माझ्या आठवणीतली शाळा सहल

🌱वि४🌿व्हॉट्सअप ग्रुप

📄आठवडा 47 वा 📝

माझ्या आठवणीतली शाळा सहल


या विषयावर शिरीष उमरे ,नवी मुंबई.शीतल शिंदे ,दहिवडी
अमोल धावडे,अहमदनगर.प्रदिप इरकर,वसई.पालघर.
सिताराम पवार,पंढरपूर.डॉ. विजयसिंह पाटील,कराड .यांनी जागवल्या आहेत आपल्या लहानपणीच्या सहलीच्या आठवणी.
वाचा तर मग…….

शिरीष उमरे ,नवी मुंबई.
प्रत्येक गोष्टीत काहीतरी नविन व पॉजीटीव्ह शोधण्याची सवय लावली त्या आखरे मास्तरांची आठवण आली *शाळा सहल* म्हटल्याबरोबर !!...😍

सातवीत शिकत असतानाची गोष्ट आहे की सरांनी डोळे मिचकावत वर्गात सांगितले  सोमवारी आपण ट्रीपला जाणार आहोत.... जल्लोष !! सगळ्यांचे उजळलेले चेहरे व कीलबिलाट ...पुर्ण वातावरण च  बदलुन गेले !!

सरांकडे ₹२० बस तिकीटीचे जमा करायचे होते. आपआपला टीफीन घ्यायचा होता. तयारीत कसे तीन दिवस निघुन गेले कळाले नाही. पहाटे सहा ला आईने दिलेला डब्बा व पाणीबॉटल रुमाल घेऊन स्वारी बाबांच्या सायकलवर बसस्टँडवर हजर.. सगळ्या वर्गमित्रांच्या बिर्हाडाला बस मध्ये कोंबुन बस रवाना झाली आणि एका अस्मरणीय प्रवासाची सुरुवात झाली....

सरांनी सगळ्यांसाठी आणलेला कच्चा चिवड्यावर ताव मारत खिडकीतुन धावणारी झाडे पहाण्याची मज्जा घेत आमची धमाल सुरु होती. मग सरांनी प्रत्येकाला कंडॅक्टरचे काम समजावुन सांगितले. घंटी वाजवण्याचे प्रकारापासुन ते तिकीटीला पाडलेल्या छीद्राचा अर्थ ही नवीन माहीतीचे प्रॅक्टीकल कुतुहलाने बघुन आमचा पुढचा धडा ड्रायवर साहेबांचा झाला... हॉर्न, आरसा, गेअर, ब्रेक, अॅक्सीलेटर, वायपर वैगेरे चा वापराचे प्रात्याक्षिके झालीत. थोडा वेळ गाण्याच्या भेंड्या रंगल्या. मग आमचे गाव आले आणि ड्रायवर कंडॅक्टर काकाना टाटा करुन आमची टोळी निघाली पुढच्या प्रवासाला... कच्चा रस्ता .. दुरवर हीरव्यागार डोंगरावर दिसणारी लाल कौलारु घरे ... हवेनी डोलनारी शेतातली कणसे... एक वेगळाच सुगंध सर्वांना धुंद करुन गेला. फुलपाखरांमागे धावणे व पक्षांच्या आवाजाची नक्कल करता करता सरांच्या मामाच्या वाड्यावर केंव्हा पोहचलो कळालेच नाही.  रस्त्यात सरांनी पुस्तकातले वनस्पतीशास्त्र असे उलगडुन दाखवले की परत पाठांतराची गरज च भासली नाही. वाड्यातली बकरीचे व कोंबडीचे पिल्लांसोबत खेळतांना व बैल जोडी जुपतांना आणि गायीच्या धारोष्ण दुधाचा हळदी सोबत आस्वाद घेतांना प्राणीशास्त्र समजावुन सांगण्याची सरांची हातोटी बघुन विस्मीत झालो की हाच का तो खडुच्या धुळीत भरलेला शाळामास्तर ... सरांचे आज वेगळेच रुप बघायला मिळत होते. कीती सांगु आणि कीती बोलु असे त्यांना झाले होते. मग आजीने दिलेला पोळीच्या चुरम्याचा लाडु तोंडात कोंबुन आम्ही सगळे चढलो बैलबंडीवर... बैलगाडीचा हा प्रवास गजब... मधात एका झर्याचे थंडगार पाणी पिऊन मासोळ्या खेकड्यांशी खेळुन भिजुन मस्त्या करत पोहचलो एका कील्ल्याच्या पायथ्याशी ... वरच्या महादेवाच्या मंदिरात जेवायचे आहे तर लवकर चढा असा आदेश मिळताच आम्ही मावळे निघालो चढाई करायला ...
चढाई करतांना खरचटणे, ढोपर फुटणे आणि मग त्यावर कंबरमोडीच्या पानाचा रस लावणे हे वैद्यकीय उपचार करत सगळी आम्ही माकडे भिडलो बोरा करवंदाच्या रानमेव्यावर... मस्त मातीत मळुन घामाजोगाळ होत पोहचलो माथ्यावर... तोपर्यंत सरांनी भुगोल व इतिहास सहज रसाळ पध्दतीने शिकवला हे कळाले पण नाही. वरुन दिसणारे विहंगम दृश्य डोळ्यात साठवुन बुरुजाच्या वाटेने परत एका दरीत उतरलो आणि सगळे अचंबीत राहलो. एक छोटासा धबधबा आमची वाट बघत होता... सरांच्या परवानगी ची वाट न पाहता कपडे फेकुन सगळी वानरसेना धबधब्याखाली नाचत होती. सर मिश्कीलपणे हसत बाजुच्या मंदिरात गेले. थोड्या वेळाने पांढर्याशुभ्र दाढीच्या साधुसोबत परतले पंचे घेउन... सगळ्यांची डोकी पुसुन दिलीत.
मग सुरु झाला आमचा राजेशाही जेवणाचा थाट !! सगळ्यांचा डब्ब्यांचा गोपालकाला ... नंतर साधुबुवांनी दिलेला दहीभाताचा प्रसाद व पळसाच्या द्रोणात अमृततुल्य ताक ...शेवटी त्यांनी दिलेल्या रानफळावर मारलेला ताव... सगळे पेंगु लागले ह्याच नवल काय !! दोन तासाच्या गाढ झोपेनंतर सगळा शिणवा निघुन गेला. उठल्यावर सरांनी बनवलेला गवती चहाने परत बॅटरी फुल...
मंदिराच्या पटांगनात लंगडी, धाबाधुबी, मामाचे पत्र वैगेरे खेळ झाले... खुप धमाल केली आणि साधुबुवाच्या पाया पडुन पायथ्याकडे प्रवास सुरु झाला. गप्पा मारत मारत परत वाड्यावर केंव्हा आलो माहीतीच पडले नाही. आजोबांनी बनवलेला हुरडा व शिंगाडे खाउन मसालेदार दुध पिऊन सगळे जड पावलांनी बसस्टॉपकडे निघालो. बसमध्ये सुध्दा सगळे अर्धनिमोल्लित डोळ्यात आज घालवलेले भावविश्वाचे पुन्हा स्वप्न बघत होते. बसमधुन उतरल्यावरही कोणाचीच घरी जाण्याची ईच्छा नव्हती...
आजही इतक्या वर्षानंतर सगळे डोळ्यासमोर जसेच्या तसे उभे राहीले...
आज वाटते की सगळ्यात जास्त पगार हा प्राथमिक शिक्षकांचा असावा... ते घडवतात पुढची पीढी... धन्य ते मास्तर जे जीव तोडुन शिकवतात 🙏😇

जाता जाता एक गोष्ट अजुन... सरांनी लावलेली प्रवासाची आवड अजुनही कायम आहे... पस्तीस वर्षापासुन भटकंती सुरु च आहे... नाविन्याचे कुतुहुल कायम आहे... शिकण्याची अतृप्ता अजुनही जिवंत आहे... जगण्याची मजा घेणे सुरु च आहे... सगळ्या गोष्टी पॉजीटीव्हली बघणे चालु च आहे...
रजा घेतो ✨🙏😇📝

शीतल शिंदे ,दहिवडी.
            आमची सहल जाणार म्हणून 4 दिवस आधीच आईच्या मागे "माझी सहल जाणार ' सहल जाणार "  म्हणून आईच डोकं उठवले .ईयत्ता चौथी मधे असताना .पहिलीच सहल होती. जवळच होती पण निसर्गरम्य परिसर होता तो .फार उत्साह होता .
सहलीला जाताना ओढ्याकाठी  पाण्यात उड्या मारल्या ' चिंचा  खाल्ल्या ' आता आलो xyz नावाच्या  देवीच्या मंदिरात .दगडी इमारत पहिली , छान खेळून दमलो आता जेवायला बसायचे .
आईने चपाती भजी बनवून दिली होती .
   सर्व मुले मुली एकाच पंगतीत बसलो .मात्र आम्हाला वेगळ्या बाजूला बसवले .का तर अनुसूचित जात . मग काय भूक पाळून गेली .घरी आल्यावर आईने विचारले कशी झाली ? सांगितले छान .

      दुसरी - सहल
इयत्ता - सातवी -  पुन्हा एकदा निसर्गरम्य  परिसरात पण वनभोजन
गुरुजींनी आमच्याकडून वर्गणी  काढली साहित्य खरेदी केले .गेलो तिकडे शेती , झाडे , फुले  छान परिसर होता तो .अजूनही डोळ्यासमोर दिसते ते चित्र .गाणी , गोष्टी वगैरे झाले आता जेवण बनवायचे होते .आम्ही सर्व मुली स्वंयपाक बनवायला तयार झालो .पण तिथेही जतीप्रथा! आम्हा चार मुलींना फक्त तांदूळ, जिरे  निवडणे , एवढेच काम दिले ना चपाती लाटलि ना भाजी बनवू दिली ना जेवण वाढू दिले .फार नाराज झालो होतो पण काय करणार . माळकरी गुरुजी आमचे ते .अजूनही ते क्षण आठवतात .कसे विसरणार .भांडी घासायला मात्र काम दिले .
     पण हरकत नाही म्हटले त्याचे कारण असे की  तेच गुरुजी वर्गामधे मात्र जातीभेद नाही केला .हुशार विध्यार्थीनी म्हणून मला मॉनिटर  केली होती .पण सहलीची मात्र आठवण राहिली .
    🙋 आणी तिसरी सहल
वन भोजनाची इयत्ता नववी .गाडीने सर्वजण गेलो .xyz देवाचे मंदिर होते . सर्व साहित्य निवडून झाले .आता स्वयंपाक बनवायचा मात्र आम्हाला वाटले  आता आपल्याला मराठी साररखेच केले जातेय की काय ? म्हणून आम्ही तीघीजनी जवळच्या नातेवाईकांकडे गेलो ते जेवण बनवून झालेवरच आलो .
     सर आमच्यावर रागावले होते फार .म्हणाले आता तुम्हाला शिक्षा देणार .आम्ही एकीमेकीच्या तोंडाकडे पहायला लागलो आता शिक्षा काय असेल ?
   शिक्षा होती "तुम्ही  तीघीणी सर्व मुला - मुलींना जेवण वाढायचे ".शिक्षा ऐकून फार आनंद झाला .आणी आनंदाने आम्ही सर्व जेवण वाढले .मात्र इयत्ता  सातवीच्या वर्गाची वनभोजन सहन , गावपातळीवरील विचाराची रुढी तशीच्या तशीच आहे .कधी सम्पेल सांगता येत नाही .
         सातवीचे गुरुजी भेटले त्यांना चहासाठी घरी बोलावले मना मधे आदर तोच  होता गुरुजी म्हणून .वैभव पाहून गुरुजी काहीच बोलले नाहीत .मीच त्यांच्या मुलीबद्दल  - वर्ग मैत्रिणी बद्दल , त्यांच्या बाईंना विचारले .
     आज मी एवढ्या वर्षांनी मन मोकळे केले .

अमोल धावडे,अहमदनगर.

नमस्कार माझ्या जिवलग मित्र/मैंत्रिणींनो
मित्रांनो सहल विषय निघाला की फिरायला जाणे, मज्जा करणे, नवीन ठिकाणं पाहणे या सर्व गोष्टी आनंदी आनंद. पण माझ्या आयुष्यात माझी बारावी पूर्ण होईपर्यंत सहलीला जायचा योगच आला नाही. परंतु मी अस लांब गेलो नसलो तरी मी पाचवी सहावीला असताना गुरुजींनी सांगितले की तुम्हा सर्वांची सहल जाणार आहे सर्व मुले आनंदी झाले परंतु माझ्या चेहऱ्यावर आनंद नव्हता कारण सहल म्हटलं की जाण्यासाठी लागणार खर्च तो माझ्याकडे नव्हता. परंतु गुरुजींनी सांगितलं की आपल्याला सहलीसाठी जवळच एक 5 ते 7 किलोमीटर अंतरावर जायचं आहे. मी जाम खुश झालो दुसऱ्या दिवशी मस्त घरून पाच रुपये, मस्त डबा व नवीन कपडे घालुन मी सहलीसाठी गेलो. जवळच असणाऱ्या तलावावर आमची सहल गेली त्याठिकाणी मस्त मित्रांसोबत मज्जा धमाल केली. दुपारी घरून दिलेल्या डब्यांचा स्वाद घेतला खुप मज्जा केली. ही माझी आठवणीतील सहल आहे. बारावी नंतर मित्रांसोबत खुप ठिकाणी फिरण्यासाठी गेलो परंतु त्या वेळेस शाळेत असताना आणि आत्ता मित्रांसोबत जातांना खुप मोठा फरक आहे. सध्याच्या जिवनात खूप साऱ्या ठिकाणी जाऊन आलो तेही भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आहे. परंतु परिस्थिती माणसाला खुप काही शिकायला भाग पाडते हा अनुभव किंवा ही सहल माझ्यासाठी खुप आनंददायी होती त्यामुळे हा आनंद मांडण्याचा प्रयत्न केला.
धन्यवाद 🙏😍


प्रदिप इरकर, वसई,पालघर.

माझ्या आठवणीत शाळा सहल तशी काही नाही परंतु आठवणीत राहिली ही आमची NSS चा कॅम्प!
9 वीला असताना आमच्या शाळेतून सहल गेली होती तिला मी नव्हतो गेलो त्यांनतर 10 वि सहल च नव्हती.11 वि 12 वि science चे विद्यार्थी म्हणून फक्त अभ्यास च करावा असाच काहीसा होते त्यामुळे मनासारखी सहल झाली नव्हती व वरिष्ठ विद्यालयात आल्यानंतर NSS मध्ये सहभाग घेण्याचे माझे कारण तर कॅम्पच होता.

वसई पासूनच काही दूर असलेल्या चांदीप गावातील शाळेत आमचा कॅम्प होता पूर्ण 7 दिवस!
थंडीचे दिवस होते.आमचा शाळेत रोजचा दिनक्रम ठरला होता.आम्हा सर्व विद्यार्थ्यांचे 7 गटात विभाजन केले होते.5:30 ला उठणे मग प्रातःविधी आटोपुन आम्ही योग करत असू,सर्व जणांना विशेष न आवडणारे असे होते😜
मग आमचा एक ग्रुप स्वयंपाक करण्यासाठी थांबत असे व आम्ही सर्व जण श्रमदान करण्यासाठी जात असत,हे सर्वांचे आवडते काम होते कधी स्वतःच्या घरी पण झाडू न मारणारे आमच्यातले काही जण उत्स्फूर्तपणे काम करत असत.

   श्रमदान आटोपून आल्यावर आम्ही अंघोळ करण्यासाठी जात असत.एका बाथरूममध्ये ४-५ जण अंघोळ करत असत😅
अंघोळ होईपर्यंत आमचे जेवण तयार झालेलं असायचे मग आम्ही जेवणावर ताव मारून दुपारच्या कार्यक्रमाला तयार होत असे.
दुपारी वेगवेगळं विषयांवर वक्ते येऊन आम्हाला भाषण देत असत.अंधश्रद्धा, पथनाट्य आणि अनेक विषयांवर आम्हाला नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. ते संपल्यानंतर संध्याकाळच्या चहाची व्यवस्था केलेली असे,चहा पिल्यानंतर आम्हीं मैदानावर मैदानी खेळ खेळत असे त्यात आम्ही चक्क सोनसाखळी, सुट्टी साखळी असे लहानपणीचे खेळ खेळून पुन्हा एकदा बालपण जगायची संधी आम्हाला ह्या 7 दिवसात मिळाली होती.
संध्याकाळच्या जेवणानंतर आमच्या प्रत्येक गटाला एक पथनाट्य सादर करायचे असे.मुंबई लोकल,शौचालय, स्त्रियांची परीस्थिती  अशा अनेक विषयांवर पथनाट्य सादर केली गेली त्यावेळी आमच्या गटाने सादर केलेले अंधश्रद्धा विरोधी पथनाट्य व त्यात मी केलेली भोंदू बाबाची acting  सर्वांच्या इतकी स्मरणात राहिली की पुन्हा कॉलेज मध्ये आल्यानंतर मला *बाबाजी* या नावानेच सर्वजण हाक मारत असत😅.
   आम्ही 26 जानेवारी सुद्धा त्याच शाळेत साजरा केला.
असा हा आमचा रोजचा 7 दिवस दिनक्रम असे.
ह्या 7 दिवसात अनेक नवीन गोष्टी ,नवीन मित्र, ग्रामीण आदिवासी भागातील जीवन,आम्हाला बघून त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारा आनंद, आम्ही अगदी सहलीप्रमाणे पार पाडलेली एक शैक्षणिक कॅम्प, अशा अनेक आठवणी स्मरणात घेऊन पार पडलेली आमची ही सहल माझ्या विशेष स्मरणात आहे😍

सिताराम पवार,पंढरपूर.

मला प्रवास खूप आवडतो. सहल ही शक्यतो निसर्गरम्य ठिकाणी, ऐतिहासिक वास्तू, गड, किल्ले आशा ठिकाणी जाते. मी आठवीत असताना मला सहलीला जाता आले नाही, कारण माझा मोठा भाऊ जाणार होता, मंजे दोघपैकी एकट्याने जायचं. मग मला दहावीत असताना संधी मिळाली. सहल कोकणात रायगड, प्रतापगड, रत्नागिरी, महाबळेश्वर येथे जाणार होती.
सुरवातीला आमच्या शिक्षकांनी बसमध्ये आमच्या गावात येताना त्यांची मुलं आणली,(सहलीला नेण्यासाठी) मग आमच्या मित्रांनी गोंधळ केला आणि त्यांना कॅन्सल केलं शिक्षक थोडे नाराजच झाले. आमची सहल अशी सुरू झाली जसा सोलापूर जिल्हा ओलांडून पुढे जावं तसं निसर्गच अदभुत अस दर्शन होऊ लागलं. मला तर ते डोंगर, दऱ्या, घाट बघून अस वाटायचं की आपण वहिवरची चित्रं तर पाहतनाही ना असा भास होत होता, खरंच सह्याद्रीचा थाट पाहून मी अचमबीतच झाले. कारण मी पहिल्यांदा माझा जिल्हा ओलांडला होता. प्रतापगडावर मात्र हद्दच झाली आमची बस पुढे आणि मुलींची मागे होती. जस आपण जिना चढावा तशी वर जायला वाट होती, आमची वर चढताना वळणावर ड्रायव्हरला ब्रेकच बदलणं येईना, आमची बस तर अशी होती की पाठीमागे दरी, सरळ मागे गेली तर दारीतच!!आम्ही बसमध्ये,5  मिनिताट तर बस मधून मुलं बाहेर!!शिक्षकांनी मोठे दगड चाकाला उटी मनुन लावले. मग पाठीमागून मुलींच्या बसचे ड्रायव्हर आले त्यांनी गियर बदलला, तोपर्यंत आम्ही बसमधून खाली,बस रिकामी
आणि सर मणले ,इथून पुढे प्रतापगड नाक्कोच, आणि आम्ही हताशपणे त्या दरीकडे पहात होते. मनात नाही ते विचार घोंगावत होते....


डॉ. विजयसिंह पाटील,कराड.( MBBS. DA.)

वडिलांची वारंवार बदली होत असल्याने, सातवीपर्यंत कुठं सहलीला जायला मिळालं नाही. सहलीला जावं असं त्याकाळात वाटलं पण नाही. मला वाटते, सत्तर ऐंशीच्या दशकात सहलीचा फारसा ट्रेंड ही नव्हता. दहावीची परीक्षा झाली आणि आम्ही मोकळं झालो.
एके दिवशी, कुणाच्या तरी मनातून आयडिया निघाली. ,
सायकल वरून , कराडपासून आठ नऊ किलोमीटर वर असलेल्या, पाचवडेश्वर ठिकाणी जायचं. सायकल वरून जायचं म्हणून निम्मी अधिक गळाटली. काहीतरी कारणं सांगून एकाएकनं काढता पाय घेतला. राहिलो आम्ही दहाजण.
आमच्यात एक अभ्या नावाचा पुस्तक पंडित होता, (मी त्याचं नाव पुस्तकराव ठेवलंवतं). दुसरा मिल्या. दोघेही अभ्यासात तोडीसतोड. अभ्याला  अफाट पुस्तकी ज्ञान तर मिल्या सगळ्यातच हुशार. अजून तिघे अन्या, लक्षा, निव्वळ टारगट . फक्त दंगा मस्ती, मारामारी करण्यात एक नंबर, ( फक्त ह्याच्यातच पहिला नंबर, अभ्यासात शेवटचा). बाकी आम्ही सगळीकडेच जेमतेम.
अभ्यानं स्वयंघोषित ट्रीपच अध्यक्ष पद घेतलं. व ट्रिप संबंधी मिटिंग ठेवली.
मिटिंग सुरू झाली. अभ्यानं एक स्वतः बनवलेली डायरी आणली होती. कसं निघायचं, बरोबर साहित्य काय काय घ्यायचं याची चर्चा सुरू झाली.
पहिलाच खोडा मिल्यानं घातला ' मी स्कुटरवरून (हा गडी वडलांची स्कुटर चालवायचा ) आलो तर चालेल का ?'.
मिटिंग मध्ये खळबळ उडाली. सगळ्यांनी मिळून त्याला विरोध केला
अभ्याच्या तोंडावर हसू आलं. मिल्या मिश्किल हसला.  ( मला लक्षात आलं, हे नुसतंच खोड्या काढणार ).
दोन दिवस अगोदर तयारी सुरू झाली. सकाळी नऊ वाजता निघायचं. एकत्र जमण्याचं ठिकाण निश्चित झालं. प्रत्येकानं डबा घेऊन यायचंही ठरलं. दोन्ही चाकात हवा मारून घ्या, हायवे वरून जायचं शिस्तीत जाऊया. बरोबर टॉवेल व उंडरवेअर घ्यावी ( पोहण्यासाठी ),इत्यादी अनेक सूचनांचा खच पडला.
पोहायचं आहे तर, सगळ्यांनी घरी कल्पना द्यावी ,.असं अभ्यानं सुचवताच, कशाला कशाला असं म्हणत माझ्यासह बऱ्याच मेम्बरनी खळकळ केली. इथं मिल्याने अभ्याला पाठिंबा दिला.
वर्गणी  ( सहभाग निधी: अभ्याचा शब्द ) गोळा करायचा विषय निघताच टारगट गॅंग संतापली. ' ये शहाण्या, आपण इथंच जाणार आहे, मुंबईला नाही, उगच खुळ्यागत बोलू नको ,'. तसं अभ्याचा चेहरा पडला. आणि पुस्तक राव ' हँ हँ' करत खुसदीशी हसला.

वडील कामानिमित्त चार दिवस गावी गेले होते. त्यामुळं त्यांना विचारायचा प्रश्नच पडला नाही. आईनं सहलीची परवानगी दिली, पण पोहण्यास कडकडून विरोध केला. पाण्यात गेलास तर बाबांना सांगीन असा दमही दिला.

अभ्यानं, सहलीचा कार्यक्रम एका फुलस्केप कागदावर छान अक्षरात लिहून सर्वांना दाखवला. तो खालील प्रमाणे...
चौकात आगमन... सकाळी ठीक 8.30 वा.
प्रयाण...  बरोबर नऊ वाजता.
प्रथम विश्रांती स्थळ.. अमुक..
द्वितीय विश्रांती स्थळ... तमुक...
अंदाजे अकरा वाजता नियोजित ठिकाणी आगमन.
देवदर्शन..15 मिनिटे. जलविहार..(हाही शब्द अभ्याचा ) अर्धा ते एक तास.
दुपारचे भोजन . दोन वाजता..
विश्रांती .. अर्धा तास..
भेंड्या व तस्संम बैठे खेळ एक तास.
साडेचारला परतीचा प्रवास.
सहा वाजता घरी परत.
सगळ्यांना कडकडून भूक लागल्याने, ह्यावर कोणीही विरोध केला नाही .

ठरलेल्या दिवशी सकाळी  सगळे चौकात हजर झाले. अभ्यानं पांढरा शर्ट  पांढरी पॅन्ट, पांढरी कापडी गोल टोपी,पांढरे कॅनव्हासचे बूट ,असा वेष परिधान केलेला. मिल्या मात्र रंगीबेरंगी कपड्यात, तर माझा ड्रेस, शाळेचाच गणवेश ( दुसरा बाहेर वापरायचा ड्रेस आईनं नेमका त्याचदिवशी धुवायला घेतलेला ) , डोक्यावर ncc ची टोपी तर पायात स्लीपर.. रानवट गॅंगनं डोक्याला टॉवेल गुंडाळलेला आणि पायात कोल्हापुरी चपला. कपड्यांच्या, पादत्राणाच्या आणि टोप्याच्या एव्हड्या व्हरायटी कुठंच बघायला मिळणार नाहीत.
ठरलेल्या वेळेला निघालो. (त्या काळी 1980 साली वाहतूक फारशी नसायची.) अन्या, रम्या, मिल्या, लक्षा, मी आणि इतर दोन जणांना रोजची सायकल चालवायची सवय. आम्ही म्हणजे मी, आणि रानवट गॅंग नेहमीच्या स्पीडनं निघालो.
चाललो होतो नेहमीच्या वेगानं, पण कधी पहिला थांबा मागे गेला ते कळलच नाही. मागून दुरून शिट्टीचा आवाज ऐकू आला. (नंतर कळलं की, अभ्याच शिट्टी वाजवत होता ).पोलिसांनं कुण्या ट्रकवाल्याला आडवलं असेल असं समजून आम्ही दरमजल करत दुसराही स्टॉप ओलांडला. फाटा आल्यावरच लक्षात आले थांबायचं. झाड बघून व सावली धरून आम्ही गप्पा चालू ठेवल्या. मागून मिल्या आला. ' अरे येऊ द्या की त्यांना'.
थोडा का बऱ्याच वेळाने अध्यक्ष व व अजून दोन जण धापा टाकत आले. आणि गप्पदिशी सायकल झाडाला लावून खालीच बसले. अभ्याचे कपडे धुळीने व ट्रकच्या काजळीने लालसर काळे पडले होते . घामाच्या धारा अंगाखांद्यावरनं वाहात होत्या..वाऱ्याने टोपी लांब उडून गेलेली..


त्या तिघांस धड बोलता येईना ( हे फक्त रविवारी मोकळ्या जागेत सायकल चालवत).
दम घेऊन अभ्या म्हणाला, ' हिथं मोठं डेरेदार झाड आहे, आजूबाजूला हिरवीगार शेती आहे, हिथचं आपण सहल साजरी करूया .'
मिलिंदच्या पुढाकाराने ही सूचना तात्काळ बहुमताने धुडकावली गेली, (पिण्याच्या पाण्याची सोय नाही व मेन इंटरेस्ट पोहण्यात असल्याने .)
कसंबसं फाट्यावरून आम्ही छोट्या रस्त्यानं इश्चित ठिकाणी पोहोचलो.
मोठी मोठी झाडे, विस्तीर्ण पटांगण , मंदिर आणि पुढं संथ वाहणारी कृष्णा नदी.. वर सूर्य आग ओकत असतानाही, इथं खाली मस्त सावली व गार वारे..
सगळ्यांनी हातपाय धुवून देवदर्शन केलं. सगळ्यांच्या पोटात खच्चून  कावळे ओरडत होते. तिथंच झाडाखाली आमची पंगत बसली. एव्हडी भूक लागली होती की, पाचच मिनिटात डबे संपले, तरी अजून भूक शिल्लक होती.. शेजारच्या पाण्याच्या टाकीतून ओंजळीत पाणी घेऊन पोटभर पाणी पिलं.
रम्या, अन्या, लक्षाआणि अर्थातच मी तिथंच कलांडलो. लक्ष्या दोन मिनिटातच घोरायला लागला. त्या आवाजानं , पिशवीतून पत्ते हुडकत असलेला अभ्या दचकला. लक्ष्याच्या तोंडातून निघणाऱ्या संगिताला , रम्या अन्याच्या तोंडानी सार्थ साथ दिली.
अर्ध्या तासाने यांना हलवून जागं केलं. हे डोळे चोळत उठले आणि चला पोहायला म्हणत कपडे काढायला लागले. अभ्या ' अरे  पोहायला जायचं नाही असे बाबांनी सांगितले आहे व आपलं तसं ठरलं पण आहे.'
पण याला  न जुमानता आम्ही चारपाच जण मिल्याच्या नेतृत्वाखाली नदीकडे निघालो. नदीत उतरायला चांगल्या दगडी पायऱ्या बांधल्या होत्या. आम्ही पहिल्या पायरीवर पाय टाकताच ' ये गाबड्यांनो, तिकडं कुठं  ' असा खणखणीत आवाज तिथं घुमला. आम्ही जागीच पुतळ्यासारखं उभे. मागे असणारी भिऊन चार पावलं मागे सरकली. शेजारच्या रानातून एक विजार बंडीवरचा आणि डोक्याला टॉवेल गुंडाळलेला व तोच पुढं तोंडावरून घेतलेला, हातात मोठी काठी घेतलेला इसम आला. ' ये सुकाळीच्यानो , पव्हायला येतं का ? आयबा ला ईचारलं है का ?'.

त्याचा तो अवतार बघून,सगळ्यांना घाम फुटला. काही न बोलता गप मान खाली घालून सगळी मागे फिरली. ' अर म्या काय म्हणतुया, हिकडं या, ' पाचव्या पायरीवर काठी आपटून ' ह्येच्या खाली जायचं न्हाय, एव्हड्यातच खेळा, जर खाली गेला तर पाय मोडून हातात दीन, '. सगळ्यांनी माना डोलवल्या. तासभर पाण्यात डुंबत बसलो, घाबरत घाबरत अभ्या पण पाण्यात उतरला. तास दिडतास गेला. कुणी बाहेर यायचं नाव घेईना. वरुन परत गडगडाट करत आवाज आला. ' हं बास , आता या वर'..
सगळी वर आली. संध्याकाळ होत आलेली. ' चंदया, ये की लगोलगी ', तसं आमच्याच शाळेतला पण दुसऱ्या तुकडीतील, चंद्रकांत हातात जर्मनचा मग भरून उसाचा रस व ग्लास घेऊन आला. सगळी ' अरे  तू इथं कसा काय ?' असं विचारू लागली.
' अगुदर रस प्या, मग सांगतु तुमाला 'असा परत गडगडाट झाला.  सगळ्यांनी पोट भरेपर्यंत रस पिला..
(मग सगळी हकीकत कळली. मिल्याच्या वडलांना अंदाज होता की किती पण सांगितले तरी ही पोरं ऐकणार नाहीत. त्यांचा एक मित्र याच गावचा.  पोरांच्या वर लक्ष ठेवायला सांगितले होते.मित्रांनं चंदूच्या वडलांना सांगितलं. )
निरोप घेऊन आम्ही परत निघालो. घर कधी आलं ते कळलंच नाही.
नव्वद टक्के गंमत मजा आणि दहा टक्के फजिती, अशी ही माझी पहिली सहल…


(या ब्लॉगमधील सर्व प्रातिनिधिक छायाचित्रे गुगलवरून घेतलेली आहेत.)


संबंधीत जणांच्या सहलीच्या आठवणी कशा वाटल्या.खालील कमेंट्स मध्ये नक्की कळवा.तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट बघत आहोत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************