देशभक्ती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
देशभक्ती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

संविधान जाळणे , हा नेमका कशाचा निषेध ?

संविधान जाळणे हा नेमका कशाचा निषेध?

संदिप बोऱ्हाडे, वडगाव मावळ,पुणे.
             आम्ही भारताचे लोक , या शब्दांनी भारतीय संविधानाची सुरूवात होते. सर्व भारतीय नागरिकांचा गौरव आणि सन्मान ग्रंथ म्हणजे संविधान.
संविधान आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देते.

    संविधान म्हणजे देशाचा सर्वोच्च कायदा. आपण ज्या देशाचे नागरिक असतो, त्या देशाचा कायदा आपल्याला पहिल्यांदा मान्य करावाच लागतो.
तो ज्यांना मान्य नसतो, तो माझ्या दृष्टीने देशद्रोहीच.
जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असलेला देश म्हणून आपला देश ओळखला जातो ते फक्त आपल्या संविधानामुळेच.

    जात, धर्म, रंग, वर्ण, लिंग कशाच्याही आधारे नागरिकांत भेदभाव करता येणार नाही,
हे संविधानाचं तत्व.. आपला राष्ट्रध्वज, आपले राष्ट्रगीत आणि आपले संविधान हे आपले सर्वांचे तीन मानबिंदू. जशी राष्ट्रध्वजाबद्दल, राष्ट्रगीताबद्दल तशीच आस्था देशातल्या नागरिकांना देशाच्या संविधानाबद्दलही हवी.

     भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आपल्या संविधानाचा अपमान काही लोकांनी केला आहे.
संविधान जाळणे ही देशातली सगळ्यात दुर्दैवी घटना आहे, या घटनेचा जाहीर निषेधच!
विषय कोणताही असो, तुम्हाला समर्थनार्थ किंवा विरोधात मत मांडण्याचा पुरेपूर अधिकार आहे. आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचाही अधिकार आहे, पण संविधान जाळण्याच्या कृतीचं कदापि समर्थन होऊ शकत नाही. पण  संविधान जाळल्यानंतरही
या देशातील जनता जर अजूनही शांत रहात असतील तर हे देशाचं दुसरे दुर्दैव, जाती, जमातीच्या अफुच्या नशेत लोकं 'लोकशाही' ला सर्रासपणे पायदळी तुडवुन अपमान करीत आहेत, ही येणार्या काळात 'देशात अराजकतेची' वाटचाल असल्याची धोक्याची घंटा आहे!

     संविधान जाळण्याऐवजी एखाद्या धर्माचा ग्रंथ जाळला गेला असता, तर त्या धर्मातील लोकं पेटून उठले असते..
काय काय झालं असतं ह्याची प्रचिती सर्वांना आहेच.
मग राष्ट्रीय ग्रंथ जाळल्या गेला तर एकाही न्यूज पेपर ला न्युज चॅनेल नाही कि, उशिरा न्यूज चॅनेल्स वर चर्चा सुरु नाही. कारवाईच तर नाव नाही. अवघड आहे माझ्या देशाच..
   
      जस इतिहास , भूगोल, विज्ञान , गणित टप्याटप्याने शिकवले जाते. तस राज्याची घटना का नाही शिकवली जात....? पण हे कुणाला करायचच नाही, हे जर झाल तर  राजकारण " कस खेळल जाईल. कुणालाच संविधान साक्षरता नको.

शेवटी जर संविधान वाचले तरच देश वाचेल अन्यथा हुकूमशाहीच !!


 

अनिल गोडबोले , सोलापूर.
         लोकशाही मध्ये एखादी गोष्ट पटली नाही की निषेध करण्याचा अधिकार आहे. आणि निषेध करणे हे चांगल्या समाजाचे लक्षण देखील आहे..

पण ज्या नियमामुळे आपल्याला सर्व अधिकार मिळाले आहेत किंवा ज्या संविधानाला बनवायला आपले पूर्वज झटले, जे सर्वात मोठी लोकशाही आणि लिखित स्वरूपात असेलेले संविधान म्हणून प्रसिद्ध आहे. तेच जाळण्यात आले.

आपल्याकडे राष्ट्रीय प्रतीक हे खूप उच्च स्थानी असतात आणि त्यांचा अपमान करू नये यासाठी कायदे देखील आहेत..

परंतु आपण कायदे पाळतो कुठे? .. संविधानाचा अपमान तर देश चालवणारे पदोपदी करत असतात म्हणून खरतर संविधान जळणाऱ्या पेक्षा ते काही कमी दोषी नाहीत.

संविधान जाळणे हा नेमका भारतीय म्हणून स्वस्तात मिळालेल्या अधिकारांचा निषेध आहे.
माणुसकीचा निषेध आहे.
प्रत्यक्ष कृती करताना त्यांना काहीच वाटले नाही, कारण त्यांना असाच इतिहास सांगितला गेला आहे जो द्वेषमूलक विचाराने प्रेरित आहे.

कायदा मोडणारे, संविधान जळणारे किंवा देशा विषयी उदासीन असणारे किंवा देशाच्या हिताचा निर्णय न घेणारे हे सगळेच देशद्रोही आहेत.

आरक्षणाचा मुद्धा किंवा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा मुद्धा हा निमित्तमात्र आहे.

संविधान आहे म्हणून तर आपण सगळे बोलू शकतो नाहीतर मुंडकीच उडवण्याची पद्धत होती राजेशाही मध्ये..

मला वाटत फक्त मतांसाठी केलेलं राजकारण आहे. मूळ मुध्ये बदलून टाकायचे किंवा भावनिक खोट्या मुध्या मध्ये तरुण वेगळा करायचा आणि मत मिळवायची पुन्हा सगळे जिकडे तिकडे... असा प्लॅन आहे सगळा

कुठल्याच राजकीय पक्षाला विकास आणि मूलभूत हक्कांसाठी काम करायचंच नाही.. त्यांना फक्त या आणि अशाच मुद्यावर विचलित करणे हाच खेळ आहे असं चित्र दिसत आहे..

पण संविधान जाळणे हे निंदनीय कृत्य आहे. त्याच समर्थन कधीच।करता येणार नाही.


 

शिरीष उमरे नवी मुंबई

तसा मी वैश्विक विचारसरणीचा पण आपल्या देशाची संस्कृती व संविधान बद्दल मला खुप अभिमान आहे.

*वसुधैव कुटुम्बकम्* हे प्रत्येक भारतीय मानत असला तरी मानवाने जमीनीवर व परस्परात रेघोट्या ओढुन कीतीतरी भिंती उभ्या केल्यात.  त्या उध्वस्त झाल्या आपल्या संविधान मुळे !!

एकच पृथ्वी आहे आणि आपला देश  वैश्विक विचारसरणीचा पुरस्कर्ता ✨👍🏻 पण काही समाजकंटक परत द्वेषाच्या रेघोट्या ओढुन मनामनात चरे पाडुन आपल्या मध्ये जातीधर्माच्या भिंती उभारण्याच्या  तयारीत आहेत...

यामागील खरे कारण राजकारण .... निवडणुका जवळ आल्या की ह्या जनावरांच्या कटकारस्थानाला सुरुवात होते...
हे दंगली घडवुन आणतील... सातवा वेतन आयोगाचे गाजर दाखवतील... कदाचित शेजार राष्ट्रासोबत युध्द घडवुन आणतील. आरक्षण आंदोलने, पुतळे विटंबना, हींसा, खुन, रेप तर होतच राहतील... कोणता पक्ष कीती वर्ष जुना आहे ह्या ला महत्व नाही... देशसेवेत व विकासात त्यांचे काय योगदान राहीले हे महत्वाचे !!

संविधान जाळल्या गेल्यावर  मिडीया कीती विकल्या गेली आहे हे लक्षात आले. राजकीय पक्ष आपली पोळी भाजुन घेत आहेत...आपण सामान्य माणसे स्वताचे डोके फीरवुन घेतोय.  ह्या विकृत लोकांचा निषेध करुन होणार नाही...

सडेतोड उत्तर द्या ...

 निवडणुकीत जातपात धर्म आणि राजकीय पक्ष न बघता निष्कलंक, निगर्वी, निष्कपटी, भ्रष्टाचारी नसलेला, गुन्हेगार नसलेला, रेपीस्ट/मर्डर/डाका न करणारा, युवा व सच्चा नागरिक असलेल्या उमेदवाराला निवडुन द्या 🙏🏼




प्रविण, मुंबई
           स्वतंत्र भारताच्या सुरवातीला अनेक वर्ष जातीय बंधनात अडकलेला एक मोठा शोषित वर्ग या देशात होता, त्यांना मुख्य प्रवाहात आणण हे मोठ आवाहन या देशासमोर होत. हजारो वर्ष दबलेला समजा, त्याच्या न्याय हक्कापासून वंचित होता आणि मानव असूनही अमानवी आयुष्य कंठीत होता. स्त्री ला कस्पटासमान मानणारा पुरुषप्रधान समाजच त्यावेळी प्राबल्य होत. तिला डावलून देशकार्य करण कठीणच होत. ज्यावेळी देश स्वतंत्र झाला त्यावेळी देशासमोर अनेक समस्या होत्या. दलित आणि महिला या वंचित घटकांच्या प्रगतीशिवाय देश प्रगत होणार नाही. याची जाणीव तात्कालिक पुरोगामी नेत्याना होती. त्यामुळे एक सर्वसमावेशक संविधान देण गरजेच होत.

बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली तशी एक घटना तयार हि केली. We the people of India ….अशी संविधांनाची सुरवात होते. संविधानाने आपल्याला माणूस म्हणून जगायचा अधिकार दिलाय. अधिकारासोबत त्यात अनेक गोष्टींची तरतूद केली गेली आहे कि जेणेकरून शोषित घटकांना न्याय मिळावा, समाजात एक स्थान मिळव आणि एक आदरपूर्वक आयुष्य जगता याव. पण ज्यावेळी घटना तयार झाली तेव्हापासून काही धर्मांध आणि मुलातात्वाद्याकडून सतत संविधानाची अवहेलना केली गेली आणि आजही चालू आहे. ९ ओगस्ट २०१८ ला  जे संविधान जाळण्याच प्रकरण झाल हे धर्मांध शक्तींनी पेरलेल्या द्वेषातून घडल आहे. या घटनेचे बीज हे धर्मांध शक्तीकडून रोवले गेले आहेत. हि धर्मांध बीजे  आपल्या नेहमीच आपल्या समोर अनेक माध्यमातून पेरले जात असतात, कधी ती संघटनेच्या रुपात, कधी बिनडोक नेत्यांच्या भाषणातून, तर कधी सोशल मेडिया च्या रुपात बीजारोपण चालू आहे.
संविधान जाळण हा नेमका कशाचा निषेध होता?

हा निषेध देशाच्या “धर्मनिरपेक्षतेचा” होता.....

हा निषेध देशातील प्रत्येक पुरोगामी लोकांचा, त्यांच्या विचारांचा निषेध होता, ...

हा निषेध लोकशाहीचा होता.....

हा निषेध मानवाला मानव मानणाऱ्या विचारसरनीचा होता......

देशामध्ये अशा घटनेची वेळ नेमकी का आली याचा विचार करणे गरजेच आहे. हा दोष हा त्या २०-२५ लोकांचा, ज्यांनी संविधान जाळले त्यांचा नाही. त्यानी हे कृत्य केल कारण कोणीतरी त्यांना प्रभावित करत होत. या निषेधाला समर्थन होत ते मानुवाद्यांच, कारण मनुवाद जिंदाबाद चे नारे त्यावेळी लावले गेले. या आधी असा प्रकार नाही झाला गेल्या ५ वर्षातील घटना जर पहिल्या तर संविधान जाळण्याचे बीज कसे रोवले गेले हे कळून येईल.

देशात मोठ्या पुरोगामी नेत्यांच्या हत्या झाल्या ...डॉ . दाभोळकर, कॉ पानसरे, कलबुर्गी आणि गौरीलांकेश यांची हत्या धर्मांध लोकांकडून झाली पण तपास शून्य. दोनच दिवसापूर्वी उमर खालीद वर भ्याड हल्ला झाला.

भीडतन्त्रचा वापर करून गोराक्षेच्या नावाखाली अल्पसंख्याकांच्या झालेल्या हत्या
मेडिया ला हाताशी घेऊन जातीवाद, भ्रष्टाचार ला  विरोध करणाऱ्या JNU च्या विद्यार्थ्यांच्य

बनावट चित्रफिती करून त्यांना देशद्रोही करण्याचा झालेला प्रयत्न

सतत हिंदू-मुस्लीम वादावर प्राइम टाइम मध्ये विकलेल्या वृत्तवाहिन्यांकडून दाखवण्यात येणार्या चर्चा (भांडण)

भीमा-कोरेगाव दंगल, त्याचा कुचकामी तपास आणि मेडिया ट्रायल द्वारे पसरवला गेलेला द्वेष

हे सर्व गेल्या चार वर्षात या देशाने पाहिलं त्यामुळे संविधान जाळणे हि घटना आश्चर्य करणारी नक्कीच नाही. शेकडो आश्वासन देणारे आणि ते पूर्ण झाले असे छाती ठोकून सांगणाऱ्या मोदींचा सर्वात मोठा पराभव हा ९ ओगस्ट २०१८ ला झाला. देशाचा अभिमान जाळला गेला.. संविधान जाळल गेल त्याचा निषेध फारच दुर्मिळ वाटला आणि नेहमी प्रमाणे यावरही प्रधानसेवकांची NO COMMENT . इथ मनात विचार आल कि जर एखाद्या धर्माचा ग्रंथ जाळला असता तर काय झाल असत? ....

देशातील बराच मोठा वर्ग आहे (मग तो कोणत्याही जातीचा वा धर्माचा असो) जो आपली सद्सदविवेक बुद्धी  काही नेत्यांकडे गहाण ठेऊन असामाजिक कृत्ये करत आहे. (जर स्वतःची सद्सदविवेक बुद्धी वापरून संविधान वाचल असत तर कदाचित ते  जाळण्याच कुकर्म केलेंच नसत ). स्वतंत्र दिनी अशी अपेक्षा करतो कि अशा वर्गाला उसन्या विचारांकडून स्वतंत्र मिळू दे. देशाला संविधान पुढे नेऊ शकत ना कि कुठला धर्म, पंथ वा जात. १९४७ साली देश राजकीय दृष्ट्या स्वतंत्र झाला पण सामाजीक परतंत्र तसेच राहिले. या देशा आज गरिबी पासून, उपसामारीपासून, जातीवादापासून आणि उसन्या भडकावू विचारांपासून  स्वतंत्र हव आहे आणि संविधान हाच एकमेव मार्ग आहे. या लेखाद्वारे सर्व भारतीयाना कळकळीची विनंती आहे कि संविधान वाचवा तरच देश वाचले अन्यथा शिल्लक राहील निव्वळ अराजकता ज्यात माणुसकी नसेल.


 
 क्षितीज गिरी,  सातारा.
              दिल्ली मध्ये जंतर मंतर वर भारतीय सविधन जाळले ऐकून मला धक्काच बसला.?का जाळले असेल त्यांनी जगातील सगळ्यात मोठी लोकशाही व्यवस्था असलेले जगानी आदर्श घेतलेले भारतीय  संविधान? त्यांना नक्की सांगायचे तरी काय होते.sc-st अॅक्ट ला विरोध करण्यासाठी त्यांनी चक्क भारतीय संविधान जाळावे ?का मनुस्मुती चा उदो उदो करण्यासाठी?बाबासाहेबांचा विरोध करण्यासाठी संविधान    जाळावे?नक्की काय ठोस कारण असावे की त्यांना हे पाऊल उचलावे लागले.या पाठीमागे त्यांची कोणती नक्की मानसिकता होती.कारण घोषणा तर sc-st अक्ट रद्द करा,आरक्षण रद्द करा,मनुस्मुती जिंदाबाद ,बाबासाहेबांबद्दल अपमानजनक घोषणा दिल्या.
        थोडक्यात सांगायचे झाले तर sc-st act रद्द करा म्हणजे त्या समाजाने संरक्षण नका मागू   अन्याय सहन करा,आरक्षण रद्द करा म्हणजे प्रतिनिधित्व नका मागू,मनुस्मुती जिंदाबाद म्हणजे आमच्या जातीचे वर्चस्व राहू द्या जसे पाहिले होते तसे.आणि बाबासाहेबांना विरोध म्हणजे त्यांच्या समतेच्या विचारांना  विरोध.पण यांची हिम्मत कशी झाली सरळ सरळ विरोध करायची.मागून वार करणारे आज समोर कसे आले.पण जाऊ द्या त्या निमित्त का होईना त्यांची खरी मानसिकता तर आपल्या समोर आली.
       मला तर वाटते मुसलमान तर बहाणा आहे खरा निशाणा इथला बहुजन समाज आहे.तो कधीच सगळ्याच्या बरोबर आला नाही पाहिजे.मागासच राहिला पाहिजे त्याच्या पायाखाली.तरच त्यांना त्यांच्या जातीचा मोठेपणा मिरवता येईल.म्हणजे आमची प्रगती नाही झाली तरी चालेल पण इथल्या बहुजन समाजाची होता कामा नये.अशी अतिशय खालच्या पातळीची विचारसरणी असलेले हे देशद्रोही. असमानतेचा पुरस्कार करणारे भडवे, समानतेचा संदेश देणाऱ्या माहामानवांचा अपमान करणारे कुत्रे,जातीय विष पसरविणाऱ्या हरामखोरांना फाशीची शिक्षा पण कमी पडेल.ती तरी लवकरात लवकर भेटावी इवढीच ती माफक अपेक्षा.




दर्शन जोशी, संगमनेर.
      देशाच्या राज्यकारभाराची माहिती ज्या पुस्तकात असते त्याला त्या देशाचे संविधान म्हणजे constitution  असे म्हटले जाते. प्रत्येक देशाची संसद  , राज्यकारभार करण्याची पद्धत वेगवेगळी असते.

       आपल्या भारताचे वैशिष्ट्य असे की भारताचे संविधान हे जगातील एकमेव प्रदीर्घ व लिखित संविधान आहे. सुमारे 63 लाख रुपये खर्चून संविधानाची निर्मिती झाली आहे. हे संविधान तयार करण्यासाठी मसूदा समितीचे अध्यक्ष  डाँ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या समितीतील सदस्यांना 2 वर्षे , 11 महिने व 18 दिवस लागले आहेत.

      परंतु  " जेथे पिकते तेथे विकत नाही " या म्हणीनुसार आम्हां भारतीयांना संविधानाची किंमत कळत नाही. मनुस्मृतीचे दहन करण्यामागची बाबासाहेबांची भूमिका लक्षात न घेता विनाकारण सरसकट ग्रंथांचे दहन करुन सदर ऐतिहासिक प्रसंगाला जातीय रंग देऊन राजकारण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भारत हे सार्वभौम, समाजवादी , धर्मनिरपेक्ष ,लोकशाही गणराज्य आहे या विचाराला स्वत:च्या व्यक्तिगत स्वार्थासाठी सोयिस्करपणे फाटा देण्यात आला आहे. हे टाळण्यासाठी शासकिय पत्रकातून जात , संवर्ग , प्रवर्ग तसेच तत्सम धार्मिक शब्द यांना बाजूला ठेवून " भारतीय " हा एकच अजेंडा जोपर्यंत ठेवला जात नाही , तोपर्यंत आपल्यासाठी प्रत्येक प्रसंग हा युद्धाचाच आहे , हे नक्की !



 

शीतल शिंदे -दहिवडी.

 " विनाश काले विपरीत बुद्धि"  म्हणतात तसे. संविदान  जाळने म्हणजे संविधानाने लोकांना त्यांचे हक्का नी अधिकार संमजायला लागलेत म्हणून, आमच्या हातून सत्ता जावू नये म्हणून, प्रत्येक जाति धर्मा मधे तेड निर्माण व्हावि म्हणून,आणि मनुवा दाचि पोळी भाजावि म्हणून, पण ज़हाले उलट.आज संविधान जा ळ ले म्हणून सर्वाना दिसले समजले,पण हे काम खुप वर्षा पूर्वीपासून चालू आहे चेहऱ्यावर मुखवटा घालून.हिंदू विरोधी मुस्लिम भांडण लावणे_ ex "गोदरा 
 हत्याकांड" कायदा बदलू पहाने,
sc st obc मुले आम्हाला आरकक्षण नहीं ही भावना हिंदूंच्या मनात भरविने,पण जतनिहाय किती आरक्षण खरे किती मिलते हे कोणी पाहिले आहे काय? आणि बकीच्या  48%मधे नेमके आरक्षन कोण घेते हे  कोण पाहतेय का?
हेच भाड़खाऊ निषेध् करणारे स्वताच्या आई बहिनीला का शिक्षण देतात का पार्लमेंट पर्यन्त का पोहोचवतात,मनुस्मृति च्या गटारी का य दया प्र माने का नाही चुल नी मुल ठेवत. पाठवा की सति करा की मुंडन स्वताच्या घरातील महिलांचे.
      मकडानो तुमचा बाप आला होता काय संविधान लिहायला.तेव्हा तुमची डोकी पानी पित होती काय.सर्वानीआमचेच पाय चाटावेट ही तुमची भावना  आता लोकांच्या लक्षात आली आहेत.
      स्वातंत्र मिळले ते फक्त इंग्रजापासून, मनु शाही तशीच राहिली, श्रेष्ठ शेती आणि कनिष्ठ नोकरी म्हणना रे स्वता नोकरी करतात आणि दुसर्यां ना किसान बना म्हणतात.
     त्यांचे काय चुकतेय म्हणा आपणच बुद्धि ग हा न ठेवली आहे. जन्माच्या अधिपासुन च भविष्य पहयाचे ,त्यांच्या शि वा य पान च हालात नाही आपले .बाघा पंचांग दया मंदी रात दा न
       बकीच्या जातीत ,__मुस्लिम,क्रीचन बौद्ध etc जातीत आपापल्या च लोकांकडून धार्मिक विधि करतात मग काय जिवंत आहेत ना ते लोक, का डिवोस ज़हाले त, आहे ना सर्व ठीक .
      उलट या प्रकारामुळे सर्व भारतीय जागे ज़हाले आहेत .सर्वांना संविधना चे महत्व कळू लागले आहे .ज़ोपलेले जागे केले.
       तुमच्यासार ख्या देशद्रोहिनी हे काम केले म्हणून बाबासाहेबांचे महत्व्व कमी होणार नाही.
      ह्यांच्या पेक्षा पाकिस्तानी बरे एवढे मोठे हे आतंकवादी आहेत आणि सरकार जार पाठिंबा देणारे असेल तर ते महा आतंकवादी ठरेल.


 *केरळ वाट बघत आहे आपल्या मदतीची 🙏🏼*
( Do good and someone will return the favour in doing good for you too.



Note: (All images are taken from internet.)

देशप्रेमी आणि देशद्रोही याची नेमकी व्याख्या काय ?

देशप्रेमी आणि देशद्रोही याची नेमकी व्याख्या काय ?

🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

देशप्रेम आणि देशद्रोही याची नेमकी व्याख्या काय ?


Source: INTERNET
-तेजस महापुरे
कराड
                   दोन्ही शब्दातच याचा अर्थ दडलेला आहे,देशप्रेम याचा अर्थ देशावर असलेलं निस्सीम प्रेम आणि देशद्रोह म्हणजे देशाशी केलेली गद्दारी या ढोबळमानाने होणाऱ्या व्याख्या.. आता आपण याचे सविस्तर पैलू पाहू,खरे देशप्रेम जर पाहायचे असेल तर आपल्याला ते स्वातंत्र्यपूर्व काळात जास्त दिसेल,आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या प्रत्येक सामान्य नागरिकपासून ते ज्या महापुरुषांनी या चळवळी निर्माण केल्या त्या मागे निस्सीम देशप्रेमाची भावना होती..आणि त्यावेळचे देशद्रोही म्हणजे ज्यांनी फितुरी केली,लालसेपोटी ब्रिटीश लोकांची चाकरी केली ते म्हणजे देशद्रोही...देशाने माझ्यासाठी काय केल यापेक्षा मी देशासाठी काय केल हा जेव्हा प्रत्येक जण विचार करेल तेव्हा ते खरे देशप्रेम असेल,जेव्हा आपल्याला देशाच्या प्रतिज्ञेचा अर्थ खऱ्या अर्थाने समजेल आणि ती आचरणात आणली जाईल ते खरे देशप्रेम असेल,देश म्हणे आपण सर्व लोकच मिळून बनलेला आहे, जर एखाद्याच्या कृत्याने कोणाला बाधा झाली,हानी झाली तर तोही देशद्रोहच आहे,भ्रष्टाचार  करणे,जातीय दंगली घडवणे,समाजातील चांगल्या काम करणाऱ्या वैचारिक,पुरोगामी लोकांच्या हत्त्या करणे व ते करणाऱ्यांना पाठीशी घालणे हा देखील देशद्रोह होय,मग देशप्रेम म्हणजे काय फक्त पोलीस होणे,सैनिक होणे एवढेच मर्यादित नाही,तर पहिल्यांदा आपण भारतीय आहोत आणि शेवटीही भारतीय आहोत ही भावना निर्माण ज्याच्या मनात होईल तो खरा देशप्रेमी असेल,आणि जो भ्रष्टाचारी असेल,जातीवादी असेल,फक्त
स्वतःचाच विचार करणारा असेल तो देशद्रोही.....


Source: INTERNET
-जयंत जाधव,
 लातूर

    सध्या देशप्रेम व देशद्रोह म्हणजे नेमके काय याबाबतीत कमालीचा संभ्रम देशात निर्माण झालेला आहे.कारण प्रत्येक जण सोयिस्करपणे आपणास पाहिजे तसा अर्थ लावत आहे.सर्वात जास्त गैरसमज हे देशप्रेम व देशभक्ती यांना एकाच साच्यात मापन किंवा मोजले जाते.ह्यात फरक हा असलाच पाहिजे.भक्ती ही आंधळी असते पण देशप्रेम हे आंधळे नसते.आपण देशावर प्रेम करु शकतो पण भक्ती नाही. ऐखाद्या गोष्टींची पूजा केल्यास त्याला अलौकिकत्व प्राप्त होते.करायचे असले तर देशावर प्रेम करा.उदाहरणार्थ जपानच्या नागरिकांना सारखे.
        धर्माबद्दल एखाद्या गोष्टीला विरोध केला की तो देशद्रोही असा त्या व्यक्तीवर ठपका ठेवला जातो, 10-15 वर्षांपूर्वी बोलण्याचे जे स्वातंत्र्य होते तेही आता कमी होत आहे.जेएनयू प्रकरणानंतर ‘देशद्रोह’ व्याख्याबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली.
भोपाळमधील मोतीलाल विज्ञान महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने ही कारवाई केली आहे. ‘भगत क्रांति दल (बीकेडी) या संघटनेसोबतच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेही भगतसिंह यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने 23 मार्च रोजी कार्यक्रमाची परवानगी मागितली होती. महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार होता, परंतु व्यवस्थापनाने त्याला परवानगी दिली नाही. यानंतर संतप्त झालेल्या बीकेडीची सदस्य असलेल्या अस्मां खान या विद्यार्थीनीने फेसबुकवर पोस्ट लिहिली होती. त्यात तिने महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकांना देशद्रोही म्हटले होते.
       राजद्रोहाचा होणारा गैरवापर थांबवायचा असेल तर व्यापक जनजागृती होणे गरजेचे आहे. कारण राजद्रोहाची कायद्याच्या चौकटीतील तील व्याख्या आणि लोकांच्या आकलनातील व्याख्या यांत तफावत आहे.‘लोकशाही व्यवस्थेत राजद्रोह ही संकल्पनाच कालबाह्य़ ठरु शकत नाही. कारण लोकशाही व्यवस्थेमध्ये व्यापक जनहित लक्षात घेता अत्यंत टोकाच्या स्थितीत कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी राजद्रोहाची तरतूद ही खूप आवश्यक आहे. व्यापक जनजागृती आणि सरकारकडून ‘राजद्रोह’ कायद्याच्या जबाबदार उपयोगासाठी जागृत जनमताचा रेटा, हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातील ‘संतुलन’ अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक आहे.
देशप्रेम व देशद्रोह साठी कोणत्याही धर्माच्या लोकांना दोष देऊ नये, माणुसकीला समाजामध्ये विभागणे ही चुकीची कृती ठरते, ही लढाई चांगल्या आणि वाईट गोष्टी ठरवण्यासाठी आहे. कोणाच्या बाजूने उभे राहायचं हा निर्णय आपला आहे,पण कायद्याला दुर्लक्षित करणे शक्य नाही.


Source: INTERNET
-करण बायस
जि. हिंगोली

देशद्रोह या शब्दाचा शब्दशः अर्थ घेतला तर तो म्हणजे ‘देशासोबत केलेला विश्वासघात’ होय.आजकालच राजकारण बघून असं वाटतं की देशद्रोही म्हणजे फक्त आपल्या देशातील काही गुपीत गोष्टी शत्रू देशाला सांगणे किंवा सरकार विरोधात बोलणे किंवा देशाविरोधात बोलणे.
काही उद्योजक बँकेचा पैसा घेऊन फरार झालेत, देशात अधिकार्यापासून ते राजकारणी लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोक भ्रष्टाचारी झालेत किंवा अस पण म्हणता येईल की ते फक्त स्वतः साठी कमवत आहेत.
आज कित्येक लोकं उपाशी झोपतात, कित्येकांना राहण्यासाठी घर नाहीत या लोकांची फसवणूक म्हणजे देशद्रोह नाही का ?
आपल्या देशात विकासाच्या नावावर राजकारण होत, लोकांना काही मुद्द्यांवर भडकावून विरोधी पक्ष आपल्या हातात सत्ता कशी येईल यासाठी मोर्चे काढून वातावरण बिघडवण हा देशद्रोह नाही का ?
लोकांना निवडणूक जवळ आली की काही पैसे देऊन मत विकत घेणे आणि जनतेला खोटे आश्वासन देऊन तात्पुरत समाधान करणं हे देशद्रोह नाही का ?
आणखी आपण किती दिवस जात आणि धर्म हे मुद्दे घेऊन मोर्चे काढणार आणि आणि काही देशद्रोही लोकांना या मुद्द्यांवर राजकारण करू देणार?
काही मुठभर लोकांनी समाजाला सुधरवण्याचा प्रयत्न केला किंवा अशा लोकांच्या विरोधात लिखाण केले आणि समजाला खरं ते दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्यांची हत्या करण्यात येते हा देशद्रोह नाही का ?
देशप्रेम शिकावं तर गांधीजी, भगतसिंग, देश सीमेवर लढणाऱ्या जवनांकडुन.स्वतः थोडं जागृत राहून या भ्रष्टाचारी, खोटे आश्वासन देणारे लोकांपासून लांब राहिले आणि स्वतःच्या प्रगतीवर लक्ष दिले तरी ते देशाला प्रगतीकडे घेऊन जाईल.
माणसाला जर स्वतःची जाणीव असेल की आपण कोण आहोत आणि काय आहोत तो स्वतः प्रगती करण्याचा प्रयत्न करतो.

“शाहू,फुले आणि आंबेडकर सर्वांसाठी साधन झाले तरीही विचारातून आचार साध्य का नाही?”

“शाहू,फुले आणि आंबेडकर सर्वांसाठी साधन झाले तरीही विचारातून आचार साध्य का नाही?”

🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

“शाहू,फुले आणि आंबेडकर सर्वांसाठी साधन झाले तरीही विचारातून आचार साध्य का नाही?”


Source: INTERNET
-अनिल गोडबोले,
सोलापूर

हा विषय खूप मोठा जटिल आहे असं नाही. आज महाराष्ट्र राज्य शाहू , फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो... अस जर कोण म्हणतं असेल तर तो खूप मोठा जोक होईल.
पुरोगामी महाराष्ट्र किंवा बुद्धिवादी महाराष्ट्र अस ही काही म्हटलं जातं. तो आजचा विषय नाही. शाहू महाराज यांनी काय केलं? फुले यांनी पुण्यात काय कार्य केले? आणि बाबासाहेब यांच्या बद्दल माझ्यासारख्याने बोलणे योग्य नाही.. पण त्यांनी कार्य काय केलं? असे तीन प्रश्न कोणालाही विचारा... ठराविक उत्तर मिळतात... आणि लोक अस्मितेचा प्रश्न बनवून सोडून देतात.

खर तर या सुधारकांचे विचार आम्हाला कळलेच नाहीत. त्यामुळे त्यांच्या कार्यातून नेमका काय अर्थ काढावा हे कळत नाही. व हे न कळल्यामुळे.. आपल्या वर्तनात कधीही बदल होत नाही.

मी बरेच शब्द ऐकतो त्यांचे अर्थ सुद्धा मला कळत नाहीत. परवा वाचलं पेपर मध्ये 'आंबेडकरवादी जनता' ..... कोण आहे ही जनता... मागासवर्गीय लोक ही आंबेडकरवादी जनता.
माळी समाजाच्या obc मागण्याचा एक मोर्चा होता मागे..तेव्हा शब्द ऐकला "फुले समर्थक".
अजूनही शाहू महाराजांनी जनता काही ऐकली नाही ... पण शिवाजी महाराज यांचे मावळे अस ऐकलं आहे..
मग मी कोण नेमका? यांच्यात... तर माझं नाव आणि आडनाव असलेल्या जाती मधले कोण पुढारी आहेत त्यानुसार मी त्यांचा "वादी" होतो.. प्रत्यक्षात मी कोणाचे विचार घेऊन वर्तन करत आहे याचा कोणाला काही सम्बन्ध नाही.

अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे कट्टरता..म्हणजे मी सनातन असो की पुरोगामी .. समोरच्या व्यक्तीला घाबरवून सोडणे हा एक प्रकार आहे... 'गर्वच नाही तर माज आहे मला अमुक अमुक असल्याचा'
हे सर्व आपलं वर्तन हे शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर निश्चित नाही.

लोकांनी स्वार्थासाठी या महापुरुषांचा राजकारण करून वापर केलेला आहे. गुलामगिरी नावाचे पुस्तक फुले यांनी लिहिले.. पण अजूनही मानसिक गुलामगिरी सम्पली आहे का?तर नाही.
बाबासाहेब यांनी पूर्ण भारताचे संविधान लिहिले पण ते एक विशिष्ठ समाजाचे नेते झाले.
शाहू महाराज हे महाराज असूनही विरोधाला सामना करत वंचीत विकास करत राहिले ...  यातील एकही गुणवत्ता सरकार कडे नाही आणि लोकांकडे वर्तनात नाही..
म्हणून दुर्दैवाने हे साधन झाले आहेत.

आपल्या सारख्या तरुणांनी हे विचार अवलंबले पाहिजेत.
जाती निर्मूलन, वर्ण वर्चस्व , आरक्षण आणि सामाजिक न्याय यावर काम करायचं असेल तर
हे विचारातून भावने मध्ये आणि भावनेतून वर्तनामध्ये आणणे गरजेचे आहे.

Source: INTERNET
-संदीप बोऱ्हाडे,
पुणे

    फुले, शाहू , आणि आंबेडकर यांच्या अगोदर मी एक नाव घेऊ इच्छितो ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज..

     महाराष्ट्र फुले, शाहू, आंबेडकर यांच्या घामाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्ताने पूर्णत्वास आला आहे. गेली अनेक दिवस काही दळभद्री लोक हे विसरूनच गेलेत. काय त्या फेसबुक, व्हाट्सअप्प वर मी आम्ही मराठे, आम्ही भिमाची पोरं अशा टायटल खाली सामाजिक तेढ निर्माण करतायत.
मुळात या मूर्खाना हेच कळत नाही की ज्या महापुरुषांच्या नावावर हे एकमेकां विरोधात बोलतायत ते कधीच जाती पातींच्या मूल्यांवर कधीच लढले नाहीत.

    शिवाजी महाराजांच्या सेवेत अनेक मुस्लिम होते. त्यांनी मुस्लिम धर्माचा कधीच द्वेष केला नाही. सर्वसामान्य रयतेचा विचार करून त्यांनी राज्याची निर्मिती केली. शिवाजी राजांनी स्थापन केलेले राज्य हे महाराष्ट्रातील फक्त हिंदुसाठीच नव्हते , तर ते महाराष्ट्रातील मुस्लीमांसाठीही होते. मग महाराष्ट्रातील मुस्लिमांना शिवाजीराजे आपले वाटू नयेत का ?

    डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य हे सर्वव्यापी असतानाही त्यांना फक्त दलितांचा नेताच ठरवले , हि फार मोठी शोकांतिका आहे.
दलितसमाजातही कितीजणांना बाबासाहेबांच्या कार्याची जाणीव आहे ? कितीजणांनी याचा अभ्यास केला आहे? दलित समाजातही बरेचजण फक्त आरक्षणापुरतेच स्वतः ला मागास ठरवतात. त्यांना महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले ,राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी घेतलेल्या परीश्रमाशी काहीच देणे घेणे नाही.

    आज धर्माच्या रंगात या महापुरुषांचे विचार पुसत चालले आहेत. जागोजागी ,पावलोपावली धर्माचे झेंडे, फेटे, गळ्यातून स्कार्फ मिरवले जात आहेत. संपूर्ण वातावरण हे त्या त्या धर्माने भारावून जात आहे . यात त्या महापुरुषांच्या शिकवणीचा, त्यांच्या विचारांचे अस्तित्व कोठे दिसतच नाहीये. दिसतो तो फक्त धार्मिक अहंकार ज्याच्यासाठी या महापुरुषांचा वापर केला जात आहे.
हा धार्मिक प्रसार करण्याएवजी या महापुरुषांचे विचार त्याच मेहनतीने प्रसारित केले तर त्याचा परिणाम सामाजिक एकता निर्माण होण्यात दिसून येईल. फक्त आपला धर्म जे सांगतो तेवढ्यापुरतेच मर्यादित न राहता चौफेर अभ्यास केला गेला पाहिजे.

   आजचा समाज हा धर्मवाद आणि जातीवाद याने वेढलेला आहे. दिवसेनदिवस माणूस हा आकुंचित बुद्धीचा होत चालला आहे. धर्म आणि जातीच्या नावावर माणसा-माणसात द्वेष निर्माण होत आहे. समाजसुधारकांनी आपले संपूर्ण जीवन या समाजाच्या सुधारणेसाठी अर्पण केले. या महापुरुषानाही धर्माच्या आणि जातीच्या चौकटीत अडकवुन त्यांचे कार्य मर्यादित केले.
या महापुरुषाची जातीजाती मध्ये वाटणी करून त्यांची जयंती साजरी करण्याच्या नावाखाली धर्माचे प्रदर्शन करण्याचा प्रयत्न अधिक होऊ लागला आहे. या महापुरुषाना खरच आदरांजली वाहायची असेल तर त्यांची शिकवण , तत्व याचे अनुकरण करावे.

   महाराष्ट्रासाठी जेवढे महापुरुष झटले ते खरं सोनं आहे आणि त्या सोन्याची किंमत मोजणं कितीही धार्मिक, जाती प्रेमी असला तरी त्याला जमायचं नाही.
पण त्याचं नाव घेऊन जाती धर्माच्या नावाखाली तेढ निर्माण करणारे खरे समाज कंठक आहेत.

Source: INTERNET
-मयुरी देवकर,
पंढरपूर

                ' वीरांची भूमी ,साधुसंतांची भूमी, विचारवंतांची भूमी ' या शब्दफुलांनी अनेकांनी या भारतभूमीचा गौरव केला आहे.  आपल्या या राष्ट्रामध्ये अनेक थोर संत, विचारवंत होऊन गेले आहेत . प्रत्येकांनीच माणसाला माणूस म्हणून कसं जगायचं हेच शिकवलं .चौकस बुद्धीने विचार करायला शिकवलं, पण खरंच आज कोणी चौकसपणे विचार करतोय का हा मोठा प्रश्न आहे आणि कोणी करत असेल तर आचरणात कितीजण आणतात हा त्याहून मोठा प्रश्न आहे .  समाजामध्ये असलेल्या अनिष्ठ रूढी, परंपरा घालवून सर्वसामान्य जनतेचे जीवन सुसह्य करण्यासाठी ज्या महात्म्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले, प्रतिकूल परिस्थितीमध्ये सर्व तत्वज्ञान सर्वसामान्यांसाठी खुले केले त्या महात्म्यांच्या विचारांचंच ओझं झालं आहे या आजच्या पिढीला..... फुले, शाहू, आंबेडकर यांनी आम्हाला काय शिकवलं याचा प्रत्येकाने वेगळाच ,आपल्या सोयीचा अर्थ काढला आहे. ज्यांनी जातीय विषमता नष्ट करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला त्याच महान लोकांची आज विभागणी करून पुन्हा जातीय विषमता निर्माण केली जात आहे काय म्हणावे या वेडेपणाला!
                आज फुले, शाहू, आंबेडकर यांची जयंती साजरी करत असताना त्यांनी सांगितलेल्या विचारांना अंगिकारनं खूप महत्वाच झालं आहे. आणि त्या विचारांचं रूपांतर अजूनही आचरणात आणले नाही तर बोलाचाच भात नि बोलाचीच कडी, खावोनिया तृप्त झाला कोणी हीच परिस्थिती पुढे राहील ...   आणि ही भविष्यातील स्थिती टाळण्यासाठी नुसतेच फुले, शाहू, आंबेडकर या व्यक्तींचा न्हवे तर त्यांच्या विचारांचा प्रसार व्हायला हवा आणि तो प्रसार व्यक्तींच्या आचरणातून व्यक्त झाला तरंच त्यांच्या विचारांचे साध्य झाले म्हणावे लागेल आणि ही जबाबदारी आता आपल्या सर्वांनाच घ्यावी लागेल हा वास्तवाचा विस्तव हातात घेऊनच इथून पुढची वाटचाल करायची आहे .....



🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
जनहितार्थ:-

मी आत्ताच जलमित्र🙋‍ झालो .1 मे ला श्रमदान करणार आहे.* माझं गाव स्पर्धेत नसलं म्हणून काय झालं.माझ्या तालुक्यातील , जिल्ह्यातील,महाराष्ट्रातील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते माझ्या भारत देशातील  आहे.

प्रत्येकाला सीमेवर जाऊन देशभक्ती व्यक्त करता येत नाही म्हणून लाखोंच्या 😥डोळ्यातील पाणी घालवण्यासाठी चला गावात पाणी आणूया.

आणि एक  जलसैनिक बनूया....

तुम्ही सुद्धा व्हाल ना मग!!जलमित्र.....💧

त्यासाठी  पुढील लिंकवर क्लिक करा https://jalmitra.paanifoundation.in/

📢 :🌱 वि४ 🌿 *व्हॉट्सअप ग्रुप.

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵


Source: INTERNET
-जयंत जाधव,
लातूर

      "प्राजक्ताचं सांडणं हे प्रारब्धच असतं

       तरीही तो फुलणं थांबवत नाही

       पायदळी जरी तुडविले कोणी तरी

       सुंगधाच देणं तो देणं थांबवत नाही".

    (संकलन-आम्ही साहित्यिक,फेसबुक गृप)
      वरील विकास पवार यांच्या चारोळी प्रमाणे महापुरुषांच्या विचारांची महती असते.
      काळ कुठलाही असो व त्यातील महापुरुष, विचारवंत हा कधीच पूर्ण नसतो.त्यांना मर्यादा असतात .महापुरुषांचे विचार जरी महान असले आज आपण त्यांना एका चौकटीत बंद केले आहे.फुले माळ्यांचे,आंबेडकर हे बुध्दांचे,शिवाजी हे मराठ्यांचे असे वाटून टाकले आहे.त्यांच्या नावाचे व विचारांचे ऐवढ्या प्रमाणात तुकडे केलेत कि 'विचार' म्हणजे काय हे शोधावे लागेल? ईश्वराने सृष्टी निर्माण केली.ती सुंदर दिसावी म्हणून सप्तरंगाची मनसोक्त उधळण केली.किती स्वार्थ रहित विचार व कृती आहे  ईश्वराची.पण स्वार्थी मानवाने काय केले जातीचे राजकारण करुन रंग वाटून घेतले.भगवा रंग हिंदूचा,निळा बौद्ध लोकांचा,हिरवा मुसलमान लोकांचा इत्यादी.
     शाहू,फुले,आंबेडकर इत्यादी सह अनेक विचारवंत यांनी त्या त्या काळात मौल्यवान विचारांचे  योगदान दिलेले आहे.या विचारांचा मुळ उद्देश हा हा मानवी कल्याण व विकास हा होता.पण काही स्वार्थी लोकांनी विचारवंत यांच्या नावाने दुकानदारी चालू केली आहे.याचा अर्थ या महापुरुषांच्या विचारांना आप कमाईचे साधन बनवले.वास्तविक पाहिलं तर स्वतः शाहू,फुले,आंबेडकर यांनी स्पष्ट सांगितले आहे कि त्यांचे विचार हे साधन आहे.आमची वाटणी करु नका.आमच्यापैकी कुणी एकही मानवी जीवनाचे सत्य सांगू शकत नाही.आपण त्यांचा अभ्यास करुन या विचारांना साध्य बनविले पाहिजे.
    चित्रपटात एखादा कलाकार हा आपल्या अभिनयाने लोकांना एक क्षणभर हसवू शकतो पण नेहमी साठी त्यांचे दुःख दूर करु शकत नाही. हा आपण प्रेरणा मात्र घेवू शकतो.तरच विचारातून आचार साध्य होतील.


Source: INTERNET
-नरेश शिवलिंग बदनाळे,
लातूर

भारत हा  विवीध कलागुणांनी पारंपारिक संस्कृतींनी आणि विचारवंतांच्या विचारांनी घडलेला  देश आहे आज एकशे तीस करोड भारतीयांची विचारधारणा ही वेगवेगळ्या विचारवंतांच्या विचारांवर अवलंबुन आहे पण,खरं पाहता आचरण शून्य आहे..
   फुले,शाहु,आंबेडकर साधने कैक झाली,
   आचरणाच्या माध्यमांना विसंगति प्राप्त झाली...

आज ही साधने फक्त बुद्धिमत्तेचे व कर्तुत्वाचे स्मृतीदीप म्हणुन आहेत पण त्या स्मृतीदीपाची ज्योत तेवत ठेवणे हे आपल्या आचरणावर अवलंबुन आहे. आज समाज फक्त त्यांच्या राहणीमाणीचे अवलोकन करत आहे आणि
विचारांवर चुकीचे विचार मांडुन पडदा सारत आहेत. समाजाने अज्ञानात राहुन चूकीच्या विचारधारणेला आपलसं केलय पण कधी हा विचार केला नाही की फुले,शाहु,आंबेडकर यांसारख्या लोकांनी कधी स्वतःचा विचार केला नाही आणि आपण मात्र स्वार्थीपणाच्या सीमा ओलांडल्या आहेत.वेगवेगळ्या अज्ञानी विचारांना बढावा देऊन आपण त्याच फुले,शाहु,आंबेडकरांच्या विचारांचे,बलीदानाचे मातीमोल करत आहोत.
नितिमत्ता हरवत आहे तमगुणी,नराधमी विचारधारणेला वाव मिळत आहे, पण यातुन फक्त साध्य होईल तो फक्त विचारांचा विनाश आणि मानवतेचा लिलाव.फुले,शाहु,आंबेडकर यांच्या विचारांना सुद्धा आपण जाती,समाज यांच्या दृष्टिकोणातुन विभागले आहे.पण, त्यांनी त्यांचे विचार हे कोणत्या समाज किंवा जाती धर्मांसाठी मांडले नव्हते हे मात्र समजुन घ्यायला आपण तयार नाही आहोत कारण, आपण फुले शाहु आंबेडकर यांच्या विचारांना आणि त्यांना कधी समजुनच घेतले नाही,आपण फक्त समजलाय आणि बाळगलाय तो गोड गैरसमज ,जाती,समाज,धर्माच्या निरर्थक विचारधारणेचा आणि त्यातुन आपल्यालाच बाहेर निघावं लागेल कारण त्यात आपणच दोषी  आहोत,
तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं दही कळकलं तर दोष दह्याचा नसतो आणि भांड्याचाही नसतो, दोष दही तांब्याच्या भांड्यात ठेवणाऱ्याचा असतो.
आपण नेहमी प्रशासनाकडे, सरकारकडेच बोटं दाखवत राहू, आरोप करत राहू.  आपल्या अपेक्षा फार मोठ्या असतात, पण साध्या साध्या गोष्टी जपण्यातही आपण स्वत: कमी पडतो. स्वत:ला पारखलं आणि स्वत:च्या वागण्यातले दोष दूर करायचं ठरवलं तर प्रगतीला सुरूवात होईल..सगळं मळभ जाऊन आभाळ स्वच्छ होईल..
समाजाने स्वत: पुढाकार घेऊन या साध्या साध्या गोष्टी सुधारल्या तेव्हा म्हणता येईल फुले शाहु आंबेडकर.. यांच्या विचारातुन आचार साध्य झाले.



Source: INTERNET
-तेजस महापुरे,
कराड

फुले,शाहू,आंबेडकर सर्वांसाठी साधन झाले तरीही विचारातून आचार साध्य का नाही? कारण आजही यांना प्रत्येक समाजाने जातीच्याच दृष्टिकोनातून पाहिले आहे,खरे फुले,शाहू,आंबेडकर हे समजलेच नाहीत कुणाला,खरंतर या व्यक्तींचे कार्य हे सर्वव्यापी होते,पण काही जातीवादी लोकांनी यांना फक्त एका विशिष्ट वर्गाचेच ते होते व त्यांचे कार्य देखील त्याचपूरते मर्यादित होते असा खोटा प्रचार केला,त्यामुळे खरे फुले,शाहू,आंबेडकर कुणाला समजलेच नाहीत,जातीवादी लोक हे फक्त आपल्या सोयीपुरते या महापुरुषांना वापरून घेतात,तसेच प्रत्येकाने ठराविक महापुरुषांचे पेटंट घेऊन ठेवले आहे,म्हणजे फक्त त्यांच्यावर फक्त आमचाच हक्क असा काहीजण तोरा बाळगून असतात, म्हणजे नुसते मिरवण्यापूरते त्यांना मानले जाते, विचारांचा वारसा पुढे नेण्याचा विचार येत नाही, अमुक एक महापुरुष आमच्या जातीचे म्हणून आम्ही पण श्रेष्ठ झालो अशी मुर्ख समज हल्ली काहींना झाली आहे,जोपर्यंत हे सर्व थांबत नाही तोपर्यंत तरी काही चांगले साध्य होईल असे मला वाटत नाही......

मला न समजलेले क्रांतिकारी भगतसिंग....

मला न समजलेले क्रांतिकारी भगतसिंग

🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

मला न समजलेले क्रांतिकारी भगतसिंग


Source: INTERNET

प्रवीण ,मुंबई
भगत सिंग हे नाव जरी घेतलं अंगावर शहरे उठतात. एक वेगळाच जोश, उत्साह अंगी येतो. देशभक्ती, त्याग, अभूतपूर्व वाचन, अगाध ज्ञान  आणि राजकीय प्रगल्बता याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भगतसिंग. पण लहानपणापासून आपल्यलाला जो इतिहास शिकवला त्यात भगतसिंग यांचे “जहाल क्रांतीकारक” अशीच साधारणपणे ओळख करून देण्यात आली. या लेखात माझा प्रयत्न राहील कि जे इतिहास विषयात नव्हते पण इतिहासात होते अशा भगत सिंग ची ओळख करून देणे.
भगतसिंग यांना बालपानापासूनच देशभाक्तीचे बाळकडू त्यांच्या आई-वडिलांकडून मिळत होते. पूर्ण कुटुंब हे स्वातंत्र्य लढ्यात अग्रेसर होते. ज्यावेळी (१९१९) मध्ये जालियानवाला बाग हत्याकांड झाले त्यावेळी त्यानी भारतमातेच्या स्वतंत्र्याची शपथ घेतली होती. त्यावेळी त्यांचे वय फक्त ११ वर्षांचे होते.
भगत सिग एक लेखक
भगत सिंग हे एक जहाल क्रांतिकारक होते आणि त्यावेळी ते विविध मासिके साप्ताहिके आणि वर्तमानपत्रे यातुन स्वतःचे विचार पोहचवत असत वयाच्या १७ व्या वर्षी त्यानी दैनिक अर्जुन मधून विविध विषयांवर लेखन चालू केले. मी नास्तिक का ? हे त्यांचे एक गाजलेले पुस्तक जे आजही तरुणाना स्फूर्ती देत आहे. त्यानी लिहिलेल्या पत्रातून त्यांचे लेखन कौशल्य प्रभावी पाणे समोर येते. त्यांच्या पत्रे “शहीद भगत सिघ :समग्र वाड्मय” या नावाने प्रकाशित झाले आहे.
नास्तिकवाद
भगतसिंग लहानपानापासून नास्तिक नव्हते, लहाणपणी ते गायत्री मंत्र पठन करायचे पण याचा अर्थ ते लहानपणी आस्तिक होते असा नाही. वयाच्या १५ व्या वर्षापासून त्यानी समाजातील रूढी परंपरा यांवर टीका करण्यास सुरवात केली. प्रचलित विश्वासांवर प्रश्न विचाराण्यस सुरवात केली. त्यांच्या मी नास्तिक का ? या पुस्तिकेत त्यानी नास्तीकाची व्याख्या लिहिली होती. “ जो देवावर विश्वास नाही अस म्हणतो तो नास्तिक नाही कारण ज्या देवावर तो अविश्वास दाखवत आहे अप्रत्यक्ष पणे तो त्याचे अस्तित्व मान्य करत असतो. खरा नास्तिक हा देवच अस्तित्वच नाकारत असतो “  ते स्वतः जरी नास्तिक असले तरी त्यानी कधीही इतर धर्मांचा अनादर नाही केला. ज्यावेळी ते प्रश्न विचारायचे कि देव कुठे असतो तेव्हा त्यांना निरनिराळे उत्तर मिळत त्यावेळी त्यानी त्याला प्रतिउत्तर साठी “Philosophy is the limitation of human knowledge” असे म्हटले होते. (संदर्भ: मी नास्तिक का?)
ज्यावेळी त्यांना फासी देणार होते त्यावेळी पण त्यानी देवासमोर प्रार्थना केली नाही. उलट ते मृत्यू समयी सुद्ध लेनिन यांचे “state and revolution” हे पुस्तक वाचत होते.
राजकीय ज्ञान
भगत सिंग जर शहीद झाले नसते तर नक्कीच एक समाजाचे भले करणारे, मुत्सदी आणि अभ्यासू नेते झले असते. वय वर्ष २१ या वयात त्यानी कोर्टात “trade dispute bill” यावर केलेली सडेतोड टीका, सरकार वर त्यांच्या लेखातून केलेलं प्रहर आणि तात्कालिक कोन्ग्रेस च्या धोरणांवर केलेल्या टीकेतून त्यांची राजकीय समाज किती समृद्ध होती हे समजते.
भगत सिंग यांचे राजकीय ज्ञान हे भारतापुरते मर्यादित नव्हते. रशियन क्रांती, फ्रेंच क्रांती, मार्क्सवाद इ. सारख्या विषयांवर पक्कड होती.
मार्क्सवाद
भगतसिंग यांचे वाचन भरपूर होते, ज्या वयात मुलांना परीक्षेचा अभ्यास म्हंटल तर घाम फुटायचा त्या वयात त्यानी कार्ल मार्क्स, लेनिन आणि बकुनीन यांचे पुस्तके वाचून काढली होती. भारतातले ते जुन्या मार्क्सिस्ट पैकी एक होते. त्यांचं साम्यवाद वर विश्वास होता आणि त्यांच्या स्वप्नातील भारतात अर्थकारण हे विकेंद्रित असायला हव अस त्यांचं दृष्टीकोन असायचा.
भगतसिंग यांनी त्यांच्या आयुष्यातून आपल्याला काही शिकवण देऊ केली आहे .
1.    कोणतीही विचारसरणी डोळे झाकून अंगिकारू नका
2.    प्रचलित विश्वास आणि प्रथांवर प्रश्न विचारा
3.    व्यक्तिपूजा करू नका आणि त्याचे समर्थन हि करू नका
मी थोडक्यात त्यांचे आयुष्य मांडण्याचा प्रयत्न केला आहे. याचे कारण एकाच कि भगत सिंग यांचे चरित्र हे फार प्रगल्ब आणि प्रभावी आहे पण आतापर्यंत त्यांची देशभक्ती लोकांनी पहिली पण त्यांची विचारसरणी, त्यांचं राष्ट्रीय-अनाताराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारणाची समज, धर्म-जात यांचे ज्ञान आणि भविष्यातील भारताविषयीची भूमिका या गोष्टी कधीच जगासमोर आल्या नाहीत. आज बरेच लोक भेटतात आणि म्हणतात भगत सिंग माझे आदर्श आहेत. पण त्यावेळी विचार येतो कि भगतसिंग यांना आदर्श मानाने जेवेढे सोपे तितकेच त्यांप्रमाणे जगणे कठीण आहे.
ज्या धर्मनिरपेक्ष भारताची भगतसिंग नी स्वप्न पहिली त्या देशात कोणीतरी नारा देतो कि “इस्लाम खतरे मे है किंवा हिंदू खतरे मे है” आणि आपली युवक आंधळे पणे त्यावर विश्वास ठेऊन धोक्यात असलेल्या धर्माला वाचवायला रक्त सांडतात. भगतसिंग यांनी जेव्हा हा धोका त्यांच्या हयातीतच ओळखला होता. यातून एक कळले कि आम्हाला भगत सिंगयांची धर्मनिरपेक्षता खरच कळली का?
आज देश हा भांडवलदाराच्या कचाट्यात अडकला आहे आणि देशात बेरोजगारी चा आकडा वाढत आहे. भांडवलशाही बंद झाली पाहिजे हे आधीच भगतसिंग यानी सांगितले पण आपल्याला त्यांचं विरोध हा डाव्या-विचारांचा विरोध वाटला आणि आज काळात नकळत आपण भांदावालादारीच्या गुलामीत आहोत.
देश सध्या अराजकतेकडे झुकत आहे. या शहीद दिनी कोणीही भगत सिंग यांची आठवण काढू नका पण निदान एक शपथ तरी नक्की घ्या कि “ काहीही झाले तरी इथून पुढे कोणत्याही विचारसरणीवर आंधळाविश्वास ठेवणार नाही आणि धर्म-जात यांसारख्या विषयांवरून रक्तपात करणार नाही “ हीच त्यांसाठी श्रान्धान्जली असेल.



अभिजीत गोडसे, सातारा

      आँक्टोबर 2017 मध्ये , आंतरराष्ट्रीय युवा व सांस्कृतिक महोत्सव , कर्णाल ( हरियाणा ) येथे जाण्याची संधी मिळाली. सदरचे पोस्टर वाचून अंगावर शहारे आले होते. तेव्हा हे टिपलेले छायाचिञ...  संपूर्ण देशातील 29 घटक राज्ये 7 केंद्रशासीत प्रदेश तसेच जवळपास 15 ईतर देश सहभागी झालेल्या या महोत्सवात..भव्य गेट मधून आत जाताच समोरच लावलेले हे चित्र प्रत्येकालाच आत्मविश्वास वाढवणारे आणि तेवढाच विचार करायला लावणारे होते . संध्याच्या काळात बाँलीवूड मधील भुक्कड सिने अभिनेता ! हाच आपला आर्दश असे मानणाऱ्या तरुणाईला लाजवेल आणि माण खाली घालायला लावेल असे हे शब्द नक्कीच आहेत .या स्वकमाई करणाऱ्या आणि तेवढेच आभासी दुनीयेत गरगर फिरवून सोडून  देणाऱ्या अभिनेत्यापेक्षा. भगतसिंह बनून त्या प्रमाणे लढले पाहिजे. त्यावेळीची लढाई ही देश स्वतंत्र होण्यासाठी होती .आत्ताची लढाई ही जात , धर्म , पंत तसेच आर्थिक , सामाजिक , राजकीय आणि या सर्वांन बरोबरच सम्मानाने जगण्याची आहे. हे नक्कीच .


Source: INTERNET

सौदागर काळे, पंढरपूर
जो क्रांतीकारक आणि त्यांचे जोडीदार देशाच्या स्वातंत्र्यसाठी हसत हसत फासावर जातात त्यांचा इतिहास,कर्तृत्व,पराक्रम शालेय पाठयपुस्तकात फक्त चार ते पाच ओळीएवढा असतो,हे न समजण्यासारखे आहे. सर्वच जहाल विचारांच्या व क्रांतिकारकांचा इतिहास दडपण्याचे काम आतापर्यंतच्या सर्वच सरकारने पाठयपुस्तकांतून जाणीवपूर्वक केले आहे.त्यात विशेषतः सुभाषचंद्र बोस यांचं नाव अग्रभागी येईल.

लहानपणापासून भगतसिंग तुटक-तुटक माहितीच्या रुपात भेटू लागले.आता कुठंतरी पुरोगामी संघटना ' *मी नास्तिक का?'* या भगतसिंग यांच्या पुस्तिकाचा प्रचार आणि प्रसार करू लागल्या. माझ्या वाचनात आलेले तेवढंच ते त्यांचं पुस्तकं.

प्रसारमाध्यमातून लेनिनचा पुतळा पाडल्यानंतर त्यांच्याशी असलेला संबंध समजतो .अन तेव्हा लेनिनच्या विचारधारेचे असणाऱ्यांना  भारतातले फाशीपूर्वीचे भगतसिंग आठवतात. तोपर्यंत मला भगतसिंग समजत नाहीत.
त्याचप्रमाणे लेनिनाचा पुरस्कार करणारे भगतसिंग. लेनिनला नाकारणाऱ्याचा सुद्धा असू शकतो.अशावेळी भगतसिंग नेमके कोणाचे हेच समजत नाहीत.

*valentine डे*(14 फेब्रुवारी)ला भगतसिंग आणि साथीदारांचा हुतात्मा दिन असतो असे खोटे पसरवून  तो दिवस साजरा करू नका.असे आवाहन करणारे पाश्चात्य संस्कृतीला विरोध करण्यासाठी भगतसिंगचा वापर करतात ते कितपत योग्य आहे  ?
असे देशभक्तीच्या नावावर कृत्य करणाऱ्यांना भगतसिंग समजले असतील का!

'भगतसिंग,सुखदेव,राजगुरु जहाल क्रांतिकारक होते. त्यांनी देशासाठी बलिदान दिले.'एवढीच जुजबी माहिती नव्या पिढीपर्यंत, तरुणांपर्यंत आणून  एखाद्या प्रस्तापित शासनाविरोधात तरुणांनी हक्कासाठी लढू नये असा काही सरकारचा यामागे उद्देश असेल का!असं असेल तर भगतसिंग कसे समजणार? भगतसिंग यांच्या नावाने चालणाऱ्या संघटना हिंसेच्या पुरस्कार करणाऱ्या असतील म्हणून आपण दुर्लक्ष करत राहायचे हे सुध्दा आपल्या संशय प्रवृत्तीचे लक्षण नाही का!

सदर जो भगतसिंग यांच्यावरील विषय दिला आहे त्याच्याऐवजी आम्ही *भगतसिंग यांचे विचार घेऊन आजचा तरुण वागू लागला तर.....* या विषयाच्या  विचारात होतो.पण हा विषय आम्ही सर्वसंमतीने निवडू शकलो नाही. भगतसिंग आपल्याला अन शासनाला सहजासहजी झेपत नाही ,हेच म्हणावे लागेल दुसरं काय ?

देशाच्या स्वातंत्र्यसाठी भगतसिंग, राजगुरु , सुखदेव यांनी प्राण दिले.तेव्हा ब्रिटीश ही समस्या होती. आजच्या युवकांपुढे दारिद्र्य, अस्वच्छता, भ्रष्टाचार यांसारखे प्रश्न आहेत. ते देशासाठी हसत हसत फासावर जाऊ शकतात आपल्याला फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून हे संपवण्यासाठी नव्या भारतासाठी एक कृती करायची आहे.या अर्थाने जरी भगतसिंग यांचे  बलिदान आपल्याला समजले तरी देशभक्तीचे लेबल शोधण्यापासूनची आपली धावपळ थांबेल.ती थांबावी लवकर आपल्या नव्या भारतासाठी.



Source: INTERNET

जयंत जाधव,लातूर
          स्वातंत्र्य इतिहासातील भगतसिंग हे निःसंशयपणे सर्वात प्रभावशाली क्रांतिकारकांपैकी एक आहेत. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत केवळ सक्रिय सहभाग घेतला नाही तर इतर अनेक युवकांना त्यात सामील होण्यासदेखील प्रेरित केले ते जिवंत असतानाच पण त्यांच्या मृत्यूनंतरही .
       स्वातंत्र्य संग्राम क्रांती:-
भगतसिंह हे अशा प्रकारचे युवक होते जे ब्रिटिशांच्या विरोधात स्वातंत्र्यासाठी लढण्याची गांधीजींच्या शैली विश्वास नव्हता. ते लाल-बाल-पाल यांच्या क्रांतिकारी मार्गांवर विश्वास ठेवत होते. भगतसिंह यांनी युरोपीय क्रांतिकारक चळवळीचा अभ्यास केला  कम्युनिझमकडे आकर्षित झाले. अहिंसा पद्धतीच्या वापरण्याऐवजी क्रांती घडवून आणण्यावर विश्वास ठेवणाऱ्यांशी हातभार लावला. काम करण्याच्या त्याच्या पद्धतींमुळे ते नास्तिक, साम्यवादी आणि समाजवादी म्हणून ओळखले जाऊ.
    भगतसिंगाचे व्यक्तीमत्व हे अथांग सागरा सारखे आहे.त्यांना व्यक्त करण्यासाठी पुन्हा भगतसिंग जन्माला यावे लागतील.मला जेवढे त्यांचे व्यक्तीमत्व समजले ते पुढील प्रमाणे-
१.महात्मा गांधी भगतसिंग बाबत गप्प का राहिले?-
हा प्रश्न वारंवार विचारला जातो. भगतसिंग यांची पूर्ण स्वातंत्र्य मिळावे ही मागणी होती.त्यासाठी गांधीचा अहिंसक मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचा मार्ग वेळकाढूपणाचा व अपूर्ण असा होता. छोट्या छोट्या गोष्टीवर उपोषण करणारे गांधी भगतसिंगाच्या बाबतीत शांत का बसले?का काही प्रयत्न केले नाही? त्यासाठी स्पष्टीकरण दिले जाते की त्या दिवशी गांधीचे मौनव्रत होते. तसेच इतिहासाचा दाखले दिले जातात की जगात जेवढी युद्ध झाली ते सर्व हिंसेच्या मार्गाने जिंकता नाही आली.तेव्हा भारताची ताकद नव्हती म्हणे. गांधीनी जर भगतसिंग बाबतीत क्रियाशील कृती केली असती तर आज भारत अखंड तर असता पण कितीतरी अगोदर स्वातंत्र्य मिळवता आले असते.
२. त्या काळात महात्मा गांधी,जवाहरलाल नेहरू,डॉ.आंबेडकर हे प्रसिद्ध वकील असूनही त्यांनी भगतसिंगाची खटला का नाही लढला?
३.भगतसिंगाच्या मदतीला मोंहमद जिनांच्या पुढाकार घेतला होता- मोहंमद जिना हे त्यांच्या काळातील प्रसिद्ध कायदेतज्ञ होते.विशेष म्हणजे ज्या सेंट्रल लेजेस्टिव्ह असेंब्लीमध्ये भगतसिंग व त्यांच्या सोबत्यांनी बाँब फोडला होता त्यावेळी जिना तेथे होते.१९२९ मध्ये एवढे असूनही जिना यांनी असेंब्लीत भाषण करताना भगतसिंगाची बाजू उचलून धरली होती. ते म्हणाले होते की,भगतसिंग यांच्या खटल्यात इंग्रज सरकार एकतर्फी खटला चालवत असून हा न्यायालयीन व्यवस्थेचा खून आहे.पण इंग्रज सरकारने त्यांच्या म्हणणेकडे दुर्लक्ष केले होते.भगतसिंगांच्या या मदतीसाठी जिना यांना इतर कुणी मदत नाही केली.
४.१९३१ ला भगतसिंग यांनी भाकित केले होते की इंग्रज सरकार आता फार १५ पेक्षा अधिक काळ भारतात राहणार नाही.हे अक्षरशः खर ठरल. ३जुलै  १९४६ मध्ये इंग्रज सरकारनी संसदेत जाहिर केले होते की भारतीयांनी आता सत्ता घेण्यास तयार राहावे आमची आता भारतावर राज्य करण्याची इच्छा नाही.कारण दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंड कमकुवत झाले होते.
भगतसिंगाची शेवटची इच्छा अपूर्णच राहिली आहेः-
 इंग्रज सरकारने भारतीयांवर दोन प्रकारे राज्य केले.पहिले १०० वर्षे मारा धाक दाखवून लुटा.नंतर कायद्याची व नियमाची भीती दाखवून राज्य केले.त्यासाठी नवीन कायदा तयार करुन इंडियन पोलिस अॕक्टनुसार पोलिस तयार केले व त्यांच्या मदतीने लोकांवर धाक व जरब बसवली. याच कायद्यामुळे लाला लजपतराय यांचा मृत्यू,भगतसिंगाना फाशी व लोकांवर अनेक वर्षे अत्याचार झाला होता. लाहोर येथे तुरुंगात असताना अमृतसर येथील पत्रकार मित्राला झालेल्या भेटीत आपली अंतिम इच्छा सांगितलं होती .भगतसिंगाची इच्छा होती की,भारत स्वतंत्र झाल्यावर इंग्रज काळातील इंडियन पोलिस अॕक्ट रद्द करावा.पण स्वातंत्र्य होऊन ६९ वर्षे झाली तरी आजही हा कायदा अमलात आहे.त्या काळातही अन्याय होता व आजही चालूच आहे.उदाहरणार्थ नंदीग्राम येथे सरकारच्या नियोजित प्रकल्प साठी हुकूमशाही पध्दतीने शेतकऱ्यांच्या जमिनी बळजबरीने बळकाविल्या होत्या. शेतकऱ्यांनी विरोध दर्शविण्यासाठी जेव्हा आंदोलन केले तर पोलीसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज व गोळीबार केला होता. महाराष्ट्रात मावळ येथे धरणात जमिनी गेल्या त्याचे थकीत मोबदला मागण्यासाठी निघालेल्या आंदोलकांवरील गोळीबार व लाठीहल्ला.
      भगतसिंगानी राजगुरुच्या प्रेम या विषयावर मत व्यक्त केले होते की,सध्याच्या काळ हा पारतंत्र्याचा असून प्रेम,लग्न यासाठी माझ्याकडे वेळ नाही. माझे लग्न हे माझ्या देशाचे स्वातंत्र्य आहे.जर पुढील जन्म मिळाला तर आयुष्यभर प्रेमिकेजवळ घालवेल.ही गोष्ट विशेष करुन यासाठी सांगितले कि काही महाभाग विनाकारण १४ फेब्रुवारी व्हॕलेंटाईन डे व त्यांच्या बलिदान दिवसाचा चुकीचा  संबंध दाखवून गैरसमज पसरवत आहे.

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************