2019 लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
2019 लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

नवीन वर्ष ,नवीन संकल्प.

नवीन वर्ष ,नवीन संकल्प.

निखिल खोडे,ठाणे.
   प्रत्येक वर्षी डिसेंबर महिना सुरू झाला की नवीन वर्षाची चाहूल लागलेली असते..आपण पुढच्या वर्षी नवीन कोणता संकल्प करावा हा विचार मनामध्ये चालु होतो. काही लोकांचे संकल्प हे एक- दोन दिवसा साठी तर काही लोक कायमस्वरूपी वर्षानुवर्षे पाळत असतात. असेच काही संकल्प आज करायचे आहे..

             नवीन वर्ष सुरू व्हायला काही दिवसच बाकी राहिलेले आहे. स्वतःसाठी आणि कुटुंबाचे जीवन अधिक समृद्ध आणि भरभराटीचे व्हावे यासाठी नवीन वर्षात काही संकल्प करायचे आहे. छोटे छोटे संकल्प मला भविष्यात मोठा फायदा करून देणारे ठरतील अशी अपेक्षा आहे.

               आजच्या धकाधकीच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या लोकांना गुण दोषसहित स्वीकारत असतो. त्यामुळे आपण काही गोष्टीच्या आहारी जातो त्याचा परिणाम आपल्याला तर होतोच शिवाय आपल्या घरच्यांना पण होतो. अश्याच गोष्टी पासुन सुटका मिळवुन स्वतःच्या मनावर ताबा मिळवायचा आहे.

             सकारात्मक विचार करणे. एखाद्या गोष्टीवर उलट अर्थ काढून नकारात्मक विचार करणे यावर सशक्त व सकारात्मक विचार करायचा आहे. जेणेकरून स्वतःचा आत्मविश्वास वाढेल..

               स्वतःसाठी वेळ काढणे. रोजच्या कामा मधुन दिवसातील एक तास तरी स्वतःसाठी काढायचा आहे. त्या वेळा मध्ये एखादा चांगला छंद लावुन घ्यायचा आहे.

               स्वतःची कामे स्वतः करणे. दैनंदिन जीवनातील रोज करावी लागणारी कामे स्वतः करायची आहे. जेणेकरून शिस्तीची सवय लागेल. स्वतः मधील आळस निघुन जाईल..



डॉ. विजयसिंह पाटील. कराड.

' काय मंडळी नवीन वर्ष चार दिवसावर आलंय, नवीन वर्षांपासून काय संकल्प सोडताय का?' असा प्रश्न कावळे सरांनी सगळ्यांपुढे टाकला.
कधी नव्हे ते घारेंनी संभाषणात भाग घेतला,ते म्हणाले 'अहो पहिल्यांदा नवीन वर्षाच्या पार्टीचं ठरवा की राव, संकल्प बिंकल्प त्या दिवशी करायचा असतो, पाहिलं पार्टीचा विषय घ्या'.
घारेंना मधेच अडवत शिपुनाना म्हणाले 'पयलं त्ये शंकल्प मंजे काय त्ये पयलं सांगा'.
गोडबोले म्हणाले 'नानासाहेब काहीतरी नवीन चांगलं काम सुरू करायचा किंवा कुठलीतरी वाईट गोष्ट सोडायचा दृढ निश्चय करणे याला संकल्प सोडणे म्हणतात'.
(नानांना नानासाहेब असं फक्त गोडबोलेच म्हणतात,त्यामुळे नाना त्यांना फार रिस्पेक्ट देतात, असो.)
'हंग अशी, असं हाय व्हयं,पन म्या काय म्हणतु घारे गुर्जी म्हणत्यात तसं पयलं पार्टीचं बगा की राव'.
इथं कावळे चिडून म्हणाले 'नॉन सेन्स,फर्स्ट लेटस मेक द न्यू इयर रेसोल्युशन, देन (इथं ते जरा अडखळले आणि पुढचं वाक्य मराठीत म्हणाले मग पार्टीचं बघू '.
नानाला कावळे सर नक्की काय म्हणाले ते कळले नाही पण पार्टीचं बघूया अस ऐकल्यावर ते शांत झाले
गोडबोले साहेब म्हणाले 'नाना काही नेहमीचे संकल्प सांगतो,तंबाखू, बिडी, सिगारेट,पान, दारू सोडणे,(इथे अनुक्रमे कावळे, घारे,डिटी सर शिपुनाना यांची तोंडे बघण्यालायक झाली.) नानांच्याकडे पहात उगाच अकारण वाद घालणे, शिव्या देणे,भांडण करणे, अश्या गोष्टीही सोडणे, माझ्याकडे(किंवा खरं म्हणजे माझ्या गरगरीत पोटाकडे)नजर रोखून नियमित व्यायाम करणे,
रोजच्या रोज डायरी लिहिणे, इत्यादी असे बरेच संकल्प आहेत',आता बोला कुठला संकल्प सोडताय? हां, कावळे सर तुम्ही सांगा तुमचा संकल्प!'..
चहाचा दुसरा कप तोंडाला लावत कावळे सर म्हणाले 'मी नववर्षाचे स्वागत साखर आणि साखरेचे पदार्थ ग्रहण करायचे सोडून देणार आहे'.
टेबलावर एकच खळबळ उडाली.'हे काय, असं का, म्हणजे चहा पण बंद होणार तुमचा' अश्या विविध प्रश्नांचा कल्लोळ उठला. तेव्हड्यात घारे हळूच नानांच्या कानाला लागले.
ते ऐकताच नाना कडाडले 'वो कावळे गुर्जी, तुमाला साखरंचा आजार झालाय, म्हनून तुमाला साखर सोडायला लागतीया, ह्ये असलं अपगं बोलणं बराबर न्हाय बगा'.
कावळे सरांचा चेहराच पडला, ते रागाने घारेंच्या कडे पाहू लागले. पण तयारीत असलेल्या घारेंनी तंबाखू पुडी पुढं केल्याने त्यांनी आपला राग गिळला.
गोडबोले म्हणाले ' मी आता रोजच्या रोज दैनंदिनी लिहायला सुरुवात करणार आहे, मोठी वही पण घेतलीयं त्यासाठी '.
नानाला राहवलं नाही, त्यांनी 'सायेब त्ये कश्यापाई, आनी त्येचा उपेग काय?' अशी (नानांच्या दृष्टीने रास्त) शंका उपस्थित केली. त्यावर गोडबोले, घोलपसाहेब,दळवी यांनी नानांना सविस्तर माहिती दिली.(त्याचं वर्णन शब्दविस्ताराच्या मर्यादेमुळे लिहू शकत नाही, क्षमस्व आणि असो, असं माझं टू इन वन एक्सपलेशन.)
नानांना काहीच कळलं नाही हे मला स्पष्ट दिसत होते, पण बोलून 'खाजवून खरूज काढणे' ही म्हण माहीत असल्याने मी मौन धरलं, (तसं मी कायमच या थोर लोकांच्या सहवासात मौन@auto mode मध्ये जातो,)..
'नाना तुमचं काय?', असा प्रश्न विचारला, त्यावर नाना डोकं खाजवत विचारात पडले, मुळात काहीतरी सोडायचं किंवा काहीतरी धरायचे एव्हढचं त्यांच्या डोक्यात शिरलं होतं. काय बोलावे हे त्यांना सुचेना,'म्या काय सोडू म्हणतासा,' असा उलटा प्रश्न त्यांनी केला.
कावळे आपला उजवा अंगठा तोंडाकडे नेऊन म्हणाले 'नाना हे सोडा की'.
एकदम उसळून नाना म्हणाले 'छा छा,त्ये का सोडा,कशापाई,ऑ,तेवडं सोडून बोला, नाईंटी (अर्धी क्वार्टर दारू) मेरी जान है,उसको मैं नहि छोडनेवाला,(नानाला मध्येच हिंदी बोलायची सवय आहे, शक्यतो हिंदी चित्रपटातील संवाद अधेमधे ते टाकतात, शिवाय मोजून पाच ते सहा इंग्लिश शब्दही त्यांना पाठ आहेत, पण ते शब्द केंव्हा कसे वापरतील याचा नेम नाही, शिवाय दोन मराठी, दोन हिंदी आणि एक इंग्लिश शब्द वापरून वाक्य करायची त्यांची कलाही मजेशीर आहे, असो)
उगाच कायबी असलं अपगं बोलायचं न्हाय, आज दारू सोडायला सांगताय उद्या बायकु सोड म्हणशीला.'
शांत बसलेले आबा आता मात्र चिडले 'ये शिप्या बंद कर तुझं तुणतुणं, तुला काय जबरदस्ती न्हाय कुणाची, जरा ऐकून घे की यांचं ऑ '..
तसं नानाचं तोंड बंद झालं.

घोलप साहेब म्हणाले 'गेस व्हॉट,मी काय सोडणार आहे ते ओळखा पाहू?'. तसं सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले. घोलप साहेबांना कसलेच व्यसन नव्हते, असले तरी आम्हा कुणाला माहीत नव्हते, मग हे सोडणार तरी काय असा प्रश्न सगळ्यांना पडला. ते म्हणाले 'मी नॉनव्हेज सोडतोय नवीन वर्षांपासून'!, तसं गोडबोले, दळवी (आणि अर्थातच मी)यांनी त्यांचे अभिनंदन केले. (शिपुनानाच्या चेहऱ्यावर तीव्र नापसंती दिसली.)
आबा म्हणाले 'मला एक नक्की सांगा, तुमचा त्यो संकल्प की काय, करायचा का सोडायचा का करून सोडायचा,ऑ'?'
आबांचा प्रश्न ऐकून सगळेच हसले.
सर म्हणाले 'कसं आहे आबा, 'संकल्प करणे' आणि 'संकल्प सोडणे' या दोन्हींचा अर्थ एकच आहे, पण यात मजा अशी की बहुतेकांना 'करणे' यापेक्षा 'सोडणे' हे जास्त भावतं म्हणा किंवा सोयीचं पडतं म्हणा.
आपलं जीवन व्यवस्थित आनंदात सुखात जावे हे प्रत्येकाला वाटते, पण त्यासाठी आपल्या जीवनात संकल्पाचे स्थान महत्वाचे आहे. मनापासून काही नियम, तत्वे,बंधने स्वतःवर लादून, त्याप्रमाणे वागल्यास,आपल्याला संयम, शिस्त लागते.संकल्प काही सोडायचा असो किंवा काही काही चांगल्या गोष्टी धरायच्या असो, तो एकदा केला की तो कायमस्वरूपी पाळणे महत्त्वाचे आहे. नाहीतर 'नव्याचे नऊ दिवस आणि परत येरे माझ्या मागल्या ' असं व्हायला नको,नाहीतर समाज तुमची टर ही उडवणारचं'.

आबा म्हणाले 'अक्षी बराबर बोलला सर तुमी, पन मी काय म्हनतो,संकल्प सोडायला मुहूर्त कश्याला पायजे?, करा की संकल्प आताच.अजून चार दिसांनी असा काय फरक पडणार हाय?'...


शीतल शिंदे ,दहीवडी .सातारा
नविन वर्ष म्हटले की सर्वांसाठी नवा उत्साह आणि नवी उमेद घेवून येणारे असते. इंग्रजांनी रुजवालेल्या काही गोष्टी आजही आपण काटेकोरपणे त्याचे पालन करतो. मग त्या चुकीच्या असल्या तरी कोण पाहत नाही दूसरे करतात म्हणून आपण पण करायच्या.पण असेच का असा कोणी विचारच करात नाहीत.
असो नविन तर नविन वर्ष!

आमच्यासाठी खरेतर प्रत्येक अन प्रत्येक क्षण नवाच आहे. पुढचा घेतला जाणारा श्वास सुद्धा सर्वांसाठी नवाच आहे. आणि म्हणून प्रत्येक क्षण, वेळ, मिनिट आणि दिवस हा आपल्यासाठी नवाच आहे.

एक संकल्प पूर्ण जहाला की लगेच दूसरा संकल्प करायचा जी वेळ असेल तेव्हाच त्यासाठी नविन वर्षाची वाट पहायची काहि गरज नाही .वेळ वाया घलवायची गरज नाही. त्यामुळे आयुष्यातील खुप वेळ वाया जातो.
म्हणून जी वेळ समोर येईल ती आपल्यासाठी नविन असते.
त्यासाठी शुभ मुहूर्त पाहण्याचे थोतांड करायची काहीच गरज नाही.
तुम्हा सर्वाना  माझ्याकडून तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक नव्या क्षणासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्या !

(यातील सर्व संबंधित छायाचित्रे गुगलवरून घेतलेली आहेत.)

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************