आठवणी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आठवणी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

पत्र..पोस्ट ऑफिस ते डिजिटल पोस्ट

पत्र.. पोस्ट ऑफिस ते डिजिटल पोस्ट

🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

पत्र..पोस्ट ऑफिस ते डिजिटल पोस्ट


Source: INTERNET               
-स्वप्नील चव्हाण,
 जि बुलडाणा

प्रिय पत्र,
        आज खूप दिवसानी आठवण आली रे तुझी....आणि चक्क भरून आल्यागत झालं मला...ते लहापणिचे दिवस असे समोर उभे झालेत एकदम...आज तुला फक्त सरकारी कामासाठी सोडून इतरत्र वापरत नाहीत हे मी जाणतो....पण तरीही तू आमच्या बालपणिच्या खूप आठवणी साठवून ठेवल्यात....कधी मामा पाठवायचे ,कधी मावशी ,कोणीही पाठवू देत तू मात्र तुझं काम चोखपणे करायचा ......अगदी न थकता...... आणि तरीही लोक आज विसरलेत रे तुला.....दुःख होत खूप....
         अगदी लोक तुझी वाट बघायचे रे....कधी येणार पत्र ...?? आणि आज  तू लोकांच्या स्मरणात नाहीयेस....असू दे ...कोणाला असो वा नसो ...आम्हाला तू आजही तेवढाच प्रिय आहेस.....               
.............."कारण आमच्यासाठी तू फक्त एक कागदाचा तुकडा नव्हतास....तू आमच्या बहिणीची राखी होतास......तू आमच्या आई-वडिलांची काळजी होतास....तू वडीलधाऱ्यांचा आशिर्वाद होतास....कधी खर्चासाठी पाठवलेले पैसे होतास....तर कधी निकाल खराब आल्यामुळे घरच्यांचा राग होता.....युवकांसाठी त्यांच्या प्रेयसीचं प्रेम होता........"

   खरंच खूप काही होता तू आमच्यासाठी........तेव्हा कदाचित आम्हाला मायने ,आराखडा माहीत नव्हता....कारण आम्हाला आमच्या भावना पोहोचवणं जास्त महत्वाचं वाटायचं....आज पत्र कसं लिहावं....हे शिकवावं लागतंय वर्गात......पण ते पत्र लिहीनं फक्त वर्गात आणि परीक्षेतच विसरून येतो आपण......आणि संदेश पाठवायला फेसबुक,व्हाट्सएप,हाइक,वगैरे आहेत ना....पत्र आम्ही फक्त परीक्षेत गुण मिळवायला शिकतो........
आजही "कबुतर जा " गाणं लागलं की ते प्रियकर आणि प्रियसी नजरेसमोर उभे राहतात...एकमेकांच्या पत्रासाठी आतुर........
अरे चित्रपटांमध्ये पण तू कित्येक महत्वाच्या भूमिका बजवल्यास....कधी प्रेम,कधी कुणाचं गुपित,कधी पुरावा ,तर अगदी "तुम मुझे भूल जाओ" इथपर्यंत.....कमाल आहे रे तुझी..!!

    आज तुझं स्वरूप बदललंय..... वेगवान झालास तू....पण आधी ज्या भावना पोहोचवत होतास कदाचित त्या पोहोचवत नाहीयेस आता....."पेपरलेस" सोबत "फिलिंगलेस" पण झालास की काय असं वाटायला लागलंय.......
  व्हाट्सएप वर रोज बोलण्यात ती मजा उरली नाही रे जी फक्त...दसरा-दिवाळी, भाऊबीज, रक्षाबंधन , वाढदिवसाला येणाऱ्या पत्रांमध्ये होती.......तू यायला थोडा वेळ लावायचा पण ...सोबत खूप भावना घेऊन यायचा रे....आता डोळ्यांची पापणे लावण्याच्या आत तू पोहोचतो ....पण त्या भावना का जाणवत नाहीयेत देव जाणे....??
कदाचित फक्त निरोप पाठवणे हाच हेतू उरला असावा...आज फास्ट होण्याच्या मागे आम्ही भावना विसरत चाललोय .....माणूस असूनही माणुसकी विसरत चाललोय.....कारण अपघात झालेल्या व्यक्तीला मदत केल्यापेक्षा, फोटो काढून व्हाट्सएप वर टाकणे आम्हाला जास्त गरजेचं वाटतं.... तुला वाटत असेल फक्त तुच बदलला ... नाही रे...आम्ही पण बदललोय... आता दिसायला आम्ही माणूस दिसतो....जी गोष्ट..अर्थात ह्या भावना आम्हाला इतर प्राण्यांतून वेगळं करतात त्या आता लोप पावत आहेत....माणूस फक्त पैसा नावाच्या कागदाच्या तुकड्यामागे धावतोय......आणि आम्ही पण प्राणीचं आहोत हे सिद्ध करण्याचा मागे लागलाय.......
       असो....पण जेव्हाही तुझा विषय निघेल...हे मन भावनांनी आणि डोळे नक्कीच पाण्याने भरून येतील...तू ज्या गोड आठवणी दिल्यास त्याबद्दल ....खूप खूप आभारी....!!
    प्रेमप्रकरण सुरुच तू करायचा ना ....आता पहिल्याच दिवशी मोबाइल नं. मागितला जातो.......कित्येक जणांसाठी तू नोकरी ची बातमी घेऊन यायचा....आता ते पण नाही....बघा इंटरनेट वर.....सैनिकांच्या कॅम्प मध्ये पोस्टमन आल्यावर जी उत्सुकता राहायची ती आता उरलीच नाही.....कारण पोस्टमन ला जावंच लागत नाही.....आठवत असेल ना तुला ते तुझ्यासाठी लिहिलेलं गाणं..."संदेसे आते है....."
  आणि खरंच "पोस्टमन काका" हा घटक तुझ्यासोबत दिसेनासा झालाय रे....काल तू दिसला रे मला त्या "चला हवा येऊ द्या" च्या सेट वर....पोस्टमन काका पण होते....छान वाटलं बघून थोडं.....पण राहशील रे तू स्मरणात कारण आज पण "मामाचं पत्र हरपलं" खेळ आठवला की हसू फुलत चेहऱ्यावर......असंच तुझ्या आठवणीत हसत राहावं सगळ्यांनी ,कारण आठवणीच तेवढ्या गोड होत्या ना......
               तुझ्या प्रतीक्षेत,
                   "माणूस"



Source: INTERNET  
-मयुरी देवकर,
 ता.माळशिरस

              अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या की माणसाला दळणवळण व संदेशवहनाच्या गोष्टींची उणीव भासू लागली आणि यातूनच नवनवीन संदेशवहनाच्या गोष्टींची निर्मिती झाली.त्यासाठी प्रथमतः नवनवीन रस्ते निर्माण झाल्यानंतर आपला निरोप दुसऱ्या गावी पोचवायचा असेल तर दूत पाठवावे लागत.नंतर अशाचप्रकारे पत्र, टेलिफोन,मोबाईल, अशा अनेक माध्यमांचा शोध लागला.'पत्राचा 'शोध लागला आणि आपल्या मनातील भावना,सुख,दुःख व्यक्त करणे खूप सोयीस्कर झाले आणि मग सुरु झाले ते पत्र घेऊन येणाऱ्या पोस्टमनकाकांची वाट पाहणे......त्यावेळी खूप लोक अशिक्षित होते त्यामुळे अगदी ते पत्रही वाचता येत नसायचे ...मग काय कधी कधी तर ते आलेले पत्र नंतर दहा-पंधरा दिवसांनी ज्यांना वाचता येते त्यांच्याकडून वाचून घ्यावे लागायचं.... त्यामुळे जर एखादी दुःखद घटना घडली तरी खूप उशीरा माहिती व्हायची.पण तेवढी तरी माहिती व्हायची हे महत्त्वाचं... पत्र पाठवणाऱ्या आणि मिळणाऱ्या दोन्ही व्यक्तींना खूप आतुरता वाटायची...आणि त्यात पत्राला उत्तर म्हणून परत पत्र आले तर आनंद द्विगुणित व्हायचा...गावातील खूप लोकांचा चेहरा पोस्टमनला पहिले कि खुलून जायचा...
          दिवसेंदिवस पुन्हा नवनवीन शोध लागू लागले आणि कमी वेळात संदेश पोहोचण्याची व्यवस्था झाली आणि आज तर पोस्ट ऑफिसची जागा डिजिटल पोस्टने घेतलीय...आज लहानांपासून मोठ्यांपर्यंत व गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळेच डिजिटल झाले आहेत....आज या डिजिटल पोस्टच्या युगात माणसं एका सेकंदाच्या अंतरावर आली पण प्रेम ,माया,आपुलकी,ती आतुरता खरंच कुठं गेली ???
या डिजिटल पोस्टाच्या काळात माणसं जवळ आली पण मनं मात्र दुरावली ...काय उपयोग आहे मग ?आज सर्वांना वाचता येत असताना आज आम्हाला समोरचा माणूसच वाचता येत नाही तर खरंच आम्ही प्रगती कुठे केली हा प्रश्न पडतो...आज पत्राच्या खूपच लवकर एखादा संदेश पोहोचतो पण तो संदेश मिळाला तरी तो आनंद आज कुठेतरी हरवला आहे...आणि हा हरवलेला आनंद डिजिटल पोस्टात नव्हे तर माणसातच मिळेल........



Source: INTERNET  
-संगीता देशमुख,
वसमत

पत्र हा शब्द आठवला की, अजूनही आठवते ते पिवळसर रंगाचे पोस्ट कार्ड,फिकट निळसर आंतरदेशीय पत्र आणि फिकट पिवळसर रंगाच्या  लिफाफ्यातील दोन्ही बाजूने लिहिलेली मोठमोठी पत्रे! आणि दारावर येऊन "पोस्टमनsss" अशी मोठ्याने हाक मारणारा खादी वर्दीतला पोस्टमन! गावात सर्वजण पोस्टमनला "मामा" म्हणायचे. असंही आपल्याकडे जवळच्या  वाटणाऱ्या माणसाला "काका" म्हणण्यापेक्षा "मामा" म्हणण्याची आंतरिक उर्मी जास्तच! तर हे पोस्टमन मामा फक्त पत्र घेऊन येत नसत तर त्या पत्रातून मामा,मावशी,आजी,आजोबा,बाहेरगावी असणारे भाऊबहीण,सासरी गेलेल्या मुलीच्या भावना,माहेराहून आईवडिलांच्या भावना अशा अनेक हृदयस्थ भावना घेऊन यायचे. त्यामुळे हे पोस्टमन अनेकजणांच्या मनाला जोडणारा दुवा होता. तसेच नोकरीची मुलाखत असो की नोकरीचे  नेमणूक पत्र असो,हे पोस्टमनच आपल्यापर्यंत पोहोचवायचे. पोस्टमन हे जवळचे वाटणे,हे साहजिकच होते.यात सर्वाना भावनिकदृष्ट्या जोडून ठेवण्याचा महत्वाचा दुवा होता तो म्हणजे पोस्टमनकडून येणारे पत्र!
      आज या पत्राचा प्रवास इमेल पर्यंत येऊन पोहोचला आहे. पण पत्रामध्ये जी भावनिकता असायची ती इमेलमध्ये कुठून आणि कशी येईल? कारण आज इमेलचा उद्देशच हा मुख्यत्वेकरून कार्यालयीन आहे. आजचे धावते युग आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेक कामे सुलभ आणि ताबडतोब होतात. तसे पाहता लोकांना खूप वेळ मिळायला हवा होता. परंतु या वेळेचेही समायोजन आजच्या तरूण पिढीने सोशल मिडियाकडे केले.  त्यामुळे कोणाकडे मोकळा वेळ नसल्याने अनौपचारिक पत्र पाठविण्यात येत नाहीत. त्यामुळे आजच्या झटपट युगात पत्राची सर इमेलला येणार नाही. आज इमेल काही सेकंदात जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात पोहोचते. पत्र मात्र आज लिहून पत्रपेटीत टाकले तर जिल्ह्याच्या बाहेर पोहोचायलाच तीन-चार दिवस लागायचे,तर राज्याबाहेर हे पत्र पोहोचायला कधी कधी तर दहा ते पंधरा दिवस लागत. यात जी प्रतीक्षा होती,त्या प्रतीक्षेत एक अनामिक ओढ असायची. साहजिकच एवढी वाट पाहून आणि दुरून  आलेल्या पत्रात काय असेल,ही उत्सुकता त्यात असायची. पत्र हे दूरच्या व्यक्तीसाठी संवादाचे एकमेव साधन होते. आज पत्र नामशेष होण्यामागचे कारण आज मोबाईलद्वारे जगाच्या कोपऱ्यात काही क्षणात कुठेही संवाद साधता येतो. परंतु पत्रातून मनातल्या भावना मोकळ्यामनाने लिहिल्या जायच्या,ज्या की आज मोबाईलवर तेवढ्या उमाळ्याने त्या बोलू शकत नाहीत. पत्रातून अख्ख्या गाण्यांच्या ओळी,शेर-शायरी,गझल यांनी ते पत्र अधिकच बहारदार व्हायचे. म्हणूनच ते तेवढेच जपूनही ठेवल्या जायचे.
          माहेराहून आलेले पत्र सासुरवाशीणीला मायेची ऊब  देऊन जायचे,तर सासरहून आलेल्या लेकीच्या पत्रातून आईला मुलीचे सुखदुःखे कळायची. सीमेवर लढणाऱ्या सैनिकाला घरून आलेल्या पत्राने शत्रूसोबत लढण्यासाठी अंगात दहा हत्तीचं बळ यायचं, तर सीमेवरून सैनिकाच्या  आलेल्या पत्राने घरच्यांचा जीवात जीव यायचा. माझे पती सैन्यात होते. तेव्हा लॅंडलाइन फोन हे श्रीमंताकडेच असायचे. घरापासून दूर असणाऱ्या सैनिकांना हे पत्र म्हणजे जीव की प्राण असायचे. अशी पत्र लिहिता लिहिता मी त्यांच्या मित्रांनाही पत्र लिहीत होते. त्यांना दरवर्षी न चुकता राखीपोर्णिमेला मी राखी पाठवायची. त्यामुळे ते सर्व माझे  सैनिक बंधू माझ्या पत्राची आतुरतेने वाट पहात असत. याच पत्रातून मी एकदाही न पाहिलेल्या त्या मित्रांसोबत आमचे बहीणभावाचे असे दृढ नाते निर्माण झाले हे आज एवढ्या वर्षानंतरही टिकून आहे. अशी अनेक अतूट नाती या पत्राने बनविली होती. त्यानंतर काही वर्षातच डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचे समाजातील अंधश्रद्धा विरोधी काम करण्यासाठी पत्र मला आले होते. त्या पत्राने माझ्या जीवनाला खरी कलाटणी मिळाली.  माझी इतकी कर्मठ घरात जडणघडण झालेली असतांना मी त्या पत्रापासून पूर्णपणे बदलले.हा पत्राचा आजपर्यंतचा प्रवास अत्यंत रोमांचकारी आणि विस्मयकारक आहे.


Source: INTERNET  
-यशवंती होनमाने,
मोहोळ

"डाकिया डाक लाया,देखो डाकिया डाक लाया "किती छान वाटतंय ना ऐकायला.पत्र एक अस व्यासपीठ की त्या व्यासपीठावर मनातील सगळ्या भावना ,विचार ,स्वप्न अगदी सहज व्यक्त करता येतात.पूर्वी गावाकडे पोस्ट्मन काका आले की सगळे कान टवकारून असायचे.शहरांत काय घडले याचा सगळा इतिहास असायचा.गावातला कोणी तरी शहरात कामासाठी गेलेला असायचा,कोणी बॉर्डर वर देशाचं रक्षण करत असायचे तर कोणाच्या लेकीबाळा दूर सासरी असायच्या,या सगळ्याना एकमेकांना भेटण्यासाठी एकच साधन होत ते म्हणजे पत्र.              
        "हमने सनम को खत लिखा ,खत में लिखा "हे सॉंग ऐकलं की त्यात त्या प्रेयसीच्या व्यक्त होणाऱ्या भावना समजतात ,तर,"के चिट्ठी आती है ,के पूछे जाती है ,लिखो कब आओगे "हे बॉर्डर फिल्म मधील सॉंग काळजाचा ठोका चुकवून जाते.म्हणजे बघा या पत्राचा किती आधार होता.पण आता.....😔😔 या email च्या जमान्यात पत्राची ओढ रहिली नाही.डिजिटल च्या जमान्यात नाती पण डिजिटल झाली.कोणतीच ओढ ,माया ,प्रेम राहील नाही.उरलाय फक्त मेसेज.असा मेसेज की त्यातली कोणतीच भावना मनाला स्पर्श करत नाही.
        पण एकमात्र नक्की आहे की जग कितीही पुढे गेले तरी पत्राची जागा कोणत्याही email ,मेसेज ने घेतलेली नाही.जी हुरहूर पत्र वाचताना होते ती मेसेज किंवा email वाचताना होत नाही.जी मजा पत्र चोरून वाचण्यात आहे ती कशात नाही.
     "पता है हमें के हम नही आ सकते तुम तक तो क्या हुआ ये खत है जो मेरी रूह से निकले हर लफ्ज तुम्हारे  दिल के आईने पर नज़र आयेंगे!"
        असो जग कितीही डिजिटल झाल तरी पत्र लिहिण्याचा आनंद च वेगळा.लिखे जो खत तुझे ,वो तेरी याद में !!!!!
     चला तर मग पत्र लिहायला सुरवात करायची ना ?????
प्रिय ........पत्र लिहिण्यास कारण की ..........



Source: INTERNET  
-किरण पवार,
औरंगाबाद

                मला प्रत्यक्षात पत्र लिहण्याचा योग केवळ दोन वेळेसच आला पण मला वैयक्तिकरित्या पत्रांची खूपच आवड होती. नेहमी वाटायचं की, खुशाली विचारणारं किंवा पावसाची तब्येत विचारणारं पत्र कधी आपणही कुणाला लिहावं. आणि बदल्यात समोरच्याने आपल्याला त्या पत्रात त्यांच्याकडील सभोवतालच्या परिसराची माहिती रितसर लिहूण पाठवावी. जेणेकरून मला वर्णन जर आवडलंच तर त्या ठिकाणी मुसाफिर बनून जाता येईल. कधीकधी वाटायचं आईलाच पत्र लिहावं. पण त्यावेळी लहान होतो; आणि माहित नाही का पण मनात असं वाटून जायचं की, पत्र पोहोचलच नाही तर.....
         मला आणखी एक गोष्ट चांगलीच माहित आहे ती म्हणजे, पत्र म्हणजे वाट पहाणं. मग ते वाट पहाणं किती क्षणांच किती मैलांच असेल हे कल्पिलेलच बरं. तो काळ जुना होताच तसा की, पत्र पोहोचायला वेळ लागायचा. मी सहावीत शिकत असताना मराठीत एक धडा होता बहुतेक... ज्यामधे आंधळी आजी तिच्या परदेशी गेलेल्या मुलाची वाट पहात असते आणि तो तिला साधं एक पत्रही लिहीत नसतो. पण पोस्टमनकाका त्या आज्जींना खोट पत्र वाचवून दाखून समाधानाच हास्य त्यांच्या चेहऱ्यावर उमटवतं असतो. त्या गोष्टीपासून मला पत्राबद्दल खूप आस्था दाटून येते...
         पण सध्याच्या डिजीटल पोस्टमधे त्या भावनांच येणं कधीच होणार नाही. डीजीटलच्या जमान्याला रागलोभाचा चेहरा थरथरणाऱ्या सुरकुत्यांच्या रुपात दिसणारच नाही जे की, पत्रातल्या शब्दांवरून स्थितीच भान लावता यायचं....

पहिला पाऊस...आणि माझ्या आठवणी(भाग-1)

आठवडा 30 वा.


पहिला  पाऊस...आणि माझ्या आठवणी(भाग-1)

(यातील सर्व संबंधित प्रातिनिधिक छायाचित्रे इंटरनेटवरुन घेतलेली आहेत.)

शिरीष उमरे,नवी मुंबई
लहानपणी जुन महीन्यात काळे ढग आकाशात  बघितले की की इवल्याश्या मनात भावनांचे वादळ सुरु व्हायचे... पहील्या पावसात भिजण्यास आतुर झालेली धरणी व त्यानंतर होणार्या सुगंधाच्या दरवळीची चाहुल लागलेले माझे अपर् नाक ... काळ्याकुट्ट आभाळात चमकनार्या विजांचे तांडव बघण्यास अधिर झालेले पिटुकले नयन व कडकडाट ने बधिर होण्यास उत्सुक असणारे माझे एवढेसे कान ... सोबतच येणारे थंडगार पाण्याचे टपोरे थेंब झेलण्यास रोमांचित असणारे गोबरे गाल... अजुनही डोळ्यासमोर उभा राहतो तो सोहळा पहील्या पावसाच्या आगमनाचा !!
मग सुरु होतात वाहणार्या पाण्याच्या ओहळात  व्हलवायच्या छोटुश्या कागदी होड्या बनववायची तयारी ... न डुबता दिसेनास्या होडींमुळे  झाल्याचा निरागस आनंदव डुबल्यावर होणारे अबोल दु:ख .. भावनांचा हा हींदोळा झुलतांना ताई ने करुन दिलेली शाळा सुरु होण्याची आठवणीने पार झोका झपकन थांबायचा. सुट्ट्या संपणार ह्या कल्पनेने कावरेबावरे झालेले मन व   उतरलेला चेहरा आई ने शाळेतल्या मित्रांची करुन दिलेल्या आठवणीने परत खुलायचा ...मग सुरु व्हायचा हट्ट बाबांकडे नवीन छत्री साठी... खालेले धपाटे व नंतर आजोबानी घेउन दिलेला रंगीबेंगी रेनकोट घालुन मिरवणे...
ह्या अविट आठवणींचा ठसा मनाला अजुनही गारुड करते...  अमिट क्षणांचा हा खजिना हा आपल्या सगळ्यांकडे असतो जपुन ठेवलेला ... मनाच्या खास खणात ... जो उघडतो दर वर्षी येणार्या पहील्या पावसासोबत !!!

मयूर डुमणे ,उस्मानाबाद
पहिल्या Romantic पावसाची Romantic आठवण
आज बऱ्याच दिवसांनी ती मला पुन्हा दिसली. खरंच किती सुंदर दिसत होती ती ! मी माझ्या रोजच्या सवयीप्रमाणे रस्त्यावरून उनाडक्या करत फिरत होतो. तिला पाहता क्षणीच स्तब्ध झालो हृदयाची धड धड वाढली माझ्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता सोबत चालणाऱ्या मित्राने विचारले अस का वेड्यासारख करतोस मी म्हणालो हा प्रेमरोग आहे जस मलेरिया असतो ना तसा हा loveria रोग आहे त्याचीच ही लक्षण आहेत त्याचवेळेस मला भूतकालातील एक प्रसंग आठवला ज्या प्रसंगाशिवाय माझी प्रेम कहानी पूर्णच होऊ शकत नाही.  पावसाल्याचे दिवस नुकतेच सुरु झाले होते . रविवार होता त्यामुळे बहुतेक mess संध्याकाळी बंद होत्या माझी mess मात्र चालू होती mess वर जाताना रिम झिम पाऊस चालु होता काही क्षणातच रिम झिम पडणाऱ्या पावसाने रौद्र रूप धारण केले मी mess वरच अडकून पडलो, आता करायच काय ? आपल्या सगल्यांचा लाडका मित्र whats up चालु केल तिकडे ती पण तिच्या मैत्रिणीं सोबत जेवायला बाहेर आली होती योगायोगाने ती ज्या ठिकाणी होती तिथेच माझे हितचिंतक मित्र पण होते भाऊने केला msg ती पोटलीत आहे त्याच वेळेस आम्ही दोघेही online होतो मी तिला म्हणालो तू जिथे आहे तिथे येऊ का ती हो म्हणाली एवढ्या मोठ्या पावसात मी कशाला येईल तिथे अस तिला वाटल असेल रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याला नदीच स्वरुप प्राप्त झाल होत मला mess वरुण जायचे होते Libraryt  आणि वाटेत जाताना लागणार होत पोटली मुसळधार पडणाऱ्या त्या Romantic पावसात मी पळत सुटलो रस्त्यावरुन वाहणाऱ्या पाण्याच्या लाटांचा विरोध झुगारुण मी पळत होतो फ़क्त तिला पाहण्यासाठी अखेर मी त्या ठिकाणी पोचलो माझी नजर तिलाच शोधत होती पण ती काय दिसत नव्हती मन सैर भैर झाल अचानक तिच्या हसन्याचा आवाज आला आणि मला ती दिसली तिनेही माझ्याकडे पाहिल मी ओलाचिंब भिजलो होतो ती अवाक झाली तिने गोड smile केली आणि हात हलवून hi म्हणाली (whats up वरुण hi करण आणि अस hi करण खुप फरक आहे बर का) तिची ती smile अजुन ही माझ्या स्मरणात आहे खरच मी त्यावेळेस वेगल्याच प्रेमाच्या धुंधित होतो त्या नंतर बरेच मोठे पाऊस झाले पण तो पाऊस मी कधीच विसरु शकत नाही

जुन एक दिवस मला आठवतो, जेंव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिलं होतं तेंव्हापासून ते आत्तापर्यंत मी फक्त आणि फक्त तिचे आणि माझेच स्वप्न रंगवत होतो. त्या माझ्या स्वप्नांच्या दुनियेत बाकी कोणाला शिरण्याची परवानगीच मी मुळी दिली नव्हती. तसं पाहता, तिच्या आणि माझ्या पहिल्या भेटीपासूनच घरच्यानाही आमच्या बद्दल कळालं होतं. आई तर म्हणाली होती, "तू तुझ्या पायावर आधी उभा राहा... पैसे कमाव... मग तुला काय करायचं ते कर. "
त्यानंतर आमच्या भेटी माहीत नाही का ? अचानक बऱ्याच कमी झाल्या. माझ्या रोजच्या रस्त्याला पुन्हा ती अजिबातच दिसेनाशी झाली. पण मी मात्र ती येण्याची वेड्या आपेक्षेपोटी तिची वाट पाहायचो.
असो, पण आज ती मला पुन्हा दिसली. अगदी तशीच होती ती. अगदी पूर्वीसारखी. डिट्टो....
तिला पाहताच मी सुखावलो. मला आमचे पूर्वीचे दिवस जसे च्या तसे आठवू लागले. पण पुन्हा ती माझ्याकडे दुर्लक्ष करूनच पुढे गेली. नाहीतर कदाचित मला पाहायला विसरली असेल. क्षणाचा विलंब न करता, मी पुन्हा दुखावलो. खरंच किती बदलली होती ती !
पण मी मात्र तिची एखाद्या वेड्या प्रियकरासारखी तिची वाट पाहत बसलोय.... त्याच रस्त्यावर…

धनंजय खनके ,जालना
औरंगाबादमधला रखरखता दिवस, उन्हाळा संपणारचं होता; लवकरचं पावसाळा येणार होता.तरी सुर्य आग ओकत होता, घामाच्या धारांनी अंग न्हाऊन निघत होतं ;
       तेवढ्यात फोन वाजला पलिकडून आवाज आला "कुठेस तु मी केंव्हाची थांबलीये,सावरकर चौकात येतोय ना मला घ्यायला "
   "अहो, मेहता जी,आलोच की तुमच्या सेवेत..." अस्स म्हणत लगेच तिला घेण्यासाठी गेलो..
    आज तब्बल तीन वर्षांनंतर आम्ही भेटत होतो.. जुने वर्गमित्र-मैत्रिणी... मी ,प्रतू , आणि मेहता जी...
  'प्रतू' यायची बाकी होती अजून. तो पर्यंत एका कॉफी शॉप मध्ये बसलो..
     जुन्या गप्पा चांगल्याच रंगल्या.. कॉफी वगैरे घेतल्यानंतर बाहेर पडलो व निवांत कुठे तरी बसावं म्हणून फार्म फुड्स जवळच्या कॉर्नर वर बसलो होतो.
   अचानक आभाळात काळे ढग जमा झाले,आग ओकणारा सुर्य कुठेतरी गायब झाला होता;हवेत गारवा जाणवू लागला, एव्हाना, सर्वांना पावसाची चाहूल लागली होती.
 आकाशात वीजा कडाडल्या; पाऊस सुरू झाला, आणि अंगावर अलगद बरसू लागल्या त्या ' *पहिल्या पावसाच्या सरी*' उन्हानं लाहीलाही झालेलं अंग कसं,  चंदना सारखं थंड झालं होतं...
    बाहेर कितीही गोंधळ असेना, पण मनात शून्य विचार होते; अगदी निरागस लहान बाळासारखे.
    पावसात चहा पिण्याची गोष्टचं वेगळी असते म्हणे, आणि आमच्या सारख्या चहाच्या वेड्यांना पावसाचा आनंद चहाशिवाय फिकाचं असतो, जवळच्याच एका हॉटेलमध्ये, हॉटेल कशाला 'टपरीचं ' म्हणा की, चहा घेतला.
   पावसाचा गारवा आणि चहाचा गोडवा काय क्षण होता तो.. आयुष्याच्या पुस्तकातून फाडून विशेष डायरीत लिहायचा आणि आठवण येताच परत वाचायचा..
       पावसात आकंठ बुडलेलो होतो, तेव्हढ्यात मेहता जी म्हणाल्या,"ओय हिरो, बस्स कर तुझ चहाप्रेम आणि मला लवकर हॉस्टेलवर सोड"
  " हो जाता येईल की, थोडा वेळ तरी थांबा, आनंद तरी घेवू द्या पावसाचा, आठवणीत राहिला पाहिजे तुमच्या आणि माझ्या पण हा पहिला पाऊस"
मी.


संदिप बोऱ्हाडे,पुणे
 तस पाहिलं तर पहिला काय किंवा दुसरा काय??? पाऊस हा पाऊसच असतो.. वर्षातले 4 महिने पावसाळ्याचे असतात पण तस आपण पाहिले तर 2 , 3 महिनेच पाऊस चांगला पडतो...गावाकडे लहान असताना पावसात भिजण्याची मजा काही वेगळीच असायची...थोडा जास्त पाऊस झाला की रात्री खेकडे पकडायला जाणे...मध्येच साप दिसणे बेडक पण खूप... आणि चिखल तर बोलूच नका ही जी काही मजा होती ती शब्दात तरी नाही व्यक्त करता यायची..पण जसे जसे मोठे होत गेलो तर पावसाळ्याचे महत्व समजायला लागले.

 पहिला पाऊस पडला की गावाकडील मजा वेगळीच आंबे पडायचे पाऊस उघडला की लगेच आंबे गोळा करायला जाणे.. पहिल्या पाऊसानंतर करवंद अजून गोड होतात कशी होतात कुणास ठाऊक पण निसर्गाची किमया.

  पहिला पाऊस असाच कोसळतो धरणीवर त्याचे ते बरसणे अकारण नसते. तर ओढ असते धरणीची.  पहिला पाऊस आणि मातीला येणारा सुगंध अनुभवायचा असेल तर शहरापासून दूर गावालाच गेलं पाहिजे. पाऊसाच्या पाण्यासाठी तहानलेली धरती पहिल्या पाऊसाच्या थेंबाबरोबर मोहरून जाते. बऱ्याच दिवसाच्या विरहानंतरच ते पहिलंच मिलन असावं. त्यातून ती पूर्ण न्हाऊन निघते. त्यांचा तो मिलनाचा प्रसंग निसर्गाला सुगंधीत करून टाकतो.

थंड हवा, ढगाळ आकाश, धुक्यात डोंगर आणि मातीचा गंध, कड़क चहा , चिंब भिजायला तयार रहा, पहिल्या पावसाच्या पहिल्या आठवणी जगायला तयार रहा....पहिला पाऊस आणि मातीला येणारा सुगंध
अनुभवायचा असेल तर शहरापासून दूर गावालाच गेलं पाहिजे.
    
   हैराण झालेली धरती,रणरणत्या उन्हाळ्याचा "कार" जमिनीची होणारी धूप ,पायाला चटके लागणाऱ्या वाट इत्यादी व त्या वाटांवर चालणारे तुम्ही-आम्ही .
हे चित्र खूप वेळा शहराप्रमाणे गावाकडील वाटांवर दिसतो .फरक असतो तो फक्त एका वहाणेचा. आकाशात निरभ्र प्रकाश असताना , अचानक वातावरणाचे रूप पालटते. थोडे मोठे काळे ढग आकाशात गर्दी करू लागतात. दाटीवाटीने,एकमेकांजवळ उभे राहतात. उभे राहिले जमले नाहीतर चक्क एकमेकांवर आदळतात. मग निर्माण होणारा गडगडाट पहिल्या पावसाची झुळूक देऊन जातो. या गोड झुळके बरोबर मानवी मन एक सुटकेचा श्वास सोडते .

तहानलेली धरती , एका एका थेंबासाठी व्याकुळ झालेली असते. वर्षभराचा विरहच असतो तोहि तिचा अन काळ्या मेघांचा....... ज्याची वाट पाहत,अंगाची लाही लाही होणारी धरती, या शांत वाऱ्याच्या 'गार' झुळकेने हळुच गाली गोड हसते. अन तेवढयात,पाखरांच्या चिऊ-काऊच्या किलबिलाट चाल मंद मंद टाकत हा मेघ राजा येतो तो थेट या धरणीवर..

  काही तज्ञांनी सांगितले आहे की , जगात तिसर महायुद्ध झाले तर ते पाण्यामुळे होईल...त्यामुळे सर्वांनी खूप झाडे लावा..आणि हो पावसा तू मला खूप खूप हवाहवासा वाटतो...खूप खूप जमके बरस.


सिमाली भाटकर,रत्नागिरी
 पाऊस म्हटले की प्रत्येकाच्या मनात वेगळी कल्पना रुजते. कुणी प्रेमाच्या पलीकडे जाऊन त्यात न्हाऊन निघत तर कुणी मैत्रीच्या गारव्यात सुखावत, कुणी त्यातच आपले अश्रु लपवून रडत. असा हा पाऊस खूप साऱ्या आठवणी देतो वर्षानुवर्षे आणि आज आठवण होऊन माझ्या लेखणीतून बरसतोय.

आठवणीत तुझ्या आले नभ दाटून अंबरी,
होऊन आसवे बरसल्या पावसाच्या सरी..
नकळे कुणा हा गंध प्रीतीचा,
विरह मनाचा,
अन ऋणानुबंध दोन जीवांचा,
जुळती रेशीमगाठी एक धागा सुखाचा,
आसमंत ही बरसून सांगे,
ना सोसला विरह
भूमीस चुंबण्या बरसला मिरग
फुलून उठली धरती
सुगंध उधली माती,
आठवणी सांगती,
सोड सखे अबोला,
रुसली नाती जुळून येती,
इंद्रधनू रंग अंबरी उधलती
जुळल्या बंध रेशीमगाठी,
आठवणीत तुझ्या आले नभ दाटून अंबरी ,
होऊन आसवे बरसल्या पावसाच्या सरी,

हा आपल्या आठवणी मधला पाऊस आज अशांच्या आठवणीतील पाऊस लिहायचा आहे जो अविस्मरणीय आहे मग तो 26 जुलै चा किंवा मराठवाड्याच्या आसुसलेल्या मातीचा.

मित्रांनो आपण प्रेमाचा पाऊस पाहिला पण ही धरणीमाय ज्या हिरवळीने नटली होती ते सृष्टीसौंदर्य आज आपणच नष्ट करून टाकु लागलोय आणि तिच्या प्रियकराला आणि आपल्या प्रेमाच्या पावसाला हरवूनच बसलोय, आणि आज उरलं आहे ते फ़क्त पाहणं निळ्या आभाळाकडे आणि उजाडलेल्या धरणी मातेकडे खरंच असा होता आपल्या आठवणीतील पाऊस या पूर्वी?
  वाट चुकल्या वासरसारखं शेतकरी वाट पाहत बसलाय पण त्याच्या लेकरांना कडकडून होणारा घंटा नाद आणि दाटून आलेलं आभाळ आपल्या शिवारात अंगावर झेलण ही फक्त एक आठवण बनुनच राहिली की राव.
   ज्यांनी केला आणि पाहिला तो पाण्यासाठी चा मैलोनमैल प्रवास त्यांच्या आठवणीत हरवून बसलाय माझा पाऊस अन डोळ्यात उरल आणि डोळ्यांत उरल ते फक्त त्याच्या आठवणीत ओसंडून वाहणार पुरासारखं पाणी.
 त्यांच्या भावना पावसाच्या आठवणीत अश्रू होऊन प्रसवल्या पण त्या चातकाची तहान भागवण्यासाठी, धरणीला चिंब भिजवण्या, तो अजूनही नाही बरसला वाट पाहतेय ती आसुसलेली धरती कधी ओघळतील त्या प्रेमाच्या सरी, तहान भागेल लेकरांची आणि फुलेल आठवणीतील शेती, हिरवा शालू नेसलेली ती धरती.
 दुष्काळी भागात हा पाऊस आठवण होऊन राहिला त्या मेघराजला एक विनंती आहे.
    आसुसलेली धरणी माय तुझ्या मिलना साठी दोन हातांचे पंख पसरून उभी आहे, तुझ्या दाटलेल्या डोळ्यातल मोती आता बरसुदे आणि या प्रेमाच्या सरीत ती न्हाऊन निघू दे आणि हा विरह संपू देत.
हा आहे माझ्या शेतकऱ्याच्या मनातला पाऊस जो फक्त आठवण होऊन राहिलाय
जाता जाता पावसाच्या खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद


डॉ.दिलीप कदम,अहमदनगर
आम्ही लहान होतो तेव्हा घरोघरी पंखे नव्हते त्यामुळ  उन्हाळ्यात सर्व लहान पोरांना आंगभर घामोळ्या व्हायच्या. खाजवून हैराण.
आज्जी सांगायची कपडे काढून पहिल्या पावसात भिजल की घमोळ्या बऱ्या होतात.
पहिल्या पावसात भिजायला मज्जा यायची.

शाळेत गेलो तेव्हा पहिल्या पावसात भिजण्या पेक्षा दप्तर भिजायच टेंशनच जास्त असायच.

मुंबईला कॉलेजला असताना *तिच्या* बरोबर वरळी सी फेस वर पहिल्या पावसात भिजल्याच्या आठवणी अद्याप विसरल्या नाहीत.

आता मात्र पहिला पाऊस आला की व्हिक्सची डब्बी आठवते मग गॅलरीत बसूनच पहिल्या पावसाची मज्जा बघतो.

पण पहिला पाऊस बघताना बायको गर्मागरम भजी आणि मस्त वाफाळकेला चहा देते.
अस वाटत तिला खेचुन  न्याव आणि पहिल्या पावसात भिजाव.
पण तिच आपल एकच पालुपद असत.

"इश्श लोक काय म्हणतील"


किरण पवार ,औरंगाबाद
            पहिला पाऊस आठवतो तो शाळेतला. कारण त्याअगोदर अगदीच इतका लहान होतो की, काही समजूच शकत नव्हतो. पण शाळेतील त्या गमतीजमती काही वेगळ्याच. पाऊस पडला की, मातीचा अप्रतिम सुगंध अगदी संपूर्ण मैदानावर पसरलेला असायचा आणि त्यात अशातच आम्ही मैदानावर घसरगुंड्या बनवायचो. पोर त्यावरून इतक्या वेळा पडायची आणि ते बघून आम्हाला मजा यायची. ते वयच इतक अल्लड होतं की; चूक वा बरोबर, कमी वा जास्त अशा कोणत्याच गोष्टी मनाला स्पर्शत नसायच्या. पाऊस पडायला लागला की, मुद्दाम भिजत, हळू चालत घरी जायचं. मग भले जवळ छत्री का असेना. मला पावसाची एक आठवण अजूनही खूप लक्षात आहे ती म्हणजे, मी व मित्राने साधारण पाचवी-सहावीत असताना एक मोठी नाव बनवली होती. अगदी आम्ही दोघे बसू शकू एवढी आणि ती घेऊन एका पाणी साचलेल्या बंद चौकोणाकृतीत ती चालवली होती. कागदी नावातर चिक्कार बनवायचो. पाणी साचलेल्या मोठ्या मोठ्या खड्यात मित्राला ढकलूनही दिलं बऱ्याच वेळा आम्ही. ती मजा अन् ती आठवण काही औरच.
                पहिल्या पावसाच्या बालपणींच्या आठवणींखेरीज पावसाच्या इतरही बऱ्याच आठवणी आहेत. जसं की, पहिल्या पावसात पाहिलेली ती किंवा तिने पहिल्या पावसात भिजताना पाहिलेला मी. इतरवेळी तसा पाऊस कामानिम्मित्तच हवा असतो सर्वांना. पण काही ठरावीक क्षणी त्याची मजा काही निराळीच. आणि महत्त्वाचं म्हणजे, *माझ्यासाठी प्रत्येक नव्या क्षणी येणारा पाऊस हा पहिलाच असतो.* कारण मला तो दरवेळी एक नवी कविता देऊन जातो. मला त्या पावसात गुंतून राहणं नाही जमतं. तो स्वत:हून मला भावना देतो. तो स्वत:हून मला आशय पुरवतो. पाऊस सोबत केवळ गार हवा किंवा चिंब सरीच घेऊन येतो असं काहीच नाही. पाऊस त्याहीपलीकडे जाऊन प्रीत, विरह, आनंद यांसारख्या बऱ्याच भावना सोबत घेऊन येतो. पहिल्या पावसात तिने मला भिजत असलेला पाहून जो मनमुराद आनंद लुटला त्या क्षणाची तुलना किंचीतच दुसऱ्या क्षणाशी होईल. मला बेधुंद जगताना पाहून तिलाही पावसात भिजायची इच्छा झाली होती......
                अर्थात हळूहळू गोष्टी फारच बदलल्या. आज पाच वर्षांनी म्हटलं तर पाऊस तोच येईलही पहिला पण तिच येणं काही होणार नाही. आयुष्य छोडसं गोड अन् थोड कटूही असू शकतं. *फक्त त्या प्रसंगांना ओलाव्यातील सरींचा शिडकावा देता आलं म्हणजे जमलं.
                
सौदागर काळे,पंढरपूर
" येरे येरे पावसा,तुला देतो पैसा.पैसा झाला खोटा ,पाऊस आला मोठा."असं बडबड  करत नाचत पावसाचा आनंद लुटण्याचा निरागसपणा पहिला पाऊस लहानपणी अनुभवू द्यायचा .त्या पावसाच्या पाण्यात सारा आसमंत आपलाच वाटायचा. काहीजणांना पावसात आज ती दिसते.पण मला फक्त ती च आठवते जी पावसात भिजून आजारी पडेल म्हणून मारत घरात नेत असे.या पहिल्या पावसात आपण भिजून आजारी पडलेले आठवत नाही.जसजसे मोठे होत गेलो तसा पहिला पाऊस सुद्धा बदलत गेला.अचानक शाळा सुटण्याच्या वेळेस आलेला पाऊस सारे अंग भिजवायचा. त्यातून वह्या-पुस्तके वाचत नसत.मग कित्येक दिवस पावसाने त्या वह्या-पुस्तकात कैद केलेला वास सहन करावा लागत असे.

लहान लहान बेडके  उड्या मारत पावसाळ्यात कुतुहुल निर्माण करायचे. त्यामुळे ते कितीही अंगाने ओबडधोबड वाटत असले तरी त्यांच्याबरोबरच्या आठवणी  रम्य आहेत.

पहिला पाऊस पडायच्या अगोदर *पावश्या* नावाचा पक्षी सारखा ओरडायचा. याची खूप कीव यायची, वाटायचं कधी एकदा पाऊस पडेल अन याची तहान भागवेल.

कधी कधी पहिला पाऊस असाही अनुभवला .धुऊन वाळण्यास घातलेले कपडे पाऊस आला तर काढायची जबाबदारी घरचे देऊन जात. अशावेळी मित्रांबरोबर बाहेर खेळण्यास गेल्यानंतर अचानक पाऊस यायचा.घरी जाईपर्यंत सर्व कपडे भिजायचे.त्यावेळी पाऊसपण झोडपायचा अन घरचेही.

कधी कधी स्वयंपाक करण्याची सर्व लाकडे पाऊस भिजवत.तेव्हा रात्री उन्हाळ्यात केलेल्या शेवाळ्या खाऊन रात्र काढावी लागत.पुढे कधी कधी तो विजेच्या कडकडाटसह, ढगांच्या गडगडाटसह
मध्यरात्री आला आहे,तेव्हा एकच धांदल उडायची. शेळ्या,गुरा-ढोरांना सुरक्षित ठिकाणी बांधताना आपोआप तो भिजवायचा.

कधी कधी हा लवकर नाही आला म्हणून माझ्या शेतकऱ्यांच्या पेरण्या वाया गेल्या आहेत.ती केलेली गुंतवणूक मातीमोल झाली आहे.तेव्हा मात्र तो ढगातून नव्हे डोळ्यातून बरसायचा.


तेजस महापुरे,कराड                     
प्रत्येक वर्षीच्या पहिल्या पावसाच्या आठवणी या वेगवेगळ्या आहेत,लहानपणी   पहिल्या पावसात भिजण्याची जणू स्पर्धाच लागलेली असायची,त्यावेळी पहिल्या पावसात भिजणं म्हणजे जग जिंकल्याचा आनंद मिळत असे,पावसाच्या साठलेल्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडणे हा आमचा आवडता खेळ, यानंतर शाळेत असताना वृक्षारोपण बद्दल माहिती समजली तेव्हा पहिला पावसात एखाद रोप लावायचं अस पक्के झाले,त्यावेळी शाळेच्या मैदानात रोपे लावल्याच आजही आठवतंय,नंतर कॉलेजमध्ये असतानाचा पहिला पाऊस हा तर अनेक आठवणी ठेवून गेलाय,त्यावेळी पाऊस आणि गरम चहा हे ठरलेलं समीकरण ते रोमँटिक वातावरण,खरंतर पाऊस हा आपल्यासाठी किती महत्वाचा आहे हे तो न पडल्यावरच समजत,पहिल्या पावसाच्या आठवणी या सुखकारक आहेत,तश्याच पुढील वेळेस राहोत हीच सदिच्छा…

R. सागर,सांगली
पाऊस म्हटलं की त्यासोबत प्रत्येकाच्याच काही ना काही आठवणी जोडलेल्या असतात. विशेषतः पहिल्या पावसाच्या.. कुणाच्या शालेय जीवनातल्या असतील तर कुणाच्या तारुण्यातल्या. पण प्रत्येक आठवण ही खासच असते. अजूनही आठवतंय बालपणी तो पहिलाच पाऊस असायचा जेव्हा घरचे कितीही ओरडले तरी पावसात भिजायची मज्जा काही औरच. त्यातही गारांचा पाऊस असला की मग तर काही विचारायलाच नको.
.
आपल्या घराच्या कौलारू छप्पराचं वानरांनी वर्षभरात किती नुकसान केलंय हे पहिल्या पावसातच समजायचं. आणि मग घरातील शक्य असतील ती सगळी लहान-मोठी भांडी आई-आजी घरात जिथं-जिथं पाणी गळतंय असं वाटायचं तिथं ठेवत जायच्या. पाऊस उघडला की मग घरावर चढून शक्य ती दुरुस्ती केली जायची.
.
शेतकरी कुटुंबात जन्म झाला असल्यामुळे पहिल्या पावसाची प्रतीक्षा घरी सर्वांनाच असायची. कधी-कधी पेरणीपूर्वीची सगळी कामं उरकून पावसाची वाट बघायचो तर कधी अंदाज चुकायचा. कामांची गडबड सुरू असायची आणि अचानक पावसाचं आगमन व्हायचं. पण तरीही मोठ्या उत्साहात पावसाचं स्वागत व्हायचं. आणि मग बाहेरच्या मातीचा दरवळणारा सुगंध आणि घरामध्ये गरमागरम कांदाभजी असा योग जुळून यायचा.
.
गेल्या 2 वर्षांत परिस्थिती बदलली. नोकरीनिमित्त गांव सोडावं लागलं. आपलं गांव, आपली माणसं सोडून यावं लागलं. पण तरीही गावाची ओढ कमी होत नाही. आजही गावी तुफान पाऊस पडतोय आणि मी इथे वसईमध्ये बसून अजून पहिल्या पावसाची वाटच बघतोय..

पहिला पाऊस आणि माझ्या आठवणी (भाग-२)

पहिला पाऊस आणि माझ्या आठवणी (भाग-२)                   
जयंत जाधव,लातूर.                                           जून महिना लागला कि मला पावसाचे चांगलेच वेध लागतात.प्रत्येकाच्या पावसाच्या काही आठवणी असतात तशाच माझ्याही आहेत.मी दरवर्षी न चुकता पहिल्या पावसात मनसोक्त ओला-चिंब होईपर्यंत भिजतो.या क्षणाला मी कधीही सोडत नाही.आणखी एक विशेष मला पावसात भिजत असताना आईस्क्रिम खायला खूपच आवडते.अशावेळी मला किती काम असू द्या.मी बाजूला ठेवतो.कारण आयुष्यात असले क्षण एकदा गेले कि परत कधी येतील सांगता येत नाही.     
माझ्या आयुष्यातील पावसाळ्यातील बरेचसे क्षण हे औरंगाबाद जिल्ह्यातील वेरुळ,खुलताबाद,म्हैसमाळ,दौलताबाद,अंजिठाच्या सान्निध्यात मी घालवलेला आहे.आमचा कॉलेज गृप नेहमी पावसाळ्यात सायकलवर औरंगाबाद पासून 30 किमी पर्यत वेरुळ,अंजिठा 85-100 किमी पर्यत सायकल वर पावसात भिजत निसर्गाचा आस्वाद घेत  पिकनिकला जात होतो.अशीच एक पावसाळ्यातील क्षण मला आठवतो. आम्ही सायकलींवर वेरुळकडे निघालो होतो तेव्हा एका जिपचा आमच्या समोर अपघात झाला.ट्रकने जोरात धडक दिली.ड्रायव्हर व त्याचा सोबती पळून गेले.त्यावेळी आमच्या गृपने तात्काळ दुसऱ्या खाजगी गाडीने जखमी 4-5 लोकांना घाटीमध्ये अॕडमिट केले.त्यातील एकाला रक्ताची गरज भासली. जो रक्तगट हवा होता तो माझा होता. मी लगेचच त्याला रक्तदान केले. तसेही हे काम मी माझ्या आयुष्याचे पॕशन-ध्येय बनविलेले आहे.हा माझ्या पावसाच्या आठवणींतील सुखद क्षण आहे.धन्यवाद.

अनिल गोडबोले,सोलापूर .
    पहिला पाऊस.... हा विषयच आठवणीत घेऊन जाणारा आहे. पहिला पाऊस .... कधीचा पहिला?..
         शाळेत जाताना आलेला पहिला पाऊस, पहिला रेनकोट .... डबक्यात दबकन उडी मारून चिखल अंगावर उडवताना आलेला पाऊस..
       हायस्कुल ला जाताना सायकल आणि रेनकोट... सांभाळून तोंडावर पाण्याचा शिडकावा करणारा पाऊस.. दहावी ला शाळा सुरू होताना... उशिरा पोहोचण्याचे कारण बनलेला पाऊस..
      11 वी(कॉलेज ला.. मग काय अजूनही लहानच समजता होय!) ला गावावरून एस टी ने जाताना खिडकीतून अंगावर येणारा पाऊस...
फिजिक्स च्या बार पेंडुलम च्या दुर्बिणीतून बघितलेला पाऊस..
    आई सोबत मार्केट मध्ये भाजी घेऊन बसताना गोणपाट भिजवणारा पाऊस..
    वेंगुर्ला बंदरावर येणारा झोत आणि भरपूर वारा असलेला पाऊस.... मित्रांसोबत चोरून सिगरेट ओढताना आलेला पाऊस..
    बारावी चा निकाल लागला आणि सोलापूरला यायला निघालो आणि  पाऊस सुरू होता..मनात, आईच्या डोळ्यात आणि बाबांच्या शब्दात.. एस टी मध्ये बसेपर्यंत कसा बसा थांबवलेला आणि नंतर वेंगुर्ला वरून कणकवली येईपर्यंत न थांबता डोळ्यातून वाहणारा पाऊस..
     दयानंद कॉलेज च्या bsc ला ऍडमिशन घेतल्यावर पहिल्या दिवशी पाऊसच होता.. 
       तिसऱ्या वर्षाचा रिझल्ट आणायला गेलो तेव्हा मनात हुरहूर लावणारा पाऊस..
    पहिल्यांदा कामगार वसाहती मध्ये मुलांना लसीकरण साठी घेऊन जाताना भिजवणारा पाऊस... 
    एड्स साठी माहिती देताना... पथनाट्य करताना आलेला पाऊस..
    Msw चा पहिल्या वर्षाची मेरिट लागली आणि पैसे भरताना मनात आणि बाहेर पाऊस होता..
   बालकामगार शाळेत शिकवताना आलेला पाऊस आणि लाईट नसताना मुलांसोबत दंगा करत एन्जॉय केलेला पाऊस
    ती मात्र पावसात भेटली नाही.. सोलापूर च्या उन्हाळ्यात भेटली तेव्हा पाऊस नव्हता ... जेव्हा पाऊस आला तेव्हा ती नव्हती ..
   पाऊस असून ती नाही म्हणून आलेला पाऊस.
   कॉलेज मधून ऑर्डर न मिळाल्याने पुणे सोलापूर चक्कर करताना पाऊस खूप होता.. मनात डोळ्यात आणि स्वप्नात सुद्धा!
     लग्न झाल्यावर तुळजापूर ला असताना आलेला पाऊस.. कोकणात बायको सोबत जाताना आलेला पाऊस..
    गाडीवर जाताना विचारांचा पाऊस.. कसं होणार आपलं आता... भविष्यात कस होईल असा विचार आणि पाऊस... बाहेर व आतमध्ये..
    यातला नेमका पहिला कधीचा ते ठरवावं लागेल..
आणि हो... आता टाईप करताना सुद्धा पाऊस आहे ...
मला पाऊस आवडतो कारण तो येतो तेव्हा भारी वाटत(हॉर्मोन्स चा खेळ सगळा... अस विज्ञान सांगत)
     तर नक्कीच आपल्याला आवडणारा पहिला पाऊस..नक्कीच एन्जॉय करा.

पल्लवी  वाघ ,बुलढाणा .
     पुण्यामधला पहिला दिवस अन् प्रत्येक वर्षीचा पहिला पाउस खुप आठवतो कारण त्याच अन् माझ जरा वेगळच नात आहे.. 
     उन्हाळी सुट्टी संपताच पुणेचा रस्ता अन् पहिल्याच दिवशी पावसाचे आगमन.. यातच तर खर रहस्य आहे.. 
कधी पप्पा असायचे तर कधी आठवणी 
पण एकटी माञ कधीच नव्हते 
    त्या पावसात भिजायला कोणीतरी सोबतच होते.. पण गेल्या 5 वर्षापासुन 1जुनची हजेरी यानी काही चुकवली नाही अन् पुण्यामध्ये 1जुनला मीही नाही असे कधी झालेच नाही. 
    भिजणे तर मी अजुनही सोडलेच नाही पण यावर्षी माञ एकटीच होती स्माईली तिला कोणी बास झाले आजारी पडशील असे कोणी म्हटले नाही याचा अर्थ असा नाही की तिला अजुन कोणीच भेटले नाही पण ती आहेच जरा अशी एकटी एकटी राहणारी वाळकं पान सुद्धा गळतांना तन्मय देउन पाहणारी 
पहिल्या पावसाच्या सर्वांना पावसाळी शुभेच्छा !!


पूजा पाटील,लातूर.
        उन्हाने तापलेले दिवस,जात असताना अचानक एका दिवशी मूसळधार पाऊस य़ेताे, आणी त्या भिजलेल्या ओल्या मातीचा सुगंध हळुवार पणे गच्चीवर घेऊन जाताे, आणी ताे पाऊस आपल्याला नाचावण्यासाठी भाग पाडताे.
           खरच म्हणतात ना पाऊस हे पहिल्या पे्मासारखं असतं,पे्माच्या सरीत चिबं भिजवणारा पाऊस,हवा हवा सा वाटणारा आपल्या चेह्रयावर हास्य फुलवणारा.
           ‎ पाऊस म्हणलं कि आठवणी असणारच काय भारी होते ते दिवस मिञ मैञीणी सोबत पाऊसात भिजणे, school bunk करुन चिखलामध्ये नाचणे आणी, त्यानंतर सरांच्या ओरडा खाणे.खरचं खुप छान होते ते दिवस!!
           ‎             मनसोक्तबरसणारा!
चिबं भिजवणारा,
पॆ्म व्यक्त करणारा!
तो पहिला पाऊस....
कवीचं शब्द फुलवणारा!
चहाचा घोट नवा वाटणारा,
धरतीस आसुसलेली!
‎तो पहिला पाऊस....



कोमल पवार,सांगोला.सोलापूर.
      दुष्काळी भाग म्हणून प्रसिध्द असलेल्या आमच्या भागात पाऊस पडण म्हणजे गंमतच ..तरी पण अनुभवलेला पाऊस चक्क गारांचा हाेता.
         मी ६ वी चे पेपर दिले होते अजून सुट्टी  संपली नव्हती १० -१५ दिवसांनी शाळा सुरू होणार म्हणून सगळे निवांत. दुपारची वेळ होती अंदाजे ३-३.३० वाजले असतील तरीपण सगळीकडे अंधार होता.अचानक वारा आला अन् ढग कडाडले कळत नकळत पावसाची चाहूल लागली.आईची पळापळ सुरू झाली.."अगं हे घरात घ्या ..ते भिजेल  पावसात"...मग आमची पण नुसती पळापळ
    नंतर कौलारू घरात बसून पावसाला न्याहळन्याची मज्जा अलगच नाही का..
   जोरदार पाऊस सुरू होता...अचानक घराच्या  पाठीमागून शुर्भ रंगाच्या गारा समोर आल्या
पहिल्यांदाच बघत असल्यानं कळालच नाही.
आईन सांगितल्याबरोबर मी अन् छोटी शामी त्या गारा वेचण्यासाठी धावलो.
           आज्जीनं सांगितलेल आठवत होत गारांच पाणी गुणकारी असत..मग एक बाटली आणून त्यात गारा टाकण्याचा निरागसपणा केला...पण गंमत अशी व्हायची गारा बाटलीपर्यत पोहचणयाआधी हातातच विरघळून जायच्या.. बाटली तिथेच ठेवून गारांचा मनसोक्त आनंद लुटला...आनंदाच्या भरात गारा वरून लागतायेत हे जाणवलच नाही..घरातून आवाज आला "बस् करा गं पोरीनों या घरात"..आईन गरामगरम पापड,भजी तळली होती.. तोपर्यत गारा बंद झाल्या पण पाऊस सुरू होता ..चिंब भिजलेल्या मनात गारांचा सुंदर देखावा रेखाटत मी पावसाकडे बघत होते ....
 नंतर कधी गारा पडल्याच नाहीत..पण  आजही गारांचा पाऊस म्हटल की तो देखावा जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहतो.. 
  असा हा मी पाहिलेला अन् कायम माझ्या आठवनींच्या शब्दांत असणारा..."पहिला पाऊस अन् त्याच्या गोड आठवनी..."
....धन्यवाद....

पी.प्रशांतकुमार,अहमदनगर.
    नगर दक्षिण आणि दुष्काळ.. नगर दक्षिण आणि पावसाची वाट यात नवीन काहीच नाही..
सगळ्यात शेवटी पाऊस आमच्याकडे येतो..शिल्लक काही ढगात असेल तर बरसतो..
...पहिला पाऊस आणि वाट पहाणे हे नेहमीच..त्यात पुण्यात आगमन..कोकणात जोरदार..विदर्भावर सुरुवात असले पेपरचे मथळे जास्त त्रास देतात..
    नव्वदच्या दशकांचा उत्तरार्ध.. जायकवाडी पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाइनच जोरात काम सुरु पण अद्याप पूर्ण झालेलं नव्हतं.. घरातल्या नळाला मार्चमधे पाणी आणि एप्रिलच्या पूर्वार्धात चहा यायचा (गढूळ) तोही एप्रिल मध्यात बंद..
...त्यावर्षी जेव्हडी पहिल्या पावसाची प्रतीक्षा केली तेव्हडी आजपर्यंत नाही.. पूर्ण मे महिना सायकलला पुढे मागे 2-2 असे चार डबे आणि मागच्या कॅरेजवर हंडा..आम्ही शाळकरी मुलं पाणी आणायचे लांब लांबून.. दिवस 3-4 तास नंबर लागायचा नाही म्हणूम रात्री 3-4 वाजता तेही म्हसणवाट्यातल्या (स्मशानभूमी) बोअर वरून .. परिसरात फक्त त्यालाच पाणी..

       जून सुरु झाला पण पावसाचा पत्ताच नाही...
महादेव कोंडून झाला... बायका रात्री घरोघर देवाचं गाणं म्हणत फिरायच्या..थोडस आठवत.. 

पाणी नाही खावू नाही
बरस रे मेघराजा
जित्राबांना दाना नाही
बरस रे मेघराजा
ढग  दाटून यायचे पण कोसळायचे नाही
...पण एक दिवस फार गाजावाजा न करता जो जोरदार दुपारचाच पडायला लागला..
...अजून आठवत .. गल्लीत होळीसारखा माहौल झालेला...लहान थोर सगळेच पावसात भिजत होते..
...खराटा घेहून आईने गच्ची धुवायला पाठवलं..
आणि पन्हाळा खालचं ते स्वच्छ पाणी हांडे /टीप भरभरून साठवलं.. इतकं स्वच्छ पाणी नळाला कधी पाहिलं शेवटचं तेही आठवत नव्हतं..
....मजेत आईला वडील म्हणाले,'अगं,चमचे आणि वाट्या सोडल्या तर सगळं भरलय पाण्याने'..किती साठवू आणि किती नको असं झालेलं..
*कुंभ अत्तरांचे हे कुणी खुले केले*

*पहिल्या पावसाचे थेंब मातीने हे पिले*
..पहिला पाऊस अजूनही आवडतो
पण रोमँटिक पेक्षा याच आठवणी मनात येतात




नवनाथ जाधव,तांदुळवाडी,परभणी.
         मी शेतकय्राचा मुलगा असल्याने माझे शेतीशी घनिष्ठ नाते तयार झालेले! मला उन्हाळा असह्य वाटायचा तो गुरांना हिरवा चारा न मिळत नसल्याने! कधी एकदाचा पाऊस पडेल आणि हिरवा चारा सुरु होईल, याची उत्सुकता लागलेली असायची. 
         पहिला पाऊस सुरु झाला की मातीचा जो सुगंध यायचा तो अत्तरालाही फिके पाडायचा.  पाऊस सुरु झाला की बाहेर पडणे बंद व्हायचे, मग मागच्या वर्षीच्या जुन्या वह्या काढायच्या, त्यांची शिल्लक पाने फाडायची ती एकत्र करुन शिवायचे आणि जाडजुड रफ कामासाठी वापरायला वही तयार व्हायची, तसेच नविन वर्षासाठी पढच्या वर्गातील मुलांची वापरलेली जुनी पुस्तके अर्ध्या किंमतीत विकत घ्यायची, आपली जुनी पुस्तके मागच्या वर्गातल्यांना अर्ध्या किंमतीत विकायची. विकत घेतलेल्या पुस्तकांना कव्हर घालणे बाहेर पाऊस चालत असताना चालू असायचे, जुनी पत्र्याची पेटी (संदुक) सर्व साहित्य ठेवण्यासाठी असायची. अशाप्रकारे पहिल्या पावसाच्या सानिध्यात सर्व शाळापूर्वतयारी पूर्ण करताना मजा यायची.
         पहिला पाऊस सुरु झाला की पेरणीपूर्वतयारीची लगभग सुरु व्हायची, कापूस लावण्यासाठी दोरीला सिंदाडाच्या पानाच्या खुणा करणे त्याला चिमण्या असे म्हणत कारण त्या खुणेचा आकार चिमणीसारखा दिसायचा, तसे सुताराकडून तिफण भरुन घेण्याची सर्वांना घाई असायची, सकाळीच उठून सुताराच्या घरी जाऊन बसावं लागायचं, तिथं अनेकजण आलेले असायचे, मग गप्पा सुरु व्हायच्या काय पेरायचं, कोणतं पिक येऊ शकतं, आंतरपिके कोणती घ्यायची इ.  या काळात सुताराचं खुपच महत्व वाटायचं.
         'मढे झाकोनिया करिती पेरणी..... ओटीच्या परीस मुठीचे ते वाढे.....' हा संत तुकारामांचा विचार जिवनात पूर्णपणे मुरलेला असल्याने पेरणी लवकर व्हावी यासाठी जीव तिळतिळ तुटायचा... पहिला पाऊस सुरु व्हायचा, घरात खते-बियाणे आणलेली नसायची, मग सुरु सावकारांची उंबरठे झिजवणं सुरु व्हायचे, सावकारांचे व्याजाचे दर ५₹ शेकडा प्रतिमाह म्हणजे वार्षिक ६०% एवढा प्रचंड असायचा पण इलाज नसायचा, असं असूनही त्यात एकप्रकारचा मिंधेपणा असायचा. सावकाराकडे मेळ नाहीं बसला तर मग डायरेक्ट गावातल्या खते व बियाणे विक्रेत्याकडे जाऊन उधारीसाठी मागणी करावी लागे, त्याचाही व्याजाचा दर वरिलप्रमाणेच असायचा, शिवाय तो दर चढवून लावायचा आणि बराच मालही मागच्या वर्षीचा असायचा, हे सगळं कळत असूनही गपगुमान बसावं लागे, कारण तो उधारी द्यायचा हीच मोठी मेहरबानी असायची.
         हे सगळं होईपर्यंत चार पाच दिवस जायचे, या दिवसांत सुरु व्हायच्या आकाडपाळ्या! म्हणजे पहिला पाऊस पडल्यानंतर तण उगवायचं ते घालवण्यासाठी पाळी मारली जायची. याचं हे जरी महत्व असलं तरीही दुधाचं ताकावर घालावावं लागायचं याची रुखरुख असायचीच, तिफण चालवण्याऐवजी पाळीवर भागवावं लागायचं!
         सगळी जाडाजोड झाल्यावर सकाळी सकाळी गाड़ी भरायची आठवाजेपर्यंत शेतात घेऊन जायचं आणि एकदाची तिफण सुरु व्हायची आणि कोण आनंद व्हायचा! 
 आनंदाचे डोही। आनंदतरंग.


श्रीनाथ कासे ,सोलापूर 
    वर्षातला पहिला पाऊस आणि मी या विषयावर किती लिहावं तेवढे कमीच आहे कारण पावसाच्या आठवणींचा ओलावा माझ्या कडे भरपूर आहे. 
    लहानपणी मी शेतातून शाळेकडे यायचो तेही पायी चालत, रस्ता अगदी कच्चा होता, जेव्हा पाऊस यायचा तेव्हा गुडघाभर चिखल असायचा तशातून ये जा करताना मला पावसाचा फार राग यायचा. मात्र पुढे जेव्हा मी पाचवीपासून 5 km सायकलीवर दुसऱ्या गावाला ये - जा करायचो तेव्हा या पावसामुळेच परगावी जाणारे विद्यार्थी या शीर्षकाखाली मला घरी जाण्याचा मौका मिळायचा. पावसामुळे आठवड्यात 2 दिवस संध्याकाळी असणारे P. T चे तास पण विज्ञान किंवा गणित शिकावे लागत असे पण यातूनहि परगावी जाणाऱ्यांना सुट्टी असायची तेंव्हा उठून बाहेर येताना जणू तुरुंगातून सुटका झाली या फीलिंगने बाहेर निघायचे. 
     पाचवी ते दहावी मी अगदी एखाद्या ' रायडर ' असल्यासारखा सायकलिवर घरी यायचो. या पावसात सायकलीवर भिजत घरी जायची मजाच वेगळी असायची. नदीला पूर येणे किंवा ओढ्यात पाणी वर यायचे तेव्हा आम्ही सायकली गळ्यात अडकवून ओढी पार केलेले पण आठवते. पायाखालची माती सरकायचे , पाण्याचा प्रवाह अगदी तीव्र असायचा.
   पावसाच्या अनेक आठवणी कॉलेजच्या आणि हॉस्टेलवरच्या आहेत. पहिल्या पावसात हॉस्टेलवर जी धम्माल अनुभवायला मिळाले ते जगात कुठेच अनुभवयास मिळत नाही. अनेक आठवणी पावसाशी आणि हॉस्टेलशी जुळलेल्या आहेत.....आणि त्या जन्मभर आठवतीलही ...
परत तसा पाऊस येणार नाही आणि ते दिवसही…



अश्विनी खलिपे,कडेगाव(सांगली)

         पावसाळा आला, सर आली किंवा नुसतं वातावरण जरी तसं झालं तरी मन वेदनांनी अगदी गच्च भरून जातं, कारणही तसंच काहीसं आहे...
तो पाऊस त्यावेळी अगदी रोमँटिक वाटणारा, पण आज मात्र जीवघेणा वाटतो कारण त्यातलं प्रेम आज कुठंतरी हरवलंय...
         लहानपणी खूप अनुभवले पाहिले पाऊस पण तारुण्यातला तो पाऊस काही निराळाच ठरला. अगदी मनात ठसे उमटवून गेला. पावसाळा सुरू होण्याच्या अधिकचा आणि उन्हाळा संपत आलेला तेंव्हाचा होता तो पहिला पाऊस... काळेकुट्ट ढग, अधून-मधून नुसती चमकणारी वीज, सोसाट्याच्या वारा व मी आणि सोबत प्रियसी(संजना), तिची मैत्रीण(प्रिया) व माझी जवळची एक मैत्रीण(कादंबरी)(जिचं माझ्यावर प्रेम होतं आणि हे प्रियसीला माहीत होतं). चातकाने वाट पाहावी अगदी तशीच वाट पाहत आम्ही गच्चीवर बसलेलो. माझा माझ्या प्रियसीसोबत अधून-मधून थोडासा सीन चालू होता व त्यावर कादंबरीचं बारकाईने लक्ष होतं आणि हे संजनासुद्धा ओळखून होती. पण पावसात भिजण्याचा मूड खराब नव्हता करायचा त्यामुळे कुणीच काही बोलत नव्हतं, पण डोळे मात्र खूप काही बोलत होते. यासगळ्यात पावसाची सर आली आणि सर्वांना चिंब चिंब केलं. पावसासोबत प्रियसी आणि मग त्यात रोमान्स नाही हे शक्यच नाही.
         अंगावर पडणाऱ्या थेंबाने ती शहारून जात होती आणि मी तिच्या स्पर्शाने. हा पहिलाच पण इतका विलक्षणीय अनुभव... आहाहा आजही शहारून जातं सारं अंग...पण या साऱ्यात वेदनांचा अनुभव घेतला तो कादंबरीने. आमच्यासाठी तो पाऊस खूप प्रेम बरसून गेला, पण कादंबरीवर मात्र वेदनांचा कहर बरसला. असा पाऊस पुन्हा आयुष्यात कधी अनुभवलाच नाही. त्यामुळे आता पावसाळ्याचा अर्थच वेदना होऊन बसलाय...
         *कुणासाठी रोमँटिक तर कुणासाठी वेदना बरसणारा, पण कसाही असला तरी मात्र सर्वांच्या मनात घर करून राहणारा असाच असतो हा पहिला पाऊस आणि त्याच्या त्या आठवणी...*


सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************