माझ्या नुकतंच वाचण्यात आलेलं पुस्तक...

माझ्या नुकतंच वाचण्यात आलेलं पुस्तक...

🌱वि४🌿 या व्हाट्सअप ग्रुपवरून

माझ्या नुकतंच वाचण्यात आलेलं पुस्तक...


Source: INTERNET
-वाल्मिक फड महाजनपूर
नाशिक          

    मी अनेक पुस्तके वाचली,पण एक पुस्तक जेव्हा वाचलं तर मला धरणग्रस्तांच्या ,पुरग्रस्तांच्या काय अडचणी,त्यांची होणारी कोंडी काय असते ह्याचा मला प्रत्यय आला." झाडाझडती " असं त्या पुस्तकाचं नाव.नेमके बायजाबाईचे शेत,घर ,विहीर असा सगळा संसार तिचा धरणामध्ये गेला.त्यांचेच तालुक्याचे  आमदार आण्णा साहेब यांनी शब्द दिला होता की,तुमच्या जमीनीच्या मोबदल्यात तुम्हाला जमीनी मिळतिल परंतु,प्रत्यक्षात जेव्हा कामाला सुरूवात झाली तेव्हा खरी राजकारण्यांची पोलखोल झाली.त्यांनी आपली औकात दाखवायला सुरूवात केली.जेव्हा बायजाबाईच्या घरावर बुलडोजर फिरू लागला त्या वेळेस वाचताना माझे डोळे अक्षरशः पाण्याने भरून आले.त्यानंतर जेव्हा त्यांच्या पुणरवसन करण्याची पाळी आली तर आमदाराचा मुलगा अतिशहाणा झाला.        दुसरीकडे जमीन मिळाल्यावर सगळे धरणग्रस्त दुसऱ्या गावात रहायला गेले.तिथेही त्यांच्यावर अत्याचार होऊ लागले.बरेच दिवस गेल्यानंतर जेव्हा बायजाबाईच्या मुलाचे लग्न झाले ,त्या वेळेस तेथील गावच्या वतनदारांनी तिच्या सुनबाईकडे वाईट नजरेनं पाहिलं ते काही बायजाबाईच्या मुलाला सहन झाले नाही आणि त्या भांडणात बायजाबाईच्या मुलाचा अंत झाला.हे पुस्तक वाचत असताना बर्याच वेळेस माझे डोळे पाणावले.खरं तर खूप लिहिले असते पण शब्द मर्यादा असल्यामुळे थांबतो नाहीतर बरेच प्रसंग राहून गेले आहेत.क्षमस्व;                मि एक शेतकरी माणूस  आहे ९वी शिकलेला काही चुका झाल्यास माफी असावी.

Source: INTERNET
-अक्षय गांवकर.
ता. सावंतवाडी.

माझ्या वाढदिवसा निमित्त माझा पार्टनर रुपेश परब ( भाई ) याने भेट म्हणून दिलेली उषा परब यांची कुसवा ही कादंबरी काही दिवसांन पुर्वीच वाचुन पुर्ण झाली. तसा मी नियमित वाचक आहे थोडफार लिहीतोही पण एखादी कादंबरी वाचुन त्यावर लिहीणे हे कधी केल नव्होत. काल वि४ ग्रुप मध्ये हा विषय पाहीला आणि पहिल्यादांच लिहायच ठरवलं. मनाला जे भावल, वाचताना जे वाटल तेच शब्द रूपात मांडण्याचा प्रयत्न केलाय.
कादंबरी आपल्या कोकणातील ग्रामीण भागातील असल्याने वाचताना कादंबरीची सुरवात मस्त झाली. सोबतीला मालवणी भाषा, बर्याच मालवणी म्हणी अन् कोकणी लोकगीत यामधुन पुन्हा अनुभवता आली. बालपण डोळ्यांसमोर उभ राहील. माझ्या आत्ता पर्यंतच्या आयुष्यात वाचलेल सगळ ललित अन् कथाच. कादंबरी पहिलीच तीही मालवणी मुलुखातली म्हणुन जरा मन लावुनच वाचत होतो.

डॉ. तारा भवाळकर यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेत त्यांनी असा उल्लेख केलाय की ही कादंबरी वाचताना एकदा हाती घेतलेल पुस्तक पुन्हा खाली ठेवावस वाटत नाही. असच काहीस माझ्या सोबत घडत होत. कादंबरी वाचकाला खिळवून ठेवते. सरसर एक एक प्रसंग घडुन जातो अन् फुडे काय याची उत्सुकता लागुन राहते.

कादंबरीची सुरवात पारधी पासुन होते. आत्ता तळकोकणात जास्त करुन शिकार हा शब्द वापरला जातो. आपल्या तळकोकणात देवांचे वार्षिक कार्यक्रम मार्गी लावण्यासाठी पारधी जंगलाच्या दिशेने वळताना दिसतात. आणि त्यात पहील्यांदाच पारधीला गेलेल्या गोदाक्काचा नवरा जानबाचा मृत्यु होतो. या पारधीचा प्रसंग अप्रतिमपणे लेखीकेने मांडला आहे. आपण स्वतःच पारधीला गेल्याचा भास होतो.

या पुढे पुर्ण कादंबरी ही गोदाक्का आणि तिचा मुलगा गजा यांवर बेतली आहे. गोदाक्काचा नवरा वारल्यावर गजा हा तीचा मुलगा काही वर्षांनी गाव सोडुन पळुन जातो. या अशा अवस्थेत गोदाक्काची पाठराखीण करणारी तीची सखी साठेलकारीन हे पाञ लेखीका उषा परब यांनी छान प्रकारे मांडल आहे. एकटी अन् एकाकी पडलेली गोदाक्का कायम आपल्या मुलाची वाट पहात असते तो कधीतरी येईल अन् माझ्या हालअपेष्टांचा शेवट होईल अशी तिला आशा वाटत असते. ती आपल मन साठेलकारीन या समवयस्क शेजारणीकडे उघड करत असते. अन् साठेलकारीन मायेन तिला सांभाळत असते.

काही वर्षानी गजा खरोखरच घरी परत येतो. गोदाक्काला एक आशेचा किरण दिसतो. पण हे सगळ काही दिवसापर्यतच टिकत. गजा खुप बदललेला असतो. एवढी वर्षे घराबाहेर राहील्याने दारू , पत्ते अशा व्यसनात तो बुडालेला असतो. काही काम न करता टवाळखोरी करणार्‍या गजा मुळे इतकी वर्ष ज्या दिर जावेने गोदाक्काचा संभाळ केलेला असतो ती लोक यांना घराबाहेर काडतात. गोदाक्काचा अपेक्षाभंग होतो. "लग्न केल्यावर पोरगा सुधारेल" या आशेने ती गजाच्या लग्नाच्या मागे लागते. साठेलकारीनच्या मदतीने आपल्या पाहुण्यातील गरीब पोरगी सुन म्हणुन घरी आणते. गजा मधे काडीचाही फरक पडत नाही उलट तो अजुनच मस्तवाल होतो. सुन म्हणुन आलेली पोरगी गरीबा घरची पण खुपच गुणी असते. ती घरची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेते. स्वतः मोलमजुरी करते. सासु नवर्‍याला खुष ठेवते. कादंबरीत या ठिकाणी स्रीयांची होणारी मानसिक, शारीरिक उपेक्षा ठळकपणे मांडली आहे.

यात गजा आणि बाबी यांची मैञि ही व्यसनाधीन आणि वासनेने आंधळी झालेली दाखवली आहे. खुळाबाय ही वेडी पोरगी गावभर फिरत असते. दोन वेळच्या जेवणाची तजवीज करावी अन् कुठेतरी अंग टेकाव हेच तीच काम. वेडेपणाचा फायदा घेऊन तिच्या शरिराचा उपभोग घेताना गजा आणि बाबी यांच्यातील हैवान नजरेस पडतो. अन् मन कावरबावर होत. तिला खाऊचा हव्यास दाखऊन तिचा उपभोग घेऊन नंतर तिला हाकलुन देण तिला मारहाण करण यातुन गजाची निच प्रवृत्ती दिसुन येते. अशा संबंधातुन तिच बाळंतपण तिच एका बाळाला जन्म देण. ते बाळ जन्माला येताच मरण पावण हे सर्व वाचताना अंगावर काटा उभा राहतो.

या कादंबरीचा शेवट वाचताना एक भयानक प्रसंग उभा राहतो. त्यात गजाची विकृत मनोवृत्ती कोणता स्तर गाठते याचा सुरवातीला वाचताना विचारही आला नव्होता येवढा शेवट मनाला लागुन जातो. घरच्या अंगणातील रोज पुजली जाणारी तुळस अचानक उखडून पडावी अन् सगळ्या संस्कारांचा पालापाचोळा व्हावा तसच काहीस निच कार्य गजा वासनेच्या आहारी जाऊन करतो. बेदकार, मवाली गजा त्याची सोशिक अन् कष्टाळु बायको. अन् अगतिक आई गोदाक्का यांच्या नातेसंबंधात गुंतवुन ठेवणारी ही कादंबरी अनेक सामाजिक प्रश्न उभे करते तर अनेक प्रश्नांची उत्तरे ही स्वतःच देते.

बाकी आबाच्या दुकानावर रंगणाऱ्या गावच्या गजाली. त्याला मिठ-मिर्ची लावणार नारु सारख चालत बोलत वर्तमान पञ. गावात होणाय्रा बैलांच्या झुंजी त्या झुंजीत मुक्या प्राण्यांचे होणारे हाल लेखीका उषा परब यांनी छान प्रकारे मांडलेत. एकंदरीत या कादंबरीत स्ञी जिवनाच्या नशिबी आलेले भोग पाहुन स्तब्ध व्हायला होत. कुसवा म्हणजे कुस हा शब्द आईची कुस या अर्थाने. कुस धन्य व्हावी म्हणून धडपडणारी आई अन् नालायक पोर या नातेसंबंधावर बोलणारी ही कादंबरी कुसवा हे नाव सार्थक ठरवते.


Source: INTERNET
-संदिप बोऱ्हाडे
वडगाव मावळ, पुणे

  पुस्तकांवर माझे खूप प्रेम आहे..मला अनेक आणि खूप पुस्तक वाचायला आवडतात.. असेच एक पुस्तक वाचनात काही दिवसांपूर्वी आले.. दया पवार यांचे बलुत..

    या पुस्तकाबद्दल खूप ऐकले होते पण प्रत्यक्षात वाचायला मिळाले..बलुतं पहिल्यांदा वाचले.  पुस्तक वाचून आपण हादरतो, मन सुन्न होते... हे तेव्हाच उमजलं. मुळासकट हादरलो. खूप रडवलं या पुस्तकानं. एखादं पुस्तक आपल्या आयुष्याचा कायमचा भाग व्हावं हे काम सर्वात प्रथम करणारं पुस्तक म्हणजे बलुतं.

  बलुतंच्या प्रस्तावनेतल्या
एका वाक्याने माझा जगण्याचा दृष्टीकोनच बदलुन गेला.
" त्यावेळी मी झोपडपट्टीत राहायचो. मध्यमवर्गीय मित्रांना घरी न्यायला मला लाज वाटायची. बलुतंमध्ये दया पवार यांनी लिहिलंय, "आपल्याला कशाला लाज वाटायला हवी? वाटायची तर लाज ज्यांनी आपल्यावर हे गुहाजीवन लादलं त्यांना वाटायाला हवी!

बलुतं म्हणजे सामाजिक जाणिवा निर्माण करणारं बाळकडू आहे. जात-धर्म सोडून केवळ माणूस म्हणून जगायला सुरवात करायला लावणारं हे पुस्तक आहे.

 उगीच शिक्षण घेतलं, नसत्या इंगळ्या डसल्या नसत्या....एक त्या पुस्तकातील हे वाक्य खूप काही शिकवून जाते.

Source: INTERNET
-सानप बालाजी,
बीड.
        The Journey Home या पुस्तकाचे मराठीत भाषांतरित तृषार्थ पथीक हे पुस्तक माझ्या नुकतंच वाचनात आलेल्या पुस्तकांच्या यादीमध्ये आहे पण आणि नाही पण कारण हे पुस्तक मी 2013 पासून दरवर्षी वाचतो  आणि त्या पुस्तकापासून/लेखकापासून प्रेरणा घेण्याचा प्रयत्न करतो...
        हे पुस्तक परम पूज्य राधानाथ स्वामी महाराजांचे आत्मचरित्र असून, यापुस्तकात एक तरुण युवक रिचर्ड ज्याने आपल्या वयाची विशीही पार केली नाही असा हा तरुण त्याच्या आतल्या आवाजाच्या शोधामध्ये अमेरिकेहून निघतो आणि शेवटी भारतामध्ये येऊन थांबतो.
        अमेरिका ते युरोप विमानाने, नंतर मात्र कधी पायी तर कधी गाडी ट्रॅव्हल्स इत्यादी द्वारे लेखक भारतामध्ये पोहोचतात. अत्यंत खडतर व रोमांचकारी अनुभवान लेखकांनी घेतला. हा अनुभव वाचतानाही अंगावर शहारे उमटू लागतात तर कधी डोळ्यात पाणी येते.
        भारतामध्ये आल्यानंतर लेखकाना आलेले चांगले वाईट अनुभव ते खूप चांगल्या पद्धतीने वर्णन करतात. हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला हे तर नक्कीच कळेल की भारत किती महान देश आहे...? आणि महान आहे तर का आहे...? भारताची अध्यात्मिक ताकत किती आहे....? आपण खरेच पाश्चिमात्यलोकांचे अनुकरण करायला हवे का...? भारतीय संस्कृती किती महान आहे...?
        या पुस्तकात रिचर्ड नावाचा साधा अमेरिकन मुलगा पुढे चालून परम पूज्य राधानाथ स्वामी कसा बनतो याचा सविस्तर वर्णन या पुस्तकामध्ये आहे.
        आता सध्या भारतीय लोक पाश्चिमात्य लोकांचे अनुकरण करत आहेत तर परम पूज्य राधानाथ स्वामी महाराज भारतीयांसोबत संपूर्ण जगाला कृष्णभावनेचा  आणि भारतीय संस्कृतीचा प्रचार करत आहेत...!!! हरे कृष्ण...

Source: INTERNET
 -अर्जुन रामहरी गोडगे
  सिरसाव ता.परंडा जि. उस्मानाबाद

           "तमाशा विठ्ठाबाईच्या जीवनाचा" हे योगीराज बाबूल लिखित पुस्तक त्याचे आत्मचरित्र्यात्मक पुस्तक माझा वाचनात आले.....खरं तमाशा ह्या लोककलेच्या माध्यमातून तीन दशके महाराष्ट्र तील लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या विठ्ठाबाईच्या जीवनाच्या झालेला तमाशा वाचताना वाईट वाटले.

            आयुष्याभर भरपूर पैसा कमावला पण तो लुटला दुसऱ्यानि त्याचे वर्णन लेखकाने अत्यंत विद्रोहीपणे केले आहे. मालती इनामदार, मंगला बनसोडे,  भारती व एका मुलीचे नाव विसरलो. आशा तमाशातील चार दिगग्ज पोरी असताना सुद्दा त्याचे निधन झाल्यावर २००२ साली दवाखान्यात भरण्यासाठी पैसे नव्हते.

           आज तमाशा सर्वोच्च पुरस्कार (विठ्ठाबाई नारायणगावकर जीवनगौरव) नावाने दिला. त्याचे लोककेलेतील योगदान याला तोड नाही. पुस्तक वाचताना मी ते पुस्तक हातात घेतले दहा तासाने ते पुस्तक वाचूनच संपवले. वाचकप्रेमी मंडळीने हे पुस्तक जरूर वाचावे. माझा वाचनातील अनमोल पुस्तक होते मी समजतो.


Source: INTERNET
-करण बायस  
जि. हिंगोली

बऱ्याच दिवसापासून एक पुस्तक वाचायचं पेंडिंग राहिलं होतं,आज-उद्या बघु करता करता दिवाळी आली आणि वेळ मिळाला तसा तो पुस्तक उघडला आणि वाचायला सुरुवात केली. पुस्तकाचं नाव होतं How to win friends & influence people  ,लेखक Dale Carnegie.
मी जास्त बोलका नाही आणि माझं फ्रेंड झोन छोटं आहे कदाचित यामुळे मी हे पुस्तक वाचायचं ठरवलं होतं.
या पुस्तकात लेखकाने काही तत्वे सांगितली आहेत जर आपण ती तत्वे रोजच्या व्यावहारिक जीवनात वापरली तर आपल्याला इतरांशी संवाद साधण्यात सोपं जाईल,नवीन नाते कशे बनवायचे ते नाते कशा प्रकारे टिकवायचे याबद्दल ही तत्वे सांगतात.

Source: INTERNET
-मयूर डुमणे,
उस्मानाबाद

उत्तम कांबळे यांच "आई समजून घेताना" हे माझ्या नुकतच वाचनात आलेलं पुस्तक. अडाणी असलेल्या आईच व्यापक शहाणपण या पुस्तकात दिसून येतं. पोराला पैसे देण्यासाठी  25 किमी पायी प्रवास करणारी आक्का,भुकेमुळे पोटात लागलेली आग पाणी पिऊन भूकेला शांत करणारी आई, दुसऱ्याच्या रानातील पिकांच्या चोऱ्या करणारी आक्का. " काय रे भाड्या मला काय तुला चोर बनवायचंय? तू खूप शाळा शिक आणि मोठा हो" असं बोलून संसार चालविण्यासाठी चोऱ्या करणारी आई. दलित जातीत जन्माला आलेला, अत्यन्त गरिबीत वाढलेला पोरगा एका प्रतिष्ठित दैनिकाचा संपादक होतो या यशामागचा महत्वाचा वाटा आहे आक्काचा. हे पुस्तक वाचताना मुलावर जीवापाड प्रेम करणाऱ्या आईच तर दर्शन होतच त्याचबरोबर एका प्रगल्भ अडाणी आईच देखील दर्शन घडतं. मुलगा कितीही शिकून मोठा झाला तरी आई बरोबर झालेल्या वैचारिक द्वंद्वात येथे मुलालाच पराभव पत्करावा लागतोय.या पुस्तकातील काही प्रसंग वाचताना डोळे आपोआप भरून येतात. हे पुस्तक प्रत्येक वाचकाला स्वतःच्या आईची आठवण करून देते. या आक्काने उत्तम कांबळेंना घडवून साहित्य आणि समाज घडविण्याचे कामच जणू त्यांच्यावर सोपविले आहे. समाज, संस्कृती,काळानुसार समाजात झालेले बदल या गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर अशाप्रकारचं दर्जेदार साहित्य वाचलं पाहीजे.

Source: INTERNET
-अपेक्षा मानाजी
मुंबई

बर्लिन,रोम,लंडन,मॉस्को,रंगून,आणि टोकियोच्या दफ्टरखण्यातील दुर्मिळ दस्ताएेवजांच्या आणि सुभाषबाबूंच्या सहकाऱ्यांच्या भूतकाळातील वादळी रणवाटेवर भ्रमण करून आल्यावर जन्म झाला तो "महानायक" चा.
मातृभूमीच्या प्रेमाने ओथंबलेला उत्तुंग महापुरुष, शाळेत वाचलेल्या सुभाषचंद्रंपेक्षा खूप वेगळा होता. आझादीच्या वेडापायी अर्ध जग पिंजून काढणाऱ्या सुभाषचं संपूर्ण जीवनच वादळी,संघर्षमय व नाट्यमय प्रसंगांनी खचाखच भरलेले होते.त्याचा धगधगता संघर्ष परकियांपेक्षाही जास्त काटेरी स्वकियांशी होता.जपानने त्यांना व्यक्ती न मानता एक लढाऊ राष्ट्र मानावे इतके उंच पर्वताएवढे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. किशोरवयातच  राष्ट्रप्रेमाची बीजे त्यांच्या ह्रदयात रुतली त्याला खतपाणी घातले ते चित्तरंजनदास व शरदबाबूंनी.गांधी व त्यांचे संबंध जितके तणावाचे होते तितकेच जिव्हाळ्याचेही.गांधी,नेहरू, सुभाष त्रिकुट वाचताना माझ्या भावनांच पारडं सुभाष कडे कललेलं राहिलं.
आय. सी. एस. च्या नोकरीला लाथडणारा सुभाष, काँग्रेस अध्यक्ष सुभाष,गांधींच्या प्रचंड विरोधालाही न जुमानता सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपद जिंकणारा सुभाष,गंभीर आजारपणाला पायाखाली चिरडून अनेकदा मृत्यूला चकवा देणारा सुभाष, देशबंधुंचि छाती गर्वाने फुलून यावी असा शिष्य, ऑस्ट्रियन इमिलीच्या प्रेमात पडलेला हळवा सुभाष,ईंफाळ- कोहिमा - ब्रह्मदेशाच्या जंगलात घनघोर रणसंग्राम जुंपणारा सुभाष, प्राणप्रिय भारतमातेच्या चरणी अखेरच्या श्वासापर्यंत देह झिजविणारा सुभाष अशी त्यांची अनेक रूपे मला नव्याने गवसली.
विश्वास पाटलांचे हे पुस्तक मला पुस्तकांपेक्षा जास्त टाईम मशीन वाटली.सर्व प्रसंग फक्त डोळ्यांसमोर उभे राहत नाहीत तर ते आपण स्वतः अनुभवतोय की काय असा भास व्हायचा.महानायक माझ्यासाठी प्रचंड प्रभावशाली व आयुष्याला कलाटणी देणारं पुस्तक ठरलं.

             
- दत्तात्रय पाटील
 ठाणे, शहापूर

    वाचन करणे व वेळेची उपलब्धता पाहून लेखन करणे हा माझा स्थायीभाव. बालपणापासूनच वाचनाची आवड असल्याने अनेक पुस्तके वाचनात आली. आताच एक पुस्तक वाचनात आले आणि त्याने मनात घर केलंय ते पुस्तक म्हणजे " एक पूर्ण- अपूर्ण" होय. डॉ. नीला सत्यनारायण यांनी केलेले हे आत्मकथन प्रत्येकाच्या हृदयाचा ठाव घेईल असेच आहे.
     " एक पूर्ण- अपूर्ण" हे पुस्तक डॉ. नीला सत्यनारायण यांच्या स्वानुभवावर आधारित आहे. संवेदनशीलतेच्या  उंबरठ्यावर  स्वार असणाऱ्या साहसी आईचे दर्शन प्रत्येक प्रसंगात मनाला स्पर्शून जाते. खरं तर हे पुस्तक म्हणजे एक अग्निदिव्य अशी आईची परीक्षाच.
      "पूर्ण- अपूर्ण" हे पुस्तक 13 भागात विस्तारले असून प्रत्येक ठिकाणी आईच्या मनाची होणारी घालमेल  व त्याही परिस्थितीत खंबीरपणे स्वतःला सावरणारी आई पावलोपावली वर्णिलेली दिसून येते.
       मूल होणं ही प्रत्येक स्त्रिच्या दृष्टीने आनंदाचा क्षण.त्यातल्या त्यात मुलगा म्हणजे आणखीनच आनंद. हा मुलगा( चैतन्य) झाल्याचा आनंद " मुलगा झाला हो" या पहिल्या भागामध्ये सुरेखपणे वर्णिलेला आहे. चैतन्य हा मतिमंदत्वाने ग्रासल्याचे दु:ख "आनंद विखुरला " या भागातून अत्यंत समर्पकरित्या मांडलेले आहे. "डाऊन्स सिंड्रोम" हा शब्द ऐकताच आईच्या मनाची होणारी तगमग अंतर्मनाला साद घालते. " सत्वपरीक्षा " या भागातून चैतन्याचा सांभाळ करतानाच्या विविध घटनांचा वेध घेतलेला आहे. आपल्या अधिकार पदाचा कुठेही वापर न करता चैतन्याचा शाळेसाठीचा शोध आदर्शवत भासतो. चैतन्य व एकरूप झालेली आई यांचा सुयोग्य समतोल " आम्ही मनाने एकत्र आलो" या भागात पहावयास मिळतो . डॉक्टरांकडील विविध प्रसंग व प्रसंगी आईला सतत वाटणारी मुलाबद्दलची चिंता तसेच त्यावर केलेली मात याचे सुंदर वर्णन " मी भीतीवर मात केली" या भागात  केलेलेे दिसून येते.  एकापेक्षा एक अशा भावनेला साद घालणाऱ्या प्रसंगामुळे हे पुस्तक नक्कीच आपल्याही हृदयाला स्पर्श करेल यात यत्किंचितही शंका नाही.
      एकंदरीत डॉ. नीला सत्यनारायण यांचे आत्मनानुभवावर आधारित असणारे हे पुस्तक म्हणजे उत्कट  अविष्काराचा  उत्कृष्ट नमुनाच !



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************