गाणी आणि मूड

Related image
जयंत शिगवण (मृद्गंध) ,मुंबई.

अजूनही चांदरात आहे
        संध्याकाळ सरली. न जाणो कित्येक तास उलटले असतिल तो आजूबाजूला आजिबात न पाहता आयमॅक मध्ये डोके खुपसून बसला होता फक्त, समोरचा चहाचा गारढोण झालेला पण तरीही काठोकाठ भरलेला मग त्याच्याकडं एव्हाना तिरसट कटाक्षानं पाहत असावा बहुतेक. 

एरवी शोधूनही चहा न मिळणार्‍या जागी थट्टेनं हा होईना ' चहा घेणार का कोणी?' असं विचारलं तर आवर्जून 'एक कटिंग इकडं पण' म्हणणारा हा, आज सकाळपासून जरासा शांतंच होता. आवरत आलेल्या भयपटाच्या टीझरमध्ये एडिटिंग सिक्वेन्सला पोस्ट क्रेडिट मागं काहीतरी धुन लावायला हवी या विचारात त्यानं गूगल ला हात घातला आणि योग्य त्या साऊंड ट्रॅक साइट वर जाऊन टेस्ट ट्रॅक वर क्लिक करणार इतक्यात अचानक कानांवर लावलेल्या हेडफोन्स मधुन ती तान झंकारली. गूगल अॅडवर्ड ची सुरेल जाहिरात असावी ती, त्यातले शब्द अचानक मधूनच सुरू झाले आणि काळजाचा ठोका चुकला मात्र त्याच्या. *' पुन्हा पुन्हा भास होत आहे, तुझे हसू आरश्यात आहे. '* 

बस्स...... त्यावेळेस डोळे घट्ट मिटून घेतले यानं पण मिटल्या पापण्यांच्या पटलामागं याच्या गतआयुष्याची गीत मैफिल सजायला तितकासा वेळ लागला नाही. एकेक प्रसंग डोळ्यासमोर रुंजी धरू लागला, त्या शब्दांची खोली पुन्हा जाणवू लागली. एकेका ओळीअखेर श्वास गडद आणखी गडद होऊ लागला त्याचा भावना अश्याच असतात वेड्या, त्यांना सावरणं म्हणजे काय माहित नसावं पण निव्वळ उसळता मात्र येतं बहुतेक. 

विचाराविचारांच्या नादात तिचा चेहरा नकळत डोळ्यांसमोर आला आज पुन्हा त्या ओळी ऐकुन. नाजूक भुवया, मधोमध खुलून दिसेल अशी लहानशी चंद्रकोर, तिच्याच खाली कपाळावर टिकलीवजा गोंदण, त्या चंद्रकलेच्या पूर्णत्वाला मोठेपणी न्याय द्यावा म्हणून लहानपणीच गोंदून घेतलेलं असावं बहुतेक. ओठांवर तेच हास्य, तोच भाव, तीच लाघवी मुद्रा! 

डोळ्यात राग आहे तिच्या पण तरीही याच्याकडं पाहून फक्त यालाच ऐकु येईल अश्या आवाजात का कोण जाणे नाजूकपणे ती त्याला अजूनही जणू सांगतेय, *' सख्या तुला भेटतील माझे, तुझ्या घरी सूर ओळखीचे.'*

होय! त्याला आज पुन्हा त्या स्वरांनी तिची ओळख करून दिली होती. संपूर्ण कोलमडली होती ती, तेव्हा तिच्या आयुष्यात आला हा, त्यानंतर कसा, किती आणि केवढा वेळ गेला काहीच कल्पना नाहिये. सगळं व्यवस्थित सुरू होतं पण अचानक एक दिवस आयुष्यभर साथ द्यायचं वचन देणारा हा एका अमोघ वळणावर तिला तिच्या नशिबावर सोडून खूप पुढं निघून आला होता आता. यानं निर्वाणीचा निर्णय काय म्हणून विचारल्यावर ' माझ्यात गुंतू नका ' एवढेच काय ती म्हणाली त्याला त्यादिवशी आणि यानं आजिबात विलंब न करता लगेच गुंता सोडवला सुद्धा नात्यांचा! तिच्या स्वरांचा पारिजात जरी त्याच्या अंगणी डौलानं उभा असला तरी त्यातलं प्रत्येक फूल आज याच्याकडं अपराधी म्हणून कसं पाहत असतं हे त्यालाही चांगलंच माहित झालंय आता सरावानं. 

चूक कोणाची हा सवाल इथं ग्राह्य न्हवता, त्याला ठाऊक होती तिची तळमळ, तिलाही दिसत होता त्याचा संघर्ष त्याची अगतिकता पण करणार काय दोघंही! नुसत्या फोन वर सुरळीत चाललेल्या नात्याला एका ठराविक चौकटीमध्ये नाव देऊन बांधायला हा एका पायावर तयार होता पण तिच्या मनाची तयारी शेवटपर्यंत झालीच नाही कधी! वाट पाहिली यानं तिच्या सोबतीची पण नाही झाली सफल त्याची तेवढी एक आकांक्षा. त्याला मान्य नसताना त्यानं का तिचा एवढा विचार करून स्वतःच्या मनाला आवर घातला ते कोडं त्याचं त्यालाही अजून सुटलेलं नाहिये. तिनं रस्ते बदलायचा शब्द टाकला असला तरी पाऊल मात्र यानंच उचलेलं पहिलं म्हणून हा अजूनही या सगळ्या प्रकाराचं ओझं त्याच्या पाठीवर मानानं वागवतोय एकटाच.

काही धुन, शब्द आणि गाणी आधी कानांवर आणि मग मनांवर असा काही परिणाम घडवून आणतात की माणसानं त्याचं स्वत्व विसरावं आणि एका अश्या दुनियेत प्रवेश करावा जिथं त्याला ओळखणारे सगळे असतिल पण त्याच्या हाकेला साथ देणारं कोणी नसावं. गाणी माणसाला जगायला भाग पाडतात ऐकलं होत त्यानं पण ती फक्त निव्वळ जगण्याचं बळ कधीचं देत नसतात. किंबहुना ती आरसा म्हणून एक भूमिका पार पाडत असतात आणि आपण त्या आरशात डोकावलो तरंच किती पाण्यात आणि किती जमिनीवर आहोत याचा अंदाज लावता येतो. माणसाचा मूड तयार करण्यात गाण्याचा जेवढा हात आहे अगदी तेवढाच हात रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून अचानक मूड उडवून डोळ्यांत नकळत पाणी दाटून आणण्यात पण आहे. 

गुंतू नका म्हणून अलगद बाजूला सरणारी ती आजही त्याला अशी अनामिक भेट देऊन जाते ती या शब्दांनीच. तिच्या मनाला जपण्यासाठी स्वतःच्या भावी आयुष्यातल्या स्वप्नाची राखरांगोळी करणार्‍या याला हे शब्द शांत बसू देत नाहीत. उगीच  स्वप्नांत चांदण्यांची आर्जवं करणार्‍या याला आज त्यांची अॅनिव्हर्सरी की काय म्हणतात अगदी त्याच दिवशी या गाण्याच्या बोलांसोबत मन हेच विचारत होतं, *' खरंच दिलंस का प्रेम तू कधी कुणाला जे तुझ्याच अंतरात आहे? '* त्यावेळी त्याला शेवट नक्कीच वेगळा करता आला असता पण वेळ त्याच्या सोबत न्हवती म्हणूनंच की काय त्या वेळेपुरता कोसळलेल्या पण राखेतून फिनिक्स सारखी भरारी मारून पुन्हा उभ्या राहिलेल्या याला स्वतःच्याच धुंदीत चालताना, भोवतालच्या पाखरांचा कलकलाट थांबल्यावर सुरेश भटांच्या साक्षीनं  मनातला आवाज आजही हेच सांगत असतो, जर ती स्वतःहून पुन्हा श्रावण सर बनून बरसली तर तू सुद्धा मृद्गंध होऊन तिला कवेत घे..., *अजूनही चांदरात आहे...!*

____________________________

Image result for music and mood
किरण पवार,औरंगाबाद,

              इ. 11-12वीत असतानापासून गाणी ऐकायची खास सवय जडली. म्हणजे माझा भाऊ आणि मी आम्ही एकरावीत असतानापासून रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणित यांसारख्या विषयांचा अभ्यासच गाणे ऐकत केला आहे. पेपर लिहताना गाण्यावरून आम्हाला बऱ्याचदा उत्तर आठवायचं. याची तशी मदत फार झाली दोघांनाही. पण हे सोडता नंतर काही गाणी ह्रदयात खोलवर रूजत गेली. मला रात्र नेहमी एका वेगळ्याच प्रकारे अस्वस्थ करते. आणि त्यात मी रात्री गाणी ऐकतो ती एकदम शांत प्रकारची खास करून ए. आर. रेहमान, हरिहरन, साऊथ इंडियन काही खास ज्यांचा अर्थ अजूनही कळत नाही. मला मुळात तीच माझी ठरलेली गाणी ऐन रात्रीच ऐकाविशी वाटतात. कारण रात्रीत मी स्वत:शी एकरूप असतो. मला माझ्यातला अंतरंग त्यावेळी साद घालत असतो.
              मी बऱ्याचवेळा पूर्णपणे भावनाशून्य होऊण जगतो. म्हणजे माझ्यासोबत असं बऱ्याचदा होतं की, मी गाण्यांनादेखील रिएक्ट होतं नाही मग आजूबाजूच्या स्थितीचं तर बाजूलाच राहिलं. माझ्यात कधीकधी पूर्णत: भावनाशून्य राहण्याची खास कला कदाचीत मी एकरावी-बारावीत ऐकत असलेल्या रेडीओवरील जुन्या गाण्यांच्या खास लिरिक्स व म्युझिकमुळे आली असावी. बाकी गाण्यांमुळे पावसाळ्यात मूड फ्रेश राहतो. आणि परिक्षेच्या काळात गाणी फार महत्वाची ठरतात; हा आजवरचा वैयक्तिक अनुभव आहे. धन्यवाद!

____________________________

Image result for music and mood
मयूर, अमरावती.

लिहण्याचा प्रयत्न करतो आणि आज पुन्हा एकदा लिहितोय.
आणि आज प्रयत्न करतो अस्सल वऱ्हाडी भाषेचा.
म्या तर आजपर्यंत कोणासाठी गाणं ऐकलं नाही रे बा.
पण आज मी गाणं ऐकतो कारण आपलं कोणीच नाही राहिला रे बा.
गाणे ऐकण्यासाठी किंवा ऐकवण्यासाठी कोणीच नाही रे बा.
ज्याच्या नावाचे आणि ज्याचा साठी गाणे ऐकतो रे बा.
तो तर आज हेडफोन लावून गाणे ऐकतो रे बा.(दुसऱ्याच्या नावाचे)
अन तुम्हाला सांगायचं म्हटलं म्हणजे मी जे काही गाणे ऐकतो ते कोणाच्या गम मध्ये नाही रे बा.
फक्त यासाठी ऐकतो की जिंदगी कटाव. आणि आपण आपलं खुश रहावे आणि तिने तिची खुश रहावे यासाठीच गाणे ऐकतो. आणि तुम्हाला एक सांगतो जर मूळ असला ना तर लोकांच्या वरातीत पण नाचलो आहे. आणि मूळ जर माझा नसला ना तर गाणे वाजणारा मोबाईल पण फेकून दिलेला आहे.
आणि तुम्हाला एक सांगू का गाणे कोणासाठीच नसतात अन गाणे कुणासाठीच ऐकायचे नसतात.
अन गाणे ऐकायचं असले तर स्वतःचे मूळ फ्रेश करण्यासाठी ऐकायचे असतात पण तुम्हाला सांगू काय मी तर तेच करतो रे बा.
मागच्या वेळेस मी काहीतरी लिहिले असताना कोणतरी म्हटलं होतं दिलजले आहे पण मी दिलजले नाही आम्ही करपलेले आहो.
म्या तर आज पर्यंत गाणे ऐकायला मजा जर घेतला असेल तो हाय फक्त गाडीवरून लांबचा प्रवास करत असताना हेडफोन घालून तर ते कशासाठी तो प्रवास लांबचा होऊ नये म्हणून फक्त.
आणि कधी कधी तर मौसम जर चांगला असला ना तरच गाणे ऐकले आहे आणि कधी कधी तर थंडी हवा कानाच्या माध्यमातून डोक्यात जाऊ नये म्हणूनही हेडफोन घातलेले आहेत .
अन् आता तुमच्या  सगळे ले एक शेवटचं सांगतो
गाणे ऐकायचे असली तर मूळ बनव लागते .
अन मूळ बनला तर गाणे ऐकावे लागते .
तर म्हणतात मेंटली डिस्टर्ब असेल तर गाणे ऐकावे म्हणतात (पण आमच्याकडे त्याच्यापेक्षाही रामबाण उपाय आहेत)
म्हणून त्या विषयाला सोडून आपन काही बोलू शकत नाही. पण एक सांगू का हेडफोन घालून गाडीवर प्रवास करणे यात अर्धी जिंदगी गेली आता मला असं वाटते  अर्धी जिंदगी राहिलेली बायको लेकरा सोबत तरी घालवाव(लग्न व्हायचं आहे बरं अजून)
आन गाणे आणि मूळ , आणि मूड आणि गाणे हे दोघे आहेत ना समदुखी माणस आहेत.
आणि समदुःखी माणस आहेत ना ते लय डेंजर असतात बरं.
अंजर मूळ असला ना तर मूळ नुसार गाण्याचा वापर करायचा
अन जर गाणं असलं ना तो मूळ नुसार त्याचा वापर करायचा.
आन म्या जे आज लिहिलं ते गाणं ऐकून नाही तर मया आजच्या मुड नुसार लिहील.
आवडलं असेल तर सांगा नाही तर आहेच आपले हेडफोन.

____________________________
Image result for music and mood
प्राची सुलक्षणा अनिल, मुंबई. 

सगळ्यात आधी ऍडमिनने हा विषय निवडल्याबाबत त्यांचे मनापासून धन्यवाद.. कारण गाणी आणि मूड यांचा अगदीच घनिष्ठ संबंध आहे आणि या विषयावर बोलण्यासारखं खूप काही आहे.. कुठल्याही गोष्टीवर व्यक्त होताना बऱ्याचदा माझ्यासारखी रोमँटिक मुलगी गाण्याचा आधार घेते.. का न घ्यावा.. ज्या भावना आपल्याला शब्दात मांडता येत नाहीत त्या किमान गाण्यातून तर व्यक्त व्हायलाच हव्यात ना.. माझ्या लहानपणी दूरदर्शनवर रंगोली कार्यक्रमात शाहरुख खानचं एक गाणं लागायचं, 'चांद तारे तोड लाऊ, सारी दुनिया पर मैं छाऊ, बस इतना सा ख्वाब हैं..' हे गाणं ऐकताना कसलीशी भारी फिलिंग यायची कि मलापण शाहरुख सारखी सगळी दुनिया जिंकायचीये.. त्याच्या त्या 'तू हैं मेरी किरन' गाणं ऐकताना तर आपणही कुणावरतरी एवढं प्रेम करावं असं वाटायचं आणि त्या फँटसीमध्ये मी रमून जायची.. शाळेत असताना पण ६ वी मध्ये एक कविता होती वि दा सावरकरांची आणि ती आम्ही चाल लावून म्हणायचो.. रक्तात भिनलं होतं ते गाणं माझ्या आणि त्याच गाण्यामुळे नंतर मी सावरकरांचं 'काळे पाणी' आणि 'माझी जन्मठेप' हि पुस्तकं वाचली होती आणि मी सावरकरांची फॅन झाले.. मग ८वीत असताना लता दीदींचं 'ऐ मेरे वतन के लोगों' हे गाणं समजलं (समजलं यासाठी कि याआधीही खूपदा ते ऐकलं होतं पण खऱ्या अर्थाने ते यावेळी समजलं) आणि हादरून गेले होते.. मग त्या गाण्यापासून इन्स्पायर होऊन बॉर्डर मुव्ही बघितली.. दोन दिवस त्याच जगात वावरत होते मी.. मला समजतच नव्हतं कि कुठून येतात ही एवढी शूर माणसं.. त्याचवेळी मी आर्मीच्या आणि आर्मीवाल्यांच्या प्रेमात पडले होते.. त्यातल्या त्यात, 'कर चले हम फिदा जानो तन साथीयों, अब तुम्हारे हवाले वतन साथीयों' हे गाणं ऐकतानाच मला रडायला यायचं.. 

शाळेत १० वीला असताना स्लम डॉग मिलेनियर मुव्ही आली होती.. त्यातल्या जय हो गाण्यानं मला वेड लावलं होतं.. म्हणजे ना त्या गाण्यात जुनून होता.. काहीतरी मिळवायची धडपड होती.. तसलंच काहीतरी माझ्या डोक्यात चाललेलं असायचं आणि म्हणून ते गाणं मला आवडत होतं.. १० वी तर चांगल्या मार्कांनी पास झाले पण त्यानंतरच्या एका वर्षात मला जबरदस्त फेल्युअर आलं.. मग तेव्हा कैलाश खैरचं 'टुटा टुटा एक परिंदा ऐसे टुटा, के फिर उड ना पाया.. लुटा लुटा किस ने उस को ऐसे लुटा, के फिर जुड ना पाया..' हेच एकमेव गाणं माझ्या डोक्यात होतं.. भयंकर डिप्रेशनमध्ये मी होते आणि माझ्यासोबत माझं ते गाणं एवढंच काय ते होतं.. 

त्यानंतर कॉलेजला असताना इंग्लिश लिटरेचरमध्ये रोमँटिसिझम शिकत असताना तर आणखीनच गाण्यांच्या प्रेमात पडले. या कॉलेजच्या काळात खूप अभ्यास केला कारण इथं स्वतः ला सिद्ध करायचं होतं आणि त्यावेळी 'वो सिकंदर ही दोस्तों कहलाता हैं, हारी बाजी को जितना जिसे आता हैं' हे गाणं आवडत होतं.. कॉलेजमध्येही चांगल्या मार्कांनी पास झाल्यावर नगरमधल्या सामाजिक संस्था स्नेहालयात नोकरीला लागले आणि तिथं तर माझं आयुष्यच बदललं.. लोकांना भेटून त्यांची मदत करताना देशभक्ती काय असते ते समजायला लागलं.. याच काळात पोलिसांसोबतही काम करायला मिळाल्याने पोलीस खात्याविषयीही आदर वाढला.. या सगळ्या धावपळीत मात्र रोमँटिसिझम मनातच होता.. तेव्हाही हिंदी जुनी गाणी मनात घर करून होती कारण माझ्या घरी बाबांना ही हिंदी जुनी गाणी ऐकायची सवय होती.. ही गाणी मला कधी आवडायला लागली समजलंही नाय.. 

आणि आत्ताही मी ते 'अफसाना लिख रही हूँ दिल-ऐ-बेकरार का, आँखो में रंग भर के तेरे इंतजार का' या गाण्याची फॅन आहे.. त्याचप्रमाणे 'मेरे दिल में आज क्या हैं, तू कहे तो मैं बता दु', चलते  चलते, मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना', तू, तू हैं वही, दिल ने जिसे अपना कहां, तू हैं जहां, मैं हूं वहां' या गाण्यांची जबराट फॅन आहे.. या गाण्यांनी माझा कितीही खराब असलेला मूड क्षणात बदलतो.. कधी कधी तर मी विचार करते कि जर ही गाणी नसती तर मी डिप्रेशनमध्ये केव्हाच आत्महत्या केली असती.. पण असो, देवाक कालजी म्हणून माका ही गाण्याची आवड लागली असा.. अन मी जगले वाचले.. 

अगदी आता मुंबईला आल्यानंतर मला एका निवांत क्षणी गिरगाव चौपाटीला जायला मिळालं.. खरं तर समुद्र हा माझ्या आवडीचा विषय आणि मुंबईला काम करायचं माझं लहानपणापासून स्वप्न होतं.. तेव्हा गिरगावला गेल्यानंतर त्या समुद्रकिनारी समुद्राचं संगीत ऐकताना मी स्वतः ला विसरले होते.. आणि मुंबईत तर दिवस दिवसभर पाऊस पडतो.. कामातून वेळ मिळाल्यावर संध्याकाळी हे पावसाचं संगीत ऐकायलाही मजा येते.. अशी ही मी गाण्यांची शौकीन प्राchi  आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत संगीतमय आणि रोमँटिक राहो एवढंच काय ते स्वप्न.. बाकी जग तर आपण जिंकणारचेय.. 

----------------------------------------------
Image result for music and radio listen
अनिल गोडबोले,सोलापूर.


मला आठवत की मी रेडिओ ऐकत मोठा झालो.  जवळपास 12 वि पर्यंत कोकणातल्या घरात टेलिव्हिजन नव्हता पण सर्व गोष्टी घरबसल्या पोहोचवण्याचे साधन म्हणून रेडिओ होता..

खर..खर... करत लागणारे विविधभारती हे अतिशय आवडत स्टेशन होत.. सांगली आणि मुंबई 'ब' (आताची अस्मिता वाहिनी).. या मुळे उत्तम प्रतीच्या साहित्याची व संगीताची ओढ लागली.

त्यामुळे मला संगीत अतिशय प्रिय आहे. (बायको पण संगीता नावाची मिळाली.. असो) 
सकाळी सकाळी वंदे मातरम ऐकू यायच.. आणि ते रेडिओ वर ऐकायचो..
भक्ती गीत असायची "नांदतो देव हा आपुल्या अंतरी" किंवा समूह गीत "जात कोणती पुसू नका .....उद्यानातील फुलास त्याचा रंग कोणता पुसू नका"... या ने सकाळ व्हायची..

त्या नंतर नवीन व जुनी हिंदी गाणी लागायची.. सकाळी शाळेला जाई पर्यंत गाणे ऐकायचो..

दुपारी नाट्य संगीत असायचं"वद जाऊ कुणाला शरण ग.."  किंवा "घाई नको... बाई अशी मी.. आले रे बकुळ फुला." अशी नाट्य गीत सगळी ऐकायचो.. बातम्या मला विशेष आवडायच्या नाहीत 

संध्याकाळी जवान लोकांसाठी पत्राद्वारे आणि नंतर फोन द्वारे गाणे ऐकवले जायचे...

कीर्तन, भारुड, पोवाडे, समूह गित आणि फटका .. भीमसेन जोशी यांचे अभंग रोज ऐकत असे..

तसच रात्री भुले बिसरे गीत ऐकायचो "तेरा मेरा प्यार अमर फिर क्यू मुझको लगता है डर.." हे वाक्य तुम्ही सरळ म्हणूच शकत नाही.. लयीतच येत.. 
"दुनिया बनाने वाले क्या तेरे मन मे समाई.." कळत नव्हतं पण हृदयात मात्र जात असे..

कॉलेज ला असताना टेप होता .. मोहबते, धडकन, काहो ना प्यार है.. याच्या कॅसेट असायच्या(एकदा तर मी कॅसेट चोरली देखील)..

गावात लग्न किंवा काही कार्यक्रम असला की "आधी वंदू तुझं मोरया" अस कर्णयावर वर ऐकलं की" आये हो मेरी जिंदगी मे तुम बहार बनके.."यायचच (शाळेतली एखादी क्रश आठवायची ना..) "तुझे देखा तो ये जना सनम" तिकडे भात शेतीत आपण शाहरुख खान समजायचं स्वताला... 

अजून ही गाणं ऐकतो (गाण्याचा क्लास लावलेला ... पहिली परीक्षा दिली..पण.. नको ... नंतर बोलू त्यावर) आता मोबाईल आला आणि वाट्टेल ते गाणं ऐकत जातो..

मराठी आणि हिंदी सोबत इंग्लिश पण आवडत आहेत. कधी कधी मल्याळम, तेलगू, कन्नड, तमिळ पण ऐकतो... सोलापूर हे बहुभाषिक शहर आहे... जयंम मधील "चिंन दो" गाण्याने वेड लावले।होते..

कोकणी माझी भाषा.. त्यामुळे पणजी केंद्र आणि कोकणी गाणी ऐकायचो... आता इकडे ते काही नाही..

असो... खूप लिहिलं.. कधी संगीत आवडत, कधी शब्द, कधी चाल आवडते तर कधी ठेका...
मला वाटत संगीत आहे म्हणून माणूसपण आहे.. 

रिमिक्स येऊ द्या किंवा काही होऊ द्या.. संगीत अजरामर राहीलच..

आवरतो आता..!!

----------------------------------------------
Image result for music and mood
करिश्मा डोंगरे, पंढरपूर

          आपण आपल्या मूडनूसार गाणी ऐकतो नेहमी.गाणी पन तशीच असतात.गाणी ऐकली की मूड एकदम छान होतो.एकदम फ्रेश मूड होतो,उत्साह निर्मान होतो.शांत वातावरनात गाणी ऐकायला खरे तर छान वाटते.जर वार्याची एकही झूळूक नसेल पूर्ण वारे बंद झाले असेल तर एकच काम करायचे एखादे शांत असे गाणे लावून बघा लगेच झाडांची पाने हालायला लागतात, मंद अशी हवा चालू होते.गाण्यात एवढी गोडी असते,संगीतमय वातावरन तयार होते.कोनतेही गाणे असो,अभंग,भारूड,ओवी,पोवाडा त्या त्या वातावरनात ऐकायला खूप छान वाटते.एखादे खूप राग आला की, शक्यतो येतोच हं तर त्यावेळी कोनावरही न रागवता काहीच कोनतीच गोष्ट करायची नाहीये.फक्त तीथून निघून जाउन गाणी ऐकली की राग निघून जातो.संगीतातले राग ऐकून आपल्या मनातला राग पळून जातो.मग शांत मनाने घरी जायचे.
       खरे सांगायचे झाले तर,आता पहील्यासारखी गाणी नाहीत.ऐकावी अशी वाटतच नाहीत.पहीली गाणी अर्थपूर्न होती.प्रत्येक कडव्याचा शब्द न शब्द समजत होता.आता तसे नाहीये त्या गायकाला आपल्याला काय समजवून देयचे आहे हेच समजत नाही.गान्याचे बोल काय आहेत तेच समजत नाही,नुसते ते धडाधडा फक्त सांउडचा आवाज.आताचा पीढीला तेच आवडतेय काय कसले कलियूग आहे.काय म्हनतात बर? हा ते डीजे लावा म्हन.कसला तो डीजे आणि काय पूर्ण त्या  गाण्याचे वाटोळे करून टाकतो.कधी कधी याच्यामूळे तर हार्ट फेल होतात.असल्या डीजे मूळे मूड येत नाही उलट जातो.मन स्थिर राहत नाही.काहीच फायदा नाहीये याचा तरी मानसांना तेच आवडते.जे चूकीच आहे ते लगेच घेतात आणि जे बरोबर आहे ते त्याच्याकडे बघनार पन नाहीत.खूप मोठ्या प्रमानात डीजेमूळे ध्वनीप्रदूषण होतेय.शांत गाण असले की त्याला मीक्स करून त्याच वाटोळ करून टाकतात.
           जूनी गाणी ऐकताना त्या गाण्यातच मग्न होवून जायचे,हारवून जायचे त्यातच,पण आता गाणे ऐकले की मन हारवत नाही उलट विचलीत होते.हे डीजे थांबले पाहीजते खरे तर.संगीताच्या मैफीलीत हरवून जायला पहीलीच गाणी पाहीजेत.
----------------------------------------------------------------------------------

____________________________
Related image
यशवंती होनमाने .मोहोळ .

     गाण्याचा आणि मूडचा खुप जवळचा संबंध आहे .म्हणजे बघा ना आपण जसा आपला मूड असेल तस गाणं ऐकतो .आपण जर आनंदी असू तर सगळे हेपी मूड वाले गाणी ऐकतो आणि जर sad असू तर सगळी sad वाली गाणी ऐकतो .बऱ्याच वेळा आपण आपण आपल्या फीलिंग्सची तुलना  गाण्यासोबत करत असतो .जस की 'आके तेरी बाहो में हर शाम लगे सिन्दुरि ' हे गाणं ऐकताना असं वाटत की आपणच त्या बीच वर आहोत .
    ' रिमझिम गिरे सावन ' हे गाणं ऐकताना पावसात नसताना सुध्दा पावसात भिजल्याचा फील येतो आणि ' दमलेल्या बाबाची कहाणी ' ऐकताना पण डोळे ओले होतात .' सुन्या सुन्या मेहफिलीत माझ्या ' ऐकताना सगळा भूतकाळ आठवतो आणि ' जिंदगी हर कदम इक नयी जंग हैं ' हे ऐकलं की जगण्याची उमेद मिळते .....
     खरंच गाणी आणि मूड एकाच  नाण्याच्या दोन बाजू आहेत .....एखादी लावणी ऐकताना नटखट भाव मनात येतात .' झाल्या तिन्ही सांजा ' ही लावणी ऐकली की सजणा ची हुरहुर मनात दाटते ......असा हा गाण्याचा आणि आपल्या मूड चा प्रवास , , , , , , कधीही न समाप्त होणारा , , , अखंड ....! ! ! ! 
____________________________

व्हॉट्सअँप स्टेटस एक आढावा.




अमोल धावडे
अहमदनगर.

व्हॉटस्अॅप स्टेटस हा प्रत्येकजण वेगवेगळ्या कारणासाठी ठेवत असतो. त्या स्टेट्समधून आपल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो. व्हॉटस्अॅप स्टेटस च्या माध्यमातून समोरच्या व्यक्तिचा मूड कसा आहे हे समजते. व्हॉटस्अॅप स्टेटस च्या माध्यमातून लोक आपले प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात तर काहीजण स्वतःचे चांगले विचार शेअर करतात तर काहीजण फक्त समोरच्या व्यक्तीला हसवण्यासाठी आपले व्हॉटस्अॅप स्टेटस ठेवत असतात.
पण हे नक्की आहे की व्हॉटस्अॅप स्टेटसच्या माध्यमातून आढावा तर नक्की मिळतो.

व्हॉटस्अॅप स्टेटस चा चांगला फायदा पण होऊ शकतो आज सकाळी न्युज पेपर वाचत असताना नाशिक शहरात व्हॉटस्अॅप स्टेटसच्या माध्यमातून एका मुलीचा बालविवाह थांबवण्यात आला. झाल अस की एक महिला कामासाठी एका सुशिक्षित व्यक्तीच्या घरी होती आणि त्या महिलेने आपल्या मुलीचा बालविवाह ठरवला व कार्यक्रमाचे फोटो व्हॉटस्अॅप स्टेटस ला टाकले त्या स्टेटस च्या माध्यमातून त्या मुलीचा बालविवाह थांबवण्यात आला. स्टेटस चा असा चांगला वापर सुध्दा होऊ शकतो.

आपण आपला दररोज चा मूड स्टेटसच्या माध्यमातून सांगतो, चांगले विचार या माध्यमातून शेअर होतात काही जोक्स वाचून तर हसू आवरत नाही आणि सर्वाना सवय होऊन जाते की मोबाईल हातात घेतला की इतरांचे स्टेटस चेक करण्याची.

व्हॉटस्अॅप स्टेटच्या माध्यमातून आढावा मिळतो हे नक्की......
___________________________________________


आशिष बारी 
ता.तळोदा जि.नंदूरबार

   आज काल प्रत्येक व्यक्ती ला स्टेटस ठेवण्याची खुपच आवड आहे. व प्रत्येक व्यक्ती त्याच्या मनातील भावना त्या स्टेटसच्या माध्यमातून व्यक्त करत असतो व  त्याच्या त्या व्यक्तीच्या आवडी- निवडी तो या माध्यमातून मांडत असतो, त्या ठेवलेल्या स्टेटसच्या माध्यमातून त्या व्यक्तीचा स्वभाव हा कळत असतो. तसेच त्यांची विचार सारणी ह्या स्टेटसच्या माध्यमातून कळते. त्या ठेवलेल्या स्टेटसच्या मधून एक बोधकथा, सुविचार , नवनवीन आचार विचार हे मांडता येतात.याचा फायदा स्टेटच्या मधुन होत असतो. समाजात जनजागृती करण्यासाठी ह्या whatsapp status चा फार छान व योग्य रित्या वापरु शकतो*

    अशा पध्दतीने आपणांस या स्टेटसचा वापर करु शकतो..
___________________________________________

अनिल गोडबोले 
सोलापूर

मानस शास्त्र अस सांगत की माणूस त्याच्या मनातील तरल भावना कुठेतरी व्यक्त करत असतो किंवा.. किंवा कोणाला तरी संदेश देण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी वापरत असतो... (त्यातूनच भाषेतील लिपी चा उदय झाला)

आता डिजिटल युगात "जसा माणूस तशी त्याची प्रतिमा" या न्यायाने व्हाट्स अप चे स्टेट्स काम करते.. अस मला वाटत.

काही जण मुद्धाम काही गोष्टी टाकतात... पण एकूणच मेसेज देण्याची व्यवस्था निनावी पणे किंवा.. 'लेकी बोले आणि सुने लागे' या पद्धतीने व्हाट्सप स्टेट्स ने सोय करन ठेवलेली आहे..

आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायाच वाकून.. या वृत्तीने आपण व्हाट्स अप स्टेट्स बघत असतो..
पण कधी कधी फार गमती होत असतात.. माझा एक मित्र आहे त्याने एक फोटो ठेवला "वाघासारखा माणूस ... आणि माणसातील वाघ.." बघतो तर नगरसेवकाच 2 वर्षाच पोरग...

गाणी तर काय विचारूच नयेत.. दृश्य एक.. मागे गाणं दुसरंच.. टिक टोक चे व्हिडीओ..
बर्थ डे चे स्टेट्स.. सेल्फी, आणि इतर फोटो... बरच काही

कधी कधी तर राग, प्रेम, धमकी ,विनंती, सूचना, मूड... सगळं स्टेट्स वर असत..

व्यक्त होण्याचं एक नवीन परिमाण म्हणून स्टेट्स महत्त्वाचे आहे... तेव्हा ठेवा, पहा, समजा, एन्जॉय करा..
___________________________________________

संगीता देशमुख,वसमत

                  व्हाट्सॅप  स्टेटस आजकालच्या वापरकर्त्यांचे "स्टेटस" झाले आहे.  खरे तर हे स्टेटस म्हणजे तुमच्या मनात काय चालले,तुमच्या आवडीनिवडी,तुमची सध्याची मानसिक,भावनिक स्थितीच दर्शवित असते. आणि असायलाही हरकत नाही कारण बऱ्याचदा माणूस आपल्या प्रत्येकच भावना कोणाजवळ तरी व्यक्त करतोच,असे नाही. आनंद माणूस सगळ्यांमध्ये व्यक्त करतो परंतु मनाची घालमेल,अपमान,सल मात्र सगळ्याजवळच बोलून दाखवतो असेही नाही. अशावेळी आपल्या मनाचा निचरा कोणत्यातरी  मार्गाने होणे व्यक्त जरुरीचे आहे.  आणि म्हणूनच अशावेळी व्हाट्सॅप स्टेटस लोक वापरतात. हे स्टेटस असे दुखी किंवा निराशाजनकच असतात असेही नाही. खूप सुंदर सुंदर गीते,विनोद हे ही असतात. यावरून तो व्यक्ती आनंदी आहे की दुखी आहे हे तर जवळच्याना कळतं.  पण काहीजण अगदी न चुकता तिकडे अपडेट असतात. कोणत्याही बाबीचा अतिवापर हा घातकच असतो. तरुण पिढीला मात्र हळूहळू नेट मध्ये अडकण्याची एकेक नवनवीन संधी मात्र या माध्यमातून मिळत आहे. त्यामुळे अभ्यासाच्या वेळात तरुणच काय लहान लहान लेकरेही यात गुंतत आहेत,हे घातक आहे. म्हणून जे आपल्याला व्यक्त होण्याचं साधन आहे,त्याचा सदुपयोग घेणे हे आपल्याच हातात आहे,अन्यथा हे विष बनायला वेळ लागणार नाही.
___________________________________________
टीप- (सर्व छायाचित्रे इंटरनेट वरून घेतलेली आहेत)

शिक्षण चार भिंतीच्या पलीकडले






१)शिरीष उमरे, नवी मुंबई.

आयुष्यात पहीली नोकरी मिळाली टाटा ग्रुप कंपनी मधे... पहीलाच दिवस आणि एचआर हेड नी सांगितलेली गोष्ट आजही कानात गुंजते ...अठ्ठाविस वर्षानंतरही...

ते म्हणाले की आतापर्यंत शिकण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागायचे. आता शिकण्यासाठी तुम्हाला पैसे मिळणार आहेत. ह्या शिक्षणाचा फायदा स्वत:साठी, कुटुंबासाठी, समाजासाठी, देशासाठी व कंपनीसाठी करा. फार महत्वाची शिकवण बोलुन गेले...

खरे शिक्षण सुरु होते ते शाळा पुस्तके सुटल्यावर... जीवनाच्या ह्या प्रवासात शेवटपर्यंत आपण शिकत असतो. समाज शिकवतो प्रत्येक मिनीटाला... ह्या चार भिंती च्या पलिकडल्या शिक्षणात व शाळेच्या शिक्षणात फरक हा च की शाळेत पहीले शिकतो व मग परिक्षा द्यावी लागते पण इथे सगळे उलटे ! पहीले परिक्षा आणि मग त्यातुन शिकणे !!

ह्या शिक्षणात काही वेळा तुमची इच्छा असो वा नसो, शिकावेच लागते तर कधी कधी तुम्ही खुप आनंद घेऊन शिकता...

ह्या शिक्षणामुळे आपण प्रगल्भ होतो. जबाबगारी घेतो. इतरांसाठी जगायला शिकतो ...
खरय ना ?
*=============================*


२)किरण पवार,औरंगाबाद.
   
                   रस्त्यांवर जिकडे तिकडे हाहाकार माजला होता. भयानक पुराच्या ओघाने प्रत्येकजण चलबिचल होऊन चेन्नईतल्या रेल्वे स्टेशनच्या बाहेरील रस्त्यांवरून वाट दिसेल तिकडे धावत सुटला होता. वाराही अफाट होता. आणि एक मुलगा शांत एका आडोशाला ऊभा राहून हे सर्व पाहत होता. त्याच्या मनात प्रचंड कोलाहल चालू होता तो म्हणजे, आता परतायच कसं....? कारण त्याने आयुष्यात प्रथम घराबाहेर पाऊल ठेवलं होतं. तो पळून आला होता. चेन्नई शहरातले गल्लीबोळ नी अनेक कंपन्या दोन दिवसात पूर्ण धुंडाळल्या त्याने वरून इंग्लिशही चांगली होती आणि हाती डीग्रीही होती. पण अंदाज अथवा याआधी जगाशी पुस्तके सोडून अर्थार्थी संबंध आलेला नव्हता. स्वत:चा जिव विनाकारण घाबरा होणं आणि चारभिंतीपल्याड डोकावल्यास थेट अनोळखी जगात कोण आपलसं करून घेणारं होतं. असो पण अशा पळून जाण्याने जगाशी तो पुरता परिचीत होऊन घरी परतला हे महत्वाचं. प्रॅक्टिकल जगायला शिकण म्हणजे थोडक्यात चार भिंतीपल्याड जाऊन शिकणं असतं.
*===========================*


३)मनोज वडे ,पंढरपूर.
           बाबासाहेबानी सांगितले की शिका संघटित व्हा,संघर्ष करा... पण आता याचा विचार केला तर अस वाटत की, शिकून पडणाऱ्याची संख्या खूप प्रमाणात वाढत असतानाच चित्र डोळ्यासमोर येत .तरीही त्या प्रमाणात रोजगार दिसत नाही .ह्याची मोठी शोकांतिका आहे.ह्यांचे परिणाम म्हणजे आताच्या तरुणांच्या मनात  विचार येतो की आता बास शिकायचं कुठे ?नौकरी कुठे लागती आहे .तो बग तुझा शेजारी शिकून तरी कुठे नौकरी करतो. पण आता काम, नौकरी तरी कुठे खाजकी क्षेत्रात करतोय ती पण ,कमी पगारीत आणि व्यापारी खूप राभवणारे हे व्यापारी बंधू ....बघा आजून ह्याच लग्न झालं नाही .कुठं शिकून मोटा बाधंनार आहेस .अशी नाराजी ह्या "चार भिंत च्या शिक्षणा" मुळे झालेली दिसत आहे .खूप एकाद्या ची पिळवणूक करत असताना चे चित्र डोळ्या समोर येत. आणि खुप वाईट वाटत की ,आपण शिकून काय आदर्श लावला की हा मुलगा येवढा शिकला आणि आता काय करतो ? अस  बोललं जातं आणि जे तरुण मूल सिनियर कडे पाहून म्हणतात काय शिकून दिवे लावले. सारांश असा की हे चार भींतीच्या शिक्षणात आमूलाग्र बदल झाला पाहिजे.असे नाही झाले तर ते मुलं शिकत नसताना चे चित्र डोळ्यासमोर येत आणि वाटत की हे शिक्षण खरच चार भीतीच्या बाहेर आले.. पाहिजे .शिक्षणाची Positive पणा वाढला पाहिजे अजून कुठे तरी स्किल फुल शिक्षण होण्याची  काळाची गरज पडत असतनाचे चित्र डोळ्यासमोर येत आणि वाईट ह्याच वाटत की, सरकार त्यासाठी काही  ठोस पावले उचल नसतानाच चित्र डोळ्यासमोर येत .त्यावेळेस एकच होत काय करावे आणि काही नाही .हा एकच प्रश्न डोळ्यासमोर भेडसावतो.
            त्यामुळे खर तर शिक्षण हे चार भींतीच्या खूप पुढे गेलेले दिसत.कारण चार भीतीचा जेवढ कमावतो तेवढं च तो शिकणारा कमवत असेल तर शिकणारा उगच शिकला का? पण खरं तर शिक्षण हे चार भीतीच्या बाहेरच खर आहे .कारण पुस्तकी ज्ञान खऱ्या जीवनात कोणीही फॉलो करत नाही रियली जीवनात हे मात्र नक्की आहे.
             ‎शेवट एवढच म्हणायचं आहे की देशाला स्वतंत्र होऊन 72 वर्ष झाली तरी ही आजूनही शिक्षण पध्दत बदलली नाही. ही मोठी शौकांतिका म्हणावी लागेल . काही दिवसात सुदरेल अशी ही काही चिन्ह दिसत नसतानाच चित्र डोळ्यासमोर आहेत .असो......तरी बदल घडणे गरजेचे आहे .नाही तर ह्याचा विस्फोट होण्यास जास्त काळ लागणार नाही.
*===========================*


४)सिताराम पवार, पंढरपूर.

 MSc ऍग्रीचे शिक्षण पूर्ण झाले आणि लगेच कृषिधन सिडस कंपनी त सिलेक्ट झालो. आता फील्ड वरील काम चालू आहेत. लेआऊट तयार करणे, पेरणीची तयारी, कोणती ट्रायल कुठं घ्यायची, नर व मादी ची लाइन कुठं लावायची दोन्हींमधील अंतर, F1 तेF8 घेणे, हायब्रीड प्रोड्युकॅशन, variety development व   तिच्या वेगवेगळ्या ठिकाणी ट्रायल ह्या सर्व गोष्टी समजल्या.
खरचं प्रॅक्टिकल माहिती खूप महत्त्वाची आहे.हेच खरं शिक्षण आहे
*===========================*

५)अनिल गोडबोले,सोलापूर.

शिक्षण ही एक प्रक्रिया आहे.... नवीन काहीतरी जाणुन घेणे म्हणजेच शिक्षण..
चार भिंतीत फक्त प्रक्रिया वाढवण्यासाठी मदत केली जाते आणि डिग्री दिली जाते.

बाकीचे आयुष्य जे शिकवते ते... डिग्री देत नाही पण माणूस म्हणून घडवते.

लहान मुला पासून निसर्गपर्यंत आपल्याला शिकता येईल फक्त तशी दृष्टी पाहिजे..

प्रेम करायला शाळेत शिकवत नाहीत. शिव्या द्यायला शाळा शिकवत नाही... जगायला आणि हरायला शाळा शिकवत नाही..

त्या मुळे या शाळेत पास झालेला व्यक्ती कधीच मागे पडत नाही
*===========================*

६)अमोल धावडे,अहमदनगर.

शिक्षण ही एक प्रक्रिया आहे. शिक्षण घेत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण घेत असतो आपल्या कार्यक्षेत्रात जो तो शिक्षण घेत असतो परंतु शिक्षणामध्ये जे पुस्तकी ज्ञान आहे तेच आपले गुरू आपणस देत असतात.

शिक्षण घेत असताना जे त्या चार भिंतीच्या आत आपल्याला दिले जाते त्याही पलीकडे जाऊन समाजामध्ये कसे जगले पाहिजे हे शिक्षण दिले जात नाही. प्रॅक्टिकल विचार केला तर त्या चार भिंतीच्या आत दिले जाणारे शिक्षण आणि समाजामध्ये जगत असताना येणारा अनुभव याचा कुठेही ताळमेळ बसत नाही.

प्रेम करायला, आयुष्य जगायला, माणुसकी जपायला हे माणूस अनुभवातून शिकत असतो त्याला कोणत्या शिक्षणाची आवश्यकता नसते.

माझे शिक्षण सामाजिक क्षेत्रात झाले आहे. कॉलेज मध्ये असताना थेरी ज्ञान दिले जाते परंतु प्रत्यक्षात काम करत असताना वेगळा अनुभव येतो. प्रॅक्टिकल काम करत असताना समोरील व्यक्तीच्या भावना त्याची गरज तो कोणत्या अडचणीत आहे त्याला काय मदत हवी आहे या सर्व गोष्टी असतात. समोरील व्यक्तीचे इमोशन आपल्याला समजते.

सध्या मी रस्त्यावर रहाणाऱ्या मुलांसाठी काम करत आहे प्रॅक्टिकल काम करत असताना त्यांच्यासोबत वेळ घालवत असताना येणार अनुभव हा अतिशय वेगळा आहे. त्यांची गरज त्यांना काय मदत हवी या सर्व गोष्टी जाणून घेताना नवनवीन गोष्टी अनुभवण्यास मिळतात आणि हे मला कधी त्या चार भिंतीमध्ये शिकवले गेले नाही.

मला असे वाटते चार भिंतीच्या पलीकडचे ही शिक्षण माणसाला हुशार बनवत असते.
*===========================*

एक काल्पनिक पत्र.



निखिल खोडे, पनवेल.

प्रिय भ्रष्टाचार,
बरा आहेस ना? म्हटलं जरा विचारपूस करावी तुझी कारण सध्या सगळीकडेच तुझीच चर्चा चालु आहे. सर्व क्षेत्रात तुझीच छाप आहे. दारिद्र्य, विषमता यामुळे तुला नवीन चालना मिळत आहे. राजकीय क्षेत्रात तर तुझे कायम स्थान आहे, तेही अगदी अव्वल पहिल्या क्रमांकावर!

तुझी कमाई करोडो अब्जोच्या च्या आकड्यात आहे. तुला वापर गरीब लोक त्यांचे काम लवकर करून घेण्यासाठी करतात तर भ्रष्ट लोकांच्या तिजोरीत पैश्याची आणखीच भर पडते ते फक्त तुझ्यामुळे! का करत असतील रे लोक तुझा वापर?

 तुझा अभ्यास करणाऱ्या ‘ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या २०१८ अहवालानुसार जगाच्या शाळेत १८० देशांमधुन भारताला ७८ वा क्रमांक तु मिळवुन दिला आहे. किती लज्जास्पद ना? तो डेन्मार्क आणि न्युझीलंड नेहमी एक नंबर साठी भांडत असतात. 

भारत ४१ टक्के गुण मिळवून पास तर झाला. तो सोमालिया बघा ना.. नेहमी नापास होतो.

असे सन्मान मिळविण्यासाठी तुझ्या मदतीला बरेच जण बसले आहेत जसे की राजकिय नेते, धार्मिक नेते, नोकरशाही, स्विस बँक, देश सोडून फरार होणारे उद्योजक, सार्वजनिक क्षेत्रातील दलाल लोक इत्यादी....

जेव्हा नेते व जनता सार्वजनिक सत्तेचा स्वतःच्या खाजगी फायद्यासाठी गैरवापर करतात तेथे तुझा उदय होतो. तुझा बोजा शेवटी वस्तूच्या किमती वाढवून आमच्यावर (सामान्य माणूस) लादला जातो; यात फक्त कणा आमचा मोडल्या जातो. पात्रता नसताना तुझा वापर करून लोकं मोठमोठी पदे मिळवतात आणि आम्हाला साधा शेतीचा सातबारा काढायचा म्हटल खिसा दोनदा तपासावा लागतो. कारण ₹ १०० असेल तर काम लवकर होईल!

अमर्याद वाढलेल्या लोकसंखेच्या मुलभूत गरजा आणि सर्वच स्तरावरील वाढती मागणी व पुरवठ्यातील तफावत, जीवघेणी स्पर्धा आणि दैनदिन जीवनाचा गाडा हाकताना जीवाचा झालेला कोंडमारा आणि त्यावरील उपाय म्हणजे कळत नकळत केलेला तुझा वापर हे तुला आणखीच बळ देणारे आहे.

तुला माहिती आहे की आज देशाभरात केंद्र, राज्य, तालुका, जिल्हा, ग्रामपंचायत पातळीवर जनतेला स्वत:ची कामे करून घेण्यासाठी बऱ्याचदा तुझा वापर करावा लागतो.

तुला थांबविण्यासाठी अनेक कायदे आहेत पण त्याची अंबलबजावणीच होत नाही. वाट पाहतोय तुझ्या वास्तव्य पुसल्या जाण्याची! तुझ्या कालबाह्य होण्याची...

तुझाच.
(नाव सांगायची गरज आहे का?)
____________________________________________

डॉ. विजयसिंह पाटील

प्रति,
कु चारुदेवी घरमोडे.

यांना राजीव नरहर डुकरे (रा.न.डुकरे) यांचा सस्नेह प्रणाम...

पत्रास कारण की आपण काल फिजिओलॉजीच्या अत्यंत महत्वाच्या वर्गास गैरहजर होता, त्यामुळे अस्मादिक काळजीत पडल्याने हा पत्रप्रपपंच..

तुमच्यासारखी अत्यंत हुशार, ब्रिलियंट विद्यार्थिनी गैरहजर असल्याने मी फार अस्वस्थ झालो, हृदयात कसतरी झालं.(हृदयात घंटा क्र१)

खरं तर मागच्या आठवड्यात कचरा गाडीच्या घंटीच्या मंजुळ अवाजासारखा आवाज ऐकू आला आणि मी मागे वळून पाहिले तर तुमचं किणकिणतं हास्य (राज्या म्हणतो 'खिंकाळल्यासारखं) माझ्या दृष्टीस पडलं (खरं तर कानावर पडलं) आणि त्याच क्षणी माझ्या हार्टमध्ये घंटा वाजल्याचा भास झाला,(घंटा क्र२)असो.

आपण मागच्या आठवड्यात मेंदूचं  कार्य इतक्या वैविध्यपूर्ण शैलीत सांगितले की,माझा मेंदू अचंबित झाला आणि माझं हार्ट थरथरलं. (घंटा३)आणि...(ते नंतर, असो)

हंसगामिनी,गजगामिनी हे शब्द पुस्तकात वाचले होते पण तुमच्या मंद,दमदार भारदस्त चालण्याने गजगामीनी याचा अर्थ पुरेपूर कळला, तेंव्हा मला बाबूच्या हॉटेलमधली थंडगार लस्सी प्यावू वाटली. असो..

तुमच्या उजव्या गालावर असलेला रुपयाच्या आकाराचा तीळ (राजा त्याला 'वांग'म्हणतो) पाहून मला आमच्या शेतातल्या डाग पडलेल्या आंब्याची आठवण झाली, पण तो तुम्हाला दृष्ट लागू नये म्हणून असावा.. असो..(तीळ-घंटा ४)

तुम्ही तुमच्या वेणीतच्या दोन शेपटात एक लाल आणि दुसरीत पांढरी रिबीन बांधलेली पाहून मला लाल,पांढऱ्या पेशी आठवल्या,आणि तात्काळ माझ्या लाल पांढऱ्या पेशीत खळबळ उडाली.त्या दोन पेशींची संयोग होऊन गुलाबी पेशी तयार झाली असावी अशी शंका आहे.(घंटा ५)
सरांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना,मानवाच्या DNA चे दोन्ही स्मूक्ष धागे कसे कुशल विणकऱ्यार्प्रमाणे गुंफले आहेत हे किती सुंदर उदाहरण दिले, ते ऐकताक्षणी मला लव्ह अँट फर्स्ट साईट किंवा खरं तर लव्ह अँट फर्स्ट हिअरिंग' असं झालं.(घंटा६)

तुमचा विचार येताच माझं हृदय रेल्वेच्या इंजिनासारखे धडधडायला लागतं.(घंटा७)

मी मोठा डॉक्टर, कवी,उत्तम शेतकरी, लेखक, कादंबरीकार,उत्तम वक्ता, सिनेमातील नायक, आमदार आणि आता तुमचा भावी वर(घंटा७) होण्याचा मानस धरून आहे.

तुम्ही माझा स्वीकार केला तर 'शिकरणात बासुंदी' होईल आणि मला माझी उच्च ध्येये साध्य करता येतील असे वाटते.

आपला हृदयाभिलाशी,
 रा.न.डुकरे..
__________________________________________

प्रविण दळवी, नाशिक.

थोडं माझ्या कल्पनातल्या मनातलं...
मनातलं नेहमी ओठांवर येतंच अस नाही...
आणि ओठांवर आलेलं सांगायला हक्काचा माणूस भेटेलंच हे ही सांगता येत नाही...
म्हणूनच हा लिहण्याचा अट्टहास...

प्रिय मन
पेनाने नाही तर
आसवांनी लिहलेलं...
एक पत्र आहे तुझं,
मी जपूण ठेवलेलं...
            धूळ होती थोडी,
            आणि मळकटलेला कागद...
            हाताने पूसून त्याला
            उचललं मी अलगद...
वाचलंय मी ते कितीदातरी,
पण पुन्हा वाचावसं वाटलं...
आठवणींच्या त्या गावात
पुन्हा धुकं दाटलं...
            त्यात शब्द होते मोजकेच;पण
            भावना मात्र ठासून भरलेल्या...
            एवढ्याशा त्या तुकड्यात,
            साऱ्या आठवणी दडलेल्या...
प्रत्येक वेळी वाटतं,
फाडून टाकावं याला...
जळजळत्या त्या अग्निकुंडात,
जाळून टाकावं याला...
           बुध्दी "हो" म्हणते याला,
           पण मन मात्र "नाही" म्हणते...
           दरवेळी प्रमाणे यावेळीही,
           मला मनाचेच ऐकावे लागते..."
                     तूझाच ह्रदय
___________________________________________

सीमाली भाटकर गंधेरे, रत्नागिरी.

प्रिय,
मानव जातीस
                संध्याकाळी समुद्र किनारी फिरता फिरता तुमची अचानक आठवण आली. आणि लिहावंसं वाटलं एक पत्र कारण मोबाईल च्या जगात पत्राचा विसर पडला आणि पोस्टमन काका अहो तुम्ही तर उंबराचे फुल होऊन बसलात की राव, म्हणूनच ठरवून टाकलं आज एक पत्र लिहायच माणुसकी जोपासलेल्या हरवलेल्या आपुलकीच्या आणि मनात वैर भाव बाळगलेल्या या जगातल्या प्रत्येक माणसाला
कदाचित तुमच्या मनात येत असतील माझ्या पत्रातले विचार पण तुम्ही काय आणि मी काय बोलता येत असूनही मुके जाहलो अशी आपली अवस्था आणि म्हणूनच ही हरवलेल्या पत्राची धडपड.
         मी जन्माला आल्या पासून संस्कार शिस्त सगळं जोपासत वयाच्या तिशी पर्यंत पोचले आणि अचानक बरेच प्रश्न मनात डोकावू लागले. शाळेच्या पहिल्या दिवशी आई वडिलांची धडपड प्रवेशा संबंधित चर्चा आणि झोपडपट्टी मध्ये मात्र दोन वेळच्या जेवणाची भ्रांत तरी माणूस शिकतो मोठा होतो पण हे सगळीकडे सारख का नाही याचं उत्तर असत हाताची बोटे सारखी नसतात.
            कधी कुणाच्या आयुष्यात शिकण्यासाठी कष्ट येतात तर कुणी आरामदायी जीवन जगत शिकत पण म्हणून या कष्ट करण्याचा छळ करण्याचा अधिकार कुणी दिला तुला माणसा. कुणीच कुणाचं ओझं वाहत नाही. पण आपुलकी चा शब्द आणि मायेची पाखर हीच माणसाच्या प्रगतीची खरी वाट असते. कॉलेजमध्ये प्रवेश मिळवताना पैसे किंवा वशिलेबाजी चालते कीव येते तेंव्हा जेव्हा खरंच त्या पात्रतेच्या व्यक्तिमत्वाला डावलल जात. ज्ञान ही आता पैशाच्या तराजूत तोलले जाते आणि उत्तर असते हाताची बोटे सारखी नसतात.
       दररोजच्या जीवनात अशा अनेक गोष्टी घडत असतात. ज्या माणसा माणसाशी जोडलेल्या असतात. लिहिता लिहिता मजेदार किस्सा आठवला, आपल्या बोलबच्चन आणि भांडकूदल स्त्री वर्गाचा ज्याचं एकमेकींच कधीच पटलं नाही आणि जिकडे पटलं तिथे शेजारणीला मोठा प्रश्न असतो. अस होतंच कसं मग माझी घरातील मानस मला का बोलतात? हिने कायतरी जादू केली. इथे प्रश्न जादूचा नसतोच मुळी प्रश्न असतो तो समजूतदार पणा आणि समजून घेण्याचा.  काही ठिकाणी तर पैशासाठी आगीत होरपळणाऱ्या आणि मुलगी झाली म्हणून बेघर होणाऱ्या स्त्रिया पाहिल्या काय वाटत तुला या विषयी माणसा माणूस म्हणून.
        तिला काही भावना, मन असतात हे आपण विसरून जातो का? का आपल्यातला माणूस संपतो. हा झाला शोषितांच्या मनाचा प्रश्न. काही ठिकाणी तर स्त्रिया इतक्या उच्च पातळीवर जातात की सगळंच मस्त असत. पण आम्हाला इतक्या वाईट सवयी असतात की आम्ही स्वतःत रममाण असतो. नवरा नावाचा प्राणी आपल्या आयुष्यात आहे. त्याचे आई वडील असतात याच भान नसत आणि कधी कधी त्यांना वाटत आपल्या सुनेला काय मान द्यायचा ती दुसऱ्या कडून आलेली आहे.
        किती वेगळे स्वभाव आणि गुंतागुंत आहे ना हाच विचार करून हसतेय मी आता कुणी कुणाकडून काय घ्यावं आणि काय द्यावे याच एक कोड होऊन बसलाय मनात.
            खरंय अगदी पण या पत्रातून एकच सांगायचं आहे नसुदे हाताची बोट सारखी कारण जेवायला पाहिजे असेल तर ती सारखी नसलेलीच बरी. नाहीतर पोट उपाशी राहील. पण म्हणून आपण आपल्या विचार प्रवृत्ती मध्ये बदल घडवून आणायचा नाही का? विचार कर माणसा माणसाच्या मनात आलेल्या प्रश्नांचा माणसा.
१)    गरिबांना शिकण्याचा हक्क नाही का?
२)      श्रीमंतांच्या घरी पैसा जातो अस का वाटत नेहमीच माणसाला की आपण कुठे कमी पडतो.
३)      माणूस लाचखोर का झाला की महागाई फक्त सरकारी माणसावर कोसळली आहे.
४)      रात्री उशिरापर्यंत दिव्या खाली अभ्यास करून नोकरी नोकरी करणाऱ्या ना फक्त परिस्थिती ची जाण का?
5)     अतोनात पैसे असणाऱ्या आई बापाची मुलं का जातात कॉलेज सोडून भटकायला नेमकी कमतरता कशात आहे संस्कारात शिस्तीत की आई बाबा नोकरी आणि पार्ट्यांमध्ये व्यस्त आहेत त्यातून लाभलेल्या एकटेपनात
6)      ताटावरच्या गप्पा तर आम्ही विसरून गेलोय कारण रूम मध्ये जेवणाची पध्दती नव्याने रुजू झालीय.
७)      रस्त्याने चालताना अपघाताला दुर्लक्ष करून आपण तडक निघून जातो कारण आपल्याला ऑफिसमध्ये पोहोचायचं असत खरंच माणुसकी काळजी हे सर्व पुस्तकात का?
8)      जागा जमीन पैसा याला श्रेष्ठत्व प्राप्त झालाय का माणसा आपलेपणाच पारडं झुकत्या मापाकड का कळतंय? 
9)     कामाला देव मानून काम करतो तिथे हिनतेची वागणूक आणि फसवणुकीच्या ठिकाणी मात्र पैशाचा पाऊस अस का घडतं.
१०)     दिवस रात्र काम करणारा पुरुष ही दमतोच आणि घरासाठी कष्ट करणारी माऊली ही थकते मग तरी दोघात दुजाभाव का?
११)    कधी वाटत माणसातील माणुसकी संपली आहे का?
        म्हणूनच एका माणसातल्या माणसाला हे पत्रातून साधलेल हितगुज माणसाला माणसाची सोबत नकोशी झालीय उरला तो फक्त स्वार्थ आणि का हा प्रश्न?
     उत्तर मिळाले किंवा कळवावे वाटले तर नक्कीच लिहा माणसातला माणूस हरवलेल्या माणसाला एक पत्र......
धन्यवाद.
_________________________________________

अक्षय कांबळे, पालघर.

मेरी प्यारी कलम,

         पत्रास कारण की, बरेच दिवस झालं शांत आहेस. लोक काय म्हणतील याचा विचार करणारे आलं नव्हे. पण आज काल पाठमोरी बोलणारे करवंटे तोंडावर बोलत आहेत. एक दीड शहाणा तर आपली ( म्हणजेच मी आणि तू) लायकी काढता काढता स्वतःचीच लायकी दाखवून गेला. म्हणे काय तर मुंबईकर तुम्ही तुमची लायकी दाखवलीच. असो. मुख्य मुद्द्याकडे वळतो. बरेच दिवस झालं शांत आहेस. म्हटलं थोडी विचारपूस करावी. आपण सोबत काम करून फक्त 3 महिने झाले असतील. पण तुझी कमतरता काही जाणवली नाही. हात होते ना तुझी उणीव भरून काढायला. पण काहीही म्हण तुझ्यासारखी धार त्यांना नाही. कमी मेहनत आणि अगदी जिव्हारी घाव घालायला तुला जसं तुला जमतं. ते काही हातांना उभ्या आयुष्यात जमणार नाही.
         बऱ्याच तक्रारी आहेत लोकांच्या. काही म्हणतात आपल्याला लिहायला येतच नाही. काही म्हणतात धार राहिली नाही पूर्वीसारखी. विनोदी लेखन तुमच्या आवाक्यातील गोष्ट अजिबात नाही. आणि बरंच काही. ऐकून कंटाळा आलाय आता. यांना कोण समजावणार आपण आपलं लिखाण पब्लिक डोमेन मध्ये जास्त आणलेलं नाहीच आहे. व्हॉट्सअँप आणि इंस्ताग्राम च्या थिल्लर पोस्ट वरून तुम्ही एवढं ऐकावणार. हसायलाच येत मला यांच्या कडे पाहून. एखाद्याला जज करण्याची एवढी घाई. असो. महान होण्याची कुठलाही मानस नाही आपला. हे तुझ्या शिवाय कोण जास्त ओळखणार नाही का ? एक औरंगाबाद दौरा बाकी आहे. जरा काहींना दाखवून द्यायचं आहे. BROTHERBHEEM हे टोपण नाव नाही आहे. तो स्वभाव आहे. लवकरच काम आटपून परत येईन. आणि आलो की लागुयात आपल्या कामाला. बरीच कामं आहेत आपली अपूर्ण. तुला सुद्धा गरज होती आरामाची. गेली 3 वर्ष एकदाही सुट्टी न घेता आपण काम करत होतो. आता मनसोक्त आराम कर. आता लवकर सुट्टी मिळणार नाही...
________________________________________
टीप-(सर्व छायचित्रे इंटरनेट वरून घेतलेली आहेत)

विद्यापीठे आणि रोजगाराभिमुख उच्चशिक्षण.

विद्यापीठे आणि रोजगाराभिमुख उच्चशिक्षण.
शिरीष उमरे,नवी मुंबई.
दहावीनंतर विज्ञान व गणित विषयात जास्त मार्क मिळाले म्हणुन डॉक्टर इंजिनियर च्या आशेने इतरांप्रमाणे माझ्या पालकांनी मला विज्ञान शाखेत धाडले. त्यातल्या त्यात इतर मित्रांच्या अंधानुकरणात मी ही सामिल झालो आणि इलेक्ट्रॉनिक्स हा विषय निवडला.ह्या चुका नंतर भविष्यात चांगल्याच जाणवतात. कदाचित पॉलिटेकनिक, आर्ट, कॉमर्स ह्या वाटांकडे दुर्लक्ष व्हावे अशीच शिक्षणव्यवस्था बनवल्या गेली होती. अकरावी बारावी ची वर्षे अभ्यासाच्या भाराखाली कशी सरलीत ते कळालेच नाही. जे काय शिकवल्या गेले ते आजगायत आयुष्यात कधीच कामी पडले नाही. मार्ग चुकला की सीस्टीम च तशी बनवल्या गेली होती आणि त्या चक्रव्युव्हात मी कसा अटकलो हे अजुन न उलगडलेले कोडे आहे.

पंच्यांशी टक्के गुणवत्ता तेंव्हा सुध्दा कमीच होती. इतके कमी गुण मिळाल्याने शासकीय महाविद्यालयाचा प्रवेश बंद व प्रायव्हेट इंजिनियरींग कॉलेज परवडणार नाही अशी पालकांची भुमिका ! ह्या नैराश्य व मानसिक खच्चीकरणातुन मला व पालकांना बाहेर निघण्यासाठी योग्य मार्गदर्शकांची कमतरता तेंव्हाही होती.

नाइलाजास्तव घरची आर्थिक परिस्थितीला साजेशी व लोकमान्य असणारी इलेक्ट्रॉनिक्स ची पदवी परिक्षासाठी आयुष्याची पुढची तीन वर्षे फुकट वाया घालवली. यशस्वी (?) फर्स्ट क्लासची पदवी धारण करुन गोंधळलेल्या बेरोजगारांच्या घोळक्यात सामिल झालो. स्वत:च्या पायावर उभे राहण्याची वेळ...

पण ही तीन वर्षे सॉफ्ट स्कील विकासासाठी खुपच उपयोगी पडली. एनसीसी, सोशल गॅदरिंग, वेगवेगळ्या स्पर्धा, खेळ, वाचन, पर्यटन, नविन भाषा शिकणे हे भरपुर एन्जॉय केले.

ह्यातुन च पुढचा मार्ग गवसत गेला. घरच्यांनी मला एमबीए करायला परवानगी न दिल्याने (विद्यापीठात निवड होऊनही!) त्यांच्या मनानुसार सर्वमान्य मार्ग निवडला. आई च्या इच्छेनुसार आयएस परिक्षा तयारी आणि वडीलांच्या आज्ञेनुसार कॉम्प्युटर डीप्लोमा करायला मुंबई गाठली. सोबतच धुर्तपणाने अन्नामलाई मुक्त विद्यापीठात मानसशास्त्र पदव्युतर साठी प्रवेश पक्का केला.
आयुष्यात दहावी नंतर खरे काही शिकलो असेल तर ह्या दोन वर्षात !! जे मुंबई ने मला शिकवले  ती शिदोरी पुढील पंचवीस वर्षे पुरली. माझ्यातील मार्केटींग व मॅनेजमेंट गुणांची पारख केली ह्या शहराने. मला माझीच नव्याने ओळख करुन दीली मुंबईने !!

आज मागे वळुन बघतांना जाणवते की दहावीनंतरचा अभ्यासक्रम हा कालबाह्य होऊन चार दशके होवुन गेलीत. खाजगीकरणाच्या धोरणातुन भ्रष्टाचाराची कुरणे उभी राहीली. विद्यापीठाच्या मढ्यावरच्या टाळुवरचे लोणी खाण्यात राजकारणी व नोकरशाही मग्न राहीली व पुढच्या दोन तीन पीढ्या बरबाद करुन टाकल्या. त्याच्या दुष्परिणामांचे चटके आता जाणवुन राहीले आहेत. एवढा प्रचंड करवसुलीचा पैसा असतांना शिक्षणावर सरकार खर्च का करत नाही ? हा एक समजुन उमजुन केलेला कटकारस्थानाचा भाग तर नाही अशी भिती वाटते. अशिक्षीत जनतेवर राज्य करणे सोपे जाते ना !!

ह्याला प्रत्युत्तर इंटरनेट व मोबाइल क्रांतीतुन मिळु शकते. केरळमधील एक पदवीधारक हमाल रेल्वे स्टेशन च्या फ्री इंटरनेट वापरातुन आयएएस होतो. मोबाइल अॅपच्या व सोशल मिडीया च्या मदतीने एका दुर्गम आदिवासी पाड्यातुन बारावी फेल एकवीस वर्षाचा तरुण कडकनाथ कोंबडीच्या व्यवसायात करोडो रुपयांची उलाढाल करतो व हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करुन देतो.

स्वयंप्रेरणा हे दुसरे माध्यम !
आयआयटी मधुन इंजिनियर झालेला तरुण फॉरेनला गलेलठ्ठ पगाराची नोकरी न करता ग्रामीण भागात ऑरगॅनिक शेती करुन स्वत:चे व हजारो शेतकऱ्यांचे आयुष्य आर्थिकदृष्ट्या यशस्वी करतो. आयएमएम झालेला विद्यार्थी मल्टीनॅशनल कंपनी जॉइन न करता आईच्या इडली वडा च्या छोट्या व्यवसायाला जागतिक पातळीवर नेतो. ह्यातुन हे तर सिध्द होते की आजची शिक्षण यंत्रणा पुर्ण कुजली असली तरीही ह्या नविन फुटलेल्या पालवीतुन नविन वटवृक्ष उभे राहतील व ही परिस्थिती बदलवतील अशी आशा अजुनही कायम आहे....


अक्षय डेरे,यवतमाळ.
माझा हा पहीला लेख आहे. काही चूका झाल्यास समजुन घ्या. माझे सातवीपर्यंत चे शिक्षण माझ्या गावातील जिल्हा परिषद शाळेत व त्यानंतरचे दहावीपर्यंतचे शिक्षण सेमी-इंग्रजी माध्यमातुन तालूक्याच्या ठीकाणी झाले व त्यानंतर बारावीसाठी महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला.

बारावीनंतर काय करायचे याचा सर्व विचार करून पदवी शिक्षणासाठी वाणिज्य शाखेत प्रवेश तर घेतला पण घरची आर्थीक परीस्थीती ठीक नसल्यामुळे नोकरीसाठी मला मुंबई गाठावी लागली. कसेबसे तारेवरची कसरत करीत मी यावर्षी वाणिज्य पदवीधर झालो.

पण आता पुढे काय करायचे याची काळजी लागलेली आहे. मला व्यवसाय व्यवस्थापनामधे आवड असल्याने पुढे शिकायचे आहे पण घरची परीस्थती बेताची असल्यामुळे मी लाखो रुपयाची फी जमा करू शकणार नाही.

स्पर्धा परीक्षेची तयारी करावी तर सहा लाख मुले फक्त पुणे मधे एमपीएससी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत आहेत. संपुर्ण महाराष्ट्रात पन्नास लाखाच्या जवळजवळ तरुण स्पर्धा परिक्षेची तयारी करीत असतील. स्पर्धा खुप वाढलेली आहे. सरकारी नोकऱ्या कमी होत आहेत.

गावाकडील शिक्षण आहे म्हणुन आम्हा गावठी मुलांना प्रायवेट कंपनीमधे आॅफीस बॉय किंवा साफसफाई साठी ठेवल्या जाते. गेली २-३ वर्ष मुंबई मधे होतो. इथे आल्यावर अनेक लोंकाशी गाठीभेटी झाल्यात. चुकांतून शिकत राहीलो. हाँटेल इंडस्ट्री चा जॉब असल्यामुळे रोज नविन लोंकाशी संवाद होतो व त्या संवादातून थोड फार शिकायला मिळते. नविन जेवणाच्या रेसिपी माहीत होतात आणि खास म्हणजे मुंबईत वेगवेगळ्या प्रांतातून काम करण्यासाठी आलेल्या लोकांशी संवाद व त्यांच्याकडील संस्कृती व वेगवेगळे रीतीरीवाज माहीत झाले.

मुंबईत आल्यावर कसे जगावे व संघर्ष काय असतो हे माहीत झाले. महाविद्यालयातच  शिक्षण दील्या जाते असे नाही. महाविद्यालयाच्या बाहेर सूद्धा खुप काही शिकायला मिळते. मी आज तीच दुनियादारी शिकत आहो. मला मुंबई ने खुप काही शिकवल. मला आणखी भरपुर काही शिकायच आहे आणि ठरवलेल ध्येय्य पुर्ण करायच आहे....


अनिल गोडबोले,सोलापूर.
उच्च शिक्षण आणि रोजगार या दोन्ही गोष्टी लक्षात घेताना आपल्याला शिक्षण व्यवस्थे कडे पण लक्ष दिलं पाहिजे.१० वि ,१२ वी झाली की सायन्स, आर्टस् आणि कॉमर्स नावाच्या विद्या शाखा... त्यातून विद्यापीठ ठरवेल किंवा महाविद्यालय ठरवेल ते विषय घ्यायचे..... डिग्री घ्यायची... लगेच नोकरी...

इंजिनिअरिंग, मेडिकल, कायदेविषयक पदवी, शिक्षक, कृषी... असे सर्व मान्य विषय त्यातून डिग्री त्यातून मास्टर डिग्री घेताना बिझनेस अडमिनिस्ट्रेशन .... खाजगी कंपनी किंवा सरकारी नोकरी...असा सरधोपट मार्ग आहे आपल्या कडे.. हे बदलायला पाहिजे..

महाविद्यालयात शिकुन किती जणांना कौशल्य मिळतात?... शिक्षक मुलांना कौशल्य शिकवतात का?.. परीक्षा पद्धत ही एकच पद्धत आहे का... ज्या मध्ये ज्ञान तपासता येईल?...माझ्या मते उच्च शिक्षण संपूर्ण पणे बदलले पाहिजे...

विषयाची निवड विद्यार्थाने करायला पाहिजे... म्हणजे फिजिक्स सोबत मी इतिहास पण शिकला पाहिजे... म्हणजे इतिहासातील संशोधन आणि विज्ञानातील तंत्र एकत्र येतील..

परीक्षा ही ज्ञान तपासणारी असली पाहिजे...लेखी पद्धतीवर असलेला भर कमी करून... संशोधन व अहवाल लेखन, किंवा इतर काही मार्ग अनुसरून मूल्य मापन करता यायला पाहिजे.  पुस्तक... नोट्स.. आणि क्लास मधून बाहेर येऊन प्रत्यक्ष अनुभव घेणं गरजेचं आहे..(आता प्रोजेक्ट पद्धत आहे त्या मध्ये चोरून प्रिंट काढून लावतात..)

सेमिनार, सिमपॉझियम, आणि संशोधन प्रसिध्द करुनच डिग्री मिळाली पाहिजे...ज्ञान अद्ययावत असले पाहिजे... पास झाल्यावर पुन्हा कंपनीला प्रशिक्षण देण्यात वेळ आणि पैसे वाया घालवायांची वेळ येऊ नये..

शिक्षक हा मार्गदर्शक झाला पाहिजे... तेच तेच घासून गुळगुळीत शिकवू नये...
उच्च शिक्षणासाठी पैसे आणि त्या ताकदीची विद्यापीठ, महाविद्यालय आणि प्राध्यापक पुढे यायला पाहिजेत...

शिक्षण आनंदी झालं पाहिजे... सर्वाना मिळण्या जोग झालं पाहिजे


प्रविण दळवी,नाशिक.
उच्च शिक्षणाने शहाणपण येते हे सत्य लक्षात घेऊन अनेक समाजसुधारकांनी विद्यापीठांची स्थापना केली. मानवी जीवनातील अन्न, वस्त्र, निवारा इतर मूलभूत गरजांप्रमाणेच विद्यापीठे व उच्च शिक्षणालाही अतिशय महत्त्वपूर्ण स्थान आहेत पण आज या शिक्षणाची पुर्ण वाट लागली आहे त्यामुळे शैक्षणिक तत्वांचा आणि धोरणांचा पुर्नविचार करुन पुन्हा एकदा नव्याने उच्च शिक्षणाचा आभ्यासक्रम बदलवण्याची वेळ आली आहे. आज विद्यापीठांचे जणू विद्यापीठच विद्यापीठ उगवले आहे. विद्यापीठांच्या अशा कबाडखान्यांमधुन बाहेर पडलेल्या पदवीधर बेरोजगारांना काम देण्यात सरकार जसे अपयशी ठरले आहे तसेच तांत्रिक व वैद्यकीय शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या इंजिनिअर व डॉक्टरांचीही दयनिय अवस्था झाली आहे. काही विचारवंत  म्हणतात की, शिक्षणक्षेत्रातील तज्ञ असणार्‍या व्यक्तींनी महाराष्ट्राचे शैक्षणिक धोरण ठरवले आहे. हे धोरण रोजगाराभिमुख आहे. जर असे असेल तर मग आपल्या शैक्षणिक धोरणांची अशी दुर्दशा का झाली ? आजची शिक्षणप्रणाली तरुणाईला योग्य वळण देण्याऐवजी उच्च शिक्षणाच्या माध्यमातून तरुणांचे फार मोठे आर्थिक शोषण करीत आहे. उच्च शिक्षणसाठी विविध जातींना आरक्षण असले तरी शिक्षणक्षेत्र खाजगी माणसांच्या हाती गेल्याने शिक्षणाचा खर्च व इतर देणग्या सामान्य माणसांच्या आवाक्या बाहेर गेल्या आहेत. लाखो तरुण शिक्षण सोडून घरी बसले आहेत किंवा कुठे तरी खाजगी ठिकाणी नोकर्‍या करीत आहेत.

हजारोच्या सख्येने रोजगार निर्माण होईल, असे दिवास्वप्न दाखवून विद्यापीठे गेल्या सात वर्षात इजिनीअरिंग, मॅनेजमेंट आणि फार्मसीसारख्या व्यावसायीक कोर्सेसच्या कॉलेजेसला मोठ्या संख्येने परवानगी दिली. परिणामी त्या कोर्सेसमधील किमान ३० ते ४० टक्के जागा रिक्त राहत असल्याचे दिसून येतेय. तर कॅम्पस मुलाखतीमार्फत अत्यल्प संख्येने विद्यार्थ्यांना नोकरी मिळतेय.त्यास्थितीत विद्यापीठे आणि उच्च शिक्षणाचा झालेला अफाट विस्तारातून बेरोजगार विद्यार्थ्यांची फौज तयार करणारा ठरतो आहे. हीच स्थिती राज्यातील इतरही प्रदेशात दिसून येते.तेव्हा हे बिघडलेले तंत्र कुणी दुरूस्त करेल काय, विद्यापीठे आणि उच्च शिक्षणाला ताळ्यावर कुणी आणेल काय ? असा सवाल आता उपस्थित होतो आहे.

प्रवीण,मुंबई.
गेले महिनाभर मी माझ्या संस्थेच्या राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यातील कामासाठी वाणिज्य शाखेच्या आणि कृषी पदवीधर असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेत होतो.  त्यामुलाखती घेताना 'शिक्षणाच्या आयचा घो' असाच म्हणावं वस वाटलं. इंदौर मधील एका प्रतिष्टीत महाविद्यालयाच्या 180 उमेदवारांमधून फक्त 4 उमेदवार परीक्षा पास होतात.  जितके वाणिज्य शाखेचे उमेदवार होते एका ही उमेदवाराला ताळेबंद जोडता आला नाही.
याचा अर्थ सरळ सरळ असा होतो की शिक्षणाची पातळी ही प्रचंड घसरली आहे कारण रोजगारासाठी गरजेच्या गोष्टी विद्यापीठे नाहीं देत आहेत. बाजाराची मागणी आणि शिक्षणाचा पुरवठा यात प्रचंड तफावत आहे.

(यातील संबंधित छायाचित्रे इंटरनेटवरून घेतलेली आहेत.

मृगाचा पाऊस

 आफरीन मणेरी ,सांगोला
              पाऊस,पाऊस एक नैसर्गिक घटना आहे .पण मनाला सुखद अनुभव देऊन चिंब करण्याची क्षमता पावसामध्ये आह. पाऊस हा शब्द उच्चारताच मन कसं प्रसन्न होतं .आपल्या आयुष्यात पावसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि या पावसाचे  अनेक प्रकार आहेत जसं की, रिमझिम पाऊस, रिपरिप पाऊस,  पावसाची पिरपिर ,वादळी पाऊस, सरासरी पाऊस, ढग फुटी, कृत्रिम पाऊस, गारांचा पाऊस, मृगाचा पाऊस किंवा वळवाचा पाऊस. मृगाचा पाऊस म्हटलं कि मन लहानपणीच्या आठवणी रमत. लहानपणी मिशीवाले किडे दिसले, सगळे आम्ही एकमेकांना दाखवायचं हे बघ मिशीवाला किडा आला आम्ही त्याच्यासोबत खेळायचं हळदीकुंकू टाकायचं कारण अगोदर आजीनी सांगितलेलं असायचं मिशीवाला किडा दिसला किंवा मिरगे चा किडा दिसला  की  पाऊस येतो. आम्ही विश्वास ठेवायचं आणि हळदीकुंकू टाकण्याचं .हळदी कुंकू टाकण्याच आणि पाऊस येण्याचं कनेक्शन काय होतं हे आतापर्यंत उमगले नाही .पण गंमत येत होती .पाऊस येणार म्हटलं की मन प्रसन्न व्हायचं. पहिला पाऊस म्हटलं की मस्ती, मजा वाटायची .आणि मन एकदम खुश व्हायचं. आजीने सांगितल्याप्रमाणे मिरगाचा पाऊस हेच नाव माहीत होतं. मृगाचा पाऊस हा शब्द मोठे झाल्यावर कळाला .पण अजूनही तो लहानपणीचा मिरगे चा किडा आणि मिरगेचा पाऊस आठवतो.                   मृगाच्या पावसाची सुरुवात सात जूनला होते म्हणूनच त्याला धडका वनी चा पाऊस किंवा मिरगाचा पाऊस म्हटलं जातं पहिल्यांदा पडलेल्या पावसामुळे मातीचा तो मनमोहक सुगंध, उन्हामुळे   त्रस्त झालेल्यांना मृगाचा पाऊस सुगंधित ओलावा देतो .पहिल्या पावसात भिजण्याची मजा घेताना सगळ्या मित्रांना ओढून  आणायचं आणि मनसोक्त नाचायच.पहिला पाऊस म्हणून  भिजताना आईपण रागवत  नव्हती. त्या पहिल्या पावसात कितीतरी आठवणी दडलेल्या आहेत.  अशा या मृगाच्या पावसाची आठवण  कधीही न विसरणारी आहे. पावसात मनसोक्त भिजणार ते बालपण प्रत्येकाच्या जीवनी  असतच आणि ते आपण ते मनसोक्त जगाव आणि आठवणींना नेहमीच उजागर करत  रहावं .आजच्या या धावत्या युगात खरंच अशा पावसाळी आठवणी मनाला सुखद अनुभव देतात  .आणि नवीन प्रेरणेने  काम करायला उस्फुर्त करतात .

____________________________
 वाल्मीक फड , नाशिक

भयंकर ऊकडत असताना माणूस ,जनावरे,पक्षी सगळीच जीवसृष्टी जेव्हा गारवा शोधत असते त्यावेळेस खर्या अर्थाने मृग नक्षत्र जवळ आल्याची आपल्याला अनुभूती येते.ऊन्हाळ्यात गरमाईला सगळेच कंटाळलेले असतात कोण झाडाखाली,कोण फॕनखाली सारखी गारवा मिळविण्यासाठी धडपड.
अशातच आपल्याला सुख देणारा,शेतकर्याच्या आशा पुलकित करणारा एक सुखद अनुभव म्हणजे मृगाचा पाऊस होय.
हा पाऊस जर झाला त्या वर्षात जवळजवळ दुष्काळ हा शब्द बोलायची गरज नाही.माझ्या अनुभवात गेली सात आठ वर्षापासून हा पाऊस पडतच नाही त्यामुळेच शेतकर्यांचे अतिशय नुकसान झालेले आहे.
मृगाचा पाऊस सांगायचा म्हणजे जुना काळ आहे तो!एक दिवस गायी शेळ्या घेऊन रानात चारायला गेलो जनावरे पाणी पाजली जास्तच ऊकाडा होत असल्यामुळे जनावरेही सावलीला येऊन निवांत बसली.मिही पाणी घेऊन आलो आणि बरोबर आणलेली मिरची भाकर खाऊ लागलो.माझ्या जवळ बसलेल्या मोत्यालाही भाकरी दिली तोही गरम्याने हैराण झालेला होता.साधारण दोन एक तास गेला आणी आकाशात ढगांनी गर्दी करायला सुरूवात केली.पाखरे इकडून तिकडे पळायला लागली.गायींनीही कान टवकारले होते.आता मला कळून चुकले होते की,पाऊस येणार मी लगेचच जवळच थोड्या अंतरावर असलेल्या साबरकांडीच्या दिशेने गुरांना शेळ्यांना हाकलायला सुरुवात केली पण तिथे पोहोचण्याच्या आतच मोठमोठाले थेंब,विजांचा गडगडाट त्या आवाजाने शेळ्या अधिकच घाबरलेल्या होत्या.कसेबसे त्यांना निवार्याला नेले.समोर इकडेतिकडे काहीही दिसत नव्हते.सकाळी पावसाचे वातावरण नव्हते पण एकाएकी आलेल्या या पावसाने मला खुप बदडले.घोंगटे आणलेले नव्हते त्यामुळे पुर्ण कपडे ओले झाल्यामुळे दातावर दात आपटत होते दोन तास पाऊस चालू होता आणी मिही त्या साबरकांडीत डोके खोऊन बसलेलो होतो.
आता थोडा पाऊस कमी झाला होता अजूबाजूला पाहीले शेताचे बांध तुडूंब भरून त्यांच्यावरुन पाणी वहात होते.आता जनावरे थोडी खडकाळ जागेकडे हुसकली आणी इकडेतिकडे पहात असताना एक नाग मला आमच्या दिशेने येताना दिसला.एका क्षणात नागोबाला जागेवरच पाणी पाजलं. 
आता प्रश्न पडला घरी जाण्याचा साधारण संध्याकाळच्या सहाची वेळ होती आणि नेमका घरी जाण्याचा रस्ता मोठ्या ओहोळाचा तिथून जाणे अशक्यच होते.रस्त्याने ओहोळाचा दिशेने गुरांना घेऊन निघालो ओहाळाजवळ आल्यावर ओहोळाच्या त्या कडेला आमचे चुलता काही चुलत भाऊ असे सगळेजण थांबलेले होते.त्यांच्या मदतीने मि शेळ्या तिकडच्या कडेला घेण्यास सुरुवात केली,हरणी गाय पाण्यात शिरली तिच्या पाठोपाठ सगळ्याच गायी त्याकडेला निघाल्या आणी शेळ्याही त्याकडेला काढल्या.अंग पुर्ण ओलेच होते.बंधारे पहील्या पावसात तुडूंब भरले होते गावातील लोकांच्या मुद्रा एखाद्या विजयी सेनापती प्रमाणे दिसत होते लोक खुप खुश होते.
एकदाचे घरी पोहोचलो गुरे सपरात बांधले आणी ओले कपडे बदलतच आईला विचारले"काय कोड्यास केलंय?" जेवायला बसलो दोन भाकरींचा मुडदा पाडला खुप चव होती त्या भाकरीला कारण भुकही लागलेली होती आणी आईने प्रेमानेही बनवली होती.
असा हा मृगाचा पाऊस कधीही आठवणीतून न जाणारा माझ्यासाठी झाला.

____________________________
किरण पवार,औरंगाबाद

चाहूल घेऊन येणारा 
हिरव्याने नव्या पालव्या फुलवणारा,

थोडस हल्कसं वातावरण
आणि तल्लक लावून धरणारा,

मातीत चारदोन थेंब मिसळताच
आलबेल सुगंधात न्हाऊन निघणारा,

प्रियकर प्रेयसीला एका अनोळखी
जगात नेऊन सोडणारा,

शेतकऱ्यासाठी वाट पहायला लावून
त्यालाच कधीकधी चुकवणारा,

मृगाचा पाऊस पुन्हा चिंब करून
खिडकीत प्रत्येकाला बसायला लावणारा,

थोड्याशा कठीण काळात
हा कधीही दगा देऊन जाणारा.

____________________________
Image result for raining farmer images
दत्तात्रय विश्वनाथ डोईफोडे, वाशिम.

आला आला परत आला पाऊस,
तहान भागवल्याविन आता नको जाऊस।

नसला पाऊस तर खूप येते आठवण,
जाताना देऊन जातो नेहमी प्रेमाची साठवण।

नसला पाऊस तर जमिनीवरही किती पडतात भेगा,
आला एकदाचा पाऊस की कुठं दिसतात त्या जागा।

नसला पाऊस की कुठं रान शेतकऱ्यांचं पिकतं,
पाऊस आला की बघा कसं हिरवळीने रान चकाकतं।

नसला पाऊस तर किती जीव तरमळतो,
पहिला पाऊस पडताच किती सुगंध दरवळतो।

पाऊसच तर देतो आपल्याला अमूल्य ते पाणी,
पाऊसच तर आहे पूर्ण जीवचक्राची संजीवनी।

निळ्या नाभवरती काळे ढग जेव्हा जमतात,
तेव्हाच तर सर्वसामान्यांचे चेहरे हसरे बनतात।

____________________________
Related image
प्रविण दळवी,नाशिक

पहिला पाऊस यायचा, कधी अगदीच लवकर तर कधी बराच उशीरा. पण मृगाचा पाऊस पडला की काय मस्तं वाटायचं. अगदी लहान होतो तेव्हाचंही आठवतंय. आमचं घर मुख्य रस्त्यापासून बरंच आत आहे. आणि मी लहान असताना घरापर्यंत जायला डांबरी रस्ताही नव्हता. घराच्या पुढे (कॉलनीमधे) खूप मोकळी जागा होती. शिवाय सगळी वसाहत शेतजमिनीवर झाल्याने चिखलही भरपूर व्हायचा. मोठ्या लोकांची आपली कुरकूर सुरू असायची. पण आम्हाला मात्र मोकळं मैदान, त्यात पावसाचं साचणारं पाणी खूप आवडायचं. त्या साचलेल्या डबक्यात धप्पाक्कन् एक पाय देऊन किंवा उडी मारून मिळणारा आनंद शब्दात व्यक्तं कसा करता येईल ? एकदा तर खूप पाऊस झाला, घराबाहेरच्या मोकळ्या मैदानात पाणी अगदी गुडघ्या पर्यंत साचलं. वाहतं पाणी होतं ते... मला दम कुठला, मी आणि माझा मित्र अगदी अनवाणी पायाने त्या पाण्यात कितीतरी वेळी भटकलो. शेवटी थकून घरी येताना कपड्यांकडे लक्षं गेलं... घरी गेल्यावर काय झालं ते सांगायलाच नको!

पावसात एक गोष्टं व्हायची, रस्त्यावर भरपूर चिखल झालेला असायचा अन शाळेच्या रस्त्यावर एका विशिष्ट ठिकाणी, शाळेत जाणार्‍या मुलामुलींपैकी कोणाची तरी चप्पल चिखलात घसरून तो/ती चिखलात पडलेला असायचा. माझ्यावर कधी ही पाळी आली नाही, पण पडलेल्या मुलामुलींवर हसण्याचं सुखं मात्र भरपूर घेतलंय. कितीतरी मुलामुलींना पावसाळी दिवसात रस्त्यावरून कसं चालावं तेच माहीत नसतं. चिखल बघून, घसरड्या जागा बघून चालणे वेगळे, आणि भर रस्त्यावर (पातळ) चिखलात चालणे वेगळे. कितीतरी मुलं चपला घालून ह्या चिखलात फताक फताक आवाज करत चालतात, त्यामुळे त्या मुलांचा पार्श्वभाग शिंतोड्यांनी मस्तं भरला जातो. हे टाळायचं असेल तर चिखलात चालताना टाचेवर भर देऊन चालावे, पाऊल पुढे टाकतानाही टाचेवर भर दिला तर पाठीवर असे शिंतोडे उडत नाहीत! मी लहान असताना पावसात अजून एक फायदा होता... शाळेच्या वेळेत जोरदार पाऊस आला की छपरावर होणार्‍या पावसाच्या कर्कश्श आवाजात मास्तरांचा आवाज सगळ्यांपर्यंत पोहचायचाच नाही. मग त्या तासाला न शिकवता काहीतरी वेगळंच केलं जायचं तसेच, घरी परत येताना, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकमधून लिक झालेल्या ऑइल/पेट्रोलमुळे साचलेल्या पाण्यात तयार होणार्‍या चमकत्या सप्तरंगात स्वतःला हरवून टाकावं वाटायचं!

पावसाच्या साचलेल्या पाण्यात कागदाच्या होड्या तयार करून न सोडलेला माणूस शोधूनही सापडणार नाही. तो तर पावसाच्या दिवसातला छंदच असतो कित्येकांचा. पण ह्या दिवसात आम्ही कॉलनीतले मित्र अजून एक खेळ खेळायचो... "खुपसणी". आता नियम आठवत नाहीत, पण एका लोखंडी गजाचा तुकडा (म्हणजेच खुपसणी) एका विशिष्टं पद्धतीने पावसाने ओल्या झालेल्या जमिनीत खुपसेल असा फेकण्याचा काहीतरी प्रकार होता. कोणा एकावर राज्य असायचं आणि बाकीचे खुपसणी जमिनीत खुपसत पुढे जायचे. जिथे खुपसणी जमिनीत खुपसल्या गेली नाही तिथे तो मुलगा बाद व्हायचा. आणि सगळे बाद झालेल्या ठिकाणावरून राज्य असलेला मुलाला एका दमात लंगडत सुरवातीच्या ठिकाणी यायला लागायचं. मजा यायची पावसाने भिजलेल्या जमिनीत, आणि थंडगार वातावरणात खेळताना.

पावसामुळे अजून एक गोष्ट व्हायची... आमच्या घराच्या गच्चीच्या स्लॅबचा उतार नीट न काढल्याने गच्चीवरही जागोजाग पाणी साचायचं. हे पाणी स्लॅबमधे मुरून घरात आतल्या भागात ओल यायची. त्यामुळे पाऊस पडून थांबला की आम्ही भाऊ-बहीण गच्चीवर जाऊन पाणी पायाने बाहेर काढायचो. मी लहान असतानाचे दिवस म्हणजे दूरदर्शनचे दिवस. पाऊस पडून गेला की पावसामुळे म्हणा किंवा वार्‍यामुळे म्हणा एंटीना हालायचा आणि टीव्हीवर फक्तं मुंग्या दिसायच्या. आम्हा तिघांपैकी मग एकजण एंटीना हालवायचं काम करायचा, एकजण गच्चीच्या कडेला आणि तिसरा खाली खिडकीपाशी असायचा. मग थोडं उजवीकडे, थोडं डावीकडे असं ओरडत टीव्हीवरच्या मुंग्या कमी झाल्या की परत सगळे घरात. पावसाळ्यात हा प्रकार नेहमीचाच!

या दिवसात टीव्हीवर मुंग्या यायच्याच, पण सर्वत्र अन्य प्राण्यांची संख्याही वाढायची. ह्या अन्य-प्राण्यात पहिला नंबर लागतो तो बेडकांचा. चिखल आणि भरपूर साचलेलं पाणी असलं की बेडूकही भरपूर व्हायचे. एरवी न दिसणारा हा प्राणी पाऊस पडला की लगेच एवढ्या मोठ्या संख्येने आणि एवढ्या ताबडतोब कसा हजर होतो हे मला न सुटलेलं कोडं आहे. तसेच दिवसभर न ओरडणारे बेडूक रात्र झाल्यावरच का डराव डराव करतात हे दुसरं कोडं! आमच्या घरचा संडास दिवसरात्र बंद असूनही, दरवर्षी एकदातरी तिथे एक बेडूक जाऊन बसलेलाच असायचा. अशा संकटसमयी त्या बेडकाला लवकरात लवकर बाहेर काढताना त्रेधा उडायची बेडकांमध्ये काही बेडकांची त्वचा अगदी चोपडी असायची आणि त्यांचा रंगही वेगवेगळा आणि आकर्षक असायचा, तेवढच काय ते बेडकांबद्दल नवल वाटण्यासारखं! पावसात दिसणारा दुसरा प्राणी म्हणजे गोगलगाय. ह्या गोगलयींचेही तीन प्रकार आहेत. एक -शंख पाठीवर असलेली, दोन - लाल रंगाची, खूप पाय असलेली आणि शेकडोंच्या घोळक्याने दिसणारी, आणि तिसरी म्हणजे शेंबडी गोगलगाय. ही गोगलगाय माझी सगळ्यात नावडती... चपटी, लिबलिबीत आणि जिथून चालत गेली त्या जागेवर शेंबूड सोडणारी! पावसाळी दिवसात गांडूळही बर्‍याच प्रमाणात दिसायचे. आणि क्वचित निघणारा प्राणी म्हणजे साप! पाऊस पडून गेल्यावर आणि सगळीकडे हिरवेगार झाल्यावर दिसणार्‍या फुलपाखरांना आणि काजव्यांना विसरून कसं चालेल. लहानपणीचे कितीतरी दिवस ह्या फुलपाखरांच्या मागे धावण्यात आणि पकडण्यात गेलेत.

फुलपाखरांमागे धावता धावता दिवसही कसे भुर्र्कन उडून गेले ते कळलंच नाही. मृगाचा पाऊस, मातीचा सुगंध, रिमझीम पावसात प्यायलेला वाफाळता चहा किंवा खाल्लेली गरम गरम भजी, हिरवे हिरवे गार गालिचे तर सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचे. पण एखादा दिवस असा येतो की बाहेर जमलेल्या काळ्या ढगांसारखं, मनातही आभाळ दाटून येतं आणि आठवणींचा पाऊस डोळ्यातून बरसू लागतो.

____________________________
Image result for raining time tea images
अक्षय कांबळे,पालघर.

लोकांना पाऊस म्हटलं की बऱ्याच गोष्टी आठवतात. त्यातल्या त्यात चहा पहिला आठवतो. आणि आठवयलाच हवा. चहा आणि पाऊस म्हणजे अहाहा ! अमृततुल्य !!! काहींना कविता सुचतात. चारोळ्या ढिगाने पडतात आज काल व्हॉटसअप वर. कुणाला पाऊस आवडतो तर कुणाला पावसात भिजणारी ती आवडते पासून न जाणो काय आणि काय. विविध रूपे पाहायला मिळतात आपल्याला पावसाची. मला फक्त एकच पाऊस आठवतो. मुंबापुरीत खळबळ माजवून टाकणारा. गेली 3 वर्ष मी वसतिगृहात राहतोय. परळ ला. दक्षिण मुंबई मधला एक महत्वाचा पट्टा. मुंबईत माणूस येतो अनेक कारणं असतील त्यातील 2 महत्वाची म्हणजे एक तर त्याला जगायचं आहे म्हणून किंवा आजाराने ग्रस्त आहे. आणि केईम हॉस्पिटल, वाडिया लहान मुलांचं हॉस्पिटल आणि कॅन्सर पेशंट साठी असलेलं टाटा हॉस्पिटल एकमेकांपासून थोड्याच अंतरावर आहेत. गजबजलेला परिसर आणि पडणारा पाऊस ही तेवढाच. प्रत्येक वर्षी पाऊस पडला की मुंबईकरांचं स्पिरीट जागृत व्हावच लागतं कारण महापालिकेकडून कुठल्याही अपेक्षा करणं म्हणजे मूर्खपणा ठरावा. आणि गेली कित्येक वर्षे आमच्या नशिबी हेच आलं आहे.
            मागच्या वर्षीची गोष्ट. आम्ही पशुवैद्यकीय महाविद्यालय वसतिगृहात राहत असल्यामुळे केईम मध्ये कुणाला रक्ताची गरज पडली की आपली मुलं हक्कांन जातात. परंपरा झाली आहे म्हणायला गेलं तर. त्या दिवशी असाच संध्याकाळ पासून पाऊस पडत होता. रात्री 11.30 च्या सुमारास वर्दी आली वॉर्डन कडून की केईम ला जायचं आहे, 3 बाटल्या रक्त हवं आहे. B +ve रक्तगट असणाऱ्या मुलांनी लवकरात लवकर जाऊन या.
            आम्ही पोहोचलो. हॉस्पिटलच्या ग्राउंड फ्लोअर ची दशा पाहवत नव्हती. पेशंट ना वरच्या बाजूला शिफ्ट करत होते. नातेवाईक आणि इतर वॉर्ड बॉय यांची वादावादी सुरू होती. आम्हाला रक्त देऊन परत हॉस्टेल ला यायचं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेज होतं पुन्हा. आम्ही दुसऱ्या मजल्यावर पोहोचलो जिथे चेअर्स ठेवल्या होत्या. वरून छत गळत होतं. आम्ही तिघांनी कसं बसं रक्तदान केलं. पण तेव्हा आपण काही तरी छान काम करतोय याचा लवलेशही मनाला स्पर्श करत नव्हता. कुठे या झमेल्यात अडकलो असच वाटत होतं. हॉस्पिटल मध्ये साहित्याची वानवा होती. बाहेरून काही मागवता येत नव्हतं. कारण पाऊस एवढा पडला होता की कुणी या दिशेला फिरकायला सुद्धा तयार नव्हतं. त्या दिवशी जाणवलं की इथे पाऊस पडला म्हणजे याहूनही वाईट अवस्था होते. ग्राउंड फ्लोअर ची. या वर्षी खर्च करून दुरुस्ती केली होती म्हणून परिस्थिती थोडी बरी होती.
            लोकांना पावसा बद्दल काय वाटतं याची कल्पना आहे मला पण गेल्या 3 वर्षात मी फक्त अनुभवलं आहे फक्त गैरसोय आणि गैरसोय. यालाच आम्ही गोंडस नाव दिलं आहे मुंबईकरांचा स्पिरीट. आम्हाला सवय पडलीय या सगळ्याची. आमचं काहीही होणार नाही. मग पाऊस येवो अथवा त्सुनामी येवो.

____________________________

Related image
रुपाली आगलावे, सांगोला
पाऊस वारा, रिमझीम धारा
कशा कोसळती नभातुन गारा..

पाऊस येता, मनही भिजे
ओल्या आठवणीत त्या दिवसांच्या...

आला पाऊस, भिजली माती
अतूट नाते धरणीमातेशी...

अंकुर फुटले, शेत फुलले
हिरवळ बघून मनही बागडे...

होईल सुखी शेतकरी माझा 
घेईल ध्यास उद्याच्या आशेचा..

पिकेल शेती, बनतील मोती
पाऊस येता सरी वर सारी...
पाऊस येता सरी वर सरी....

____________________________
Image result for raining farmer images
संगीता देशमुख,वसमत

मृगाचा पाऊस,
धोधो कोसळला तरी
नाही तो,
अवकाळी पावसासारखा...
रोंरों करत घोंघावणारा...
अचानक येऊन धुमाकूळ घालणारा...
बेसावध शेतकऱ्यांची
राने धुवून नेणारा .... 

मृगाचा पाऊस,
ज्याच्या वाटेकडे 
कोरड्या डोळ्याने 
वाट पहात 
बसलेल्या शेतकऱ्यांच्या
डोळ्यात ओल पेरणारा...
शेतकऱ्यांच्या डोळ्यात 
चिक्कार स्वप्नं पेरणारा...

मृगाचा पाऊस,
रणरणत्या उन्हात 
वसुंधरेवर अलवार 
प्रेमसरींचा वर्षाव करणारा...

मृगाचा पाऊस,
चातकाची दीर्घ तृष्णा
भागवणारा....

मृगाचा पाऊस,
चराचराला संजीवनी देणारा....

पण,
यानेही आज रूप बदलले,
तोही वागतो,
माणसासारखा लहरी...
स्वतःचाच  नेम चुकवतो,

चराचराला कधी 
सुखात चिंब भिजवतो,
तर कधी 
कोरडाठाक होऊन
शुष्क मनाने
रडवतोस...

____________________________

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************