विनोदाचे वावडे: सद्यस्थिती

🌱वि४🌿व्हॉट्सअप ग्रुप
आठवडा 48 वा   

विनोदाचे वावडे: सद्यस्थिती
     
रामेश्वर क्षीरसागर,पुणे
  ऑस्कर पुरस्कार सोहळा चालू होता. Jimmy Kimmel त्याचे निवेदन करत होता.  त्यावेळी ऑस्कर पुरस्कारासाठी एका समलिंगी संबंधावर आधारित चित्रपटाला मानांकन दिले गेले होते. त्याच्याच काही दिवस अगोदर समलिंगी संबंधांवर टीका करण्याचे धाडस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तसेच त्यांच्या उपराष्ट्राध्यक्ष यांनी केले होते. ज्यावेळेस या चित्रपटावर बोलण्याची वेळ आली तेंव्हा Jimmy Kimmel एकच वाक्य बोलतो ," मुळात असे चित्रपट आम्ही प्रेक्षकांना दाखवण्यासाठी बनवतच नाहीत तर असे चित्रपट आम्ही फक्त अमेरिकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना दाखवण्यासाठी बनवतो ." खरे तर हा एक विनोद होता, मात्र किती तरी मोठा अर्थ  विनोदात दडलेला होता. विनोदाचे काम फक्त एखाद्याला हसवणे असे नसते तर , त्यातून एक खूप मोठा अर्थ साध्या, सरळ भाषांतून समोरच्यापर्यंत पोहचवणे असा असतो.
  म्हणजे १९७५ ला आणीबाणी ची घोषणा केली गेली. या आणीबाणीचा विरोध करण्याचे काम मोठ्या प्रमाणात साहित्य वर्तुळातून केले गेले. मात्र, यात महत्वाची व्यक्ती होती ती म्हणजे " पु.ल. देशपांडे ". विनोदी माध्यमातून आणीबाणी वर, लेखकांच्या स्वातंत्र्यावर भाष्य करण्याचे काम पू.ल. नी या काळात केले. मग अत्र्यांनी याच शैलीचा वापर विधिमंडळात करताना एक वेगळा पायंडा पाडून दिला. विधिमंडळात एक हसते - खेळते वातावरण गंभीर विषय हाताळण्यासाठी पोषक बनवले...आणि त्यानंतर आपल्याकडील राजकारणी केवळ विनोदी च बोलायला लागले. ही परंपरा आजतागायत चालूच आहे.
     याच्या दुसऱ्या बाजूचा विचार केला तर आज बघितले तर समाज माध्यमांतील बहुतांशी विनोद हे स्त्री वरती, किंवा तिच्या कुठल्या तरी अवयावर  असल्याचे जाणवायला लागते. मोठ्या चवीने ते forward ही केले जातात. मला वाटते की, स्त्रीचे समाजातील स्थान, तिची प्रतिमा ढासाळण्यासाठी किंवा या व्यवस्थेत ती एक विनोद बनून राहण्यासाठी आज समाज माध्यमांतील हे विनोद मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतात ! विषय जरी विनोदाचा असला तरी, त्यातील नैतिकता पाळली जाणे फार महत्वाचे असते. सहज फुंकर मरून साध्य होणाऱ्या गोष्टीसाठी ' विनोद ' उत्तम माध्यम आहे मात्र, त्याने जर फक्त जखमाच केल्या जात असतील तर त्याचे ' वावडे ' वाटणे साहजिक आहे.
  खरे तर कुठल्याही संकल्पनेला अनेक पैलू असतात हे जर लक्षात घेतले तर विनोदाटून साध्य काय होते हे पाहणे महत्वाचे असते ! *कारण डुई* म्हणतो त्याप्रमाणे शेवटी *साध्य हेच साधनांना योग्य ठरवते* त्यामुळे विनोदातून आपल्याला साध्य काय करायचे आहे ते एकदा ठरवायला पाहिजे !
  धन्यवाद !!

शिरीष उमरे, नवी मुंबई
विनोद म्हणजे आपला इनोद हो दादा कोंडके वाला... अशोक मामा सराफ यांचा... लक्ष्मीकांत बेर्डेंचा... दीलीप प्रभावळकरांचा .... लांबलचक लीस्ट आहे... विनोदाच्या अफलातून टायमिंगसाठी व शब्द फेकीसाठी प्रसिद्ध आहेत हे सगळे. विनोद हा आपल्याला व्यंग, उपहास व तिरकसपणातुन ही हसवत आला आहे. खरे ना !!  

आता वावडे वर येऊ या...
शिक्षणमंत्री विनोद तावडे ह्यांचा विनोद वावडे ह्याच्याशी काहीही संबंध नाही पण सरकारी शाळेचे त्यांना काय वावडे होते काय माहीत .. हजारो शाळा बंद केल्या की हो त्यांनी !! ( उदाहरण देतादेता शाब्दिक चिमटा घेतला ना मी 😜) काही हसतील तर काहींना राग येइल...

पुर्वी पुलंच्या मिष्कील शैलीतले रेशमी चिमटे हसत हसत सहन करायचे राजकारणी ...
अत्रेंचे शालजोडीतले जोडे खाऊन ही ही मंडळी हसर्या चेहर्याची इस्तरी बिघडु द्यायची नाही.  बाळासाहेब ठाकरेंचे वाग्बाण म्हणजे पिस्तोलमधल्या गोळ्याच... त्यासाठी सुध्दा निधड्या छातीने ( बेशरमीचे बुलेट प्रुफ जॅकेट आतुन घालुन) सामोरे जाऊन वार पचवणारे लीडर आताशा राहीले नाहीत असे वाटायला लागले आहे. विनोद बुध्दी चे बुरुज ढासळायला लागलेत... आर के लक्ष्मण यांच्या कॉमन मॅनच्या एक्झीटनंतर तर जास्तच जाणवायला लागले...

पुर्वी सरदारजी वर खुप जोक यायचे...पण त्यांनी जॉलीपणा दाखवुन स्वत: वर हसुन धार बोथट करुन टाकली. मधात संताबंता प्रमाणे बाबुजी,  शक्तीमान, आलिया भट्ट, रजनीकांत वैगेरे वर भरपुर जोक झालेत पण ह्या सगळ्या कलाकारांनी सहजतेने दाद देऊन मॅच्युरिटी दाखवली.
मिमीक्री आर्टीस्ट ना पण अशीच दाद मिळायची...
शरद पवारांना मैद्याचे पोते म्हणणारे बाळ ठाकरे हे दोघे राजकीय विरोधक असले तरी जिवलग मित्र होते. इंदिरा व मनमोहनसिंग ह्याची गुंगी गुडीया व मौनीबाबा अशी टवाळी उडवल्या जाऊनही त्यांनी  खिलाडुवृत्ती दाखवली व संयम पाळला.

पण आता ती सहनशक्ती राजकारणी नेत्यांमध्ये कमी झालेली दिसते...
व्यंगचित्रकार, विनोदी स्तंभ लेखक व वक्ते ह्यांना राष्ट्रद्रोहाखाली अटक व्हायला लागलीय... विनोद सहन न झाल्यामुळे कोर्टात केस दाखल होउन राहील्यात. नुकतेच औरंगाबाद खंडपीठात न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे ..
खळाळुन हसुन सात मजली हास्याचे मजले चढवणारे आपण मराठी असे कसे आपली सांस्कृतीक परिपक्वता विसरलो ?



अनिल गोडबोले,सोलापूर
विनोद बुद्धी असा शब्दच मुळात असं सांगतो की विनोद करायला आणि समजायला बुद्धी लागते.

लोकांवर आणि त्यांच्या व्यंगावर शाब्दिक कोटी केली म्हणजे विनोद नव्हे.

शब्द आणि त्यांचं स्थान यावर विनोद निर्मिती होत असते.
आताच्या साहित्या मध्ये पु. ल.. त्यांच्यासारखं किंवा वपु, अत्रे यांच्या सारखा विनोद वाचनात येत नाहीत.
शंकर पाटील आणि द. मा. मिरासदार यांची लेखन शैली वेगळी होती.. परिस्थिती वर कोरडे ओढताना त्यांनी केलेलं बारकाईने निरीक्षण व वर्णन याला तोड नाही.
ढाल किंवा धिंड तसेच मिरासदार यांचं. वळण वाचून आपण हसलो मनात बारीकशी कळ उमटलेली असते.

आपल्या आयुषयात आनंद हा रस(भाव) खूप महत्त्वाचा आहे. आता देखील टेलिव्हिजन वर विनोदी मालिका खूप भाव खाऊन जातात.

सोशल मीडियावर सगळेच प्रकारचे विनोद चालतात. एखाद्याला खूप इगो असतो तेव्हा त्याला सहन होत नाही.

मस्करी आणि विनोद करताना समोरच्या व्यक्तीचा आदर कमी होता काम नये हे पु.ल यांनी पाळलेले अंतर बाकीच्यांनाही पाळता येईल का?

विनोदाची गरज आहे.. ओढून ताणून हसण्या पेक्षा खर खर मित्राच्या खांद्यावर हात ठेवून एखादा नॉन व्हेज जोक मारला की सगळं टेन्शन निघून जात.

पोट दुःखेस्तोवर आणि डोळ्यातून पाणी येई पर्यँत (हसून हसून मुरकुंड पडणे) आपण कधी हसलो होतो?.. हे आठवत असेल तर आपण अजून माणसात आहोत.

चला हवा येऊ द्या सारखा कार्यक्रम आपल्याला दाखवून देतो की विनोद निर्मिती हे देखील खायचे काम नाही

एकंदरीत इगो असेलेल्या माणसांना विनिदाचे वावडे असण्याची शक्यता आहे. पण विनोद नाकारण्याचे सामर्थ्य कोणाच्याही लिखाणात नाही हे सत्य आहे.

आणि महत्त्वाचं म्हणजे लोकांनी केलेले विनोद पचवायचे असतील तर.. स्वतःला स्वतःवर विनोद करता आला पाहिजे..
तेव्हा हासताय ना.. हसायलाच पाहिजे..!!!


अजय तळेकर,अहमदनगर
विनोद झोंबला म्हणून हिंसाचार झाला, एवढय़ाने विनोद हरत नाही. जगभरच्या हुकूमशहांना 🎯पुरून उरण्याची ताकद👆🏻💪🤙 विनोदात आहेच.*
 *एक विनोदामधे रडणाऱ्याना😭😭 हसवन्यातपत 😂😂😂ताकद आसते ,विनोद हे खुप प्रकारचे 🙆🏻‍♂असतात प्रत्येक व्यक्ती हा विनोद😉 करत असतोच आणि बाकी त्यावर प्रतिसाद पण देतच असतात*.
  *त्यामुळे कुणाला 😀विनोदाचे वावडे 😫 आहे असे तर म्हणताच नाही येणार*🎯

डॉ. विजयसिंह पाटील. MBBS.DA. कराड.
'समाजाला विनोदाचं वावडं आहे का ? ' हा प्रश्न माझ्या मनात भुंगा घालत होता.
आमचा सकाळी चालण्याचा ग्रुप आहे. चालून आलं की एका चहाच्या टपरी कम हॉटेल मध्ये बसून चहा पीत गप्पा मारायच्या असा आमचा रोजचा दिनक्रम.ग्रुप मध्ये सगळ्या प्रकारची, सगळ्या थरातील लोक आहेत  ...

मी आणि घारे दमून बाकड्यावर बसलो. अगोदरच प्रा. कावळे (यांचा वर्ण नावासारखा, पण कायम पांढरे शुभ्र कपड्यात असतात, अगदी सकाळच्या व्यायामात सुध्दा! )चहाचा घोट घेत कसल्यातरी विचारात पडलेले ,(ते कायम विचारातच पडलेले असतात.)
चहा येईतोपर्यंय मी माझ्या मनातला प्रश्न त्यांच्या दिशेनं भिरकावला.

' खामोश, मला विनोदाचं वावडं आहे म्हणता ? माझं विनोदाचं अंग अजून तुम्हाला दिसलं नाही ? ' असं म्हणून माझ्याकडे त्यांनी दया आणि तुच्छतापूर्वक दृष्टिक्षेप टाकला.. हे पहा ' कावळ्याने कितीही साबणाने अंग घासले तरी तो काही बगळा होत नाही' (ही घासून पुसून गुळगुळीत झालेली म्हण माझ्यावर बाणासारखी मारली.) असं म्हणत ख्या ख्या, खि खि करत हसत सुटले.( हास्यातून ,नुकत्याच खाल्लेल्या सुपारीचे कण आसमंतात भिरकावले गेले .)
तेव्हड्यात शेजारीच बसलेले घारे सर, कावळे सरांच्या कपड्यांकडे नजर टाकून हसत,' पण, कावळ्याने कितीही अंगाला चुना लावून घेतला , तरी तो  कावळाच रहातो, बगळा होत नाही. 'अशी कोटी केली .

कचकन ब्रेक दाबल्यावर जशी गाडी जाग्यावर थांबते, तसं, सरांचं तोंड आणि हसू गप्पदिशी बंद झालं. रागानं त्यांचा काळसर सावळा चेहरा, निळा जांभळा पडला.
यावर काय उत्तर द्यावे याचा सर विचार करत असताना, घारेंनी तंबाखूची चंची काढली.(सर स्वतः च्या खर्चाने कोणतंच व्यसन करत नाहीत).तंबाखू दर्शनाने त्यांचा राग मावळला. तंबाखूच्या आदान प्रदानात मूळ विषय बाजूला पडला.
मी परत प्रश्न उपस्थित केला.  'आम्हाला तर विनोदाचे वावडे नाही हे तुमच्या लक्षात आले असेलच ' असं गुळणी धरून सर बोलले..
तेव्हड्यात आबा काठीचा आवाज करत आले (या वयस्कर आजोबांची गडगंज जमीनआहे,  हॉटेल पण त्यांच्याच जागेत आहे. कमी बोलतात पण जे बोलतात ते मार्मिक. ) ' आमच्या विनोदचं नाव कशापायी काढलं ' असं मोठ्या आवाजात त्यांनी विचारले. तुमचा मुलगा विनोद यावर चर्चा नसून , लोकांची विनोद बुद्धी कमी झाली आहे का यावर चर्चा सुरू आहे असं समजावता समजावता, माझे नाकेनऊ आले.
' मंग इनोद म्हणा की,' असं मिशीला ताव देत ' त्याचं असं हाय की माणसानं सारखं हसलं पायजे, नाय तर काय बी उपेग नाय, आनि हसायला इनोद पायजेच '. यावर सगळ्यांनी माना डोलावल्या. मग पुढं ' आता म्या रोज इनोद , मजा  करत असतो, रानात कामाला आलेल्या माणसाबरोबर इनोदातनं बोलत असतो. एकादा गडी उगाच टंगळमंगळ करत असल तर, म्या म्हणतु ' असंच काम कर , मजी लवकर पोर हुईल' . सगळी बाया गडी खुसखूसायला लागतात. त्यो इतका लाजतु की, पटापट काम अवरतु ' इथं सगळ्या हॉटेल हश्यानं दुमदुमून जातं.

तेव्हड्यात आमचे अजून दोन मित्र हाश हुश्श करत आले. त्यातील एक कारखानदार घोलप, आणि शेडगे इंजिनिअर .
रुमालाने तोंड पुसत पुसत
घोलप साहेबांनी ' गुड मॉर्निंग गाईज , ( हे कायम इंग्लिश मिश्र मराठी बोलतात.).  'इतकं हसण्यासारखा काय टॉपिक चाललाय ?.' मी त्यांना टॉपिक सांगितला . ' नॉन सेन्स, आम्हाला विनोदाचं वावडं, आम्हाला ? जस्ट रबीश, जरा दम घेऊन ' अहो घरी आम्ही इतक्या चांगल्या इंग्लिश कॉमेडी सिरिअल्स बघतो की , जस्ट डोन्ट आस्क, आम्ही सगळे खो खो हसत असतो..' परत दम घेऊन, पुढं आलेल्या चहाचा घोट घेतात.
वीज कंपनीत साहेब असलेले शेडगे म्हणाले ' आपण बुवा, फक्त विनोदी साहित्य वाचतो, आणि ऑफिसमध्ये पण सगळ्यांना विनोदी पुस्तकं वाचायला सांगतो, मला तर विनोद फार आवडतो'.
तेव्हड्यात घारे म्हणाले ' साहेब, तुम्ही लोड शेडिंग चं वेळापत्रक जाहीर करता, पण लाईट इतक्या वेळा जाते की मला वाटते की तुम्ही नक्की लाईट कधी असेल याचं वेळापत्रक जाहीर करावं '..यावर हॉटेल मध्ये चांगलाच हशा पिकला. आणि साहेबांचा चेहरा चांगलाच पडला.

आत्तापर्यंत बराच वेळ कावळे सरांनी मौन धारण केलेलं होतं. (ते स्व:इश्चित मौन नसून, तंबाखू च्या रसाने तोंड भरलेलं आहे. इति. घारे .) कावळ्यांनी
' अहो लोड शेडिंग हे नाव, साहेबांच्या नावावरूनच पडलंय, !'..ह्या ह्या हँ हँ करत असं हसू लागले.
'अहो तसं नाही' आणि रागाने अतिशय क्लिष्ट भाषेत ते लोड शेडिंग बद्दल माहिती द्यायला लागले. टेबलावर आणि हॉटेलमध्ये घनघोर शांतता पसरली.

'वावडं मंजे काय ? (हा एक धान्याचा प्रकार समजून ) काय भाव निघालाय ?'असं नुकत्याच आलेल्या शहा (धान्याचे प्रसिध्द व्यापारी )यांनी विचारलं. त्यामुळे हॉटेलात परत मोठा हशा पिकला. त्यात शेडगे साहेबांचं भाषण विरून गेलं.

बराच वेळ शांत बसलेले आबा बोलले ' अवो घोलप सायेब, तुमच्या लेंग्यावर कसला डाग पडलाय वो '. दचकून घोलप उभं राहून आपल्या पॅन्टचं निरीक्षण करायला लागतात, डाग काही दिसेना. आबा खो खो हसायला लागतात. तसं आपण किरकोळात गंडलो हे लक्षात आल्यावर त्यांचा चेहरा क्रोधाने लालबुंद होतो,'काय आबा, कसलीबी चेष्टा करता होय ? आणि माझ्या एव्हड्या भारीतल्या ट्रॅकपॅन्टला लेंगा म्हणता ?' असं म्हणून कपाळावर आठ्या पाडून बाहेर पडतात. ,
जाता जाता कपातला चहाचा शेवटचा घोट घ्यायला ते विसरत नाहीत. असो.
त्यांच्या मागोमाग शेडगे पण जातात..
मग आबा घारे गुरुजींकडे पहात
'घारे गुर्जी, आज लंगडी मिशी ठेवलीय?'असं मोठ्या आवाजात विचारताचं झाडून सगळं हॉटेल घारेंच्या कडं पाहू लागले. घारे भांबावले. लंगडी मिशी हा  काय प्रकार कोणालाच माहीत नव्हता. पण घारेंच्याकडं बघताचं सगळ्यांच्या हसून हसून पोटात दुखायला लागलं. गडबडीने उठून घारेंनी आरश्यात बघितलं. तर खरंच एका मिशीचे टोक लांब होतं तर दुसऱ्या चं छोटं.. ' घारे चिडून तोंडातल्या तोंडात धुसपूसायला लागले. ' चिडू नगा वो गुर्जी, घ्या खावा तंबाखू '. (घारेनी आपला सगळा राग तंबाखूला चोळून आणि हातावर थापट्या मारून काढला.)

खो खो हसत आबा ' अस्तुरीचा बास ,अन ईड्याला नको काथ.. (मोठ्यांच्या गप्पाचं अधिक असतात )'अशी म्हण आमच्या तोंडावर फेकतात. आनी ' दुसऱ्याच्या टवाळक्या करून आपन मोठं हे दाखवायचा उद्योग नाय करायचा'
' नुसतं संक्रांतीला म्हणायचं, तिळगुळ घ्या, गोड बोला, म्या म्हणतो आपुन रोजच गूळ खाल्यागत हसायला काय हरकत आहे ?.
आजोबा पुढं ' एक  मातर खरं, आपण दुसऱ्याची चेष्टा केली तर, उलट चेष्टा खपवून घ्यायची तयारी पायजे'.
आता कसं झालंय, इनोद सगळ्यांसनी आवडतो पन फक्तस्त दुसऱ्यावरचा, सोतावर इनोद झाला की यांचं डोस्क फिरतं . असं नाय पायजे . अरं तू कोण महाराजा हायस व्हय चिडायला!!

डोसक्यात हवा गेली की मग काय खरं नाय.. स्वाभिमान जरूर पायजे, पन फुकाचा गर्व नगं. गर्वाच घर खाली होतं म्हणत्यात ते बराबर हाय.
इनोद करायचाबी, कुनी केला तर मनावर घ्याचं नाय, जमलं तर पलटवार करायचा. ते कसं असं विचारताचं ,  'दोन दिसापूर्वीची गोस्ट ऐका ' भांगलणीला दा -वीस गडी बाया होत्या, म्या जरा उशिराच रानात गेलतो, उन्ह तापली व्हती,तहान लागली व्हती , रानात गेल्या गेल्या कळशीच तोंडाला लावली, थोडं पाणी खाली धोतरावर पडलं, धोतर भिजलं .मी जिथं भांगलण चालू व्हती तिथं गेलु,.तर एक चाबरा गडी म्हणाला , ' धोतर भिजलया,आबा, काय कुत्र्यानं टांग वरती करून भिजवलं की काय ?'.
पन म्या बी काय कमी हाय व्हय ,  ' अर पण तू कधी टांग वरती करून गेलास, कळलंच न्हाय बग '..अशी माणसं हसली म्हनता, ". हे ऐकून सगळं हॉटेल हशात बुडालं...

बराच वेळ झाला होता. आम्ही सर्वजण हसत हसत बाहेर पडलो.

मला आबांचं मत पूर्ण पटलं होतं. सध्या  समाजाला दुसऱ्या व्यक्ती / समुदाय/जाती धर्म/देश विदेश यांच्यावरचा विनोद आवडतोच.. फक्त आपल्यावर केलेला विनोद पचत नाही. पचत नाही म्हणून झेपत नाही. आणि न झेपणाऱ्या गोष्टी टाळण्याकडं नव्वद टक्के लोकांचा कल असतो. आणि ते साहजिकच आहे.
शिवाय 'मी'पणा, अहंकार, गर्व माणसाची बुद्धी भ्रष्ट करतो हे सर्वमान्य आहे. अगदी चि. वि. जोशींपासून ते पु. ल.पर्यंत सर्व प्रख्यात विनोदी लेखकांनी मुख्य पात्र स्वतः ला केंद्रस्थानी ठेऊन विनोदी लेखन केले आहे. शक्यतो हे पात्र बावळट दाखवलं असल्याने वाचकांच्या पसंतीस पडले. विनोदाचा बादशहा चार्ली च्याप्लिन आपले अश्रु गिळून जगाला हसवत राहिला...
साध्या चेष्टेची मस्करी होणाऱ्या या दिवसात, विनोदाचं वावडं असणं हे साहजिकच....(बहुसंख्य लोक मूर्खांच्या नंदनवनात राहातात,)


पी.प्रशांतकुमार,अहमदनगर
... एक जण जमावासमोर तावातावाने बोलत होता.. कवी,कलाकार,साहित्यिक यांनी पण लिहिताना बोलताना भान बाळगायला पाहिजे.. मागे कुसुमाग्रजांनी सुद्धा मराठी लोकांचा वेडे म्हणून आपला अपमान केला. आपण जाब विचारायला पाहिजे होता तेव्हा गप बसले सगळे पण आता चालणार नाही आमच्या संस्कृतीचा.. वगैरे वगैरे..
... मला कळेचना शेवटी सगळं झाल्यावर मी त्याला हळूच विचारलं..ते कुसुमाग्रजांच नेमकं समजलं नाही?.. तो चिडून म्हणाला त्या कवितेत नाही का ते म्हणाले... *वेडात मराठे वीर दौडले* .. मी कपाळाला हात मारून घेतला..
 ज्या लोकांची ही साहित्यिक समज आहे त्यांना विनोद तर शत्रूच वाटेल.. खरतर विनोद हे शस्त्र आहे पण ते गुंडांच्या हातातल्या तलवरीसारखं नसून डॉक्टरांच्या हातातल्या नाजूक चाकू सारखं..
... सद्यस्थितीत.. निखळ विनोद कमी होतोय..त्याची जागा अंगविक्षेप आणि लाऊड एक्सप्रेशन च्या गोष्टींनी घेतलीय.. आणि दुर्दैवाने बऱ्याच जणांना हे म्हणजेच विनोद अस वाटतंय..
...आताशा संसदेतसुद्धा हलके विनोद करून केलेली व्यंगपूर्ण भाषणे ऐकू येत नाही.
... विनोद साधा जरी असला तरी वातावरणातला ताण मिटवून जातो. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात विनोद हा एका औषधाप्रमाणे काम करतो.
... पण दुर्दैवाने राजकीय खेळयांनी दूषित झालेल्या समाजात लोकांचा sense of humor कमी कमी तर होत चालला नाही ना? अशीही शंका येत चालली आहे.. विनोदातल्या उपमा जशाच्या तशा घ्यायच्या नसून त्या मागचा अर्थ आणि व्यंग समजून घेणे गरजेचे आहे..  धटिंगणांना,हुकूमशाहांना सदा सर्वकाळ विनोदाची भीती वाटत आलीय.. विनोदी कोपरखळ्या मारल्या म्हणून जर तक्रारी होऊ लागल्या तर ते आपल्या लोकशाही असणाऱ्या देशाला योग्य नाही..
...तेव्हा भरपूर वाचा आणि विनोदबुद्धी जागृत ठेवा .. विसंगतवरच्या कोट्या समजून घ्या आणि चिडू नका.

(यातील सर्व संबंधित ईमोजी गुगलवरून घेतलेल्या आहेत.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************