पुरोगामी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पुरोगामी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

अस्तिकता की नास्तिकता… नेमकी कशाची गरज आहे अपल्याला?? (भाग:-२)

🌱 वि४🌿या व्हाट्सअप ग्रुपवरून

अस्तिकता की नास्तिकता… नेमकी कशाची गरज आहे अपल्याला?? (भाग:-२)


Source:- INTERNET
-अक्षय पतंगे,
आ. बाळापूर,
जि. हिंगोली

    वेद, धर्मसूत्रांनी सांगितलेल्या गोष्टी सत्य मानणे म्हणजे आस्तिक. वेद,धर्मसूत्रांची भीती न बाळगता चिकीत्सा करणे म्हणजे नास्तिकता.
            अजून तरी अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य,शिक्षण या आपल्या मुलभूत गरजा. असं तर नाही की, कुणी आस्तिक आहे म्हणून तो अन्नाशिवाय राहू शकतो आणि नास्तिक आहे म्हणून निवाऱ्या शिवाय राहू शकतो. मला वाटतं आस्तिक, नास्तिक असणं ही प्रत्येकाच्या स्वतंत्र विचारसरणीवर अवलंबून असतं.
          कट्टरतावाद संपवून अभय निर्माण करणं, शोषणापासून मुक्ती, गरिबी संपवणे, प्रत्येकास शुद्ध पाणी, तरुणांना रोजगार, zero hunger, Freedom of choice यांची गरज आहे.

         सत्य स्वीकारून मानवी कल्याणासाठी निरपेक्ष प्रयत्न करणं महत्वाचं वाटतं. डोळस वृत्ती ठेवून मानवी व्यवहार करणं हे आस्तिक, नास्तिक यापेक्षा चार पाऊल पुढेचं असेलं.  उदा. केरळच्या १.८४ लक्ष विद्यार्थ्यांना टिसीवर ना जातीचा उल्लेख केला, ना धर्माचा यामुळे ना तणाव, ना विद्वेष, ना दंगली.



Source:- INTERNET
-विशाल सातपुते,
 पंढरपूर

अस्तिक किंवा नास्तिक असणं हा त्या व्यक्तीचा दोष नसून त्याच्या जीवनातील विचारांचा किंवा अनुभवाचा सार आहे. मी स्वतः देव मानत नाही परंतु ,तूम्ही देव मानू नका  असे सांगण्याचा आधिकार मला नाही.कारण देव मानने किंवा नाही मानने हा प्रत्येकाचा वैयक्तिक भाग आहे. आज आपण विज्ञानवादी युगात देव असणं हे स्विकारू शकत नाही. आणि   देवाचे असणं हे नाकारूही शकत नाही.कारण ,काही गोष्टींना आपण वैज्ञानिक कारणे देऊ शकतो परंतु काही गोष्टींना आपण वैज्ञानिक कारणे देऊ शकत नाही. उदाहरण द्यायचे झाले तर मी वयाच्या 19 व्या वर्षी पूणे ते पंढरपूर असा वारीचा चालत प्रवास केला. परंतु मला चालत असताना कसलाही ञास जाणवला नाही याचा अर्थ देवाने मला चालण्याची क्षमता दिली असा होत नाही, तर मी माझी स्वतःची काळजी घेतल्यामुळे ते शक्य झाले ,असे मी मानतो.याउलट मी पंढरपूरला पोहोचल्यावर मंदिरात गेलो नाही, जर देव खरंच असता तर त्याने माझे वाईट  करायला हवे होते ,उलट त्यावर्षीचा उत्कृष्ट विद्यार्थी वारकरी म्हणून माझा महाविद्यालयात सन्मान करण्यात आला. सांगण्याचा मुद्दा असा आहे की ,देव मानने किंवा नाही ही वैयक्तिक संकल्पना असू शकते. प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात. आठवलं म्हणून सांगतो, डिसेंबर 2015 मध्ये माझी स्वतःची लहान बहीण आजारी होती,ती स्वतःशीच बडबड करत असे.मधूनच काही वेळ घट्ट डोळे मिटून बसत असे.गावातील तसेच पंढरपूरमधील नामांकित डाॅक्टर चे असे मत होते की , तिचा मेंदूचा प्राॅब्लेम असून उपचाराअंती तो पूढील पाच ते सहा महिन्यात बरा होऊ शकतो. सर्व पर्याय जवळजवळ संपले  होते.अशावेळी आमची आजी तिला पाहण्यासाठी घरी आली होती. बोलता बोलता तिने देवाचा विषय काढला, तसा मी सर्वांना रागाने बोललो, एवढे डाॅक्टर उपचार करून थकले, आता देव तिला नीट करणार. परंतु आम्ही खेडेगावात राहात असल्यामुळे मी काॅलेजला गेल्यावर आईने त्या बाईला बोलवून देवाविषयी काही असेल तर सांगा अशी विनंती केली , त्यानुसार त्या बाईने सांगितले की , तुमच्या कुळदैवताची मंगळवारी पूजा करून ही सर्व परीस्थिती तूम्ही पूर्ववत करू शकता. योगायोगाने दूसर्या दिवशीच मंगळवार होता. सांगितल्याप्रमाणे सर्व पूजा वगैरे करून झाली , आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे जी माझी लहान बहीण गेले 10-12 दिवस अंथरुणावर पडून होती, ती पुढच्या दिवशी बुधवारी स्वतः सर्व गोष्टी आवरून शाळेत गेली होती आणि ही वस्तुस्थिती आहे. अशावेळी आपण विज्ञानवादी देवाचे अस्तित्व नाकारू शकत नाही. मान्य आहे की, देवाचा आणि तिच्या आजारी  असण्याचा काही संबंध नसेलही परंतु देवानेच मला ठिक केले ही तिची वेडी समजूत आजही कायम आहे. सांगण्याचा मुद्दा असा आहे की, देव माझ्या पाठीशी आहे, या एकाच आशेवर आज लाखो लोक आपले अस्तित्व टिकवून असतील तर आपण त्यांचे अस्तित्व नाकारू शकत नाही. परंतु स्वतःच्या कर्मामुळं/ आळशी जीवनामूळे काही लोक दारिद्र्याकडे वळतात. अशावेळी ते देवाला दोष देतात. देवानेच माझे वाईट केले असे सांगतात. ते देव मानत नाहीत. मग त्यांना नास्तिक म्हणायचं का ? हाही प्रश्न आहेच. काही दिवसांपूर्वी नितिन भानगूडे पाटिल यांच्या भाषणातील एक वाक्य खूप छान वाटलं, ते असे की , तूम्ही स्वतःच तूमचे जीवन चांगले किंवा वाईट घडवू शकता . तूमचे चांगले किंवा वाईट करण्याचा अधिकार हा तूम्हाला स्वतःलाच आहे. कोणताही देव तूम्हाला कष्टाविणा फळ देणारच नाही, कष्टाला पर्याय नाही.  आज देशात हजारो वेगवेगळ्या प्रकारची देवस्थाने आहेत. एकीकडे मंदिरात लोक हजारो रुपये दान करून येतात परंतु घरी असलेले आई-बाप कधी अर्धपोटी तर कधी उपाशी झोपतात, याची त्यांना जाणीव नाही. आज अनेक अनाथाश्रम, वृध्दाश्रम याची वाढ होत आहे.आजच्या काळात लोक मंदिरात दान करू शकतात परंतु आई -वडिलांना दोन वेळच जेवण देऊ शकत नाही ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. जर देवच सर्व विश्वाचा निर्माता असेल तर त्याला दान देण्याइतके आपण मोठे आहोत का ? यावरही विचार व्हायला हवा. डाॅ.शाम मानव यांनी आपल्या एका मूलाखतीत असे सांगतात की जर देवाला नवस करून मूले होत असतील तर लग्न करण्याची गरजच काय? शेवटी जाता जाता एवढेच सांगतो की, आपल्या वाड-वडिलांनी परंपरागत ज्या देवाची जोपासना केली त्या देवावर ठेवायची असेलच तर श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा कदापि नको. कारण तूमची अंधश्रद्धा ही एखादा जीव नष्ट करू शकते.                                     तात्पर्य: -आज नास्तिकता मनाशी बाळगून परंपरागत अस्तिकताही जपणे ही काळाची गरज आहे.



Source:- INTERNET
-संजय साळुंके,
जळगांव

                आस्तिक म्हणजे देवाला मानणे व नास्तिक म्हणजे देवाला न मानणे. पण देव म्हणजे नेमकं कोण ? मंदिरातील दगडाची मुर्ती ? डोंगरावर विराजमान मुर्ती? तीर्थक्षेत्र ? गंगास्नान ? कुंभमेळयातील साधू ? का कुणी संधीसाधू? नव्हे नव्हे मित्रांनो , रंजले गांजलेले , दुःखी कष्टी , निराधार हुशार विद्यार्थी, अंध पंगू यांच्यात ज्याला देव दिसतो तो आस्तिक , मग तो देवळात जातो की नाही हे गौण ठरते. संत गाडगेबाबा पंढरीच्या वारीला दरवर्षी न चुकता जायचे पण मंदिरात कधीच गेले नाहीत, मात्र वारीत  चंद्रभागेच्या तीरावर दिवस भर स्वच्छता करून रात्री तेथेच अंधश्रद्धा, निरक्षरता, व्यसनाधीनता , जात पात विरोधात कीर्तन करायचे . आमचा देव कोणाला मानायचे यातच खरा गोंधळ होतो. संत तुकाराम महाराजांनी म्हटले , जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, तोचि साधू ओळखावा , देव तेथेचि जाणावा। संत एकनाथ महाराज यांनी वाळवंटात तहानेने व्याकुळ गाढवात देव पाहून त्याला तीर्थ पाजून तहान भागवली. शेवटी भुकेल्याला अन्न, तहानलेल्याला पाणी, उघड्या नागड्याना वस्त्रं, गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी मदत, बेघराना निवारा, अंध पंगू रोग्यांना औषधोपचार, बेरोजगारांना रोजगार, पशू पक्षी प्राण्यांना अभय, गरीब तरुण तरुणींच्या विवाहासाठी मदत, व दुःखी निराश्यांना हिम्मत देणें म्हणजे आस्तिक , व हे न करता टिळा लावून गळा कापणे म्हणजे नास्तिकता. मंदिरात देव कधीच नसतो , तो असतो गरजूंच्या रूपात जगात सर्वत्र.आपण आपल्या मनाला विचारा आपण आस्तिक आहोत का नास्तिक ? नेमकी कशाची गरज आहे आपल्याला. धन्यवाद.


Source:- INTERNET
- जयंत जाधव,
लातूर

   माझ्या मते,आस्तिक व नास्तिक या संकल्पना किंवा गोष्टी  सामान्य मानसाच्या समजण्या पलीकडंची. ' देव 'ही काही लोकांनी खाजगी मालमत्ता करीन टाकली आहे. प्रत्येक जण देवाजवळ काही मागणी करतो त्यास आस्तिक म्हणणे योग्य नाही तर स्वार्थी  म्हणता येईल.
     देवाला देवळात राहू द्यावे.पण काही स्वार्थी लोकांनी त्याचे ऐवढे बाजारीकरण केले कि देव देवळातून केव्हाच पळून गेले.
      निसर्गातील 'सुपर नॕचरल पॉवर ' सूर्य,चंद्र,पृथ्वी,समुद्र,जल ,अग्नी,वायू इत्यादी गोष्टी माणसाला एक रुपया देखील न घेता कोणताही स्वार्थ न साधता लाखो किंमत असलेल्या गोष्टी अगदी फुकट देतात.पूजा करायची असली तर यांची करा.माणूस फक्त नावाला माणूस आहे.खरी माणूसकी ते दाखवतात.
        शाळेत असताना विज्ञानाचे सर म्हणायचे ,ऊर्जा अक्षय म्हणजे नष्ट होत नाही फक्त एका स्वरुपातून दुसऱ्या स्वरूपात बदलते. मग मी वर उल्लेख केलेल्या जाल,वायु,सूर्य या सुपर नॕचरल पॉवरला जर कोणी देव मानत असेल तर त्यांना नास्तिक म्हणता येणार नाही.या नैसर्गिक शक्तींच्या चांगली शिकवण म्हणजे एकमेकांना न स्वार्थ साधता मदत करणे कोणी शिकत असेल तर त्याला मी आस्तिक म्हणेल.
       तात्पर्य,एखादा माणूस एक तर आस्तिक असू शकतो वा एक तर नास्तिक.माझे वैयक्तिक मत असे आहे की,जिथे माणूसकी जपणा-या गोष्टी घडत असतील तिथे मी आस्तिक पण जिथे माणूसकीला अहितकारक घडत असेल तिथे मी नास्तिक असेल.

Source:- INTERNET
-नवनाथ कुसुम राजाभाऊ जाधव,
परभणी

   आस्तिक नास्तिक संकल्पना या आज जरी देवाशी संबंधित वाटत असल्या तरीही त्या मुलत: तशा नाहीत, त्या वेदांच्या मान्यतेशी संबंधित आहेत, त्या तशा गृहीत धरल्यास नास्तिक असणं आवश्यक आहे,  आजच्या रुढ अर्थाने देवत्वाशी जोडल्यास - 'देव मानायचा की नाही' हा खरा प्रश्न नाही, तर कोणता देव नाकारायचा आणि कोणता देव स्वीकारायचा हा खरा प्रश्न आहे, तर शोषण करणारा देव नाकारायचा जो पुरोहितांचे , भटजींचे (यातला 'जी' मला स्वत:ला मान्य नाही) हितसंबंध जपतो आणी रंजल्या, गांजल्यांना नडतो आणि शोषण न करणारा देव स्वीकारायचा , जो सगळ्या संतांनी सांगीतलेला आहे,             तिसरी एक संकल्पना आहे, आस्तिक म्हणजे सकारत्मकता आणि नास्तिक म्हणजे नकारात्मकता यादृष्टीने Be positive असणं केव्हाही चांगलं, याअर्थाने आस्तिक असावं.


Source:- INTERNET
-सागर राडे,
सांगली

आस्तिकता आणि नास्तिकता.. एकाच नाण्याच्या दोन बाजू. साधारणपणे आस्तिकता म्हणजे देव, आत्मा या किंवा अशाच न पाहिलेल्या गोष्टींचं अस्तित्व मानणे. याउलट नास्तिकता म्हणजे वर उल्लेख केलेल्या गोष्टींचं अस्तित्व नाकारणे. मग असं असेल तर आज आपल्याला यापैकी खरंच कशाची गरज आहे?
थोडेसे ऐतिहासिक संदर्भ देतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्य स्थापन करत असताना *हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा* ह्या विचारानेच ते नेहमी कार्यरत राहिले. स्वराज्यातील कुठल्याही गड-किल्ल्यावर बघितलं तर तिथे एखादं तरी मंदिर आवश्य दिसेल. कुठलंही महत्वाचं कार्य असेल तर गडावरील देवाचं दर्शन ते घेत असत असे उल्लेख इतिहासात सापडतात. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर ते आस्तिक होते याबाबत कुणाचंच दुमत नसेल.
पण तरीही *हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा* हा विचार घेऊन ते देवाच्या भरवशावर सगळं सोडून कधी स्वस्थ नाही बसले. अफजलखानाची स्वारी असेल, पन्हाळ्याचा वेढा असेल, शाहिस्तेखानाचं आक्रमण असेल किंवा आग्र्याची कैद असेल, ते कधी माझा देव बघून घेईल, तोच मला किंवा स्वराज्याला या संकटातून बाहेर काढेल असं नाही म्हणाले. प्रत्येक ठिकाणी त्यांनी पूर्वतयारी केली. त्याप्रमाणे योजना आखल्या आणि स्वतः आघाडीवर राहून त्या संकटांचा सामना केला आणि यश मिळवलं.

तीच गोष्ट कुठल्याही मोहिमेची. आस्तिक लोकांना अमावस्या म्हणजे अशुभ दिवस वाटतो. पण बऱ्याच महत्वाच्या मोहिमा महाराजांनी अमावस्या किंवा त्याच्या आधीच्या रात्री पार पाडल्या. रात्रीच्या अंधाराचा अचूक फायदा घ्यायचा हाच विचार त्यामागे असायचा. हीच गोष्ट आग्र्याहून सुटकेनंतरची. महाराज आग्र्याहून सुखरूप स्वराज्यात दाखल झाले पण शंभूराजे सुरक्षित परत यावेळी म्हणून त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी पसरवली. तेवढ्याने लोकांचा विश्वास बसणार नाही ह्याची जाणीव असल्याने शंभूराजांच्या जिवंतपणीच त्यांचे क्रियाकर्मदेखील केले. समुद्र ओलांडल्याने दैवी कोप होतो ही तत्कालीन प्रचलित समजूत. पण तरीही महाराजांनी स्वतः सिंधुदुर्गाची उभारणी करण्यास सुरुवात केली कारण ह्या समजुतींपेक्षा शत्रूशी लढा देणं आणि त्यासाठी समुद्रावर हुकूमत असणं जास्त गरजेचं आहे हे महाराजांनी जाणलं होतं.
अशा कित्येक उदाहरणांतून महाराजांनी हेच दाखवून दिले की आपण आस्तिक असलो तरी फक्त रूढी-परंपरा म्हणून सगळ्याच गोष्टी पुढे चालवायच्या नसतात. तर त्यामागचा विचार समजून घेत प्रसंगी त्या रूढी-परंपरा झुगारून देण्यातच शहाणपण असतं. आणि त्याने आपल्याला झालाच तर फायदा होईल, नुकसान नक्कीच नाही.
म्हणूनच मी तर म्हणेन की आपल्यालाही आज अशाच आस्तिकतेची गरज आहे जी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी दाखवून दिली.


Source:- INTERNET
-क्षितिज गिरी, सातारा

मुद्दा आस्तिक किंवा नास्तिक चा नाहीच ।आस्तिक किंवा नास्तिक हे विचार बरोबर किंवा चुकीचे असेही आपल्याला म्हणता येणार नाही।दोनीही गोष्टीचे समर्थन होऊ शकते।पण खरा वाद याच्या नंतर सुरु होतो।
          मनापासून देवाची भक्ती करणे त्याला पूजने ।एकाद्यावर दया दाखवणे।ईश्वर आहे या भीतीने का होईना पण पुण्य (आपण कशाला पुण्य म्हणतो हा वादाचा मुद्दा असू शकतो) काम करणे।कोणत्याही नवीन कामात ईश्वर माझ्या बरोबर आहे या सकारात्मत दृष्टीने चालणे म्हणून पण खुप सारी मानसिक शक्ती आपल्याला भेटून जात।इथपर्यंत सर्व व्यवस्तीत चालू असते ।
              भक्ताच्या भोळेपणाचा भीतीचा किंवा कामजोरीचा फायदा घेऊन उघड  पणे त्याची पिळवणूक केली जाते।समाजामध्ये देव धर्म यांचे नाव घेऊ चुकीच्या गोष्टीना समर्थन दिले जाते। वेगवेगळ्या अधध्देला पाठिंबा दिला जातो।देवाच्या व धर्माच्या  नावावर चुकीच्या गोष्टी खपवल्या जातात।हि कथा देवाने किंवा धमग्रथांनी सांगितलि आहे तिचा खरी आहे अशी समजून किंवा भिती घातली जाते।नरकाची किंवा इतर भीती दाखवुन उघड उघड शोषण केले जाते।देवाचे नाव घेऊन आतापर्यंत खुप क्रुर भयानक अत्याचार घडवले गेले आहेत।व आजही घडवले जातात।त्याचे उघड उघड समर्थनही केले जाते।आणि कधी कधी तर अन्यायाला बाली पडणार पण त्याच्यावरील अन्यायाचे समर्थन करतो कारण त्याला त्याची जाणीवच नसते किंवा तो समाजाच्या विरोधान जायला घाबरत किंवा टाळत असतो ।आजही या नावावर कितीतरी निःपाप जीवांचे बाली पडले जातात किंवा मानसिक शोषण केले जात।त्यामुळे नको वाटते हि आस्तिता।पण परत प्रश पडतो यामध्ये सामान्य माणसाचा काय दोष तो तर निरपेक्ष भावनेने भगवंताला शरण गेला आहे।पण परत प्रश पडतो आपल्यावरील व सामाज्यावरील अन्यायाचे सरळपणे पाठींबा देणार्याला आस्तिक म्हणावे का ?
              नास्तिक योग्यआहे तीच बरोबर आहे त्याने सर्व प्रश सुटतील असेही वाटते।पण अशीही माणसे भेटतात ज्याचा देवावर विश्वास नसतो पण इथल्या जातीव्यवस्थेवर असतो।ते देव नाही म्हणून सरळ सरळ दुसऱ्याचे लुबाडून खातात किंवा त्या गोष्टीचे  समर्थन करतात।मग विचारचक्र सुरु होते व वाटायला लागते त्यापेक्षा आस्तिक बारा निदान तो त्याच्या अज्ञानात तरी सुखी आहे।पण काही किंवा बहुतांशी अशी लोक पण भेटतात ती नास्तिक असता आणि माणूसच माणसांचे होणारे शोषण थांबवू शकतो ।कुणीही दुसरा येणार नाही।या विचाराने प्रेरित असतात।आणि मग ते प्रसंगी पूर्ण समाजाचा पण का होईना पण विरोध करून पण आपले विचार ठामपणे मांडतात।आणि ते आमलात येण्यासाठी कृती पण करतात।किंवा देव नाही पण प्रेम दिल्याने प्रेम वाढते या विचाराच करून जेवढे दुसर्याचे व समाजाचे चांगले करता येईल ठेवढे ते करतात।
           कितीतरी आस्तिक लोक देव धर्माच्या नावाने चाललेल्या काळ्या बाजाराला विरोध करतात पण म्हणून ते लगेच नास्तिक होत नाही तर त्याची त्या दिशेने चालू असणारी ती एक वाटचाल असते।मग ती त्याच्या नकळत का होईना पण विद्रोह झालेला असतो ।मागे एक वाक्य माझ्या कानावर आले कुणीतरी म्हणाले सर्व धर्मग्रंथ वाचून मी नास्तिक झालो।त्यामुळे आपले अज्ञान हेच कारण आहे आपण आस्तिक असण्यामागे ।अंतिम सत्य हे नास्तिक कडे वाटचाल करते।पण त्यामुळे आपण अस्तिकतेल विरोध करू शकत नाही तर त्यातील फक्त अधश्रदेला करू शकतो ।व लोकांच्या लक्षात आणून देऊ शकतो देव धर्माच्या नावाने चालू असणारी प्रथा परंपरा कशी चुकीची आहे ते।त्यामुळे लोकांची हळूहळू वाटचाल हि नास्तिकतेकडे होईल त्यांना कळणारही नाही।पण यासाठी कायम करावी लागेल ती समाजजागृती आणि नेहमी प्रमाणे यामध्ये बाली जाईल तो सच्या नास्तिकांचा ।जे आज पर्यंत होत आले आहे तेच पूढे पण होईल।पण अशी समाजजागृती जर झाली नाही तर आपण काळाने खुप मागे खेचले जाऊ हे मात्र नक्की।जसे शिवशाही व पेशवाई मध्ये तफावत आली अगदी तशीच।
      शीमंतांना देव नसला तरी चालेल पण गरिबाला देव लागतो।क्षणा क्षना ला मानसिक शरीरींक संकटांना सामोरे जाणार्याला देव लागतो।कारण तेवढाच एक पर्याय त्याच्या कडे असतो तो हि शेवटचा ।पण याचाच गैर फायदा घेऊन आणखी त्याचे शोषण केले जाते ।होते काय उलटेच।
        आस्तिक माणसाकडे भरपूर प्रश्नांची उत्तरे नसतात किंवा तो त्याची चिकित्सा करत नाही आणि ती शोधण्याचा  प्रयन्त हि करत नाही।किंवा उत्तरे घावली तरी यामध्ये आपला काही फायदा नाही किंवा ते सत्य सीकारण्याची तेवढी हिम्मत नसते किंवा होत नाही।
आतापर्यंतच्या जगाच्या इतिहासामध्ये झालेल्या क्रांत्या या रक्तरंजित किंवा लोकशाही मार्गाने झाल्यात त्यामुले थोडा अधिक प्रमाणात का होईना पण न्याय मिळाला ।आजही असाच न्याय मिळवावा लागतो।मग तो लोकशाही मार्गाने आसू किंवा प्रसंगी हुकूमशाही मार्गाने।पण न्याय देण्यासाठी कोणताच देव किंवा कोणीही आले नाही ।हजारो वर्षापासून चालत आलेली भारतातील अन्यायकारी जातीव्यवस्था असो किंवा जगातील स्त्री पुरुष असमानता असो किंवा जगातला काळा गोरा भेदभाव असू किंवा गुलामांचा व्यापार असू ।कितीही क्रूर अन्याय झाला लोखों कोट्यवधी लोक मारले गेले मग ते रोगामुळे असू  किंवा महायुद्धा मूळे किंवा एखाद्या हिंसाचारामध्ये कोणीही आले नाही वाचवायला आणि तसे कोणी येतहि नाही।त्यासाठी जगाच्या इतिहासमध्ये खुप जणांनी निस्वार्थी भावनेने समाजसेवा केली।आणि थोडा जास्त प्रमाणात का होईना पण न्याय मिळून आणला।आपले पूर्ण आयुष्य वेचले ।ते एकच आहे हे माहित असून पण ।पण आपण काय केले आपण फक्त त्यांना दगडांच्या मुर्त्या त्यामध्ये कैद केले।आणि एखांद्या भक्त प्रमाणे त्याचा जयघोष केला।आणि नेमकी त्याच्या विचारांचीच पायमल्ली करून आपण अस्तिकांनकडे वळालो ।मग खपवल्या गेल्या आजही जातात त्याच्या नावाने कोणत्याही गोष्टी।आपण मात्र आंधळे पणाने स्वीकारतो।आणि परत आपल्याला गरज भासू लागते नास्तिकतेची।खरच आपल्याला निस्वारती नास्तिकतेची गरज आहे।तरच आपण एका शोषण मुक्त समाजाची निर्मिती करू शकतो।
          आस्तिक म्हणजे अस्तित्व  मध्ये असणारी गोष्ट जशीच्या तशी स्वीकारणार आणि नास्तिक म्हणजे आस्तिक (अस्तित्वात असणाऱ्या) गोष्टीची चिकित्सा करून चुकीच्या गोष्टीचे समर्थन ना करता मनाला पटणाऱ्या सत्य गोष्ट स्वीकारने ।म्हणजे प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करून बरोबर असणाऱ्या गोष्टी स्वीकारने मग त्या गोष्टी समाजाच्या विचारसरणीच्या विरोधात का असेना पण त्या आमलात आणणाऱ्याचा प्रवास आस्तिकते पासून नास्तिकते कडे होतो।


पवन खरात,अंबाजोगाई
जर देव या संकल्पने हि संदर्भ जोडला तर मी नास्तिक आहे,पण जर माणुसकी सोबत संदर्भ जोडला तर मी आस्तिक आहे ।

कारण मी जगात जिवंतपणी आई वडिलांचा छळ करणारे,  दोन वेळेची भाकरी खायला देण्यासाठी सुद्धा काणकुन करणारे  आणि मेल्यानंतर पुण्य मिळण्यासाठी लोकांना गोड जेवण खाऊ घालणारे असे नीच प्रवर्तीचे लोक सुद्धा अगदी जवळून पहिले आहेत.


     "अंगात देव येणे " हे वाक्य आपल्या सर्वांना परिचित आहे आणि विशेष म्हणजे फक्त आणि फक्त भारतातच ऐकायला मिळेल.
जर अंगात देव येऊन खालील प्रश्न सुटणार असतील,

1. एखादया अंथरुणावर पडलेल्या व्यक्तीला तंदुरुस्त करत असेल,हातात गळ्यात गंडे दोरे बांधून जर आजार नीट होत असता तर डॉक्टर जन्माला यायची गरज काय होती ?

2.जर उपासतापास करून एखाद्याची अधुरे स्वप्न पूर्ण होत असतील, तर दररोज भारतात भूक बळिले मरणारांची संख्या लाखोंमध्ये आहे, ज्यांना एक वेळच अन्न मिळणे मुश्किल आहे ,त्यांच्या स्वप्नचं काय?

3. जर देव अंगात येतो तर मग एखाद्याच्या अंगात आईन्स्टाईन , स्टीफन हॉकिंग्स,थॉमसन, न्यूटन ,आंबेडकर ,शिवाजी महाराज, यायला पाहिजेत, त्यामुळे देशाची प्रगती तरी होईल. असं का होत नाही?

 4.नेहमी अयशस्वी होणाऱ्याला यशस्वी करत असेल,तर या जगात कोणालाच अथक परिश्रम करायची गरज काय ?

माझ्या समोर घडलेला एक प्रसंग सांगतो,
ऑफिसला जाण्यासाठी घरातून निघालो थोडं दूर गेल्यावरती एका घरासमोर एक देव्हारा आणि तुळस होती साधारणतः 10 मिनिटं पूर्वी पुजाकरून झाली असेल,मी त्यासमोर जळत असलेल्या अगरबत्ती वरून अंदाज लावला. एक 8 वर्षाची मुलगी एक 1 वर्षाचं बाळ कडेवर घेऊन  त्या घरासमोर भाकरी मागत  उभी राहिली होती, बाजूला एक कुत्रा उभा होता. तेवढ्यात त्या घरातून एक बाई भाकरी घेऊन आली आणि ती भाकरी त्या कुत्र्याला टाकली, तेव्हा मला खरंच खूप दुःख वाटलं पण एक गोष्ट मात्र मी शिकलो या जगात माणसाला जेवढी किंमत नाही त्यापेक्षा जास्त किंमत कुत्र्याला दिली जाते.

म्हणूनच मला हे सांगायचे आहे कि ,
"जर देव या संकल्पने हि संदर्भ जोडला तर मी नास्तिक आहे,पण जर माणुसकी सोबत संदर्भ जोडला तर मी आस्तिक आहे ।"


अस्तिकता की नास्तिकता… नेमकी कशाची गरज आहे अपल्याला?? (भाग:-१)

🌱 वि४🌿या व्हाट्सअप ग्रुपवरून
अस्तिकता की नास्तिकता… नेमकी कशाची गरज आहे अपल्याला?? (भाग:-१)


Source:- INTERNET
-किरण पवार,
औरंगाबाद

याविषयी मला ठामपणे सांगायच आहे ते म्हणजे आपल्याला नास्तिकतेची गरज आहे. कारण *आस्तिक असण तुमच्यातल कुतूहल नष्ट करून टाकत.* कुतूहल एका प्रकारे जिद्दीचा उगम असतो. नास्तिकता प्रश्नांना पुरक आणि पडताळणीची उत्तरं शोधते.
          आजवर जेवढी आस्तिक लोक पाहिली तेवढ्यांमुळे नाहक अअंधश्रद्धेचे बळी पाहिले. धर्माच्या नावाखाली अन्याय पाहिला. आस्तिक लोकांना इतरांच स्वातंत्र्य हिरावून घेताना पाहिल. *खर तर आस्तिक लोकांना सर्व गुन्हे मी लेबलींगच्या नावाखाली करतानाच आजवर पाहिलं.*


Source:- INTERNET
-अनिल गोडबोले,
सोलापूर

हा प्रश्न मला खूप वेळा पडत आला आहे. नेमकं अस वातावरण आपल्या आजूबाजूला असत की आपण सरळ सरळ धार्मिक असाव अस वाटत... एखादा सण किंवा समारंभ होत असेल तर अस वाटत की देव आहे, हे एवढे लोक जर छाती ठोकून अनुभव आला आहे असं सांगतात तेव्हा नक्कीच आपण आस्तिक व्हायला पाहिजे... व्हायला पाहिजे काय... आहोतच आपण..
ते सण, घरात येणारे लोक, प्रसाद च्या नावाखाली विविध पदार्थांची रेलचेल, उदबत्त्यांचे वास, आरती चे स्वर, भजनातील तल्लीनपणा... हे सगळं आवडत. चांगलं असण्याची ताकद आहे असं वाटत जात..
तसेच उलट भूत, वाईट शक्ती, यांच्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी, नशिबाच्या खेळावर मात करण्यासाठी अस्तिकता असल्याशिवाय पर्याय नाही असं मतच होत माझं....

आणि मग एक माणूस भाषण देताना, लेख लिहिताना किंवा शाळेत शिकलेला विज्ञानाचा संदर्भ देऊन संभाषण (वाद विवाद नव्हे) करू लागतो.. आणि आपल्याला ते पटत जात. मनात आत कुठेतरी हालत जात सगळं, केवढं मोठं असत्य आपल्या गळ्यात मारलं जात आहे, आणि ते पण किती पद्धतशीर पणे.. दाभोलकर खरे वाटायला लागतात.. भगतसिंग वाचताना आपलं मनच म्हणत... अरे हे तट खर आहे की, मग शोधत शोधत जाताना लेनिन, मार्क्स, अगदी प्रोटेस्टंट करणारा मार्टिन ल्युथर पासून अगदी थेट चार्वाक पर्यंत गाडी येऊन पोहोचते.
मधेच नास्तिक मेळावे काय भारतात, मध्येच एखादं राष्ट्र निधर्मी असून त्यांचा gdp आणि समाधानाने जगण्याची वृत्ती भन्नाट आहे असं कळत आणि ते पण बरोबर वाटायला लागतं
बुद्ध, महावीर, बसवेश्वर यांच्या पासून काल परवा पर्यंतच्या गाडगे बाबा चे विचार योग्यच वाटायला लागतात.
पांडुरंगाच्या चरणी जाणारे संत दाखवताना... हे लक्षात येत की हे नुसतेच शरण गेले नाहीत तर शिकवून गेले आहेत... जगायला..
'ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा' अस वाचल्यावर वाटत की हे संत नक्कीच जो पांडुरंग शोधत आहे आणि आमच्या मनातला विठ्ठल हा वेगळा आहे.
मंदिरात जायला , मशिदीत जायला मन नकोच म्हणत, बाप्तिस्मा देऊन भूत काढणार्यांना जाऊन प्रबोधन करावं असं वाटत..
आणि या क्षणाला पुन्हा घरातले मोठे जाणते ज्यांनी आयुष्य बघितलं आहे .... ते सांगतात... 'हात जोड' आणि पुन्हा देव धर्म अस सुरू होत..
कितीवेळा तरी अशी आंदोलन मनात होत असतात.....
मी नास्तिक आहे असं न म्हणता फक्त तशा अर्थाचा मेसेज सोशल मीडियावर टाकला की फोन, मेसेज,... आणि बरच काही.
'एकच सांगतो तुला देव आहे किंवा नाही हे सोड.. विश्वास ठेवा.. देव तुझ्या मनात आहे..
देव असल्याशिवाय तर हा सगळा पसारा कसा चालला आहे?'
असा उपदेश चालू असताना.. कोणीतरी स्टीफन हौकिंग नावाचा माणूस सांगून जातो.... ' देव सोगट्या खेळताना कुठेतरी हरवतो त्या त्यालाच सापडत नाहीत आणि आपण नशीब म्हणून बसलोय....' देव नावाची कोणतीच वस्तू किंवा एनर्जी नाही...
अस बरच काही..... एवढं सगळं होऊन प्रश्न उरतो की ' मी आस्तिक की नास्तिक'
आणि शोध सुरू होत नेमकं काय सत्य आहे.. शेवटी सत्य हेच सापडत की..... दोन्ही बाजूची टोक गाठण्यापेक्षा आपण आपला मधला मार्ग काढावा... त्याबरोबर मनात प्रश्न येतो "ना घर का ना घाट का" अशी अवस्था तर होणार नाही ना आपली....
वाद घालण्यापेक्षा संवाद साधत नाही आपण आपले मुध्ये खरे म्हणून आपल्याच लोकांशी भांडत जातो.... एवढं बोलतो की नंतर भीती वाटते... " माझा दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी तर होणार नाही ना?"
काही गोष्टी समजायला लागतात... निरीश्वरवादी तर फार पूर्वी पासून आहेत..
आपणच बऱ्याच गोष्टी एकात मिसळ केल्या आहेत.
नैतिक असण्यासाठी मला देव धर्म करण्याची गरज नाही तर विचार बुद्धी वादी असन गरजेच आहे... जेव्हा बुद्धी प्रश्न विचारते तेव्हा सगळी उत्तर मिळत नाहीत.... मिळत फक्त ' कसं जगावं' या वरच उत्तर..
आनंदी रहा, माणुसकी ठेवा, देव माना किंवा मनू नका पण आपले विचार समोरच्यावर थपवु नका, चुकीच घडत असेल तर आवाज उठवा...
आणि ठणकावून सांगा मला कुठल्याच कट्टरतेची गरज नाही.....मी सगळ्या सोबत इतरांना न दुखवता माझ्या मनाप्रमाणे राहू शकतो...
मी माझ्यामुळे कोणाला त्रास होणार नाही असे वागेन...
आता या वागण्याला तुम्ही काय म्हणायचे ते म्हणा
मला तर वेगळं काही सांगण्याची गरज वाटत नाही
मला दोन्हीची गरज वाटत नाही.. फक्त ज्या गोष्टी काळाच्या कसोटीवर ज्ञान म्हणून टिकून आहेत... त्या गोष्टी साठी कुठल्याही काल्पनिक गोष्टीवर मला अवलंबून राहण्याची गरज नाही..!!



Source:- INTERNET
-करण बायस,
जि. हिंगोली

आस्तिकता आणि नास्तिकता ह्या दोन संकल्पना आपल्याला आणखी पण गोंधळून टाकतात.
असं म्हणतात अस्तिकता म्हणजे देवपूजा करणे, धर्म ग्रंथात किंवा धर्म गुरूंनी सांगितल्या प्रमाणे धार्मिक कर्मकांडात विश्वास ठेवणे असं काहीतरी आणि नास्तिकता म्हणजे या उलटं.
काही लोक मी किती अस्तिक आहे हे दाखवण्यासाठी पूजाप्रार्थना,गंध,धार्मिक कर्मकांड करणे आणि स्वतःला अस्तिक घोषित करतात.यामागे त्यांचा हेतू असतो तो म्हणजे मृत्यू नंतर त्यांना स्वर्ग पाहिजे असते,मोक्षप्राप्ती हवी असते.
या सगळ्या गोष्टींचा पाया  हे धर्मप्रचारक आहेत.
लोकांना हे धर्मप्रचारक असं पटवून देण्यात व्यस्त असतात की जो देवपूजा करतो, धर्मग्रंथांनी सांगितलेल्या मार्गावर चालतो तोच खरा अस्तिक असतो आणि जो या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही तो नास्तिक असतो.

आपल्या देशात वास्तवता ही आहे की लोकं मंदिरात जाऊन देवाला सोनं, पैसा दान करतात. त्या लोकांना कोण समजवाव की तुम्ही दिलेला सोनं आणि पैसा हा देवाकडे जात नाही (देवाकडे कशाची कमी असेल की ते आपल्याकडून घ्यायला बसले)ते तिथल्या महाराज आणि संस्थेच्या मंडळाच्या लोकांच्या पोटासाठी जातात.
या धर्मगुरूनी असं पटवून दिलं की जर तुम्ही आम्ही सांगितल्याप्रमाणे काही केलं नाही तर तुमच्या वर देव नाराज होईल आणि तुमच्या अडचणी आणखी वाढतील.देव लोकांच्या अडचणी का वाढवेल त्याच्यासाठी तर सगळे एक समान आहेत.
देशाला लुटणारे हे लोक आणि पिळून निघणार  म्हणजे शेतकरी, बेरोजगार आणि गरीब लोक.आणि या लोकांनी समाजाची mentallity अशी बनवून ठेवली की हे गरीब लोक सुद्धा त्या धर्मप्रचारकांना नाव ठेवणार नाही.
आपण बघितलं बरेचसे समाजसुधारक असे होते की ते या गोष्टीत(लोकांच्या दृष्टिकोनातून नास्तिक) विश्वास ठेवत नव्हते पण त्यांचा समाजाकडे बघण्याचा दृष्टीकोन चांगला होता मग या समाजसुधारकांना काय म्हणायचे ? या समाजसुधारकांनी समाजासाठी चांगलं करण्याचा प्रयत्न केला त्यांना माहीत होतं की धार्मिक कर्मकांड केल्यानं समाजाची प्रश्न सुटणार नाही.या धर्मप्रचारकांनी अशी परिस्थिती करून ठेवली की आपण या समाजसुधारकांना पण आठवत नाही किंवा लोकांपर्यंत त्यांना पोहचू दिलं नाही.
विचार करण्यासारखी गोष्ट आहे लोकं एवढ्या श्रद्धेनं देवस्थानवर जातात तिथे पैसे टाकतात आणि म्हणतात आम्ही ते देवाला दिले अरे त्यात तुमचा काय फायदा झाला? सोनं देवाला चढवून काय फायदा झाला? देवाला नारळ फोडून काय फायदा झाला?
इथं शेतकरी आत्महत्या करत आहे, शाळेत मुलांना बरोबर शिकवलं जात नसल्यामुळे बेरोजगारी वाढत आहे, वरून हे धर्मप्रचारक तरुण मुलांना भडकवतात आणि देशाचं भविष्य इथंच संपवायचं म्हणजे गरीब लोक गरीब राहावं,बेरोजगार लोक बेरोजगार राहावे!
हे धर्म, जात मानवनिर्मित आहेत आणि मानवांनी देवाला जाती/ धर्मानुसार वाटून घेतले.

आजकाल देवाच्या नावावर लोक पैसे सुद्धा कमवतात,म्हणजे देवाच्या मुर्त्या बनवणे, गणेशोत्सव, नवरात्री मध्ये हे जास्त होते पण कधी विचार केला का पाण्याचं प्रदूषण किती वाढत आहे, कधी विचार केला का पाण्यात राहणाऱ्या जीवनच इथं लोकांना वाटते आम्ही गणेशोत्सव, नवरात्री मध्ये 2-3 वेळा उपावासच खाऊन उपवास केला आणि त्या जीवाला मारून यांना पुण्य भेटणार? या लोकांना उपवास काय असते हे सुद्धा माहीत नाही.
आज तिरुपती ला एवढं सोनं चढवला जातो जर तोच देशाचे काही प्रश्न सोडवण्यात लावले तर काय जाते. जो संत, गुरू आपलं संपूर्ण आयुष्य एका फकीर सारखं राहून जगतो आज लोक तिथं जाऊन सोन्याचं सिंहासन,सोन्याचं छत्र देतात,ते संत जर आज असते तर त्यांनी हे स्वीकारलं असतं का?
आणि असं करून लोकांना वाटते की ते अस्तिक आहेत?

असं म्हणतात की देव हा आपल्यामध्ये(आपले अचेतन मन)आहे, हा देव आपली केलेली प्रत्येक प्रार्थना तो ऐकतो पण ती प्रार्थना अगदी मनापासून असली पाहिजे. आपले चेतन मनात कोणत्याही प्रकारची भीती, संशय नसला पाहिजे आणि  ही फक्त दगडाच्या देवसमोरच केली जाते असं नाही,आपण कोठेही असलो तरी प्रार्थना करू शकतो फक्त त्यात पवित्रता असली पाहिजे ,कोणाच्या प्रति वाईट गोष्टी नसल्या पाहिजे पाहिजे.अशावेळेस आपले अचेतन मन आपल्याला आपले उत्तर नक्कीच देते, हेच सांगण्याचे प्रयत्न संतांनी केले पण लोकांनी त्यांना पण देव बनवून धंदा चालू केला.
आज आपल्यात पण खूप क्षमता आहे आपण सुद्धा प्रगती करू शकतो पण लोकांना या धर्म, जातींनी खूप घट्ट पकडून ठेवलं आहे.

आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे जर प्रगती करायची असेल तर.


Source:- INTERNET
-सीताराम पवार,
पंढरपूर

आस्तिक मणजे  देव (वेद)मानणारे आणिनास्तिक(वेद) देव न मानणारे.आपल्या भारतीय तत्वज्ञानाप्रमाणे नास्तिक मध्ये बौद्ध, जैन व चार्वाक याच्या विचारधारेचा समावेश होतो. खर तर म.गांधीजी मनतात "सत्य हाच ईश्वर आहे.स्वयंपूर्ण खेडी,भै  तिकवादाला विरोध, आज अपण यांत्रिकीकरण जगात आहोत, पुन्हा मंतोय जीवनशैली खूप बदलती आहे.त्यासाठी आपल्याला अध्यात्माची गरज आहे,अंतिम ध्येय सुखी-समाधानी जीवन जगणे हेच आहे,एवढी प्रगती होऊनसुद्धा आपण आणखी सुख शोधतोय? म फुलेंनी कोणीतरी निर्मिक आहे असे मानले आहे. मणी नाही भाव देवा मला पाव... अस गाडगेबाबा नि मटले आहे.तसेच नास्तिक विचारधारेतील बुद्ध, जैन विचारात कर्मकांड सोडून इतर बऱ्याच गोष्टी साम्य आहेत, प्रार्थना, विपश्यना, आता तर गावोगावी बुद्ध मूर्ती स्थापन होत आहेत.आत्मिक समाधानासाठी हे उपयोगाचे आहे. संत तुकाराम महाराजांनी सुद्धा कर्मकांडाना विरोध केला,मनुन कर्मकांडाशिवाय भक्ती, अध्यत्म,माझा सुद्धा कर्मकांड, नवस बोलणे, याला विरोध आहे मला वाटते मूळ अस्तिकतेत हे नसावं काही स्वार्थी लोकांनी त्यात घुसफाळ असावं.बुद्ध मनतात स्वतःचा दीप स्वतःच बना. संत तुकाराम महाराज मनतात"1वेदांचा तो अर्थ आम्हशीच ठाव।येराणी वाहवा भार माथा।
2 वेद अनंत बोलिला।अर्थ इतुलाची शोधीला।
मूळ वेदांमध्ये कर्मकांड होती का पुन्हा काळानुसार त्यात घुसळली हे कळायला मार्ग नाही. अस्तिकता की नास्तिकता हे मणजे ,तत्वमीमांस की ज्ञानमीमांसा अस होईल, किंवा कलेसाठी जीवन की जीवनासाठी कला. खरं तर आपल्या भारतात आस्तिक, नास्तिक दोघेही कडक नियमानुसार शक्यतो वागत नाहीत, आपल्यात विविधत्तेतून एकता आहे.जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आइन्स्टाइन कृष्णमूर्तीनच्या पायाजवळ बसत. अनेक नोबेल विजेते वेडे झाले, आत्महत्या केल्या, कोणी चपला खाल्या,मला कुणाला हिनावायचे नाही पण, मानसिक शांताता, संतुलनासाठी काही गोष्टी मानसशास्त्रही मान्य करते. खर तर खराइशवरवाद आपल्याला वारकरी संप्रदाय कडून शिकायला भेटतो उदा. संत सावता माळी
कर्तव्य कर्म हाच खरा धर्म।
शेवटी ज्याची त्याची गरज वेगवेगली आहे ...


Source:- INTERNET
-सिमली भाटकर,
रत्नागिरी

माझ्या मते आस्तिकपणा व नास्तिकपणा ह्या एकाच नाण्याच्या बाजू आहेत.देव देव करणे म्हणजे आस्तिक व न करणे म्हणजे नास्तिक असे अजिबात नाही.देऊळबंद चित्रपटात एक वाक्य आहे ,'परमेश्वर हे मानसाच्या प्रगल्भ बुद्धीला लागलेले ग्रहण आहे.मुळात हे ग्रहण आपण स्वतः लावून घेत असतो.परमेश्वर ही संकल्पना आपणच निर्माण केली व कधी धर्माच्या नावाखाली तर कधी जातीच्या नावाखाली वर्षानूवर्ष जोपासल्या आहेत.
मला माझ्या लेखातून कुणाच्या भावनांचे समर्थन करायचे नाही किंवा कुणाच्या भावना दुखाविण्याचा अजिबात उद्देश नाही.देवाच्या नावाखाली लोकांच्या मनात चाललेले युद्ध व त्यातूनच निर्माण होणारी अंधश्रध्दा यावर मला थोडेसे स्पष्टीकरण द्यायचे आहे.
झाडाचे एक लहान बीज जमिनीवर पडते.मातीत रुजते.त्याला योग्य पोषक वातावरण मिळाले कि अंकुर फुटून त्याचे मोठ्या वृक्षात रुपांतर होते.ह्या क्रियेला कुठली जादू म्हणता येईल का? कुणाकडे आहे  याचे उत्तर ? निश्चितपणे नाही.अगदी असच नात आहे आस्तिक व नास्तिक यामधील. आपल्याला समाजातील देवाचे स्थान किंवा नाव कमी करायचं नाही आणी देवाच्या नावाने चाललेला अंधश्रध्देचा काळाबाजार देखील थांबवायचा आहे.
राम,रहिम येशू हे एकच आहे व त्यांची शिकवण देखील सारखीच आहे.माणसाने विचारांनी मतभेद निर्माण केली,त्यातून वादविवाद,भांडणे सुरू झाली.मुळात विचारांची पातळी जशी उंचावते तसे माणसाचा समजूतदारपणा,त्याची परिस्थिती सभोवतालचे वातावरण व सर्वात महत्त्वाचे त्याची सकारात्मक विचार करण्याची पध्दती ,योग्य अयोग्य काय हे जाणून घेण्याची प्रवृत्ती  प्रगल्भ होते.
उदाहरणार्थ भाविक  लोक देवाला फुले,मोठ्या देणग्या घेऊन हजारो मैलांचा प्रवास पायी चालत देवस्थानात येतात. पण त्या ठिकाणी पाच मिनिटे देखील स्तब्ध उभे राहून आपल्या लाडक्या देवाला बघता येत नाही.कुत्र्याला हाकलून लावतात तसे दलाल भडवे भक्ताना मंदिरातून लवकर बाहेर काढतात .कित्येक वेळा चेंगराचेंगरीत भाविक यांचा मृत्यू होतो.येथे मानसाच्या बुद्धीमत्तेची दया येते व विचारांचा कस लागतो.देवस्थान गर्भ श्रीमंत होत आहे तिथे माणसांची गर्दी वाढते.पण अनाथाश्रम,वृध्दाश्रमातील लोकांना जगवण्यासाठी  इत्यादी ठिकाणी मात्र कुणी पुढं येत नाही.त्यासाठी बुद्धी व विचार असावे लागतात.
देवाला मानावे नक्की माना पण श्रध्देने. आपल चांगले होत नाही म्हणून लिंबू मिरची दूस-याचे दारात फेकणे हे सर्व प्रकार वाईट आहेत.ही श्रध्दा नाही,तर त्याला  वाईट भावना म्हणतात.दोन तासभर मंदिरात दर्शनासाठी लांब रांगा लावण्या ऐवजी मोकळ्या हवेत ॐ उच्चार करून प्राणायाम, योगासने करुन मन व शरीर दोन्ही निर्मळ करा म्हणजे साक्षात देव भेटल्याचा आनंद मिळेल.अशा  विचारांची अंगी जोपासना करा.
देवाला न मानणाऱ्या लोकांना नास्तिक म्हणण्या पेक्षा त्यांचे विचार समजून घ्या. हर एक माणसाची कोणावर ना कोणावर श्रध्दा असते.त्यांचे विचार वैज्ञानिक असू शकतात,वाचन मोठे असू शकते.देव मानणाऱ्याचे देखील अस असू शकते.आपण फक्त यातून अंधश्रध्दा दूर करायला पाहिजे.
उदा.महिलांना मासिक पाळी येणे ही शारीरिक व नैसर्गिक गोष्ट आहे .याचे विज्ञान सांगण्याची मला गरज नाही.पण या काळात तिने देवाला हात लावू नये,मंदिरात येऊ नये हे सर्व अंध कल्पना आहेत.मासिक पाळी काळात तिने एका जागी बसावे,आराम करावा ही गोष्ट ठिक आहे पण तिने गुपचूप ऐकलंच पाहिजे म्हणून देवाची लेबल्स लावून अंधश्रध्दा पसरवीणे कुठेतरी थांबायला पाहिजे.
माझ्या वाचनात एक सुंदर वाक्य आले आहे.संदर्भ आठवत नाही.ते वाक्य असे की,'मला येणारी मासिक पाळी जर श्राप आहे तर तुझे बाप बनणे देखील पाप आहे .' अशुद्ध रक्तातून जन्माला आलेले बाळ तुम्हाला चालते पण त्ता मातेचा स्पर्श नाही चालत.ही आस्तिकता नव्हे तर अंधश्रध्दा ठरते जी की समाजातून दूर करणे गरजेचे व महत्त्वाचे आहे.
लिहायला गेली तर कागद कमी पडेल. प्रत्येकाची विचार करण्याची पातळी वेगवेगळी असते आस्तिक व नास्तिक या चक्रव्युव्हात अडकण्यापेक्षा माणुसकीने जपून वागा,नात्यांना प्रेमाने बांधले पाहिजे.एकमेकांना मदत करून एक विकसित भारत घडविण्याचे दृष्टीने प्रयत्न करा.धर्म,जात,देव आस्तिक नास्तिक इत्यादी वादात न अडकता विचारांच्या प्रगल्भतेने माणसाच्या बुद्धीला लागलेले अंधश्रध्देचे ग्रहण दूर करु या.
एखादी गोष्ट कोणावरही लादण्यापेक्षा समजून सांगणे जास्त फायदेशीर ठरते.तात्पर्य  आज आस्तिकपणा-नास्तिकपणा करण्यापेक्षा माणसाला माणूसकीने साथ देणे ही काळाची गरज आहे.


Source:- INTERNET
-संदीप बोऱ्हाडे,
 पुणे

   आस्तिक आणि नास्तिक यांच्या दोन सोप्या व्याख्या आहेत देवाला जे मानतात ते आस्तिक आणि जे मानत नाहीत ते नास्तिक...सर्वसाधारण जे जन्माला येतात ते अस्तिकच असतात अस मला वाटत. कारण मी सुद्धा अस्तिकच होतो लहानपणी आजी , आजोबा
आई , वडील यांनी अनेक देवाच्या गोष्टी कथा सांगितल्या आणि हेच सगळे खरे आहे असा माझा विश्वास...परंतु जसेजसे वाचन आवडू लागले आणि अनेक पुस्तके वाचली तेव्हा मला या सगळ्या गोष्टींचे कोडे सुटले.
आजच्या दिवसाला मी या सगळ्या भाकड, काल्पनिक कथा मानतो. कारण आज मी एक नास्तिक आहे..मी कोणत्याही धर्माला देवाला मानत नाही मानवता हाच माझा धर्म आणि माणुसकी हाच माझा देव..मला तरी भविष्यात निधर्मी म्हणून मरायचे आहे..
   मी नास्तिक आहे म्हणजेच जगावर आणि या जगातला एक घटक म्हणून माझ्यावर एखाद्या दैवी शक्तीचे नियंत्रण आहे.
ती दैवी शक्ती व्यक्तीच्या आयुष्यात चांगले वाईट बदल घडवू शकते हे मला मान्य नाही. व्यक्ती आयुष्यात घडते किंवा बिघडते ती त्या व्यक्तीला उपलब्ध असलेल्या संधी आणि त्या संधीचा फायदा करून घेण्याची व्यक्तीची क्षमता या दोन घटकांमुळे. व्यक्तीच्या कर्तृत्वामध्ये कोणताही देव आणि दैव या घटकांचा यत्किंचितही संबंध नसतो. मन, मेंदू आणि मनगटावर माझा विश्वास आहे म्हणून मी नास्तिक आहे.
  सध्या धर्माचा मोठा सुळसुळाट तयार झाला आहे हिंदू,  मुस्लिम , इसाई या सगळ्याच धर्मातील लोक माझा धर्मच कसा श्रेष्ठ यांसाठी चढाओढ करताना दिसतात.. होय मी “नास्तिक” आहे... कारण आस्तिकांना मी देव-धर्म-जात-पात या निरर्थक मुद्द्यांवर भांडताना पाहतोय...इतिहास जर पहायचा झाला तर भारत पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांची विभागणी धर्माच्या नावावरच झाली..,,गोध्रा हत्याकांड, शिखांची कत्तल, अजूनही खूप उदाहरणे आहेत की धर्माच्या देवाच्या नावावर आजही अनेक लोकांच्या कत्तली केल्या जातात..आणि जे धर्मग्रंथ आहेत त्यापासूनच सुरवात होते एकमेकांच्या कत्तली करण्यासाठी तुम्ही गीता ,कुराण किंवा बायबल वाचा..सगळे धर्मग्रंथ आणि देव यांनी मनुष्यासाठी काय केले आहे..मनुस्मृती आणि शरियत हे दोन धर्माची पुस्तके वाचा किती भयानक प्रथा आहेत.
माझे स्पष्ट आहे की , माणसानेच देव आणि धर्मग्रंथ यांची निर्मिती केली आहे आपले पोट भरण्यासाठी...अज्ञानामुळे देवाची इतकी भीती घालून दिली आहे लोकांच्या मनात की भीतीनेच आजचा मनुष्य त्याचा गुलाम झाला आहे..33 कोटी देवांचे मला विशेष वाटते मला 33 देवांची तरी नावे सांगू शकाल का कोणी एकाच तरी पूर्ण नाव आहे का ?? अल्लाला देखील कोणीही पहिला नाही. माझ ठाम विश्वास आहे कोणतीही व्यक्ती ही आईच्या गर्भातूनच जन्म घेते.. बाकी देवांचे मला विशेष वाटते कोण आभाळातून आलाय , कोण जमिनीतून , कोण पाण्यातून , कोण नाकातून , हातातून पायातून , आणि अजूनही खूप काही.
   पोथ्या, पुराणे, ग्रह ,कुंडल्या ,
मुहूर्त , चमत्कार,  जात , पात , आणि धर्म यावर माझा काडीमात्र विश्वास नाही . कशाला हवेत ओ हे ..देव आहे तर शेतकरी आत्महत्या करतात , अगदी 2 महिन्याच्या निरागस लहान मुलीवर बलात्कार होतो..कित्येक अपघात होतात देवाला जाताना सुद्धा, आतंकवादी हमले होतात , कित्येक लोक उपाशी दररोज झोपतात, कित्येक लढाया आणि आतंकवाद याच्याच नावाने सुरू आहे, यांच्यासाठी देव का नाही काही करत?? कुठे आहे तो ??
होय, मी नास्तिक आहे कारण मी देवाला नाही तर देवाच्या अस्तित्वाला मानत नाही. पण म्हणुन देव नाही असं मी म्हणत नाही. हो देव अाहे. देव अनाथ लेकरांमध्ये आहे. देव गरीबांमध्ये आहे. देव भुकेल्यामध्ये आहे. देव पिडीतांमध्ये आहे. देव प्राण्यांमध्ये आहे. देव गरजवंतात आहे. देव जळी स्थळी काष्ठी पाषाणी आहे. त्यांची सेवा करणं किंवा त्यांच्या गरजेला उपयोगी पडणे हीच खरी देवाची भक्ती आहे. देवाचं अस्तित्व इतस्ततः पसरलेले असताना आपण मंदिरात का शोधावे त्याला?
आणि सगळ्यात महत्वाचे देव निसर्गामध्ये आहे.. 80 टक्के नोबेल पारितोषिक हे नास्तिक असलेल्या लोकांना मिळालेले आहेत. चार्वाक, गौतम बुद्ध , स्टीफन हौकींग , भगतसिंग असे अनेक नास्तिक महान पुरुष होऊन गेले. तुम्ही विचार तर करा?? की खरच अस असेल का हे होईल का?? तर्क लावायला शिका.. बहुतेक विकसित देश हे नास्तिक आहेत नाहीतर धर्माच्या नावावरील देशांची स्थिती तुम्ही पाहताच आहात. आणि हो देशापेक्षा कोणताही धर्म आणि संविधानपेक्षा कोणताही धर्मग्रंथ मोठा नाही. वास्तव स्वीकारा मित्रांनो वास्तव..आणि मी नक्कीच इथे सांगू इच्छितो की भारताला नास्तिकतेची खुप खूप गरज आहे.

पुरोगामी म्हणजे नेमक काय रं भाऊ ? (भाग-2)

🌱 वि४🌿या व्हॉटसअप ग्रुप वरून
           Source :Internet

पुरोगामी म्हणजे नेमक काय रं भाऊ ?
(भाग-2)

क्षितिज गिरी ,सातारा:
       प्रतिगामी आणि पुरोगामी अशा दोन विचारसरणी आपल्याला समाजामध्ये बघायला मिळतात.प्रतिगामी विचारसरणीच्या  लोकांचा आपल्या संस्कृतीवार धर्मावर रूढी व परंपरेवर खुप विश्वास असतो त्यासाठी ते काहीही करायला तयार असतात अगदी मरायला पण आणि मारायला पण ....

कुठली गोष्ट बरोबर कोणती चूक हे त्याचे अगूदरच ठरलेले असते फक्त ती कशी बरोबर किंवा ती कशी चुक हे पटूऊन देण्यासाठी ते आपली बुद्धी खुप वापरतात त्यामुळे हे  हुशार नसतात आसे आजिबात म्हणता येणार नाही ।

पुरोगामी मात्र कोणतीही गोष्ट पडताळून पाहतात आणि पटली तरच स्वीकारतात।
सामान्य माणूस एखादी गोष्ट चुकीची आहे हे समजले त्याविरुद्द   बंड करत नाही कारण ते करण्याचे धाडस फक्त पुरोगामीच करु शकतात अगदी समाजाच्या विरोधात जाऊन पण हे विरोध करतात आणि आपल्या विचारावर शेवट पर्यंत ठाम असतात त्याच्या मुळे तर समाजाव्यवस्थे  मध्ये अमूळाग्रह बदल होतात आणि आपण म्हणतो जग बदललंय 
    
       मी लहान असताना आमच्या गावात भविष्य सांगणार आला होता त्याने माझे खुप चांगले भविष्य पण सांगितले आणि पुढे तुझ्या वाईटावर आहे आणि त्याला बाजूला केलेस कि झाले म्हणून माझ्याकडून खुप पैसे उकलले होते घरी कुणीच नसल्यामुळे त्याला पण आयती संधि मी मात्र आता माझी खुप प्रगती होणार या विचारत खुप खुश होतो। 
आता मात्र जेव्हा असे कुणी मला माझे भविष्य सांगते किंवा गावात पोतराज येतो  तेव्हा मनात एकच विचार येतो केव्हा सुधारणार या जाती कधी होणार यांचाही विकास यासाठीच झाला होता का भारत  स्वतंत्र्यं।हा बदल फक्त पुरोगामी
विचारसरणीत वावरत असल्यामुळेच झाला।
पुरोगामी नेहमी स्वताचा विचार कमी आणि समाजचा विचार जास्त करतो
पुरोगामी हि एक मानसिकता किंवा विचार करण्याची पद्दत आहे खुप  अभ्यास केला शिकला डिग्री मिळवली म्हणजे तो पुरोगामी झाला असे आजिबात नाही आडाणी  माणसेही पुरोगामी असतात । संत गाडगेबाबांचेच उदाहरण घ्याना ।

प्रतिगामी नेहमी धर्म जात पंथ लिंग भाषा प्रांत यावर भर देतात तर पुरोगामी कायम गरिबी बेरोजगारी महागाई तसेच माणसाला रोज भेडसावणाऱ्या समस्या वर भर देतात ।
लोकमान्य टिळक प्रतिगामी विचारांचे होते तर नरेंद्र दाभोलकर पुरोगामी विचारांचे होते।
पुरोगामीचे विचार सामान्य लोक समजून घेऊ शकत नाहीत कारण ते काळाच्या खुप पुढे निघून गेले असतात महात्मा फुलेंच्या काळात झालेला स्त्री शिक्षणाचा विरोध आणि आजच्या काळात झालेला शनी मंदिरातील स्त्रियांच्या प्रवेशासाठी विरोध हे सारखेच आहेत।
            Source :Internet
जयंत जाधव ,लातूर:
        A progressive change happens gradually over a period of time.कालांतराने एक प्रगतीशील बदल हळूहळू होतो.मानवाचा सर्वात मोठा शिक्षक म्हणजे निसर्ग.निसर्गाच्या नियमाप्रमाणे कोणत्याही विचाराला कधीच पूर्णपणे समर्थन  करता येत नाही.तो विचार काही काळा त्या व्यवस्थेचा भाग राहू शकेल.परिवर्तन हा जगाचा नियम आहे.व्यवस्था मधील दोन्ही बाजूवर सातत्याने काम करणारे घटक,बदल घडवणारे कधीच एकमेकांचे वैरी नसतात . ते बदल सूचवतात,परिणाम देतात आणि ते कोणत्याही प्रवाहाचे असू द्या व्यवस्थेचा कायमचा भाग होतात.याऊलट सामाजिक परिवर्तनाच्या स्तरावर मात्र हे घडत नाही.परिवर्तनातून समाजपरिवर्तन व त्यातूनच चालू व्यवस्थेत बदल घडून आणने अपेक्षीत असते फक्त ते परिवर्तन वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारलेले ,काळाच्या गरजेनुसार सुसंगत हवे. In the system, with retrograde thoughts, work is going on with a combination of sensualism, partiality, and it is going on for a long time. Sometimes the dimensions of progressive on a black screen, sometimes even when it may appear blurred, will not be the same arrangement .


अक्षय पतंगे ,हिंगोली:
       पुरोगामी म्हणजे बोलाचीचं कढी नाही तर अंधश्रद्धेची जोखडं झुगारून देत, जुनाट वाईट प्रथा परंपरांना फेकुन देत, आधुनिकतेच्या भट्टीतुन बाहेर निघालेले बावन्नकशी सोन्याचे देशाच्या प्रगतीचे अन् समाजाच्या उन्नतीचे विचार म्हणजे पुरोगामी. काही जण भंपक प्रसिद्धीसाठी पुरोगामीत्वाचा आव आणून नौटंकी करतात.  स्वतः चे अस्तित्व शाबुत ठेवण्यासाठी वारंवार महामानवांना आठवतात. यामुळं पुरोगामीत्व नावाचं लेबल लागत नसतं, त्यासाठी कधी गाडगेबांबाच्या हातातील झाडु, राष्ट्रसंताची खंजिरी, साने गुरूजींची लेखणी, कबीरांची वाणी अन् जोतीबांनी सांगीतलेला आसुड व्हावं लागतं, बाबासाहेबांसारखं लोकशिक्षक, तुकारामांसारखं विद्रोही ,अन् बुद्धांसारखं प्रेमळ झाल्यास आपण अभंग होऊ, ते असेल पुरोगामीत्व.

      Source :Internet

अनिल गोडबोले,सोलापूर:
       दोन शिष्य एकदा रस्त्याने चालले होते. त्यांना वाटेत एक नदी लागली. नदी तशी फार खोल नव्हती पण माहितगार व्यक्ती शिवाय दुसर्या कोणालाही पार करणे अवघड असे. त्या दोन्ही शिष्यांना नदी पार करताना एक सुंदर स्त्री भेटली. त्यांना तिने विनंती केली कि मला नदी पार करावयाची आहे आणि त्यासाठी आपण मला मदत करू शकाल का?... त्यावेळी त्या दोघांपैकी एक शिष्य जो काही वर्षांनी दुसर्या पेक्षा मोठा होता त्याने क्षणाचाही विलंब न लावता त्या स्त्री चा हात धरला आणि तिला पाण्यात घेऊन गेला. ज्याठिकाणी ती स्त्री चालू शकत नव्हती तिथे त्याने तिला उचलून घेतले आणि आणि त्या तिघांनी नदी पार केली. पलीकडच्या काठावर तिला त्या शिष्याने खाली सोडले तिला नमस्कार केला आणि ते पुढे चालू लागले.
थोड्यावेळाने जो दुसरा शिष्य होता तो खूप विचारात दिसत होता त्याने या मोठ्या गुरुबंधूला विचारले कि, आपण असे कसे काय करू शकला आपण तर ब्रम्हचारी आहोत शिष्य आहोत एका परस्त्रीला खांद्यावरून उचलून घेताना तुम्हाला काहीच वाटल नाही त्यावर तो मोठा शिष्य हसून दुसर्या शिष्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला ... ‘ अरे मी तर तिला केव्हाच खांद्यावरून उतरवली तू अजून तिला उतरवली नाहीस’.... या कथेचा बोध एवढाच कि आपण आपल्या आयुष्यात एखाद्या गोष्टीकडे कुठल्या नजरेतून बघतो त्या नुसार आपल्याला जग दिसत असत...
असो तर ... या कथेचा आणि या विषयच संबध देखील असाच आहे... कितीतरी गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहित आहेत चुकीच्या आहेत किवा आपल्याला त्रास  होतो आहे किवा या अशा गोष्टी मुले समाजातील काही वर्गाच शोषण होत आहे व तरी देखील आम्ही ते जोखड मनावर बाळगून चाललो आहोत... अशी मानवारची जोखड समूळ उखडून फेकून देण्याचा विचार म्हणजे पुरोगामी विचार... इंग्लिश मध्ये त्याला progressive विचार म्हणतात.. अशा विचारातून ज्या भावना जन्माला येतात व त्या भावनांना धरून ज्या व्यक्तीचे वर्तन असते त्या व्यक्तींना पुरोगामी म्हणतात.
देव मानवा कि न मानवा हा वेगळा विषय आहे खर तर पण देव या विषयाला धरून किवा अमुक एक केल्याने माझे कल्याण होईल किवा नुकसान होईल अशा खुळचट कल्पनांना धरून काहीतरी खोट्या किवा छद्म विज्ञानाचा आधार घेऊन किवा पुराणात एवढ प्रगत तंत्र्द्णन होत यावर वाद घालणाऱ्या व्यक्तींना पुरोगामी कसे म्हणावे? हाच मोठा प्रश्न आहे. ज्या गोष्टी काळाच्या कसोटीवर व विद्ण्यावर मान्य ठरतात त्या गोष्टीना मानणे म्हणजे पुरोगामित्व!. पण असे होताना दिसत नाही. पुरोगामित्वाच्या गप्पा मारताना आम्ही काही तेवढे देवभोळे नाहीत .... पण विषाची परीक्षा कशासाठी घ्यायची... असा युक्तिवाद करणारे अनेकजण भेटतात. तेव्हा मला खर्च प्रश्न पडतो कि आम्हाला पुरोगामित्व कळाल आहे का?
महर्षी कर्वे यांच्यापासून जर विचार केला तर आधुनिक काळात खूप अशा सुधारणावादी व्यक्ती महारष्ट्रात होत्या आणि आहेत पण प्रखर विचार ठाम वर्तन आणि बुद्धीप्रामाण्य वादी जीवनशैली फार थोड्या व्यक्तीकडे असते आणि तेच खरे पुरोगामी ...
पुराना मध्ये चार्वाकांचा सिद्धांत सर्वाना माहित आहेच... तेव्हा पासून कालानुरूप प्रत्येकाने आपल्या आपल्या भूमिका मांडलेल्या आहेत. ज्ञानेश्वरांनी पसायदान कोणाकडे मागितल ... विश्वात्मके देवे... म्हणजे १२व्य शतकात हा विचार करणे हे पुरोगामित्वाच लक्षण निश्चित आहे.संत मंदिलिनी जे विचार मांडले ते सगळे पुरोगामी आहेत... पण त्यांना मानणारा वर्ग त्यांना फक्त follow करतोय .. तो कुठे डोळस झालाय?.. जेव्हा हे प्रत्येकजण आपल्या आपल्या ज्ञानाच्या कसोटीवर घासून विचा करायला लागतील तेव्हा ळूप मोठा बदल होईल.
दुर्दैवाने महावीर, बुद्ध, ज्ञानेश्वर, एकनाथ महाराज, तुकोबा पासून  सोक्रेतीस, मार्टिन ल्युथर किंग, गांधीजी, बाबासाहेब आंबेडकर व अगदी आताच्या दाभोळकर यांच्या पर्यंत पुरोगामित्वाची एक लाट आपल्याकडे आहे.. काही लोक आपल्या स्वार्थासाठी पुरोगामित्वाचा तिटकारा करतात किवा स्वर्थापुर्त पुरोगामी झाल्यासारखं दाखवतात. ज्या राज्यात शाळेत मुली शिक्षण शिकवणारा शिक्षक सकाळी विअद्न्यनिक दृष्टीकोन शिकवतो आणि रात्री सूर्यग्रहणाचे वेध पाळतो.. तिथे तो मुलावर काय पुरोगामित्व शिकवणार... !! आणि फक्त या मुले पुरोगामित्व मागे पडत नाही तर खोट कस वागायचं याचा उत्तम धडा आपण पुढच्या पिढीला देत असतो..
शेवटी एवढच सांगतो.. आपण सगळे classically conditioned आहोत (पाव्ह्लोव चा कुत्र्याव्रचा प्रयोग) म्हणजे कशाला उगाचच आपण त्या विचारात पडायचं... आपल्याला काही त्रास होतोय का ... नसेल... तेवढ करायाल काय जात आहे आपल.... आणि आपण फक्त मोद्र्ण कपडे आणि खान सोडून बाकी काही करत नाही. असच जर हे सुधारणावादी करत राहिले असते तर ?????.....
उठ जागे व्हा आणि आपल्या विचारावर आणि बुद्धी प्रमाण्यावर विश्वास ठेऊन वागा.... म्हणजे पुरोगामित्व सहज येईल

ज्ञानेश्वर टिंगरे , उस्मानाबाद:
         समाजाच्या बदलत्या प्रवाहात नेमकेपणाने पुरोगामी ची व्याख्या करणं तसं जरा अवघडच वाटतं, कारण समाजपटलावर घडणाऱ्या ठळक घडामोडी, व्यक्तींना येणारे अनुभव मग ते प्रशासनातील असोत कि दैनंदिन व्यवहारातील याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम त्याच्या मनावर या विविध संकल्पनांना आकार देतो.
बुरसटलेल्या विचारांचे जोखड फेकुन देऊन बदलत जाणारा काळ व समाज यांना अनुकूल अशा नव्या विचारांना अग्रक्रम देणे अन त्याच बरोबर समाज एकसंघ ठेवण्यास कारणीभूत असणाऱ्या व पूर्वापार चालत आलेल्या विचारांना तितक्याच सजग, उदार मनाने जतन करून ते पुढे हस्तांतरित करणे म्हणजे पुरोगामी असं मला वाटतं.
आणखीन नव्याने बोलायचं झालं तर प्रतिगामी विचारांच्या मंथनातून निघालेले सार व आजच्या परिस्थितीला संतुलित राहण्यास आवश्यक अशा विचारांची सरमिसळ करून एक नवा विचार किंवा प्रवाह समाजात प्रस्थापित करने म्हणजे पुरोगामी…
              Source :Internet
गणेश भंडारी ,अहमदनगर:
    आपण अनेकदा जाता-येता 'पुरोगामी' हा शब्द ऐकतो, वाचतो. अमुक एक व्यक्ती पुरोगामी विचारांची आहे, सरकारची धोरणे पुरोगामी आहेत, महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, तो नेता पुरोगामी चळवळीशी संबंधित आहे; ही आणि अशी असंख्य विधाने आपल्या कानावर पडत असतात. हे 'पुरोगामी' म्हणजे नेमके काय प्रकरण आहे, पुरोगामी असणे म्हणजे काय याचा विचार आपण करूयात.

'पुरोगामी' या शब्दाचा शब्दकोशीय अर्थ 'प्रगतिशील, अग्रगामी, पुढे जाणारा' असा आढळतो. म्हणजे जो सतत पुढे जातो, प्रगती करतो तो पुरोगामी असे आपण ढोबळमानाने म्हणू शकतो. पण अजून बारीक विचार करायचा झाल्यास नेमके कोणत्या क्षेत्रात, कोणत्या बाबतीत पुढे जाणे, प्रगती करणे म्हणजे पुरोगामी? उद्या मी म्हटले की मी लोकांना फसवण्यात खूप पुढे गेलो आहे, त्यासाठी नवीन तंत्रज्ञान मी विकसित केले आहे. या क्षेत्रात मी अफाट प्रगती केली आहे, म्हणून मला पुरोगामी म्हणा! हे चालेल का? नाही ना? याचा अर्थ अशी काहीतरी ठराविक क्षेत्रे, ठराविक बाबी असल्या पाहिजेत, ज्यात पुढे गेलात, प्रगती केलीत तरच तुम्ही पुरोगामी या संज्ञेस पात्र व्हाल. मग कोणती आहेत ही क्षेत्रे?

आपण मिळवलेल्या ज्ञानामुळे, साधलेल्या प्रगतीमुळे, मांडलेल्या विचारांमुळे समाज पूर्वी होता त्यापेक्षा अधिक सुखी होत असेल, अधिक स्वातंत्र्य, शांतता व मुक्ततेचा अनुभव घेत असेल, समाजातील विविध भेद व त्यामुळे समाजाला होणारा मनःस्ताप यांचे प्रमाण कमी होत असेल, समाज अधिक तार्किक विचार करायला शिकला असेल तर अशा प्रगतीला, पुढे जाण्याला पुरोगामी निश्चितच म्हणता येईल. या अर्थाने समाजातील अनिष्ट रूढी-परंपरा यांविरुद्ध बोलणारे, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी झटणारे, समाजात समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणारे; थोडक्यात माणसाला माणूस म्हणून जगता यावे यासाठी प्रयत्न करणारे सर्वच पुरोगामी म्हणता येतील.

समाजाने केवळ भौतिक व आर्थिक प्रगती करून चालत नाही. त्यामुळे समाज सुखी होईलच याची खात्री देता येत नाही. भौतिक व आर्थिक प्रगती आवश्यक आहेच, यात वाद नाही; पण केवळ तितकेच पुरेसे नाही. त्याच्या जोडीला समाजाची मानसिकता बदलणे, तिला कालानुरूप आधुनिक वळण लावणेही तितकेच महत्वाचे व आवश्यक आहे. लोकांची मानसिकता व सवयी बदलणे, त्यांना कालसुसंगत व तार्किक रूप देणे हेच पुरोगामी चळवळींचे ध्येय असते.
                 Source :Internet
समाजातील मध्ययुगीन प्रवृत्ती, रूढी- मग त्या सामाजिक असतील वा राजकीय- यांचे निर्मूलन करून त्याजागी आधुनिक प्रथा व पद्धती प्रस्थापित करणे यासाठी पुरोगामी कार्यकर्ते सतत झटत असतात. त्यांचा हा संघर्ष दुहेरी असतो. एका बाजूला त्यांना समाजाला आपल्या बरोबर घेऊन चालायचे असते, समाजाला त्यांचे हित-अहित याबाबत सचेत करायचे असते, लोकांचे प्रबोधन करायचे असते; तर दुसऱ्या बाजूला प्रतिगामी शक्तींचा, त्यांच्याकडून होणाऱ्या हल्ल्यांचा मुकाबला करायचा असतो, या हल्ल्यांपुढे टिकून राहून पुढे जायचे असते. समाजात जागृती करणे, लोकांना आपल्या बाजूने वळवणे, त्यांचे मतपरिवर्तन करून त्यांना आपले विचार अंगिकरायला भाग पाडणे हे एक कौशल्यच असते. लोकांना त्यांच्या भाषेत, त्यांच्या पातळीवर जाऊन आपला मुद्दा पटवून देणे, सतत पाठपुरावा करणे, त्यासाठी प्रात्यक्षिके दाखवणे, लोक ज्या पद्धतीने घटनांकडे पाहतात, ज्या प्रकारे विचार करतात, त्या पद्धतीने आपण विचार करायला शिकून त्यातून योग्य तो मार्ग शोधणे याप्रकारे लोकांचे प्रबोधन करावे लागते.

जुन्या रूढी-परंपरा, कालबाह्य विचार यांमध्ये ज्या घटकांचे हितसंबंध गुंतलेले असतात ते घटक या गोष्टी सहजासहजी कशा नष्ट होऊ देतील? लोक अंधश्रध्दांतून मुक्त झाले, तार्किक विचार करू लागले, आपापसांतील भेद विसरून एकोप्याने नांदू लागले तर त्यांचे हितसंबंध धोक्यात येतील, त्यांची दुकानदारी व पर्यायाने त्यांचे अस्तित्वच धोक्यात येईल. त्यामुळे असे घटक हरप्रकारे पुरोगामी चळवळीला व पुरोगामी विचारांचा लोकांना बदनाम करण्याचा, त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्याचा, त्यांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न करतात. इतके करूनही जर पुरोगामी लोकांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत तर असे प्रतिगामी लोक त्यांचे अस्तित्वच नष्ट करण्याचा मागे लागतात. त्यासाठी वाटेल त्या मार्गाचा आधार घ्यायला ते मागेपुढे पाहत नाहीत. आजकाल आपण सहज सामाजिक माध्यमे, जसे फेसबुक, व्हाट्सअप यांवर चकजार मारली तर पुरोगामी लोकांची, त्यांच्या विचारांची हेटाळणी कशा प्रकारे केली जाते हे आपल्या लक्षात येईल. या प्रतिगामी शक्तींच्या कृपेने आज या माध्यमांवर 'पुरोगामी' ही एकप्रकारे शिवीच झाली आहे. पुरोगाम्यांचा उल्लेख फुरोगामी, पुरोघाणी, पू रोगा मी अशा विकृत पद्धतीने करणे हेतर सर्रास दिसून येते. याच्या जोडीला पुरोगामी व्यक्ती व संस्थांचे जमेल तेवढे चारित्र्यहनन करणे, त्यांच्यावर खोटेनाटे आरोप करणे, त्यांच्या नावाने कपोलकल्पित गोष्टी पसरवून समाजाचे त्यांच्याविषयीचे मत कलुषित करणे हेही दिसून येते. या प्रयत्नांचा आणखी एक भयानक प्रकार अलीकडे दिसून येत आहे. प्रतिगामी लोक पुरोगामी चालवळींत, संस्थांत शिरकाव करतात, त्यांना पद्धतशीरपणे हायजॅक केले जाते. आपली विचारसरणी त्यांच्याद्वारे लोकांवर लादली जाते.

आपल्या महाराष्ट्र राज्याची ओळख एक पुरोगामी राज्य अशी आहे. आता 'आहे' म्हणण्यापेक्षा 'होती' असे मानणे अधिक सयुक्तिक ठरेल. कारण अलीकडे घडणाऱ्या घटना पाहता महाराष्ट्राने आपली पुरोगामी ओळख गमावली आहे असे वाटते. किंबहुना महाराष्ट्राला पुरोगामी म्हणणे हा एक विनोद झाला आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. तसे पाहिले तर महाराष्ट्राला पुरोगामी चळवळीचा, पुरोगामी विचारांचा मोठा वारसा मिळाला आहे. अगदी संत ज्ञानेश्वर-तुकारामांपासून तर शिवरायांपर्यंत आणि फुले-शाहू-आंबेडकरांपासून तर अगदी अलीकडच्या दाभोलकर-पानसरेंपर्यंत अनेकांनी या पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्वपूर्ण योगदान दिले आहे. आपल्या विचारांनी, काळाच्या पुढे असणाऱ्या दृष्टीने ही परंपरा विकसित केली आहे. खरे तर या सर्वांचे आपल्या राज्यावर अनंत उपकार आहेत. आपण या उपकारांची परतफेड मात्र त्यांना गोळ्या घालून, त्यांची बदनामी करून करत आहोत ही किती शरमेची बाब आहे! अलीकडे वाढत असलेला जातीय हिंसाचार, अंधश्रद्धांनी नवीन नवीन रूपांत वर काढलेले डोके, जाती-धर्माच्या भक्कम होत जाणाऱ्या भिंती, विरोधी मत ऐकून घेण्याची आपण गमावत असलेली क्षमता यांमुळे आपण आपला हा वारसा मातीमोल तर करणार नाही ना अशी भीती दाटून येते आहे. हा वारसा जपणे, त्याचा आणखी विकास व प्रसार करणे हे आपल्याच हातात आहे. सध्या आपल्यासाठी ही करो या मरोची स्थिती आहे. पुरोगामी विचार जपण्यास आटा आपण अपयशी ठरले तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला कदापि माफ करणार नाहीत हे मात्र नक्की.

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************