अव्यक्त प्रेम - भाग २ ( दुसरा )


अनिल गोडबोले,सोलापूर.

आता या विषयावर किती लिहायचे आणि काय लिहायचे हाच प्रश्न मला पडला..
आयुष्यात इतक्या वेळा प्रेम झालं आहे ना..! काही लक्षातच ठेवायच तरी अवघड आहे..
विशेष म्हणजे सर्व प्रेम अव्यक्तच राहिले हो..

मुळात प्रेम ही व्यक्त करायची गोष्ट असते हेच कळत नव्हतं. जेव्हा व्यक्त करावंसं वाटलं तेव्हा परिस्थिती किंवा वेळ दोन्ही साथ देत नव्हते..
तर काही किस्से किंवा अनुभव ..

मी शाळेत असताना एक बालवाडी मध्ये शिकवायला बालवाडी ताई यायच्या.. कोकणी पद्धतीने अबोलीच्या फुलांचा गजरा माळून.. त्या खूप छान वाटायच्या तेव्हा.. पण त्याना मात्र हे सांगायच राहून गेलं.

एकदा हायस्कुल मध्ये असताना नदीला पूर आला होता तेव्हा भातशेती पाण्यात गेली होती व रस्तायावरून पाणी चालले होते व खूप मोठा लाटेचा झोत आला तेव्हा एका गावातल्या माणसाने अगदी मला धरून उचलूनच रस्त्याच्या बाजूला नेले.. तेव्हा मीच इतका घाबरलेला होतो..पण त्याला काही बोलायचं झालंच नाही..

कॉलेज(11 वि आणि 12 वि मध्ये) एक मुलगी आवडत होती.. पण आपण काय सांगायची गरज पडली नाही.. पोरांमध्ये चिडवा चिडवी सुरू झाली आणि तिने बोलणं टाळलं.. तेपण व्यक्त करायचं राहून गेलं..

बीएस्सी करताना अजिबात काही घडल नाही कारण.. कॉलेज आणि अभ्यास यांच्यात जीव गेला. आणि सोलापुरात भीती पण वाटायची खूप.. उलट मुलींना अरे-तुरे सुद्धा करत नव्हतो..
मुलींना मी नोट्स देत होतो(म्हणजे मी किती हुशार आहे ते तुम्हाला कळलं असेल).. तर मुलींना परत मागता येत नव्हतं.. आता बिनधास्त बोलतात सगळे.. पण तेव्हा काय डोक्यात घेऊन होतो माहीत नाही.. पण बोलणं काही होत नव्हतं

एकदा बस ला पैसे कमी पडले एका बंजारा आजी ने माझं तिकीट काढलं.. त्यांना "धन्यवाद" व्यक्त करायच राहून गेलं.

बालकामगार शाळेत एका मुलाच्या घरी गेलो होतो.. त्यांनी परिस्थिती नसताना आम्हाला कँटीन वर चहा पाजला.. त्या मुलाला तर आम्ही शाळेत आणला पण डोळ्यात पाणी आणून माझ्या पोराला शिकवा म्हणणाऱ्या बापाला काहीच बोलू शकलो नाही..

मी हॉस्पिटलमध्ये काम करत असताना एक डॉक्टर होती.. तेलगू बोलायची.. माझं सोलापुरी हिंदी तिला कळत नसे.. आणि तीच तेलगू आणि हैद्राबाद हिंदी मला येत नसे.. पण तिची काम करण्याची पद्धत फार छान होती.. हे सांगायच राहून गेलं..काही चुकीच झालं की लगेच डॉक्टर ला ओरडत होतो आपण पण चांगल्या गोष्टी मात्र अव्यक्त राहतात.

एक पेशन्ट होती बऱ्याच आजारावर मात करून बाळाला जन्म देऊन मराठी बोलायला लागली.. मला मात्र एक कन्नड शब्द बोलायला जमलं।नाही.. तेव्हा या सगळ्याच कौतुक करायच राहून गेलं.

काही जवळचे न सांगताच कायमचे सोडून जातात.. आणि नंतर आपण त्यांना "असा होता.. आणि तसा होता" असे बोलत राहतो.. पण व्यक्त करत नाही..

खर सांगू का.. काही गोष्टी कितीही मनात आणल्या तरी व्यक्त करता येत नाहीत..
आणि आता बोलून काही उपयोग नाही..

अशा कितीतरी अव्यक्त गोष्टी व्यक्त करण्यात मजा नाही.. पण आता वाटत की"तेव्हा व्यक्त केल्या असत्या तर...!"

तर अशा सर्व व्यक्त आणि अव्यक्त प्रेमाना आता सांगू...


"खरच.. तुम्ही होतात म्हणून आज मी आहे.. अजून ही माझं तेवढंच प्रेम आहे तुमच्यावर..समजूत घ्याल अशी आशा आहे..!"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

बालाजी सानप,बीड.
         आमचा नववीचा पहिला दिवस असताना एका नवीन मुलीची वर्गात एन्ट्री झाली. आणि त्या मुलीने सरांना सांगितलं की  माझी मागच्या वर्षी सेमी इंग्लिश होत पण आता मला मराठी मेडिअममध्ये शिकायचं आहे. ही पहिली माझी आणि तिची भेट.
           शाळा जवळच्या व्यक्तीची असल्यामुळे शाळेमध्ये आमची गॅंग कोणालाच भीत नसायची. आणि आम्ही तर खूप मुलींना चिडवायचो. पण ती जर चुकून जरी समोर आली ना तरी चिडवायचे तर दूर पण मला काय बोलावे  नि काय नाही काहीच जमायचे नाही.
         सर्व मूल मला तिच्या नावानं चिडवत असल्याने तिला सुद्धा माहीत झालं होत की माझं तिच्यावर प्रेम आहे पण ती माझ्या पुढाकाराची वाट पाहत होती आणि मी तिच्या पुढाकाराची पण नंतर एकदा तिनेच पुढाकार घेतला आणि मला भेटायला आली, ती जशी माझ्या समोर येऊन उभा राहिली तसा मी 120च्या स्पीडणे गायब झालो.
           आजपर्यंत कोणत्याही मुलीला बोलायला, भांडायला, कारण असेल तर शिव्या द्यायलाही न घाबरणारा मूलगा त्या दिवशी कसा काय पळून जाऊ शकतो आणि फक्त एकाच मुलीला का भिऊ शकतो हे मला आणि माझ्या मित्रांना आजपर्यंत न सुटलेलं कोडं आहे.
           एकदा रक्षाबंधनाच्या वेळी सर्व मुली राख्या बांधायला आल्या आणि त्या मुलींनी अचानकच तिला माझ्यापुढे आणून उभा केलं मग माझी पण पंचायत आणि तिची पण मग मी समोर हात केला आणि बाजूला पाहू लागलो मग तिने राखी बांधली माझ्या मित्राला सांगितलं की माझी निळ्या रंगाची राखी आहे, आणि मी तिला 15 ते 20 डेरी मिल्क दिल्या मग मात्र माझं दिवसभर मन लागलं नाही, दुसऱ्या दिवशी हातातील 50 ते 60 राख्या कापताना मी निळी राखी सापडू लागलो आणि ती निळी राखी सगळ्यात शेवटी सापडली जेव्हा मी ती पहिली तेव्हा मी इतका खुश कधीच झालो नव्हतो जितका तेव्हा झालो कारण त्या राखीवर लिहिलेलं होत "HAPPY FRIENDSHIP DAY LOVELY FRIEND"  ते फ्रेंडशिप बँड माझ्याकडे आजही जशास तस आहे.
           तिला आयुष्यात जास्तीत जास्त 2 ते 3 वेळच बोललो असेल पण मदत मात्र खूप केली.ती बिचारी बोलायचं प्रयत्न करायची आणि मी मात्र न बोलता गायब होत असे.आमच्या बॅचच्या सर्व मूला मुलींना माहीत झालं होत. मी कोणत्या मुलीला काही बोललो की ति लगेच तिच्याकडे पहायच्या किंवा तीच नाव घ्यायच्या मग वाघाच्या रुबाबात बोलणारा बाल्या लगेच मांजर होऊन जायचा.
         शेवटी 10विचा सेंड ऑफ आला आणि तिच्याकडून मित्रांच्या अग्रहापोटी फक्त एक स्लॅमबुक लिहून घेऊ शकलो.तीच आमची शेवटची भेट. नंतर 10वीच्या परीक्षेनंतर आमच्या गल्लीमधील माझी बॅचमेट घरी अली आणि बोलली उद्या तीच लग्न आहे येणार का माझ्यासोबत जाऊ आपण.
        त्यादिवशी इतका त्रास झाला आणि मनाला निर्णय घेतला की आता बीड मध्ये नाही थांबायचं आणि मग पुढील शिक्षणासाठी मी बीड मध्ये न थांबता डायरेक्ट पंढरपूर गाठलं.
        नंतर जे बीड सोडलं ते आजपर्यंत...!!!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

पल्लवी वाघ,बुलढाणा.
             शेवटचं किंवा पहीलं प्रेम अशी कुठल्याही प्रकारची उपमा नाही देणार मी पण निखळ आहे माझ प्रेम. अव्यक्त असल तरी त्याच दु:ख नाही आणि सुखही नाही. त्याला गमावूनबसण्याचा पश्चाताप ही नाही आणि त्याला मिळवल्याचा आनंद ही नाही तर उत्साह आहे तो माझा आहे म्हणून खूप सार प्रेम करण्याचा.
माझा तो "तो "ना आहेसच असा पहिल्याच भेटीत प्रेमात पाडणारा आणि ह्या वाघिणीला प्रेमकवियत्री बनवणारा. मला असे वाटते यापूर्वी याला बर्‍याच वेळा बघितले होते पण त्यादिवशी तो माझ्या डोळ्यात जरा जास्तच भावला होता. कदाचित माझ्या स्वप्नातील राजकुमार तोच होता. त्या दिवशी जरा वेगळेच झाले लोक माझे होते,नेहमीप्रमाणे कौतुकही माझेच होते, जबाबदारीही माझीच वाढली होती, बोलायचे ही मलाच होते पण मी मात्र गप्प होते आणि तो मात्र बोलत होता जसे की मलाच सावरण्यासाठी तो आला होता आणि कौतुकाची थाप मात्र माझ्याच पाठीवर सुरू होती. तेव्हाच मात्र माझा चार्लि चाम्पलिन आल्याचा भास झाला.
नंतर आमच्या अवकाळी भेटी होत गेल्या त्यामुळे काही गोष्टी अचानक घडत गेल्या मी त्याच्या प्रेमात राधेसारखी कधी वेडी झाले हे मलाही कळले नाही. कवितेतुन व्यक्त होत गेले कविता मात्र पोचली त्यापर्यंत पण माझ्या भावना अजून त्याच्या मनापर्यंत पोहचल्या नाहीत.आम्ही फारसे अनोळखी नाही पण एकमेकांचे घट्ट मित्रही नाही. दोघेही छान ओळखतो एकमेकांना पण फार बोलतही नाही. तसा रस्ता दोघांचाही एक आहे पण ठरवून कधी नाही तर चुकूनच होतात आमच्या गाठीभेटी. विषय खूप असतात त्याच्याजवळ बोलयला पण मी कधीच त्याला हाय..! करत नाही. मी तर करते त्याच्यावर जीवापाड प्रेम पण व्यक्त व्हायला मला कधीच जमले नाही आणि ते कदाचित जमणार ही नाही. पण माझं प्रेम अव्यक्त असल्याची मला आजपर्यंत खंतही नाही आणि कदाचित राहणार ही नाही. जसा तो माझा आहे तसाच सगळ्यांचा आहे. स्रियांचा आदर आणि त्यांच्याविषयी काळजी हाच त्याच्या जीवनाचा खरा उद्देश आहे त्यामुळेच तो माझा खरा कोहिनूर आहे. फक्त खंत नाही पण मी त्याला पाहीजे हा माझा हट्टहास आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

R. सागर, सांगली.
           'ती पाहताच बाला, कलिजा खलास झाला..'
होय तीच.. जिच्यासोबत 3 वर्षे एकाच शाळेत एकत्र शिकत होतो तिला तब्बल 8 वर्षांनी पाहत होतो. ती समोर आली आणि क्षणात नजर भूतकाळात गेली. चौथी पास झालेलो आणि जिल्हा परिषदेची शाळा सोडून हायस्कुलला प्रवेश घेतलेला. तिचंही तेच. तिथंच तीही दिसली. ती आली.. तिनं पाहिलं.. अन मीही पाहातच राहिलो.. थोडीशी खोडकर पण तरीही निरागस. वर्गात कधी टॉपर नव्हती पण सगळ्यांपेक्षा शंका तिलाच जास्त असायच्या. कधी एकमेकांशी बोलायचा प्रसंग नाही आला पण ती समोर असली की भारी वाटायचं. आम्ही ज्या शाळेत शिकायचो तिथे 10वी पर्यंतची शिक्षणाची सोय होती. पण काय झालं काय माहीत. सातवी पास झालो अन तिने 8वीला दुसरीकडेच कुठेतरी प्रवेश घेतला. त्यानंतर त्या दिवशी पहिल्यांदाच तिला पाहात होतो. तोच चेहरा, तीच नजर..
.
शाळेत असताना एकत्र शिकलेलो त्यामुळं आधी कधी बोलणं झालेलं नसलं तरी एकमेकांची ओळख होतीच. त्यात इतक्या वर्षांनी अन इतक्या अनपेक्षितपणे एकमेकांसमोर आलेलो त्यामुळे एकमेकांना टाळून बाजूला जायची किंवा ओळख न दाखवायची शक्यता नव्हतीच. योगायोगाने ही भेट देखील शिक्षणाच्या निमित्तानेच झालेली. यावेळी एका वर्गात शिकणार नव्हतो पण एकाच ठिकाणी शिकायचं होतं.
.
नंतरच्या 2 वर्षात वरचेवर भेट होत राहिली. कधी सहज भेट व्हायची तर कधी मैत्रीच्या नात्यानं ठरवून भेटायचो. कधी कॉलेजमधल्या तर कधी घरच्या गोष्टींची चर्चा व्हायची. थट्टा-मस्करी, राग, रुसवा, कधी तिचा हट्टीपणा हे प्रत्येक भेटीत ठरलेलं असायचं. तिच्या मनात काय होतं माहीत नाही पण इकडे माझ्या डोक्यात टिकटिक वाजायला लागलेली.
.
त्यानंतर 3-4 वर्षे एकमेकांच्या संपर्कात होतो. पण माझ्या डोक्यातली टिकटिक अन काळजातली धडधड तिला कधी समजलीच नाही आणि मीही कधी ही गोष्ट तिला बोललो नाही. शेवटी एक दिवस तिचाच कॉल आला. लग्नाचं आमंत्रण द्यायला. तिचं लग्न झालं. ती संसाराला लागली. त्यानंतर दोघांकडूनही एकमेकांचा संपर्क कमी होत गेला. पण तरीही कधी तिची आठवण आलीच तर स्वतःचं प्रेम व्यक्त न केल्याची खंत वाटते...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

अनिकेत कांबळे,कोल्हापूर.

अव्यक्त प्रेम हे असंच असत,तिथे बोलायची हिम्मत नसते, एकतर्फी प्रेम खरं तर मला शोकांतिका वाटायची पण तो एकतर त्याग असतो नाहीतर अपेक्षा, तीन माझ्याशी बोलावं अशी अपेक्षा धरून असलेला मी मात्र अजूनही तसाच अव्यक्त आहे,याच कारण मात्र अजून उमगलं नाही,
        MA 1st मध्ये असताना सगळं नवीन होत,विद्यापीठात मी ही नवखा होतो,खूप स्वप्न घेऊन आलो होतो इथं पण सगळी स्वप्न पूर्ण करण्याच्या नादात मी एकटा असणं खूप महत्त्वाचं वाटत होतं,पण ही आयुष्याची शोकांतिका मला दूर करायची होती,तिला वर्गात पहिल्यादा पाहिली तेंव्हा अस काही वाटलं नाही कारण आजकाल स्वार्थी प्रेम मिळतं अस म्हणतात, तेवढ्यात माझी दुसरी एक मैत्रीण म्हंटली की आमच्या लेडीज हॉस्टेल मध्ये भांडण झाली तर समजून घेणारी ती एकमेव आहे,बस्स !!!झालं तिच्याकड असणारा समजूतदारपणा खूप भावला.माझ्या मोबाईल ची अर्धी मेमरी तिच्या फोटोनी गच्च भरली, त्यासाठी मी माझे फोटो डिलिट मारले..
           पण आपण अस बिनधास्त आणि ती मात्र माझ्याकडे न बघणं सुद्धा, त्यात दुसरं वर्ष चालू झाल सुद्धा पण करावं काय ,घराची ओढ लागली की जळजळीत वास्तव समोर येत आणि ही विद्यापीठाची स्वप्नाळू दुनिया विसरायला भाग पडत...कदाचित ती मला माझ्या प्रेमाला समजून घेईल की नाही या प्रश्नात मी खूप गुरफटून जातोय, मीच अव्यक्त होतोय, प्रेम तर खूप आहे पण वास्तव पाठ सोडत नाही, अगोदर वास्तवाशी झुंज देतो मग प्रेम नक्की मिळेल अशी आशा ठेऊन दररोज चा दिवस तिला ,तिच्या गालावरच्या खळी ला पाहून दिवस घालवायचा, हेच माझं अव्यक्त प्रेम.....
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संदिप बोऱ्हाडे( वडगाव मावळ, पुणे)

   माझी प्रेमाची परिभाषा थोडी वेगळी असल्याने अव्यक्त तरी कसे करायचे समजत नाही...आजकाल प्रेम म्हणजे फक्त फक्त स्त्री आणि पुरुषांचेच असते का..?? कदाचित माझे हे प्रेम या विषयात बसते का नाही माहिती नाही पण तरीही प्रयत्न..

   शालेय जीवनात जसे जसे वर्ग पुढे आपण जातो प्रथमिक शाळा, माध्यमिक, नंतर junior college , sinior college डिप्लोमा नंतर अजून खूप आहे..आणि या काळात या वयात नकळत अपल्याला कोण न कोण आवडत असतच...मग त्याला काय आपण लगेच प्रेम म्हणायचे का..?? माझ्यामते ते तर आकर्षणाच.. पण प्रेम हा शब्द खूप मोठा आहे.

     अस म्हणतात जग जिंकता येते प्रेमाने. पण फक्त ते प्रेम निस्वार्थ असायला पाहिजे..
जे रंग, रुप, जात, धर्म, श्रीमंती , गरिबी पाहून केले जात नाही त्याला ‘प्रेम’ म्हणतात.

    जगात सर्वात श्रेष्ठ प्रेम हे आईच सर्वांना माहिती असेलच पोटच्या लहान बाळाच्या प्रेमापोटी हिरकणी बुरुज उतरून गेली होती...
प्रेम करांव भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं..
प्रेम करावे बाबा आमटे यांच्यासारखं कुष्ठरोग्यांसारखे..
प्रेम कराव संत गाडगेबाबा यांच्यासारखे गरीब, दीन, दुबळ्यांवरील केलेले प्रेम..
प्रेम कराव  साने गुरुजींसारखे विद्यार्थ्यांनवरील प्रेम..

     प्रेम म्हणजे प्रेम असतं..
वडिलधार्यांवरच प्रेम , वास्तूवरच प्रेम , झाडांवरच प्रेम , प्राण्यांवरच प्रेम , भाषेवरच प्रेम , गावावरच प्रेम , माणसांवरच प्रेम , आणि सगळ्यात महत्वाचे माझे सर्वात जास्त पुस्तकांवरील प्रेम. काही लोक मोबाईल वर देखील खूप प्रेम करत असतील बरका 😀
आणि हो प्रेमाला वय, वस्तू, विशिष्ट गोष्ट, किंवा कशाचीच गरज नसते...ते कोणावरही, कश्यावरही आणि कधीही होऊ शकते त्याला वेळ , काळ , मर्यादा कसलेही बंधन अजिबात नाही.

    आईच प्रेम, वडिलांचं प्रेम, भाऊ-बहिण यांच्या मधील प्रेम एवढच कशाला.... मित्र प्रेम, शेजारी प्रेम (शेजारीण प्रेम नव्हे) असे कितीतरी नाते संबंध आहेत जे प्रेमाच्या पायावर भक्कम उभे आहेत. या प्रेमाविषयी आपण किती बोलतो तर अगदी थोडच.

    प्रेम ही भावना किती सुंदर आहे. मातृप्रेम, देशप्रेम, बंधुप्रेम, पुत्रप्रेम अशा कितीतरी परी तिला लाभल्यात. परंतु प्रेम म्हटले की आम्हाला आधी प्रियकर आणि प्रेयसी यांच्यामधीलच दिसत...

     प्रेमाला वय , मर्यादा  आणि मृत्यू नसतो.
प्रेम करावे कोणीही कुणावरही, त्याला नसाव तारखेचे बंधन,
प्रेम करावे स्वतःवर , समाजावर , देशावर, सृष्टीवर , विचारांवर ,
प्रत्येकाने प्रेम करावे माणुसकीवर .

    त्यामुळे माझ्या या सगळ्या प्रेमावर मी ना व्यक्त होऊ शकतो नाही अव्यक्त.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

नवनीता (शैलेश भोकरे),आळंदी

दुखरी नस आहे हा विषय. माणूस मऊ होतो; चुकून कधी तिचं नाव आठवलं की, क्षणाचाही विलंब न करता तिच्या 'वैशिष्ट्यांचा' विचार सुरू होतो.
कशी होती, कशी बोलायची, कशी हसायची....

खूप काही येऊन जातं क्षणात समोर..
पण आता काय उपयोग? काळ निघून गेलाय..
तेव्हा जर हिम्मत केली असती तर आज परिस्थिती वेगळी असती. स्वप्नांना पंख लागले असते... नव्हे नव्हे तिचे स्वप्न आपले आणि आपले स्वप्नही तिचे झाले असते...

पण मुळात माणूस हिम्मत का करत नाही?
ती नाही म्हणेल आणि मैत्रही राहणार नाही म्हणून किंवा ती नाही म्हणून अपमान करेल म्हणून...

खरं तर आपल्यातल्या बहुतेकांना ह्यावर विश्वासाच नाही की, मुली हो म्हणतात. त्यांची आतून इच्छा असते आपण त्यांना प्रपोज करावं अशी.

(पण मला एक कळत नाही की, मुली असा कोणता करार फॉलो करतात ज्यात त्या आपल्याला विचारू शकत नाही?)

असो,
पण आपणच माती खातो...
आणि वेळ निघून जाते. रस्त्याने जाताना नजरानजर झाली की, मग सगळं सगळं डोळ्यासमोरून तरळून जातं...

बरचसं बोलूनही जे बोलायचं तेच राहून जातं...
अव्यक्त!.
----------//////////////////-----------------////////////------------

अव्यक्त प्रेम - भाग १ (पहिला)


महेश कामडी,नागपुर.
        प्रेम म्हणजे काय? , मला माहिती नाही,
पण प्रेमाचे पहिले पाऊल म्हणजे मैत्री हे तर जवळपास सर्वांनाच माहिती असणार.
माझी एक मैत्रीण आहे, जी माझ्यासोबत कधी बोलायची नाही. कधी माझ्याकडे बघायची किंवा नाही तेही माहिती नाही, कारण मी पण तिच्याकडे कधी बघायचं अस आठवत नाही.
माझ्या शेजारीच असायची (माझ्या बहिणीची जवळची मैत्रीण)
10 पर्यंत असच काही, नंतर clg
Clg पासून थोड फार बोलण हसन🙂 पण मनात मात्र काहीही नाही 2 वर्ष अशीच निघून गेली पण आता मात्र बोलण वगरे सुरू झाले होते. मैत्रीचं शिडी चढत होतो.
आता मात्र clg संपल होत, फक्त दिसायची तर घरी
तिची admission दुसऱ्या clg ला आणि मी दुसऱ्या येथूनच संपर्क तुटला😔
पण अचानक एक दिवस तिची मला फेसबुक वर फ्रेंड रिक्वेस्ट आली(मन में लड्डू फुटा🤩)
मग असच बोलण सुरू झाले. जवपास दीड - दोन महिने असेच निघाले fb वरती बोलण्यात, एक दिवस तिला मो. न. मागितला मनात भीती होती देणार की नाही किंवा का हवा कशाला हवा विचारेल पण असल काहाही न घडता reply मध्ये मो. न. होता😇🤗
मग सर्वांचे आवडते WhatsApp वरती बोलणे सुरू झाले.
पण अजूनही मनात प्रेम हा विषय आलेला नव्हता माझ्या तरी, तिचं तिलाच माहीत.
ती समोरच्या शिक्षणाकरिता दुसरीकडे गेलीच, आणि तिथेच थोड दूर जवळ मी पण राहतो, मग आता काय बोलणे भेटणे या सर्व गोष्टी सुरू झाल्यात कधी बोललो तर तासनतास फोन वर गप्पा मारत आणि याच सर्व गोष्टी घडतांनी मी कसा तिच्याकडे आकर्षित होत गेलो कळलेच नाही.
आज पण असच सुरू आहे.
तिच्या मनात काय आहे माहिती नाही.
आणि माझी कधी या बद्दल तिला बोलण्याची हिम्मत झाली नाही
हेच माझ अव्यक्त प्रेम(स्वानुभव)

*पुढे काय करायचं याबद्दल suggestion द्याल रविवारी*🙂
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

जगताप रामकिशन शारदा,बीड.

एक वर्षाच्या गँपनंतर काँलेज सुरु झाले होते आणि आमचे सर्व जुने मित्र सोडून वरच्या वर्गात गेल्याने आमच्या नशिबी ज्युनिअर सोबत बसण्याची वेळ आली होती अशी वेळ पहिल्यांदा आलेली होती.
नित्यनेमाने आम्ही आमचा शेवटचा बेंच ग्रहण केला. आख्ख्या वर्गावरून एक कटाक्ष टाकला आणि तो कटाक्ष एका पाठमोऱ्या आक्रुतीवर घुटळला पण जास्त वेळ नाही. पण ती आक्रुती नक्कीच इतरांपेक्षा जराशी वेगळी भासली.रानावनात ही कस्तुरीच्या गंधाने मन प्रसन्न व्हावे असा भास तिला पाहून झाला. मुली काय पहिल्यांदा पाहत नव्हतो पण मी तिला पहिल्यांदा पाहत होतो. अंधार्या कोठडीत एखाद्या प्रकाश किरणाने प्रवेश करून वातावरणात चैतन्य निर्माण करावे असेच काहीतरी तिच्यात होते.
क्षणा क्षणाला आख्या वर्गाला डोळ्याखाली घालणाऱ्यांच्या गर्दीतही ब्लँक बोर्डाला १८० डिग्री मध्ये घुरणाऱ्या त्या आक्रुती ने मात्र ह्रदयाचे पार पाणी पाणी केले होते.
मनाला वेड तर तेव्हा लागले जेव्हा ती बुधवारी चेक्स चा पोशाख परिधान करून आली.सर्वसामान्य पोशाखात पण ती एक असामान्य अशी भासत होती. तिची वाईट गोष्ट एवढीच की ती कधीच १८० डिग्री सोडून नजर फिरवत नसे .
कधी कधी अस वाटायचं की नवजात बाळ पाळण्यात टाकलेले आहे आणि ते निवांत पाळण्याच्या वर फिरणाऱ्या पंख्याकडे पाहत आहे. बाराही महिने तोंडावर एकच भाव निरागस. वागण्यात पण एवढी निरागसता की सोबत चालणाऱ्या मैत्रिणी चाच हात धरून चालणार. बोलतानाही तोंडाला हात लाऊन दुसरीच्या कानात बोलणार किती भाग्यवान ते कान ज्यांनी ते शब्द प्राशन केले आणि आम्ही तिचे शब्द ऐकायला आमचे कान सुपाएवढे केले तरी फक्त दोन तीन शब्दाच आमच्या कानावर आले.
माणसाच्या गर्दीत वावणारी ती एक खरोखरच स्पेशल व्यक्ती होती.सगळ कस अगदी निरागस आणि नाजूक होत . असा दिवस कधीच आठवत नाही कि तिच्या चेहऱ्यावर चे निरागस भाव बदलेले आहेत. तिचे ते सौम्य शब्द ऐकायला पण कान नेहमीच आतुरलेले राहायचे. कधी कधी हातांच्या बांधलेल्या मुठी पण तिच्या निरागसपणाची मुकि साक्ष द्यायच्या. हो तिच्या हातांच्या मुठीवरून आठवल तिच्या मनगटावर असणारा काळा धागा पाहून मी पण मनगटावर काळा धागा बांधलेला आहे तोच कधी कधी मला खूप बैचेन करुन सोडतो. तो चेहरा नक्कीच एक गुढ होता. तरी पण त्या  चेहर्याच्या असण्याने एक नविन उमेद मनाला लाभायची.कंटाळवाणा तास पण कधी बोर व्हायचा नाही. चेहऱ्यावर चे भाव पहायला मिळावे म्हणूनच बेंच मिळवण्याची धरपड व्हायची. ती वर्गात उशिरा किंवा आलीच नाही तर जीवाची घालमेल व्हायची. काही असो पण तो निरागस चेहरा  हा खूप प्रेरणादायी होता.
तिच्या त्या नाजूक हालचाली पण एवढ्या परिपूर्ण असत ना फक्त perfect अन् perfect.
कोणत्याही गोष्टी चा दिखावा नाही कोणत्याही गोष्टीचा खेद नाही I'm a Barbie girl in my Barbie world असच तिच सुत्र असाव कदाचित. डोळ्यांची ती नकळतपणे होणारी उघडझाप, निरागसपणे ओठावर तरळणारे शब्द, ती एकटक बोर्डाकडे रोखलेली नजर, काहीहि अति नाही पण चोपून चापुन बांधलेले केस आणि कानात असणाऱ्या त्या सोनेरी लहान लहान रिंग खरोखरच तिच्या सौंदर्यात भर घालत असत.
वर्षामागुन वर्षे लोटली पण आजही तो निरागस चेहरा तेवढ्याच निरागसपणे डोळ्यासमोर येतो आणि मनाला चटका लावून जातो. सध्याच्या काळात बेगडी निरागस चेहऱ्यावर पण तो चेहरा खूप भारी आहे. शेवटी originalतेच original असत. अपेक्षा आहे की नशिबाच्या दयेने जर तो चेहरा पुन्हा एकदा समोर आला तर तोच निरागस आणि लोभस असावा.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

प्रा. रोहन बाळकृष्ण वर्तक,लोणावळा, मावळ, पुणे

ती तशी खूपच जवळची पण आणि हक्काची देखील, तिच्यामुळे संपूर्ण व्यक्तित्व घडल आणि एक सदृढ मानव म्हणून मी ह्या समाजात खंबीर उभा राहत गेलो. मला आठवतंय माझं शिक्षण व्हावं म्हणून तिने केलेला संघर्ष, विनाखंड केलेले अथक परिश्रम, रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र हे तिनेच केलं होतं केवळ माझ्या आणि माझ्या भविष्यासाठी आणि माझ्या सर्वांगीण प्रगती साठी. तिने माझ्या साठी गमावलेले त्याच्या आयुष्यातील मोलाचे क्षण, वेळेला दाखविलेली खंबीरता, आणि बंडखोरीही आणि बरच काही... होय आज पर्यंत तिने माझ्या साठी खूप केलंय पण कदाचित मी तीच प्रेम समजू शकलो नाही. आणि माझं तिच्या वर मनापासून प्रेम आहे हे देखील कधीच सांगू शकलो नाही.......

मी एकत्र कुटुंबात वाढलेलो, आजीच्या अधिपत्या खाली माझे वडील मिळून एकूण सात मुलांचा संसार थाटात बहरताना मी बघत होतो आणि घडत होतो. आर्थिक प्रश्न तसे मोठे होतेच पण त्याची झळ कधीही आम्हाला लागू दिली नाही. घरातील बावीस जणांचा स्वयंपाक, कपडे धुणे, भांडी घासणे या रोजच्या कामाला अत्यंत शीघ्रगतीने आटोपशीर पणे मार्गस्थ करताना मी रोज तुला पाहायचो, एखादं काम माझं नाही किंवा इतर कोणाचं तरी आहे हा विचार तुझ्या मनात कधीच आला नाही, समोर येईल ते सर्व काम पूर्ण करण्याची तुझी नेहमीच लगबग असायची. हे सर्व आवरून घरातील वाढत जाणाऱ्या गरजांना पूर्ण करण्यासाठी फावल्या वेळेत ब्लाउज, परकर, शिवण्या पासून साडीला बीडिंग आणि फॉल करण्यात तू स्वतःला गुंतवून घेतलं होतंस. अण्णांना(वडिलांना) रसाच्या गुऱ्हाळात ऊस तोडण्यास मदत करण्या साठी देखील तू कधी मागे पुढे पाहिलं नाहीस. ह्याच चोवीस तासात इतर सर्व आराम करत असताना माझा आणि ताईचा नियमित अभ्यास देखील घ्यायचीस.

आजपर्यत तू तुझें माहेर असो किंवा सासर सर्वांसाठी अथक परिश्रम घेतलेस,  आणि माणसं बांधलीस. तू नेहमी अन्यायाविरुद्ध आणि  आळशी प्रवृत्ती विरुद्ध प्रखर पणे बोललिस आणि खंबीरपणे उभी राहिलीस. आण्णा गेल्यावर स्वतःचे दुःख बाजूला सारत  ताईच्या संसाराची गाडी खंबीरपणे मार्गावर आणलीस.

तू कधीही आमची उगाचच प्रशंसा केली नाही. घरात सर्व असतानाही वीज, अन्न आणि पाण्याची बचत कशी करावी याची शिकवण स्वतःच्या वागणुकीतून नेहमीच देतेस. ह्याबाबतीत तुझे तीक्ष्ण शब्द कदाचित अनेकांना नकोशे वाटतात परंतु एखाद्या शिकलेल्या सुशिक्षित माणसाला लाज वाटेल अशीच तुझी समज आहे आणि तुझी विचार धारा आहे. 

तू आमच्या गरजा पुरविल्या पण इतर अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आमच्यात(ताई आणि मी) स्वयंस्फूर्ती आणि मेहनत करण्याची मानसिकता निर्माण केलीस. तुला समजून घेण्यासाठी मला माझ्या आयुष्याची 35 वर्षे द्यावी लागली आणि खरच आज जाणिव झाली मी मनापासून तुझ्यावर प्रेम करतोय......आई.

आज पर्यंत तुला मी नाही समजून घेतलं पण ह्यापुढे तुझा सन्मान राखण हे माझं आद्य कर्तव्य आहे. तू माझ्यावर केलेली अतोनात कृपारूपी प्रेम माझ्या हृदयात कायम तेवत राहील.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

अपेक्षा मानाजी,मुंबई.
      जानेवारी महिना होता, सकाळी बोचऱ्या थंडीत कुडकुडतच आम्ही धामणवाडीच्या डोंगरावर उभे होतो.ताडवाडी आणि धामणवाडीचे डोंगर सख्खा मित्रांप्रमाणे एकमेकांच्या शेजारी स्थित होते,त्यांना जोडणारा निमुळता घटवळणाचा रस्ता जणू ते एकमेकांचा हात धरून उभे आहेत असे भासवत होता.सर्वजण डोळे बारीक करून 'त्या' दोघांची वाट पहात ताडवाडीच्या डोंगराकडे पहात होते.तितक्यात समोरच्या डोंगरावरून 'ते' दोघे येताना दिसले.आदल्यादिवशीच मैत्रीणीने त्यांच्याबद्दल तोंडभरून सांगितलं होत,त्यांची तिथल्या आदिवासी लोकांसाठीच काम, त्या लोकांप्रती समर्पण... बरंच काही. 'त्या' दोघांना येताना पाहून मैत्रीण कानात कुजबुजली "हेच ते दोन दादा". दोघांनी येताच  आमच्याशी संवाद साधला सर्व्हे कसा करायचा ह्याबद्दल माहिती दिली.त्या दोघांमधला ' तो' दिसायला साधारण,गव्हाळ,डोळे छोटे आत गेलेले,पण पाणीदार व बोलके, जाड भुवया,किंचित वाढलेली दाढी, सरळ तीक्ष्ण नाक,कमी उंचीचा व किरकोळ शरीरयष्टीचा.चेहरा जेवढा नाजूक आवाज तितकाच कणखर व स्पष्ट,चेहरा व आवाजात केवढा विरोधाभास! समोरच्याच लक्ष आपल्यावर खिळवत ठेवण्याची विलक्षण ताकद त्याच्यात होती.माझ्या मेंदूला पटतं नसलं तरी पहिल्या भेटीतच माझ्या मनाच्या कोपर्‍यात त्याने अलगद प्रवेश केला.
त्यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे सर्व्हे साठी आम्ही वेगवेगळया घरांत पांगलो,काम सुरू झालं 'तो' मात्र दिसेना.माझ्या बुद्धीचे आणि मनाशी चाललेलं द्वंद्व काही थांबेना.त्याला पाहण्याची अनामिक हुरहूर मनात होती आणि 'तो' दिसला.शंका विचारायच्या निमित्ताने मी धावतच त्याच्याकडे गेले,सोबत मैत्रीणही होती( विनाकारण). ती त्याला दादा म्हणायची म्हणून मलाही म्हणावं लागलं नाईलाजानं.दिवसाअंती आम्ही कॅम्प मध्ये परतलो, ते दोघे तिथंच राहायचे त्या लोकांसोबत.
नंतरच्या दिवसात त्याने वेगवेगळया विषयांवर आमच्याशी संवाद साधला,पाड्यांमध्ये काम व श्रमदान झाल.रोज दिवसाच्या सुरुवातीला त्याला पहायची ओढ असायची त्याहीपेक्षा महत्त्वाचं त्याला ऐकायची,तो एक उत्तम वक्ता होता. माझं मन स्वतःच्या नकळत त्याच्याभोवती घुटमळायला लागलं होतं. कॅम्पच्या दिवसात त्याच्या दुसऱ्या मित्राशी खूप वेळा वेगवेगळया विषयांवर बोलणं झालं, परंतु त्याच्याशी बोलायची संधी मिळतच नव्हती. तसं त्याला मी कोणत्या मुलीसोबत फारसं बोलताना पाहिलं नाही त्यामुळे तसं धाडस झालं नाही.त्या दोघांसारख्या मुंबईतल्या,शहरातील सुखसोयींसह वाढलेल्या मुलांनी त्या सर्व झगमगाटापासून दूर, अनभिज्ञ अशा पाड्यात येऊन काम करणं,तिथल्या लोकांनी त्या दोघांना आपलं समजून जीव लावणं हे सगळंच 'त्या'च्या बद्दल माझ्या मनात प्रेमभावना निर्माण होण्यास कारणीभुत ठरतं होतं.कोवळ्या मनात पहिल्यांदाच प्रेम ह्या भावनेने माझ्या मनाला शिवल होतं.दिवस सरले परतायची वेळ आली ,मी परतले ते खूप साऱ्या व अव्यक्त प्रेम घेऊन,त्याला पुन्हा भेटायच्या निर्धाराने.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

प्राची सोनवणे,अहमदनगर.

खरं तर तो माझं पहिलं प्रेम वगैरे नाहीये.. ते फिल्मी दुनियेत असतं तसलं पहली 'नजर वाला प्यार' पण नाहीये.. आणि आमचं खूप सूत जुळतं असंही काही नाहीये.. तो खूप शांत आणि मी प्रचंड बडबडी.. तो कधीच चिडत नाही अन माझ्या तर नाकावर राग बसलेला.. तो अपमानचं उत्तरही शांत राहून देतो तर मी जशास तशी वागणारी.. वेळ पडल्यास कोणाचीही वाट लावणारी.. पण काहीही झालं तरी त्यालाच येऊन सांगणारी.. अगदी रागात काहीबाही बोलले तरी राग गेल्यावर रडून माफी मागणारी.. आणि कसं कुणास ठाऊक पण सगळं माहीत असूनही तो मला समजून घेत होता.. माझा हट्टीपणा, माझा राग सहन करत होता.. तो माझ्या आयुष्यात आल्यापासूनच मला प्रेम आणि रिलेशनशिप यातला फरक समजायला लागला होता.. आम्ही सोबत असताना फक्त मी बोलणार आणि तो ऐकून घेणार हे ठरलेलंच.. कधी कधी न बोलता खूप काही बोलून जाणारा तो.. माझं मन कधी त्याच्यात गुंतलं मला समजलंच नाही.. आणि हे जाणवल्यावर त्याला टाळायचाच प्रयत्न करत होते मी.. स्वतः ला त्याच्यापासून दूर ठेवायचा प्रयत्न करत होते.. वाईट वाटत होतं, रडायला पण येत होतं.. फक्त त्याच्यासमोर मी कित्ती स्ट्रॉंग आहे हे दाखवत होते.. तो मात्र काहीच लपवू शकत नव्हता.. खूपदा त्याने मला विचारण्याचा, माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला.. आणि मी मात्र त्याने माझ्याशी बोलू नये म्हणून भांडणच केलेलं..
मला कधीच त्याच्यावर असलेलं माझं प्रेम समजू द्यायचं नव्हतं.. पण मी त्याच्यासमोर हरले होते.. तो वेडा.. त्याला तर कळतंच नव्हतं की त्याला नेमकं काय झालंय..
म्हणजे ना.. त्याच्याशिवाय मी जगू शकणार नाही किंवा मरून जाईल असलं काही नव्हतं.. पण असा मित्र मला परत कधी मिळाला नसता आणि मला प्रेमापेक्षा मैत्री महत्त्वाची वाटत होती.. दुसरा कोणीही मुलगा माझा जीवनसाथी झाला असता पण मी स्वतः ला हरवून बसले असते.. कारण स्वतः चा शोध मला त्याच्यामुळे लागला होता आणि जगण्याचं कारण समजलं होतं..
पण अजूनही माझं त्याच्यावर किती प्रेम आहे हे मी त्याला सांगू शकले नाहीये.. आणि कदाचित सांगूही शकणार नाही.. भविष्यात आम्ही सोबत असू किंवा नसू.. पण त्याच्यानंतर कधी कुठं मन गुंतणार नाहीये हे ही तितकंच खरं आहे..

ना जाहीर हुई हम से, ना बयां हुई उन से..
बस सुलझी हुई आंखों में उलझी रही मोहब्बत..
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

अंजली मालुसरे,नवी मुंबई.

तो होताच तसा.. कोणालाही आवडण्यासारखा...त्याची माझी ओळख शाळेतुन एकमेकांना धक्का  लागण्यापासुन झालेली.. तशी त्याची त्यावेळी GF होती, पण मी उगच त्या दोघांना एकञ बघुन विनाकारण अस्वस्थ व्हायची.. तस बघायला गेलो तर आम्ही दोघे मिञही नव्हतो आणि एकमेकांना अनोळखीही नव्हतो म्हणुन मग मीच ठरवलं की आपण आतातरी फक्त अभ्यासातच लक्ष द्यायचं. त्यामुळेे जेव्हा जेव्हा तो समोर यायचा तेव्हा तेव्हा माझा रस्ता आपोआप वेगळा व्हायचा. ह्यातच आमची दहावी झाली आणि आमचे रस्तेही कायमचे बदलले.
माझं आयुष्य त्यानंतर नवीन काॅलेजमधील अभ्यास, स्पर्धांमध्ये सहभाग घेणं, पथनाट्य करणं यामध्ये व्यस्त होत परंतु ह्याच आयुष्य माञ वेगळ्याच ठिकाणी भरकटत होत आणि याची मला पुसटशीही कल्पना नव्हती..
जवळजवळ तीन वर्षानंतर एकदिवस तो मला दिसला. खरतर त्यादिवशी मी माझ्या मैञिणींबरोबर चौपाटीवर गेली होती आणि हा एकटाच तिथे सिगरेट ओढत बसला होता.. जर त्याचे केस कूरळे नसते न तर मी त्याला ओळखलच नसतं की हा तोच आहे.. शाळेत असताना फिटनेसवर लक्ष देणारा मुलगा खरच हा आहे का असा प्रश्न तेव्हा पडला होता इतका बदललेला.. त्यावेळी मग मी त्याच्याशी बोलायच ठरवलं आणि त्याला आवाज दिला.. माझा आवाज ऐकुन त्याने माझ्याकडे बघितलं आणि कुठेतरी त्याच्या डोळ्यात मला ओळखीची छटा दिसली.. त्या दिवशी बोलता-बोलता मी त्याच्याकडून त्याचा फोन नंबर घेतला आणि निघुन गेली.. दोन दिवसांनी त्याला फोन केला, परंतु पहिल्यांदा फोनवर बोलत होतो म्हणुन काय बोलायच तेदेखील समजत नव्हतं.. तरी त्यादिवशी बोलता बोलता एवढंच समजल की दहावीनंतर त्याची जी Gf होती ती त्याला सोडुन गेली मग ह्याने तिला विसरण्यासाठी सिगरेटला जवळ केल होत. नंतर मग हळुहळु आम्ही फोनवर, मेसेजवर बोलायला लागलो. एकमेकांच्या समस्या आणि त्यावरचे उपायही सांगायला लागलो. पण हे सर्व करताना मला हे जाणवल की मी आधीची वाटणारी अस्वस्थता जी लपवली होती ती परत जाणवतेय आणि मी पुन्हा एकदा त्याच्या प्रेमात पडतेय.. त्याचा माञ आधीच्या अनुभवामुळे प्रेमावरचा पुर्ण विश्वास उडाला होता आणि मला माझा हा मिञ नि आमची मैञी दोन्हीही गमवायचं नव्हत.. म्हणुन पुन्हांदा मला वाटणार्या त्या भावना मनाच्या कोपर्यात कायमच्या बंद करून ठेवल्या..
आज आमच्या मैञीला चार वर्ष झाली.. अजुनही आम्ही मेसेजवर, फोनवर बोलुन एकमेकांचे प्रोब्लेम्स सोडवतो.. त्याने सिगरेट अजुनही पूर्ण सोडली नाही परंतु त्याच प्रमाण खुप कमी झालय. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माझ्यापेक्षा जास्त आता त्याची आणि माझ्या नवर्याची मैञी आहे.. हो.. माझं लग्न झालं आणी माझं पहिलं प्रेम कायमचच अव्यक्त राहिलं.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
 किरण पवार,औरंगाबाद.
     
         जवळपास नववी-दहावीत असताना पहिलं प्रेम झालेलं. क्रिकेटनंतर माझी दुसरी आवड होती ती, कविता लिहणं. त्या लिखाणातून माहित नाही का पण एका अशा मुलीला मी व्यक्त करायचो जी, साधारणत: साऊथ इंडियन भागात रहाते आहे. तिची परिस्थिती अत्यंत हलाखिची आहे. आणि माझ्याकडे ज्याप्रमाणे मी तिला स्वप्नात पत्र लिहतो, त्याचप्रमाणे मलाही ती लिहायची. माझ्या स्वप्नात अशा मुलीची कल्पना करायचो जीचं नाव गाव ठराविक मला ठाऊक नाही किंवा तीदेखील मला नीटशी पूर्ण ओळखत नाही. पण तरी आम्ही रोज रात्री स्वप्नात भेटायचो. तिचं मला पत्र दर चार दिवसाला आलेलं असायचं. त्यावर मी तिला तिच्या संकटांच निवारण करायचो. आणि पुन्हा ती तिच्या आयुष्यात योग्य दिशेने प्रवास करायची.
           कदाचित तुम्हाला हे फार काल्पनिक वाटेलं पण मला आतून वाटतं कुठेतरी ती या जगतात आहे. आणि तीचं माझ्या आयुष्यातं येणं; हेदेखील सत्य होईल. आजवर एवढी पत्र एकमेकांना लिहणारे आम्ही दोघे. ना कधी ती मला प्रेम करतेयं असं म्हणाली; ना मी कधी तिला तसं म्हणालो. विचार आहे प्रत्यक्षात भेटेल तेव्हा सर्व बोलायचं, जे आजवर पत्राद्वारे जमू शकलं नाही त्याची उकलं करायची. पण खरचं अव्यक्त तर आहेच त्यासोबत अंधुकसं आणि अदृश्य प्रेम आहे माझं. कुठेतरी आमची मन एक आहेत. पण अजून आमच्यातल्या एकमेकांना प्रत्यक्षातले आम्ही भेटलोच नाही आहोत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सरकारी रूग्णालय(ग्रामीण)

सरकारी रूग्णालय(ग्रामीण)
              
सिताराम पवार,
पंढरपूर.
          सरकारी रुग्णालयात सुरवातच होते"अहो या चैकाशी कक्षातील सर कुठे गेलेत, कोणी आह का नाही इथं"अशी चैकाशी करून होत.पुढं केस पेपर काढण्याची रांग अधिकारी आतूनच ओरडतात सुट्टे दहा रु ध्या. शुक्रवारी आणि मंगळवारी डोळ्याची तपासणी असते सगळी म्हातारी आजी आजोबा रांगेत असतात कधी पूर्वसूचना न देता डॉक्टर येत नाहीत मग आजीची प्रतिक्रिया"सकाळी पाचला उठून साडेसहाच्या बसने आले(ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय तालुका)आले गेल्या मंगळवारी पण असंच पोटची पोरीचं संग इनात तर या डॉक्टर ला काय म्हणावं".तोपर्यंत एक काका पुटपुटत आले"औषध नाहीत तर दवाखाना कशाला काढायचा"दोन दिलीत बाकीची बाहेरून घ्या मन. जास्त काय बोलावं तर लगीच शब्द तयारच"सगळं फुकट नसतं मिळतं मामा".जस काय यांच्या घरचेच द्यायचं.ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांची रिक्त पदे खूप दिसून येतात. किरकोळ आजारावरील औषधे वगळता इतर सुविधांचा अभाव आहे.
ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील बहुतांश डॉक्टरांचे खाजगी रुग्णालयाशी संबंद दिसून येतात. सरावासाठी आलेल्या विध्यार्थी डॉक्टरवर जबाबदारी टाकून अथवा नवीन कंत्राटी डॉक्टर आपल्या जागेवर लावून काही डॉक्टर स्वतःच्या, नातेवाईक यांच्या रुग्णालयात जातात. काही महागड्या इंजेक्शन चा काळाबाजार सर्रास केला जातो. तसाच रुग्णालयात भौतिक सुविधा, स्टाफ चा अभाव, औषध चा अभाव दिसून येतो.
एक मात्र डिलिव्हरी च्या वेळी फोन केला की लगेच शासनाची गाडी येते.आणि खेड्यातील लोक आरोग्याची काळजी घेत आहेत. म्हणून एका ग्रामिन रुग्णालयातील नर्स ना विचारलं त्या म्हणाल्या"काय थोडं झालं की पळत लोक येतात दवाखान्यात"
हे झालं जेथे दवाखाना आहे तेथील पण ज्या दुर्गम भागात आणखी दवाखाने नाहीत, पुरेशा सुविधा नाहीत त्यांचं काय.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
          
दत्तात्रय विश्वनाथ डोईफोडे,
वाशिम.
          रुग्णालय म्हणल की माझं जरा डोकच हालत कारण आहे त्यामागे मला सर्वात प्रिय होते ते माझे वडील आणि तेही काम करत होते रुग्णालयात (सरकारी रुग्णालयात) जरा वेगळा अनुभव आहे माझा...

लहान असताना वडील रुग्णालयात कामाला असल्याने आमची फार मोठी पंचाईत व्हायची जेव्हा पोलिओ लसीकरण मोहीम सुरू व्हायची आम्हाला ऐकडे लपू की तिकडे लपू असं व्हयाच शेवटी "दो बूँद जिंदगी के" वडील स्वतः च्य्या हातांनी द्याचे आणि आमचं लसीकरण पूर्ण व्हयाचा. तुम्हाला खरं सांगतो लसीकरण च्या कामाला आठवडाभर वडील रात्र दिवस राबताना पाहिलं.

जसं जसं वय वाढत गेलं रुग्णालय काय असत कळत गेलं तिथं काय चालत तेही समजत होत सरकारी रुग्णालय नेमक काय समजायला लागलं जिथं आज नुसता सर्दी खोकला साठी पण सहज होणार ५०० - १००० च खाजगी दवाखान्यातलं बिल आणि एकीकडे 5 रू ची चिठ्ठी फाडून उपचार देणारं सरकारी रुग्णालय तफावत आहे.

मला मान्य आहे सरकारी रुग्णालयात जेवढ्या सोयी सुविधा हव्यात त्या पूर्ण नाही होत. आजची परिस्थिती पण बदलली आहे पण परिस्थिती बरोबर रुग्णालये बदलली नाहीत याचं भानही आहे मला.

माझं डोकं फिरत तेव्हा जेव्हा मला कळलं मी बाहेर शिकायला होतो आणि रात्री झोपेत वडिलांना हायपर टेन्शन आलं आणि मदती साठी अंबुलान्स वेळेवर नाही पोहचली त्यांना रुग्णालयात वेळेवर न नेल्याने पुढे काय झालं ते समजू शकता... शेवटी २५ वर्ष ज्या अंबुलान्स वर नोकरी केली ती अंबुलान्सच वेळेवर ना आल्याने व्हात्याच नवत झालं.

बऱ्याच चांगल्या बाबीही आहेत पण वाईट गोष्टीचा अनुभव जास्त हेही तितकेच खरं.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सैनपाल पाटील,
आजरा, जि-कोल्हापूर.
          ग्रामीण रुग्णालय हे खेडोपाड्यांसाठी हक्काचे आरोग्यधाम आहे. सरकारतर्फे जनसामान्यासाठी चालवले जाणारे ही सामाजिक आरोग्य सेवा आहे. दारिद्र रेषेखालील जनतेस तर येथे मोफत उपचार उपलब्ध आहे. आज कल खेडोपाडी प्राथमिक आरोग्य केंद्रे आहे. तिथे प्रशिक्षित नर्सेस व आशा मदतनीस आहे. ही आरोग्य केंद्रे हर एक तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या ग्रामीण रुग्णालयाला जोडलेली असतात. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात येणारा रुग्ण हा त्याच्या अखत्यारित येणाऱ्या खेड्यापाड्यातून आलेला असतो. अशा रीतीने प्रत्येक गाव हे ग्रामीण रुग्णालयाची जोडलेले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार ग्रामीण रुग्णालयात साधारणतः 25 ते 30 खाटा, 4 तज्ञ डॉक्टर्स नर्सेस व इतर कर्मचारी असतात. डॉक्टरांच्या मध्ये एक बालरोग तज्ञ, एक स्त्रीरोग तज्ञ, एक शल्यविशारद (सर्जन) आणि एक भूलतज्ञ असतो. या ग्रामीण रुग्णालयाला येणाऱ्या रुग्णांच्या मदतीसाठी 'रुग्णकल्याण समिती' कार्यरत असते. ही समिती उपलब्ध सेवांच्या प्रती वर लक्ष ठेवतेे. तसेच रुग्णाला रुग्णालयात औषधे उपलब्ध नसलेल्या परिस्थितीत लागणाऱ्या बाह्य औषधांचा रुग्णावर वारंवार भार येणार नाही याची दक्षता घेते.

आरोग्य विभागाने एवढी सर्व व्यवस्था लावली असली तरी जमिनी हकीकत काही वेगळी आहे. खिशात चार पैसे असणारा कोणीही रुग्ण सरकारी रुग्णालयात जात नाही. मग केवळ मजबुरी म्हणून आर्थिक हलाखीत नडलेले रुग्ण येथे जातात. त्यांनाही योग्य व वेळेवर याची आपण खात्री देऊ शकत नाही. ग्रामीण रुग्णालयात जाणे हे आजकल आपल्याला कमीपणा वाटतो आहे. काहीना त्यामध्ये त्यांची प्रतिष्ठेला धक्का लागेल असे वाटते.

आता ग्रामीण रुग्णालयात बद्दल असे कटू मत होण्याबद्दल काय काय बरे कारणे असावित, याचा अंदाज ग्रामीण रुग्णालयाची संबंधित तक्रारी पाहिल्या तर येऊ शकतो. ग्रामीण रुग्णालयात जायचे तर वेळ पाहून आजारी पडावे लागते. काहींच्या मते औषधांची उपलब्धता वेळेवर नसते. त्यांच्या वैधता पडताळणी यांची व्यवस्था ठीक नसते. रुग्णालयातील डॉक्टर्स आपले खाजगी हॉस्पिटल उडून रुग्णांना आपल्या खाजगी दवाखान्यात बोलवून आर्थिक अधिकार टाकतात. मिती कार्यशील नसतात. रुग्णाच्या आजाराचे वेळेत निदान करणे व त्यांच्या तक्रारी बद्दल गांभीर्य नसणे. औषध उपचारात दिरंगाई करणे पुन्हा पुन्हा हेलपाटे मारायला लावणे. आणि अत्यावश्यक संवेदनशील आजारात अंबुलन्स सारख्या सेवा उपलब्ध करून न देणे. बऱ्याच ग्रामीण रुग्णालयाचे ठिकाण आहे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणापासून दूर असते रात्री-अपरात्री वाहनांची येण्या जाण्याची सोय नसते जवळपास खानपानाची सोय नसते. त्यामुळे रुग्णाचे नातलग आणि प्रसंगी रुग्णाचे ही खाना पाण्याचे हाल होतात. बाह्य औषधांसाठी जवळपास मेडिकल नसते. बऱ्याचदा डॉक्टर नसतात, त्यामुळे उपचारात दिरंगाई होऊन रुग्णाचा जीवावर बेतल्याच्या घटना घडतात. रुग्णालयातील स्वच्छता आणि इमारत देखभालीकडे तिचे लक्ष दिले जात नाही. थोडक्यात काय तर आरोग्य उपचारांत गुणवत्तेची हमी देता येत नाही; असा सार्वत्रिक समज आहे आणि तो बऱ्याच अंशी खरा आहे हे खेदाने म्हणावे लागेल.

मुळात ग्रामीण रुग्णालय ही सरकारची जनआरोग्य मोहिमा राबवणारी एक महत्त्वपूर्ण संस्था आहे. सरकारच्या आरोग्यविषयक धोरणांना जनसामान्यापर्यंत पोचवणारी प्राथमिक केंद्रे आहेत. प्रत्येक खेडोपाडी असणारी त्यांची जोड ही आरोग्य विषयक संवाद निर्माण करते. आरोग्यविषयक जनजागृती करते. लोकांमध्ये पसरणाऱ्या साथीच्या रोगांना आटोक्यात आणण्यात या ग्रामीण रुग्णालयानी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अशावेळी रुग्णांना घ्यावयाच्या काळजी व साथींच्या प्रतिबंधित उपचार पद्धतीविषयी या ग्रामीण रुग्णालयानी एक रोग प्रतिबंधक शिक्षण चळवळ राबवली आहे. काही असाध्य व घातक रोगांच्या उच्चाटनात व प्रतिबंधात या रुग्णालयाचा मोठा वाटा आहे. पोलिओ, डेंगू, कावीळ, न्युमोनिया या सारख्या रोगाच्या समूळ उच्चाटन या रुग्णालयांची महत्वाची भूमिका होती. येथे टीबी वर खात्रीशीर इलाज होतो. तसेच एडस् सारख्या असाध्य रोगावर उपचार पद्धतीत रुग्णाबद्दल पुरेशी गोपनीयता राखली जाते.

या सर्व गोष्टी मान्य केल्या तरी जनसामान्यांमध्ये आजारपण आणि आरोग्यविषयक बाबतीत ग्रामीण रुग्णालयाचा आधार व भरोसा वाटत नाही. लगेचच व वेळेवर उपचार न मिळणे तसेच रुग्णांना योग्य वागणूक मिळणे अशा बऱ्याच रुग्णांची धारणा आहे. उपचार पद्धतीतील वेळकाढूपणा व सरकारी कारभारातील संथपणा इथेही जाणवतो. यात तब्येतीची हेळसांड होते अशी रुग्णांची भावना आहे. दुसरा मुद्दा असा की सर्व सेवा एका छताखाली मिळत नाहीत त्यामुळे रुग्णांना काही सेवां साठी इतरत्र धावाधाव करावी लागते.त्यात ग्रामीण रुग्णालयाचे ठिकाण शहरापासून थोडे दूर असेल तर फरपट ही ठरलेली आहे.

खेडोपाडी किंवा रिमोट एरिया मध्ये डॉक्टर सेवा करायला तयार होत नाहीत.त्यामुळे कायदा करून जबरदस्तीने डॉक्टरांना तिथे पाठवावे लागते. वैद्यक क्षेत्रात जो सेवाभाव अपेक्षित आहे त्याचा अभाव जाणवतो. कारण वैद्यक शिक्षण प्रचंड महागल्यामुळे ती गुंतवणूक लगेच भरून काढण्यासाठी चांगल्या डॉक्टर शहरांत प्रॅक्टिस करण्यास जास्त प्राधान्य देतात.त्यामुळे क्रिटिकल अवस्थेतील रुग्णांना खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागते आणि महागड्या उपचारांमुळे त्यांचा खिशाला कात्री लागते.

या सर्व गोष्टींचा आढावा सरकार आणि संबंधित यंत्रणा घेत नसेल असे नाही. पण ज्या योजना व सुखसोयी जनसामान्यांसाठी सरकारला अपेक्षित आहेत, त्या जमिनी हकिकतीत उतरताना दिसत नाहीत. यात थोडा सरकारी ढिसाळपणा असेलही, सरकारी आरोग्य विषयक योजना कागदावर कितीही चांगल्या असल्या तरी त्याला लाभार्थीपर्यंत पोचण्यासाठी जी इच्छाशक्ती पाहिजे तिचा अभाव दिसून येतो. रेशन दुकानावर मिळणारे धान्य व इतर वस्तु प्रत यथातथाच असते; ते सरकार खराब वस्तूंचा पुरवठा करते म्हणून नव्हे तर वाटप पद्धतीतील दिरंगाई आणि वेळ काढूपणा चांगले राशन खराब करतो. तेव्हा चांगल्या आरोग्यासाठी पोषक आहार योजनेने किती बालकांचे पोषक पोषण झाले हे विचार करावयास लावणारे आहे. त्यात भरीस भर म्हणजे आरोग्य विषयक जागृतीचा अजून म्हणून म्हणावा तसा प्रभाव ग्रामीण भागात दिसत नाही आणि अशाच रुग्णांची आरोग्यविषयक काळजी घेणारा दवाखाना ही सुदृढ नाही. त्यामुळे सरकारी रुग्णालयाचेच आरोग्य धोक्यात आहे असे खेदाने म्हणावे लागेल.

बदलत्या काळानुसार ग्रामीण रुग्णालय बदलली नाहीत. आताच्या काळी असणाऱ्या सुविधानी ती अद्यावत केली गेली नाहीत. आजही खाजगी रुग्णालयात जाणारा वर्ग ग्रामीण रुग्णालय आकर्षित करू शकले नाही. एखाद्या तालुका अखत्यारीत येणारी ३०-४० गावे यांचे सर्वतोपरीने आरोग्यविषयक शंकांचे समाधान करण्याची कुवत ग्रामीण रुग्णालयानी कमवली नाही.  नवनवीन व आकर्षक आरोग्य विषयक योजना आरोग्य विभाग राबवू शकला नाही.पण ज्या योजना येतात त्या सरळ धोपट मार्गाने पारंपरिक पद्धतीने राबवल्या जातात. मग लोकांच्या मनात ग्रामीण रुग्णालयाबद्दल विश्वास आणि आधाराची भावना कशी वाढावी. दुसर्‍या राज्याच्या आरोग्य विषयक धोरणात आणि आपल्या राज्याच्या धोरणाची एक तुलनात्मक चिकित्सा केली तर खूपश्या सुधारणांची गरज वाटते. आता देशाला जागतिक महासत्ता करण्यात व्यस्त असलेल्या सरकारांना लोकांची प्राथमिक गरज ध्यानात येत नाही असे तरी कसे म्हणावे. आजकाल तसे प्रयत्न होताना दिसताहेत पण त्याचे परिणाम समोर येण्यास थोडा वेळ जावु द्यायला हवा. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयांचे आरोग्य सुधारुन भविष्यातील ग्रामीण भारत अधिक सशक्त आणि निरोगी असेल अशी आशा धरुया.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
योगेश्वर पाटोळे .
पेठ. ता.वाळवा जि.सांगली.
     ग्रामीन रुग्नालय हेच तर आमच्या सारख्या गरीब जनतेसाठी वरदान आहे भारत सरकारचे याचा गावी असताना खुप लाभ झाल कारण आर्थीक परीस्थिती जेव्हा जेव्हा काही आजार व शारीरीक त्रास होतो व पैसे नसायचे मग पेर्याय एकच सरकारी ग्रामीण रुग्णालय .याम्ध्ये तेथील सर्व नोकर वर्ग व अधीकारी खुप काळजीपुर्व आजारी व्यक्तीचा  औषधोपचार करुन त्याना बर करुन सोडतात .या यंत्रनेचे आभार मानावे ते कमीच .
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
शीतल शिंदे,
दहिवडी, जि- सातारा.
       ग्रामीण रुग्णालये , प्राथमिक आरोग्य केंद्र , उपकेंद्र या शासकीय संस्था त्या ठिकाणी असलेल्या लोकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी उभारण्यात आलेल्या आहेत मात्र त्याचा फायदा फ़क्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले घटक घेताना दिसतात .त्यांच्यासाठी हे माध्यम खूप महत्वाचे आणी फायद्याचे असुन एक हक्काचे माहेरघर आहे .
ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी पहिल्या पेक्षा आता  खूप चांगल्या सुविधा पुरविल्या जातात परंतु लोकांची मानसिकता अजून बदलली नाही .खरेतर जेवढा पगार तेथील कर्मचाऱ्या वर दर महिन्याला शासन खर्च करते साधारणता 8 ते  13 लाख त्यांपैकी 1 लाख रुपयांचा खर्च सुद्धा लोकांच्या आरोग्य सेवा पुरविण्यासाठी होत नाही म्हणजे त्या प्रमाणात लोक त्याचा फायदा घेत नाहीत .
म्हणजे पुढ्यात वाढलेय पण आपल्याला खाता येत नाही असंच.तत्काळ आणी निशुल्क  सेवा पुरविणारे शासकीय केंद्र असूनही लोक खाजगी रुग्णालयाची धाव घेतात .मान्य आहे काही प्रमाणातच सेवा असतात पण जे आहे त्याचा फायदा करून घेणे गरजेचे आहे .
या ठिकाणी 4 डॉक्टर्स नसले तरी दोन - तीन तरी असतात आणी तेही mbbs असतात . 7 परिचारिका , 1औषध निर्माता , 2 रक्त तपासणीसाठी , 1 एक्स रे कर्मचारी , शिपाई अशा प्रकारचे प्रशिक्षित  कर्मचारी असुन त्याशिवाय इतर अशासकीय कर्मचारीही कार्यरत असतात .शासनाचे वेगवेगळे प्रकल्प असुन त्या ठिकाणी विविध सेवा पुरविल्या जातात .
1) जसे की क्षयरोग तपासणी व उपचार ,
2) आई. सी .टी .सी. विभाग म्हणजे ऐच्छिक सल्ला व मार्गदर्शन विभाग _ मोफत समुपदेशन केले जाते .
एच .आय. व्ही . तपासणी व त्याचे ए. आर. टि . उपचार .
3) एन सी डी _ नॉन कम्युणीकेबल डिसेस - अ संसर्गजन्य रोग निदान - जसे की उच्य रक्तदाब , मधुमेह , केन्सर यासाठी तपासणी व उपचार पद्धती हे हि मोफत पुरविले जातात .
शिवाय महालॉब तपासणी - सी बी सी , एच बी , थायरॉड , कोलेस्टेरॉल आणी आणखी तपासण्या होतात .याचा सर्वांनी फायदा करून घेतला पाहिजे .
आताच्या संकरित बियाण्यापासून उत्पन्न घेतलेले धान्य , पालेभाजी ,फळे आणी चुकीची आहार पद्धती , व्यायामाचा अभाव यामुळे वाढत चाललेले मधुमेहीण्चे , उच्य रक्तदाब यांचे प्रमाण खूप वाढलेले आहे .या साठी याठिकाणी उपचार मोफत दिले जातात .त्यातून अगदी गरज भासली तर थोडफार खाजगी  उपचार घेवू शकतो .

या शिवाय शाळा तपासणी पथक ज्यात 4 डॉक्टर्स 2 फर्मसिस्ट  , 4 परिचारिका असे यांचे पथक प्रत्येक तालुक्याला असते की ते 0 ते 18 वयोगटातील मुला मुलींची अंगणवाडी , शाळा , विद्यालय , कॉलेज या ठिकाणी जावून तपासणी करून कमतरता असलेली मुले निवडून , गरजू ऑपरेशन , व इतर उपचारजिल्हा पातळीवर  केले जातात हे हि महत्वाचे आहे .

शिवाय गरोदर मातेला सर्वमोफत  तपासण्या अगदी एक सोनोग्राफी मोफत , डीलिवरी साठी गाडीची  सेवा ,बाळांचे लसीकरण आणी नसबंदी शस्त्र क्रिया मोफत पुरविली जाते .

आता त्रुटी मात्र असतातच की सगळीकडे पण जे आहे त्याचा फायदा का करून घेवू नये आणी ज्या दिसतात त्रुटी त्यांवर आवाज उठवा .
लोकांना सरकारीत यायचे म्हटले की नाकं मुरडली जातात आणी कमीपणा वाटतो .आम्ही दोघे दोघे जण नोकरी करतो तरी असणाऱ्या सर्व आरोग्य सोईचा लाभ घेतो .कारण बोलणारे काय दवाखान्याचा खर्च देणार आहेत? रात्री अपरात्री हक्काचे आणी जीव वाचवीणारे  ठिकाण !
काय मग त्यांना का म्हणून लाजायचे ?
ते पैसे आपण दुसऱ्यांना मदत करण्यासाठी वापरू शकतो इतरांचे पण
सहकार्य होते !

शेवटी खरेच सांगेन , आग्रह करेन घ्या सर्वांनी लाभ हि !
हि लोकांनी लोकांसाठी पूरवीलेली सेवा आहे आणी त्यावर आपला पूर्ण अधिकार आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अक्षय पतंगे,
आ‌.बाळापुर, जि. हिंगोली.
           ग्रामीण रुग्णालयास आपण सरकारी दवाखाना म्हणुन ओळखतो. ग्रामीण भागात 'सर्वांसाठी आरोग्य' या ब्रीदवाक्याने सरकारी दवाखाने आरोग्यसेवा पुरवतात. केंद्र व राज्य सरकारच्या विविध आरोग्य योजना व उपक्रम या माध्यमातून चालविले जातात. भारतात देवी नावाचा आजार, पोलीओ तसेच कृष्ठरोग यावर समाजात प्रभावी जागृती करून हे संपवण्यासाठी सरकारी रुग्णालयांनी केलेले प्रयत्न नाकारता येणार नाही. वयोगट ०-५ मधील बालकांना वेळोवेळी लसीकरण देण्याचे काम ही रुग्णालये करत असतात.   पुर्वी घरोघरी बाळंतपण व्हायची. मात्र सरकारी दवाखाने आल्यापासून गरीब कुटुंबाना आधार मिळाला. बाळांतपणे आणि शस्त्रक्रिया मोफत व्हायला लागल्या. लोकसंख्या नियंत्रण किंवा वय पुर्ण झाल्यावर विवाह ही जनजागृती सुद्धा सामाजिक आरोग्य ठेवण्यासाठी महत्वाची ठरली.
ग्रामीण भागातील रुग्णालयांत खाटांची संख्या, रुग्णांची आबाळ, अपुरे मनुष्यबळ तसेच औषधींचा तुटवडा असे वारंवार निदर्शनास येते. आशा कार्यकर्ती किंवा आंगणवाडी शिक्षिका यांनाही वेळोवेळी प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. कारण त्या थेट गावात काम करत असतात. वरील बाबींकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अर्चना खंदारे,
हिंगोली.
         आपल्या कडे  असा समज आहे कि,ग्रामीण सरकारी दवाखान्यामध्ये विलाज  म्हटलं कि गैरसोय आणि गरीब व्यक्तीच इथे येतात आणि दुसरीकडे  खाजगी दवाखान्यामध्ये विलाज केला तर तो उत्तम मानला जातो. का ? तर तिथे  आपण जास्त पैसा खर्च केला असतो.म्हणजे इथे पण पैसा च महत्वाचा आहे.पण ज्यांच्या  जवळ पैसे नाहीत अस्या व्यक्तींनी काय करायचं. त्यांच्या जवळ ग्रामीण रुग्णालय शिवाय  पर्याय नसतो आणि तिथे हि डॉक्टर च रुग्णांचा विलाज करत असतात.ग्रामीण आणि खाजगी रुग्णालयातील  डॉक्टर मध्ये एक फरक जास्त प्रमाणात आढळतो .तो म्हणजे खाजगी डॉक्टर आपल्याला जरा जास्तच प्रेमाने  बोलतात आणि ग्रामीण म्हणजे सरकारी रुग्णालयात डॉक्टर जरा जास्तच कडक बोलतात यालाही एक कारण आहे.ते म्हणजे आपण लोक त्याचा  गैर फायदा घेतो, सरकारी आणि स्वस्त वस्तूची आपण किंमत करत नाही.नुकसान झालं तर झालं सरकारच होणार त्यात आपलं काय जाणार. या दृष्टीकोणामुळे  सरकारी रुग्णालये अस्वच्छ राहतात .इथे हि आपल्याला आपल्या सरकारी रुग्णालय विषयी आपले विचार आणि आपला दृष्टिकोन बदलणे फार महत्वाचे आहे.
                      सरकारी रुग्णालयामुळेच आज गरीबाची  कुटुंबे चांगल्या व बऱ्याच प्रमाणात स्वस्थ होत  आहेत .पूर्वीच्या वेळी हि लोकांवर ज्या भयंकर आजाराने  थैमान घातले होते त्यावेळी हि सरकारी रुग्णालयानेच त्या आजारावर  मात करत सर्वांना बरेही केले. सरकारी रुग्णालयातून आज हि खूप चांगल्या प्रकारे  रुग्णांना सोई सुविधा पुरविल्या जात आहेत आणि त्याचा फायदा हि गरीब असो वा श्रीमंत  सर्वांना सारखाच होत आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(यातील सर्व संबंधीत छायाचित्रे गुगलवरून घेतलेली आहेत.)

तलाठी कार्यालयात आलेला अनुभव

किशोर शेळके.लोणंद.
            माझे वडील एक प्रामाणिक आणि कष्टाळू, होतकरू शेतकरी आहे. त्यांना कोणतेही काम कायद्याच्या चौकटीत राहून करायला आवडतं. तसेच त्यांचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे, कुणाचा एक रूपया बुडवायचा नाही, आणि आपलाही एक रूपया कुणाला सोडायचा नाही. आत्तापर्यंत खूप प्रामाणिकपणे त्यांना कष्ट, कष्ट आणि कष्टच करताना मी पाहिले आहे. कधीच आपला स्वाभिमान कुणाकडे गहाण टाकला नाही. स्वतःच्या फायद्यासाठी कधी चूकीचे काम त्यांनी आजवर केलेच नाही. 

काही दिवसांपूर्वी आम्ही शेतामध्ये एक नविन विहिर खोदली. आता नविन विहिरीवर नविन वीजकनेक्शनची नितांत आवश्यकता होती. पण ते कनेक्शन लगेच मिळत नाही, हे आम्ही जाणून होतोच. पण त्यासाठी हालचाल अन् धावपळ करणं गरजेचं. आणि ती धावपळीची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. मला ते नविन वीजकनेक्शन लवकरात लवकर मिळवायचे होते. आणि त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करणे अनिवार्य. MSEB च्या अधिका-याने बरीच मोठी कागदपत्रांची यादी दिली, आणि ती सगळी कागदं लवकरात लवकर गोळा करायला सांगितली. त्यात 'विहीरपड' नोंद केलेला, ७/१२ चा उतारा, अशा एका कागदाचा उल्लेख केला होता. आता तो कागद तलाठी कार्यालयात मिळतो, एवढीच जाण होती मला. यापलिकडे तो कसा मिळवावा ही कल्पना मात्र नव्हती. 

तलाठी कार्यालयात गेल्यावर माननीय तलाठी महोदयांचे दर्शन एक दोन भेटीत थोडेच होणार? त्यासाठी पाच दहा चकरा खाल्ल्या नाहीत, तर त्या कार्यालयाला आणि त्या खुर्चीला काहीच महत्त्व नाही. मग महत्व लक्षात आल्यावर प्रत्यक्ष भेट... भेटीत विहिर नोंदीबाबत प्रस्ताव... आणि समोरून टाळाटाळ..
असं साधारण तिन ते चार वेळा घडलं. तलाठी साहेब खरंच इतर कामात व्यस्त होते, की त्यांनी मुद्दामहून माझ्या कामाला उशिर लावला, हे माझ्या खूप उशिरा लक्षात आलं. मी आपलं वडिलांनी सांगितलं, तेवढंच ऐकायचं. मी ज्यादा काही केलंच नाही. कार्यालयात ब-याच वेळा येणं जाणं झाल्यामुळे चार दोन चेहरे ओळखीचे झाले होते. त्यातलाच एकजण म्हणाला, "अजून दोन वर्षे हेलपाटे घातले, तरी नोंद होणार नाही. टेबलाखालुन दोन रूपये दे, काम होऊन जाईल". आता खरं तर वडिलांना ही गोष्ट सांगीतली तर या प्रकरणाला थोडं वेगळंच वळण लागेल. मग मी विचार केला की, हे माझ्याच पातळीवर हाताळलेलं बरं पडेल. मी त्या भल्या इसमाला विचारलं, " साधारण किती द्यावे लागतील "
" एक, हजार रूपये तरी द्यावे लागतील बघ.." तो गृहस्थ. 
"अहो, पण आण्णासाहेबांनी आधी तसं बोलायला पाहिजे ना? एक महिना झाला हेलपाटे घालतोय, चारपट पैसे खर्च झाले एवढ्यात माझे..." - मी.
" अरे, ही साधारण प्रोसेस आहे, यात बोलण्यासारखं काय आहे, ऑफर तू द्यायची असते. आण्णासाहेब कसे तुला डायरेक्ट मागतील. " ते गृहस्थ एवढे बोलून निघून गेले.
मी थोडा खटाटोप करून आण्णासाहेबांचा फोन नंबर लिहून घेतला....

आज सकाळी सकाळीच महोदयांना फोन केला, म्हटले की, " आण्णासाहेब थोडा वेळ असेल तर चहा घेऊयात का..?" सर्वसाधारण बोलणं झाल्यावर त्यांनी होकार दिला. आम्ही एका चांगल्या हॉटेलमध्ये भेटलो. चहा घेत घेत थेट विषयाला हात घातला. 
मी म्हणालो. - " आण्णासाहेब एक महिना झाला मी धावपळ करतोय. आणि तुम्ही माझं काम काहीच मनावर घेतलं नाही, मला आधीच माहीत असतं तर मी मागेच तुम्हाला हे पैसे दिले असते."
तलाठी महोदय इथेही शांतच. मी त्यांना मी एक हजार रूपये दिले. ते फक्त "फोन करतो," एवढेच बोलून गेले. 
मी ही माझ्या कामाने निघून गेलो. 

त्या हजार रूपयांची ताकद मला दुस-या दिवशी कळाली. जेव्हा तलाठी साहेब सकाळी सकाळीच घरी तो कागद घेऊन मला उठवायलाच आले....
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
पी.प्रशांतकुमार, अहमदनगर.
....एका माणसाच्या मागे एक कुत्रा लागला.घाबरून खूप लांब पळल्यावर तो एका खांबावर चढला आणि आवेशात कुत्र्याला म्हणाला, 'तू कुत्रा आहे म्हणून सोडून देतो.तुला काय माझी किंमत कळणार..एक गुंठा जरी असता ना तुझ्या नावावर तर मग तुला माझी..एका तलाठ्याची ताकद समजली असती..'
....भारतातल सर्वात भ्रष्ट सरकारी विभाग हा महसूल विभाग आहे..आणि त्यात तलाठी कार्यालयाचा वाटा खूप मोठा आहे..
...उत्पन्नाचा दाखला सोडला तर कुठलंही काम पैसे दिल्याशिवाय होतच नाही..
...साधं वारसनोंद वा इतर प्रकारे नाव लावण्याचं  काम घ्या.. आधी तर लक्षच देणार नाही..कुठल्याही कागदाची पोहोच देणं त्यांना अति जिकिरीचं वाटतं.. मग लवकर फेरफार नोंदवणार नाही.."फेरफार प्रलंबित" हा शेरा जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत जात नाही..
आता तर इमानदार तलाठी ह्याची व्याख्याच बदलली आहे. इमानदार तलाठी म्हणजे जो पैसे घेऊन कमीतकमी पटकन काम करतो..
..मला तर अजूनही तलाठी कार्यालयांचे नियम समजले नाहीत..दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या एकाच प्रकारच्या कामाला .. वेगवेगळी कागदपत्रे..वेगवेगळ्या पैशांची मागणी आणि काम होण्यासाठी वेगवेगळ्या दिवसांची वाट..
नवीन licence साठी RTO कार्यालयातला भ्रष्टाचार बराच कमी झाला तसं काही महसूल मधे होईल का?
... तुमचं काम करतो म्हणजे तुमच्यावर उपकार करतो हा जो त्यांचा आव आहे त्याच काय? ठिकठिकाणच्या खासकरून शहरातल्या Zero तलाठी लोकांचं काय.. नवीन जाणाऱ्यांना तलाठी कोण आणि झिरो तलाठी कोण हेच समजत नाही इतका त्यांचा रुबाब असतो..
...परिस्थिती वाईटच आहे..चांगले तलाठीही असतीलच पण आमच्या दुर्दैवाने ते आमच्या वाट्याला येतच नाही हे दुःख..
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

मनोज वडे,पंढरपूर.
           ✍🏻  सर्व Online होत ,चालले पण माणसाची मन मात्र Offline होऊ लागली दिसताना दिसतात कारण सर्व पार दर्शक होत आहे मन माणसाची वृत्ती मात्र नीट आजून पहावयास मिळत नाही ह्याच एक मेव कारण म्हणजे दर फलक ,तसेच कार्यलयाची माहिती तीत नीट नसणे ,सगळे आज ही लपून छपून चालेल दिसत आहे कारण कोणतीही सरकारी योजना असो पंच नामा असो तो नीट होत नसतानाचे चित्र आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे कारण म्हणजे तलाठी कार्य ,त्याच्या मर्यादा, त्याच्या फी ,त्याना मिळणार भत्ता , त्याचा खर्च हा जो पर्यंत लोकांना समजत नाही तो पर्यंत तलाठी कार्यलयाची दशा कायमस्वरूपी अशीच राहील अस मला वाटते,कारण माणूस तलाठी कार्यलयात जातो त्याव्हा तो वेगळाच अवतारात असतो ,त्यातील माझ्या मते 70% लोक गरीब म्हणून वागतात, कारण त्याला वाटत मला सरकारी योजना मिळाव्यात ह्या निंद्या पायी 70 %लोक दबावात वागताना दिसतात ,पण राहिलेलं 30%सरकारी कार्यालयात कौलर टाईट करून असतात जे मी बोलेल ते च होईल म्हणजे आशा लोकांना तलाठी राम राम करतो ,जेणे करून सुविधा ही ह्यांना च जास्त देण्याचा पर्यंत ही सरकारी कार्यालयात कामे ह्याची Fast होताना ही दिसतात.🤔म्हणजे आज ही दरी त्याचं पद्धतीने चालली आहे ,जी स्वतंत्र होण्यापूर्वी होती ,एवढंच बद्दल झाल्याला दिसतो की आज छाकुन बुक्का मारल्या  जातात .स्वतंत्र होण्यापूर्वी उघड होत्या ..हा माझा थोडक्यात विचार लिहण्यासारखे खूप आहे ,विषय थांबत नाही ,पण वाटत आता कृती होईला पाहिजे ,बास आता , किती सहन करायचे..     ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सचिन फड, नाशिक.
            मी काही वर्षापूर्वी नाशिक मध्ये एक जुने घर घेतले. घर जवळच्याच नातेवाईकाचे होते त्यामुळे खरेदी होऊन दहा वर्षे झाली तरी मी तलाठ्या कडे जाऊन सातबारा वर नाव लावुन घेतलं नव्हतं. एक दिवस वाटल आता खूप उशीर होईल नाव लावून घेऊया आधीच जे काम दोनशे त होणार होते त्याला पाचशे लागणार आहे. मग मी सर्व कागदपत्र तयार केले आणि तलाठी कार्यालयात गेलो माझ्या अंदाजा नुसार तलाठी पाचशे रुपये मागेल असे वाटत असतांना त्यांनी चक्क एक हजार रुपये मागितले. मग मी थोड थांबुन विचार केला आणि त्यांना म्हणालो "माझ्या कडे आत्ता पाचशेच रुपये आहे तुम्ही हे कागदपत्र जमा करून घ्या, मी घरी जाऊन लगेच पुर्ण हजार रुपये घेऊन येतो" असं म्हणून तिथून निघून आलो. मग मनात विचार केला की, आपण जर हे डॉक्युमेंट इथे ठेवून गेलो तर ते पेंडिंग कामाच्या गठ्यात जाऊ शकतात, तस झालं तर नंतर आपोआप नोंद होऊन जाईल आणि आपल काम ह्या भावात होऊन जाईल. आणि जरी नाहीच झालं तरी फक्त झेरॉक्स चा दहा रुपये खर्च वाया जाईल. आर्थिक शक्ती पेक्षा थोडीशी युक्ती लावून बघावी. आणि तसही एवढे दिवस नोंद केली नाहीये, तर अजून काही दिवस उशिरा करू, एवढे 1000 रुपये देण्यापेक्षा जाऊ द्या करू नंतर कधीतरी.
आणि गंमत काय बघा ना! माझी युक्ती काम करून गेली जिथे पाचशे रुपये देणार होतो तेथे त्यांनी एक हजार रुपये मागितले.
पण माझं काम तर 'फुकटातच' होऊन गेलं...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
शीतल शिंदे, दहिवडी जि .सातारा.
     तसा आमचा तालुका नेहमीच दुष्काळी .पाऊस पाडला तर पिके नाहीतर काहीच नाही .पिण्याच्या पाण्याची बोंबाबोम्ब .
काय करायचे सगळ्याच गोष्टींनी दुष्काळ आमच्या नशिबाला .तालुक्याला अधिकारी दिले जातात ते पण अगदी हेरुणच.कोणाचा साइकॉलजीचा प्रॉब्लेम , तर कोणी व्यसन करणारा , तर कोणी आपलेच खरे म्हणणारा .
कुठल्याहि  कार्यलयात जा काहीतरी उणीव आहेच .दुष्काळ असल्यामुळे त्यांनाही दिलेली शिक्षाच म्हणा .पण पगार चालू आहेच की ओ .
असो गरज्वण्ताला अक्कल नाही म्हणतात तसेच म्हणायचे आणि पुढे चालायचे .
आपले तलाठी आण्णांचे कार्यालय हे हि याला सुटले नाही .खेडे गावात तर येतात की नाही माहीतच नाही .जरा गाव दादागिरी करणारे असेल तर असतात आठवड्यातून एक दोन दिवस .नाहीतर बाजीराव कोठे असतात माहीतच नाही .मोबाईलला तर ह्यांच्या कधीच रेंज नसते .मग यांच्या मागे यांना शोधायला तालुक्याला जायचे तेही 50+50 रुपए तिकीट  घालवून  .आणि तिथे गेल्यावर किती मागतात आणि आणखी परत यायला सांगतात की काय या विचारांनी काहूर माजते मनामध्ये .फक्त ऊताऱ्याची पुस्तकाची झेरॉक्स घ्यायची असते आणी त्यावर सही शिक्का 
म्रूत्यू नंतरच्या नोन्दिला पण काहीतरी द्यायची अपेक्षाच !

सातबाराला नाव लावायला पण मौजा काहीतरी .एकत्र आणेवारी लावताना काही काळात नसेल तर एक आणा मध्ये जास्त मेम्बर्स असतील तर " पै  "चा हिशोब जुळेना तर लावून टाकायचे कोणाच्या तरी नावावर जास्त .किंवा जो पैसे देईल त्याच्या नावावर लावून टाकायचे जास्त क्षेत्र .मग आपण बदलून गेल्यावर मागे एकमेकांची डोके फोड का होईना आपल्याला काय करायचे आहे .परत म्हणायला मोकळे अहो चुकून झाले असेल .
पीकपाणी भरताना , देताना सुद्धा तीच बोम्ब .ज्या मोठ्या शेतकऱ्याला माहीत असेल तोच लाभार्थी नाहीतर माहीत नसलेले राहिले तसेच .
असा आमचा डोळे उघडे ठेवून केलेला आंधळेपणा अथवा उघड उघड भ्रष्टाचार ! 
आणि गोरगरिबांची लूटमार !
 कधी होणार बंद हे ! आणि म्हणे 
आणि अच्छे दिन आनेवाले है !
लेकिन कब ?
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(All images are taken from Internet)

माझ्या नुकतंच वाचण्यात आलेलं पुस्तक...

माझ्या नुकतंच वाचण्यात आलेलं पुस्तक...

🌱वि४🌿 या व्हाट्सअप ग्रुपवरून

माझ्या नुकतंच वाचण्यात आलेलं पुस्तक...


Source: INTERNET
-वाल्मिक फड महाजनपूर
नाशिक          

    मी अनेक पुस्तके वाचली,पण एक पुस्तक जेव्हा वाचलं तर मला धरणग्रस्तांच्या ,पुरग्रस्तांच्या काय अडचणी,त्यांची होणारी कोंडी काय असते ह्याचा मला प्रत्यय आला." झाडाझडती " असं त्या पुस्तकाचं नाव.नेमके बायजाबाईचे शेत,घर ,विहीर असा सगळा संसार तिचा धरणामध्ये गेला.त्यांचेच तालुक्याचे  आमदार आण्णा साहेब यांनी शब्द दिला होता की,तुमच्या जमीनीच्या मोबदल्यात तुम्हाला जमीनी मिळतिल परंतु,प्रत्यक्षात जेव्हा कामाला सुरूवात झाली तेव्हा खरी राजकारण्यांची पोलखोल झाली.त्यांनी आपली औकात दाखवायला सुरूवात केली.जेव्हा बायजाबाईच्या घरावर बुलडोजर फिरू लागला त्या वेळेस वाचताना माझे डोळे अक्षरशः पाण्याने भरून आले.त्यानंतर जेव्हा त्यांच्या पुणरवसन करण्याची पाळी आली तर आमदाराचा मुलगा अतिशहाणा झाला.        दुसरीकडे जमीन मिळाल्यावर सगळे धरणग्रस्त दुसऱ्या गावात रहायला गेले.तिथेही त्यांच्यावर अत्याचार होऊ लागले.बरेच दिवस गेल्यानंतर जेव्हा बायजाबाईच्या मुलाचे लग्न झाले ,त्या वेळेस तेथील गावच्या वतनदारांनी तिच्या सुनबाईकडे वाईट नजरेनं पाहिलं ते काही बायजाबाईच्या मुलाला सहन झाले नाही आणि त्या भांडणात बायजाबाईच्या मुलाचा अंत झाला.हे पुस्तक वाचत असताना बर्याच वेळेस माझे डोळे पाणावले.खरं तर खूप लिहिले असते पण शब्द मर्यादा असल्यामुळे थांबतो नाहीतर बरेच प्रसंग राहून गेले आहेत.क्षमस्व;                मि एक शेतकरी माणूस  आहे ९वी शिकलेला काही चुका झाल्यास माफी असावी.

Source: INTERNET
-अक्षय गांवकर.
ता. सावंतवाडी.

माझ्या वाढदिवसा निमित्त माझा पार्टनर रुपेश परब ( भाई ) याने भेट म्हणून दिलेली उषा परब यांची कुसवा ही कादंबरी काही दिवसांन पुर्वीच वाचुन पुर्ण झाली. तसा मी नियमित वाचक आहे थोडफार लिहीतोही पण एखादी कादंबरी वाचुन त्यावर लिहीणे हे कधी केल नव्होत. काल वि४ ग्रुप मध्ये हा विषय पाहीला आणि पहिल्यादांच लिहायच ठरवलं. मनाला जे भावल, वाचताना जे वाटल तेच शब्द रूपात मांडण्याचा प्रयत्न केलाय.
कादंबरी आपल्या कोकणातील ग्रामीण भागातील असल्याने वाचताना कादंबरीची सुरवात मस्त झाली. सोबतीला मालवणी भाषा, बर्याच मालवणी म्हणी अन् कोकणी लोकगीत यामधुन पुन्हा अनुभवता आली. बालपण डोळ्यांसमोर उभ राहील. माझ्या आत्ता पर्यंतच्या आयुष्यात वाचलेल सगळ ललित अन् कथाच. कादंबरी पहिलीच तीही मालवणी मुलुखातली म्हणुन जरा मन लावुनच वाचत होतो.

डॉ. तारा भवाळकर यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेत त्यांनी असा उल्लेख केलाय की ही कादंबरी वाचताना एकदा हाती घेतलेल पुस्तक पुन्हा खाली ठेवावस वाटत नाही. असच काहीस माझ्या सोबत घडत होत. कादंबरी वाचकाला खिळवून ठेवते. सरसर एक एक प्रसंग घडुन जातो अन् फुडे काय याची उत्सुकता लागुन राहते.

कादंबरीची सुरवात पारधी पासुन होते. आत्ता तळकोकणात जास्त करुन शिकार हा शब्द वापरला जातो. आपल्या तळकोकणात देवांचे वार्षिक कार्यक्रम मार्गी लावण्यासाठी पारधी जंगलाच्या दिशेने वळताना दिसतात. आणि त्यात पहील्यांदाच पारधीला गेलेल्या गोदाक्काचा नवरा जानबाचा मृत्यु होतो. या पारधीचा प्रसंग अप्रतिमपणे लेखीकेने मांडला आहे. आपण स्वतःच पारधीला गेल्याचा भास होतो.

या पुढे पुर्ण कादंबरी ही गोदाक्का आणि तिचा मुलगा गजा यांवर बेतली आहे. गोदाक्काचा नवरा वारल्यावर गजा हा तीचा मुलगा काही वर्षांनी गाव सोडुन पळुन जातो. या अशा अवस्थेत गोदाक्काची पाठराखीण करणारी तीची सखी साठेलकारीन हे पाञ लेखीका उषा परब यांनी छान प्रकारे मांडल आहे. एकटी अन् एकाकी पडलेली गोदाक्का कायम आपल्या मुलाची वाट पहात असते तो कधीतरी येईल अन् माझ्या हालअपेष्टांचा शेवट होईल अशी तिला आशा वाटत असते. ती आपल मन साठेलकारीन या समवयस्क शेजारणीकडे उघड करत असते. अन् साठेलकारीन मायेन तिला सांभाळत असते.

काही वर्षानी गजा खरोखरच घरी परत येतो. गोदाक्काला एक आशेचा किरण दिसतो. पण हे सगळ काही दिवसापर्यतच टिकत. गजा खुप बदललेला असतो. एवढी वर्षे घराबाहेर राहील्याने दारू , पत्ते अशा व्यसनात तो बुडालेला असतो. काही काम न करता टवाळखोरी करणार्‍या गजा मुळे इतकी वर्ष ज्या दिर जावेने गोदाक्काचा संभाळ केलेला असतो ती लोक यांना घराबाहेर काडतात. गोदाक्काचा अपेक्षाभंग होतो. "लग्न केल्यावर पोरगा सुधारेल" या आशेने ती गजाच्या लग्नाच्या मागे लागते. साठेलकारीनच्या मदतीने आपल्या पाहुण्यातील गरीब पोरगी सुन म्हणुन घरी आणते. गजा मधे काडीचाही फरक पडत नाही उलट तो अजुनच मस्तवाल होतो. सुन म्हणुन आलेली पोरगी गरीबा घरची पण खुपच गुणी असते. ती घरची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेते. स्वतः मोलमजुरी करते. सासु नवर्‍याला खुष ठेवते. कादंबरीत या ठिकाणी स्रीयांची होणारी मानसिक, शारीरिक उपेक्षा ठळकपणे मांडली आहे.

यात गजा आणि बाबी यांची मैञि ही व्यसनाधीन आणि वासनेने आंधळी झालेली दाखवली आहे. खुळाबाय ही वेडी पोरगी गावभर फिरत असते. दोन वेळच्या जेवणाची तजवीज करावी अन् कुठेतरी अंग टेकाव हेच तीच काम. वेडेपणाचा फायदा घेऊन तिच्या शरिराचा उपभोग घेताना गजा आणि बाबी यांच्यातील हैवान नजरेस पडतो. अन् मन कावरबावर होत. तिला खाऊचा हव्यास दाखऊन तिचा उपभोग घेऊन नंतर तिला हाकलुन देण तिला मारहाण करण यातुन गजाची निच प्रवृत्ती दिसुन येते. अशा संबंधातुन तिच बाळंतपण तिच एका बाळाला जन्म देण. ते बाळ जन्माला येताच मरण पावण हे सर्व वाचताना अंगावर काटा उभा राहतो.

या कादंबरीचा शेवट वाचताना एक भयानक प्रसंग उभा राहतो. त्यात गजाची विकृत मनोवृत्ती कोणता स्तर गाठते याचा सुरवातीला वाचताना विचारही आला नव्होता येवढा शेवट मनाला लागुन जातो. घरच्या अंगणातील रोज पुजली जाणारी तुळस अचानक उखडून पडावी अन् सगळ्या संस्कारांचा पालापाचोळा व्हावा तसच काहीस निच कार्य गजा वासनेच्या आहारी जाऊन करतो. बेदकार, मवाली गजा त्याची सोशिक अन् कष्टाळु बायको. अन् अगतिक आई गोदाक्का यांच्या नातेसंबंधात गुंतवुन ठेवणारी ही कादंबरी अनेक सामाजिक प्रश्न उभे करते तर अनेक प्रश्नांची उत्तरे ही स्वतःच देते.

बाकी आबाच्या दुकानावर रंगणाऱ्या गावच्या गजाली. त्याला मिठ-मिर्ची लावणार नारु सारख चालत बोलत वर्तमान पञ. गावात होणाय्रा बैलांच्या झुंजी त्या झुंजीत मुक्या प्राण्यांचे होणारे हाल लेखीका उषा परब यांनी छान प्रकारे मांडलेत. एकंदरीत या कादंबरीत स्ञी जिवनाच्या नशिबी आलेले भोग पाहुन स्तब्ध व्हायला होत. कुसवा म्हणजे कुस हा शब्द आईची कुस या अर्थाने. कुस धन्य व्हावी म्हणून धडपडणारी आई अन् नालायक पोर या नातेसंबंधावर बोलणारी ही कादंबरी कुसवा हे नाव सार्थक ठरवते.


Source: INTERNET
-संदिप बोऱ्हाडे
वडगाव मावळ, पुणे

  पुस्तकांवर माझे खूप प्रेम आहे..मला अनेक आणि खूप पुस्तक वाचायला आवडतात.. असेच एक पुस्तक वाचनात काही दिवसांपूर्वी आले.. दया पवार यांचे बलुत..

    या पुस्तकाबद्दल खूप ऐकले होते पण प्रत्यक्षात वाचायला मिळाले..बलुतं पहिल्यांदा वाचले.  पुस्तक वाचून आपण हादरतो, मन सुन्न होते... हे तेव्हाच उमजलं. मुळासकट हादरलो. खूप रडवलं या पुस्तकानं. एखादं पुस्तक आपल्या आयुष्याचा कायमचा भाग व्हावं हे काम सर्वात प्रथम करणारं पुस्तक म्हणजे बलुतं.

  बलुतंच्या प्रस्तावनेतल्या
एका वाक्याने माझा जगण्याचा दृष्टीकोनच बदलुन गेला.
" त्यावेळी मी झोपडपट्टीत राहायचो. मध्यमवर्गीय मित्रांना घरी न्यायला मला लाज वाटायची. बलुतंमध्ये दया पवार यांनी लिहिलंय, "आपल्याला कशाला लाज वाटायला हवी? वाटायची तर लाज ज्यांनी आपल्यावर हे गुहाजीवन लादलं त्यांना वाटायाला हवी!

बलुतं म्हणजे सामाजिक जाणिवा निर्माण करणारं बाळकडू आहे. जात-धर्म सोडून केवळ माणूस म्हणून जगायला सुरवात करायला लावणारं हे पुस्तक आहे.

 उगीच शिक्षण घेतलं, नसत्या इंगळ्या डसल्या नसत्या....एक त्या पुस्तकातील हे वाक्य खूप काही शिकवून जाते.

Source: INTERNET
-सानप बालाजी,
बीड.
        The Journey Home या पुस्तकाचे मराठीत भाषांतरित तृषार्थ पथीक हे पुस्तक माझ्या नुकतंच वाचनात आलेल्या पुस्तकांच्या यादीमध्ये आहे पण आणि नाही पण कारण हे पुस्तक मी 2013 पासून दरवर्षी वाचतो  आणि त्या पुस्तकापासून/लेखकापासून प्रेरणा घेण्याचा प्रयत्न करतो...
        हे पुस्तक परम पूज्य राधानाथ स्वामी महाराजांचे आत्मचरित्र असून, यापुस्तकात एक तरुण युवक रिचर्ड ज्याने आपल्या वयाची विशीही पार केली नाही असा हा तरुण त्याच्या आतल्या आवाजाच्या शोधामध्ये अमेरिकेहून निघतो आणि शेवटी भारतामध्ये येऊन थांबतो.
        अमेरिका ते युरोप विमानाने, नंतर मात्र कधी पायी तर कधी गाडी ट्रॅव्हल्स इत्यादी द्वारे लेखक भारतामध्ये पोहोचतात. अत्यंत खडतर व रोमांचकारी अनुभवान लेखकांनी घेतला. हा अनुभव वाचतानाही अंगावर शहारे उमटू लागतात तर कधी डोळ्यात पाणी येते.
        भारतामध्ये आल्यानंतर लेखकाना आलेले चांगले वाईट अनुभव ते खूप चांगल्या पद्धतीने वर्णन करतात. हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला हे तर नक्कीच कळेल की भारत किती महान देश आहे...? आणि महान आहे तर का आहे...? भारताची अध्यात्मिक ताकत किती आहे....? आपण खरेच पाश्चिमात्यलोकांचे अनुकरण करायला हवे का...? भारतीय संस्कृती किती महान आहे...?
        या पुस्तकात रिचर्ड नावाचा साधा अमेरिकन मुलगा पुढे चालून परम पूज्य राधानाथ स्वामी कसा बनतो याचा सविस्तर वर्णन या पुस्तकामध्ये आहे.
        आता सध्या भारतीय लोक पाश्चिमात्य लोकांचे अनुकरण करत आहेत तर परम पूज्य राधानाथ स्वामी महाराज भारतीयांसोबत संपूर्ण जगाला कृष्णभावनेचा  आणि भारतीय संस्कृतीचा प्रचार करत आहेत...!!! हरे कृष्ण...

Source: INTERNET
 -अर्जुन रामहरी गोडगे
  सिरसाव ता.परंडा जि. उस्मानाबाद

           "तमाशा विठ्ठाबाईच्या जीवनाचा" हे योगीराज बाबूल लिखित पुस्तक त्याचे आत्मचरित्र्यात्मक पुस्तक माझा वाचनात आले.....खरं तमाशा ह्या लोककलेच्या माध्यमातून तीन दशके महाराष्ट्र तील लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या विठ्ठाबाईच्या जीवनाच्या झालेला तमाशा वाचताना वाईट वाटले.

            आयुष्याभर भरपूर पैसा कमावला पण तो लुटला दुसऱ्यानि त्याचे वर्णन लेखकाने अत्यंत विद्रोहीपणे केले आहे. मालती इनामदार, मंगला बनसोडे,  भारती व एका मुलीचे नाव विसरलो. आशा तमाशातील चार दिगग्ज पोरी असताना सुद्दा त्याचे निधन झाल्यावर २००२ साली दवाखान्यात भरण्यासाठी पैसे नव्हते.

           आज तमाशा सर्वोच्च पुरस्कार (विठ्ठाबाई नारायणगावकर जीवनगौरव) नावाने दिला. त्याचे लोककेलेतील योगदान याला तोड नाही. पुस्तक वाचताना मी ते पुस्तक हातात घेतले दहा तासाने ते पुस्तक वाचूनच संपवले. वाचकप्रेमी मंडळीने हे पुस्तक जरूर वाचावे. माझा वाचनातील अनमोल पुस्तक होते मी समजतो.


Source: INTERNET
-करण बायस  
जि. हिंगोली

बऱ्याच दिवसापासून एक पुस्तक वाचायचं पेंडिंग राहिलं होतं,आज-उद्या बघु करता करता दिवाळी आली आणि वेळ मिळाला तसा तो पुस्तक उघडला आणि वाचायला सुरुवात केली. पुस्तकाचं नाव होतं How to win friends & influence people  ,लेखक Dale Carnegie.
मी जास्त बोलका नाही आणि माझं फ्रेंड झोन छोटं आहे कदाचित यामुळे मी हे पुस्तक वाचायचं ठरवलं होतं.
या पुस्तकात लेखकाने काही तत्वे सांगितली आहेत जर आपण ती तत्वे रोजच्या व्यावहारिक जीवनात वापरली तर आपल्याला इतरांशी संवाद साधण्यात सोपं जाईल,नवीन नाते कशे बनवायचे ते नाते कशा प्रकारे टिकवायचे याबद्दल ही तत्वे सांगतात.

Source: INTERNET
-मयूर डुमणे,
उस्मानाबाद

उत्तम कांबळे यांच "आई समजून घेताना" हे माझ्या नुकतच वाचनात आलेलं पुस्तक. अडाणी असलेल्या आईच व्यापक शहाणपण या पुस्तकात दिसून येतं. पोराला पैसे देण्यासाठी  25 किमी पायी प्रवास करणारी आक्का,भुकेमुळे पोटात लागलेली आग पाणी पिऊन भूकेला शांत करणारी आई, दुसऱ्याच्या रानातील पिकांच्या चोऱ्या करणारी आक्का. " काय रे भाड्या मला काय तुला चोर बनवायचंय? तू खूप शाळा शिक आणि मोठा हो" असं बोलून संसार चालविण्यासाठी चोऱ्या करणारी आई. दलित जातीत जन्माला आलेला, अत्यन्त गरिबीत वाढलेला पोरगा एका प्रतिष्ठित दैनिकाचा संपादक होतो या यशामागचा महत्वाचा वाटा आहे आक्काचा. हे पुस्तक वाचताना मुलावर जीवापाड प्रेम करणाऱ्या आईच तर दर्शन होतच त्याचबरोबर एका प्रगल्भ अडाणी आईच देखील दर्शन घडतं. मुलगा कितीही शिकून मोठा झाला तरी आई बरोबर झालेल्या वैचारिक द्वंद्वात येथे मुलालाच पराभव पत्करावा लागतोय.या पुस्तकातील काही प्रसंग वाचताना डोळे आपोआप भरून येतात. हे पुस्तक प्रत्येक वाचकाला स्वतःच्या आईची आठवण करून देते. या आक्काने उत्तम कांबळेंना घडवून साहित्य आणि समाज घडविण्याचे कामच जणू त्यांच्यावर सोपविले आहे. समाज, संस्कृती,काळानुसार समाजात झालेले बदल या गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर अशाप्रकारचं दर्जेदार साहित्य वाचलं पाहीजे.

Source: INTERNET
-अपेक्षा मानाजी
मुंबई

बर्लिन,रोम,लंडन,मॉस्को,रंगून,आणि टोकियोच्या दफ्टरखण्यातील दुर्मिळ दस्ताएेवजांच्या आणि सुभाषबाबूंच्या सहकाऱ्यांच्या भूतकाळातील वादळी रणवाटेवर भ्रमण करून आल्यावर जन्म झाला तो "महानायक" चा.
मातृभूमीच्या प्रेमाने ओथंबलेला उत्तुंग महापुरुष, शाळेत वाचलेल्या सुभाषचंद्रंपेक्षा खूप वेगळा होता. आझादीच्या वेडापायी अर्ध जग पिंजून काढणाऱ्या सुभाषचं संपूर्ण जीवनच वादळी,संघर्षमय व नाट्यमय प्रसंगांनी खचाखच भरलेले होते.त्याचा धगधगता संघर्ष परकियांपेक्षाही जास्त काटेरी स्वकियांशी होता.जपानने त्यांना व्यक्ती न मानता एक लढाऊ राष्ट्र मानावे इतके उंच पर्वताएवढे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. किशोरवयातच  राष्ट्रप्रेमाची बीजे त्यांच्या ह्रदयात रुतली त्याला खतपाणी घातले ते चित्तरंजनदास व शरदबाबूंनी.गांधी व त्यांचे संबंध जितके तणावाचे होते तितकेच जिव्हाळ्याचेही.गांधी,नेहरू, सुभाष त्रिकुट वाचताना माझ्या भावनांच पारडं सुभाष कडे कललेलं राहिलं.
आय. सी. एस. च्या नोकरीला लाथडणारा सुभाष, काँग्रेस अध्यक्ष सुभाष,गांधींच्या प्रचंड विरोधालाही न जुमानता सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपद जिंकणारा सुभाष,गंभीर आजारपणाला पायाखाली चिरडून अनेकदा मृत्यूला चकवा देणारा सुभाष, देशबंधुंचि छाती गर्वाने फुलून यावी असा शिष्य, ऑस्ट्रियन इमिलीच्या प्रेमात पडलेला हळवा सुभाष,ईंफाळ- कोहिमा - ब्रह्मदेशाच्या जंगलात घनघोर रणसंग्राम जुंपणारा सुभाष, प्राणप्रिय भारतमातेच्या चरणी अखेरच्या श्वासापर्यंत देह झिजविणारा सुभाष अशी त्यांची अनेक रूपे मला नव्याने गवसली.
विश्वास पाटलांचे हे पुस्तक मला पुस्तकांपेक्षा जास्त टाईम मशीन वाटली.सर्व प्रसंग फक्त डोळ्यांसमोर उभे राहत नाहीत तर ते आपण स्वतः अनुभवतोय की काय असा भास व्हायचा.महानायक माझ्यासाठी प्रचंड प्रभावशाली व आयुष्याला कलाटणी देणारं पुस्तक ठरलं.

             
- दत्तात्रय पाटील
 ठाणे, शहापूर

    वाचन करणे व वेळेची उपलब्धता पाहून लेखन करणे हा माझा स्थायीभाव. बालपणापासूनच वाचनाची आवड असल्याने अनेक पुस्तके वाचनात आली. आताच एक पुस्तक वाचनात आले आणि त्याने मनात घर केलंय ते पुस्तक म्हणजे " एक पूर्ण- अपूर्ण" होय. डॉ. नीला सत्यनारायण यांनी केलेले हे आत्मकथन प्रत्येकाच्या हृदयाचा ठाव घेईल असेच आहे.
     " एक पूर्ण- अपूर्ण" हे पुस्तक डॉ. नीला सत्यनारायण यांच्या स्वानुभवावर आधारित आहे. संवेदनशीलतेच्या  उंबरठ्यावर  स्वार असणाऱ्या साहसी आईचे दर्शन प्रत्येक प्रसंगात मनाला स्पर्शून जाते. खरं तर हे पुस्तक म्हणजे एक अग्निदिव्य अशी आईची परीक्षाच.
      "पूर्ण- अपूर्ण" हे पुस्तक 13 भागात विस्तारले असून प्रत्येक ठिकाणी आईच्या मनाची होणारी घालमेल  व त्याही परिस्थितीत खंबीरपणे स्वतःला सावरणारी आई पावलोपावली वर्णिलेली दिसून येते.
       मूल होणं ही प्रत्येक स्त्रिच्या दृष्टीने आनंदाचा क्षण.त्यातल्या त्यात मुलगा म्हणजे आणखीनच आनंद. हा मुलगा( चैतन्य) झाल्याचा आनंद " मुलगा झाला हो" या पहिल्या भागामध्ये सुरेखपणे वर्णिलेला आहे. चैतन्य हा मतिमंदत्वाने ग्रासल्याचे दु:ख "आनंद विखुरला " या भागातून अत्यंत समर्पकरित्या मांडलेले आहे. "डाऊन्स सिंड्रोम" हा शब्द ऐकताच आईच्या मनाची होणारी तगमग अंतर्मनाला साद घालते. " सत्वपरीक्षा " या भागातून चैतन्याचा सांभाळ करतानाच्या विविध घटनांचा वेध घेतलेला आहे. आपल्या अधिकार पदाचा कुठेही वापर न करता चैतन्याचा शाळेसाठीचा शोध आदर्शवत भासतो. चैतन्य व एकरूप झालेली आई यांचा सुयोग्य समतोल " आम्ही मनाने एकत्र आलो" या भागात पहावयास मिळतो . डॉक्टरांकडील विविध प्रसंग व प्रसंगी आईला सतत वाटणारी मुलाबद्दलची चिंता तसेच त्यावर केलेली मात याचे सुंदर वर्णन " मी भीतीवर मात केली" या भागात  केलेलेे दिसून येते.  एकापेक्षा एक अशा भावनेला साद घालणाऱ्या प्रसंगामुळे हे पुस्तक नक्कीच आपल्याही हृदयाला स्पर्श करेल यात यत्किंचितही शंका नाही.
      एकंदरीत डॉ. नीला सत्यनारायण यांचे आत्मनानुभवावर आधारित असणारे हे पुस्तक म्हणजे उत्कट  अविष्काराचा  उत्कृष्ट नमुनाच !



सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************