18 व्या वर्षानंतर माझं काय? अनाथाश्रमातील मुलांची कैफियत.

🌱 वि४🌿 व्हॉट्सअप ग्रुप
📄 आठवडा 22 वा 📝
31मार्च ते 06एप्रिल 2018
18 व्या वर्षानंतर माझं काय? अनाथाश्रमातील मुलांची कैफियत.

(या विषयावर विशाल सातपुते,पंढरपूर,संदीप भंडारे,अहमदनगर.सिमाली भाटकर,रत्नागिरी,जयंत जाधव,लातूर यांनी मांडलेले मत सविस्तर वाचा तसेच यातील सर्व प्रातिनिधिक छायाचित्रे इंटरनेट वरून घेतलेली आहेत)

विशाल सातपुते,पंढरपूर.
         अनाथ म्हणजे काय? तर "साधारणपणे ज्याला दोघेही पालक नाहीत,अशा मूलांना किंवा मूलींना अनाथ म्हणतात". परंतु आजच्या आधुनिक काळात अनाथाची व्याख्या बदलताना दिसत आहे. सर्वसाधारणपणे जी मूले आपल्या पालकांपासून दूर आहेत, त्यांना अनाथ म्हणता येईल.          उदाहरण: - मुंबई , पूणे यांसारख्या ठिकाणी काम करणारे बालकामगार आज अनाथ आहेत असे म्हणता येईल , कारण यातील अनेक मुलांच्या पालकांना ते असूनही त्या मुलाच्या भविष्याची चिंता नाही. मग त्यांना अनाथ म्हणणं, हे गैर ठरणार नाही.                                      आज असंख्य 18 वर्षानंतर अनाथाश्रमातून बाहेर पडणारी मूले भरकटत असलेली दिसतात. आज त्यांना आपलं वाटणारं/ करणारं समाजात कोणीही नाही. त्यांच्यापुढे त्यांना सतत जाणवणारा, त्यांच्या मनात खोलवर रूजलेला प्रश्न म्हणजे "या जगात माझे कोण" ?        
साधारणपणे 18 वर्षाचा  मुलगा किंवा मुलगी म्हणजे 12 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेला म्हणता येईल परंतु त्याच्या पूढील शिक्षणाचा प्रश्न आहेच. त्यानंतर त्याच्या पूढील शिक्षणाचा खर्च कोण करणार, त्यांच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण होतीलच  असेही नाही. त्यांना माझ्या माहितीप्रमाणे फक्त 12 वी नंतर पुढील शिक्षणात म्हटले तर D.ed. आणि ITI या दोन शिक्षण पद्धतीत फक्त 3% आरक्षण आहे. त्यातही त्यांच्या जोडीला अपंग आहेतच. मग जर त्यांच्या जोडीला अपंग स्पर्धक उभा असेल तर अनाथ कितीही गुणवंत असला तरी अपंगांचा अगोदर विचार होईल आणि नंतर अनाथांचा..                                       मग अशावेळी होणारा निर्णय हा त्यांच्यावर होणारा अन्यायच  आहे. अपंगाच्या कुटूंबात जर दुसरी व्यक्ती कमवता असेल तर खरी गरज ही अनाथांनाच प्राधान्य देण्याची आहे  ,असे मला वाटते.                           आज 18 वर्षानंतर अनाथाश्रमातून बाहेर पडणारी मूले कोठे जाणार?  काय करणार?  समजा ही मूले बसस्थानक,  रेल्वेस्टेशन याठिकाणी काही दिवस राहतील परंतु त्यांच्याबरोबरच बाहेर पडलेल्या मूलींच काय ? त्या राहू शकतील अशा  ठिकाणी  ? बरं समजा त्या अशा परिस्थितीतही राहील्या तर त्यांच्यावर होणारे अन्याय किंवा अत्याचाराच काय? त्याला कोण जबाबदार राहणार ? असे कितीतरी प्रश्न आज त्यांच्यासमोर आणि समाजासमोर आहेतच.   
             याहीपेक्षा त्यांच्या जीवनातील सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे त्यांच्या विवाहाचा प्रश्न. आज समाजात/ कुटूंबात राहात असलेल्या मूला-मूलींचे लग्नाचे विविध प्रकारचे प्रश्न आहेतच,  ही तर अनाथ मूले.  त्यांची जात,धर्म त्यांना माहीत नाही. मग त्यांच्याबरोबर संबंध जोडणार तरी कोण?  आज कुटूंबात राहात असलेल्या मूला-मूलींच्या कूंडली पञिका बनविल्या जातात . त्यांची जात , धर्म, भाषा यांचाही विचार होतोच. अशावेळी अनाथांची पञिका कोण बनवणार  ? त्यांचे अस्तित्व कोण मान्य करणार.                                                                 आज त्यांच्यापुढे जीवन जगत असताना अनेक सोई-सुविधांचा अभाव आहे. आज त्यांना त्यांच्या आवडीनुसार करिअर करण्याची संधी मिळत नाही. त्यांच्या अड-अडचणी समजून घेऊन त्यांना हव्या असलेल्या सोई-सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांच्या आवडीनुसार त्यांना शिक्षण क्षेत्रात करिअर करण्याची संधी देण्याची गरज सरकारची तसेच आपल्या सर्व समाज बांधवांची आहे .  तात्पर्य: -आज 18 वर्ष पूर्ण केल्यानंतर अनाथाश्रमातून बाहेर पडलेल्या मूला- मूलींचे योग्य प्रकारे पुनर्वसन करण्याची गरज सरकारची तसेच आपल्या सर्व समाज बांधवांची आहे.                                                         
संदीप भंडारे,श्रीगोंदा (अहमदनगर)
अनाथ हा शब्दात च सगळं काही आहे ... समाजात आपण पाहतो की ज्याला आई ,वडील, बहीण , भाऊ नाही असं कोणीही नाही जो त्याच्या हिताचा त्याचा भविष्याचा विचार करेल त्याला मार्गदर्शन करेल त्याची काळजी घेईल तो अनाथ अस मला वाटत कारण नाते वाईक हे फक्त संपत्ती साठी जवळ करतात हे मी माझा डोळ्यांनी पाहिलं आहे ऐकलं आहे आणि अनुभवलं आहे ...
जेव्हा हे कोणी नसत आणि मग त्या बाळाचं त्या मुलाचं / मुलीच काय होत आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की त्यांना नेऊन सोडलं जात आणलं जात अनाथ आश्रमात एखाद्या एनजीओ मध्ये ... लहान पणा पासून त्यांचं अस कोणीच नसत ते आपले बिचारे असतील तेथे राहतात मिळेल ते खातात आपल्या सारख चोखनाल नाही मिळत त्यांना हळू हळू ते मोठे होतात विचार करू लागतात की माझं  काय चुकलं मी काय केलं माझा वाट्याला हे सगळं का?
  त्यांचं काही नाही चुकत किंवा त्यांच्या आई वडील यांचं चुकत ...चुकत  ते त्यांच्या वाट्याला येणार खूप लहान वयात अनाथपणाच करण ज्या वयात आई बर राहायचं असत वडिलांन बर जगायचं असत त्या वयात यांना हे कठीण प्रसंगातून जावं लागलं ... आपलं अस कोणी नसत मग हे जवळ करतात आपला एकांत आणि नेहमी विचारात असतात त्यांच्या मनात चाललेला गोंधळात
   मग आपलं बाळ पन ते असाच पूर्ण करतात जर एनजीओ चांगली असेल तर त्यांच्या भविष्यात नक्की खूप छान काही होणार असत जर नसेल तर त्याना शिक्षण नाही ज्यांना खेळत आवड असते त्यांना खेळ खेळता येत नाही असं बरंच काही असत जे करायचं असत पण करता येत नाही ( काही एनजीओ मदे हेच चालत मी नामउल्लेख नाही करत ) पण काही एनजीओ काही अनाथ आश्रमात सगळं काही शिक्षण हे नक्की दिल जात ...
ते घेत असताना ते पूर्ण होई पर्यंत त्या अनाथ मुलांकडे काहीही नसत नाही नोकरी नाही दुसर काही काम ज्यातून ते दोन पैसे येतील अस काही नसतं मग त्यांनी करायचं काय कारण सगळ्या अनाथ आश्रमात आणि एनजीओ मदे हा एक नियम किव्वा त्यांचा नियम आहे जो ते पूर्ण पाळतात की 18 वय वर्ष पूर्ण झालं की ती संस्था त्यांना सोडणं बंधन कारक असत मग त्या मुलाने / मुलीने करायचं तरी काय समाजात आपले अस कोणी नाही जिथं राहता येईल . नोकरी नाही जवळ पैसे नाही मग काय करायचं

      कारण बरेचसे अशी मूल असतात की त्यांना कळायला लागत की इथं आपल्याला फक्त काही दिवस राहता येईल मग हे सोडून आपल्याला आपल्या पायावर्ती उभं राहावं लागेल काहीतरी करावं लागेल मग कुठं तरी ते आपल्या जीवनात वेगळं घडून आणण्याचा प्रयत्न करायला सुरुवात करतात आणि नेमकं तोच टीम त्यानां तेथून सोडून जावं लागतं
   18 व्या वय वर्षे नंतर त्यांना खरी गरज असते त्या संस्था ची त्या ठिकाणी राहून काही काळ थांबून स्वतःला सावरण्याची एक पक्का आधार निर्माण करण्याची जेणे करून भविष्यात त्यांना त्यांच जीवन नीट जगता येईल ...
  असे काही मुलं मी पहिले आहेत की चांगले शिकलेले आहेत अनाथ आहे पण कुठं चहा च्या टपरी वरती कुठं उसाच्या घुराला वरती कुठं हॉटेल मदे अरे मग या साठी त्यांनी शिक्षण घेतलं का जगले का त्याना जेव्हा आधाराची गरज असते तेव्हा आपण करतो का मग खर तो कोणी मुलगा मुलगी या संस्थान मदे राहून खरे त्यांचे अनाथ पण दूर झाले का त्यांना त्यांच्या अडचणीत आपण मदत केली का हे त्या संस्थानाणी नीट विचार करायला हवा ....
    सगळ्या गोष्टी या आधार दिला की नीट होतील अशी गोड गैरसमज हा या संस्थानी बाजूला ठेऊन त्यांचा विचार करायला हवा अस मला वाटतं.
    18 वय वर्ष नंतर काम करणारे एनजीओ खूप काही थोड्या प्रमाणात आहे (उदा.स्नेहालय) अशा बऱ्याच संस्था स्थापन होयला हव्या जेणे करून एक चांगला माणूस तरुण तरुणी घडून पुढे तीच त्याच आयुष्य सुंदर बनविल ....
      थोड्या फार प्रमाणात चुका असतील तर चूक समजून माफ करा मी माझं आणि त्या अनाथ मुलाचं मनोगत तुमच्या समोर मांडलं आहे ..... आभारी आहे  …


सिमाली भाटकर,रत्नागिरी.
अनाथ हा शब्दच मुळात माणसाच्या मनाला चटका लावून जातो. खर तर अनाथ याची व्याख्याच करणे कठीण आहे.आज अनाथ याविषयी माझी व्याख्या व व्यथा मी अनाथ म्हणून मत सांगणार आहे.
माझे आई बाप नाहीत म्हणून मी अनाथ असे जग समजते पण प्रत्यक्षात मात्र कधी स्वतःच्या पापाचे पितळ उघडे पडू नये म्हणून तर कधी मुलगी नको,कधी नाबालिकतेचा फायदा घेऊन आम्हांला लावारीस म्हणून टाकतात.पोटाची खळगी भरण्यासाठी किंवा स्वतःच्या कर्तुत्वावर काही तरी करुन दाखवयाचे म्हणून कष्टत राहणारे आम्ही ....सर्वच अनाथ.जगाच्या मते हिच आमची व्याख्या.
पण मला कधी ह्या जगाने कधी मायेने विचारलं का,बाळां तुला काय आवडते बरं?तुला शाळेत जायला आवडेल?तू इथून बाहेर पडल्यावर काय करणार आहेस? त्यात मी जर मुलगी असेल तर खूपच वाईट.कधी कोण माझा गैरफायदा घेईल सांगता येत नाही.असे बरेच वेळा घडले.मग पुन्हा मनात नैराश्य,हीनपणाची भावना निर्माण होते.का मी एक अनाथ?
शासन म्हणे आम्हाला पोटभर अन्न पुरवते पण ते आम्हाला पुरते काहो?आम्ही शाळेत शिकावे पण तितकी फिस नसते आमच्याकडे.आजच्या घडीला आमची संख्या पुष्कळ व आम्हांला मिळणारे अनुदान अतिशय नाममात्र जे कि चटणीला पुरत नाही.अनेकदा भाकर किंवा चपाती पाण्यात बुडवून खावी लागते आम्हाला. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या संस्थाना शासनाच्या नाममात्र अनुदानच्या धोरणामुळे खूपच त्रास सहन करावा लागतो.त्यामध्ये भर पडते पांढरपेशी भ्रष्ट अधिकारी व शासनाची 'सिस्टीम नावाची 'यंत्रणा,यांचा एवढा प्रचंड त्रास असतो कि एक वेळा हे अधिकारी वर्ग विसरतात आम्ही अनाथ याच यंत्रणाचा भाग आहोत.
मुलगी झाली म्हणून रस्त्यावर फेकून देणे कितपत योग्य आहे?एक स्त्री आहे म्हणूनच या जगात मुलगा वा मुलगी जन्म घेत असते मग हा भेदभाव कशाला ?स्वतःच्या शारीरिक सुखासाठी आजचे तरुण तरुणी कोणत्याही थराला जातात.त्यांच्या नविन विचारसरणीला माझा विरोध नाही.तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे.पण त्यातून जे मुले जन्माला येतात,त्यांना लाचारीचे जीवन जगण्यासाठी कचराकुंडी,रस्त्यावर फेकून देतात ह्या कृतीला जबाबदार कोण ?

कारण जन्माला आल्या पासून मृत्यू पर्यंत मनात सलत राहते हे लाचारीपणाचे जगणे.कुणी तरी आपले होते पण त्यांनीच आपल्याला रस्त्यावर टाकून दिले.मलाही वाटते शाळेत जावे,आहे त्या परिस्थितीत जगण्यासाठी मी धडपड करतो पण माझा हा अमानुषपणाचा भूतकाळ मला जगू देत नाही.मुळातच हा अमानुषपणा कधी संपणार? कोण मला देणार मदतीचा हात ?कोण माझ्यातील माणूसकीला जपणार किंवा जागवणार?
वरील असे अनेक प्रश्न लहानपणापासून आमच्या मनात आहेत पण कधी ओठांवर येत नाही.तरी १८ वर्ष पूर्ण होत आले कि इवलेसे पंखाना बळ देत  जगणे सावरु पहात  आहे.कधी संस्कार कमी पडतात तर कधी मार्गदर्शन.अनाथ म्हणून लहानपणापासून होणारी हीन भावना,अवहेलना इत्यादी मन एवढे पोलादी बनते कि फक्त माणूसकी पासून भीती वाटते.मुलगी म्हणून बाहेर पडताना कधी कोण तो घाणेरडा स्पर्श देऊन जाईल सांगता येत नाही.
आज या मंचावरुन तुम्हांला सर्वांना नम्र विनंती आहे कि तुम्ही जशी आम्हा अनाथांना जगण्यासाठी अनाथश्रम दिले ,थोडेसे बळ दिले,आणखी एक छोटासा उपकार तुमच्यातील जे शिकलेले आहेत त्यांना आमच्याकडे पाठवा,आमच्या भावना-विचार जाणून समजून घ्या म्हणजे एका नव्या  सृष्टीचा जन्म होईल जिथे कोणी अनाथ असणार नाही.आम्ही देखील तुमच्या सारखे मन मोकळे आहोत.आमच्या सोबत फक्त एक दिवस जगा व आम्हाला भविष्यात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करावे.
१.         स्पर्धा परीक्षा कशी द्यावी?...कदाचित आम्ही देखील चांगली अधिकारी होऊन अजून एखाद्याला पुढे आणेल.
२.          आम्हांला  काय आवडते ते जाणून घ्या.....मी देखील लता मंगेशकर ,सचिन तेंडुलकर बनू शकतो.
३.          विशेषतः अशी टिम बनवा जेणेकरुन आम्ही उज्जवल भवितव्य घडवू शकू,आम्हांला देखील ओढ लागेल जगण्याची परख्यांसोबत.
४.        छोट्या रोजगारांची माहिती द्या ज्यामुळे आम्हांला कष्टाची ओढ वाटेल.
५.       मुलगी असेल तर पाहण्याची दृष्टी माणूसकीची ठेवा,कामवासनेची नको.जगण्यासाठी थोडेसे बळ द्या म्हणजे मी पुन्हा अनाथ होणार नाही.
6.   जमलं तर एक पुस्तकं नक्कीच आणा हळूहलु आम्हांला ही लागेल वाचनाची आवड आणि होईल छोटंसं आमचंही ग्रंथालय
बोलण्या सारखे खूप आहे पण आता थांबते.नक्की वाचा व मदत करा.मग कदाचित मलाही जगण्यास बळ मिळेल व मी ही भरभरुन जगेल मनासारखे १८ वर्षानंतर देखील.धन्यवाद.

जयंत जाधव,लातूर.
“ मी एक अनाथ ”
या अमानुष  माणूसकीच्या जगामध्ये

काही कळ्या फुलतात कधीतरी झडून

पण खुलून येत नाही  मी एक अनाथ

या पाखरांना मिळत नाही आधार, की

त्यांचा विकास होईल परिपूर्ण

नाहीसा होईल काळोख म्हणून यांना मिळत नाहीत प्रकाशही..

त्यांना उकीरडयावरी फेकून दिलं जातं

पापी पोट अन् उसन्या मायेवर जगत

त्यातलंच नशिबी कुणी तरी

धडपडत रडत पडतं चिखलात

प्रेम मिळाल्यानं ते फुलू लागतं!

नवीन  एक रस्ता

अन् नवीन  एक उमेद

आणि मी एक अनाथ !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************