बलात्कारी विकृत लोक.. अशा किती निर्भया वर अत्याचार केल्यावर आपण पेटून उठणार? (भाग-१)

🌱 वि४🌿 व्हॉट्सअप ग्रुप

   📄आठवडा 24वा📝
14 एप्रिल ते 20 एप्रिल 2018

बलात्कारी विकृत लोक.. अशा किती निर्भया वर अत्याचार केल्यावर आपण पेटून उठणार? (भाग-१)

१.पी. प्रशांत कुमार,अहमदनगर
२.करण बायस,हिंगोली.
३.राज इनामदार,पंढरपूर.
४.संदिप बोऱ्हाडे,वडगाव मावळ,जि.पुणे.
५. सौदागर काळे,पंढरपूर
६.किरण पवार,औरंगाबाद
७. महेश देशपांडे,उस्मानाबाद.
८.ज्ञानेश्वर टिंगरे,उस्मानाबाद.
९. मयुरी देवकर,पंढरपूर.
१०. लक्ष्मी यादव,मुंबई

(यातील सर्व  छायाचित्रे इंटरनेटवरून घेतलेली आहेत)

यांचे विचार सविस्तर वाचा:-

पी.प्रशांत कुमार,अहमदनगर
परवाच मित्राच्या  घरी गेलो.. बारीक केस केलेली त्याची मुलगी ..काका काका करत बिलगली..  "काय रे किती बारीक केले केस अगदी मुलगाच वाटते.."
"...हो त्यासाठीच .."..शांतपणे मित्र म्हणाला..
...मोठे केस सुंदर दिसत होते रे..मग मलाच भीती वाटायला लागली.. आता समजतंय मुलीचा बाप होणं किती कठीण आहे ते..
....मला ते समजलं मीही एका मुलीचा बाप आहे..
मीही बरच काही केलं अगदी अगदी कराटे क्लास लावण्यापासून... मग वाटत रफ आणि टफ बनवण्यात आपण तीच बालपण तर नाही ना पणाला लावत??.. मुलींना सशक्त बनवण्या सोबतच मुलांना(boys) आचार विचार शिकवण गरजेचं आहे
....भीती वाटते..म्हणून स्कूल बस ऐवजी स्वतः सोडतो आणतो..भीती वाटते म्हणून जवळच्या ठिकाणीही सायकलवर पाठवणं टाळतो ..भीती ..रोज भीती वाटते.. आणि ती नीरागस आहे म्हणून तर जास्त..

पण हे माझं वागणही चुकतंय.. मी काळजी घ्यावी हे ठीक पण अति घेणं चूक..  का आपल्याकडे आपण सर्व काही मुलींनाच सांगतो..उलट काही अतिशहाने महाभाग तर ती अशी वागली रात्री बाहेर होती म्हणून झालं असलं समर्थन करताना दिसतात तेव्हा ते रागाचा पारा चढतो..
का आपल्याकडे कायद्याचा धाक नाही? कमकुवत कायदा नाही तर राबवणारे आहेत..जिच्यावर  अत्याचार झालाय आपण तिच्याकडेच गुन्हेगार म्हणून पहातो.. हे सर्व चीड आणणार आहे..
...
अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांच्या समर्थनार्थ जेव्हा तिरंगा घेऊन मोर्चे निघतात तेव्हा आपल्या भावना का दुखावत नाही..
....सत्ताधारी पक्षाचे एक आमदार मीडियासमोर म्हणतात की,'तीन बच्चों कि माँ पर रेप कैसे हो सकता है..' वगैरे तारे तोडतात तेव्हा आपल्याच लाज वाटते..

आम्ही कायदे कडक करू.. वगैरे वालग्नांना काहीही अर्थ नाही.. आहे ते कायदे जर व्यवस्थित वापरले तरी खूप होईल.. कायद्याच्या राज्याचा धाक असावा.. आणि स्त्री अत्याचाराच्या सर्व केस साठी एक स्वतंत्र fast track Court असावं..  आणि मुबलक पैसा ओतून श्रीमंत आरोपी सुटणार नाहीत याची काळजी घ्यावी..
...लक्षात घ्या ..  खूप उशीरा न्याय मिळणं हे ही एक प्रकारे न्याय नाकारणच होय..

करण बायस ,हिंगोली
आपण अशा देशात राहतो जिथे लोक ‘मी हिंदू आहे’ ,’मी मुस्लिम आहे’ असं म्हणायला लोकांना आवडते. पण खुप कमी लोक आहेत जे मनापासून म्हणतात की ‘मी भारतीय आहे’.लोकांची मानसिकता बदलण्याची नाही .

हिंदू संस्कृती मध्ये नवरात्री च्या वेळेस कुमारीका ची पुजा केली जाते आणि दुसरीकडे हिंदू देवाच्या मंदिरात बलात्काराच्या घटना घडतात.

ती मुस्लिम होती म्हणून काही लोक बलात्कारी लोकांना वाचवण्यासाठी पुढं येतात,खुप वाईट आहे हे. पण देवासाठी तर सगळे सारखेच ना. आपण ज्या मंदिरात देवाला शोधतो तो देव कुठे गेला होता?आज पर्यंत मी देवाच्या मूर्तीला निर्जिव समजत होतो पण नाही त्याला पण आता जात समजू लागली आहे. ‘मला वाटते देवसुद्धा आता जातीवादी झाला आहे.’ 😢  

मी कुठेतरी वाचलं होतं आणि ते एकदम खरं लिहिलेलं होत *‘Even I'm nude in my room,but you don't have any Right to Rape me’.*
राज इनामदार,पंढरपूर
*आज़ भारतकी बेटियोंके* *तनपरही नही , मनरभी हो रहा है बलात्कार*
*अगर एैसेही खत्म होती रही बेटियाँ तो कैसे चलाओगे संसार*

आजकाल कुठल्याही वर्तमान पत्राची आपण पाने चाळली असता , बलात्काराच्या बातम्या हमखास असतात .ज्या देशात स्त्री ला देवी समजलं जाते , तिची पूजा केली जाते , ज्या देशांत  शक्तीची आध्यदेवता स्त्री आहे .
त्या देशात आता रोजचेच बलात्कार होतायत , या पेक्षा मोठ दुर्दैव काय म्हणायचे.

*यत्र नार्यस्तु पुज्यंते रमनते तत्र देवता*
अर्थात: जिथं ठिकाणी स्त्री ची पूजा केली जाते , सन्मानाची वागणूक दिली जाते , त्या ठिकाणी ईश्वरीय क्रुपा होते , तेथे देवता वास करतात .
आपल्याला आपले धर्म ग्रंथ स्त्रीच्या आदर करण्याची शिकवण देतायत ...त्या भारत देशात दिलीच्या निर्भया , कोपर्डि येथील घटना , उ.प्रदेशातील घटना .राजस्थान , गुजरात , कर्नाटक येथील गर्दोली ..तमिळनाड् , आसाम अशा अनेक राज्यात सरास बलात्कार झालेले आपण वाचले असेल ..
 पण पुढे त्या नराधमाना काय शिक्षा झाली याकडे कोण लक्ष देतोय ..इथे काहीजण म्हणत आहेत अरे बलात्कार आमच्या समाजातील किंवा जातीतील मुलीवर झाला असता म्हणजे सांगितले असत , पेटवा पेटवी केली असती , तोडले असत , कापले असत , आम्हीं काय आहे , हे दाखवलें असते .
मित्रांनो आपल्या समाजातील , जातीतील मुलीवर बलात्कार झाल्यावरच पेटायच तोडायच , सरकारला हिसका दाखवायचा म्हणल्यावर , कस आपण म्हणू शकतो की आम्हीं सारे भारतीय बांधव आहोत .
सर्व प्रथम आपण लक्श्यात घेतलं पाहिजे की आपण सर्व भारतीय आहोत , भले राज्य कुठंलेंही असो .आणी जाती फक्त दोनच आहेत स्त्री आणी पुरुष ..मग स्त्रीवर   बलात्कार झाल्यावर , या पुरुष जातीने पेठुन उठून न्यायासाठी सरकारला धारेवर धरायला नको का ?
मग आम्हीं कधी पेठुन उठनार आहे , कधी आमच रक्त सळसळनार आहे ..अरे आपण जिवंत असल्याचा पुरावा देणार आहोत की नाही .आपल्याला आपल्या आपली मुलगी , बहीण याच्या चांगल्या भविष्याची काळजी आहे की नाही ..आम्हीं सरकारला केंव्हा धारेवर धरणार आहोत .आम्हीं जाती पातीच्या कोशातूंन बाहेर पडून केंव्हा सूजान नागरीक बनून लढणार् आहोत .
बलात्कारमुक्त भारत केंव्हा करणार आहोत ?
   कठुवा येथील घटनेने तर माणुसकीलाच काळिमा फासला , अरे शैतान सुधा लाजला असेल , जनावरेही आपआपसात बोलत असतील आपण माणूस नाही ते बरे आहोत म्हणुन .इतका माणूस ख़ालच्या पातळीला गेला .
साठ वर्षाच्या एका शैतानाने 8 वर्षाच्या मुलीवर पाशवी बलात्कार केला .नंतर त्याच्या मुलांने व पूतन्यानेही बलात्कार केला ..परराज्यातुंन ऐकाला बलात्कार करण्यास बोलावन्यात आले .सतत आठ दिवस ड्रॅगचे इंजेक्शन देवून तिचे लचके तोडण्यात येत होते .तीची विल्हेवाट लावण्यास पोलीसानाही यांनी सामील करून घेतले व पोलिसांनीही सदरक्षनाय खलनिग्रहनाय विसरून मेलेल्या मुलीवर ही बलात्कार करत्यात तेंव्हा डोक सुन्न होतेय ! हे वाचून , अजस्त्र नागांनी चावा घेवा तस होतय ,मती गुंग आहे .वारंवार त्या मुलीचा चेहरा समोर येतोय आणी म्हणतोय ..मला न्याय दया मला न्याय दया .
ही घटना तर सुन्न करतेच पण नंतरची घटना वाचून वाटंत आपण कुठल्या देशात राहतोय. छ. शिवराय , म गाँधी , शाहू फुले,  आंबेडकर यांच्या देशांत की.
रस्त्यावर उतरून नराधमांना वाचवन्यासाठी हातांत तिरंगा घेवुन , भारत माता की जय म्हणनार्या त्या धर्माँध जातीयवादी संघटनांच्या , काळे कोट घालून आरोपीच्या बाजूने असणाऱ्या त्या कायदेपंडिताच्या , आरोपीचे गोडवे गानार्या त्या दोन मंत्र्यांच्या. अरे कसली मानसिकता झालीय तुमची , घाणित लोळणार्या डुक्करापेक्षाही खाली घसरलात तुंम्ही इतके धर्मांध कसे काय झालात . अरे सिरियातील लोक सुधा इसिसवाल्याना म्हणत असतील .अरे सीरियाचा भारत बनवू नका , इतके खाली घसरलें आहेत ह्या नीच आवलादी .
अरे जगातील सगळ्यात भंगार देश , नालायक असा पाकिस्तान देश , त्या देशात गेल्या काही महिन्यात एका लहान मुलीवर बलात्कार झाला व नंतर तीची हत्या करण्यात आली .तेंव्हा तेथील कोर्टाने केस फास्ट ट्रेक वरती घेवुन आरोपीला पाँच दिवसांतच फाशीची शिक्षा दिली .स्त्रीला न्यायाच्या बाबतीत आम्हीं त्या देशाच्याही माघे पड़ाव कसलं आमच दुर्दैव आहे .
न्हाय अस होणार नाही ..ही भूमी पवित्र आहे , ही भूमी छ शिवराय यांची आहे .इथे स्त्रीची अब्रुवर नजर टाकणार्या पिसाळलेल्या कुत्र्यांना न्यायालयाने ठेचल तर ठीक नाहीतर ..त्या कुत्र्यांना ठेचायच कामं येथील तरुणांना कराव लागेल हे मात्र नक्की .

संदिप बोऱ्हाडे,पुणे
बलात्कार हा मानवी जीवनातील सर्वात भयानक, माणुसकीला काळिमा फासणारा, हत्येपेक्षाही जास्त गंभीर असा गुन्हा आहे. त्याचं कोणत्याही अवस्थेत समर्थन होऊच शकत नाही.
बलात्कारी वृत्तीचा आता तर कहर होत चाललेला आहे.. फक्त बलात्कारच नव्हे तर सामूहिक बलात्कार करताना व्हिडीओ शूट करायचा आणि तोही सोशल एप्सवर प्रसारित करायचा इतकं धाडस आणि विकृती वाढत चाललेली दिसते ..आश्चर्य म्हणजे इतके बिनधास्त हे व्हिडीओ फिरत असताना पोलिस किंवा कायदा काही करु शकत नाही....???

    भारतात 3 4 प्रकरणे अत्यंत गाजली त्यापैकी थोडक्यात काही विषद करतो
१. दिल्लीत निर्भया प्रकरण झालं... थंडीत विवस्त्र करून रेप करून रस्त्यावर टाकलं... योनीत लोखंडी रॉड टाकला...
२. दिल्लीत 'गुडीया' या पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला होता.. योनीत मेणबत्ती आणि प्लॅस्टिकच्या बॉटल घुसवल्या होत्या...
३. सध्या इथे आसीफा चे एक उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे
आणि हो हद्द तर तेव्हा होते जेव्हा एका 8 महिन्याच्या मुलीवर बलात्कार झाला..ती मुलगी म्हणजे छोटं बाळ निष्पाप जीव तो... त्याला आपण मुलगी आहोत, योनी आहे आपल्याला हे पण कळलं नसेल.. आणि कोणीतरी रेप केला.

    माणसा जगाकड उघड्या डोळ्याने बघ . कोपर्डि काय, निर्भया काय किंवा आशिफा . ह्या सर्व घटना मानवता शून्य गोष्टीतून घडतात . नराधम कोणत्याही जातीधर्माचा असो त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे . मानवता संपलेली माणसे पाहिल्यावर मला कीव येते . देव काय रे नुसता उघड्या डोळ्यांनी तमाशा बघतोस . तुझंच मंदिरात हे निच काम करताना नराधमांना लाज वाटली नाही . आठ वर्षांच्या चिमुकलीला आठ दिवस देवळात ठेऊन गुंगीच औषध देऊन सामूहिक आणि पाशवी बलात्कार केला.....काय त्या देवालाही ऐकू गेली नसेल का वो तिची आर्त आणि काळीज भेदनारी किंकाळी.....एरवी न्याय आणि मागण्या पूर्ण करण्यासाठी ज्या देवळात लोकांच्या झुंडी दिसतात त्याच देवळात चिमुकलीचे लचके तोडण्यात आले...

  जातीतल्या मुलिवर बलात्कार झाल्यावर.....हजारोच्या संख्येने..गुन्हेगारांना फाशी व्हावी यासाठी मोर्चा काढता.का ,ती आमची बहीण म्हणून.. आणि दुसर्या परकीय....मुलिंवर..महिलांवर बलात्कार झाल्यावर ती बलात्कारी...वारे...वा..भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत...आरे दिन दहाडय आया-बहीनींची इज्जत-अब्रू लुटलीजाते....आणि प्रत्येक जन बघत बसतोय......गुन्हयाला आणि गुन्हेगाराला जात नसते हे जरी ञिकाल बादित सत्य आसल तरी काहि लोकांच्या मानसीकतेतुन जात जात नाहि कोपर्डी आसो वा खैरलांजी बलात्कार म्हणजे बलात्कार आणि गुन्हेगाराला फाशीचं पण ऐकीकडे भारत माझा देश आहे आणि सारे भारतिय माझे बांधव मग मला प्रश्न विचारावासा वाटतो दिल्लीतील निर्भया,कोपर्डी
प्रकरणातील आमचीच बहीण ह्यांच्या साठी जो जमाव रसत्यावर ऊतरुण न्याय मागतो तोच जमाव आशिफा च्या न्यायासाठी रसत्यावर ऊतरेल का? पण इथे होतय नेमकं उलट इथे तुला संपवणाऱ्या बलात्कार करणाऱ्यां नराधमांना वाचवण्यासाठी मोर्चे निघाले आणि देशाचं प्रतीक तिरंगा झेंडा त्या मोर्च्यात लहरत राहिला....पण त्या झेंड्याला पण दुःख वाटलं नसेल का ग??

   लहानपणी पित्यानं, तरुणपणी पतीनं आणि म्हातारपणी मुलानं संरक्षण करण्याची ती वस्तू आहे.पित्यानं लग्न होईपर्यंत ती अनाध्रात राहील म्हणजे तिचा कौमार्यभंग होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. महिला या देखील पुरुषांसारख्याच माणूस आहेत...त्यांनाही तशाच भावभावना आहेत...अधिकार आहेत..हक्क आहेत..स्वातंत्र्य आहे..सर्वच बाबतीत.. हे अजूनही बहुसंख्य समाजाला समजतच नाही.........

   असंही काय उखाडतोय आम्ही म्हणा.. चार दिवस सगळीकडे आम्ही तुला न्याय मिळवून देण्यासाठी फेसबुक,व्हाट्सअपवर,अक्षर धुमसत असतील
आंदोलन, तमाशा...राजकारण पुन्हा काही दिवसांनी बलात्कार होत जातील... आम्ही पुन्हा फेसबुक व्हाट्स अप वर डी पी ठेवू , आंदोलने करू , मेणबत्या घेऊन तुला श्रद्धांजली वाहू आणि 8 दिवसाने सगळं विसरून जाऊ.
आम्ही माणूस आणि माणुसकी म्हणून कधीही लढणार नाही आम्ही कायम धर्माच्या, जातीच्या नावाखाली नंगानाच करत राहू..


सौदागर काळे,पंढरपूर.
खूप वर्षांपासून स्त्रीवर राजरोस अत्याचार होत आहेत.हे आताही,आजही.तुमच्या माझ्या घरात. फरक एवढाच की आपण तो बलात्कार या व्याख्येत घेत नाही. बलात्कारी विकृत लोक कोण आहेत.हे दाखवताना पाच बोटातील चार बोटे स्वतःकडे असतात. हे विसरून जातो आपण.
तुमची माझी मानसिकता ही *"कामापुरता मामा"* या म्हणीसारखी आहे.अन स्वतःस  म्हणे आम्ही याविरुद्ध कधी पेटून उठणार?

तुम्ही तिला आपल्या घरातून प्रथम हतबल करायचे,तिला आपल्याशिवाय जगता येणार नाही.अशी व्यवस्था करायची. तिला इतकं नाजूक करायचं की तू काचेचं फांडे आहे .असं सतत सांगत राहायचे.अन हे उपदेश दगडातले देव देत नाहीत तर तिच्याच योनीतुन जन्म घेतलेले हे महाभाग देत राहतात.

तिच्यावर हा समाज सतत बलात्कार करत असतो. सतत म्हणजे सतत.फक्त तो शारीरिक नसतो. जेव्हा शारीरिक होतो तेव्हा मात्र आपण साव असल्यासारखा आव आणत असतो.आज कित्येक जणांना शिव्यादेण्यासाठी *ती* लागते .हा रोजचा तिचा अपमान नाही का!आपलेच ओठ दातांविरोधात उठाव, पेटून उठलेले अजून तरी पाहिलेले नाही.

आपण खरंच पेटून उठणारे असतो ना !तर आपल्या मुलीचे, बहिणीचे,मैत्रिणीचे 7 च्या आत घरात अन 18 च्या आत लग्न उरकून टाकण्याची धडपड केली नसती.हा मानसिक बलात्कार आपल्याच माणसांकडून होत असेल तर ती न्याय कोठे मागणार?

ती जन्मतःच निर्भय आहे. पण तिच्या एकटीच्या मर्यादा आहेत ताकदीच्या.ती आपल्या एकट्याला झेपणार नाही म्हणूनच पुरुष जातीतले पाच-सहा षंढ लोक एकत्र एकटीसमोर लढायला जातात.तरीही शेवटपर्यंत ती झुंज देते.स्वतःला पुरुषार्थ म्हणून घेणारे हे काय तिचे संरक्षण करणार?

खूप राग ,मनस्ताप होतो अशा वृत्तीचा की जे शारीरिक आकर्षणासाठी वस्तू बदलल्यासारखे तिला बदलत राहतात.हे सारं त्याचं *प्रेम* या पवित्र नावाच्या खाली चालू असतं.हे काम झालं की प्रेम संपुष्टात आणतात. आज त्यातलेच कितीजण तरी मेणबत्या जाळत पुढे चाललेले दिसतात. हे काय पेटून उठणार?

....कथुआ मधील मंदिरात घडलेली अमानुष घटना डोळ्यासमोर कल्पना करताना संत गाडगेबाबांचा उपदेश : *देव* हा *"दगडात नसून"* हे सत्यापित झालं मात्र *"माणसात आहे"* हे मात्र खोटं वाटू लागलं.

बलात्कारी विकृत लोक हे आभासी आकृती आहेत.ते पुसण्यासाठी डस्टर सुध्दा तसाच तयार करावा लागेल.तरच तिची अन त्याची प्रतिमा फळ्यावर नव्याने तयार करता येईल.

खरंतर अशा गोष्टीवर  सर्व मुलींनी लिहायला हवं. माझ्यासारखे सवत बनलेले पुरुष मदत करू शकतात,कायम आधार देऊ शकत नाही.तो त्यांनी गृहीत धरायचं सोडून द्यावं. तुम्ही स्वतःच पेटून उठायला हवं.उद्याच्या प्रकाशमय दिवसासाठी.. ..

किरण पवार ,औरंगाबाद
आपण सर्रास वृत्तपत्र वाचणार, आम्ही टि.व्ही वर सर्रास बातम्या पाहणार, आता तर आम्ही डोळ्यादेखत खूणही पहायला तयार. मानसिकता अशी काय करून घेतली आम्ही की, एका आठ वर्षांच्या मुलीकडे वाकड्या नजरेने पाहून चक्क तिच्यावर बलात्कार केला जातो आणि आम्ही फक्त  पाहण्यापलीकडे, बोलण्यापलीकडे काहीच करू शकत नाही. हां कारण आपण बांधील आहोत ना काही करायला.
             पेटून उठण हे काय आहे नेमकं? हे आज सांगायची वेळ आलीय तरूण पिढीला. खरं सांगायचं तर अक्षरशः कल्पना केली ना तरी अंगावर काटा येतो. विचारही करवत नाही, त्या आठ वर्षांच्या चिमुकलीने कसा सहन केला असेल तिच्यावर झालेला बलात्कार....?
          लहानपणापासूनच स्त्रीवर एक प्रकारचा बलात्कारच केला जातो आणि आम्ही तरीही अभिमानाने मिरवतो, आम्हाला मुलगी आहे. मुलगी जरा कुठे मोठी झाली की, नातेवाईक तिच्याकडे ज्या  नजरेने बरयाचदा पाहतात त्याइतक अस्वस्थ दुसर काहीच करत नाही मनाला. या गोष्टी घडतात सर्रास. फरक एवढाच की, मुली याची वाच्यता कुठेही करत नाहीत. आणि करणार तरी काय म्हणून? दुखः होतं, रागही प्रचंड येतो बलात्कार करणारया प्रवृत्तींचा पण हातात काहीच नाही उरत न्याय कधी मिळणार? हे वाट पाहणं सोडल तर.....

महेश देशपांडे,उस्मानाबाद
मला या विषयावर एवढंच म्हणावस वाटत की *आपण आपली बुद्धि गहाण टाकल्यासारखे वागत आहोत*. अतिशय असंवेदनशील होत आहोत. किती जणांनी या सगळ्या घटनेनंतर आपल्या घरातील किंवा संपर्कतील महिलांना कनखर बनायला सांगितले किंबहुना त्यांना तसे धड़े दिले...ईत्यादी इत्यादी...

आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे आपण अक्षरशः मीडिया च्या हतातील खेळण झालो आहोत... हे खर आहे .
कोणी कितीही नाही म्हणा... अहोच आपण मीडिया च्या हतातील खेळण... किती जण विचार करतात हो प्रत्येक बातमिबद्दल...?
आसिफा प्रकरणात आता सत्य समोर येत आहे तर सगळे चुप... कोणाला दोषी ठरवनार? मीडियाला? अहो तुम्हीच तर त्यांच्या संगन्यावर विश्वास ठेवलाय...
माझ्या अशा बोलन्यामुळे बऱ्याच जणांना राग येईल पण, माफी असावी अहो खरच... जरा तरी विचार करावा प्रतिक्रिया देण्यापूर्वी...🙏🏻🙏🏻

त्यात अजुन ह्या धर्मात अस त्या धर्मात अस...

हे सगळ असह्य आहे...

तुम्ही कितीही आरडा ओरड केल्यावर कोंण लक्ष देत?
सरकार?
त्यांच्याशी आपला काहीही संबंध नाही... तस असत तर आतापर्यंत दखल घेतली असती...

या आशा घटना होउ नयेत म्हणून
आपल्याला जाग व्हायचे असेल तर...

याला *बोलण्या पेक्षा कृतिचीच गरज आहे* अस मला वाटत आणि पुरुष महिला दोन्ही घटकानी मिळून प्रयत्न करायला हवे.
ज्ञानेश्वर तात्या टिंगरे,उस्मानाबाद.
आजच्या परिस्थितीवर विषय चर्चेला घेतला त्याबद्दल टीमचे धन्यवाद..

पण लिहिताना मनात एक प्रकारची भीती पण वाटत आहे की इतक्या संवेदनशील विषयावर लिहीताना तितक्याच तोलामोलाची भाषा वापरली गेली तरच त्या घटनांचे गांभीर्य जाणवेल अन्यथा नाही, तरीपण धाडस करून थोडासा प्रयत्न करत आहे.

आज असिफाच्या निमित्ताने देशात जे वातावरण ढवळुन निघालं आहे ते पाहता असं लक्षात येते आहे कि अशा घटना घडल्या कि हमखास चर्चा केली जाते ती जाती धर्माची.. इतके शिंतोडे उडवले जातात कि मूळ मुद्दा बाजूला पडून नवीन घटना घडण्यास पोषक वातावरण तयार करून दिले जाते.
आजपर्यंत देशातील ज्या ज्या माता भगिनींवर अन्याय अत्याचार झाले त्या सर्व भारतमातेच्या लेकी होत्या.. पण विषयाला अनुसरून गेल्या लेखात जसे मला पडलेले प्रश्न विचारले होते तसेच आज देखील काही प्रश्न मी सगळ्यांना विचारणार आहे, तुम्ही त्यावर विचार करावा आणि काही चूक असेल तर मला वैयक्तिक सांगा ही विनंती..


१ . आज असिफा वर जे झालं ते अत्यंत दुर्दैवी आहेच, मात्र इतर माता भगिनींवर असाच अन्याय अत्याचार झाला त्यावेळी आपण का गप्प होता किंवा असता ?

२. अन्याय, अत्याचार झालेल्या स्त्रियांची / मुलींची जात व धर्म बघून तुम्ही मेणबत्ती हातात घेणार का ?

३. ज्या सोशल मीडियावर, इलेक्ट्रॉनिक मीडियावर दाखवलेल्या चुकीच्या कव्हरेज मुळे तुम्ही डायरेक्ट न्यायाधीश बनून आरोपी कोण हे जाहीर करण्यात मोठेपणा मानता व कालांतराने सत्य बाहेर आल्यावर मूग गिळून गप्प बसता याबद्दल मला स्पष्टीकरण हवं आहे ?

४. अत्याचार हा अत्याचारच असतो, तो विशिष्ट जातीधर्मातील व्यक्तीने केला तरच तो घटनेत बसतो आणि अन्य लोकांनी केला तर बसत नाही हे होऊ शकत नाही , मग अत्याचार ज्याच्यावर झाला त्याला जात धर्म नसेल तर अत्याचार करणाऱ्याच्या जातीधर्माचा संदर्भ प्रत्येक ठिकाणी घेऊन का बदनामी केली जाते ?

५. आजकाल व्हाट्सअप्प, फेसबुकवर निषेधार्थ प्रोफाइल पिच्चर / dp काळा करा , भगवा, हिरवा, निळा करा म्हणून पोस्ट फिरताना दिसतात.. मला सांगा आज तुमच्या असल्या आभासी श्रद्धांजलीने, निषेधाने माणूस घराबाहेर पडणारच नाही..
Dp काळे केले की काम झाले ही त्याची मनोवृत्ती वाढीस लागेल, ही विकृती अशीच वाढू द्यायची आहे का ?

६. उद्या अशाच घटना आपल्या आजूबाजूला किंवा घरात सुद्धा घडू शकतात मग उच्च शिक्षणासाठी स्वतःच्या मुलीला किंवा नोकरीसाठी बायकोला पाठवण्यासाठी सगळे तयार होतात मग त्यांना किमान  स्व - संरक्षण करण्यासाठी असणाऱ्या विविध कोर्सेस ला का पाठवले जात नाही ?

७. आज आशा घटना घडल्या कि काही चळवळी अनाहूत पणे काही राजकीय पक्षांना पोषक वातावरण निर्मिती करून देतात अन नाव मात्र सामाजिक असते ही   ' शाळा ' कधी बंद होणार ?

८. आज ज्या मीडियाच्या माध्यमातून आपणास आशा घटनांची माहिती मिळते, ही मीडिया किती विकलेली आहे हे माहिती असून सुद्धा जर सुशिक्षित म्हणवून घेणारे जर द्वेषाचे बीज समाजात पसरवत असतील तर याला जबाबदार कोण ?

धन्यवाद...


मयुरी देवकर ,पंढरपूर
खरंच मन आणि मेंदू अगदी सुन्न झाले आहेत प्राचीन संस्कृतीची परंपरा असलेल्या संस्कारमय  भारतात आपण राहत आहे असं म्हणायलाही आज लाज वाटते . काय चाललंय आज आपल्या आजूबाजूला? खरंच एकेकाळीची  प्राचीन संस्कृती, संस्कार ही सर्व विशेषणे आज निष्फळ वाटू लागली आहेत.प्राणीसुद्धा अशी कृत्ये करणार नाहीत अशा नराधमांना आज संरक्षण दिलं जातंय....... 
                 एकीकडे आम्ही स्त्रियांना किती मान, सन्मान देतो,त्यांच्या कौतुकाचे पोवाडे गायचे आणि दुसरीकडे इतक्या कोवळ्या मुलींना पाशवी अत्याचाराने नष्टच करून टाकायचे काय म्हणावे याला?कधी या वासनांनी बरबटलेल्यांचे डोळे उघडणार?आता ही वाट पाहण्याची वेळच नव्हे याच डोळ्यांना ठेचायला हवे आणि त्यासाठी जातीय राजकारण न करता माणुसकी लक्षात घ्यायला हवी.... पण आता माणुसकी म्हणलं कि पुन्हा बहिणाबाईंची आठवण झाली त्या म्हणतात 'अरे माणसा माणसा, कधी होशील माणूस?'  खरंच बहिणाबाई अहो अजूनही हा माणूस *माणूसच* नाही झाला...या अशा गोष्टी करण्यातच त्यांना पुरुषार्थ वाटत आहे पण यांच्या या अट्टाहासापायी अजून अशा किती चिमुरड्यांना नाहक बळी जावं लागणार??? आणि हे सर्व घडत असताना अजूनही शेजारच्या मुलीबाबत हे सर्व घडत आहे मग मी मस्तच राहणार कधी आम्ही बदलणार.....एवढे करूनही हे नराधम मस्त राहतात, त्यांना काहीच शिक्षा दिली जात नाही उलट त्यांनाच प्रतिसाद दिला जातोय खरंच लाज वाटतेय अशा लोकात आपण राहतोय......
              स्त्रियांसाठी कायदे, नियम असून काय उपयोग???त्या कायद्याची अंमलबजावणी कोण करणार??? आज ७वर्षाच्या मुलीपासून ते ७० वर्षाच्या आजीपर्यंत कोणीच सुरक्षित नाही ....खरंच भय इथले संपत नाही .... परवा निर्भया, काल गुडीया, आज असिफा, उद्या अजून कोण हेच चालूच राहील जोपर्यंत आपण शांत बसू .... आता वेळ आली आहे ती स्त्रियांनी फक्त यावर आवाज उठवून, मेणबत्ती पेटवून शांत बसण्याची न्हवे तर यावर पेटून उठून लढा देण्याची आणि न्यायच मिळवण्याची व या नराधमांना शिक्षा देण्याची....

लक्ष्मी यादव,मुंबई.
१. बलात्कारी लोकांना 'विकृत'म्हणून मोकळं सोडू शकत नाही. या केसमधील व्यक्ती पूर्णपणे भानावर असतात आणि थंड डोक्याने नियोजन करून बलात्कार करतात.

२.असिफाच्या केसमधील बलात्कार करणारी अपराधीनी बलात्काराचा'बदला' घेण्यासाठी वापर केला. आजवर अनेक देश, समूह यांनी बदला घेण्यासाठी स्त्रियांवर बलात्कार केले. जवळचं उदाहरण घ्यायचं झालं तर भारत-पाकिस्तान फाळणी.आपणही बलात्कार झाल्यास 'अब्रू गेली'असच समजतो. बलात्काराच्या घटनेवर पेटून उठणारे किती तरुण बलात्कार पीडितेशी लग्न करायला तयार होतील?

३.जगात जवळजवळ  सगळीकडे लैंगिक छळ हा स्त्रियांचे दमन करण्यासाठी आणि सत्ता प्रस्थापित करण्यासाठी केला जातो. मग ते बायकोवर जबरदस्ती करणारे नवरे असू देत नाही तर लहान मुलीवर अत्याचार करणारे असोत.

४. असिफाला किंवा ज्यांच्यावर बलात्कार झाला त्यांच्या दोषींना फाशी/जन्मठेप झाली की न्याय मिळाला असं म्हणणं ही एक तात्पुरती बाजू झाली. मुळातच मुलींवर स्त्रियांवर बलात्कार होऊच नये असं वातावरण निर्माण करणं ही कायमस्वरूपी आणि टिकाऊ बाजू झाली. आपण तात्पुरत्या बाजूवर काम व्हावे म्हणून पेटून उठतो,पण दुसऱ्या बाजूसाठी आग्रह धरत नाही. मुलींना कराटे शिकवणं , त्यांना सातच्या आत घरात आणणं किंवा पोलिसांनी रात्री/दिवसा गस्त घालणं ही सगळी मलमपट्टी आहे.याच्या मुळाशी असणाऱ्या घटकांवर आपण काम करत नाही. उदा.मुलगे मोठे होऊन बलात्कारी होऊ नये म्हणून त्यांना लहानपणापासून फक्त आई बहिणीचाच नव्हे तर प्रत्येक स्त्रीचा, तिच्या हक्कांचा आदर करायला आपण पालक, कुटुंब,समाज म्हणून शिकवत नाही. उलट आपल्या मुलानं किंवा कुठल्याही मुलानं एखादया मुलीची छेड काढली तर 'men will be men' असं म्हणून नकळत त्यांना प्रोत्साहन देत असतो. आपल्याकडील सिनेमा'तू हां कर या ना कर तू है मेरी किरण'असंच शिकवितो.मुलांसमोर आपल्या बायकोला चिल्लर समजून तिचा वारंवार अपमान करणारे वडील आपल्या मुलाला आणि मुलीला स्त्रीवर अन्याय करणं आणि तिने ते सहज स्वीकारणंच शिकवीत असतात.मुळात पुरुष,मुलगे,मुली,स्त्रिया या सर्वांना प्रत्येक स्त्रीचा सन्मान करणं, तिच्या शरीराचा सन्मान करणं हे शिकवलं पाहिजे.आपल्या/शेजारच्या/नात्यातील/समाजातील मुलानं एखाद्या मुलीची छेड काढल्यास आपण/समाज त्यावर कशी प्रतिक्रिया देतो हे विचार करण्यासारखे आहे.मुलाला काय म्हणतो आणि मुलीला काय म्हणतो?मुलीला नीट वागायला शिकविण्यापेक्षा तिला अत्याचाराचा विरोध करायला आणि मुलांना/पुरुषांना नीट वागायला शिकविण्याची गरज आहे.कोणत्याही स्त्रीवरील लैंगिक अत्याचार सहन केला जाणार नाही हा संदेश कुटुंब, समाज,शासन पातळीवर जायला हवा.

५.आपल्याकडे स्त्रियांवर लैंगिक अत्याचार वेगवेगळ्या वर्गवारीत मान्य आहे.उदा.जर एखाद्या स्त्रीवर परपुरुषाने लैंगिक अत्याचार केला तर तो बलात्कार,पण नवऱ्याची लैंगिक जबरदस्ती बलात्कार नाही.18 वर्षांच्या आतील मुलीवर लैंगिक अत्याचार झाला/शरीरसंबंध केले तर तो बलात्कार,पण तेच कृत्य त्याच मुलीशी नवऱ्याने केलं तर तो बलात्कार नाही.लग्न हे बलात्कार करण्याचे लायसन आहे.सेक्स वर्करवर बलात्कार होऊ शकतो हे आपण मान्य करत नाही. त्यामुळे लैंगिक छळ किंवा बलात्कार हा एका अर्थाने समाजमान्य आहे. खरं तर कुणीही केलेल्या लैंगिक अत्याचाराची वेदना सारखीच असते. पण आपण त्यावर पेटून उठत नाही.
६.बलात्कारीस फाशीने हा प्रश्न मिटत नाही.प्रश्न स्त्रीला वस्तू समजण्याची मानसिकता बदलण्याचा आहे; नाहीतर बलात्कारीस फाशी असणाऱ्या देशात बलात्कार होणं बंद झालं असतं.
७.दोषींवर तात्काळ कारवाई न होणं, कायद्याचा धाक नसणं हाही मुद्दा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************