अफेअर : फेअर की अनफेअर


अनिल गोडबोले,सोलापूर.

अफेअर... ज्याला आपण "लफडं" म्हणतो. अफेअर.. या शब्दाचा अर्थ घटना असाही होतो.अफेअर.. या शब्दाचा अर्थ जे फेअर (योग्य) नाही ते.. पण 
(अयोग्य) अनफेअर अस ही म्हणता येत नाही ते...तुम्ही काहीही म्हणा.. अफेअर म्हणजे भारी मज्जा बाबा.!एकमेकांविषयी विचार करणं, आवडणं, भेटणं, गुलाब, कोफी आणि बरच काही.. आपल्याला एखादी व्यक्ती आवडते हीच गोष्ट मुळात भरपूर आनंददायक असते आणि त्या पेक्षा समोरच्या व्यक्तीला आपण आवडतो हे प्रचंड आनंददायी असतं..आपले हिंदी पिक्चर यावर तर चालू आहेत.. भिन्नलिंगी आकर्षक बरोबर समलिंगी आकर्षण देखील असते.  
आता 14 फेब्रुवारी ला व्हॅलेंटाईन डे नावाचा सण येत आहे.(तो सण आहे की निमित्त आहे की मार्केट उभं करण्याची पद्धत आहे की अजून काय आहे.. ते मात्र कळत नाही) फार मज्जा. फोन कॉल, मेसेज, गुड मॉर्निंग गुड नाईट.. काळजी करणं.. बाहेर फिरायला जाण, एकमेकांचाच विचार करणे.. प्रेम भावना.. असा सगळा कार्यक्रम सुरू होतो.
ते अफेअर शारीरिक पातळीवर पोहचते.. प्रेम भावना आणि काम भावना एकत्र येऊन कृती होतात.. आणि हे सर्व अफेअर मध्ये होत असत. 
अनफेअर होण्याची शक्यता नाकारता येत नाही पण त्या साठी त्या दोघांनीही आपला स्वार्थ साधून नंतर सोडून देऊ नये..
लग्न केलेले किंवा लग्न न केलेले कोणीही असोत ज्यांनी त्यांनी आपल्या जोडीदाराला आणि स्वतःला देखील फसवु नये.
अफेअर करावं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.. पण ते नैतिक किंवा अनैतिक कोणी ठरवावं.. ते अफेअर सुरक्षित असावं एवढीच इच्छा..
तेव्हा करा लफडं एखादं बिनधास्त.. त्रास न देता.. त्रास न करता..!

प्रीती,सातारा.
तस बघायला गेलं तर अफेअर ह्या शब्दाचा अर्थ प्रकरण असा होतो म्हणून मला तो प्रेम ह्या नात्यासाठी नैतिक वाटत नाही म्हणून एखाद्या प्रेमाच्या नात्याला अफेअर म्हणावं हे योग्य नाही 
     असो आत्ता राहता राहिला प्रश्न प्रेम योग्य की अयोग्य तर मला एक किस्सा सांगावासा वाटतो एकदा असच मी आणि माझ्या मैत्रिणी मधे लग्नवरून चर्चा चालू होती मी तिला म्हणल "बाकी काहीही असो मी लग्न करणार तर घरातल्यांच्या मर्जी नुसार अरेंज मॅरेज च कारण मला ह्या प्रेम अफेअर ह्या गोष्टींवर काडीमात्र विश्वास नाही कारण हल्ली त्यात खरे पना उरला नाही आणि त्यात घरातले परवानगी देतीलच अस पण नाही त्यावर ती म्हणाली तुझ म्हणणं बरोबर आहे पण तुला काय गॅरंटी आहे तुझा होणारा पार्टनर तुला भविष्यात समजून घेईल आणि दुसऱ्या कुणाच्या boyfriend किंवा girlfriend बरोबर लग्न करण्यापेक्षा आपल्या boyfriend किंवा girlfriend बरोबर लग्न करणं कधीही चांगलं.जेणेकरून तुला तुझ्या पार्टनर च्या सगळ्या चांगल्या वाईट सवयी गोष्टी आधीपासूनच कळतील....."
        तिच्या ह्या वाक्यांनी मला पुरत गोंधळून टाकलंय त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर मी अजुनही शोधतेय अफेअर:फेअर की अनफेअर.....

रामकिशन जगताप,बीड
जस ग्लास भरलेला आहे की आर्धा आहे हा विवादित विषय आहे तसाच अफेअर्स पण आहे. प्रत्येकाला ते ठरवण्याचा आधिकार आहे. फक्त आपल्यामुळे कोणाच्या मनात विश्वासघात केल्याची भावना येऊ नये व केलेल्या कामामुळे आपलेच मन आपल्याला खायला उठू नये. एवढेच.

किरण बंडू पवार,औरंगाबाद.
प्रेमाच काहीतरी फेअर आहे
पण लाॅयल असलेल्या पार्टनरला फसवणं
जरासं अनफेअर आहे,

एकावरचा प्रेमातला इंटरेस्ट जाणं
हे जरासं विचित्र आहे
आणि महत्वाचं शरीरसुखासाठी
एखाद्याला अंधारात ठेवणं चुकीच आहे,

गरज असते प्रेमाचीही
आणि गरज असते शरीरसुखाचीही
माणसाच्या जन्मजात गरजांशी
तडतोज करणं जरा अनफेअर आहे,

पण खऱ्या अर्थी
विश्वासाला तडा देऊन दुसरं नातं ठेवणं
हे खरचं जरा अनफेअर आहे,

नाण्याच्या दोन बाजूत या
पारडं जड जरा खात्रीच आहे,
विश्वासात घेऊन काही गोष्टींना
जे घडतं तेच इथे फेअर आहे.

आदित्य चौगुले,इचलकरंजी.
 याच तिच्याशी किंवा त्याच हिच्याशी अफेअर चालू आहे अशी कधीतरी कुजबुज कानावर येते. म्हणजे काहीजण प्रेम या पवित्र शब्दाला पण अफेअर हे नाव देऊन मोकळे होतात. प्रेमाला वयाचे बंधन नसते पण तेच प्रेम एखाद्याला खुपत असेल तर तो अफेअर आहे असे सांगू लागतो. जर एखाद्याचे अफेअर प्रामाणिक आणि विश्वासावर टिकून असेल तर ते अफेअर फेअर आहे. आणि आपलेच दोन तीन अफेअर आहेत आणि आपला जोडीदार मात्र एकवचनी एकनिष्ठ असावा अशी अपेक्षा बाळगणे हे अनफेअर आहे. हीच बाब वैवाहिक जोडप्यांना लागू पडते. पुरुषाने बाहेर अनेक लफडी करण्याला समाजमान्यता मिळते पण त्याची बायको मात्र चारित्र्यशील पाहिजे ही अपेक्षा बाळगणे म्हणजे अनफेअर आहे. एकमेकांचा एकमेकांवर विश्वास, प्रामाणिकपणा, समंजसपणा असेल आणि नाते जितके निखळ असेल तितके ते अफेअर नक्कीच फेअर असेल.

संकेत मुनोत,पुणे.
अफेअर फेअर केव्हा म्हणता येईल हाही प्रश्न आहे.पण अनेकदा अनफेअर वाटते.
 नाते टिकवूया या सामजिक चळवळीचे कार्य करतांना याबद्दल च्या काही केसेस आल्या. गैरसमज नको म्हणून सांगतो कि जी नाती आहेत ती अधिक चांगली होण्यासाठी, त्यातील गोडवा वाढवण्यासाठी ,गैरसमज कमी होऊन एकमेकांना समजून घेत पुढे कसे जाता येईल यासाठी ही नाते टिकवूया चळवळ
सध्या स्वार्थीपणा, टिव्ही सिरियल्स ,सोशल मीडिया आणि इतर ठिकाणी सतत दाखवले जाणारे नाते तोडण्याबद्दल चे आणि तीव्र टोकाचे मत मांडण्याचे विचार इ मुळे नात्यांमध्ये तणाव होण्याचे आणि ती तुटण्याचे प्रमाण खूप वाढले आहे त्यामुळे नाते टिकवूया ही चळवळ तर त्यात आसलेली नाती सुंदर करण्यासोबतच ज्यांचे नाते तुटत आहे त्यावर ही कार्य केले जाते.

यात आलेली काही केसेस मध्ये असे  आढळुन आले कि एक जोडीदार नाते टिकवण्याचा कसोशीने प्रयत्न करतोय तर दुसऱ्या तोडण्याचा, मग तोडणारा टिकवणार्यावर येन तेन आरोप करून त्याची किंवा तिची बदनामी करून त्या नात्यातून बाहेर पडतो पण तोपर्यत नाते टिकवायचा प्रयत्न करणारा जोडीदार मात्र कसोशीने प्रयत्न करत राहतो.
यात अनेक केसेस मध्ये असे आढळुन आले कि जोडीदारा चे पहिल्यांदा ज्या कुणासोबत अफेयर होते तश्याच अपेक्षा तो पुढच्या जोडीदाराकडून करतो आणि नाही पूर्ण झाल्या कि त्याला ती गोष्ट जमत नाही असे समजून काही बाही कारण काढून त्याला हैराण करतो आणि सोडून देतो. म्हणजे समजूतदार लोक आहे त्यात adjust करतात पण धरसोड प्रवृत्तीचे लोक त्यात सोडून देतात , यात ज्याने सोडून दिले त्याला काही तेवढा त्रास होत नाही पण मुख्य त्रास होतो तो ज्याने ते नाते टिकवण्याचा प्रयत्न केला त्याला.
उदा- प्रियाने समीर ला पटवून त्याच्याशी लग्न केले पण लग्नानंतर प्रिया सतत समीर कडून अवास्तव अपेक्षा ठेवायला लागली, कि मला वाटत माझा नवरा असा असावा तसा असावा वगैरे.....
समीर प्रेमापोटी अनेक गोष्टी करायचा पण एवढे बदलणे काही शक्य नव्हते शेवटी सतत भांडण इ करून प्रियाने समीर पासून घटस्फोट घेतला , यात समीर पुरता तुटला पण एक दोन वर्षांनी एक चांगली मुलगी आयुष्यात आल्याने तो आनंदी झाला.घटस्फोट झाल्यावर काही दिवसांनी जेव्हा समीरला प्रियाची एक सहकारी भेटली तेव्हा तिने त्याला प्रियाच्या लग्नापूर्वीच्या  प्रियकराबद्दल सांगितले आणि त्याला धक्काच बसला, प्रियाला जसा नवरा पाहिजे होता आणि समीरला जे ती सतत तू असा असा बन म्हणायची तो तसाच होता अगदी, समीर च्या प्रिया वरील आंधळ्या प्रेमामुळे प्रियाचे असे काही असेल हे त्याच्या लक्षात च आले नाही.आणि प्रिया आणि तिच्या घरचे स्वतःची चुकी लपवण्यासाठी सतत समीरवर खोटे नाटे आरोप करत राहिली आणि समीर त्याची उत्तर देत राहिला
हेच गणेश आणि सोनम बाबत. लग्न झाल्यवर गणेश सोनम कडून सतत त्याच्या मैत्रिणी ची अपेक्षा ठेवायचा आणि तिला दोष द्यायचा.शेवटी काही बाही कारण काढून त्याने घटस्फोट मिळवला.असे अनेक प्रसंग सांगता येतील ज्याच्यामुळे काहींची आयुष्य उध्वस्त झाली त्यामुळे पुढे दुसऱ्या कुणाकडून तशीच अपेक्षा करणार असाल तर ते अफेअर फेअर नाहीतर अनफेअर

*यातील सर्व छायाचित्रे इंटरनेट वरून घेतली आहेत.

प्रजासत्ताक भारतात हरवलेली प्रजा.

प्रजासत्ताक भारतात हरवलेली प्रजा.

🌱वि४🍀 या व्हाट्सअप ग्रुपवरून

प्रजासत्ताक भारतात हरवलेली प्रजा.


Source:- Internet

-वाल्मीक फड नाशिक 

प्रजासत्ताकचा अर्थ बर्याच वर्षाने लोकांना कळाला खरा पण जे आपले हक्क आपण देशाला महान बनविण्यासाठी वापरतो का? मला तर उघड दिसतंय की,प्रजासत्ताकच्या बाता करणारे अनेक लोक देशातील ज्या काही कायदा सुव्यस्थेच्या बाबी आहेत त्यावरच आक्षेप घेत असतात .प्रजेच्या हातात सत्ता असली म्हणून आपण ज्या देशात रहातो जेथे आपण खातो,पितो त्या स्थानाचा अपमान त्याच्याविरुद्ध घोषणा देणे असा होत नाही. 
गेल्या दशकापासून अशा अनेक गोष्टी घडत आहेत इथून मागे असे घडत नव्हते .मला ह्यामध्ये अधिकार मागण्यापेक्षा असलेल्या सरकारवरील नाराजी जास्त दिसते.मुळात ज्या सरकारने बहुमत मिळऊन सरकार स्थापन केलेले आहे व जो कायदा राज्यसभा आणी लोकसभा ह्या दोन्हीही सदनात बहुमताने पास झालेला आहे त्याचा विरोध करणे म्हणजेच शुद्ध राजकारण केल्या सारखेच आहे.देशात जवळजवळ नऊशेच्या आसपास विद्यापिठं आहेत परंतु एकच विद्यापिठ असं आहे की,तेथील विद्यार्थ्यांना प्रजासत्ताकच्या नावावर  आपली राजकारणाची पोळी भाजण्यासाठी भडकवले भडकवले जात आहे.काही गरीब विद्यार्थ्याला ह्यात काही रस नसताना त्यांच्या शैक्षणिक वर्ष वाया घालविण्याचे काम ह्या महाभागांकडून होत आहे.खरं तर त्यांचा हा प्रयत्न एक ठराविक माणसांची ओळख टिकवून ठेवण्यासाठीचा आहे आणी तो प्रजासत्ताकतेसाठी घातक आहे.
काही देशद्रोही तत्वे जेव्हा आपल्याच सैनिकांना दगड मारले जातात आणी सैन्य जेव्हा कारवाई करतं तेव्हा आपल्याच देशात खाणारे स्वताला बुद्जीवी समजणारे लगेच सैन्यावर टिका करायला लागतात.ते अशा टिका करु शकतात कारण प्रजासत्ताक.

Source:- Internet

-प्रविण, मुंबई

प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता. भारतीय लोकशाही मध्ये भारतावर ज्यावेळी एकाधिकारशाहीची टांगती तलवार दिसली त्यावेळी या देशातील प्रजेने प्रजासत्ताक या शब्दाचा खरा अर्थ सत्ताधाऱ्यांना दाखवला. त्याची काही मोजकी उदाहरणे.
१. जेव्हा देशावर आणीबाणी लादली आणि "Indira is India and India is Indira" असा नारा सत्ताधाऱ्यांनी लावला त्यावेळी जनक्षोभ उसळून तत्कालीन प्रजने , भारतीयांनी सत्तापालट केला
२. भ्रष्टाचाराने देश ज्यावेळेस पोखरला जात होता त्यावेळी लोकपाल विधेयकाला समर्थनासाठी अवघा भारतवर्ष रस्त्यावर आला
३. आणि ज्यावेळेस एकाधिकारशाही ने जनमत विचार न करता समाजघातकी कायदे संमत करण्याचा धडाका सत्ताधाऱ्यांनी लावला त्यावेळेस पुन्हा एकदा जनता रस्त्यावर उतरली.
असे आणखीन काही उदाहरणे देता येतील पण ती "काही"च असतील. तेवढ्याने देश प्रजासत्ताक मानणे म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठाण्यासारखे होईल. 
2005 साली माहितीचा अधिकार ही अमंलात आणला गेला.  त्याचाच परिणाम लोकपाल ची चळवळ होती. पण आता तर हा कायदाच कमकुवत केला गेलाय.
*ग्राम* *स्वराज* 
गावातील प्रत्येक  निर्णयात लोकांचा सहभाग किती असतो?
ग्रामसभेला किती लोक उपस्थित असतात?
महिला ग्राम सभा अर्थपूर्णरीत्या किती गावात घेतली जाते?
यात सहभाग घेणे ही कोणाची जबाबदारी...?
शिक्षण, आरोग्य, रोजगार ह्याची गरज असताना धर्म-जात यावर मतदान कोण करत?
या प्रत्येक प्रश्नच उत्तर देश प्रजासत्ताक आहे की नाही याचंच उत्तर आहे. 73 व्या घटना दुरुस्तीनंतर देशात पंचायत राज लागू झाले, 
ग्राम स्वराज या देशाची काळाची गरज आहे हे गांधीनी फार आधीच जाणलं होत, पण ग्राम स्वराज च्या नावे सरपंच वर्ग आपल्या सात पिढ्यांचा उद्धार करण्यात व्यस्त आहेत. फार कमी महिला सरपंच या पतीच्या हस्तक्षेपाशिवाय काम करत आहेत, पण बहुसंख्य महिला सरपंच तसेच महिला पंचायत सदस्य या नामधारी आहेत.

  मी भारतातील वेगवेगळ्या राज्यातील ग्रामीण भागात फिरलो पण सत्ता कधीही लोकसत्ता वाटली नाही. उदाहरण द्यायचे झाले तर  रातलाम (मध्यप्रदेश) जिल्ह्यातील बाजना या तालुक्यात तेथील बँकिंग व्यवस्थेचा अभ्यास करताना एक वास्तव कळलं जे भरतात अनेक ठिकाणी पहावयास मिळेल. 94% लोक ही आदिवासी पण तालुक्यावर 1% बनिया लोकांचं राज्य. या शतकात ही या तालुक्यता अवाजवी दराने बेकायदेशीर कर्ज देऊन आदिवासी समाजाला कर्जबाजारी ठेवलं गेलंय.
पूर्ण भारतभरात मायक्रोफायनान्स कंपन्यांनी कायद्याच्या अडून सावकारी चालू केलेय, प्रत्येक गावात किमान 50 तरी अशी कुटुंब सापडतील की जे या कंपन्यांच्या कर्जा ने हैराण आहेत पण सरकारने कोणत्याही कंपन्यांवर कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. करण या कंपन्या भांडवलशाही च्या सत्तेचा द्योतक आहेत आणि सरकार स्वतः त्यासमोर हतबल आहे.

एकंदर काय तर लोकशाहीत लोक नाहीत, संसदेत 'लोक'नेते नाहीत, कायदा बनावण्यात "लोक"सहभाग नाही, नियमांचं 'लोक' पालन नाही करत पण निवडणुकीत 'लोक'मत म्हणून लोकशाही. 

लोकशाही ही लोकसहभाग, लोकसत्ता, लोकमालकी या तत्वावर चालते आणि त्यात व्यक्तीपूजेला, धर्मांध शक्तीना, भेदभावाला आणि प्रत्येक लोकविरोधी कृतीला  कदापि स्थान नसले पाहिजे. पण या सर्वांना स्थान दिल्याने व्यक्ती देशापेक्षा मोठी होते आणि प्रजासत्ताक देशातून प्रजाच बाजूला सरली जाते.

Source:- Internet

-वैशाली सावित्रीबाई गोरख
 ग्राफिक डिझाइनर.पंढरपूर(मुंबई)

सद्या भारतात जी परिस्थिती दिसतेय त्यावरून तर आपण हेच म्हणू शकतो की प्रजा हरवलेली आहे , सध्या भारत हा प्रजासत्ताक नाही तर राजासत्ताक देश झाला आहे, येथे जनतेला काय हवंय ह्याचा विचार केला जात नाही तर राजाचा जो अजेंडा ठरलेला आहे त्याप्रमाणे सगळं होतय, मग प्रजेन त्याचा विरोध करो, आंदोलन करो राजा ला काही फरक पडत नाही, नि आज भारतातील स्वतःला सुशिक्षित मानणारी बऱ्या पैकी तरुण पिढी अशी आहे की त्यांना देशात काय चाललंय हे ही माहीत नाही, त्याचं अस म्हणणं आहे की आपण आपल्या राजाला गादीवर बसवलंय म्हणजे राजा आपला सगळ्या प्रजेचा विचार करूनच निर्णय घेईल .नि त्यातील थोड्या फार जागृत असलेल्या प्रजेला माहीत आहे की राजा चुकीच्या नि त्यांना जे हवंय तेच लागू करतोय तर त्यांना देशद्रोही आहेत अशी लेबल लावली जातात एवढंच नाही तर रॉड घेऊन मारलं जात,अटक ही केली जाते. नि बाकीच्या प्रजा ही तेच करतेय राजा बोलला ते देशद्रोही आहेत तर आहेत पण स्वतःच्या विचाराने ,चिकित्सा करून पहावं काय चाललंय ह्या साठी त्या उरलेल्या प्रजेला मोबाईल च्या दुनियेतुन वेळ नाहीय , अशा प्रकारे प्रजासत्ताक भारतात दोन प्रकारे हरवलेली प्रजा भेटतेय आपल्याला. आपल्या प्रजासत्ताक भारतात प्रजा हरवायला फक्त राजा जबाबदार नाहीय तर येथील प्रजा च जास्त प्रमाणात त्याला जबाबदार आहे असं मला वाटतं.


Source:- Internet

-अनिल गोडबोले
  सोलापूर

प्रजा"सत्ताक" देश म्हणजे ज्या देशात प्रजा सत्तेच्या केंद्रस्थानी असते ती व्यवस्था... आता हे मोजण्यासाठी कोणताही निकष नाही, परंतु आपण "प्रतिनिधी व्यवस्था" निवडलेली असल्यामुळे ज्या प्रक्रियेद्वारे ज्यांचे जास्त प्रतिनिधी येणार ते राज्यकारभार करणार..... अशी नियमावली आहे...

तर या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन प्रजेसाठी, प्रजेच्या वतीने निर्णय घेणारे सरकार हे प्रजासत्ताक असणार आहे..

आता भारतामध्ये याच्या उलट होत आहे का? असा संभ्रम निर्माण झाला आहे परंतु अजूनही प्रजासत्ताक च आहे असे माझे ठाम मत आहे.. लढण्याचे सामर्थ्य अजूनही पैसेवाल्यानी हिरावून घेतले नाही..

प्रजा आपलीच आहे राज्यकर्ते देखील आपल्यातले आहेत.. चांगल्या व वाईट गोष्टी आपल्यातच आहेत, त्या दूर झाल्या तर नक्कीच"प्रजासत्ताक" झाल्याशिवाय राहणार नाही.

लोकांनी लोकांचे लोकांसाठी उभी केलेली व्यवस्था चुकीची असू शकते पण ती वाईट असू शकत नाही.. लोक लढतील, शिकतील आणि राजकारण देखील या बाजूने झुकेल असा मला विश्वास आहे.

फक्त या मध्ये लढावं लागेल, बलिदान जातील त्यांचंच फार दुःख होत आहे.. प्रजासत्ताक दिन आणि सर्व प्रजेला ही बाजू लवकरात लवकर समजून येईल एवढीच अपेक्षा

बदलती माणसे,बदलते पर्यावरण.

बदलती माणसे,बदलते पर्यावरण.

                                                Photo: Google

किरण पवार,औरंगाबाद.
सध्या माणसांच दैनंदिन राहणीमान बऱ्याच प्रमाणात बदलल्याच आपल्याला पहायला मिळतयं पण त्या राहणीमानाचे हकनाक परिणाम आज आपण पर्यावरणावर झालेले पाहतोय. मुळात माणसाला विनाशाकडे जाण्याची हौस असतेच पण मग अशात हकनाक प्राण्यांनी का मरावं? हा प्रश्न ऊभा राहतो. आॅस्ट्रेलिया किती बेचिराख होऊन बसलं आणि माणूस हतबल होऊन सगळं पाहण्यापलीकडे काहीच करू शकत नव्हता...
            मी पर्यावरण जरा मनातलं बोलतो आज... झाली मनाची शांती. काय मिळवलत माझा ऱ्हास करून. माझ्यापुढे सर्व गुन्हे क्षम्य ठरले असते तुमचे. पण तुम्ही तर मलाच बरबाद करायला उठलात. एकवेळा नाही तर कित्येक वेळा मी तुम्हाला सांकेतिकरित्या खुणावलही की, बाबांनो सुधरा आता तरी. माझ्याशिवाय तुम्हीही नाही जगू शकत, हे वारंवार सांगण्याची वेळ माणसासारख्या समजुतदार प्राण्यावर यावी. माणसा आजच्या तुझ्या आस्तित्वाच्या नाशाला सर्वस्वी फक्त आणि फक्त तूच जबाबदार आहेस. अजूनही वेळ हाताबाहेर गेली नाही, योग्य काय हे ठरवून मर्यादेत जगायला शिक. प्रत्येक गोष्टीला आपापली बंधन असतात. ही बंधने मात्र तू स्वत:ला अहंकाराच्या भावनेत पाहताना हरवून बसलास. तुझ्या अहंकारापायी टेक्नॉलॉजी आणि विज्ञानाला तू अमूल्य ठरवून निसर्गाला कमी लेखत आलास आजवर. आता अंत असाच एकेकाचा होणार. विनाश अटळ आहे. आणि आता अर्थहीण आहे रे जगणं! काय ठेवलयं यात सांग जरा... मला कधीकधी वाटतं थेट फेकून द्याव सारं थोडांड असलेलं हे लख्तर अंगास चिटकवून ठेवलेलं. तू खंबीर आहेस तर तुझी कृपा बाबा, माझ्यात नाहीये तेवढा धीर. हीच काय ती माझी अक्षम्य चूक असेल. मोहापायी अडून राह्यलंय हे जग. बघं ना म्हणजे एका वाळवंटातल्या तलावातल्या पाण्याने हजारो पक्षी क्षणात खाक व्हावेत का? चूक कोणाची म्हटलं तर इकडे तिकडे बोट फिरतात सहज आपली. पण त्या निश्पाप मुक्तपणे आकाशात स्वैर करणाऱ्या मुक्या जिवांच्या शवाच आता काय करायचं? आज बदलत चाललेल्या पर्यावरणाच्या कोपण्याला जबाबदार कोणयं रे? तू मात्र उत्तर देऊ नकोस. कारण तुला फक्त तात्विक नी बौद्धिक वाद करून तावून सुलाखून सोडायचयं सर्व. तू कधीच अंतर्मनातल्या स्वैर भाबड्या मनाला जगासमोर मांडायचा प्रयत्नही करणार नाहीस, दाखवत राहशील फक्त चुकचुकती सहानुभूती. मला नकोसयं हे असं जग ज्यात क्षणाचीही हल्ली श्वाश्वती उरली नाहीये, मग ती पक्ष्यांची असो, प्राण्यांची वा इतर.

वाल्मीक फड,नाशिक 
खरंय माणसे आज बदलली आहे कारण जुन्या काळात माणसे जशी बोलायची तेच करायची.एखाद्याला शब्द दिला तर जुना माणूस त्या शब्दाखातर आपल्या जिवाची पर्वा न करता दिलेला शब्द पाळत असायचा.आणी आताचा माणूस समोरचा आपल्या पुढे जातो की,काय?त्याच्याकडे आपल्यापेक्षा जास्त काही असो नये.अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील.आजची माणसे इतकी बदलली की त्यांना देव नावाची शक्ती आहे तिच्यावर विश्वास नाहीतर मग यांचा विश्वास कोणावर तर आत्ता आलेल्या नेत्यांवर.
जुन्या काळात निवडणुकीत उभा असलेला एखादा उमेदवार जर गावात आला आणी एखाद्या गावातील जाणकार वृद्ध माणसाने त्या उमेदवाराच्या पाठीवर हात ठेवला की त्याला लोक मतदान करायचे परंतु आत्ता तर उलट आहे दिवसभर एका उमेदवाराबरोबर फिरणार आणी संध्याकाळी दुसऱ्याबरोबर माणूस असा दुफळी झाला आहे आणी माणसांच्या ह्या अनेक चुकांमुळे निसर्गाने सुद्धा आपला रंग बदलायला सुरुवात केलेली आहे.
पर्यावरणाची पुरती वाट लागली आहे.दिवसातून तीन वेळेस हवामान बदलत आहे.उन्हाळा,हिवाळाआणी पावसाळा हे तीनही एकाच दिवसात बघायला मिळत आहे,जसा माणूस बदलला तसाच निसर्गही बदलू पहात आहे.
म्हणून माणसाने सदविचारी,विवेकी वागले पाहीजे तेव्हाच निसर्गाकडून आपल्याला तशीच साथ मिळेल.

                  Photo: Google

प्रतिक्षा बूध्दे,गडचिरोली.

कसे केव्हा दिस गेले 
जेव्हा मातीच आई होती
काळ्या आईच्या कुशीत
ज्योत आयुष्याची होती... 

आज कुणाला कळना
कोण मास हा चालला
त्याच्या शेतकरी जीवाचा
जणु हाडोक संपेना...

सार्या जगाचा पोशींदा
आज उपाशीच मेला
त्यांचं लेकरु कोवळं
तो ही शहरास निघाला... 

कसे केव्हा दिस गेले
पोरं माडावर होती
दुर आकाशी पतंग
त्याची हाती दोरी होती...

गाव माडही ओसाड
गर्दी शहरात झाली
कसा पडला दुष्काळ
नदी मनीची आटली...

कधी कळेल का मला
कसा देव भूत झाला
ज्यांची जागा मंदिरात
तोच मदिरा प्यायला...
...प्रति_ksha

युवक आणि विवेक


@vichar4
श्रद्धा काट्रे,सातारा.
भारत देश जगामध्ये युवकांचा देश म्हणून ओळखला जातो.त्या युवकांची आज काय अवस्था आहे , हे आपण जाणतोच. आजच्या युगात तरुणांचे दोन प्रकार दिसून येतात.एका बाजूला राष्ट्रप्रेम ,वाचक,विज्ञानवादी ,आपण समाजाचे काय तरी देणं लागतो हा विचार असणारे तर दुसऱ्या बाजूला व्यसन ,वासना, गुंडागिरी, मुलींची छेड काढणे यामध्ये भुरकटलेले दिसतात.यामध्ये दुसऱ्या बाजूच्या तरुणाईचे प्रमाण खूप वाढतच चाललेलं आहे.यावर मात करण्यासाठी आजच्या तरुणांनी विवेकशील राहिले पाहिजे. त्यांच्यातील विवेक जागा झाला पाहिजे.
          युवक हा देशाचा कणा असतो. जर कणाच बरबाद झाला तर देशाचा भविष्यकाळ खूप बिकट आहे.आपण जर इतिहास पहिला तर जगामध्ये ज्या काही क्रांत्या झाल्या ,जी काही परिवर्तने घडून आली ,तर ती फक्त तरुणांच्या संघटीतपणामुळेच. मग आजच्या युवकाने आपण कुठे चाललो आहे,याची त्या तरुणाला जाणीव झाली पाहिजे. प्रत्येक युवकाने आपल्यातील विवेक जागा केला पाहिजे. या 21व्या शतकात बदलत्या जगाचे साक्षीदार होत असताना आपण जातपात आणि द्वेषभाव विसर्जन करून देशकार्य केलं पाहिजे.

डॉ.कौस्तुभ कल्पना विलास,पुणे.
           खरे पहायचे झाल्यास विवेक हा बर्याच गोष्टींवर अवलंबून असतो. विवेक हा माणसाने घेतलेल्या निर्णयातून प्रतिबिंबीत होतो. अगदी लहानपणाच्या संस्कारांपासून ते उपजत ज्या नैसर्गिक प्रेरणा आणि प्रसंग समोर असतो त्यानुसार, तसेच माणूसाची ध्येय्य धोरणे आदी माणसाचे निर्णय (म्हणजेच विवेक) नियंत्रित करत असतात. माणसाला विवेकी तेव्हाच म्हणता येते जेव्हा त्याचे निर्णय हे कर्तव्य, सामाजिक भान, अपेक्षित क्रिया आदींवर योग्य ठरत जातात. एका क्रियेने माणूस विवेकी ठरत नाही. तो त्याच्या व्यक्तीमत्त्वाचा भाग असतो. विवेक हा जोपासावा लागतो. बुद्धीप्रामाण्यवाद अंगी हळूहळू बाणवावा लागतो. स्वतःला विवेकी समजणारे बहुतेकवेळा अविवेकी कृत्ये करून जातात. ज्याचे निर्णय दूरगामी व अल्पगामी दोन्हीकडे निदान दुरगामी तरी स्वतःचा व समाजाचा फायदा करतात किंवा नुकसान करत नाहीत त्याच्या त्या निर्णयांना व त्याला विवेकी म्हणता येईल. माणसाचे मन चंचल असते व चंचल मनामागे धावणारे विवेकी निर्णय घेऊ शकत नाहीत. पण चंचल मन आणि सहृदयता यांत खूप फरक आहे हे मी सहेतूक नमूद करू इच्छितो. चंचल मन हे विषय व गरजा बदलत राहते व विचारांना पर्यायाने माणसाला त्यामागे पळवते. तर सहृदयता हा माणसाचा एक गुण असतो. ज्या कशानेही मन अशांत होते, उद्विग्न वा उत्तेजित होते (व्यसन, राग, कामवासना, दया, प्रेम, भीती, वा काहिही) ते पहिल्यांदा विवेकीपणावर आघात करते. तसेच जे जे तुमच्या तार्किकतेवर आघात करते मग ते काहिही धर्मांधता, आळस वा काहिही ते ते तुम्हाला विवेकीपणापासून दूर नेते. विवेकी असणे हि तारेवरची कसरत आहे. त्यात तारूण्य म्हणजे ऊर्जेचा अखंड प्रवाह, एक प्रकारचा उद्रेक असतो, हार्मोन्स आपल्या अत्युच्च पातळीवर असतात. म्हणूनच आयुष्यातली हिच वेळ जास्त धोकादायक असते अविवेकीपणे काहितरी हातून घडून आपले व इतरांचे आयुष्य उध्वस्त होण्याची शक्यता जास्त असते. अगदी खून, बलात्कार वैगेरे खूप लांबची गोष्ट फक्त मजा म्हणून गाडीचा वेग अनियंत्रित वाढवून अपघातात जीव घालवणारे व घेणारे अविवेकी तरूण आपण पाहतोच. तारूण्य म्हणजे मस्तवाल अश्व धरला तर विवेक म्हणजे लगाम असते, जीचा आदर प्रत्येकाने केलाच पाहिजे. शेवटी जेवढी विवेकशीलता समाजात वाढेल तितका तो समाज परिपुर्ण विकासाकडे मार्गक्रमण करेल यात शंका नाही.

किरण बंडू पवार,औरंगाबाद.
        युवक आणि विवेक हा अत्यंत समर्पक विषयच म्हणावा लागेल. कारण युवक हा विवेक बुद्धी ठेवून चालणारा असावा सोबतच जोड अशी की, त्याची आदर्शसरणी कार्याबाबत ही स्वामी विवेकानंद यांच्यासारखी असावी. स्वामी विवेकानंदांनी जी युवकांची ताकद समाजासमोर उघड केली तिला खरच नवाजावचं लागेल. पण सध्याच्या घडीला महत्त्वाचं आहे ते, युवकांनी विवेकबुद्धी ठेवून आपापल्या ध्येयमार्गांवर चालत राहणं. पण सध्या देशात आपल्या युवकांची एवढी मुबलक क्षमता झाली आहे आणि नेमक्या ऐनवेळी देश विकसनशील वरून विकसीतमधे प्रवेशाच्या मार्गावर जाण्याऐवजी विकसनशीलच्याच यादीतून वगळण्यात आला. डॉ ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या मिशन 2020 ची तर तरूणांना भूल ते जाताच पडली, ह्यापेक्षा दुर्दैव काय म्हणावं? आमच्या तरूणाईला रोजगार हवाय म्हटलं तर सोशल मिडीयावर भारत-पाकीस्तान अशा मुद्द्यांवरून भरकटवलं जातं आणि आमची तरूणाई ही आज प्रलोभनांना बळी पडलेली आहे. त्यामुळे आजच्या युवकाला विवेकाची फार गरज आहे. सध्या एवढ्यावरच थांबतो.

चैतन्यकुमार देवकर,माळशिरस (सोलापूर)
           योग्य आणि अयोग्य काय हे माहिती असणं आणि आपला फायदा असो किवा नुकसान समाज देश आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानवता या गोष्टींना केंद्रस्थानी ठेवून एखादी निवड करणं म्हणजे विवेक .यौवन हा आयुष्याच्या प्रवासातील राजमार्ग असतो विवेकशील असण्याची या काळात खूप गरज असते.एकीकडे मोबाईल व इतर व्यसनांच्या नादी लागून युवकामधील विवेकाचा अंत होताना दिसत आहे .हाताला आणि बुध्दीला  काम नसल्यामुळे झटपट पैसा कमविणे अन् आभासी जगतात वावरणे यातून अस्वस्थता शिवाय घरच्या लोकांनी जाणीव करून दिल्यावर मग विवेक सोडून वाम मार्गाने पैसा कमविणे ,असंगाशी संग धरल्यामुळे खून ,चोऱ्या, बलात्कार असे प्रकार घडत आहेत. मोबाईल हे एक शस्त्र आहे त्याचा वापर आपण कोणत युद्ध लढण्यासाठी करतो हे महत्त्वाचं आहे.तर दुसरीकडे चला विवेकाचा आवाज बुलंद करू म्हणून धडपडणारे युवक देखील आहेत. वाट चुकलेल्या आपल्या मित्र मैत्रिणींना आपण योग्य वाट दाखविली पाहिजे.मी माझ्या २ मित्रांना pubg पासून परावृत्त करू शकलो.अशाच छोट्या गोष्टींनी आपण इप्सिताकडे वाटचाल करून विवेकशील युवकामार्फत देश घडवू शकतो.आपण आता २०२०मध्ये जगत आहोत डॉ अब्दुल कलामांनी पाहिलेल्या स्वप्नांना कुठपर्यंत पूर्ण करू शकलो?? किंवा आपण स्वतः पाहिलेल्या स्वप्नांना कुठपर्यंत पूर्ण करू शकलो याचा विचार व्हायला हवा. आणि युवकांनी विवेकाची कास धरून मार्गक्रमण करायला हवे.

….वि४ व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी चित्रावर क्लिक करा.

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************