अव्यक्त प्रेम - भाग २ ( दुसरा )


अनिल गोडबोले,सोलापूर.

आता या विषयावर किती लिहायचे आणि काय लिहायचे हाच प्रश्न मला पडला..
आयुष्यात इतक्या वेळा प्रेम झालं आहे ना..! काही लक्षातच ठेवायच तरी अवघड आहे..
विशेष म्हणजे सर्व प्रेम अव्यक्तच राहिले हो..

मुळात प्रेम ही व्यक्त करायची गोष्ट असते हेच कळत नव्हतं. जेव्हा व्यक्त करावंसं वाटलं तेव्हा परिस्थिती किंवा वेळ दोन्ही साथ देत नव्हते..
तर काही किस्से किंवा अनुभव ..

मी शाळेत असताना एक बालवाडी मध्ये शिकवायला बालवाडी ताई यायच्या.. कोकणी पद्धतीने अबोलीच्या फुलांचा गजरा माळून.. त्या खूप छान वाटायच्या तेव्हा.. पण त्याना मात्र हे सांगायच राहून गेलं.

एकदा हायस्कुल मध्ये असताना नदीला पूर आला होता तेव्हा भातशेती पाण्यात गेली होती व रस्तायावरून पाणी चालले होते व खूप मोठा लाटेचा झोत आला तेव्हा एका गावातल्या माणसाने अगदी मला धरून उचलूनच रस्त्याच्या बाजूला नेले.. तेव्हा मीच इतका घाबरलेला होतो..पण त्याला काही बोलायचं झालंच नाही..

कॉलेज(11 वि आणि 12 वि मध्ये) एक मुलगी आवडत होती.. पण आपण काय सांगायची गरज पडली नाही.. पोरांमध्ये चिडवा चिडवी सुरू झाली आणि तिने बोलणं टाळलं.. तेपण व्यक्त करायचं राहून गेलं..

बीएस्सी करताना अजिबात काही घडल नाही कारण.. कॉलेज आणि अभ्यास यांच्यात जीव गेला. आणि सोलापुरात भीती पण वाटायची खूप.. उलट मुलींना अरे-तुरे सुद्धा करत नव्हतो..
मुलींना मी नोट्स देत होतो(म्हणजे मी किती हुशार आहे ते तुम्हाला कळलं असेल).. तर मुलींना परत मागता येत नव्हतं.. आता बिनधास्त बोलतात सगळे.. पण तेव्हा काय डोक्यात घेऊन होतो माहीत नाही.. पण बोलणं काही होत नव्हतं

एकदा बस ला पैसे कमी पडले एका बंजारा आजी ने माझं तिकीट काढलं.. त्यांना "धन्यवाद" व्यक्त करायच राहून गेलं.

बालकामगार शाळेत एका मुलाच्या घरी गेलो होतो.. त्यांनी परिस्थिती नसताना आम्हाला कँटीन वर चहा पाजला.. त्या मुलाला तर आम्ही शाळेत आणला पण डोळ्यात पाणी आणून माझ्या पोराला शिकवा म्हणणाऱ्या बापाला काहीच बोलू शकलो नाही..

मी हॉस्पिटलमध्ये काम करत असताना एक डॉक्टर होती.. तेलगू बोलायची.. माझं सोलापुरी हिंदी तिला कळत नसे.. आणि तीच तेलगू आणि हैद्राबाद हिंदी मला येत नसे.. पण तिची काम करण्याची पद्धत फार छान होती.. हे सांगायच राहून गेलं..काही चुकीच झालं की लगेच डॉक्टर ला ओरडत होतो आपण पण चांगल्या गोष्टी मात्र अव्यक्त राहतात.

एक पेशन्ट होती बऱ्याच आजारावर मात करून बाळाला जन्म देऊन मराठी बोलायला लागली.. मला मात्र एक कन्नड शब्द बोलायला जमलं।नाही.. तेव्हा या सगळ्याच कौतुक करायच राहून गेलं.

काही जवळचे न सांगताच कायमचे सोडून जातात.. आणि नंतर आपण त्यांना "असा होता.. आणि तसा होता" असे बोलत राहतो.. पण व्यक्त करत नाही..

खर सांगू का.. काही गोष्टी कितीही मनात आणल्या तरी व्यक्त करता येत नाहीत..
आणि आता बोलून काही उपयोग नाही..

अशा कितीतरी अव्यक्त गोष्टी व्यक्त करण्यात मजा नाही.. पण आता वाटत की"तेव्हा व्यक्त केल्या असत्या तर...!"

तर अशा सर्व व्यक्त आणि अव्यक्त प्रेमाना आता सांगू...


"खरच.. तुम्ही होतात म्हणून आज मी आहे.. अजून ही माझं तेवढंच प्रेम आहे तुमच्यावर..समजूत घ्याल अशी आशा आहे..!"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

बालाजी सानप,बीड.
         आमचा नववीचा पहिला दिवस असताना एका नवीन मुलीची वर्गात एन्ट्री झाली. आणि त्या मुलीने सरांना सांगितलं की  माझी मागच्या वर्षी सेमी इंग्लिश होत पण आता मला मराठी मेडिअममध्ये शिकायचं आहे. ही पहिली माझी आणि तिची भेट.
           शाळा जवळच्या व्यक्तीची असल्यामुळे शाळेमध्ये आमची गॅंग कोणालाच भीत नसायची. आणि आम्ही तर खूप मुलींना चिडवायचो. पण ती जर चुकून जरी समोर आली ना तरी चिडवायचे तर दूर पण मला काय बोलावे  नि काय नाही काहीच जमायचे नाही.
         सर्व मूल मला तिच्या नावानं चिडवत असल्याने तिला सुद्धा माहीत झालं होत की माझं तिच्यावर प्रेम आहे पण ती माझ्या पुढाकाराची वाट पाहत होती आणि मी तिच्या पुढाकाराची पण नंतर एकदा तिनेच पुढाकार घेतला आणि मला भेटायला आली, ती जशी माझ्या समोर येऊन उभा राहिली तसा मी 120च्या स्पीडणे गायब झालो.
           आजपर्यंत कोणत्याही मुलीला बोलायला, भांडायला, कारण असेल तर शिव्या द्यायलाही न घाबरणारा मूलगा त्या दिवशी कसा काय पळून जाऊ शकतो आणि फक्त एकाच मुलीला का भिऊ शकतो हे मला आणि माझ्या मित्रांना आजपर्यंत न सुटलेलं कोडं आहे.
           एकदा रक्षाबंधनाच्या वेळी सर्व मुली राख्या बांधायला आल्या आणि त्या मुलींनी अचानकच तिला माझ्यापुढे आणून उभा केलं मग माझी पण पंचायत आणि तिची पण मग मी समोर हात केला आणि बाजूला पाहू लागलो मग तिने राखी बांधली माझ्या मित्राला सांगितलं की माझी निळ्या रंगाची राखी आहे, आणि मी तिला 15 ते 20 डेरी मिल्क दिल्या मग मात्र माझं दिवसभर मन लागलं नाही, दुसऱ्या दिवशी हातातील 50 ते 60 राख्या कापताना मी निळी राखी सापडू लागलो आणि ती निळी राखी सगळ्यात शेवटी सापडली जेव्हा मी ती पहिली तेव्हा मी इतका खुश कधीच झालो नव्हतो जितका तेव्हा झालो कारण त्या राखीवर लिहिलेलं होत "HAPPY FRIENDSHIP DAY LOVELY FRIEND"  ते फ्रेंडशिप बँड माझ्याकडे आजही जशास तस आहे.
           तिला आयुष्यात जास्तीत जास्त 2 ते 3 वेळच बोललो असेल पण मदत मात्र खूप केली.ती बिचारी बोलायचं प्रयत्न करायची आणि मी मात्र न बोलता गायब होत असे.आमच्या बॅचच्या सर्व मूला मुलींना माहीत झालं होत. मी कोणत्या मुलीला काही बोललो की ति लगेच तिच्याकडे पहायच्या किंवा तीच नाव घ्यायच्या मग वाघाच्या रुबाबात बोलणारा बाल्या लगेच मांजर होऊन जायचा.
         शेवटी 10विचा सेंड ऑफ आला आणि तिच्याकडून मित्रांच्या अग्रहापोटी फक्त एक स्लॅमबुक लिहून घेऊ शकलो.तीच आमची शेवटची भेट. नंतर 10वीच्या परीक्षेनंतर आमच्या गल्लीमधील माझी बॅचमेट घरी अली आणि बोलली उद्या तीच लग्न आहे येणार का माझ्यासोबत जाऊ आपण.
        त्यादिवशी इतका त्रास झाला आणि मनाला निर्णय घेतला की आता बीड मध्ये नाही थांबायचं आणि मग पुढील शिक्षणासाठी मी बीड मध्ये न थांबता डायरेक्ट पंढरपूर गाठलं.
        नंतर जे बीड सोडलं ते आजपर्यंत...!!!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

पल्लवी वाघ,बुलढाणा.
             शेवटचं किंवा पहीलं प्रेम अशी कुठल्याही प्रकारची उपमा नाही देणार मी पण निखळ आहे माझ प्रेम. अव्यक्त असल तरी त्याच दु:ख नाही आणि सुखही नाही. त्याला गमावूनबसण्याचा पश्चाताप ही नाही आणि त्याला मिळवल्याचा आनंद ही नाही तर उत्साह आहे तो माझा आहे म्हणून खूप सार प्रेम करण्याचा.
माझा तो "तो "ना आहेसच असा पहिल्याच भेटीत प्रेमात पाडणारा आणि ह्या वाघिणीला प्रेमकवियत्री बनवणारा. मला असे वाटते यापूर्वी याला बर्‍याच वेळा बघितले होते पण त्यादिवशी तो माझ्या डोळ्यात जरा जास्तच भावला होता. कदाचित माझ्या स्वप्नातील राजकुमार तोच होता. त्या दिवशी जरा वेगळेच झाले लोक माझे होते,नेहमीप्रमाणे कौतुकही माझेच होते, जबाबदारीही माझीच वाढली होती, बोलायचे ही मलाच होते पण मी मात्र गप्प होते आणि तो मात्र बोलत होता जसे की मलाच सावरण्यासाठी तो आला होता आणि कौतुकाची थाप मात्र माझ्याच पाठीवर सुरू होती. तेव्हाच मात्र माझा चार्लि चाम्पलिन आल्याचा भास झाला.
नंतर आमच्या अवकाळी भेटी होत गेल्या त्यामुळे काही गोष्टी अचानक घडत गेल्या मी त्याच्या प्रेमात राधेसारखी कधी वेडी झाले हे मलाही कळले नाही. कवितेतुन व्यक्त होत गेले कविता मात्र पोचली त्यापर्यंत पण माझ्या भावना अजून त्याच्या मनापर्यंत पोहचल्या नाहीत.आम्ही फारसे अनोळखी नाही पण एकमेकांचे घट्ट मित्रही नाही. दोघेही छान ओळखतो एकमेकांना पण फार बोलतही नाही. तसा रस्ता दोघांचाही एक आहे पण ठरवून कधी नाही तर चुकूनच होतात आमच्या गाठीभेटी. विषय खूप असतात त्याच्याजवळ बोलयला पण मी कधीच त्याला हाय..! करत नाही. मी तर करते त्याच्यावर जीवापाड प्रेम पण व्यक्त व्हायला मला कधीच जमले नाही आणि ते कदाचित जमणार ही नाही. पण माझं प्रेम अव्यक्त असल्याची मला आजपर्यंत खंतही नाही आणि कदाचित राहणार ही नाही. जसा तो माझा आहे तसाच सगळ्यांचा आहे. स्रियांचा आदर आणि त्यांच्याविषयी काळजी हाच त्याच्या जीवनाचा खरा उद्देश आहे त्यामुळेच तो माझा खरा कोहिनूर आहे. फक्त खंत नाही पण मी त्याला पाहीजे हा माझा हट्टहास आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

R. सागर, सांगली.
           'ती पाहताच बाला, कलिजा खलास झाला..'
होय तीच.. जिच्यासोबत 3 वर्षे एकाच शाळेत एकत्र शिकत होतो तिला तब्बल 8 वर्षांनी पाहत होतो. ती समोर आली आणि क्षणात नजर भूतकाळात गेली. चौथी पास झालेलो आणि जिल्हा परिषदेची शाळा सोडून हायस्कुलला प्रवेश घेतलेला. तिचंही तेच. तिथंच तीही दिसली. ती आली.. तिनं पाहिलं.. अन मीही पाहातच राहिलो.. थोडीशी खोडकर पण तरीही निरागस. वर्गात कधी टॉपर नव्हती पण सगळ्यांपेक्षा शंका तिलाच जास्त असायच्या. कधी एकमेकांशी बोलायचा प्रसंग नाही आला पण ती समोर असली की भारी वाटायचं. आम्ही ज्या शाळेत शिकायचो तिथे 10वी पर्यंतची शिक्षणाची सोय होती. पण काय झालं काय माहीत. सातवी पास झालो अन तिने 8वीला दुसरीकडेच कुठेतरी प्रवेश घेतला. त्यानंतर त्या दिवशी पहिल्यांदाच तिला पाहात होतो. तोच चेहरा, तीच नजर..
.
शाळेत असताना एकत्र शिकलेलो त्यामुळं आधी कधी बोलणं झालेलं नसलं तरी एकमेकांची ओळख होतीच. त्यात इतक्या वर्षांनी अन इतक्या अनपेक्षितपणे एकमेकांसमोर आलेलो त्यामुळे एकमेकांना टाळून बाजूला जायची किंवा ओळख न दाखवायची शक्यता नव्हतीच. योगायोगाने ही भेट देखील शिक्षणाच्या निमित्तानेच झालेली. यावेळी एका वर्गात शिकणार नव्हतो पण एकाच ठिकाणी शिकायचं होतं.
.
नंतरच्या 2 वर्षात वरचेवर भेट होत राहिली. कधी सहज भेट व्हायची तर कधी मैत्रीच्या नात्यानं ठरवून भेटायचो. कधी कॉलेजमधल्या तर कधी घरच्या गोष्टींची चर्चा व्हायची. थट्टा-मस्करी, राग, रुसवा, कधी तिचा हट्टीपणा हे प्रत्येक भेटीत ठरलेलं असायचं. तिच्या मनात काय होतं माहीत नाही पण इकडे माझ्या डोक्यात टिकटिक वाजायला लागलेली.
.
त्यानंतर 3-4 वर्षे एकमेकांच्या संपर्कात होतो. पण माझ्या डोक्यातली टिकटिक अन काळजातली धडधड तिला कधी समजलीच नाही आणि मीही कधी ही गोष्ट तिला बोललो नाही. शेवटी एक दिवस तिचाच कॉल आला. लग्नाचं आमंत्रण द्यायला. तिचं लग्न झालं. ती संसाराला लागली. त्यानंतर दोघांकडूनही एकमेकांचा संपर्क कमी होत गेला. पण तरीही कधी तिची आठवण आलीच तर स्वतःचं प्रेम व्यक्त न केल्याची खंत वाटते...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

अनिकेत कांबळे,कोल्हापूर.

अव्यक्त प्रेम हे असंच असत,तिथे बोलायची हिम्मत नसते, एकतर्फी प्रेम खरं तर मला शोकांतिका वाटायची पण तो एकतर त्याग असतो नाहीतर अपेक्षा, तीन माझ्याशी बोलावं अशी अपेक्षा धरून असलेला मी मात्र अजूनही तसाच अव्यक्त आहे,याच कारण मात्र अजून उमगलं नाही,
        MA 1st मध्ये असताना सगळं नवीन होत,विद्यापीठात मी ही नवखा होतो,खूप स्वप्न घेऊन आलो होतो इथं पण सगळी स्वप्न पूर्ण करण्याच्या नादात मी एकटा असणं खूप महत्त्वाचं वाटत होतं,पण ही आयुष्याची शोकांतिका मला दूर करायची होती,तिला वर्गात पहिल्यादा पाहिली तेंव्हा अस काही वाटलं नाही कारण आजकाल स्वार्थी प्रेम मिळतं अस म्हणतात, तेवढ्यात माझी दुसरी एक मैत्रीण म्हंटली की आमच्या लेडीज हॉस्टेल मध्ये भांडण झाली तर समजून घेणारी ती एकमेव आहे,बस्स !!!झालं तिच्याकड असणारा समजूतदारपणा खूप भावला.माझ्या मोबाईल ची अर्धी मेमरी तिच्या फोटोनी गच्च भरली, त्यासाठी मी माझे फोटो डिलिट मारले..
           पण आपण अस बिनधास्त आणि ती मात्र माझ्याकडे न बघणं सुद्धा, त्यात दुसरं वर्ष चालू झाल सुद्धा पण करावं काय ,घराची ओढ लागली की जळजळीत वास्तव समोर येत आणि ही विद्यापीठाची स्वप्नाळू दुनिया विसरायला भाग पडत...कदाचित ती मला माझ्या प्रेमाला समजून घेईल की नाही या प्रश्नात मी खूप गुरफटून जातोय, मीच अव्यक्त होतोय, प्रेम तर खूप आहे पण वास्तव पाठ सोडत नाही, अगोदर वास्तवाशी झुंज देतो मग प्रेम नक्की मिळेल अशी आशा ठेऊन दररोज चा दिवस तिला ,तिच्या गालावरच्या खळी ला पाहून दिवस घालवायचा, हेच माझं अव्यक्त प्रेम.....
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संदिप बोऱ्हाडे( वडगाव मावळ, पुणे)

   माझी प्रेमाची परिभाषा थोडी वेगळी असल्याने अव्यक्त तरी कसे करायचे समजत नाही...आजकाल प्रेम म्हणजे फक्त फक्त स्त्री आणि पुरुषांचेच असते का..?? कदाचित माझे हे प्रेम या विषयात बसते का नाही माहिती नाही पण तरीही प्रयत्न..

   शालेय जीवनात जसे जसे वर्ग पुढे आपण जातो प्रथमिक शाळा, माध्यमिक, नंतर junior college , sinior college डिप्लोमा नंतर अजून खूप आहे..आणि या काळात या वयात नकळत अपल्याला कोण न कोण आवडत असतच...मग त्याला काय आपण लगेच प्रेम म्हणायचे का..?? माझ्यामते ते तर आकर्षणाच.. पण प्रेम हा शब्द खूप मोठा आहे.

     अस म्हणतात जग जिंकता येते प्रेमाने. पण फक्त ते प्रेम निस्वार्थ असायला पाहिजे..
जे रंग, रुप, जात, धर्म, श्रीमंती , गरिबी पाहून केले जात नाही त्याला ‘प्रेम’ म्हणतात.

    जगात सर्वात श्रेष्ठ प्रेम हे आईच सर्वांना माहिती असेलच पोटच्या लहान बाळाच्या प्रेमापोटी हिरकणी बुरुज उतरून गेली होती...
प्रेम करांव भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं..
प्रेम करावे बाबा आमटे यांच्यासारखं कुष्ठरोग्यांसारखे..
प्रेम कराव संत गाडगेबाबा यांच्यासारखे गरीब, दीन, दुबळ्यांवरील केलेले प्रेम..
प्रेम कराव  साने गुरुजींसारखे विद्यार्थ्यांनवरील प्रेम..

     प्रेम म्हणजे प्रेम असतं..
वडिलधार्यांवरच प्रेम , वास्तूवरच प्रेम , झाडांवरच प्रेम , प्राण्यांवरच प्रेम , भाषेवरच प्रेम , गावावरच प्रेम , माणसांवरच प्रेम , आणि सगळ्यात महत्वाचे माझे सर्वात जास्त पुस्तकांवरील प्रेम. काही लोक मोबाईल वर देखील खूप प्रेम करत असतील बरका 😀
आणि हो प्रेमाला वय, वस्तू, विशिष्ट गोष्ट, किंवा कशाचीच गरज नसते...ते कोणावरही, कश्यावरही आणि कधीही होऊ शकते त्याला वेळ , काळ , मर्यादा कसलेही बंधन अजिबात नाही.

    आईच प्रेम, वडिलांचं प्रेम, भाऊ-बहिण यांच्या मधील प्रेम एवढच कशाला.... मित्र प्रेम, शेजारी प्रेम (शेजारीण प्रेम नव्हे) असे कितीतरी नाते संबंध आहेत जे प्रेमाच्या पायावर भक्कम उभे आहेत. या प्रेमाविषयी आपण किती बोलतो तर अगदी थोडच.

    प्रेम ही भावना किती सुंदर आहे. मातृप्रेम, देशप्रेम, बंधुप्रेम, पुत्रप्रेम अशा कितीतरी परी तिला लाभल्यात. परंतु प्रेम म्हटले की आम्हाला आधी प्रियकर आणि प्रेयसी यांच्यामधीलच दिसत...

     प्रेमाला वय , मर्यादा  आणि मृत्यू नसतो.
प्रेम करावे कोणीही कुणावरही, त्याला नसाव तारखेचे बंधन,
प्रेम करावे स्वतःवर , समाजावर , देशावर, सृष्टीवर , विचारांवर ,
प्रत्येकाने प्रेम करावे माणुसकीवर .

    त्यामुळे माझ्या या सगळ्या प्रेमावर मी ना व्यक्त होऊ शकतो नाही अव्यक्त.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

नवनीता (शैलेश भोकरे),आळंदी

दुखरी नस आहे हा विषय. माणूस मऊ होतो; चुकून कधी तिचं नाव आठवलं की, क्षणाचाही विलंब न करता तिच्या 'वैशिष्ट्यांचा' विचार सुरू होतो.
कशी होती, कशी बोलायची, कशी हसायची....

खूप काही येऊन जातं क्षणात समोर..
पण आता काय उपयोग? काळ निघून गेलाय..
तेव्हा जर हिम्मत केली असती तर आज परिस्थिती वेगळी असती. स्वप्नांना पंख लागले असते... नव्हे नव्हे तिचे स्वप्न आपले आणि आपले स्वप्नही तिचे झाले असते...

पण मुळात माणूस हिम्मत का करत नाही?
ती नाही म्हणेल आणि मैत्रही राहणार नाही म्हणून किंवा ती नाही म्हणून अपमान करेल म्हणून...

खरं तर आपल्यातल्या बहुतेकांना ह्यावर विश्वासाच नाही की, मुली हो म्हणतात. त्यांची आतून इच्छा असते आपण त्यांना प्रपोज करावं अशी.

(पण मला एक कळत नाही की, मुली असा कोणता करार फॉलो करतात ज्यात त्या आपल्याला विचारू शकत नाही?)

असो,
पण आपणच माती खातो...
आणि वेळ निघून जाते. रस्त्याने जाताना नजरानजर झाली की, मग सगळं सगळं डोळ्यासमोरून तरळून जातं...

बरचसं बोलूनही जे बोलायचं तेच राहून जातं...
अव्यक्त!.
----------//////////////////-----------------////////////------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************