गावाकडच्या जत्रा.

रौप्य महोत्सवी आठवडा
🌱 वि४🌿व्हॉट्सअप ग्रुप
📄 आठवडा 25 वा📝
21एप्रिल  ते 27 एप्रिल 2018
गावाकडच्या जत्रा.


(या विषयावर पी.प्रशांतकुमार,अहमदनगर.आर.सागर,सांगली.राज इनामदार,पंढरपूर.किरण पवार,औरंगाबाद.अभिजीत गोडसे,सातारा.प्रदिप इरकर,वसई,जि-पालघर
अंजली आमकर,रत्नागिरी.संगीता देशमुख,वसमत ,हिंगोली.यांचे सविस्तर विचार वाचा)

संबंधित प्रातिनिधिक छायाचित्रे इंटरनेट वरून घेतलेली आहेत.


पी.प्रशांतकुमार,अहमदनगर:
.. गावाकडच्या जत्रा ह्या विषया या विषयावर लिहिण्याइतका व्यासंग नाही माझा त्या ऐवजी माझ्या गावची जत्रा ह्या विषयावर लिहितो..
....माझं गाव ..उत्तर महाराष्ट्र/प.महाराष्ट्र आणि मराठवाडा यांच्या सीमा एकत्र येतात तिथे.. नकाशानुसार अहमदनगर जिल्ह्यात शेवटचं टोक..आजूबाजूचा सर्व शेजार मराठवाड्याचा..
...गावात 75-80% मुस्लिम तर आजूबाजूच्या  वाड्यावस्त्यांवर आणि तांड्यांवर 90% हिंदू..
..*ग्रामदैवत* .. मुस्लिम त्याला पीर मानतात तर हिंदू नाथपंथीय बाबाची समाधी..
...तिथले आचार पद्धती दोन्ही धर्मीयांना बुचकाळ्यात पाडणाऱ्या.. हिंदू-मुस्लिम दोन्हीच अद्भुत मिक्चर ..
...तिसऱ्या श्रावणी शुक्रवारी भरणारी जत्रा..गर्दी..ती दुकानं..पाळणे..मध्यरात्री निघणारा छबिना .. झोप आवरता येत नसल्याने दुसऱ्या दिवशी सगळं आठवायचं नाही..
..आमचं वेशीत पहिलं घर .. त्यात छोटं किराणा दुकान.. यात्रा काळात खूप काम असायचं घरी .. पुढच्या ओट्यावर दुकान मांडायचं ..पावसाळा असल्याने वर ताडपत्री लावायची .. सर्व वस्तूंच्या 2-4 दिवस आधीच पुड्या करून ठेवायच्या.. आम्हाला दिवळीपेक्षाही ह्या दिवसात जास्त काम असे.. जत्रेच्या दिवशी आईला स्वयंपाकही करायला वेळ नसे त्या दिवशी आमच्या बनेखां पठाणच्या हॉटेल मधले भजे आणि जिलेबी सोबत पिवळे लाडू,गुडीशेव,भेळ असले पदार्थ..
...आणखी ही खूप आहे सांगण्यासारखं पण आता हे सर्व आठवणीत.. *1992* नन्तर परिस्थितीत खूप बदल झाले.. सगळ्यांच्याच धार्मिक भावना तीव्र झाल्या.. आधीच्या कित्येक पिढ्यांना न पडलेला *देव हिंदू की मुस्लिम ?* हा प्रश्न लोकांना पडला.. दोन्ही बाजूच्या गावाबाहेरच्या,तालुकाबाहेरच्या लोकांनी त्यात तेल घातलं... आणि नेहमी आनंदाची उधळण करणाऱ्या जत्रेत त्या वर्षी दंगल झाली..पहिल्यांदा असलं आक्रीत घडलं..
... जमावबंदी,संचारबंदी,कर्फ्यु हे शब्द पाहिल्यांदा गावाला समजले.. गावाला आणि देवस्थानाला छावणीच रूप आलं.. दोन्ही बाजूची शेकडो लोकं पोलिसांनी पकडली.. देवदर्शन पूर्ण बंद..संध्याकाळी पूर्ण गावाला ऐकू येणारा नगारा बंद.. दिवाबत्ती बंद..
....
..काळानुसार भीतीच वातावरण कमी झालं..परत लोक एकमेकांशी बोलायला लागली..लग्न कार्यातली ये जा सुरु झाली.. पोलीस बंदोबस्त 2-3 वर्षांनंतर पूर्ण हटला
.... आता बरीच वर्षे झाली..पुलाखालून बरंच पाणी गेलं..दोन्ही बाजूची लोकं बाहेर आली.. बहुदा केसेस पण सामंजस्याने हटवल्या एकमेकांवरच्या..
....पण ती *जत्रा* शेवटची ठरली..  
.... आता जत्रा संपली..गावाकडे जायचं कारण ही संपलं ..
मागे गेलो तेव्हा देवापर्यंत जाता आलं..कुणीच नाही.. रया गेलेली .. शब्दशः कुत्रही नव्हतं.. अजूनही अधिकृतरित्या जायला परवानगी नाही म्हणतात पण आता जाणारंही नाही कुणी आणि अडवणारंही नाही कुणी.. गडबड गोंधळ काहीच तिथे उरलं नाही
... आता तिथे उरली ती फक्त शांतता .. भयाण शांतता….

R.सागर ,सांगली:
मार्गशीर्ष संपून पौष सुरु होतो. थंडीचा कडक वाढत चाललेला असतो. आणि अशाच वेळी खेडोपाड्यांमध्ये जत्रा-यात्रांचा हंगाम सुरु होतो. माझं गांव सांगली जिल्ह्यातलं कृष्णाकाठी वसलेलं. आमच्याकडे कांही गावांमध्ये ग्रामदैवताची जत्रा भरते तर काही ठिकाणी पीरबाबाचा उरूस. पण जत्रा असो किंवा उरूस आजही आमच्याकडे हिंदू-मुस्लीम एकत्रितपणे साजरा करतात. तशी कित्येक वर्षांची ती परंपराच बनली आहे. आणि हेच आमच्या गावाकडच्या जत्रेचं वेगळेपण आहे.

अलीकडच्या काळात जत्रा एखाद्या उत्सवासारखी साजरी करायचं प्रमाण तसं बघायला गेलं तर वाढलंय आणि दिवसेंदिवस ते वाढतच चाललंय. जत्रेला आपापले नातेवाईक, मित्रमंडळी यांना आमंत्रित करायचं आणि त्यांच्यासाठी जेवणावळीचा बेत ठेवायचा हे तरी सर्रास बघायला मिळतं. आजकाल सगळेच आपापल्या कामात व्यस्त असतात. त्यामुळे एकमेकांकडे येणं-जाणं फारसं होत नाही. जत्रेच्या निमित्ताने सगळे एकत्र यावेत, एकमेकांची भेट व्हावी हा त्या जेवणावळीमागचा हेतू.

जत्रेचा आणखी एक फायदा म्हणजे तमाशासारखी महाराष्ट्राची अस्सल लोककला जिवंत ठेवायचं काम जर कुणी केलं असेल तर ते या खेडोपाडी होणाऱ्या जत्रांनीच. गावाकडची जत्रा म्हणजे तिथे तमाशाचा फड हमखास असणारच. भले आज तमाशात काम करणाऱ्या कलावंतांचे जीवन हलाखीचे असेल, नवीन कलावंत या क्षेत्रात यायला जास्त उत्सुक नसतील पण हा जत्रांचा ४-५ महिन्यांचा जो कालावधी आहे, तो कालावधी तमाशा कलावंतांसाठी बरंच काही देऊन जातो.

गावाकडची जत्रा म्हंटलं की तमाशाच्या फडासोबत कुस्त्यांचा फडही आलाच. आपले जुने मराठी चित्रपट बघा ज्यामध्ये तत्कालीन समाजव्यवस्थेचं वास्तव दिसून येतं. तिथे जत्रा, तमाशाचा फड आणि कुस्त्यांचा फड हा संगम नक्कीच बघायला मिळेल. गावाकडच्या जत्रांमध्ये हा संगम आजही बघायला मिळतो. आपल्या तांबड्या मातीतले अनेक नावाजलेले मल्ल असतील ज्यांनी आपल्या कुस्ती क्षेत्रातल्या कारकीर्दीची सुरुवात जत्रेतल्या फडातूनच केलेली बघायला मिळेल. कुस्ती क्षेत्राला लोकाश्रय द्यायचं काम या जत्रेनंच केलंय.

आमच्या लहानपणीचा काळ असा होता ज्यावेळी जत्रेच्या निमित्ताने तमाशा आणि कुस्तीसोबतच बैलगाडी शर्यतीदेखील व्हायच्या. सध्या न्यायालयाच्या निर्णयामुळे शर्यती बंद झाल्या. पण जत्रा आली की विविध शेतकऱ्यांच्या सर्जा-राजांची आणि त्यांनी गाजवलेल्या मैदानांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. कुणीही काहीही म्हणो, तमाशाचा फड असो किंवा कुस्तीचं मैदान असो जत्रांचा हंगाम असल्याशिवाय त्यात मजा नाही येत. आणि म्हणूनच गावाकडची जत्रा आजही वेगळीच भासते.
राज इनामदार,पंढरपूर:
ला मै तेरी पढ़लूँ गीता ,पढले तु मेरा कुरान
अपना तो है एकही सपना ,एक थाली मे खाना खाये सारा हिंदुस्तान
      स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशांत सुरु झालेल्या जातीपातींच्या राजकारणामुळे सम्पूर्ण देशांत असुरक्षीततेचे वातावरण निर्माण झाले आहे .परिणामी देशांची अंतर्गत सुरक्षा व एकात्मता धोक्यात आली आहे .माणुसकीला घरघर लागली आहे व मानवतेची दमछाक होत आहे .मानवतेपेक्षा ..जात , धर्म यांचे वर्चस्व वाढत चाललें आहे . मोठमोठ्या शहरामधे वेगवेगळया कारणांवरूंन कधी मिरवणुकीवरून तर कधी झेंडा बाँधन्यावरून तर कधी मंदिर -मस्ज़िद वरून भांडण-तंटें निर्माण होतात .याच भांडणाचे रुपांतर नंतर भयानक दंगलींमध्ये होते .
   निष्पाप , निरागस लोकांना जिवांस मुकावे लागते , अनेक लोकं बेघर होतात , अनाथ होतात. मोठ्या प्रमाणात जीवीत व वित्तहानी होवून आपले व देशाचे प्रचंड नुकसान होते. माणसा माणसामधे दुरावा निर्माण होवून सामाजीक तेड निर्माण होते .या सर्व गोष्टीत हरली जाते ती मानवता , माणुसकी व बंधुता आणी जिंकते फक्तआणी फक्त  धर्मांधता व दाँभिक्ता. आपली राजकीयपोळी भाजन्यासाठी काही स्वार्थी प्रवूतीचे लोकं जाती -जातीत व धर्मा -धर्मात तेढ निर्माण करणारी भट्टी नेहमी विषारी आगीच्या ज्वालानी भडकवत ठेवतात .

     धार्मीक कारणांवरुण एकमेकाचे रक्त सांडन्यास आसूसलेल्या लोकांनी , गावातील यात्रेत /उरुसात येवून पहावे .इथे त्यांना दिसेल स्वामी विवेकानंद व डॉ APJ कलाम यांच्या स्वप्नातिल भारत देश . आज़ खऱ्या अर्थाने जात -धर्म यांच्या पलीकडचा भारत देश हा ग्रामीण भागातच आहे , अस म्हणलं तर चुकीचे ठरणार नाही .   राष्ट्रपिता महात्मा गाँधी म्हणाले होते खेड्याकडे चला ते उगच नव्हे , कारण आज़ सुधा ग्रामीण भागांने माणुसकी जिवंत ठेवली आहे , आजही गावाकडे दिवाळीला मुस्लीम बांधवाना फराळा बोलावल्याशिवाय हिंदूची दिवाळी साजरी होत नाही आणी रमजान ईदच्या दिवशी आपल्या हिन्दू बांधवाना मनसोक्त शिरखुरमा खावु घातल्याशिवाय मुस्लिम बाँधव स्वत खात नाहीत .
 खरच  रमजाण (Ramjan) मधे *राम* आहे आणी diwali मधे Ali *अली* आहे .हे ग्रामीण भागातील कष्टकरी लोकांना समजलं पण AC रूम मधे राहणार्या सूट-बुटातील स्वतला उच्चशिक्षित समजणार्या या लोकांच्या ध्यानात हे साध सोप गणित येवू नये , आश्चर्ययाची गोष्ट आहे .
     गावातील सुंदर एकात्मकतेचे दर्शन हमखास आपणाला गावातील देवाच्या यात्रा व पीर साहेबाच्या उरुसात पाहावयास मिळते .एकादा सण किंवा ग्रामदैवतचे उत्सव पंचक्रोशीतील सर्व लोकांनी एकत्र येवून लोकवर्गनीतूंण साजरा करण्याच्या पध्दतीला यात्रा म्हणतात . यात्रा/उरूसाचा मुख्य उद्देश सर्व समाज्यातील लोकांना एकत्रित आणून जिव्हाळ्याचे नाते निर्माण करून लोकसम्पर्क वाढवणे हा असतो .

    गावातील यात्रा/उरूसाने वेगवेगळ्या समाज्याच्या लोकांना एकत्र बांधून ठेवण्याचे कामं केले आहे .गावातील यात्रेची तारीख जरी नुसती जवळ आली तरी गावातील प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर चमकलेली दिसते .गावातील सर्व समाजातील नांदायला गेलेल्या लेकी -बाळींना माहेरी येण्याचा हक्काचा उत्सव म्हणजे यात्रा होय .गावातील घरा -घरांत , गल्ली बोळात केलेली विद्युत रोषनाई , स्वागतासाठी उभारलेलें डिजिटलबोर्ड , पाहुणे , नातेवाईक यांनी गाँव गजबजून जातो .यात्रेच्या कामात चढ़ा ओढिने भाग घेण्यास सर्व समाजातील तरुणाची जणू स्पर्धाच लागलेली असते .पाहुणे रावळयानी घरे अगदी भरून जातात ..विविध पकवानाची तयारी चालू असते ..तर काहींनची यात्रेसाठी विविध खरेदी सुरु असते ..एकंदरीत आनंदोत्सव सुरु असतो सर्व घरांत .
     यात्रा हा दिवस देव -देवतांच्या नैमीत्तीक उत्सव , अपार कृतज्ञतूंन गाँवोंगाँवची माणसे येतांत ..देव दर्शन घेवुन एकमेकांना आनंदाने भेटतात ..क्षणभर मंदिराच्या झाडाजवळ बसून मनं मोकळी करतात ..सुख -दुख  सांगण्यात सांज परतून जाते . रात्री परत विविध कार्यक्रम मनाला शांतता देवून जातात .
       गावातील यात्रेमधे वेगवेगळया समाजाला वेगवेगळा मान असतो .त्याच्याशिवाय दुसरा कोणी तो कामं करू शकत नाही .पूजेचा मान , अभिषेक करने , बत्ती सांभाळणे , नारळ फोड़ने , पालखीला खांदा देणे , अशा  विविध कामाचा मान विविध समाज्याकडे असतो. यातूनच एकत्रीकरण होवून एकीची बंधुतीची माळ तयार होते .यातूनच मानवता मोठ्या डौलाने बहरते .
     मी स्वत ज्या गांवात राहतो त्या गावातील ग्राम दैवत बालेपीर यात्रेत (उरुसात) ,यात्रा साजरा करण्याचे कामं  मुस्लीम बांधवापेक्षाही दोन पावूले पुढे जावुन सर्व ग्रामस्थ भरपूर खर्च करून यात्रा साजरी करतात .येथे पुजारी मुस्लिम लोकांना मान असतो ..नैवध्य व पूजेचा मान गावातील पाटलांना असतो , पालखीचा मान भोई समाज्याला आहे .बतीचा मान इतर समाज्याकडे असतो . उद् घालण्याचा मान गावातील सर्व समाज्याच्या प्रतिनिधीना असतो .एकंदरीत पाहिले तर गावातील सर्व देव -देवतानी , पीर साहेबानी सर्व समाजाला एकत्रित आणून त्यांच्यामधे बंधुभाव निर्माण केला आहे .   *गावातील राम व रहिम दोघे आजही एकमेकाच्या हातांत हाथ घेवुन गुण्यागोविंदाने एकमेकाच्या सुख -दुखात सामावलेलें असतात*.
        *गावातील मंदीराला आपल्यासमोर असलेल्या मस्ज़िदची काळजी आहे तर मस्ज़िदला मंदिराविषयी जिव्हाळा व प्रेम आहे .ग्रामीण भागातील भारत जाती -पातीच्या पलिकडचा आहे. याला कारण म्हणजे गावाकडील यात्रा आहेत*.


किरण पवार,औरंगाबाद :
जत्रा म्हटलं ना तर एक शब्द  डोळ्यांसमोर ऊभा राहतो. तो म्हणजे, गोतावळा.गोतावळा म्हणजे थोडक्यात एकत्र जमणे. आणि एक गोष्ट नक्कीच खरी आहे की, एकत्र असण्यात किंवा एकत्र येण्यात जो आनंद आहे ना तो दुसरा कशातच नाही. मला जत्रा म्हटलं ना की आठवण येते ती पेढे, प्लॅस्टीकची बॅट, रिमोटची गाडी आणि यांसारख्या भरपूर गोष्टींची. जत्रेच खास वैशिष्ट्य म्हणाल तर घरच्यांच्या नजरेतून त्या एका विशिष्ट दिवशी देवाला पाया पडण्यासाठी गेलच पाहिजे. पण आमच्या नजरेतून मात्र जत्रा फक्त फिरण्यासाठी आणि ठराविक आवडत्या  गोष्टी विकत घेण्यासाठी. *जत्रेशी एक जिव्हाळा असायचा.* एक वेगळ नात असायचं. कळलंच नाही कधी त्या जत्रेतून चालता फिरता इतका मोठा कधी झालो की, आता जत्रा हे नावही औत्सुक्याने आपसुक तोंडातसुद्धा येण थांबल. सगळंच थांबत चालू रहात तेच आयुष्य मानाव कदाचित.

            पण एक खंत व्यक्त कराविशी वाटते की, आजची पिढी जत्रेत दिसते का? *आजच्या पिढीला आनंद केवळ क्षणीक लाभतो.* तोही माॅल किंवा इतर बरीच दुकानं आहेत त्यांच्या हौस पुरवायला. आजचे पालक ना मुलांना मजबूत होऊच देत नाहीत. जरा कुठे पाय घसरला तरी..... काय संभाषण होतं हे सांगायला नको. विशेषतः *हे घडत स्वतःचा स्टॅन्डर्ड जपू पाहणारया पालकांबरोबर.* मी असं अगदीच म्हणत नाही की, तुमच काळजी घेणं चुकीचं आहे पण अतिशयोक्ती नको. आम्ही *येरमाळ्याच्या जत्रेत भर उन्हात लहान असताना गेलोच की. आम्ही अनुभवला चुना वेचण्याचा  प्रकार. आम्ही अनुभवली लाखोंच्या वर गर्दी. आम्ही अनुभव घेतला रथ आणि पालखीचा तेही जत्रेत जाऊन.* दुरून टिव्हीवर पाहून सत्य परिस्थितीचा आनंदही कळतं नसतो आणि अडचणीदेखील समजत नसतात.
           जत्रेचे दिवस जवळ आल्याची चाहूल मनाला अगदीच भांबावून टाकायची. इतकं प्रचंड कुतूहल मनात असायचं ना की, जत्रेच्या आधीच  स्वप्नातून आम्ही तिथे हजर. *घरच्यांसोबत आधीच डील करावी लागायची की,* जत्रेत गेल्यावर काय घ्यायचं? कधीकधी असंही व्हायचं तिथे गेल्यावर मन बदलायच. मग कशीबशी लाडीगोडी लावून अथवा रडत पडत का असेना ती वस्तू मात्र घ्यायलाच लावायची. जत्रेच्या आठवणी निघाल्या ना की, मन अगदी भरून येत. *काही निरागस सुखद क्षण असे आहेत की, ज्यांची तुलना शहरातील  सद्यकालीन लहान मुलांच्या मॉलशी होणं दुरच.

कविता:- जत्रा

जत्रा काय म्हणतोस
अरे गोतावळ्याची हौस म्हणं
यात्रा दुरची वाटते रे
ठराविकतेने नटलेली परंपरा म्हणं,

पों पों भोंगा मिरवतोस
रडून घेतलेली पिपाणी म्हणं
गाडी रस्त्यावर फिरवतोस
गाडीची मौज बघ म्हणं,

आठवण काय ठेवतो
जिव्हाळ्याची जत्रा मैत्रीण  म्हणं
नुसताच काय वाचतो
बापाला जत्रेत घेऊन चल म्हणं.


अभिजीत गोडसे ,सातारा:
ग्रामीण भागात जेवढे प्रेम, जिव्हाळा, आपुलकी मिळेल तेवढी तुम्हाला कुठेंच मिळणार नाही. भावकी काय असते आणि ती काय करू शकते हे गावात राहुणच कळते. सबंध महाराष्ट्रात वेळोवेळी हे पहायला मिळते हे ही तेवढच खर अहे. गावकडच्या जञा म्हणजे एक उत्सव आपल्याकडे सनांना जेवढ महत्त्व आहे तेवढच गावकडच्या जञानां महत्त्व आहे. किंबहुना जास्तच. लहान मुलांन पासून ते जेष्ठ मंडळी पर्यत सर्वच जोरदार जञा साजरी करतात. शेतातील कडबा गोळा करुण गंजी लावून झालेल्या असतात . ऊस गेलेला असतो एकूणच शेतकरी रोजच्या कामातुन थोडाफार निवांत झालेला असतो. जञे साठी थोडी पैशाची जुळवाजुळव झालेली असते. ही जञा खर्या अर्थाने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची असते. असे म्हटले तर काही वावगे ठरणार  नाही. बारा महीने कामच असते. त्यातुन थोडा दिलासा म्हणून आणि येणाऱ्या पाहुणांच्या आणि स्वतःच्या सुखात आणि दुखाःत थोडी उसत.

     महाराष्ट्रात मराठवाडा असेल , विदर्भ असेल , पश्चिम महाराष्ट्र असेल अशा वेगवेगळ्या भागात आपआपल्या रितीरीवाजा नुसारा या जञा होत असतात. मैलो-मैली भाषा वेगळी चालीरीती थोड्या प्रमाणात वेगळ्या तशाच गावातील देवस्थाने ही वेगवेगळ्या प्रकारची असतात. त्या त्या पद्धतीने त्या त्या ठिकाणी आणि ग्रामपंचायत लोकसंख्या किती ? यानुसार जञा होतात . पण सर्वच ठिकाणी सारखा दुवा म्हणजे गावात जञेला छबीना , सासनकाट्या , देवस्थान , कुस्तीचा फड , बैलगाड्या शर्यत , तमाशा , तंबुतील चिञपट , खेळण्याची दुखाणे , वेगवेगळ्या प्रकारची सोंगे , खाऊची दुखाणे आणि गुलाल हे जवळपास सर्वच ठिकाणी पहायाला मिळते काळानुसार यातील काही घटक बंद झाले असले तरी जुन्या व्यक्तीना हे सर्व माहिती आहे. गावातील राजकारण कसे आहे, पुढारी कसे आहेत , पैशांचा कारभार कसा चालू आहे यावर संध्या जञा रंगतात. गावात ठराविक लोकांना जसे की पुर्वी बारा बलुतेदार असत त्यांना नेमुण दिलेल काम असे किंवा त्याचा तो मान असे तसेच जञेतील पालखी , सासणकाठ्या हा ठराविक लोकांचा मान असतो. गावकडच्या जञेतुन कित्येक माणसांची मने जुळतात आणि तेवढीच दुरवतात सुद्धा !

           मुद्दा आहे तो गाव सोडून स्वता:चे पोट भरायला गेलेल्या लबाड लोकांचा ! कारण ही मंडळी स्वतःला उच्छभ्रु समजत असतात गावात यांचा दुर पर्यत संबंध नसतो . असेल तर गावात थोडी जमीन आणि आजी - आजोबा . ही पुणे , मुंबईत राहणारी यांना गावात अजिबात मान सम्माण कोण देत नाही. जञे साठी म्हणून एक दोन दिवस येतात. हाफ बरमुडा घालून फिरतात.जमिनी व्यवस्थित आहेत का बघतात कमी पैशाच्या साड्या आजीला आणतात आणि स्वता:च्या चार चाकी गाडीतून निघुन जातात. हीच ती मंडळी पुर्वी गावच्या पारावार चोवीस तास पडीक असायची , रानावनात गुरांच्या मागे पळायची आणि आत्ता यांना गावातील लोक वेडी वाटतात , मुर्ख वाटतात काहीच्या बायकांना तर गावाला जञेत यायच म्हणजे किळस वाटतो. ही मंडळी गावासाठी एक रुपया खर्च करत नाहीत. कोणत्याही सामाजिक कार्यत मदत करत नाहीत . येवढच काय तर जञेची  शंभर रुपये वर्गणी सुद्धा देत नाहीत. पुन्हा हेच लोक त्याच्या आँफीसला गेल्यावर गावातील लोकांची उनी - धुनी इतर सहकारी लोकांना सांगत बसतात. आमच्या गाव किती खराब आहे. हे टिंगल करुण सांगतात. आशा मंडळीना मग गावचा माणुस बरोबर वटनी वर आणतो. छबीण्याच्या मागे सर्व गावातील लोक गुण्या- गोवींदाने गुलाल उधळत असतात. आणि ही मंडळी कुठे तरी साईटला ईनशर्ट करुन हात बांधून उभी असतात. थोडक्यात त्यांनाच लाजा वाटतात .कारण गुलाल लावायला कोणी त्यांना जातच नाही. तेही कुणाला लावत नाहीत. भावकीचा घोळका उभा असेल पाराखाली तर अशा लोकांना कुणी तिथे घेतच नाही . येऊन उभा राहीला तर कधी येतुन जातो असे त्यालाच वाटते. बरोबर त्याचा चार-चौघात अपमान करतात. हे सर्व थोडी प्रमाणात योग्यच आहे तुम्ही बाहेर जाऊन फार शहाणे झाला का ? गावाचा आणि तुमचा काही संबंध नाही का ? तुम्ही जरी गावात नसला तरी तुमचा आजा , पंजा गावात होताच की शेवटी त्यांच्या साठी तरी काहीतरी केले पाहीजे या लोकांनी. फक्त जञेत दोन दिवस येऊन हाफ बरमुडा घालून  फिरले म्हणजे सुशिक्षित नाही. काहीतर महाभाग मुंबईत भाड्याच्या घरात राहतात आणि ईकडे गावात केस वाढवून , दाड्या वाढवून , काणात बाली घालून घालून फिरतात . वर्गनी द्या म्हटले की लफाछपीचा खेळ करतात. बरेच जन म्हणतात हे शहरात राहत असले तरी यांचा गावकडच्या जञेचा आभ्यास असतो. या लोकांना गावची वेश सुद्धा माहिती नाही ग्रामपंचायतीच्या मतदानाला येत नाहीत. त्यांना आभ्यास काय असणार ? तिकडे बीच वर जाऊन पैसे उधळणार , ऐक दोन वर्षी पुर्वी संबंध आलेल्या लोकांना मोठ- मोठी गिफ्ट देणार आणि ईकडे गावात जन्म झालेला असाताना शंभर रुपये देण्यासाठी मागेपुढे पाहणारी यांची थोतांड संस्कृती आहे.

            जे काही लोक मोठी झाली त्यांनी गावाला , गावच्या जञेला कधीच विसरली नाहीत . गावा बरोबर कायम स्नेह जपला .शेवटी घरातील माणंस तुम्हाला विचारत असतील तरच तुम्हाला भाहेरची माणस किमंत देतात. तुम्ही कितीही मोठे व्हा गावाला विसरले की सर्व काही संपले हे माञ खर .गावातील जञेत बदल झाला पहिल्या सारखी गर्दी आत्ता पहायला मिळत नाही हे नक्की. पण याला हे लोक ही काही प्रमाणात जबाबदार आहेत.


प्रदिप इरकर.वसई,जि-पालघर:
तसा मी मुळचा सुळेवाडी, ता-माळशिरस जि-सोलापूर चा.परंतु रोजगारामुळे आमच्या कुटुंबाने मी लहान असतानाच वसई येथे स्थलांतर केले.त्यामुळे गावाकडची जत्रा जेवढी अनुभवली आहे त्यावर लिहिण्याचा प्रयत्न करेल.

माघ पौर्णिमेच्या दिवशी साधारण पंधरा दिवस असणाऱ्या या जत्रेची सुरुवात व्हायची.
जत्रेला जायचा म्हणजे मोठा भाऊ व त्याच्या मित्रांसोबत जायला मिळत असे.
जत्रेला गेले म्हणजे सर्वात पहिला महालक्ष्मी देवीचा दर्शन घेऊन जत्रेला सुरुवात होई.
त्यानंतर त्याच्या बाजूलाच एक शेतीसंबंधी एक प्रतियोगीता भरलेली असायची त्यामध्ये असा होते की आपण आपल्या शेतात पिकलेल्या उत्कृष्ट फळ फुल किंवा काहीही ह्याचा नमुना आपल्या नावासकट जमा करायचा व शेवटून आदल्या दिवशी उत्कृष्ट नमुन्याला बक्षिसे मिळत असत.असेच उत्कृष्ट नमुने गोळा करण्यासाठी भावाबरोबर अगदी कुसमोड गावापर्यंत सायकल वरून जाऊन आणलेले नमुने अजून ही आठवतात व माझ्या नावावर लावलेल्या ज्वारीच्या कणीसासाठी मिळालेले बक्षीस ही अजून आठवते.
त्यानंतर जत्रेतील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे जत्रेत आलेले सिनेमाचे तंबू(थ्याठर).(आजच्या काळात नायक नायिका विविध शो ला जाऊन आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करतात त्याकाळी ते त्यांना करावे लागत नसे कारण)."धडाम ढिशुंम चा खेळ.धडाम ढिशुंम चा खेळ."असे जोरजोरात ओरडणारे किंवा "अलका कुबल ची माहेरची साडी" असे ओरडणारे थ्याठरवाले  विशेष लक्ष वेधून घेत असत.अलका कुबल चा पिच्चर लागलेल्या अशा थिएटर मधून स्त्रीवर्ग तर नेहमी रडतच बाहेर आलेला असायचा.असा एकतर पिच्चर बघितल्याशिवाय गावाकडच्या कोणाचीही जत्रा संपत नसे.
त्याच्या बाजूलाच पायाने जोर देऊन फिरवणारे पाळणे वाले असत.
लहान मुलांसाठी खेळण्याची दुकाने,शेतीची सामान,भांडीकुंडी यांच्या वेगळ्याच रांगा असत.
घरी जात जात  भजी आणि जिलेबी वर ताव दिल्याशिवाय जत्रेची सांगता मात्र होत नसे..

खरंच गावातील 'जत्रा' व शहरातील 'यात्रा' व महानगरातील 'फन फेअर' यामध्ये खूप खूप अंतर आहे..

अंजली आमकर,रत्नागिरी:
"माझ्या गावातील जत्रा" हा विषय शाळेत निबंध व चित्रकले साठी आला होता. या  विषयाचे नाव वाचल्यावर मला त्याच शाळेतल्या आठवणी डोळ्यासमोर आल्या. शाळेत जेव्हा हा विषय दिला तेव्हा मी आश्चर्यचकित झालेली कि आता "जत्रा" म्हणजे नेमके काय?  जन्मापासून मुंबई ला राहिलेली गावी कधी गणपतीचे सात दिवस सोडून माझे जाणे होयचे नाही. मुंबई ची इतकी सवय होती कि गावी राहणे कधी आवडलंच नाही. म्हणून गाव म्हणजे काय ? हे देखील मला फारसे आवडत नव्हते. माहिती करून घ्यायचेही नव्हते.  शाळेत विषय आला म्हणून मैत्रिणी आई बाबा सर्वाना प्रश्न प्रश्न प्रश्न विचारून हैराण करायला सुरु केले. जत्रा म्हणजे काय ? तिकडे काय काय असत? कधी असते ? सगळी कडे असते का ? आपल्या गावी आहे का? आपल्या गावी कधी असते ?मला आज पर्यंत दाखवले का नाही ? जत्रेत करतात काय ?

त्यावेळी मोबाइलला व इंटरनेट जास्त वापरात नव्हते म्हणून हेच आजूबाजूचे "आपली माणसं" माझ्यासाठी "माझा  गुगल " होती. शेवटी काही पुस्तकातील फोटो दाखवून मला थोडी फार जत्रा समजली. जत्रा म्हणजे ठराविक देवाचा देवीचा उत्सव, खूप लोक गर्दी, खाऊ  व खेळणीची दुकाने. या माहितीच्या आधारे माझे निबंध व चित्र पूर्ण झाली होती. मला आपल्या गावाकडची जत्रा बघायची आहे असा हट्ट मी लहानपणी खूप वेळा केला असेन. पण आपल्या गावाकडे जत्रा होत नाही हे उत्तर मिळाल्याने जत्रा बघणे काही भाग्यात दिसले नाही.  कोकणातील एका खेडेगाव माझे गाव या गावाला जत्रेचा इतिहास नाहीच. इकडे गणेशोत्सव व शिमगोत्सव खूप दिमाखात साजरे केले जातात. यातील "शिमगोत्सव" वेळी साधारण शाळेत लिहायची तसे जत्रेचे स्वरूप दिसून येते. पण शिमगोत्सवाला जत्रा म्हणता येणार नाही. मध्यंतरी   " गाव तिथं जत्रा " नावाचा कार्यक्रम पाहायची त्यातून खरं समजू लागले कि जत्रा म्हणजे काय.. तर गावातील देव देवीचा वर्षातून एकदा मोठा उत्सव साजरा केला जातो... त्या निमित्ताने सर्व गावकरी मंडळी एकत्र येतात... एकत्र भेट होते.. थट्टा मस्करी, गप्पा गोष्टी होतात तर कधी भांडण होतात तर कधी भांडण मिटतात... . मनोरंजन होते... भजन कीर्तन, लावणी, दिंडी, पोवाडे अश्या अनेक कलेचे सादरीकरण होते... गमतीदार खेळ खेळले जातात... शर्यती पाहायला मिळतात..  काही जत्रा मधून धार्मिक कारणां बरोबरच आर्थिक व व्यावहारीक उलाढालींसाठी सोयीचे केंद्र हि जत्रा असते. जत्रेला श्रद्धा अंधश्रद्दे ची जोड असते. कधी देवाच्या नावाने बाजारीकरण तर कधी राजकारण तर कधी समाजकारण चे हि रंग या जत्रेतून दिसून येतात.

अशी हि जत्रा विविध रंगानी नटलेली.... प्रत्यक्ष पाहण्याचा योग अजूनही नाहीच.

अजूनही जत्रा मी झी २४ तासाच्या बातम्या मधूनच बघते.  

संगीता देशमुख वसमत,हिंगोली:
       फक्त जत्रा जरी म्हटलं तरी आठवतो तो गावाकडचा उत्सव! प्रत्येक गावात एखादे तरी देवाचे  मंदिर हे असणारच. तीच ती ग्रामदेवता,जिच्या निमित्ताने गावात हा जत्रेचा उत्सव साजरा होतो. वेगळा देव नसला तरी हक्काचे हनुमानमंदिर तर प्रत्येक गावात असतो. खरेतर प्रत्येक गावच्या  ग्रामदेवतेचा खरा आणि हक्काचा मान कोणाचा असेल तर तो आहे,हनुमानाचा! मग वेगळी देवता नसेल तरी हनुमानाच्या नावाने गावची जत्रा भरत असते आणि फार पूर्वापारपासून अखंड चालत ही परंपरा! पूर्वीच्या काळी करमणुकीची कुठलीही साधने नसल्याने जत्रेला फार अनन्यसाधारण महत्व होते,किंबहुना वर्षातून एकदा भरणारी गावची जत्रा ही आबालवृध्दांचे खास आकर्षण असायचे. वर्षभरातील कष्टाचा, शेताचा,संसाराचा ताण या जत्रेतूनच कमी व्हायचा. सासूरवाशीणीला माहेरासाठी येण्याचे अनेक कारणापैकी एक कारण असायचे. गावची जत्रा म्हटलं की,गावच्या सगळ्याच लेकीबाळी माहेरी यायच्या. मैत्रीणीजवळ एकमेकींच्या  सासरची सुखदुखे वाटून घ्यायच्या. मनातला साचलेला सल यानिमित्ताने बाहेर पडून जत्रेसारखेच मनात सुखाचं एक नवं गाव वसायचं. पण आता मनोरंजनाच्या साधनांची रेलचेल इतकी वाढली की,जत्रेसारखे उत्सव आता गावची परंपरा म्हणून नाममात्र साजरे व्हायला लागलेत.
          आमच्या बालपणीच्या जत्रेची बात काही औरच होती. माझ्या माहेराच्या आसपास जी छोटीमोठी खेडे,गावं आहेत,त्या प्रत्येक ठिकाणी अजूनही दरवर्षी जत्रा पहिल्याप्रमाणेच भरते. त्यात अंबोड्याची गजाननबाबाची,वाकोडीला महादेवाची,पुसदजवळ दणकेश्वरची आणि खुद्द माहेरात नवचंडी देवीची अशा अनेक जत्रा भरतात. या जत्रा म्हणजे एक स्वतंत्र गजबजलेलं गाव असायचं.
              आमच्या लहानपणीआम्ही जत्रेला जायचे म्हणून जेव्हा सरांना सुट्टी मागायचो तेव्हा सर म्हणायचे, जत्रेत कोण जाते माहीत आहे का? आम्ही प्रश्नार्थक चेहरा केला की,सर म्हणायचे,जत्रेत हौशे,गवसे आणि नवसे जातात. एक जत्रेत फिरायची ,नवीन नवीन काही पहायची हौस म्हणून,दुसरे जत्रेत काही गवसते का म्हणून आणि तिसरे म्हणजे देवाला तुझ्या पाया पडायला लेकराला घेऊन येतो म्हणूननवस करणारे असतात. यानुसार आम्ही पहिल्या वर्गातील म्हणजे हौशे म्हणून जत्रेला जाणाऱ्यापैकी असायचो.पूर्वी दूरदर्शनचे तेवढे स्तोम नसल्याने जत्रेतील सिनेमे पहाणं,हे आमच्यासाठी फार मोठे आकर्षण असायचे. नवनवीन  मराठी,हिंदी सिनेमे जत्रेतच पडद्याच्या मोकळ्या टॉकीजमध्ये पहायला मिळायचे. पडद्याच्या एका बाजूला पुरुषमंडळी,तर दुसऱ्या बाजूला महिलामंडळ असायचे.आज तंत्रज्ञानाच्या युगात त्या सिनेमांची आवर्जून आठवण होते. आज पी. व्ही. आर. मध्येही बसून त्या सिनेमांची आठवण विसरता येत नाही.

            जत्रेत आकाशपाळणा,चित्रविचित्र असणारे प्राणी, माणसं आणि वेगवेगळ्या नवनवीन वस्तू हेही जत्रेतील आकर्षणाची केंद्रे असतात.  जत्रेतील आकाशपाळणा म्हटलं की,अंगावर शहारा,थरार हे सगळे आलेच. जत्रा म्हटलं की, प्रत्येकाचे काही ना काही गमतीदार किस्से हे असतात. मी तिसरीचौथीत असेल. आई,काकू,बहीणभाऊ अशा घरच्या मंडळीसोबत मी अंबोड्याच्या जत्रेला गेले होते. गजाननबाबाच्या मंदिरात जायचे असल्याने घरची मंडळी प्रसादात गोड मुरमुरे घेत होती. मी जाणीवपूर्वक नाही पण एक बालवयातील चाळा म्हणून असेल,मी सहजच त्या ढिगातला  गोड खडू उचलला. पण तो उचलायची वेळ आणि त्या दुकानात पाठीमागच्या जागेत बसून जिलेबी तळणाऱ्या माणसाने ते पाहिले. आणि तो जोरात ओरडला,"ए पोरी,ते खाली टाक,खाली टाक!" तो गोड खडू हातातून कधी निसटला ते कळालेही नाही. बापरे! मला कळलेही नाही की,मी चोरी करत होते. आई,काकू,बहीण सगळ्याजणी मला या कृत्याबद्दल रागावत होत्या. पण "ती लहान आहे,तिला काय कळते,ती खडू उचलत नव्हती,ती फक्त खेळत होती" असं म्हणून माझी बाजू घेणारी तिथे एकमेव माझी आजी होती. मला अपमानही वाटला आणि माझ्या कृत्याबद्दल लाजही वाटली. पण तेव्हापासून माझ्या बहिणीत आणि माझ्यात भांडण झाली की,माझी बहीण मला "चोर,चोर...." म्हणून चिडवायची आणि "बाबांना सांगते" म्हणून सतत धमकवायची. आता कळत्या वयात वाटते,अनावधानाने का असेना पण चोरी तर माझ्या हातून झालीच होती. कदाचित तेव्हा ती चोरी पकडल्या गेली नसती तर अशा छोट्यामोठ्या चोऱ्या हातून झाल्याही असत्या. पण तेव्हापासून कोणत्याही जत्रेत घरच्यांची काहीही खरेदी सुरु असली की,आपली "हाताची घडी आणि तोंडावर बोट" ठेवायचे. या गावाकडच्या जत्रेने ही एक स्वयंशिस्तच लावली म्हणाना! सरांच्या म्हणण्यानुसार  जत्रेत 'हौशी' म्हणून गेले होते पण त्या कृत्यामुळे ठरले मात्र 'गवसे'!
जत्रेचे काही चांगलेवाईट असे अनेक प्रसंग आज या लेखाच्या निमित्ताने आठवतात आणि आठवतच रहातात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************