20 ऑगस्ट...कधी मिळेल जवाब ?

🌱वि४🌿व्हॉट्सअप ग्रुप

🌱🌿🌱🌿🌱🌿🌱🌿🌱🌿

20 ऑगस्ट...कधी मिळेल जवाब ? 


१)सौदागर काळे,पंढरपूर

या 20 ऑगस्टला नरेंद्र दाभोळकर यांच्या खूनाला 5 वर्षे होत आहेत.मुख्यमंत्र्याच्या तोंडून 'फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र'असे शब्द खूप वेळा सामान्यपणे बाहेर पडत असतात.तेव्हा त्याच तोंडातून दाभोळकर-पानसरे या महाराष्ट्राचा पुरोगामी वारसा पुढे चालवणाऱ्या विचारांचा खुनीचे नाव अजून कसे काय बाहेर पडत नाही!त्यांच्या अभ्यासाची सवय गृह विभागाला पण लागली असेल का?समजत नाही कोणकोणत्या गोष्टीचा जवाब मागायचा?कधीपर्यंत कार्यकर्त्यांनी  संयमाने,विवेकपणे 'who killed Dabholkar?"म्हणत जवाबाची वाट बघायची आणि खुद्द न्यायालयाने पण कधीपर्यंत सरकारला तपास जलद करा म्हणून सुनवायचे?

आता हे #जवाबदो अभियान संपूर्ण देशात सुरू केले आहे. पण सरकार जर नौटंकीपणाचा अभिनय करत असेल तर असे किती वर्षे अभियान चालवायचे? हा पण विचार करावा लागेल.

नरेंद्र दाभोळकर-गोविंद पानसरे यांचा खून करणारे सनातन संस्थेच्या निगडित आहेत ,याचा निर्वाळा काही चालू असलेल्या तपासातून बातम्यांद्वारे समजते.यांच्यावर हा संशय  फक्त  कार्यकर्त्यांचा,विवेक विचार करणाऱ्यांचा नाही तर सर्व सामान्यांचा पण आता दृढ झाला आहे.काही दिवसांपूर्वी मुंबईत याच सनातन साधकाच्या घरात बाँब बनवण्याचे साहित्य सापडते.तेव्हा या संस्थेवर सरकारला अजून कारवाईसाठी कोणाच्या सर्टिफिकेटची गरज आहे  !

ज्यांना आपण जवाब मागतो आहे ते सरकार आंधळेपणाचे, मुकपणाचे , बहिरेपणाचे, पांगळ्यापणाचे नाटक करत असेल तर .....तर सवाल संपणार नाहीत.

२)अर्जुन( नाना) रामहरी गोडगे,सिरसाव ता.परांडा जि.उस्मानाबाद                                                

              महाराष्ट्रातल्या पुरोगामी, विज्ञान आणि विवेकवादी चळवळींचा प्रेरणास्त्रोत असलेले डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा आज, दि. २० ऑगस्ट २०१८ रोजी पाचवा स्मृतिदिन. दाभोलकर यांच्या हत्येला पाच वर्षे लोटली, तरी त्यांच्या मारेक-यांचा तपास लागलेला नाही. विचारांचा सामना विचारांनी करणा-या या सज्जन कार्यकर्त्यांचा आणि हजारो कार्यकर्त्यांचे नेतृत्व करणा-या या प्रबोधनकाराचे खुनी पाच वर्षात सीबीआय आणि विशेष गुन्हे शाखेला सापडू नयेत, याची शरम वाटायला हवी. ही बाबच महाराष्ट्रासारख्या पुरोगामी समजल्या जाणा-या राज्यासाठी लांच्छनास्पद आहे.
          दाभोलकर यांच्यानंतर  कॉम्रेड गोविंदराव पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश यांचीही हत्या झाली. पानसरे आणि कलबुर्गी यांच्याही हल्लेखोरांना पकडण्यात यश आलेले नाही. समाजाला पुढे नेणारा विचार मांडण्यासाठी स्वत:ची हयात खर्ची घालणा-या समाज सुधारकांच्या एकापाठोपाठ हत्या होतात आणि मारेकरी पकडले जात नाहीत, ही समाजासाठी चिंतेची आणि पोलिसांसाठी लाजिरवाणी बाब आहे. सत्तेत कोणताही पक्ष असला तरी तपासातील प्रगती कूर्मगतीनेच सुरू आहे. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासात जी काही प्रगती झाली आहे, ती उच्च न्यायालयाने तपासाची देखरेख सुरू केल्यानंतरची आहे. दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्यांच्या झाल्या. न्यायालयाची देखरेख, सामाजिक संघटनांचा पाठपुरावा, जनमनातील अस्वस्थता हे सगळे असूनही दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्यांचा तपास इतक्या संथगतीने चालू असेल, तर सर्वसामान्य माणसावरील अन्यायाला कधी न्याय मिळणार, हा प्रश्न अनुत्तरित राहतो.
          सर्वात अस्वस्थ करणारी उदासीनता आपल्या देशातील संघटित दहशतवादाच्या विरोधात काम करण्यासाठी स्थापन झालेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेची आहे. त्यांनी मडगाव बॉम्ब स्पॉटतील आरोपी व अन्य लोकांना पकडले असते तर दाभोलकर, पानसरे , कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या टळू शकल्या असत्या, असे वाटते. सत्तेत पक्ष कोणताही असो; धर्माच्या नावावर दहशत पसरवू इच्छिणा-या शक्तींना अगदी नाइलाज झाल्याशिवाय तपासायचे नाही, हे धोरण या संथगती तपासाच्या मुळाशी असल्याचे दिसते. दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी,गौरी लंकेश या चारही हत्या या काही वैयक्तिक अथवा कौटुंबिक कारणांतून झालेल्या नाहीत, हे आतापर्यंतच्या तपासातून आणि आरोपपत्रांमधून स्पष्ट झालेले आहे. पटत नसलेले विचार द्वेषबुद्धीने आणि नियोजनबद्धपणे संपविण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे जोपर्यंत हे मारेकरी फरारी आहेत, तोपर्यंत विवेकी विचार मांडणा-या लोकांना कायम धोका राहणार आहे.
           दाभोलकरांच्या समाजप्रबोधनाच्या कार्याला उजाळा देत, राज्यभर त्यांचे फक्त स्मृतिदिनी स्मरण होत आहे. राज्याची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी असलेल्या पुण्यात डॉ. दाभोलकरांचा दिवसाढवळ्या खून झाला. विचारांचा सामना विचारांनी करणा-या या सज्जन कार्यकर्त्यांचा आणि हजारो कार्यकर्त्यांचे नेतृत्व करणा-या या प्रबोधनकाराचे खुनी पाच वर्षात सीबीआयला सापडू नयेत, याची शरम सरकारलाही वाटायला हवी. डॉ. दाभोलकरांच्या हत्येने सारा महाराष्ट्रच नव्हे, तर देशही हादरला होता.
          डॉ. दाभोलकरांच्या मारेक-यांना अटक करा, या मागणीसाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह अनेक राजकीय पक्षांची आंदोलने आजही सुरू आहेत. डॉ. दाभोलकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विचारांना विज्ञान आणि विवेकवादी विचारांची बैठक असल्यामुळेच, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या त्यांच्या चळवळीला व्यापक पाठिंबा मिळत होता. ते स्वत: सा-या राज्यभर जनजागरणासाठी अविश्रांत परिश्रम करत होते. महात्मा फुले, राजर्षी छ. शाहू महाराज, आगरकर, डॉ. आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांच्या सामाजिक विचारानुसार महाराष्ट्र अंधश्रद्धा आणि रूढी परंपरांच्या जोखडातून मुक्त व्हावा, हे डॉ. दाभोलकरांचे स्वप्न होते. त्यासाठीच ते सलग चौदा वर्षे सरकारशी आणि या विधेयकाला विरोध करणा-यांशी झुंजत राहिले. ते उदारमतवादी असल्यामुळेच विचारांचा विरोध विचारांनीच करायला हवा, यावर त्यांचा विश्वास होता. दाभोलकर यांची सनातन्यांकडून हत्या झाल्यानंतर राज्यभरात जो लोकक्षोभ उसळला त्यावरून सरकारने खडबडून जागे होत जादूटोणाविरोधी विधेयकाचा अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे.
           हा निर्णय घेण्यासाठी दाभोलकरांच्या रूपाने विवेक, बुद्धिप्रामाण्यवाद, विज्ञाननिष्ठ विचारांचा एक बळी द्यावा लागला, ही बाबच महाराष्ट्रासारख्या पुरोगामी समजल्या जाणा-या राज्यासाठी लांच्छनास्पद आहे.
          अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातले पहिलेच पुरोगामी राज्य ठरले. सरकारने केलेल्या या कायद्याचे स्वागतही झाले. दाभोलकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी तयार केलेल्या विधेयकाच्या प्रारूपावर काही धर्ममरतडांनी जोरदार हल्ले चढवत हा धर्मात हस्तक्षेप असल्याचा कांगावाही केला होता. डॉ. दाभोलकर हिंदू धर्माच्या विरोधात असल्याचा अपप्रचार काही हितशत्रूंनी केला होता. पण प्रत्यक्षात मात्र उदारमतवादी डॉ. दाभोलकरांना विज्ञानवादी समाजाच्या निर्मितीसाठीचे भक्कम पाऊल म्हणूनच अंधश्रद्धा निर्मूलन कायदा व्हावा, असे वाटत होते. हाच त्यांच्या मूलभूत विचारांचा गाभा होता. त्यामुळेच धार्मिक पूजा-अर्चा, धार्मिक विधीला आपला विरोध नाही, अशी भूमिका घेत, सरकारशी चर्चा करून त्यांनी सरकारने तयार केलेल्या या विधेयकाला मान्यताही दिलेली होती. केवळ त्यांच्या समाजप्रबोधनाच्या चळवळीमुळेच महाराष्ट्रात हा कायदा झाला.
          समाजातील दीनदुबळ्यांवर, अशिक्षितांवर, विशेषत: महिलांवर धर्माचा, अनिष्ट परंपरांचा प्रचंड पगडा असून अंधश्रद्धेच्या मार्गातून या जनतेचे मानसिक, आर्थिक, सामाजिक शोषण होत असते आणि ही नवी व्यवस्था समाजात वेगाने पसरते आहे याकडे दाभोलकरांनी लक्ष वेधले होते. दाभोलकर हे काही अंधश्रद्धा निर्मूलनासाठी लढणारे एकमेव कार्यकर्ते नव्हते. आपल्या संतांनी चार-पाचशे वर्षापूर्वी समाजातल्या भोळसट, अविवेकी, अज्ञानातून निर्माण झालेल्या रूढींविरुद्ध लढा पुकारला होता. संतांनी सुरू केलेली विवेकवादाची, बुद्धिप्रामाण्यवादाची लढाई दाभोलकर एक परंपरा म्हणून पुढे लढत होते. ही संतपरंपरा आधुनिक कायद्याच्या रूपात यावी यासाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन खर्च केले होते. पण जसे संतांना काही धर्म पाखंडय़ांच्या रोषातून जावे लागले, तसा रोष दाभोलकर यांनाही सोसावा लागला. महाराष्ट्राच्या संतपरंपरेत हिंदू कर्मकांडाविरोधात बोलणा-या ज्ञानेश्वरांना वाळीत टाकण्यात आले होते. विवेकाला आव्हान देणारे तुकारामांचे अभंग इंद्रायणीत बुडवले गेले होते. या संतांचा धर्मपाखंडय़ांनी जो छळ केला होता तशी परिस्थिती दाभोलकरांच्याही वाटय़ाला आली होती. जे काही समाजातील वाढत्या धर्मवादाविरोधात, फॅसिझमच्या विरोधात बोलतात त्यांचा आवाज कायमचा बंद करून टाकणे, ही संस्कृती महाराष्ट्रात महात्मा गांधींच्या खुनापासून रुजवण्यात आली आहेच. तीच संस्कृती दाभोलकर यांच्या खुनाच्या घटनेतून पुन्हा उफाळून आली.
          दाभोलकरांचे जादूटोणाविरोधी विधेयक केवळ हिंदू धर्माच्या विरोधात नाही, तर ते सर्व धर्मामधील कर्मकांडाच्या विरोधात आहे, हे सत्य नाकारत हिंदू सनातनी दाभोलकर हे हिंदू देवादिकांचे अवमूल्यन करत आहेत, असा विचार पसरवत होते. दाभोलकर खुलेआम चर्चेला आव्हान देत होते, तेव्हा धर्माभिमानी या चर्चेपासून दूर पळत होते. दाभोलकर गावोगावी, गल्लोगल्ली, उन्हातान्हातून, एसटीतून प्रबोधनासाठी वणवण फिरत असताना धर्माभिमानी हिंदू धर्मावर चहुबाजूंनी आक्रमण होत आहे, हिंदूंवर अन्याय होत आहे, असा टाहो फोडत होते. तेव्हा दाभोलकरांना आपल्या जीवाला धोका आहे याचीही कल्पना होती; पण ते नेहमीच निर्धास्तपणे, धाडसाने समाजसुधारणेची लढाई गावागावात जाऊन लढत होते. पोलिसांनी त्यांना झेड सिक्युरिटी देण्याचे कबूल केले, पण हे संरक्षणही त्यांनी नाकारले. कारण आपल्याला संरक्षण मिळेल; पण सामान्य कार्यकर्त्यांचे संरक्षण कोण करणार, असा त्यांचा सवाल असे. अशा मवाळवादी, उदारमतवादी आवाजाचा धर्माभिमान्यांनी धसका घेतला. या धसक्यातून सनातन्यांनी हिंदू धर्माला अधिकाधिक आक्रमक बनवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यात सुशिक्षितांची, उच्चशिक्षितांची भरती होत असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर आणि अराजकसदृश होत जाणार आहे. दाभोलकर म्हणत, ब्रिटिशांनी तत्कालीन सनातन्यांचा विरोध पत्करून हिंदू धर्मात सुधारणा व्हाव्यात म्हणून सतीबंदीचा कायदा, विधवा पुनर्विवाहाचा कायदा संमत करून घेतला होता. आता आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशके होऊनही लोकशाही स्वीकारलेल्या या देशात मूलगामी स्वरूपाचे सामाजिक सुधारणेचे कायदे होत नाहीत, ही खरी चिंतेची गोष्ट आहे. आयुष्यभर धर्माच्या नावाखाली भोंदूबाबांकडून होणारी लूट, नरबळी, जादूटोणा, मंत्र-तंत्र, चेटूक, ढोंगबाजीला कडाडून विरोध करणा-या डॉ. दाभोलकरांच्या मारेक-यांचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी मांत्रिक-तांत्रिकांची मदत घेतल्याचे प्रकरणही गाजले.त्यावर जोरदार टीकाही झाली.
लोकशाहीच्या चौकटीत राहून दाभोलकर आपले वेगळे विचार मांडत असतील आणि त्या विचारांची हत्या करणे ही लोकशाहीच्या गाभ्याची हत्या आहे. सर्व प्रकारच्या मागे निश्चिततच घाणेरडे राजकारण करून कधी जाब मिळेल हे सांगता येत नाही. यांचे मारेकरी न सापडणे म्हणजे भारतीय लोकशाहीची दिवसाढवळ्या झालेली हत्या. याचे मारेकरी भारतातील कोणत्याच सुरक्षा यंत्रणा ला सापडत नाहीत. यासारखी अपमानास्पद गोष्टी नाही, मूग गिळुन बसलेले राजकारणी त्यांना काही करून देत नाहीत हे माझ्यासारखं अतिसर्वसामान्य माणसाला पडलेलं कोड आहे. झोपलेल्या झोपेतून उठवता येत पण झोपेचे सोंग करणाऱ्या कसं उठवाच. बाकी सर्व नाटकं समजतात पण मी काहीही करू शकत नाही याचे दुःखही होतंय.

३)शुभम राधेश्याम,  पंढरपूर

    "कानून हात बहुत लंबे होते हे जनाब "  हा घासून पुसुन गुळगुळीत झालेला संवाद आपण आजवर कित्येक हिंदी चित्रपटामध्ये पाहिला आहे आणि ते  'बहुतांश ' सत्यही आहे  ,पण  डॉ. दाभोळकराच्या केसमध्ये 'मारेकऱ्यांचे हात' हे 'कायदा तयार करनाऱ्याच्या' हातापर्यत पोहोचले आहेत आणि हे अदृश्य व अधिक शक्तिशाली हात 'कायद्याची अमलबजावणी' करनाऱ्या तथाकथित 'लांब' हातावर प्रभाव व दबाव टाकतात  त्यामुळे २० ऑगस्टचा जवाब कधी मिळेल हे सांगणे अवघड आहे.

४)किशोर शेळके. लोणंद. जि. सातारा

    आपण 'अंधश्रद्धा निर्मूलन समिती' हे नाव ऐकलं तरी आपल्या डोळ्यासमोर महाराष्ट्राचे थोर विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोळकर हे व्यक्तिमत्व उभं रहातं. कोणत्याही स्वार्थाशिवाय केवळ समाजप्रबोधन करावे या भावनेतून त्यांनी महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर शेकडो कार्यकर्ते उभे करून एक चळवळ उभी केली. आणि ती चळवळ यशस्वीपणे राबवत असताना काही समाजकंटकांच्या अघोरी वृत्तीला सामोरे जावे लागले. खरंतर या मातीमध्ये अश्या व्यक्तिमत्त्वाला प्रत्येक नागरिकाने वंदन केले पाहिजे पण या मातीचे दुर्दैव असं की दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांसारख्या व्यक्तींना छातीवर गोळ्या झेलून मरण पत्करावं लागलं.

      २० ऑगस्ट २०१३ या दिवशी डाॅ. नरेंद्र दाभोळकर यांचा खून करण्यात आला याची खंत आहेच पण याहीपेक्षा मोठं दुर्दैव म्हणजे या गोष्टीला पाच वर्षे उलटूनही हे हैवानी कृत्य करणारी राक्षसं अजून मोकाटच आहेत. भारतीय तपास यंत्रणा अजून तरी सक्षम समजली जाते. ज्या गोष्टीला पाच दिवसांचा अवधी पुरेसा होता ती गोष्ट पाच वर्षांत पूर्ण होऊ शकत नसेल तर या यंत्रणेवर विश्वास ठेवावा का?. हा खुप मोठा प्रश्न आहे.

       डाॅ.नरेंद्र दाभोलकर यांनी स्वतःला समाजकार्यात वाहून घेतले होते. अनिष्ट प्रथा व अंधश्रद्धा या गोष्टींचा त्यांनी कडाडून विरोध केला. ज्या लोकांना त्यांची ही गोष्ट आवडली नाही त्या लोकांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य बंद पाडावे या हेतूने त्यांचा खून केला. पण त्यांच्या पश्चात हमिद दाभोळकर, मुक्ता दाभोळकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे असंख्य कार्यकर्ते यांनी डाॅ. नरेंद्र दाभोळकरांचा तो लढा तेवढ्याच जोरात चालू ठेवला आहे.

      डाॅ. नरेंद्र दाभोळकर यांचा खून म्हणजे त्यांच्या चाहत्यांना व कार्यकर्त्यांना न पचनाराच होता. त्यांच्या खुनाचे मारेकरी शोधण्यासाठी सरकारी यंत्रणा आणि तपास यंत्रणा चुकीच्या पद्धतीने काम करत आहेत. या विरोधात कार्यकर्त्यांनी अंहिसेच्या मार्गाने अंदोलन चालू ठेवले आहे. पण तरीही सरकारने याची कोणतीही दखल घेतली नाही. सरकारला जाग यावी यासाठी आणि जाणीवपूर्वक करत असलेल्या चुकीच्या तपास यंत्रणेविरोधात आपलाही थोडा हातभार असावा हीच अपेक्षा.
शब्दमर्यादेमुळे जास्त काही लिहू शकत नाही पण माझे वाचकांना आवाहन आहे की जास्तीत जास्त संख्येने या लढ्यात सहभागी व्हावे.


५)शीतल शिंदे,दहिवडी

      " अंधश्रद्धा निर्मूलन समीती " _  अध्यक्ष  डॉ .नरेंद्र दाभोलकर.हे नाव इतिहासात अमर राहील...
    लोकांना गठरातून बाहेर काढायचे नाही तितेच पडुदयायचे असे झाले आहे आता आणि जर कोणी काडायचे म्हटले तर तो कायदा /देश  चालवनाऱ्याच्या विरोधात काम करतोय असे म्हणावे लागेल. जागृती केली की पोट कसे भरणार.लोकांच्या बुद्धिला तान दयायचा नाहीं नाहीतर बुद्धि चालेल त्यांची.
     पुनः फीरून प्रश्न तिथेच येतो.
           माझ्या दुषकृत्याना माझा भाऊ आड आला तरी मी त्याची गय करणार नाही .असे काहींच्या रक्तातच नाहीतर वंशबिज DNA मधेच आसते,हे डॉ बाबासाहेबांनी  अभ्यास करुण, सिद्ध करून, लिहून ठेवले होते.
 तशी उदाहरणे सुद्धा आहेत इंग्रज काळापासून ते आतापर्यंत.
बघा अभ्यास करुण सर्व समाज सुधारकांना,महापुरुषाना मरणारे अथवा त्यांच्या मारनास  कारणीभूत कोण आहेत. महात्मा गांधी,संत तुकाराम ,संत नामदेव माऊलींचे आई वडील, महात्मा बशेवश्वर,राजा भृहद्रथ,महात्मा फुलेवर कट, बलिराजाचा वध,
शिवराय,संभाजीराजे.
     एकटे माईचे लाल  नरेंद्र दाभोलकर,वागले सोडले तर.
      हत्या करनारांचे हात कायद्यापर्यंत पोहोचलेले नाहीत तर कायदा चलवायला लावणार्याणि एथपर्यंत हात पोहोचवले आहेत.सत्ता कोणाचीही असो कायदा कोनिपन बनवला असो तो चवलनार आम्ही 👍.हे  हात! कायदा हातात घेणारे जोपर्यंत मुळातून उपटून काढले  जाणार नाही तोपर्यंत हे असेच बलि जाणार.
दभोळकरांचे मारेकरी सापडत नाहीत की सापडू  देत नाहित,आणि सापडतील की नाही हे नंतर.मात्र यांचे कार्य पुढे सर्वानी चालू ठेवले पाहिजे. तर च  त्यांचे स्वप्न पूर्ण होईल असे मला वाटते.
     कायदा बनवलाय चांगला पण त्याचा वाइट वापार करायला लावणारी पिलावळ जोपर्यंत थांबंवली जाणार नाही तोपर्यंत असेच चालू राहणार.

  म्हणून खरा इतिहास वाचने खुप गरजेचे आहे.

६)संगीता देशमुख,वसमत जि. हिंगोली

"२० ऑगस्ट २०१३" हा दिवस पुरोगामी महाराष्ट्रासाठी "काळा दिवस"च म्हणावा लागेल. या महाराष्ट्राची जडणघडण ही पुरोगामी म्हणून झालेली आहे. पण आज एकविसाव्या शतकातील स्थिती  पहाता पुरोगामी महाराष्ट्राची वाटचाल मात्र उलट्या दिशेने होत आहे,हेच लक्षात येईल.ज्या विभूतीने सामान्यजनांसाठी जीवाचे रान करून समाजातील अंधश्रद्धा संपविण्याचा प्रयत्न केला,त्याच सामान्य जणांच्या हाताने डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना संपविले. डॉक्टराना संपविणारे हात जरी सामान्यांचे असले तरी त्या हातातील बंदुकीच्या गोळ्या मात्र सामान्य जणांच्या नव्हत्या. त्या गोळ्या होत्या पाताळयंत्री समाजकंटकाच्या! गोळ्या झाडणारी हात सापडली तरी,त्यांना पकडण्याचे धाडस हे शासन करत नाही म्हटल्यावर त्यामागच्या हाताना शोधण्याचे किंवा त्यांना जाब विचारण्याचे धाडस हे शासन करेल का?
             आणि हे हात नेमके कोणाचे होते,हे मात्र सरकारला शोधून काढावेसे वाटले नाहीत. ज्यांना त्यांच्या हत्येचा तथाकथित  रचलेल्या कटाचा शोध आधीच लागतो पण दिवसाढवळ्या भरवस्तीत डॉक्टरांचा खून होतो आणि त्या घटनेचा तपास अजूनही लागत नाही,हे कोणत्याही विवेकनिष्ठ व्यक्तीला पटण्यासारखे आहे का? आज या घटनेला पाच वर्ष पूर्ण होत आहेत.या घटनेचा जाब कोणाही सामान्य माणसालाही  विचारावासा वाटला नाही. ही किती खेदाची बाब आहे! याउलट  डॉ. दाभोळकरानंतर ,कॉ. पानसरे,डॉ. कलबुर्गी,गौरी लंकेश अशा विचारवंतांच्या हत्येची साखळी सुरू केली. या देशात विचाराच्या लढाईला बंदुकीच्या गोळीने संपविल्या जाते आणि गुन्हेगारांना संरक्षण दिल्या जाते. आणि याचं सोयरसुतक कोणालाही नाही. त्या देशाची वाटचाल "तेजाकडून तिमिराकडे" सुरू आहे,असं खेदाने म्हणावं लागतं.
         डॉ. नरेंद्र दाभोळकरांचा विरोध हा देवपूजेला किंवा धर्माला नव्हताच. अजूनही सामान्य माणसांपर्यंत त्यांच्या विचारांचा अपप्रचारच केल्या जातो. ढोंगी बुवाबाजी आणि तथाकथित स्वतःला साधुसंत म्हणवून घेणाऱ्या लोकांकडून होणाऱ्या फसवणुकीला विरोध होता. पण  "यथा राजा,तथा प्रजा" या म्हणीप्रमाणे जनताही कधी व्यवस्था म्हणते त्यात किती सत्य आहे,हे पाहण्याचा प्रयत्न करत नाही. कोणीही डॉ. दाभोळकरांचे  विचार वाचण्याचा प्रयत्न करीत नाहीत. त्यांना ऐकण्याचा प्रयत्न करीत नाहीत. याउलट अज्ञानामुळे त्यांच्या हत्येचे समर्थन करणारेही लोक इथे कमी नाहीत. कधीकधी असंही वाटतं की,डॉ. दाभोळकरांचे बलिदान व्यर्थ गेले. कोणासाठी डॉ. दाभोळकरांनी स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवले होते? इथे कोणी कोणाला शिवीगाळ केली की,त्या त्या समाजाचे लोक पेटून उठतात. मग दिवसाढवळ्या होणाऱ्या डॉ. दाभोळकरांच्या हत्येविरुध्द कोणी का आवाज उठवत नाही?
एकामागोमाग एक विचारवंतांच्या हत्या होतात आणि आम्ही हातावर हात ठेवून निमूटपणे बसतो.  डॉ. दाभोळकरांच्या मारेकऱ्यांची नावेही बाहेर आली आहेत. ते खुलेआम मोकाट फिरत आहेत.एका महत्वाच्या टप्प्यावर येऊन  हे प्रकरण थांबविले जाते.  मागील वर्षी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याच संदर्भात "जबाब दो" हे आंदोलन सुरू केले होते. पण त्याचा जबाब कधी मिळेल,किंवा मिळेलच की नाही,हेही सांगता येणार नाही. जर मारेकरी आणि त्यांचे मास्टरमाइंड असेच मोकाट फिरणार असतील तर बाकी विवेकनिष्ठ विचारवंतांनी विचार करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. तुमच्या विचाराच्या लढाईला कसे उत्तर दिले जाईल, याचाही विचार करावा लागेल.  २० ऑगस्ट २०१८ रोजी डॉ. दाभोळकरांच्या हत्येला पाच वर्षे पूर्ण  होतील. बाकी विचारवंतांना  विवेकनिष्ठ विचारांची पेरणी करायची की गांधारीसारखी डोळ्यावर जाणूनबुजून पट्टी बांधून घ्यायची? हा ही विचार करावा लागेल! जर विचाराची लढाई खंबीरपणे चालूच ठेवायची असेल तर आधी  डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचे  मारेकरी  कधी पकडल्या जातील? त्यांच्यावर कारवाई कधी होणार? हत्येमागचे मास्टरमाइंड कधी शोधणार?  या प्रश्नांचे  जाब विचारणे आवश्यक आहे. २० ऑगस्ट रोजी डॉ. नरेंद्र दाभोळकरांना मूकपणे  श्रद्धांजली देऊन भागणार नाही. तर त्यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त शासनाला पुन्हा एकदा शासनाला प्रश्न विचारावा लागेल.आणि जवाब मिळेपर्यंत त्याचा पाठपुरावा करावा लागेल  तरच त्यांचा स्मृतिदिन करण्यात अर्थ उरेल. सहावा स्मृतिदिन येण्यापूर्वी डॉ. दाभोळकर,कॉ. पानसरे,डॉ. कलबुर्गी यांचे मारेकरी पकडले जावेत,अशी इच्छा व्यक्त करून डॉ.नरेंद्र दाभोळकर यांना पाचव्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!!

७)प्रा. रोहन बाळकृष्ण वर्तक,लोणावळा ता. मावळ.जि. पुणे

20 ऑगस्ट 2011.... सकाळच्या प्रहरी मी रेल्वे स्टेशन उभा होतो आणि माझ्या भावाचा फोन आला आणि सुन्न करणारी बातमी सांगितली... क्षणार्धात मी निशब्द आणि असंख्य विचारांनी गुरफुटून गेलो.
हे का आणि कशासाठी, कुणी केलं असेल हे काम, कसं काय शक्य आहे हे? अनेक प्रश्न मी स्वतःलाच विचारात राहिलो आणि अनुत्तरित होत गेलो....

श्री शिवाजी उदय मंडळ, सातारा ह्या मंडळाचे सक्रिय सदस्य म्हणून खरंतर माझ्या परिवाराची आणि श्री नरेंद्र दाभोळकरांची ओळख, आणि ह्याच मंडळाची लोणावळ्यात स्थापना करण्यासाठी त्यांनी केलेली धडपड आणि त्यातून त्यांचा लाभलेला सहवास, एवढंच आमचं प्रत्यक्ष नात.
अत्यंत स्पष्ट आणि निःसंकोच आयुष्य जगलेला माणूस आणि सामाजिक प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने निर्भयपणे उभा केलेला एक विचार. ही माझ्या मनी उभी राहिलेली त्यांची प्रतिमा. कधी वैयक्तिक आयुष्यात भीती हा शब्द जरी उभा राहायचा प्रयत्न केला की दाभोळकर हे नाव मी स्वतःहून समोर सजवतो आणि भीतीला दूर पळवतो.
जनतेच्या मनात अधिराज्य केलेल्या "देव" ह्या संकल्पनेला नेस्तनाभूत  करून वैज्ञानिक दृष्टिकोनाची आस धरणाऱ्या दाभोळकरांचा खून होणे ही आपल्या देशाच्या भविष्याची चिंता वाढविणारी घटना आहे, आणि ह्या चिंतेत भर की काय आज 5 वर्षे पूर्ण होऊनही त्या मारेकऱ्याचा शोध न लागणे होय.
आज बदलत चाललेली समाज रचना, धर्म केंद्रित प्रवृत्ती,  आणि जाती पातीत विरघळून नष्ट होत चाललेली मानवाची नैतिकता या मुळे दाभोळकर यांचा सारखे विचारवंत काळाच्या पडद्याआड होताना आपण बघत आहोतच. यासर्वांकडे कटाक्षाने बघताना मला प्रश्न पडतो की, धर्म संकुचित मंडळी आपल्या पुढील पिढीला प्रतिष्ठे करता का होईना इंग्रजी शाळेत शिकविणारा समाज, आज देखील स्वतःमध्ये बदल घडून देत नसेल तर 20 ऑगस्ट चे उत्तर भेटणे अशक्यच आहे.
सध्याची राजकीय सत्ता त्या सत्तेतील राजकर्त्यांमध्ये मुरलेला मनुस्मृतीचा विचार यामुळे ह्याविषयाकडे बघण्याचा शासनाचा दृष्टीकोन पक्षघाती आहे हे निश्चितच.

आज संध्याकाळी झळकल्या बातमीनुसार औरंगाबाद येथील सचिन अणदुरे हयाने श्री दाभोलकर ह्याच्यावर गोळी झाडली असे CBI ने स्पष्ट केले परंतु ह्याची सत्यता तपासताना शासन कीती कोणापुढे गुढगे टेकटाय ह्यावर वरील प्रश्नचा जबाब अवलंबून राहील.
*=========================*

India is under serious crisis of nature degradation. Every state is the victim of wrath of the nature. This time Kerala, The God’s Own Country. Kerala is facing its worst flood in 100 years. More than 300 people have lost their lives and over 2 Lakh people have been displaced. 12 districts has badly affected.One of MP also shared a fear of lost of 50,000 lives. Around Rs 20,000 crore lost is occurred in the wrath of nature. There was demand of Rs. 2000  crore from Central government. Central Government has sanctioned only Rs. 500 Crore. 


It’s a time for common  people like us to help our brothers and sister from Kerala. Its an urgent need to help the God’s Own Country. The coverage in mainstream media is also hardly there unfortunately. Therefore it is important that common people like us help! You can donate directly to the Chief Minister’s distress relief fund (CMDRF) through the bank account given below. Whatever amount possibleLink: https://donation.cmdrf.kerala.gov.in/



Do good and someone will return the favour in doing good for you too



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************