नैराश्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नैराश्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

कोरोना: वाढती बेरोजगारी व नैराश्य. (भाग-3/3)


अनिल गोडबोले,सोलापूर

लॉक डाउन, नवीन स्ट्रेन, वाढत जाणारे संसर्गाचे आकडे, लोकांचे होणारे मृत्यू आणि लसीचे राजकारण या गोष्टी एका बाजूला आहेत तर दुसऱ्या बाजूला व्यापार, काम, पैसा करिअर, संधी  सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आशा.. या बाबतीत उदासीनता येत आहे.


लोक जगले तर व्यापार होईल असं सरकार म्हणत आहे व्यापारी म्हणतात की "कोरोना येईल जाईल पण जी मंदी येईल त्यात कोणीही राहणार नाहीत"


खर काय आणि खोट काय..! काहीच कळत नाही


यामुळे येत आहे प्रचंड निराशा त्याच्या पाठोपाठ येत आहे उदासीनता..  वाढत जाणारे आत्महत्येचे आकडे..


तरुणांच्या देशात तरुण मानसिक दुर्बल होणे ही अत्यंत वाईट गोष्ट आहे..


पण सर्व मित्रांनो आणि मैत्रिणींनो .. आज आपल्याकडे लढण्याशिवाय पर्याय नाही. सरकारला किंवा कोणालाही दोष देत बसलात तर नुकसान जास्त होईल..


काळ कठीण आहे खरा... पण संघर्ष करणे आपल्या हातात आहे.. अजिबात निराश न होता.. मानवी मेंदूने विचार करा.. मानवतेच्या भावनेने विचार करा.. 


आपण नक्की जिंकू .. हा आत्मविश्वास बाळगण्याची गरज जास्त आहे..


राजकारणी ,मीडिया, व्यवस्था यांचे पूर्णपणे धिंडवडे निघाले आहेत.. न्यायव्यवस्था तोकडी आहे.. 


आपण आपला मार्ग शोधावा, 'मला असच जगायचं आहे..!'हा हट्ट सोडून नवीन कौशल्य, नवीन ज्ञान, नवीन काम शोधावे..


जीवन अमूल्य आहे.. ते जाणून घेऊन आपण आपला बचाव करणं आणि पुढे जाण आपल्या हातात आहे.. 


स्वतःला संसर्ग होऊ देणार नाही.. माझ्यामुळे संसर्ग वाढू देणार नाही.. एवढी काळजी घेऊन आजचा काळ आपण काढला तरी येणाऱ्या काळात आपण नक्कीच पुढील जीवन जगू शकतो...


हारा वही जो लढा नहीं.. एवढंच लक्षात ठेवा आणि निराशेतून बाहेर या... दुसर्यानाही मदत करा.. मानवतेचाच विजय होईल याची खात्री मला आहे.


सौरव दुर्गेकार,अमरावती

गात जेव्हा जेव्हा मोठी संकटे आली होती तेव्हा तेव्हा जुन्या गोष्टी लयास जावून नव्या गोष्टी उदयास आल्या. निसर्गाचा नियमच आहे, “फक्त मजबूत असणारच जगेल (survival of thefittest)”. ज्यांनी काळाशी जुळवून घेतल ते टिकणार ज्यांनी बदल स्वीकारला नाही त्यांना निसर्गाने स्वीकारलं नाही. जर डायनासोर सारखे महाकाय प्राण्यांवर जर वाईट दिवस आलेच नसते तर लहान प्राणी आणि आपण तयार होऊन पृथ्वीवर नसतोच दिसलो.


माझ्या घराजवळील उदाहरण सांगतो,"अनंता दादा जो गेली 5 वर्षे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होता त्याने कोरोना आल्यावर आपल्याला नोकरी मिळणार नाही हे समजताच गुरांच्या पौष्टिक खाद्याचा छोटासा व्यवसाय सुरू केला, त्यात यश मिळवून आज त्याने स्वतःच पक्क घर पण बांधलं. जर कोरोना आलाच नसता तर त्याला समजलच नष्ट की रोजगाराचे अन्य मार्ग पण आहेत. त्याने आमच्या गावाची गरज ओळखली की गावात हे हे उपलब्ध नाही हे उपलब्ध करून देवू...”

 

नैराश्य, त्याच्यासाठी ज्याने आलेल्या संकटाला आपला शेवट समजला, पुनर्जन्म, ज्याच्यासाठी ज्याने संकटाला सामोरे जाण्याची तयारी दाखवून नवीन संधी निर्माण करून संधीच सोनं केलं त्यांच्यासाठी.


बेरोजगारी नक्कीच वाढली. माझा मामा, ज्याच एक उपहारगृह आहे, पूर्वी त्याच्याकडे कामाला 13 माणसे होती, तेच कोरोणा नंतर 5, माणसांना द्यावा लागणारा पगार कमी झाल्याने कमाई खूप वाढली. जी पाच उरली आहे त्यांना चांगला पगार आहेच पण ज्यांना काम सोडावं लागलं त्यांच्या पोटावर पाय. मामा आणि असेच अनेक उद्योजक, दुकानदार तरी काय करणार, आता जास्त लोकांची गरज नाही म्हणून त्यांना काढावच लागेल. 


जे काही होत ते चांगल्यासाठीच होत, या दृष्टीने बघितलं तर सगळ्यांना अशक्य वाटणारं ऑनलाइन शिक्षण या कोरोनाने आणून दाखवील, या क्षेत्रात जुन्या नोकऱ्या गायब करून नवीन नोकऱ्या आल्या. शाळेचं उदाहरण बघितल तर, घंटा वाजविणाऱ्या मामाच्या जागी आता एसएमएस वर remainder पाठवणे हे एक काम आलं, साफसफाई करणे याच्या जागी फाईल्स आणि व्हिडिओ जंक काढून व्यवस्थित बॅकअप तयार करणे, म्हणजे आताचं सफाईच काम बनलं. असच सगळ्या कामा कडे बघता येईल. 


तरुण नेहमी शोक व्यक्त करायचे की जुने लोक नोकरीवरून. निघणार नाही तर आम्ही नोकरी करणार कोठे? घ्या तुमचं काही काम कोरोना ने करून टाकलं. नवीन जगाला लागणारे नवीन कौशल्य शिका, नाहीतर काही खर नाही ब्वा….


संगीता देशमुख,वसमत

कोरोना हा आजार किती वास्तव आहे,हे माहीत नाही,परंतु त्याच्या आधारावर देशात जे राजकारण सुरू झालंय ते मात्र अत्यंत जीवघेणे आहे. आज आजूबाजूला परिस्थिती एवढी भयावह झाली की,आता जिवंत राहण्यासाठी माणूस धडपडतोय.कोरोना हा आजार किती वास्तव आहे,हे माहीत नाही,परंतु त्याच्या आधारावर देशात जे राजकारण सुरू झालंय ते मात्र अत्यंत जीवघेणे आहे. आज आजूबाजूला परिस्थिती एवढी भयावह झाली की,आता जिवंत राहण्यासाठी माणूस धडपडतोय.

       वास्तव हे आहे की,मागील काही वर्षांपासून देशात नोकरभरतीच नाही.वाढती लोकसंख्या आणि शासनाची उदासीनता पहाता आजचे शिक्षण हे वांझोटे झाले आहे. त्यातून तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल,याची शाश्वती आजचे शिक्षण देऊ शकत नाही. समाज माध्यमातून तरुणांना अनेक सल्ले देण्यात येवू लागले की,नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय शोधा. मग तरुणाई काहीतरी व्यवसाय शोधात फिरू लागले. तरुणाई इतकी गोंधळलेली की,कोणता व्यवसाय सुरू करायचे म्हटले तर पुरेसे भांडवल नाही, भांडवल जमा केले तर त्याची शाश्वती नाही.सरकार उठसुठ हे विक,ते विक सुरू आहे. त्यातूनही अनेकांच्या नोकऱ्या गेल्या,ज्यांच्या टिकल्या ते अर्ध्यावर आले. यात कहर म्हणजे, कोरोनाचे जागतिक संकट!  तरुणांची होती नव्हती आशा या कोरोनाने हिरावून घेतली. तरुणांचे स्वप्न पहाता पहाता कोसळलीत. तरुण नैराश्याच्या खाईत इतके कोसळले की,तरुणांच्या आत्महत्या वेगाने वाढल्या. ते मानसिक रुग्ण होण्याचीही प्रमाण प्रचंड वाढले. तरुणांचीच बेरोजगारी हा प्रश्न नाही तर,अनेक कमावते हात याकाळात घरात लॉकडावून झाले. घरातील पोटे लॉकडावून झालीत. देशात अशी अवस्था असताना आजही सरकार लक्ष न देता निवडणुका,राजकारण यालाच प्राधान्य देत आहे. देशातील वाढती बेरोजगारी,जनतेची हतबलता,नैराश्य,हे सगळे जाणीवपूर्वक जनतेपासून लपवून जनतेची दिशाभूल केली जात आहे.

कोरोनाच्या काळात शाळा, महाविद्यालये बंद!ऑनलाइन शिक्षण हा फक्त दिखावा ठरला. सामान्य पर्यंत एकही दिवसाचे शिक्षण पोहोचलेच नाही. कारण अजूनही अशा अनेक लोकांकडे स्मार्ट फोन नाहीत आणि काहीजणांकडे आहेत त्यांच्याकडे तेवढा डेटा नाही.अनंत अडचणीतून देश जात आहे. देशात उत्तम शिक्षण(स्वावलंबी बनवेल असे) आणि प्रत्येकाच्या हाताला काम कसे मिळेल, याचे नियोजन शासनाने करायला हवे,अन्यथा देशात तरुणांचे नैराश्य व त्यातून होणाऱ्या आत्महत्या हा कोरोनापेक्षाही भयानक समस्येला देशाला सामोरे जावे लागेल. कोणत्याही सरकारचे आजची तरुणाई हे प्राधान्य असायला हवे. आज  कोरोनापेक्षाही सवंग राजकारणामुळे देशाची अवस्था आतून पोखरलेली आहे.

कोरोना: वाढती बेरोजगारी व नैराश्य. (भाग-2/3)

प्रविण दळवी,नाशिक

कोविड-१९ महामारीमुळे जगासमोर अभूतपूर्व संकट निर्माण केले आहे हे संकट अनेक पातळ्यांवर आहे. वैद्यकीय, आर्थिक, सामाजिक, मानसिक अशा विविध पातळ्यांवर मानवजातीसमोर संकट उभे राहिले आहे. कोविड-१९ महामारीचा प्रसार रोखण्यासाठी बहुतांश देशांनी लॉकडाऊनची उपाययोजना केली आहे. कोविड-१९चा प्रसार रोखणे हे यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे मात्र लॉकडाऊनमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. उद्योग-व्यवसाय ठप्प झाले आहेत. आर्थिक व्यवहारच थांबल्यामुळे किंवा फारच कमी प्रमाणात सुरू असल्यामुळे त्याचा विपरित परिणाम मनुष्यबळावर झाला आहे. कोविड-१९च्या संकटामुळे जगभरात बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढले आहे त्यामुळे आणखी एक नवे संकट उभे राहिले आहे. काही रोजगार आतापर्यतच्या कालावधीत गेले आहेत, तर काही रोजगार आगामी काळात जाणार आहेत. कोविड-१९ महामारीला रोखण्यावर सध्या सर्वच सरकारांचे लक्ष केंद्रित झाले आहे. याचा परिणाम अर्थव्यवस्थेचे चक्र मंदावण्यात झाले आहे. अलीकडच्या काळात भारतात आणि जगभरातदेखील हळूहळू लॉकडाऊनमधून बाहेर येत अर्थचक्राला चालना देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र अजूनही कोविड-१९चे गांभीर्य मोठे आहे त्यामुळे ही दीर्घकालीन लढाई आहे. दुर्दैवाने नकळत या सर्व घटकांचा दीर्घकालीन मोठा परिणाम समाजातील कमजोर घटकांवर झाला आहे त्यांच्यासमोर आगामी काळात मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. या सर्व परिस्थितीत मानसोपचार सेवा योग्यरितीने उपलब्ध होणे आणि त्यांचा सर्वसामान्यांना योग्य तो प्रतिसाद मिळणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.


मीकवी,मंगळवेढा,सोलापूर

ह्या रोगराईला सामोरे जात असताना कित्येकांना आपला जीव गमवावा लागला तर कित्येकांना आपला रोजगार गमवावा लागला.मी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या उमेदवारांपैकी एक आहे.खरं तर या स्पर्धेत जागा असतात 250 आणि उमेदवार असतात 4 लाख 50 हजार.उरलेल्या  4 लाख 49 हजार 750 उमेदवारांचं काय होईल...? आता ह्या सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांना रोजगार कुठून उपलब्ध व्हायचा....


दुसरा मुद्दा :- प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत मुलांना प्रशिक्षण दिलं गेलं पण ते खरंच योग्य आणि दिशादर्शक होत का...? हा प्रश्न मुळात मला सतावतो.


कोरोनाच्या काळात ना परीक्षा झाल्या ना कोणता रोजगार भेटला... मग आपलं जीवन जगायचं कस हा प्रश्न वारंवार आजच्या युवकाला पडतो....खरं तर याच प्रभाव उभरत्या भारतातील युवकावर पडत आहे.ना रोजगार उपलब्ध ना रोजगारक्षम मार्गदर्शन वा शिबिर. 


वाढतं नैराश्य :- जर रोजगार नसेल तर प्रत्येकजण तणावाखाली येणार हे साहजिकच आहे.आजचे युवक म्हणजे वय 18 ते 35 च्या आतील सर्व जण नैराश्याने जगत आहेत....एकीकडे कोरोना तर दुसरीकडे कोरोनाच्या प्रभावाने कमी होत असलेल्या नोकऱ्या.नैराश्याची अनेक कारणे येतात परंतु बेरोजगारी हे प्रमुख कारण आजकाल दिसत आहे.यावर उपाय सापडेल अस मला वाटत नाही...२०२७ पर्यंत भारत लोकसंख्या बाबतीत जगात एक नंबर होईल तेव्हा बेरोजगारी अजून कोणत्या थरापर्यंत जाईल हे अंदाजही लावू शकत नाही.


शुभम देशमुख,नांदेड़.

कोविड-१९ महामारीमुळे जगासमोर अभुतपुर्व संकट निर्माण झाले आहे. या महामारीमुळे आनेक क्षेत्र माघे पडले आहेत. आनेक बाबींवर याचा गंभीर असा परिणाम दिसून येत आहे, ज्यामध्ये आर्थिक, मानसिक, वैधकीय, सामाजिक आशा आनेक बाबी आहेत. मानवजातीसमोर एक मोठे संकट उभे राहिले आहे.हे संकट रोखण्यासाठी वेगवेगळ्या देशानी वेगवेगळी उपाययोजना केली आहे पण बहुतांश देशांनी लॉकडाउनची उपाययोजना केलेली आहे. लॉकडाउन मुळे कोविड-१९ चा प्रसार रोखण्यास मदत तर होत आहे परंतु आर्थिक द्रश्ट्या आनेक देश मागे पडले आहेत. याच लॉकडाउनमुळे जागतिक आर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. आनेक उद्योग-धंदे थांबले आहेत काही तर बंद पण पडले आहेत. उद्योग-धंदे बंद पडल्यामुळे किंवा जे सुरु आहेत ते खुप कमी प्रमाणात सुरु आहेत त्यामुळे बेरोजगारी पण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 


बेरोजगारी वाढल्यामुळे खुप जणांना नैराश्य आले आहे. त्याचा परिणाम आत्महत्येच्या प्रमाणावरदेखिल झालेला आहे. त्यामुळे आनखी एक मोठे संकट आपल्या पुढे उभे टाकले आहे. आता सर्वसामान्य माणूस जीव वाचवणार की आपली उपाजिविका वाचवणार काही कळत नाहिये. या संकटा मुळे पुर्ण मानवजाती खचली आहे. आपण सर्वानी मिळुन या संकटाला सामोरे जा लागेल. नियम पाळुनच आपल्याला या कोरोनाला टाळता येईल.



कोरोना: वाढती बेरोजगारी व नैराश्य. (भाग-1/3)


शिरीष उमरे,नवी मुंबई.

जानेवारी २०२० ला अंतर्देशिय विमान प्रवासी कोरोना भारतात घेवून आले. तेंव्हापासुन आज १६ महिने झालेत, कोरोना थैमान मांडतोय सगळीकडे... ह्या पाचशे दिवसात सगळी उलथापालथ झाली आहे देशात...


२०१४ च्या मध्यापासुन धार्मिक उन्मादाचा उगम मागिल सात वर्षात त्सुनामीचे रुप धारण करुन थयाथया नाचतोय संविधानाच्या छातीवर... भस्मासुरासारखी गत झाली आहे मतदारराजाची !! वणवा पेटतो तसे सगळीकडे आग पसरत चालली आहे. त्यात चुकीचे राजकिय निर्णय पेट्रोल सारखे काम करत आहेत... हा भडका आता सगळ्यांना भाजत चालला आहे. 


नोटबंदी व जीएसटी ह्यासारखे अवकाळी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी म्हणजे माकडाच्या हातात कोलित दिल्यासारखे झाल होतेे. कित्येक करोडो छोटे व्यवसायी, उद्योजक व सेवा पुरवठादार ह्यांची अर्थव्यवस्था कोलमोडुन पडली होती. नविन नोकरभरती तर सोडाच, जुन्या स्टाफची छाटणी सुरु झाली होती.


 ह्यातच एनपीए माफीच्या माध्यमातुन काही ठराविक कार्पोरेट घराण्यांना फायदा पोहचवुन बँका मोडकळीस आणल्या गेल्या. सामान्य लोकांना कर्ज मिळणे तर दुरच, त्यांच्या कष्टाच्या बचतीच्या ठेवी धोक्यात आणुन टाकल्या.  लघुउद्योग संपुष्टात येत गेलेत. सरकारी नियंत्रणातल्या कंपन्या विकण्याचा सपाटा लावलाय त्यातुन खाजगी क्षेत्राला फायदा पोहचवणे व आरक्षण संपवणे अशी दुहेरी कुटनिती अंमलात येत आहे.

शेतकरी, आदिवासी व मजुर वर्गाला जगणे मुष्कील करणाऱ्या पॉलिसी संसदेत पाशवी व अनैतिक मतदानाने मंजुर करवुन अर्थव्यवस्थेच्या कबरीवर शेवटचा दगड ठेवण्यात आलाय. 

ह्या सगळ्या अराजकतेत कोरोना ही आंतराष्ट्रीय आपदा आली. केंद्र सरकार व राज्य सरकारने ह्याचा योग्य फायदा उचलुन लॉकडाउन च्या शस्त्राचा वापर करुन बेरोजगारीचा पहाड तात्पुरता झाकण्यात यश मिळवले. 


लॉकडाउनच्या काळात झालेल्या मानवी हक्काची ऐशीतैशी व करोडो मजुरवर्गाची पायपीट हृदय पिळवटुन टाकणारी होती. एक वर्ष आख्खी भारतीय जनता घरी बसवुन ठेवली होती. -२३ ही जीडीपी ची निगेटिव ग्रोथ ह्याचेच ध्योतक आहे... 

कोरोनाचा मृत्युदर १% सुध्दा नाही आहे. ह्यापेक्षा दहापटीने जास्त मृत्युदर असणारे रोग भारतात आहेत त्यावर मुलभुत आरोग्य सुविधा कुठलेच सरकार पुरवत नाही. आर्थिक अंदाजपत्रकात आरोग्य व शिक्षणावर असलेली तुटपुंजी व्यवस्था व त्यात सरकारी यंत्रणेचा प्रचंड भ्रष्टाचार ह्यामुळे जागतिक पातळीवर १९६ देशाच्या यादीत १६४ वा नंबर आहे आपल्या देशाचा. हे सगळे दारिद्र्य लपवण्यासाठी जनतेला वेठीस धरणे सुरु आहे. 


कोरोना वर आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी सरकार जवळ ना पुरेसा मेडीकल स्टाफ आहे ना हॉस्पीटल बेड...ना आवश्यक औषधी ना वेंटिलेटर्स ... त्यातच महागाई चे जनतेला रोजचे झटके !!


आरोग्य व शिक्षणातील खाजगी क्षेत्रे तर जबरीची वसुली करुन राहिली आहे जनतेकडुन. मिडीयाद्वारे कोरोनाची प्रचंड भिती निर्माण करुन बेरोजगारी ह्या महत्वाच्या मुद्द्या वरील लक्ष वळवण्यात सरकारी यंत्रणेला यश मिळाले आहे. पण ही तात्पुरती थोपवणूक भयंकर रुप धारण करणार ह्यात शंकाच नाही. 


सध्याचे बेरोजगार तरुणवर्गाचे नैराश्य त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त आहे. प्रचंड प्रमाणात लोक डीप्रेशनचे बळी पडत आहेत. ह्यातुन त्यांना सावरणे गरजेचे आहे.  आज मुठभर सधन लोक सोडले तर ९०% भारतिय आर्थिक चणचणीला सामोरे जात आहेत. 


ह्यात वेळेवर योग्य उपाययोजना केल्या गेल्या नाहीत तर भविष्यात  जनक्षोभातुन गृह युध्द व गुन्हेगारीत नियंत्रणाबाहरील वाढ आणि नंतर  हुकुमशाही सारख्या अरिष्टके नाकारता येणार नाहीत. 


लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी व कोरोना संपवण्यासाठी आणि देशाला पुर्वपदावर नेण्यासाठी एकजुट महत्वाची... पुढील ३ वर्षे देशासाठी खुप महत्वाची !!! जागते रहो ....


किरण पवार,औरंगाबाद.

          ध्या कोरोनामुळे एक गोष्ट फार विचित्र झालेली पहायला मिळते आहे, ती म्हणजे नैराश्य येणं. नैराश्य येणं आणि त्याविरोधात मानसिक लढा देणं हे एका मर्यादेपर्यंत आधी बऱ्यापैकी सहज वाटतं होतं. परंतु कोरोनामुळे गोष्टी अशा काही बद्दलच्या की, पुढे दिसू लागणारी प्रत्येक शाश्वत गोष्ट अंधारात दिसू लागली किंबहुना नाहीशीच झाली. थोडक्यात यात करियरचा एखादा महत्वाचा टप्पा असेल, एखाद्या व्यवसायाचा जम बसवणं असेल, काहींच्या ठराविक स्पर्धा परिक्षा असतील, वा इतर विविध गोष्टींचा यात समावेश येतो. काही गोष्टी अशाही घडत आहेत की, अनेकांना दोन वर्षांच शिक्षण थेट ऑनलाईन मिळून नंतर त्यांच कॅम्पस इंटरव्हू, नंतर सिलेक्शन आणि थेट काम भेटलं तर वर्क फ्रॉम होम. कुठेतरी आपण आधीपासूनच अशा अचानक आलेल्या बदलाला सामोरे जाण्यासारखे नव्हतोच, आत्ताही अनेकांची ती मनस्थिती तयारच नाही होतं. नैराश्य यायला कारणीभूत ठरलेल्या ठराविक गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे, अनेकजण आज सर्वांसोबत, सर्वांमधे असूनही एकटे पडले आहेत. त्यांना त्यांच्या एकटेपणाची चाहूल आहे पण ती उलगडून दाखवता येत नाहीये. आपण माणूस म्हणून अनेकदा दिखाव्यांना अधिक महत्व देतो, ज्याने गोष्टी आपल्याच आंगलट येतात; आणि हे कोरोनाकाळात अनेकांचं झालं आहे. आज बेरोजगारी वाढलेली आहे तरीदेखील आम्हाला यासारख्या महत्त्वाच्या विषयावर पाठ फिरवायला अधिक आवडतं. कारण इन्स्टाग्राम रिल्स आनंद द्यायला सोबत आहेतचं की! मुळात आपण कोरोनामुळे व्यवस्थापन, नियोजन, आयुष्यात तयारीत रहाव्या लागणाऱ्या करियरसाठी इतर प्लॅन्सची अशी कुठली तसदीच घेतलेली नाही. बेरोजगारी कुणा एकाच्या अमुकतमुक निर्णयाने तयार झाली असं नाहीये, बेरोजगारी वाढीस लागायला अनेक घटक जबाबदार आहेत असं मला वाटतं. आणि राहिला प्रश्न नैराश्यातून बाहेर पडायचा तर ते आपण साध्य करू शकतो फक्त थोडासा खंबीरपणा मनाला जाणवून देण्याची गरज आहे. तुर्तास इथेच थांबतो, धन्यवाद!


सौदागर काळे,पंढरपूर.

वळपास दीड वर्ष झाले कोरोना हा आजार आपल्यात आहे.सध्या तो जास्तच वेगाने आपले साम्राज्य तयार करतो आहे. त्याच्या या शक्तीपुढे जगातील अणवस्त्रधारी देश सुद्धा नांगी टाकत आहेत.त्याने सर्वांची अर्थव्यवस्था खिळखिळी केली.तहान लागली की विहीर खोदण्याचा प्रकार करावा तशाप्रकारे सर्व देशांतील सरकारांनी आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष देण्याचा चंग बांधला.पण तो किती तकलादू आहे याचा आपण रोज  मीडियाद्वारे तमाशा पाहतो आहे.आता कोरोना वर लस आली.लसीकरण चालू झाले.या पार्श्वभूमीवर आपल्या राज्याचा विचार केला तर केंद्र-राज्य , सत्ताधारी-विरोधक यांच्या भांडणात केव्हाही राज्याची परिस्थिती हाताबाहेर जाईल की काय! असे चित्र उभे राहत आहे.


उद्या कोरोना जेव्हा जाईल तेव्हा त्याने किती हानी केली याच्यापेक्षा त्याने आपल्या या व्यवस्थेप्रती आपले कितपत डोळे उघडले,हे अनुभवणे खरं महत्त्वाचे ठरणार आहे. 

मानवाच्या मूलभूत गरजांपैकी अन्न ही जगण्या-मरण्याच्या अस्तित्वाची गरज आहे. वस्त्र,निवारा,आरोग्य व शिक्षण या गरजा पोट भरल्यानंतर येतात.तरीपण या साऱ्या गरजांची पूर्तता होण्यासाठी या व्यवस्थेत आपण धडपडत असतो. अशावेळी योग्य वयात काम मिळणे खूप गरजेचे आहे.ते मिळत नसल्याने खुपजण नैराश्यात जीवन जगत आहेत.कोरोना येण्यापूर्वी आपल्या देशात बेरोजगारी व त्याच्या मुळे लोक नैराश्यामध्ये जाण्याचे प्रमाण होतेच.हे नाकारून चालणार नाही.फरक एवढाच होता तेव्हापर्यंत ते पद्यावर अंधूकपणे दिसण्याची व्यवस्था सरकारने केली होती ती आता कोरोनाने हातामध्ये सूत्रे  घेताच  पडद्यावर स्पष्टपणे दिसू लागले. कोरोनापूर्वी नवा रोजगार मिळावा म्हणून काम करण्यासाठी तरुण वर्ग प्रतीक्षेत आहे.


आता कोरोना काळात अर्थव्यवस्था बेजार झाल्याने जे रोजगार होते ते सुद्धा जात आहेत.ज्यांचा रोजगार जात आहे, तो वर्ग कौटुंबिक जबाबदारीचे ओझे वाहणारा आहे.ज्याच्यावर अख्खे कुटुंब अवलंबून आहे. जॉब नसल्यामुळे लग्न न होणाऱ्या तरुणाईपेक्षाही हा वर्ग सर्वात जास्त नैराश्यात असणार यात शंका नाही.या कोरोनाच्या काळात जे असंघटित क्षेत्रात काम करत होते.त्यांचे रोजगार गेले. सुरुवातीच्या लॉकडाउनच्या काळात रस्त्यावरून घरी चालत जाणारे लोक पाहिले की अजूनही ते विचलित करून जातं. त्यांनी ते अनुभवलं.आजही ते पोटाला चिमटा काढत येणाऱ्या दिवसाला सामोरे जात आहेत.


हे कधीपर्यंत चालेल.माहीत नाही.उद्या कोरोना या जगातून जाईल सुद्धा.पण बेरोजगारीवर राज्यकर्ते लस तयार करतील का! याचे सध्यातरी उत्तर नाहीच. त्यामुळे आपण नैराश्याला सोशल डिस्टिंग प्रमाणे सध्यातरी दूर ठेऊनच जगूया.यातच भले आहे.


सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************