नातेसंबंध लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नातेसंबंध लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रक्षाबंधन - भावा बहिणीचे बदललेले भावनिक संदर्भ.


वैशाली सावित्री गोरख .पंढरपूर(पुणे)
             रक्षाबंधनाचा अर्थ मी पहिल्यापासून हाच ऐकत आलेय की भाऊ बहिणीच रक्षण करतो म्हणून बहीण भावाला राखी बांधते म्हणजेच धागा जो आयुष्यभर भावाने आपल्या पाठीशी उभे राहावे ह्याच प्रतीक आहे .पण माझ्या बाबतीत हे अतिशय वेगळं आहे मी जेव्हा लहान होते म्हणजे आठवी पर्यंत मी शाळेत कार्यक्रमाला डान्स घ्यायचे तेव्हा माझा भाऊ घरी येऊन आई जवळ खूप तक्रार करायचा एक मोठा भाऊ ह्या नात्यानं मला धाकात ठेवण्याचा तो प्रयत्न होता पण लवकरच आमच्या वेगळ्या आयुष्याला सुरुवात झाली ,जीवनाशी संघर्ष ,शिक्षणासाठी संघर्ष त्यात मला माझ्या भावाने प्रत्येक गोष्टीत साथ दिली ते पण अशा पद्धतीने की मी कधी वैचारिक रित्या स्वतंत्र झाले ते मलाच समजलं नाही .आमच्या घरात आम्ही दोघांनीही काम करून शिक्षण घेतलं त्यामध्ये माझ्या भावाने मला अकरावीच्या अडमिशन घेऊन दिल व सांगितले की इथून पुढचे तुज्या जीवनाचे प्रत्येक निर्णय तुझे असणार मग चुकली तरी त्याला जबाबदार तू स्वता असशील नि हीच माझी खरी सुरुवात होती .नंतर पुण्याला शिक्षणाला आल्यानंतर ही तेच झालं जेव्हा मी पुण्यात पहिल्यादा येणार होते त्यावेळेस मला सांगितल गेलं की एकटी ये ,पुण्यासारख्या शहरात एकटं येण म्हणजे माझ्या साठी खेड्यातील मुली साठी खूप अवघड गोष्ट होती पण मी ते ही धाडस केलं त्यावेळेस मी भैय्याला भांडायचे की तुला माझी काळजी नाही तू मला एकटीला कसा प्रवास कण्यासाठी सांगू शकतोस पण माझ्या लक्षात येत नव्हतं की ते माझं ट्रेनिंग चालू होतं एक सक्षम स्त्री ,बहीण,मुलगी बनण्याचं व त्यामुळे आज मी कुठेही धाडसाने जाऊ शकते .ज्यावेळेस मी मी एकटीने ट्रेक केला त्यावेळेस माज्या भावाला खूप आनंद झाला होता .आजही मी कुठे फिरायला जायचं असेल तर मला घरात कोणाला विचारावं लागत नाही फक्त काळजी नको म्हणून मीच सांगत असते.तो माझ्यापेक्षा तीन वर्षांने मोठा आहे तरीही मी त्याला त्याच्या नावाने बोलावते,हक्काने त्याला घरातील काम सांगू शकते व तो ती त्याची जबाबदारी म्हणून करतो. एक मित्र म्हणून माझ्या आयुष्यातील सगळ्या गोष्टी त्याला सांगते व त्याच्या ही सगळ्या गोष्टी विचारून घेते .आमच्या मधील हे नात कधीच भाव नि बहीनिच न राहता एक चांगला मित्र म्हणून तयार झालं आहे मी सामाज्यात पाहते की खूप जास्त प्रमाणात भाऊ आपल्या बहिणींवर नजर ठेवत असतात पण माझा भाऊ मला सांगत असतो हा हा फिल्म खूप छान आहे बघायचा असेल तर बघून ये .त्यानं स्वतःला डेव्हलप केलेली ही एक वेगळी विचारसरणी आहे त्यामुळे मी सक्षम होण्यास प्रयत्न झाला आहे .प्रश्न राहिला रक्षाबंधनाचा,दिवाळीतील भावाची ओवळणीचा ,नागपंचमीचा भावाचा उपवास तर मी ह्या कोणत्याच गोष्टी करत नाही नि आमच्या घरात होत ही नाहीत .माझा भाऊ रक्षण करण्यासाठी माझ्या पाठीशी उभा नाही तर मला सोबत घेऊन चालत आहे असे हे आमुचे बदलते भावनिक संबंध आहेत .



अर्जुन (नाना) रामहरी गोडगे,
सिरसाव ता-परंडा जि-उस्मानाबाद

नात प्रेमाचं तुझं अन माझं आहे ..
सय येते बारक्यापाणीच्या दिसाची..!!
गमावलले ते गोड दिवस..
आठवत राहतात आजही..!!
मनी भाव दाटत राहतोय..
हातातल्या राखीसोबत..!!
बंद हे प्रेमाचे नात आहे
ताई हे आपलं जन्मजन्मोचं आहे..!!


*संगीता देशमुख,वसमत*
          आपल्याला रक्षाबंधनाचा इतिहास फार प्राचीन आहे. इंद्राच्या खचलेल्या हातावर त्यांच्याच पत्नीने राखी बांधून पतीचा आत्मविश्वास वाढविला होता तर कृष्णाच्या जखमी बोटावर आपल्या पदराची चिंधी बांधून त्याच्याशी मैत्रीपूर्ण भावाचे संबंध प्रस्थापित केले होते. चित्तोडगढची राणी कर्मावतीने बहादूरशाहपासून  स्वतःच्या रक्षणासाठी मुघल हुमायूँला राखी बांधली होती. याचाच अर्थ असा की,हा सण आपण भावाबहिणीच्या ऋणानुबंधाचा मानत असलो तरी इतिहास पाहता हा सण रक्षणाचा आहे. आपण यास राखीपोर्णिमा म्हणत असलो तरी त्यापेक्षा रक्षणासाठी बांधलेला धागा म्हणून "रक्षाबंधन" हे नाव अधिक समर्पक वाटते. कोणी यास कजरी पोर्णिमा,कोणी राखीपोर्णिमा तर कोणी नारळीपोर्णिमा म्हणतात. रक्षणाच्याच हेतूने बांधले जाणारे हे बंधन,म्हणून रक्षाबंधन!  आज ही प्राचीन परंपरा आपल्यापर्यंत झिरपत आली आहे. कालानुरूप सर्वच बाबी आहे तशा आपण स्वीकारत नाहीत. आपल्या सोयीनुसार आपण काय स्वीकारायचे आणि काय नाकारायचे हे ठरवत असतो. तसाच हा अनेक सणांपैकी असणारा रक्षाबंधनाचा सण! 
            पूर्वी सासुरवाशीण बहीण भावाची आतुरतेने वाट पहायची. त्याला राखी बांधण्यापेक्षाही त्याच्याशी हितगुज साधून माहेरची वास्तपुस्त करणे,माहेरच्यांची सर्वांची ख्यालीखुशाली विचारणे आणि त्यासोबतच आपलेही मन मोकळे करणे घडायचे.  तिच्या साचलेला मनाचा निचरा व्हायचा. माहेरची खुशाली ऐकून अंगावर मूठभर मांस चढल्यासारखे वाटायचे. तेवढाच संसाराचा दाह कमी होऊन संसारात नव्याने हुरूप चढायचा. माहेरून येणारी माणसेच काय ती संपर्काचे माध्यम होते. परंतु आजकाल विवाहित मुलींना एकतर पूर्वीसारखा  सासुरवास नाही आणि दुसरे म्हणजे संपर्कासाठी हातात मोबाईलसारखे साधन आले. सर्वात महत्वाचे आजच्या चौकोनी कुटुंबात त्यांचीच सत्ता असल्याने भावनांच दमन होत नाही. त्यामुळे पूर्वीप्रमाणे या सण उत्सवात रस वाटत नाही. ज्या आस्थेने हे सण साजरे व्हायचे त्याविरुद्ध आता आस्था जाऊन तिथे दिखाऊपणा आला. आता सण साजरे करण्यामागे प्रतिष्ठा हा हेतू प्रभावी ठरतो आहे. आजकाल इथे पैशाची उधळण,भपकेबाजपणा आला. आई आपल्या घरातल्याच  लेकराला प्रत्यक्ष शुभेच्छा देण्याऐवजी आधी फेसबुकवर शुभेच्छा देऊ लागली. या सोशल मिडियाने माणसामाणसातले भौगोलिक अंतर कमी केले पण भावनिक अंतर मात्र निश्चितच वाढवले आहे. कारण आजकाल दिवस सेलीब्रेशनचे आहेत. प्रत्यक्षात कोणत्या बाबी होवोत अथवा न होवोत परंतु "कालाय तस्मै नम:" प्रमाणे आधी त्या बाबी सोशल मिडियावर अपलोड केल्या जातात. मग याला नाती तरी कशी अपवाद असतील? नातीही अशीच आज हळूहळू कोरडीठाक होत चालली आहेत. नात्यातील ओलावा नात्याच्या मुळांपर्यंत न पोहोचता तो सोशल मिडियावरच्या दिखाव्यापर्यंतच मर्यादित राहिला आहे. मग त्यात नाती कोणतीही असोत,तीही सवंग आणि उथळ जगात वहावत जात आहेत
कुटुंब अधिकाधिक छोटी होत चालली,घराच्या भिंती रुंदावू  लागल्या तशीच नात्यातील अंतरही रुंदावत आहे. नात्याला घट्ट बांधून ठेवणारी धागे आजकमकुवत झाली आहेत. परंतु भावा-बहिणीच्या नात्याचा घट्ट बांधून ठेवणारा राखीचा धागा मात्र जेवढा कोमल तेवढाच तो जबाबदारीत बांधून ठेवणारा राकट धागा आहे.  परंतु हे बहीणभावाचे नाते काही ठिकाणी कायद्याच्या चौकटीत जाऊ पहात आहे.
         पूर्वीची बहीण भावाला प्रेमाने जिंकून घेण्याचा प्रयत्न करायची तर आजच्या काही बहीणी भावाच्या संपत्तीत बरोबरीने वाटा मागून घेत आहेत. कायद्याने अधिकार मिळतो पण प्रेम उरत नाही. त्यामुळे आज रक्षाबंधन जवळ आले की,भावाच्या पायाना  बहिणीकडे जाताना जी ओढ होती त्यात आज थोडी धाकधुक आली,कारण बहीण राखीच्या बदल्यात साडीचोळीच्या रूपात काय मागेल,हे सांगू शकणार नाही. यात बहीण आहे आणि भाऊ सधन आहे,असेही काही नाही. बहीणही सधन असली तरी भावाच्या संपत्तीत तिला वाटा हवा असतो.  पण अशी उदाहरणे फार तुरळक आहेत. अजूनही अनेक बहिणी आपल्या भावाला फार श्रध्देने,आस्थेने राखी बांधतात. माझा भाऊ माझे रक्षण करीलच आणि आपण बांधलेल्या राखीने तो अजून सक्षम होईल,दीर्घायुषी होईल,अशी आशा बाळगतात. पण आजच्या काही बहिणी अशाही आहेत की,ज्या भावापेक्षा अधिक सक्षम आहेत. अनेक ठिकाणी त्याच आपल्या भावाच्या पाठीराख्या म्हणून कणखरपणे उभ्या आहेत. अनेक कमावत्या बहिणी आज अविवाहित राहून भावाच्या संसाराला तोलून धरणाऱ्या आहेत. आजच्या भावालाही आपली बहीण स्त्री म्हणून कमजोर वाटत नाही,तर ती भरभक्कम आधार वाटते. राखी ही  रक्षणाचे प्रतीक आहे. ती कोणी कोणाला बांधली,हे महत्वाचे नसून दोघेही एकमेकांचे रक्षक ठरावेत,एकमेकांना एकमेकांचा आधार वाटावा,हे आज अपेक्षित आहे. मला राखी माझी बहीण आहे तशी या जगातील प्रत्येक मुलगी,स्त्री ही कोणाची ना कोणाची बहीण आहे. माझ्या बहिणीसोबतच तिचे रक्षण झाले पाहिजे. स्त्रीवरचा अन्याय,अत्याचार थांबवता आला पाहिजे,तिच्यावर होणारे बलात्कार थांबवता आले पाहिजे,अशा उदात्त हेतूने भावाने ही राखी आपल्या बहिणीकडून बांधून घ्यायला हवी. मग ही फक्त बहीण भावापुरती राखीपोर्णिमा रहाणार नाही तर ती सुदृढ,निकोप समाजासाठी खरे "रक्षाबंधन" ठरेल. अशाच "जबाबदार  रक्षाबंधना" साठी सर्व बहीण आणि भावाना शुभेच्छा!



अमोल धावडे ,अहमदनगर

बहन का प्यार किसी दुआ से कम नहीं होता,
वो चाहे दूर भी हो तो गम नहीं होता,
माना कि रिश्ते दूरियों से फीके पड़ जाते हैं,
लेकिन भाई-बहन का प्यार कभी कम नहीं होता।।

हिंदू संस्कृतीमध्ये रक्षाबंधन सण साजरा केला जातो. बहीण भावाच्या उदंड आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करते त्याचप्रमाणे भाऊ तिच्या संरक्षणासाठी तिला वचन देतो व आयुष्यभर तिचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध राहतो हे सांगायचे कारण आज काही कामकाजानिमित्त बन पिंपरी या ठिकाणी गेलो होतो. गावाकडील लोकांचे प्रेम म्हणजे यात शँकाच नाही घरात कितीही गरिबी असली तरी घरी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत मनापासून करतात. आज एका मुलाच्या गृहभेटी दरम्यान चर्चा करत असताना सदर परिवारातील मुलीचा विषय निघाला. तिचे नाव मानसी नाव काल्पनिक किती शिक्षण झाले तर तिने सांगितले ९ वी तुन शिक्षण सोडले व आई वडिलांनासोबत शेतीचे काम करते. वडील दारू पितात पुढे शिक्षण करायचे नाही. वयाच्या १४ व्या वर्षी तिचा साखरपुडा केला. मुलीशी बोलत असताना तिला पुढे शिक्षण कारवायाचे आहे समजले. चहा घेवून झाल्यावर आम्ही निघालो तर मुलगी ओवळणी ताट घेऊन आली ते पाहून मी बोललो हे काय तर तिने सांगितले की दादा रक्षबंधन जवळ आली आहे तर तुम्हला राखी बांधायची आहे. ऐकुण आनंद झाला व मोठा भाऊ म्हणून तिने मला राखी बांधली आणि ओवाळणी म्हणून तिच्या पालकांना संगितले की मुलीचे शिक्षण बंद करू नका तिला कुठल्याही प्रकारची मदत लागली तर मला निसंकोचपणे फोन लावा. आज मला आणखी एक छोटी बहीण मिळाली. देवाचे आभार. मी ठरवलंय की तिच्या पुढील भविष्यात कोणत्याही प्रकरची मदत लागो ती मी एक मोठा भाऊ म्हणून करण्यास तयार आहे. 
खरच गावाकडील जीवन खुप सुंदर व लोक त्याहूनही प्रेमळ असतात.😍😍
#Thanksमानसी..
सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा💐

लिव्ह इन रिलेशन... काळाची गरज की पाश्चात्य संस्कृतीच आक्रमण.

🌱 वि४🌿 व्हॉट्सअप ग्रुप
लिव्ह इन रिलेशन... काळाची गरज की पाश्चात्य संस्कृतीच आक्रमण.

(यातील सर्व प्रातिनिधिक छायाचित्रे गुगलवरून घेतलेली आहेत)

गीताश्री मगर,पुणे
लिव्ह इन रिलेशनशिप काळाची गरज...
वाढते डायव्होर्स चे प्रमाण बघून वाटते की लिव्ह इन रिलेशनशिप काळाची गरज आहे. बऱ्याच वेळा लव्ह मॅरेज होऊनही डायव्होर्स होतात कारण दोन माणसे प्रत्यक्ष एकत्र राहू लागल्यासच ते एकमेकांना खऱ्या अर्थाने समजू शकतात. त्यामुळे लिव्ह इन रिलेशनशिप हे बेटर वाटते. जर का पुढे चालून पटले नाही तर ताबडतोब वेगळे होता येते. पण लव्ह मॅरेज असो की अरेंज मॅरेज वेगळे होण्याची प्रक्रिया खूप किचकट आणि वेळखाऊ असते. त्यासाठी कोर्टवर डिपेंड राहावे लागते. मग काहीवेळा नाते आहे तसेे फक्त ऍडजस्ट करत पुढे ढकलले जाते. जोडपे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहते त्याअर्थी मला वाटते तिथे व्यक्तिस्वातंत्र्य, स्त्री पुरुष समानता ह्या मूल्यांवर त्या नात्याची उभारणी होते. (काही अपवाद वगळून ) त्यामुळे सोबत राहताना जास्त तणाव वाटत नाही. पण एक असते छोटी मोठी भांडणे झाली की आपला पार्टनर सोडून जाईल की काय आता अशी भीती कायम दोघांमध्ये राहते. पण प्रेम दृढ असल्यास, बॉंडिंग चांगली असल्यास तशी भीतीही वाटत नाही. पण कधी कधी ह्या भीतीनेही माणूस नाते चांगले पध्दतीने जपण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे लिव्ह इन रिलेशनशिप मला तरी बेटर वाटते. पण एखाद्या केस मध्ये पार्टनर सोडून जरी गेला तरी त्यानंतर तुम्हाला एकटे राहता आले पाहिजे. असंही राहण्याची तुमची तयारी असायला हवी. त्यासाठी तुम्ही आर्थिक रित्या स्वावलंबी असायला हवे. आणि मनाने स्ट्रॉंग असले पाहिजे.
लिव्ह इन रिलेशनशिप चे सगळ्यात चांगले उदाहरण द्यायचे म्हणले तर अमृता आणि इमरोज ! बस्स असं जगता आलं पाहिजे ! तसं जगता आलं तर लाईफ खूप सोपी आहे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये !

रामेश्वर रोकडे,उस्मानाबाद
विवाह म्हणजे दोन भिन्न लिंगी व्यक्ती एकत्र येऊन प्रजोत्पादन व कौटुंबिक जबाबदारी पाळण होय.मानवाने तंत्रज्ञानाच्या सहाय्याने खूप प्रगती केली.सुखवस्तू,भौतिक वस्तू,तंत्रज्ञान ,विज्ञान यांमध्ये प्रगती केली परंतु मानवी हव्यासापोटी शाश्वत विकासाला मात्र विसरला.प्रगती करत असताना जिवनाची मूल्य व शारीरिक,भावनिक,सामाजिक बांधिलकी मागे पडत चालली आहे. आजची जिवनशैली व आहार, व्यसनाधिनता यामुळे मानवी आरोग्यावर खूप मोठा परिणाम झाला आहे.त्याचाच परिणाम शारीरिक,मिनसिक,भावनिक आरोग्य खालावत जाऊन मानवी जिवन एकलकोंडे बनत चालले आहे.मानवाच्या शारीरिक काम (sex) हे फक्त उपभोगापुरताच विचार करत आहे.काम हे वाईट नाही पण त्याला नितीमत्तेची जोड हवी.मनाचा चिडचिडेपणा,कामाचा ताण,व्यसन,अपुरी कामेच्छा,समजुन घेण्याची स्थिती यांमुळे कौटुंबिक जिवनातील वाढता संशय त्यामुळे घटस्फोट प्रमाण वाढत आहे.तसेच स्वतंत्र कुटुंब पद्धती यामुळे सहजिवनाचा अभाव.यामुळे तात्पुरते संबध म्हणजे लीव्ह इन रिलेश असे प्रकार वाढतात.त्यातुनच समलींगी विवाहांना परवानगी.सरोगेसी मदर असे प्रकार वाढतात.सरोगेसी मदर हा तर भारतात मोठ्या प्रमाणात चालतो.यामध्ये स्त्रीत्वाचा अपमान आहे ऐक पैश्यासाठी केलेली पिळवणूक आहे.भारत ही भूमी समशितोष्ण पट्ट्यात येते इथे वातावरण हे आरोग्यदाई आहे.वैवाहिक जिवनाला कामोत्तेजना देणारे आहे.तसेच वैज्ञानिक दृष्टीने मानवाला कायमस्वरूपी सहजीवन साथीदाराची गरज असते.याचबरोबर भारतीय संस्कृती मध्ये सोळा संस्कारापैकी एक महत्त्वाचा संस्कार विवाहाला मानलेला आहे.तसेच मानवाने प्रगती केली,सुखवस्तू जिवनामध्ये वाढल्या म्हणजे मानवाने यंत्राप्रमाणे वागू नये.मानवाच यशस्वी जिवन हे कुटुंब, परिवार, समाज याला अनुसरूनच पुर्ण होते.तेंव्हा या सर्वांना फाटा देऊन वैचारिक,शारीरिक ,आर्थिक दृष्टीने एकत्र येऊन लिव्ह इन रिलेशन अस राहण हे किती योग्य?म्हणून भारतात वैज्ञानिक,सामाजिक ,सांकृतीक,भौगोलिक दृष्टीने लिव्ह इन रिलेशन हे फक्त पाश्चात्त्य संकृतीच अंधानुकरणच आहे. ती काळाची गरजही नाही.
श्रीनाथ कासे,पुणे 
'लिव इन रीलेशनशीप' ही नेमकी भानगड काय आहे ? त्यामागचे उद्देश काय आहेत ? नंतर अभ्यासानुसार कळाले कि, 'स्त्री -पुरुष लग्न न करिता काही काळासाठी किंवा कायम शारीरिक आणि मानसिकरित्या एकत्र राहणे होय.' हा पण एक पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरणाचा भाग आहे. जसा 'valentine's day' हा एक प्रकार आहे, तसाच हा एक प्रकार. भारत देश मुळात अनुकरणीय आहे आणि अनुकरण करताना चांगल्या आणि वाईट या दोन्ही गोष्टी अनुकरण होत असतात. 'valentine's day' हा जसा प्रेम व्यक्त करावयाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. तसा तोच प्रेम अनुभवता यावा यांसाठी 'लिव इन रीलेशनशीप' हि भानगड आली असावी. मुळात माझ्या ओळखीचा किंवा बघण्यात असा एकही व्यक्ती ' लिव इन ' मध्ये राहत नाही. हा प्रकार ग्रामीण भारतात कधीच दिसला नाही. हा फक्त काही शहरापुरते, आणि आर्थिकद्रुष्टीने स्वयंपूर्ण असलेल्या स्त्री पुरुषांपुरतेच प्रचलित आहे असे मला वाटते.
काहीजणांना 'लिव इन' हा धर्म बुडवणारा किंवा विवाहसंस्था बुडवण्याचा कट वाटत असला तरि जसा जीन्स पँट, टी शर्ट, मोबाईल इ. हळूहळू आपल्या जीवनाच्या अविभाज्य घटक होत गेल्या तसाच हा प्रकार सुध्दा हळूहळू समुदायाचा अविभाज्य घटक होत जाईल पण त्याला अजून तरी बराच वेळ आहे.
मा. सुप्रीम कोर्टाने 23 जुलै 2015 ला याबद्दल निर्णय दिले. "18 वर्षांवरील मुलगी स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते. मुलगा आणि मुलगी एकत्र राहणे हा 'जगण्याचा अधिकार' आहे. ' Domestic Violence Act 2005 ' यामध्ये या गोष्टी समाविष्ट केले गेले आहे.
भारतात पूर्वीपासून बहुपत्नी प्रथा आणि बहुपती प्रथा (हिमाचल प्रदेश आणि द.भारत) चालत आली आहे. आणि अजूनही बघावयास मिळते. बहुपत्नी प्रथेचे आणि 'लिव इन' चे उत्तम उदाहरण म्हणजे गुजरात राज्यातील 'मैत्री- करार' , या करारात विवाहित पुरुष स्टँप पेपर वर 'मैत्री करार' करून महिलेला घरी आणतो. यानंतर दोघे पती पत्नी प्रमाणे 'लिव इन' मध्ये राहतात. या प्रथेपेक्षा तरी 'लिव इन' बराच आहे असे म्हणावे लागेल.
शेवटी इतकेच सांगू शकतो, जोपर्यंत गावातील  'दगडू आणि धोंडू' यांसारख्या सामान्य लोकांपर्यंत 'लिव इन रीलेशनशीप' पोहचत नाही तोपर्यंत हा प्रकार सपशेल अयशस्वीच आहे असे मला वाटते.

किरण पवार,औरंगाबाद.
मला तरी लिव्ह इन रिलेशनशिप ही काळाची गरज वाटत नाही. बदलत्या काळानुसार गोष्टी बदलतात. त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत, हे मी मान्य करतो. पण सध्या माझ्या मते लिव्ह इन रिलेशनशिप मुळे *नातं उलगडण्याची जी मजा असायची ती आता उरली नाही.* या पाश्र्चात्य प्रढथेमुळे दुसरा तोटा असा की, *एकमेकांना जाणून घेण्याच जे कुतूहल होतं, ते नष्ट झाल. त्यामुळे एकमेकांचे गुणदोष सर्व माहिती असल्याने काही वेगळी बाब उरत नाही.* परिणाम आनंद, समाधान सगळच संपत.

प्रा. रोहन वर्तक,लोणावळा
जागतिकीकरण 1991 पासून भारतात सुरू झाले, जागतिकीकरण म्हणजे काय? तर भारताच्या व्यापाराच्या सीमा वृद्धिंगत करण्या हेतूने जगातील बहुतांशी देशाशी आपण सर्वांगाने आणि सर्वार्थाने संबंध ठेवण्यास सुरवात केलेली आहे.
ह्या जागतिकरांच्या प्रवासात व्यापराबरोबर अनेक विचारप्रवाह, भाषा, तंत्रज्ञान, शब्द इ. भारतात आले आणि भारतातून बाहेरही गेले... त्यापैकी एक शब्द प्रयोग जो भारतात रुजू पाहतोय तो म्हणजे  live in relation..........?

live in relation म्हणजे नक्की काय? तर शाररिक आणि मानसिक सुखा साठी दोन व्यक्तींनी समोपचाराने एकत्र राहणे होय...

गेली कित्येक वर्षे माणूस बदलतोय. तो स्वतःला अपेक्षित आणि सोयीस्कर बदलाना स्वीकारत सो कॉल्ड... प्रगती करत आहे.
वाढलेली लोकसंख्या, वाढलेली बेरोजगारी, अत्यल्प उत्पन्न, उंच अपेक्षा, आणि भयानक वास्तव.... यातून मला हवं असलेलं प्रेम मला मिळत नाही किंवा माझ्या अपुऱ्या कामाईमुळे अनेकांचं लग्न करण्यातही अनेक अडचणी येतात. यात वय वाढत जात आहे आणि सेक्स विषयी भावना निर्माण  होऊन दिवसेंदिवस तीव्र होत आहेत, तेव्हा समविचारी सहचारी अपेक्षित असतो पण तेथे भावनांचा बांधिलकी नको असते, मग यातून शाररिक सुख आणि मानसिक आधार निर्माण होण्याकरिता आज प्रामुख्याने लिव्ह इन रिलेशन हे इन्स्टंट सोल्युशन आहे, आणि हे अनेकांना पटत देखील आहे. हेच एक प्रमुख कारण आहे आज ह्या गोष्टी स्पष्ट पणे मांडल्या जात आहेत.

लिव्ह इन रिलेशन ही प्रथा म्हणजे पाश्चात्य संस्कृतीचे आपल्या संस्कृतीवर आक्रमण आहे असे म्हणणे चुकीचे होईल. मुळात भारताचा इतिहास बघितला तर लग्न बाह्य संबंध, लग्नाच्या पूर्वीचे संबंध हा लिव्ह इन रिलेशनचा एक अध्याय म्हणावा लागेल. जे आज तागायत भारतातील बहुतांशी समाजाला अमान्य आहे. परंतु जागतिकरणामुळे त्याला पाश्चिमात्य देशांनी दिलेले गोंडस नाव आपला समाज स्वीकारत आहे आणि अत्यावश्यक गरजेच्या पुर्तते साठी समाजमान्य मार्ग लिव्ह इन रिलेशन च्या हेडलाईन खाली स्वीकारत आहे. थोडक्यात काय तर काहीतरी नवीन म्हणून बोबलत आत्मसात करण्यास सुरुवात केली आहे.

ग्रामीण भारतात देखील लिव्ह इन रिलेशन होते आणि आहेत फक्त समाज त्या नात्याला अनैतिक संबंध म्हणवून हिणावत असतो. तर शहरी भारतात सध्या हे नातं मुकुटासारखा मिरवत जात आहे.

आपला बहुतांशी समाज अध्यात्मिक आहे. हाच आध्यत्मिक समाज ह्या नात्याला समजून घेऊ शकत नाही म्हणून एकंदरीत ह्या संबंधांकडे बघण्याचा दृष्टिकोन बहिष्कृत असल्याचे चित्र जास्त ठळक पणे दिसते. तर आधुनिक विचारवंत आणि खऱ्या अर्थाने शिक्षित समाज स्वतःच्या तर्क  शुद्ध बुद्धीचा वापर करून हे नातं आणि आपली माणस जपत आहेत हेही तेवढच खरं.

मॅस्लो च्या सिद्धांतानुसार मानवाच्या 5 प्राथमिक गरजा असतात त्या म्हणजे अन्न,वस्त्र,निवारा, झोप आणि सेक्स.
सेक्स ही प्राथमिक गरज भागविण्याकरिता आणि मानसिक आधाराकरिता लिव्ह इन रिलेशन आजच्या युगात अत्यावश्यक आहे असे माझे मत आहे. आणि अशा नात्याला समाजाची मान्यता नसेल तर हीच भूख भागविण्याकरिता जागो जागी आसाराम, राम रहीम तयार होयला वेळ लागणार नाहीत.
धन्यवाद

अनिल गोडबोले,सोलापूर
भारतामध्ये जर आपण सध्या काही गोष्टीच निरीक्षण केले तर असे आढळून येत आहे की एका बाजूला सगळीकडे संस्कृती आणि बऱ्याच आदर्शवादाच्या कल्पना दिसत आहेत तसेच दुसरीकडे ' आपण एखादी गोष्ट का करतो किंवा का करत नाही' याचं काही ठोस कारण माहीत नसताना आपण पिढ्यानपिढ्या तसेच वागत आहोत.

लग्न संस्था मोडकळीला आलेली आहे व कुटुंब संस्था खूप मोठ्या परिवर्तन घडवून आणण्याच्या मार्गावर आहे. वाढते घटस्फोटाचे प्रमाण, पारंपरिक लग्न पद्धती, मुलींचे कमी होत चाललेले प्रमाण, लिबरल संस्कृती व विचार यांच्या गुंत्यामध्ये अडकलेली युवा पिढी लग्न या गोष्टीतील मूळ गाभा *सहजीवन*... हेच हरवून बसले आहेत.

कामाच्या निमित्ताने किंवा पैसे मिळवण्यासाठी वीकेंड मॅरेज सांभाळत बसलेल्या जोड्या दिसत आहेत. म्हणजे लग्न एका व्यक्तीसोबत आणि दिवसातले 18 तास दुसऱ्या व्यक्तीसोबत अस काहीसं चाललेलं आहे.

प्रजनन आणि सेक्स या गरजा पूर्ण करणे ही देखील फार प्राथमिकता उरलेली नाही. लग्न जुळवताना अवास्तव कल्पना केल्या जातात आणि त्या पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर पळत राहणे एवढंच जीवन झाले आहे.

लग्न संस्थेतून आलेली बंधन ज्याला पाळता येतात त्याला ठीक आहे पण जो ही बंधन पाळू शकत नाही तसेच दुसऱ्याला पाळण्याची सक्ती करू शकत नाही त्यामुळे मानसिक तणाव वाढत आहे व आपलेपणा कमी होत जातो आणि शेवटी फकत दोन शरीर एकत्र राहतात..

(सर्व व्यक्तीच्या बाबतीत अस होत नाही परंतु वारंवारता वाढत चाललेली आहे)

या सर्व प्रसंगाचा अभ्यास करताना असे जाणवले की लिव्ह इन रिलेशन हा एक मार्ग यावर का असू नये?.

ज्या मध्ये स्वातंत्र्य आहे, प्रेम आहे, गरजा पूर्ण करणे आहे, व्यवहारी बाजू आहे, जबाबदारी आहे आणि दुसऱ्या बाजूला गृहीत धरलं जाण्याची भीती नाही.

म्हणजे एकाने तडजोड करायची आणि दुसऱ्या व्यक्तीने गृहीत धरायचे ही व्यवस्था राहत नाही.
व्यक्ती सोबत राहिल्या की भावना एकत्र येतात त्यामुळे भावनिक नात निर्माण झालं तर लग्न झालं काय किंवा कॉन्ट्रॅक्ट झालं क्या किंवा लिव्ह इन... असलं काय! शेवटी प्रेम असेल तर चांगलंच आहे की..

संशयी वृत्ती असली की दोन्ही गोष्टी टिकू शकत नाही पण इकडे जर संशय आला तर संवाद साधण्याचा किंवा समजून घेण्याचा पर्याय आहे व जास्त झालं तर सोडून देण्याचा पर्याय आहे.

प्रेम नसलेली जोडपी एकत्र राहिली काय आणि नाही राहिली काय? काही फरक पडत नाही.

लग्नामध्ये एकनिष्ठता जशी मान्य आहे तशीच इथे ही एकनिष्ठता असणे गरजेचे आहे. खूप व्यक्ती सोबत शरीर संबंध ठेवायचे असतील तर व्यवस्थित आरोग्याची काळजी आणि पार्टनरची परमिशन असली तर काही फरक पडत नाही.

एकनिष्ठता आपली संस्कृती आहे व त्याग करण्याची वृत्ती आपण आधीच खोटी ठरवली आहे... घटस्फोटाचे खटले चालू करून आणि एड्सचा विळखा वाढवून..

आपण म्हणजे 136 करोड भारतीयांनी हा मुखवटा तोडला तट बाकी काय उरत नाही..

माझ्या मते लग्न काय किंवा लिव्ह इन रिलेशन काय.. आनंदी राहणे गरजेचे आहे.. एकमेकांसाठी राहणे गरजेचे आहे..

संस्कृतीचे परिवर्तन होत आहे.. जीन पॅन्ट पासून .. अगदी मांड्या झाकण्या पर्यंतची चड्डी घालून फिरण्या एवढी।मोकलीकता येत आहे.

बलात्कार, विनयभंग आणि छेडछाड या सर्व वर्तन आणि विचार समस्या आहेत ... त्यासाठी संवाद साधून प्रत्येकाला ज्याची त्याची मोकळीक देणे गरजेचे आहे...

तर शेवटी काही गोष्टीचे भान राखले तर मोडकळीस आलेल्या लग्न संस्थेला हा पर्याय विचार करायला काही हरकत नाही.

मुलं आणि पालक यांच्यातील चुकलेला संवाद.


🌱 वि४🌿 व्हॉट्सअप ग्रुप

📄 आठवडा 23वा📝

07 एप्रिल  ते 13 एप्रिल  2018

मुलं आणि पालक यांच्यातील चुकलेला संवाद.

यातील सर्व प्रातिनिधिक छायाचित्रे इंटरनेट वरून घेतलेली आहेत.

किरण पवार ,औरंगाबाद
कितीतरी आयुष्ये उद्ध्वस्त केली या न घडून आलेल्या संवादाने. काहींना जगावस वाटल नाही त्यांनी थेट आत्महत्या केल्या. आणि ज्यांना जगायची थोडीफार आस होती त्यांना या न घडलेल्या संवादाने घरापासून कायमच दूर केल. आपण आजही जेवढ्या सहजतेने हा विषय बोलतो किंवा व्यक्त करतो त्यापेक्षा कितीतरी पटींनी त्याची तीव्रता अधिक आहे.
              डीयर जिदंगी या चित्रपटातले वाक्य होत की, आपण बाह्यंगावर झालेल्या इजांवर उपाय त्वरीत करतो पण मेंदूला होत असलेल्या त्रासाकडे आपण दुर्लक्ष करतो. याच कारण म्हणजे आम्हाला मानसिक स्वास्थ्य म्हणजे लाजीरवाणी गोष्ट वाटते. हे उदाहरण इथे द्यायच कारण म्हणजे मुलं व पालक यांच्यातील चुकलेल्या संवादाचे बळी काही वेळा *मानसिकरित्या* जातात. मी अशा काही केसेस पाहिल्या आहेत. काहींची मानसिक अवस्था इतकी बिघडते की, मुल आत्महत्या करण्यापुर्वी चिठ्ठीही लिहू शकत नाहीत. ( सर्वच आत्महत्या अशा असतात अस नाही ).  जाऊद्या पण सध्याच्या पिढीला आणि पालकांना या गोष्टींवर विचार करायला वेळ कुठे आहे म्हणा...
            
   आम्ही दरवेळी काहीही झाल तरी एवढंच पाठ केलेल असतं की, *आम्ही मुलांसाठी जीवाच रान करतो तर मुलांनी आमच ऐकायला नको?* पण मला वाटत तुम्ही जे करता ते मुलांपर्यंत पोहोचवा की. आणि प्रश्न *मुलांच्या आयुष्याचा असतो तर त्यांच्या निर्णयावर त्यांना पुढे जाण्यास मदत करा.* कधीकधी एक सहानुभूतीचा हात खूप गरजेचा असतो. सध्या नवीन पिढी *चंगळवादाच्या आहरी* जाते आहे याला नकळत कारण पालक आणि मुल यांच्यातला तुटलेला संवाद आहे. मुंबई-पुणे यांसारख्या बड्या शहरातली मुल *ड्रग्जच्या* आहरी जातात, *गुन्हेगारी* क्षेत्राकडे वळतात या प्रत्येकाला कुठेतरी कारण तुटलेला संवाद आहे हे मान्य करावच लागेल.
                 मी ही गोष्ट मान्य करतो काही पालक हे मुलांचे मित्र होण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. परंतु काही गोष्टीत त्रुटी राहून जातात. मला मुलांना हेही सांगायचंय की, *ठरावीक क्षणी तुम्हीही संवादासाठी पुढाकार घ्यायला हवा.* टाळी ज्याप्रमाणे एकहाती वाजत नाही त्याचप्रमाणे मला वाटत की, मुलं-पालक संवादासाठी ठराविक वयात आल्यावर पालकांबरोबरच मुलांनीही संवादासाठी पुढाकार घ्यायला हवाच.


जयंत जाधव,लातूर
"कळस उत्तम पाहिजे असेल तर पाया भक्कम व मजबूत असला पाहिजे "
- डॉ.अ.ल.देशमुख.
        वरील मताप्रमाणे,युवा अवस्थेत  भरकटत जाऊ नये म्हणून लहानपणीच परिणामकारक बाळकडू मुलांना पाजले पाहिजे.पालकांसाठी ही गोष्ट फारशी कठीण नाही.पण त्यासाठी मुले व पालकांमधील संवाद हा आपलेपणाचे असायला पाहिजे.जे कि सध्याच्या स्पर्धेच्या युगात हरवले आहेत किंवा कुठे तरी चुकल्यासारखे झालेत.
मुले व पालकांमधील चुकलेल्या संवादात पालकांची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरते.पालक म्हणजे काय?त्यांचे कोणते आदर्श मुलांसाठी प्रेरणा देणारे असावे?
मुलांना मधील दोष,चुका घालवून त्याला गुणवान बनविण्यासाठी प्रयत्न करणे व त्याचे आयुष्य आनंदी करणे हे पालकांचे खरं महत्त्वाचे काम आहे.पण या उलट  आजचे पालक मुलांना महागडे कोचिंग क्लास,कपडे,पिझ्झा-बर्गर विकत घेऊन दिले कि आपली मुलांप्रतीची जबाबदारी संपली असे समजतात पण असे नसते,मुलांना पालकांकडून यापेक्षा वेगळे अपेक्षित असते.नेमके तेच पालक मुलांना देत नाही.मुलांचे सुख-आनंद हे पैशात मोजण्याची फार मोठी चुक  पालक करतात.ही गोष्ट  येथे मी दोन उदाहरणावरून स्पष्ट करतो.
          पहिल्या प्रसंगात एका घरातील आई वडिल दोघेही कामासाठी अॉफिसला जातात. घरात क्षितिज नावाचा शाळकरी मुलगा असतो. अचानक त्या घरात फिश टँकमधील दोन तीन मासे मृत्यू झालेले असतात.पालक ठरवतात  टँकमधले पाणी बदलायला वेळ मिळत नसल्याने फिश टँक काढून  काहीतरी कलात्मक पेंटीग लावू.हा विचार सांगताच क्षितिज रडायला लागला व म्हणू लागला कि काही झाले तरी मी हे होवू देणार नाही.फिश टँकमधील पाणी मी बदलेल.तुम्ही अॉफिसला जाता.मी दुपारी शाळेतून आल्यावर संध्याकाळी सात पर्यंत हेच मासे माझ्या सोबतीला असतात,त्यांचे पाण्यातील फिरणे पाहून हालचाल पाहून घरी कोणीतरी आहे असे सतत वाटते.त्यांना जर काढून टाकले तर मी कोणाकडे पाहून जगू? क्षितिजने पालकांना विचारलेला हा प्रश्न खरोखरच अंतःकरण हेलावणारा होता.
              दुसऱ्या प्रसंगात देखील आई वडिल दोन्ही नौकरीनिमित्ताने बराच काळ घराबाहेर असतात.या घरातील एकुलती एक मुलगी मेघनाला सांभाळण्यासाठी केअर टेकर असते पण ती दिवसभर तिच्या कामात असते.मेघनाला फक्त सोबत असते ती टेडी बेअरची.दिवस रात्री झोपताना ,उठता बसता,जेवताना तसेच स्नानगृहात अंघोळ करताना (बाथरुममध्ये )देखील टेडी बेअर सोबतीला.त्याला एक क्षणभर सोडत नव्हती. शेवटी मेघनाचे आईने चिडून तो टेडी फेकून दिला.तेव्हा मेघना रडत म्हणाली ,तुम्ही अॉफिसला जात.तुम्हाला मित्र आहेत.माझी केअर टेकर तिच्या कामात व्यस्त.माझ्याशी बोलणारे कुणी नाही.मला भीती वाटते.मग दिवसभर हा टेडी माझ्या सोबत असतो.त्याला फेकून दिल्यावर मी काय करु? मेघनाचा हा प्रश्न पालकांना गहन विचार करायला भाग पाडणारा आहे.ज्या कोमल वयात आपले भावविश्व किंवा मनाचे अंतरंग पालकांजवळ व्यक्त करायचे पण मुले त्या निर्जीव बाहुल्या कडे व्यक्त करतात.ही वेळ कुणी निर्माण केली असेल वा ह्याला जबाबदार कोण असेर तर पालक. हा सर्वात मोठा दुष्परिणाम आहे मुले व पालक यांच्यातील चुकलेल्या संवादाचा.

          आनंदी व तणावमुक्त पालक एक आनंदी पिढी घडवू शकतात-मुलांवर चांगले संस्कार घडविण्यासाठी पालक आणि मुले यांच्यात सुसंवाद असायला हवा. स्वतः तणावमुक्त असलेले पालकच आपल्या मुलांना तणावमुक्त जीवन जगायला मदत करु शकतात. आपल्या मुलाशी सुसंवाद साधू शकतात. मुलांना तणावग्रस्त पालकांजवळ आपल्या भावना बोलू  वाटत नाही. त्यांच्या डोक्यातील नवीन कल्पना, विचार,स्वतःच्या समस्या तणावग्रस्त असणार्‍या पालकाला सांगाव्याशा वाटत नाही; म्हणून प्रथम पालक स्वतः तणावमुक्त असले पाहिजे.त्यासाठी पुढील उपाय अंमलात आणता येईल.
१. मुलाशी सकारात्मक संवाद साधा- शरीरावरील घाव भरुन येतात पण मनावर झालेले घाव कधीच भरुन येत नाही.मुलांच्या भावना समजून त्यांना काय वाटते ,त्यांच्यातील क्रियाशीलतेला वाव द्या.आपली मते बळजबरी लादू नका.
२.मुलांना सोबत वर्तमानात जगा- सध्याची मुले ही वर्तमान काळात जगतात व आई वडिल ही भूतकाळात.हे संवादातील अंतर भरुन निघायला पाहिजे.सध्या काय सुरू आहे त्यावर लक्ष केंद्रित (focus )करा.
३. पालकांनी व्यवहारी व पालक ह्या दोन्ही भूमिका वेगवेगळ्या ठेवाव्यात- मुलांशी पालक म्हणून वागताना आपले प्राफेशन बाजूला ठेवून फक्त मी पालक आहे या भूमिकेतून मुलांशी संवाद साधावा.
४.मुलांमधील सतत दोष शोधण्याचा प्रयत्न करणेपेक्षा त्यांच्या गुणांचे कौतुक करा.पालकांनी स्वतःची चुक असल्यास मान्य करा कारण मुले ही पालकांचेच अनुकरण करत असते.
५.मुलांवर सतत अधिकार गाजवू नका.फुलांप्रमाणे ते देखील कोमेजतात.त्यांची आवड, कुवत, शारीरिक आणि मानसिक क्षमता या सर्वांचा विचार पालकांनी करायला हवा.
        प्रसिद्ध लेखिका माधवी घारपूरे यांच्या मते,मुलांची आकलन-विचार करण्याची जी शक्तीचा विचार  आपण मोठे माणसे किंवा पालक करुच शकत नाही.आपली मते त्यांच्यावर लादत असतो.त्यांचे अभिप्राय जाणून घेत नाही.त्यांच्या विचार शक्तीला संस्कार देत नाही.आपणही कधीतरी लहान होतो.लहानाचे मोठे झालो पण लहानांसाठी राहिलो नाही.त्यावर एकच उपाय ते म्हणजे मोठ्यांनी लहान होणे हाच मोठेपणा.नाही का?...
        तात्पर्य,(संदर्भ- डॉ.मिलिंद ठोंबरे) आपला मुलगा युनिक म्हणजेच एकमेवद्वितीय आहे, हे पालकांनी लक्षात घ्यावे. त्यामुळे इतरांशी त्याची तुलना करणे टाळावे. त्याच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडण्यासाठी तुम्ही त्याचे मित्र व मेंटॉर किंवा मार्गदर्शक बनणे अपेक्षित आहे. आपण मुलाचे पालक आहोत मालक नाही, याचे भान ठेवावे.

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
जनहितार्थ:-

मी आत्ताच जलमित्र🙋‍ झालो .1 मे ला श्रमदान करणार आहे.* माझं गाव स्पर्धेत नसलं म्हणून काय झालं.माझ्या तालुक्यातील , जिल्ह्यातील,महाराष्ट्रातील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते माझ्या भारत देशातील  आहे.

प्रत्येकाला सीमेवर जाऊन देशभक्ती व्यक्त करता येत नाही म्हणून लाखोंच्या 😥डोळ्यातील पाणी घालवण्यासाठी चला गावात पाणी आणूया.

आणि एक  जलसैनिक बनूया....

तुम्ही सुद्धा व्हाल ना मग!!जलमित्र.....💧

त्यासाठी  पुढील लिंकवर क्लिक करा https://jalmitra.paanifoundation.in/

📢 :🌱 वि४ 🌿 *व्हॉट्सअप ग्रुप.

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵

अंजली आमकर,रत्नागिरी
मुलं आणि पालक यांच्यातील संवादाचा विचार करताना प्रथम पालकांचा (कुटुंबीयांचा) एकमेकांशी सवांद कसा आहे....इकडून खरी सुरवात होते.
आज जर घरातील चित्र पाहिले तर सर्वसाधारण असे असते  कोणी तरी टीव्ही मध्ये बिझी.. तर कोणी मोबाईलवर बिझी..  तर कोणी लॅपटॉप -कॉम्प्युटर वर बिझी...कोणाचा अभ्यास तर कोणी घरातील इतर कामे आवरण्यात बिझी...एकूणच सर्वच आपल्या कामात मशगुल ... आजकाल एकत्र जेवणारे कुटुंबे देखील शोधून सापडावी असे असतात... एकत्र जेवायला बसले तरी टीव्ही सुरुच असेल...मग या सर्व बिझी शेड्युल मध्ये नेमका सवांद होणार कधी????
एकमेकांशी बोलले तरी बोलणं म्हणजे  "मला टिफिन दे... आज उशीर होईल... उद्या लवकर उठव..मला पैसे पाहिजे...याच बिल भर...येताना भाजी घेऊन ये. मला वेळ नाही." ....... या अश्या बोलण्याला सवांद म्हणता येणार नाही...ही सर्व त्या कामाविषयीची इंडिकेटर म्हणू शकतो....
जर पालकच असे वर्तन करत असतील, तर मुलं देखील हेच अनुकरण करणार.
मग बालक नेमका सवांद म्हणजे काय हे कसे व कुठें शिकणार???
शाळा कॉलेज मध्ये अभ्यास शिकवला जातो...पण मनातील भावना व्यक्त करणे ... मनसोक्त बोलणे...मनापासून ऐकणे...एकमेकांना समजून घेणे... विश्वास जपणे... मानसिक विकास करणे या सर्व गोष्टी संवादातून आपल्यात विकसित होतात.
पालक बालक सवांद असो किंवा पालकांचा एकमेकांशी सवांद... कुटुंबातील लहान लहान प्रश्न देखील सवांद नसल्यांर गंभीर बनत आहेत... बालके अगदी शुल्लक अपयश पचवणे ही सहन करू शकत नाही. कधी चुकीच्या वळणावर जाऊन पोहचतात हे त्यांना समजतही नाही.
बालक पालक सवांद गरजेचा आहे. पण याची मूळ सुरवात पालकांचा एकमेकांशी असलेल्या सवांदापासून झाली पाहिजे.
शेवटी इतकंच सांगेन की, जसं पेराल तसं उगवेल.


राज इनामदार,पंढरपूर
  आज़ मुलांशी बोला , त्यांच्याशी संवाद साधा , उद्या म्हातारपणी  मुल तुमच्याशी संवाद साधतील. आणी हे वास्तव आहे .मुल म्हणजे म्हणजे एक छोटासा कँमेरा आहे .ते प्रत्येक गोष्ट आपल्या आई वडीलांची आत्मसात करत असतात .आई वडील जसे वाघतात , लहान मुलही तस वाघन्याचा प्रयत्न करत असतात .

    आजकालच्या जीन्स पँट व टी शर्टच्या जमान्यातील मम्मीकडून मायेचा पदर केव्हाच मुलांच्या डोक्यावरुंन हरवला आहे .मोबाईल आणी इंटरनेटच्या जमान्यात , पप्पा सतत मोबाईलवर व्यस्त असल्याने , आता आशीर्वादरूपी पित्याचा हाथही मिळेना .सवांद तर गमावलाच या चिमुकल्या जीवांनी परंतु त्याच बरोबर बदलत्या काळात मायेच्या ओलाव्याला सुधा पोरकी झाली ही लहानगी मुल .

  एकत्रित कुटुंब नसल्याने आजी आजोबा इतिहासजमाच झालेत. आजची संस्कृती म्हणजे, *आम्हीं दोन आमचे दोन , आमचा होतो एक चौकोन , चौकोनातील जातात दोन मग उरलेल्याना आधार कोण* ? अशी परिस्थिथि आहे.
   आई वडील शहरी भागात दोघंही जॉब करतात , कारण खुप पैसा कमवायचा असतो. कमवने म्हणजे वाईट गोष्ट नाही , जरूर कमवा,  खूप कमवा,  पण ज्याच्यासाठी कमवत आहात ना ! त्याला पैशा पेक्षा लहानपणात आधाराची , पपाबरोबर खुप खुप गपा मारण्याची , मम्मीशी शाळेतील गमती -जमती सांगाव्यशा त्या लहान जिवाला वाटत असतात .
    आपण फक्त दोन तीनच गोष्टी मुलांना विचारतो , परीक्षा कधी आहे?  ...किती मार्क पडले .? ..अभ्यास झाला का ?    काय हे या लहान मुलाला जन्म देण्यामाघे  फक्त एवढाच उद्देश होता काय ?
    *लहानांनी मोठ व्हाव अस वाटेत असेल तर ..मोठ्यानी सुधा काही काळ लहान व्हाव लागत* नेमकं हे सूत्रच आम्हीं विसरत चाललोय .त्यामुळेच आजकाल मुल नैराश्याच्या अंधार्या खाइत  ढकलले चाललेत. .
मित्रांनो स्वामी विवेकानंद , एडिसन , राष्ट्रपती कलाम साहेब ,असे इतर महापुरुष ..कुटुंबातील संवादाने व आई वडिलांनच्या वैचारिक प्रेरणेनेच महान बनू शकली व महान कार्य करू शकली ....चला तर मग *आपणही आपल्या मुलांबरोबर सवांद साधुया*


मनोज वडे ,पंढरपूर
मुलं जशी मोठे होतात तसें वडिलांनी आपला स्वभाव बदलला पाहिजे कारण मोठया  मुलाचा अपमान  करणं हे महागात पडू शकतो,कारण त्या मुलाला नवे विचार ,नवं जग पाहिलेलं असत त्याला स्वतःचे विचार असतात त्यामुळे तो त्या वयात काही ही करू शकतो.. त्या मुळे वडिलांनी जस वय वाढेल तस आपल्या स्वभावात बद्दल केला पाहिजे तर त्याचा संवाद चांगले होतील आणि एक प्रकारचं त्याच्या नात्यात घट्टपण येईल. परंतु सध्या हा संवाद होत नसलेला दिसतो त्यामुळे भरकटलेली मुलाची संख्या प्रचंड वाढत आहे असं आपण निदर्शनात येत.
एकमेकांचा संवाद नसल्याने मूल PORN side कडे वळतात आणि आपल्या आयुष्याची राखरांगोळी करताना मूले दिसतात ,तर पालक आणि मुलानी मित्रत्वाचे नात जपले तर ह्या मुले एक तर प्रचंड विकास होइल कारण वडिलांनी आपले अनुभव share करून ते त्या मुलांना पटले तर कर नाही तर करू नको असे जर व्यक्ती स्वातंत्र्य दिले तर त्या नात्यात चांगला विकास होईल आणि हा चुकलेला संवाद कुठे तरी जुळेल अस मला वाटत....

नितिन लेंडवे,पंढरपुर
      हल्ली संवाद सोडला तर वाद, विवाद आणि वादावादी अस सगळ घडत. मग तो परस्पर पालकांतील, कुटुंबातील असो वा समाजातील. संवाद साधण्याच्या संदर्भात विचार केला तर खर हा सुवर्णकाळ म्हणावी अशी स्थिति. फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर इ. कितीतरी पर्याय नुसते ओसंडत आहेत. समाज माध्यमांवरती माणसे नुसती "पडीक" आहेत म्हटले तर अतिशयोक्ति आहे असे कोणी म्हणनार नाही.
     पालक व मुल संवाद चुकण्याची वा विसंवाद का घडतो असा विचार केल्यास अनेक कारणांची जंत्रीच तयार होऊ शकेल.

   मुलांशी संवाद साधायला पाहिजे हेच मुळात ब-याच पालकांच्या गावी नसते, मुलांना विचारात न घेता गृहीत धरणे, आपलेच विचार मुलांवर थोपवणे, विपरीत अपेक्षाकृत राहणे, चुकल्यास प्रबलना ऐवजी रागावणे, मुलांमध्ये भेदभाव करणे,  भावनिक, मानसिक आधाराचा अभाव, एकाच वेळी अनेक जबाबदा-या निभवाव्या लागत असल्याने पुरेसा वेळ नसणे.
        अशी एकनाअनेक कारणे आहेत. यामुळे मुलांमध्ये पालकांप्रती विश्वासाची भावना तयार होत नाही.  विश्वासाच्या भावनेअभावी समन्वय राहत नाही. समन्वय नसेल तर संवादाचा सेतुच तयार होणार नाही.
        आज पुर्वी सारखी संयुक्त कुटुंब पद्धति राहिलेली नाही. जिथे असेल ते कौतुकाचा विषय ठरावा. त्यामुळे विविध नात्यांच्या मायेच्या ओलाव्याचा दुष्काळच. आणि अशातच दोन्ही पालक चाकरमानी असतील तर मग विचारायलाच नको. अशावेळी पालकांची होणारी ओढाताण, कौटुंबिक जबाबदा-या यातुन निर्माण होणारा ताण-तणाव व परिणामी घरातील वातावरण हे तापलेलच राहणार. मग कशाला घरात आनंद निर्माण होईल व सुसंवाद घडेल. हा खर तर वरवरच विचार करत आहोत आपण. असो.
  या गोष्ठी खरतर टाळता येणा-या पण नाहीत. स्पर्धा वाढत आहे. प्रत्येकाला जीव तोडुन पळत राहाव लागणारच आहे. तारेवरचीच ही कसरत आहे. अशावेळी घरात काही बाबतीत समतोल राखावा लागेल. जाणीवपुर्वक संवाद घडवण्यासाठी काही गोष्ठी कराव्या लागतील.
१) मुलांना त्यांचे पालक या नात्याने वेळ द्यावा लागेलच.
२) आठवड्यातुन, दिवसातुन किती वेळ द्यायचा हे ठरवावे
३) आपण त्यांचे आई-वडील असलो तरी त्यांना स्वतः ची मते आहेत व ती मांडु द्यावीत.
४) त्यांच्या आवडी-निवडी विषयी बोलावे
५) चुक करत असेल तर वेळीच हे चुक आहे याची जाणीव करुन द्यावी
६) पालकांचा परस्पर संवाद उत्तम असावा
७) मुलांच्या मनात स्वतःबद्दल विश्वास निर्माण करावा
८) मुलांच्या चांगल्या गोष्ठीबद्दल त्यांचे कौतुक करावे. मुलांना ते आवडते.
९) मुल ही संवाद साधण्यासाठी, बोलण्यासाठी आतुर असतात. त्यांना जे वाटते ते सांगावे असे वाटत असते. ते ऐकुन घ्याव.
१०) आम्ही सर्व काही तुझ्याच साठी करत आहोत हे सांगणे जरा थांबवावे.😊.
     वरील नमुनादाखल काही गोष्ठी संवाद घडवण्यासाठी निश्चित पणाने करता येतील. संवाद साधणे ही खरे तर एक उत्तम कलाच आहे. प्रत्येकाला आपापल्या पातळीवर नियोजनपुर्वक संवाद साधता येतो.
  चांगल्या संवादानेच पालक-पाल्य नाते मजबुत होईल. आणि त्याही पुढे जाऊन मित्रत्वाचे नाते निर्माण झाल्यास उत्तमच. आनंद येईल. संस्कार घडतील.आणि शेवटी संतती हीच तर संपत्ती.😊

                
प्राची कर्वे ,देहूरोड पुणे
            मुले आणि पालक यांच्यात संवाद राहिलेला नाही . उलटपक्षी विसंवाद जास्त दिसतो . याला कारणे बरीच आहेत .आजकाल पालकांना मुलासाठी वेळ नाही .ऑफीस ; वर्कलोड ; टेन्शन यामुळे ते मुलांना वेळ देत नाहीत आणि मुलांनाही त्यांचा अभ्यास आणि वेगवेगळे क्लास यांनी  त्रस्त केले आहे . एकमेकांसाठी वेळ नाही त्यामूळे संवाद नाही .
             मुलांच्या मागण्या लगेच पूर्ण केल्या जातात . त्यासाठी त्यांना जराहीआर्जव करावे लागत नाही .जसे मुलानी पेट्रोल साठी पैसे मागितले कि त्यांना  लगेच ते दिले  जातात त्यांनी आधी पैसे कधी व किती घेतले  किती पेट्रोल टाकले अगर पैसे दुसरीकडे खर्च झाले वगैरे गोष्टी पालक विचारत  नाहीत . त्यमुळे मुले मागितल्यावर लगेच मिळालेच पहिजे असेच समजतात .कधी हीशोभ मागितला तर चिडतात .अवास्तव खर्च करतात .मुलाना पालक वेळ न देता पैसे मात्र भरपूर  देतात .

               पालक मुलांचे म्हणणे नीट ऐकून घेत नाहीत .अर्थात त्यामुळे मुलेही पालकांचे  ऐकत नाहीत . म्हणूनच समजाऊन सांगणे व घेणे दोन्हीही दुरापास्त झाले आहे .पूर्वी हे काम घरातील आज्जी आजोबा करत गैरसमज बोलून दूर करण्याचे काम अगदी शिताफीने पार पाडत  पण आता आज्जी आजोबा घरी  नसतात त्यामुळे एकमेकातला  दुरावा मात्र वाढतो आहे.संवादच घडत नाही मग सुसंवाद कसा  घडेल .
याकरिता मुले व पालकांनी मिळून ऐकण्याची व समजाऊन घेण्याची गरज आहे . पालकांनी मुलांना अवास्तव स्वातंत्र  न देता प्रत्येक गोष्टीत मिळून चर्चा करून मार्ग काढण्याची गरज आहे .

सिमाली भाटकर,रत्नागिरी

आधुनिकीतेच्या जगात व्यस्त होते सगळे

बोलण्याचे साधन जिथे दूरध्वनी बनले

थकले जीव जेव्हा घरट्याकडे परतले

पिल्लांपाशी बागडण्या ऐवजी मोबाइलमध्ये गुंतले...१.

ममता- माया पाळणाघरे वा आयांपाशी थांबले

भक्कमतेच्या सावल्यांना वृध्दाश्रमात नेऊनी बसविले

आणी आधुनिक युगात कुटुंबाचे रुपच पालटले

आशा अन् अपेक्षाच्या ओझ्यानं कुणी प्राणास मुकले...२. दडपशाहीच्या भावनेनं विक्षिप्तावाणी एकटे होऊन पडले जुन्या सोबत नवं स्वीकारतांना बालपण हरवले

नात्यांचे पाश आता स्पर्धेत रंगले

जिंकण्याच्या आशेत आपलेपणाने खेळणं विसरले...३.

तू तू मी मी करता करता पाखरांच्या भांडणात पिल्लांचे अस्तित्व हरवले

स्वातंत्र्याचे अर्थ स्वैराचारात बदलले

आणी मोकळे पणाने जगण्यांचा आनंद घेणं विसरले...४.

माझ्या वरील कवितेच्या माध्यमातून मला एवढेच सांगायचे आहे,मुले ही देवाघरची फुले आहेत.त्यांना समजून घेणे आवश्यक आहे.त्यांच्या सोबत लहान होऊन जगा,त्यांच्याशी बोला.तुम्हांलाही तुमचे बालपण परत मिळेल.
धाक हा डोळ्यात असावा व प्रेम हे वाणीत असले पाहिजे.काही पालक आपल्या मुलात सुधारणा व्हावी म्हणून कधी कधी  त्यांना मारतात.मला कोणत्याही चुकीचे समर्थन करायचे नाही.पण मुलांना मारणे ही त्यांच्या चुकीची शिक्षा वा दंड नाही तर त्याने ती चुक का केली हे समजून घेऊन त्याला समजावून सांगणे जेणेकरुन तो चुक परत करणार नाही.जगण्याचं कौशल्य शिकणे हिच आजच्या काळाची गरज आहे.तरच तुम्ही आनंदाने सुख जीवन जगू शकता.

समीर सरागे ,यवतमाळ
आजकालच्या युगात पालक आणि पाल्ये यातील दरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या दोघांमधील संवाद(संवाद म्हणजे केवळ बोली नव्हे तर एक प्रकारची सकारात्मक वागणूक) कुठेतरी हरपत आहे अस चित्र दिसतय.

प्रत्येक पालकांच्या त्यांच्या पाल्या कडून फार मोठ्या प्रमाणात अपेक्षा असतात, त्याने जगाच्या तुलनेत काही वेगळ करावे ,प्रत्येक क्षेत्रात नाव कमवाव वैगरे त्यांच्या अपेक्षा मग  सतत अभ्यास कर म्हणून त्याच्या मागे लागने, त्याचेवर सतत पाळत ठेवायची  तुला  अमुक विषयात इतके कमी मार्क्स कसे मिळाले इतके  का नाही ? , तूला 10 वी 12 विला 98 टक्के मार्क्स मिळालेच पाहीजे त्याच्या कमी नकोच , तुला अमुक अमुक  विषयाचा शिकवनी क्लास लावून देतो वैगरे वैगरे.म्हणजे  आपण मुलांना सतत अपेक्षाच्या ओझ्या खाली ठेवत असतो आणि अपेक्षा देखील कोणत्या ज्याना सतत समाजात मिरवायच असतं आणि आपली प्रतिष्ठा जपायची असते!

आपल्या अश्या वागण्या बोलण्या आणि मार देण्या मुळे मुले सतत दड़पन आणि दबावाखाली राहत असतात यामुळे ति चीड़ चिड़ी तर होतातच आणि पालकाचा राग मनात घेऊन बस्तात व यामुळे मुले नेहमी पालकाना टाळायचा प्रयत्न करतात परिणामी ते मनमोकळे पनाने कोनशी बोलू शकत नाही , कोनाशी खेलु शकत नाही  एकलकोंडेपणा मुळे त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण होते व याचा वाईट परिणाम त्यांच्या मानसिक अरोग्या वर होत असतो  याकरणास्त्व मुले  भित्री बनतात व त्यांच्यात आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होतो.

म्हणजे वंरवार  मुलाना टोकने ,कोणतीही चांगली गोष्ट त्याने केल्यावर त्याचे कौतुक करायच्या ऐवजी किंवा तो चुकत असेल तर त्याला संमजवन्याच्या ऐवजी आपण त्याला चार चौघात हटकतो किंवा थोड्याशा चुकिवर त्याला मार देतो हे पूर्णतः चुकीचे आहे.

प्रत्येक पालकाने आपल्या मुलां कडून  काही चुक झाल्यास त्याला मारायच्या किंवा रागावयाच्या ऐवजी सुरुवातीला त्याची समजूत काढावी, समजून संगीतल्याने मुले समजतात ते पुन्हा तशी चुक करत नाही.

वडिलांनी  मुलाला आपला जास्तीत जास्त वेळ द्यायला हवा , ऑफीस मधून आल्यावर  संवाद साधन्याचा प्रयत्न कारायचा  त्याच्याशी गप्पा मारायच्या आज शाळेत क़ाय शिकविले, कोणता गृहपाठ दिला ,क़ाय खेळ खेळले  वैगरे या बाबत मुलाशी चर्चा करावी.

बरेचसे पालक मुलासमोर व्यसने  करतात (सिगरेट ,दारू ,व इतर तत्सम पदार्थांचे सेवन वैगरे) परंतु अशे करणे म्हणजे मुलाला वाईट सवय लावणे  या गोष्टी आपण सहसा लक्षात घेत नाही. कारण मुले है प्रत्येक गोष्टीचे अनुकरण करत असतात आणि पालकानी जर वाईट व्यसन मुलांसमोर केलीत तर ते देखील तशेच अनुकरण करतात कारण जे आई वडील  करतात  ते  चांगलेच अशी त्यांची भावना होउ शकते   
म्हणून नेहमी चांगल्या बाबी मुलांसमोर करायच्या.

बरेच पालक  बहुधा आपल्या मुलांकडे माझा मुलगा हा आमच्या म्हातारपनातील काठी आहे अश्या नजरेने पाहत असतात परंतु हे पूर्णत: चुकीचे आहे, उलट त्याच्या मधील सुप्त गुणानां ओळखून  त्याच्यात असलेल्या कला गुणानां  वाव द्या खेळ, कला, वैगरे मध्ये असलेले त्याचे छंद जोपासा. त्यांना इतरांचा मान सन्मान करायला शिकवा ,काही खरेदी करताना त्यांना सोबत घेऊन जा यामुळे त्यांच्या आवडी निवडी जोपासल्या जातील.

त्यांच्यावर संस्कार लादू नका उलट आपल्या चांगल्या बोलण्या ,वागण्यातुन व व्यवहारातून मुलांना संस्कार मिळत असतात
मुलांवर नेहमी अधिकार गाजवन्या एवजी त्यांच्याशी समरस व्हा आणि त्यांचे मित्र बनून त्यांच्याशी वागा हाच संवाद अपेक्षित आहे.

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵



सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************