चहा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चहा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

चहा(भाग 2 दुसरा)

चहा (भाग 2 दुसरा)
*01)अनिल गोडबोले,
सोलापूर*

सोलापूर हे कोरड्या वातावरणाचं गाव, पण या वातावरणाला अजिबात न मानवणार चहा हे पेय मात्र 'अमृततुल्य' म्हणून पिलं जात.

टॅनिन नावाचं मंद गतीने असर करणार विष ज्या मध्ये असते ते पेय म्हणजे चहा... हे सकाळी उठल्या उठल्या आपल्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी चहा हे पेय अतिशय प्रिय आहे.

आता ब्रिटिशांनी चहा भारतात वाढवला, रुजवला आणि जागतिक बाजातपेठ दिली, आणि चहा सर्व सामान्य माणसाच्या जीवनात आला.

त्या चहा पेक्षा त्या मध्ये असलेली साखर ही जास्त धोकादायक ठरत आहे.. डायबेटीस आणि हृदयविकाराची राजधानी म्हणून भारत ओळखला जातो त्याला चहा जबाबदार आहे.

मी स्वतः चहा अजिबात पित नाही(हल्ली मागील 2 वर्षांपासून) . चहा हे अजिबात आरोग्य वर्धक नसून देखील लोकांना आवडत कारण.. चहा पिल्याने तरतरी वाटते.

हो मेंदूला तरतरी वाटते ही ड्रग ऍक्शन सारखी परिस्थिती आहे.. फारशी वाईट नसली तरी याची सवय काही जात नाही. रक्तात वाढणारी साखर आणि तरतरी या मुळे माणसाला 'छान' वाटत.

तरी पण या 'चाय पे चर्चा' होऊन अनेक मसलती झाल्या आहेत. एक चहावाले आपले पंतप्रधान झाले आहेत.

एक इकॉनॉमी चालवणार पेय म्हणू चहा आहेच.  आता तर ग्रीन टी, लेमन टी, मसाला टी, इलायची टी.. अजून कितीतरी प्रकार आहेत.

टपरी आणि 5स्टार पर्यँत चहा हे सर्वांची तहान आणि भूक भागवत आहे.

हे सगळं खरं असलं तरी मित्र भेटल्यावर "चल बे चहा पाज बे कडू," असं म्हणतो तेव्हा मात्र चहा अधिक जवळचा वाटतो
*==============================*

*02)दिपाली वडणेरे,
     नाशिक*
चहा तस तर चहाचं आणि माझं नात फार काही जवळच नाही पण घराघरात एक टाईम जेवण नसले तरीही चालेल  चहा पाहीजेच असतो.

जेव्हा हा विषय आला तेव्हा मला आश्चर्य  वाटले आणि हा असा कसा विषय आहे अणि नेमकी काय लिहीणार यावर हाच विचार मला पडला होता  पण नंतर त्यावर लेख आले ते वाचले आणि समजले की असा विषय आहे तर आणि आणि छान वाटला मला विषय पण आणि सर्वांचे  लेख / अनुभव तसेच त्यातुन सुचलेल्या कल्पना आणि म्हणूनच केली मग मीही लिहायला सुरुवात.

खरंतर चहाचं आणि माझं जास्त काही जवळच नातं नाही  पण आमच्या घरात मात्र चहाचं नातं खूप जवळचं आहे ते म्हणजे असे की, आई -वडील दोघांनाही केव्हाही  चहा द्या नाही म्हणणार नाही एकवेळ जेवण नसले तरीही चालेल उपवास असेल किंवा नसेल जेवायचे चला किंवा काय स्वयंपाक  करू असेही जरी बोलले ना तर आधी एकच वाक्य ते जाऊदे काहीही कर जे पटेल ते पण एक कप चहा कर हे आधी सांगतील.
चहा म्हटले की सर्वांचेच  आवडीचे पेय संपुर्ण क्षीण-भाग काढुन तरतरी आणणारे. तसेच गावाकडे तर अजुनच भारी सवय ती म्हणजे चहा हा कप-बशी मध्येच घ्यायचा आणि बशीनेच प्यायचा तसे तर गावाकडे प्रत्येकाच्याच  घरी मोजकाच चहा बनवलेला / ठेवलेला असतो असे काही नाही तो जास्तीचाच राहतो पण तरीही अजुन जर आलेच कोणी तर या चहा घ्या असे म्हणून आपल्यातील कपातील चहा त्यांना देता येतो. कोणीही येऊ द्या घरी सांगायची वेळ पण नाही येत की चहा ठेवा म्हणून अगदी कोणी घरात आले की पाणी दिले की लगेच बोलता बोलता चहा ठेवायला सुरूवात होते.

चहा म्हटले की एक मोठेपणा असतो कोणी त्याला संस्कार  म्हणतो तर कोणी समजदार पण म्हणजे कसे बघा आता जर कोणी कुठे गेले आणि त्यांनी जर चहा बनवला किंवा साधं बोलली जरी ना की बसा आत्ता  चहा बनवते तर म्हणतात समजदार आहे बरं का काहीच सांगायची पण गरज पडत नाही तीला तर खूपच समजदार आहे . आणि चेच जर एखाद्या ठीकाणी नाही घडलं तर काय वळण आहे तीला चहा करायच तर बाजूलाच पण साध विचारलं नण नाही कसला गर्व  आहे काय माहीत स्वतःला खूपच काही समजते ती हंमममम

थोडक्यात काय तर चहा हे फक्त पेय नाही तर एक जिव्हाळा  , प्रेम, आपुलकी आहे जो सर्वांना जोडण्याचे काम करतो. फक्त  2-5 मिनिटे लागतात तयार करायला पण त्याने नाती मात्र घट्ट होतात , लांबचे नाते असले ना तरीही ते चहा पिता -पिता इतके जवळ येतात ना  की कधी आले हे देखील समजत नाहोी .

असा हा चहा खूप काही लिहीता येणारा विषय
*==============================*

*03)राकेश पवार,
मालेगाव जि नाशिक.*
  माजा अणि चहाचा प्रवास खुप छान आहे    तस हे माज आता अवडीचे पेय .
      चहाची सवय लागली मला 11विला सकाळी कॉलेज असायचे अणि दुपारी क्लास 2ते 3 फिजिक्स चे लेक्चर जाले की आळस यायचे मग हळूच सारांची विनंती करुण पैसे घयांचे तसे सर पन खुप छान चहासाठी कायम पैसे दयाचे मग सराणी दिलेल्या 20 रु अणि आम्ही 7 मूल अजुन 10 रु टाकून 6 चहा घ्यचो अणि त्यात 7 कारायचो खुप मजा यायची राव .
  मग 12वी पास जालो आणि चहा सवय बंद जाली . मग मि bcs ला एडमिशन घेतले आणि खुप त्रास रोज सकाळी घरुन 5 ला बाइक ने निगायचे अणि 6 ला क्लास असायचा थंडीचे दिवस लगातार 3 क्लास मग रोज पहिला क्लास जाला का चहा प्याला जायचे  पन प्रॉब्लम असा वाहीचा की 30 मूल आम्ही मग बिल कोण भरणार 150 रूपये म्हटले म्हणजे खुप होतात मग चहा जाला का सर्व मूल पैसे जमा करायचे अणि दयाचे पन आता तीसरे वर्ष आहे bcs च आता कोणी कुटे कोणी कुटे पन आम्ही आज पण रोज त्या हॉटेल वर चहा प्याला जातो.                     तीस मुलान मदुन आता 6 च मूल असतो आम्ही चहा आहे तर दोस्ती आहे दिवस चहा पिल्याने सुरु होतो अणि खुप कही गोष्टी शिकायल भेटत असतात चहा पीताना.
*==============================*

*04)अंजली मालुसरे,
नवी मुंबई*
सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी कशाची आठवण येत असेल नं तर ती चहाची... मला चहाचा इतिहास एवढा माहित नसला तरी हव्या त्या वेळेला उपलब्ध असणारं अमृततुल्य पेय म्हणजे चहा हे नक्कीच माहितीयं..
         लहान असताना पारले-जी बिस्किट चहासोबत खाणे म्हणजे पर्वणीच.. जर कधी डोकं दुखायला लागल तर कोर्या चहात लिंबुरस पिळुन तो प्यायचा किंवा अंगात ताप असेल आणि खुप थंडी वाजत असेल तर मग गरम गरम कोरा चहा प्यायचा ही माझी  ठरलेली औषधे..
        कॉलेजमध्ये असतानासद्धा कॅन्टिनमध्ये खिशाला परवडणारी गोष्ट म्हणजे चहा.. मग काय असाइनमेंट्स पुर्ण करणे, आपला चहा संपल्यावर दुसरीच्या चहावर नजर ठेउन तिच लक्ष नसताना तोही संपवणे, आणि समोरुन येणार्या Handsome मुलांवर लाईन मारणे हे आम्हां मैञिणींच ठरलेल काम..
        चहाचे आता अनेक प्रकारही आलेत आणि प्रत्येकाची आवडही वेगवेगळी असते, जसं कि कोणाला दुधाचा चहा आवडतो तर कोणाला कोरा चहा, कोणाला ग्रीन टी पाहिजे तर कोणाला तंदुर चहा... काहिजणांची चहा करायची पद्धतही वेगवेगळी असते.. आता माझच बघा न, Normally सर्वजण चहा करताना त्यात आलं, गवती चहा टाकतात पण मी याव्यतिरिक्त त्यात एक किंवा दोन लवंगा, काळिमिरी आणि थोडा ओवा हेही टाकणार. हा झाला माझा स्पेशल चहा...
    अजुन सांगायच तर चहाच्या चहापणाची खरी मजा घ्यायची नं तर ती पावसाळ्यातच.. पावसात भिजत, कुडकुडत ढाब्यावर मस्त गरमागरम चहा प्यायचा किंवा मग चहासोबत खायला जर का गरम कांदाभजी असेल तर हा दुग्धशर्करा योगच...त्याला मग तोडच नाही कशाची...आजपर्यंत ज्या काही थोड्याफार कविता मला सुचल्या असतील न त्या या चहाच्या साक्षीनेच बरं का...मध्यंतरी आॉफिसमध्ये मी कॉफी पिण्याची सवय लावली होती परंतु आता परत कधी चहा प्यायला लागली हे माझ मलाच कळल नाही.. कदाचीत माझी आणि चहाची नाळ ही जन्मापासुनच जोडली असावी..
       मी चहाबद्दल एवढं लिहितेय,बोलतेय पण त्याच्यासोबत जर का मला आईची आठवण आली नाही तर ते नवलच.. कारण लग्नाआयधी ज्याक्षणी चहा प्यावासा वाटायचा त्याक्षणी न सांगताच आई समोर चहाचा कप घेउन यायची... मग काय एक चहा Share करत दोघी गप्पा मारत बसायचो..आता लग्नानंतरही सकाळचं मी आणि माझे अहो एकञच चहा पितो.. वेळ बदलली, माणसं बदलली पण चहा आणि त्याची गोडी अजुनही तशीच आहे..
       खरचं चहाबद्दल आपण कितीही लिहायला गेलं तरी कमीच परंतु माझ्या नजरेतुन चहाच्या चहापणाबद्दल लिहण्याचा हा छोटासा प्रयत्न... चला लिहिता लिहिता समजल की आपली आता चहा प्यायची वेळ झालीय….आता जोपर्यंत मस्त माझा स्पेशल चहा बनवुन पित नाही न तोपर्यंत मी काही स्वस्थ बसत नाही..
*==============================*

*05)नितिन लेंडवे,
तावशी,पंढरपूर*
       जगात सगळ्यात लोकप्रिय असलेले पेय म्हणजे चहा होय. या चहाचे अनेक प्रकार अस्तित्वात आहे. ब्लॅक, ग्रीन, लेमन, स्पेशल.(मला एवढेच माहिती आहेत.)
       मला चहा खुप आवडतो. पण आता कमी केला आहे. आता गुळाचाच चहा घेतो. तोही एकच वेळ. सकाळी. ( आता तो गुळ पण आमचे शेजारी मा. हरीदास यादव यांच्याकडुन मागवावा लागेल. सेंद्रीय गुळ
     चहा पिल्याने तरतरी, उत्साह, जोश असे काही काही शरीरात निर्माण होते हे खरेच. तसे इतर पेये देखील निर्मिती करतातच.
    मात्र काही असले तरी आहार जस औषध असते तसेच ते विष देखील ठरते. आपण किती ही चहा'वेडे' असो. पण प्रमाणातच चहा घ्यावा. जेणेकरुन चहाचे साईडइफेक्ट काही जाणवणार नाहीत.
*==============================*

*06)विशाल कांबळे,
(सांगली),M.A.मुंबई,विद्यापीठ,मुंबई*            
                     
 चहा हे एक अस पेय आहे जे उन्हाळा,पावसाळा,हिवाळा अशा तिन्ही ऋतूमध्ये चालतं. बहुतांशी लोकांना चहा आवडतोच. तसा मलाही आवडतो. माझे आणि चहाचे खूप जवळचे नाते आहे. लहानपणापासून मला चहा आवडतो आणि आजही. चहा म्हटल्यावर मी नेहमीच तयार असतो. गावातील अस एकही हॉटेल किंवा टपरी नसेल जिथे मी व माझे मित्रमंडळी चहा प्यायला नाही. गावामध्ये एखादी नवीन चहाची टपरी किंवा हाॅटेल सुरू झालं की आम्ही तिथे धाड टाकायचोच. उद्देश हाच की चहाची चव कशी आहे.
                     चहा म्हणजे माझ्यासाठी एक ऊर्जा असल्यासारखे आहे. खरतर चहा म्हणजे एक वेगळाच बंध आहे. काहीवेळा  मित्रामित्रांमध्ये आपापसात काही कारणाने वाद होतात त्यावेळी सर्व परिस्थिती पूर्ववत करण्याच काम चहाच करतो. ग्रुपमधील एकजण जरी म्हणाला ना की जाऊदे यार सोडना, चला चहा घेऊ. एवढं पुरेसे आहे. आणि एकदा चहा घेतला की आपण का भांडत होतो हे ही कुठल्याकुठे निघून जातं. खरतर नाती जपण्याचं काम  चहा करतो.
                     चहा म्हणजे एक तरतरी आहे एक वेगळाच करंट आहे.  तुम्ही कोणत्याही टेंशन मध्ये असाल किंवा काही कारणाने तुम्ही अस्वस्थ असाल किंवा कामामुळे थकला असाल तर एक चहा जरी घेतला ना तर या सगळ्या गोष्टी दूर पळून जातात. माझ तर अस मत आहेे कि चहा फक्त प्यायचा नाही तर तो feel करायचा. मला तर चहा कधीही चालतो. आम्ही सगळे मित्र रोज रात्री जेवणानंतर गावच्या बस स्टँडवर जाऊन चहा प्यायचो. मग त्यानंतर गप्पा    रंगल्या की एक दोन वाजलेल्या समजायच्या नाहीत.
मी ते क्षण खूप miss करतो. पण गावी गेलो की  मित्र, चहा या गोष्टी पुन्हा नव्याने सुरू व्हायच्या.  त्यावेळी त्या आठवणी एक वेगळीच ऊर्जा द्यायच्या. आयुष्याकडे बघण्याचा  नविन दृष्टीकोन द्यायच्या.
                            चहा बद्दलच्या माझ्या काही ओळी मला इथे share करायला खूप आवडतील.

एक चाय ही है                    जो दिल की सारी बेचैनी दूर      करती है, वरना कौन       आपके दिल की हर बात हर बार सुनेगा.
*==============================*

*07)निखिल खोडे,
ठाणे*

          नुसत्या नावाच्या उच्चाराने तरतरीत करणार पेय म्हणजे चहा..चहा हे असे पेय आहे की जे गरिबापासून तर फाईव स्टार हॉटेल मध्ये जाणाऱ्या श्रीमंत लोकांपर्यंत सर्वच सर्वच पितात. चहा हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. घरी आलेल्या माणसाला "चहा घेऊन जा" हे तर ठरलेला भाग आहे. सकाळी उठल्यावर पहिली आठवण येते ती म्हणजे चहा. सर्वात जास्त पिले जाणारे पेय म्हणुन चहाचा उल्लेख आहे.

               छोट्या कामगारा पासुन तर मोठमोठे बिझनेस करणारे लोक चहाचा आस्वाद घेताना दिसतात. दिवसभरात चहाची आणि माझी खूपदा भेट होते. सकाळी उठल्यापासून तर रात्री घरी जात पर्यंत.  चहा घेणार का? असा प्रश्न कोणी केला तर त्याला नेहमीच होकारार्थी उत्तर तयार असते. कामाच्या थकव्यापासून दूर नेण्यात आणि तरतरी आणण्यात चहाचा खुप मोठा सहभाग आहे. त्यात नागोरी चहा मिळाला तर अजून बेहत्तर.. मी दिवसाला ५-६ कप तर चहा आरामात पितो..
         
            चहा मध्ये टॅनिन नावाचं विष असते हे माहिती असुन सुद्धा चहाला कोणी नाकारत नाही. तो कोणत्याही भांड्यात बनवलेला असो, कोणत्याही कपड्यांमध्ये गाळलेला असो चहा पिण टाळणे अवघड आहे. अलीकडे असा शोध लागला आहे की चहाच्या सेवनामुळे हृदयविकार सहसा जवळ येत नाही.

            चहा हा जन्मापासूनच सर्वांसाठी सारखाच आहे त्यात कोणताही भेदभाव नाही. चहा ला अमृततुल्य नावाने सुद्धा संबोधिले जाते.. पाण्या नंतर जगात दुसऱ्या क्रमांकावर चहाचे सेवन केले जाते. आज जगभर चहाचे सेवन केले जाते. हजाराहून चहाचे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. अनेक चहाच्या  टपऱ्या वर मोठमोठ्या हॉटेल्स मध्ये मिळणार नाही असा चहा मिळतो..
*==============================*
(यातील सर्व संबंधीत छायाचित्रे गुगलवरून घेतलेली आहेत)

चहा (भाग 1) पहिला

चहा (भाग 1पहिला)




*१)अनिकेत कांबळे,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर*

 चहा हे माझं पहिलं प्रेम म्हंटल तर अतिशयोक्ती होणार नाही,मागच्यावेळी विषय निवडला गेला नसला तर आज आपलं चहावरच प्रेम जिंकल्याचा मनस्वी आनंद झाला हे मात्र नक्की,
चहा मग तो घरात असो कॉलेज वर किंवा विद्यापीठात,एकवेळ सोबत गर्लफ्रेंड नसली तरी चालेल पण सकाळ पासून रात्री पर्यंत चहा हा हवाच,नुसतं चहा प्यायला चल म्हणायचा अवकाश मी एका पायावर तयार कायम.मध्यंतरी खूप ब्रेकअप झाले चहा चे आणि माझे, कारण संध्याकाळी जिम ला जाऊन आला की प्रोटीन म्हणून चहा प्यायचो, बॉडी काय खाक होईल मग अशाने,जाऊदे सोडून दिलं एक महिना वाऱ्यावर पण शेवटी पहिलं प्रेम सुखानं जगू तरी कसं देईल आणि दुःखात कस सोबत सोडेल....पुन्हा आमचं पेचअप झालं,आजपर्यंत तिचा पाठलाग सोडला नाही,आईच्या शिव्या मला पडायला चालू झाल्या की समजायचं साखर संपवली आपल्या चहाने, पण जास्त काळ घरी राहायला नाही मिळायचं हॉस्टेल वर अठरा विश्व दारिद्र्य ,कोण चहा देतोय का याची वाट बघायची नाहीतर एक तर उधार प्यायचा नाहीतर कधी कधी एक एक रुपया गोळा करून 6 रुपये जमले की चहा प्यायचा त्यात एवढा आनंद मिळायचा की स्वर्ग सापडतो तो इथंच,कधी कधी एकटपण सुखानं जागवणारा चहा एकटेपणात खंबीर बनवणारा चहा,चौकात एक कप चहा घ्यायचा येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांच्या गोंधळात एक शांतता मिळते ती चहानेच, असो हे चहाचं प्रेम दीर्घकाळ टिकणार आहे,हे माझं पहिलं प्रेम ...असंच अनंत राहो,भलेही चहा पिऊन आयुष्य कमी होईल पण कमी आयुष्यात खूप काही कस जगायचं हे ज्याला त्याला चहा पितानाच सुचत हे मात्र खरं.
*==============================*


*२)अर्जुन रामहरी गोडगे,
सिरसाव ता.परंडा जि.,उस्मानाबाद*

कित्येक माणसं आयुष्यात आली,
आयुष्य बेचव करून गेली तुझी मात्र अजूनही तशीच आहे...

आयुष्यात कधी कोणतेच व्यसन केलं नाही
तू मात्र मला कधी सोडलं नाही.....

जीवनाच्या या मुशाफिरीत जीव कधी कधी होतोय नकोसा पण
जोडीला तू असली की कधी एकटा वाटतं नाही....

आयुष्य झंड झाल्यासारखं वाटतंय
कंटाळालो आहे रोजरोजच्या कटकटीना पण तुझी साथ कायम आहे.....

विद्यापीठातील कॅन्टीनची तुझी चव बेचव आहे
दिवसातून चार पाच वेळा तरी भोगयचं हे चाललंय रोजच......

काही झालं तू मात्र माझी साथ सोडली नाही
वैतागलेल्या जीवाला विसावा देयला तू नेहमी तयार यातूनच बरं वाटतंय........

कित्येक ची आयुष्य तू वळणावर आणली
खूप बरं वाटतंय तुझाशीवाय कोणालाच करमत नाही आजकाल....
*==============================*

*३)जगताप रामकिशन शारदा
(बीड)*
'अण्णा एक चाय 'असा आवाज दिला की न एक पुसटसा हसण्याचा आवाज यायचा. सुरवातीला दुर्लक्ष केले पण पुन्हा पुन्हा अनुभव येताना पाहून एक दिवस विचारले असता मी *चहाला चहा* न बोलता *चाय* बोलतो हे त्यांना विचित्र वाटायचं. सुरवातीला काही नाही पण जस जस दिवस सरत होते रात्री अपरात्री दुपारी कधीही मी चहा पियायला गेलो की 'एक चाय' असा उपरोधिक आवाज यायचा. कधी कधी तो.ऐकून ओशाळल्यागत व्हायचे . चहाला चाय बोलण्याच्या सवयीने ती ओळख एवढी वाढली की ती कँटीन राहिली च नाही एक दुसर घर बनून गेली.
*==============================*

*४)संगीता देशमुख,
वसमत*
आम्हा भारतीय लोकांची दिवसाची सुरुवातच ही चहाने होते. चहाप्रेमी लोकं तर चहास पृथ्वीतलावरील अमृत असेही म्हणतात. रात्रभराच्या आरामनंतर आपण सकाळी शरीराने ताजेतवाने झालेलो असलो तरी मनाने मात्र जोवर पोटात चहा पडत नाही तोवर आपल्यातली मरगळ काही केल्या निघून जात नाही. दिवसभराचा उत्साह भरण्यासाठी चहा हे उत्तम पेय आहे. चहा हा पारंपरिक आहे. चहाऐवजी गरम पाणी पिऊन ती मरगळ जाईल,असेही नाही. काही लोकं चहाला पर्याय म्हणून कॉफी,दुध घेतात तर काहीजणांना आजकाल डॉक्टरलोक चहाऐवजी ग्रीन टी,ब्लॅक टी असे पर्याय सुचवतात. आमच्या मनात चहा इतका रुतून बसला आहे की, सकाळी चहा पिलाच पाहिजे,अशी आमची दृढभावना आहे. म्हणजे चहाशिवाय कोणी आपल्या दिनचर्येची कल्पनाही करू शकणार नाही. म्हणून तर मग चहा जेव्हा अनेक कारणानी  नको असतो तेव्हा चहाला पर्याय म्हणून ग्रीन टी,ब्लॅक टी,कॉफी हे घ्यावे लागते. हे कितीही आपल्या जीवनात शिरले तरी चहाची जागा मात्र ही पेये घेऊ शकलेली नाहीत. म्हणूनच सकाळी सकाळी कोणी भेटले तर "झाला का ग्रीन टी/कॉफी अथवा ब्लॅक टी?" असं कोणी विचारत नाही. अजूनही आपल्याला दिवसाच्या सुरुवातीला कोणी भेटले किंवा बायका एकमेकींना सकाळी भेटल्यावर विचारतात की,'झाले का चहापाणी?' जुन्या बायका दुपारी जांभया यायला लागल्या तर चार वाजले,चहाची वेळ झाली,असं सुचवायच्या. अनेकजण तर आधी चहा झाल्याशिवाय कोणत्या कामाला हातच लावत नाहीत. कोणाला हा चहा दिवसभरातून कितीही वेळा लागतो,कोणाला दोनदा लागतो, तर कोणाला सकाळचाही पुरेसा असतो. काहींना सकाळी उठल्याबरोबर लागतो,तसा तो काहीजणांना झोपतानाही लागतो. पण चहा लागतोच! चहा लागत नाही,अशी अगदी बोटावर मोजण्याइतके लोक असतील. अनेकांना सकाळचा चहा घेतल्याशिवाय पोट साफ होत नाही,इतकं चहा आणि माणसांचं नातं घट्ट आहे.
            मनुष्याच्या दिवसाची सुरुवात जशी चहा करतो,तसे तो माणसामाणसामधील ऋणानुबंधही घट्ट करतो. आपल्या घरी आलेल्या व्यक्तीला चहा विचारला तर त्या  व्यक्तीला योग्य मान मिळाल्यासारखा वाटतो. घरी आल्याबरोबर एखाद्याला जेवण विचारले नाही तर फारसे वाटणार नाही पण चहा जर विचारला नाही तर 'काय कंजूष माणूस,याला तर चहा विचारण्याएवढीही माणुसकी नाही,यांच्याकडे चहा विचारण्याचीही रीतभात नाही' ,अशी दुषणे आपल्याला येवून चिकटतात. किंवा 'त्या व्यक्तीकडे गेल्याबरोबर चहा विचारला,फार भला माणूस' म्हणून आपले कौतुकही होते. जुनी माणसं म्हणायची,बऱ्याचदा हजार रुपयाने जे काम होणार नाही ते काम एक कप चहाने होते,म्हणून आपल्या घरी आलेल्या माणसाला चहा विचारावा. अर्थात आपल्या घरी आलेल्या व्यक्तीच्या  स्वागताचे साधनच चहा हे आहे. चहा हा कोणताही भेद पाळत नाही. घरी आलेला व्यक्ती श्रीमंत असो गरीब असो अथवा तो उच्चशिक्षित असो की अडाणी त्याला आपण आल्याबरोबर चहा घेण्याबद्दल विचारतो. कितीही परका असो की जीवलग असो त्याच्या आदरातिथ्याचा मान मिळतो तो आधी चहालाच! पाहुणा कोणत्याही वेळेला येवो चहा विचारल्या जातोच. पाहुणे फारच उशीरा आले,त्यांचे जेवणाचा बेत ठरलेला असेल तरी त्यांना एवढे विचारले जाणारच की,आधी चहा घेता की ताट तयार करू? पाहुणचार कोणता आणि कसा द्यायचा,हा आदरातिथ्याचा चहानंतरचा टप्पा.
                     मराठवाड्यात मुलीला पहायचा कार्यक्रम म्हटलं की,फक्त चहा पोहे ठरलेले. मित्रामित्रांच्या गप्पा रंगायला सुरुवात चहाच्या टपरीवर. कोणत्याही कार्यालयात दिवसभर चहा सुरूच असतो.  कार्यालयातील गैरप्रकार भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आजकाल प्रत्येक कार्यालयात सी सी कॅमेरे बसवण्यात आले आहेत. पण आता सी सी कॅमेऱ्याच्या नजरेतून सुटण्यासाठी "असे" साहेब किंवा त्यांच्या  स्पेशल माणसाला समोरची व्यक्ती "चला साहेब,बाहेर चहा पिऊन येऊ " म्हणून चहा प्यायला बाहेर बोलावतात. "चहा पिणे" हा त्यांचा कोडवर्ड बनतो. अशावेळी हा "चहा" किती महागडा असेल,याची कल्पनाच न केलेली बरी!  असा चहा काही ठिकाणी बदनाम जरी असला तरी काहीजणांना मात्र अगदी राजमार्गाने राजरोसपणे त्याने श्रीमंत बनविले आहे. दवाखाना,शाळा,सरकारी,खासगी कार्यालये,रेल्वेस्टेशन,बस स्टेशन अशा सर्व ठिकाणी चहा आपले अस्तित्व टिकवून आहे म्हटल्यापेक्षा पसरवत आहे. एकदा असच  एका चहाविक्रेत्याशी बोलतांना त्याच्या चहाच्या व्यवसायाविषयी बोलणे झाले. तो म्हणाला,"मॅडम,माझी चहा लै फेमस हय. चहाच्या धंद्यावर मी दोनताळी घर बांधलं,पोरीचं धुमधडाक्यात लगन लावलं अन् दोन पोरायसाटी चार फ्लाट बी घेऊन ठिवले". अवाक् होऊन मी त्याचे उत्पन्न विचारले तर तो म्हणाला "दिवसाचा माझा  गल्ला पंधरा हजाराचा असतो". नुसत्या चहाने या आणि अशा माणसाना एवढे धनाढ्य बनविले हे ऐकून माझ्या मनात चहाची थोरवी अधिकच वाढली.थोडक्यात या चहाला कोणी नावबोटे ठेवली अथवा डॉक्टरने नको म्हणून सांगितले तरी अगदी प्राचीन काळापासून हा चहा आपले स्थान अबाधित राखून आहे.
*==============================*

*५)प्रदिप इरकर,
वसई*
चहा..अहो हा शब्द जरी उच्चारला तरी शाहरुख खानच्या 'फॅन' चित्रपटातील डायलॉग आठवतो. "वो सिर्फ चाय नही है,दुनिया है मेरी"
आमच्या कुटुंबात असलेलं चहाचे व्यसन हे माझ्या माहितीप्रमाणे 2-3 पिढ्यांपासून तरी नक्कीच आहे व ही परंपरा आमची आताची पिढी म्हणजे मी आणि भाऊ अगदी नित्यनेमाने पाळतो.
म्हणजे असा की दुसऱयांच्या घरात चहाची वेळ ठरलेली असते परंतु आमच्या घरी चहाची लहर ठरलेली असते म्हणजे एकाला जरी तलफ झाली की 5 कप चहा हे समीकरण ठरलेलंच आहे.
थकवा आणि चहा..
अभ्यास आणि चहा..
कामानिमित्त बाहेर जाणे आणि चहा..
रोज सकाळी घरातून बाहेर पडणे आणि चहा..
बाहेरून घरी येणे आणि चहा..
डोकं दुखले आणि चहा..
ही काही इतर चहाची समीकरणे.

मित्रही असे की भेटल्यावर मॅक्डोनाल्डस किंवा पिझ्झा नाही तर चहाची टपरी.
आणि नागोरी चहा असेल तर मग उत्तमच.

शेवटी एकच दारूचं व्यसन असण्यापेक्षा हे चहाचे व्यसन बरेच...
*=============================*

*६)अपेक्षा मानाजी,
मुंबई*
चहाची भारतासोबतची नाळ अतूट आहे.घरात एखादं मुल जरा जास्तीचं लाडकं असावं तस भारतीयांनी सर्व पेयांमध्ये चहाला जरा जास्तच लाडोबा केलं.मित्रांच्या कट्ट्यावर, ऑफिस मध्ये रस्त्याकडेच्या टपरीवर, घराघरांत सगळीकडे ह्याचीच हवा.परंतु भारत त्याची जन्मदात्री नाही बरं,ह्याची जन्मदात्री आई चायना.पण भारतानेही सख्खा मावशीप्रमाने त्याला जीव लावला.प्राचीन काळात चीन मध्ये म्यांडेरियन भाषेत चहा ला 'किया' बोललं जायचं त्यानंतर किया च रूपांतर चाय मध्ये झालं.युरोप मध्ये १५४१ च्या दरम्यान चहा ला 'टे' बोललं जायचं १६४४ मध्ये व्यापारी भाषेत 'टी' बोललं जाऊ लागलं. पहिल्यांदा चहाचे सेवन  केव्हा झाले ह्याबद्दल नेमकी माहिती उपलब्ध नसली तरी,चहाच्या सेवनाचे पुरावे ई.स. वी.पूर्व (७५०-५००) रामायणाच्या काळापासून चे आहेत.त्यानंतर जवळजवळ हजार वर्षे चहा लुप्त होऊन राहिला.त्यानंतर त्याच्या पूनरउगमाची माहिती पहिल्या शतकात बौद्ध भिक्षुंकडून सेवन केले गेल्याची आहे.त्यानंतर १५९८ मध्ये डच यात्रीने त्याच्या पुस्तकात भारतात चहाची भाजी,सूप होत असल्याची नोंद केली आहे.परंतु चहाच्या पुनरुज्जीवनाचे श्रेय जाते ते ब्रिटिशांना. चहाचं व्यावसायीकीकरण ब्रिटिशांनी केले.१७७४ मध्ये पहिला गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टींग ने पहिल्यांदा चायानाच्या चहाच्या बियांचे नमुने भूटान ला शेतीसाठी पाठवले,इंग्लिश वनस्पतीशास्त्रज्ञ जॉन बक्स निरीक्षक होते,१७७७ मध्ये त्यांनी वॉरन ला भारतात चहाची लागवड करण्याबाबत सुचविले.
ब्रिटिश भूदल सेनेतले कर्नल रॉबर्ट ह्यांनी १७८० मध्ये हावरा येथे बोटनिकल गार्डन मध्ये चहा लावण्याचा प्रयोग केला.त्यानंतर १८२३ मध्ये स्कॉटिश यात्री रॉबर्ट ब्रूस यांनी ब्रम्हपुत्रा खोऱ्यातील स्थानिक चहा शोधला.आसामच्या मणीराम दिवाण ह्यांनी ह्या स्थानिक चहा ची महत्त्व पूर्ण माहिती रॉबर्ट ह्यांना दिली.मणीराम दिवाण हे आसाम मध्ये चहा ची शेती करणारे पाहिले भारतीय ठरले.१८३४ मध्ये भारतात आसाममध्ये पहिल्या चहाच्या बागा उभ्या राहिल्या.त्यानंतर १८३५ मध्ये टी बोर्डाची स्थापना झाली.१८३८ ला पहिल्यांदा आसामचा चहा लंडन ला गेला.नंतर आसाम ते दक्षिणेला केरळ पर्यंत बागा पसरत गेल्या.आज भारत चहाचा जगातील दुसरा सर्वात मोठा उत्पादक आहे.गेले शतकभर भारत जगातील अव्वल चहा उत्पादक होता,परंतु आता चीन ने आपल्यावर मात केलीय. आसाम, पच्छ्म बंगाल, तामिळनाडू, केरळ,त्रिपुरा, अरुणाचल भारतातील जास्त चहा उत्पादन करणारी राज्ये आहेत.आपल्या लाडक्या चहाचे ग्रीन टी,ब्लॅक टी, उलाँग टी, व्हाईट टी असे प्रकार आहेत.चहा ला संजीवनी मिळाली ते इथल्या बाजारपठांवर अधिराज्य गाजवण्यासाठी पण त्याने मात्र भारताच्या हृदयावर अधिराज्य गाजवले.
*==============================*

*७)हरीदास यादव,
मु.पो.मारापूर, ता.मंगळवेढा. जि. सोलापूर*

विषय चहाचा निघाला, अन् मन इतिहासातील बालपणात जावून पोहोचल, आमच सत्तेचाळीस जणांच एकत्र कुटुंब, लहान मुलांना चहा दिला की त्यांची वाढ खुंटते, असा आमच्या घरातील लोकांचा समज असल्याने, साधारण पंधरा वर्षाच्या आतील  मुलांना चहा द्यायचा नाही हा अलिखित नियम काटेकोरपणे पाळला जायचा.
परंतू मला चहा खुप आवडायचा, त्यामुळे मी आईकडे चहासाठी खुपच हट्ट करायचो. आणि मग आई दुधाच्या ग्लासमध्ये थोडासा चहा टाकून दुधाबरोबर प्यायला द्यायची, व माझी समजूत काढायची.

आमच्याकडे गुऱ्हाळ असल्यामुळे चहा गुळाचा असायचा. चुलीवर बनवलेल्या गुळाच्या चहाची चव मला खुपच आवडायची.

हळूहळू मजुरांच्या अडचणीमुळे गुऱ्हाळ बंद पडल आणि गुळाच्या डब्यात साखरेने घुसखोरी केली. चहाच्या चवीत आणि रंगात फरक पडला, तसाच चहाच्या गुणधर्मात ही बदल झला. शुद्ध, सात्त्विक व पौष्टिक गुळाच्या चहाची जागा रसायन व गंधक मिश्रीत साखरेच्या चहाने बळकावली, आणि आरोग्यासाठी घातक व हानिकारक पर्वाला सुरुवात झाली.

चारपाच वर्षापुर्वी मला साखरेच्या चहाचे दुष्परिणाम जाणवू लागले, म्हणून मी बाजारातून गुळ आणला व गुळाचा चहा घ्यायला सुरुवात केली, परंतू बाजारातील गुळामध्ये गुळ बनवताना मोठ्या प्रमाणात रसायनांचा वापर केला असल्याने तो चहा प्यायची ईच्छा होईना.

आणि मग खुप विचार करून व सेंद्रिय शेतीचा अभ्यास करुन  मी माझा स्वताःचा एक एकर ऊस नैसर्गिक पध्दतीने पिकवला व शेजारच्या गावातील गुऱ्हाळावरती फक्त भेंडीचा रस व चुना वापरून स्वताः समोर उभ राहून गुळ बनवून आणला. व तो घरी वापरायला सुरुवात केली, व बाजारी रसायनयुक्त गुळ आणि साखर घरातून हद्दपार केली, खुप समाधान वाटल.

तयार झालेला गुळ घरी संपेना म्हणून मग मित्रपरिवार व पाहुणे रावळे यांना वाटला, त्यांनाही तो खुप आवडला, त्यांनी परत विकत मागितला व घेवून गेले.

आता मी स्वताःचे नवीन गुऱ्हाळ सुरु केले असून, सेंद्रिय ऊसापासून तयार केलेला शुद्ध, स्वच्छ, स्वादिष्ठ गुळ व काकवी तयार करत आहे.आज माझ्या सेंद्रिय गुळाला व काकवीला फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे,व तो माझा मुख्य व्यावसाय बनला आहे.

सांगण्याचे तात्पर्य येवढेच की एका चहाच्या आवडीमुळे मला नवीन व्यावसाय मिळाला.
हे सगळ चहाच्या आवडीमुळे झाल.
मी चहाचा शतशाः  आभारी आहे.
*==============================*

*८)वाल्मीक* *फड*
*महाजनपूर* *नाशिक*  
   चहा म्हटलं की आजही आईची आठवण येते आणि डोळे पाणावतात.कारण चहा म्हणजे साक्षात अमृत माझ्या आईचे.प्रसंगी जेवण नाही मिळाले तरी चालेल पण चहा पाहिजेच.काय होतं आमचं एकत्र कुटुंब होते त्यावेळी आमच्या आजिबाई म्हणजे मोठा दरारा,पाच सुना,पाच मुलं,एक दिड डझन नातवंडअसा मोठा परीवार .आईला चहा पिऊ वाटला तर स्वतः गुळ चहा पावडर आणायची आणि गुपचूप चहा बनऊन प्यायचा कारण म्हातारी फार कडक होती.                काही दिवस निघुन गेल्यावर आमचे कुटुंब विभक्त झाले आता आम्ही वेगळे राहू लागलो.आईचे चहाप्रेम इतके प्रबळ होते की,विभक्त झाल्यावर आई बिनधास्त होऊन चहा पिण्याच्या आनंद घेऊ लागली.जास्त चहा घेतल्याने पुढे आईला ञास जाणवू लागला.दवाखान्यात नेल्यावर डाॕक्टरांनी सांगितले आजी चहा बंद करावा लागेल तेव्हा बाकी आईला डॉक्टरांचा खुप राग आला.आईने डाॕक्टरला सांगितले तुला काय गोळ्या सूई द्यायची ती दे आणि मला जाऊदे घरी.आईला मुद्दाम म्हणायचो आपल्याला आता चहा बंद करायचा आहे त्यावर आई मला सांगायची ,चहा पिऊन मेले तरी चालेल पण मी चहा प्यायचा सोडणार नाही.आणि खरोखर एका गंभीर आजाराने आई गेली .इतके चहाप्रेम होते की,एकदा आई आणि मी मुंबईला एका जवळील नातेवाईकाकडे गेलो,तिथे काही चहा आला नाही आईने नात्याने भावजय असलेल्या बाईला जागेवर खसकून टाकले.                  आमच्या सौ सुद्धा आईला सामील झाल्या होत्या.आजही त्यांचे चहाप्रेम अतुट असं आहे.मि आई असतांना कायम एक ओवी म्हणायचो "अमृताची वाटी येता माझे हाती /तेणे मज चित्ती आनंद ".चहा हा आईचा जिव की प्राण होता.आजही चहा समोर आला की,आईची आठवण ताजी होते
*==============================*
(यातील सर्व संबंधीत छायाचित्रे गुगलवरून घेतलेली आहेत)

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************