प्रेमावरती बोलू काही …. (भाग:-२)

प्रेमावरती बोलू काही …. (भाग:-२)

🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

प्रेमावरती बोलू काही ….


Source:- INTERNET
-सागर मडावी,
यवतमाळ

येणार दुरावा अंतराचा
वाटून घेऊ
वाटणीत आठवणी आपल्या
साठवून ठेऊ

या अंतराच्या वाटणीत
काय माझे आणि तुझे ?
या वेळेलाही तिची किंमत
दाखवून देऊ

चंद्र कधी विसरला का त्याची कला ?
मग हे मन कसे बर विसरेल तुला
तू ये अमावस्ये पौर्णिमेच हे अंतर पार करून

जणू चंद्राच्या सुंदर कलेसारखी
अन सागराला मिळणाऱ्या नदिसारखी
*या सागराला भेटायला*....

*वाट बघतोय ...ये लवकर*..



Source:- INTERNET
-अनिल गोडबोले,
सोलापूर

प्रेम हा विषयच इतका भारी आहे ना.. माणूस आपोआपच रोमँटिक होऊन जातो. प्रत्येकाने आपल्या आपल्या वेळेत आणि त्या काळात बऱ्याच गमती जमती केलेल्या असतात. पण हे सगळं मांडण्यासाठी देखील धैर्य लागत.
आता या विषयावर लिहिताना.. माझ्या जीवनात प्रेम कधी होत ... असा विचार करत गेलो आणि तुम्हाला सांगतो थेट चौथी मध्ये पोहोचलो.

मी चौथी ला असताना शाळेने बालवाडी चालू केली होती. त्यामध्ये एक शिकवणार्या बाई होत्या, त्या मला आवडत असायच्या असा 'साक्षात्कार' आता मला झाला. कोकणातील टिपिकल मुलगी जी साडी नेसून, अबोलीच्या फुलांचा गजरा माळून शाळेत येत असे..
पण यात काही फार अर्थ नाही. पण एक गोष्ट लक्षात आली आणि ती म्हणजे ... मी लहान पणा पासून प्रेमळ आहे.

मग पाचवी मध्ये असताना एक मुलगी आवडत होती . पण ती पाटीवरची पेन्सिल खायची . आठवी मध्ये हायस्कुल ला एक मुलगी आवडत होती.. (जो पर्यंत मित्र चिडवत नाहीत तो पर्यंत ते जगजाहीर होत नसे) पण दुसऱ्या वर्षी राखी पौर्णिमेला शाळेत रक्षा बंधनाचा कार्यक्रम झाला आणि तिने राखी बांधल्यामुळे ते सगळं समुद्रात वाहून गेले..

कॉलेज मध्ये मात्र एक मुलगी आवडली होती. पण ती हुशार होती.. सायन्स च्या मुलीला पटवायच असेल तर तुम्ही त्या पेक्षा जास्त हुशार असलं पाहिजे किंवा तस दाखवलं तरी पाहिजे... पण तिकडे ही बोंबाबोंब.
बारावी नंतर सोलापुरात आलो. सोलापुरात तर अशी भीती घातली होती की.. 'इथल्या मुलीच इतक्या डेंजर आहेत की त्या मुलांनाच फसवतात'. हे वाक्य डोक्यात असल्याने इकडे पूर्ण 3 वर्ष काहीही संशोधन केले नाही.

मास्टर डिग्री ला आल्यावर एक आवडली होती पण तिला आधीच एक बॉयफ्रेंड होता.. त्यामुळे तिकडे सगळंच बंद झालं..(एक प्रेम मिळू शकत नाही माणसाला..)

मग मी नोकरी करत असताना दवाखान्यात नोकरीला होतो. एक डॉक्टर कन्या होती.. तिला मी अवडायचो (पहिल्यांदा अस काहीतरी झालं) म्हणून मग प्रकरण चालू करावं म्हटलं तर त्या वर्षी त्यांच्या घरातून त्यांच्या जातीतला डॉक्टर मुलगा मिळाला मग तिनेच कॅन्सल केलं....

मग नंतर मोबाईल मुले देखील कॉलेज मधील कॉन्टॅक्ट वाढले तेव्हा कळलं की काही मुलीना मी आवडत होतो पण त्या बोलल्या नाहीत मला ज्या आवडत होत्या त्यांना मी बोललो नाही...
तर अशी खूप प्रकरण झाली... आणि शेवटी एकदा लग्न झालं... मग जेव्हा सहजीवन चालू झाल तेव्हा कळलं की प्रेम या शबदाचा अर्थच किती थोडक्यात घेतला..
एखादी व्यक्ती आपली आहे अस समजून घ्यायला देखील जे हृदय लागत.. एकमेकांची काळजी घेण्यासाठी असलेला भाव... सुख आणि जास्त दुःख वाटून घेत आलेले कितीतरी या 'आकर्षणा पेक्षा' जास्त प्रेम करत होते..

माझी आजी, आई अशा कितीतरी व्यक्ती होत्या ज्यांनी काळजी घेतली
माझे वडील, भाऊ, काही जीवाला जीव देणारे मित्र यांच्यामुळेच तर या जीवनात मी उभा आहे हे सर्व प्रेम तर आहे..

सगळंच रोमँटिक आहे.. आता मी बायकोला म्हणालो एकदा ,"मी लग्न करीन दुसर".. तर मला वाटलं की ती भांडेल किंवा काहीतरी बोलेल तर ती चक्क हसायला लागली.... आणि म्हणाली, "भाजी निवडून घेता येते का..लग्न मी केलं तुमच्याशी नाहीतर नुसतेच बसला होता इतके दिवस.. हे घ्या डबा आणि जावा आता कामाला..'

अस इथपर्यंत प्रेम येऊन पोहोचला आहे.. असो तरी मी अजुन रोमँटिक, आणि सदाहरित असल्याची स्वप्न चुकून पडलीच तर अजूनही मोरपिसा प्रमाणे तरंगत जात असतो.. हे देखील एक प्रेमच आहे!

Source:- INTERNET
-सीताराम पवार,
पंढरपूर

तू टेन्शन घेऊ नकू मी आहे तोपर्यंत घरची काळजी करायची नाही फक्त शिक्षण, असं मनुन मला आधार आणि मानसिक पाठबळ देणाऱ्या माझा बंधुराया! मला राम लक्ष्मण यांच्या बंधू प्रेमाला लाजवेल असा प्रेम करणारा भाऊ भेटला त्यातच तो मित्रही झाला!
तस तर प्रेम काही दोन प्रियेसी-प्रियकर यांचे असते, अशी लहानपणापासून धारणा होती पण आता प्रेमाची व्याख्या समजली.
साने गुरुजींनि जगाला प्रेम अर्पण करण्याचे शब्ध वापरले, देश नाही, राज्य नाही जग!
अध्यात्मिक जीवनात सुद्धा प्रेमाला खूप महत्त्व आहे, संत म्हणतात"प्रेमविना भजन नाकविन मोती।अर्थविन पोती वाचु नये।
तर स्वा. सावरकरांनी अपल्या मातृभूमीवर प्रेम केले"ते म्हणतात ने मजसी परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, अंगावरती शहारे आणते हे प्रेम।
तर एक पंथाचे वाक्य आहे"प्रेमाने बोला....
आईच्या प्रेमाबद्दल मी शब्दात वर्णनचं करू शकत नाही,त्याबद्दल लिहावं तेवढ थोडंच..
खरं तर मला प्रियेशी नाही, पण मैत्रणी-मित्र आहेत, त्यातल्या काही मुली आशा आहेत, माझ्यापाशी रडल्याही भाव म्हणून बहीण-बंधू प्रेम.
प्रेम कोणतंही असो ते खरंच अजरामर असते, एकदा तबला वाजवायांच्या तासाला गेलो असता, आमच्या सरांना तिकडून फोन आला बहुतेक मुलगा रडत होता, सर समजावून सांगत होते, मग शेवटी सरांनी मटले""शुक्रतारा मंद वारा, चांदणे पाण्यातूनई... मोबाईल वरूनच.त्यावेळी या प्रेमाने मात्र मला अंतर्मुख केलं...
तसं तर प्रेम काही आजचं होत असे नाही, खूप जुन्या काळापासू हे प्रेम अस्तित्वात आहे .कवी ना.धो. महानोर याचं वर्णन करताना लिहितात,
गडद जांभळं भरलं आभाळ, मृगतल्या सावल्याना भिलोरी भोवळ, खोलवर चिंब बाई मातीला दरवळ।
भिलोरी हाताला "मोराच गोंदण," चांदण्याचं बन बाई पेटलं पाण्याने,जांभळीच्या झाडाला सांगावा शकुन।
मणजे आजच्या शहरी प्रेमालाही लाजवेल अस मोरच गोंदण, आपल्या प्रियेसीच नाव, गोंदने अस होत....
प्रेम कोणावरही करा अगदी जीव ओतून करा,निस्वार्थी भावनेन


Source:- INTERNET
-गीताश्री मगर,
पुणे

#प्रेम_करण्याचा_अधिकार !
#प्रेम_जगण्याचा_अधिकार !

माणूस म्हणून आपल्याला प्रकृतीने तोह्फ्या मध्ये जे काय काय दिलं आहे त्यात सगळ्यात सुंदर तोहफा म्हणजे “प्रेम” !
“प्रेम” नसते तर आपण फक्त जन्मलो असतो, मोठे झालो असतो हवं त्याच्याशी सेक्स केला असता, आपल्या सारखी एक पिढी तयार केली असती आणि इतर प्राण्यासारखं मरून गेलो असतो. पण प्रेम ही भावना आपल्याला खास बनवते, याहून पुढे जाऊन सांगायचं म्हणल तर आपल्याला “माणूस” बनवते.

माकडाचा माणूस केव्हा झाला अस जर मला हिस्ट्रीच्या प्राध्यापकाने विचारलं तर मी त्याला हेच सांगेन कि, “दोन पायावर चालणारी ही माकडं आपल्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्तीला ‘व्यक्ती’ म्हणून समजून घ्यायला लागली. शारीरिक आकर्षण, सेक्स यांच्यासोबतच; याच्या पल्याड असलेल्या ‘प्रेम’ नावाच्या सुंदर भावनेला अनुभवायला लागली, समजून घ्यायला लागली. भाषेतून, स्पर्शातून ते व्यक्त करायला लागली ! ह्या सगळ्यांचा परिणाम ती समूहाने राहायला लागली, आपल्या छावी साठी, छाव्या साठी, पिलांनसाठी खोपटं बांधायला लागली, त्यांना खायला प्यायला लागणारे अन्न घरात शिजवायला लागली, अन्नासाठी लागणारे जिन्नस घराच्या आसपास पिकवायला लागली, शेती करायला लागली. एकूण काय तर स्थिर झाली.

एकमेकांमध्ये भावनांची, विचारांची देवाण घेवाण होयला लागली. बघता बघता अनेक घरांची वस्ती वसली, गावं वसली. त्याची शहर झाली. आणि ही बिन शेपटाची माकडं माणसात रुपांतरीत झाली. तर दोस्तानो एवढी सगळी कमाल कुणी केली ?? ओबिव्ह्सली प्रेमाने !
तर दोस्तांनो बिनदास्त प्रेम करा, प्रेम जगा आणि एक दिवस स्वतः प्रेम व्हा ! ☺

Source:- INTERNET
-श्रीनाथ कासे,
सोलापूर

तुझा सहवास जणू एखाद्या प्रेमगीतासारखे जात आहे,
तुझी आठवण जणू एखाद्या वीरहगीतासारखे जात आहे.

तुला बोललोच नाही जे जीवनी कधीही, आज बोलायचे आहे,
आयुष्य तुझ्याशिवाय एखाद्या म्रुगजळासारखे जात आहे.

कधी कुठल्याच रुपी सखे मला प्रेमजीवन मिळालेच नाही,
तुझ्याविना जीवन जणू मेघदूताच्या यक्षासारखे जात आहे.

नेमके अर्ध्यावर सोडून जावे काय असेही कोणास कोणी,
अनभिज्ञ जेथे सर्व, आयुष्य त्या किनाऱ्यासारखे जात आहे.

राहिले न या कवितेत दुःख आणि आठवणीशिवाय काही,
हा डाव, अर्ध्यावरती मोडलेल्या त्या कहाणीसारखे जात आहे.

Source:- INTERNET
-जयंत जाधव,
लातूर

माझ्या मते लोकांना जीवनात आनंदी राहायचे असेल तर प्रेमाची भूमिका खूप अत्यावश्यक आहे.प्रेमाची कमतरता असेल तर कोणीही सुखी बनणार नाही.प्रेम महत्त्वपूर्ण आहे पण फक्त प्रेमी युगुल जोडीतील नव्हे तर मित्र व कुटुंबातील प्रेम देखील महत्त्वाचे असते.मी एकटा राहतो ह्याला काही महत्त्व नाही,माझ्या सोबत एखादा पाळीव कुत्रा वा मांजर असेल तर त्याच्याशी असलेले स्नेह प्रेम मला आनंदी करण्यास महत्त्वाचे आहे आणी माझ्याकडे येवून किंवा भेटून वा बोलून कोणी खूष होत असेल तर हे प्रेमाचे रंग आयुष्य जगण्यासाठी खूप मोठी उर्जा देतात.
माझ्या प्रेमाच्या अनुभवावरून एक गोष्ट जास्त स्पष्ट करु इच्छितो मुलांच्या पेक्षा मुली अधिक व्यवहारी असतात.मुले सर्व मन खोलून व्यक्त होतात.मुली मात्र हातचा राखून ठेवतात.


Source:- INTERNET
-राज इनामदर,
पंढरपूर


प्रेम यशस्वी झाल तर जीवन अमृत 💏
विरह आला तर ..रोज थोडं थोडं करून मारणार विष 🙏
....काय सांगू विष जगू देईना 😢 आणी अमृत मरु देईना 🙂
रोज आरसा पाहताना ..चेहरा तिचा ...
डोक्यात सतत विचार तिचा
ह्रुदय माझ पण त्यात घर तीच .
माझ वागणं , चालणे, बोलणं यावर सर्व नियंत्रण तीच .
मी माझा नाहीये ..माझा माझ्यावर ताबाच नाहीये
तिच्या नावाचं नुसतं अद्याक्षर जरी कुठं दिसलं तरी माझ्या चेहऱ्यावर आनंदाच्या लहरी येतांत .
तुझी एक नजर माझ जीवन बनविते वेडे .....
आणी तिच्या नावाचा कागद जरी खिशात ठेवला तरी लोकं विचारतायत अत्तर कुठलं लावले आहे म्हणून ...तुच सांग प्रेमा नावं कुणाचं सांगु
💑



Source:- INTERNET
-नरेश शिवलिंग बदनाळे,
लातूर

What is love...?
' प्रेम ' म्हणजे नक्की काय ?
प्रेम हे विष म्हणुन घ्यायचं की अमृत म्हणुन प्यायचं हे ज्याचं त्याच्यावर अवलंबुन असतं खरे तर प्रेम ही संकल्पनाच मुळी कडाक्याच्या उन्हात हलकिशी पावसाची सर यावी आणि धगधगत्या वसुंधरेला शीतलतेची भेट द्यावी आणि त्या शीतलतेचा सुगंध सगळ्या असमंतात चिरकाल दरवळावा अशी आहे प्रेमाला माझा विरोध नाही प्रेमामुळेच तर कित्येकांच्या जीवनात बदल घडुन येतात त्यांच्या वाळवंटा सारख्या रुक्ष जीवनात हिरवळ निर्माण होते
त्याग,पावित्र्य आणि एकनिष्ठतेचे दुसरे नाव प्रेम आहे प्रेम ही अतिशय व्यापक संकल्पना आहे प्रेम ही अतिशय निरागस निर्मळ भावना असते इतर कुणापेक्षाही एकमेकांवर अतुट विश्वास ठेवणं म्हणजे प्रेम एकमेकांना समजुन घेणं म्हणजे प्रेम एकमेकांच्या जीवनात सहभागी होता येणं म्हणजे प्रेम निस्वार्थ पणे किंवा तिच्यासाठी झिजणं म्हणजे प्रेम एकमेकांच्या सुखांचा विचार करणं म्हणजे प्रेम प्रेमात पडल्यावर आपली मते एकमेकांवर लादु पये कारण प्रत्येकाला आपले जीवन स्वतंत्रपणे जगण्याचे स्वातंत्र्य आहे प्रेमात पडणे याचा अर्थ आपण पारतंत्र्यात जाणं किंवा कुणाचं तरी स्वातंत्र्य हिरावुन घेणं असा नव्हे तर आयुष्याची वाट चालताना एकाकीपणे मार्गस्थ राहिलो तर मार्ग लवकर संपत नाही वाट निरर्थक वाटते पण जर कुणी सोबत असेल तर आयुष्याला अर्थ प्राप्त होतो वाटेत लागणाऱ्या उन पावसाळ्यात आधार देणारं कुणीतरी असावंठेच लागली तर तर हाताचा आधार देणारं आपली काळजी घेणारं आपल्याला आपलं म्हणणारं असं कुणीतरी असावं हा त्या मागचा नकळत हेतु असतो प्रेम हा पोरखेळ नव्हे प्रेमामुळेच एखाद्याच्या आयुष्यात पालवी टिकुन राहते आणि प्रेमामुळेच एखाद्याच्ये उध्वस्त होवुन आयुष्याची राखरांगोळी होते हे नेहमी लक्षात ठेवायला हवं.
कुणीतरी आपल्याला आवडतय यापेक्षा आपण कुणालातरी आवडतोय ही गोष्ट फार आनंद देणारी असते आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्या व्यक्तिने आपल्यावरही प्रेम करावं असं आवश्यक नसतं प्रेमाच्या पूर्णत्वाला 'लग्न' हे नाव दिलंच पाहिजे असं आवश्यक नाही प्रेमात पडणं हा सर्वात सुखद आनंददायी अनुभव आहे पण आपल्या सुखाची आपल्या कुटुंबाला झळ पोहचणार याची जबाबदारीही आपणच घेतली पाहीजे
आजच्या पिढिची प्रेमाची व्याख्या ही निव्वळ वासनेशी निगडीत आहे शरीराच्या सुखापलीकडे प्रेमाचे इतर अगणित रंग अनुभवण्याइतका वेळ आजच्या तारुण्याकडे नाही त्याच्या सगळ्या भावना इनोसन्ट झाल्या आहेत 'रात गई बात गई ' चा सगळा मामला आहे आज प्रेमात पडलात उद्या प्रपोज केलं आणि परवा लगेच डेटिंग असं प्रेम नसतं असु ही नये
प्रेम म्हटल्यावर कोणाच्याही मनात अनंत तरंग उठतील ही भावना प्रत्येकासाठी वेगवेगळीअसते पण ही प्रत्येकवेळी 'तो' आणि 'ति' त्याच्याच भोवती फिरणारी का ?
राधा कृष्ण यांच निस्सिम प्रेम आपण पुरातन काळापासुन ऐकत आलेलो आहोत पण 'मिरा' तिचं काय साक्षात प्रेम म्हणजे त्यागमुर्तीच ती तिनं सुद्धा श्री कृष्णावर नितांत प्रेम केलं एवढच नव्हे तर त्याच्या नावासाठी तिनं आपलं घर संसार राजवाडा नातेवाईक सर्वांना सोडुन ध्रुत वस्त्र परिधान करुन वीणा घेवुन श्री कृष्ण रसात न्हावुन निघाली हे प्रेम नव्हे तर काय ? कोण समजणार तिला ?
प्रेम म्हणजे फक्त आकर्षण नसुन आत्यंतिक विश्वास त्याग जीवनातील कोणतीही बेरीज वजाबाकीचे गणित नसणारी भावना , सच्चा प्रेमाचा अनुभव प्रत्येकानं एकदातरी घ्यायलाच हवा हल्लीच्या धावपळीच्या जगात धावणारी 'ती' आणि 'तो' त्यांना कुठे वेळ असतो अशा भावना ओळखायला आणि पारखायला ?
आपल्या प्रत्येकाला कोणीतरी आवडत असतं मग ते आपल्या नात्यात असो किंवा मित्र मैत्रिणीत असो त्याचं स्थान इतरांपेक्षा वेगळच असतं आपण कशाच्या ना कशाच्या निमित्तानं एकमेकापासून आपल्या माणसापासुन दुरवर राहत असतो तेव्हा आपलं मन मात्र सारखं त्याच्या आठवणीनं सारखं व्याकुळ (अस्वस्थ ) होत असतं लग्नानंतर आपण आपल्या सगळ्यांपासुन दुरावतो त्याच्या आठवणी त्याचा लाभलेला सहवास आपल्याला सारखी त्याच्या भेटीची ओढ लावत असतो खरच,मन फार गुढ असते ते कधी कुठे गुंतत भिरभिरत काहीच कळत नाही पण मनाला वाटतं तस करायला हवं ( मिळावं ) हा भाव मात्र सर्वांना समजतो
आपल्या माणसापासुन आपणदुर असताना अचानक आवडत्या माणसाचा माणसाचा फोन येतो आणि आपल्या आजुबाजूच सगळं वातावरण अगदी बदलुन जातं संपूर्ण जग सुंदर होऊन जातं आपलं आवडतं माणुस साधसंच काहीतरी आणि ते आपल्याला मनापासुन आवडतं आपल्या सगळ्यांनाच हवी असते थोडीशी माया ती मिळते त्यामुळेच ते माणुस आपल्या आवडीचं होतं त्याची प्रत्येक गोष्ट आपल्याला चांगली वाटते बेसुर गाणं असो वा चारोळी, नुसत्या आठवणीनं ऱ्हदयात खोलवर दाटल्यासारखं वाटतं आणि मग डोळ्यात अश्रु दाटतात खरंच एकदा अनुभवुन पहा आपल्या आवडत्या माणसाची माया ! आपल्या प्रत्येकांच कोणीतरी असतं त्यातले भाव कधी बोलके असतात तर कधी अबोल फरक इतकाच असतो पण मनातली अधीरता तितकीच असते. त्यासाठी आयुष्यात जुळावंच आपलं आवडीच नातं त्यातल्या त्यात आपल्या आवडत्या माणसाला आपण मनापासुन आवडत असाल तर मग काय ? अवघ जीवनच सुगंधी होऊन जातं त्याचा आनंद अमाप असतो.तो कधी शब्दात मावत नाही हे मात्र अगदी खरं.....! 'ILU' 'This is love'......💞

प्रेमावरती बोलू काही ….(भाग:-१)

प्रेमावरती बोलू काही …. (भाग:-१)

🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

प्रेमावरती बोलू काही ….


Source: INTERNET
-श्रीनाथ कासे,
सोलापूर

"प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं ! "
या मंगेश पाडगावकर,यांच्या ओळी सहज आठवल्या आणि प्रेमाचा खरा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला. सर्वसामान्य लोकांना प्रेम हे हिंदी चित्रपटांतूनच जास्त समजलेला दिसतो. चित्रपटातील नायक, नायिकेवर प्रेम करतो. तो चित्रपट संपेपर्यंत त्याचे प्रेम तो मिळवतो. असे चित्र भरपूर चित्रपटामध्ये बघायला मिळते. पण हे चित्र सामान्य जीवनात मात्र बघायला मिळत नाही.
प्रेमाची संकल्पना ग्रामीण भागातील थोडी वेगळीच आहे. येथे अप्रत्यक्षरित्या एकमेकांवर प्रेम केले जाते. पूर्वग्रहदूषित वातावरण असते.अशामध्ये प्रेम करणाऱ्यावर बंधने असतात. तो ठराविक जात, धर्म, आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, करियर इ. अडथळे पार करीत तो प्रेमाच्या शिखरावर कधी पोहोचतच नाही. काही ठिकाणी प्रेम हा शब्द पाप म्हणूनच बघितले जाते. मग ऑनर किल्लिंग, घराची अब्रू वगैरे वगैरे प्रकार पहावयास मिळतात. येथे प्रेम तुमचं आणि आमचं सेम नसतं, असेच म्हणावे लागेल.
शहरातील प्रेम, ग्रामीण प्रेमाच्या एकदम विरुद्ध असते. येथे बोल्ड आणि बिनधास्त प्रेम बघावयास मिळते. मुंबई, पुणे यांसारख्या ठिकाणी सार्वजनिक जगामध्ये बगीचा, ब्रिज येथे प्रेमाचे थवे बघावयास मिळतात. त्यांनाही धमकावण्यचे काम अनेक संस्था, दल, प्रशासन अविरत अखंडपणे करीत असते. असो, तो त्यांचा खाजगी प्रश्न असेल.
माणसाच्या जीवनामध्ये असा एखादा वयाचा टप्पा येतो जेथे मनाच्या वाळवंटात त्याला प्रेम नावाचे म्रूगजळ जाणवू लागते. मग तो प्रेम करू लागतो. ते प्रेम त्याला जीवनात कधीच मिळणार नाही, हे समजल्यावर त्याला असह्य होते. जर प्रेम मिळाले नाही तर तो स्वतःवर दोष ओढाउन घेतो. मग तो स्वतः मधल्या चुका हुडकत राहतो. 'आपलाच रंग जात, धर्म, सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती कमी पडली असेल' असा विचार त्याच्या मनामध्ये डोकावत असतो. वेळ ही अशी मलम आहे. जे कितीही मोठी जखम राहूदे त्यावर लावले असता जखम भरून येते.
प्रेम हा विषय फारच नाजूक असल्याने करताना, लिहिताना, फारच काळजी घ्यावी लागते .प्रेमावर अनेक शायर, कवी, लेखक यांनी भरपूर लिहून ठेवलेले आहे. भविष्यात लिहितील सुद्धा... आपण उभ्या जन्मात एवढा व्याप पेलू शकणार नाही.
गालिब प्रेमावर एकेठिकाणी म्हणतो,
ये इश्क नहीं आसां , इतना तो समझ लीजिये
एक आग का दरिया है , और डूब के जाना है ।
प्रेमात एवढी सहनशक्ती असावी लागते
प्रेम कश्यावर आणि कोणावर करावे याचे उत्तर देताना मंगेश पाडगावकर म्हणतात,
"या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे"
प्रेम हे शब्दच मुळात सर्वव्यापी आहे. साने गुरुजींनी प्रेमाला धर्माच्या ठिकाणी ठेवलेले आढळते, "खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे" या ओळी मी शाळेत असताना प्रार्थना म्हणून कितीतरी वेळा गायिलो असेन. डोळे मिटले नाही किंवा प्रार्थना म्हंटलं नाही तर कितीतरी मुलं मार पण खायचे. असो, साने गुरुजींनी 'प्रेम देणे हाच खरा धर्म आहे' असे सांगितले आहे.
शेवटी प्रश्न पडतो, " प्रेमा, तुझा रंग कसा ? " श्यामच्या आईचे श्यामवर , एखाद्या सैनिकाचे देशावर, पालकांचे आपल्या पाल्यावर, मित्राचे मैत्रिणीबरोबर, गायीचे वासरूवर, असे अनेक आणि अफाट प्रेमाचे रंग पहावयास मिळतात. जेथे स्वार्थ, कपट, ग्र्हुणा, वाईट विचार इ. संपलेले दिसतील तेथे प्रेम सहज उमलू शकेल यात काही वावगे नाही. प्रेमाचे अनेक रंग असतात त्यात तुमचा कुठला आहे ते शोधायला शिका..आणि प्रेम शोधा ज्याचे त्याने....



Source: INTERNET
-शुभम,
पंढरपूर

We can't imagine
A body without soul ,
We can't imagine
A temple without statue of God,
Like that ;
We can't imagine
A human life without LOVE.

प्रेम...... एखाद्या कळीच सुंदर अश्या फुलामध्ये रूपांतर होण हे जितके सहज, सुंदर आणि नैसर्गिक असते तितकेच प्रेम होणही सहज, सुंदर आणि नैसर्गिक असत. कधी ते पहिल्या नजरेत होते तर कधी ते सहवासाने फुलत. ते आपण ठरवून करू शकत नाही.. बस ते होत - का होत, कधी होत, कस होत हे आपणालाही कळत नाही आणि ते तस असण्यातच खरी गमत आहे. त्यामध्ये असणारी भेटीची ती अनामिक ओढ, हुरहूर प्रत्येकाला हविहवीशी वाटते - त्यासाठी काय वाटेल ते करण्याची तयारी आणि ती करत असताना जिवाची होणारी उलाघाल, बेचैनी जिवाला आणखीनच कासावीस करून सोडते ... हा सर्व आटापीटा करून तो येणारा प्रेमाचा एक क्षण ... वैशाख वनव्यानंतर येणाऱ्या वळिवाच्या पहिल्या पावसाप्रमाणे ... विरहाच्या अग्निमध्ये होरपळून निघालेल्या जिवाना तृप्त करून सोडतो... ज्यासाठी प्रत्येक जीव आसूसलेला असतो.

खरतर प्रेम हे कधीच ठरवून केल जात नाही, ठरवून केला जातो तो व्यवहार - प्रेम नव्हे. अश्या व्यावहारिक प्रेमामध्ये स्वतःचा आनंद साध्य करण्यासाठी प्रेमाचा साधन म्हणून वापर केला जातो. समोरच्या व्यक्तिवर मालकीहक्क गाजवला जातो. त्यामध्ये तिला/त्याला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून न पाहता केवळ आपल्या आनंद प्राप्तिचे एक साधन म्हणून पहिले जाते. आज कित्येक प्रेमसंबंध/प्रेमविवाह तुटन्याचे हेच प्रभावी कारण आहे - कारण अश्या ठिकाणी प्रेम हा त्या दोन जीवाना जोडणारा सुंदर, नाजूक, हळुवार, तरल आणि एकमेकांचे सहजीवन समृध्द व आनंदी करनारा 'बंध' (अमर्याद) न राहता त्याचे रूपांतर कूरुप, काटेरी, ताठर, रूक्ष अशा 'बंधनात' (मर्यादा) होते; आणि कोणत्याही व्यक्तिला बंधनात/पारतंत्र्यात राहायला आवडत नाही - परिणामी नाते तुटते . कारण स्वातंत्र्य आणि आनंद हाच प्रत्येक सजीवांच्या जिवनाचा स्थायी स्वभाव आहे.

'अध्यात्म ' माणसाला आत्मिक बळ देत, निर्भयतेची कला शिकवते आणि आत्म्याचे - परमात्माशी नाते जोडते ; तर 'प्रेम ' हे आत्म्याला - आत्म्यालाशी जोडून सर्व चराचर सृष्टी ही त्या निर्गुण - निराकार सर्वव्यापी परमात्माचेच सगुण - साकार रुप आहे याची जाणीव जागृत करते.

"प्रेम - म्हणजे एकत्रित सहजीवन जगण्याची कला." कोणतीही कला ही सहज साध्य नसते ; तर ती जाणीवपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक जोपासावी लागते त्यासाठी गरज आहे ती काही गोष्टी समजून घेण्याची , शिकण्याची आणि वेळप्रसगी स्वतामध्ये बदल करण्याची.

........ म्हणजे प्रेम

® जरी तू माझा/माझी होवू शकत नसशील (पूर्ण प्रयत्न करून ते शक्य न झाल्यास) तर काही हरकत नाही , ज्याचा/जिचा होशील त्याच्याशी/तिच्याशी आनंदाने राहा. तुझ्या भावी आयुष्यामध्ये कधी काही अडचण आली तर स्वताला कधिही एकट समजू नकोस अगदी तुझ्याव्यतिरिक्त सपूर्ण जग जरी तुझ्याविरुध असले तरी मी नेहमी तुझ्याबरोबर असेन हा विश्वास आपल्या प्रिय व्यक्तिला देण आणि त्याला त्याची जाणीव असणे म्हणजे प्रेम.
® स्वतःच्या 'स्व' चा विकास साधत असताना समोरच्या व्यक्तिच्या विकासालाही पोषक वातावरण निर्माण करून त्यालाही 'स्व' विकासाठी अवकाश उपलब्ध करून देण - ' सहविकास ' म्हणजे प्रेम.
® स्वताचे स्वातंत्र्य अबाधित राखत दुसर्यांच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण न करणे - 'स्वातंत्र्याचा आदर' म्हणजे प्रेम.
® स्वताच्या जिवनाचा आनंद शोधात असताना इतरांचे जीवनाही आनंदी करणे - 'आनंदी सहजीवन' म्हणजे प्रेम.
® आपण जसे चुकू शकतो तसेच समोरचाही चुकू शकतो याचे भान ठेउन कोणीच परिपूर्ण नसतो याची जाणीव ठेवन - ' सहजाणीव' म्हणजे प्रेम.
® समोरचा तानसेन(तान - तणाव आणि दुखात) असताना आपण कानसेन(मनपूर्वक एकूण घेणे) होणे - 'संवेदनशिलता' म्हणजे प्रेम.
® वेळप्रसगि आपण स्वता थोडी झळ सोसून/ एक पाऊल पाठीमागे घेउन समोरच्याला प्राधन्य देणे - 'त्याग' म्हणजे प्रेम.
® समोरची व्यक्ती आइस्क्रिम(दुखाच्या किंवा भावनेच्या भरात प्रवाहपतित होणे/वाहून जाणे) झाल्यास आपण कोन(सावरणे किंवा आधार देणे) होणे - 'काळजी घेणे' म्हणजे प्रेम.
® समोरच्या व्यक्तीचा तो जसा आहे तसा स्वीकारा करणे - 'अटीविरहित स्वीकार' म्हणजे प्रेम.
® समोरच्या व्यक्तीवर डोळे बंद करून प्रेम करण्यापेक्षा डोळे उघडे ठेवून डोळे बंद होइपर्यंत प्रेम करणे - ' वास्तवतेच भान' म्हणजे प्रेम.

सरतेशेवटी सर्वात महत्वाच्या दोन गोष्टी ;
(१) स्वतःवरती प्रेम करणे - म्हणजे स्वतःचा स्वतःच्या सर्व गुण दोषासह स्वीकार.
(२) प्रेम व्यक्त करणे - आपण आपल्या प्रियजनावरती खूप प्रेम करतो पण ते कधी व्यक्तच करत नाही, ही खूप मोठी शोकांतिका आहे. प्रेम करणे जितक महत्त्वाचे आहे तितकेच प्रेम व्यक्त करणेही महत्वाचे आहे - कारण या प्रत्येक व्यक्ती प्रेमासाठी भुकेजलेली आणि आसूसलेली असते त्याची अवस्था ' क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षांव पडो मरणाचा ' अशी असते आणि त्यांना तो प्रेमाचा एक क्षण आपण नक्कीच देवू शकतो - आपले त्यांच्यावरती असलेले प्रेम व्यक्त करून.

प्रेमाधीन ब्रम्ह श्याम, वेद ने बताया |
याते याते नाम, ' प्रेम मंदिर' धराया ||


Source: INTERNET
-संदीप बोऱ्हाडे,
पुणे

अस म्हणतात जग जिंकता येते प्रेमाने. पण फक्त ते प्रेम निस्वार्थ असायला पाहिजे..प्रेमाची परिभाषा बदलणे गरजेचे आहे.

जगात सर्वात श्रेष्ठ प्रेम हे आईच सर्वांना माहिती असेलच पोटच्या लहान बाळाच्या प्रेमापोटी हिरकणी बुरुज उतरून गेली होती.
प्रेम करांव भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं..
बाबा आमटे यांचे कुष्ठरोग्यांवरील प्रेम.

प्रेम ही भावना किती सुंदर आहे. मातृप्रेम, देशप्रेम, बंधुप्रेम, पुत्रप्रेम अशा कितीतरी परी तिला लाभल्यात. परंतु प्रेम म्हटले की आम्हाला आधी प्रियकर आणि प्रेयसी यांच्यातील शरीर पातळीवरची प्रेमभावनाच दिसू लागते.


Source: INTERNET
-किरण पवार,
औरंगाबाद

खरं तर हाच प्रश्न पडलाय की, प्रेमावरती काय बोलू? जेवढ बोलेल तेवढ अपुरच ठरेल. पण खरंच साला प्रेमामध्ये आहे काहीतरी असं जे अशक्यलाही शक्य करायला भाग पाडतं. मी तर सत्यतेला प्रेमाचा महत्वाचा पैलू समजतो. त्यामुळे एक सत्य आज या निमीत्ताने सांगून टाकतो. मीही प्रेम केलं आहे. त्या घटनेला आता जवळपास पाच वर्षे उलटून गेली. मला नक्की ठाऊक अजिबात नव्हतं, मी तिच्यावर का प्रेम करतो? पण मी करत राहिलो. तिला थेट समोर जाऊनच विचारल होत मी. पण तिने तिच उत्तर आजवरही काही दिल नाही. गेली पाच वर्षे अशीच गेली. मी विचारायचो आणि ती काहीच उत्तर देत नसायची. पण मी एक गोष्ट ठामपणे ठरवली होती की, आयुष्यात कुठल्याही वळणावर जर तिला माझी गरज लागली तर मी तिच्यासाठी नक्कीच हजर असेन. मला माहित नाही, मी नक्की तिची वाट इतके दिवस कुठल्या तुटपुंजा आशेवर पाहिली. पण एक गोष्ट होती जी सतत माझ मन मला सांगत होतं की, तू संपूर्ण आयुष्य तिच्यासाठी थांबलास तरी कमीच.
प्रेम ही देण्याची गोष्ट आहे; एवढंच काय ते मला ठाऊक आहे. बाकी आपल्या नशिबात प्रेम असेल नसेल तरी अजिबात फरक नाही पडू द्यायचा आपण. आपण आपला आनंद स्वतःसाठी निर्माण करू शकतो. *प्रेम गरजेचं नक्कीच आहे पण फक्त प्रेम म्हणजेच आयुष्य असं असावच असं नाही.* प्रेम जर एक जादू असेल तर समजून जा की, ती जादू ज्याने केली ती छडी म्हणजे आयुष्य.

कविता:- *प्रेमावरती बोलू काही*

प्रेमावरती बोलू काही
सावरून घेऊ चुका काही
आयुष्याची कला आहे ही
सहज जरा कठीण काही,

प्रेमावरती बोलू काही
दूर करू रूसवे काही
आयुष्यातली वाट ही
अवचट जरा अबोल काही,

प्रेमावरती बोलू काही
नवे बंध जुळवू काही
आयुष्यातली वादळे ही
मंद जरा विनाशी काही,

प्रेमावरती बोलू काही
जगू मनसोक्त नवं काही
आयुष्याची अगणित कोडे ही
सुटती जरा जीवघेणी काही.



Source: INTERNET
-पी.प्रशांतकुमार,
अहमदनगर

...सर्व वन्य प्राण्यांत स्वार्थ selfishness ही जन्मजात नैसर्गिक भावना आहे.. मग प्रेम म्हणजे काय?.. तर त्या by default असलेल्या स्वार्थीपणावर मात करत केलेलं sharing.. हिंस्र प्राण्यांमध्ये आपण जेव्हा पहातो की सिंहिण आपलं खाण आपल्या पिलांबरोबर share करते.. ते प्रेम ..  तस तर ती अन्न सिंहाबरोबर पण share करते पण त्या मागे असते भीती..

....खेळांमधे मोजताना love म्हणजे शून्य असतं..जिथे पॉईंट्स मोजतात ते सुरुवातीलाच इशारा वजा सांगतात लव्ह ऑल..
माझ्यामते प्रेम म्हणजे शून्यत्वाची भावना.. Ready for sacrifice एक असा खेळ ज्यात जीत-हार अस काहीच नसत.. मालकीहक्क वगैरे भावना येतात ते प्रेम नसत तिथे व्यवहार असतो..
अमीर खुसरो म्हणतात.. *'खुसरो दरिया प्रेम का, उल्टी इसकी धार। जो उबरा सो डूब गया, जो डूबा सो पार।'*

...प्रेमीक ह्या प्रकारात प्रेमाचं  बऱ्याचदा रूपांतर द्वेषात होताना दिसत.. जिच्यावर/ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्याच वाईट व्हावं अस कस वाटू शकतं? .. कधी काही अपरिहार्य कारणाने लांब जावं लागलं तर तो किंवा ती आहे तिथे सुखी असावी अशा भावना प्रेमात असण्यात वेगळं काय??


Source: INTERNET
-लक्ष्मी

तो.....माझ्या नजरेतला
       
हे प्रिय,

बऱ्याच दिवसांनंतर मी तुझ्याशी लिखित स्वरुपात बोलते आहे. तुझ्यापासून दूर होते तेव्हा तुझ्याशी होणारा संवाद, प्रेम, राग, शंका-कुशंका सगळं सगळं डायरीत लिहून काढायचे (व डायरी तुला वाचायला द्यायचे). एकत्रित राहायला लागल्यावर थेट तुझ्याशीच बोलायला लागले. तरीही काहीतरी उरतच.....लिहिण्यासाठी.....

अजूनही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधील आपली पहिली भेट आठवते. दिवाळीची तोबा गर्दी. माझ्याकडे भलीमोठी सुटकेस. फक्त तुझ्याशेजारची जागा रिकामी. मला लॉटरी लागल्याचा आनंद. मी बसणार तेवढयात तू माझ्याकडे तिरक्या नजरेने त्यावर विरजण टाकलस, “ इथला माणूस खाली उतरला आहे. तो आला तर मी उठणार नाही, तुम्हांला उठावं लागेल.” तुझ्या या खडूस निक्षूनपणाचा रागच आला. एका मुलीशी (तेही इतक्या सुंदर !) बोलण्याची किती कठोर आणि उद्धट पद्धत वाटली मला. ‘तो उतरलेला माणूस आला तर आपण उठायचच नाही, होईल ते होईल,’ असा विचार करून मी बसले. शेवटी तो ‘उतरलेला माणूस’ काही परत आला नाही आणि आपल्या बस प्रवासाबरोबर आपल्या आयुष्याच्या सह्प्रवासाचीही सुरुवात झाली. या तीन तासांच्या प्रवासात बरच काही घडलं. अगदी सिनेमातल्यासारखं. मुली कशा असतात, मुले कशी असतात यावर आपला झालेला वाद, रात्री आठच्या वेळी रस्त्यात एक रॉकेलच्या ट्रकचं पुलावरून खाली पडणं, तू जखमींना वाचविण्यासाठी अंधारात उतरणं, तुझी बस चुकणं,माझं कंडक्टर व प्रवाशांशी भांडण, तुला शोधण्यासाठी परत अपघात स्थळी पळत येणं, दोघांनी बराच अंतर पुढे गेलेली बस पळत पळत पकडणं, तुझे रक्ताने माखलेले कपडे पाहून सगळ्यांकडून कौतुक वगैरे वगैरे. ज्यावेळी तू जखमींना वाचविण्यासाठी मागचा पुढचा विचार न करता एकटाच उतरलास, त्याचवेळी तू माझ्या मनात घर केलस...म्हटलं... ‘चांगला माणूस’ आहे.’ (पहिल्या नजरेचं प्रेम वगैरे असं काही नव्हतं हं !)
मैत्री वाढत गेली. ‘मैत्रीपलिकडच्या’ नात्याचा दोघांनाही मागमूस लागला. मी निर्धास्त. तुझा फोन, ‘आपलं नातं मैत्रीपलीकडे जात आहे. माझ्या घरी खूप पारंपारिक वातावरण आहे. मला तुला फसवायचं नाही, खोटया आशेवर ठेवायच नाही. आजपासून आपला संपर्क बंद.’ याहीवेळी तू आवडलास. तुझ्या स्पष्टपणामुळे तुझ्याबद्दलचा आदर आणखी वाढला. पुढ कसला संपर्क बंद, तो वाढतच गेला, अगदी ‘आता आपण एकमेकांशिवाय राहू शकत नाही’ इथपर्यंत.

खरं तर प्रेम, लग्न अशा गोष्टी मी स्वतःच्या आयुष्यात गृहीत धरलेल्या नव्हत्या. लहानपणापासून आई-वडील, भाऊ-वहिनी या नात्यांपासून ते आजूबाजूचे सर्व संसार होरपळलेले पाहिले होते. तर्र दारू पिऊन येणारे नवरे, दिवसभर शेतात राबून रात्री नवऱ्याच्या लाथा खाणाऱ्या, विव्हळणाऱ्या बायका; भेदरलेली, असहायपणे रडणारी लेकरे हे सर्व मी अनुभवलं होतं,पाहिलं होतं. सणाच्या दिवशी माझ्या वडिलांचं दारू पिऊन येणं, जेवायला वाढलेली ताटे पायाने उधळणं, आईला कोपर्‍यात घालून पोटात लाथा घालणं, तिचं वेदनेनं ओरडणं, ‘माझ्या पोरीला मारू नका हो,’ असा आजीचा केविलवाणा सूर, आम्हां बहिण-भावाचं आईला धरून रडणं, तिनं रागाने लेकरांना घेऊन घर सोडणं, पण ‘जायचं कुठं?’ याचं उत्तर न मिळाल्याने निम्म्या रस्त्यातून घरी परतणं, तिचं व माझंही रात्रभर रडणं.....अशा कितीतरी जखमाच जखमा...मनावर कोरलेल्या...कधीच न पुसल्या जाणाऱ्या (कालांतराने काही परिस्थिती बदलली तरीही)...सतत सलणाऱ्या...प्रश्न विचारणाऱ्या...असं का? राग यायचा सगळ्या नात्यांचा.नको ते वडील, भाऊ.....पुरुषच नको.....का सहन करतात बायका सगळं?...तेही अगदी निमूटपणे...बायकांनी, मुलींनी असंच रहायचं असतं, बायकांनी डोक्यावरून पदर पडू देवू नये, परपुरुषाशी बोलू नये, विधवेने कुंकू लावायचं नाही, बायको मेल्यावर चुलत भावाने लगेच लग्न केलं, मात्र नवरा वारल्यावर चुलत बहिण सासरीच राहिली.....कितीतरी घटना...खटकणाऱ्या......मग नकोच ते लग्न ...ती साडी...ते मंगळसूत्र...आणि ते जोखड... (माझे हे विचार सर्वांना ‘काहीतरीच, पुस्तकी आणि बंडखोर’ वाटायचे.)

तुझ्याशी जुळलेलं नातं मात्र जैविक झालं...कदाचित, नाही, खरचं तू ‘वेगळा’ वाटलास.

पण तुझ्यासोबतच्या सहजीवनाला मी सहजासहजी तयार नव्हते. मी तुला अटींची यादीच सांगितली( मी भूतकाळात दुसऱ्यांच्या लग्नाच्या सहजीवनाच्या भयंकर सत्याला अनुभवल होतं, त्यामुळे मला दूधही माझ्या परीने फुंकून प्यावेसे वाटले असेल.)... ‘मी आहे तशीच राहणार, मीही तुला बदलवण्याचा प्रयत्न करणार नाही. साडी, कुंकू, महत्वाचं म्हणजे मंगळसूत्र घालणार नाही, मूल व्हावं की नाही यावर आता माझं ठाम मत नाही, पुढे काय निर्णय घेईन हे मला माहित नाही, माझ्या घरच्यासाठी तू प्रस्थापित ‘जावई’ न होता ‘मुलगा’ बनशील वगैरे वगैरे.’ तू फक्त एवढचं म्हणालास, ‘मला या अटी मान्य आहेत, तू समजूतदार आहेस. मला खात्री आहे वेळप्रसंगी तू सांभाळून घेशील.’ मी स्तंभित.

तुझ्याशी मैत्री हा सहजयोग असला तरी पुढील वाटचाल सोपी नव्हती. मी तथाकथित ‘खिशात नाही दाणा अन् पाटील म्हणा’ अशा जातकुळीत जन्मलेली. वडील सुशिक्षित, राजकारणी, प्रतिष्ठित. त्यांच्या मते, मी माझ्या आयुष्यातले सगळे निर्णय घ्यायला सक्षम(लग्न सोडून). कुणाशीही मैत्री, हरकत नाही. (त्यांचे स्वतःचे जिवलग मित्र सगळ्या जाती-धर्मातील होते.) मात्र लग्न...फक्त आणि फक्त जातीतच. (माझा अकरावितला पहिला दिवस..ते मला सायकलवरून बस थांब्याला सोडायला आलेले... ‘शिकायचं तेवढ शिक...मात्र दुसऱ्या जातीत लग्न करायचं नाही,’ सूचक शब्द.)

मला जात-पात मानण कधीच मान्य नव्हतं, त्यामुळे तुझ्याबद्दलचा निर्णय मी घेवू शकत होते. तरीही त्यांनी टाकलेला ‘विश्वास,’ माझ्यासाठी घेतलेले कष्ट, माझं अवकाश धुंडाळण्यासाठी दिलेले प्रोत्साहन व संधी, पाहिलेली स्वप्ने हे सगळं सगळं विस्कटणार होतं. तुझी स्थिती तर माझ्याहून बिकट...तू थोरला,शिक्षकाचा ‘आदर्श’ मुलगा. तुझ्या घरी चहा प्यायला गेलेली मी पहिलीच मुलगी...तुला मोजून एक-दोन मैत्रिणी. आपण जेव्हा एकमेकांबद्दल घरी सांगितलं...सगळं काही आपल्याला अगदीच अपेक्षित..तुझ्या आईचा बी.पी. वाढला. वडिलांनी, भावाने संबंध तोडण्यास सांगितले..माझ्या आई वडिलांनी त्यांच्या माझ्यावरील ‘विश्वासाची’ परत परत आठवण करून दिली, आत्महत्या करण्याच्या धमकीपर्यंत प्रकरण गेलं. दोघेही भावनिक झालो..क्षणभरच..तू तर जाहीरच केलं, ‘लग्न केलं तर हिच्याशीचं.’ तुझ्यातला हा ठामपणा मला जरा अनपेक्षितच होता खरा. अशा सगळ्या परिस्थितीत एक फारच वाईट गोष्ट घडली..तुझी आई अपघाताने वारली.तू तिच्या काळजाचा तुकडा आणि ती..तुझ्या हृदयाची धडधड...आईचा लाडका.अतिशय आज्ञाधारक..घरी धुणी-भांडी करण्यापासून ते घर सारवन्यापर्यंत सगळं काही आनंदाने करणारा.तिची काळजी घेणारा.आधीच अबोल तू ...आणखीनच नि:शब्द झालास. माझ्या घरी लग्नाचा विषय बंद तर तुझ्या घरी या विषयाने आणखीनच जोर धरला....या सगळ्या तणावाच्या परिस्थितीत आपण आणखीनच जवळ आलो. ‘आता आपण लग्न करायलाच हवं’ या तुझ्या विचारांशी मी सहमत झाले. घरच्यांनीच लग्न लावून द्यायला हवे, या विचाराला आता अर्थ नव्हता.तुझ्या धाकटया भावाचे लग्न व घरच्यांनी आपल्या लग्नाचा विचार करण्यसाठी वेळ घ्यावा म्हणून ‘लग्न करायचे पण सांगायचे नाही’ असे ठरले आणि ‘ दोघांचा विवाह झाला’ असा कायदेशीर पुरावा नोंद करून घेतला. (खरं तर माझा ‘कायदेशीर लग्न’ वगैरेत विश्वास नव्हता,मात्र तुझी ‘लिव्ह-इन-रिलेशनशिपची’ (कायदेशीर लग्नाविना एकत्रित राहण्याची) तयारी नव्हती. शिवाय एकदा कायदेशीर पुरावा तयार झाल्यावर इतर हालचाली न करता घरचे आपल्याला स्वीकारतील, अशी अशाही वाटत होती.) हा सगळा खटाटोप ‘घरच्यांना बांधून ठेवायचच’ अशा निर्धारासाठी होता.यात तुझी परिपक्वता कामी आली.

तुझे दोन मित्र, तू आणि मी असा आपला ‘संसार’ सुरु झाला. (खरं तर काहीच बदललं नव्हतं, होस्टेलमध्ये राहिल्यासारखे वाटायचे.)एकत्रित स्वयंपाक करणं, स्वतःचे कपडे स्वतः धुणं, घरातील व बाहेरील जबाबदाऱ्या मिळून पार पाडणं, दोघांनी सल्लामसलत करून निर्णय घेणं या गोष्टी आपल्या आयुष्यात आपोआप होत होत्या. यासाठी मला तुझं कोणत्याही प्रकारचं ‘जेंडर सेन्सिटिव’ होण्यासाठीचं प्रबोधन करावं लागलं नाही. त्यामुळे एकत्रित राहण्यातल्या काही गोष्टी सोडल्या तर आपणा दोघांचही ‘लग्न’ वगैरे झालंय असं दोघांनाही वाटायचं नाही.(आठवतंय ना, तीन-चार प्रसंगात आजुबाजूच्यांना आपण सख्खे बहिण-भाऊ वाटलो होतो.) आणि असंच आयुष्य मी अपेक्षिल होतं.

मला प्रचलित ‘नवरा-बायको’ अशा जड नात्याबद्दल (अगदी शब्दांबद्दलही) तिटकारा होता, आहे. कोणाचीतरी बायको, तिचा कोणीतरी नवरा, त्या नात्याची एकमेकांशी वागण्याची समाजनिर्मित उतरंड. विचारानेच धस्स व्हायचं. मात्र आपल्या नात्यात असं काहीच झालं नाही. मला प्रचलित ‘बायको’ व्हायचं नव्हतं, मात्र तूही ‘नवरा’ न बनता नेहमीच मित्रासारखा वागलास, वागतोस हे महत्वाचं. म्हणूनच मला आपलं नातं ‘जड किंवा नकोसं’ कधीच वाटलं नाही. सहजीवनातील सुरुवातीस क्षुल्लक कारणावरून आपल्यात अबोला व्हायचा(इतक्या क्षुल्लक की काही वेळाने आपण कोणत्या कारणावरून भांडलो हेही लक्षात राहायचं नाही.), मात्र माझी समजूत काढायची जबाबदारी बऱ्याच प्रसंगात तुझीच असायची (बहुतेकदा ‘तुझीच’ चूक आहे, अशी मला पक्की खात्री असायची, त्यामुळे तू ती चूक पुन्हा करू नये यासाठी माझा मौन व्रताचा प्रपंच). कधी कधी छोटया पण महत्वाच्या गोष्टींवरून वाद व्हायचे. उदा. मी बर्मुडा वापरणं, संध्याकाळी रस्त्याच्या कठडयावर एकटीनं बसणं, कामावरून रात्री जास्त उशिरा घरी येणं हे तुला खटकायचं. अशावेळी माझ्याप्रतीची ‘काळजी’ तू व्यक्त करायचास, पण जाताजाता मी तुला टोकाची ‘स्त्रीमुक्तीवाली’ वगैरे वाटायची. (आता यातल्या कशानेच काहीच फरक पडत नाही, हा भाग अलाहिदा. तुला एक गंमत सांगते, बऱ्याचवेळा अशा छोटया वाटणाऱ्या महत्वाच्या गोष्टींना मी मुद्दामहून ताणून धरून तुला खूप उलट प्रश्न विचारायचे, अजूनही कधीकधी विचारते जे तुला आवडत नाही. उद्देश एकच असतो, तू या मुद्द्यांचा तळाशी जाऊन विचार करावास.) मात्र या सगळ्या ‘गोड’ खटक्यांमधेही ‘आपण आयुष्यभरासाठी एकमेकांसोबत राहणार आहोत, तेव्हा कोणतीही समस्या संवादाने लवकरात लवकर सोडवायची,’ हा दोघांचा विचार आपल्या नात्यात दृढ करायला तुझाच पुढाकार असायचा.

तुझ्यासोबतच्या सह्जीवानातली व माझ्या आयुष्यातला महत्वाचा कप्पा असलेली एक महत्वाची गोष्ट, जिचा उल्लेख करायलाच हवा ती म्हणजे आपले शरीरसंबंध. अगदी लहानपणापासून स्वतःच्या लैंगिक अवयवांना, स्वतःतल्या लैंगिकतेला इतकं झाकून ठेवलेलं की मी आयुष्यात कधी कुणाशी शरीराने जवळ येईन असा विचारही करवत नव्हता(समाजानं ज्या पद्धतीनं त्याला ‘गलिच्छ’ समजून ‘नैतिकतेला’ जोडलेलं त्यानूसार मी त्याचा तिरस्कारच केलेला). पुरुषांच्या वखवखलेल्या नजरा (अगदी जवळच्या नात्यातीलही), नकोसे स्पर्श, अप्रत्यक्षपणे केली जाणारी ‘आवाहने’ हेही अनुभवलेलं. शिवाय ‘नवरा’ कशा पद्धतीनं ‘बायकोच्या’ शरीराला ओरबाडून ‘बलात्कार’ करत असतो, याची अनेक उदाहरणे ऐकलेली, पाहिलेली असल्याने मला माझ्या आयुष्यात तो भागच नसावा अशीच माझी इच्छा.(काही घटना ऐकल्यावर तर कितीतरी दिवस मन अस्वस्थ होतं. माझ्या जवळच्या नात्यातल्या नवऱ्याने मरणपंथाला लागलेल्या बायकोला प्रत्येक संबंधासाठी ५०रु. देऊन तिच्यावर केलेल्या ‘बलात्काराची’ कहाणी शेवटच्या श्वासाला तिने आपल्या लेकीला सांगितली व एका पोत्यात कोंबलेले ३००-४०० रुपये ती मेल्यावर सापडले. माझ्याकडे आलेल्या दुसऱ्या केसमध्ये मुस्लीम कुटुंबात बायकोच्या योनीमार्गात गाजर, मुळा घालून केलेल्या हिंस्त्र अत्याचाराने तिची योनी इतकी फाटली होती की तिला चालवतही नव्हतं. माझ्या एका मैत्रिणीच्या नवऱ्याने तिला ‘सुहागरात्रीत’ इतकं ओरबाडलं की तिने दुसऱ्या दिवशी घरच नव्हे तर नवऱ्यालाही सोडलं.)

शिवाय ‘पुरुष’ शरीरसंबंधात प्रेम शोधतो आणि ‘स्त्री’ शरीरसंबंधापलीकडचे प्रेम शोधते, असं बरच काही वाचलं असल्यामुळे सुरुवातीला मी तुझ्याकडे जरा ‘संशयानेच’ पाहत होते. शिवाय प्रत्यक्षात काय होतं (पेक्षा करायचं असतं) हे केवळ वाचीव असल्याने संकोचलेही होते. पण तू मात्र अगदी हळुवारपणे, प्रेमाने, तुझ्या स्पर्शाने, आधी दोन मने मग दोन शरीरे एकत्रित आल्याने होणाऱ्या उत्कट आनंदाची मला ओळख करून दिली. हा अनुभव ‘घाण’ नसून आपण जास्त जवळ येवून आपलं नात अधिक दृढ होतय याची जाणीव मला झाली. नर आणि मादी यांच्यातले शरीर संबंध ‘वासनेच्या’ पलीकडले असू शकतात, त्यातही एकमेकांवरील प्रेमाची प्रचिती येते, घट्ट मिठीतील ‘आधार’ एकमेकांना किती निश्चिंत बनवितो, शरीसंबंधातला प्रत्येक स्पर्श हा एकमेकांच्या मर्जीनूसार झाला तरच तुमचं नातं दृढ आणि सहजीवन आनंदी हे तुझ्या सोबतीने शिकले. तूही या प्रकरणात ‘शिकाऊ’ होता तरी एकमेकांना वेळ देवून, समजून घेवून त्याला ‘सुखद’ बनविण्यात तुझा वाटा मोठा आहे. बिनसलेल्या, लादलेल्या जबरदस्तीच्या रात्रींमुळे विस्कटलेले संसार पाहिले की मला तुझा अभिमान वाटतो. तुझ्यामुळे मी तुझ्याच नव्हे तर माझ्याही शरीरावर प्रेम करायला शिकले.

मी वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांसोबत काम सुरु केले होते. खरं तर तुझी कोणत्याही सामाजिक मुद्याबद्दलची, कोणत्याही प्रकारची (शैक्षणिक वगैरे) पार्श्वभूमी नसतानाही तू या महिलांबद्दल इतर बरेचसे लोक जसं ‘दूषित’ मत व्यक्त करतात तसं कधीच केलं नाहीस. आपल्या चर्चा व तुझं त्यांना भेटणं यामुळे तुला ‘सत्य’ बघता आलं. ‘लक्ष्मी वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी काम करते’ हे सांगताना तुझ्या चेहऱ्यावर कधीच संकोच नसायचा, उलट त्यांच्या शोषणास ‘पुरुषप्रधान समाजव्यवस्थाच’ कशी कारणीभूत आहे हे तू इतरांना पटवून द्यायचास. तुझ्यातला ‘चांगला’ माणूस मला वारंवार दिसायचा.

तुझी परीक्षा घेणारे अनेक प्रसंगही आपल्या जीवनात आले. उदा. अचानकपणे काम सोडण्याचा व काही दिवस काहीच न करण्याचा माझा निर्णय. मात्र तुझं मत-‘तुला तुझ्या आयुष्यात जे काही करावं असं वाटतं ते तू कर, आनंद आणि समाधान न देणारी कोणतीच गोष्ट कोणत्याच दडपणाखाली करून नकोसं. कोणताही निर्णय घे, मी तुझ्या बरोबर असेन. आपण सुखी राहू एवढं मी कमावतो.’ तू माझ्या जगण्याला ‘स्पेस (अवकाश)’ दिलस असं मी म्हणणार नाही, पण त्याला तू हलविलं नाहीस हे महत्वाचं. तू शिक्षणाने इंजिनिअर, एम.बी.ए. केलेला, पण पैशांची हाव तुला कधीच नाही. म्हणूनच तू मला आणखी आवडतो.

असं म्हणतात की ‘खरी समानता मानणारा पुरुष’ घरातल्यांशी वागताना कळतो. तुझं स्वयंपाक बनविणं, स्वतःचे कपडे धुणं (बऱ्याचदा माझेही), चहा बनविणं, भांडी घासणं, माझ्याशी मित्रासारखं (बऱ्याचदा मित्रापलिकडचं) वागणं या सर्व गोष्टी तू इतर लोकांसमोर, नातेवाईक, मित्र मैत्रिणी यांच्यासमोर करतोस म्हणून मला तू ‘ढोंगी’ वाटत नाहीस. आपलं नातं गावी राहणाऱ्या तुझ्या घरच्यांनी स्वीकारल्यावर साडी, मंगळसूत्र यांचा प्रश्न आलाच होता. त्याची जबाबदारी मी पूर्णपणे तुझ्यावर टाकलेली. ‘तिला घालायचं नाही तर ती घालणार नाही, तिला कोणी जबरदस्ती करू नका,’ अशी ठाम पण कठोर भूमिका तू लिलया पेललीस. तुझ्या वडिलांनी आयुष्यभराच्या जमापुंजीतून बांधलेल्या घराच्या वास्तुशांतीच्या पूजेला बसण्यास मी दिलेल्या नकारामुळे निर्माण झालेली नात्यातील तेढ व वादळ तूच शमवलस, तेही मला काहीच दोष न देता. मी माझं नाव बदललं नाही, तुझ्या ध्यानीमनीही हा मुद्दा नाही. उलट लग्नानंतर आपल्या बायकोचे नाव बदलून तिची ‘ओळख’ बदलविणाऱ्या तुझ्या मित्राला तू बरचं सुनावलस.शिवाय घरकाम न करणाऱ्या तुझ्या मित्रांनाही स्वतःचं उदाहरण देवून समजावतोस. घर, लाईट बिल, पाणी बिल दोघांच्या नावावर केलस. होणारं अपत्यही दोघांच्या नावावर, जात-धर्मविरहित असेल या माझ्या मताशीही तू सहमत. आपल्या विवाहामुळे तू काही नात्यांना दुरावलास,पण मी काहीही चुकीचं केलं नाही यावर तू ठाम. तुझ्यासाठी नवीन असणाऱ्या विचारांवर तू विचार केलास, पटल्यावरच स्वतः अंगिकारलेस व महत्वाचं म्हणजे इतरांना विचार बदलण्यासाठी प्रेरणा दिलीस.

सगळं जग जरी विरोधात गेलं तरी एकमेकांची साथ सोडायची नाही, कितीही भांडलो तरी एकमेकांपासून दूर जाण्याची भाषा करायची नाही, नात्यात एकमेकांचा सन्मान ठेवायचा (कोणत्याही किंवा अगदी टोकाच्याही परिस्थितीत), दोघांच्यातील वाद दोघांच्यातच सोडवायचा, समोरच्याला स्वतःला आवडेल असं बनविण्याचा प्रयत्न करायचा नाही (समोरचा व्यक्ती मूळचा तसा असतो म्हणूनच आपण तिच्यावर प्रेम केलेलं असतं ना!), मात्र समोरच्याने दिलेल्या सूचनांचा विचार करायचा प्रयत्न करायचा, समोरच्याला समजून घेण्यासाठी त्याच्या ठिकाणी स्वतःला ठेवून बघायचं, जगताना दुसऱ्याच्या गरजेला, आनंदाला प्राधान्य द्यायचं, आव्हानं पेलण्याची व नवीन गोष्टी करण्याची प्रेरणा द्यायची, नात्यात एकमेकांपासून लपविण किंवा खोटं बोलणं याला थारा नाही, विश्वास हा नात्याचा पाया (‘जोडीदाराने/नवऱ्याने घेतलेल्या संशयाने संसार उध्वस्त’ हे समाजातील वास्तव असताना तुझ्या मनात माझ्या ‘पुरुष’ नात्यांबद्दल कधीच प्रश्नचिन्ह आले नाही. अविश्वसनीय गोष्ट म्हणजे पूर्वी माझ्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या (पण मला कोणताही त्रास न देणाऱ्या) माझ्या ‘चांगल्या’ मित्रांशी मैत्री टिकविण्यास तुझा कधी आक्षेप नाहीच, उलट मदतच असते.), इतरांना त्यांच्या गुणदोषांसकट स्वीकारायचं, स्वतःच्या मुलभूत तत्वांशी कधीच तडजोड करायची नाही ही आणि इतर असंख्य संस्कारित झालेली व जीवनानुभावातून तयार झालेली तत्वे तुझ्यासोबत जगताना आणखीनच घट्ट झाली आहेत.

तुझं एवढं ‘कौतुक’ केल्यावर तू अगदीच ‘परिपूर्ण’ आहेस, असा अर्थ होत नाही. तुझ्याबद्दल काही तक्रारीही आहेत. उल्लेखनीय म्हटलं तर तुला कधी कधी माझ्या वेदना कळत नाहीत. (तुझ्या मते, तू त्या अनुभवल्या नाहीस म्हणून कळत नाहीत, जे मला पटत नाही ( मला माहित आहे तुलाही मनातून ते पटत नाही).उदा. आपल्या दोघांच्या वादांच्या क्षणी मी स्वतःला त्रास करून घेते. त्यावेळी तू माझी साथ देत नाहीस असं माझा आतला आवाज मला सांगतो. तुला वाटतं, मी स्वतःला त्रास करून घेवू नये (तुझ्यामुळेच मी त्रास करून घेते), त्याने प्रश्न सुटणार नाही. बरोबर आहे, पण हे तू मला जवळ घेवून, प्रेमाने सांगू शकतोस. मला त्या क्षणी तुझ्या मानसिक आधाराची खरी गरज असते. पण हे तुला माझी अपेक्षा कळूनही तू तुझा ‘अहंकार’ जपत ‘बघ्याची’ भूमिका घेतोस, हे माझ्या मनाला माझ्या त्रासापेक्षा जास्त वेदना देवून जातं. अपेक्षा आहे, यापुढे तू याचा विचार करशील (खरं तर मीच आता त्रास करून घ्यायचा नाही असं ठरवलंय, तरीही).

खरं तर तू भेटण्या अगोदरही मी आनंदी होते, तुझ्याशिवाय. आता मात्र तुझ्याशिवाय जगण्याची कल्पना करवत नाही. माझा एक मित्र म्हणतो, ‘एखाद्या माणसाची सवय होणं फार वाईट, त्याच्याशिवाय आयुष्य नुसते दिवस काढण्यासारखे वाटते.’ माझंही तुझ्यावरचं अवलंबित्व फारच वाढलय.तू सगळ्याच भूमिका पार पाडतोस, जोडीदार, मित्र, भाऊ, वडील, आई, मैत्रीण..अगदी सगळयाच. आपल्याकडे लग्न झाल्यावर ‘मुलीची’ कशी पटकन ‘बाई’ होते, तिला अंतर्बाह्य बदलावं लागतं, किती प्रकारच्या नको असणाऱ्या तडजोडी औपचारिकपणे करत, घुसमट आयुष्य काढावं लागतं, सासर-माहेरच्या फेऱ्यात अडकाव लागतं, हृदयाची धडकन असणाऱ्या जन्मदात्यांना भेटण्यासाठी, ज्या मातीत जन्मले, पहिलं पाऊल टाकलं, तिचा सुगंध उरात साठविण्यासाठी, प्रत्येकवेळी नवऱ्याची/सासरच्यांची ‘पूर्वपरवानगी’काढावी लागते. मी मात्र यातल्या कोणत्याच गोष्टी न करता मोकळा श्वास घेत आयुष्य जगतेय. लग्न किंवा ‘चांगला’ जोडीदार मिळणं हा जुगार आहे, असं म्हणतात. त्यातच ‘माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळावा,’ असा विचार करणाऱ्या तथाकथित उच्च समजल्या जाणाऱ्या ‘पुरुषप्रधान जातीत जन्मणाऱ्या’ स्त्रीसाठी तर तो ‘आकडा’ लावण्याइतकं बेभरवशाचं आहे. मला तर ‘ज्याकपॉट’ लागलाय.

तुझ्यासोबतच्या सहजीवनात अनेक चढउतार आले, येतील. मात्र तुझ्या नजरेतील आश्वासकता, स्पर्शातील आपलेपणा आणि आलिंगनातील संरक्षकता यामुळे जीवन मजेदार वाटते. तुझा माझ्यावरील, माझ्या क्षमतांवरील माझ्यापेक्षाही जास्त विश्वास यामुळे मी निश्चिंतपणे आयुष्यावर प्रयोग करीत असते. नात्यातील संवाद, बांधिलकी, विश्वास, प्रामाणिकपणा, समजूतदारपणा या सगळ्यांमुळे तुझ्यासोबत जगताना कधी कंटाळा आला नाही, उलट आपण सारखे एकमेकांच्या प्रेमात पडत असतो. खरं तर आपण तसे खूप बाबतीत भिन्न. मी साहित्याची विद्यार्थिनी, सौंदर्यासक्त, अति संवेदनशील, भावनिक तसेच काहीशी बेशिस्त तर तू विज्ञानाचा, इंजिनियर, सरळ रेषेत चालणारा, शिस्तबद्ध काहीसा व्यवहारी. आपण एकमेकांना बदलवायचं नाही असं ठरविलं होतं, तरी नकळतपणे एकेमकांच्या संगतीत एकमेकांकडून शिकून स्वतःला, नात्याला, समाजाला पूरक अशा साऱ्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यात समाविष्ट करून घेतल्या. ‘अजून चांगला माणूस’ बनण्याची प्रकिया चालूच राहिली.

माझ्या वडिलांनी अजून तुला स्वीकारलं नाही. त्याबद्दल तुझी तक्रार नाही. ते ज्या सामाजिक जडणघडणीत घडलेत, त्यात आपल्या नात्याचा स्वीकार त्यांच्यासाठी सोपी बाब नाही, हे तूही समजून घेतलस. मात्र त्या सामाजिक मर्यादा, रुढी, परंपरा तोडणं, अशक्य नाही हेही आपण जाणतो. बस्स, माझ्यावरच्या प्रेमापोटीतरी त्यांनी हे धाडस करावं, ते करतील याबद्दल मला विश्वास वाटतो.

आपण एकमेकांसाठी ‘एकमेवाद्वितीय’ आहोत, नात्यात ‘परिपूर्ण’ आहोत असं नाही, हे दोघांनाही मान्य आहे. मात्र जे चांगलं त्याची जपणूक व नात्यासाठी त्रासदायक त्यावर पुनर्विचार हे तत्व जपल्यामुळे नात्यातला ‘गोडवा’ टिकवून एकमेकांसोबत ‘आनंदी’ आहोत इतकचं, बरोबर ना?
माझं सहजीवन ‘सुखी’ करणाऱ्या, मला साथ देणाऱ्या अशा तुझ्यातल्या ‘ साध्या’ व ‘गोड’ माणसाला माझा प्रणाम! तुझ्यासारखी इतरांना ‘आनंदी’ करणारी जास्तीत जास्त माणसं जन्माला येवोत, तयार होवोत ही सदिच्छा!

शरद, हे सर्व ‘पुरुष’ म्हणून करतोयस म्हणून तू ‘विशेष’ आहेस असं नाही, तर तुझ्यातला ‘संवेदनशील’ माणूस तू जिवंत ठेवलास म्हणून तुझं कौतुक.

चल आता पुरे करते. (खरं तर आपल्या नात्याबद्दल, तुझ्याबद्दल लिहिणं कधी संपणारच नाही.)

तुझ्या वारंवार प्रेमात पडणारी (खरं तर प्रेमातच असणारी),


Source: INTERNET
-प्रदीप इरकर,
पालघर

आज तूला खूप miss करतोय मी.
मित्र मैत्रिणींच्या घोळक्यात सुद्धा मी तुला खूप miss करतोय.

माझ्या हसण्यामागचे दुःख व बोलण्यामागचे सत्य फक्त तूच ओळखत होतीस.म्हणूनच कदाचित तुला मिस करतोय मी.

गरज लागली की माझ्यासोबत बोलणारे आताही खूप आहेत पण फक्त माझ्यासाठीच बोलणारी तू फक्त एकटिस होती.म्हणूनच कदाचित आज तुला खूप मिस करतोय मी.

जसजसा वाढदिवस जवळ येतोय तसतसा
"B'day ला तुला काय पाहिजे?" हा प्रश्नही मी खूप miss करतोय.
आज खरच तुला मी खूप मिस करतोय.

आपण बघीतलेल्या स्वप्नातील त्या क्षणांनाही खूप मिस करतोय
इतकाच नाही तर ती पात्रेही तुला आज मिस करत असतील.
खरच आज तुला खूप मिस करतोय.

संघर्षाशिवाय जीवन नाही,असे तूच म्हणत होतीस.
आज त्याच *संघर्षाला* खूप मिस करतोय.
आज खरंच तुला मी खूप मिस करतोय

खरंच आज तुला मी खूप मिस करतोय.
तू गेल्यापासून माझ्या खऱ्या हास्यालाही तुझ्यासोबतच मी मिस करतोय

Source: INTERNET
-सिमाली भाटकर,
रत्नागिरी

(हा लेख पूर्ण काल्पनिक असून याचा वास्तवतेशी काही संबंध नाही तसेच परवानगीशिवाय प्रकाशनास व शेअर करण्याची परवानगी नाही.)

मिलनाची जाणीव रुपेरी वाळूला कळली
निळ्याशार आकाशात काळ्या ढगांनी एकच गर्दी केली...
वा-याच्या झुळकीसोबत आठवण तुझी आली
ओढीने तुझ्या मीही किना-याकडे धाव घेतली
बेभान वारा तुला भेटण्याची ओढ मजला
पाहती का वेडे डोळे
बनातल्या पाऊलवाटा
कुठे येतात का ऐकू
तुझ्या पाऊलांच्या हाका
रवी क्षितिजास भेटला
पाखरांनीही गाठला घरटा
वाट पाहून आठवणीने तुझ्या
डोळे माझेही भरुन आले
कुशीत विसावल्या धरतीच्या
आभाळही दाटून आले
वळले उदास परतण्यास मी
उगवलास झाडाआडून
चंद्रासारखा सांगण्या मज ओळखल्या ग तुझ्या मनातल्या भावना मी,
व्याकुळतेने मज कवेत घेतले,
आभाळही थेंब होऊनि धरतीस बिलगले,
प्रेमच्या या पहिल्या भेटीत अन पावसाच्या पहिल्या सरीत,
आठवणीने तुझ्या,
मी ही चिंब चिंब भिजले,
चिंब चिंब भिजले,,,,,,
अचानक एका संध्याकाळी कवितांची वही पाहताना ही कविता डोळ्यासमोर आली आणि घडून गेलेल्या प्रवासाची धूसर आठवण अचानक झाली.
प्रेम एक सुंदर भावना व्यक्त केली तर खूपच छान आयुष्य घडत, आणि कधी त्याच कोमेजल्या गुलाबात रूपांतर झालेलं ही दिसून येत. या प्रेमातून तयार होणार नात किंवा नात्यातून उमळणार हळुवार प्रेम असच काहीस दडलंय माझ्या प्रेमाच्या हळुवार कथेत ज्यातून खुलली एक कळी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच. कविता साकारता साकारता आयुष्याची कादंबरी उलघडली.
प्रत्येक स्त्री सारख माझं आयुष्य देखील थोडं कष्टकरी पण आव्हाहनात्मक. शिक्षण, कौटुंबीक जबाबदारी, काहीतरी प्राप्त करण्याची बनण्याची ओढ, सातत्याने प्रयत्न करत पुढे जाण्याची हुरहूर, यामुळेच देवालाही दया आली असावी की ते माझ्या आयुष्यात आले. कारण इतकं खडतर आयुष्य जगत असताना देव असतो आणि तो मानने हे माझ्या तत्वातच नव्हतं. असो
पण त्यांनी मला घडवले परिस्थिती वर मात करत, अभ्यास करून घेतला आणि सोबत प्रेमाची शिकवणी देखील घेतली. पण जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये यांना कदाचित ते मान्य नव्हते. दोन एकटे जीव एकाकी पणाने, परिस्थितीमुळे जवळ आले.
माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच निशिगंध फुलला अन मोगऱ्यासारखा सुवास नखशिखांत पसरला होता. पण हे क्षणिक निघालं कारण जगात प्रेम केले की लग्न हा एकमेवाद्वितीय पर्याय ठेवून दिलेला आहे. त्यावर तोडगा एकच एकतर वेगळे व्हा नाहीतर लग्न करा. पण इथे कौटुंबिक अडचणी आणि कर्तव्य यामुळे ते शक्य नव्हतं. मग वेगळं व्हायला हवे असे ठरवले पण न बोलून दाखवता झालेलं अबोल प्रेमाचं नात दूर जाऊच देत नव्हते. कारण न स्पर्शता ते इतके घट्ट झाले होते की कदाचित कुणीच ते वेगळे करू शकले नाही. अगदी ते आणि मी देखील.
मग एक सुंदर निर्णय घेतला कदाचित लोकांना न पटणार पण इथे त्यांची फिकीर नव्हती आणि एका डॉ. यांच्या सल्यानं आम्ही एक टेस्ट ट्यूब बेबी करून बाळ घेतले आणि कोणत्या ही प्रकारची अनैतिक संबंध न ठेवता त्यांनी मला आईपण दिल आणि माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एक अविस्मरणीय अनुभव आणि क्षण आला आणि मी भरभरून जगू लागले. मग त्यांनी स्वतः जबाबदार नागरिक सारख बाळ दत्तक घेतले आणि त्यांचं आयुष्य जगू लागले.
यात एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे प्रेम होते आहे आणि आजन्म राहील पण कधीही त्यांनी मला स्पर्श देखील केला नाही कारण फक्त समाजात माझं स्थान मानाचं असावं किंवा स्वतः कोणता वेगळा मार्ग देखील निवडला नाही अभिमान वाटतो त्यांचा आणि त्यांच्या स्वतः वरती ताबा ठेवणाऱ्या त्यांच्या भावनेचा.
निर्णय खूप मोठा होता आणि भयंकर होता इतरांसाठी पण आम्हाला मात्र एक नवी उमेद मिळाली जगायला आणि ते म्हणायचे मग........
व्यर्थ जीवनाचा तू जाणलेला अर्थ मी,
हृदयात दडला तुझ्या तो श्वास मी,
तुझ्या जगण्याची एक आस मी,
स्वार्थी मनाचा निस्वार्थ आधार मी, पंख तुटल्या पाखरांचा दाटलेला कंठ मी,
व्यर्थ जीवनाचा तू जाणलेला अर्थ मी,
सप्त सुरातला एकक्षरी स्वर मी,
सप्तर्षी नभातला, निखळला तुझं साठी,
तो चमकता तारा मी,
तुटल्या गुलाबाचा शेवटी उरला तो देठ मी,
व्यर्थ जीवनाचा तू जाणलेला अर्थ मी,
मी न होतो मजपाशी,
तरी बेभान वाऱ्यात जाणला तुझा तो स्पर्श मी,
मेघ काळे पावसाचे,
चिंब भिजवून जाती अशा जलधारा मी,
जग कोळशाची खाणी अन शिंपल्यात गवसलेला तुज मोती मी,
खाणीत फिरता सोनियांच्या पाऊला खाली चिरडला ,
तो निर्मळ परीस मी,
अधुऱ्या कहाणीचा गोड शेवट मी,
तरी अजूनही जीवनात अधुराच मी,
व्यर्थ जीवनाचा तू जाणलेला अर्थ मी, फ़क्त मी,,,
खरच खूप व्यर्थ वाटू लागले होते जीवन पण प्रेमाने बळ दिल. प्रेम ही शक्ती आहे फक्त ती योग्य निर्णय घेतला तर.
काही जण शरीराच्या हव्यासापोटी प्रेम करतात पण इथे दोन मनाचं अबोल नात न स्पर्शता निर्माण झालं. संकटे खूप होती नातेवाईक लोक बोलतच राहतात पण आम्ही मनाने खंबीरपणे उभे राहिलो.
आज दुःख फक्त एकाच गोष्टीच आहे,मी एकीची आई आणि दुसऱ्याची आंटी आहे आणि ते एकाचे बाबा आणि दुसरीचे अंकल आहेत.
अबोल नात्यातून निर्माण झालेल आमच्या प्रेमाचं प्रतीक आज जवळ आहे. जीवन खूप छान जगतोय. त्यामुळे ज्यांना आपलं प्रेम मिळालं नाही त्याने जीवन संपावण्यापेक्षा , एकमेकांना त्रास देण्यापेक्षा समजून घेऊन जीवन प्रेमळ बनवावं.
खरं प्रेम तेच जे समोरच्याला आनंद देत समजून घेत.
त्यागातही प्रेम असत... आम्ही जवळ नव्हतो तरी एकमेकांना शब्दाने साथ दिली ही शब्द सोबत थोडक्यात.....
सोडून गेले मी जग जरी राहतील आठवणी माझ्या तुझ्या उरी,
नसेन मी तुज बाहुंचा आधार देण्या,
शब्द येतील माझे तुझे सांत्वन करण्या,
न आले अश्रू पुसण्या स्व हस्त माझे,
पहा एकदा उघडुनी हस्त लिखित माझे,
पिऊन टाकील अलगद,
नयना तुन ओघळणारे मोती तुझे,
वाटेल तुझं एकटा जग प्रवासी मी,
शब्द होऊनि राहीन अखेर पर्यन्त तुझी सोबती मी,
ना कळले ना तुज कधी,
का लिहिले अनंत कोटी शब्द मी,
लगाम नसता राजा हाती, अश्व सगळे उधळून जाती,
मी न केले जरी सारथ्य तुझे,
शब्द लगाम देऊन हाती विजयी करिन,
असंख्य अश्वमेध तुझे,
सोडून गेले मी जग जरी,
आठवणी होऊन राहीन तुझ्या उरी,
शब्द होऊनि सोबती होईन,
तुझ्या प्रत्येक पाऊलावरी,,,,,

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************