निवडणुकीच निकाल तसा अपेक्षित होता. पण कॉग्रेसचा दारूण झालेला पराभव पाहता कॉग्रेस ला आता आंत्मचिंतनाची गरज वाटली तर नवल नाही आहे. भारतातील जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांन मध्ये नवीन काहीतरी पाहण्यास मिळाले, म्हणून जनतेने त्यांना निवडून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले ठोस निर्णय, कोणत्याही आंतरराष्ट्रीय दबावाला न घाबरता त्यांनी जे निर्णय घेतले त्यामुळे त्यांना मतदारांनी पसंती दिली आहे.
मागील ६० वर्ष मध्ये परकीय आंक्रमणाला घाबरून आघाडी सरकारने काहीच पाउले उचल्ले नाही. त्या गोष्टीची तीव्र नाराजी जनतेमध्ये होती आणि ती दाखवण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा त्यांनी ती दाखवून दिली. आघाडी सरकारच्या काळात झालेल्या घोटाळ्या सारख्या प्रकरणामुळे जनता त्रस्त झाली होती. जनतेने बदल घडवण्याचा विचार केला आणि तो आमलात आणला. जनतेला फक्त त्यांची समस्या समजून घेणारा आणि ती उपाययोजना करणारा नेता हवा होता आणि मला वाटते की तो मिळालेला आहे.
वाल्मीक फड ,नाशिक.
झालेल्या निवडणुकीतून जनतेने फार मोठा संदेश राजकारण्यांना दिलेला आहे.जो नेता यापुढे देशाच्या मानआपमानाचा विचार करेल तोच नेता आता जनता स्विकारणार आहे.खोटे बोलून देशाला लुटणारे,आपल्याच तिजोर्या भरणारे नेते आता देशाला चालणार नाही.आपला देश कष्ट करणारा आहे शिवाय शूर आहे आपण का दुसर्या देशापुढे आपली मान झुकवायची?
जनतेने हा निकाल देऊन सांगितले आहे की,आता आम्ही जातीच्या नावावर मत मागणारे तसेच मुख्यमंत्री असताना रस्त्यावर लोळून आव आणणारे आणी प्रांतवाद करणारे असे जे नेते आहेत त्यांना आम्ही सत्तेवर येऊ देणार नाही.कारण असे लोक देशाला घातक असतात.हे लोक आपला राजकिय स्वार्थ साधण्यासाठी कोणत्याही थराला जायचे यांचे देशाच्या सेनेविरुद्धातील वक्तव्य,हिंदु समाजा विरुद्ध वक्तव्य,तसेच काश्मीरमधील सेनेवर दगड मारणारांचा पुळका आणी सर्वात महत्त्वाचे म्हणजे यांनी केलेले मोठमोठे घोटाळे.आजपर्यंत काँग्रेस स्वताला आम्ही जातीय वादी नाही आहोत हे सांगायचे परंतु खरा जातीवाद करणारा पक्ष असेल तर तो काँग्रेस पक्ष होता आणी हे मागासलेल्या वंचित व आदिवासी बांधवांना चांगलेच कळाले म्हणून त्यांनी सरकार हे मोदींचे असावे असा निर्णय घेतला.
जनतेने काही अंशी का होईना भ्रष्टाचार कमी होताना पाहीला,सरकारी कार्यालयांमध्ये सामान्य माणसाची होणारी कुचंबना थांबलेली पाहीली आता जनता निसंकोच सरकारी कार्यालयांमध्ये जाऊन काम करुन घेते.तसेच लोकांना देशावर कोणी वाकडी नजर ठेवली तर त्यांचे डोळे काढणार्या सरकारची गरज होती.मागिल काळात लोक अडाणी होते तसेच मिडीया इतकी पुरक नव्हती देशात काय चालले आहे हे जनतेला लवकर कळत नसायचे म्हणूनच जनता डोळे झाकून काँग्रेसला मतदान करत असायची,परंतु आता प्रत्येकाला मोबाईल तसेच TV ऊपलब्ध असल्याने बातमी कळायला वेळ लागत नाही.
सरकारने गरीबांसाठी अनेक योजना काढल्या आणी त्या आमलातही आणल्या.हे सरकार खरं बोलणारं आहे आणी काम करणारं आहे हेच जनतेला म्हणायचं आहे.
किरण पवार,औरंगाबाद.
या निवडणुकीत झालेल्या निकालात स्पष्ट झालचं की, भारतीय जनता पार्टीवर जनता पुन्हा एकदा विश्वास ठेऊ इच्छिते आहे. ज्यात मुळ प्रभाव फक्त एका व्यक्तीचा आहे, नरेंद्र मोदी. पण हा प्रभाव देशाच्या अशा भागात कमी आहे जिथे सोशल नेटवर्किंग कमी, विकासही त्या तुलनेने कमी प्रमाणात आहे. मुळ मुद्दा जनतेने या निवडणुकीत जातीच राजकारण केलेलं सहजचं पहायला मिळत. केवळ महाराष्ट्राचा जरी विचार केला तरी वंचित बहुजन आघाडीला मिळालेली एकून मते असतील, यावरून जातीय राजकारण स्पष्टच होतयं. त्यांचा एकही उमेदवार जनतेला तेवढा पात्र वाटूच नये... ?
आम्हाला या गेल्या पाच वर्षांत असं लढवलं जातयं की, हिंदुत्ववादी नाही तर मुस्लिम देशावर राज्य करतील आणि हिंदु धर्म संकटात येईल. तिकडे बहुजनांना अजूनही त्यांच्या विकासासाठी लढण्याची फारशी संधी उपलब्ध होते का नाही तोवर जातीयवाद मधे आणून मूळ मुद्दे पुन्हा बाजूला. या चालू सरकारने काय केलयं? कोणत्या आंदोलनाला न्याय दिलायं? एकीकडे जे. न. यू. च्या टॉपर तरूणाने नाकात दम केल्यावर त्याला देशद्रोही घोषित करून सामान्य जनतेत त्याची प्रतिमा खराब करायची आणि दुसरीकडे साध्वीसारख्या स्त्रीला निवडुन आणायचं; यावर नक्कीच विचार होणं गरजेच आहे. जनतेचा कौल जरी भुल दाखवून केला गेला असला तरी एक गोष्ट नक्की आहे, गांधी विरूद्ध गोडसे विचारसरणी समाजात रूजवली जात आहे. मला तरी एवढचं वाटतं की, जर आत्ता जाग नाही आली तर आपल्याच हाताने आपल्या देशाची सर्वधर्मसमभाव ही प्रतिमा पुसल्या जाईल की काय?
निवडणुकीचे निकाल खर तर धक्कादायकच होते... सत्ताधाऱ्यांसाठी आणि विरोधकांसाठी त्या पेक्षा जास्त जनतेसाठी... कारण... चर्चा अशी होती की... भाजपा सत्तेत बसेल पण एक हाती सत्ता मिळणार नाही... व प्रबळ विरोधी पक्ष मिळेल..
तरीदेखील हा निर्णय जनतेचा आहे असं मानलं (कारण मतमोजणी प्रक्रिया आणी घोटाळा या बद्दल सर्वसामान्य माणसाला काहीच माहीत नाही)
तर त्याची कारणे काही अशी असावीत:-
हिंदू बहुसंख्य असल्याने हिंदूंचा पक्ष आला तरच आपण काहीतरी करू शकतो नसेल तर हिंदू पुन्हा मागे पडेल ही भीती..
मोदी शिवाय दुसरा पर्याय नाही... असा प्रचार आणि प्रसार... म्हणजे राहुल गांधी यांना पंतप्रधान म्हणून जबाबदारी देण्याची लोकांना भीती वाटते
आपल्या वर्गातला मॉनिटर हा सर्वात जास्त गडबड करणारा असेल तर वर्ग जरा तरी शांत राहील... अशी एक इच्छा.
भाजपा ने अनेक दिगग्ज नेते पक्षाकडे ओढून घेतले...
अजून एकदा चान्स दिला पाहिजे ही मनोवृत्ती
पुलावामा अटॅक, ऊरी आणि बालकोट येथील घटनांचा आणि देशभक्तीचा अर्थ असा लावला आहे की.. मोदी असतील तरच पाकिस्तान घाबरून राहील..
काही लोक पूर्णपणे आहारी गेलेले आहेत... सोशल मीडियावर व वृत्तवाहिन्या यांनी तयार केलेली वातावरण निर्मिती
लोकांना वाटत असलेली भीती...की जर पुन्हा भाजपा सत्तेवर नाही आले तर ते काय करतील....
काँग्रेस कडे स्वतःची भूमिका नाही... किंवा त्यांनी फक्त अँटी मोदी असा प्रचार मुद्दा राबवला... देशाच्या विकासाबद्दल काहीच चर्चा नव्हती.
इतर पक्ष सरळ सरळ भाजपा ला येऊन मिळाले होते..
मागील चार वर्षात केलेल्या कामाचा भर किंवा राफेल सारखे मुद्दे निवडणुकी दरम्यान आलेच नाहीत..
धर्म, देशभक्ती आणि तारणहार मानण्याची वृत्ती ही भाजपा ला शरण जाण्यास भाग पडली आहे..
तरी हा जनतेचा कौल आहे असं मानलं तरी साध्वी, बुवा, महाराज आणि नवीन व्यक्ती ज्या निवडून आल्या आहेत, ते संसदेत जाऊन काय करतील ते त्यांनी देश हिताचं करावं ही सदिच्छा
निकाल लागले.. TV वर पहिले आणि आपल्याला राजकारणातलं काहीही कळत नाही हे सत्य स्वीकारलं..
...1984-85 ची निवडणूक सोडली तर आपल्याकडे लोकसभा निवडणुकीत खास लाट अशी नसायची.. 76 ला इंदिराविरोधी होती पण ती लाट सरकारी दडपशाही विरुद्ध होती..असो तर
...त्याकाळी मतदारसंघ बांधणे याला खूप महत्व होत..निवडणुकीपूर्वी 3-4 वर्ष मतदार संघात फिरायचं.. मागण्या वगैरे समजून घ्यायचा जमेल तितका सरकार दरबारी पत्रव्यवहार करायचा.. लोकांनाही हे जाणवून द्यायचं.. प्रसंगी लोकांना सोबत घेऊन मोर्चे वगैरे काढायचे..
.. जुने लोकं सांगतात आमच्याकडे 1972 ला काँग्रेसच्या काळात एक तरुण विरोधी पक्षाकडून उभा होता आणि गावातले जुने जाणते काँग्रेसी म्हणत होते नाही नाही ह्यावेळी त्यालाच मतदान करावं लागणार गावोगाव दुष्काळात पाझर तलावाच्या कामासाठी सरकारशी भांडत फिरलाय.. आणि केलेही तेच..
...
पण 1991 नंतर परिस्थिती झपाट्याने बदलली.. जातीवर होणार मतदान आता धर्मावर होत गेलं..
आपण आर्थिक,सामाजिक जीवनमान सुधारणेसाठी सरकार निवडायचो.. अजूनही आपण अधिकृतपणे धर्मनिरपेक्षच आहे.. फक्त कागदोपत्री...
2014 चा निकाल मस्तच होता लोकांनी उत्स्फूर्त पणे विकासाच्या अपेक्षेने सरकार निवडल..
2019 च्या निवडणुका ह्या परत विकासाच्या मुद्यावरून भरकटल्या अस मला वाटतं.. प्रचारात विकास सोडून बाकी सर्वच मुद्दे होते..
राहिला प्रश्न विरोधी पक्षाचा खासकरून काँग्रेसचा तर त्यांना लोकांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून आंदोलन करायची सवयच राहिलेली नाही.. राफेल सारख्या कितीतरी मुद्यांवर राहूल गांधी एकाकी लढताना दिसले.. जेष्ठ नेत्यांना आपल्या पोरांची काळजी दिसली फक्त.. पक्ष एकजुटीने लढताना दिसलाच नाही..
...बहुसंख्य खतरेमैं? हे लोकांना वाटलं,पटलं .. असच म्हणावं वाटतं. धार्मिक ध्रुवीकरणही यशस्वी झालं असं वाटतं.. स्वामी,साध्वी,मौलाना,बाबा हे संसार मोह माया सोडलेले लोक का निवडणुकीत उभं राहतात किंवा कसे काय निवडून येतात हे समजणं आपल्या डोक्याबाहेरच आहे..
गत निवडणुकापासून सोशल नेटवर्कचा प्रभाव खुप वाढलेला दिसला.. लोकशाहीत विरोधक सुद्धा खूप महत्वाचे असतात. विरोधक म्हणजे देशद्रोहीच हा तर एक नवाच ट्रेंड लक्षात आला..
... आमच्या लहानपणी शाळेत किती मार्क पडले याचं उत्तर देताना आम्ही 'राहुल नापास झाला,सोनीला 45%पडले,अर्जुनला 50%अशी लांब प्रस्तावना करून मला 56% अस सांगायचो.' तसं आता नेहरूंनी हे केलं नाही,राजीवने अस केलं वगैरे सांगतात आणि ते जनतेला पटलंही..
जनतेला काय म्हणायचं ते मला तरी कळलं नाही.. सरकार काठावर येईल असा अंदाज माझा सपशेल चुकला.. विशेष काहीही न करता वाढलेल्या जागा ? .. पक्षांतर केलेले बहुसंख्य निवडून आले..
...अध्यक्षीय निवडणुकीप्रमाणे लोकांनी आपला प्रतिनिधी न पाहता pm पदाचा उमेदवार पाहून मतदान केलं असावं..
जनतेला काय म्हणायचं आहे ते बुचकाळ्यात पाडतंय पण जनतेसमोर काय वाढलं की ते खुश होतील हे सत्ताधार्यांना अचूक समजलं..
तूर्तास आपण आपल्याला निवडणुकीतल काहीही समजत नाही या सत्याचा स्वीकार करणं श्रेयस्कर.
संगीता देशमुख,वसमत
२०१४ ला निवडणूकीचा निकाल लागला. आणि जनतेने बदल स्वीकारला,हे पाहून लोकशाही जीवंत असल्याचा अभिमान वाटला. बहुजनांच्या हिताचा विचार करणारं सरकार नाही,हे माहीत असूनही खूप आशा ठेवल्या. परंतु पदरात घोर निराशा पडली. लोकांना बदल आवडला नाही,हे नोटाबंदी,जीएसटी,महागाई,वाढत गेलेली बेकारी,बेरोजगारी,गुन्हेगारी,ढासळत गेलेला शैक्षणिक दर्जा आणि याबाबत नाराज असलेली जनता पाहिली. आता हे सरकार येणार नाही,असे वाटत असताना २०१९ चा निकाल आला तेव्हा एकतर्फी आलेला जनमताचा(?) कौल पाहून लोकांना काय म्हणायचं हे महत्वाचे नसून सत्तेला काय वाटतं,हे सत्य पुढे आलं. आलेला निकाल पाहून "इतना सन्नाटा क्यू भाई?"जवळपास अशीच लोकांची प्रतिक्रिया होती. त्यात मतमोजणीपूर्वी ॲंब्युलंसमधून सापडलेल्या इव्हीएम मशींस,निवडणुकीपूर्वीच "इव्हीएममध्ये ७०% ची सेटिंग" हे बातम्या ऐकून "जनतेला नेमकं काय म्हणायचे आहे?" हा प्रश्न गौण ठरतो. जनता आज हतबल आहे. गुंडप्रवृत्तीचे लोक निवडून येतात,सैनिकांच्या बलिदानाचं स्वार्थासाठी भांडवल केलं जातं,हे पाहून जनतेला नेमकं काय म्हणायचं,आणि नेमकं घडलं काय? हा प्रश्न समोर येतो.
निकाल लगायच्या अगोदर काही दिवस मी तीन वेगवेगळ्या राज्यातील लोकांशी संवाद साधला होता.प्रवास करताना जास्त करून रिक्षा चालकांशी संवाद झाला होता.या चालकांचे मत यासाठी महत्त्वाचे असते की रोज त्यांच्या गाडीत वेगवेगळी माणसं बसतात,कोणत्याही विषयावर लोक चर्चा करतात.जमलं तर चर्चेत सहभागीही होतात.अन शिकलेल्या पेक्षा त्याना या बाबतीत जास्त कळतं.हे निकालानंतर समजून आलं.
उत्तरप्रदेश मध्ये आग्रा येथे गेल्यानंतर (तेव्हा तेथील मतदान झाले होते)एका रिक्षा चालकांशी खूप मोदींविरोधात मी वादविवाद केला .शेवटी रिक्षातून उतरताना तो एवढाच म्हणाला,तुम्ही लोक कितीही ओरडा .जितेगा तो मोदी.लिख लो.त्याचं खरं झालं.
दिल्लीत अजून मतदान व्हायचं होतं.तेव्हाची गोष्ट.एका सरकारी शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्याच्या घरी गेलो होतो.ती महिला होती.ती आम आदमीने केलेल्या कामाचे कौतुक करत होती.शेवटी लोकसभेला कुणाला मतदान करणार आहात.असं विचारलं होत तेव्हा काहीच रिप्लाय आला नाही.रिप्लाय न येण्याचे उत्तर भाजप असू शकतं.झालंही तसंच .सर्व 7 जागा भाजपच्या आल्या.दिल्लीच्या जनतेच्या मनात आपचा विकास आहे.पण लोकसभेच्या वेळी मात्र मतदानात दिसला नाही.दुसरं म्हणजे विकास करा अथवा न करा जनता निवडून देईलच असं नाही.असं दिल्लीतील जनतेला तर म्हणायचं नाही ना!
मी सध्या झुंझुनु जिल्ह्यात राजस्थान मध्ये काम करतो.येथील लोकसभेचा रिझल्ट चकित करून गेला.जसा मध्यप्रदेशचाही आहे.6 महिन्यांपूर्वी राज्यात कांग्रेसचे सरकार येते अन लोकसभेत एकही उमेदवार निवडून येत नाही.एका तेथील स्थानिक भाजप कार्यकर्त्यांने तर मला निकाल लागायच्या दोन दिवस अगोदर सांगितले होते की राजस्थान मधील 25 पैकी 25 जागा मोदीच्या असतील.झालंही तसंच.हे मत त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे होते ज्याने 6 महिन्यांपूर्वी पराभव पचवला होता.एवढा आत्मविश्वास आला कोठून!
जयपूर मध्ये टागोर नगरमध्ये राहणाऱ्या एका मित्राच्या नातलगला हाच प्रश्न विचारला,ज्याने नुकतेच त्यांच्या भागातील भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केला होता.त्याचं उत्तर होतं,अशीही येथील जनता कितीही विकास करा.प्रत्येक पाच वर्षांनी सरकार बदलते.वरिष्ठ भाजप नेत्यांनी वसुंधराराजे यांना घालवायचे होते म्हणून मनापासून प्रचार केला नाही.पण मोदीच्या बाबतीत असे नव्हते.काहीही करून निवडून आणायचे होते.तो परिणाम दिसून आला.
खूपजणांच्या मते मोदींचा विजय म्हणजे विकास आहे.हा विकास दक्षिण राज्यात आणि ओरिसा मध्ये चालला नाही.ते पण देशाचे भाग आहेत.तेथील लोकांनी त्यांना का नाकारलं याचे उत्तर मिळत नाही.तसंच हा मोदींचा evm घोटाळ्यातुन झालेला विजय आहे असं विरोधकांचे म्हणणे आहे.दक्षिण राज्यात evm घोटाळा करता आला नाही असा याचा अर्थ धरायचा का!
पण मी ज्यांच्याशी संवाद साधला त्यांचं जास्त करून मत असायचं,मोदींनी केलेला सर्जिकल हल्ला,जगात मिळालेला मोदींना मान म्हणजे देशाचा वाढलेला सन्मान.मोदींनी हिंदूना दिलेली ताकद.नंतर विकासाचा मुद्दा सांगा म्हटल्यावर रस्त्याकडे बोट लोक दाखवत.देशात खूप ठिकाणी रस्ते चांगले होत आहेत.गरीब कुटुंबात गॅस पोहोचला,जनधन योजनेतून बँकेत मोफत खाते तयार झाले.कुटुंबात महिलांचे महत्त्व वाढले.
शेवटी जनतेने विरोधकांना उत्तर दिलं आहे.विचारधारेच्या नावाखाली तुकड्या तुकड्या मध्ये लढण्याऐवजी,मोदींविरोधात एकजुटीने चेहरा निर्माण करा.RSS सारखी एखादी घरा घरात जाऊन निष्काम कार्याला(भाजपच्या)वाहून घेणारी संघटना निर्माण करा. हे तुम्हाला जमत नसेल तर मोदींचा राष्ट्रवाद ,विकासाची व्याख्या आम्हांला प्रिय आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा