गावाकडचे खेळ..बदलत जाणारे चित्र

🌱वि४🌿व्हॉट्सअप ग्रुप
गावाकडचे खेळ..बदलत जाणारे चित्र

प्रमोद पांचाळ,परळी,बीड
मी एक खेडे गावातील आहे .आम्ही ज्या वेळी लहान होतो त्या वेळी खूप खेळ खेळत गेलो उदा.गोट्या . पण आता मात्र त्या दिशेनाशा झाल्या आहेत.मला आजून आठवण आहे की मी माझ्या मित्रा बरोबर गोट्या खेळत असताना मला माझ्या आईने काम सांगितले पण मी ते काम केले नाही म्हणून मला माझ्या आईने तू पुन्हा गोट्या खेळशील का म्हणून खूप मारले होते.पण आजकालच्या मुलांना आशे खेळ महितपन नाहीत आणि प्रत्येक खेळ हा प्रत्येक ऋतूमध्ये खेळला जातो. उदा पावसाळ्यात  चम्पूल हा खेळा जात होता
हिवाळ्यात मध्ये विटी दांडू खेळला जात होता
उन्हाळ्यात ,गोट्या ,कोया,इ,,, खेळ खेळतात पण आताच्या मुलांना हे खेळ माहीत पण नाही .आताचे मुले फक्त मोबाईल वरचीच गेम खेळण्यात व्यस्त आहेत व शहरातील मुलांना तर हे खेळ माहीत पण नाहीत व ते कशे खेळतात हे पण माहीत नाही गावाकडचे खेळत जी मजा आहे ती कशातच नाही.
शिरीष उमरे,नवी मुंबई.
एकदम बालपणातले दिवस आठवलेत....😍
चिखलात लोळणे, मातीत व गवतात कुस्त्या खेळणे, पावसात भिजत नाचणे, गारपीट नंतरच्या गारा गोळा करणे, झाडावर चढणे, दगड मारुन कैर्या तोडणे, टायर काडीने फीरवत धावणे... हे खेळ कुठल्याही नियमाला बांधुन नसणारे, कुठल्याही पंच वा निरीक्षकाच्या अनुपस्थित आणि बरेचवेळा एकट्याने एन्जॉय केले मनमुराद...
त्यानंतर शाळा मिळाली... मग मामाचे पत्र, धाबाधुबी, लंगडी, लपाछुपी, पानफुकणी, पावसळ्यातली फेकस, गुल्लीदंडा, कोपराने केलेला भक्का व रंगीबेरंगी कंचे, चिंचोक्याचे अष्टचंग, रुमाल, एक टपा कॅच आउट वाले गल्ली क्रीकेट असे स्वत: बनवलेले नियम व सामुहीक खेळ मनसोक्त खेळलो.  नॉनकरप्टेड असल्याने वडीलांची नेहमी होणारी बदली व त्यामुळे मला एकाच खेळाची वेगवेगळी नावे व नियम माहीती व्हायचे.
नंतर नियमबध्द व प्रशिक्षण घेऊन विद्यालयात मार्फत खेळ शिकण्याचा प्रयत्न केले ते रींग, व्हॉलीबॉल, फुटबॉल, बास्केट बॉल, हॅन्डबॉल, खोखो, आट्यापाट्या, कबड्डी, लेझीम, मल्लखांब, मानवी मनोरे वैगेरे ... इतके खेळ खेळलो कारण एक तर स्टँडबाय राहायचो कींवा टीममधुन बाहेर हाकल्या जायचो...😜 पण मी माझे स्पोर्टींग स्पीरीट सोडले नाही. 😉
नंतर बॅडमिंटन, टेबलटेनिस, चेस व लॉनटेनिस आणि क्रीकेट हे सभ्य व श्रीमंत खेळ खेळुन बघितले पण रमलो कॅरमबोर्ड व पत्ते मध्येच तेही घरच्यांसोबत !!
नंतर कॉलेज जिवनात एनसीसी मध्ये रेतीच्या पोत्यात दुष्मन समजुन खुपसलेली रायफलीची संगीन कींवा *परेsssssड सावधान* कमांड प्रॅक्टीसच्या वेळी बेंबीच्या देठापासुन बोंबलणे, पिस्तोल मशिनगन स्टेनगन हँडग्रेनेड चालवणे, रणगाडा व जीप पॅराग्लायडींग, दोरीने वर चढणे, भिंती चढुन ओलांडणे,  रिव्हर क्रॉसिंग, वेगवेगळ्या नॉट बांधणे, रॉक क्लायमींग, स्ट्रेचर बनवुन डमी पेशंट कॅरी करणे, जखमी साथीदाराला खांद्यावर नेणे, विषारी साप ओळखणे, विषारी वनस्पतीची ओळख, सायकलींग, बायकींग, ट्रेकींग, बंगपॅकर्स, हीचहीयकींग (पैसे खिस्यात नसतांना लीफ्ट मागुन कींवा पैदल प्रवास आणि कुठलेही काम करुन जेवणाचा बंदोबस्त करणे कींवा उपाशी असे पागलपंती अनुभव) हेच अॅडवेंचर खेळ जीवन बनले होते.
आत्तांच्या मुलांकडे बघितले की कीव येते. एकतर मोबाईल कींवा टीव्ही गेम कींवा लहान वयापासुन बालपण मारुन टाकणारे व्यावसायिक प्रशिक्षणाचा भडीमार पालकांकडुन...😔
आता पंचवीस वर्षांनी मागे वळुन बघता खेळांच्या आठवणी ने परत दहा वर्षाचा झाल्यासारखे वाटते... ✨✍🙏
दत्तात्रय डोईफोडे,वाशिम
आपला गाव खूप बदललं बंड्या मी माझ्या मित्राला म्हणलं त्यानं पण मान होकारार्थी दुलवली कारण त्याच्या हाती होता अँड्रॉइड मोबाईल आणि तो त्यात कुठल्या तरी कळपाबरोबर गेम खेळत होता ऑनलाईन...
मी पुढे होत त्याला म्हटले जरा ठेव बाजूला तो मोबाईल आणि बोल माणसाबरोबर व्यवस्थित 2 मिनिट तेवढ्यात तोच पुटपुटला थांब थोड आता संपवतो सगळा गेम...
मला जवळ बसून आता थोड बोर व्हायला लागलं मी तस त्याला म्हटल त्याने 2 मिनिट म्हणत म्हणत 1 तास घालवला शेवटी जिंकला पण त्याच अभिनंदन करायला वास्तविक माझ्या शिवाय कोणी नवत... मीच केलं मग ते पण.
बोलता बोलता गावच्या वेशीवर पांदन मधून जाताना सरकारी विहीर दिसली कोणी तरी दोघं तिघ उघडी, जवळ गेलो ते पोहत होती, मग काय कपडे काढून पाण्यात उडी लगेच कारण थोडा उकाडा पण जाणवत होता पोहताना पाहून पोरांनी दादा खेळणार का शिवाना - पाणी विचारलं मग काय बंड्या म्हणाला खेळूच दे आज 3 वर्ष झाली सोबत नाही खेळलो...
विहिरीतून बाहेर आल्यावर घरी निघालो माळाच्या बरडाणी जाताना वडाच्या झाडाखाली विश्रांती घ्याला बसलो तोच बंड्या ने मोबाईल काढला परत केला चालू तोच गेम परत...
आता मात्र मलाही राग येत अरे किती चिकट शिल त्या मोबाईल ले, फेक तिकड अन आराम कर बंड्या काही नाही ऐकेना...
आराम करत असताना डोक्यात विचारचक्र सुरू झालं काय हा प्रताप अँड्रॉइड मोबाईल चा सगळे येडे करून सोडले बा... लहान असताना चोर पोलीस, चंपुल, लपणा चीपणी, डाब - डूब, हे झाले घरचे खेळ... शाळेतली खेळ लंगडी, खो खो, लिंबू चमचा, पोट्यातली शर्यत ई अनेक खेळ खेळले पण आता बराच चित्रे बदलल...
खरंच...

रामेश्वर जाधव,नांदेड
नमस्कार मी जेव्हा लहान होतो तेव्हा माझ्या गावी मी मित्रांबरोबर विविध खेळ खेळत असे त्यामध्ये काचेच्या गोट्यां अधारे बेंग्या पाणी असो कि कोपर खर्डी असो त्यामुळे तर कोपराने काचेची गोटी गल पर्यंत धकलत न्यावी लागत असे आणि कोपराला खरचटत असे तसेच ऊन्हाळ्यामध्ये गावाकडील कॅनोलला महीनाभर पाणी राहत असे त्यापाण्यामध्ये पोहुन पोहुन अख्खे डोळे लाल होत सर्व धुके दिसायचे असा आमचा दिवसातुन दोन वेळेस दिनक्रम असे पाण्यामध्ये शिवणापाणी हा डाव म्हणजे पोहण्याची सुरूवात असे आणि शेवट मनला तर पाण्याच्या ड्रापमधील धार खाली बुडून राहण्याच्या उपक्रमाने होत असे,चिचेंच्या झाडावरती जावून चिंच प्रत्येक नखांनी दाबुन पाहून पाड असेल तर ते झाडावरतीच बसून खाण्याचा मोह आवरत नसे चिंचा खाऊन झाल्यावर संध्याकाळी जेवन करतांना दात खुप आंबलेले असायचे त्यावेळ वाटायचे की उद्या चिंचा नाही खायच्या पण दुपारची शाळा सुटली की माकडावानी गत होयायची आणि पुन्हा चिंचेच्या झाडाकड पाय ओढले जायचे.
सुळकाट्या पण आम्ही खेळत असे ज्याच्यावर डाव आला त्याने आपली काठी सांभाळायची असे व बाकीचे आपली काठी दगडावर टेकवित टेकवित डाव आलेल्या मित्राची काठी मुख्य जाग्यावरुन दुर नेली जात असे व ज्याची काठी दगडावर नसेल त्याला पकडल्यावर त्या जागेवरून मुख्य जाग्यावर हातात काठी घेऊन लगडत जावे लागे.
   अशा प्रकारचे विविध खेळ गावाकडे माझ्या लहानपणी खेळले जायचे झाडावरचा डाप,सुळकाट्या,डबीकाडीचे चित्र,गुटखा पुड्या खालेले पाऊच,लांगीलुंगी,गाडीच्या चक्याची शर्यत ई.खेळाचा समावेश होता पण आता मी जेव्हा गावाकडे सुट्टीमध्ये जातो तेव्हा हे खेळ लोप पावलेले दिसत आहेत गावाकडील छोटे मूल मोबाईल वरती लुडो असे खेळ खेळतात त्यामध्ये शारिरीक क्षमता असणारे खेळ दिसत नाहीत.
               
निखिल खोडे,ठाणे.

          "स्वतःच गाव" म्हटल की प्रत्येकाच्या मनात आपुलकीची आणि उत्साहाची भावना निर्माण होते. गावची आठवण जरी काढली तरी लगेच गावी जायची इच्छा होते. लहानपणा पासुन पाहत आलेलो गावातील मित्रमंडळी भ्रमणध्वनी (Mobile) आणि आधुनिक करणामुळे गावातील चित्र बदलेल दिसते.

             लहानपणी शाळा व्यतिरिक्त पुर्ण वेळ हा खेळण्यात जायचा. कुरघोडी, कब्बडी, खो खो, विटी दांडू, रगोळी, क्रिकेट, अशे अनेक प्रकारचे खेळ गावात लहानपणी खेळत आलो. खेळामुळे शरीराचा व्यायाम होतो ते मोठे झाल्यावर समजले लहानपणी तर फक्त मौज मजा आणि आनंद मिळतो म्हणून खेळायचो. खेळामुळे बरेचदा आमच्या मित्रांमध्ये कधी भांडण व्हायची तर कधी आम्ही एकत्र यायचो.

               बालपणाची एक गोष्ट आठवते, मला क्रिकेट खेळायचा खुप नाद होता. क्रिकेट खेळत असताना बॉल नेहमी हरवयचा आणि त्याही दिवशी तो खेळता खेळता हरवला. बॉल तेव्हा १२ रुपायत मिळायचा आणि जवळ पैसे नसल्यामुळे घरच्या डब्ब्यातून कोणाला न सांगता पैसे घेऊन बॉल विकत घेऊन आलो. सायंकाळी आई शेतातून आल्यावर तिला मी केलेला पराक्रम जसा कळाला तसच मला, मी ज्या दुकानातून बॉल विकत घेतला तीतपर्यंत मला मारत नेले पुन्हा अशे करशील का म्हणुन. खुप जास्त रडलो परंतु त्यामागे तिची संस्काराची भावना होती. ते संस्कार तेव्हाच रुजले गेले.

                आता मात्र गावाकडची आणि तेथील खेळाची परिस्थिती पुर्णपणे बदललेली आहे, गावाकडील खेळाची जागा आता पूर्णपणे मोबाईल, टिव्ही ने घेतली आहे. कारण बराचसा वेळ हा या गोष्टी मुळे मनोरंजनात निघुन जातो. शेवटी एकच *गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी..!!*

मुकुंद बसोळे,लातूर.
सूर्य मावळतीला लागला होता....तो सुद्धा जणू सांगत होता आता थकलोय जातो घरी.....येतो उद्या परत....नवी अशा,नवी उमेद आणि नवा उष:काल घेऊन....आणि सोबतच येतो घेऊन नवी सोनेरी पहाट.....
     आणि इकडे 'हानम्या' म्हणजेच हणमंत....सुद्धा थकला होता....पण त्याच्या डोक्यात उद्याच्या कामाची गोळाबेरीज चालू होती....उद्याच्या कामाचा विचार करत आणि आपल्या हिरवाईने नटलेल्या "रानाकडे" बघत बघत तो घराकडे चालू लागला....हातातल्या तंबाखूवर थाप मारत त्याने ती तोंडात टाकली आणि आपल्या डोक्यातल्या  कामाच्या 'वळवळ' करणाऱ्या किड्यांना उडवून लावलं....आणि तो घराकडे चालू लागला....संध्याकाळचा टाइम....गुर सुद्धा घराकडे जात होती आणि त्यांच्या खुरामुळे उडालेली धूळ हवेत तरंगत होती....म्हणून वातावरण सुद्धा गढूळ झालं होतं....आणि ती धूळ अंगावर घेत घेतच 'हानम्या' घराकडे जात होता....त्या धुळीची फिकीर त्याला नव्हतीच कारण लहानपणापासून तो असाच मातीत खेळायचा....त्याच्या प्रत्येक खेळात माती अंगाला चिटकायची...आणि मातीशी असणारी त्याची 'नाळ' आणखीनच घट्ट व्हायची....त्याच्या लहानपणीच्या खेळामुळे मातीशी असलेलं त्याच नात अधिकच घट्ट होत गेलं....
                गुरांसोबत रमत -गमत तो गावात कधी पोहचला ते त्याला कळलच नाही....पण गावात पोहचता पोहचता  त्याच्या नजरेतून गावाच्या शाळेतील 'मैदानाच' रिकामेपण सुटलं नाही आणि त्याला त्याचं खूप वाईट वाटलं....आणि त्याला त्याचे सवनगडी मैदानाच्या कोपऱ्यात 'गोट्या' खेळताना दिसू लागले...त्याने स्वतःचा चिमटा काढला...."च्यामारी  स्वप्नंय तर हे" असं स्वतःशीच म्हणून तो आपली वाट चालू लागला...आपल्या सवंगडया च्या आठवणीत तो गावातल्या चौकात कधी पोहचला ते त्यालाच कळलच नाही....."टिंगटिंगटिंग.... टिंगटिंगटिंग....." च्या आवाजाने तो भानावर आला...त्याला मोबाईल व्यवस्थित हाताळता येत होता...म्हणून त्याला लगेच कळलं की कोणीतरी 'टेम्पल रन'खेळत होत....त्याने मान वर केली तर चौकातल्या कट्ट्यावर 'पाटलाचा' प्रिन्स  'टेम्पल रन' खेळत होता आणि गावातील त्याच्याच वयाची इतर पोर त्याला घेराटा घालून उभी होती....तो 'प्रिन्स' 'टेम्पल रन' खेळण्यात इतका मग्न होता की जसं मोबाईल मधील व्यक्ती टर्न घेयायचा तसा हा 'डुलायचा'....आणि त्याच बघून ती पोर सुद्धा तसंच 'डुलायची'.....एकदा तो तर इतका जास्त 'डुलला' की पडता पडता वाचला....."डिजिटल इंडिया" असं 'हानम्या' स्वतःशीच म्हणला आणि त्याला लगेच आठवू लागले मातीशी नात सांगणारे त्याचे लहानपणीचे खेळ......
                तो लहानपणी गल्लीतून बोंबलत पळतानाची  आठवण त्याला झाली आणि त्याला आम्हीसुद्धा 'टेम्पल रन'  च्या हिरो पेक्षा कमी नव्हतो असं उगाचच वाटून गेलं....पण लहानपणी केलेल्या 'टेम्पल रन' मुळे आम्ही आतासुद्धा 'तंदरुस्त' आहोत....पण  'डिजिटल इंडिया' मध्ये कुठून येणार ही 'तंदरुस्ती'....आताशी त्याला शाळेतील मैदानाच्या 'रिकमेपणाच' कोड उलगडत होत......वरचेवर मोबाईल मध्ये गुंग होत जाणारी पोर....म्हणूनच शाळेचं मैदान रिकामं झालं आहे....त्याला त्याच्या लहानपणी ची खेळ आठवू लागली....'लपंडाव'....एक दोन तीन आलो रे म्हणायला लावणारं.... आणि शोधक वृत्तीचा 'विकास' करणारा लपंडाव....आणि खेळताना सुद्धा किती मज्जा येयाची....'गोट्या'....आम्हाला नेम  लावणं शिकवत शिकवत आमची 'एकाग्रता' वाढवायचं....'कबड्डी'... एक रांगडा आणि मर्दानी खेळ...आमच पिळदार शरीर त्यानंच तर बनवलं आणि आम्हाला मेहनतीची सवय सुद्धा लावली....'लगोरी' सुद्धा असाच नेम शिकवणारा खेळ....'शिवणापाणी' अखंड पळायला लावणारा आणि आमचा 'स्टॅमिना' च विकास करणारा खेळ....असे एक ना एक....अनेक खेळ....आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या खेळामुळे मिळणारे 'सवनगडी' आणि आमच्यात निर्माण होणार प्रेम....आताच्या पोरांना हे भेटणार नाही....खरंच आताचे पोर दुर्दैवी म्हणायला हवेत.......
                  आपल्या लहानपणीच्या खेळाची आठवण करत करतच 'हानम्या' मारूतीच्या मंदिराजवळ आला आणि याचे हात आपसूकच जोडले गेले आणि आपसूकच तो बोलून गेला  "हनमंता....ह्या डिजिटल इंडिया च्या पिढीला ह्या मोबाईल च्या चक्रव्यूहातुन काढ रे बाबा"..... पण देव त्याच ऐकणार होता का?...देवालाच माहीत......

शीतल शिंदे ,दहिवडी.
लहानपण देगा देवा मुंगी साखरे चा खवा !
 गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी .
     किती छान आज पुन्हा जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.मला वाटते ही शेवटची पिढी असेल की ते गावाकडच्या वेग-  वेगळ्या गमती- जमती अनुभवलेली.
 आताच्या गावच्या मुलांना खेळातील गमती जमती, अनुभव  विचारल्यास त्यांना सांगणे कठीण जाईल .कारण आता ती जागा मोबाईल गेम , संगणक , मित्रांशी व्हाट्सअप चाटिंग , एकत्र केलेली ट्रिप इत्यादीनी  घेतली .
गावामधील मोजक्या दूरदर्शन -  टी व्ही ची जागा घराघरातील केबल नी घेतली.फिस्ठ ची जागा हॉटेल पार्टीने घेतली . आईबाबांची ची जागा मम्मी पप्पा नी घेतली .मैत्रिणीच्या जागी फ्रेंड्स आले .
 खेळामधील गंमती तर सोडाच त्यांची नावे पण आताच्या मुलांना सांगता येणार नाहीत .
  सूरपारूम्ब्या , सुर्फ्यट्या , खोखो , कब्बड्डी ,लंगडी  विटी दांडू , गोट्या , गलीवर पैसे गोगलगाय , काचपुरनी , पत्त्यावर पैसे , लपाछपी, धनुष्यबाण हे आणी अश्या प्रकारचे खेळ आता बुडाले .
          सुट्टीदिवशी  डोंगर उतरून खाली जायचे बोरे खाण्यासाठी , अगदी कड्यावर झाड असेल तरी जायचे , कोणते झाड गोड बोराचे ते लक्षात ठेवून तिथे जायचे .
मग ओढ्या मधे पोहायचे , तीथे च बसून बांधून नेलेलि बाजरीची भाकरी नी तेल-  चटणी- लोणचे खायचे .आणी अंदाजे चार च्या सुमारास घराकडे निघायचे .हातात घड्याळ कुठे तेव्हा पहायला .उन्हाळ्यात करवंदे आणन्यास  डोंगर फिरून यायचे , कवट, बेल , चिंचा, जाम्भले सीताफळ इत्यादी फळे खाण्यासाठी सगळी शिवार फिरायचे .झऱ्यावर पाणी प्यायला जायचे ह्या आणी बऱ्याच गोष्टी .आजी गोष्टी सांगायला , सैदुची गोष्ट संताजी धनाजी च्या घोड्याची गोष्ट , बाहुली बनवून दयायची बाहुला-  बाहुलीची लग्न लावणे आणी त्याबरोबर स्वतः ची पण लग्न - हळदी लावणे आज्जी सोबतीला - गुडदाणीची फिस्ठ करायची ओ हो काय त्या आठवणी .
   हाइस्कूलच्या  वेगळ्या आठवणी येता जाता रस्त्याने बोराचे झाडे शोधत , दुसऱ्याच्या शेतातील  येता जाता ,हरभरा, गाजर खात कधी कधी रस्त्या कडेच्या नाल्यात साठलेल्या पाण्यात पोहत बसायचे .अश्या प्रकारचे उद्योग आमचे.

विकास येवले,पुणे
आजही हरवतो मी त्याच आठवणींत, एकटाच मग मनोमन वेड्या परी हसतो. आठवतात ते क्षण जे बालपणी मी माझ्या मित्र, सवंगडया सोबत घालवले.अजूनही त्या आठवणी तशाच ताज्या आहे. अस वाटत जणू ही काल पर्वाचीच गोष्ट, लांब दूर नजर जाईल तोवर आमचच शेत आहे. जरा वाकड-तिकडं आहे म्हणून त्याच नाव वाकड असच आहे.त्या शेताच्या मध्य भागी एक खूप मोठं आंब्याच झाड आहे तिथं त्यावरच रंगायचा आमचा खेळ, आमच्या कडे ज्याला सुरपरब्या म्हणतात. (ठिकाण बदलेल तस खेळाच नाव ही बदलत) एकदा का सगळे मित्र मिळून तिथं गेलो की संध्याकाळ शिवाय घरच तोंड ही बघन होत नसे.(घरून कोणी शोधत आल की बांधानी त्या हलक्या सैल इजारी (प्यांट) पकडून पळताना सगळ्यांची तारांबळ होयची हा भाग वेगळा) झाडा खाली रिंगण आखून एक काठी दूरवर भिरवायची, एकावर राज्य आणि बाकी सरसर वेगाने झाडावर चढायचे, ज्यावर राज्य त्यान कोणा एकाला पकडून दाखवायचं. असा खेळाचा नियम असे आजही आठवत मला खेळताना पायाखालची फांदी तुटून वरच्या फांदीला माकडा सारखा लटलेला मी, आणि त्या वेळी घाबरूनही मित्रांना घाबलोच नाही, अस खोट भासवणारा मी.
दिवस भर उंडरायच पोटाला आग लागली की मात्र तिथंच हवे तितक्या कैऱ्या (किरण्यांनी खिशात लपून आणलेलं मिट आणि मसाल्याची पुडी त्यात तो स्वाद आहहह बोलूच नका) शेजरच्या झाडावर जांभळ आणि झाडालगतच्या झूडपायावर करवंद अशी आमची मेजवानी असे आजही जातो मी सवडीने त्या जागी शोदायला माझे मित्र त्या क्षणात पुन्हा जगायला रमायला ते चित्र तसच डोळ्या देखत उभं ही राहत.
हल्ली ते सारे असतात व्हर्चुअल विश्वात बदलत्या काळा नुसार ते बदलले तसे त्यांचे खेळ ही बदलले कधी candy crush , कधी clash of clan आणि आता तर नवीनच आहे ते काय तर pubg की काय ते गावाकडचे माझ्या मातीतले खेळ मात्र हळूहळू नामशेष होतायत हीच खंत आता मनाशी उरलीय.
#as u wish

किशोर शेळके,लोणंद,सातारा.   
         मुळात हे दोन शब्द ऐकले तरी बरचसं चित्र स्पष्ट होतेय. कारण हरवत चाललेले गावाकडचे खेळ आता गुगलवर देखिल सापडत नाहीत. मी परवा शहरात असलेल्या माझ्या बहिणीच्या घरी गेलो. भाचा साधारण ९ ते१० वर्षाचा असेल. रविवारचा सुट्टीचा दिवस असल्याने तो घरीच होता. हाॅलच्या एका कोपय्रात 'गोट्या' खेळत होता. तो गोटी आटीत धरण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याला जमत नव्हते. मी त्याची ती धडपड बघत होतो. त्याने हलकेच माझ्याकडे बघितले आणि थोडा लाजला. मी पुढे होऊन त्याच्या शेजारी जाऊन बसलो. एक गोटी साधारणतः पाच ते सहा फुटांवर ठेवायला सांगितली. दुसरी गोटी आटीत व्यवस्थित पकडली आणि एक डोळा बंद करून सोडली. सहा फुटांवर असलेली दुसरी गोटी मी अगदी सहज उटवली. आणि मग मी पंधरा वर्षे पाठीमागचा भूतकाळ आठवू लागलो.

         शाळेत असताना खो-खो किंवा कबड्डी हेच खेळ असायचे पण आमच्या सुट्टीच्या दिवशीचे खेळ आजही मनाला सुखावून जातात. आमचा 'विटी दांडू' हा खेळ पोकेमोनला काहीच कमी नव्हता. आमची विटी दांडू ने मारून मारून कधी वेशीच्या बाहेर जायची कळायचं पण नाय. आणि ज्याच्यावर राज्य यायचं, तो लंगडी घालून घालून घामाघूम व्हायचा. अगदी रडकुंडीला यायचा. त्याला चिडवण्यात जी मजा असायची ती आत्ता कॅन्डी क्रशच्या अगदी शंभर लेवल पूर्ण केल्या तरी येत नाही. आणि नंतर स्वतःवर राज्य आल्यानंतर जो हिरमूसपणा यायचा तो अगदी एखादं मोबाईल वाॅर मधील वाॅर हरल्यावर येईल त्याहीपेक्षा जास्त असायचा.


      झाडावर खेळलेल्या 'सूर पारंब्या' अजून आठवतायेत. आपला सूर वाचवण्यासाठी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना झाडावर चढून पकडायचे, माकडापेक्षा जास्त चपळाईने झाडावर हालचाली करायच्या. हे खेळ खेळताना येणारी मजा क्रिकेट आणि फुटबॉल खेळताना कधीच येणार नाही. 'सूरपाट्या' हा आमचा महत्वाचा सांघिक खेळ या खेळात खेळाडू किती खेळवावे यावर काहीच बंधन नाही. आपापली पाटी अडवून धरणे हे क्रिकेट मध्ये विकेट टिकवून धरण्यापेक्षा कौशल्याचे काम आहे. एकेका घराचे कोंडे सोडवत सोडवत शेवटचे घर पास केले की, एक सूर निश्चित, आणि हा सूर फुटबॉलमधील गोलपेक्षा आनंद देणारा असायचा.

          रग्बी हा खेळ खूप कमी लोकं खेळतात, पण आम्ही आजही गावाकडे 'काकडा' या नावाने हा खेळ खेळतो. फक्त रग्बीच्या निमुळत्या चेंडूऐवजी आम्ही गाठ बांधलेल्या चिंधी ने हा खेळ खेळतो. आणि आमचं मैदान हिरवं नसतं, तर काळीभोर मशागत केलेली मोकळी शेती, हे आमचं मैदान. एका खेळाडूला पाच पाच खेळाडू अगदी तोंडात माती जाईपर्यंत लोळवायचे, पण खेळ जिंकण्यासाठी प्रत्येकजण चिकाटीने खेळणार.

           काही खेळ आम्ही असेही खेळलेत की त्यांची नावे पण विचित्र आहेत. 'कांदाफोड' हे त्यातील एक नाव. यात आधी एक पाय पसरून त्यावरून उडी मारून जायचे, ते नंतर पायावर पाय, मग त्यावर हात, वाकून, ते अगदी शेवटी सरळ ऊभे राहून फक्त मान वाकवून त्यावरून उडी मारायची.
 
अगदी त्या काळात आंब्याच्या कोयादेखील खेळण्यात असायच्या. एक गोल रिंगण करून त्यात त्या कोया मांडायच्या,आणि बाहेरून एका फरशीवजा दगडाने अगदी एकेक कोय उडवायची.
हे सगळे गावाकडचे खेळ सांगताना एवढे गमतीशीर आहेत तर खेळताना किती गमतीशीर असतील याचा विचार मोबाईल मधील गेम खेळणारांनी करूच नये
रामेश्वर क्षीरसागर,पुणे
     4-5 वर्षांची भाची मागच्या उन्हाळ्यात घरी आली होती. ती आल्यानंतर पोरगी अशी उनाड की दिवसभर मातीच खेळत बसायची. आणि मग मला तेंव्हा माझे बालपण आठवले की माझा सगळ्यात आवडता खेळ हा माती, वाळू खेळणे आणि खाणे हा होता ! माहीत नाही त्या मातीत एव्हढे काय खेळायचो पण तेच खेळत बसायचो...कदाचित मातीची ती एक स्वतःकडे खेचून आणण्याची शक्ती असावी !
    शाळेत गेल्यानंतर असे काही खेळ खेळायला लागलो..म्हणजे काही खेळ तर मी एखाद्या मित्राने त्रास दिला तर त्याचा बदला घेण्यासाठी च खेळायचो. या खेळांचे नाव हिंतासे विचित्र असायचे. म्हणजे लांडी नावाचा एक खेळ होतं.त्यात खेळण्यावर कमी आणि मारण्यावर च जास्त भर दिला जायचा. असाच आणखीनच खेल होता. म्हणजे त्याचे नाव तसे विचित्र होते -" आंगी का लुंगी " आता नावावरून उगीच तर्क बांधण्याचा प्रयत्न ही करू नका ! असाच आणखी एक खेळ होता त्याचे नाव गहू ! खायला तर सहसा गहू मिळायचा नाही, पण गहू खेळून मात्र भरपूर घ्यायचोत ! चौथीत असताना असाच एक खेळ होता जो की फक्त आम्ही चौथीच्या वर्गातील मुले -मुली खेळत असू !म्हणजे नियम साधेच. मुलांची  एक आणि मुलींची एक अश्या २ टीम असणार. त्या teams मध्ये अख्ख्या वर्गातील मुले आणि मुली असणार. म्हणजे किमान २५ players एका टीम मध्ये. आणि नियम साधेच एकमेकाच्या टीम ला पकडायचे , म्हणजे चोर पोलिस सारखे. पण नाव मात्र, भलतेच विचित्र होते - " गिधाड गॅंग "😅
   आणखी एक फारच महत्वाचा खेल आम्ही खेळायचो ! त्याला खेल म्हणणे योग्य ठरेल का नाही माहीत नाही...पण गावाकडे फळे चोरण्याचा खेळ आम्ही मुले जोरात खेळायचो. म्हणजे ही फळे पण अशाच लोकांची चोरायची, जी लोकं फळांना राखण बसतात ! आता एक आजी होती, तिच्या बोरीची बोरे फार गोड लागायची. पण म्हातारी बोरे घेऊनच द्यायची नाही. मग आख्ख्या गावातल्या बोरी सोडायच्या आणि म्हातारीच्याच बोरिची बोरे खायला आमची स्वारी जायची ! पेरू, सीताफळे,रामफळ, आंबे,चिकू अगदी सगळीच फळे बक्कळ प्रमाणात चोरून खाल्ली ! मला आठवतंय मी डाळिंब फक्त बाजारात विकत घ्यायचो. कारण गावात कोणाकडे चोरण्यासर खे डाळिंब नसायचे आणि मला ते फार आवडायचे ! बाकी, मग माध्यमिक शाळेत गेल्यावर ते कबड्डी ,खो -खो vallyaball ,football वगैरे खेळायला लागलो. आम्ही शाळेत इतका जबरदस्त खो - खो खेळायचो की सगळ्या शाळेला आमच्यावर गर्व वाटावा आणि नेमका आम्ही तालुक्याला जाऊन हरायचो ! एकदा पाचवीत असताना सुर - पारंब्या खेळताना एक भिडू झाडावरून कोसळला सगळ्यांनी बघितले की त्याचे कोपराचे हाड बाहेर आले आहे, तेंव्हा घाबरुन सगळे त्याला तसेच टाकून पळून गेले !😅
   परवा दिदीचा फोन आल्यावर गल्लीतील लेकरे आता खेळतात का असे विचारले तर ती म्हणते की ," आता गल्लीतली लेकरे खेळतच नाहीत .अगदी दररोज च नव्हे तर रविवारी पण T.V. लावून नुसता T.V. बघत बसतात. खेड्यांचे ही आता शहर झाले आहे ."
  मग वाटले, *" ते दिवस गेले कुठे जेंव्हा फुले बोलायची !*
    मनःपूर्वक धन्यवाद!

डॉ. विजयसिंह पाटील. MBBS.DA.कराड.
आम्ही सगळं नेहमीसारखे फिरून ,हॉटेलात शिरलो. आबा मागचं होते. ( कावळे सरांना कोणतरी भेटलं आणि त्यांचं काशावरतारी भाषण सुरु झालं असावं असा आमचा अंदाज )
बसून पुढं आलेल्या चहाचा घोट घेत निवांत बसलेलो. तेव्हड्यात कावळे सर लंगडत आले. काय झालं सर असा विचारायचा अवकाश कावळे सर रागाने सुरू झाले. आवाज वाढवून ' नॉनसेन्स, ही काय पद्धत आहे का ?  आजच्या मुलांना काही शिस्तच नाही बघा, रबिश 'असं म्हणत आपला दुखरा पाय चोळू लागले. अहो पण झालं तरी काय ? असं विचारताचं ' काय झालं, ? अगआई ग असं म्हणत कळ निघालेला पाय चोळू लागले. घारे सरांनी सांगितले ' क्रिकेट चा चेंडू लागला त्यांच्या पायाला, जास्त काय नाही ' असं म्हणताच कावळे सर संतापाने आपला पाय वर उचलून उत्तरले ' खामोश, जास्त नाही म्हणता, हे बघा, किती जोरात चेंडू लागलाय ते, जरा तरी शिस्त हवी की नको या मुलांना, याचा मी धिक्कार करतो '
तेव्हड्यात आबा काठी टेकत आले आणि म्हणाले ' ढेकर कशाची देताय सर '. तसा हॉटेलमध्ये जोरात हशा पिकला. कावळे सर मुकाट्यानं चहाच घोट घेत बसले.
घोलप साहेब ' अहो सर ही मुलं निदान बाहेर खेळतात तरी , हल्लीची मुलं टीव्ही किंवा मोबाइल ला चिकटून बसलेली असतात, आपण त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. कावळे रागानं काहीतरी बोलणार होते , पण त्याचं लक्ष घारेनी पुढं केलेल्या तंबाखू कडं गेलं आणि राग गिळून त्यांनी तंबाखू तोंडात धरली. चला थोडा वेळ आली तरी कावळे च तोंडचं मीटर बंद राहणार या विचाराने सगळ्यांनी मनात  हुश्श केलं.
घोलपसाहेब पुढं ' हल्ली मुलं खेळताना दिसतच नाहीत. बघावं तेंव्हा टीव्ही पुढं, आम्ही लहानपणी , गोट्या, विटी दांडू , कबड्डी , सूर पारंब्या, इतकं खेळलोय ' .
यावर सगळ्यांच सहमती झाली.
तेव्हड्यात आबा म्हणाले ' आमच्या इतकं खेळ कुणीच खेळलं नसलं, इटी दांडू, दगडी गट्टी आनी गोट्या, लगोऱ्या, भवरा, कुठलं बी नाव घ्या ,आमी त्यो खेळलुया..
अवो, इटी तासायचो, दांडूला लाकूड हुडकून आणायचो.
एकदा गंमत झाली, मी जोरात इटी हाणली, ती गेली रस्त्यावर चाललेल्या आमच्या बाच्या फेट्यातच . बा ला कळलं बी नाय, बा लै डेंजर मानुस, म्या दांडू फेकून लपून बसलो.
डोसक्यावरकाय चिमनी बसली असं वाटून, बा नं फेटा सोडला, तशी इति बाईर पडली. इटी हातात घेऊन बा नं डरकाळी फोडली' आमचं बेन कुटाय  ?, आख वावार मोकळं पडलंय, गाबड्यानु इथंच जागा मिळाली व्हय खेळायला ? परत इथं दिसला तर तंगड मोडून गळ्यात बांदिन, '..बाला गडबड व्हती, नायतर धूनं धुतल्यागत आमाला धुतलं असतं.
आमी गलोरीनं चिंचा पाडायचू , त्याची स्पर्धाच असायची. परतेकाला टाइम दिलेला असायचा.सगळ्यात जादा चिचा पाडणाऱ्याला परतेकानं ठरलेल्या चिचा द्यायच्या. लै मजा याची' आबा आपल्या लहानपणात हरवून गेलेले.
सुटीत सकाळी उठल्या उठल्या चा पिऊन आमी, हिरीकडं पळायचू. भुका लागल्यावरच वर याचू .चार चार तास पव्हत असू. एकदा मजाच झाली. माजा जोडीदार परश्याला , तेच्या बानं काय तरी काम सांगितलं होतं. हिकडं परश्या आमच्या बरोबर हिरीत डुंबत व्हता.
त्यो परश्याला हुडकत हिरीवर आला. त्याची हाक ऐकून परश्याची पाचावर धारण बसली. परश्या लगीच नाक दाबून पाण्याखाली गेला. वरुन हाकावर हाका येत व्हत्या . बानं हिरीत वाकून बघितलं तर परश्या काय दिसला नाय. शिव्या घालत त्यो माग फिरला. आमी खुनावल्या वर परश्या वर आला. पण बा बी लै हुशार. त्यानं कापडं काडून हिरीत उडी मारली. परश्याचं मानगूट धरलं. आनि इतकं बदाडलं की बोलू    नगा..' त्या आठवणीने आबा हसू लागले.
'पहाटं बा मला उठवायचा आनी तालमीत टाकायचा, वस्ताद झोर बैठका काढायला लावायचा, मातीत डोकं घुसळायचा, लै हाल करायचा, पन हळूहळू गोडी लागली.

शेवटी आबा म्हणाले ' या खेळातून मुलांचं मनोरंजन व्हायचंच आणि वर व्यायाम होत व्हता.कडकडून भुका लागायच्या, मिळलं ते खायचे आणि पडल्या पडल्या झोप लागायची , आता मातूर ये खेळ बंदच झालेत,, त्या खेळांची मजाच न्यारी '
घोलप साहेब म्हणाले ' अगदी बरोबर आबा, हल्ली झालंय काय की आईवडील दोन्ही नोकरीला. त्यात विभक्त कुटुंब पद्धत आली. घरात जुने खेळ खेळण्यासाठी म्हातारी माणसं नाहीत. मुलांना वेळ द्यायला आईवडिलांना वेळ नाही. त्याची भरपाई टीव्ही, विडिओ गेम्स आणि मोबाईल देऊन केली जातेय. व्यायाम पूर्ण बंद झालाय, भयानक परिस्थिती आहे '

(यातील सर्व संबंधित छायाचित्रे गुगलवरून घेतलेली आहेत.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************