कोरोना: वाढती बेरोजगारी व नैराश्य. (भाग-1/3)


शिरीष उमरे,नवी मुंबई.

जानेवारी २०२० ला अंतर्देशिय विमान प्रवासी कोरोना भारतात घेवून आले. तेंव्हापासुन आज १६ महिने झालेत, कोरोना थैमान मांडतोय सगळीकडे... ह्या पाचशे दिवसात सगळी उलथापालथ झाली आहे देशात...


२०१४ च्या मध्यापासुन धार्मिक उन्मादाचा उगम मागिल सात वर्षात त्सुनामीचे रुप धारण करुन थयाथया नाचतोय संविधानाच्या छातीवर... भस्मासुरासारखी गत झाली आहे मतदारराजाची !! वणवा पेटतो तसे सगळीकडे आग पसरत चालली आहे. त्यात चुकीचे राजकिय निर्णय पेट्रोल सारखे काम करत आहेत... हा भडका आता सगळ्यांना भाजत चालला आहे. 


नोटबंदी व जीएसटी ह्यासारखे अवकाळी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी म्हणजे माकडाच्या हातात कोलित दिल्यासारखे झाल होतेे. कित्येक करोडो छोटे व्यवसायी, उद्योजक व सेवा पुरवठादार ह्यांची अर्थव्यवस्था कोलमोडुन पडली होती. नविन नोकरभरती तर सोडाच, जुन्या स्टाफची छाटणी सुरु झाली होती.


 ह्यातच एनपीए माफीच्या माध्यमातुन काही ठराविक कार्पोरेट घराण्यांना फायदा पोहचवुन बँका मोडकळीस आणल्या गेल्या. सामान्य लोकांना कर्ज मिळणे तर दुरच, त्यांच्या कष्टाच्या बचतीच्या ठेवी धोक्यात आणुन टाकल्या.  लघुउद्योग संपुष्टात येत गेलेत. सरकारी नियंत्रणातल्या कंपन्या विकण्याचा सपाटा लावलाय त्यातुन खाजगी क्षेत्राला फायदा पोहचवणे व आरक्षण संपवणे अशी दुहेरी कुटनिती अंमलात येत आहे.

शेतकरी, आदिवासी व मजुर वर्गाला जगणे मुष्कील करणाऱ्या पॉलिसी संसदेत पाशवी व अनैतिक मतदानाने मंजुर करवुन अर्थव्यवस्थेच्या कबरीवर शेवटचा दगड ठेवण्यात आलाय. 

ह्या सगळ्या अराजकतेत कोरोना ही आंतराष्ट्रीय आपदा आली. केंद्र सरकार व राज्य सरकारने ह्याचा योग्य फायदा उचलुन लॉकडाउन च्या शस्त्राचा वापर करुन बेरोजगारीचा पहाड तात्पुरता झाकण्यात यश मिळवले. 


लॉकडाउनच्या काळात झालेल्या मानवी हक्काची ऐशीतैशी व करोडो मजुरवर्गाची पायपीट हृदय पिळवटुन टाकणारी होती. एक वर्ष आख्खी भारतीय जनता घरी बसवुन ठेवली होती. -२३ ही जीडीपी ची निगेटिव ग्रोथ ह्याचेच ध्योतक आहे... 

कोरोनाचा मृत्युदर १% सुध्दा नाही आहे. ह्यापेक्षा दहापटीने जास्त मृत्युदर असणारे रोग भारतात आहेत त्यावर मुलभुत आरोग्य सुविधा कुठलेच सरकार पुरवत नाही. आर्थिक अंदाजपत्रकात आरोग्य व शिक्षणावर असलेली तुटपुंजी व्यवस्था व त्यात सरकारी यंत्रणेचा प्रचंड भ्रष्टाचार ह्यामुळे जागतिक पातळीवर १९६ देशाच्या यादीत १६४ वा नंबर आहे आपल्या देशाचा. हे सगळे दारिद्र्य लपवण्यासाठी जनतेला वेठीस धरणे सुरु आहे. 


कोरोना वर आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी सरकार जवळ ना पुरेसा मेडीकल स्टाफ आहे ना हॉस्पीटल बेड...ना आवश्यक औषधी ना वेंटिलेटर्स ... त्यातच महागाई चे जनतेला रोजचे झटके !!


आरोग्य व शिक्षणातील खाजगी क्षेत्रे तर जबरीची वसुली करुन राहिली आहे जनतेकडुन. मिडीयाद्वारे कोरोनाची प्रचंड भिती निर्माण करुन बेरोजगारी ह्या महत्वाच्या मुद्द्या वरील लक्ष वळवण्यात सरकारी यंत्रणेला यश मिळाले आहे. पण ही तात्पुरती थोपवणूक भयंकर रुप धारण करणार ह्यात शंकाच नाही. 


सध्याचे बेरोजगार तरुणवर्गाचे नैराश्य त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त आहे. प्रचंड प्रमाणात लोक डीप्रेशनचे बळी पडत आहेत. ह्यातुन त्यांना सावरणे गरजेचे आहे.  आज मुठभर सधन लोक सोडले तर ९०% भारतिय आर्थिक चणचणीला सामोरे जात आहेत. 


ह्यात वेळेवर योग्य उपाययोजना केल्या गेल्या नाहीत तर भविष्यात  जनक्षोभातुन गृह युध्द व गुन्हेगारीत नियंत्रणाबाहरील वाढ आणि नंतर  हुकुमशाही सारख्या अरिष्टके नाकारता येणार नाहीत. 


लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी व कोरोना संपवण्यासाठी आणि देशाला पुर्वपदावर नेण्यासाठी एकजुट महत्वाची... पुढील ३ वर्षे देशासाठी खुप महत्वाची !!! जागते रहो ....


किरण पवार,औरंगाबाद.

          ध्या कोरोनामुळे एक गोष्ट फार विचित्र झालेली पहायला मिळते आहे, ती म्हणजे नैराश्य येणं. नैराश्य येणं आणि त्याविरोधात मानसिक लढा देणं हे एका मर्यादेपर्यंत आधी बऱ्यापैकी सहज वाटतं होतं. परंतु कोरोनामुळे गोष्टी अशा काही बद्दलच्या की, पुढे दिसू लागणारी प्रत्येक शाश्वत गोष्ट अंधारात दिसू लागली किंबहुना नाहीशीच झाली. थोडक्यात यात करियरचा एखादा महत्वाचा टप्पा असेल, एखाद्या व्यवसायाचा जम बसवणं असेल, काहींच्या ठराविक स्पर्धा परिक्षा असतील, वा इतर विविध गोष्टींचा यात समावेश येतो. काही गोष्टी अशाही घडत आहेत की, अनेकांना दोन वर्षांच शिक्षण थेट ऑनलाईन मिळून नंतर त्यांच कॅम्पस इंटरव्हू, नंतर सिलेक्शन आणि थेट काम भेटलं तर वर्क फ्रॉम होम. कुठेतरी आपण आधीपासूनच अशा अचानक आलेल्या बदलाला सामोरे जाण्यासारखे नव्हतोच, आत्ताही अनेकांची ती मनस्थिती तयारच नाही होतं. नैराश्य यायला कारणीभूत ठरलेल्या ठराविक गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे, अनेकजण आज सर्वांसोबत, सर्वांमधे असूनही एकटे पडले आहेत. त्यांना त्यांच्या एकटेपणाची चाहूल आहे पण ती उलगडून दाखवता येत नाहीये. आपण माणूस म्हणून अनेकदा दिखाव्यांना अधिक महत्व देतो, ज्याने गोष्टी आपल्याच आंगलट येतात; आणि हे कोरोनाकाळात अनेकांचं झालं आहे. आज बेरोजगारी वाढलेली आहे तरीदेखील आम्हाला यासारख्या महत्त्वाच्या विषयावर पाठ फिरवायला अधिक आवडतं. कारण इन्स्टाग्राम रिल्स आनंद द्यायला सोबत आहेतचं की! मुळात आपण कोरोनामुळे व्यवस्थापन, नियोजन, आयुष्यात तयारीत रहाव्या लागणाऱ्या करियरसाठी इतर प्लॅन्सची अशी कुठली तसदीच घेतलेली नाही. बेरोजगारी कुणा एकाच्या अमुकतमुक निर्णयाने तयार झाली असं नाहीये, बेरोजगारी वाढीस लागायला अनेक घटक जबाबदार आहेत असं मला वाटतं. आणि राहिला प्रश्न नैराश्यातून बाहेर पडायचा तर ते आपण साध्य करू शकतो फक्त थोडासा खंबीरपणा मनाला जाणवून देण्याची गरज आहे. तुर्तास इथेच थांबतो, धन्यवाद!


सौदागर काळे,पंढरपूर.

वळपास दीड वर्ष झाले कोरोना हा आजार आपल्यात आहे.सध्या तो जास्तच वेगाने आपले साम्राज्य तयार करतो आहे. त्याच्या या शक्तीपुढे जगातील अणवस्त्रधारी देश सुद्धा नांगी टाकत आहेत.त्याने सर्वांची अर्थव्यवस्था खिळखिळी केली.तहान लागली की विहीर खोदण्याचा प्रकार करावा तशाप्रकारे सर्व देशांतील सरकारांनी आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष देण्याचा चंग बांधला.पण तो किती तकलादू आहे याचा आपण रोज  मीडियाद्वारे तमाशा पाहतो आहे.आता कोरोना वर लस आली.लसीकरण चालू झाले.या पार्श्वभूमीवर आपल्या राज्याचा विचार केला तर केंद्र-राज्य , सत्ताधारी-विरोधक यांच्या भांडणात केव्हाही राज्याची परिस्थिती हाताबाहेर जाईल की काय! असे चित्र उभे राहत आहे.


उद्या कोरोना जेव्हा जाईल तेव्हा त्याने किती हानी केली याच्यापेक्षा त्याने आपल्या या व्यवस्थेप्रती आपले कितपत डोळे उघडले,हे अनुभवणे खरं महत्त्वाचे ठरणार आहे. 

मानवाच्या मूलभूत गरजांपैकी अन्न ही जगण्या-मरण्याच्या अस्तित्वाची गरज आहे. वस्त्र,निवारा,आरोग्य व शिक्षण या गरजा पोट भरल्यानंतर येतात.तरीपण या साऱ्या गरजांची पूर्तता होण्यासाठी या व्यवस्थेत आपण धडपडत असतो. अशावेळी योग्य वयात काम मिळणे खूप गरजेचे आहे.ते मिळत नसल्याने खुपजण नैराश्यात जीवन जगत आहेत.कोरोना येण्यापूर्वी आपल्या देशात बेरोजगारी व त्याच्या मुळे लोक नैराश्यामध्ये जाण्याचे प्रमाण होतेच.हे नाकारून चालणार नाही.फरक एवढाच होता तेव्हापर्यंत ते पद्यावर अंधूकपणे दिसण्याची व्यवस्था सरकारने केली होती ती आता कोरोनाने हातामध्ये सूत्रे  घेताच  पडद्यावर स्पष्टपणे दिसू लागले. कोरोनापूर्वी नवा रोजगार मिळावा म्हणून काम करण्यासाठी तरुण वर्ग प्रतीक्षेत आहे.


आता कोरोना काळात अर्थव्यवस्था बेजार झाल्याने जे रोजगार होते ते सुद्धा जात आहेत.ज्यांचा रोजगार जात आहे, तो वर्ग कौटुंबिक जबाबदारीचे ओझे वाहणारा आहे.ज्याच्यावर अख्खे कुटुंब अवलंबून आहे. जॉब नसल्यामुळे लग्न न होणाऱ्या तरुणाईपेक्षाही हा वर्ग सर्वात जास्त नैराश्यात असणार यात शंका नाही.या कोरोनाच्या काळात जे असंघटित क्षेत्रात काम करत होते.त्यांचे रोजगार गेले. सुरुवातीच्या लॉकडाउनच्या काळात रस्त्यावरून घरी चालत जाणारे लोक पाहिले की अजूनही ते विचलित करून जातं. त्यांनी ते अनुभवलं.आजही ते पोटाला चिमटा काढत येणाऱ्या दिवसाला सामोरे जात आहेत.


हे कधीपर्यंत चालेल.माहीत नाही.उद्या कोरोना या जगातून जाईल सुद्धा.पण बेरोजगारीवर राज्यकर्ते लस तयार करतील का! याचे सध्यातरी उत्तर नाहीच. त्यामुळे आपण नैराश्याला सोशल डिस्टिंग प्रमाणे सध्यातरी दूर ठेऊनच जगूया.यातच भले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************