एक काल्पनिक पत्र.



निखिल खोडे, पनवेल.

प्रिय भ्रष्टाचार,
बरा आहेस ना? म्हटलं जरा विचारपूस करावी तुझी कारण सध्या सगळीकडेच तुझीच चर्चा चालु आहे. सर्व क्षेत्रात तुझीच छाप आहे. दारिद्र्य, विषमता यामुळे तुला नवीन चालना मिळत आहे. राजकीय क्षेत्रात तर तुझे कायम स्थान आहे, तेही अगदी अव्वल पहिल्या क्रमांकावर!

तुझी कमाई करोडो अब्जोच्या च्या आकड्यात आहे. तुला वापर गरीब लोक त्यांचे काम लवकर करून घेण्यासाठी करतात तर भ्रष्ट लोकांच्या तिजोरीत पैश्याची आणखीच भर पडते ते फक्त तुझ्यामुळे! का करत असतील रे लोक तुझा वापर?

 तुझा अभ्यास करणाऱ्या ‘ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या २०१८ अहवालानुसार जगाच्या शाळेत १८० देशांमधुन भारताला ७८ वा क्रमांक तु मिळवुन दिला आहे. किती लज्जास्पद ना? तो डेन्मार्क आणि न्युझीलंड नेहमी एक नंबर साठी भांडत असतात. 

भारत ४१ टक्के गुण मिळवून पास तर झाला. तो सोमालिया बघा ना.. नेहमी नापास होतो.

असे सन्मान मिळविण्यासाठी तुझ्या मदतीला बरेच जण बसले आहेत जसे की राजकिय नेते, धार्मिक नेते, नोकरशाही, स्विस बँक, देश सोडून फरार होणारे उद्योजक, सार्वजनिक क्षेत्रातील दलाल लोक इत्यादी....

जेव्हा नेते व जनता सार्वजनिक सत्तेचा स्वतःच्या खाजगी फायद्यासाठी गैरवापर करतात तेथे तुझा उदय होतो. तुझा बोजा शेवटी वस्तूच्या किमती वाढवून आमच्यावर (सामान्य माणूस) लादला जातो; यात फक्त कणा आमचा मोडल्या जातो. पात्रता नसताना तुझा वापर करून लोकं मोठमोठी पदे मिळवतात आणि आम्हाला साधा शेतीचा सातबारा काढायचा म्हटल खिसा दोनदा तपासावा लागतो. कारण ₹ १०० असेल तर काम लवकर होईल!

अमर्याद वाढलेल्या लोकसंखेच्या मुलभूत गरजा आणि सर्वच स्तरावरील वाढती मागणी व पुरवठ्यातील तफावत, जीवघेणी स्पर्धा आणि दैनदिन जीवनाचा गाडा हाकताना जीवाचा झालेला कोंडमारा आणि त्यावरील उपाय म्हणजे कळत नकळत केलेला तुझा वापर हे तुला आणखीच बळ देणारे आहे.

तुला माहिती आहे की आज देशाभरात केंद्र, राज्य, तालुका, जिल्हा, ग्रामपंचायत पातळीवर जनतेला स्वत:ची कामे करून घेण्यासाठी बऱ्याचदा तुझा वापर करावा लागतो.

तुला थांबविण्यासाठी अनेक कायदे आहेत पण त्याची अंबलबजावणीच होत नाही. वाट पाहतोय तुझ्या वास्तव्य पुसल्या जाण्याची! तुझ्या कालबाह्य होण्याची...

तुझाच.
(नाव सांगायची गरज आहे का?)
____________________________________________

डॉ. विजयसिंह पाटील

प्रति,
कु चारुदेवी घरमोडे.

यांना राजीव नरहर डुकरे (रा.न.डुकरे) यांचा सस्नेह प्रणाम...

पत्रास कारण की आपण काल फिजिओलॉजीच्या अत्यंत महत्वाच्या वर्गास गैरहजर होता, त्यामुळे अस्मादिक काळजीत पडल्याने हा पत्रप्रपपंच..

तुमच्यासारखी अत्यंत हुशार, ब्रिलियंट विद्यार्थिनी गैरहजर असल्याने मी फार अस्वस्थ झालो, हृदयात कसतरी झालं.(हृदयात घंटा क्र१)

खरं तर मागच्या आठवड्यात कचरा गाडीच्या घंटीच्या मंजुळ अवाजासारखा आवाज ऐकू आला आणि मी मागे वळून पाहिले तर तुमचं किणकिणतं हास्य (राज्या म्हणतो 'खिंकाळल्यासारखं) माझ्या दृष्टीस पडलं (खरं तर कानावर पडलं) आणि त्याच क्षणी माझ्या हार्टमध्ये घंटा वाजल्याचा भास झाला,(घंटा क्र२)असो.

आपण मागच्या आठवड्यात मेंदूचं  कार्य इतक्या वैविध्यपूर्ण शैलीत सांगितले की,माझा मेंदू अचंबित झाला आणि माझं हार्ट थरथरलं. (घंटा३)आणि...(ते नंतर, असो)

हंसगामिनी,गजगामिनी हे शब्द पुस्तकात वाचले होते पण तुमच्या मंद,दमदार भारदस्त चालण्याने गजगामीनी याचा अर्थ पुरेपूर कळला, तेंव्हा मला बाबूच्या हॉटेलमधली थंडगार लस्सी प्यावू वाटली. असो..

तुमच्या उजव्या गालावर असलेला रुपयाच्या आकाराचा तीळ (राजा त्याला 'वांग'म्हणतो) पाहून मला आमच्या शेतातल्या डाग पडलेल्या आंब्याची आठवण झाली, पण तो तुम्हाला दृष्ट लागू नये म्हणून असावा.. असो..(तीळ-घंटा ४)

तुम्ही तुमच्या वेणीतच्या दोन शेपटात एक लाल आणि दुसरीत पांढरी रिबीन बांधलेली पाहून मला लाल,पांढऱ्या पेशी आठवल्या,आणि तात्काळ माझ्या लाल पांढऱ्या पेशीत खळबळ उडाली.त्या दोन पेशींची संयोग होऊन गुलाबी पेशी तयार झाली असावी अशी शंका आहे.(घंटा ५)
सरांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना,मानवाच्या DNA चे दोन्ही स्मूक्ष धागे कसे कुशल विणकऱ्यार्प्रमाणे गुंफले आहेत हे किती सुंदर उदाहरण दिले, ते ऐकताक्षणी मला लव्ह अँट फर्स्ट साईट किंवा खरं तर लव्ह अँट फर्स्ट हिअरिंग' असं झालं.(घंटा६)

तुमचा विचार येताच माझं हृदय रेल्वेच्या इंजिनासारखे धडधडायला लागतं.(घंटा७)

मी मोठा डॉक्टर, कवी,उत्तम शेतकरी, लेखक, कादंबरीकार,उत्तम वक्ता, सिनेमातील नायक, आमदार आणि आता तुमचा भावी वर(घंटा७) होण्याचा मानस धरून आहे.

तुम्ही माझा स्वीकार केला तर 'शिकरणात बासुंदी' होईल आणि मला माझी उच्च ध्येये साध्य करता येतील असे वाटते.

आपला हृदयाभिलाशी,
 रा.न.डुकरे..
__________________________________________

प्रविण दळवी, नाशिक.

थोडं माझ्या कल्पनातल्या मनातलं...
मनातलं नेहमी ओठांवर येतंच अस नाही...
आणि ओठांवर आलेलं सांगायला हक्काचा माणूस भेटेलंच हे ही सांगता येत नाही...
म्हणूनच हा लिहण्याचा अट्टहास...

प्रिय मन
पेनाने नाही तर
आसवांनी लिहलेलं...
एक पत्र आहे तुझं,
मी जपूण ठेवलेलं...
            धूळ होती थोडी,
            आणि मळकटलेला कागद...
            हाताने पूसून त्याला
            उचललं मी अलगद...
वाचलंय मी ते कितीदातरी,
पण पुन्हा वाचावसं वाटलं...
आठवणींच्या त्या गावात
पुन्हा धुकं दाटलं...
            त्यात शब्द होते मोजकेच;पण
            भावना मात्र ठासून भरलेल्या...
            एवढ्याशा त्या तुकड्यात,
            साऱ्या आठवणी दडलेल्या...
प्रत्येक वेळी वाटतं,
फाडून टाकावं याला...
जळजळत्या त्या अग्निकुंडात,
जाळून टाकावं याला...
           बुध्दी "हो" म्हणते याला,
           पण मन मात्र "नाही" म्हणते...
           दरवेळी प्रमाणे यावेळीही,
           मला मनाचेच ऐकावे लागते..."
                     तूझाच ह्रदय
___________________________________________

सीमाली भाटकर गंधेरे, रत्नागिरी.

प्रिय,
मानव जातीस
                संध्याकाळी समुद्र किनारी फिरता फिरता तुमची अचानक आठवण आली. आणि लिहावंसं वाटलं एक पत्र कारण मोबाईल च्या जगात पत्राचा विसर पडला आणि पोस्टमन काका अहो तुम्ही तर उंबराचे फुल होऊन बसलात की राव, म्हणूनच ठरवून टाकलं आज एक पत्र लिहायच माणुसकी जोपासलेल्या हरवलेल्या आपुलकीच्या आणि मनात वैर भाव बाळगलेल्या या जगातल्या प्रत्येक माणसाला
कदाचित तुमच्या मनात येत असतील माझ्या पत्रातले विचार पण तुम्ही काय आणि मी काय बोलता येत असूनही मुके जाहलो अशी आपली अवस्था आणि म्हणूनच ही हरवलेल्या पत्राची धडपड.
         मी जन्माला आल्या पासून संस्कार शिस्त सगळं जोपासत वयाच्या तिशी पर्यंत पोचले आणि अचानक बरेच प्रश्न मनात डोकावू लागले. शाळेच्या पहिल्या दिवशी आई वडिलांची धडपड प्रवेशा संबंधित चर्चा आणि झोपडपट्टी मध्ये मात्र दोन वेळच्या जेवणाची भ्रांत तरी माणूस शिकतो मोठा होतो पण हे सगळीकडे सारख का नाही याचं उत्तर असत हाताची बोटे सारखी नसतात.
            कधी कुणाच्या आयुष्यात शिकण्यासाठी कष्ट येतात तर कुणी आरामदायी जीवन जगत शिकत पण म्हणून या कष्ट करण्याचा छळ करण्याचा अधिकार कुणी दिला तुला माणसा. कुणीच कुणाचं ओझं वाहत नाही. पण आपुलकी चा शब्द आणि मायेची पाखर हीच माणसाच्या प्रगतीची खरी वाट असते. कॉलेजमध्ये प्रवेश मिळवताना पैसे किंवा वशिलेबाजी चालते कीव येते तेंव्हा जेव्हा खरंच त्या पात्रतेच्या व्यक्तिमत्वाला डावलल जात. ज्ञान ही आता पैशाच्या तराजूत तोलले जाते आणि उत्तर असते हाताची बोटे सारखी नसतात.
       दररोजच्या जीवनात अशा अनेक गोष्टी घडत असतात. ज्या माणसा माणसाशी जोडलेल्या असतात. लिहिता लिहिता मजेदार किस्सा आठवला, आपल्या बोलबच्चन आणि भांडकूदल स्त्री वर्गाचा ज्याचं एकमेकींच कधीच पटलं नाही आणि जिकडे पटलं तिथे शेजारणीला मोठा प्रश्न असतो. अस होतंच कसं मग माझी घरातील मानस मला का बोलतात? हिने कायतरी जादू केली. इथे प्रश्न जादूचा नसतोच मुळी प्रश्न असतो तो समजूतदार पणा आणि समजून घेण्याचा.  काही ठिकाणी तर पैशासाठी आगीत होरपळणाऱ्या आणि मुलगी झाली म्हणून बेघर होणाऱ्या स्त्रिया पाहिल्या काय वाटत तुला या विषयी माणसा माणूस म्हणून.
        तिला काही भावना, मन असतात हे आपण विसरून जातो का? का आपल्यातला माणूस संपतो. हा झाला शोषितांच्या मनाचा प्रश्न. काही ठिकाणी तर स्त्रिया इतक्या उच्च पातळीवर जातात की सगळंच मस्त असत. पण आम्हाला इतक्या वाईट सवयी असतात की आम्ही स्वतःत रममाण असतो. नवरा नावाचा प्राणी आपल्या आयुष्यात आहे. त्याचे आई वडील असतात याच भान नसत आणि कधी कधी त्यांना वाटत आपल्या सुनेला काय मान द्यायचा ती दुसऱ्या कडून आलेली आहे.
        किती वेगळे स्वभाव आणि गुंतागुंत आहे ना हाच विचार करून हसतेय मी आता कुणी कुणाकडून काय घ्यावं आणि काय द्यावे याच एक कोड होऊन बसलाय मनात.
            खरंय अगदी पण या पत्रातून एकच सांगायचं आहे नसुदे हाताची बोट सारखी कारण जेवायला पाहिजे असेल तर ती सारखी नसलेलीच बरी. नाहीतर पोट उपाशी राहील. पण म्हणून आपण आपल्या विचार प्रवृत्ती मध्ये बदल घडवून आणायचा नाही का? विचार कर माणसा माणसाच्या मनात आलेल्या प्रश्नांचा माणसा.
१)    गरिबांना शिकण्याचा हक्क नाही का?
२)      श्रीमंतांच्या घरी पैसा जातो अस का वाटत नेहमीच माणसाला की आपण कुठे कमी पडतो.
३)      माणूस लाचखोर का झाला की महागाई फक्त सरकारी माणसावर कोसळली आहे.
४)      रात्री उशिरापर्यंत दिव्या खाली अभ्यास करून नोकरी नोकरी करणाऱ्या ना फक्त परिस्थिती ची जाण का?
5)     अतोनात पैसे असणाऱ्या आई बापाची मुलं का जातात कॉलेज सोडून भटकायला नेमकी कमतरता कशात आहे संस्कारात शिस्तीत की आई बाबा नोकरी आणि पार्ट्यांमध्ये व्यस्त आहेत त्यातून लाभलेल्या एकटेपनात
6)      ताटावरच्या गप्पा तर आम्ही विसरून गेलोय कारण रूम मध्ये जेवणाची पध्दती नव्याने रुजू झालीय.
७)      रस्त्याने चालताना अपघाताला दुर्लक्ष करून आपण तडक निघून जातो कारण आपल्याला ऑफिसमध्ये पोहोचायचं असत खरंच माणुसकी काळजी हे सर्व पुस्तकात का?
8)      जागा जमीन पैसा याला श्रेष्ठत्व प्राप्त झालाय का माणसा आपलेपणाच पारडं झुकत्या मापाकड का कळतंय? 
9)     कामाला देव मानून काम करतो तिथे हिनतेची वागणूक आणि फसवणुकीच्या ठिकाणी मात्र पैशाचा पाऊस अस का घडतं.
१०)     दिवस रात्र काम करणारा पुरुष ही दमतोच आणि घरासाठी कष्ट करणारी माऊली ही थकते मग तरी दोघात दुजाभाव का?
११)    कधी वाटत माणसातील माणुसकी संपली आहे का?
        म्हणूनच एका माणसातल्या माणसाला हे पत्रातून साधलेल हितगुज माणसाला माणसाची सोबत नकोशी झालीय उरला तो फक्त स्वार्थ आणि का हा प्रश्न?
     उत्तर मिळाले किंवा कळवावे वाटले तर नक्कीच लिहा माणसातला माणूस हरवलेल्या माणसाला एक पत्र......
धन्यवाद.
_________________________________________

अक्षय कांबळे, पालघर.

मेरी प्यारी कलम,

         पत्रास कारण की, बरेच दिवस झालं शांत आहेस. लोक काय म्हणतील याचा विचार करणारे आलं नव्हे. पण आज काल पाठमोरी बोलणारे करवंटे तोंडावर बोलत आहेत. एक दीड शहाणा तर आपली ( म्हणजेच मी आणि तू) लायकी काढता काढता स्वतःचीच लायकी दाखवून गेला. म्हणे काय तर मुंबईकर तुम्ही तुमची लायकी दाखवलीच. असो. मुख्य मुद्द्याकडे वळतो. बरेच दिवस झालं शांत आहेस. म्हटलं थोडी विचारपूस करावी. आपण सोबत काम करून फक्त 3 महिने झाले असतील. पण तुझी कमतरता काही जाणवली नाही. हात होते ना तुझी उणीव भरून काढायला. पण काहीही म्हण तुझ्यासारखी धार त्यांना नाही. कमी मेहनत आणि अगदी जिव्हारी घाव घालायला तुला जसं तुला जमतं. ते काही हातांना उभ्या आयुष्यात जमणार नाही.
         बऱ्याच तक्रारी आहेत लोकांच्या. काही म्हणतात आपल्याला लिहायला येतच नाही. काही म्हणतात धार राहिली नाही पूर्वीसारखी. विनोदी लेखन तुमच्या आवाक्यातील गोष्ट अजिबात नाही. आणि बरंच काही. ऐकून कंटाळा आलाय आता. यांना कोण समजावणार आपण आपलं लिखाण पब्लिक डोमेन मध्ये जास्त आणलेलं नाहीच आहे. व्हॉट्सअँप आणि इंस्ताग्राम च्या थिल्लर पोस्ट वरून तुम्ही एवढं ऐकावणार. हसायलाच येत मला यांच्या कडे पाहून. एखाद्याला जज करण्याची एवढी घाई. असो. महान होण्याची कुठलाही मानस नाही आपला. हे तुझ्या शिवाय कोण जास्त ओळखणार नाही का ? एक औरंगाबाद दौरा बाकी आहे. जरा काहींना दाखवून द्यायचं आहे. BROTHERBHEEM हे टोपण नाव नाही आहे. तो स्वभाव आहे. लवकरच काम आटपून परत येईन. आणि आलो की लागुयात आपल्या कामाला. बरीच कामं आहेत आपली अपूर्ण. तुला सुद्धा गरज होती आरामाची. गेली 3 वर्ष एकदाही सुट्टी न घेता आपण काम करत होतो. आता मनसोक्त आराम कर. आता लवकर सुट्टी मिळणार नाही...
________________________________________
टीप-(सर्व छायचित्रे इंटरनेट वरून घेतलेली आहेत)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************