मराठा आरक्षण नेमकं कुठं अडत आहे?




मयुर डुमणे,उस्मानाबाद.
____________________


राठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला दिसून येतोय. अशावेळी मराठा आरक्षणाचा विषय समजून घेणं खूप महत्वाच ठरतं. मराठा समाजाला आरक्षण मागण्याची वेळ का आली हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे.


पंतप्रधान नरसिंहराव यांनी मंडल आयोगाच्या शिफारसी 1991 मध्ये लागू केल्या आणि त्यानुसार OBC घटकांना 27% आरक्षण लागू झालं. म्हणजे 1991 पासून 50% आरक्षण शिक्षणात आणि नोकरीत लागू झालं. परिणामी SC, ST, NT, OBC वर्गातील घटकांनी आरक्षणाचा लाभ घेत शैक्षणिक प्रगती साधली. मागास घटकांतील अनेकजण चांगल्या हुद्यावर आले. मात्र याची दुसरी बाजूही आपल्याला बघावी लागेल. दुसरीकडे खुल्या गटाला 50% जागा राखीव राहिल्या. या खुल्या गटातील स्पर्धेत उच्च वर्णीयांचा वाटा अधिक राहिला. त्याचबरोबर OBC व अन्य वर्गातील घटकही खुल्या वर्गातील जागा गुणवत्तेच्या जोरावर मिळवू लागला. अशा या स्पर्धेत मराठा समाजाला जाग आली आणि शिक्षणातील व सरकारी नोकरीतील आपला टक्का घसरत चाललाय याची जाणीव झाली. हे एक कारण झालं. दुसरं कारण आहे शेतीची दुर्दशा. राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मराठा समाजातील शेतकऱ्यांचा वाटा अधिक आहे. सातत्याने पडणाऱ्या दुष्काळामुळे, हवामान बदलामुळे शेतीची अवस्था खूप वाईट झाली. अल्पभूधारक मराठा शेतकरी कर्जबाजारी झाला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल झाल्याने मुलांच्या उच्च शिक्षणासाठी अडचणी येऊ लागल्या. मुलीचे लग्न मराठा जातीच्या स्टेटसला शोभेल असं करता येईना.  खाऊजा धोरण स्वीकारल्यानंतर बदलत्या अर्थव्यवस्थेच्या स्पर्धेत टिकून राहणं शेतकऱ्यांना अशक्य झालं. शेती व्यवसायाकडे नकारात्मकपणे पाहिले जाऊ लागलं. शेतीपेक्षा नोकरी केलेली कधीही चांगली हा समज दृढ होत गेला.  तिसरं कारण आहे वाढती बेरोजगारी. एक काळ होतो ज्यावेळेस इंजिनिअरिंग केल्यावर चांगली नोकरी मिळायची पण तो काळ हळूहळू लुप्त झाला. खाजगी क्षेत्रातील नोकऱ्या घटल्या. BA,Bsc, इंजिनिअरिंग च्या डिगऱ्या नोकरी मिळवून देण्यास असमर्थ ठरल्या. राज्यातील बहुतांश बेरोजगार वर्ग स्पर्धा परीक्षेची तयारी करू लागला. अधिकारी होणं हेच अनेकांच ध्येय झालं.  स्पर्धा अधिक तीव्र झाली. पण सुरवातीला मोठ्या प्रमाणात निघणाऱ्या जागा हळूहळू कमी होऊ लागल्या. जागा कमी होत गेल्यामुळे मराठा तरुणांना सहजासहजी अधिकारी होणं अशक्य झालं. मागास वर्गामध्येही नोकरी मिळवण्यासाठी स्पर्धा कठीण झाली. आरक्षण नसल्यामुळेच आपल्याला नोकरी मिळत नाही, फीमध्ये सवलत मिळत नाही ही भावना मराठा तरुणाईमध्ये प्रबळ झाली. मागास जातींना आरक्षण मिळत असल्यामुळे आपल्याला संधी मिळत नाही ही मांडणी दिशाभूल करणारी असली तरी बेरोजगारीच्या असंतोषात अनेकांना पटणारी आहे. यातूनच मग मराठा आरक्षणाच्या मागणीचा उदय झाला. प्रश्न आहे वाढत्या बेरोजगारीचा, शेतीच्या दुर्दशेचा, शिक्षणाच्या बाजारीकरणाचा, मंदावलेल्या अर्थव्यवस्थेचा पण आला आरक्षणावर. 


मराठा आरक्षणाची मागणी करण्यात आली खरी पण मराठ्यांना आरक्षण कोणत्या निकषावर द्यायचं हा प्रश्न निर्माण झाला कारण मराठा समाजातील एक वर्ग आर्थिकदृष्ट्या मागास असला तरी सामाजिक दृष्ट्या मागास नाही. आरक्षण मिळवायचे असेल तर मराठा समाज मागास आहे हे सिद्ध करावं लागेल. यासाठी मागासवर्गीय आयोग नेमण्यात आले. आयोगाने मराठा समाजाला मागास ठरवून देखील अडचणी काही कमी होणार नव्हत्या. कारण मराठा आरक्षणामुळे सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली 50% ची मर्यादा क्रॉस होणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत तमिळनाडू राज्याला ही मर्यादा क्रॉस करता आली पण मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. पण समजा सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती उठवली आणि पुढे चालून घटनात्मक पिठानेही मराठा आरक्षणाला मान्यता दिली तरी प्रश्न कमी होणारे नाहीत.  हरियाणातील जाट, गुजरातमधील पाटीदार समाजही आरक्षणाची मागणी करू लागेल. 


मराठा समाजातील वर्ग

राज्यात मराठा समाज बहुसंख्य असल्यामुळे शिक्षण, सहकार, राजकारण अशा क्षेत्रात मराठा जातीच वर्चस्व राहिलं आहे. मराठा समाजातील एक वर्ग फोरव्हीलरमधून दिमाखात फिरणारा, राजकीय वर्चस्व असणारा, बागायती जमिनी असलेला असा आहे मात्र त्यांची संख्या एकूण मराठा लोकसंख्येच्या तुलनेत कमी आहे. मध्यमवर्गीय देखील आहेत. मात्र या व्यतिरिक्त जो शेतकरी, कष्टकरी मराठा समाज आहे. त्याची आर्थिक परिस्थिती दयनीय आहे. त्याची संख्या जास्त आहे. यामध्येही प्रादेशिक वर्गवारी करता येते. पश्चिम महाराष्ट्रातील मराठा शेतकऱ्यापेक्षा मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्याची परिस्थिती अधिक हलाखीची आहे. 


आरक्षणाचा फेरआढावा का घेण्यात आला नाही? 

आरक्षणाची व्यवस्था ही काय परिपूर्ण व्यवस्था नाही. त्यातदेखील दोष आहेत मात्र हे दोष दूर करण्याची इच्छाशक्ती राज्यकर्त्या वर्गाने वेळीच दाखवली नाही. OBC घटकाला जशी क्रिमिलेयरची म्हणजे उत्पन्नाची मर्यादा घालून दिलीय तशी मर्यादा काही कालावधीनंतर SC,ST. गटालाही लागू करणं गरजेचं आहे. SC वर्गातील एखादा तरुण जिल्हाधिकारी जरी झाला तरी त्याच्या पोराला आरक्षणाचा लाभ मिळतोय. त्यामुळे SC गटातील इतर जो आर्थिकदृष्ट्या मागास घटक आहे त्याला संधी मिळत नाही. आरक्षणाचा लाभ घेऊन ज्यांची परिस्थिती सुधारलीय अशांनी स्वतःहून आरक्षण नाकारायला हवे होते पण तसं होताना दिसत नाही. यामुळे ज्या वर्गाला आरक्षण मिळतेय त्या वर्गातील जो पुढारलेला आहे त्यालाच पुनःपुन्हा आरक्षणाचा फायदा मिळतोय. त्यावर मर्यादा घालायला हव्यात. OBC वर्गातीलही ज्या जाती पुढारलेल्या आहेत, आरक्षणाचा लाभ घेऊन सक्षम झाल्या आहेत त्यांना आरक्षण नाकारायला हवं. आरक्षणाचा हेतू सामाजिक न्यायाचा आहे व्यक्ती उद्धाराचा नाही हे ही समजून घ्यायला हवं. आरक्षणाचा फेरआढावा घेण्यात न आल्यामुळे ही सदोष व्यवस्था अशीच पुढे चालत आली आहे. 


आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची मागणी

एवढी सगळी गुंतागुंत पाहिल्यावर मग शेवटी आर्थिक निकषावर आरक्षण द्या अशी मागणी पुढे येते. आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम कधीच नव्हता. सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या जे घटक मागासलेले आहेत त्यांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळावं यासाठी आरक्षण आहे.  सामाजिक न्याय प्रस्थापित करणं हा आरक्षणाचा मुख्य हेतू आहे. घटना दुरुस्ती करून दिलंच आर्थिक निकषावर आरक्षण तर त्याचा फायदा किती लोकांना होणार आहे? कारण आरक्षण हे खाजगी क्षेत्रात लागू नाही. ते फक्त सरकारी नोकऱ्यात आणि सरकारी संस्थांमध्ये लागू आहे. या जागा वरचेवर कमी होताना दिसत आहेत. मूळ समस्या बेरोजगाराची, कौशल्याच्या अभावाची, घसरत्या gdp ची, शेतीच्या दुर्देशची आहे मात्र उपाय शोधला जातोय आरक्षणात. म्हणजे आरक्षण ही तर मराठा, पाटीदार, जाट समाजाची दिशाभूल ठरतेय. पण हे वास्तव आपल्याला स्वीकारायचं नाही. मराठा आरक्षणाचा चकवा या लेखात पत्रकार, अभ्यासक रमेश जाधव म्हणतात, "आरक्षण ही समान संधीचा अवकाश उपलब्ध करून देणारी कुबडी आहे, हत्यार नव्हे याचा विसर पडलेला आपला समाज आहे. अमेरिकेत जशी affirmative action झाली तशी स्थिती आपल्याकडे आहे का? गोऱ्यांनी वर्चस्ववादी भूमिका घेऊन आपल्याला संधी नाकारल्यामुळे आपण मागे पडलो. आता त्या संधी हस्तगत करून त्यांच्या तोडीस तोड किंवा त्यांच्याहून अधिक चांगला परफॉर्मन्स देऊ ही वृत्ती आरक्षणाचा लाभ मिळणाऱ्या जातींमध्ये दिसते का? याउलट त्यांना आरक्षण मिळतंय तर आम्हालाही द्या ही याचकाची वृत्तीच आपल्याकडे प्रबळ होताना दिसतेय. ज्ञानाची आस आणि संपत्ती निर्मितीचा ध्यास याला कवडीचीही किंमत न देणाऱ्या समाजाचे हेच भाग्यध्येय असणार. आजच्या पर्यावरणात अशी आस आणि ध्यास असलेला समाज निर्माण करणं हा आज एखाद्या राजकीय पक्षाचा अजेंडा असणं शक्य आहे का? हे आपलं कलेक्टिव्ह फेल्युर आहे" पत्रकार रमेश जाधव यांचे  हे अभ्यासू मत मला महत्वाचे वाटते. राज ठाकरे यांनी घेतलेल्या मुलाखतीत शरद पवारांनीही आर्थिक निकषाचा सूर आवळला. पण त्याच मुलाखतीत  70 हजार लोकांना रोजगार मिळवून देणारा हनुमंत गायकवाड हाच तुमचा आदर्श असला पाहिजे, असे बोलून त्यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत. 



पारावरच्या गप्पा

      

ओंकार क्षिरसागर,अहमदनगर

दाखव रे ती गायछाप नाहीतर सोड डबल घे..

आय आर थांब बाबा काय रे काय झालं रंगा??? 

बाबा नको नको मीच माझी इकत घेऊन खातो.

का रे बाबा म्या काय इष कालवल हाय व्हय र सुकळीच्या...

अरे बाबा नको म्हटलं ना.

अरे पण का सांगशील तर???

अरे बाबा तू तालुक्याला जाऊन आलास न व्ह.

हा मग त्याच काय???

अरे मग तो कोरोना का फोरोना आलाय ना बाबा तिथं त्याच्याने लोक हात लावल्या लावल्या मरतात म्हणे.

संप्या नसलं खायची तर खाऊ नकोस पण उगाच माझ्या मनात भीती नको घालून देऊस लगा तू


शहरी बाबू आला शहरी बाबू

संकेत कधी आलास बाळा

नाना आठवडा झाला आलोय आणि आल्या आल्या स्वतःला घरात कोंडून घेतलं मी.

ते म्हणून का रे बाबा??

अहो नाना मी सांगतो हा शहरी बाबू तिकडून आलाय आपल्याला ते व्हायरस होऊ नये म्हणून हो ना रे संक्या??

हो रे आणि त्याला कोरोना असे म्हणतात.

अरे मला एक सांग की ते गावात येताना लांबून दत्त मंदिर दिसायचं ते एवढं खराब का झालं की किती पडझड झाली आहे त्याची असे का??

आणि आणि प्रवरेला पाणी केव्हा येणार आहे रे शहरात बघ ते अडवलेल्या पाण्यात पोहायची मजा काही येत नाही बघ लगा आणि आणि पद्मावतीला केव्हा जायचंच आपण मेंढरं घेऊन? आणि आणि तो नदी पलीकडचा काळभैरव चला राव चला अरे आणि तिथे अजून पण रविवारी पिठलं भाकरी मिळते का रे?? अरे बघ ना आठ वर्षे झालीत पण जिभेवरची ती चव अजून विसरलो नाहीये हा मी..

अरे आय भुसपांग्या जरा गप की श्वास घे थोडा.

दत्त मंदिराचे झालं असे की साल बदलले आणि त्याचे हक्क मोठया वाड्याकडे गेले आणि तुला म्हणून सांगू काय काका काकू आणि आज्जी वर्षभरात कायमचे दत्ताकडे गेले रे.

काही काय बोलतोय हे शक्यच नाही काका सैन्यात होते त्यांचे ते सकाळचे व्यायाम अजून पण डोळ्यासमोर आहेत रे.

गप लगा तुला माहीत तरी आहे का काही इथलं?

तू शेवट केव्हा आला होतास तुला आठवत का?

येतोस आणि पुन्हा सांजच्याला निघतोस लगा 

आम्हाला तू आलास याची खबर मिळे पर्यत तू पुन्हा जायला निघालेला असतोस बघ.

अरे हो रे कामाची गडबड खूपच वाढली आहे रे आजकल काय करू समजतच नाहीये जबाबदारी वाढली आणि सर्वच.

ते सोड मला एक सांग आता मग मंदिर कोण बघत???

अरे त्यांची  मुले शहरात असतात चांगलं कमवतात म्हणून त्यांना इकडे यायला नको वाटतं. आता अवकाळी झाला तेव्हा आपली ती *आमटी चिंच*  जिच्यावर आपण सुरपा-रंब्या खेळायचो ते पडली की रे खाली सरळ मंदिरावर.

वाईट झालं रे आपल्या गावातलं एकूणच सर्व..

अरे तू गेलास गाव सोडून तुझ्या सोबतच ज्यांनी ज्यांनी गाव सोडलं त्यांनी पुन्हा कुठे गावाकडे ढुंकून पण बघितलं नाही.

आणि बाकी जे आम्ही इथे थांबलो ते उसाला,घासाला आणि दुधाच्या किटलीत पाणी देऊन देऊन आयुष्य काढतोय..


हे सर्व बोलत असताना संकेतच्या डोळ्यासमोरून संपूर्ण लहानपणीचे आयुष्यच गेले जसे

टचकन डोळ्यात पाणी आलं आणि इथून पुढे वेळ मिळेल तसे गावाकडे यायच त्याने ठरवलं आणि जमेल तशी आर्थिक मदत करून यांना एक सरळ आयुष्याच्या घडीत घेऊन यायचे याचा मनोमन संकल्प त्याने केला.



पावसाळ्यातील सौंदर्य


    


चैतन्यकुमार देवकर,माळशिरस

हिल्या पावसाच्या एका एका थेंबा बरोबर उन्हाळ्यातील प्रखर उन्हाचे चटके सहन करून भेगाळलेल्या जमिनीची तहान भागत असते. मातीचा दरवळणारा सुगंध याची साक्ष देतो जणू तिच्या  तृप्ततेची ती ढेकरच असते. चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यामधून पावसाची रिपरिप पडल्याबरोबर आभाळात न मावेल असा आनंद ओसंडून वाहत असतो. हळूहळू जमीन हिरवीगार व्हायला लागते. जमिनीची तहान भागल्यानंतर डबकी, नद्या,ओढे यांच्यामध्ये पाणी साठू लागतं. डबक्यामधल्या पाण्यामध्ये होड्या करून लहान मुलांचे खेळ रंगू लागतात. झाडांच्या पानापानांवर रात्रभर पडलेल्या पावसाचे थेंब दबा धरून बसलेले असतात. अवखळ पोरांचे मग त्या झाडाखाली एखाद्याला न्यायचं आणि झाडाला जोरात हिसका देऊन त्याला  'शॉवर बाथ' द्यायचे खेळ रंगतात.

एखाद्यावेळी अतिवृष्टी होते. गावातील सारे ओढे,नाले तुडुंब भरून लागतात. अनेक घरं अगदी चाळणी प्रमाणे गळू लागतात. ओढे-नाले यांनी रौद्ररूप धारण केल्यामुळे म्हणून गावाचा संपर्क तुटतो. गावकऱ्यांना चर्चेला पुन्हा एक नवीन विषय मिळतो. पुढचे काही दिवस तर या पुराच्या पाण्याची चर्चाच रंगणार असते. गावातली जेष्ठ,वृद्ध मंडळी त्यांच्या काळातील किस्से सांगून आताच्या पाण्याची तुलना करताना दिसतात. निसर्ग यातूनही एक मोठा संदेश देऊन जातो... एक धडा देऊन जातो... ओढा- नाल्यांवर झालेली अतिक्रमणं आपल्या सोबत घेऊन जातो.. आणि माणसांनी केलेल्या चुका सुधारण्याची आणखी एक संधी देऊन जातो..

सौदागर काळे,पंढरपूर.

पाऊस झोपडीमध्ये पडत असतो.झोपडी जुनी झाल्याने गळत असते.जिथून पाणी टिपकत असते,त्याखाली भांडी ठेवली जातात. रिकाम्या भांड्यात पडणाऱ्या थेंबांचा आवाज ते काठोकाठ भरत आलेल्या पातेल्यात पडणाऱ्या थेंबांचा आवाज वातावरणात  एक नाद,संगीत तयार करत राहते.हे सौंदर्य झोपडीमालक-मालकीण रात्रभर ऐकत असतात.

रात्रभर सुसाट्याचा पाऊस पडलेला असतो.भल्या पहाटेपासून पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत असतो.ज्या भाबळीला  सुगरणी चिमण्यांचे घरटं होतं ते आता तुटून खाली पडलं होतं.लहान मूलांनी सकाळ सकाळ ते कुतूहल म्हणून खेळण्यासाठी घेतलं आहे.चिमण्यां नविन सौंदर्य तयार करण्यासाठी पुन्हा कामाला लागल्या आहेत.

अनिल गोडबोले,सोलापूर

पावसाळा हा ऋतू अतिशय रोमँटिक आहे. त्यामुळे पावसाळ्यात निसर्ग सौंदर्याला बहार येतो. सगळी कडे हिरवळ आणि चैतन्य देणारे वातावरण असल्यामुळे, आनंददायी वातावरण असते.

मला आठवत की हायस्कूल ला जात असताना साधारण पणे 7 ते 8 किलोमीटर पायी चालत जावं लागायचं. कोकणात अजूनही दळणवळणाची साधन फारशी वाढलेली नाहीत. खेडेगावात चालत फिरावं लागत.. त्याचा फायदा असा की सर्व आजूबाजूच्या गोष्टी निरखत, बघत निवांत चालत जायचो.

कोकणात पावसाळ्याचे रौद्र रूप असतेच पण त्या सोबत.. सतत पडणाऱ्या पावसात चालण्याचा आनंद वेगळाच..!

तेव्हा शाळेत जायची घाई नासायची आणि घरी यायची पण.. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवेगार गवत आणि झुडुपात येणारी विविध फुल व याच्यावर पडणारे पावसाचे थेंब अजूनही आठवले की मन डायरेक्ट हायस्कूल मध्ये जाते.

छोट्या छोट्या भिंगरी (हेलिकॉप्टर प्रमाणे उडणारे कीटक) पकडायचो. फुलपाखरं तर भरपूर दिसायची.. आता कॉलेजमध्ये प्राणिशास्त्र शिकताना फोटो बघितला की ते नवीन अस कधी वाटत नाही. सर्व प्रकारची फुलपाखरं अजूनही माझ्या गावात आहे. आता तर त्यावर काहीजण अभ्यास करत आहेत.

शाळेत जाताना छत्री नावालाच असायची.. म्हणजे पावसात भिजायचं, हे नक्की असायचं.. फक्त एकच गोष्ट महत्त्वाची असायची ती म्हणजे पावसाळी सँडल..! पाण्यात पायाखाली काय येईल हे सांगता येत नसे..

मध्येच एखादा ससा टुणकन उडी मारून निघून जाई.. शेतात चालू असलेली काम व त्यात काम करणाऱ्या बायकांची लोक गीते चालू असायची.. डोक्यावर इरले घेऊन भात शेती मध्ये काम चाललेलं असायचं..

एकदा तर सापावर पाय पडता पडता राहिला. नंतर कळलं की, तो साप म्हणजे नाग होता. गावाच्या बाजूने तेरेखोल ची खाडी गेलेली आहे.. पावसाळ्यात ही गोड्या पाण्याची असते इतर वेळी समुद्राचे पाणी यात येते.. त्या नदीचा आवाज.. पक्षी यांचे आवाज कानात अजूनही बसलेले आहेत..

असो, आता अजून काय वर्णन करावे, बा. भ. बोरकर सांगतात त्या प्रमाणे, "माझ्या गोव्याच्या भूमीत, गड्या नारळ मधाचे.. कड्या कपारी मधोनी, घट फुटती दुधाचे."

मला माहित आहे, वरील कविता आपण चाल लावूनच वाचली असणार, तर माझ्या मनात पावसाळा अत्यंत निसर्गाने भरलेला आहे.

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************