मृगाचा पाऊस

 आफरीन मणेरी ,सांगोला
              पाऊस,पाऊस एक नैसर्गिक घटना आहे .पण मनाला सुखद अनुभव देऊन चिंब करण्याची क्षमता पावसामध्ये आह. पाऊस हा शब्द उच्चारताच मन कसं प्रसन्न होतं .आपल्या आयुष्यात पावसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि या पावसाचे  अनेक प्रकार आहेत जसं की, रिमझिम पाऊस, रिपरिप पाऊस,  पावसाची पिरपिर ,वादळी पाऊस, सरासरी पाऊस, ढग फुटी, कृत्रिम पाऊस, गारांचा पाऊस, मृगाचा पाऊस किंवा वळवाचा पाऊस. मृगाचा पाऊस म्हटलं कि मन लहानपणीच्या आठवणी रमत. लहानपणी मिशीवाले किडे दिसले, सगळे आम्ही एकमेकांना दाखवायचं हे बघ मिशीवाला किडा आला आम्ही त्याच्यासोबत खेळायचं हळदीकुंकू टाकायचं कारण अगोदर आजीनी सांगितलेलं असायचं मिशीवाला किडा दिसला किंवा मिरगे चा किडा दिसला  की  पाऊस येतो. आम्ही विश्वास ठेवायचं आणि हळदीकुंकू टाकण्याचं .हळदी कुंकू टाकण्याच आणि पाऊस येण्याचं कनेक्शन काय होतं हे आतापर्यंत उमगले नाही .पण गंमत येत होती .पाऊस येणार म्हटलं की मन प्रसन्न व्हायचं. पहिला पाऊस म्हटलं की मस्ती, मजा वाटायची .आणि मन एकदम खुश व्हायचं. आजीने सांगितल्याप्रमाणे मिरगाचा पाऊस हेच नाव माहीत होतं. मृगाचा पाऊस हा शब्द मोठे झाल्यावर कळाला .पण अजूनही तो लहानपणीचा मिरगे चा किडा आणि मिरगेचा पाऊस आठवतो.                   मृगाच्या पावसाची सुरुवात सात जूनला होते म्हणूनच त्याला धडका वनी चा पाऊस किंवा मिरगाचा पाऊस म्हटलं जातं पहिल्यांदा पडलेल्या पावसामुळे मातीचा तो मनमोहक सुगंध, उन्हामुळे   त्रस्त झालेल्यांना मृगाचा पाऊस सुगंधित ओलावा देतो .पहिल्या पावसात भिजण्याची मजा घेताना सगळ्या मित्रांना ओढून  आणायचं आणि मनसोक्त नाचायच.पहिला पाऊस म्हणून  भिजताना आईपण रागवत  नव्हती. त्या पहिल्या पावसात कितीतरी आठवणी दडलेल्या आहेत.  अशा या मृगाच्या पावसाची आठवण  कधीही न विसरणारी आहे. पावसात मनसोक्त भिजणार ते बालपण प्रत्येकाच्या जीवनी  असतच आणि ते आपण ते मनसोक्त जगाव आणि आठवणींना नेहमीच उजागर करत  रहावं .आजच्या या धावत्या युगात खरंच अशा पावसाळी आठवणी मनाला सुखद अनुभव देतात  .आणि नवीन प्रेरणेने  काम करायला उस्फुर्त करतात .

____________________________
 वाल्मीक फड , नाशिक

भयंकर ऊकडत असताना माणूस ,जनावरे,पक्षी सगळीच जीवसृष्टी जेव्हा गारवा शोधत असते त्यावेळेस खर्या अर्थाने मृग नक्षत्र जवळ आल्याची आपल्याला अनुभूती येते.ऊन्हाळ्यात गरमाईला सगळेच कंटाळलेले असतात कोण झाडाखाली,कोण फॕनखाली सारखी गारवा मिळविण्यासाठी धडपड.
अशातच आपल्याला सुख देणारा,शेतकर्याच्या आशा पुलकित करणारा एक सुखद अनुभव म्हणजे मृगाचा पाऊस होय.
हा पाऊस जर झाला त्या वर्षात जवळजवळ दुष्काळ हा शब्द बोलायची गरज नाही.माझ्या अनुभवात गेली सात आठ वर्षापासून हा पाऊस पडतच नाही त्यामुळेच शेतकर्यांचे अतिशय नुकसान झालेले आहे.
मृगाचा पाऊस सांगायचा म्हणजे जुना काळ आहे तो!एक दिवस गायी शेळ्या घेऊन रानात चारायला गेलो जनावरे पाणी पाजली जास्तच ऊकाडा होत असल्यामुळे जनावरेही सावलीला येऊन निवांत बसली.मिही पाणी घेऊन आलो आणि बरोबर आणलेली मिरची भाकर खाऊ लागलो.माझ्या जवळ बसलेल्या मोत्यालाही भाकरी दिली तोही गरम्याने हैराण झालेला होता.साधारण दोन एक तास गेला आणी आकाशात ढगांनी गर्दी करायला सुरूवात केली.पाखरे इकडून तिकडे पळायला लागली.गायींनीही कान टवकारले होते.आता मला कळून चुकले होते की,पाऊस येणार मी लगेचच जवळच थोड्या अंतरावर असलेल्या साबरकांडीच्या दिशेने गुरांना शेळ्यांना हाकलायला सुरुवात केली पण तिथे पोहोचण्याच्या आतच मोठमोठाले थेंब,विजांचा गडगडाट त्या आवाजाने शेळ्या अधिकच घाबरलेल्या होत्या.कसेबसे त्यांना निवार्याला नेले.समोर इकडेतिकडे काहीही दिसत नव्हते.सकाळी पावसाचे वातावरण नव्हते पण एकाएकी आलेल्या या पावसाने मला खुप बदडले.घोंगटे आणलेले नव्हते त्यामुळे पुर्ण कपडे ओले झाल्यामुळे दातावर दात आपटत होते दोन तास पाऊस चालू होता आणी मिही त्या साबरकांडीत डोके खोऊन बसलेलो होतो.
आता थोडा पाऊस कमी झाला होता अजूबाजूला पाहीले शेताचे बांध तुडूंब भरून त्यांच्यावरुन पाणी वहात होते.आता जनावरे थोडी खडकाळ जागेकडे हुसकली आणी इकडेतिकडे पहात असताना एक नाग मला आमच्या दिशेने येताना दिसला.एका क्षणात नागोबाला जागेवरच पाणी पाजलं. 
आता प्रश्न पडला घरी जाण्याचा साधारण संध्याकाळच्या सहाची वेळ होती आणि नेमका घरी जाण्याचा रस्ता मोठ्या ओहोळाचा तिथून जाणे अशक्यच होते.रस्त्याने ओहोळाचा दिशेने गुरांना घेऊन निघालो ओहाळाजवळ आल्यावर ओहोळाच्या त्या कडेला आमचे चुलता काही चुलत भाऊ असे सगळेजण थांबलेले होते.त्यांच्या मदतीने मि शेळ्या तिकडच्या कडेला घेण्यास सुरुवात केली,हरणी गाय पाण्यात शिरली तिच्या पाठोपाठ सगळ्याच गायी त्याकडेला निघाल्या आणी शेळ्याही त्याकडेला काढल्या.अंग पुर्ण ओलेच होते.बंधारे पहील्या पावसात तुडूंब भरले होते गावातील लोकांच्या मुद्रा एखाद्या विजयी सेनापती प्रमाणे दिसत होते लोक खुप खुश होते.
एकदाचे घरी पोहोचलो गुरे सपरात बांधले आणी ओले कपडे बदलतच आईला विचारले"काय कोड्यास केलंय?" जेवायला बसलो दोन भाकरींचा मुडदा पाडला खुप चव होती त्या भाकरीला कारण भुकही लागलेली होती आणी आईने प्रेमानेही बनवली होती.
असा हा मृगाचा पाऊस कधीही आठवणीतून न जाणारा माझ्यासाठी झाला.

____________________________
किरण पवार,औरंगाबाद

चाहूल घेऊन येणारा 
हिरव्याने नव्या पालव्या फुलवणारा,

थोडस हल्कसं वातावरण
आणि तल्लक लावून धरणारा,

मातीत चारदोन थेंब मिसळताच
आलबेल सुगंधात न्हाऊन निघणारा,

प्रियकर प्रेयसीला एका अनोळखी
जगात नेऊन सोडणारा,

शेतकऱ्यासाठी वाट पहायला लावून
त्यालाच कधीकधी चुकवणारा,

मृगाचा पाऊस पुन्हा चिंब करून
खिडकीत प्रत्येकाला बसायला लावणारा,

थोड्याशा कठीण काळात
हा कधीही दगा देऊन जाणारा.

____________________________
Image result for raining farmer images
दत्तात्रय विश्वनाथ डोईफोडे, वाशिम.

आला आला परत आला पाऊस,
तहान भागवल्याविन आता नको जाऊस।

नसला पाऊस तर खूप येते आठवण,
जाताना देऊन जातो नेहमी प्रेमाची साठवण।

नसला पाऊस तर जमिनीवरही किती पडतात भेगा,
आला एकदाचा पाऊस की कुठं दिसतात त्या जागा।

नसला पाऊस की कुठं रान शेतकऱ्यांचं पिकतं,
पाऊस आला की बघा कसं हिरवळीने रान चकाकतं।

नसला पाऊस तर किती जीव तरमळतो,
पहिला पाऊस पडताच किती सुगंध दरवळतो।

पाऊसच तर देतो आपल्याला अमूल्य ते पाणी,
पाऊसच तर आहे पूर्ण जीवचक्राची संजीवनी।

निळ्या नाभवरती काळे ढग जेव्हा जमतात,
तेव्हाच तर सर्वसामान्यांचे चेहरे हसरे बनतात।

____________________________
Related image
प्रविण दळवी,नाशिक

पहिला पाऊस यायचा, कधी अगदीच लवकर तर कधी बराच उशीरा. पण मृगाचा पाऊस पडला की काय मस्तं वाटायचं. अगदी लहान होतो तेव्हाचंही आठवतंय. आमचं घर मुख्य रस्त्यापासून बरंच आत आहे. आणि मी लहान असताना घरापर्यंत जायला डांबरी रस्ताही नव्हता. घराच्या पुढे (कॉलनीमधे) खूप मोकळी जागा होती. शिवाय सगळी वसाहत शेतजमिनीवर झाल्याने चिखलही भरपूर व्हायचा. मोठ्या लोकांची आपली कुरकूर सुरू असायची. पण आम्हाला मात्र मोकळं मैदान, त्यात पावसाचं साचणारं पाणी खूप आवडायचं. त्या साचलेल्या डबक्यात धप्पाक्कन् एक पाय देऊन किंवा उडी मारून मिळणारा आनंद शब्दात व्यक्तं कसा करता येईल ? एकदा तर खूप पाऊस झाला, घराबाहेरच्या मोकळ्या मैदानात पाणी अगदी गुडघ्या पर्यंत साचलं. वाहतं पाणी होतं ते... मला दम कुठला, मी आणि माझा मित्र अगदी अनवाणी पायाने त्या पाण्यात कितीतरी वेळी भटकलो. शेवटी थकून घरी येताना कपड्यांकडे लक्षं गेलं... घरी गेल्यावर काय झालं ते सांगायलाच नको!

पावसात एक गोष्टं व्हायची, रस्त्यावर भरपूर चिखल झालेला असायचा अन शाळेच्या रस्त्यावर एका विशिष्ट ठिकाणी, शाळेत जाणार्‍या मुलामुलींपैकी कोणाची तरी चप्पल चिखलात घसरून तो/ती चिखलात पडलेला असायचा. माझ्यावर कधी ही पाळी आली नाही, पण पडलेल्या मुलामुलींवर हसण्याचं सुखं मात्र भरपूर घेतलंय. कितीतरी मुलामुलींना पावसाळी दिवसात रस्त्यावरून कसं चालावं तेच माहीत नसतं. चिखल बघून, घसरड्या जागा बघून चालणे वेगळे, आणि भर रस्त्यावर (पातळ) चिखलात चालणे वेगळे. कितीतरी मुलं चपला घालून ह्या चिखलात फताक फताक आवाज करत चालतात, त्यामुळे त्या मुलांचा पार्श्वभाग शिंतोड्यांनी मस्तं भरला जातो. हे टाळायचं असेल तर चिखलात चालताना टाचेवर भर देऊन चालावे, पाऊल पुढे टाकतानाही टाचेवर भर दिला तर पाठीवर असे शिंतोडे उडत नाहीत! मी लहान असताना पावसात अजून एक फायदा होता... शाळेच्या वेळेत जोरदार पाऊस आला की छपरावर होणार्‍या पावसाच्या कर्कश्श आवाजात मास्तरांचा आवाज सगळ्यांपर्यंत पोहचायचाच नाही. मग त्या तासाला न शिकवता काहीतरी वेगळंच केलं जायचं तसेच, घरी परत येताना, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकमधून लिक झालेल्या ऑइल/पेट्रोलमुळे साचलेल्या पाण्यात तयार होणार्‍या चमकत्या सप्तरंगात स्वतःला हरवून टाकावं वाटायचं!

पावसाच्या साचलेल्या पाण्यात कागदाच्या होड्या तयार करून न सोडलेला माणूस शोधूनही सापडणार नाही. तो तर पावसाच्या दिवसातला छंदच असतो कित्येकांचा. पण ह्या दिवसात आम्ही कॉलनीतले मित्र अजून एक खेळ खेळायचो... "खुपसणी". आता नियम आठवत नाहीत, पण एका लोखंडी गजाचा तुकडा (म्हणजेच खुपसणी) एका विशिष्टं पद्धतीने पावसाने ओल्या झालेल्या जमिनीत खुपसेल असा फेकण्याचा काहीतरी प्रकार होता. कोणा एकावर राज्य असायचं आणि बाकीचे खुपसणी जमिनीत खुपसत पुढे जायचे. जिथे खुपसणी जमिनीत खुपसल्या गेली नाही तिथे तो मुलगा बाद व्हायचा. आणि सगळे बाद झालेल्या ठिकाणावरून राज्य असलेला मुलाला एका दमात लंगडत सुरवातीच्या ठिकाणी यायला लागायचं. मजा यायची पावसाने भिजलेल्या जमिनीत, आणि थंडगार वातावरणात खेळताना.

पावसामुळे अजून एक गोष्ट व्हायची... आमच्या घराच्या गच्चीच्या स्लॅबचा उतार नीट न काढल्याने गच्चीवरही जागोजाग पाणी साचायचं. हे पाणी स्लॅबमधे मुरून घरात आतल्या भागात ओल यायची. त्यामुळे पाऊस पडून थांबला की आम्ही भाऊ-बहीण गच्चीवर जाऊन पाणी पायाने बाहेर काढायचो. मी लहान असतानाचे दिवस म्हणजे दूरदर्शनचे दिवस. पाऊस पडून गेला की पावसामुळे म्हणा किंवा वार्‍यामुळे म्हणा एंटीना हालायचा आणि टीव्हीवर फक्तं मुंग्या दिसायच्या. आम्हा तिघांपैकी मग एकजण एंटीना हालवायचं काम करायचा, एकजण गच्चीच्या कडेला आणि तिसरा खाली खिडकीपाशी असायचा. मग थोडं उजवीकडे, थोडं डावीकडे असं ओरडत टीव्हीवरच्या मुंग्या कमी झाल्या की परत सगळे घरात. पावसाळ्यात हा प्रकार नेहमीचाच!

या दिवसात टीव्हीवर मुंग्या यायच्याच, पण सर्वत्र अन्य प्राण्यांची संख्याही वाढायची. ह्या अन्य-प्राण्यात पहिला नंबर लागतो तो बेडकांचा. चिखल आणि भरपूर साचलेलं पाणी असलं की बेडूकही भरपूर व्हायचे. एरवी न दिसणारा हा प्राणी पाऊस पडला की लगेच एवढ्या मोठ्या संख्येने आणि एवढ्या ताबडतोब कसा हजर होतो हे मला न सुटलेलं कोडं आहे. तसेच दिवसभर न ओरडणारे बेडूक रात्र झाल्यावरच का डराव डराव करतात हे दुसरं कोडं! आमच्या घरचा संडास दिवसरात्र बंद असूनही, दरवर्षी एकदातरी तिथे एक बेडूक जाऊन बसलेलाच असायचा. अशा संकटसमयी त्या बेडकाला लवकरात लवकर बाहेर काढताना त्रेधा उडायची बेडकांमध्ये काही बेडकांची त्वचा अगदी चोपडी असायची आणि त्यांचा रंगही वेगवेगळा आणि आकर्षक असायचा, तेवढच काय ते बेडकांबद्दल नवल वाटण्यासारखं! पावसात दिसणारा दुसरा प्राणी म्हणजे गोगलगाय. ह्या गोगलयींचेही तीन प्रकार आहेत. एक -शंख पाठीवर असलेली, दोन - लाल रंगाची, खूप पाय असलेली आणि शेकडोंच्या घोळक्याने दिसणारी, आणि तिसरी म्हणजे शेंबडी गोगलगाय. ही गोगलगाय माझी सगळ्यात नावडती... चपटी, लिबलिबीत आणि जिथून चालत गेली त्या जागेवर शेंबूड सोडणारी! पावसाळी दिवसात गांडूळही बर्‍याच प्रमाणात दिसायचे. आणि क्वचित निघणारा प्राणी म्हणजे साप! पाऊस पडून गेल्यावर आणि सगळीकडे हिरवेगार झाल्यावर दिसणार्‍या फुलपाखरांना आणि काजव्यांना विसरून कसं चालेल. लहानपणीचे कितीतरी दिवस ह्या फुलपाखरांच्या मागे धावण्यात आणि पकडण्यात गेलेत.

फुलपाखरांमागे धावता धावता दिवसही कसे भुर्र्कन उडून गेले ते कळलंच नाही. मृगाचा पाऊस, मातीचा सुगंध, रिमझीम पावसात प्यायलेला वाफाळता चहा किंवा खाल्लेली गरम गरम भजी, हिरवे हिरवे गार गालिचे तर सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचे. पण एखादा दिवस असा येतो की बाहेर जमलेल्या काळ्या ढगांसारखं, मनातही आभाळ दाटून येतं आणि आठवणींचा पाऊस डोळ्यातून बरसू लागतो.

____________________________
Image result for raining time tea images
अक्षय कांबळे,पालघर.

लोकांना पाऊस म्हटलं की बऱ्याच गोष्टी आठवतात. त्यातल्या त्यात चहा पहिला आठवतो. आणि आठवयलाच हवा. चहा आणि पाऊस म्हणजे अहाहा ! अमृततुल्य !!! काहींना कविता सुचतात. चारोळ्या ढिगाने पडतात आज काल व्हॉटसअप वर. कुणाला पाऊस आवडतो तर कुणाला पावसात भिजणारी ती आवडते पासून न जाणो काय आणि काय. विविध रूपे पाहायला मिळतात आपल्याला पावसाची. मला फक्त एकच पाऊस आठवतो. मुंबापुरीत खळबळ माजवून टाकणारा. गेली 3 वर्ष मी वसतिगृहात राहतोय. परळ ला. दक्षिण मुंबई मधला एक महत्वाचा पट्टा. मुंबईत माणूस येतो अनेक कारणं असतील त्यातील 2 महत्वाची म्हणजे एक तर त्याला जगायचं आहे म्हणून किंवा आजाराने ग्रस्त आहे. आणि केईम हॉस्पिटल, वाडिया लहान मुलांचं हॉस्पिटल आणि कॅन्सर पेशंट साठी असलेलं टाटा हॉस्पिटल एकमेकांपासून थोड्याच अंतरावर आहेत. गजबजलेला परिसर आणि पडणारा पाऊस ही तेवढाच. प्रत्येक वर्षी पाऊस पडला की मुंबईकरांचं स्पिरीट जागृत व्हावच लागतं कारण महापालिकेकडून कुठल्याही अपेक्षा करणं म्हणजे मूर्खपणा ठरावा. आणि गेली कित्येक वर्षे आमच्या नशिबी हेच आलं आहे.
            मागच्या वर्षीची गोष्ट. आम्ही पशुवैद्यकीय महाविद्यालय वसतिगृहात राहत असल्यामुळे केईम मध्ये कुणाला रक्ताची गरज पडली की आपली मुलं हक्कांन जातात. परंपरा झाली आहे म्हणायला गेलं तर. त्या दिवशी असाच संध्याकाळ पासून पाऊस पडत होता. रात्री 11.30 च्या सुमारास वर्दी आली वॉर्डन कडून की केईम ला जायचं आहे, 3 बाटल्या रक्त हवं आहे. B +ve रक्तगट असणाऱ्या मुलांनी लवकरात लवकर जाऊन या.
            आम्ही पोहोचलो. हॉस्पिटलच्या ग्राउंड फ्लोअर ची दशा पाहवत नव्हती. पेशंट ना वरच्या बाजूला शिफ्ट करत होते. नातेवाईक आणि इतर वॉर्ड बॉय यांची वादावादी सुरू होती. आम्हाला रक्त देऊन परत हॉस्टेल ला यायचं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेज होतं पुन्हा. आम्ही दुसऱ्या मजल्यावर पोहोचलो जिथे चेअर्स ठेवल्या होत्या. वरून छत गळत होतं. आम्ही तिघांनी कसं बसं रक्तदान केलं. पण तेव्हा आपण काही तरी छान काम करतोय याचा लवलेशही मनाला स्पर्श करत नव्हता. कुठे या झमेल्यात अडकलो असच वाटत होतं. हॉस्पिटल मध्ये साहित्याची वानवा होती. बाहेरून काही मागवता येत नव्हतं. कारण पाऊस एवढा पडला होता की कुणी या दिशेला फिरकायला सुद्धा तयार नव्हतं. त्या दिवशी जाणवलं की इथे पाऊस पडला म्हणजे याहूनही वाईट अवस्था होते. ग्राउंड फ्लोअर ची. या वर्षी खर्च करून दुरुस्ती केली होती म्हणून परिस्थिती थोडी बरी होती.
            लोकांना पावसा बद्दल काय वाटतं याची कल्पना आहे मला पण गेल्या 3 वर्षात मी फक्त अनुभवलं आहे फक्त गैरसोय आणि गैरसोय. यालाच आम्ही गोंडस नाव दिलं आहे मुंबईकरांचा स्पिरीट. आम्हाला सवय पडलीय या सगळ्याची. आमचं काहीही होणार नाही. मग पाऊस येवो अथवा त्सुनामी येवो.

____________________________

Related image
रुपाली आगलावे, सांगोला
पाऊस वारा, रिमझीम धारा
कशा कोसळती नभातुन गारा..

पाऊस येता, मनही भिजे
ओल्या आठवणीत त्या दिवसांच्या...

आला पाऊस, भिजली माती
अतूट नाते धरणीमातेशी...

अंकुर फुटले, शेत फुलले
हिरवळ बघून मनही बागडे...

होईल सुखी शेतकरी माझा 
घेईल ध्यास उद्याच्या आशेचा..

पिकेल शेती, बनतील मोती
पाऊस येता सरी वर सारी...
पाऊस येता सरी वर सरी....

____________________________
Image result for raining farmer images
संगीता देशमुख,वसमत

मृगाचा पाऊस,
धोधो कोसळला तरी
नाही तो,
अवकाळी पावसासारखा...
रोंरों करत घोंघावणारा...
अचानक येऊन धुमाकूळ घालणारा...
बेसावध शेतकऱ्यांची
राने धुवून नेणारा .... 

मृगाचा पाऊस,
ज्याच्या वाटेकडे 
कोरड्या डोळ्याने 
वाट पहात 
बसलेल्या शेतकऱ्यांच्या
डोळ्यात ओल पेरणारा...
शेतकऱ्यांच्या डोळ्यात 
चिक्कार स्वप्नं पेरणारा...

मृगाचा पाऊस,
रणरणत्या उन्हात 
वसुंधरेवर अलवार 
प्रेमसरींचा वर्षाव करणारा...

मृगाचा पाऊस,
चातकाची दीर्घ तृष्णा
भागवणारा....

मृगाचा पाऊस,
चराचराला संजीवनी देणारा....

पण,
यानेही आज रूप बदलले,
तोही वागतो,
माणसासारखा लहरी...
स्वतःचाच  नेम चुकवतो,

चराचराला कधी 
सुखात चिंब भिजवतो,
तर कधी 
कोरडाठाक होऊन
शुष्क मनाने
रडवतोस...

____________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************