वेळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वेळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

नेमके कशात बिझी असतो आपण एवढे?



गणेश भंडारी, अहमदनगर.

"गण्या, अरे माझ्या मोबाईलचं बिल भरलं का?"
"नाही ना आई"
"अरे भर ना मग! तीन दिवसांपासून मागे लागलेय तुझ्या, अजूनही भरलं नाहीस? त्या आयडियावाल्या बाईचा रोज फोन येतोय बिल भरा म्हणून."
"भरतो गं आई. अगं वेळच भेटला नाही. बिझी आहे सारखा."
"एवढा रे कशात बिझी? आणि गेल्या पंधरा दिवसांपासून तुझ्या मागे लागलेय, तो मागच्या खोलीतला बल्ब गेलाय; तेवढा बदल म्हणून. तुझे आपले उत्तर ठरलेले-बिझी आहे म्हणून! अरे, एवढी काय कामं असतात तुला न कशात एवढा बिझी असतो काही कळत नाही मला! नेहमी त्या गांधीजींचे नाव घेतोस ना, त्यांचा आदर्श घे जरा. त्यांनाही तुझ्यासारखाच चोवीस तासांचा दिवस आहे ना, पण बघ त्यांनी किती प्रचंड कामे करून ठेवली. त्यांनी देशच काय, पूर्ण जग बदलले आणि तुझ्याच्याने साधा एक बल्ब बदलून होत नाही?"

आईच्या या तोफखान्यापुढे मी काय बोलणार बिचारा! पण तिचेही काही खोटे नाही म्हणा! ती किती किरकोळ कामे सांगते आपल्याला, पण तीही आपल्याच्याने होऊ नयेत? नेमकी गडबड काय होतेय? नेमके कशात एवढे बिझी आहोत आपण? मुळात आपण खरंच बिझी आहोत का? साला विचार करायला पाहिजे यावर, नाहीतर गोष्टी हाताबाहेर जातील....

गेल्या चार तासंपासून विचार करतोय, आपण नेमके कशात बिझी आहोत; पण नेमके उत्तर काही सापडेना राव! काय करावे बरे? कोणाची मदत घ्यावी का? कोण बरे मदत करीत उत्तर शोधायला? अरे हो- एक व्यक्ती आहे! मघाशी आईने बोलता-बोलता गांधीजींचे उदाहरण दिले ना, त्यांनाच विचारुया! तेच काहीतरी मार्ग दाखवतील!

"प्रणाम बापू!"
"ये बेटा! आज कसाकाय वेळ मिळाला तुझ्यासारख्या बिझी माणसाला?"
"बास का बापू, आता तुम्हीही बोलणार का मला?"
"मीही म्हणजे? आधी कोणी काय बोललं का तुला?"
"तर! आई बोलली. तिने काही किरकोळ कामे सांगितली होती, पण खरे तर माझ्याकडून ती करून झाली नाहीत. बिझी होतो म्हणून सांगितलंय तिला, पण मला कळेना की असं का होतंय ते."
"असं म्हणजे?"
"म्हणजे सतत बिझी-व्यस्त असल्यासारखं तर वाटतंय; पण कामं तर कोणतीच होत नाहीयेत. नेमकं कळेनाय की मी एवढा कशात बिझी असतो? वेळ का पुरत नाही? मघापासून विचार करतोय यावर, पण उत्तर काही सापडेना. आईने तुमचे उदाहरण दिले मघाशी. मग विचार केला, चला तुमच्याशीच बोलूया. प्लीज सांगा ना, तुमच्याकडेही माझ्याइतकाच वेळ आहे, पण तुम्ही किती प्रचंड कार्य केले तेवढ्या वेळात. मग मलाच का जमत नाही? कुठे चुकते माझे?"
"अरे, अरे! एवढ्या साध्या गोष्टीसाठी किती परेशान होतोस!"
"साध्या? साधी गोष्ट आहे ही?"
"नाहीतर काय! मला तुझी समस्या कळली. तू बिझी असतोस-पण निरर्थक गोष्टींमध्ये. आणि तुला वेळेचे नियोजनही शिकावे लागेल. फार कठीण नाही ते. प्रयत्नांनी जमून जाईल. जीवनाला थोडी शिस्त मात्र लावावी लागेल."
"काय करायचं, थोडं सविस्तर सांगा ना!"
"सगळ्यात आधी आपला वेळ कुठे खर्च होतोय याचा जरा बारकाईने विचार करावा लागेल. त्यातूनच समस्येवरचा उपाय मिळेल. आता मला सांग, दिवसाचे तास चोवीस, बरोबर? त्यांपैकी झोपण्यात किती जातात आणि नोकरीच्या ठिकाणी किती जातात?"
"झोपण्यात साधारणतः सात आणि नोकरीसाठी जाण्यायेण्याच्या वेळेसह म्हणजे सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी सात-म्हणजे अंदाजे साडेनऊ तास."
"म्हणजे हे वजा जाऊन तुझ्याकडे उरले साडेसात तास. त्यातील अडीच तास तुझी दैनंदिन कामे, जेवण, अंघोळ यात जातात असे म्हटले तरी तुला पाच तास मिळतात. आता या पाच तासांचे काय करतोस सांग पाहू?"
"अं...अं खरं सांगू का? मोबाईल, व्हाट्सअप-फेसबुक आणि टीव्ही पाहण्यात खूप वेळ जातो हो!"
"दॅट्स इट! तुझ्या बिझीपणाचे मूळ त्यातच आहे! तूच नाही रे, तुझ्या पिढीतल्या अनेकांचे पाहिलंय मी. मध्यंतरी एक सर्व्हेही झाला होता यावर. भारतातल्या मुलांचे रोज सरासरी चार ते पाच तास मोबाईल व टीव्हीवर खर्च होतात. कसा रे इतर कामांसाठी वेळ मिळेल मग?"
"पण बापू, जीवनात काहीतरी विरंगुळा हवाच ना?"
"मी कुठे म्हणतोय की निरस जीवन जगा म्हणून? पण कोणत्याही गोष्टीचा प्रमाण असावे रे! मला सांग, या जगात केवळ मोबाईल-टीव्हीनेच विरंगुळा मिळतो का? आज अनेकानेक उत्तमोत्तम पुस्तके अगदी सहज उपलब्ध आहेत. कधी वाचले होते शेवटचे पुस्तक? काहीतरी उत्तम लिहावे, त्यासाठी चिंतन करावे. हिंडावे-फिरावे. माणसे वाचावीत. केलंय कधी हे? त्यातून विरंगुळा मिळतोच, पण ज्ञानही वाढते."
"हे सगळं करण्याचा कंटाळा येतो हो खूप!"
"उत्साह पाहिजे उत्साह! कंटाळा म्हणजे उत्साहाची कमी! उत्साह वाढवण्यासाठी जीवनशैली बदलली पाहिजे. रोज रात्री कितीला झोपतोस आणि सकाळी कितीला उठतोस?"
"रात्री साडेबारा-एक होतात आणि मग सकाळी उठायला आठ-साडेआठ."
"ताजी हवा कशी मिळेल मग? माझ्याकडे बघ-मी रात्री आठला झोपतो आणि पहाटे चारला उठतो. तू निदान सहाला उठायचा प्रयत्न कर. सहाला उठावे, बागेत फिरायला जावे. तेथेच पंधरा मिनिटे ध्यान करावे."
"खरेच की! किती फ्रेश वाटेल नाही?"
"हो. त्यामुळे दिवसही चांगला जातो. योग्य नियोजन करता येते"
"खरं, ते वेळेच्या नियोजनाविषयी बोलला होतात-"
"आपल्याकडे उपलब्ध वेळेचे योग्य नियोजन करायला शिकले पाहिजे. निरर्थक गोष्टींवर खर्च होणारा वेळ कमी करून तो आवश्यक कामांसाठी कसा वापरता येईल हे पाहिले पाहिजे. समजा तू व्हाट्सअपवर दोन तास खर्च करतोस. ते खरेच आवश्यक आहे का? नाही वापरले तर काय बिघडेल? मला वाटते काही बिघडणार नाही."
"होय. मध्यंतरी मी नऊ-दहा महिने व्हाट्सअप वापरात नव्हतो, पण फारसे काही बिघडले नाही. आवश्यक माहिती, निरोप इकडून तिकडून मिळतच गेले."
"असाच विचार प्रत्येक गोष्टीचा कर. टीव्हीवर काय पाहतोस? त्या राधा-शनायाच्या भानगडीच ना? काय उपयोग तुला त्यांचा? तो वेळ तू दुसरीकडे वापरू शकतोस. बातम्या पाहत असशील तर याचाही विचार करावा की यातील किती माहिती माझ्यासाठी खरेच आवश्यक आहे? माणसाने आपल्या खऱ्या गरजा ओळखायला शिकले पाहिजे.वेळ कुठे निरर्थक खर्च होऊ शकतो, याची केवळ एक-दोन उदाहरणे दिली मी. स्वतःच्या बागण्याचे बारीक निरीक्षण केलेस तर आणखीही बरेच काही सापडेल तुला, होय ना?"
"खरंय."
"वेळेचे नियोजन करण्याचेही एक तंत्र असते. प्रथम दीर्घ मुदतीची लक्षे ठरवावीत. म्हणजे की मला या एका वर्षात काय काय साध्य करायचंय? मग ते कसे साध्य करता येईल, त्यादृष्टीने महिना, आठवडा, दिवस व अगदी तासाचेही नियोजन करावे. मायक्रो प्लॅंनिंग!"
"इतके साचेबंद आयुष्य?"
"कोण म्हणतं? एकदा करून तर बघ! नियोजनाप्रमाणे ध्येये साध्य करण्यातही एक वेगळाच आनंद असतो. आणि अगदी साचेबंदपणा टाळण्यासाठी थोडी लवचिकता-वेळेचे मार्जिनही ठेवावे."
"अजून काय काळजी घ्यावी नियोजन करताना?"
"केवळ कागदावरचे नियोजन नको आपल्याला, तर त्याची अंमलबजावणीही व्हायला पाहिजे. म्हणजे बघ की हा एक तास मला वाचनासाठी खर्च करायचाय असे ठरवले आहे, तर तो त्याच गोष्टीसाठी खर्च व्हावा. माझे काही किस्से तू ऐकलेच असतील की कसे मी ठरलेल्या वेळी ठरलेली कामे करायचो ते. त्या बाबतीत स्वतःशी प्रामाणिकपणा व आत्मनियंत्रण खूप महत्वाचे. वाचनाच्या मध्येच तुला मोबाईल खुणावेल, पण कंट्रोल-तुला सध्या वाचनच करायचंय! आणखी एक-हे नियोजन म्हणजे तुझी वैयक्तिक बाब आहे. तुझ्या गरजेप्रमाणे तुला ते करायचंय. तुझ्या गरजा तुझ्यापेक्षा जास्त चांगल्या दुसरे कोणी ओळखू शकणार नाही. तेव्हा या बाबतीत ऐकावे जनाचे अन करावे मनाचे! पण एकदा जे काही ठरवले असेल, तेथून माघार घेणे नाही! मधून मधून नियोजनाप्रमाणे आपण वागतोय का याचाही रिव्ह्यू घ्यावा. कुठे चूक होत असेल, नियोजनात सुधारणा पाहिजे असे वाटत असेल तर त्याप्रमाणे बदल करावेत."
"साध्या गोष्टी आहेत हो या!"
"तर! पण अमलात आणून बघ-तुझा बिझीपणा कुठल्या कुठे पळून जाईल आणि महान कामे करण्यासाठी तुला वेळच वेळ मिळेल!"

खरेच बापूंशी बोलून एक नवी दिशा मिळाली हो! डोक्यात बल्बच पेटला म्हणा ना! आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे वागायला हवे. मग बघू आईची बोलणी कशी काय बसतात ते!
===========================


अर्जुन (नाना) रामहरी गोडगे
सिरसाव ता. परंडा जि. उस्मानाबाद

             आजची तरुण पिढी माझ्यासह सोशल मीडियाच्या आहारी गेली आहे. फेसबुक, व्हॅटअप, इन्स्टाग्रामचा अतिरेकी वापर करत आहे. काहीही काम नाही लै बुझी असल्याचा आव आणतय....लिखाण काय करत नाही, वाचन संपलय, बुद्धी गहाण ठेवून लाईक, कमेंटच्या नादात चांगल्या गोष्टीला मुखलीय.

           मला तर वाटतंय काहीतरी लिहलं पाहिजे पण कामाच्या व्यापामुळे जमत नाही, तरीही माझ्या आवाक्यात विषय असला की मी सोडत नाही.....एवढी चांगली संधी असून देखील तरुण लिहत नाहीत. "कीव करावी वाटते माझसारखं लोकांची" आज आपलं लिहन छापून येणं ही काय सोपी गोष्टी नाही. फुकट मिळायला त्याचं मोल नसतं.

           दोस्तांनो लै बिझी असल्याचा आव आणू नका,लिहत राहा,बुद्धीची मशागत करत राहा...."नाहीतर कधीतरी वाटेल षंढ सोशल मीडियावर तासनतास घालवला हाती का आलं घंटा ? जास्त नाटकी बोललोय असं नाही ही खरी स्थिती आहे.


===========================

शिरीष उमरे नवी मुंबई

मी स्वभावाने तरुण अाहे. 😎वयाने म्हातारा आहे.😝  मला आठवते कॉलेजमध्ये शिकत असतांना मी लय बिझी राहायचो.😌

कधी एनसीसी त 💂‍♂तर कधी वादविवाद स्पर्धा 🎙 तर कधी निवडणुकीच्या हाणामारीत 🏑🤼‍♀ तर कधी कॉलेजच्या गॅदरींग मध्ये 🎼🎤🎸🎭!!

घरच्यानी सोडुन दिलेला सांड जसा... आमच्या वेळी स्पर्धा परीक्षा, मोबाइल, सोशल मिडीया वैगेरे चा बागुलबुवा नव्हता. 😅

आज लक्षात येते की एका विशिष्ट वयात आपण खुपच बिझी असतो आणि ते लादलेले मुळीच नसते. नाविन्याची आवड, करुन बघायचे धाडस व गरम रक्त ह्यातुन वेळेचे भान राहत नाही.. ह्यावेळी योग्य मार्गदर्शक मिळाला तर खुपच छान...
अन्यथा पस्तावा शिवाय हातात काही पडत नाही...

मोबाइल , सोशल मिडीया अजिबात वाईट नाही जर त्याचा वापर योग्यरित्या केला तर च..

आज आम्ही म्हातारे विकीपिडीया, गुगल, युट्युब, फेसबुक, व्हॉटस्अप, लिंकीडइन, इंस्टाग्राम, ट्विटर व कित्येक अॅपस् याचा वापर बिझनेस साठी करतो. पैसे कमावतो. मग काय हरकत आहे ह्यावर बिझी राहण्यात ? आज डीजीटल मार्केटींग हे खुपच महत्वाचे आहे.

तरीही  असे वाटते की युवा पीढीने व्यायाम, वाचन, लिखाण, चर्चा ह्यासाठी थोडा वेळ काढायला हवा. स्वत:च्या हॉबीज जपायला हव्या...

पोपटपंची थांबवतोय... बाकी तरुण पीढीला आवाहन की तुमचे बिझी असणे हे कीती महत्वाचे हे सिध्द करण्याचा प्रयत्न करा.. फकित चार ओळी !! 👍🏻
🙏🏼😇


===========================



अनिल गोडबोले
सोलापूर

पृथ्वीला स्वतःभोवती आणि सुर्या भोवती फिरताना लागणारा कालावधी तर माणसाने मोजला व त्याच्या आधाराने तो रोज काम करू लागला.

अजून काही तरी मिळवायचं आहे या आशेने किंवा माझ्या मनाला वाटत म्हणून एका एका गोष्टींच्या मागे लागला.. त्यामूळे ज्याच्या मागे लागला त्याला वेळ द्यावा लागला आणि बाकीच्याला वेळच शिल्लक राहिला नाही.

उद्योग आणि त्यांच्या वाढी साठी माणसाच्या गरजा वाढत गेल्या किंवा वाढवत राहण्याचा खेळ सुरू झाला.

मग technology ने माणसाला भयानक वेग दिला. वेग मिळाला की माणूस निवांत राहील अस वाटू लागलं.

मग निवांत वेळेत तो अजून पळू लागला अजून पैसे संपत्ती कमवू लागला. वेळच नव्हता तेव्हा..

मग त्याने एवढं ओरबाडले की त्याच्या पुढच्या पिढीला एन्जॉय करण्यातून वेळ मिळेना.
आणि जे वेळ काढून जगत होते त्यांना काहीच राहील नाही म्हणून कमवण्यासाठी पळू लागले आणि बीझी झाले.

ज्यांच्याकडे पैसे आणि टेक्नॉलॉजी आहे ते त्यांच्या प्राथमिकता सोडून दुसरं काहीतरी करत आहेत.

तर शेवटी महत्त्वाचं काय.. वेळ.. नाही ...
तर आपली प्राथमिकता महत्त्वाची

बीझी आपण आपल्या जगातच आहोत. आपल्याला हे पाहिजे आणि ते पाहिजे त्या मध्ये सुद्धा.. मला जस पाहिजे तेच झालं पाहिजे..

आपल्याच शेपटाला काठी बांधून त्याला गाजर बांधलं आहे आणि त्याच्या मागे पळतोय आपण..

जगतो आहोत का आपण.. हे जग कोणीतरी चालवत आहे आणि आपण पळतोय..

खरोखर बीझी आहोत का आपण.. निसर्गात, झाडात मनासारखा निसर्ग सौंदर्य बघत कधी फिरणार.

मित्र नावाचं एक नात दिल होत निस्वार्थी पणे... त्याला भेटून खूप आनंद व्हायचा.. पण बीझी असल्यामुळे तोच भेटत नाही..

एक दिवस बीझी असतानाच घरचे पोचवायच्या आत जरा जगलो तर बर होईल..

खरच जरा बीझी पणा सोडून डोळे मिचकावून जगाकडे बघुयात का..!

===========================



डॉ. विजयसिंह पाटील. MBBS.DA.कराड...

मला वाटते, बिझी असणे आणि ओक्युपाईड असणे यात फार मोठा फरक आहे.उदा. मी बिझी आहे याचा मी लावलेला अर्थ, पूर्णपणे कामात व्यग्र. पहाटे उठून चालण्याचा व्यायाम,मग चहा, प्रातर्विधी आटपून देवपूजा करून, सकाळचा नाश्ता. व मग दिवसभर घाण्याचा बैलासारखं काम आणि फक्त काम. उसंत मिळालीच तर दुपारचे लगबगीनं उरकलेलं जेवण. संध्याकाळच्या पलीकडे व रात्रीच्या अलीकडे कधीतरी हे काम संपतं. (मध्येच घराचं बांधकाम, मग फार्महोऊस, गाड्या बदलणे हा क्षणिक विरंगुळा).घरी आल्यावर जेवणास वेळ असेल तर चहा घेऊन गावात मित्रांकडे फार फार तर अर्धा तास गप्पा. परत घरी. जेवण झाल्यावर त्याच त्याच टीव्ही मालिका. मग अंथरुणावर पडल्या पडल्या झोप. परत पहाटे उठून नेहमीचाच दिनक्रम. महिन्यातून एकदा दीड दिवस सुट्टी घेऊन कुठल्या तरी ठिकाणची गडबडीत आवरलेली ट्रिप. 'परत ये रे माझ्या मागल्या'. वर्षातून एकदा परप्रांतात पाच सहा दिवसांची सहल. परदेशी गेलो तर फक्त स्थळं आणि दिवसांची संख्या वाढायची.
पण कोणत्या तरी एका क्षणी लक्षात आले, की हे कुठतरी थांबलं पाहिजे.'
शांतपणे विचार केल्यावर लक्षात आलं की आपण व जनावरे यात फारसा फरक नाही. उलट ते भूक लागल्यावर खातात, झोप आल्यावर झोपतात. ते आपल्या मनाचे राजे... आणि आपण सवयीचे गुलाम. (त्यांतच अल्बर्ट कामुचं एक पुस्तक वाचनात आले.  त्यांच्या म्हणण्यानुसार ' माणूस रोज तेच तेच दिनचर्या करून रोजच आत्महत्या करतो '. शॉक बसल्यासारखं झालं.
विचार केला, कामाचा व्याप हळूहळू कमी करायचा आणि आपले छंद जोपसायचे...
आणि मग सुरु झाला माझा ओक्युपाईड दिवस.
पहाटेचा व्यायामात खंड पडू दिला नाही. व्यग्र कामाचा कालावधी कमी कमी करत आणला. आणि फावल्या वेळात,  वाचनासाठी, आवडते सिनेमा मुख्यतः इंग्रजी, मित्रांसोबत गप्पा टप्प्या, बाईक रायडिंग, जवळचीच पण न पाहिलेली प्रेक्षणीय स्थळे, फोटोग्राफी, आणि हल्ली हल्ली थोडंफार लिखाण.
यामुळं दैनंदिन चिडचिड बऱ्यापैकी कमी झाली, वजन आटोक्यात आलं, स्ट्रेस लेव्हल कमी झाली.
अगदी बारीक सारीक गोष्टीत आनंद मिळायला लागला.
विचार केला असता असं जाणवलं की, आत्तापर्यंतचा मोठा कालावधी हातातून निसटून गेलाय. तो कालावधी फक्त( बिझी )आर्थिक दृष्ट्या कारणी लागला.. आता खरं आयुष्य जगायला शिकलोय..
=========================

शीतल शिंदे ,दहिवडी
         🤔 नेमके  बीझी कशात असतो आपण हे पाहणे फार गरजेचे आहे .ऐथे कोणाला वेळच मिळत नाही हो .आउटपुट मात्र ईतरानसारखच .उठल्या पासून झोपेपर्यण्त पोट भरण्यासाठी  आणी सम्पत्तीचा संग्रह  करण्यासाठी खटाटोप करत असतो .शेवटी काय मोकळेच जाणे .
कधी दुसऱ्याच्या दुखः त  सहभागी झालोय का आपण ? ईतरानकडे पहायला तरी वेळ आहे काय आपल्याकडे , ते सोडाच हो बुजुर्ग झालेल्या आई वडिलांना पहायला पण वेळ नसतो आपल्याकडे त्यांना ऑनलाईनच अग्नी देतो .सम्पत्तीचे एवढे जतन  करतो  की पाठीवर पाय देत  आलेल्या बहीण - भावंडानां आर्थिकदृष्ट्या , मानसिकदृष्ट्या मदत कराविशी वाटत नाही आपल्याला . हे आपले असते बीझी आयुष्य .पैसा कमावण्यासाठी केलेला  खटाटोप !
              समाजासाठी झटणे तर लाम्बच .समाजासाठी कार्य करू म्हटले की आता अभ्यास आहे , मग नोकरीच्या शोधात आहे आणी हो अहो नवीन लग्न झालेय आता . झाले आता मुलगा दहावीला आहे मग घराचे कर्ज आणी  मुलांच्या  शिक्षणाचे कर्ज फेडतोय हो आता .हुश्श ,
          थकलोय आता  सेवाणीव्रुत्त  झालोय हो आता , आता काय गुडगे दम काढत नाहीत बघा .
              मुले नातवंडे आपापल्या व्यापात .
           ना कधी छंद जोपासला , ना कधी सामाजीक बांधिलकी  जोपासली .
       संपले ते आयुष्य  , स्वतांमधूण कधीतरी  बाहेर येवून  गरजूंना  मदतिचा हात  देवूयात नीराधाराणा  मदत करुयात .दुसऱ्याचे पोट भरले तर आपले पोट लवकर भरेल , दुखः दूर केले तर आपले दुखः लवकर दूर होईल अगदी शंभर टक्के .चला मग पुन्हा स्वतः साठीतरी  समाज कार्य करूयात आणी आपले कार्य सिद्धीस नेवुयात 🙏
===========================


संगीता देशमुख,वसमत,जि. हिंगोली

पूर्वीचा काळ किती छान होता! असं म्हणायची वेळ आज आपल्यावर आली. आत्ता आत्तापर्यंत म्हणजे मला नोकरी लागल्यावरचा काळ विचारात घेतला किंवा विसाव्या शतकाच्या शेवटचा विचार केला तरी लक्षात येईल की, सामान्य माणसाच्या जीवनात यंत्रांचा शिरकाव एवढ्या मोठ्या प्रमाणात झाला नव्हता. फार मोठ्या जमीनदाराच्या शेतातही तेव्हा जमिनीच्या मशागतीपासून तर शेतीतील जास्तीत जास्त  कामे माणसांच्याच साहाय्याने होत असत. फार झाले तर मळणीयंत्रासारखी मोजकी यंत्र शेतात आली होती. घरातली  जात्यावरची दळणे गेली असली तरी विहिरीचे पाणी शेंदणे,कपडे धुणे,आणि गावातल्या गावातच काय पण तीन-चार कि. मी. पर्यंत पायीच जात असत. शहरातही मध्यमवर्गीय लोकांकडे फार तर सायकलचा उपयोग होत होता. ही सर्व कामे करण्यात भरपूर वेळ जायचा आणि यातून ज्यांचा वेळ उरला ते मोठे लोक दूरदर्शन पहात असत आणि गरीब लोक मंदिरात भजन,किर्तन यात वेळ घालवायचे. पण तरी सुध्दा त्यांच्याकडून "मला वेळच मिळत नाही" अशी तक्रार कधी ऐकली नाही. परंतु आज यांत्रिकीकरणाचा झपाट्याने विकास झाला. आणि मानवाच्या जीवनात त्याचा इतका शिरकाव झाला की,ही स्वारी आता चक्क स्वयंपाकघरात शिरली. इकडे लाइटबील सारख्या छोट्यामोठ्या कामासाठी कोसभर दूर जाऊन  तासभर उभं रहावं लागायचं  ती कामे आता दोन अंगठ्याच्या अंतरात आणि काही मिनिटात होत आहेत. या सर्व बाबींचा विचार केला तर लक्षात  की,पूर्वीच्या तुलनेत आजचा वाचलेला वेळ गेला कुठे?
                 आज येताजाता अनेक लोकांच्या तोंडून हेच ऐकायला मिळते की,"मला वेळच नाही" किंवा "मला वेळच मिळत नाही"!पुन्हा पुन्हा मनात तोच विचार  डोकावतो की, ' नेमके कशात बीझी असतो आपण एवढे!'  मजलदरमजल करत जाण्याची आम्हाला सवय होती आणि आज दळणवळणाची साधने आली तरी आम्ही वाहनांचा वेग अफाट ठेवतो. का? तर लवकर पोहोचायचे असते... पूर्वीचे लोक मोठ्या प्रमाणात अवांतर वाचन करायचे. आज असे वाचनही कमी झाले. यंत्रामुळे आमचा कितीतरी वेळ वाचला. परंतु मला वाटते, त्या वाचलेल्या वेळाचे आपल्याला नियोजन करता आले नाही. इंटरनेटच्या जाळ्यात आपण पुरते अडकलो. अभिमन्यूसारखी आपली अवस्था झाली. या जाळ्यात शिरलो तर खरं पण यातून बाहेर पडण्याचा कळूनही वळत नाही. मग पर्यायाने "मला वेळच मिळत नाही",अशी सबब सांगून आपण आपल्याच माणसापासून,सत्कार्यापासून,चांगल्या सवयीपासून दूर जात आहोत. कोणाला चांगला विचार करण्यास वेळ नाही,कोणाला चांगले लिहिण्यास,वाचण्यास वेळ नाही,कोणाला चांगले काम करण्यास वेळ मिळत नाही. खरे तर  ही आपली तंत्रज्ञानापुढे हार आहे. 
           आजही आपण आपल्याजवळ असलेल्या वेळेचे नियोजन योग्य पध्दतीने केले तर आपला बराचसा वेळ चांगल्या सवयीसाठीं,आपल्या माणसासाठी आणि महत्वाचे म्हणजे समाजकार्यासाठी लावू शकतो. पण यासाठी आपल्याला त्याची आवड असणे गरजेचे आहे कारण तशी म्हणच आहे  "आवड असली की सवड मिळते" आणि आणि काम करायचेच नसेल तर  "ना के नौ बहाणे" ठरलेलेच आहेत.आधुनिक तंत्रज्ञानाचा यथायोग्य उपयोग घेऊन वाचलेला  वेळ सत्कारणी लावू शकतो.
=======================

निखिल खोडे,  ठाणे.
           मागच्या रवीवारी ग्रुप वर विषय टाकण्यात आले होते आणि आता मी लिहायला सुरवात केली.... म्हणजे नेमके कुठे बिझी असतो आपण यावरून समजले...😅
         
           *वेळेचं गणित* (केंव्हा ते आठवत नाही पण बहुधा इयत्ता सहावी सातवीला) विचारधन होते त्यातले २-३ वाक्य आठवते की महापुरुषांनी वेळ मिळत नाही ही तक्रार कधीच केली नाही. मग मी कधी - कधी स्वतःच विचार करतोय की आपल्याला वेळ कमी का पडते कोणत्याही गोष्टी साठी?
         
            वेळेचे व्यवस्थापण करणे हे कधी मला जमलेच नाही. प्रत्येक वेळेस वेळापत्रक बनवले परंतु वेळापत्रका प्रमाणे काम करणे झालेच नाही..
सोशल मीडिया वर बराचसा वेळ निघुन जातो.. त्यामुळे नवीन काहीतरी शिकायला मिळते हा एक मुद्दा सोडला तर बाकी तर नुसता टाइमपास चालु असतो..
            
              कामाच्या जबाबदारी मुळे दिवसाचा वेळ कसा निघून जातो कळायला  मार्ग नाही..फक्त शेवटी इतकंच की लक्षात आहे.."वेळ कोणासाठी थांबत नाही"....⏳⌛

(या ब्लॉगमधील सर्व प्रातिनिधिक छायाचित्रे गुगलवरून घेतलेली आहेत.)

मला टायम नाही….मग नक्की तुझा वेळ जातोय तरी कुठं ?? (भाग:-२)


🌱वि४🌿  या व्हाट्सअप ग्रुप वरून

मला टायम नाही….मग नक्की तुझा वेळ जातोय तरी कुठं ?? (भाग:-२)


Source: Internet
अश्विनी कटकेमोड,नांदेड:
वेळ  हा शब्द  कानी पडताच  मला विश्वास नागरे पाटलांनी म्हटलेली कविता आठवते.                          'To realize the value of TIME'               आपण जर वेळेच महत्त्व  जाणल तर आपल्याला 'मला टायम नाही'  अस म्हणण्याची वेळ  येणार नाही. आयुष्य जस चाललय तस भरकटत जाऊ देण्यापेक्षा त्याला वेगळ वळण देण महतवाच असत.  नाहीतर आपल्या लोकांना जेव्हा आपली खरी गरज असती तेव्हा आपल्यावर 'टायम नाही'  अस म्हणण्याची वेळ येती.  उदाहरणच घायच झाल तर आई-वडिलासाठी आपल्याकडे  वेळेच्या नियोजना अभावी टायम नाही भेटत.                      आपण शिकत राहतो,  शिकत राहतो,  आणि शिकतच राहतो.  पण नौकरी मिळत  नाही  आणि आपला इथपर्यंत प्रवास  होईपर्यंत  आई-वडिल थकतात.  जेव्हा ते थकतात  तेव्हा आपण  नोकरीच्या  शोधात  लागतो.. आणि जेव्हा  ते  जास्त थकतात  तेव्हा आपण office च्या कामात किवा घर-गृहस्थी मध्ये  जास्त  व्यस्त  होतो.                              त्यामुळे आपण जेही करतोय  ते  गुणवत्तापूर्ण असलं पाहिजे. जेणेकरून आपल्याला  योग्य वेळेत योग्य  गोष्टी  करायला  भेटतील  आणि खंत करण्याची,  टायम नाही भेटला,  'टायम नाही',  अस म्हणण्याची वेळ नाही येणार. म्हणून म्हणतात  योग्य  गोष्टी  योग्य  वेळेतच  छान वाटतात. मग ते लग्न  असो का नौकरी.  जेव्हा  वेळ  निघून गेलेली  असते तेव्हा  अनेक  जबाबदार्‍या  अंगावर  पडलेल्या  असतात.  नौकरी,  घर - दार,  आई-वडिल,  लेकर मग फक्त उरती ती खंत..  त्यामुळे  युवकांनी वेळेचा फायदा गायला हवा.  ते म्हणतात  ना वेळेच सोन करा.  ते करायला हव व हे वाक्य  विसरायला हव 'मला  टायम नाही'  मग आपोआपच  आपला टायम  जातोय कुठे  हे भविष्यात जाणयला सोयीस्कर  जाईल.


सूरज शेवाळे,मुंबई:
वेळ रात्री 9 ते 10 च्या दरम्यान जेवण करून पाय मोकळे करावे म्हणून गच्चीवर शतपावली करत होतो, डोक्यात उद्याच्या दिवसाचे नियोजनाचे विचार सुरू होते, अचानक कशात तरी पाय अडकला आणि चांगलाच पालथा झालो😣😣😣
कुठे काय आणि किती लागलाय याचा हिशोब करत सावरतोय तोच लक्ष गेलं आभाळाकडे
.
.
.
आणि दिसले सप्तर्षी , ध्रुव , शुक्रतारा , लाखो चांदण्या असे एक एक समोर दिसले आता उठू वाटत नव्हतं पार हरवून गेलो त्यात
.
.

नुसतं त्यांच्या कडे बघत राहिलो
.
.
मनाला वाटलं एवढे दिवस का नाही पडलो ?

 उत्तर आले तुलाच वेळ नव्हता म्हणून 😊

Source: Internet

अमर चिखले,पुणे:
          आयुष्यात अगदी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ति बिलगेट्स जरी असला तरीही त्याला दिवसाचे चोविसच तास भेटतात आणि सर्वसामान्य माणसालाही. मग आपला वेळ जातो तर नेमका कुठे? जो योग्य व्यवस्थापन करतो तो यसस्वी होतो. आणि असे म्हणतात की जे लोक म्हणतात माझ्याजवळ थोडा पण वेळ नाही परंतु त्या व्यक्ती विचलीत असतात वेळ त्यानां व्यवस्थापित करता येत नाही म्हणून ते असे म्हणतात.वेळ हा फक्त पैसे कमवण्यासाठी जात आहे परंतु फ़क्त पैसे कमवणे म्हणजे आयुष्य नसून निरोगी आयुष्य सुध्दा कमवता आले पाहिजे.परंतु आपण मात्र व्यवस्थेला दोष देतो की आपणाला सुविधा मिळत नाही म्हणून परंतु आपण आपला किती वेळ योग्य खर्च करतो त्याचा आपला आपणच विचार करावा . नेपोलियन वेळेच महत्त्व जाणू शकला नसता तर आदर्श सेनापती कधीच झाला नसता.
वेळेची तुलना पैश्याशी कधीच होऊ शकणार नाही कारण पैसे परत भेटतील पण वेळ नाही परत केव्हाच भेटू शकणार . आपला वेळ जास्त मोबाईलवर जातोय तसेच मालिका पाहण्यात जात आहे .परंतु जर वेळेचे योग्य व्यवस्थापण केले तर तशीच एखादी मालिका तुमच्या पण यशस्वी जीवनावर निघू शकेल .
           

Source: Internet


जयंत जाधव,लातूर:
मला माझ्या दहा वर्षाच्या भाचीने व्हाॕटस् अॕपवर पाठविलेला सर्वात सुंदर संदेश-
‎" सुख आहे सगळ्यांजवळ पण ते अनुभवायला वेळ नाही..
इतरांकडे सोडा पण स्वतःकडे बघायला वेळ नाही..
जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत आज जगायलाच वेळ नाही..आणि
सगळ्यांची नावं मोबाईलमध्ये नोंद आहेत.. पण;
चार शब्द बोलायला वेळ नाही."
मला वेळ नाही ह्या शब्दाचा एखाद्या ढाल सारखा वापर करायला लोक  शिकले आहेत.सर्वत्र वेळ नाही हा शब्द सहज कोणी पण वापरतात विशेषतः जवळचे मिञ,नातेवाईक.आपण किती व्यस्त आहेत हे दाखविण्यासाठी सतत मोबाइलवर बोलणे.ही बाब एक प्रकारे स्टेटस सिंबाॕल ठरला आहे .आपल्या जवळ वेळ नाही म्हणजे आपण खूप व्हि.आय.पी-महत्वाचे झालो हा गोड-गैरसमज आज चटकन पसरत आहे. दूसरी बाजूस अशी स्पष्ट करावी वाटते की आजच्या धावपळीच्या युगात सगळी कडे कामाचा व्याप खूप वाढला आहे.कार्यालयीन व कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडतांना समतोल साधता येत नाही म्हणून मला वेळ नाही असे म्हणणे स्वतःला फसवण्या सारखे आहे.कामाचे क्षेत्र कोणतेही असो तिथे चांगला पोशाख व वागणे हे ओघाने आलेच.जर असे नाही  झाले तर ते चुकीचे ठरेल.आज जग बरेच बदलले आहे.ह्या वर पुढील उपाय करून पाहता येईल - काही दिवसासाठी तुम्ही स्वतःचा वेळ खरोखर कसा घालवता यांच्या नोंदी लिहून ठेवा. निश्चितपणे तुम्हाला नवल वाटेल. टीव्ही पाहणे, इंटरनेटवर, चित्रपट पाहण्यात, फोनवर बोलण्यात, मित्रांना भेटण्यात तुम्ही किती वेळ घालवता? आता, तुम्ही ठरवलेल्या महत्त्वाच्या गोष्टींशी ही डायरी तपासून पाहा. तुम्हाला काय दिसते? कदाचित तुम्हाला फक्‍त टीव्ही पाहणे, फोनवर बोलणे, किंवा वेब-सर्फींग अशा सवयींचा विचार करावा लागेल आणि या गोष्टींमधूनच भरपूर वेळ काढता येईल!
थोडक्यात  नियोजन करुन महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या त्याला  प्रथम प्राधान्य दया.याचा अर्थ तुम्ही टीव्ही पाहू नका किंवा वैरागी बना असे  अजिबात नाही. एवढेच की तुम्हाला “महत्त्वाच्या गोष्टी प्रथम” ह्या वचनाचे पालन करावे  लागेल.
At times you will feel your loved ones' presence. They may come to ... But the most important thing for you to know is that your loved ones want you to enjoy life.


Source: Interne
ज्ञानेश्वर तात्या टिंगरे,उस्मानाबाद:
नाही खरंच मला टायम नाही हो., मी गुंतवून घेतलं आहे स्वतःला माझ्या आभासी जगात मला माहिती नाही ते किती खरं किती खोटं आहे अन दुसरं म्हणजे मला त्या फंदात पण पडायला आवडत नाही.
नोकरी घर व ठराविक लोक यांच्या पलीकडे मला काही बघायला वेळ नाही.. तसा वेळ मिळतो पण मला तो देऊ वाटत नाही कारण मला फक्त आणि फक्त माझं दिसतं, दुसर्याच्या जीवनात डोकावून मला काय मिळणार आहे अन जर डोकावून पाहिलं तर मला ते काय देणार आहेत त्यांच्या समस्या सोडवल्या म्हणून ते मला थोडंच देवमाणूस म्हणून संबोधित करणार आहेत.
अन शेवटी मला देवमाणूस कोणी म्हटलं तरी आजकाल देवमाणूस कसा राहतो हे मी बघितलं आहे त्यामुळे मला ते उपकार बीपकार नकोत कोणाचे ,पाप पुण्याच्या भानगडीत मला नाही पडायचे.
झटपट श्रीमंत होता येतं का ? मला मान देणारे लोक आहेत का तिथं, माझ्या कुटुंबाला काही फायदा आहे का तुमच्या बोलण्याचा, का उगाचच नादी लावताय आम्हांला ?
तसा तर माझं निम्मं आयुष्य करिअर बनवण्यासाठी खर्च झालंय पुरती वाट लागता लागता राहिली आहे माझी नका सांगू मला टायमाचं, ?
माझ्या मित्रानं माझ्या मागून बंगला बांधला 2 कोटीची गाडी घेतली, मला अक्षरशः लाज वाटते मी अजून नवीन चार चाकी घेऊ शकलो नाही, ना नीट बंगला,
मला हे सगळं उभा करायच आहे काहीपण करून समजलं ?
माझं लग्नाच्या अगोदर सगळा टायम फालतू गोष्टीत गेला नको त्या ठिकाणी नको त्या वेळी मी तिथे जास्त खर्च केला मग तो वेळ असो की पैसा त्याची फळं मी आज भोगतोय.
कॉलेज जीवनात करियर घडवायचे सोडून आगाऊ शहाणपण केलं आख्खी जवानी वाईट कामासाठी खर्च केली त्यामुळे नाही आता वेळ मला कसलाही.
धावत्या जगात मला माझं अस्तित्व निर्माण करायचे आहे अन ते पण लोकांनी नाव काढलं पाहिजे नुसतं बघत राहिली पाहिजेत माझ्या बंगल्याला अन माझ्या गाडीला.
त्यो समाज, सेवा, परोपकारी वृत्ती ह्या गोष्टींचा मला लय झिट येतो बघा.
माझ्या स्वतःच्या आईबाबांना मी गावाकडं ठेवलं आहे कालांतराने त्यांना वृद्धाश्रमात पाठवण्याचा मी विचार करतोय अन तुम्ही मला समाजाचं सांगत आहात, खूळ लागलंय व्हय तुम्हाला,?
जावा तिकडं मला नाही असलं विचार करायला टायम बियाम..  



Source: Internet

प्रवीण दाभोळकर परळ ,मुंबई:

'नाही रे, ते करायला मला वेळ नाही मिळाला'..आपण सहज बोलून जातो आणि ही पण वेळही अशीच मारून नेतो. हळूहळू याची सवय होऊ लागते. लोक आपल्याला गृहीत धरायला लागतात तेव्हा खाडकन जाग येते. काहीतरी चुकतंय..वेळापत्रक बिघडलय..आपल्यालाच जाणवू लागतं आणि आपण कामाला लागतो.

वेळ नाही असं म्हटलं की प्रश्न तिथेच संपतो, तो समोरच्यासाठी..आपल्या मनाला कधी विचारून पाहिलं का? खरंच मला वेळ नव्हता? मग काय केलं मी?  

आपली यादी तयार होते. तेव्हा कळत ज्या गोष्टींसाठी वेळ देण्याची तशी फारशी गरज नव्हती तिथेच खूप वेळ घालवला आपण. ते काम महत्वाचं अशी मनाची समजूत आपणच काढल्याच आपल्याला आठवत. अनेकदा "भावनिक" होऊन काम केल्याच आठवत. भावनेला वेळेत आणि पैशात मोजता येत नाही.

सर्व सुखसुविधा असणारा विद्यार्थी नापास होतो, त्यावेळी कामाधंदा समभाळून शिकणारा पहिला येतो. "कामाची ओढ, तळमळ" किती हे यातून दिसत.

"कमिटमेंट" हा शब्द दुधारी तलवारी सारखा काम  करतो. शब्दाला जगल्याने एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी मिळू शकते. नाही जागल्यास काय होत याचा अनुभव प्रत्यक्षात घ्यावा.

प्रत्येक वर्ष ३६५ दिवसांनी भरलेलं कॅलेंडर घेऊन येत. जे सर्वांसाठी सारख असत. नवा संकल्प सर्वच करतात पण काही दिवसांनी त्याचा "प्राधान्यक्रम" बदललेला असतो. उदाहरण प्रत्येकाने आपापली ठरवावीत.

सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःच शरीर, मन निरोगी, उत्साहित रहावं यासाठी दिवसातून किती वेळ देतो हे ठरवावं. "स्वयंशिस्ती"नंतर कुटुंब, नोकरी, समाज हे ओघाने आलंच.

सर्वांना सर्वच गोष्टी करायच्या असतात. पण प्रत्यक्षात ते शक्य नसतं. थोडक्यात काय तर आपण प्राधान्य, महत्व कोणत्या गोष्टीला देतो ते महत्वाचं. याच "वेळापत्रक" आखल तर मला वेळ मिळाला नाही हे सांगण्याची वेळ येणार नाही.


Source: Internet

R. सागर:

21व्या शतकात प्रवेश करता करता विज्ञानाने बऱ्याच गोष्टी साध्य केल्या. अगदी कुठलीही गोष्ट कधीही सहजपणे उपलब्ध होऊ शकते असा विश्वास दिला. पण हे होत असतानाच काही गोष्टी मात्र हरवत चालल्या. आजकाल सगळीकडे ऐकायला मिळणारं वाक्य म्हणजे 'वेळच मिळत नाही..' खरंच मला वेळ नाही या वाक्यात तथ्य आहे का? मला वेळ नाही या वाक्यामध्येसुद्धा दोन प्रकार आहेत. एक मला खरंच वेळ नाही, मी खूप व्यस्त आहे. आणि दुसरा म्हणजे माझ्याकडं वेळ आहे पण तो तुझ्यासाठी नाही कारण मी माझ्या वेळेनुसार प्राधान्यक्रम ठरवला आहे आणि त्यामध्ये तू कुठंच नाहीस.
.
सध्या मी नोकरीनिमित्त बाहेर राहतोय. तरीही महिन्यातून 2-3 वेळा घरी जाणं घडतंच. गावाकडं गेल्यावर दुपारच्या वेळी किंवा संध्याकाळी निवांतपणे कधी बाहेर पडलोच तर कुठेतरी कट्ट्यावर 4 वयस्कर मंडळी बसलेली दिसतात. कधी त्यांच्याबद्दल विचार केला की लक्षात येतं की गेल्या कित्येक वर्षांपासून हा त्यांचा नित्यक्रम आहे. जेव्हा घरच्या जबाबदाऱ्या होत्या, कामात व्यस्त असायचे तेव्हाही आणि आताही.. कुणाकडेही आणि कुठलाही कार्यक्रम असू दे तिथे न चुकता हजर राहणाऱ्या त्यांच्या पिढीकडे बघितलं की प्रश्न पडतो की जर ते इतक्या वर्षांपासून आपले सगळे व्याप सांभाळून एकमेकांना सुख-दुःखात वेळ देत असतील तर आपल्याकडेच एकमेकांसाठी वेळ का नाही?
.
कदाचित आपल्याकडे वेळ नसण्यामागचं कारण हेही असेल की आजच्या स्पर्धेच्या वातावरणात भौतिक सुखाच्या शोधात फिरत असताना आहे त्यात समाधानी राहण्याची वृत्ती हरवत चाललीय. दुसऱ्याची प्रगती होत असताना कुठेतरी त्याच्याही पुढे जाण्याची सुप्त इच्छा आपल्याला खुणावत असते. त्यामुळेच वेळ असला तरी वेळ नाही असं भासवायचा प्रयत्न केला जातोय. त्यातच भरीस भर म्हणून मोबाईल हातात आलाय. त्या माध्यमातून सोशल मीडिया च्या आभासी दुनियेत आपण एकमेकांच्या खूपच जवळ वावरत असतो. तिथेही आपला बराच वेळ खर्च होतो. त्यामुळेही असेल आपण एखाद्याला प्रत्यक्ष वेळ देऊ शकत नाही.
.
काहीजण मात्र त्यातूनही वेळ काढून आपलं कार्य करत राहतात. त्याचंच उदाहरण म्हणजे आपली admin team. प्रत्येक आठवड्यासाठी नवीन विषय शोधणं, त्या विषयावर येणाऱ्या सगळ्या पोस्ट एकत्रित करून त्याचा ब्लॉग बनवणं हे सगळं काम ही team वेळात वेळ काढून करत असते. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. त्या कामातील सहकार्यासाठी आज ग्रुपवर सौदागर सरांची पोस्ट आली होती. ग्रुपमधलं कोणी आपल्या ब्लॉगसाठी योगदान देऊ इच्छित असेल तर तसं कळवा असं त्यांनी म्हटलं होतं. पण इथेही पुन्हा तेच. वैयक्तिक माझ्याबाबतीत बोलायचं झालं तर खरंच माझ्याकडं तितका वेळ नाही याची जाणीव मला झाली त्यामुळं त्या पोस्टला इच्छा असूनही प्रतिसाद नाही देता आला.


Source: Internet

 -अभिजीत गोडसे,सातारा:

         पृथ्वीवर माणव प्राणी हा विचार करणारा प्राणी आहे . या बुद्धीजीवी माणवाणेच काय ती प्रगती केली आहे . माणवाचे आयुष्य जेमतेम ७० ते ९० वर्षे आहे . या छोट्याशा आयुष्यात माणवाला सर्व काही करायच आहे . आपली ध्येय , आपली  स्वप्न पुर्ण करायची आहेत . या छोट्या आयुष्यात थोडा तरी इतिहास पुढील पिढीला ठेऊन जायच आहे . आणि या सर्वांनसाठी महत्त्वाचे आहे. ती म्हणजे वेळ. वेळच गणित जमने म्हणजे ऐक प्रकारे कौशल्यच! आणि म्हणूनच आपल्याला सारखा  काणावर पडनारा शब्द म्हणजे मला टायम नाही ...

       आयुष्यात वर्षाचे बारा महीणे आणि रोजच्या दिवसराञी चे चोवीस तास हे प्रत्येकाला सारखेच . अगदी अलीकडे पहायल गेले तर देश स्वतंञ झाला तेव्हा गांधी , आंबेडकर , नेहरू इ. महामाणवानां आणि असख्य कार्यकर्ते यांना ही चोवीस तासच होते . जगाचा विचार केला तर अमेरिका , जपान , चिन , रशिया अशा प्रगतीशील देशांनाही चोवीस तासच होते . ज्यांनी इतिहास घडवला , मोठ - मोठे शोध लावले , वौविध्य पुर्ण  आसे काम केले या सर्वांना तेवढाच वेळ होता जेवढा आत्ता आपल्या आहे . मला वाटते वेळच गणित हे व्यक्ती नुसार बदलते .आणि व्यक्ती सुद्धा वेळेनुसार बदलते . आज जेष्ठ व्यक्तीला वेळ जात नाही आणि तरुण युवकाला वेळ पुरत नाही . ज्यांच डोक रिकाम आहे त्याला वेळचवेळ आहे .. जो धेय्यान झपाटलाय त्याला वेळ नाही .. प्रत्येक व्यक्ती प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळी असते . तसेच त्याचा 'वेळ' ही प्रत्येक वेळी वेगवेगळा असावा ! नक्कीच त्या परिस्थिती मधे मला टायम नाही हे वाक्य तो म्हणत असेल किंवा म्हणत नसेल ही ....

        आजच्या स्मार्ट जमाण्यात कुणालाच वेळ नाही असे वेळोवेळी होत आहे . अनुभवतो आहे . धावत्या जगा बरोबर स्पर्धा करता करता सर्वच मेटाकुटीला आले आहेत . पन एक वर्षीचे , एक महिन्याचे , एक आठवड्याचे , एक दिवसाचे , एका तासाचे नियोजन पुर्वीक वेळापञक केले तर नक्कीच मला टायम नाही हे वाक्य उच्चारने कमी होईल .

मला टायम नाही….मग नक्की तुझा वेळ जातोय तरी कुठं ?(भाग-1)

🌱वि४🌿  या व्हाट्सअप्प ग्रुप वरून

मला टायम नाही….मग नक्की तुझा वेळ जातोय तरी कुठं ?(भाग-1)



Source: Internet

रविराज आकोसकर,लातूर:

प्रत्येकाने स्वतच्या काहीतरी प्राइयारिटी ठरवून आयुष्य खूप बांधून ठेवलंय.
अहो सहजच आपण कुणाला तरी मदत करण्यास नाकरतो पण समोरची व्यक्ति कुठे तरी दुखवली  जाते .आणी वरून आपण वेळ च कारण देऊन विषय बंद करतो..हे अस होण्याची कारणे म्हणजे  आपली फिक्स्ड पॉलिसी..
पण त्या नाकारले ल्या वेळात आपण पण काहीच नाही करत उगाच आपला आळस आणी कामाची प्राइयारिटी आपण सर्व कामात आडवी आणतो..
आणी  मी पण कधी कधी आई ची कामे माज्या प्राइयारिटी मुळे करत नाही..मला कुठेतरी चुकलं अस वाटत आहे..
आणी आजकाल पण आपण नाते आणी सम्बंध पाहून त्यांची कामे करायची का नाही हे ठरवतो.म्हणजे आपण एक तर आपली जीवनशैली पक्की करून ठेवली आहे नाहीतर आपण आपला तोटा पाहून कुठेतरी समोरच्या व्यक्तीला दुर्लक्षीत करत आहोत..
ह्याने फक्त समाजमन चिरडलि जातील..आणी आपले अनुकरण आपली पुढची पिढी नक्कीच करेन..
म्हणून आपण स्वतच बदलण्याची गरज आहे अस मला वाटत..धन्यवाद

Source: Internet

गणेश पाटील:

*"ते दिवस खूप छान होते,*
*घड्याळ एखाद्याकडेचं असायचे,*
*आणि वेळ सर्वाकडे…!*
आता घड्याळ सर्वांकडे आहे परंतु वेळ कुणाकडेच नाही....!
       का कुणाष्टुक आपण वेळ असून नसल्याचा आव आणतो. कदाचित आपण कायम दुसऱ्याबरोबर असतानाही स्व:च्या शोधात असतो म्हणून आपल्याला वेळ नसतो दुसऱ्याच्यानंत रमण्याचा
जेव्हा एखादे काम आपण आपलेच आहे असे समजतो तेव्हा वेळ कसा गेला हे सुद्धा नाही कळत पण याचा मला काय फायदा असे जेव्हा आपण विचार करतो तेव्हा वेळ असून ही नसतो आपल्याकडे. खरा वेळ तर आपला मी किती चांगला आहे , मी किती बलवान आहे हे सांगण्यात च जातो. दुसऱ्याच्या मनाचा विचार करायला वेळ नसतो. आपल्याला आपल्या मनोरंजनासाठी खूप वेळ असतो पण कधी आपण कुणाचे तरी मनोरंजन करावे हे वाटत नाही आपल्याला.
     आपण आपल्या कालिग सोबत खूप वेळ घालवतो आपण अनेकांशी खोटे बोलतो पण आपल्या कालिगास एकटे सोडत नाही. पण त्याच वेळी जेव्हा आपल्या घरातून फोन येतो तेव्ह तो फोन सुद्धा घ्यायला वेळ नसतो. खर तर तो फोन आपल्या काळजी साठी च असतो बर का??
वेळ निघून गेल्यावर कळन्यापेक्षा तशी वेळच येऊ नये याची काळजी घ्या. आपलं म्हणून तरी वेळ द्या आणि आपलं करून टाका सगळ्यांना !!!
Source: Internet

दत्तात्रय डोईफोडे,वाशीम:
होय हे खरं आहे की आजकाल वरील वाक्य सहसा सर्वांच्याच तोंडून बाहेर पडत,

आज खरचं नोकरी, व्यवसाय, पैसा यामागे सतत धावत राहून वेळ कधी निघून जातेय याचा पत्ताच लागत नाही, पण तरीही वेळात वेळ काढून काही कर्तव्य बजावत असणारे ही आहेत.

शिक्षकांना शिकवायला, डॉक्टरांना पेशंटना तपासायला, विद्यार्थ्यांनाही शिकायला वेळच नाही, आता वेळ आली आहे की आजकाल का वेळ नाही सर्वांकडे हे शोधण्याची…

Source:Internet

   किरण पवार,औरंगाबाद :  
            वेळ ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येक बाब बदलवण्याच सामर्थ्य ठेवते. पण सध्या असं चित्र पहायला मिळतं की, बरेच जण मला वेळ मिळत नाही म्हणून तक्रार करतात. या तक्रारी करुन किंवा या विषयावर कोणी एकाने काही सुचवल्यामुळे हा प्रश्न मुळात सुटत नाही. फार फार तर थोड्या प्रभावामुळे आजची तक्रार लांबणीवर जाईल. याच्यावर तोडगा काढण्यासाठी जो-तो स्वत: समर्थ असला पाहिजे. *आपल्याला जे साध्य करायचंय त्या वाटेत कोणती गोष्ट किती महत्त्वाची आणि आपण अधिक प्राधाण्याच्या गोष्टीला किती जास्त वेळ देऊ शकतो, हे ठरवलं पाहिजे.*
          बऱ्याच वेळा अशा गोष्टी आपल्यासोबत होतात. ज्यातआपण जेव्हा *टाईमपास करतो तेव्हा वाटत की, आपल्याकडे अजून भरपूर वेळ आहे आणि मी नंतर ती गोष्ट पूर्ण करेन. पण ही एक प्रकारची आपल्या मनाची झालेली तात्पुरती चुकीची समजूत असते आणि ज्याक्षणी टाईमपास सोडून त्या गोष्टीच्या पाठी लागतो त्यावेळी लक्षात येतं की, आपल्याजवळ तर वेळ खूप कमी उरलाय.* यातून नंतर बऱ्याच गोष्टी उद्भवतात. जसं उदा.:- नैराश्य येणे, उदास वाटणे... वगैरे. मग कधीकधी आपण अशा स्थितीत आपल्या जवळच्या मित्रांचे बरेच सल्ले घेतो पण त्यातून मन समाधानी होत नाही. कारण त्याला पुढे दिसत असलेल्या कमी वेळेची भिती वाटतच असते.
             *एकदा प्रसिद्ध लेखक उत्तम कांबळे म्हणाले होते की, तरुण वय(साधारण तीशी येईपर्यंत) हे असं वय आहे ज्यात तुम्ही ठरवलं तर तुमच्याकडे वेळच वेळ आहे*. आणि ही गोष्ट खरीच आहे. कारण या वयात जी जिद्द असते ती जिद्दच इतकी अफाट असते की, तीच महत्व ती तुम्हाला पुर्णत्वाला नेऊनच सिद्ध करते.

आपला वेळ जातो कुठे व का?
           निश्र्चितच आपला वेळ जातोय म्हणजे तो वेळ का जातो याच कारणही आपण स्वतच असल पाहिजे. *सध्या आपल्या सर्वांचा वेळ जास्त घेणार महत्त्वाच ठिकाण म्हणजे सोशल मीडिया*. या सोशल मीडियावर वेळ कसा जातो याच्याशी प्रत्येकजण आता परिचित आहे. याच्यापासून शक्य तितका वेळ वाचवायला आणि तो महत्त्वाच्या गोष्टीत वळवायला आपण शिकल पाहिजे.
           दैनंदिन जीवनात बऱ्याचदा रस्त्यावर कोणी ना कोणी भेटत रहात. पण आपण या भेटीत बऱ्याच वेळा अडकून पडतो. या अशा गोष्टींमधून साध्य काहीच होत नाही उलट आपला वेळ जातो. *त्यामुळे वेळेवरही एकदा विचार करून विश्वस्त तोडगा काढाच.*

या विषयावर कविता:-

वेळ म्हणतो वेळ दे
स्वप्न पुर्णच करेन
दुर्लक्षित करशील मला
ध्येय तुझ दूर करेन,

हिशोब ठेवशील माझा
व्याजासहीत चुकता करेन
बुडवशील कर जर
तुला नजरअंदाज करेन,

थोड संयमाने घे
एक दिवस बक्षीस देईन
चुकांना वेळेवर दुरुस्त कर
मी तुझा सन्मान करेन,

अखेर निर्णय तुझाय
तेव्हा सावकाश ठरवं
पण वेळेला वेळ देशील
तर तुलाच मी राजा करेन.

Source: Internet

विश्वनाथ कदम,हिंगोली:
                                                                      
 मुळात. हा विषय प्रतेक मानवाच्या दैनंदीन जिवनाशी निगडीत आहे.परंतु विषयाच्या दंभिरतेत मागील दोन चार वर्षात विशेष भर पडलेली दिसते.                                               मुळात विषयाच वास्तव्य वेगळच आहे,  विषयीचा अभ्यास केल्यास 'मला वेळ नाही' म्हननारी दोन प्रवूत्तीची मानस समाजात असतात.     पहिला वर्ग ज्यांना मुळात खरच वेळ नसतो, व दुसरा ज्यांना मात्र भरपुर वेळ आसतो,परंतु ते वेळ नसल्याची आव आनतात.                             ऐकेविसाव्या शतकात जशी विज्ञानाची प्रगती घडून आली ,तशीच आधोगती मानवी विचाराची झाली आहे.                                                             एकंनदर आधुनिकतेच्या काळात स्वत: साठी unlimited परंतु इतरांचा विषय आला कि....    ''मला  टायम नाही.''.      या प्रवूत्तीत वाठ झालेली आहे.                                         

Source: Internet
समीर सरागे यवतमाळ:
 सर्वांच्या जीवनात वेळेला अनन्य साधारण महत्व आहे.   कारण की आज लोकांच्या गरजा देखील वेळेवर अवलंबून आहेत. जेवढे तंत्रज्ञान विकसित झाले तेवढे आपण वेळेच्या बंधनात दिवसेंदिवस गुरफ़टत चाललो आहोत. आज च्या जीवनमानात पैशा पेक्षाही वेळेचे फार मूल्य आहे . कारण पैसा, धन संपत्ति देखील गेलेली वेळ परत आनु शकत नाही.
त्यातच मला वेळच नाही  हा शब्द अलीकडे अगदी परवलीचा होऊन बसला आहे. कुठेही कधीही ते सहज  कानावर पड़ते.   व मला वेळ नाही ही एक मोठेपनाची बाब बनली आहे. अगदी आपल्या जवळच्या नातेवाईक ,आप्तपरिवार  कडून किंवा जवळच्या मित्रा कडून हे शब्द नेहमी प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष पणे आपल्या कानावर पडले  असतील. म्हणजे कर्तव्ये, जबाबदा-या सहजा सहजी टाळण्यासाठी  अशा शब्दाचा सर्रास वापर केल्या जातो. म्हणजे मी किती बिझी आहे ?, मि किती Importent व्यक्ति आहे असा शंदेश त्यातून त्याला द्यायचा असतो.आणि मला किंचित ही वेळ नाही अस काही जनाना त्यातून सांगायचं असतं.

खरे तर मला वेळच नाही असे म्हणणे म्हणजे आपण एकप्रकारे आपली स्वतःचीच  फसवणूक करने होय.

हल्ली आजच्या धकाधकीच्या युगात कोना जवळ तितका वेळ शिल्लक राहिला नाही आणि ते १०१ टक्के खरही आहे.  मनुष्याचे जीवन जगणे अलीकडे  फार आवहानात्मक आणि संघर्षमय झाले आहे. खास करून शहरी भागातील जीवनशैली बाबत बोलायचे झाल्यास नौकरी आणि कामा करिता दिवसभराची धावपळ , कर्तव्ये,  कौटुंबिक जबाबदारी आणि त्यामुळे उतपन्न होणारा मानसिक तान (tress)या सर्वामुळे तो व्यक्ति आपल्या मित्र परिवाराला योग्यरित्या वेळ देउ शकत नाही. परिणामी नात्याय दुरावा निर्माण होत आहे.  म्हणजे तो आपल्याच व्यस्त जीवनात हरवून बसला आहे. परिणामी हे देखील वेळ न मिळण्याचे एक कारण आहे.

पूर्वी देखील व्यस्त जीवन असायचे परंतु त्या सोबतच मायेचा ,आपुलकिचा , औदर्याचा ओलावा असायचा म्हणजेच तो आपल्या सर्व कर्तव्य आणि जबाबदार्या सांभालुन आपले नाते आणि  नात्यातील आपलेपन  जपायचा,
याउलट आजच्या तरुणपीढ़ी कड़े बघता  आजची तरुण पीढ़ी  आपला ७०% वेळ हा इंटरनेट आणि सोशल मीडिया वर  वाया घालवत असल्याचे एका माहिती नुसार उघड़ झाले आहे. ही बाब आजच्या पीढ़ी करिता धोकयाची घंटा आहे. म्हणजेच प्रत्येक वेळी आपल्याला घाईत आणि धावपळीत दिसनारी आजची युवा पीढ़ी ही माहिती तंत्रज्ञानाच्या  युगात इंटरनेट आणि  सोशल मिडियाच्या मायाजाल मध्ये मग्न आहे. ज्या सोशल मीडिया आणि इंटरनेट चा आविष्कार हा माहितीची अदान प्रदान अगदी सहज आणि सोप्या रितिने होण्या करिता तसेच नवनवीन माहिती संकलित करण्या करिता , आपले जीवन जगणे थोड़े सूखकर बनवन्या करिता या gadgets आणि उपकरणांचा आविष्कार झाला आहे. त्याचे गुलाम बनून त्याच्या आहारी जाण्या करिता नाही. आजची युवा पीढ़ी यात मात्र आपला वेळ दवडत आहे. वेळ घालविन्या करिता मनोरंजन म्हणून आपन चित्रपट बघणे, पुस्तके वाचने , खेळ खेळणे,  आपला परिवार किंवा आपल्या आप्तेष्टा बरोबर वेळ घालवने वैगरे  असे मनोरंजनाचे पर्याय असायचे म्हणजेच यातून मनोरंजना बरोबर करमनुक तर होतच असे सोबतच ,ज्ञान , मानुसकी आणि आपलेपन देखील जपल्या जात असे. परंतु आज प्रगत तंत्रज्ञानाच्य या भौतिक युगात माणसे तांत्रिक दृष्टया जेवढी जोडल्या गेली आहे तेवढीच मनाने   दुरावल्या देखील गेली आहे.उदा. मागे एका वृत्त वाहिनीने मातृदिवस या पर्वावर मुंबईचा एक   प्रसंग दाखविला होता कि,  एका वृद्ध महिलेचा  मुलगा अमेरिका स्थित न्यू यॉर्क शहरात नौकरी करण्या करिता गेला तीथे काही दिवस वीसा घेऊन राहिला, त्याला ग्रीन कार्ड मिळाले व तो तीथे कायमचा स्थाईक झाला त्याची आई त्याला 5 वर्षा पासून सतत  फोन करायची कधी येणार आहेस वैगरे परंतु तो नेहमी मला कामा मुळे वेळच मिळत नाही वैगरे उत्तरे द्यायचा, नंतर टाळटाळ  सुरु झाली व काही दिवसांनी  फोन येनेच बंद झालेत शेवटी वेदनेने निराश झालेल्या या वृद्ध  आईचा मृत्यु झाला मग फ्लैट मधील काही रहिवाशाना कळले की इथे एक वृद्ध महिला राहत होती व ति आता दिसेनासी झाली आहे मृतदेहाची दुर्गंधि सुटल्यावर माहिती पडले की ती महिला दोन दिवसा पासून मृतावस्थेत आहे. तेव्हा तिचा मुलाला कळविन्यात आले परंतु  तरीही तो आला नाही. सांगायचे तातपर्य म्हणजे  हेच की,एका  मुलाला आपल्या जन्मदात्रीला  भेटन्या करिता देखील सवड मिळाली नाही म्हणजेच  तो भावना शून्य वा  संवेदनहीन झाला होता. म्हणून आज या आभासी दुनियेत आपण पैसा,धन संपत्ति  तर भरपूर कमावली त्याबरोबर   आपण आपले मुल्यवान नातेसंबंध, आपले  अस्तित्व आणि संवेदना गमावुन बसलो आहे.
वेळेचा  चांगला सदुपयोग करन्या   बरोबरच  संवेदना व आपलेपन जपने देखील महत्वाचे आहे. परंतु वेळेचा विनाकारण  अपव्यय करणे  म्हणजे आपले भविष्य आणि आपले अस्तित्व  अंधकारमय बनविने होय.

निकिता गडाख,अहमदनगर:

नेहमीचच झालेय हे रोज च ऊशीर
अजून थोडा वेळ मिळाला असता तर बर झाले असते..,
अस आपण सहज म्हणून जातो
पण मला एक कळत नाही आपला वेळे जातो कुठे मग?
खरतर जर वेळच अचुक नियोजन केले तर सगळ्या गोष्टीना बरोबर वेळ देता येईल.
यासाठी आपण यादी बनवू शकतो
1.अती महत्वाचे
2.जरा कमी महत्त्ववाचे
3. महत्त्ववाचे
जे ते काम ज्या त्या यादी मध्ये टाकून त्या प्रमाणे करून कामे पण वेळे पण मिळेल.
   
Source: Internet

निलेश पाटील:

"मला वेळ नाय" हा डायलॉग साधारणपणे सगळ्यांच्याच तोंडी असतो . असं म्हणतात की धकाधकीच्या जीवनात वेळ कुणालाच नाही. मग वेळ जातो कुठे हा सगळ्यांनाच मोठा प्रश्न आहे. याला वेळेच नियोजन नसणे हे मुख्य कारण आहे. आजच्या घडीला युवकांचा वेळ खास करून सोशल मीडिया वर जातो. फेसबुक, व्हाट्सउप ,इन्स्टाग्रामवर जातो. महत्त्वाचे कामे करायला वेळ नसतो. तेव्हा मग आपसूकच म्हणतात मला टाईम नाही.






तेजस महापुरे,कराड:
.वेळ अत्यंत महत्त्वाचा आहे.कारण काहीही करून गेलेली वेळ परत आणता येत नाही.सध्या प्रत्येक जण हेच सांगतो की मला वेळ नाही, खरतर हेच सांगण्यात बहुमूल्य वेळ जात आहे.सध्या वेळ जात आहे ते नको ते कामे करण्यात, उदाहरण घ्यायचे झालेच तर अनेक मिळतील. सगळ्यात जास्त वेळ जात असेल तर तो मोबाईल मुळेच का तर उगीच काही कारण नसताना आपण मोबाईल ची स्क्रीन स्क्रोल करत असतो,  घरातल्यांनी जर एखादे काम सांगितले तर म्हणतो की मला नाही जमणार मी कामात आहे,आणि काम ते कसल उगीच निरर्थक पोस्ट्स पाहण्यात,आजकाल माणसे तुटण्यात सगळ्यात जास्त हातभार असेल तर तो या मोबाइलचा आहे,  टाइम जातोय तो इथेच जातोय, कातर मोबाइल मुळे फेसबुक,व्हाट्सअप्प, यांच वाचन आवश्यकतेपेक्षा जास्तच वाढलंय,, जे की अजिबात फायदेशीर नाही याने एकाच अवस्था निर्माण होईल जी म्हणजे मला अजिबात वेळ नाही असे बोलणे,यामुळेच आपण अनेक चांगल्या गोष्टी करू शकणार नाही, आपण हेच सांगत बसू की करावं तर खूप काही वाटत पण वेळ नाही,करण वेळ नसतो असे शक्यच नाही, आणि माणूस कितीही व्यस्त असला तरी तो आवडत्या गोष्टींसाठी वेळ काढतोच, तर आजपासून मला अजिबात टाइम नाही असे म्हणून वेळ घालवण्यापेक्षा आवडत्या गोष्टींसाठी वेळ देणे सुरू करायला हवे असे मला वाटते..... 

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************