संदिप बोऱ्हाडे,
वडगाव मावळ, पुणे.
स्त्रीयांना पुर्वीपासुनच देविपण दिलय पण माणुसपण नाही. अर्थातच स्त्रीयांना ह्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये दुय्यम स्थान दिल जात. स्त्री म्हणजे फक्त भोगण्याची वस्तु स्त्रीवर अत्याचार, बलात्काराच्या घटना रोज होतात पण आजही अन्यायग्रस्त, बलात्कार पिडीत स्त्रीकडे माणुस म्हणुन पिडीत म्हणुन समजा बघत नाही.
समाज तीला सहनभुती आणि पाठींब्याची भुमिका न घेता तिच्याकडे तुच्छतेने बघतो. जणु काय तीच अपराधी, दोषी आहे. मात्र तशाच नजरेने बलात्कारी नराधमाकडे बघितले जात नाही.
यौन शोषण वा छळ कशाला म्हणायचं, याबाबत कायदा पुरेसा स्पष्ट आहे. आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कायदेशीर सत्तेचा उपयोग करून एखाद्या व्यक्तीला तिच्या इच्छेविरुद्ध स्पर्श करणं वा लैंगिक कृतीसाठी भाग पाडणं म्हणजे यौन शोषण वा छळ. स्त्री, पुरुष, उभयलिंगी (ट्रान्सजेंडर) असा भेद त्यामध्ये नाही.
स्त्री ही तक्रार करायला घाबरते
कारण, जी स्त्री तक्रार करते तिच्याच चारित्र्याची काहिही चर्चा केली जाते. आणि पुरावा तिलाच द्यावा लागतो. शिवाय सगळीकडे पोलिस डाँक्टर नर्स इ. लोक वेगळ्याच नजरेने पाहतात ते सर्व असह्य वाटते त्या स्त्रीला . मात्र तो पुरुष काहितरी पराक्रम केलाय असा वावरत असतो वा त्याने जे काहि कृत्य केलयं ते जणू काही निसर्गदत्त अधिकारातून घडलं आहे असाच समाजाचा दृष्टिकोन आहे त्यामुळेच स्त्रिला भिक नको पण कुत्रा आवर असे म्हणण्याची पाळी येते. स्वतःची , कुटुंबाची ,तथाकथीत सामाजिक प्रतिष्ठा ,आई वडिलांचा समाजाच्या ,धर्माच्या तथाकथित राक्षकांकडून होणारा अपमान ,
घरातील व समाजातील पुरुष प्रधान मानसिकता ...जॉब गमावण्याची भीती उदासीन justice delivery system काही महिलांमध्ये कायद्याची अपुरी माहिती , घरच्यांवर आपण ओझं बनून राहू असा विचार
समाजात महिलांना देण्यात येत असलेले दुय्यम स्थान व त्यांचं म्हणणं seriously न घेणे
अशा अनेक बाबी लक्षात येत आहेत.
नाना पाटेकरांपासून सुरुवात झाली. त्यानंतर चित्रपट, पत्रकारिता या क्षेत्रातील अनेक हस्तींना आरोपांना सामोरं जावं लागत आहे. काही व्यक्तींनी माफी मागितली, काही व्यक्तींनी चौकशीला सामोरं जाण्याची तयारी दर्शवली आहे, तर काहींनी साफ इन्कार केला आहे.
बर मी म्हणतो कोण कसं का असेनात. तीच्या मर्जी विरुद्ध होत तर तिने केली तक्रार खरी असेल खोटी असेल हे चौकशी समिती आणि न्यायालय बघेल ना.
आपण कशाला त्यांच चारित्र्यावर आक्षेप घेत बसायच. आणि हा अधिकार आपल्याला दिला कुणी. ती आपल्याकडे तक्रार घेऊन तर आली नव्हती. की बघा तेवढं माझ्यावर अन्याय झालाय , रेप झालाय , छेड काढलिये. जी कोण असेल ती सोशल प्लॅटफॉर्म वर तीच म्हणण मांडतीये. पटलं तर ठिक नाहीतर योग्य भाषेत विरोध करा....पण जोक करायचे , दात काढायचे अधिकार कुणालाच नाही....उद्या एखादी वेश्याव्यवसाय करणारी स्त्री सुद्धा तक्रार करु शकते जर तिची मर्जी नसेल तर....लोकशाही ने हा अधिकार दिलाय प्रत्येकाला.
जर #metoo चा गैरफायदा घेऊन जर कुठली महिला कुठल्या पुरुषाला ब्लॅकमेल करत असेल तर कायदा त्या महिलेला काय शिक्षा करणार. Metoo गोष्ट जर एका पुरुषा सोबत झाली तर कायदा त्या महिलेला शिक्षा पाहिजेच..असा कायदा करा..!!
माझा पाठींबा आहे तनुश्रीला. केवळ ती स्ञी आहे व एकटी आहे म्हणुन तीच्या विरुदध कोणत्याही खालच्या पातळीवर जावुन लिहायचे काय? नाना पाटेकर व राज ठाकरेंमागे मँन पॉवर आहे म्हणुन तीला सगळया बाजुंनी घेरायचे काय? तनुश्री च्या आरोपांची कायदेशिर चौकशी होवु दया. नाना निर्दोष सुटले तर त्याची बाजु घ्या. बॉलिवुड कोणत्या लायकीचे आहे व येथे किती कास्टींग काऊच चालते व रोल देण्यासाठी महीलांना झोपण्याच्या अटी ठेवल्या जातात हे सगळया देशाला माहीत आहे. तनुश्रीचे आरोप खरे सुदधा असु शकतात . नाना पाटेकर कुणी संत महात्मा नाहीत. कि ते असे करनारच नाही. आंधळया चाहत्यांच्या म्हणण्यावर सत्य ठरनार नाही. व चाहते व भक्त तर आसाराम बापु व राम रहीमला पण होते लाखोंच्या संख्येत..तनुश्री..तुझी बाजु जर खरी असेल तर पर्वा करु नको. तुझ्या विरुदध हजारो आहेत की लाखो आहेत की करोडो...गेले उडत...लढाई चालु ठेव.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
किशोर शेळके.लोणंद .
पाश्चात्य संस्कृतीकडे झुकत चाललेला भारतीय समाज हळूहळू सर्व च पाश्चात्य गोष्टींचे अनुकरण करू लागला आहे. परिणामी पुरूषप्रधान भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांच्या बाजूने कायदे एकवटू लागले, आणि यामुळे, कायद्याच्या भितीपोटी का होईना पण काही प्रमाणात स्त्रिया स्वतःला सुरक्षित समजू लागल्या. पण नेहमीच स्त्रियांवरिल अत्याचार कायद्यापर्यंत गेलेला आपल्याला दिसत नाही. यामागे बरीच कारणे आहेत, स्त्री ची बदनामी, अत्याचार करणारे व्यक्तीची धमकी, भ्रष्ट यंत्रणा इत्यादी.. आधुनिकतेच्या काळात कायद्यापेक्षा सोशल मिडीया जवळ वाटू लागलीय. आणि स्त्रियांना सोशल मिडीया वर तक्रार करणे सोपे वाटते.
जवळपास बघितलं तर प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया सोशीत असल्याचं आपल्याला जाणवतं, पण खेदाची बाब ही आहे की, स्त्रियांवर झालेल्या अन्यायाला वाचा एवढ्या उशिरा का फुटते.
म्हणजे बघा की, आपण पेपरमध्ये बातमी वाचतो ती अशी, लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर वारंवार बलात्कार- चार वर्षानंतर तक्रार दाखल.
आता मला सांगा की बलात्कार वारंवार होऊ शकतो का? किंवा असू शकतो का? कारण ज्या व्यक्तीवर पहिल्यांदा बळजबरी होते तिथे शांत बसणे योग्य आहे का? जर तिथे खरोखरच अन्याय होत असेल तर त्याच वेळी त्या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे. आणि पुन्हा होणाय्रा अन्यायापासून आपलं रक्षण केलं पाहिजे. पण असं होत नाही, त्यावेळी ती सोशीत शांत बसून समोरच्या व्यक्तीला पुढिल अत्याचार करण्यास वाव देते. आणि पाणी डोक्यावरून गेल्यावर तक्रार करण्यास सुरुवात करते. खरंतर या अन्यायाला त्या पुरूषापेक्षा ती तरूणी जास्त जबाबदार आहे असं मला वाटतं.
#me too ही अशी एक संकल्पना आहे, जी पाश्चात्यांकडून जगभरात पसरली, आणि भारतातही आली. या सोशल मिडीयाच्या दोन शब्दांनी अख्खं जग हादरवून ठेवलंय. भलेभले हस्थी आता आपापला इतिहास आठवू लागलेत.
प्रत्येक माणूस हा भावनांचा भुकेला आहे, याला अपवाद कुणीच नाही. स्त्री आणि पुरुष या दोघांनाही प्रेमाची गरज आहे. आपण वावरत असलेल्या ठिकाणी हे प्रेम किंवा आकर्षण होऊ शकतं, यामध्ये कित्येक वेळा आपापली मर्यादा सोडून बाब पुढे जाते, ही गोष्ट दोन्ही बाजूकडून मान्य असेल तर कुठेही वाच्यता होत नाही. आणि जर एकीकडून मान्य नसेल तर त्याचवेळी विरोध करणे गरजेचे आहे. जरी त्याठिकाणी पिडीत तरुणी अब्रूचे कारण पुढे करत असेल, तरी माझ्या मते, त्याठिकाणी तिचा वैयक्तिक स्वार्थ तिला शांत राहण्यास भाग पाडत असेल. आणि नंतरच्या काळात त्या व्यक्तीशी आलेलं वितूष्ट त्याच्या विरोधात तक्रार करण्यास किंवा # me too बोलण्यास भाग पाडत असेल.
मी असं मुळीच म्हणणार नाही की, प्रत्येक वेळी स्त्रीचंच चुकतंय किंवा पुरूषाचं चुकतंय, माझ्या मते या गोष्टीला दोन्ही व्यक्ती तेवढ्याच जबाबदार आहेत. पण यातून खय्राच गोष्टी बाहेर येणं गरजेच्या आहेत, उगीच एखाद्या मोठ्या व्यक्तीला ब्लॅकमेल करणं किवा बदनाम करणं यासारख्या गोष्टी घडू नये हीच अपेक्षा.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
निखिल खोडे, ठाणे.
ऑक्टोबर २०१७ मध्ये शोशल मीडियावर रोझ मॅकगोवन आणि अॅशले जूड या दोन अभिनेत्रींनी हार्वे वाईनस्टाईन या हॉलिवूड मधिल निर्मात्या वर काम देण्याच्या बदल्यात आपला लैंगिक छळ केल्याचा आरोप न्यूयॉर्क टाईम्स मध्ये केला. आता भारतामधे तनुश्री दत्ता आणि बॉलिवूड पासुन हा #metoo आता माध्यमापर्यंत पोहोचला.
प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी त्यांची उंची गाठली आहे. स्त्रियांना समान आरक्षण देऊन सुध्दा पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीला दुय्यम स्थान मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून स्त्रियांवर होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. अत्याच्याराच्या तक्रारी आपली बदनामी होईल म्हणुन नोंदिविल्या जात नाही.
सध्या #metoo यावरून स्त्री शोषणाच्या तक्रारी केल्या जात आहे. तक्रारी पूर्ण खऱ्या की खोट्या हे ठरवणे कठीण आहे. काही मोठ्या लोकांना बदनाम करण्यासाठी असु शकतात..! भारतातील कायद्यामुळे अनेक जणांवर जरी बंधन घातले गेले तरी त्याचे उल्लंघन हे नेहमीच होतात. भ्रष्टाचार मुळे काही आवाज दबविले जातात, तर काही पैशाचा वापर करून गुन्हा लपविला जातो.
देशातील स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटनाना कुठेतरी आळा बसणे गरजेचे आहे. त्यासंबंधी गंभीरपणे विचार करणे मुख्य म्हणजे कृती करणे गरजेचे आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
किरण पवार,औरगांबाद.
मी स्पष्ट आणि ठामपणे या मताचा आहे की , या वेळी #metoo चा वापर केवळ *पुरूषांची बदनामी* करण्यासाठी केला जातोयं. कदाचित तुम्ही सहमत व्हालं न व्हालं. मुळात आपण अशा देशात राहतो जिथे सेक्स् सारख्या महत्वाच्या नैसर्गिक गोष्टीवरती बोलणंही टाळलं जातं. *गोष्टी लपवल्या जातात म्हणून आज ही परिस्थिती उद्भवली जात आहे.* मानसिक संतुलन टिकवण्यासाठी शारिरीक भूक भागवणंही तितकचं गरजेच असतं जितकं जगण्यासाठी श्वास. पण मुळात ही गोष्ट आपण सहजरित्या स्विकारतचं नाही.
आता मुळ मुद्यावर येतो. ते म्हणजे, ही #metoo मोहीम ज्या तनुश्री दत्तामुळे पुन्हा जोर धरत आहे त्या अभिनेत्रीवर खरचं कितपतं अन्याय झाला? जर खरचं तिच्यावर अन्याय झाला असेल तर तिने प्रथम कोर्टात जावं, पोलिसांकडे जावं; ज्याच त्याच काम नेमून दिलं आहेच ना. पण असं झालचं नाही. तनुश्री सर्वप्रथम मिडीयाकडे जाते. का? कारण नाना पाटेकरांविषयी निर्माण झालेला *द्वेष असू शकतो.* अथवा तिला *पैसे दिले असतील कोणीतरी.* नाकारता येत नाही. कारण *ती ज्या तोऱ्यात बोलत होती त्यात कुठेही मदतीची भावना नव्हती; ऊलट मुद्दाम सूड उगवायचा आहे, असं सर्व तिच्या बोलण्यातून थेट स्पष्ट होत होतं.*
राहिला प्रश्न नानांचा तर त्याच्या चारित्र्यावर कणीही येऊन काहीही आरोप करावे; एवढाही शुल्लक नाहीये तो माणूस. *त्याच्यामुळे महाराष्ट्रीय जनतेला दुष्काळाच्या झळेतून दिलासा मिळाला.* *शेतकऱ्यांना पुसणारा पहिलाच असा माणूस पाहिलायं प्रत्यक्षात मी.* आणि आम्हच्या सारख्या भरकटलेल्या तमाम माणसांना *नाना सारख्याच माणसांची गरज आहे ना की तनुश्रीसारख्या पैशापायी विकल्या जाणाऱ्या स्त्रीची.* आम्ही नाही ठेका घेतलेला दरवेळी *स्त्रीलाच योग्य दाखवण्याचा.*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अभिजीत गोडसे, सातारा.
पुरूष आणि स्त्री ही समाजाची दोन चाके आहेत. दोघांनाही एकमेकांची गरज आहे. हे वारंवार आपण आयकतो. पण खरच देशात फक्त आणि फक्त पुरूषसत्ताच आहे. स्त्री ही फक्त भोगवादी म्हणूनच पाहीली जात होती आणि जाते. जे जे काही उत्तम करणारे ते ते सर्व पुरुषच अशी एक सारासार बनलेली किंवा बनवलेली आपली माणसीकता आहे. याला जबाबदार आपण सर्वच आहोत. कायम स्त्रीचे शोषण करुण तिचा आवाज दाबणारे आता फार काळ तगणार नाहीत. कारण आता चळवळ चालू झाली आहे " मी - टू " ची म्हणजेच " मी सुद्धा "
अमेरिकेत ही चळवळ चालू झाली . या चळवळीमुळे तेथे संध्या बरेच तुरूंगाची हवा खात आहेत . आपल्याकडे ही " मी - टू " ची चळवळ जोमाने वाढते आहे . आत्तापर्यत स्त्रीयांनी खूप सारे अन्याय सहन केले. सर्व निमूटपणे गिळून बसण्यात स्त्रीया धन्यता मानत होत्या . पण आता या चळवळी मुळे काहीप्रमाणात तरी स्त्रीया बोलायला पुढे येत आहेत . हे खर तर कौतुकास्पक आहे. आज मोठ्या शहरामधे चालू झालेली ही चळवळ ग्रामीण भागात येण्यास वेळ लागणार नाही .आपल्याकडे महिलानं विरोधात कायदे असून सुद्धा आत्याचार काही थांबले नाहीत . या पुरूषांच्या वासणेत आज छोटी मुलगी , तरुण मुली , म्हाताऱ्या बायका , मुकबधीर असा कुठलांच घटक राहीला नाही की त्याच्यावर आत्याचार किंवा बलत्कार झाला नाही . येवढच काय काही बापांनी स्वतःच्या मुलीला सुद्धा सोडले नाही . अशा कित्येक घटना आहेत. की विचारी माणसांचे मन सुन्न होते. आत्ता ही चळवळ चिञपट , राजकारण आणि पञकारीता या क्षेत्रा पुरती दिसत असली तरी. याचे स्वरूप नक्कीच वाढणार आहे. इतर क्षेत्रातही महीला सुरक्षित असतात असे नाही .
आता मुद्दा उरतो की ही चळवळ आत्ताच का सुरू झाली . कोण म्हणते निवडणूक जवळ आल्यामुळे , कोण म्हणत आहे यांना कोणीतरी फुस लावली वगैरे वगैरे पण हे सर्व साफ चुकीचे आहे. ही स्त्रीयांनी स्त्रीयांन साठी चालवलेली चळवळ आहे. आत्ता पर्यत जेवढ्यानंवर आरोप झाले त्यातील काही जणांनी फक्त आरोपाचे खंडण केले आहे. बाकीचे अजून बोलायला तयार नाहीत . ज्यावेळी एखाद्या पुरूष प्रामाणिक असतो त्याला माहिती असते मी काहीही गैरकृत्य केले नाही . असा पुरूष आरोपांचे खंडण लगेचच करतो. आज आरोप समाजमाध्यमावर होत असले तरी कोर्टात , न्यायालयात खरे बाहेर येईलच. काहीणा आपली चूक लक्षात यायला लागली आहे. नुकताच एका केंद्रीय मंत्री यांनी राजीनामा दिला आहे. हे या " मी - टू " चळवळीचे यशच आहे . आज पुणे विद्यापीठातील कायदा व पञकारीतेच्या विद्यार्थीनीं we Together (#we too) नावाची समिती स्थापन केली आहे. उद्देश हा की सर्व पिडीत स्त्रीयांना कायदेशीर मदत करणे. हळूहळू ही चळवळ वाढते आहे. ही चळवळ चांगल्या पुरूषांच्या विरोधात नाही तर जे विकृत माणसिकतेचे पुरूष आहेत त्याच्यासाठी आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
शिरीष उमरे, नवी मुंबई
माझ्या मते # metoo...ना पुरुषांची बदनामी करण्यासाठी असावे कीवा स्त्रियांच्या शोषणाचा आवाजासाठी असावे !!
हे राजकारण्यांचे षडयंत्र असण्याची जास्त शक्यता आहे. ह्यात विद्यमान सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्ष व इतर संधीसाधु राजकीय पक्षांची मिलीभगत असु शकते....
इतक्या मोठ्या प्रमाणावर मिडीया ह्याला हायलाइट करत आहे त्यामुळे शंका येते की हा वेलफंडेड, वेलप्लॅनड् इवेंट असावा. बदनामी व शोषण कीत्येक वर्षापासुन सुरु आहे पण इलेक्शनच्या तोंडावर हे आंदोलन सुरु करणे म्हणजे नक्कीच काहीतरी काळेबेरे आहे.
सध्याच्या सरकार त्यांच्या कार्यपध्दती व निर्णयांमुळे चारही बाजुने टीकेने वेढले गेले आहेत. सामान्य जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवणे हा उद्देश असु शकतो. केरळमध्ये नन वर बलात्काराचा आरोप असलेला बिषप ला जामीन मंजुर होते ह्या बातमीला मी टु च्या गदारोळात दुर्लक्षित केल्या जाते. ह्या कल्लाबाजारात कोणते विधेयक, कोणते शासकीय निर्णय व कोणत्या योजना चुपचाप पार पडल्या हे बघावे लागेल.
थोडक्यात नागरिकांनो सावध रहा. रात्र वैर्याची आहे. नेहमी अश्या घटनांची दुसरी बाजु बघण्याचा प्रयत्न करा. सत्य लक्षात येइल. 🙏🏼
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
रामेश्वर क्षीरसागर ,पुणे.
काही दिवसांपूर्वी U - tube वरती एक व्हिडिओ पहात होतो. Video मध्ये शैला रशीद जी की JNU ची विद्यार्थिनी आहे, ती तिला P.HD घेण्यास उशीर का लागत आहे याचे स्पष्टीकरण देत होती. व्हिडिओ पाहता - पाहता मी त्याखाली असलेल्या comments पाहत होतो, आणि पहिलीच comment पाहिल्यानंतर मला एक वेगळ्याच प्रकारचा धक्का बसला. कारण ती comment अशी होती,* *शैला रशीद च्या bag मध्ये पुस्तकांपेक्षा कंडोम ची संख्या जास्त असते ."* आणि त्या comment ला किमान एक हजार जणांनी react केले होते ! खरे तर या comment चा आणि video चा दूर दूर पर्यंत काहीही संबंध नव्हता. मात्र, हा थेट संबंध जोडला जातो तो आमचं मानसिकतेशी .
ही मानसिकता म्हणजे *स्त्री ची इज्जत संपूर्णपणे फक्त आणि फक्त तिच्या योनीत सामावलेली आहे* म्हणून तिला बदनाम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तिच्या लैंगिकतेवर प्रश्न निर्माण केले जातात . हे एक निखळ सत्य आहे. तरी, स्वतःवर लैंगिक अत्याचार झालाय हे सांगून आपल्या समाजात प्रसिद्धी मिळेल असे सांगणे म्हणजे अगदीच असबंध ठरते !! मुळात हा विषय दिल्यानंतरच त्यातून हीच मानसिकता दिसते की आम्हाला त्यात काहीतरी शंका आहे! मला ठामपणे म्हणायचे आहे की, *"*लैंगिक अत्याचारं होतात, आणि ते झालेत हे एक निखळ सत्य आहे* यातून प्रसिध्दी वगैरे मिळवण्याचा हेतू आहे असे वाटणेच मुळात आपल्या पुरुषसत्ताक मानसिकतेत दिसून येते ! मग प्रश्न उठवले जातात की ती त्यावेळी का बोलली नाही, तेंव्हाच का मांडले जात नाही वगैरे, वगैरे ! मला यासाठी एक उदाहरण द्यावे वाटते... परवा - परवा symboysis कॉलेज च्या माजी विद्यार्थीनींनी #mee too मोहीम मोठ्या प्रमाणात मान्य करताना आपल्यालाही कॉलेज मध्ये असताना त्रास सहन करावा लागला असे सांगितले ! मात्र, याचा शैक्षणिक बाबीवर परिणाम होऊ नये म्हणून आम्ही बोललो नाही, असे सांगितले ! अशी असंख्य करणे आहेत की ज्यामुळे ह्या गोष्टी बोलल्या जात नाहीत. प्रत्येक वेळेस जर मुलींनाच दोषी धरले जात असेल तर मग अशा गोष्टी वेळच्या वेळी कशा बाहेर पडणार हा खरा प्रश्न आहे !
खरे तर आपल्या व्यवस्थेत खास करून पोलिस व्यवस्थेत तक्रार दाखल करणाऱ्या व्यक्तीलाच संशयास्पद ठरवले जाते. म्हणून आपल्याकडे काही अशी आशा बाबींमध्ये मदत करण्याची प्रवृत्ती कमी दिसून येते. मला वाटते, काही अंशी हीच प्रवृत्ती सुद्धा # mee too च्या बाबतीत ही दिसून येते. जेंव्हा लाखो जणी पुढे येऊन सांगायला लागतात की , हो माझ्यावर ही झा लाय अत्याचार तेंव्हा बाकीच्यांना वाटायला लागते की आपण काही असे एकटेच नाही आहोत, तेंव्हा ती गोष्ट सांगायला धीर वाटायला लागतो . विद्या बाळ लिहितात की ब्रिटन मध्यल्या एका अत्याचार पीडित निवारा गृ हात एक वाक्य लिहिलेले होते.- *अत्याचार तुमच्या गावात होऊ शकतो, तुमच्या वस्तीत होऊ शकतो, तुमच्या नातेवाईक स्त्रियांवर होऊ शकतो, मैत्रिणींवर होऊ शकतो , आणि क्कचीत तुमच्यावर ही होऊ शकतो आणि मी ही त्याचं भक्ष्य होऊ शकते तरच निवराघराचा आणि त्यात राहायला आलेल्यांचा तुम्ही आपुलकीनं विचार करू शकाल* म्हणूनच #mee too मुळे अगदी १०-१० वर्षांपासून चे अत्याचार ही बाहेर पडू लागतात. आपण ते मान्य करायला हवेत, किंबहुना किमान ते ऐकून तरी घ्यायला हवेत !
पंजाबी साहित्यिका अमृता प्रीतम एके ठिकाणी फार वस्तावपणे स्त्री ची परिस्थिती मांडताना म्हणतात *स्त्री ही तिंबवून ठेवलेल्या कनकेसारखी आहे, घरात ठेवली तर उंदर कुर्तडतात आणि बाहेर ठेवली तर कावळे टोचा मारतात* इतकी विदारक परिस्थिती या समाजाची असताना ही आम्हाला जर हे एक प्रसिद्धी साठी केलेला खटाटोप आहे असे वाटणे म्हणजे एक सोंग घेतल्यासारखे आहे. आणि राहिला मुद्दा राजकारणाचा वगैरे तर म्हणजे आपल्याला सवयच लागली आहे की ज्या प्रश्नांचे उत्तर आपण देऊ शकत नाही किंवा ते स्वीकारू शकत नाही तेंव्हा आपण पळवाट शोधायला लागतो. मग, राजकारण किंवा परदेशी शक्ती हा आपला सगळ्यात जवळचा सहकारी वाटायला लागतो. खरे तर, ही गोष्ट सगळ्यांनाच मान्य आहे की हे वास्तव आहे ,पण पुरुषसत्ताक व्यवस्थेने स्त्री ची कुठली गोष्ट आतापर्यंत मानली नाही ती ही गोष्ट कशी मान्य करेल ? मला वाटते, या मागे राजकारण नाही आहे तर #mee too मान्य करणे हेच मोठे पुरुषसत्ताक व्यवस्थेचे राजकारण आहे. जागा, विचार करा, मान्य करा. कारण *एकवेळ झोपलेल्या व्यक्तीला जागे करता येते पण झोपेचे सोंग केलेल्याला नाही*
ता.क.- परवाच M.J. अकबर यांनी #mee too मुळे राजीनामा दिला आहे !
धन्यवाद!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संगीता देशमुख,वसमत
"मी टू...." हा लाखो बळींच्या शोषणाचा एक आवाज आहे...दबलेल्या अपमानाचा... पण यात अनेकांना त्या पुरुषाची बदनामी आहे,असं वाटते. अर्थातच ह्या "मी टू" मधील स्त्रिया बळी ठरल्या त्या पुरुषाकडूनच! जिथे अन्यायविरुद्धचा आवाज आहे, याचा अर्थ तिथे अन्यायकर्ताही आहे. बऱ्याचदा असही होऊ शकते की,यात एखादा पुरुष निष्कारण अडकवल्या जाऊ शकतो. त्यात त्याचा काही दोष नसला तरी यात त्याला अनेक कारणाने अडकवले जाऊ शकते. पण हे प्रमाण अतिशय नगण्य असेल. कारण इथे अशा अन्यायाच्या बळी ह्या युगानयुगापासूनच्या आहेत. त्यातही फक्त सिलीब्रेटीज बळी ठरतात, असही काही नाही. यासंदर्भात अगदी चार भिंतीतली स्त्री सुद्धा बळी ठरत असते. त्यातही त्यात तिच्या जवळच्या नातेवाईकांकाच समावेश असतो. आधीच पुरुषप्रधान संस्कृती असल्याने समाजाकडून झुकते माप हे पुरुषांसाठी पडते आणि अपराध्याच्या पिंजऱ्यात ही स्त्रीच असते. त्यामुळे असे अनेक आवाज असतील जे पिढ्यानपिढ्या बळी आहेत परंतु त्यांच्यासोबतच परंपरेने त्यांचा आवाजही बंद केलेला असतो. घरातील मोठी माणसेच जेव्हा असा त्रास देतात तेव्हा तिला दाद कुठेही मागता येत नाही. याउलट तिच्याच चारित्र्यावर शिंतोडे उडविल्या जातात. घर असो,नोकरी असो, कार्पोरेट क्षेत्र असो,राजकारण असो की अजून कुठलेही क्षेत्र असो प्रत्येक क्षेत्रातील स्त्री ही बळी आहे. भले त्यातील काहीजणींनी खंबीरपणे विरोध केला असेल,तर काहीजणी परिस्थितीवश होऊन बळी ठरल्या असतील. लोक असेही म्हणतात की,"स्त्रिया बळी ठरल्यानंतर कितीतरी दिवस,महिने किंवा वर्षानंतर त्या कुठेतरी व्यक्त होतात. इतके दिवस का त्या गप्प राहिल्या?" तिने जर अशा व्यक्तीचे नाव घेतले तर आधी तिलाच दोषी ठरवतील,तिचीच बदनामी होईल,घरून तिच्या बाहेर पडण्याला,तिच्या नोकरीला,शिक्षणाला विरोध होईल,याचा तिच्या कुटुंबावर काय परिणाम होईल? तेव्हा या सर्व बाबीपेक्षा तिला ध्येय महत्वाचे वाटते तेव्हा झाकली मूठ... म्हणून तेव्हा ती मूग गिळून गप्प बसत असेल. याचा अर्थ ती तेव्हा त्यात मनातून सहभागी असतेच असे नाही. आणि याच तिच्या मानसिकतेचा पुरुषमंडळी गैरफायदा घेतात. जेव्हा कुठेतरी अनेकांचे पाठबळ मिळते,हिच्यासारख्याच अनेकजणी अशा बळी आहेत,तीच एकटी यात अडकलेली नाही,हे लक्षात आल्यावर त्या भीतभीत का होईना व्यक्त होतात. बऱ्याचदा आपले अडकलेले काम दुसरीकडून कुठूनही होणार नाही,हे लक्षात आल्यावर कदाचित शरण येतही असेल. पण असा शरण आणणारा,तिला परिस्थितीवश करणारा शेवटी पुरुषच असतो ना? याचा अर्थ प्रत्येकच महिलेची बाजू रास्तच आहे,असेही म्हणता येणार नाही.अनेकदा स्त्रियाही आपले काम साध्य करण्यासाठी अशा मार्गाला जातात आणि अनेक स्त्रिया अशाही आहेत की,मुद्दामहून,स्वार्थासाठी काही पुरुषांचे नाव घेऊन बदनाम करण्याच्या हेतूनेही हा मार्ग स्वीकारतात. पण अशा स्त्रिया अगदी बोटावर मोजण्याइतक्या असतात. कारण स्त्री आधी बदनामीलाच घाबरते.पण ह्या स्त्रिया म्हणजे अखिल स्त्रीवर्ग नव्हे.
स्त्रीला जोपर्यंत उपभोगाची वस्तू म्हणून मानतील तोपर्यंत अशा अनेक स्त्रिया यापुढेही बळी ठरत रहाणारच! आता अशा पुरुष वर्गाने आपली मानसिकता बदलायलाच हवी.विवेकी पुरुषाने हा विचार आवर्जून करावा की,आज मी ज्या स्त्रीला जी मागणी करत आहो,हीच वेळ आपली पत्नी, बहीण,मुलगी यांच्यावरही येऊ शकते. आणि जर हा विवेकी विचार पुरुष करणार नसतील तर स्त्री मोकळा श्वास घेईल कसा? विकसित देशात स्त्रियां अशा बळी पडणार असतील तर कोणते आईवडील,कोणता पती,कोणते सासूसासरे आपल्या घरातल्या स्त्रीला निश्चिंतपणे बाहेर पाठवतील? फुले,आंबेडकर,शाहू,आगरकर यांनी स्त्री बाहेर पडावी म्हणून जीवाचे रान करून समाजात क्रांती घडवली.असेच प्रत्येक वेळी स्त्रीला जबाबदार धरत राहिलो तर कोणतीही सूज्ञ स्त्री आपली वेदना बोलून दाखवणार नाही आणि ती जर असा अन्याय बोलून दाखवणार नसेल तर मग पुरुषांची यातील मुजोरी वाढेल. जर अशी स्त्रीवरच्या अन्यायाची अशी परंपरा कायम राहिली तर आपल्या देशाचा प्रवास उलट्या दिशेने व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे कॉर्पोरेट जग किंवा राजकारण किंवा फिल्मी जग यातील काही स्त्रिया जरी पुरुषांच्या बदनामीकरीता आरोप करीत असल्या तरी सामान्य स्त्रिया मात्र जर अशा आरोप करीत असतील तर त्या नक्कीच पुरुषांकडून झालेल्या अन्यायाच्या बळी आहेत. "मी टू "चा हा आवाज त्यांच्या शोषणाचाच आवाज असेल. कारण सामान्य स्त्रिया चारित्र्याला सर्वस्व मानून चार माणसात धिंडवडे काढण्यापासून दूरच रहातील. पण प्रत्येक स्त्रीने आपल्या शोषणाचा आवाज न दबू देता तो बाहेर काढल्याशिवाय त्यांच्यावरचा अन्याय दूर होणार नाही. त्यामुळे कोणाचाही बदला घेण्याच्या हेतूने किंवा स्वार्थ हेतू ठेवून न वागता खरोखरच त्यांच्यावर असा अन्याय झाला असेल तर त्यांनी ही "मी टू" ची चळवळ अधिक ज्वलंत करायला हवी.
शीतल शिंदे .- दहिवडी
me too -
आज 21 शतकात सुद्धा स्त्री पुरुषांबरोबर समानतेच्या पातळीवर काम करत असली तरी तिच्याकडे बघण्याचा द्रुष्टी कोण , तिच्याबद्दल विचार करण्याची पद्धत तीच आहे .
खरेतर ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली आणी स्वमताप्रमाणे लिहून ठेवलेली , लादलेली संस्क्रुती याला कारणीभूत आहे .
ह्या कायद्यामध्ये बदल करणाऱ्यांनी प्रथम दूरदर्शन मलिकेमधिल , कॉमेडी मधील स्त्रियांची होणारी टिंगल टवाळी करण्यावर बंदी आणावी .मलीकामधुण स्त्रीला दिला जाणारा दुय्यम दर्जा , अन्याय , आत्याचार याला विरोध केला पाहिजे .
सरळसरळ देवांनी स्त्रीचा केलेला वापर पाहून सर्व सामान्य लोक सुद्धा बोलतात की देवांनी केले मग आपण केले म्हणून काय झाले .
या कायद्याने महिलांना फार मोठा दिलासा मिळाला असला तरी कायद्याची अंमलबजावणी पुरेशी केली जात नाही .स्त्रियांचा आवाज तिथेच दाबला जातो .सत्ताधारी पक्ष यात सामील होवून यात अन्यायाला साथ देतात . ही आपली संस्क्रुती .नवु दिवस चप्पल न घालता त्या स्त्री रुपी दुर्गामातेला पुजतात आणी बाकीचे दिवस चप्पल घालून तिला तुडवतात ही आपली संस्क्रुती .
तेव्हा का नाही कोप होत दुर्गा मातेचा .तेव्हा कायद्याचा आधार घ्यावा लागतो .यात फक्त स्त्रीचीच
हेळसांड होते .अक्खे च्या अक्खे कुटुंब यात बरबाद होतात म्हणून याला कोठेतरी आळा बसावा हे ही महत्वाचे आहे .
मात्र स्त्रियांनी याचा गैरफायदा घेणे सुद्धा चुकीचे आहे. काही वेळा या कायद्यामुळे पुरुषांवर सुद्धा अन्याय होवू शकतो मात्र ह्याचे प्रमाण अगदी हाताच्या बोटांवर मोजण्यासारखे असते .त्यालाही घरातील पुरुषांची साथ असतेच की .
अशावेळी आशा महिलांना सुद्धा त्याची शिक्षा होणे गरजेचे आहे आशा लोकल लेवल चे पोलीस ठाणे पद्धतर्शीरपणे चौकशी करून योग्य त्या पद्धतीने मदत करू एफ. आय .आर .करू शकतात .कारण खरे काय नी खोटे काय हे त्यांना माहीत असते फक्त त्यांनी कोणावरही अन्याय होवू नये या पद्धतीने काम करणे गरजेचे असते पण तेथेही त्यांचे वर राजकीय लोकांचा दबाव आणला जातो .
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
तेजस महापुरे, कराड..
आपल्या सर्वांना कल्पना आहे की प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, ते तंतोतंत या #metoo या चळवळी संदर्भात लागू होईल, कारण ही चळवळ जशी स्त्रियांचा शोषणाचा आवाज बनला आहे तशी ती पुरुषांची बदनामी करण्याचं माध्यम देखील बनू शकते याची शक्यता नाकारता येत नाही, खरतर कोणत्याही स्त्रीवर कोणत्याही प्रकारचा अन्याय हा होता कामा नये आणि तसा अन्याय हा झालाच तर त्याविरुद्ध आवाज हा त्वरित उठवायलाच हवा, पण अन्याय करणारा व्यक्ती जर धनदांडगा असेल आणि आपल्या सामर्थ्याच्या जोरावर जर पोलीस,न्यायालय या व्यवस्थेवर प्रभाव टाकून शोषित स्त्रीचा आवाज दाबून टाकायचा प्रयत्न करत असेल तर #metoo ही चळवळ अन्यानग्रस्त स्त्रीसाठी अत्यंत प्रभावी अस्त्र ठरेल त्यामुळे व्यवस्थेवर सकारात्मक दबाव निर्माण होऊन न्याय मिळण्याची शक्यता नक्कीच निर्माण होऊ शकते, तसेच यामुळे अन्याय केलेल्या व्यक्तीचा सामाजिक बहिष्कार होऊ शकतो, आणि तो व्हायलाच हवा आणि त्याचे गुन्हेगारीपणा हा न्यायालयात देखील सिद्ध व्हावा जेणेकरून स्त्रियांचा आणि सर्वांचाच पोलीस व न्यायव्यवस्थेवरील विश्वास वाढेल, #me too मुळे स्त्रियांना जर त्यांच्यावर अन्याय होत असेल तर ते व्यक्त करण्यासाठी अत्यंत प्रभावी माध्यम होत आहे व तो स्त्रियांचा शोषणाचा आवाज बनावा कारण जर ह्याचा गैरवापर सुरू झाला तर या चळवळीवर कोणाचाही विश्वास राहणार नाही......
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(सर्व छायाचित्रे इंटरनेट वरून घेतली आहेत.)
(सर्व छायाचित्रे इंटरनेट वरून घेतली आहेत.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा