पहाट होत असताना

🌱वि४🌿 व्हाट्सअप ग्रुप

पहाट होत असताना
Source:- INTERNET
-शुभम आशा कैलास
जिल्हा सातारा

 पहाटेची झोपेला गुलाबी झोप अस म्हंटल जाते. अत्यंत गाढ झोप असते ती. पण माझ्या बाबतीत ही झोप कधी भेटलीच नाही. लहानपणी इयत्ता 7 वी मध्ये असताना आई कडून रडून रडून सायकल विकत घेतली होती. पण सायकल विकत घेतल्यानंतर खूप पश्चाताप झाला. आईने घरखर्चासाठी ते पैसे पपांपासून लपवून ठेवले होते.  करण 'पपा ते पैसे ही दारू पिण्यात वाया घालवतील म्हणून. आईला काही तरी मदत घरखर्चामध्ये म्हणून त्यावर्षापासून मी वृत्तपेपर वाटण्याचे काम करवे असा सल्ला माझा मित्र अनिकेत याने दिला. मग काय मी सकाळी पहाटे रोज 5 ला उठू लागलो. सुरुवातीला सकाळी लवकर उठणार म्हणजे खूप आनंदाने उठायचो. दिवसाची सुरुवात कशी छान स्वच्छ हवेने व्हायची. माझं पदवीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत मी पेपर टाकण्याचे काम केले. त्यामुळे पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा अश्या तिन्ही ऋतूंची पहाट माझ्यासाठी खूप च जवळची आहे. मला नेहमी माझ्या मित्रांचा हेवा वाटायचा ते सकाळी 8 वाजेपर्यंत जगोपायचे अन मी मात्र सकाळी लवकर पहाटे उठून पेपर टाकायला जायचो. पण असा कोणताच दिवस नसे की मला कोणत्या पेपर ची हेडलाईन माहीत नसे. तो एक मला खूप मोठा फायदा झाला. जो व्यक्ती सूर्योदयापूर्वी उठतो त्याचे आयुष्य जास्त असते असाच एक लेख वर्तमानपत्रामध्ये मी वाचला होता, जेव्हा जेव्हा मला सकळी लवकर उठू वाटत नसे त्यावेळी मी स्वतःला त्या लेखाची आठवण करून देत असे. माझ्या पदवीनंतर मी तामिळनाडू च्या धान अकॅडमी मध्ये प्रवेश घेतला आणि माझं आणि पहाटेचे नाते तुटले, आणि रात्रीशी नाते जुळले.  कारण पुढच्या दिवशीचा अभ्यास करणे प्रत्येक विद्यार्थ्याला अनिवार्य होते. त्यानंतर माझे फील्ड वर्क सेगमेंट पाहिले सुरू झाले आणि मी तेलंगणा राज्यातील आदीलाबाद जिल्ह्यातील एक छोट्या आदीवासी पड्यामध्ये आलो. आणि पुन्हा माझे आणि पहाटेचे नाते सुरू झाले. इथे गोंड आदीवासी लोक सकाळी 4 ला उठतात त्यामुळे मी पण लाजेपोटी साडे 5 किंवा 6 ला उठायला लागलो. इथे महिला 4 ला पहाटे तर पुरुष 6 ला उठतात. दिवसाची सुरुवात ते त्यांचे अंगण साफ करून करतात. दिवसाची सुरुवात कोंबड्याच्या अरवण्याने होते. मी इंटरनेटद्वारा येथील तापमान पाहिले तर ते सकळी 8 डिग्री सेल्सिअस असते. इतक्या थंडीमध्ये येथील लोक उठताना पाहून मी आश्चर्यचकित झालो. काही लोक सकाळी पहाटेच बैल, गाई, आणि शेळ्यांना चरायला घेऊन जातात. मी देखील त्यांचे जीवन अनुभवण्यासाठी तसेच ओळख वाढविण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्यासोबत गेलो होतो. असे हे माझे अन माझ्या जीवनातल्या पहाटेचे नात...
‬~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Source:- INTERNET
- वाल्मीक फड
महाजनपूर नाशिक

दिवसातील सगळ्यात सुंदर क्षण म्हणजे पहाट.पहाटेचे वातावरण हे फार सुखद अनुभव देणारे असते.पहाटेच्या वेळेत कोणतेही काम केले तर ते काम अगदी योग्यच असते.म्हणून तर फार पुर्वीपासून अगदी साधुसंत सुद्धा पहाटेच ऊठून आपल्या दिनचर्येला सुरूवात करत असायचे.
का नाही?कारण पहाटे केलेली पुजा अर्चना हि अगदीच पवित्र मनाने केली  जाते.मला तर पहाटे जेव्हा मि काकडा भजन गाण्यासाठी जातो तेव्हा साक्षात परमेश्वर आपल्या समोर ऊभा असल्याचा भास होतो.इतर वेळेस अनेक भजन आम्ही गात असतो परंतु पहाटेसारखा आनंद त्या भजनांत नसतो.
पहाटेची ती हवा हि एखाद्या औषधापेक्षा कमी नाही.जेव्हा आम्ही काही कामे पहाटे ऊठून करतो(शेतीतिल)त्यावेळेस आम्हाला इतर वेळेच्या तुलनेत कधिही थकल्यासारखे जाणवत  नाही.म्हणून पहाट होत असताना व्यायाम करणे,सायकल चालविणे,पिकांना पाणी देणे,पुजा अर्चना करणे,तसेच पुस्तके वाचणे हे तर एक नंबरचे काम कारण पहाटे केलेले वाचन कधिही स्मरणातून जात नाही.अश्या अनेक गोष्टि  आहेत की,त्या पहाटे खुप सुख देत असतात.
पहाटेचा तो गारवा,आकाशातील तारे,वर आभाळाकडे पाहिले की,ते काजव्याप्रमाणे इकडून तिकडे तिकडून इकडे स्वछंद ऊडणारी विमाने ते दृश्य अगदीच मनमोहक असते.
असो संत नामदेव महाराज आपल्या एका अभंगात सांगतात "ऊठोनी पहाटे/विठ्ठल पहा ऊभा विटे/चरण तयाचे गोमटे /अमृतदृष्टि अवलोका."तसेच पुर्वीपासून आपल्याकडे एक म्हण प्रचलित आहे तशी संतवाणिच म्हणावि लागेल.
पहले प्रहर सब जागे
दुसरे प्रहर भोगी
तिसरे प्रहर तस्कर जागे
चौथे प्रहर योगी.चौथा प्रहर म्हणजेच पहाट म्हणूनच ती होत असताना शुभ असते,पवित्र असते,मायाळू असते म्हणूनच पहाट हविहवीसी वाटते.चुकले तर माफी असावी.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


Source:- INTERNET
-सौदागर काळे,
पंढरपूर.

पहाटेचं आणि लिंबानानाचं खूप वर्षांपासूनचं नातं.बरोबर चारच्या ठोक्याला हा म्हातारा उठतो.बाहेर जाऊन येणार. मग गुराखालील घाण काढणार.गोठ्यातील शेळ्या व्हरांड्यात बांधणार.गोवऱ्याच्या राखेने दात घासणार. खाकरण्याचा आवाज त्यात वेगळाच.दोन-चार दगडे मांडून केलेल्या अंघोळीच्या जागेत एकाच बादलीत गार पाण्याने अंघोळ करणार.(लय गारठा पडला की थोडं सोमट पाणी करतो.)गार पाण्याचा तांब्या अंगावर पडताच आपल्या कुलदेवताच्या नावाचा गजर करणार.हा आवाज साऱ्या गल्लीत घुमत राहतो.काहीजणांच्या साखरझोपेतल्या सपनात सुद्धा हा आवाज मिसळत असणार.तोपर्यंत पाच वाजल्याला असतात.गल्लीतल्या लोकांना लिंबानाना म्हणजे घड्याळ .त्याच्या आवाजाने लोक उठतात.आता काही वेळातच तांबडं फुटेल असं समजून गल्लीतल्या बाया आपल्या दिवसाची सुरुवात करायला सुरू करतात.लिंबानाना उठल्यापासून काम करतो.घरची उठो अथवा न उठो तो आपलं बिगिबिगी काम करत राहणार.अंघोळ झाल्या झाल्या चहा करण्यासाठी चुलीवर भांडं ठेवतो.रात्रीचा विस्तव चुलीत तवा झाकून तसाच ठेवल्यामुळे पहाटे चगाळ,कागद टाकलं की फुकारीने फुकताच चूल ढणाढणा पेट घेते. सूर्याला नमस्कार करण्याच्या अगोदर आपलं अंघोळ झालेले त्वांड असलं पाहिजे.असं मला लिंबानाना नेहमी सांगतो.लिंबानाना मध्ये प्रत्येक ऋतूची पहाट भरभरून भरली आहे.कधी हिवाळ्याची,कधी पावसाळ्याची तर कधी उन्हाळ्याची पहाट.कोंबंडं आता कधीही ओरडतं म्हणून त्याच्यावर भरवसा नसल्यामुळे चंद्र,चांदण्या, आभाळाचा रंग पाहून अजून तांबडं फुटायला किती अवकास असेल.यावरून लिंबानाना पहाटे उठण्याचा अंदाज बांधतो. लिंबानानाला लिहिता-वाचता येत असते तर! तर काय?त्यांनी दुर्गा भागवत यांच्यासारखं निसर्गाने ओतप्रेत भरलेलं "ऋतुचक्र " पुस्तकासारखं एखादा पहाटेवर लेख लिहिला असता का!असं उगच मनात येतं.प्रत्येक माणसात काहीतरी दडलेलं असतं तसं लिंबानाना मध्ये पहाट दडलेली होती.

हिवाळ्यात बरोबर आमच्याकडे ऊसतोडणी सुरू होते.तेव्हा पहाटे पहाटे ऊसबैलगाड्या एका मागून एक रस्त्याने जात असतात.तेव्हा त्या बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज पहाटेच्या शांततेला संगीत देत असतो. पहाट होत असताना कुठंतरी ऊसाच्या फडात कोयत्याचे पाते कपकपा ऊस कापत असते. त्याचाही आवाज वातावरणात घुमत असतो.हा आवाज वेदनेचा,कष्टाचा असतो.एकपारगी कामाला जाणाऱ्या बाया पहाटे उठून भाकरी धपा धपा थापत असलेला आवाजही कानी पडतो.दुसऱ्या बाजूला गावातील दत्ताच्या देवळात पुजाऱ्याने सुरू केलेली काकडा आरती त्या वातावरणास प्रसन्न करते.आरती सुरू होताच गावातील मोकाट कुत्री मंदिराजवळ जाऊन एका स्वरात ओरडू लागतात. लिंबानानाच्या मते,ही दत्ताचीच कुत्री आहेत.काही महिन्यांपूर्वी देवळात इलेक्ट्रॉनिक घंटीची मशीन बसवलीे.त्याचा आवाज खूप मोठा येतो.म्हणून कुत्री त्या आवाजाला प्रतिसाद देत नाहीत.हे पाहून लिंबानाना गाववाल्यांना मशीन बसवल्यावरून नेहमी शिव्या देत असतो.लिंबानाना नेहमी आम्हांला एक सांगतो,'पयल्या बाया तांबडं फुटायच्या अगोदर जात्यावर दळण दळयाच्या तेव्हा त्या ओव्या गायच्या.त्यांचा आवाज दूरवर पोहोचायचा.आज पिठाच्या गिरण्या आल्या.बायाचं कष्ट हलकं झालं बरं झालं पण पहाटेच्या ओव्या जात्याबरोबर कायमच्या गेल्या.'

थंडीचे दिवस आले की,आम्ही गल्लीतल्या पोरांनी खूप वेळा व्यायाम करण्याचे नियोजन केलेले असायचे.मग पहाटे पहाटे साऱ्यांच्या घराजवळ दाराची कडी हालवणे,हाका मारणं,त्याला जागं करणं हा वेगळाच व्यायाम अर्धाभर तास चालायचा.कधी कधी एखाद्या घरापसलं कुत्रं भुकायचं.त्याला दगड मारण्यापेक्षा आमचा ओळकीचा आवाज पटला की मग ते शेपूट घोळून शांत पडायचे.शेतात पाखरं राखणं हा वेगळाच कार्यक्रम ठरलेला असतो.अगोदर ज्वारीच्या पिकांसाठी आणि आता आमच्या भागात द्राक्षेच्या बागांसाठी पाखरं राखतात.त्याचाही आवाज पहाटे साऱ्या गावांत पसरतो.

पहाट होत असताना मांजराची भांडणं,उंदीर-घुस यांच्या हालचाली,पक्ष्यांचा आवाज,झाडांची-पिकांची हालचाल तसेच विविध ठिकाणी आतापर्यंत गेलो तेथील पहाट. ते वर्णन करायला खरंच मजा येईल.अजूनही आपले शब्द त्या पहाटेला योग्य न्याय देणार नाहीत. म्हणून त्या अनुभवल्याला पहाट तशाच डोळ्यासमोर आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात पहाट असते.आपण ती अनुभवत नाही.पहाट होत असताना...ती मावळतेकडे झुकतच असते.आपलंही आयुष्य तसंच...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


Source:- INTERNET
-संगीता देशमुख,
वसमत

रात्रीच्या प्रदीर्घ आरामानंतर निसर्गाच्या कुशीत जेव्हा पहाट जन्माला येते तेव्हा सृष्टीच्या रोमारोमात चैतन्य भरलेले दिसते. हळूहळू अंधाराचे साम्राज्य संपत आलेले असते आणि इकडे विजयाचा गुलाल  प्राचीवर उधळीत रविराजांचे आनंदाने आगमन होते. जणू सत्तेवरून एकजण पायउतार होतो तर दुसरा सत्तेवर विराजमान होतो. हा रविराज सर्व सजीवांच्या जीवनातील अंध:कार नष्ट करून प्रत्येकाच्या जीवनात हर्षोल्हासाची किरणे पेरीत येतो. यात त्याच्या स्वागताला जी कष्टाळू,निरलस लोकं सज्ज असतात,त्यांच्या जीवनात तो चैतन्य भरतो,आरोग्य देतो तर निशाचर, आळशी लोक या आनंदाला आणि आरोग्यदायी वातावरणाला  मुकतात. ही पहाटच अशी आहे की,माणसाला,सृष्टीला प्रत्येक दिवसाची सुरुवात नव्या जोमाने,नव्या उमेदीने साजरी करायला शिकवते. म्हणूनच वृक्षवल्लीवर जुन्या फुलांची गळती होऊन नव्या फुलांचा बहर आलेला पहाटेच दिसतो,सगळी वृक्षवल्ली टवटवीत आणि गुबगुबीत हसऱ्या बाळासारखे. माणसेही अंतर्बाह्य स्वच्छ होतात. स्नानादी विधी करून बाह्यांगाने तर ध्यानधरणेने अंतरांगाने स्वच्छ होतात. ही दिवसाची सुरुवात दिवसभराच्या कामासाठी,कर्तव्यासाठी पुरत असते.
             प्रत्येक ऋततली पहाट ही वेगळी भाfसते. पावसाळ्यातली पहाट कधी  झिमझिमणारा पाऊस कधी रपरपणाऱ्या पावसाला घेऊन येते. हा पाऊस सर्व सृष्टीला अभ्यंगस्नान घालत असतो. आणि हे अभ्यंगस्नान आपण चहाचा घोट घेत घेत  खिडकीतून पहात असतो. बाहेर गोठ्यात जनावरे दडून बसतात तर पक्षी कुठेतरी झाडाच्या खोपीत दबा धरून बसलेले असतात. हिवाळ्यातली पहाट अतिशय मनोहर असते. बाहेर कोंबड्याची आरव ऐकू आली की कळते,पहाट झाली  हिवाळ्यातली रात्र एवढी मोठी असूनही थंडीचा गारवा पहाता ही रात्र अजून थोडी मोठीच असायला हवी होती,असं वाटतं. आजीच्या,आईच्या कुशीची ऊब संपूच नये वाटते. बाहेर निसर्गाने धुक्याची चादर पांघरून घेऊन तोही पहाटेच्या कुशीतच निपचित पडलेला असतो. पानांफुलांवर दवबिंदूनी आपला साज चढवलेला असतो. पक्षी झाडाच्या कुशीतून आपल्या पंखांना हळूच फडकवून अन्नसंशोधनाच्या मार्गी लागलेले असतात. पाखरांची ही किलबिल पहाटेच्या पायात जणू पैंजण घालून सगळ्यांच्या स्वागताला तयार करत असते. हिवाळ्यातली श्रीमंत लोकांची पहाट ही गरम कपड्यात लपेटलेली तर गरीबांच्या उघड्यानागड्या अंगावरून काढता पाय घेणारी असते. श्रीमंताच्या अंगावर पौष्टिक पदार्थ मूठभर मांस चढविणारी तर गरीबाच्या अंगावर  उललेल्या हातापायावर झोपडीचे आणि नशिबाच्या गुंतागुंत झालेली रेखाचित्र रेखाटलेली असते. तर उन्हाळ्यातली पहाट ही आरामात येणारी,रात्रभर घामाच्या धारा अंगात मुरवून सकाळी गार वाऱ्याच्या झुळकेने पुन्हा साखरझोप देणारी,माणसात आळशीपणा भरणारी आणि लवकरच दशदिशांत सोनेरी किरणांची उधळण करणारी पहाट!
          शहरातली आणि गावाकडची पहाट यातही तोच फरक! गावातली पहाट कुठे जात्यावरचे संगीत,गाईगुरांच्या हंबरण्याचे संगीत,त्यांच्या गळ्यातील घुंगराच्या किणकिणीचे संगीत,दुधाच्या धारेचे संगीत,अंगणं झाडून पडलेल्या  सड्याचे संगीत,झाडावेलीवर पाखरांचा गुंजरव,विहिरीतून पाणी शेंदण्याचे संगीत, तर पहाटेच शेतात पोहोचलेल्या बळीराजाच्या ललकारीचे संगीत! आणि त्यासोबतच घराघरातून दरवळणारा चहाचा घमघमाट!माणसाला एका वेगळ्याच जगात घेऊन जातो. शहरातील पहाट म्हणाल तर रात्री उशिरापर्यंत जागे असलेल्या लोकांना पहाटेच दर्शन होत नाही. पण आरोग्याबद्दल जागरूक असणाऱ्या शहरातील लोकांची पहाट ही रस्त्यावर "मॉर्निंग वॉक" घेऊन सुरू होते. ती पहाट यांना आरोग्यदायी ऑक्सिजन पुरवते.
अशी ही पहाट सगळ्यांसाठीच वेगवेगळ्या रूपाने,ढंगाने प्रकट होते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Source:- INTERNET
-श्रीनाथ कासे
सोलापूर

काळ्याकुट्ट रात्री कोणीही नव्हता माझ्यासोबत
जो, तो, सगळेच आले, पहाट होत असताना...

बुडत्याला नाही कोणी वाली, उगवत्याला स्वागत,
सर्व विसरतात अंधार्‍या रात्री, पहाट होत असताना...

ज्याने - त्याने करावे होईल तेवढे भुंग्याला मदत
फुलालाही फुलावे लागते, पहाट होत असताना...

अनेक गोष्टी घडत बिघडत असतात या आयुष्यात
गरिबालाही जगावे लागते, पहाट होत असताना...

सृष्टीचाच नियम, शितल चंद्र सकाळी नाही चालत,
सूर्यालाही जळावे लागते, पहाट होत असताना...

सावित्रीमाई आणि आजची स्त्री

🌱वि४🌿 या व्हाट्सअप ग्रुपवरून

सावित्रीमाई आणि आजची स्त्री

Source: INTERNET
- मयुर डुमणे, उस्मानाबाद

स्त्री म्हणजे प्रजोत्पादनाचे मानवी साधन, स्त्री ही पायाची दासी  असून तिने पुरुषाच्या सुखासाठी उभे आयुष्य खर्च करावे, स्त्रीने शिक्षण घेणे म्हणजे धर्म बुडविणे, स्त्री शिकायला लागली की विधवा होते अशा खुळचट समजुती ज्या समाजात रूढ होत्या त्या समाजात स्त्रियांच्या शिक्षणासाठी झटणारी देशातील पहिली महिला शिक्षिका, सनातन्यांकडून होणाऱ्या हल्यांना न घाबरता  शिक्षणातून प्रतिगामी समाजात क्रांतीची बीजे रोवणारी धाडसी महिला समाजसुधारक म्हणजे सावित्रीबाई फुले होय. महात्मा फुल्यांनी सावित्रीला शिकवून समाजसुधारणेची सुरवात स्वतःच्या घरापासून केली. सावित्रीच्या रूपाने त्यांनी स्त्री शिक्षणाच्या बिजाचे रोप लावले. त्या रोपाचे मोठया वटवृक्षात रूपांतर होऊन प्रतिगामी समाजाच्या विचाराला चालना मिळाली. स्त्रिया शिकल्या तरच त्यांच्यावरील पिढ्यानपिढ्या होत असलेला अन्याय दूर होईल, स्त्री शिक्षणामुळे बुरसटलेला समाज देखील शहाणा होईल म्हणून फुल्यांनी 1 जानेवारी 1848 रोजी सनातन्यांच माहेरघर असलेल्या पुण्यातील भिडे वाड्यात भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. देशातील या पहिल्या मुलींच्या शाळेची पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले झाल्या. मुलींना शिकवण्याच धाडसी काम त्यांनी हाती घेतलं. फक्त मुलींसाठीच शाळा काढुन ते थांबले नाहीत तर ज्या समाजाला पाणी पिण्याचा अधिकार नाकारला होता, ज्यांची सावली पडली तरी विटाळ होत होता अशा महार, मांग आणि चांभार यांच्या मुलामुलींसाठी देखील त्यांनी शाळा सुरू केल्या.1848 ते 1852 पर्यंत त्यांनी अठरा शाळा सुरू केल्या होत्या.  प्रतिगामी समाजात हे काम करणं सोप्प नव्हतं. ज्या जोतिबांना शूद्र आहेस म्हणून ब्राह्मणांच्या वरातीतून हाकलून दिले त्यांनीच आपल्या पत्नीस शिकवून तिच्याकडून ब्राह्मणांच्या मुलींना शिकविण्याचा त्यांच्या बालेकिल्यात प्रयत्न करणे मोठे धाडसाचे काम होते. त्यांच्या बालेकिल्ल्यात राहून महार,मांगासाठी शाळा उघडून त्यांना समाजाचे घटक बनविणे हे तर त्याहून मोठे धाडसाचे काम होते. सावित्रीबाई फुले शाळेला जात असताना सनातनी लोकांकडून त्यांच्यावर चिखलाचा,शेणाचा,दगडाचा मारा करण्यात आला. कुचेष्टा केली, शिव्याशाप दिले. हा सर्व मानसिक आणि शारीरिक छळ सहन करत सावित्रीबाई मोठ्या धैर्याने लढत राहिल्या. शाळेच्या पहिल्या दिवशी फक्त सहा मुली होत्या. मुली शिकू लागल्या. शाळेत मुलींची संख्या वाढावी म्हणून ज्योतीराव आणि सावित्री यांनी पालकांना स्त्री शिक्षणाच महत्व पटवून दिले. हळूहळू शाळेतील मुलींची संख्या वाढू लागली. आपली मुलगी शिकतेय याचा पालकांनाही आनंद होऊ लागला मात्र हे सर्व सनातनी लोकांना सहन होणे शक्य नव्हते. सावित्रीबाईंच्या शाळेला प्रसिद्धी मिळत असल्यामुळे सनातन्यांचा जळफळाट झाला. त्यांनी सावित्रीबाईंची वाट अडवायला गुंड पाठवले. गुंड सावित्रीबाईंच्या अंगावर येऊ लागले त्यावेळी सावित्रीबाई फुले यांच्यातील रणरागिणी जागी झाली. त्यांनी गुंडाच्या कानशिलात लगावली. सावित्रीच्या त्या रौद्र अवतारापुढे सनातन्यांची पळता भूई थोडी झाली. यानंतर सावित्रीच्या वाटेस कोणी जाण्याची हिंमत केली नाही. एवढ्यावर सनातनी गप्प कसे बसणार? त्यांनी धर्मनिष्ठ,भोळ्या असणाऱ्या जोतिरावांच्या वडीलांवर म्हणजे गोविंदरावावर धर्माची भिती दाखवून दबाव निर्माण केला.सनातनी प्रवृत्तीला ते बळी पडले. गोविंदराव जोतिरावांना म्हणाले,"तुझं काम नाही ना पटत ब्राह्मण समाजाला, मग दे सोडून ते काम आणि शेतीवाडी कर. स्त्री शूद्राला शिक्षणाचा अधिकार नाही तर त्याच्यासाठी अट्टाहास का करतोस? " जोतीराव आपल्या ध्येयावर ठाम होते. सनातन्यांच्या दबावाला बळी पडलेल्या गोविंदरावांनी नाईलाजाने, मोठ्या जड अंतःकरणाने, जोतिरावांना घराबाहेर जाण्यास सांगितले. शिक्षणाच्या पवित्र कार्यात स्वतःला झोकून देणाऱ्या सावित्रीनेही आपल्या पतीला साथ दिली. समाजाच्या उद्धारासाठी जोतीराव आणि सावित्रीबाईंना स्वतःच्या घराचा त्याग करावा लागला.  सावित्रीबाईंचे कार्य केवळ शिक्षणापुरते मर्यादीत राहीले नाही. बालवयात विधवा झालेल्या स्त्रीयांवर त्यांच्या तरुणपणात पुरुषांकडून अत्याचार होत असत. पुरुष स्वतःची वासना पूर्ण करून मोकळे होत पण त्या अत्याचाराचे गंभीर परिणाम स्त्रियांना भोगावे लागत. अत्याचारामुळे गरोदर राहिलेल्या विधवा स्त्री पुढे दोनच मार्ग होते एक भ्रूणहत्या आणि दुसरा आत्महत्या. विधवा स्त्रियांची ही अडचण दूर करण्यासाठी जोतिरावांनी सावित्रीबाईच्या मदतीने 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. अनेक तरुण विधवांच्या आत्महत्या,भ्रूणहत्या या गृहामुळे रोखल्या गेल्या. विधवांना नको असलेल्या बाळाचा सांभाळ स्वतः सावित्रीबाईंनी केला. विधवा स्त्रियांचे केशवपन ही त्या काळातील अनिष्ट प्रथा होती. या अनिष्ट प्रथेविरुद्ध आवाज उठविण्याची विनंती सावित्रीबाईंनी जोतिरावांकडे केली. जोतिरावांनी केशवपन प्रथेविरुद्ध नाभिकांचा संप घडवून आणला. माणुसकीला काळीमा फासणारे हे घृणास्पद कृत्य न करण्याचे आवाहन त्यांनी नाभिक समाजाला केले. नाभिक समाजानेही जोतिरावांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला. सावित्रीबाईंच्या प्रेरणेने जोतिरावांनी घडवून आणलेल्या या संपामुळे केशवपनाची प्रथा कमी होण्यास मदत झाली. विधवा पुनर्विवाहासाठी त्यांनी प्रयत्न केले. अस्पृश्यांच्या स्पर्शाने विटाळ होतो म्हणून त्यांना जगण्यासाठी आवश्यक असणारे पाणी देखील दिले जात नव्हते अशावेळी जोतिरावांनी घरातील पाण्याचा हौदच अस्पृश्यांसाठी खुला केला ही मोठी क्रांतिकारक घटना होती. सनातनी पेशव्यांनाच त्यांनी आव्हान दिले होते. जोतिरावांच्या आयुष्यातील अशा प्रत्येक क्रांतिकारी घटनेला सावित्रीबाईंनी मोलाची साथ दिली. सावित्रीबाई माहेरी गेल्यावर त्यांचा भाऊ त्यांना म्हणाला की तू व तुझ्या नवऱ्याला वाळीत टाकले असून तुम्ही दोघे महार मांगासाठी जे काम करता ते पाप आहे त्यामुळे आपल्या कुळास बट्टा लागला आहे. तुम्ही नवरा बायकोने जातीप्रथेस अनुसरून व भट सांगेल त्याप्रमाणे आचरण करावे" सनातनी लोकांनी पेरलेले जातीचे विष किती खोलवर रुजले होते याची प्रचिती सावित्रीबाईंच्या भावाने केलेल्या या संवादातून दिसून येते. सावित्रीने त्याला समजावून सांगितले, भट लोक जेव्हा सोवळ्यात असतात तेव्हा तुला विटाळच मानतात, तुला पण महारच समजतात, आम्ही मुलींना महार मांगांना शिकवतो, विद्या देतो हेच त्यांना नकोय म्हणून ते लोक असे वागतात"
अर्धांगवायूचा झटका आल्यामुळे अंथरुणाशी खिळलेल्या पतीची सेवा सावित्रीबाई करत राहिल्या. अखेरच्या क्षणी सावित्रीबाईंविषयी कृतज्ञता व्यक्त करताना महात्मा फुले म्हणतात, सावित्रीने माझ्यासोबत 50 वर्षे जीवनप्रवास केला. तिच्या साथीमुळेच मी समाजोपयोगी काम करू शकलो. या काळात तिने खूप हालअपेष्टा सोसल्या, मानहानी पत्करली पण ती मानवतेच्या कार्यापासून तसूभरही ढळली नाही"  सामाजिक कार्यामुळे घराकडे दुर्लक्ष झाले. आर्थिक परिस्थिती खालावली. या सर्व बिकट परिस्थितीला सावित्रीबाईंनी धैर्याने तोंड दिले. जोतिरावांच्या अंत्ययात्रेसाठी दत्तक पुत्र यशवंताने हातात टिटव धरल्यावर भाऊबंदकीने मोठा गहजब केला. या गोंधळाला थांबविण्यासाठी सावित्रीबाई स्वतः पुढे आल्या आणि त्यांनी ते टिटव हातात घेतले. एवढेच नाही तर जोतिरावांच्या चितेला त्यांनीच अग्नी दिला. सावित्रीबाईंच जीवन अशा क्रांतिकारी घटनांनी वेढलेले आहे. जोतिरावांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाजाची धुरा सावित्रीबाईंनी यशस्वीपणे सांभाळली.  सावित्रीबाई फुलेंच संपूर्ण जीवनच संघर्षाने व्यापून टाकणारे आहे. त्यांनी केलेल्या संघर्षामुळे आजची स्त्री विविध क्षेत्रात भरारी घेत आहे, परंतू अतिशय वेगवान झालेल्या या आपल्या जीवनात आपण सावित्रीबाईंनी केलेलं महान कार्य विसरत चाललोय हे अतिशय खेदाने नमूद करावं लागतंय. केशवपन, बालविवाह इत्यादी धर्माच्या नावावर महिलांवर अन्याय करणाऱ्या प्रथांविरुद्ध टोकाची प्रतिकूल परिस्थिती असताना सावित्रीबाई लढल्या. आजच्या मुली स्वतःला सावित्रीच्या लेकी म्हणवून घेतात पण हुंड्यासारख्या अन्यायकारी प्रथेला साधा विरोध सुद्धा करत नाहीत, हे दुर्देव आहे. आजही या पुरुषप्रधान समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते. लग्न झाल्यावर मुलीनेच मुलाच्या घरी का जायचं? मुलीनेच मंगळसूत्र का घालायचे?  मुलीनेच स्वयंपाक, घरकाम का करायचे? हे प्रश्न आतापर्यंत किती मुलींनी या पुरुषप्रधान समाजाला विचारले? धर्म आणि परंपरेच कारण पुढे करून हा पुरुषप्रधान समाज आजही स्त्रियांना दुय्यमच लेखतोय. मासिक पाळीच कारण पुढे करून महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही. सावित्रीच्या लेकींनी अशा प्रथेविरुद्ध आवाज उठविणे अपेक्षित आहे. विविध क्षेत्रात महिला प्रगती करीत असल्या तरी आजही महिलांचा सामाजिक,राजकीय सहभाग कमी आहे. चूल आणि मुल एवढ्यापुरतच जीवन असणारी एकेकाळची स्त्री आता विविध क्षेत्रात भरारी घेऊन स्वतःच कर्तृत्व सिद्ध करत असलं तरी सावित्रीच्या लेकींचा संघर्ष अजून संपलेला नाही. कारण आजही बराचसा समाज स्त्रीकडे वस्तू म्हणूनच बघतोय या मानसिकतेविरुद्ध सावित्रीबाईंची लेकींना लढावे लागेल.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Source: INTERNET
भर्तरी उद्धव कोळेकर
पिंपरखेड,उस्मानाबाद

रुसो नसता तर फ्रेंच राज्यक्रांती झालीच नसती असे समर्पक गौरउद्गार नेपोलियन बोनापार्ट याने  रुसो च्या फ्रेंच राज्यक्रांतीतल्या योगदानाबद्दल काढले होते.अगदी त्याच प्रमाणे महात्मा फुले नसते तर सावित्रीबाई नसत्या असे म्हणावे लागेल.नामदेव तुपाची वाटी घेऊन कुत्र्याच्या मागे लागले,तर ज्ञानदेवांनी काशीहून आणलेलं तीर्थ गाढवाला पाजलं पण जोतिबानी माणूस मणहून नाकारलेल्या मांगा महारांना पाणी पाजल(हे वास्तव आहे) हे जोतिबांचे मोठेपण.विद्येविना मती  गेली,मतिविना नीती गेली,नीती विना गती गेली,गती विना वित्त गेले,वित्त विना शूद्र खचले, इतक्ये अनर्थ एका अविदेये केले.इतक्या समर्पकपणे शिक्षणाचे महत्व सांगणारे व उक्तीप्रमाणेकृती करून, ज्या काळी स्त्री च्या डोक्यावरून पदर पडल्यावर शिक्षा केली जात होती त्या काळी आपल्या पत्नी ला शिक्षण दिले. आज एकविसाव्या शतकात आपण मुलींच्या परगावी शिक्षणा बद्दल काचरतो तर त्या काळी हे वाघाचेच काम म्हणावे लागेल.एखादा नवरा आपल्या पत्नीपाठी उभे राहिल्यावर काय घडते याचेच हे मूर्तिमंत उदाहरण.महाराष्ट्राची पहिली स्त्री शिक्षिका, पहिली मुख्यद्यापीका,आद्य कवयित्री आद्य समाजसुधारक(सुबोध रत्नाक,बावनकशी कवितासंग्रह) आणि जोतीरावांच्या प्रत्येक कार्यामध्ये जशे केशवपन, बालविवाह, विधवाविवाह व प्रतिबंध,मुलींसाठी शैक्षणिक कार्यत अखेरच्या स्वासपर्यंत योगदान दिले.इतिहासात पाहिल्यावर गार्गी,मायित्री, मुक्ता,जनाबाई,कान्होपात्रा, मा जिजाऊ अलीकडच्या किरण बेदी,अवनी चतुर्वेदी(पहिली लढाऊ महिला विमान वैमानिक),स्वाती महाडिक(कर्नल),सुमित्रा महाजन,निर्मला सीतारामन अश्या वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत स्त्रिया पाहिल्यावर उर भरून येतो,परंतु त्याच निर्मला सीतारामन संरणक्षण मंत्रीपदावर रुजू होताना आपल्या कार्यालयात मोठी महापूजा करतात त्या वेळी खंत वाटते(मी कुठल्या हि धर्मावर टीका करत नाही).21 व्या शतकातील आधुनिक मनःवली जाणारी स्त्री जेव्हा भिडे वाड्यामध्ये सावित्रीबाईंना मारलेल्या दगडांची पूजा करते, तेव्हा ती अजूनही विचाराने अपूर्ण वाटते.कशी असेल सावित्री च्या मनातील आज ची स्त्री आत्मनिर्भर, स्वाभिमानी, विज्ञानाची कास धरणारी,स्वतःचा विचार असणारी नक्कीच असेल.सावित्री च्या शाळेत शिकलेली चिमुकली मुक्ता साळवे त्या काळी विकटोरिया राणीला पत्र पाठवून,आम्हाला खाऊ नको तर पुस्तके दे मनःते यावरून सावित्रीच्या विद्यार्थ्यांची कल्पना येते. तसेच ताराबाई शिंदे जिने नंतर स्त्री पुरुष तुलना नावाचा ग्रंथ लिहिला.सावित्रीबाईंनी मुलींना शिक्षण हे सत्संगाला जाण्यासाठी,पारायणे करण्यासाठी, नवऱ्याला गोडधोड पदार्थ करून खाऊ घालण्या नाही दिले तर मुक्ता साळवे सारखे प्रश्न विचारण्यासाठी दिले आहे असे वाटते.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Source: INTERNET
संगीता देशमुख,वसमत

        सावित्रीबाई फुले यांचा कालखंड हा एकोणिसाव्या शतकातील आहे. त्याकाळात स्त्रियांचे दमन हे अनेक प्रकारे होत असे. अंधश्रद्धाच्या बळी ह्या महिलाच होत्या. यातून या महिलांना बाहेर काढायचे असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा मार्ग नाही,हे महात्मा फुल्यांनी ओळखले होते. त्याकाळी अनेक अंधश्रद्धापैकी एक महत्वाची अंधश्रद्धा होती की,जर स्त्री शिकली तर तिचा नवरा मरतो. तिच्या  सात पिढ्या नरकात जातात. महात्मा फुल्यांना यातील फोलपणा माहीत असल्याने त्यांनी अशा अंधश्रद्धाना न जुमानता सावित्रीबाईला शिकवून मुलींची शाळा पुण्यात सुरू केली,ज्याला स्त्रीउध्दाराचा राजमार्ग आपण म्हणू शकतो. ज्योतिबासारखे समाजात पुरुष आजही असतील पण त्याकाळात सावित्रीबाईने असे धाडसाचे पाऊल उचलणे म्हणजे खरी क्रांती होती ती! समाजाच्या घातक रुढीपरंपराना विरोध करून स्त्रीच्या उध्दारासाठी पतीच्या खांद्याला खांदा लावून काम केले. पण आज विज्ञानाचे,तंत्रज्ञानाचे युग असूनही स्त्री आज किती बुरसटलेल्या विचाराची दिसून येते. आज शिक्षण घेऊन सुशिक्षित झालेली स्त्री अजूनही अंधश्रद्धाच्या विळख्यात अडकलेली आहे. खेदाने म्हणावे लागते  की,अशा स्त्रियांमध्ये शिक्षणाने ना आत्मभान जागे झाले ना आत्मसन्मान,ना ही सामाजिक भान! चार भिंतीच्या बाहेर पडणाऱ्या स्त्रिया घरगुती स्त्रियांवर टीका करतात,तर घरगुती स्त्रिया घराबाहेर पडणाऱ्या स्त्रियांना नावबोट ठेवतात. आजच्या स्त्रियांची मानसिकता पाहता शिक्षणाने यांना विशाल,वैज्ञानिक दृष्टिकोन दिला नसून फक्त कागदावर डिग्री दिली एवढेच म्हणावे लागेल. सावित्रीमाई स्वतः शिकून जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत समाजासाठी जगल्या आणि आजच्या स्त्रीने स्वतःला शोभेच्या बाहुलीप्रमाणे सजवणे आणि आपली दोन मुले आणि नवरा यापलीकडचे विश्वच नाकारले. आजची स्त्री कमालीची आत्ममग्न आहे. स्त्रियांच्या वैचारिक दृष्टिकोनात दिडशे वर्षात जो बदल व्हायला हवा होता तो झालेला नाही.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


Source: INTERNET
-करण बायस
आ.बाळापूर
जि. हिंगोली

जवळपास सर्वच धर्मानी स्त्रियांना कमी लेखल आहे. त्यांना एक दुय्यम दर्जेच स्थान दिलं. स्त्री म्हणजे पायातील वाहन असं बोलून स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जाते.स्त्री ही स्वतंत्र राहण्यास पात्र नाही तिने लहान असताना आपल्या वडिलांच्या आज्ञा पाळावी, लग्नानंतर नवऱ्याची आणि म्हातारपणी मुलाची आज्ञा पाळावी ही एक समाजची मानसिकता होती/आहे.यज्ञावल्क्य यांनी अस म्हटलं आहे की ज्या स्त्रीला भाऊ नाही तिच्याशी लग्न करू नये. ज्या स्त्रीला मुलगा नाही तिला घटस्फोट देऊन माणूस दुसरा विवाह करू शकतो,असं मनुस्मृती कौटिल्य अर्थशास्त्रात लेखल आहे.
सुश्रुत यांनी असं सांगितलं की विवाहासाठी मुलीचे वय वर्ष १६ व आणि पुरुषाचे वय वर्ष २५ हे योग्य वय असते, पण हे नजुमानता समाजात बालविवाह पद्धतीला वाव मिळाला.
लग्नानंतर स्त्री आपल्या वडिलांचं घर सोडून पतीच्या घरी जाते,वडिलांनी ज्या मुलाशी लग्न लावून दिल ते अनुरूप असो वा नसो,मुलीने त्याची सेवा केली पाहिजे असं धर्म सांगतो.
धर्माने सांगितल्याप्रमाणे काही धार्मिक कर्मकांड, व्रत,वेगवेगळ्या विधी करणे यात स्त्रियांना गुंतवून ठेवण्यात धर्माला मोठं यश मिळालं आहे. या गोष्टींनी स्त्रियांना चार भिंतीमध्ये ठेवलं आणि त्यांचं स्वतंत्र हिरावून घेतलं.

अनेक संत समाजसुधारकांनी आपल्या परीने समाजात स्त्रियांचा सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न केले.महाराष्ट्रात १९ फेब्रुवारी १६३० रोजी एका आत्म्याने जन्म घेतला ज्यांनी स्त्रीयांचा सामाजिक दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न केला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.हजारो वर्षांपासून सुरू असलेल्या अनिष्ठ परंपरांना मोडत महाराजांनी स्त्रियांचा मानसन्मान वाढवला.

अनिष्ठ परंपरना समाजाचा द्वेष पत्कारून विरोध करणारी, स्त्री शिक्षणाचा पाया रचणारी,अज्ञानाच्या अंधारास ज्ञानाची मशाल पेटवणारी ती म्हणजे सावित्रीमाई.स्त्रियांचा सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी आपलं आयुष्यभर प्रयत्न करणाऱ्या समाजसुधारकांमधील एक म्हणजे ’सावित्रीमाई’.
आज एकही क्षेत्र असं नाही की जिथे स्त्री नाही.आजची स्त्री स्वावलंबी झाली आहे.प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.स्त्री शिक्षण घेते, जॉब पण करते.
स्त्री आपली बाहेरची जबाबदारी सांभाळत घरची पण जबाबदारी सांभाळते.
स्त्री ही या सर्वांमध्ये स्वतंत्र झाली आहे पण कुठं तरी एका संकल्पनेतुन ती सुटली नाही ते म्हणजे ’चूल आणि मूल’ . या संकल्पनेतसुद्धा,स्त्रीला यातून मुक्त करण्याची एक मोठी प्रक्रिया ती आपल्या मानसिकते वर अवलंबून आहे.
काही विकसित देशांकडे बघितलं तर स्त्रियांनी पण आपल्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि तो भारतात पण चालू आहे आणि नक्कीच बदल घडून येईल.

कविता निर्मिती ...एक कौशल्य!

कविता निर्मिती ...एक कौशल्य!

सिमाली भाटकर,रत्नागिरी.
काव्यात्मक कौशल्य ज्यांचे ठायी
त्यांनी साकारली जगाची नवलाई

   " भावनेचा हृदयस्पर्शी अविष्कार म्हणजे कविता"
काव्य ही अशी कलाकृती आहे ज्यातून आसमंत नव्हे तर संपूर्ण विश्वातील सजीव निर्जीव सर्व प्रकारच्या वस्तू त्यांच्या मन आणि भावना कवी आपल्या शब्दांत मांडत असतो म्हणून अस म्हणतात "जे न देखे रवी ते देखे कवी"
       उस्फुर्त प्रेम असो अथवा मुक्यांची भावना असो नाहीतर नदी समुद्राचे निखळ नाते असो कवी ते शब्दांच्या संगतीत असे काही जोडतात की सप्तरंगी इंद्रधनू विविधांगी रूपाने रेखाटले आहेत. कविता करणे हे कौशल्य म्हणण्या पेक्षा ती एक भावना आहे, ज्या मानवी मनाने टिपल्या आणि कागदावर रेखाटल्या. कलात्मक तेचे भाव प्रत्येकाच्या हृदयात असतात. कुणी रंग संगतीत रेखाटतो कुणी शब्दरुपी साकारतो. मनातले भाव, वेदना, प्रेम, सर्वांन पर्यंत पोहचवते ती कला मग ते कौशल्य कवितेचं असो किंवा चित्रांचं किंवा लेखाचं.
       मग या कविता प्रेमाच्या असतात काहो तर नाही जगातल्या असंख्य मूक जाती प्रजाती यांच्यावरही त्या साकारतात फक्त त्यांच्या भावना कळणे महत्वाचे मग ते वृक्ष, समुद्र किनारा, नदी, चंद्र सूर्य तारे, काहीही अगदी ऋतूंच्या बहरात देखील कविता स्फुरते बरं.
       जणू पाहताच क्षणी शब्द संपदा बहारावी आणि पाहता पाहता पानोपानी साकारावी हीच खरी कला आहे. ज्याला ती भावली तो फारच नशीबवान कारण हे कौशल्य उपजतच नसत ते हळूहळू फुलत बहरत आणि वटवृक्षापरी विस्फारत त्यातूनच जगाला कळतो एक कवी मग ते विंदा, नारायण सुर्वे किंवा माडगूळकर असो ज्यांनी काव्याचे भांडार खुले केले आणि कवितेचे कौशल्य जगाला दाखवले.  
          अंकुर
निसर्गाच्या सानिध्यात, पावसाच्या थेंबात
वाऱ्याच्या संगीतात, अन कोकिलेंच्या गाण्यात,
समुद्राच्या लाटांत, शिंपल्यात ल्या मोत्यात, वाळूच्या ढिगाऱ्यात,
अन सुरुच्या बनात,
गुरफटत मन, त्या हिरवळीच्या कोण्यात
भावनांचे त्या टपोरे शब्द बनतात कवीच्या मनात,
टपोऱ्या शब्दांचा पाऊस बरसतो कोऱ्या पानात,
शब्द शब्दांना अंकुर फुटतो पणातल्या पानात,
जशी पानफुटी ला पान फुटतात पणातल्या पानांत,
पाना पानांचा पाचोळा, जसा अंगणात पडला प्राजक्ताचा सडा,
शब्द शब्दांची गुंफण जसे बागेला तारांचे कुंपण,
शब्द शब्दांत गुंतले, भाव मनीचे ही त्यांच्या जुळले,
चार पदांची चारोळी झाली,
ओळी ओळींचे कवन ही जुळले,
भावनेच्या भरात, हळव्या कवीच्या मनात शब्द पंक्तीचे कवन प्रसवले.
   
सैनपाल पाटील,आजरा,कोल्हापूर.
मनातल्या भावभावनांचा कल्लोळ नेमकेपणाने शब्दांत पकडण्याची कला म्हणजे कविता आहे. मनातल्या उतू जाऊ पाहणाऱ्या भावनांना मोकळी करून दिलेली वाट म्हणजे कविता आहे. कवीला स्वत:शीच हितगुज करायला लावणारी एक सुंदर मैत्रीण म्हणजे कविता आहे.जगण्याची अभिव्यक्ती चिमटीत पकडणारी ती कविता. मनाला उल्हासणारी, मनाला रडवणारी आणि दुसऱ्याला रडायला लावणारी ती कविता. कविता भावनांची मुक्ती आहे. कविता जगण्याची आसक्ती आहे, आस आणि कास आहे. जाणिवांच्या अस्तित्वाचे हुंकार टणात्कारात रूपांतर करणारी ही कला आहे. अनेकांच्या जीवनाचा अर्थ कविता आहे. मनाला जिवंत संवेदनशील आणि जागृत ठेवणारी कविता आहे. तिच्या स्फुरणात निर्मितीचा आनंद आहे. तिने अबोल आणि सुप्त भावनांना बोलायला शिकवले आहे, विचारांच्या अंगानी येणार्‍या साधनांना, अभिव्यक्तीला उजळले आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते...

"जाणिवांना आता धार आहे
कविता जिणं परजणार आहे."

कवीच्या भावनिक विश्वाला तेजवणारं पाणी देऊन त्याला उद्धारणारी शक्ती फक्त कविताच आहे.मन आणि तयातला भाव या दोघांचा हिंदोळणारा झोका म्हणजे कविता.

कोणतीही भावना जोपर्यंत प्रखर अनुभवाने तप्त होत नाही काव्य निर्मिती वास्तवदर्शी होत नाही. कवीने जाणलेल्या, भोगलेल्या जखमा आणि वेदना, त्याने झेललेल्या पाहिलेल्या विटंबना ताडलेली विसंगती, अनुभवलेले भावविश्व, वावरलेले समजलेले जग, आकाशाशी साधलेला संवाद, पशुपक्ष्यांशी केलेले हितगुज, समाजाकडुन भोगलेल्या अवहेलना आणि उपहास, मनाची अनुभवलेली आसक्ती, स्थैर्य, धैर्य,सौख्य, मायाममता प्रेम, विरह, उल्हास, मनाची गूढता, त्याची गाज, त्याची भावबंधने, त्यांची परस्परातील विण, त्यातील मनोरे, नात्यातील तडे, अनुभवलेला हिरवा निसर्ग,  उजाड निसर्ग, इंद्रधनुचा लालिमा, मोहित करणारा सूर्योदय, सकाळचं कोवळे ऊन...या सारख्या अनुभूतीने उचंबळणार भाव,भान हरपवणारी सौंदर्य, हसू रडू विचार आचार दुर्बलता हिंसाचारी पशुता, भावनांची न्यूनता... इत्यादीचा अस्तित्वांचा मनावर नोंदणाऱ्या प्रखर *वेणा* उराशी बाळगून कवी कविता निर्मिती करतो.
रामेश्वर क्षीरसागर,पुणे.
  मी एका कवी मित्रा ला विचारले की तू तुझ्या आयुष्यातील पहिली कविता कधी लिहिलीस, तर तो फार वेगळे उत्तर देतो की, *जेंव्हा माझा जन्म झाला, आणि जन्माला आल्यानंतर जेंव्हा मी पहिल्यांदा धाय मोकलून रडलो, ती माझ्या आयुष्यातील पहिली कविता होती* . आता असे उत्तर ऐकून मला वाटते की ठराविक ओळीत लिहिणे म्हणजे कविता नसते, ठराविक विषयांवर लिहिणे कविता नसते, तर मंनसाची प्रत्येक कृती ही जागतिक एक सुंदर कविता असते. म्हणजे वासराचे गाईच्या स्तनाला दूध पिणे यालाही आपण कविता म्हणू शकतो, किंवा आईचे मुलाला रागावणे ही ही कविता असू शकते. मी सध्या जे काही लिहितो आहे, ती ही एक कविताच आहे. म्हणजे कवींच्या म्हणण्यानुसर जगातील प्रत्येक कृती आणि साहित्यकृती ही अगोदर कविता असते आणि नंतर तो दुसरा सहित्य प्रकार असतो. हे लक्षात घेऊन मुळात कवितेला कुठली कौशल्ये लागू शकतात किंवा गरजेची असतात हे मला न पटण्यासारखे  आहे ,हा संदर्भ लक्षात घेऊन *कविता* लिहितो आहे.
     विषयाला सुरूवात करताना मला माझ्याच कवी मित्र *नितीन जाधव* च्या काही कवितेच्या ओळींचा उल्लेख करावा वाटतो. तो म्हणतो की,
  एक एक अश्रू माझ्या  पेनातून पाझरतात, लोक त्यालाच कविता म्हणून गोंजारतात
    ज्यावेळेस तो कवितेला अशा प्रकारे व्यक्त करायला लागतो तेंव्हा मला वाटते की कविता हा साहित्यप्रकार लिहिण्यासाठी फारच महत्वाचे कुठले काही कौशल्य असावे लागते तर ते संवेदनशीलता आहे. कारण, कविता म्हणजे फार काही विशेष असे प्रतिभासंपन्न माणसाने च लिहावा, त्याला फार काही येत असावे लागते वगैरे नाही, तर त्यासाठी मला वाटते की संवेदनशीलता हा महत्वाचा घटक आहे , जो की कुठल्याही प्रकारच्या व्यक्ततेसाठी आवश्यक आहे. मग ती कविता असो किंवा मी जे लिहितो आहे तो लेख असो. मग, हे पाहायला गेले तर ज्यावेळेस *नारायण सुर्वे* म्हणायला लागतात की,
 *भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी गेली* ते फार काही वेगळे नसते तर, आपल्या जीवनातला संघर्ष त्यांना सांगावा वाटतो, आणि त्यासाठी ते कवितेचा आधार घेतात. म्हणजे आपल्याकडे नाही का प्रेमवीर म्हणायला लागतात की , *सूर तुझे , गाणे माझे जीवनगाणे गावू का...* ही कुठल्या तरी कवीची प्रेयसी साठीची भावना आहे...ती फक्त शब्दात एक संवेदनशीलतेने व्यक्त झाली आहे. मला वाटते की, जगातील प्रत्येक व्यक्ती हा कवी आहे. फरक इतकाच की काही बोलके कवी असतात तर काही अबोल कवी असतात. नारायण पुरी नावाचा कवी म्हणतो की, *मी लिहितो म्हणजे निर्भय होतो आहे, जगास पाहण्या डोळे देतो आहे* मला वाटते की कविता लिहिण्यासाठी हे एक महत्वाचे कौशल्य आहे. निर्भयता नसती तर नामदेव ढसाळ सारख्या कवीने ज्या काही कविता लिहिल्या त्या लिहिल्या नसत्या.
  नागराज मंजुळे लिहितात की,
 आम्ही दोघे मित्र, एकच ध्येय, एकच विचार, एकच उद्दिष्ट,                            पुढे जाऊन त्याने आत्महत्या केली , आणि मी कविता लिहिली*
ज्यावेळी ते आत्महत्येला पर्याय कविता सांगायला लागतात, तेंव्हा मला वाटते की संवेदनशीलता किंवा व्यक्त होऊ  वाटणे हा महत्वाचा गुण किंवा कौशल्य कविता लिहिण्यासाठी आवश्यक असते. एक कवी म्हणतो,
काटा रूतावा कळीला तसा फाटत जातो कवी, आपलेच दुःख वाटत जातो कवी* याच्याही पुढे जाऊन *नारायण पुरी* च पुढे म्हणतात,
कविता म्हणजे आस्तीत्वाचे गाणे, स्वतःच आपली  राख उधळीत जाणे.
   मला वाटते कविता ही कुठल्याही कौशल्यावर आधारित नसून ती माणसाच्या जिवंत असण्याच्या कौशल्यावर अवलंबून आहे. धन्यवाद!

(यातील संबंधित छायाचित्रे इंटरनेटवरून घेतलेली आहेत)

माणुस नेमका हारतो कुठे?

सैनपाल पाटील, आजरा, कोल्हापुर.
         आपण नेमके हारतो कुठे हे जर माणसाला कळले असते, तर प्रत्येक वेळी त्याने यशाची नवीन रेसिपी तयार करून हर क्षेत्र पादाक्रांत केले असते. पण असे होत नाही. आपल्या प्रत्येकाला जीवनात विजय हवा असतो, हार कुणालाही नको असते. पण हार आणि जीत या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे सांगायला कुण्या विद्वानाची गरज नाही. पण अनुभवायला काही ऊन पावसाळे पाहिले पाहिजे.
     यशासंदर्भातील महत्त्वाच्या निर्णयाबाबत काही गोष्टी वर लक्ष केंद्रित केल्यास निर्णयातील अचूकता आणि त्याच्या शक्यतेच्या जास्त जवळ जाता येऊ शकते.
     प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी निर्णायक क्षण येतात. आयुष्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी तो क्षण खूप महत्त्वाचा असतो. यावेळी तुम्ही जो निर्णय घ्याल तो तुमच्या आयुष्याला बरी वाईट कलाटणी देणारा असतो. तुमचं यश आणि अपयश हे त्यावरून ठरते. तुमचा सामाजिक दर्जा आणि वैचारिक पातळीहि असे छोटे मोटे निर्णयच ठरवतात.
    सर्वच निर्णय बरोबर किंवा सर्वच निर्णय चूक असे काही होत नसते. फक्त तो निर्णय घेताना ज्या गोष्टी तुम्ही विचारात घेता किंवा विचारात घ्यायला हव्यात या सर्व गोष्टींशी तुम्ही स्वतःला अवगत करत नाही. तोटक्या माहितीवर घेतलेला निर्णय हा कधीही परिपूर्ण निर्णय असू शकत नाही. कालांतराने तो निर्णय चुकीचा होता असे वाटते, खरेतर तुम्ही सर्व गोष्टींची योग्य ती कारणमीमांसा केलेली नसते किंवा निर्णय घेताना निर्णयावर परिणाम करणाऱ्या सर्व बाबींचा परामर्श घेतला नसतो.
   आपल्या अपयशाचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे आपण हरलो तर काय याची वाटणारी भीती. लोक काय म्हणतील? त्यांना कसे सामोरे जायचे? बघा आपण प्रत्येक वेळी जगाचा विचार करत असतो. खरंतर यशाची अपेक्षा धरणाऱ्या प्रत्येकाने लोकापवादावर विजय मिळवायला हवा. त्यात तटस्थता राहिली तरच निर्णयात पुरेशी योग्यता राहिल.
    वैचारिक परिपक्वता नसताना माणूस चांगले निर्णय घेवु शकत नाही, ते चुकीचे असण्याची जास्त शक्यता असते. असा माणूस निर्णयप्रक्रियेला दोष देतो. त्यास वेळीच योग्य ते मार्गदर्शन घेणे गरजेचे असते.
   तुलनेत नव्या असणाऱ्या कामामध्ये जाणकारांचे मत विचारात घेणे आवश्यक असते. अशा वेळी जास्तीचा विश्वास धोकादायक ठरू शकतो. एखादे काम कितीहि आकर्षक असले तरी आपल्याला गती नसणाऱ्या कामांमध्ये नसीब आजमावून नये. आपल्या क्षेत्राशी संबंधित असलेल्या कामामध्ये सुरुवात केल्यास संबंधित अनुभव व माहितीचा उपयोग होतो.
    आपण घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी स्वतः स्वीकारली पाहिजे. नंतरच्या प्राप्त यशापयशाची जबाबदारी ही तुमचीही असली पाहिजे. पण यश आपल्या खाती जमा करून अपयशाचे खापर मात्र इतरांच्या माथी मारत राहाल तर ही सोय जास्त वेळ साथ देत नाही.
    एखाद्या विषया संदर्भात निर्णय घेतल्यावर त्याच्याशी ठाम राहणे हे निर्णयकर्त्याचे आद्यकर्तव्य आहे. त्या निर्णयाला मूर्त रूप देणे हे त्याच्याच ईच्छाशक्तिवर अवलंबुन राहते. शेवटी काय तर प्रयत्नांतील सातत्य, प्रामाणिकता आणि तीव्रता हिच तुमचे यश सुनिश्चित करत असते.

_________________________


रुपाली आगलावे, सांगोला.
       माणुस हरतो, जेंव्हा त्याला त्याच्या जवळच्याच व्यक्तीने फसवलेल असत तेंव्हा.......... कारण आपण वैर्याच्या वाराला झेलायला तैयार असतो पण..... आपल्या माणसांनी केलेल्या वारावर लावायला कोणतंच मलम किंवा औषध अजून तैयारच झालेलं नाही कारण..... कोणाला ते expected नाही.... त्यामुळे माणुस तेंव्हा हरतो.....
    कित्तेक वेळा पडलेला माणुस उठताना पाहिलाय... हरलेला माणुस जिंकताना पाहिलाय.... पण मनातुन खचलेला माणुस कधीच जिंकलेला नाही पहिला...
        कोणतीही परिस्थिती माणसाला हारायला किंवा जिंकायला कारणीभुत नसते तर त्याचे विचार, त्याची इच्छाशक्ती, त्याची जिंकण्याची जिद्द या गोष्टींचा त्यावर परिणाम होतो... व त्यानुसारच त्याचे परिणाम समोर येताना दिसतात....
      या जगात अशी कोणतीच गोष्ट नाही जी माणसाला हरवू शकते फक्त त्याच स्वतःच मन सोडून..... जर माणसाने स्वतःच्या मनावर ताबा मिळवला तर तो या जगावर सुद्धा ताबा मिळवू शकतो.. एवढी ताकत माणसांमध्ये आहे.... 
    शेवटी एवढंच सांगणं... हार जित तर चालूच राहणार आज हरलो तर उद्या जिंकणार.... ही आशा मनात बाळगा.... कितीही कशातही हरलात तरी चालेल पण मनाने कधीच हार मानू नका.... Life is yours... Keep smiling.

_________________________

वाल्मीक फड नाशिक.
       जेव्हा जेव्हा माणसाच्या मनाविरुद्ध घडते त्याच वेळेला त्या माणसाच्या
 संवेदना त्याचा रागावर नसलेला कंट्रोल पाहिला की,माणूस हरलायअसं वाटतं.
एखाद्या प्रिय व्यक्तीने माणसाला म्हणजे जी व्यक्ती त्याचा जिव की प्राण असते,त्या व्यक्तीशिवाय तो कल्पांतिही राहू शकत नाही ज्याच्यावर या माणसाचा अतुट असा विश्वास आहे आणि त्यानेच ह्याचा जर केसाने गळा कापला तर तेव्हा माणसाला हारल्याची अनुभूती होते.
तरुणपणात खुप कष्ट करुन राब राबून आपल्या मुलाबाळांना चांगले शिक्षण देऊन त्यांना समाजात ताठ मानेनं जगायला ऊभं करतो,परंतु तेच मुलंबाळं त्याला वृध्दाक्ष्रमात नेऊन घालतात त्याच वेळेला आपण हारलो आहोत ह्या गोष्टींचा आभास होतो.
सारासार विचार म्हणजे आपल्या आसपास आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडणे,आपल्या पत्नी,मुलांनी आपल्या भावना समजून न घेणे,आपण केलेला व्यवसाय व्यवस्थित न चालणे,अशा गोष्टि घडल्यानंतर जो माणूस आत्महत्येसारखा विचार करतो तोच माणूस खराखुरा हारतो असं मला वाटतं.

_________________________

राजश्री ठाकूर , मुंबई
   अस्मानी - सुलतानी , आप्त - स्वकीय - परकीय , पारतंत्र्य - स्वातंत्र्य , विश्वासघात , अवसानघात या सगळ्या बाबी माणसाला कमकुवत करतील कदाचित .. थोड्या काळासाठी थांबवतील पण माणसाला हरवणारी गोष्ट एकच - मृत्यू ; स्व - मृत्यू . 

   बाकीची सर्व संकटे परतवून लावता येतात , त्यांच्या विरुद्ध उभ ठाकून लढता येते .. ज्या संकटात माणूस विजयी होतो तिथे आत्मविश्वास आणि संकट विजयी झाले तर अनुभव गाठीशी जमा होतो . पण जगाच्या प्रारंभापासून अंतिम विजय केवळ आणि केवळ एकाच गोष्टीचा - मृत्यू . 
  ऍडम ईव्ह , प्लुटो , सॉक्रेटिस , बुद्ध , नित्शे , सिकंदर , पुरू ,  गांधी - गोडसे , सावरकर , लिंकन , अल्बर्ट एलिस , आईन्स्टाईन हि सगळी मंडळी नामवंत , बुद्धिवंत , विचारवंत आयुष्यात अपयशी ठरली पण मेहनतीने , विचारांनी परिस्थितीवर विजय मिळवला .. पण या सगळ्यांना कुणी जिंकून घेतलं तर मृत्यूने . 
   अमुक व्यक्ती शिवाय मी जगू शकणार नाही असं जवळ जवळ प्रत्येकाला वाटत पण कित्येक वेळा त्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतरही आपण आहोत .. आत्ता हा लेख लिहितांना , वाचतांना जाणवतंय मृत्यूवर सध्यातरी विजय आपला आहे .. पण कधीतरी तो हरवणार .  
   कितीही उत्तम मानसिकता असो अथवा आरोग्य , सांपत्तिक स्थिती उत्तम असो वा अठरा विश्वे दारिद्र्य , आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक असो , नकारात्मक असो वा दृष्टिकोनाचा अभाव असो अंतिम लढाई मृत्यू जिंकणार  
   मग या मृत्यूला हरवायच तरी कसं ? मृत्यूचा मृत्यू करायचा तरी कसा ? विज्ञान अध्यात्म कधीतरी हे कोड उलगडेल . पण मग तोवर काय ? 
  सहज जिंकू द्यायचं त्याला ? आपण उभ्या केलेल्या निर्मिती अशाच सोडून द्यायच्या ? की कार्यातून अंशरुपी उरत राहायचं या पृथ्वीवर ? 
जगणं फुकट मिळालंय म्हणून झुगारून द्यायचं की न मागता मिळालं म्हणून अमूल्य म्हणायचं ? पण कसंही केलं तरी माणूस मृत्यू पुढे हरतो. हे नक्की .
  पण असं होईल का , तो एकदाच हरवेल त्या आधी प्रत्येक लढाई माणूस जिद्दीने लढेल , कुठेतरी स्वतः ला शोधेल .. सेवा वगैरे खूप मोठे शब्द झालेत किमान जगण्याविषयी निष्ठा बाळगेल ... मृत्यूला जिंकायचं असेल  तर जगताना  त्याचा विसर पडून जगण्याचा प्रयत्न करता येईल , भान राखून बेभान होऊन जगून बघता येईल.. कदाचित आपली कुण्णी कुण्णी म्हणून आठवण काढत नाही म्हणून रुसून मग येणारच नाही तो .. तेव्हा कदाचित म्हणता येईल आधी कुण्या एका काळी हरवायचा मृत्यू माणसाला पण आता नाही ..

_________________________

लग्नामधील खर्च.

लग्नामधील खर्च.


१.संदिप बोऱ्हाडे( वडगाव मावळ,पुणे)
आजच्या घडीला कोणी किती आलिशान लग्न केले याचे प्रदर्शन करण्याची चढाओढ समाजात लागलेली दिसत आहे. अमुक अमुकने एवढा खर्च केला तमुकने तेवढा. अगदी बाहेर देशात जाऊन खर्चिक  लग्नसोहळे करण्याचीच प्रथा सुरु झालेली आहे. कुठेही लग्न केले तर काय फरक पडणार आहे ते समजत नाही ??? त्यात श्रीमंत आणि गरीब पण आले अगदी हे सर्वसामान्य लोक कर्ज काढून लग्न करण्याची स्पर्धा करतात..

   काही लोकांना आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करण्याची भारी हौस असते. आता काहीजण म्हणतील आहे त्यांच्याकडे पैसे आहेत काय करायचे ते... अहो ! जावयाला लेकीला कपडे ,काही भेटवस्तू दिली तर ठीक परंतु जावयाच्या पूर्ण घरबाराला कपडे ,जावयाला 51 ,101 सोन्याचे धोंडे असली हौस केली जाते आणि तीही एकमेकांच्या चढाओढीत ....याचा परिणाम म्हणून दुसरे आपल्या सासर्यांकडून त्याची परिस्थिती नसताना असल्या अपेक्षा धरतात, मुलीची छळवणूक करतात आणि स्वतः च्या संसारात विष कालवून घेतात. याला काय म्हणायचे ???

   आजकाल तर लग्न समारंभावर भरपूर खर्च केला जातो. जो तो आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यात मग्न असतो. रोषणाई, फटाके यावर मुक्तहस्ते खर्च केला जातो. लग्न जमेल तितके अलिशान करण्याचा प्रयत्न चालू असतो. यातून माणूस काय मिळवतो. उलट गमवतोच. निरर्थक पैसा.
खेडोपाडी ६ ते ८ तास विद्युत कपात चालू असताना शहरातून मात्र लग्न मंडप रोशनाईने दिपून निघत असतात. .उपासमारीमुळे लाखो जनता मरत असताना नुसत्या आतीषबाजीवर लाख लाख रुपये सहजच उधळले जातात. अक्षरश: लाखो  रुपये तरी असेच उडवून टाकतात फटाक्यात.. आजचा शेतकरी लाख दोन लाखाचे कर्ज झाले म्हणून जीव देत आहे. हि मात्र शोकांतिका.

  नवरदेवाने आणि नवरीने  घातलेले किमती कपडे हे परत कधीही वापरले जात नाहीत. ते तसेच कपाटात आठवण म्हणून पडून राहतात. मग  पुन्हा वापरता येतील असे बऱ्यापैकी कपडे घेता येत नाहीत का? नवरा नवरी सोडा परंतु जवळजवळ संपूर्ण घरबार वऱ्हाड अशी उंचीवस्त्र घालून मांडवात मिरवत असतात. हे कपडे परत दुसऱ्या कार्यक्रमात वापरायचे म्हटले तर परत प्रतिष्टेचा प्रश्न ? मग हे कपडे परत काहीच कामाचे नाहीत कारण एरवी हे असले कपडे आपण वापरू शकत नाही. मग कशाला हा वायपट खर्च ? जेवणात तर विविध पंचपकवान त्याला जोड फाष्ट फूड, चायेनीज वगैरे प्रकार. अन्नाची तेवढीच नासाडी. अर्धवट खावून टाकलेली ताट. उगाचच ताट भरभरून घ्यायचे आणि न खाताच टाकून द्यायचे??? कुठे अन्नाची नासाडी करणारे हे लोक आणि कुठे भुकेने कचर्यात अन्नाचा शोध घेणारी मुले ??
  
  पण या श्रीमंत लोकांनी थोडा विचार केला असता तर...??
देशातील बरेच शेतकरी कर्जमुक्त झाले होतील. बर्याच बेघरांना निवारा मिळु शकेल.लग्नासाठी पैसे नाहीत म्हणुन आत्महत्या करणार्या मुलींचे लग्न लावता येतील. बेकारीमुळे आत्महत्या करणार्या तरुणांना रोजगार निर्मिती करुन देता येऊ शकेल,  परिस्थितीमुळे शिक्षणापासुन वंचित असणार्या होतकरु विद्यार्थ्यांना शिक्षण देता येईल. हा ठेवा कायमस्वरुपी स्मरणात राहणारा जीवनदान देणारा आहे....परंतू आपल्याला आपल्या श्रीमंतीचेच प्रदर्शन करण्यात जास्त आनंद मिळणारा असतो जो क्षणभंगुर आहे...

 बऱ्याच लग्नात काही विशेष अतिथींचे फेटा ,शाल ,नारळ देवून स्वागत केले जाते. लग्नाला येणारी प्रत्येक व्यक्ती आपले काम-धंदा सोडून वेळ काढूनच आलेली असते. त्यामुळे लग्नाला आलेली प्रत्येक व्यक्ती आदरणीय समजून असे काही लोकांचाच सत्कार करण्याचा प्रकार थांबवला गेला पाहिजे. नाहीतर आपल्या आदरणीय मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत आपले कार्य उरकून घ्यावे. बाकीच्या मंडळीना कमी लेखून त्यांचा वेळ कशाला फुकट वाया घालवता??

      सायना नेहवाल, काही दिवसांपूर्वी लग्न झालेले नवरा अभय देवरे (I.R.S.)  प्रीती कुंभारे सहायक प्रबन्धक (IDBI,Bank) ....तसेच अजीम प्रेमजी यांच्या मोठ्या मुलाचे लग्न आणि आजच एक बातमी वाचली श्रीमंतीचे प्रदर्शन न करता आपले धन सत्कारणी लावावे याचा आदर्श घालुन देणारे हे हिरे व्यापारी महेशभाई सवाणी...यांनी 3000 अनाथ मुलींचे कन्यादान करून फक्त लग्न लाऊन न देता संपूर्ण जबाबदारी घेतली आहे.
आणि अशी लोकच समाजासाठी आदर्श असली पाहिजेत.

 काही जण म्हणतील पैसा आमच्या बापाचा आहे आम्ही तो कसाही खर्च करू.. तुम्ही कोण सांगणारे?? तुमचे धन तुम्हाला कसे खर्चायचे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे . परंतु एक माणूस म्हणून आपण कमावलेले धन योग्य ठिकाणी कामी आले तर ते नक्कीच मानसिक समाधान देऊन जाईल. या धनिक लोकांनी समाजात साधेपणाने लग्न लाऊन त्या संपत्तीचा वापर दीन- दुबळ्यांसाठी केला तर समाजात नक्किच एक आदर्श निर्माण होईल.
********************************

वाल्मीक फड(महाजनपूर नाशिक)
लग्न हा हिंदू संस्कृती प्रमाणे एक प्रकारचा संस्कार आहे.तसेच जिवनातील तीन सोहळ्यापैकी एक सोहळा आहे.लग्न ह्या प्रकाराला एक सोहळा तसेच संस्कृती चा भाग म्हणून साजरा करायला हवा आहे परंतु आज तसे आजिबात होत नाही.
आज लग्नासारखा संस्कार वेगळेच रूप धारण करीत आहे.लग्न प्रक्रियेला समाजाने प्रतिष्ठेचा विषय बनविले आहे.मोठाले खर्च क्ष्रीमंतिचे प्रदर्शन मांडून लग्नासारखा संस्कार एक खेळ बनविला आहे.अफाट  खर्च,रोषणाई,अन्नाचे नुकसान अशा अनेक प्रकारांनी लग्न सोहळा बदनाम होत चालला आहे.दारु पिणे,अश्लील गाणे स्पिकरवरती लाऊन त्यावर अस्लील नाच करणे अशा ह्या गोष्टीमुळे लग्न सोहळ्याची पुरती वाट लावलेली आहे.भेटवस्तुंचा ऊत अशा अनेक खर्चीक बाबी आपल्याला सांगता येतील.
जुन्या काळात लग्न असायची कमी खर्चाची अगदी साधा मंडप व त्यावर आंबा,जांभळं,कडुनिंब अशा झाडांचे डगळे असायचे.एका बैलगाडीत वाजत गाजत मंडपात आणले जायचे ,यथोचित पुजा करुन ते मांडवावर टाकले जायचे आणी तेही एक रुपया खर्च न करता.
चिक्कार पैसा खर्च करुन जेवणावळ दिली जाते परंतु एकत्र जेवताना दिसत  नाही ऊभ्या ऊभ्या जेवण ऊरकतात तेही पायात बूट चप्पल ठेवून.तसं जुन्या काळात जेवण साधं असायचं पण एकत्र पंगत बसायची आग्रह केला जायचा सगळं अगदी प्रेमाने केले जायचे तेही एकदम कमी खर्चात.पहिले सनईच्या सुरात लग्न साजरे व्हायची परंतु आता कर्कश डिजेचा आवाज आणी त्या आवाजात मद्यधुंद होऊन नाचनारे तरुण.सारा खर्चच आत्ताच्या लग्नांचा.मुठभर धनिक लोकांनी लग्न ह्या संस्काराची पुरति वाट लावली आहे.
*********************************

भर्तरी उद्धव कोळेकर, (पिंपरखेड)
मुळात कोणत्याही विवेकशील माणसाला जर विचारले तर लग्नात खर्च कमी करावा असेच उत्तर मिळेल. मी विवेकशील यासाठीच म्हणतोय कि, आताचा युवक,युवती पूर्ण समाज भलेही तो शिकलेला असो किंवा नसो तो लग्न कार्यामध्ये अनआवश्यक  खर्च करताना दिसतो. विवेकशील , शिक्षित,अशिक्षीत, अडाणी यांमध्ये मूलभूत फरक आहे,कारण शिक्षितच फक्त विवेकशील असतात असे नाही.स्वताला शिक्षीत म्हणणारे डॉक्टर, वकील, इंजिनीर, राजकारणी(अंबादास दानवे च्या मुलाचा लग्न खर्च) आपला विवेक गहाण ठेवून प्रचंड खर्च करताना दिसतात.याला काही युवक अपवाद आहेत,साखर पुडा,dj, सोहळवा,घोडा, भपकेबाज कपडे,येतीजाती, चुळण्या-गुळण्या, घरगुस्नी,पायधुनी,ताटाला टेकन(टेकणाला जावयाला टू व्हील बुर पण दिली जाते) अशा कित्येक प्रथा लग्न खर्च वाढवतात.अशा वेळी प्रथा,परंपरा   आणि पर्यायाने धर्म समोर येतो कारण वरील सर्व धार्मिक विधी आहेत आणि धर्म हि तर अफू ची गोळी आहे तिथे विवेक कसा टिकणार.शहाण्यास सांगणे ना लगे
*********************************

मुकुंद बसोळे,(लातूर)
स्थळ- गण्या आणि मन्याच निसर्गाच्या कुशीत लपलेलं गाव...'टेंभुर्णी'....सकाळची 9 ची वेळ....मस्त अलहदायाक  वातावरण....पण बोचरी थंडी वाजत होती त्यामुळे चहाच्या दुकानात चांगलीच गर्दी पडली होती....सगळेजण चहा पिऊन गरम होत होते....आपला गण्या सुद्धा चहा पित-पित वर्तमानपत्र वाचत होता.... तेवढ्यात मन्या आला......

मन्या- काय राजे काय करत आहात.....

गण्या- (थोडंस गोंधळून आणि वाचनाची तंद्री भंग पावली असा तोंडावर आव आणून... सगळ्यांना ऐकू जाईल अशा आवाजात )  ये ऐका सगळेजण....ह्या मन्याला 'मोस्ट इंटेलिजेंट मॅन ऑफ टेंभुर्णी' अवार्ड द्या रे........ (हे वाक्य ऐकून चहाच्या स्टॉल वर एकाच हशा पसरतो).....बंबूऱ्या दिसत नाही व्हय रं वर्तमानपत्र वाचतोय ते.....मग तरीही थोबाड वर करून कशाला विचरतोस....तू खरंच डोक्यावर पडला होता....कॉमन सेन्स चा भागच नाही तुझ्याकडे....बंबूऱ्या.....

मन्या-गप ये किती शहाणा आहिस माहीत आहे.... सरक तिकडं...आणि चहा सांग मला पण....( स्वतःशीच)  आयला थंडी लै पडली आहे मायला....पार कुठून कुठून धूर निघत आहे ते सुद्धा कळेना झालंय..... काय ओ अण्णा....

अण्णा-  होय रे मन्या.... सकाळी सकाळी परसाकडं जायला बी नग वाटायलाय रे....थंडीच्या भीतीने....( परत सगळे हसतात)

मन्या- बरोबर बोललात अण्णा....(आपला मोर्चा मण्याकडे वळवून).....एवढं काय रं हाय त्या वर्तमानपत्रात....आम्हला बी वाचून दाखव की.....

अण्णा-होय रे गण्या वाचून दाखव की आम्हाला पण.....

गण्या-(अण्णा वयस्कर असल्यामुळे त्यांचा आदेश गण्याला मानावाच लागणार होता तर त्याने वाचायला सुरुवात केली....)  छत्तीसगड, राजस्थान आणि मिझोराम राज्यात भाजप पिछाडीवर....अण्णा काँग्रेस ने चांगलीच पकड निर्माण केली म्हणायची......(दुसरी बातमी वाचत) राफेल वरून सरकार अडचणीत.....अण्णा हा सुद्धा मुद्दा चांगलाच चघळतोय हं..... इशा अंबानीचे लग्न धुमधडाक्यात साजरे... बॉलीवूड च्या सर्व प्रसिद्ध  अभिनेत्यांची हजेरी.....

अण्णा- ( मधेच गण्याला तोडत...) झालं का बाबा तीच लग्न....लै भारी केलं असेल बाबा....भारतातल्या सगळ्यात श्रीमंत बापाची 'पोरगी' ती...

गण्या-हो 'अण्णा' झालं....खूप भारी केलं अंबानीने लग्न....काय ती रोषणाई अबब....काय तो खर्च.....

अण्णा- हं मोठे माणसे बाबा ती....बरं ते जाऊदे.... तुझ्या पोराचं... नितेश चं लग्न ठरलय ना....नाही म्हंटलं तरी तू सुद्धा आपल्या 'गावाचा'अंबानीच म्हणायचास....मग काय काय ठरवलं आहेस....

मन्या- (मधेच)  हो तर मग.... 'द  आर्मी बॉय - नितेश' चं लग्न धुमधडाक्यातच होईल.... काय रे गण्या....

गण्या-( अभिमानाने छाती फुगवून जसं काय अंबानीच आहे तो आणि मिश्यावर ताव मारून)  हो तर बघा कसं धुमधडाक्यात करतो का नाही लग्न.... ( एवढ्यात त्याचा गावातील प्रतिस्पर्धी विनायकराव  चहा पेयायला येतात.....त्यांना बघून तर गण्याला लईच चेव सुटतो आणखीन आवाज चढवून) सार गाव बघताच राहील पाहिजे नुसतं....जाळ आणि धूर संगटच....निस्त बघत राव्हा तुम्ही....

अण्णा- होय बाबा करशील तू सगळं कारण अंबानी आहेस तू.....(तेवढ्यात नितेश येतो चहाच्या स्टॉल वर येतो)

मन्या-काय 'नवरदेव'...  द आर्मी बॉय.....काय म्हणतेय नवरी....फोनवर बोलतोस का नाही तिला....नाही बाबा आजकालचा ट्रेंड आहे म्हणे ते सोयरीक झाल्या झाल्या फोन गिफ़्ट करायचं म्हण....

नितेश-  नाही ओ काका....अजून नाही बोलत आम्ही.....

अण्णा-  बरं झालं नितेश....चांगली आहे म्हण पोरगी....गुणांची आहे म्हण....आता बंधनात आडकशील तू.....आता सुटका नाही.....

नितेश-( स्वतःशीच कुजबुजत) सुटायचय कुणाला....

अण्णा- अ.... काय बोललास....

नितेश-काही नाही....

अण्णा- तुझा बा तर काही नाही...खूप उत्सुक आहे तुझं लग्न करायला.....

गण्या- अहो अण्णा माझा एकुलता एक मुलगा आहे तर करणारच ना हो....अहो अण्णा लग्न म्हणजे आपल्या आयुष्यातील एक अमूल्य ठेवा....ते काही परत परत परत होत नाही...आणि असंही परत परत करायला तो काही चहा नाही....एकदाच करायचं धुमधडाक्यात करायचं....बाकी कर्ज का काढणं होईना आपल्याला....पोराला ह्या  त्याच्या जीवनातील आनंदाच्या क्षणी अमूल्य भेट नको का दयायला....त्याच्यासुद्धा आठवणीत राहायला पाहिजे ना...हा अमूल्य क्षण जीवनभर....उद्याच कर्जासाठी अर्ज करतो बघा....एक दोन वर्षीत फिटून जाईल कर्ज....पण साऱ्या गावाने नाव घेतला पाहिजे....आणि पोराने सुद्धा आठवणीत ठेवला पाहिजे.....होय की नाही.....

नितेश- ( काहीतरी 'निश्चय' करून) बाबा मी काही बोलू का?

गण्या-तू नाही तर कोण बोलणार तुझंच तर लग्न आहे बोल तू....

( एव्हाना गावातील बरीचशी प्रतिष्ठित मंडळी आली होती...आणि मघापासून चाललेली चर्चा मन लावून ऐकत होती....आता 'नवरदेव' काय बोलणार म्हणून सगळ्यांनी माना नितेश कडे वळवल्या आणि नितेश बोलू लागला....)

नितेश-    बाबा.... 'लग्न'.....लग्न म्हणजे  माणसाच्या जीवनातील अविस्मरणीय ठेवा असतो....तुमच्या जीवनात पुढची व्यक्ती तुमच्याबाबत कोणतीही शंका मनात न ठेवता...तुम्हाला तुमच्या जीवनातील सुख आणि दुःखात साथ देण्यासाठी येत असते....ती सात जन्मापर्यंत तुम्हाला साथ देणार असते....तुमची ती अर्धांगिनी असते....आणि ती तुमची अर्धांगिनी बनण्याचा 'अभूतपूर्व'सोहळा म्हणजे 'लग्न'....आईनंतर सगळ्यात मायाळू स्त्री तुमच्या जीवनात प्रवेश करत असते....तर बाबा मला ह्या लग्नाच्या सोहळ्याला 'विसरता' न येण्याजोग करायचे आहे....माझी एक विनंती आहे बाबा....

गण्या-बोल बेटा काय करू?....

नितेश- माझ्या लग्नात किती रुपये खर्च करणार आहात तुम्ही.....

गण्या- गण्या तू माझा एकुलता एक पोरगा आहेस तू म्हणशील तितका खर्च करू....बोल तुझी इच्छा काय आहे...

नितेश-  ऐका तर.... माझी अशी इच्छा अशी आहे की  माझ्या लग्नात तुम्ही वायफळ खर्च करण्याऐवजी तुम्ही गावात एक ग्राउंड तयार कराव  जिथे गावातील पोरांना सैन्यात जाण्यासाठी लागणार शरीर तयार करता येईल....जेणेकरून गावातील जास्तीत जास्त मुलं 'सैन्यात' भरती होऊन देश्याची सेवा करतील...आणि गावात ग्रंथालय स्थापन करावं जिथे आपल्या गावातील पोरं स्पर्धा परीक्षेची तयारी करतील... माझी शेवटची इच्छा.... तुम्ही 2-2  लाख रुपये दोन शहिदांच्या कुटुंबियांना द्यावेत......बस्स येवढीच ईच्छा आहे माझी....आणि यात मी सुद्धा माझे सगळे आतापर्यंत जमा झालेले पैसे तुम्हाला देईन.....बाबा लग्नात केल्या जाणाऱ्या इतर खर्चपेक्ष्या तुम्ही जर अश्या पद्धतीने माझं लग्न केलंत तर खरंच माझ्यासाठी तुमच्याकडून माझ्या लग्नाची अमूल्य भेट ठरेल....(सगळे थक्क होऊन नितेश कडे बघत असतात.... सगळ्यांनाच नितेश चा अभिमान वाटतो आणि टाळ्यांचा आवाज ऐकू येतो.....आणि विनायकराव उठून नितेश कडे येतात जे की गण्याचे प्रतिस्पर्धी आहेत....)

विनायकराव-   जिंकलास तू पोरा....खरंच तू सिद्ध केलंस की ह्या भारतमातेचा तू वीर सुपुत आहेस....मी सुद्धा माझ्या पोराचं लग्न खूप खर्च करून धुमधडाक्यात करणार होतो....पण नाही...आता मी आणि तुझा बा मिळून गावासाठी ग्राउंड,ग्रंथालय करू....काय गणपतराव.....  ( आणि नितेश ला सॅल्युट मारतात.....त्यांचं बघून बाकीचे सगळे सुद्धा नितेश ला सॅल्युट करतात..... गण्याची तर छाती 102 इंच फुगलेली असते)

गण्या- होय विनायकराव....जस पोरगा बोलला तसंच होईल.....(गण्याच्या डोळ्यात अश्रू  येतात)

मन्या-  खरंच तू ' द आर्मी बॉय'आहेस पोरा.... कडक सलाम तुला.... मानाचा मुजरा.....

(ह्या लग्नानंतर टेंभुर्णी गावात असा पायंडा पडतो की प्रत्येक लग्नात वायफळ खर्च करण्यापेक्षा तेथील गावकरी तो खर्च गावातील समाजकार्यात आणि शहिदांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी खर्च करतात).....
********************************

राजश्री ठाकुर,(मुंबई)
मुळात लग्न करावं का हाच  जटिल प्रश्न या पिढीपुढे आहे. त्यातून कसाबसा निर्णय घेत.. लग्न करावं पर्यंत जर जोडपी पोहोचली , तर लग्नातील खर्च यावरून खडाजंगी ठरलेली . समाजाचे निकष , लग्नाविषयीच्या इतरांच्या अपेक्षा , स्वप्ने आणि आर्थिक स्थिती यातून एक रक्कम ठरते त्यातून विवाह सोहळा संपन्न होतो .

 अत्यंत खाजगी अशा या बाबीत कुणी किती खर्च करावा हा तितकाच वैयक्तिक प्रश्न .  

सध्याच्या परिस्थितीत वधू वर , दोन्हीकडचे पालक नोकरी करणारे . गाठीभेटी दुर्मिळ . याच निमित्ताने गोतावळा निवांत जमतो , गप्पांचे फड जमतात , लहानपणीच्या आठवणी , थट्टा मस्करीस पुन्हा बहर येतो .. सोहळ्यास येऊन चार घटका आनंद घेणारे पाहुणे बघून लग्न पारंपरिक विधीने का , या प्रश्नाचे आपसूक उत्तर मिळते . मंडळींच्या आतिथ्यात कमतरता नको म्हणून खर्च करणे अगदी स्वाभाविक . या सरबराईची प्रत्येकाची पद्धत स्वतः च्या जीवनमानास , पद्धतीस अनुसरूनच असणार पण त्यावरून कुणी कुणाचा दर्जा ठरविणे अगदीच टाकाऊ.
 जगातील कुठल्याही संस्कृतीत विवाह हा एक महत्वाचा संस्कार आहे . या भूतलावर आपल्यासाठी योग्य अस कुणीतरी मिळालं आहे , हि सुखावणारी बाब , हा आनंद सगळ्यांसोबत वाटून घ्यावा हे या सोहळ्याचे प्रयोजन ..यात समाजाचा सहभाग कसा असावा तर शुभेच्छा देणारा .  पुढील आयुष्याचा जोडीदार त्यासोबतच हे पाहिलं पाऊल कसं , कुठे , कशाप्रकारे टाकावं हे टिका न करता स्वीकारण्याइतका समाज प्रगल्भ व्हावा . अतीव हर्षाच्या समयी खिसा थोडा सैलावला... हरकत नाही .. भान राखून खर्च केला तरी हरकत नाही .. त्यावरून त्या माणसाच्या सामाजिक दायित्व आणि जाणिवा यावर बोट ठेवण्याची गरज च काय ?
  कामाच्या ठिकाणची गेट टुगेदर्स चालतात , मित्रांसोबत पार्ट्या चालतात तिथले खर्च विरंगुळ्याचे कारण असते मग जिथे हि सगळी मंडळी एकत्र येऊन आपला परीघ विस्तारतो अशा विवाह खर्चा विषयीच आकस का ?
  अनाथ मुलांची लग्ने धूमधडाक्यात लागली की समाजाला कोण आनंद आणि यदा कदाचित त्या लग्नाचा सोहळा नाही झाला तर कष्टी होणारी , उसासे टाकणारी माणसे आहेत . त्यामागची मिमांसा म्हणजे , त्या लोकांना आयुष्यात पालकांचा सहवास , आणि इतर आनंद मिळाले नाहीत म्हणून त्यांची लग्ने धडाक्यात झालेली चालतील . पण जे सनाथ आहेत , आर्थिक परिस्थिती उत्तम आहेत , खर्च निभावू शकतात अशा माणसांनी मात्र ते अजिबात करू नये . नाहीतर आहेच सामाजिक टीकेचा बागुलबुवा उभा .

  आम्ही अंबानीस खुले पत्र लिहू , त्याची कानउघाडणी करू ( ते पत्र नेमके अंबानी सोडून सगळ्यांना मिळालंय )  पण हा दिवस अशा पद्धतीने साजरा करण्यासाठी त्याने स्वतःस त्या पात्रतेचे बनविले आहे हे सर्रास विसरू ..
   हेच कुणा आर्थिक सबळ व्यक्तीने कुठल्याही कारणांमुळे लग्न लहान प्रमाणावर केले तर आजवर जितक्या जेवणावळीत ते कुटुंब जेवले असेल त्याचा उद्धार ..
   
  अजुन एक ट्रेण्ड , आम्ही लग्नात खर्च करणार नाही ते पैसे अमुक संस्थेला देऊ , पाहुण्यांनी सुद्धा जो आहेर करायचा असेल ती रक्कम या संस्थेच्या द्यावी .  वाह रे सक्तीचा दानधर्म .. जुजबी माहितीच्या आधारे , तुमच्यावरील प्रेमापोटी , नात्याच्या बंधनापायी लोकांनी हे का करावं ? स्वतः च्या उच्च सामाजिक जाणिवा दाखविण्याच्या नादात निवड येणाऱ्या पाहुणयांची निवड करण्याच्या मूलभूत अधिकाराची पायमल्ली होऊ नये .
 
  थोडक्यात काय , आमंत्रण असेल , शक्य असेल तर आनंदी भावनेने लग्नास उपस्थित रहावे , मेजवानीचा , सजावटीचा आनंद घ्यावा , वधू वरास शुभेच्छा द्याव्या . खर्च किती , वायफळ कुठला आवश्यक कुठला यावर आपला वेळ खर्च करू नये . चलन चल आहे , विनियोग होतोय यात समाधान मानावे . कुणी लग्नात खर्च केलाच नसेल , बोलावलं नसेल तर वेळ वाचला म्हणून खुष व्हावे , आणि त्या आठवड्यात वि४ वर एक ऐवजी दोन विषयांवर लेख लिहावे ..

 कुर्यात सदा मंगलम् !
*********************************

मयुर डुमणे,(उस्मानाबाद)
लग्न ही मुलगा आणि मुलगी यांची समान गरज आहे, त्यामुळे लग्नाचा जो काही खर्च होईल तो दोघांनी केला पाहीजे.
हुंडा,मानपान,आहेर,वरात,DJ, बस्ता, विडिओ शूटिंग,ब्राह्मण या सगळ्या पैशाचा अपव्यय करणाऱ्या गोष्टींना फाट्यावर मारून महात्मा फुले यांनी घालून दिलेल्या सत्यशोधक पद्धतीने लग्न केलं पाहिजे. हुंडा घेणाऱ्या नालायक मुलाशी मी लग्न करणार नाही असा निर्धार मुलींनी करावा. सत्यशोधक पद्धतीने लग्न आणि दोन्ही कडील लोकांना छान जेवण. लग्नाचा खर्च आपोआप कमी होईल. महात्मा फुले यांच्या विचारांप्रमाणे जगल्याचा आणि ब्राह्मणी लग्न पद्धत झुगारून दिल्याचा मानसिक आनंद यांमुळे होईल. कमी खर्चात लग्न करण्याची पद्धत आपण समाजात रुजवू शकलो तर शेतकरी वर्गाला याचा सर्वात मोठा फायदा होईल. श्रीमंतीचा बडेजाव दाखवणारी लग्न आपण मोडीत काढलीत पाहीजे. श्रीमंत, भांडवलदार लोक अशा भपकेबाज लग्न करण्याच्या पद्धती जोपासतात आणि त्यांच अनुकरण सामान्य वर्ग करतो. लग्न ही प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाची घटना आहे ती घटना संस्मरणीय करण्यासाठी भरपूर पैसा खर्च केला पाहीजे असं काही नाही. खर्च करायचाच असेल तर विधायक गोष्टींवर करा. लग्नात येणाऱ्या लोकांना पुस्तक वाटा. यांसारखे अभिनव प्रयोग आपण करू शकतो. पारंपारिक लग्नाची पद्धत ही शोषणकारी पद्धत आहे, तिला सत्यशोधक पद्धत किंवा कोर्ट मॅरेज हा चांगला पर्याय आहे.
*********************************   
                    
मनोज वडे,(पंढरपूर)                      
  ‎          लग्नातील खर्च काही गोष्टी केल्या पाहिजेत परंतु काही त्यातील म्हटले तर वाईपट जेवढा खर्च वाटतो तो टाळला पाहिजे जेणे करून त्याचा योग्य ठिकाणी वापर झाला तर फायदा होऊ शकतो .बगा जर आपण अक्षता म्हणजे तांदूळ जर टाकत असेल तर तो वाईपट खर्च आहे त्या ऐवजी जर फुल टाकली तर फुलांना भाव चांगला येईल आणि शेतकरी ही सुखी होईल दुसरे म्हणजे वरातीत चिरमुरे न टाकता जर त्याचा चिवडा करून गरिबांना वाटला तर फायदा होऊ शकतो ,जेवढा आपल्या परीने खर्च वाईपट वाटतो तेवढा जर टाळला तर नक्की लग्नाचा खर्च वाईपट म्हणता येणार नाही कारण त्यानिमित्ताने लोक एकत्र येतात नवीन काय करायचे काय केलं पाहिजे ह्याचे विचार त्याचे विचाराची देवाण घेवाण होती त्यामुळे एक मनाला सुखद आंनद मिळतो आणि त्या उर्जेनी लोक आपापल्या घरी जातात म्हणजे लग्नातीलखर्च हा मुद्दा घेतला तर ह्या मध्ये दोन मुद्दे येतात जर आपण वाईपट खर्च टाळला तर त्यातून होणारे फायदे ही तेवढेच आहेत...म्हणून ह्याचा बाऊ करून चालणार ही नाही.
*********************************
(यातील संबंधित छायाचित्र इंटरनेटवरून घेतलेली आहेत)

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************