नेमके कशात बिझी असतो आपण एवढे?



गणेश भंडारी, अहमदनगर.

"गण्या, अरे माझ्या मोबाईलचं बिल भरलं का?"
"नाही ना आई"
"अरे भर ना मग! तीन दिवसांपासून मागे लागलेय तुझ्या, अजूनही भरलं नाहीस? त्या आयडियावाल्या बाईचा रोज फोन येतोय बिल भरा म्हणून."
"भरतो गं आई. अगं वेळच भेटला नाही. बिझी आहे सारखा."
"एवढा रे कशात बिझी? आणि गेल्या पंधरा दिवसांपासून तुझ्या मागे लागलेय, तो मागच्या खोलीतला बल्ब गेलाय; तेवढा बदल म्हणून. तुझे आपले उत्तर ठरलेले-बिझी आहे म्हणून! अरे, एवढी काय कामं असतात तुला न कशात एवढा बिझी असतो काही कळत नाही मला! नेहमी त्या गांधीजींचे नाव घेतोस ना, त्यांचा आदर्श घे जरा. त्यांनाही तुझ्यासारखाच चोवीस तासांचा दिवस आहे ना, पण बघ त्यांनी किती प्रचंड कामे करून ठेवली. त्यांनी देशच काय, पूर्ण जग बदलले आणि तुझ्याच्याने साधा एक बल्ब बदलून होत नाही?"

आईच्या या तोफखान्यापुढे मी काय बोलणार बिचारा! पण तिचेही काही खोटे नाही म्हणा! ती किती किरकोळ कामे सांगते आपल्याला, पण तीही आपल्याच्याने होऊ नयेत? नेमकी गडबड काय होतेय? नेमके कशात एवढे बिझी आहोत आपण? मुळात आपण खरंच बिझी आहोत का? साला विचार करायला पाहिजे यावर, नाहीतर गोष्टी हाताबाहेर जातील....

गेल्या चार तासंपासून विचार करतोय, आपण नेमके कशात बिझी आहोत; पण नेमके उत्तर काही सापडेना राव! काय करावे बरे? कोणाची मदत घ्यावी का? कोण बरे मदत करीत उत्तर शोधायला? अरे हो- एक व्यक्ती आहे! मघाशी आईने बोलता-बोलता गांधीजींचे उदाहरण दिले ना, त्यांनाच विचारुया! तेच काहीतरी मार्ग दाखवतील!

"प्रणाम बापू!"
"ये बेटा! आज कसाकाय वेळ मिळाला तुझ्यासारख्या बिझी माणसाला?"
"बास का बापू, आता तुम्हीही बोलणार का मला?"
"मीही म्हणजे? आधी कोणी काय बोललं का तुला?"
"तर! आई बोलली. तिने काही किरकोळ कामे सांगितली होती, पण खरे तर माझ्याकडून ती करून झाली नाहीत. बिझी होतो म्हणून सांगितलंय तिला, पण मला कळेना की असं का होतंय ते."
"असं म्हणजे?"
"म्हणजे सतत बिझी-व्यस्त असल्यासारखं तर वाटतंय; पण कामं तर कोणतीच होत नाहीयेत. नेमकं कळेनाय की मी एवढा कशात बिझी असतो? वेळ का पुरत नाही? मघापासून विचार करतोय यावर, पण उत्तर काही सापडेना. आईने तुमचे उदाहरण दिले मघाशी. मग विचार केला, चला तुमच्याशीच बोलूया. प्लीज सांगा ना, तुमच्याकडेही माझ्याइतकाच वेळ आहे, पण तुम्ही किती प्रचंड कार्य केले तेवढ्या वेळात. मग मलाच का जमत नाही? कुठे चुकते माझे?"
"अरे, अरे! एवढ्या साध्या गोष्टीसाठी किती परेशान होतोस!"
"साध्या? साधी गोष्ट आहे ही?"
"नाहीतर काय! मला तुझी समस्या कळली. तू बिझी असतोस-पण निरर्थक गोष्टींमध्ये. आणि तुला वेळेचे नियोजनही शिकावे लागेल. फार कठीण नाही ते. प्रयत्नांनी जमून जाईल. जीवनाला थोडी शिस्त मात्र लावावी लागेल."
"काय करायचं, थोडं सविस्तर सांगा ना!"
"सगळ्यात आधी आपला वेळ कुठे खर्च होतोय याचा जरा बारकाईने विचार करावा लागेल. त्यातूनच समस्येवरचा उपाय मिळेल. आता मला सांग, दिवसाचे तास चोवीस, बरोबर? त्यांपैकी झोपण्यात किती जातात आणि नोकरीच्या ठिकाणी किती जातात?"
"झोपण्यात साधारणतः सात आणि नोकरीसाठी जाण्यायेण्याच्या वेळेसह म्हणजे सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी सात-म्हणजे अंदाजे साडेनऊ तास."
"म्हणजे हे वजा जाऊन तुझ्याकडे उरले साडेसात तास. त्यातील अडीच तास तुझी दैनंदिन कामे, जेवण, अंघोळ यात जातात असे म्हटले तरी तुला पाच तास मिळतात. आता या पाच तासांचे काय करतोस सांग पाहू?"
"अं...अं खरं सांगू का? मोबाईल, व्हाट्सअप-फेसबुक आणि टीव्ही पाहण्यात खूप वेळ जातो हो!"
"दॅट्स इट! तुझ्या बिझीपणाचे मूळ त्यातच आहे! तूच नाही रे, तुझ्या पिढीतल्या अनेकांचे पाहिलंय मी. मध्यंतरी एक सर्व्हेही झाला होता यावर. भारतातल्या मुलांचे रोज सरासरी चार ते पाच तास मोबाईल व टीव्हीवर खर्च होतात. कसा रे इतर कामांसाठी वेळ मिळेल मग?"
"पण बापू, जीवनात काहीतरी विरंगुळा हवाच ना?"
"मी कुठे म्हणतोय की निरस जीवन जगा म्हणून? पण कोणत्याही गोष्टीचा प्रमाण असावे रे! मला सांग, या जगात केवळ मोबाईल-टीव्हीनेच विरंगुळा मिळतो का? आज अनेकानेक उत्तमोत्तम पुस्तके अगदी सहज उपलब्ध आहेत. कधी वाचले होते शेवटचे पुस्तक? काहीतरी उत्तम लिहावे, त्यासाठी चिंतन करावे. हिंडावे-फिरावे. माणसे वाचावीत. केलंय कधी हे? त्यातून विरंगुळा मिळतोच, पण ज्ञानही वाढते."
"हे सगळं करण्याचा कंटाळा येतो हो खूप!"
"उत्साह पाहिजे उत्साह! कंटाळा म्हणजे उत्साहाची कमी! उत्साह वाढवण्यासाठी जीवनशैली बदलली पाहिजे. रोज रात्री कितीला झोपतोस आणि सकाळी कितीला उठतोस?"
"रात्री साडेबारा-एक होतात आणि मग सकाळी उठायला आठ-साडेआठ."
"ताजी हवा कशी मिळेल मग? माझ्याकडे बघ-मी रात्री आठला झोपतो आणि पहाटे चारला उठतो. तू निदान सहाला उठायचा प्रयत्न कर. सहाला उठावे, बागेत फिरायला जावे. तेथेच पंधरा मिनिटे ध्यान करावे."
"खरेच की! किती फ्रेश वाटेल नाही?"
"हो. त्यामुळे दिवसही चांगला जातो. योग्य नियोजन करता येते"
"खरं, ते वेळेच्या नियोजनाविषयी बोलला होतात-"
"आपल्याकडे उपलब्ध वेळेचे योग्य नियोजन करायला शिकले पाहिजे. निरर्थक गोष्टींवर खर्च होणारा वेळ कमी करून तो आवश्यक कामांसाठी कसा वापरता येईल हे पाहिले पाहिजे. समजा तू व्हाट्सअपवर दोन तास खर्च करतोस. ते खरेच आवश्यक आहे का? नाही वापरले तर काय बिघडेल? मला वाटते काही बिघडणार नाही."
"होय. मध्यंतरी मी नऊ-दहा महिने व्हाट्सअप वापरात नव्हतो, पण फारसे काही बिघडले नाही. आवश्यक माहिती, निरोप इकडून तिकडून मिळतच गेले."
"असाच विचार प्रत्येक गोष्टीचा कर. टीव्हीवर काय पाहतोस? त्या राधा-शनायाच्या भानगडीच ना? काय उपयोग तुला त्यांचा? तो वेळ तू दुसरीकडे वापरू शकतोस. बातम्या पाहत असशील तर याचाही विचार करावा की यातील किती माहिती माझ्यासाठी खरेच आवश्यक आहे? माणसाने आपल्या खऱ्या गरजा ओळखायला शिकले पाहिजे.वेळ कुठे निरर्थक खर्च होऊ शकतो, याची केवळ एक-दोन उदाहरणे दिली मी. स्वतःच्या बागण्याचे बारीक निरीक्षण केलेस तर आणखीही बरेच काही सापडेल तुला, होय ना?"
"खरंय."
"वेळेचे नियोजन करण्याचेही एक तंत्र असते. प्रथम दीर्घ मुदतीची लक्षे ठरवावीत. म्हणजे की मला या एका वर्षात काय काय साध्य करायचंय? मग ते कसे साध्य करता येईल, त्यादृष्टीने महिना, आठवडा, दिवस व अगदी तासाचेही नियोजन करावे. मायक्रो प्लॅंनिंग!"
"इतके साचेबंद आयुष्य?"
"कोण म्हणतं? एकदा करून तर बघ! नियोजनाप्रमाणे ध्येये साध्य करण्यातही एक वेगळाच आनंद असतो. आणि अगदी साचेबंदपणा टाळण्यासाठी थोडी लवचिकता-वेळेचे मार्जिनही ठेवावे."
"अजून काय काळजी घ्यावी नियोजन करताना?"
"केवळ कागदावरचे नियोजन नको आपल्याला, तर त्याची अंमलबजावणीही व्हायला पाहिजे. म्हणजे बघ की हा एक तास मला वाचनासाठी खर्च करायचाय असे ठरवले आहे, तर तो त्याच गोष्टीसाठी खर्च व्हावा. माझे काही किस्से तू ऐकलेच असतील की कसे मी ठरलेल्या वेळी ठरलेली कामे करायचो ते. त्या बाबतीत स्वतःशी प्रामाणिकपणा व आत्मनियंत्रण खूप महत्वाचे. वाचनाच्या मध्येच तुला मोबाईल खुणावेल, पण कंट्रोल-तुला सध्या वाचनच करायचंय! आणखी एक-हे नियोजन म्हणजे तुझी वैयक्तिक बाब आहे. तुझ्या गरजेप्रमाणे तुला ते करायचंय. तुझ्या गरजा तुझ्यापेक्षा जास्त चांगल्या दुसरे कोणी ओळखू शकणार नाही. तेव्हा या बाबतीत ऐकावे जनाचे अन करावे मनाचे! पण एकदा जे काही ठरवले असेल, तेथून माघार घेणे नाही! मधून मधून नियोजनाप्रमाणे आपण वागतोय का याचाही रिव्ह्यू घ्यावा. कुठे चूक होत असेल, नियोजनात सुधारणा पाहिजे असे वाटत असेल तर त्याप्रमाणे बदल करावेत."
"साध्या गोष्टी आहेत हो या!"
"तर! पण अमलात आणून बघ-तुझा बिझीपणा कुठल्या कुठे पळून जाईल आणि महान कामे करण्यासाठी तुला वेळच वेळ मिळेल!"

खरेच बापूंशी बोलून एक नवी दिशा मिळाली हो! डोक्यात बल्बच पेटला म्हणा ना! आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे वागायला हवे. मग बघू आईची बोलणी कशी काय बसतात ते!
===========================


अर्जुन (नाना) रामहरी गोडगे
सिरसाव ता. परंडा जि. उस्मानाबाद

             आजची तरुण पिढी माझ्यासह सोशल मीडियाच्या आहारी गेली आहे. फेसबुक, व्हॅटअप, इन्स्टाग्रामचा अतिरेकी वापर करत आहे. काहीही काम नाही लै बुझी असल्याचा आव आणतय....लिखाण काय करत नाही, वाचन संपलय, बुद्धी गहाण ठेवून लाईक, कमेंटच्या नादात चांगल्या गोष्टीला मुखलीय.

           मला तर वाटतंय काहीतरी लिहलं पाहिजे पण कामाच्या व्यापामुळे जमत नाही, तरीही माझ्या आवाक्यात विषय असला की मी सोडत नाही.....एवढी चांगली संधी असून देखील तरुण लिहत नाहीत. "कीव करावी वाटते माझसारखं लोकांची" आज आपलं लिहन छापून येणं ही काय सोपी गोष्टी नाही. फुकट मिळायला त्याचं मोल नसतं.

           दोस्तांनो लै बिझी असल्याचा आव आणू नका,लिहत राहा,बुद्धीची मशागत करत राहा...."नाहीतर कधीतरी वाटेल षंढ सोशल मीडियावर तासनतास घालवला हाती का आलं घंटा ? जास्त नाटकी बोललोय असं नाही ही खरी स्थिती आहे.


===========================

शिरीष उमरे नवी मुंबई

मी स्वभावाने तरुण अाहे. 😎वयाने म्हातारा आहे.😝  मला आठवते कॉलेजमध्ये शिकत असतांना मी लय बिझी राहायचो.😌

कधी एनसीसी त 💂‍♂तर कधी वादविवाद स्पर्धा 🎙 तर कधी निवडणुकीच्या हाणामारीत 🏑🤼‍♀ तर कधी कॉलेजच्या गॅदरींग मध्ये 🎼🎤🎸🎭!!

घरच्यानी सोडुन दिलेला सांड जसा... आमच्या वेळी स्पर्धा परीक्षा, मोबाइल, सोशल मिडीया वैगेरे चा बागुलबुवा नव्हता. 😅

आज लक्षात येते की एका विशिष्ट वयात आपण खुपच बिझी असतो आणि ते लादलेले मुळीच नसते. नाविन्याची आवड, करुन बघायचे धाडस व गरम रक्त ह्यातुन वेळेचे भान राहत नाही.. ह्यावेळी योग्य मार्गदर्शक मिळाला तर खुपच छान...
अन्यथा पस्तावा शिवाय हातात काही पडत नाही...

मोबाइल , सोशल मिडीया अजिबात वाईट नाही जर त्याचा वापर योग्यरित्या केला तर च..

आज आम्ही म्हातारे विकीपिडीया, गुगल, युट्युब, फेसबुक, व्हॉटस्अप, लिंकीडइन, इंस्टाग्राम, ट्विटर व कित्येक अॅपस् याचा वापर बिझनेस साठी करतो. पैसे कमावतो. मग काय हरकत आहे ह्यावर बिझी राहण्यात ? आज डीजीटल मार्केटींग हे खुपच महत्वाचे आहे.

तरीही  असे वाटते की युवा पीढीने व्यायाम, वाचन, लिखाण, चर्चा ह्यासाठी थोडा वेळ काढायला हवा. स्वत:च्या हॉबीज जपायला हव्या...

पोपटपंची थांबवतोय... बाकी तरुण पीढीला आवाहन की तुमचे बिझी असणे हे कीती महत्वाचे हे सिध्द करण्याचा प्रयत्न करा.. फकित चार ओळी !! 👍🏻
🙏🏼😇


===========================



अनिल गोडबोले
सोलापूर

पृथ्वीला स्वतःभोवती आणि सुर्या भोवती फिरताना लागणारा कालावधी तर माणसाने मोजला व त्याच्या आधाराने तो रोज काम करू लागला.

अजून काही तरी मिळवायचं आहे या आशेने किंवा माझ्या मनाला वाटत म्हणून एका एका गोष्टींच्या मागे लागला.. त्यामूळे ज्याच्या मागे लागला त्याला वेळ द्यावा लागला आणि बाकीच्याला वेळच शिल्लक राहिला नाही.

उद्योग आणि त्यांच्या वाढी साठी माणसाच्या गरजा वाढत गेल्या किंवा वाढवत राहण्याचा खेळ सुरू झाला.

मग technology ने माणसाला भयानक वेग दिला. वेग मिळाला की माणूस निवांत राहील अस वाटू लागलं.

मग निवांत वेळेत तो अजून पळू लागला अजून पैसे संपत्ती कमवू लागला. वेळच नव्हता तेव्हा..

मग त्याने एवढं ओरबाडले की त्याच्या पुढच्या पिढीला एन्जॉय करण्यातून वेळ मिळेना.
आणि जे वेळ काढून जगत होते त्यांना काहीच राहील नाही म्हणून कमवण्यासाठी पळू लागले आणि बीझी झाले.

ज्यांच्याकडे पैसे आणि टेक्नॉलॉजी आहे ते त्यांच्या प्राथमिकता सोडून दुसरं काहीतरी करत आहेत.

तर शेवटी महत्त्वाचं काय.. वेळ.. नाही ...
तर आपली प्राथमिकता महत्त्वाची

बीझी आपण आपल्या जगातच आहोत. आपल्याला हे पाहिजे आणि ते पाहिजे त्या मध्ये सुद्धा.. मला जस पाहिजे तेच झालं पाहिजे..

आपल्याच शेपटाला काठी बांधून त्याला गाजर बांधलं आहे आणि त्याच्या मागे पळतोय आपण..

जगतो आहोत का आपण.. हे जग कोणीतरी चालवत आहे आणि आपण पळतोय..

खरोखर बीझी आहोत का आपण.. निसर्गात, झाडात मनासारखा निसर्ग सौंदर्य बघत कधी फिरणार.

मित्र नावाचं एक नात दिल होत निस्वार्थी पणे... त्याला भेटून खूप आनंद व्हायचा.. पण बीझी असल्यामुळे तोच भेटत नाही..

एक दिवस बीझी असतानाच घरचे पोचवायच्या आत जरा जगलो तर बर होईल..

खरच जरा बीझी पणा सोडून डोळे मिचकावून जगाकडे बघुयात का..!

===========================



डॉ. विजयसिंह पाटील. MBBS.DA.कराड...

मला वाटते, बिझी असणे आणि ओक्युपाईड असणे यात फार मोठा फरक आहे.उदा. मी बिझी आहे याचा मी लावलेला अर्थ, पूर्णपणे कामात व्यग्र. पहाटे उठून चालण्याचा व्यायाम,मग चहा, प्रातर्विधी आटपून देवपूजा करून, सकाळचा नाश्ता. व मग दिवसभर घाण्याचा बैलासारखं काम आणि फक्त काम. उसंत मिळालीच तर दुपारचे लगबगीनं उरकलेलं जेवण. संध्याकाळच्या पलीकडे व रात्रीच्या अलीकडे कधीतरी हे काम संपतं. (मध्येच घराचं बांधकाम, मग फार्महोऊस, गाड्या बदलणे हा क्षणिक विरंगुळा).घरी आल्यावर जेवणास वेळ असेल तर चहा घेऊन गावात मित्रांकडे फार फार तर अर्धा तास गप्पा. परत घरी. जेवण झाल्यावर त्याच त्याच टीव्ही मालिका. मग अंथरुणावर पडल्या पडल्या झोप. परत पहाटे उठून नेहमीचाच दिनक्रम. महिन्यातून एकदा दीड दिवस सुट्टी घेऊन कुठल्या तरी ठिकाणची गडबडीत आवरलेली ट्रिप. 'परत ये रे माझ्या मागल्या'. वर्षातून एकदा परप्रांतात पाच सहा दिवसांची सहल. परदेशी गेलो तर फक्त स्थळं आणि दिवसांची संख्या वाढायची.
पण कोणत्या तरी एका क्षणी लक्षात आले, की हे कुठतरी थांबलं पाहिजे.'
शांतपणे विचार केल्यावर लक्षात आलं की आपण व जनावरे यात फारसा फरक नाही. उलट ते भूक लागल्यावर खातात, झोप आल्यावर झोपतात. ते आपल्या मनाचे राजे... आणि आपण सवयीचे गुलाम. (त्यांतच अल्बर्ट कामुचं एक पुस्तक वाचनात आले.  त्यांच्या म्हणण्यानुसार ' माणूस रोज तेच तेच दिनचर्या करून रोजच आत्महत्या करतो '. शॉक बसल्यासारखं झालं.
विचार केला, कामाचा व्याप हळूहळू कमी करायचा आणि आपले छंद जोपसायचे...
आणि मग सुरु झाला माझा ओक्युपाईड दिवस.
पहाटेचा व्यायामात खंड पडू दिला नाही. व्यग्र कामाचा कालावधी कमी कमी करत आणला. आणि फावल्या वेळात,  वाचनासाठी, आवडते सिनेमा मुख्यतः इंग्रजी, मित्रांसोबत गप्पा टप्प्या, बाईक रायडिंग, जवळचीच पण न पाहिलेली प्रेक्षणीय स्थळे, फोटोग्राफी, आणि हल्ली हल्ली थोडंफार लिखाण.
यामुळं दैनंदिन चिडचिड बऱ्यापैकी कमी झाली, वजन आटोक्यात आलं, स्ट्रेस लेव्हल कमी झाली.
अगदी बारीक सारीक गोष्टीत आनंद मिळायला लागला.
विचार केला असता असं जाणवलं की, आत्तापर्यंतचा मोठा कालावधी हातातून निसटून गेलाय. तो कालावधी फक्त( बिझी )आर्थिक दृष्ट्या कारणी लागला.. आता खरं आयुष्य जगायला शिकलोय..
=========================

शीतल शिंदे ,दहिवडी
         🤔 नेमके  बीझी कशात असतो आपण हे पाहणे फार गरजेचे आहे .ऐथे कोणाला वेळच मिळत नाही हो .आउटपुट मात्र ईतरानसारखच .उठल्या पासून झोपेपर्यण्त पोट भरण्यासाठी  आणी सम्पत्तीचा संग्रह  करण्यासाठी खटाटोप करत असतो .शेवटी काय मोकळेच जाणे .
कधी दुसऱ्याच्या दुखः त  सहभागी झालोय का आपण ? ईतरानकडे पहायला तरी वेळ आहे काय आपल्याकडे , ते सोडाच हो बुजुर्ग झालेल्या आई वडिलांना पहायला पण वेळ नसतो आपल्याकडे त्यांना ऑनलाईनच अग्नी देतो .सम्पत्तीचे एवढे जतन  करतो  की पाठीवर पाय देत  आलेल्या बहीण - भावंडानां आर्थिकदृष्ट्या , मानसिकदृष्ट्या मदत कराविशी वाटत नाही आपल्याला . हे आपले असते बीझी आयुष्य .पैसा कमावण्यासाठी केलेला  खटाटोप !
              समाजासाठी झटणे तर लाम्बच .समाजासाठी कार्य करू म्हटले की आता अभ्यास आहे , मग नोकरीच्या शोधात आहे आणी हो अहो नवीन लग्न झालेय आता . झाले आता मुलगा दहावीला आहे मग घराचे कर्ज आणी  मुलांच्या  शिक्षणाचे कर्ज फेडतोय हो आता .हुश्श ,
          थकलोय आता  सेवाणीव्रुत्त  झालोय हो आता , आता काय गुडगे दम काढत नाहीत बघा .
              मुले नातवंडे आपापल्या व्यापात .
           ना कधी छंद जोपासला , ना कधी सामाजीक बांधिलकी  जोपासली .
       संपले ते आयुष्य  , स्वतांमधूण कधीतरी  बाहेर येवून  गरजूंना  मदतिचा हात  देवूयात नीराधाराणा  मदत करुयात .दुसऱ्याचे पोट भरले तर आपले पोट लवकर भरेल , दुखः दूर केले तर आपले दुखः लवकर दूर होईल अगदी शंभर टक्के .चला मग पुन्हा स्वतः साठीतरी  समाज कार्य करूयात आणी आपले कार्य सिद्धीस नेवुयात 🙏
===========================


संगीता देशमुख,वसमत,जि. हिंगोली

पूर्वीचा काळ किती छान होता! असं म्हणायची वेळ आज आपल्यावर आली. आत्ता आत्तापर्यंत म्हणजे मला नोकरी लागल्यावरचा काळ विचारात घेतला किंवा विसाव्या शतकाच्या शेवटचा विचार केला तरी लक्षात येईल की, सामान्य माणसाच्या जीवनात यंत्रांचा शिरकाव एवढ्या मोठ्या प्रमाणात झाला नव्हता. फार मोठ्या जमीनदाराच्या शेतातही तेव्हा जमिनीच्या मशागतीपासून तर शेतीतील जास्तीत जास्त  कामे माणसांच्याच साहाय्याने होत असत. फार झाले तर मळणीयंत्रासारखी मोजकी यंत्र शेतात आली होती. घरातली  जात्यावरची दळणे गेली असली तरी विहिरीचे पाणी शेंदणे,कपडे धुणे,आणि गावातल्या गावातच काय पण तीन-चार कि. मी. पर्यंत पायीच जात असत. शहरातही मध्यमवर्गीय लोकांकडे फार तर सायकलचा उपयोग होत होता. ही सर्व कामे करण्यात भरपूर वेळ जायचा आणि यातून ज्यांचा वेळ उरला ते मोठे लोक दूरदर्शन पहात असत आणि गरीब लोक मंदिरात भजन,किर्तन यात वेळ घालवायचे. पण तरी सुध्दा त्यांच्याकडून "मला वेळच मिळत नाही" अशी तक्रार कधी ऐकली नाही. परंतु आज यांत्रिकीकरणाचा झपाट्याने विकास झाला. आणि मानवाच्या जीवनात त्याचा इतका शिरकाव झाला की,ही स्वारी आता चक्क स्वयंपाकघरात शिरली. इकडे लाइटबील सारख्या छोट्यामोठ्या कामासाठी कोसभर दूर जाऊन  तासभर उभं रहावं लागायचं  ती कामे आता दोन अंगठ्याच्या अंतरात आणि काही मिनिटात होत आहेत. या सर्व बाबींचा विचार केला तर लक्षात  की,पूर्वीच्या तुलनेत आजचा वाचलेला वेळ गेला कुठे?
                 आज येताजाता अनेक लोकांच्या तोंडून हेच ऐकायला मिळते की,"मला वेळच नाही" किंवा "मला वेळच मिळत नाही"!पुन्हा पुन्हा मनात तोच विचार  डोकावतो की, ' नेमके कशात बीझी असतो आपण एवढे!'  मजलदरमजल करत जाण्याची आम्हाला सवय होती आणि आज दळणवळणाची साधने आली तरी आम्ही वाहनांचा वेग अफाट ठेवतो. का? तर लवकर पोहोचायचे असते... पूर्वीचे लोक मोठ्या प्रमाणात अवांतर वाचन करायचे. आज असे वाचनही कमी झाले. यंत्रामुळे आमचा कितीतरी वेळ वाचला. परंतु मला वाटते, त्या वाचलेल्या वेळाचे आपल्याला नियोजन करता आले नाही. इंटरनेटच्या जाळ्यात आपण पुरते अडकलो. अभिमन्यूसारखी आपली अवस्था झाली. या जाळ्यात शिरलो तर खरं पण यातून बाहेर पडण्याचा कळूनही वळत नाही. मग पर्यायाने "मला वेळच मिळत नाही",अशी सबब सांगून आपण आपल्याच माणसापासून,सत्कार्यापासून,चांगल्या सवयीपासून दूर जात आहोत. कोणाला चांगला विचार करण्यास वेळ नाही,कोणाला चांगले लिहिण्यास,वाचण्यास वेळ नाही,कोणाला चांगले काम करण्यास वेळ मिळत नाही. खरे तर  ही आपली तंत्रज्ञानापुढे हार आहे. 
           आजही आपण आपल्याजवळ असलेल्या वेळेचे नियोजन योग्य पध्दतीने केले तर आपला बराचसा वेळ चांगल्या सवयीसाठीं,आपल्या माणसासाठी आणि महत्वाचे म्हणजे समाजकार्यासाठी लावू शकतो. पण यासाठी आपल्याला त्याची आवड असणे गरजेचे आहे कारण तशी म्हणच आहे  "आवड असली की सवड मिळते" आणि आणि काम करायचेच नसेल तर  "ना के नौ बहाणे" ठरलेलेच आहेत.आधुनिक तंत्रज्ञानाचा यथायोग्य उपयोग घेऊन वाचलेला  वेळ सत्कारणी लावू शकतो.
=======================

निखिल खोडे,  ठाणे.
           मागच्या रवीवारी ग्रुप वर विषय टाकण्यात आले होते आणि आता मी लिहायला सुरवात केली.... म्हणजे नेमके कुठे बिझी असतो आपण यावरून समजले...😅
         
           *वेळेचं गणित* (केंव्हा ते आठवत नाही पण बहुधा इयत्ता सहावी सातवीला) विचारधन होते त्यातले २-३ वाक्य आठवते की महापुरुषांनी वेळ मिळत नाही ही तक्रार कधीच केली नाही. मग मी कधी - कधी स्वतःच विचार करतोय की आपल्याला वेळ कमी का पडते कोणत्याही गोष्टी साठी?
         
            वेळेचे व्यवस्थापण करणे हे कधी मला जमलेच नाही. प्रत्येक वेळेस वेळापत्रक बनवले परंतु वेळापत्रका प्रमाणे काम करणे झालेच नाही..
सोशल मीडिया वर बराचसा वेळ निघुन जातो.. त्यामुळे नवीन काहीतरी शिकायला मिळते हा एक मुद्दा सोडला तर बाकी तर नुसता टाइमपास चालु असतो..
            
              कामाच्या जबाबदारी मुळे दिवसाचा वेळ कसा निघून जातो कळायला  मार्ग नाही..फक्त शेवटी इतकंच की लक्षात आहे.."वेळ कोणासाठी थांबत नाही"....⏳⌛

(या ब्लॉगमधील सर्व प्रातिनिधिक छायाचित्रे गुगलवरून घेतलेली आहेत.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************