माझा वि४ ग्रुप सोबतचा आजवरचा प्रवास. भाग - 1 (पहिला)



डॉ. विजयसिंह पाटील MBBS. DA. कराड
           लहान असताना, घरात करमणूकीचे साधन एकमेव रेडिओ. मला गाण्यांची, बातम्यांची फारशी आवड नसल्याने, मैदानी खेळ आणि वाचन याची आवड लागली.
अगदी लहानपणापासून मला वाचनाची दांडगी आवड. लहान असताना चांदोबा वाचत असे. आठवीत असताना कराड नगर वाचनालयाचे सभासदत्व कार्ड वडिलांनी दिलं. आणि मोठा खजिनाच सापडला. बाबुराव अर्नाळकर ते सुहास शिरवळकर, पु .ल. ते व .पु , शिवाजी सामंत ते रणजित देसाई, व बा बोधे ते शंकर पाटील , मिरासदार ते राम नगरकर, चि व्ही जोशी, नेमाडे ते अरुण साधू यांची जवळ जवळ सर्व पुस्तके MBBS ला जाईपर्यंत वाचून झाली होती. पुढं कॉलेज जीवनात इंग्रजी साहित्य वाचायला लागलो.
शिक्षण पूर्ण झाले. नोकरी आणि व्यवसाय सुरू झाले. अशीच वीस वर्षे लोटली. वाचन चालूच होते, पण प्रमाण कमी झाले होते. त्यात स्मार्ट फोन आले आणि वाचनाची व्याख्याच बदलून गेली.
व्हाट्सअप्प / फेसबुक वरील पुस्तक प्रेमी, साहित्य विषयक ग्रुप्सना जॉईन झालो. सहज कुठंही वाचायला मिळू लागले. भरपूर लेखकांचे लेख वाचायला मिळू लागले.
तसं बघायला गेलं तर, स्थिरस्थावर झाल्यावर माझ्या मनात, आपणही काही तरी लिहावं असं सारखं वाटत होतं. तसा प्रयत्नही केला चारपाच वेळा. लिहिल्यावर एखाद्या तज्ज्ञांना लेख दाखवला तर, सूचनाच इतक्या यायच्या की , मी निराश होऊन लिखाण बंद व्हायचं. मग चार पाच महिन्यांनी परत काहीतरी लिहायचो. परत ये रे माझ्या मागल्या. आपल्याला लिहायला बिलकुल जमणार नाही असं वाटलं आणि तो विषयच सोडून दिला.
एके दिवशी, आमच्या मेडिकलच्या ग्रुपवर एकानं कळकळीने लिहिलं ' अरे नुसते पोस्ट फॉरवर्ड करू नका, स्वतः काही तरी लिहा हो '. झालं माझ्या मनानं उचल खाल्ली.
त्यात एका ग्रुपवर वि4 ग्रुपची लिंक आली. कुतूहलाने जॉईन झालो. पहिले पंधरा दिवस कोण काय आणि कसं लिहितयं याचं निरीक्षण करत होतो .काही दिवसांनी थोडी माहिती असलेला विषय आला. घाबरत घाबरत, थोडं फार लिहिलं आणि शेवटी ' माझं काही चुकलं असेल तर माफ करा ' अशी तळटीपही टाकली . लगेच या ग्रुपवरील काही लोकांनी धीर दिला आणि लेख चांगला आहे, असा अभिप्राय पण दिला. (त्यांचं परत एकदा आभार ). धीर दिला नसता तर , कदाचित माझं लिखाण बंद पडले असते. भित्या पोटी ब्रम्हराक्षस अशी माझ्या मनाची स्थिती होती. जवळपास सर्व भौतिक आकांक्षा पूर्ण झालेल्या होत्या. जीवन एका लयीत चाललेलं ( त्यावर मी पंधरा दिवसांपूर्वी ग्रुपवर लिहिलंय ). पुढच्याच आठवड्यात वैद्यकीय संबंधित विषय आला. मी मोठ्या उत्साहात लिहिलं पण. त्यालाही बऱ्यापैकी प्रोत्साहन मिळालं. काही दिवसांनी समलैंगिकता हा विषय आला. माहिती होतीच, पण चार दिवस त्या विषयावर अभ्यास केला. आणि लेख लिहिला. चार वेळा एडिट करून ग्रुपवर टाकला. त्यालाही अडमीन मंडळी आणि ग्रुप सदस्यांनी चांगला प्रतिसाद दिला. पुढं 'माझी विनोदी कथा'  हा विषय आला . विचार केला, आपण रोज इतके रुग्ण तपासतो , त्यावर काहीतरी विनोदी लिहावं. डोक्यात तोच विषय भुंगा घालायला लागला . ' पेशंट व्यक्ती आणि वल्ली असा लेख लिहिला . प्रतिसाद चांगला मिळाला. बऱ्याच सदस्यांनी वैयक्तिक मेसेज करून अभिनंदन केलं. तो लेख फेसबुकवर टाकला. माझ्या अपेक्षेपेक्षा फारच चांगला प्रतिसाद मिळाला. (त्याचे पुढे नऊ भाग फेसबुकवर टाकले, असो. )
(म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीसाठी योग जुळून यावा लागतो. )
माझा वि4 ग्रुप बरोबरचा सहवास जेमतेम सहा महिन्यांचा, पण वीस वर्षांत जे जमलं नाही ते या कालावधीत जमलं असं निदान मला तरी वाटते. सर्व श्रेय वि4 ग्रुपचं..
माझ्या लिखाणाची , भलं ते चांगलं असेल किंवा बोअर असेल, मला जे समाधान मिळालं त्याची किंमतच होउ शकत नाही , सुरुवात आपल्या वि 4
ग्रुपमुळं झाली यात शंकाच नाही.
मी ग्रुपच्या अडमीन मंडळी आणि सर्व सभासदांचे मनापासून आभार मानतो..
मनःपूर्वक धन्यवाद . 🙏🏻🙏🏻🙏🏻
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

करण बायस, जि. हिंगोली.
       आधीपासून वाचनाची आवड होती ,पण कधी लिहिण्याचा प्रयत्न केला नव्हता पण कधीतरी लिहायला सुरुवात करणार हे मनात चालू असायचं.
*🌱वि४🌿* ग्रुप चालू झाल्यानंतर काही २-४ दिवसांनी अक्षय ने मला ग्रुप मध्ये ऍड केले.पहिल्या आठवड्यातील विषय आलेले होते त्यापैकी *श्यामच्या आईने माझ्यातला श्याम असा घडविला* या विषयावर लिहायचं ठरवलं आणि माहिती गोळा करून माझे शब्द मांडण्याचा प्रयत्न केला. लेख टाकायचा शेवटचा दिवस होता पण मनात चालू होतं टाकावं की नाही लेख पुन्हा पुन्हा वाचला मित्रांना दाखवला आणि काही पॉसिटीव्ह फीडबॅक आला म्हणून टाकला लेख ग्रुपवर त्यातून बऱ्याच जणांनी चांगला प्रतिसाद दिला.
काही दिवसांनी ग्रुपवर थोडा गोंधळ होत होता ,मी एक मेसेज टाकला “ग्रुप बंद करा” म्हणून 😜 (मला ग्रुप लिंक म्हणायचं होत पण घाईत लिंक लिहायचं विसरलो) ,मला ग्रुप मधून रेमोव करण्यात आलं पण मी माझ्या अडमीन मित्र अक्षय ला सांगितलं मग पुन्हा ऍड झालो .
त्यांनतर ग्रुप साठी ब्लॉग बनवण्याची संधी मिळाली, मी पूर्वी कधीही ब्लॉग बनवला नव्हता आणि मला ते जमत पण नसे, ग्रुप वर मेसेज आला होता ब्लॉग बनवण्यासाठी कोणाची तयारी असेल तर पर्सनली मेसेज करा आणि मी बनवण्यासाठी तयार झालो मला थोडा वेळ देण्यात आला एखादी पोस्ट एडिट करून दाखवायला मी ते करून दाखवलं आणि ९-१० महिन्यापासून विचार अडमीन टीम मध्ये ब्लॉगर म्हणून मला योगदान करण्याची संधी मिळाली,काही काळसाठी पूर्ण ब्लॉगची जबाबदारी आल्यामुळे मला ब्लॉग बद्दल आणखी शिकता आलं.
ग्रुपच्या अडमीन टीम आणि सर्व मेंबर्सचे धन्यवाद 🙏ग्रुप कडून खुप काही शिकता आलं आणि ग्रुपला भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. सर्व मेंबर्सनी ग्रुपवर थोडं का होईना पण लिहीत राहावं आणि आपले विचार इतरांपर्यंत पोहोचवावे.🙏🙏
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

अर्जुन बर्गे,अहमदनगर.
      सर्वप्रथम मी या ग्रुप चा आभारी आहे।।।👏👏
मला अवांतर वाचनाची पहिल्यापासून एवढी आवड नाही ।।।पण पहिल्यांदा हा ग्रुप जॉईन केला तेव्हा यातील प्रत्येक लेख जेव्हा वाचत गेलो त्यातून समजत गेले अवांतर वाचनात किती ताकद असते।।।आज प्रत्येक गोष्टीवर ठाम मत मला या ग्रुप मूळे मांडायला शिकलो।।।।
     या ग्रुप मुळे मी लिहायला शिकलो।।।।।🙏🙏
ज्या वेळेस एखादा लेख ग्रुप वर एखादा लेख येतो तेव्हा लेखकाची विचार करण्याची क्षमताच खरच कुतूहल वाटत🤔।।।प्रत्येक दृष्टीने त्या लेखसंदर्भात पोसिटीव्ह,,, निगेटिव्ह सगळ्या गोष्टींना विचार करून लेख लिहीत असतो🤔🤔।।।
माझं अवांतर वाचन कमी असल्यामुळं शब्द संग्रह जास्त नाही पण विचार ग्रुप मध्ये जॉईन झाल्यापासून तो नक्कीच खूप मोठा वाढलाय।।।।😊😊
    मला माझे मित्र बऱ्याच वेळेस विचारतात की तुझ्यात अचानक एवढा कसा बदल झाला की प्रत्येक गोष्टीवर आपल ठाम मत मांडतोय।प्रत्येक गोष्टीवर स्वतःचे विचार व्यक्त होतायत।।।👊👊।।।
तर मी त्यांना एकच म्हणतो माझ्याकडं विचार आहे।।।त्याने माझ्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवलाय।।। आणि आयुष्याच्या प्रत्येक turning पॉईंट ला तो माझ्या सोबत असेल।।।।।
       आणि खरच सांगतो तुमच्या विचाराने माणूस प्रगल्भ बनतो👏👏।।।ज्याच्या कडे विचार करण्याची क्षमता आहे तो व्यक्ती आयुष्यात येणाऱ्या कोणत्याच गोष्टीपासून पळ काढत नाही👊👊।।।।प्रत्येक गोष्टीला भिडून त्यातून मार्ग काढत असतो।।।।🎯🎯
      माझ्या विचार करण्याला विचार ग्रुप पासून सुरुवात झाली😊हे माझ्या आयुष्यातील खूप मोठं आचिवमेंट आहे👏👏।।।।
     मी आभारी आहे ग्रुप मधील सदस्यांचा।अडमीन मंडळींचा।।।।

Thanks🙏🙏🙏
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

दत्तात्रय विश्वनाथ डोईफोडे, वाशिम.
        प्रवास शब्द आजवर सर्वांनी ऐकला, अनुभव ला आहे असा एकही व्यक्ती नसेल जो कोणताही प्रकारचा प्रवास केला नाही, तसाच मीही आहे बराच प्रवास केला तो विविध प्रकारचा बरेच अनुभवही आलेत पण "विचार" ग्रुप बरोबरचा आजवरचा प्रवास नेत्रदीपक नाही पण शुरवात तर झाली आहेच आणि पुढे बराच  प्रवास बाकीही असेल... असो.
       मी ह्या ग्रुप मध्ये आलो ते माझ्या खोलिमित्र सीताराम पवार साहेब यांच्या शिफाशीनुसार आणि पाहिले काही दिवस बघितलं या ग्रुप मध्ये काय विचार चालतात सुरवातीला काही आवडीचे विषय आले वेळ मिळत असल्याने काही लेखही लिहिले, सॉरी काही लेख नव्हे ते आता काही दिवसा पूर्वी pdf स्वरूपात वाचले तर ते ब्लॉग, लेख तर नवतेच ते फक्त गद्य उतारे होते असे जाणवले.
      मध्ये काही दिवस नोकरी च्या शोधात असताना ती मिळाली आणि सवतःला त्यात गुरफटून घेतलं वेळच मिळत नाही असं व्हायला लागले कारण खाजगी नोकरी म्हणजे...समजलात असाल...
     मागीलच आठवड्यात सौदागर सर चा एक प्रेमळ संदेश आला सतत विचार शाळेत गैरहजर राहिल्यास remove केले जाईल खडबडून माफी मागत मागील आठवड्यात लेख लिहिला आणि येथून पुढेही लिहू इच्छित आहे...
      जी संधी विचार ग्रुप ने दिली त्या साठी मी या ग्रुप चा ऋणी तर आहेच आणि हो हा प्रवास मला शेवटपर्यंत अनुभवायचं आहे...अशीच साथ आणि प्रेमाची अपेक्षा...

धन्यवाद V4!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

R. सागर,सांगली.
    सर्वप्रथम आपला *वि४* समूह 1 वर्षाचा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण करतोय त्याबद्दल समूहाचे संकल्पक-संस्थापक सौदागर काळे सर, संपूर्ण admin टीम आणि सर्व सदस्यांचं अभिनंदन व आभार..
      माझ्याबाबतीत बोलायचं तर मी वि४ समूहाला जोडलो गेलो साधारणपणे गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये. त्यावेळी समूहाचा चौथा किंवा पाचवा आठवडा होता. नोकरीला असल्यामुळे घरापासून दूर होतो. दिवसभराच्या कामानंतर संध्याकाळी निवांत वेळ असायचा. लॅपटॉप घरी ठेवलेला. त्यामुळे मोबाईल सोडला तर करमणुकीचं साधन असं काही नव्हतंच. त्यामुळे जास्तीत जास्त वेळ मोबाईलवर ऑनलाईन राहायची सवय लागलेली. अशातच एके दिवशी वि४ समूहाची माहिती आणि सोबत सौदागर सरांचा नंबर मिळाला. त्यावर संपर्क करून समूहामध्ये सामील झालो आणि तिथून सुरू झाला वि४ समूहासोबतचा माझा प्रवास..
    मला लहानपणापासून वाचनाची आवड. मी 5वीला असताना पहिल्यांदा एक कादंबरी वाचायला घेतलेली. तिथून कॉलेज पूर्ण होईपर्यंत तो छंद जोपासला. जे मिळेल ते वाचायचो. त्यातून वेगवेगळी माहिती मिळत राहिली. विविध माध्यमातून सातत्याने आपल्या लेखणीची छाप पाडणारे आमचे लेखक-कवी-पत्रकार मित्र संदीपदादा असोत, सीमेवर पहारा करतानासुद्धा मिळेल त्या वेळेत वाचन आणि लेखनाची आवड जोपासणारा आमचा मित्र युवराजदादा असो, साधारण वर्षभर रेल्वेप्रवासात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणारे आमचे कथालेखक मित्र मानेसर असतील, शिवाजी विद्यापीठामध्ये शिक्षण घेत असताना भेटलेले सतीश सरांसारखे पत्रकारितेचा अभ्यास करणारे मित्र असतील या सगळ्यांच्या सहवासात वाचनाची आवड जोपासता आली. पण तरीही एखाद्या विषयावर लिहायचं धाडस कधी झालंच नव्हतं.
    वि४ समूहात सामील झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात लिहायचा प्रयत्न केला. लेखनाचा कुठलाच पूर्वानुभव नसताना लिहिलेली पहिली पोस्ट समूहावर टाकली. विशेष म्हणजे मी जे काही लिहिलं ते admin टीम-सदस्यांनी समजून घेत मला प्रोत्साहन दिलं. त्यामुळं लिहायचा उत्साह वाढला. त्यानंतरचे काही आठवडे प्रत्येक वेळी लिहायचा प्रयत्न केला. पुढे विविध कारणांमुळे लिखाणात सातत्य राखता आलं नाही. पण लिखाणात सातत्य नसलं तरी कमीत-कमी सदस्यांनी पोस्ट केलेले त्यांचे लेख तरी कधी थेट समूहावर तर कधी एकत्रितपणे ब्लॉगवर वाचत असतो. त्यातून बऱ्याच गोष्टींबद्दल माहिती मिळत असते. कधी काही विषयांबद्दलचे समज-गैरसमज दूर होतात. त्यामुळं खूप छान वाटतं.
     मागच्या आठवड्यापासून ठरवलंय प्रत्येक आठवड्यात एका तरी विषयावर व्यक्त व्हायचं. कितपत शक्य होईल माहीत नाही. पण प्रयत्न सुरूच राहील. त्यासाठी आतापर्यंत पुरेशी संधी मिळत राहिली. सर्वांनी विश्वास दाखवला. यापुढेही आपल्या सर्वांची साथ मिळत राहील हीच अपेक्षा.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


किशोर शेळके,लोणंद. जिल्हा सातारा.
         मी आणि माझी लेखणी  याविषयी काही मांडायचे झाले, तर दूरवर काही संबंध नसलेली लेखणी आज माझी तहान, भूक अन् झोपही घेऊन गेलीय. अगदी चार महिन्यापूर्वीचा 'वि४' केला, तर लिहायला आजिबातच आवडत नव्हतं. आवडत नव्हतं म्हणण्यापेक्षा तसं कारणच नव्हतं. कारण मी माझ्या दैनंदिन जीवनात भरपूर मोकळा असलेला वेळ, आणि महागडा मोबाईल आणि त्यातिल न संपणारा नेटपॅक हे सगळं रमी सर्कल आणि कॅन्डी क्रश खेळण्यातच खर्च करत होतो. माझे व्हाट्सअॅप गुड माॅर्निंग, गूड नाईट, एखादा जोक फाॅरवर्ड करणे, किंवा एखादा व्हिडिओ डाऊनलोड करून घेणे, यापलिकडे वापरलेच नाही.
        मानव हा सृजनशील प्राणी आहे. आपापल्या बुद्ध्यांकाच्या जोरावर आपली वैचारिक पातळी ठेवतो. आपली वैचारिक पातळी वाढवण्याची ताकद प्रत्येकात आहे, फक्त प्रखर इच्छाशक्तीची गरज आहे. कहीतरी नवीन शिकण्याची जिद्द, आणि त्यासाठी मिळालेली संधी, या दोन गोष्टी एखाद्या व्यक्तीचे ध्येय ठरविण्यासाठी नव्हे तर ते गाठण्यासाठी पुष्कळ आहेत.
        मला कविता करायला आवडत होत्या. सहा ते सात वर्षांपुर्वी महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षी एका मुलीसाठी मी पाच सहा कविता केल्या, साहजिकच त्या प्रेमकविता होत्या. त्या मी माझ्या मित्रांना वाचून दाखवल्या. मित्रांनी कवितेची समीक्षा करायची ठेऊन मला वेड्यात काढण्याचा प्रयत्न केला. वाचक मित्रांनो, आपल्या कलेला जर योग्य ती दाद मिळाली नाही ना तर त्या कलेचा आपल्यालाच खूप राग येतो. वाटते की ऊगीचच पडलो या फंदात. मलाही तसंच वाटलं. आणि माझी लेखणी उघडन्याआधीच म्यान केली.
        आपल्या जिवनाचा मार्ग बदलून टाकणारी गोष्ट म्हणजे आपल्याला मिळणारं प्रोत्साहन. आणि नेमकं तेच मला मिळालं आपल्या 'वि४' ग्रुप वर. मी इथं आलो कसा हे महत्त्वाचे नाहीच आहे, पण मी इथं आल्यावर माझ्यात जे लक्षणीय बदल झाले, हे खूप महत्वाचं आहे, कारण इथे आल्यानंतर मला माझे 'वि४' मांडण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ मिळणार होतं. इथे मला ते प्रोत्साहन मिळणार होतं, ज्याची गरज मला सहा वर्षांपुर्वीच होती. इथे मला तुमच्या सगळ्यांचं प्रेम मिळणार होते. इथे मला माझ्या चूकीला समज आणि चांगल्या कामाला शबासकी मिळणार होती. इथे मला माझी दिशा मिळणार होती, माझी लेखणी मिळणार होती.

संगतीत 'वि४'च्या, मी असा आलो होतो
घेऊन माझे हाती, मी भविष्य आलो होतो

        साधारणपणे मला 'वि४' या समूहाला जोडून आठ ते नऊ आठवडे ही नसतील झाले, पण असं वाटतं या परिवारातील लोकांचे अन् माझे मागील जन्माचे काहीतरी ॠणानुबंध असावेत. या समूहातील प्रत्येक व्यक्ती मला सखा असल्याची जाणीव होते. प्रत्येक व्यक्ती मला आपलीच वाटते. या स्वार्थी जगतात अगदी निस्वार्थी भावनेने काम करणाय्रा व्यक्तींच्या परिवारात माझा सहभाग झाला, म्हणजे नक्कीच मी मागील जन्मी काहीतरी चांगलं काम केलं असणार आहे. व्यक्तीशः नाव घेण्यापेक्षा समूहातील प्रत्येक व्यक्ती तेवढ्याच आपुलकीने आणि जिद्दीने आपले 'वि४' जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करतो आहे. आज या समूहाला एक वर्ष पूर्ण होत असेल तरी ज्यावेळी या समूहाची सुरूवात झाली, त्याचवेळी हा समूह कौतुकास पात्र ठरलेला आहे. यामधील कुठल्याही व्यक्तीला कोणत्याही फळाची अपेक्षा नाही. आपले 'वि४' प्रेरीत करून समाज जागृतीचे काम करणारी ही समाजसेवक मंडळी. समाजातील चांगल्या गोष्टी बाजूला आणि वाईट गोष्टी बाजूला करण्यासाठी सतत धडपडणारी लोकं. म्हणजे काय तर यांच्या सान्निध्यात येणाय्रा दगडाचं सोनं करणारा हा परीस.

 समाजकंटकांचे घाव थोपविण्या, पुन्हा लेखणीच धावली.
करण्या सृष्टीचे रक्षण, आहे 'वि४'ची सावली...

         या समुहाचा भूतकाळ मी पाहिला नाही. पण भविष्यात या समुहाचं कार्य समाजाला अजून चांगल्या मार्गावर घेऊन जाईल, यात तिळमात्र शंका नाही.

         आणि मला सामावून घेऊन, एक व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल मी 'वि४' समुहाच्या अॅडमीन टिमचा शतशः ॠणी....
~~~~~~~~~~~~~~~~~~

सौदागर काळे, पंढरपूर.
         *मा* झ्या🌱वि४🌿ग्रुपसोबत खूप आठवणी जोडल्या आहेत.हा ग्रुप मी व माझ्या साथीदारांनी का काढला असेल?त्याचा खरंच किती जणांना फायदा झाला ?तो चालू करण्याचा आपला काय स्वार्थ?आपण स्मार्ट फोन हाती येताच व्हॉट्सअपवर ग्रुप वर ग्रुप निर्माण करावे अन त्या ग्रुपने बेवारस अपत्य असल्यासारखं भटकत राहावं. तसं आपल्याही ग्रुपचे होईल का ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे एक वर्ष संपताना हाती येत आहेत.ते सारे सकारात्मक आहेत म्हणून खूप भारी वाटत आहे.
     हा ग्रुप निर्माण कसा झाला.त्याची थोडी माहिती देतो.2016 आणि 2017 असे दोन वर्षे लोकसत्ता वर्तमानपत्राने वरिष्ठ महाविद्यालयीन पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ब्लॉग बेंचर्स ही स्पर्धा घेतली होती.ती आता बंद झाली.त्यात प्रत्येक आठवड्यातील एक संपादकीय निवडले जायचे अन पुढच्या आठवड्यापर्यंत त्याच्यावर विचार व्यक्त करणाऱ्या तरुणांकडून ब्लॉग मागितले जायचे.असे दोनदा मी त्या स्पर्धेचा विजेता ठरलो. तेव्हा मनात यायचे प्रत्येक आठवड्याचे ब्लॉग बेंचर्स विजेते यांचे व्हॉट्सअप क्रमांक एकत्र करून एक ग्रुप तयार करावा.त्यावर विचार जागर करावा.पण ते शक्य झाले नाही.पण जे माझ्यासारखे लिहिण्यासाठी धडपडत होते,वर्तमानपत्रे त्यांच्या मतांना दुर्लक्ष करत होते,काहीजण आपले मोडकेतोडके लिखाण करत असत पण ते  समाज माध्यमावर मांडत नसत, काहीजण फेसबुक पोस्ट टाकत पण व्हॉट्सअपचा वापर लिखाणासाठी करत नसत.म्हणून ठरवलं . लोकसत्तावाले आठवड्याला एक संपादकीय द्यायचे तसे आपण व्हॉट्सअपवर विषय देऊ.ते आपण आपल्या निर्माण केलेल्या ब्लॉगवर प्रसिद्ध करू.ते ब्लॉग बेंचर्स तयार करत होते तर आपण कमीतकमी जागरूक,संवेदनशील तरुण-नागरिक व्हॉट्सअप विद्यापीठातून बाहेर येताना पाहू.ही संकल्पना मी माझे मित्र अक्षय पतंगे आणि वैशाली सावित्री यांच्यापुढे मांडली.त्यांनी तेव्हा साथ दिली अन 🌱वि४🌿नावाचा नियमाच्या अधिन चालणारा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार झाला.
     "श्यामच्या आईने माझ्यातला श्याम असा घडविला.."असा विषय देऊन ग्रुपचा प्रारंभ केला.पहिल्याच विषयाला भरभरून प्रतिसाद मिळाला.विषयाची संख्या 1 वरून 3 पर्यंत नेली.तोपर्यंत अनिल गोडबोले आमच्या ग्रुपचे आधारस्तंभ झाले.आजतागायत आहे. पण ब्लॉग मात्र तीन -तीन विषयाचे निर्माण करणे मला झेपाणेसे झाले.अशावेळी ब्लॉग करण्यासाठी प्रविण भिकाले,करण बायस ,पवन खरात,नरेश बदनाळे जोडले गेले.त्याच बरोबर बालाजी सानप,मयुरी देवकर,जयश्री,संगीता देशमुख,जयंत जाधव,सीमाली भाटकर विषयाचे संकलन आणि ग्रुप नियंत्रण साठी जोडले गेले.काही महिन्यांपूर्वी शिरीष उमरे अर्थात शिरिषदा आम्हांला जोडले गेले अन ग्रुप नियंत्रण ,संकलन,फेसबुक पेज,तसेच काही काळ शांत व संथ गतीने चाललेल्या ग्रुपला ऊर्जा त्यांनी दिली.ते आपण पाहतच आहात.यातील काही ऍडमिन काही काळापुरते थांबले.काहींनी वेळेअभावी जबाबदारी पार पाडताना कसरत होते म्हणून ऍडमिन पद रिकामे केले.आम्ही ऍडमिन फक्त टीमपुरते उरलो नाही.तर ते एक आमचे कधीही एकमेकांना न भेटलेले पण जिव्हाळ्याचे, वादविवादाचे कुटुंब झाले आहे.ग्रुप नियंत्रण करताना आपल्याला दोघे-तिघे दिसतात.पण पडद्यामागे खुपजण निस्वार्थ भावनेने,आपल्या कामातून वेळ काढत ग्रुप चालवत आहेत.ही सारी माणसं आपली आहेत.म्हणून आभार नाही.आम्ही एकमेकांच्या ऋणात आहोत.
        *४-वि* म्हणजे *1.विद्यार्थी 2.विवेक 3.विनय 4.विरजा* हे चार मिळवून विचार(वि४) तयार केला.याचे नावापुरते ग्रुपला स्पष्टीकरण देण्याच्या भानगडीत आम्ही कधीच पडलो नाही.नकळतपणे ते सत्यात कसे आणता येईल याचा प्रयत्न ठेवला.काही मित्र मला म्हणाले ,तुम्ही या ग्रुपच्या माध्यमातून विचाराचा जागर,प्रहार करता जरा कृती पण करा.आपण सर्व जिथे-जिथे आहोत तिथे कार्य  करत आहोत.त्याच्यात सत्य,प्रामाणिकपणा भरलेला असेल तर अजून जगाला दाखवायचे म्हणून काहीतरी करायचे .हे बरोबर नाही.पण येथे होणाऱ्या विषयाचे विचार वाचून काहींनी कृती सुद्धा केली.मला वाटतं ग्रुपचे सदस्य सिद्धेश्वर गाडे हे असतील कदाचित.त्यांनी मराठी शाळेवरच्या एक विषयाचे विचार वाचून,त्यातून बोध घेऊन गावच्या शाळेतील सुधारणेसाठी पाठपुरावा केला अन त्यात त्यांना यशही मिळाले.असं त्यांनी मला अभिप्राय दिला होता.असे चांगले कृतिशील अनुभव आले.तर काही नकारात्मक बाबीसुध्दा घडल्या.आमच्या टीममधील काही ऍडमिन तरुणींना चुकीचे मॅसेज टाकुन त्रास देण्याचा प्रयत्न केला.आम्ही वेळीच ते रोखण्याचाही प्रयत्न केला.एक जणाला आम्ही ग्रुपचे नियम मोडले म्हणून रिमोव्ह केले तर त्याने रिमोव्ह का केले म्हणून मारण्याची धमकी दिली.टीमच्या व्यक्तिरिक्त कोणाला हे सांगितले नाही.तसेच पुरोगामी संबंधित,सरकार विरोधातातील काही पोस्ट फेसबुकपेजवरून आपोआप डिलीट केल्या गेल्या जात होत्या.काही असे अनुभव आहेत.जे व्हॉट्सअप सारख्या ग्रुपसंबंधी अनुभवायला मिळतील. असा एवढा विचारही केला नव्हता.
  हा ग्रुप टिकला,टिकवला त्याचे कारण एकच नियम.ते मोडण्यासाठी आम्ही बनवलेच नाहीत.ग्रुपमध्ये काहीही विषयांतर टाकले की आम्ही सरळ रिमोव्ह करत आलो.कित्येक वेळा खूप जवळचा मित्र आहे म्हणून कधीच सवलत दिली नाही.नियमांमध्ये मराठी भाषा इंग्रजी लिपीत न लिहिता देवनागरी लिपीत लिहावी ,असा अट्टहास केला.आपोआप संबंधित सदस्यांकडून मराठी भाषेचे संवर्धन होऊ लागले.अन त्यांचे सोशल मीडियावर मराठी लिखाणही सुधारू लागले.लिखाण न करणाऱ्याला रिमोव्ह करू असा नियम बनवला आहे .पण हाच नियम फक्त खूपदा काटेकोर पाळला नाही.पण यातील कुणी चुकीचा मॅसेज टाकला की रिमोव्ह करत होतो.भावनिकतेपेक्षा कर्तव्यनिष्ठतेला आम्ही प्राधान्य देत राहिलो.त्यामुळे काही जवळच्या व्यक्ती नाराजही झाल्या.पण त्यांनी वेळोवेळी समजून घेतले.
       काही महिन्यांपूर्वी मी 🌱वि४🌿ग्रुपला कामामुळे वेळ देत  नव्हतो.तर खूपवेळा आपण आता ग्रुप चालवण्याचे थांबवावे असा विचार इतर ऍडमिनना मी सांगितला.एकदा तर सदस्यांचा प्रतिसाद कमी झाल्याने 🌱वि४🌿 हे एक मढे झाले आहे.आपण कुठपर्यंत त्याचे राखण करायचे.असा शब्दप्रयोग केला.ऍडमिन टीमने समजूत काढून 🌱वि४🌿ची गाडी नीटपणे पुन्हा रुळावर आणली.आताही आमच्यातल्या खुपजणांना वेळ नसतो पण नव्या -जुन्या लेखकांचे अधिक चांगले लिखाण वाचायला मिळेल.अडकत-अडकत लिखाण करणाऱ्याचे व्यासपीठ बंद पडेल.जोडली गेलेली सर्व सदस्य-ऍडमिन पुन्हा विखुरली जातील.या विचाराने🌱वि४🌿ग्रुप आम्हांला वेळ काढण्यासाठी प्रेरणा देत राहतो.
   आमच्या टीममध्ये सर्व पक्षाचे,विचारधारेचे लोक आहेत.पण विषय निवडताना सर्वानी कधीच हाच विषय घ्या किंवा ग्रुपवर तो लादण्याचा प्रयत्न केला नाही.सर्व काही लोकशाही मार्गाने काम करत आहोत.आता विषय निवड ग्रुपवरच्या सदस्यांकडे सोपविले आहे.त्यामुळे इथे एक थोडे प्रत्येक आठवड्याला कोणते विषय द्यायचे हे टेंशन कमी झाले.
  आता पुढे काय?असा प्रश्न पडतो तेव्हा विचारबरोबर ग्रुपने कृती करावी का!असं वाटतं.पण आमच्यातले एकही एका ठिकाणचे नाही .प्रत्येकजण वेगवेगळ्या जिल्ह्यातले आहे.तर काहीजण आमच्यातले कामानिमित्त राज्याबाहेर आहेत.सर्व एकत्र येण्याची तारीख अद्यापतरी जमवता आली नाही.जे ऑनलाइन शक्य आहे ते करतो आहोत.एक मराठी साहित्यातील परंपरा म्हणून ऑनलाइन दिवाळी अंकाची भर टाकत आहोत .वेळेअभावी ठराविक सदस्यांकडून लेख घेत आहोत.ते कितपत यशस्वी ठरेल.हे आपण जाणालाच.
  ग्रुपमध्ये सर्व क्षेत्रातील लोक आहेत.त्यात विध्यार्थी, शिक्षक, कामगार, लेखक,सामाजिक संस्थाचालक, सरकारी अधिकारी,पत्रकार,डॉक्टर,विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, असे विविध क्षेत्रातले मिश्रण असलेली भेळ तयार झाली आहे.या साहित्यरूपी भेळीचा आस्वाद लिहायला,मत व्यक्त करणाऱ्या महाराष्ट्रातील युवक-युवतींना होत राहावा.पुन्हा एकदा ग्रुपमधील सर्व सदस्यांचे व्हॉट्सअपचा विधायक वापर करण्यासाठी खारीचा वाटा उचलला त्याबद्दल खूप खूप आभार...तुमच्याशिवाय हा प्रवास अपूर्णच राहिला असता...

 *ही वाट अशीच दूर जावी न संपणाऱ्या प्रवासासाठी.....*
 ~~~~~~~~~~~~~~~~~~~

 प्रमोद पांचाळ धर्मापुरी ता परळी  जिल्हा बीड
       वि४ ह्या ग्रुप वर मला येऊन खुप दिवस झाले नाहीत तरी पण मला जे अनुभव आले आहेत ते मी सांगेल
वि४ हा ग्रुप काही साध्या वेक्तिनि भरलेला नाही  इथे एका पेक्षा एक विद्वान मंडळी आहे व आपले विचार ते आशे मांडतात की त्या विचारावर त्या वाचकाने काहीना काही तरी विचार करावा म्हणण्या पेक्षा त्याने विचार करावाच लागेल  आशे विचार असतात
     सर्व मंडळी चे मी आभार मानतो कारण माझी वाचनाची सवय मोडली होती पण ह्या ग्रुप च्या साहाय्याने मला परत वाचनाची सवय लागली आहे
     मी रोज रात्री 8:30 ते सरासरी 10 पर्यंत आपले सर्वाचे विचार  वाचतो मला आपले विचार वाचनाची ओढ लागली आहे मी लिहिण्या पेक्षा वाचनातच मला रस वाढत जात आहे पण त्याच बरोबर लिखान करायची इच्छा पण होत आहे
       मी आभारी आहे वि४ ग्रुपचा मला आपण आपल्या बरोबर आणल्या बदल

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


अनिल गोडबोले,सोलापूर.
     विचार विषयी लेखन करताना फार विचार करावा लागत नाही. पण तरीही आठवत होतो.. कधी, कुठून सुरुवात झाली... आणि मला सुरुवातच आठवेना.. एवढा मी एकरूप झालो.
    तर गम्मत अशी आहे की.. लेखन करावं असं मला वाटत होत. मी कॉलेजला असताना कविता करायला आवडायचं(माझ्या कविता बाकीच्यांना सोडा.. जिच्यासाठी केल्या होत्या तिला ही सांगणं झालं नाही.. हा भाग वेगळा)..
पण लिखाण करावं हे मनात होत. फेसबुक वर ग्रुपवर लिहीत होतो. सोशल वर्कर म्हणून किंवा सोशल वर्क या विषयाचा शिक्षक म्हणून मला सामाजिक विषयावर लिखाण करावयाचे होते. पण तसा प्रसंग फार काही येत नव्हता.

माझा एक विद्यार्थी आहे. त्याने 'युवाशक्ती' नावाचा एक ग्रुप तयार केला आहे, आणि मला त्या ग्रुपमध्ये त्याने घेतलं होतं. त्या ग्रुपवर सौदागर यांची विचार ग्रुपची लिंक आली होती. लिखाण करण्याची हौस होतीच.. लगेच जॉईन झालो.

वेळोवेळी लेख लिहीत गेलो.. मला जसे जमेल तसे.. विषय सुचवत गेलो.. मला अडमिंन टीम वर घेण्यात आले व मी अडमिंन म्हणून गोंधळ घालू लागलो.

ते आधारस्तंभ वगैरे म्हणतात.. पण मला मात्र तसे वाटत नाही. मला खर तर या सगळ्याच कौतुक वाटत. सौदागरजी ब्लॉग लिहितात आणि त्यातून प्रेरणा घेऊन हे सर्व सुरू झाले..

कौतुक खरच खूप आहे कारण मराठी साहित्य आणि मराठी माणसाचे विचार याला बाजारात काहीही किंमत नसताना असा विचार करून असा ग्रुप तयार करणे, नियम करणे, संकलन करणे, ब्लॉग तयार करणे, विविध विषयावर चर्चा करणे.. अशी बरीच काम ही टीम करत आहे.

मला मात्र यातील काहीच येत नाही, हे मी अगदी मनापासून मान्य करतो. एकही व्यक्ती मला वैयक्तिक भेटलेला नाही. प्रवीण जी मात्र मला बोलवत असतात सोलापूरला आल्यावर... पण मलाच वेळ मिळत नाही..

एकदा भेटू सगळ्यांना.. तेवढाच माझ्या सारख्या पुंडलिकाला पांडुरंग भेटल्यासारखे वाटेल..

एकमेकांना न भेटता मोबाईल च्या माध्यमातून लोकांना व्यक्त करायला भाग पाडणं.. ही साधी गोष्ट नाही. मी वारंवार सांगतो त्या प्रमाणे... यातील एकही व्यक्ती एक रुपया देखील पगार न घेता अतिशय गुणवत्ता पूर्ण काम करत असतात..

मूळ याच श्रेय सौदागर जी याना असलं तरी बाकीचे फॅमिली मेम्बर भेटले. नरेशजी, पवनजी, करणजी ब्लॉग निर्मितीच काम करत असतात.. फार तांत्रिक आणि गुंतागुंतीचे काम आहे ते..!

पण सर्वजण लीलया ते पार पाडतात. वैशाली जी , मयुरीजी, संगीता जी आणि सीमाली जी यांचे योगदान देखील वाखाणण्याजोगे आहे. महिलांची संख्या अडमिंन टीम मध्ये कमी असली तरी कामामध्ये मात्र कोणीही कमी नाही.

मला आपला.. एक आनंद फुकटचा.. वर्गात मॉनिटर असल्यासारखा सगळ्यांना नियम शिकवत असतो. मुळात 'गोडबोले' असल्यामुळे चांगलं काही पटकन नाही दिसलं।तरी चुकीच काहीतरी पटकन दिसत (शिक्षक असण्याचे तोटे)

पण एक मात्र आहे. जे काही आहे ते प्रामाणिकपणे लिहिण्याचा प्रयत्न करतो. वाईट बरे अनुभव आणि समाज कार्यातील विचार मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

बाकी अडमिंन टीम मध्ये असलेले शिरिषजी यांच्या सोबत चर्चा करणे (म्हणजे चर्चा कमी आणि नियम दाखवणे जास्त अशी महत्त्वाची काम (😳🤣) मला असतात.

ग्रुपवर सर्वाना समभाळून घेणं ही तारेवरची कसरत असते. तरी पण माझ्या मुळे काही जणांना त्रास झाला असेल तर मनापासून त्यांची माफी मागतो.

वाचक आणि लेखक वाढवणे हा उद्देश हा ग्रुप पूर्ण करत आहे.. हा माझा।विश्वास आहे. मराठी भाषा ही नक्कीच अभिजात साहित्य निर्मिती करू शकते यावर माझा ठाम विश्वास आहे.

तरीदेखील.. आपल्याकडे काहीजण कॉपी पेस्ट करून लेख टाकतात तेव्हा खुप त्रास होतो.
करणं जी ना गुगल वर कळत ते..
शक्यतो सर्वांनी 4 च ओळी का होईना स्वतःच्या लिहाव्यात अशी सदिच्छा आहे.
ग्रुप नियंत्रक म्हणून काम करत असताना काही ठिकाणी 'गोडबोले'असून 'कडू' व्हावं लागतं. कारण नियंत्रकाची भूमिका ही तशीच असते..

शेवटी... मी लिहिताना अतिशय भावनिक होऊन लिहीत आहे.. कारण हे सर्व काही घडू शकत ते सर्व आपल्या सारख्या सदस्यांमुळे..
आपण आमचं वाचन विश्व आणि।विचार विश्व समृद्ध करत आहात. त्यामुळे सर्व सदस्यांना मनापासून मानाचा मुजरा करतो..

लवकरच दिवाळी अंक काढत आहोत. काही दिवसांनी इ साहित्य सारखी वेबसाईट काढू.. एकेदिवशी साहित्य संमेलन देखील घेऊ..(अध्यक्षपदासाठी भांडण देखील करू😁).. अजून काय होईल भविष्यात काही माहीत नाही.. पण हा ग्रुप मात्र चालू राहील याची काळजी नक्कीच घेऊ..

कोणाचाही नामोल्लेख राहिला असेल तर माझ्या विसरभोळ्या स्वभावाचा भाग म्हणून सोडून देणे....

पुनःश्च.. सर्वांचे आभार
धन्यवाद
🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************