कायदा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कायदा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणि त्याचे समाजावरील परिणाम

🌱वि४🌿व्हॉट्सअप ग्रुप

📄 आठवडा 5⃣0⃣वा 📝 

❤🧡💛💚💙💜🖤💗💓💖

🎊🎉🎊🎉🎁🎈🎊🎉🎊🎉🎈


सुवर्ण महोत्सवी आठवडा

🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀

14 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर 2018

💬✍💬✍💬✍💬✍💬✍

  अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणि त्याचे समाजावरील परिणाम


शिरीष उमरे, नवी मुंबई


२१ सप्टेंबर १९९५ गणपती दुध पिण्याची अफवेला तत्कालिन शासनाचे मुख्यमंत्री  महोदयांनी श्रध्दा म्हणुन मान्यता देण्याचा प्रयत्न केला होता. जागतिक अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (स्थापना १९८९) तो हाणुन पाडला तो जागतिक अंधश्रध्दा निर्मुलन दिन मानला जातो.

जागतिक पातळीवरही अब्राहम कोवूरांच्या २२ अंधश्रद्धा आव्हानांपैकी एकही आव्हान एक लाखाचे बक्षीस असतांनाही आजगायत कोणीही स्विकारले नाही.

महाराष्ट्रात समाजसुधारकांचा ४०० हुन जुना इतिहास असतांना समाजकंटकानी श्रध्दा व अंधश्रध्दा ह्यातला फरक सामान्य जनतेच्या लक्षात येऊ दिला नाही.

जागतिक अंधश्रद्धा निर्मूलन समिती मार्फत सोळा वर्षाच्या संघर्षानंतर सरकारने हे विधेयक विधानसभेत मांडले व तिथे ते चौदा वर्षे रखडत राहीले. नंतर नरेंद्र दाभोळकरांच्या निर्घुण हत्येनंतर लोकप्रक्षोभाला घाबरुन काटछाट करुन हे विधेयक पास झाले. ह्या गोष्टीलाही आता पाच वर्षे उलटुन गेलीत.

महाराष्ट्र राज्यात नरबळी व इतर अमानवी, अघोरी प्रथा, जादूटोणा निवारण व उच्चाटन कायदा ज्याला सगळीकडे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा म्हणतात तो २०१३ पासून अस्तित्वात आहे.

आजही या कायद्याबद्दल शासनाकडुन जनजागृतीचे काहीही प्रयत्न केले जात नाही. शालेय शिक्षणात ह्याचा अंतरभाव नाही. पोलीस यंत्रणेलाही याची पुर्ण माहीती नाही. त्यांच्या अधिकाराची त्यांना जाणीव नाही. शासनाकडुन त्यांच्या नियुक्त्या नाहीत. राजरोसपणे ह्या कायद्याच्या चिंधड्या फाडणे सुरु आहे.

जोपर्यंत आपण नागरिक जागृत होऊन एकत्र संघर्ष करत नाही तोपर्यंत ह्या कायद्याची अंमलबजावणी शासन करणार नाही.

जागृतीसाठी वाचाल तर वाचाल!!

नरेंद्र अच्युत दाभोलकर
मराठी  विज्ञानवादी व समाजसुधारक ह्यांचे साहित्य

वाचा
१)पुस्तक: समता-संगर
२) पुस्तकः ठरलं...डोळस व्हायचंच!
३) पुस्तक: प्रश्न तुमचा, उत्तर दाभोलकरांचे
(संकलनः संदेश बालगुडे)
४) अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम
५) अंधश्रद्धा विनाशाय
६) तिमिरातुनी तेजाकडे
७) श्रद्धा-अंधश्रद्धा
८) भ्रम आणि निरास
९) विचार तर कराल?
१०) प्रश्न मनाचे (सहलेखक डॉ हमीद दाभोलकर)
११) मती भानामती (सहलेखक माधव बावगे)
१२) ऐसे कैसे झाले भोंदू
१३) ठरलं... डोळस व्हायचंय
१४) विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी
१५) झपाटले ते जाणतेपण - सहसंपादक विनोद शिरसाठ
बघा:
 ज्याचा त्याचा प्रश्न (अंधश्रद्धा या विषयावरील नाटक - लेखक : अभिराम भडकमकर). या नाटकाचे ४५०+ प्रयोग
ऐका
दाभोलकरांच्या दहा भाषणांची सी.डी.- प्रश्न तुमचे उत्तर दाभोलकरांचे - डी.व्ही.डी, निर्माते - मॅग्नम ओपस कंपनी.
==============================

संगीता देशमुख,वसमत 


धर्माच्या व परंपरेच्या नावाखाली युगायुगांपासून  समाजात सामान्य लोकांची आर्थिक,शारीरिक,मानसिक,सामाजिक पिळवणूक ही अत्यंत मोठ्या प्रमाणात होत होती आणि खरेतर ती आजही आहे. याच गर्तेतून सामान्य लोकांना बाहेर काढण्यासाठी
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील अंधश्रद्धा निर्मूलनासाठी घातले. त्यासाठी त्यांना बलिदानही करावे लागले. त्यांच्याच अखंड प्रयत्नांचा विचार करून राज्य सरकारला डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या बलिदानानंतर का होईना पण २०१३ मध्येअंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा करावा लागला. हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर दाभोळकरसमर्थकांना बरचसं समाधान झाले होते. पण आजवर आपल्या देशात असे अनेक कायदे अस्तित्वात आहेत परंतु त्याची अमलबजावणी मात्र शून्य आहे.म्हणून जोवर भारतीय लोकांची मानसिकता बदलत नाही,तोवर कोणतेही कायदे करून उपयोग होणार नाही. याचा अर्थ असा नाही,की असे कायदेच अस्तित्वात आणण्याची गरज नाही. पण जेव्हा कायदे अस्तित्वात येतात तेव्हा अशा कायद्याबाबतची जागरूकता निर्माण करण्याची अपेक्षा  समाजातील सूज्ञ लोकांकडून आहे. आपल्या राज्याचे म्हणा किंवा देशाचे दुर्दैव म्हणा,परंतु ज्यांच्या हातात देशाचे सूत्र आहेत,तेच लोक अशा अंधश्रद्धाचा अवलंब आणि  प्रसार करतात. मग कायदाउल्लंघनाची कारवाई कोणावर करायची आणि देशातील सामान्य लोकांनी अनुकरण कोणाचे करावे? त्यामुळे डॉ. दाभोळकरांच्या बलिदानानंतरही,कायदे अस्तित्वात येऊनही याबाबतीत सुधारणा दिसून येत नाही. सामान्य लोकांचे प्रबोधन व्हावे,त्यांना अज्ञानातून बाहेर काढण्याच्या ऐवजी देशात कट्टर धार्मिकतेच्या नावावर जास्त फूट पाडण्याचे आणि अंधश्रद्धा रुजविण्याचे काम लोकप्रतिनिधींकडूनच सातत्याने होत आहे. डॉ. दाभोळकरांचे बलिदान व्यर्थ जाऊ द्यायचे नाही,असे जर काही सूज्ञाना वाटत असेल तर सामान्य लोकांना या कायद्याबाबत जागरूकता आणि अंधश्रद्धेच्याबाबत प्रबोधन करून बाहेर काढणे,ही काळाची गरज आहे. अन्यथा असे कित्येक कायदे विनाअमलबजावणीविना  कागदोपत्री अस्तित्वात आहेत.  जर त्याची नोंदच होत नसेल तर या कायद्याचे समाजात चांगले परिणाम दिसून येणार नाहीत.
==============================

किशोर शेळके. लोणंद. जि. सातारा



    अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्वेसर्वा डाॅ. नरेंद्र दाभोळकर यांच्या अथक प्रयत्नानंतर महाराष्ट्र शासनाने २०१३ ला अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आमलात आणला. अर्थातच हा कायदा धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करीत असल्याने त्याची अंमलबजावणी करणे जरा अवघड काम आहे. पण समाजहितासाठी या कायद्याची अंमलबजावणी करणे खुप गरजेचे आहे.

    या कायद्यामध्ये हिंदू परंपरेतील नेमक्या कोणत्या अंधश्रद्धा समाविष्ट करायच्या यात बरीच मत-मतांतरे झाली. महाराष्ट्रात भरपूर पाऊस पडावा म्हणून पंढरपूरच्या विठ्ठलाची आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी महापूजा पासून ते लिंबाला चहूबाजूनी टाचण्या टोचून केलेल्या करणी पर्यंत सर्वच गोष्टींची चर्चा होऊ लागली. कारण दाभोळकरांच्या विचारसरणीचा महाराष्ट्र घडविणे म्हणजे झाडावरून आंबा तोडण्याएवढं सोप्पं काम मुळीच नाही. आणि याचं कारण ही तसंच आहे. राज्याचा प्रथम नागरिक जर या गोष्टीला खतपाणी घालत असेल तर अंधश्रद्धा मुक्त महाराष्ट्र हे दाभोळकरांचं स्वप्न स्वप्नच राहणार ना?.

     महाराष्ट्र राज्य शिक्षणाच्या बाबतीत चांगलेच सक्षम झालेले पहायला मिळतेय. अशिक्षीत वर्ग कमी होऊन शिक्षित वर्ग थोड्याफार प्रमाणात का होईना पण वाढलाय. आणि तरीही अंधश्रद्धा कमी होत नसेल तर यासारखं मोठं दुर्दैव नाही.

     एखाद्या स्वयंघोषीत भोंदूबाबाच्या आश्रमासमोर एखादी मर्सिडीस सारखी गाडी उभी दिसली ना, तर माझी तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहत नाही. आपल्याला चांगलं माहीत असतं की चमत्कार हे विज्ञानाचे अविष्कार आहेत आणि कोणत्याही आजाराचे निदान डाॅक्टरच करू शकतो. हे माहित असूनही आपला सुशिक्षित वर्ग काय विचार करून इथं नतमस्तक होतो, ते त्यांनाच ठाऊक.

        डाॅ. नरेंद्र दाभोळकर यांच्या पाठपुराव्याने त्यांच्या मृत्यू पश्चात का होईना पण या कायद्याची निर्मिती झाली. पण या कायद्या अंतर्गत कारवाई किती जणांवर झाली हे विचारले तर ही संख्या अगदी बोटावर मोजता येईल इतकीच भरेल. पोलिस यंत्रणेतील पोलिस निरीक्षकांच्या वरच्या हुद्यावरील सर्वच अधिकारी नुसत्या संशयावरून ही कारवाई करू शकतात, पण आजपर्यंत त्यांचा नाईलाज माझ्यातरी लक्षात आला नाही.

     महाराष्ट्रातील अनेक देवस्थानांचा विचार केला तर अंधश्रद्धेला पूर येण्याचं उगमस्थान हेच. आणि गरीबीने होरपळणारा समाज, अख्ख्या देशाचे बजेट पुर्ण करू शकेल एवढा पैसा दरवर्षी या मंदिरात देतो, आणि स्वतःला आत्मिक समाधान लाभल्याचं ढोंग आणून पूढील पाप करण्यासाठी मोकळा होतो. शिक्षण, विज्ञानवाद, सतसदविवेकबुद्धी किंवा विवेकवाद या गोष्टी मानवी विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. आज या सर्व गोष्टी माणसाकडे आहेत, पण या गोष्टींचा योग्यवेळी व योग्य ठिकाणी वापर केला जात नाही.

     माझ्या मते, अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी कायद्याची वाट बघण्यापेक्षा समाजाने जागृत होणे गरजेचे आहे, तरच दाभोळकरांसारख्या विचारवंतांचे बलिदान सार्थकी लागेल.
==============================

शीतल शिंदे - दहिवडी


   अंधश्रद्धा म्हणजे समाजाला लागलेली कीड , अंधश्रधा म्हणजे समाजाला लागलेली वाळवी .ही वाळवी आपल्याला कधी खावून टाकते म्हणजे दारीद्र्याकडे नेते आणी उध्वस्त करते ते कळतही नाही .
          शिवरायांनी त्यांच्या काळात हया गोष्टींचा कधीही महत्व दिले नाही .कारण त्यांचे गुरु संत तुकाराम ह्यांच्या विचारांवर ते चालत होते .त्यांनी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी  कोणतेही होम , हवन , मंत्र , तंत्र पूजा पाठ , विधी केले नाहीत .शिवरायांनी बरेच गड किल्ले अमव्शेच्या रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवून जिंकले .त्यांनी कधी कोणत्याच किल्ल्याला काळी बाहुली , लींबु मिरची बांधली नाही .आपल्या राजाने नाही मग आपण का ?🤔 हा प्रश्न नाही का पडत ह्या रयतेला . ज्या रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी या राजानी आपले प्राणांचे बलिदान दिले .
    शिवरायांच्या साम्राज्यानंतर ह्या देशात स्वतःचे अस्तित्व राखण्यासाठी ह्या भोळ्याभाबड्या जनतेवर अंधश्रद्धेचे जाळे पसरवले गेले ते अजून काही निघालेच नाही .
          आज विजया दशमी दिन  याच दिवशी सम्पूर्ण जगामधे पसरलेल्या बौद्ध धर्माचा स्वीकार करणारा राजा सम्राट अशोक यांनी आपले हातातील शस्त्र खाली ठेवून जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या बौध्द धम्माचा स्वीकार केला की जो
विज्ञाननावर आधारित आहे जेथे अंधश्रध्दा नसून  समता , करुणा , प्रज्ञा आहे. म्हणून हा दिवस विजया दशमी दिन म्हणून साजरा केला जातो . जगातील पहिला समाजकार्य करणारा राजा , युद्ध नको तर (शांती  ) बुद्ध हवा म्हणणारा आणी जगाला शांतीचा संदेश देणारा असा राजा होता .
       यांचे विचारांचे आचरण करणारे संत तुकाराम , शिवराय , राजे संभाजी , ह्याच विचारांचा वारसा पुढे चालवणारे,  ह्या समाज सुधारकांना सुद्धा प्राणांचे बलिदान द्यावे लागले .
    ह्या  समाजाला अंधश्रेतून बाहेर काढानारे दाभोळकर ह्यांना सुद्धा आपले प्राण गमवावे लागले. 
   भारतीय संस्क्रुतीच्या  नावाखाली आपल्या समाजावर लादलेली अंधश्रद्धा ह्या समाजातील ऊच्य शिक्षित तरुणांनी मोडून काढल्या शिवाय समाप्ती होणार नाही .प्रत्येक तरुणाने आपल्या घरात कोणत्याही प्रकारचे अंधविश्वासू , कुकर्म  , पूजा पाठ , जप तप , मंत्र होम हवन , प्राण्यांचे बलिदान , ह्या प्रतांना कडाडून विरोध केला पहिजे .तरच ह्या दरिद्र्याकडे नेणाऱ्या,  बुद्धीला गंज लावणाऱ्या आणी आशीर्वादाने मिळणाऱ्या गोष्टींकडे आशा लावून बसविन्यास भाग पाडणाऱ्या आशा थोतांड गोष्टींना  लाथाडुण  लावले पाहिजे तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने स्वावलंबी होवू .

खरेतर अंधश्रद्धेचे  ग्रहण लावलेल्या या देशाला,
             भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला 26 जानेवारी 1949 रोजीच अंध श्रद्धा मुक्त केले आहे . हे सम्पूर्ण जगाला मान्य आहे फक्त भारतात राहानाऱ्या लोकांना हे मान्य करू दिले नाही काही समाज
कंठकानीं !
        ज्या दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी  या भारत देशाला संविधान रुपी अनमोल ग्रंथ बहाल केला त्याच दिवसापासून भारतामध्ये, , , , 😁😁🤔🤔
   स्वर्गामधूण देवांची येणे जाणे बंदच झाले .त्याआधी सर्व देवी-  देवता स्वर्गामधून मुक्त पणे प्रुथ्वी वर मुक्तपणे संचार करत होते .आता काय टेक्स पडतो काय त्यांना ? 🤔

देवांचे प्रुथ्वीवर अवतार घेणेपण बंद झाले आणी समुद्र मंथन पण बंद झाले की हो ! जटा तून नदी वाहने बंद झाले , मळा पासून नवीन जीव तयार करने बंद झाले पाण्यावर तरंगणारे पूल पण कोण आता बंधू शकत नाही का बरे 🤔 हे व्हायला पहिजे ना आता , मग  का नाही .
आता काही कोण वरदान , शाप देत नाही .आणी आता पहिल्यासारखे देव दानव यांचे हवेतून युद्ध पण होत नाही किंवा प्रुथ्वी निशस्त्र  करणारे शूरवीर पण जन्माला आले नाहीत .
   काय जादू केली बाबासाहेबांनी जादू नाही केली  रात्रं दिवस अभ्यास करून आपले सर्व आयुष्य ह्या जनतेच्या सुखासाठी  संविधानाच्या माध्यमातून सर्वांना स्वातंत्र्य  हक्क ,  अधिकार  आणी सर्वस्व बुद्धी बहाल केली आहे,  आपण फक्त त्याचा वापर करायचा आहे .
  त्याच्याही पलीकडे जावून बाबासाहेबांनी 14 अक्टोम्बर 1956 रोजी  सम्पूर्ण मानव जातीला
तारनाऱ्या आशा बौध्द धर्माचा स्वीकार केला .त्याचे कारण हेच की हा एकच धर्म असा आहे की तो या बहुजन समाजाला या अंधश्रद्धेतून , दारिद्र्यातून , दुखः तून , गलिच्छ विचारातून आणी गुलामगिरीतून बाहेर काढन्याचा एकच पर्याय आहे म्हणून .       

बाबासाहेब त्यावेळी म्हणाले होते की हा धर्म काही साधा सुधा धर्म नाही ,  समाजाला ह्या  धर्माचे ,   तत्वाचे म्हणजे पालन करने फार अवघड जाईल परंतु माझ्या पुढे दुसरा कोणता मार्ग नाही की तो या भाबड्या समाजाला बाहेर काढेल , समानतेची वागणूक देईल , स्त्रियांचे शोषण थाम्बवेल  .ते म्हणाले

 हळूहळू होईल पालन - कारण मला ह्या शिवाय कोणताहि मार्ग मला  दिसत नाही .
मात्र काही समाज कंठकानीं बौध्द धर्म म्हणजे अमुक तमुक जातीचा असे सांगत वाईट प्रचार केला .

बाबासाहेबांनी हा धर्म का स्वीकारला ते त्यांनी स्वतः  लिहिलेल्या
 "बुद्ध आणी त्यांचा धम्म "
ह्या पुस्तकात त्यांचे विचार सविस्तर मांडलेले आहेत .हे पुस्तक सर्वांनी अवश्य वाचा .

ज्या दिवशी भारतामध्ये प्रत्येक घरा घरात संविधानाचे पाठ वाचले जातील , महापुरुषांच्या कार्याचे  धडे शिकवले जातील त्या दिवसापासून सम्पूर्ण भारतातील प्रत्येक घरातील प्रत्येक मूल
विज्ञानवादि  , अंध श्रद्धा मुक्त आणी  शास्त्रज्ञ होतील .
"जय भारत जय अंधश्रद्धा मुक्त संविधान "
==============================

निखिल खोडे, ठाणे


            आंधळेपणाने एखादी गोष्ट स्वीकारणे म्हणजे अंधश्रद्धा होय. अंधश्रध्दे मध्ये विविध प्रकार येतात उदाहरण. जादुटोणा, बुवाबाजी, भूत- पिशाच्च, अंगात भूत येणे, तंत्र- मंत्र, नरबळी, अफवा पसरविणे इत्यादी असतात. २०१३ मध्ये डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या प्रयत्नानंतर महाराष्ट्र सरकारने अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अमलात आणला. परंतु त्याची अंबलबजावणी खऱ्या अर्थाने होते का आणि  जास्त करून ग्रामीण भागात कायद्याची माहीती तरी आहे का? याला कारणीभूत ठरते तो म्हणजे खेड्यातल्या लोकांमधील अशिक्षितपणा आणि बुवाबाजी करणारे संधीसाधू लोक जे गरीब लोकांना देवाचा शाप बसेल वैगरे म्हणून लुबाडत असतात.
  
                उदाहरण म्हणून सांगतोय की  माझ्या गावाजवळून ५ किमी अंतरावर आजणसरा नावाचे गाव आहे. भोजाजी महाराज नावाचे देवस्थान आहे. त्याठिकाणी नवस फेडण्यासाठी वेगवेगळ्या गावावरून आलेले लोक  तिथे येऊन स्वयंपाक करतात. रविवारी आणि बुधवारी जवळपास १०० क्विंटल डाळीचे पुरण पोळ्या बनविल्या जातात. भक्तीच्या नावाखाली अन्नाची नासाडी ही खूप मोठ्या प्रमाणात होते. आणखी एक उदाहरण म्हणजे गिरड म्हणून एक गाव आहे, ज्यांचे कुलदैवत बुवाफरिद आहे ते लोक घरचा कोणताही आनंदाचा प्रसंग उदा. लग्न वैगरे असेल तर त्याआधी गिरडला जाऊन तलावाच्या ठिकाणी बोकडाचा किंव्हा कोंबडीचा बळी दिला जातो. यामुळे तलाव मध्ये प्रदूषण  खुप मोठ्या प्रमाणात होते. या प्रकाराला काय म्हणाव?

                   ढोंगी लोकांमुळे, अशिक्षितपणा मुळे, जुन्या परंपरेमुळे अंधश्रद्धेचे प्रमाण वाढले आहे. याला जबाबदार लोकांमधील काही गोष्टीबद्दल चा अज्ञानपणा आहे. टेलिव्हिजन वरील मलिका, बातम्या व इतर दाखविले जाणारे कार्यक्रम सुध्दा याला जबाबदार आहे परंतु त्यांना मिळणारा पैसा हा मोठ्या रकमेत असतो आणि लोकांची पसंती अश्याच कार्यक्रमाला जास्त असते त्यामुळे करमणुकीच्या नावाखाली अंधश्रध्दा फैलवणे चालु आहे. हे बंद व्हायला पाहीजे. ह्या उलट ह्या कायद्याचे जास्त प्रसार व प्रचार व्हायला हवा....
==============================

IMAGE SOURCE INTERNET

कलम 377...(समलिंगी कायदा) किती गरजेचा?

कलम 377...(समलिंगी कायदा) किती गरजेचा?



डॉ विजयसिंह पाटील ,  कराड

      समलिंगी ही काय फक्त आत्ताच्या आधुनिक समाजाची समस्या आहे असं नाही. अगदी प्राचीन काळापासून जगभरात ही समस्या अस्तित्वात आहे. किती तरी भारतीय ग्रंथात, ह्या बद्दल माहिती आहे. विशेषतः वात्सयांन लिखित कामसूत्र ग्रंथात, समलैंगिक संबंध यावर खुली चर्चा केली आहे. शिवाय खजुराहो येथील शिल्पं हेच दर्शवतात. एव्हढ असूनही भारतीय समाजाने सम लैंगिकता कधीच स्वीकारली नाही.(म्हणूनच मनुस्मृती ग्रंथात सम लैंगिकता हा मोठा अपराध मानला गेला होता).
        निसर्गनियमांविरोधात जाऊन कोणत्याही पुरुष, स्त्री किंवा प्राण्याबरोबर संभोग करणे' अशी या गुन्ह्याची व्याख्या करण्यात आली आहे. 
          "तुमच्या खाजगी आयुष्यात तुम्ही समलैंगिक असणं हा गुन्हा नाही. पण तुमच्या समलैंगिक इच्छा जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात आणू पाहता तेव्हा कायद्याच्या दृष्टीने तो गुन्हा ठरतो.
          सम लैंगिक संभोग म्हणजे ज्या संभोगातून प्रजनन होणार नाही असा संभोग. प्राचीन काळापासून संभोग हा फक्त प्रजननासाठीच केला पाहिजे, अशी धारणा होती. त्यामुळे साहजिकच , लेस्बियन,(स्त्री-स्त्री),  गे( पुरुष-पुरुष), बायसेक्शूअल ( दोन्ही प्रकारचे संबंध) हे अनैसर्गिक मानले गेले आहेत.

भारतात अंदाजे 0.2 टक्के समाज, समलैंगिक  आहे.

समलैंगिकतेला, अनेक बाजू आहेत.
1-- व्यक्ती सापेक्ष, त्या त्या व्यक्तीची आवड, आकर्षण, लैंगिक कल हा वेगळा असू शकतो. ती व्यक्ती तीन फेजेस मधून जाते, त्याला 'CONING OUT OF THE NEST' घरट्यातून बाहेर येणे म्हणतात

घरट्यातून बाहेर येणं...
ही पाश्चात्त्य कल्पना आहे. ह्या कल्पनेनुसार, एखाद्या व्यक्तीने आपलं सम लैंगिकता जाहीर करणे. ह्याचा तीन पायऱ्या आहेत, पहिली, स्वतः ला जाणीव होणे, दुसरी, ह्याबाबत कुटुंबातील सदस्यांना कल्पना देणे व तिसरी- समाजात उघड पणे जाहीर करणे,( एकत्र रहाणे ई.)
2--सामाजिक,,,, जे जे अनैसर्गिक ते ते अनैतिक..हे सामाजिक चेहरा असतो
3--कायदेशीर,,समाजाचे विचार कायद्याच्या चौकटीत घालून केलेली संहिता
4-- धार्मिक.. सर्व धर्मांचा कट्टर विरोध आहे.
5-- वैद्यकीय बाजू,,, आपण समलिंगी आहोत असं जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या पालकांना सांगते तेव्हा अनेकदा असं घडतं की ते त्या व्यक्तीला डॉक्टरांकडे किंवा मानसोपचारतज्ज्ञांकडे घेऊन जातात, पण हा मानसिक आजार नाही, अशी भूमिका भारतातल्या मानसोपचार तज्ज्ञांच्या सर्वोच्च संस्थेनं स्पष्ट केली आहे.

      "समलैंगिकता हा आजार नाही. इथून पुढे Indian Psychiatric Society त्याला आजार मानणार नाही," असं सांगत, मानसोपचार तज्ज्ञांच्या भारतातल्या सर्वोच्च संस्थेने एक मोठं पाऊल उचललं आहे.
           
जगातील सध्याच चित्र ।।।
    संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार संस्थेच्या आकडेवारीनुसार जगातल्या 76पेक्षा अधिक देशांमध्ये समलैंगिकतेला गुन्हेगारी दर्जा देणारे, त्यांच्याविरुद्ध भेदभाव करणारे कायदे अस्तित्वात आहेत. संयुक्त राष्ट्रांनी समलिंगी लोकांच्या अधिकारांसाठी फ्री अँड इक्वल हे कँपेन चालवलं आहे. जगातले पाच देशांमध्ये आजही समलिंगी वर्तनाची सर्वाधिक शिक्षा मृत्युदंड आहे.
    ब्रिटीश वसाहत असताना ज्या देशांमध्ये समलैंगिकतेला गुन्हेगारी दर्जा देणारे कायदे केले गेले आणि त्यांपैकी ज्या देशांमध्ये ते आजही अस्तित्वात आहेत त्या देशांची एप्रिल महिन्यात ब्रिटीश पंतप्रधान थेरेसा मे यांनी माफी मागितली होती.
     कॉमनवेल्थ देशांच्या नेत्यांच्या बैठकीत लंडनमध्ये बोलताना, मे या कायद्याविषयी म्हणाल्या, "ते कायदे तेव्हाही चुकीचे होते आणि आताही चुकीचेच आहेत."
        "कोणी कोणावर प्रेम करावं, कोणी कसं असावं यावरून कोणताही भेदभाव केला जाऊ नये आणि कोणाचाही छळही होऊ नये," असं मे यांनी कॉमनवेल्थ नेत्यांच्या संमेलनात स्पष्ट केलं. 
        "ज्या कॉमनवेल्थ देशांना हे कालबाह्य कायदे सुधारायचे आहेत त्यांना सहकार्य करण्यास ब्रिटन तयार आहे,"असंही मे यांनी स्पष्ट केलं.
कायदेशीर बाजू..

कायदा कलम 377....
कलम ३७७ नेमके काय ?

लॉर्ड मॅकॉडले यांनी भारतीय दंड संहिता १८६० साली तयार केली. या संहितेवर अर्थातच ब्रिटिश कायद्यांची छाप होती. आयपीसीतील कलम ३७७ नुसार ‘अनैसर्गिक संभोग’ हा गुन्हा ठरतो. या कलमाअंतर्गत दोषी ठरल्यास १० वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंड अशी तरतूद आहे.

दिल्ली हायकोर्टाने २ जुलै २००९ मध्ये ऐतिहासिक निकाल दिला होता. दिल्ली हायकोर्टाने समाजसेवी संघटनांची याचिका मान्य करत समलिंगी प्रौढांमध्ये संमतीने असलेले संबंध कायदेशीर ठरवले होते
समलिंगी संबंधांना मान्यता दिली तर समाज रसातळाला जाईल, असे धार्मिक संघटनांचे म्हणणे होते.व त्याप्रमाणे त्यांनी याचिका ही दाखल केली.

सुप्रीम कोर्टाने समलिंगी संबंधांना वैध  ठरवणारा दिल्ली हायकोर्टाचा निर्णय रद्दबातल ठरवला होता. ३७७ हे कलम काढून टाकण्याचे अधिकार संसदेचे आहे, असे कोर्टाने स्पष्ट करत कलम ३७७ चा चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात टाकला होता..

2017 साली सुप्रीम कोर्टाने खाजगीपणाच्या अधिकाराच्या सुनावणीदरम्यान असं मत व्यक्त केलं होतं की "लैंगिक कल हे
 खाजगीपणाच्या अधिकाराचा आवश्यक भाग आहेत." कोर्टाने 
असंही म्हटलं होतं की, "लैंगिक कलांच्या आधारावर भेदभाव करणं हा व्यक्तीच्या आत्मसन्मानाचा अपमान आहे."

समलैंगिक संबंधांना विरोध असणाऱ्यांचे दावे..
1,,, सामाजिक विकृती वाढत जाईल ...हल्लीच्या फास्ट युगात युवा वर्ग, live in relationship, सम लैंगिक प्रेम ह्यात हळू हळू का होईना गुरफटत चालला आहे, व हे प्रमाण अधिक वाढेल ह्याची भीती व त्यामुळे विरोध
2,,अनैसर्गिक आहे, 
3,, धर्मविरोधी , जिथे जिथे धर्माची वाढ नाही व (मुलं न होणे हे बहुतांशी धर्माना पसंद नाही.
4,,भारतीय संस्कृतीला घातक
5,,, रॅगिंग मध्ये वाढ होईल
इत्यादी...

शेवटी...
1,,,समलिंगी संबंधांना गुन्हेगारी चौकटीत बसवणं चूक आहे
2,,,  "सेक्शन 377वर असलेला गुन्हेगारीचा शिक्का पुसणं ही पहिली पायरी असायला हवी

3,,,  त्यापाठोपाठ समलैंगिकतेचा पॅथॉलॉजीशी म्हणजे रोगनिदानशास्त्राशी संबंध नाही हे ही लोकांना पटवून द्यायला हवं."





अनिल गोडबोले,सोलापूर.

         समलिंगी संबंध हे आपल्याकडे नैसर्गिक व प्रस्थापित मानले जात नाहीत.. त्याला लोकांची मानसिकता आणि कलम 377 जबाबदार आहे.
     कायदे करण्यात आले तेव्हाची परिस्थिती आणि मानसिकता आता जगात कुठेही नाही जी भारतात आहे.. 
आपल्याकडे एकतर विरोधाला विरोध होतो किंवा आपण प्रत्येक गोष्ट "प्रोडकटीव्ह" आहे का.. एवढंच पाहतो..
            या पेक्षा गंभीर प्रश्न असा आहे की लैंगिकता ही प्रत्येक व्यक्तीची भूमिका आहे... त्यात अनैसर्गिक काहीच नाही.. 
        (मुलगा लग्न झाल्यावर सुधारेल म्हणून लग्न करून देण्या मागे हीच भूमिका आहे.)
आणि विकृती नाही.. प्राणी देखील समलिंगी संबंध करतात..

कायदा बदलण्यात एवढा इंटरेस्ट का?
       कारण भावनिकते तुन न्याय मिळत नाही.. आणि केवळ एखादा समलिंगी किंवा 'तृतीय पंथी' आहे म्हणून त्याला पोलीस अटक करू शकत नाहीत. त्याला कोणी सम्पती मधून बेदखल करू नये आणि तो देखील एक माणूस आहे हे कोणी विसरू नये म्हणून.. 
       समलिंगी, तृतीयपंथी, लेस्बियन, बाय सेक्सयूएल या बद्दल आपण कधी उघडपणे चर्चा करत नाही..
आई वडील मान्य करत नाहीत अशा व्यक्तींना..
       वाळीत टाकणे हे मानवाधिकार विरुद्ध असून हा एक सामाजिक बहिष्कार टाकला जातो तो बंद करण्याची लढाई म्हणून 377 कलमात बदल करणे गरजेचे आहे


( Note :All images are taken from internet.)

इच्छा मरण कायदा : प्रगत मानवाची गरज की अधोगती



🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

इच्छामरण कायदा : प्रगत मानवाची गरज की अधोगती


Source:-INTERNET
-ओंकार क्षीरसागर,
श्रीरामपूर

    खरतर हा कायदा खरच आपण पारीत करावा याची आजच्या धावत्या युगात जरा जास्तीच गरज भासू लागलीये असच हॉस्पिटल कडे बघून वाटू लागलंय.
कारण आजकालची वाढती आर्थिक लाचारी वाढते आजार आणि त्यातून बाहेर येणाऱ्या कमी वाटा आणि त्यात आर्थिक संकट हे आता डोळ्यांनासुद्धा न सोसणारे होत चाललंय.

मागच्या वर्षात tv वर एक बातमी बघितली सरकारी अधिकारी होते कोणीतरी त्यांना काय आजार झाला होता माहीत नाही पण दिवसांगणिक त्याच्या त्रिव्रता आणि आर्थिक चणचण वाढतच गेली आणि शेवटी त्यानं घरी हलवण्यात आलं कारण त्या कुटूंबियाकडे तेवढंच उरलं होत हक्काचं अस काही. त्यामुळे त्यांना घरी हलवण्यात आलं त्यांची न जगण्याची ईच्छा बघून हे साफ जाणवत होतं की त्यांना कुटुंबियांची फरफड दिसत होती त्यामुळे त्यांनी बऱ्याच शिफारशी वगैरे वगैरे पण केल्या की मला *स्वईच्छा मरण* वगैरे वगैरे त्याचं पुढे काय झालं कुठेच खबर नाही त्यांचा पुण्यात शोध घेतला सापडले नाही. असो जर एका सरकारी अधिकारी असलेल्या मनुष्यावर असली वेळ येत असेल आम्ही तुम्ही कुठे आहोत याचा विचार करणे आज गरजेचे झाले आहे असे नाही का वाटतं तुम्हाला?


मुळात काय तर चांगलं भाजीपाला फळे मिळत नाहीच त्यामुळे आजार आणि परिस्थिती नसणे खूप वाईट होऊन बसते मग त्यामुळे मला अस वाटतं तीळतीळ मारण्यापेक्षा एकदाचं काय ते *ईच्छा मरण* येऊन जावे आणि त्या  देहातील काही अवयव दान करावे असं केलं तर काही वावडं ठरणार नाही असं मला वाटतं.
पण मग याचा पण गैरफायदा उठवला जाऊ शकतो बाकी गोष्टींसारखा मग त्या साठी प्रतिबंधात्मक उपययोजना असाव्यात जसे की एखादी समिती करावी. त्या जो कोणी व्यक्ती असेल त्या कडून नोटरी करून घ्यावी त्यावर साक्षीदार घरचे असावेत म्हणजे भविष्यात जर त्याचे घरचे काही objection घेत असतील तर सबळ पुरावे असायला हवे ना.

मूळ म्हणजे मला वाटतं आपण या गोष्टीचा मुळाशी जाणं गरजेच आहे चांगलं खाणं (अर्थत ते भेटलंच तर भाग्यच म्हणावं) योग्य व्यायाम चालणे फिरणं राहणं शारीरिक स्वच्छता नानाविविध गोष्टींचा अभ्यास करून आपण स्वतःवर विजय किंवा अस म्हणता येईल प्रकृतीवर विजय मिळवण्यास यशस्वी ठरू.

शेवटी एवढंच सांगेन की *ईच्छा मरण* कायदा असावाच अस मला तरी मनापासून वाटतयं कारण परिस्थिती असहाय्य आणि दिवसांगणिक हतबल होत चालली आहे.

Source :- INTERNET
-जयंत जाधव,
लातूर

    जगातील अंतिम सत्य कोणते?त्याचे उत्तर मरण होय जीवनाचे अंतिम सत्य आहे.मरण कोणालाही नको असते.पण जो जीव जन्माला आला तो एक दिवस नष्ट होणारच आहे.
   "कळावे त्यालाही कसे असते जगणे क्षणाक्षणाला तिळतिळ मरणे  मुक्ती जीवनातून मिळेल की नाही मरणाला माझ्या न्याय मिळेल की नाही "
इच्छा मरण म्हणजे जेव्हा एखाद्या असाध्य आजारातून आणि त्याच्या त्रासातून मुक्ती मिळवण्याचा मृत्यू हाच एक उपाय उरतो तेव्हा रुग्णास त्याच्या इच्छे प्रमाणे मृत्यू देणे. असं करणारे आपल्या इच्छेने आपलं जीवन संपवतात. 'इच्छा मरण' ह्याला इंग्रजी मध्ये 'युथनेशिया' euthanasia  असे  म्हणतात.भारतात इच्छा मरणाला कायदेशीर मान्यता नाही .सर्वोच्च न्यायालयाने अलिकडेच इच्छा मरणावर केंद्र आणि सर्व राज्य सरकारांना नोटीसा पाठवून मत मागितले आहे.  जगात अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढयाच देशात स्वित्झर्लंड, जपान, जर्मनी, अमेरिका या देशांमध्ये इच्छामरणाला कायदेशीर मान्यता मिळालेली आहे.
विषय हा आहे इच्छा मरण कायदा: प्रगत मानवाची गरज की अधोगती. माझ्या मते इच्छामरण ही प्रगत मानवाची गरज ठरलेली आहे.मी स्पष्ट पणे इच्छामरणाचा अधिकार असावा ह्या मताचा आहे.विज्ञानाच्या मदतीने मानव मरणाला लांबवू शकतो पण त्याच्या वर विजय मिळवू शकलेला नाही.ते शक्य पण नाही.निसर्गाच्या कार्यात मानवाने लुडबूड करु नये व शेवटीच जरी मानव मरणाला जिंकू शकला तो दिवस ह्या जगाचा शेवट ठरेल.
मी स्पष्ट पणे इच्छामरणाचा अधिकार असावा ह्या मताचा आहे.त्यासाठी पुढील उदाहरण महत्त्वाचे ठरते.मुंबईच्या रुग्णालयातील अरुणा शानबाग परिचारिकेवर बलात्कार करण्यात आला आणि 37 वर्षांपासून ती कोमात होती. तसेच रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकाच तिची सेवा करत होत्या.अशा  प्रकरणांमध्ये इच्छा मरण वैध मानले पाहिजे.यावर न्यायालयात व बाहेरच्या जगात  बराच वादविवाद झाला पण ठोस निर्णय झालाच नाही.शेवटी ईश्वरानेच दया करुन त्यांना नैसर्गिक मरण दिले.
दुसऱ्या एका प्रकरणात  (संदर्भ-प्रविण तांबे) एक जेष्ठ वृद्ध आजोबा  वय वर्षे ९० हे गेली दोन वर्षांहून जास्त काळ अंथरुणावर पडून आहेत.त्यांनी आयुष्य अगदी समाधानकारक जगले आहे व यापुढे त्यांना जगण्याची इच्छा नाही.आत्महत्या  त्यांना मान्य नाही.त्यांना मरण हवे आहे  पण कायदेशीर.जीवनात त्यांनी कायद्याला खूप महत्त्वाचे स्थान दिले.अशा वेळी इच्छामरणाचा अधिकार असावाच.
इच्छामरण देण्याचा कायदा अवश्य करा परंतु कुटुंबातील व्यक्तींच्या परवानगीसह अनेक कायदेशीर बाजू लक्षात घ्याव्यात.भारतामध्ये अनेक वृद्ध त्यांची शारीरिक क्षमता गमावून बसले आहेत.कुटुंबाने त्यांचेकडे लक्ष्य देऊनही त्यांना आत्मसन्मानाने जगता येत नाही.तर काही वृद्ध लोकांना कोणाचा आधारही नसतो.त्यातूनही दोघांपैकी एखादी व्यक्ती दगावल्यास एकटेपणा येउन चिडचिडे बनतात त्यातच आजारपण वैगेरे अनेक गोष्टींचा त्रास त्यांना होतो.अश्या लोकांसाठी हा कायदा अवश्य असावा.पण त्याचा गैरफायदा कुटुंबातील इतरांनी घेऊ नये यासाठी कायदेशीर बाजू तपासाल्या पाहिजे.
इच्छामरणाचा अधिकार असावा पण त्याची अंमलबजावणी किती योग्य  प्रमाणात होईल यात शंका आहेच.जर हा अधिकार दिला तो एक प्रकार खून करण्याचा परवाना तर ठरेल का? हा पुढील प्रश्न नक्कीच निर्माण झाल्या शिवाय राहणार नाही.हे काळ ठरवेल पण एक नक्की आहे जिवंत सजीव माणसाला तडफडून मरण्यापेक्षा त्याच्या स्वेच्छेने मरण मिळालेले केव्हाही चांगले ठरेल. "What life is not supposed to be, but it should be good, or if it is a problem for ourselves and others to suffer, then such a world does not have meaning. Every person should have the right to accept dignity along with dignity."


Source :- INTERNET
-किरण पवार,
औरंगाबाद
         
     खरं तर इच्छा मरण कायदा असाही कायदा असतो किंवा असावा याची जाणीव मला आत्ताच झाली. मला तरी वाटत की, असा कायदा अमलात आणणे किंवा त्याबद्दल विचार करावा लागणे हीच मुळात खेदाची बाब आहे. *प्रगत माणूस नेमका इतका प्रगत कसा आणि केव्हा झाला की, जेणेकरुन निसर्गाच्या इतक्या महत्वपूर्ण भूमिकेतही तो हस्तक्षेप करू लागला. प्रांजळपणे मी एक गोष्ट मानतो की, इच्छा मरण कायदा ही बाब प्रगत माणसाची झालेली फार मोठी अधोगती आहे.*
                अडचणी, संघर्ष आणि तडजोडीच जगणं एवढं निरर्थक का वाटत? आपणच म्हणतो की, अडचणी जेवढ्या बलाढ्य तेवढंच जास्त उद्या आपल सामर्थ्य. आणि दुसरीकडे आम्ही विचार करतो कशाचा? तर इच्छा मरणाचा. मी तरी आजवर माणूस प्राणी सोडून इतर कुठल्याही प्राणीमात्राने किंवा पक्षाने इच्छा मरण स्विकारल्याच ऐकल नाही. तुम्ही म्हणाल माणूस हा वैचारिक दृष्ट्या सक्षम आहे. पण मी म्हणतो जिथे आपल्याला निसर्गाने ठरवलेल आयुर्मान दिल आहे ते कमी का करू पाहतो आहोत आपण. *समजा कायदा लागू झाला म्हणून उद्या मी इच्छा मरण स्वीकारल तर माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या आईच काय? किंवा मुल, पत्नी यांच काय?* त्यांचा यात काहीही दोष नव्हता.
             केवळ देशात आत्महत्येच प्रमाण वाढतंय आणि म्हणून आम्ही या कायद्याकडे आस लावून जगणार असू तर हा शुद्धपणे पोरकटपणा झाला. *सध्या सुशिक्षित समाजाच असं झालंय की, त्यांना नक्की जीवन काय आहे हेच माहित नाही.* चाकोरीबद्ध आयुष्य जगण आणि दुसर म्हणजे ताण आल्यावर हसणं एवढ आपल तोंडपाठ असत. आज प्रत्येकाला जवळपास 90% लोकांना जगण्यातली सहजता लक्षातच येत नाही. आणि म्हणूनच आम्हाला इच्छा मरण कायदा म्हणजे एक सुखाची वाट दिसतो.
                आजचा समाज वाचणं कमी करतो पण निर्णय मात्र एका सेकंदात घेऊन मोकळा होतो. *आणि ही त्याच्यातली उणीव आपण ही आजकालची पिढी किती फास्ट आहे, असं बोलून खपवतो.* फार काही तरी मोठ करायचंय म्हणजे खूप व्याप आणि अडचणीत गुंतत चाललोय हा समज आपल्याला छळतो. त्यातून बाहेर पडण्यासाठी ह्रदयाला दिलासा द्यावा लागतो की, या गोष्टी फार शुल्लक आहेत. मी हे मान्य करतो की, वयस्कर व्यक्ती स्वत:ला असा दिलासा नाहीत देऊ शकत. पण अशा क्षणी इतर कुणीतरी ते नक्कीच करू शकतं. *काही वेळा काही गोष्टी घडण्यासाठी आयुष्य नाही तर एक क्षण पुरेसा असतो.*
                 माझ एवढंच म्हणणं आहे की, इच्छा मरण हा कायदा दुसऱ्या देशात कोणत्या तत्वांवर लागू करण्यात आला याच्याशी आपल काहीच देणंघेणं नाही. पण आपल्या देशात मात्र तो नको. कारण हा कायदा सरळपणे पळवाट आहे जे की, जीवणाच्या अंतिम सत्याला अनुसरून नाही. *कारण अंतिम सत्य मृत्यू होणे होय. तो स्वत:हुण करणे नाही.*
                 शेवटी एवढंच म्हणेन की, जर *निसर्गाने जन्म दिलाय ना तर त्याच्या मान ठेवून शेवटच्या श्वासापर्यंत बिनधास्त जगेण. मृत्यू येईल तेव्हा येवो. मी माझ कार्य तोवर करत राहो.*

Source:- INTERNET
-संजय साळुंके,
जळगाव

  'ज्याचं जळत , त्यालाच कळतं'.  जेव्हा सर्वांशी साधे सरळ , मनात काही न ठेवता , प्रामाणिकपणे वागूनही , चारही बाजूंनी संकट समोर येतात तेव्हा इच्छा मरणाचा कायदा असो किंवा नसो , काही फरक पडत नाही. सध्या वाढलेले आत्महत्याचे प्रमाण यावरून हेच दिसून येते. वंचितच नाही तर सक्षम व्यक्ती देखील आत्महत्या करण्यासाठी का प्रवृत्त होतात ? हल्लीच्या जगात मुखवटे घातलेले लोकच जास्त दिसत असल्याने संवेदनशील माणसाचं जगणं खूपच अवघड आहे. आपल्याशी तोंडावर अतिशय गोड बोलणारे , आपल्यावर  पाठीमागुन वार करण्यासाठी किती उत्सुक असतात हे लक्षात आलेवर साधेपणाने जगणं खूपच अवघड होते. एखादी मुलगी/ मुलगा पैशासाठी प्रेमाच नाटक करून लुबाडून घेतो व नंतर अधिक श्रीमंत  व्यक्तीवर प्रेम करताना दिसणं, भिकारी केविलवाणे तोंड करून जेवणासाठी भिक्षा मागतो व नंतर त्या पैशाची दारू पिताना दिसणं , कायद्याचा रक्षक कायदेशीर कामासाठी लाच मागताना दिसणं , आईवडील यांचेकडून आपल्याच  मुलांमध्ये भेदभावाची वागणूक मिळणं, पत्नी/ पति वर खुप प्रेम करुनही अचानक दुसऱ्या व्यक्ती सोबत नको त्या स्थितीत दिसून येणं इ . अनेक कारणं अशी आहे की संवेदनशील व्यक्तीला त्या क्षणी जगणं निरर्थक वाटतं. मग ईच्छा मरणाचा कायदा असो / नसो .आत्महत्या हा एकमेव पर्याय समोर दिसतो. नव्हे त्याक्षणी तोच योग्य पर्याय वाटतो . जगात सर्वत्र टिळा लावून गळा कापणारेच जास्त दिसून येतात. तत्वज्ञान दुसऱ्याला सांगणं खुप सोपं असतं, जेव्हा स्वतः वर वेळ येते तेव्हा तेच तत्वज्ञान निरर्थक वाटू लागते. त्यामुळे इच्छामरण कायदा प्रगत मानवाची गरज की अधोगती याचं उत्तर म्हणजे, अधोगती.

Source:- INTERNET
-पी.प्रशांतकुमार,
अहमदनगर

...कायदा हा शब्द वाचला की लगेच *कायद्यातील पळवाटा* हा शब्द डोळ्यांपुढे येतो पण हे आपलं दुर्दैव आहे..
...कुठलाही कायदा योग्य प्रकारे पाळला जाईल, त्याचा गैरफायदा, चुकीचा उपयोग होणार नाही हे यंत्रणेने पाहणं गरजेचं आहे .. आणि आपला समाज आणि कायदा राबवणाऱ्या यंत्रणा पहाता गैर उपयोग होणारच नाही या कायद्याचा अस म्हणणं चुकीचं ठरेल..
.....इच्छा मरण का हवं?कुणाला हवं ?..
हा काही आत्महत्या करण्याची परवानगी देणारा कायदा नाही.. जेव्हा रोगांनी/वेदनांनी शरीर जर्जर होत.. असह्य आणि कधीच बऱ्या न होऊ शकणाऱ्या रुग्णांना जेव्हा यातून सुटका हवी असते मृत्यू हा त्यांना आणि  आता या त्रासातून सुटका व्हावी मृत्यू हा मुक्ती वाटू लागतो तेव्हा नक्कीच इच्छामरण या संकल्पनेचा विचार व्हावा..
....अन्न पाणी यांचा त्याग करून जीवन संपवन या संकल्पना भारतात नवीन नाहीत. *समाधी मरण*, *प्रायोपवेशन* किंवा *संथारा* आदीचा वापर अनादी कालापासून होतोय..विनोबा भावे,सावरकर यांनीही जीवनासक्ती संपल्यावर खंगून अत्यावस्त अवस्थेत रुग्णशैय्येवर जगण्यापेक्षा मरणाचा स्वीकार केला.
....दुरुपयोग टाळल्यास आणि चांगला मसुदा आणल्यास हा कायदा योग्यच..खूप मरणशय्येवरचे रुग्ण हेच म्हणत असतात...
मौत तू एक कविता है
मुझसे एक कविता का वादा है मिलेगी मुझको

डूबती नब्ज़ों में जब दर्द को नींद आने लगे
ज़र्द सा चेहरा लिये जब चांद उफक तक पहुँचे
        दिन अभी पानी में हो, रात किनारे के करीब
        ना अंधेरा ना उजाला हो, ना अभी रात ना दिन

जिस्म जब ख़त्म हो और रूह को जब साँस आऐ
मुझसे एक कविता का वादा है मिलेगी मुझको
(गुलझार)

Source:- INTERNET
-आर. सागर,
सांगली

    आज विविध क्षेत्रांमध्ये मानवाने प्रगतीची शिखरे पादाक्रांत केली आहेत. पण तरीही मृत्यू कुणाला चुकला नाही. ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू अटळ आहे आणि हेच अंतिम सत्य आहे. इच्छामरण म्हणजे तरी काय? तर आपल्या मृत्यूची वाट न बघता स्वइच्छेने मृत्यू स्वीकारणे. प्रश्न असा उरतो की 21व्या शतकात विज्ञानाने इतकी प्रगती केली असताना इच्छामरण कायदा खरंच गरजेचा आहे का?
.
खरंतर या प्रश्नावर प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकतं. पण मला असं वाटतं की अपवादात्मक (शासकीय भाषेत बोलायचं तर दुर्मिळातील दुर्मिळ) प्रकरणांमध्ये इच्छामरण स्वीकारायची तरतूद कायद्यात असावी. काही देशांमध्ये असा कायदा आहे पण आपल्याकडे अजून असा कुठलाही कायदा केला गेला नाही. पण तरीही काही घटना याबाबत विचार करायला भाग पाडतात.
.
अशीच एक घटना घडलेली अरुणा शानभाग यांच्याबाबत. 1973 पासून 2015 साली मृत्यू येईपर्यंत साधारणपणे 42 वर्षे त्या कोमात होत्या. श्वासोच्छवासापलीकडे स्वतः काहीही करणं अशक्य असताना आणि रक्ताच्या नातेवाईकांनी पाठ फिरवलेली असताना केईएम हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी 42 वर्षे त्यांचा सांभाळ केला ही खरं तर कौतुकाचीच गोष्ट. पण तरीही 42 वर्षे त्यांनी ज्या मरणयातना सहन केल्या त्याचं काय? अशा स्थितीत जेव्हा रुग्णाच्या परिस्थितीत काहीच सकारात्मक बदल होत नसेल किंवा भविष्यात काही सुधारणा व्हायची शक्यताच दिसत नसेल तर अशा व्यक्तीला इतकी वर्षे त्याच स्थितीत ठेवणं किती योग्य आहे? अशा स्थितीत इच्छामरणाची तरतूद का असू नये?


Source:- INTERNET
-संगीता देशमुख,
 वसमत,
 जि.हिंगोली

    आजचे जग विज्ञान आणि तंत्रज्ञानयुग आहे. आज कोणत्याही माणसाला कोणत्या क्षणी कुठला आजार उदभवेल, हे सांगता येत नाही. आजची जीवन जगण्याची पध्दत पाहिली तर माणूस आपल्या पोटात येनकेन प्रकारे वेगवेगळी रसायने आणि अनेक प्रकारची विष सोडत आहे. त्यामुळे पूर्वी दीर्घायुषी असलेला माणूस हा निरोगीच असायचा. किंबहुना तो निरोगी असल्यानेच दीर्घायुषी ठरायचा . परंतु आजची परिस्थिती अतिशय विपरीत आहे. आज गरोदरपणात आईच्या चुकीच्या आहार-व्यसनामुळे जन्माला आलेले मूलही कुठलातरी आजार घेऊन जन्माला येतो आहे. आजची जीवनमानपध्दती,व्यसनाधीनता यामुळे अगदी उमेदीच्या काळात,तारुण्यात अनेक तरुण गंभीर आजाराला सामोरे जात आहेत. आज तंत्रज्ञानाच्या आधारे व औषधोपचारामुळे हे तरुण दीर्घायुषी ठरत आहेत,पण त्यासोबतच एक कटू सत्य हे आहे की, ते निरोगी नाहीत. अशी अनेक श्रीमंत,सधन कुटुंबातील व्यक्ती दुर्धर आजाराने वर्षानुवर्षे पिडीत आहेत. या औषधोपचाराने माणसाचे आयुष्य वाढत आहे,पण तो आजार सुसह्यच असेल,याची मात्र शाश्वती नाही. म्हणून आज अशी अंथरुणाला खिळून असलेले आणि मरणाची वाट पहाणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक फारमोठ्या प्रमाणात आपल्याला पहायला मिळतात. यातून पुढचा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे इच्छामरण आणि दयामरण याचा!
                   इच्छामरण आणि दयामरण यात फरक आहे. इच्छामरण हे स्वतःहून स्वतःसाठी मागितलेले मरण आहे तर दयामरण हे दुसऱ्याने दिलेले मरण आहे. अरुणा शानभाग ह्या  जवळपास चाळीस वर्षे कोमातच अंथरुणाला खिळून होत्या. तेव्हा त्यांच्या कुटुंबियांनी अरुणा शानभागच्या दयामरणासाठी अर्ज केला होता. तिथे इच्छामरण नव्हते. आणि नारायण लवाटे यांनी वयाच्या ८८व्या वर्षी तर  इरावती लवाटे यांनी वयाच्या ७८व्या वर्षी  या दांपत्याने इच्छामरणासाठी अर्ज केला होता. इच्छामरण की दयामरण हाही विचार केला तर इच्छामरण म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर आत्महत्या आणि दयामरण म्हणजे खून!  त्यामुळे इच्छामरणाचा कायदा झाला तर या कायद्याचा गैरवापरच जास्त प्रमाणात होईल. आज समाजातील संवेदनशीलता हरवल्याचे दाखले पावलोपावली मिळतात. जन्मदात्या आईवडिलांनाच वृध्दाश्रमामध्ये ठेवण्याचे प्रमाण अतिशय जास्त आहे. बऱ्याचदा अशा प्रकारामुळे  त्या मुलाची समाजात निंदाही होते,तरीसुद्धा तो हा प्रकार करतो. आणि विचार करा,जर असा कायदा संमत झाला तर याच कायद्याच्या आधाराने दयामरणाच्या नावाने  अशीच मंडळी आईवडिलांचे जीवन संपवणार नाही कशावरून? कारण आपल्या देशाची शोकांतिका ही आहे की,आपल्या देशात कायद्याचा उपयोग होण्याऐवजी दुरुपयोगच जास्त होतो,हा इतिहास आहे.
          मानवी जीवन खूप सुंदर आहे. पूर्वी औषधोपचाराच्या अभावामुळे लोकांना मृत्यू लवकरच यायचा. परंतु आज विज्ञान आणि तंत्रज्ञान एवढे प्रगत आहे की,प्रत्येक आजारावर निश्चित असा इलाज आहे. असे असतांना मरणाची इच्छा करणे,थोडे गैर वाटत नाही का? आपण त्या रुग्णाच्या वेदनांचा विचार करून इच्छामरणाचा विचार करत असू तर एकदा याही बाबीचा विचार व्हायला हवा की,आज जगात इतके दारिद्र्य आहे की,लोकं भीक मागून रस्त्याच्या काठावर,पुलाखाली राहून जीवन जगतात.एवढेच नाही तर काहीजणांना इतके अपंगत्व आहे की,जन्मापासून अशा व्यक्ती परावलंबी असतात. अशा अपंग व्यक्ती दारिद्र्यातही रस्त्याने फरकटत फरकटत भीक मागून आयुष्य जगणारी लोकं पाहिली की  असं वाटतं,मानवामध्ये जगण्याची किती उमेद आहे! त्याच्या जीवनात काहीच सुंदर नसेल पण त्याला जगातील सुंदरता पहायची असेल!  वंचिताचे,अभावाचे जीवन जगताना अशी अनेक लोकं दिसतात. त्यावेळी मनात विचार येतो,प्रत्येक माणसाला जीवन जगण्याचा खरचं अधिकार आहे. आणि असाही मानवाला निसर्गाच्या विरोधात जाण्याचा काय अधिकार आहे? जन्म कुठे घ्यावा,हे जसे आपल्या हातात नाही,तसेच मृत्यू कसा यावा,हेही आपल्या हातात नाही. मग निसर्गनियमानुसार जीवन जगण्यास काय हरकत आहे?एका परिचयाच्या दांपत्याला  मतिमंद एकुलती एक  मुलगी आहे. आज ती बारा वर्षाची आहे. तिची तब्येत वारंवार बिघडते.ती कितीही  आजारी असो आजही तिचे आईवडील तिला ताबडतोब इलाज करतात. त्यांना असं वाटतं कीअपंग का असेना तिने आम्हाला मातृत्व,पितृत्व दिले. तिच्यामुळे आमच्यावरचा वांझपणाचा ठपका पुसल्या गेला. ती मुलगी स्वतंत्र जीवन जगूच शकत नाही,हे माहीत असतानाही   असे पालक दयामरणाच्या कायद्याचा वापर करतील का?  अरुणा शानभागच्या नातेवाईकांनी तिच्या दयामरणासाठी अर्ज केला असला तरी तिच्याच सहकाऱ्यांनी मात्र तसा त्यांना अधिकार देण्यात येऊ नये म्हणून विनंतीअर्ज केला होता. अरुणा शानभाग शुध्दीवर येणारच नव्हती,हे माहीत असताना देखील त्यांची प्रिय व्यक्ती त्यांच्या डोळ्यासमोर रहाणार,याचेच समाधान त्यांना होते. खरेतर अरुणा शानभागच्या आयुष्याकडे पाहिले की,सुरेश भटांच्या ओळी आठवतात,
"सरणावर जाताना मला इतकेच कळले होते,
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते."
     असे असले तरी,हे जग खूप सुंदर आहे आणि ते जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आणि आजूबाजूचा नात्यात वाढत चाललेला दुरावा,स्वार्थ पाहिला की,असे वाटते,या कायद्याचा दुरुपयोगच जास्त होईल.म्हणून इच्छामरण कायदा हा नैतिकदृष्ट्या अधोगतीकडेच नेणारा ठरेल .

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************