द ग्रेट इंडियन किचन


किरण पवार,औरंगाबाद

            नुकताच सर्वांच्या भेटीला ओटीटी प्लॅटफॉर्मवरून आलेला "द ग्रेट इंडियन किचन" हा सिनेमा एका अर्थाने चुकीच्या रूढीपरंपरा, चुकीचे समज या सर्वांवर चांगलीच चपराक मारून जातो असं म्हणता येईल. या सिनेमातील बारकावे अगदी मनाला विचार करायला भाग पाडून जातात. लेखक आणि दिग्दर्शक असलेल्या बेबी याने हा सिनेमा एका साध्या माध्यमात बांधून तो इतका परिपूर्ण पद्धतीने पडद्यावर उतरवला आहे, की सिनेमा पाहताना अक्षरश: दैनंदिन जगण्यातली अडगळ समोर दिसत आहे असा भास होतोच. या सिनेमाची सुरूवात ज्या गाण्याने होते, ते गाणचं मनात लगेच घर करून जातं. सुरूवातीच्या काही क्षणापर्यंत सिनेमाच्या विषयाची खास ओळख होत नाही किंबहुना आपण लावलेला अंदाज चुकतो. पण जे घडतं ते अगदीच मनाला स्पर्शून जातं. आज तमाम स्त्रीची कुटुंबातील भुमिका आणि तिचं वास्तविक जगणं काय आहे? याची घालमेल या सिनेमाने समोर मांडली. मी बऱ्याच दिवसांपासून हा सिनेमा पहायची वाट पाहत होतो आणि काल एकदाचा पाहिला. या सिनेमाने हळूवाररित्या अनेक पैलू उलगडले. मी सिनेमाची मजा किरकिरी व्हावी असा काहीच क्लू देत नाही परंतु काही ठराविक छोटेछोटे मुद्दे आहेत ज्यावर भर दिला गेला पाहिजे. जसं की, या सिनेमातील नायक - नायिका अर्थात नवरा- बायको संभोग होताना एक मुद्दा फोरप्ले या गोष्टीवरून जो साधा संवाद घडतो, तो बऱ्याच अनुषंगाने विचार करायला भाग पाडतो. दुसरा मुद्दा म्हणालं तर, बायकोला सॅनिटरी पॅड हवे असतात ती तसं नवऱ्याला सांगते तेव्हा त्याचे ते शब्द ऐकल्यावर एकदम पहिले चेहर्‍यावरील हावभाव. तिसरा मुद्दा म्हणालं तर शिवताशिवत ज्याला म्हटलं जातं. स्त्री तिच्या पिरियड आलेल्या काळात घरात कुठल्या महत्वाच्या गोष्टींना शिवायला तिला नकार दिला जातो, तिच्याशी त्या चार एक दिवसात वागणूक पूर्णत: बदलली जाते. बारकाईने लक्ष द्यायला हवा असा आणखी एक विशेष मुद्दा म्हणजे, मुलगा घरात आल्यावर आईला पाणी मागतो. आज बऱ्याच घरात असं पाहिल्या जातं, मुलगा असेल तर त्याची प्रत्येक गोष्ट घरचे ऐकतात किंबहुना सवय अशी लावल्या जाते की, तो मुलगा आहे त्याने जेवताना स्वत: पाणी नाही घेतलं तर बहिणीने द्यावं, तो मुलगा त्याला घरात हवी ती गोष्ट त्याने मागितली तर जाग्यावर मिळाली पाहिजे. हे आज प्रत्येक घरात घडतं फरक इतकाचं हे इतक्या सुक्ष्म आणि कळतं नकळतं घडतं की आपलं त्यावर फारसं लक्ष लागत नाही आणि आपण त्यावर विचारही करत नाही. खरतरं मला या सिनेमातले अनेक बारकावे आवडले आहेत, काही निवडक मी इथे मांडले. तुम्ही आवर्जून हा सिनेमा पहायला हवा आहे.


स्वयंपाकघरातील कोंडलेल्या व्यवस्थेचा अंधार…


प्राजक्ता हरदास.

सोशल मीडियावर या मल्याळम चित्रपटाबाबत प्रत्येकजण त्याच्या अनुभवानुसार व्यक्त होतोय...अनेकांकडून हा चित्रपट आवर्जून पाहा असा सल्ला दिला जातोय...हे सगळं ऐकून, पाहून काल हा चित्रपट पाहिलाच...


चित्रपट पाहिल्यानंतर काही काळ ' स्त्री जन्मा ही तुझी कहाणी' या उक्तीचीच आठवण झाली...कारण 'कोणतीही स्त्री जन्माला येत नाही, तर ती घडवली जाते'. हे फ्रेंच विचारवंत सिमॉन द बोव्होआर यांनी आपल्या 'सेकंड सेक्स' या पुस्तकात लिहून ठेवलंलं वाक्य डोळ्यासमोरून तरळू लागलं. हेच वाक्य पुरुषाबाबतही आपण म्हणू शकू की कोणताही मुलगा पुरुष म्हणून जन्माला येत नाही तर पुरुष असा असायला हवा, असं त्यावर बिंबवलं जातं. हे संदर्भ इथे लिहिण्याचं कारण की संपूर्ण चित्रपटात समाजात अजूनही रुतून बसलेल्या पुरुषप्रधान संस्कृतीचा चेहरा प्रत्येक दृश्यात सतत डोकावताना दिसतो. चित्रपटाची पार्श्वभूमी ही केरळातील आहे. केरळमध्ये साक्षरतेचं प्रमाण अधिक असताना जर तेथील स्त्रीची हि व्यथा असेल तर उत्तर भारतात आणि उर्वरित ठिकाणी या चित्रपटाचा संदर्भ किती चपखल आहे हे ध्यानात येतं.


(खाली मी जे लिहिणार आहे ते सगळ्याच पुरुषांना लागू होत नाही...कारण असे अनेक पुरुष, नातेवाईक, मित्र माझ्या आजूबाजूला आहेत जे आज या मानसिकतेच्या, या सामाजिक दबावाच्या पलीकडे जाऊन विचार करतात. त्यांच्या आयुष्यातील स्त्रियांचं महत्त्व जाणतात. एकमेकांच्या साथीने उभे राहतात. त्यामुळे यात पुरुषप्रधान असा उल्लेख असला तरी तुम्हाला दुखावण्याचा प्रश्नच नाही!)


र ही गोष्ट एका केरळमधील कुटुंबातील आहे. केरळमधीलच नाही तर भारतातल्या बहुतांश घरातली आहे. प्रत्येक भारतीय कुटुंबातील स्वयंपाक घरातली स्त्रीच्या आयुष्यातील रोज न चुकता घडणारी कथा. ही कथा दिग्दर्शक जिओ बेबी यांनी अत्यंत साध्या शैलीत मात्र तितक्याच चपखलपणे मांडलेली आहे. या चित्रपटात पात्रांची संख्या अगदी बोटावर मोजण्याइतकी आहे. महत्त्वाचं म्हणजे या पात्रांना नावच नाहीत. पण त्यांची चाकोरीबद्ध कामं मात्र आहेत. यावरून त्यातील सार्वत्रिकपणा दिसून येतो. यामध्ये अभिनेत्री निमिषा सज्जयन आणि अभिनेता सुरज वासुदेवन हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. संपूर्ण चित्रपट स्त्रीच्या आयुष्यातील सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हात धुवून मागे लागलेल्या (काही घरातील दबावामुळे) स्वयंपाकघरावर आधारलेला आहे.


चित्रपटाच्या सुरवातीला नायिका अगदी एकाग्रपणे नृत्याचे धडे गिरवताना दिसते. आणि त्याला समांतर अशा पद्धतीने विविध चविष्ट पदार्थ तयार करून टेबलावर मांडले जात आहेत, अशी दृश्यं समोर येतात. लगेचच मुलगा-मुलगी पाहण्याचा कार्यक्रम आणि पुढे त्यांचं लग्न अशा घटना घडत जातात. तिचं लग्न होतं आणि समोर उभं राहतं 'द ग्रेट इंडियन किचन.'  घड्याळाच्या काट्यावर, घरच्यांच्या मर्जीवर चालणारं...! मग उठल्यापासून सुरू होतं तिचं रोजचं चक्र. भिजवणे, चिरणे, वाटणे, आंबवणे, निवडणे, फोडणीला घालणे, पदार्थ टेबलावर मांडणे, टेबल स्वच्छ करणे, भांडी घासणे, केर काढणे, खरकटे साफ करणे, इत्यादी इत्यादी. ही कामाची यादी आजच्या दिवशी संपली तर पुढच्या दिवशी पुन्हा आ वासून समोर उभीच असते. मात्र तरीही ती हे सगळं तिची जबाबदारी - कर्तव्य म्हणून निभावत असते.


ती हे सगळं घरच्यांसाठी करत असताना तेव्हा तो मात्र स्वतःचं आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी छान व्यायामाने दिवसाची सुरुवात करतो. तर त्याच्याच दुसऱ्या बाजूला घरातील ज्येष्ठ म्हणवणारे तिचे सासरे पेपर वाचत, मोबाईल पाहत निवांत बसलेले असतात. त्या सासरेबुवांना त्यांच्या पत्नीने इतकं सगळं हातात आणून द्यायची सवय लावलेली असते की सकाळी टूथपेस्ट लावलेला आयता ब्रश बायकोने आपल्या हाती द्यावा अशी त्यांची अपेक्षा असते. बायको ते न चुकता करतेही, हे विशेष! या दोघा पुरुषांचे हे वैयक्तिक कार्यक्रम आटोपले की ते टेबलावर येऊन बसणार आणि मग त्या दोघांना सासू - सुनेने गरमागरम बनवलेलं अन्न वाढत जायचं. आणि त्यांचं खाऊन झाल्यावर, ते दोघेही आपापल्या कामाला गेल्यानंतर सगळ्या टेबलभर अधाश्यासारखा खाऊन खरकटं पसरवलेल्या त्या जागी बसून मग दोघी सासू - सुनेने जळलेलं - उरलेलं अन्न आपल्या पोटात टाकायचं. त्यानंतर ते तुंबलेलं सिंक हात घालून साफ करायचं, खरकटी भांडी साफ करून सगळं स्वयंपाकघर झाडूनपुसून चकाचक करायचं. असं दिवसभराचं चक्र. ते चक्र संपत नाही तोवर रात्री नवऱ्यासाठी हजर राहायचं. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्या उत्साहाने याच रहाटगाड्यात दिवस काढायचा.  


एकंदरीत रोज घडणारं हे त्या कुटुंबातील चित्र. ही दृश्य चित्रपटात इतक्या वेळा दाखवलीयत की पाहणाऱ्याला एका क्षणानंतर कंटाळा येऊ लागतो. आणि तिथेच दिग्दर्शकाचा चित्रपटामागचा हेतू साध्य होतो असं मला वाटतं. कारण जर प्रेक्षकांना ही दृश्ये पाहताना कंटाळा येत असेल, चीड येत असेल तर दिवसरात्र त्या स्वयंपाक घरात राबणाऱ्या तिची काय अवस्था होत असेल याचा विचार प्रत्येक सद्सदविवेक बुद्धी असणाऱ्याने करायला हवा.


सासूची भूमिका यात खूप सपोर्टिव्ह आहे. मात्र सासू जेव्हा मुलीच्या बाळतंपणासाठी जाते तेव्हा संपूर्ण घराची जबाबदारी एकट्या नायिकवेवर येऊन पडते. तरीही ती त्या सगळ्या जबाबदाऱ्या चोख निभावताना दिसते. पण तरीदेखील तिच्या त्या कष्टाचं मोल ठरत नाही. सासू मुलीकडे गेल्यावर सासऱ्यांना पायात घालण्यासाठी हातात आणून द्यावी लागणारी चप्पल हे दृष्य तर झेपेना. मात्र आजही काही घरात अशी स्थिती आहे हे नाकारून चालत नाही.


एका सुशिक्षित घरातून आलेली ती या घरात आधुनिक साधनांचा वापर करते तेव्हा परंपरा - रूढी मानणाऱ्या सासऱ्यांचा जो काही चेहरा असतो तो न पाहवणारा आहे. तिच्या बदलाच्या कृतींना नाकारलंच जातं. त्यांचं म्हणणं असतं अन्न वाटायचं ते पाटा - वरवंट्यावर, कपडे धुवायचे ते हातानेच, भात हवा तो चुलीवरचा, अन्न हवं ते ताजं शेगडीवरून ताटात पडलेलं गरमागरम स्वादिष्ट. मग अशा ठिकाणी तिच्या मिक्सर, कुकर, फ्रीज, वॉशिंग मशीन या घरात उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर करणंही मूर्खपणाचं ठरतं.


जेव्हा दोघं नवरा - बायको हॉटेलात जातात तेव्हा नवरा अगदी शिस्तीत व्यवस्थित एका प्लेटमध्ये खरकटं टाकतो, तेव्हा नायिका मॅनर्सबद्दल (शिष्टाचार) बोलल्यावर नायकाचा दुखावलेला पुरुषी अहंकार आपल्याला विचार करायला भाग पाडतो. मग जरी तिचं म्हणणं बरोबर असलं, तरी मग त्यावरून बसता - उठता ऐकवले जाणारे टोमणे दुखावलेल्या त्या पुरुषी मानसिकतेचं दर्शन घडवतात. मग पुन्हा त्याने चांगलं बोलावं - वागावं यासाठी मग तिलाच करावी लागणारी विनवणी, मग लाडानं सॉरी म्हणवून घेणं या सगळ्यात त्या दुखावलेल्या अहंकारी मानसिकतेचं दर्शन स्पष्टपणे दिसतं.


मासिक पाळी या स्त्री संबंधित महत्त्वाच्या असणाऱ्या विषयावरही चित्रपटात जे काही समाजाच्या मानसिकतेत असलेलं मागासलेपण दाखवलंय ते वेदनादायी आहे. सात दिवस वेगळं बसणं, कोणत्याही गोष्टीला हात न लावणं, दूर कोणाच्याही नजरेला पडणार नाही अशा ठिकाणी आपले कपडे वाळत घालणं, तुळशीला हात न लावणं हे सगळे संदर्भ तिथे पाहताना त्रासदायक वाटत असले तरी आजही २१ व्या शतकात ते दिसून येतात हेही सत्य आहे. मासिक पाळी म्हणजे अपवित्र मानणारा वर्गही आहे, हे नाकारणं मग चुकीचं ठरत नाही. अशी असंख्य घरं आजही दृष्टीस पडतात.


आणखीन एक यात प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे पावित्र्य - अपावित्र्याच्या चक्रात एका स्त्रीच्या गैरहजेरीत दुसऱ्या स्त्रीलाच ही सगळी जबाबदारी अंगावर घ्यावी लागते. पुरुष त्याच्याकडे वेळ असूनही ती जबाबदारी अंगावर घेत नाही. त्याला ही कामे त्याचीदेखील आहेत असं कधी वाटतंच नाही, हे मात्र दुःखद आहे.


या प्रसंगांमध्ये मोलकरणीचं पात्र विशेष ठरतं. तिचं स्वातंत्र्य नायिकेच्या तुलनेत अधिक असलेलंच पाहायला मिळतं. मोलकरणीची वाक्यं त्या दोघींच्या संवादात चपखल बसतात. "मला मुलांचा सांभाळ करण्यासाठी माझी कामं करावीच लागतात. मी मासिक पाळीत असतानाही इतरांच्या घरी जाऊन सगळी कामं करतेच." असं म्हणून ती भूक भागवण्यासाठी गरजेचं असलेलं परिस्थितीचं गांभीर्य रूढींच्या पलीकडे जाऊन आपल्या समोर मांडते. 


तसंच यात समाजशास्त्राचा शिक्षक म्हणवणारा, कुटुंब - घर यांसारखे विषय शिकवणारा तिचा नवरा जर स्वतःच इतका मासिक पाळी या विषयाबाबत विचारांनी मागास असेल तर त्या मुलांना कुटुंब आणि समाज याचे धडे तो काय देत असेल यावरच प्रश्नचिन्ह माझ्या मनात निर्माण होतो. तसंच या साऱ्याबाबत स्वतःच्या आईला जेव्हा ती हे सगळं सांगते. तेव्हा "सासरच्यांच्या आज्ञेचं पालन कर. ते म्हणतायत तसंच वागत जा." हे शब्द सामाजिक दबावाला बळी पडलेल्या आपल्या समाजाचं दर्शन घडवतात. 


मुलीला लहानपणापासूनच पालक आपली मुलगी म्हणून नाही तर परक्याच्या घरची सून म्हणूनच घडविण्याचा प्रघात निर्माण करत असतात. असंच बसायचं, असंच करायचं, जेवण करता नाही आलं तर नवऱ्याला काय जेवू घालणार, अशीच वागत राहिलीस तर सासरचे काय म्हणतील? हे बोल प्रत्येक मुलीला आजही ऐकावेच लागतात. तिचं शिक्षण हे सासरी मुलांना शिकवण्यासाठी कामी येणं गरजेचं वाटत असतं, बाकी अजून विशेष काही नाही. यात तिने स्वतःसाठी सक्षम व्हावं हा हेतू नसतो तर सासरच्यांकडे गेल्यावर काय? हीच मानसिकता आजही अधिक दडलेली दिसते.


सबरीमालाचा आलेला संदर्भही इथे महत्त्वाचा आहे. नवरा आणि सासरे सबरीमालाचं व्रत करतात. या काळात स्त्रीचं दर्शन आणि स्पर्श चालत नाही म्हणणारे पुरुष तिने बनवलेलं अन्न मात्र मिटक्या मारत खातात. इथे आलेला सबरीमाला मंदिर प्रवेशाचा संदर्भ, ज्या महिलेने व्हिडीओतून आवाज उठवला तेव्हा तिला सहन कराव्या लागणाऱ्या यातना पाहिल्या की सावित्रीबाईंना मुलींच्या शिक्षणासाठी प्रत्यक्षात झेलाव्या लागणाऱ्या दगड - शेणाच्या माऱ्याचा संदर्भ डोळ्यासमोर येतो.


घरातील या सगळ्या जुलमी प्रवृत्तीतून ती नायिका मुक्त होण्याचा प्रयत्न करते, मुक्तपणे विचार करण्याचा प्रयत्न करते तेव्हा पुरुषी अहंकार दुखावला जातो. "तुला घरात राहायचं असेल तर व्हिडिओ डिलीट कर" असा धमकीवजा आदेश नवरा जेव्हा तिच्यावर सोडतो, तेव्हा आजच्या काळातील स्त्री अत्याचाराची - तिचा आवाज सतत दाबून ठेवणाऱ्या सामाजिक मानसिकतेची दाहकता दिसून येते. 


ती जेव्हा काम करण्याचं म्हणते, तिला नृत्य शिक्षिका होण्याची संधी मिळते तेव्हा हे आपल्या घराला साजेसं नाही, स्त्री म्हणजे घरातली लक्ष्मी असते. तिने मुलांचा सांभाळ करावा असा सल्ला तिचे सासरोबा तिला देतात. "माझी बायकोही पोस्ट ग्रॅज्युएट होती पण तिनेही काम नाही केलं. मुलांचा सांभाळ केला म्हणून बघ आज सगळी आमची मुलं चांगल्या मार्गाला आहेत." असं सगळं बोलून तिला दाबण्यात येतं. गोड बोलून वेळ पुढे ढकलली जाते. तिच्या स्वप्नांना - पखांना वेळोवेळी छाटलं जातं. 


जेव्हा या सगळ्या घटना - हे सगळं रोजचं जगणं तिला असह्य होतं, तेव्हा तिचा संताप त्या ड्रेनेजमधल्या संपूर्ण चित्रपटात थेंब - थेंब करत साठून राहिलेल्या बादलीतल्या दोन्ही पुरुषांच्या तोंडावर फेकून मारलेल्या पाण्यातून व्यक्त होताना दिसतो. फँड्रीतल्या व्यवस्थेवर मारलेल्या दगडाप्रमाणे !


या सगळ्या बंधनातून मुक्त होऊन जेव्हा ती रागारागाने घराबाहेर पडते तेव्हा स्वच्छ निर्मळ वातावरणात चालताना डावीकडे 'डेमॉक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया' या संस्थेचा एक बॅनर दिसतो. थोडी पुढे चालत नाही तर काळया कपड्यात धार्मिक कार्यक्रमांसाठी देणग्या मागणारे लोक जप करत बसलेले दिसतात...ही दोन्ही चित्रं विरोधाभासी दाखवली असली तरी आजचं वास्तव मांडणारी ठरतात. या दोन्ही गोष्टींत विचारांची तफावत असली तरी समाज हा याच टोकांनी सर्वस्वी बनलेला आहे हे आपल्या ध्यानात येतं. या सगळ्यातून मात्र ती तिच्या स्वप्नांच्या - आकांशांच्याच दिशेने मार्गक्रमण करते.


शेवटी जेव्हा नायकाचा स्वयंपाक घरातला शॉट आणि एक स्त्री असतानाचं दृश्य दाखवलंय तेव्हा सकारात्मक बदल घडलाय असं मनात क्षणात वाटत असताना एक नवा ट्विस्ट इथे दिसून येतो. जेव्हा एक सोन्याने मडलेली वेगळीच स्त्री त्या कोंडलेल्या स्वयंपाकघरातील पेला विसळताना दिसते तेव्हा आपल्या व्यवस्थेचा चेहरा खऱ्या अर्थाने तिथे प्रतिबिंबित होतो. म्हणजेच काय पुरुषप्रधान संस्कृती मान्य असलेली स्त्री त्याला इथे सहज भेटते. मात्र ही संस्कृती अन्यायकारक असून त्यात स्वतःत बदल घडविणारा नवरा मात्र तिला पुन्हा भेटत नाही. याचाच अर्थ बदलाचे वारे सहजासहजी वाहत नसतात, हे त्या शेवटच्या क्षणांतून प्रकर्षाने जाणवतं. 


आणि जिथून लग्नापूर्वी नायिकेच्या नृत्याच्या आवडीने चित्रपटाची सुरुवात दिग्दर्शकाने केलेली असते त्याच नृत्यापाशी येऊन शेवट होतो. मात्र वेगळ्या ढंगात - वेगळ्या आवेशात. इथे शूज आणि गाडी चालवत तिने नृत्याच्या तिच्या क्लासमध्ये केलेली एंट्री प्रभावी ठरते. त्या नृत्यातील तिच्या दिग्दर्शनात जी साखळ्यांच्या बंधनात असलेली मुलगी आधी तिने दाखवलीय, ती जेव्हा खुर्चीत मोकळेपणाने पायावर पाय रोवून बसताना दाखविण्यात येते, तेव्हा ते चित्र प्रचंड सकारात्मक आणि आशावादी स्वरूपाचं वाटतं! या चित्रपटात कोणीच खलनायक नाही. मात्र पुरुषप्रधान व्यवस्था या चित्रपटात खलनायकाची भूमिका बजावते. असे एक नाही तर असंख्य आपल्या सामाजिक व्यवस्थेतले संदर्भ जिओ बेबी यांनी आपल्या प्रभावी दिग्दर्शनाने प्रेक्षकांसमोर ' द ग्रेट इंडियन किचन ' च्या माध्यमातून मांडले आहेत. त्यामुळेच हा चित्रपट अनेकांना आपल्या रोजच्या जगण्यातील फ्रेम्सना साचेबद्ध रचनेत कैद करून मांडलेला चित्रपट वाटू लागतो. 


तर स्त्रियांनी हा चित्रपट जरूर पाहावाच मात्र प्रत्येक पुरुषाने हा चित्रपट पाहायला हवा. तेव्हाच खऱ्या अर्थाने चित्रपटामागचा हेतू सार्थकी लागेल. आणि मग आपण स्त्री - पुरुष यापलीकडे जाऊन माणूस म्हणून एकमेकांना पाहू लागलो की काय मग जग जिंकलंच. घरातील कामांच्या जबाबदाऱ्या एकमेकांचा आदर करत वाटून घेऊ लागलो, एकमेकांना साथ देत पुढे जाऊ लागलो तर हे सगळे प्रश्न निर्माण होण्याआधीच मग सुटतील की. मात्र या साऱ्या बदलाची अपेक्षित सुरुवात आपल्याला फक्त ती स्वतःपासून करावी लागणार आहे. स्त्री - पुरुष समानतेचे धडे केवळ शाळेतील पुस्तकात, कागदावर न नाचवता अशा चित्रपटांतून पुन्हा पुन्हा चर्चेत आणल्यास हळूहळू का होईना हा अपेक्षित बदल घडेल याची खात्री वाटते.

(चित्रपट अमेझॉन प्राईमवर उपलब्ध आहे.)


मयुर डुमणे,उस्मानाबाद

या चित्रपटातुन एक अत्यंत महत्वाचा विषय प्रभावीपणे मांडला आहे. त्यामुळे या विषयावर आपल्या ग्रुपमध्ये चर्चा व्हावी, ग्रुपच्या सदस्यांनी हा चित्रपट आवर्जून पहावा यासाठी हा विषय निवडला.  सोशलमीडियामुळं या महत्वाच्या चित्रपटाकडे अनेकांचं लक्ष वेधलं गेलं. चित्रपटातील भाषा जरी समजत नसली तरी चित्रपटातील दृश्ये बरीच बोलकी आहेत. त्यामुळे भाषा समजत नसताना देखील चित्रपट सहज समजून जातो. वर्षानुवर्ष चालत आलेल्या पुरुषत्ताक व्यवस्थेचं चित्रण चित्रपटात मांडण्यात आलंय. या पुरुषसत्ताक व्यवस्थेने बाईला बंधनातून अडकवून ठेवलंय. तिने लग्न करावं, नवऱ्याला खुश ठेवावं, स्वयंपाक करावा, घर सांभाळावं. या पारंपरिक चौकटीत अडकून पडलेल्या तिला मुक्तपणे फुलताच येत नाही. तिच्या इच्छा, आकांक्षा या पुरुषसत्ताक व्यवस्थेने दाबून ठेवल्या आहेत. रात्री नवऱ्याचे धक्के सहन करायचे, सकाळी लवकर उठायचं, स्वयंपाकाची तयारी करायची, जेवण टेबलवर नेऊन वाढायचं, खरकट उचलायचं, त्यांचं जेवण झाल्यावर मग आपण जेवायचं, डब्बा भरून द्यायचा, भांडी घासायची, धुणी धुवायची. असा हा दिनक्रम. म्हणजे तिला एखाद्या नोकरासारखं राबवून घ्यायचं. तिचा स्वाभिमान वेळोवेळी ठेचायचा. तिची सासू हिला घरचे नियम समजावून सांगते. सासू देखील पुरुषसत्ताक व्यवस्थेची वाहक कशी आहे हेच चित्रपटातुन सांगितलंय. तिला नोकरीचं ऑफर लेटर आल्यावर सासरा म्हणतो नोकरी करायची नाही. माझी बायको पण ma शिकलीय. बघ कशी घर सांभाळतीय. नवऱ्याकडे गेल्यावर नवरा म्हणतो आपलं लग्नाआधीच ठरलं होतं.तू नोकरी करणार नाही. चित्रपटातील दृश्य फार बोलकी आहेत. एकीकडे ती किचनमध्ये सकाळी घाम येईस्तोवर राबतेय तर दुसरीकडे नवरा मस्त व्यायाम करतोय, सासरा खुर्चीवर बसून पेपर वाचतोय. हे आपल्या समाजातील सगळीकडेच कॉमन दृश्य. पण कहर म्हणजे इतकं सगळं करूनही हे पुरुष वरून बायांना आदेश सोडतात. या चित्रपटातील सासऱ्याला चुलीवरचा भात पाहिजे असतो. गॅसवर शिजवलेला भात आवडत नाही. मासिक पाळी, सेक्स या गोष्टींवर खुलेपणाने आपण व्यक्त होत नाही. हा विषय देखील चित्रपटात हाताळलाय. गाडीवरून खाली पडलेल्या नवऱ्याला ती धावतपळत जाऊन उचलायचा प्रयत्न करते तर नवरा तिला झिडकारतो, बाजूला हो म्हणतो का तर तिला मासिक पाळी सुरू आहे. कहर म्हणजे मासिक पाळी सुरू असणारी बायको आपल्याला शिवली म्हणून हा पवित्र होण्यासाठी नदीत अंघोळ करतो. हा नवरा शाळेत शिक्षक आहे. विद्यार्थ्यांना समाजशास्त्राचे धडे देतो.  ती फक्त फोरप्लेची मागणी करते तर ते देखील त्या नवऱ्याला सहन होत नाही. घरी जेवण करताना कसलेही नियम न पाळता खरकट टेबलावर सांडणारा नवरा बाहेर हॉटेलमध्ये गेल्यावर मात्र खूप शिस्तीत जेवण करतो. टेबलावर सांडत नाही. असंच तुम्ही घरी का जेवत नाही असं विचारल्यावर हा गडी म्हणतो ते माझं घर आहे मी कस पण जेवेल तू मला नको शिकवू. थोडक्यात चित्रपटात दांभिक पुरुषी मानसिकतेला वारंवार उघड पाडलंय. भांडी धुवायचं बेसिन ब्लॉक झालंय त्यामुळे तिला वारंवार त्रास होतो. ती सतत नवऱ्याकडे प्लम्बर बोलावण्याची मागणी करते. पण हा नवरा याकडे दुर्लक्ष करत राहतो. याला किरकोळ बाब समजतो.  तो फक्त स्वतःच्या भावनांचा गरजेचा विचार करतोय. आपल्या बायकोला सॅनिटरी पॅड सुद्धा आणून देणं त्याला मुळावर येतं. शेवटी बेसिनमधलं साठलेलं घाण पाणी ती नवरा आणि सासऱ्याच्या तोंडावर मारते आणि तट घराचा निरोप घेते. ती स्वतःच्या घरी जाते मात्र तिथेही तिला सांगण्यात येतं. माफी माग त्यांची. आणि परत तिकडेच जा. एकूणच पुरुषत्ताक व्यवस्थेत महिलांची  घुसमट कशी होतेय हे प्रभावीपणे चित्रपटात मांडलंय. शेवटी ती या सगळ्या पुरुषसत्ताक व्यवस्थेला धुडकावून लावत डान्स क्लास घेते. स्वतःच्या पायावर उभा राहते.हा शेवट भावतो. हा चित्रपट असा आहे की यातील प्रत्येक प्रसंगावर जितकं लिहिलं तितकं कमीच आहे. म्हणूनच प्रत्येकाने हा चित्रपट पाहिला पाहिजे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************