रक्षाबंधन - भावा बहिणीचे बदललेले भावनिक संदर्भ.


वैशाली सावित्री गोरख .पंढरपूर(पुणे)
             रक्षाबंधनाचा अर्थ मी पहिल्यापासून हाच ऐकत आलेय की भाऊ बहिणीच रक्षण करतो म्हणून बहीण भावाला राखी बांधते म्हणजेच धागा जो आयुष्यभर भावाने आपल्या पाठीशी उभे राहावे ह्याच प्रतीक आहे .पण माझ्या बाबतीत हे अतिशय वेगळं आहे मी जेव्हा लहान होते म्हणजे आठवी पर्यंत मी शाळेत कार्यक्रमाला डान्स घ्यायचे तेव्हा माझा भाऊ घरी येऊन आई जवळ खूप तक्रार करायचा एक मोठा भाऊ ह्या नात्यानं मला धाकात ठेवण्याचा तो प्रयत्न होता पण लवकरच आमच्या वेगळ्या आयुष्याला सुरुवात झाली ,जीवनाशी संघर्ष ,शिक्षणासाठी संघर्ष त्यात मला माझ्या भावाने प्रत्येक गोष्टीत साथ दिली ते पण अशा पद्धतीने की मी कधी वैचारिक रित्या स्वतंत्र झाले ते मलाच समजलं नाही .आमच्या घरात आम्ही दोघांनीही काम करून शिक्षण घेतलं त्यामध्ये माझ्या भावाने मला अकरावीच्या अडमिशन घेऊन दिल व सांगितले की इथून पुढचे तुज्या जीवनाचे प्रत्येक निर्णय तुझे असणार मग चुकली तरी त्याला जबाबदार तू स्वता असशील नि हीच माझी खरी सुरुवात होती .नंतर पुण्याला शिक्षणाला आल्यानंतर ही तेच झालं जेव्हा मी पुण्यात पहिल्यादा येणार होते त्यावेळेस मला सांगितल गेलं की एकटी ये ,पुण्यासारख्या शहरात एकटं येण म्हणजे माझ्या साठी खेड्यातील मुली साठी खूप अवघड गोष्ट होती पण मी ते ही धाडस केलं त्यावेळेस मी भैय्याला भांडायचे की तुला माझी काळजी नाही तू मला एकटीला कसा प्रवास कण्यासाठी सांगू शकतोस पण माझ्या लक्षात येत नव्हतं की ते माझं ट्रेनिंग चालू होतं एक सक्षम स्त्री ,बहीण,मुलगी बनण्याचं व त्यामुळे आज मी कुठेही धाडसाने जाऊ शकते .ज्यावेळेस मी मी एकटीने ट्रेक केला त्यावेळेस माज्या भावाला खूप आनंद झाला होता .आजही मी कुठे फिरायला जायचं असेल तर मला घरात कोणाला विचारावं लागत नाही फक्त काळजी नको म्हणून मीच सांगत असते.तो माझ्यापेक्षा तीन वर्षांने मोठा आहे तरीही मी त्याला त्याच्या नावाने बोलावते,हक्काने त्याला घरातील काम सांगू शकते व तो ती त्याची जबाबदारी म्हणून करतो. एक मित्र म्हणून माझ्या आयुष्यातील सगळ्या गोष्टी त्याला सांगते व त्याच्या ही सगळ्या गोष्टी विचारून घेते .आमच्या मधील हे नात कधीच भाव नि बहीनिच न राहता एक चांगला मित्र म्हणून तयार झालं आहे मी सामाज्यात पाहते की खूप जास्त प्रमाणात भाऊ आपल्या बहिणींवर नजर ठेवत असतात पण माझा भाऊ मला सांगत असतो हा हा फिल्म खूप छान आहे बघायचा असेल तर बघून ये .त्यानं स्वतःला डेव्हलप केलेली ही एक वेगळी विचारसरणी आहे त्यामुळे मी सक्षम होण्यास प्रयत्न झाला आहे .प्रश्न राहिला रक्षाबंधनाचा,दिवाळीतील भावाची ओवळणीचा ,नागपंचमीचा भावाचा उपवास तर मी ह्या कोणत्याच गोष्टी करत नाही नि आमच्या घरात होत ही नाहीत .माझा भाऊ रक्षण करण्यासाठी माझ्या पाठीशी उभा नाही तर मला सोबत घेऊन चालत आहे असे हे आमुचे बदलते भावनिक संबंध आहेत .



अर्जुन (नाना) रामहरी गोडगे,
सिरसाव ता-परंडा जि-उस्मानाबाद

नात प्रेमाचं तुझं अन माझं आहे ..
सय येते बारक्यापाणीच्या दिसाची..!!
गमावलले ते गोड दिवस..
आठवत राहतात आजही..!!
मनी भाव दाटत राहतोय..
हातातल्या राखीसोबत..!!
बंद हे प्रेमाचे नात आहे
ताई हे आपलं जन्मजन्मोचं आहे..!!


*संगीता देशमुख,वसमत*
          आपल्याला रक्षाबंधनाचा इतिहास फार प्राचीन आहे. इंद्राच्या खचलेल्या हातावर त्यांच्याच पत्नीने राखी बांधून पतीचा आत्मविश्वास वाढविला होता तर कृष्णाच्या जखमी बोटावर आपल्या पदराची चिंधी बांधून त्याच्याशी मैत्रीपूर्ण भावाचे संबंध प्रस्थापित केले होते. चित्तोडगढची राणी कर्मावतीने बहादूरशाहपासून  स्वतःच्या रक्षणासाठी मुघल हुमायूँला राखी बांधली होती. याचाच अर्थ असा की,हा सण आपण भावाबहिणीच्या ऋणानुबंधाचा मानत असलो तरी इतिहास पाहता हा सण रक्षणाचा आहे. आपण यास राखीपोर्णिमा म्हणत असलो तरी त्यापेक्षा रक्षणासाठी बांधलेला धागा म्हणून "रक्षाबंधन" हे नाव अधिक समर्पक वाटते. कोणी यास कजरी पोर्णिमा,कोणी राखीपोर्णिमा तर कोणी नारळीपोर्णिमा म्हणतात. रक्षणाच्याच हेतूने बांधले जाणारे हे बंधन,म्हणून रक्षाबंधन!  आज ही प्राचीन परंपरा आपल्यापर्यंत झिरपत आली आहे. कालानुरूप सर्वच बाबी आहे तशा आपण स्वीकारत नाहीत. आपल्या सोयीनुसार आपण काय स्वीकारायचे आणि काय नाकारायचे हे ठरवत असतो. तसाच हा अनेक सणांपैकी असणारा रक्षाबंधनाचा सण! 
            पूर्वी सासुरवाशीण बहीण भावाची आतुरतेने वाट पहायची. त्याला राखी बांधण्यापेक्षाही त्याच्याशी हितगुज साधून माहेरची वास्तपुस्त करणे,माहेरच्यांची सर्वांची ख्यालीखुशाली विचारणे आणि त्यासोबतच आपलेही मन मोकळे करणे घडायचे.  तिच्या साचलेला मनाचा निचरा व्हायचा. माहेरची खुशाली ऐकून अंगावर मूठभर मांस चढल्यासारखे वाटायचे. तेवढाच संसाराचा दाह कमी होऊन संसारात नव्याने हुरूप चढायचा. माहेरून येणारी माणसेच काय ती संपर्काचे माध्यम होते. परंतु आजकाल विवाहित मुलींना एकतर पूर्वीसारखा  सासुरवास नाही आणि दुसरे म्हणजे संपर्कासाठी हातात मोबाईलसारखे साधन आले. सर्वात महत्वाचे आजच्या चौकोनी कुटुंबात त्यांचीच सत्ता असल्याने भावनांच दमन होत नाही. त्यामुळे पूर्वीप्रमाणे या सण उत्सवात रस वाटत नाही. ज्या आस्थेने हे सण साजरे व्हायचे त्याविरुद्ध आता आस्था जाऊन तिथे दिखाऊपणा आला. आता सण साजरे करण्यामागे प्रतिष्ठा हा हेतू प्रभावी ठरतो आहे. आजकाल इथे पैशाची उधळण,भपकेबाजपणा आला. आई आपल्या घरातल्याच  लेकराला प्रत्यक्ष शुभेच्छा देण्याऐवजी आधी फेसबुकवर शुभेच्छा देऊ लागली. या सोशल मिडियाने माणसामाणसातले भौगोलिक अंतर कमी केले पण भावनिक अंतर मात्र निश्चितच वाढवले आहे. कारण आजकाल दिवस सेलीब्रेशनचे आहेत. प्रत्यक्षात कोणत्या बाबी होवोत अथवा न होवोत परंतु "कालाय तस्मै नम:" प्रमाणे आधी त्या बाबी सोशल मिडियावर अपलोड केल्या जातात. मग याला नाती तरी कशी अपवाद असतील? नातीही अशीच आज हळूहळू कोरडीठाक होत चालली आहेत. नात्यातील ओलावा नात्याच्या मुळांपर्यंत न पोहोचता तो सोशल मिडियावरच्या दिखाव्यापर्यंतच मर्यादित राहिला आहे. मग त्यात नाती कोणतीही असोत,तीही सवंग आणि उथळ जगात वहावत जात आहेत
कुटुंब अधिकाधिक छोटी होत चालली,घराच्या भिंती रुंदावू  लागल्या तशीच नात्यातील अंतरही रुंदावत आहे. नात्याला घट्ट बांधून ठेवणारी धागे आजकमकुवत झाली आहेत. परंतु भावा-बहिणीच्या नात्याचा घट्ट बांधून ठेवणारा राखीचा धागा मात्र जेवढा कोमल तेवढाच तो जबाबदारीत बांधून ठेवणारा राकट धागा आहे.  परंतु हे बहीणभावाचे नाते काही ठिकाणी कायद्याच्या चौकटीत जाऊ पहात आहे.
         पूर्वीची बहीण भावाला प्रेमाने जिंकून घेण्याचा प्रयत्न करायची तर आजच्या काही बहीणी भावाच्या संपत्तीत बरोबरीने वाटा मागून घेत आहेत. कायद्याने अधिकार मिळतो पण प्रेम उरत नाही. त्यामुळे आज रक्षाबंधन जवळ आले की,भावाच्या पायाना  बहिणीकडे जाताना जी ओढ होती त्यात आज थोडी धाकधुक आली,कारण बहीण राखीच्या बदल्यात साडीचोळीच्या रूपात काय मागेल,हे सांगू शकणार नाही. यात बहीण आहे आणि भाऊ सधन आहे,असेही काही नाही. बहीणही सधन असली तरी भावाच्या संपत्तीत तिला वाटा हवा असतो.  पण अशी उदाहरणे फार तुरळक आहेत. अजूनही अनेक बहिणी आपल्या भावाला फार श्रध्देने,आस्थेने राखी बांधतात. माझा भाऊ माझे रक्षण करीलच आणि आपण बांधलेल्या राखीने तो अजून सक्षम होईल,दीर्घायुषी होईल,अशी आशा बाळगतात. पण आजच्या काही बहिणी अशाही आहेत की,ज्या भावापेक्षा अधिक सक्षम आहेत. अनेक ठिकाणी त्याच आपल्या भावाच्या पाठीराख्या म्हणून कणखरपणे उभ्या आहेत. अनेक कमावत्या बहिणी आज अविवाहित राहून भावाच्या संसाराला तोलून धरणाऱ्या आहेत. आजच्या भावालाही आपली बहीण स्त्री म्हणून कमजोर वाटत नाही,तर ती भरभक्कम आधार वाटते. राखी ही  रक्षणाचे प्रतीक आहे. ती कोणी कोणाला बांधली,हे महत्वाचे नसून दोघेही एकमेकांचे रक्षक ठरावेत,एकमेकांना एकमेकांचा आधार वाटावा,हे आज अपेक्षित आहे. मला राखी माझी बहीण आहे तशी या जगातील प्रत्येक मुलगी,स्त्री ही कोणाची ना कोणाची बहीण आहे. माझ्या बहिणीसोबतच तिचे रक्षण झाले पाहिजे. स्त्रीवरचा अन्याय,अत्याचार थांबवता आला पाहिजे,तिच्यावर होणारे बलात्कार थांबवता आले पाहिजे,अशा उदात्त हेतूने भावाने ही राखी आपल्या बहिणीकडून बांधून घ्यायला हवी. मग ही फक्त बहीण भावापुरती राखीपोर्णिमा रहाणार नाही तर ती सुदृढ,निकोप समाजासाठी खरे "रक्षाबंधन" ठरेल. अशाच "जबाबदार  रक्षाबंधना" साठी सर्व बहीण आणि भावाना शुभेच्छा!



अमोल धावडे ,अहमदनगर

बहन का प्यार किसी दुआ से कम नहीं होता,
वो चाहे दूर भी हो तो गम नहीं होता,
माना कि रिश्ते दूरियों से फीके पड़ जाते हैं,
लेकिन भाई-बहन का प्यार कभी कम नहीं होता।।

हिंदू संस्कृतीमध्ये रक्षाबंधन सण साजरा केला जातो. बहीण भावाच्या उदंड आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करते त्याचप्रमाणे भाऊ तिच्या संरक्षणासाठी तिला वचन देतो व आयुष्यभर तिचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध राहतो हे सांगायचे कारण आज काही कामकाजानिमित्त बन पिंपरी या ठिकाणी गेलो होतो. गावाकडील लोकांचे प्रेम म्हणजे यात शँकाच नाही घरात कितीही गरिबी असली तरी घरी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत मनापासून करतात. आज एका मुलाच्या गृहभेटी दरम्यान चर्चा करत असताना सदर परिवारातील मुलीचा विषय निघाला. तिचे नाव मानसी नाव काल्पनिक किती शिक्षण झाले तर तिने सांगितले ९ वी तुन शिक्षण सोडले व आई वडिलांनासोबत शेतीचे काम करते. वडील दारू पितात पुढे शिक्षण करायचे नाही. वयाच्या १४ व्या वर्षी तिचा साखरपुडा केला. मुलीशी बोलत असताना तिला पुढे शिक्षण कारवायाचे आहे समजले. चहा घेवून झाल्यावर आम्ही निघालो तर मुलगी ओवळणी ताट घेऊन आली ते पाहून मी बोललो हे काय तर तिने सांगितले की दादा रक्षबंधन जवळ आली आहे तर तुम्हला राखी बांधायची आहे. ऐकुण आनंद झाला व मोठा भाऊ म्हणून तिने मला राखी बांधली आणि ओवाळणी म्हणून तिच्या पालकांना संगितले की मुलीचे शिक्षण बंद करू नका तिला कुठल्याही प्रकारची मदत लागली तर मला निसंकोचपणे फोन लावा. आज मला आणखी एक छोटी बहीण मिळाली. देवाचे आभार. मी ठरवलंय की तिच्या पुढील भविष्यात कोणत्याही प्रकरची मदत लागो ती मी एक मोठा भाऊ म्हणून करण्यास तयार आहे. 
खरच गावाकडील जीवन खुप सुंदर व लोक त्याहूनही प्रेमळ असतात.😍😍
#Thanksमानसी..
सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा💐

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************