उलगडूया या सदरातून बोलताना मला माझे बालपण आठवले..पाठीवरती हात ठेवून,तुम्ही फक्त लढ म्हणा कवी कुसुमाग्रजांच्या कणा या कवितेतून आपण जर आपल्या आयुष्यात डोकावून पाहिले तर नक्कीच त्याचा आपल्या आयुष्याशी संबंध आहे हे उमजून येईल..खरेतर कुसुमाग्रजांची ही कविता प्रत्येक मराठी मनाच्या जवळची आहे..अगदी साधी,सरळ मांडणी असणारी ही कविता प्रत्येक मराठी मनाला जगण्याचे धैर्य देते..तेव्हा लहानपणी या कवितेचा अर्थ इतका उमगत न्हवता पण आज आयुष्य जगताना या कवितेचा खरा अर्थ उमगतो..तसा कवितेचा अर्थ वाचनाऱ्याच्या मानसिकतेनुसार आणि अनुभवानुसार बदलत असतो पण आशय हा तोच राहतो.
मला आठवते आम्ही लहान असताना आमची आजी आम्हा भावंडांना तिचे अनुभव रात्री एकांतात उलगडून सांगत असे..तिच्या सांगण्यानुसार तिच्या आयुष्यातील मी अनुभवलेला एक किस्सा मी इथे मांडतो..आमची आजी तिच्या मुलांसह म्हणजे माझ्या वडिलांसोबत २ चुलते आणि आत्याचा सांभाळ करताना किती अडचणी आल्या याचे केलेले कथन म्हणजे एक जीवनपटच..माझे वडील म्हणजे शेंडेफळ,माझे वडील २ वर्षाचे असतानाच माझे आजोबा देवाघरी गेले..त्याच वेळी माझी आजी रस्त्याच्या एका बाजूला ३ फूट खाली एका झोपडीवजा छप्पर नसलेल्या घरात राहत होती..पावसाळ्यात तर खूपच विदारक चित्र व्हायचे घरातील भांडी पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जाणे हे नित्याचेच ठरलेले ते सावरता सावरता या लहान मुलांचा सांभाळ करणे म्हणजे तिची तारेवरची कसरत व्हायची..अश्याच एका पावसाळ्यात आजोबा गेले आणि आजीचा होता न्हवता तोही आधार गेला..जिथे एक वेळ जेवणाचे हाल व्हायचे तिथे इतक्या मुलांचा सांभाळ आणि ते ही एकटीने हे येरा गबाळयाचे काम न्हवे?..पण हे माझ्या आजीने एकटीने पेलले..माझे थोरले चुलते शिक्षण अर्धवट सोडून आजीला साथ देऊ लागले..ती दुसऱ्याच्या शेतात राबत तर होतीच पण त्याचबरोबर थोरले चुलते ला भावंडांच्या जबाबदारीची जाणीव करून देऊन दुसऱ्याच्या घरी धूनी भांडी करून स्वतः उपाशी राहून मुलांना खाऊ घालत असे.. गावातीलच जिथे आजी धुनी भांडी करत असे त्या घरातील आजीची मालकीण खूपच मायाळू होती ती तिला कामाच्या मोबदल्याबरोबर भविष्यातील मुलांच्या शिक्षणासाठी आणि राहत्या घराच्या बांधकामासाठी प्रोत्साहन देत असे तिला गुंतवणुकीचे योग्य सल्ले देत असे...त्या माऊलीच्या प्रोत्साहनाने आणि आजीच्या आणि थोरल्या चुलत्याच्या कष्टाने घर राहण्यायोग्य बांधून पूर्ण केले..आजी सांगते जर मला माझ्या मलकिनीचा आपुलकीचा हात पाठीवर नसता तर कदाचित तेव्हा मिळालेल्या पैश्याचा योग्य असा वापर करताच आला नसता. ती म्हणत असे पैसे तर खूप मिळवता येतील पण अशी पाठीवर हात ठेवून तुम्ही फक्त लढा म्हणणारी आपुलकीची माणसे मिळाली तर आयुष्यातील सर्व संकटांचा सामना करण्याची हिंमत ,आत्मविश्वास आपल्याला मिळेल जो आज खूप गरजेचा आहे म्हणून आयुष्यात अशी माणुसकी राखून ठेवणारी आपलुकीची माणसे जोडायला शिक हा सल्ला द्यायला ती विसरली नाही...आज आजी हयात नाही पण तिने दिलेल्या तिच्या अनुभवांची शिदोरी मात्र सोबत आहे.