सानप बालाजी,बीड.
आता साजरी होणारी दिवाळी आणि माझ्या लहानपणी साजरी होणारी दिवाळी यामध्ये खूप साम्य आढळून येते. माझ्या लहानपणीची दिवळी कमित कमी 10 दिवस चालायची, आणि आता दिवाळीच्या दिवशीसुद्धा दिवाळी आहे अस वाटत नाही हा बदल अंगावर पडणाऱ्या जबाबदर्यांचा आहे की आणखी कशाचा हे मात्र मला आणखी कळले नाही.
लहानपणी घरच्यांना प्रेमाने सांगून, विनवणी करून, रुसून फुगून, तस न ऐकल्यास भांडणे करून फटाके वाजवण्याची जी मजा होती ती आज जबाबदारीच्या ओझ्याखाली हरवत चालली आहे का...?
लहानपणी प्रत्येक मित्राच्या घरी एक दिवस फराळासाठी फिक्स ठरलेला असायचा आता मात्र तू "काय करतो...? जॉब कसा चालू आहे...?" या मित्राच्या घरच्यांच्या प्रश्नाच्या भीतीने तिकडे जानही हळू हळू टाळलं जात.
आता लहान मुलांकडे पाहूनच जी काही दिवाळीची मजा मिळेल ती मिळो आणि आपले लहानपणीचे दिवस आठवून दुःखही होणार हे नक्की...!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
तेजस महापुरे, कराड.
दिवाळी म्हणजे खूप धमाल,मस्ती,रोषणाई, फराळ,भाऊबीजेला ला मोठ्या बहिणीला दिलेली कॅडबरी आणखी बरेच काही...माझा सर्वात आवडता सण आहे ही दिवाळी, जेव्हा डिसेंबर महिन्याच्या शेवटी पप्पा कॅलेंडर आणायचे तेव्हा मी पहिल्यांदा दिवाळी कोणत्या तारखेला आहे हे पाहायचो, मला ते खूप आवडत असे, आजही मी ते दरवर्षी नवीन कॅलेंडर आल्यावर करतोच... आणि जशी जशी दिवाळी जवळ येईल तसा तसा माझा उत्साह वाढत असे, प्रथम सत्र परीक्षा संपली रे संपली की मित्रांसोबत किल्ला तयार करायला सुरुवात करत असे, आमचा 4 ते 5 मित्रांचा ग्रुप प्रत्येकाच्या घराजवळ किल्ला बनवण्यासाठी येत असू, खरच जेव्हा तो किल्ला बनवून पूर्ण होईल त्यावेळी आमचा आनंद गगनात मावत नसे... किल्ला झाला की मग कपडे खरेदी,आकाशकंदील आणणे व छोटे आकाशकंदील घरी बनवणे तसेच फराळासाठी लागणारे सर्व साहित्य बाजारपेठेत जाऊन आणणे हे मला फार आवडायचं, पहिल्या पहाटे उठून उटणे लावून गरम पाण्याने केलेली आंघोळ नंतर घराबाहेर लावलेल्या पणत्या सर्वच काही अफलातून... दिवाळी मध्ये मित्रांकडे फराळाला जायचे हे ठरलेलंच असायचं आज याच्या घरी तर उद्या माझ्या घरी, मी तर कॉलनी मधल्या प्रत्येक घरात जाऊन दिवाळीच्या शुभेच्छा देत असे त्यात मला मोठा पराक्रम वाटे... 4 थी पर्यंत मी फटाक्यांना घाबरत असे, बाहेर फटाके वाजू लागले की मी शक्यतो बाहेर पडत नसे, नंतर हळू हळू मित्रांच्या मदतीने फटाके वाजवायला शिकलो, परंतु जस जस वायू प्रदूषणाबद्दल समजू लागल तस मी फटाके वाजवणं सोडून दिलं, 8 वी नंतर मी आजपर्यंत कधीही फटाके वाजवले नाहीत... खरच प्रत्येक वर्षीच्या दिवाळीच्या आठवणी या फार छान आहेत, या सणामुळे जस स्वतः आनंदी होतो तसेच दुसऱ्यालाही आनंद आपण देऊ शकतो, असच आनंदी होऊया आणि दुसर्यांनाही आनंद वाटत राहूया, वि4 ग्रुप मधील माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना माझ्याकडून येणाऱ्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सिमाली भाटकर,रत्नागिरी.
दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण उत्सव. संपूर्ण आसमंतात फराळाचा सुगंध दरवळत असतो. फटाक्यांच्या आवाजाने आणि रोषणाईने निसर्ग कसा दुमदुमून जातो. घरोघरी रांगोळ्या सजल्या असतात. आकाश कंदील जणू काही आकाशातल्या चांदण्या सोबत स्पर्धेत सहभागी होतात. अशीच दिवाळी साजरी होत असते सगळीकडे अगदी तुमच्याकडे आणि माझ्याकडे सुद्धा.
पण कधी विचार केलात की की ऋणानुबंध असलेली नाती संपतात आणि उरतो एकाकी प्रवास तिथे दिवाळी कशी काय साजरी होत असेल. आयुष्यात पहिल्यांदाच गौप्यस्फोट होऊन अनाथ पणाच लेबल लावलं गेलं तिथे साजरी केली जाते आपल्या सारखी दिवाळी.
फुटपाथ वर बसून रांगोळ्या विकणारे, पणत्या मेणबत्त्या बनवणारी अपंग मुलं यांची दिवाळी ही दरवर्षी काहीतरी नवीन बदल घडवून आणणारी असते की काहीतरी नवकल्पाना घेऊन येणारी असते नाही माहिती ना?
खरंच खूप मोठा प्रश्न उपस्थित झाला मनात दिवाळीच्या निमित्ताने. शहरीकरण झाले लोक गावं सोडून शहरात येऊ लागले सणासुदीला गावी येता येता शहरातलेच होऊन गेले घरटे चुकल्या पाखरासारखे. आणि जीर्ण शरीर वाटेकडे डोळे लावून बसलेली दिसते एखादया गावात एखाद्या चातकासारखी.
हेच का आपले सण आज प्रत्येक जण मेसेज करतोय "आई बाबा ना असा किती बोनस मिळायचा की ते आमच्या चेहऱ्यावर हसू ठेवायचे." पण यातले किती जण त्याच आईबाबांना सोडून दूर परदेशी कदाचित कामानिमित्त बाहेर असतील मग ते एक हास्य पुन्हां उमळण्यासाठी त्यांच्या बॉस जवळ एक सुट्टी मिळू नये शोकांतिकाच आहे ना? कारण प्रत्येक जण हेच कारण देतो बॉस सुट्टी देत नाही. मला वाटत यांचे बॉस परग्रहवासी असावे काय बरोबर ना.
आपण दिवाळीत इतका फराळ बनवतो की शेवटी त्याला रस्त्यावर गाई गुरे यांची वाट पाहत तिष्ठत राहावं लागतं हीच का आपली दिवाळी. आणि हो हेच एखाद्या अनाथ आश्रम किंवा गरिबांना दिले तर काहीतरी पुण्य लाभेल या उद्देशाने तरी दान केले तर व्यर्थ नक्कीच नाही जाणार पण आपली विचार करण्याची कुवत फक्त रस्त्यापर्यंत च.
फटाके इतके वाजवतो आपण की अख्या वर्षभराच प्रदूषण एकाच दिवशी कारण दिवाळी एकदाच येते वर्षांतून लहान बाळ शेजाऱ्यांकडे, बीपी पेशंट शेजारी आम्हाला काय फटाके फोडणार हौस आहे.
मग शेजारी हॉस्पिटल आहे ही गोष्ट फारच दूर राहिली.
आहे ना विचार करण्यासारखी दिवाळी खरंच चांगला विचार करा दिवाळी सणांची मांदियाळी पण ती सर्वांचे सोबत प्रेमाने साजरी करूया, प्रदूषण रोखण्यासाठी चार फटाक्यांच्या सोबत एक झाड नक्की लावूया.
आपले मित्र परिवार नेहमीच येतात सणासुदीला एकदिवस ज्यांच्या आयुष्यात अंधार आहे ज्यांना सण एकाकी वाटत त्या अनाथांना भेट देवून एक गोड नात निर्माण करूया.
वृद्धाश्रमात देखील कुणीतरी वाट पाहत बसत नातवंडांची मग भेटायला जायला काय हरकत एक संध्याकाळ आजी आजोबा ना. या दिव्यांच्या सणात हजारो दिवे पेटवा पण त्यात एक दिवा असा असावा जो आपल्या सोबत इतरांच्या आयुष्यात प्रकाश पसरवले.
कारण आजही बरीच गावे फक्त दिव्यांच्या प्रकाशात जगतात कारण तिथं वीज पोहोचली नाही.
दिवाळीत खूप जण किल्ले करतात पण ज्या शिवरायांनी ही परंपरा दिली त्यांच्या आठवणी याच दिवाळी सुटीत आपण रंगरंगोटी करून खराब करतो. जे जपता येत नाही त्यांची प्रतिकृती बांधून काय उपयोग तुम्हीच सांगा?
मनाशी विचार करा आणि प्रेमाने दिवाळी साजरी करा. लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू निघो आपले आयुष्य.
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
राजश्री ठाकूर , मुंबई .
खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट , आटपाट नगर होत , तिथली प्रजा सुखी , राजा समाधानी , वर्षभर सणवार , धामधूम . सणवार जाऊन काही दिवस उरले तर माणसे रोजच जगणं जगायची . व्रत वैकल्ये , जागरण गोंधळ यांचा रतीब होताच .
एकूणच सुखासीन आयुष्य होते . हळूहळू दिवस पालटले , आटपाट नगरावर परचक्र आले , तशी या आधीही आक्रमणे होतीच पण माणसांनी धार्मिक असण बंद केलं नव्हतं . पण हे परचक्र मात्र वेगळं होत , रोजच्या जगण्यात हस्तक्षेप करणार होत .
परचक्राने नगरजनांना तंत्रज्ञान , गती , शिक्षण यांची झलक दाखविली . त्यांच्या प्रथा मोडीत काढण्याचा , फूट पाडण्याचा प्रयत्न केला .. आणि अहो आश्चर्यम् सख्खे भाऊ म्हणणारे पक्के वैरी म्हणून ठाकले . नगरातल्या शहाण्या तरुणांनी हे ओळखले , बुद्धी गहाण ठेवून फक्त धर्माधिष्ठित वागण्याने नगराची हि स्थिती झाली आहे असे त्यांनी ओळखले आणि शिक्षणावर भर दिला . पुन्हा दिवस पालटले परचक्र गेले . आटपाट नगर आता दोन गटात मोडले गेले , प्रथा परंपरा पाळणारे व न पाळणारे , दोन्ही बाजू आपल्या मतावर ठाम होत्या . त्यातून एक नवीन कट्टर समुदाय तयार झाला .
परस्पर मताचा आदर , वागणुकीतील स्वातंत्र्य या गोष्टी विस्मरणात गेल्या . मनाने कमकुवत झालेली माणस , माझं तेच खर म्हणण्यासाठी विकोपाला जाऊ लागली .
पुन्हा एक पुढची पिढी आली , या पिढीला कळत होत इतिहासातील सगळंच उत्तम नाही आणि विज्ञानाची सगळीच कोडी अजुन उलगडली नाहीत . मग त्यांनी काय केलं ? विज्ञान-तंत्रज्ञान आणि इतिहास परंपरा यांची सांगड घालायला सुरुवात केली . कधी जमलं कधी बिनसलं . मग झाला गोंधळ ..
काय चुकले ते ध्यानी येईना . नवीन मार्ग शोधता येईना आणि जुने सोडून देता येईना अशा वेळी त्यांनी एकच केले परिस्थितीला दोष द्यायला सुरुवात केले .. आधीचे सण कसे छान , आधीची माणसं कशी गोजिरवाणी , जमीन कशी सुपीक अन् अन्न कसं कसदार .. दिवाळीची अश्शी मजा असायची.. पण आता सगळं बदललं ...उसासा १ ..मग उसासा २ .... असे खूप उसासे , बदल नाही , फक्त कार्बन डायऑक्साइड मध्ये वाढ .
मग हे प्रमाण वाढत गेलं दर वेळी दिवाळीच्या आठवडा पंधरवडा आधीपासून माणसं हळहळायला सुरू करायची मग जमेल तस दिवाळी साजरी करून पुन्हा थोडी हळहळ व्यक्त केली की कंदील पणत्या आणि हळहळ माळ्यावर पुढच्या वर्षासाठी .
आता आटपाट नगर उसासे टाकत होते अशी कशी पोर हि माझी , यांना दोन घटका मौज करता यावी म्हणून सण आहेत याचा विसरच पडला आहे , त्यांनी आधी तर त्याला धार्मिकता चिकटवून टाकली आणि मग व्यवसायाच पॅकेजिंग . आपली कर्तव्ये पार पाडावी , उद्योगी असावे आणि त्यातून आपल्या ऐपतीने सवडीने सण साजरे करावे एवढी साधी गोष्ट यांच्या मठ्ठ डोक्यात का शिरत नाही बरे ? ऋणं कृत्वा घृतं पिबेत , हे कुठवर ? "
त्याला वाटत होत सांगावस , ' मनाचा आवाज ऐका .. कालपेक्षा आज चांगला आहे तुमचा ते बघा ना एकदा .. किती आयुष्ये घालवाल चणचण म्हणजेच आनंद हे मानण्यात ? आणि खरच एवढ वाटत की काल चांगला होता ठाम विश्वास आहे आनंद त्यातच आहे तर वागा की तसे कुणी अडवल आहे ? पण तुम्ही नाही करणार ते . आणि मी आज आनंदी आहे , मला हे जग हे तंत्रज्ञान आवडत असं सांगण्यात तर तुम्हाला कमीपणा वाटतो . पण आज काल साठी हळळणारे तुम्ही उद्या या आज साठी खंतावून असाल . जगायचं विज्ञान युगात , फायदे घ्यायचे पण मान्य करायचं नाही . जीव अजूनही मातीत आहे म्हणजे आपण संवेदनशील आहोत असा गोड समज करून घ्यायचा . संवेदनशीलता परिवर्तनक्षम असेल तरच खरी असते .
नाही वाटत ना नका करू सण साजरे . आणि वाटतयं ना तर करा . बदल स्वीकारा . भांडवल करू नका . "
दिवाळीच्या आधीच सांगितलं हे आटपाट नगराने .. किती लोक ऐकतात ( पाळण नव्हे फक्त ऐकावं विचार करावा एवढच वाटतयं नगराला ) .
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अपेक्षा मानाजी,मुंबई.
चाळीतली दिवाळी ज्यांना अनुभवता आली ते खरंच महाभग्यवान.सुदैवानं माझ बालपण शिवडीच्या बी. डी. डी चाळीत गेलं.तिथल्या दिवाळीचा थाट काही औरच होता.
दिवाळीची पूर्वतयारी दहा दिवस आधीपासून सुरू व्हायची. पंधरा दिवस आधीपासूनच बाबांकडे नव्या कपड्यांसाठी चकाटा लावला जायचा.त्यानंतर आईची फराळाची तयारी आणि शेजारून येणारा घमघमाट.आमच्याकडे कंदील घरीच बनवला जायचा,एकत्र कुटुंबामध्ये सणाची मजा काही औरच असते.बाबा व काका मिळून कंदील बनवायचे,त्यासाठीच्या कांड्या जमा करणे,कागदाला गोंद लावून देणे ही जबाबदारी माझ्यावर असायची मी ही ती फार जिकरिने पार पाडायची.
दिवाळीच्या दिवशी बोचऱ्या थंडीत भल्या पहाटे उठायला तसं जीवावरच यायचं.उटण्याचा गंध साऱ्या घरभर दरवळायचा.आई व काकी आम्हा सर्वांना ऊटणं लावून द्यायच्या.मग त्या नरकासुराचा टाचेखाली चिरडताना जणू आपणच त्याचा वध करतोय असं माझ्या भाबड्या बालमनाला वाटायचं.आम्ही सर्वजण एकत्र फराळावर ताव मारायचो.त्यातही बाबांनी बनविलेले कळीचे लाडू मला खास आवडायचे.तुपातले ते मऊ लाडू अगदी तोंडाच बोळक झालेल्या माणसानेही आवडीने खावेत असे असायचे.त्या लाडवाची चव आजही माझ्या जिभेवर रेंगाळते.बाबांना फटाके उडवायचा मोठा शौक होता.नानातऱ्हेच्या फटाक्यांचा खचचं घरात पडायचा.बाबा फटाके फोडायला पुढे असायचे आणि मी त्यांच्यामागे दुडूदुडू लावायची.
दिवाळीत आमची चाळ चमचमत्या पोषाखातल्या वधूसारखी दिसायची. निरनिरळया आकाराचे कंदील आणि टीमटीमते ईवलेशे दिवे दारांची शोभा वाढवायचे,त्यातही एखाद्या बड्या माणसाच्या दारावर काचेचे रंगीत पाण्याचे दिवे लागायचे,तेव्हा अशा दीव्यांचं फार अप्रूप वाटायचं.
आम्ही चाळीत मजल्यावरच फटाके फोडायचे त्यांच्या आवाजाने घरातली भांडी कॅब्रे डान्स करायची.सर्व चाळ एकत्र दिवाळी साजरी करायची,दिवाळी सारख्या सणाने आमच्या चाळीचा एकोपा जपला होता.आज इतक्या वर्षांनी खूप काही बदललं घरात इनमिन दोन माणसं तरीही आई हट्टाने दिवाळी पूर्वीसारखी साजरी करते. नुसतं दिवाळी आधिसारखी राहिली नाही बोलून चालणार नाही. दिवाळीच दिवाळीपण आणि तिच्यातला गोडवा जपणं आपल्या पिढीच्या हातात आहे आणि ह्याची सुरुवात स्वतः पासून होते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संगीता देशमुख,वसमत
या शेतकऱ्यांचा खरीपाचा हंगाम सुरू झालेला असतो. घरात धनधान्याची सुबत्ता असते. कृषीप्रधान देशातील बारा बलुतेदार आणि वासुदेव,गोंधळी,मसणजोगी,यासारखी अनेक लोकं शेतकऱ्यावर अवलंबून असत. या लोकांचा अप्रत्यक्ष यांच्यावर हक्कच असायचा तो! जेवढही पिकेल त्यात या लोकांचा वाटा शेतकरी काढून ठेवत असत. आणि घरधनीन पण मोठ्या मनाने हे दान करत असे. म्हणून या काळात येणारा दिवाळसण फक्त शेतकऱ्यांसाठीच नाही तर सर्वासाठी आनंदाचा अन् उत्साहाचा असे. म्हणून पूर्वीच्या काळी वीज नसल्याने दिवाळीच्या काळात एखादा किलो तेल दिव्याला जाळणेही त्यांच्यासाठी आनंदाची बाब असायची. दिवाळीमुळे अशी शेतकऱ्यांची,त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांची मने आणि घरे उजळून निघत. तो मनाचा आणि घराचाही दीपोत्सव असायचा. पण आज जगाचा पोशिंदाच अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे स्वतःचे पोट भरण्यास असमर्थ ठरत आहे. पावसाच्या लहरीपणामुळे शेत बरोबर पिकत नाही,पिकले तर विकत नाही,विकले तर त्याला योग्य भाव मिळत नाही. इकडे यांत्रिकीकरणामुळे आणि जागतिकीकरणाच्या धोरणामुळे बलुतेदारांवर आणि छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. अशावेळी आज एकीकडे दिवाळी म्हणजे नुसता चंगळवाद असतो. पैशाची नुसती लयलूट सुरू असते आणि दुसरीकडे शेतकऱ्यांनी लागवडीसाठी घेतलेले कर्जच फिटत नाही,इतर गरीबांच्या घरात एका फोडणीसाठी तेल मिळणे दुरापास्त असते,तिथे दिव्यांची रोषणाई आणि फटाक्यांची आतषबाजी यांचा ते विचार तरी करू शकत असतील का?
अशावेळी मला माझ्या घरातील दिवाळी नजरेसमोर येण्याआधी असे चिंताग्रस्त चेहरे दिसतात आणि वाटते,मी भरमसाठ खर्च करून दिवाळी साजरी करत असेन तर त्यातला फार मोठा नाही पण "चिऊचा घास वंचितासाठी" नक्कीच काढू शकतो. असा अनेकांचा एकेक चिऊचा घास मिळून अनेकांची पोट भरू शकतात. तरच मला वाटते,मला माझी दिवाळी साजरी करण्याचा अधिकार आहे. कारण "सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझे माझ्या देशावर प्रेम आहेअसे आपण फक्त वाणीनेच न म्हणता कृतीतूनही ते प्रेम दिसले पाहिजे.
दरवर्षीप्रमाणेच यंदाही माझी दिवाळी मी आधी वंचितांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवूनच मग साजरी करणार आहे. यावर्षी वेगळी मोहीम आम्ही राबवत आहोत. दिवाळीनिमित्त आपण खरेदी मोठ्या प्रमाणात करतो. तिथे काहीही घासघीस न करता ते सांगेल त्या भावात खरेदी करतो. घासघीस करून फायदाही नसतो. पण शेतकऱ्याच्या मजबुरीचा गैरफायदा आपण घेतो. आणि तिथे घासघिस करतो. शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन भावही बऱ्याचदा मिळत नाही. त्यासाठी ग्राहकांमध्ये जागृती व्हावी,या हेतूने सुरुवात म्हणून शेतकऱ्याजवळचीच झेंडूची फुले घ्यायची,बाजारात कोणताही भाव असो, मी ५०/ रु कि. प्रमाणे आणि कमीत कमी ५कि घ्यायचेच अशी एक चळवळ उभी केली. त्याचप्रमाणे *संवाद* मार्फत यंदा "शांतिवन आर्वी,जि बीड" येथे स्वतःकडून व मित्रमैत्रिणीकडून धान्य,पैसे आणि दिवाळीचे साहित्य नेऊन देत आहोत. मला वाटते,आपण दिवाळी हा सण खूप मोठा मानतो. मग तो सगळ्यानाच आनंददायी ठरावा,म्हणून ही माझी व माझ्या कुटुंबाची व ठरलेल्या मित्रमैत्रिणीची दिवाळी भविष्यातही अशीच चालू राहील. आणि कृषिप्रधान देशातील दिवाळी अशीच सर्वांचीच दातृत्वाची राहो. माझे घर दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघताना वंचिताच्या घरालाही माझ्याच एका पणतीने उजळून टाकावं.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
वैशाली खरात गोरे , सोलापूर .
दिवाळी हा सण आपल्या कुटुंबातच नाही तर सर्व समाजात साजरा होतो. सर्व सनात हा सण मोठा मानला जातो.ह्या सणा दिवशी घरात सगळे एकत्र यायचे आणि सगळ्यांच्या गप्पा गोष्टी चालू होत असत आपापले अनुभव सांगायचे ,ते दिवसच खूप छान होते,सगळे जण आनंदात असायचे.नव नवीन ड्रेस घेणे फटाके उडवणे हे सगळ नवीन राहायचं त्यामुळें खूप ऊसुक्ता असायची दिवाळी चालू होयच्या आधी अस वाटायचं की कधी एकदा सुट्टी लागती आणि कधी किल्ले बनवायला चालू करतोय , ज्यादिवशी सुट्टी लागायची त्या दिवशी पेपर च गांभीर्य ही एवढं नसायचं पण सुट्टी लागायची याचा खूप आनंद असायचा एकदा की सुट्टी लागली की मग चालू होयच नवीन कपडे घ्याचे फटकड्या आणायच्या आणि किल्ला बनवायचा. किल्ला बनवताना माती दगड विटा गोळा करून आणायचो किल्ला बनवायचा म्हणल की ४,5 दिवस लागायचे किल्यावर मावळे ठेवायचे आणि सगळ्यात वरती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवायचो , कील्याच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांचं नाव मोहरी टाकून काढायचो आणि किल्ला बनवल्याचा एवढा आनंदा हॉयचा की सगल्याना सांगत फिरायचो आणि गल्लीतील सगळ्यांचे किल्ले बघायचो खूप मजा यायची त्या वेळेस दिवाळीचं फराळ साठी आई ला कामात मदत करायची नवीन नवीन कपडे घालायचे फटाकड्या उडवायच्या , फटाके उडवताना अमचात आणि चुलत काका मधे शर्यत लागायची एक मेकानच्या घरावर रॉकेट सोडायची खूप मजा यायची त्या वेळेस सगळ्यांचं घरी फराळाला जायचे आणि त्यांना पण आपल्या घरी बोलवायचं भावाला आंघोळ घालताना आमचे रोज नंबर असायचे आणि त्याचा कडून गिफ्ट घेयची आतुर असायची पण आता लहपणीच्या दिवली एवढी मजा नाही येत नाही कारण आता आपली जागा आपल्या पुतण्यानी व भाच्यानी घेतली आहे आणि म्हणुच मजेची ज्जिमेदरीच निघून गेलीय अस वाटत कधी कधी अस वाट की आपण अजुन एकदा लहान व्हावं आणि ते दिवस यावे . यावरून मला एक म्हण आठवते लहान पण देगा देवा मुंगी साखरेचा रवा.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा