मेंढरे आणि आम्ही: साम्यता

🌱वि४🌿व्हॉट्सअप ग्रुप
मेंढरे आणि आम्ही: साम्यता


संदिप बोऱ्हाडे वडगाव मावळ,पुणे.
 मी थोडे विषय बदलतो कारण मेंढरे म्हणजे सर्वच प्राणी बोलले तरी योग्यच राहील..आणि आम्ही खूप सभ्य आहोत पण मेंढरे आणि माणसांची तुलना करणे कदापी शक्य नाही म्हणून मी असा विषय सुचवितो सभ्य माणसांपेक्षा चांगली आहेत जंगली जनावरे..??

   आमचा जन्मच जंगलात झाला...जंगली जनावरांपासून सामान्य माणूस बनण्याची इतकी मोठी प्रक्रिया कधी पूर्ण झाली समजलेच नाही. आता आम्ही पूर्णपणे सभ्य झालो आहोत कारण आम्ही जंगल केव्हाच सोडले आहे..आता आम्ही जंगली जनावर नसून माणूस बनलो आहोत. आम्हाला चूक आणि बरोबर या गोष्टी कळायला लागल्या आहेत. आता आमच्याजवळ धर्म , समज, विज्ञान , लोकशाही , एकमेकांचे सहाय्य, आणि बरोबरी आहे.

  परंतु आम्ही ज्या ठिकाणाहून निघून आलो त्या जंगलात आजही चारही बाजुंनी भयंकर अराजकता, असमानता, अन्याय, मारामारी, एकटेपणा याव्यतिरिक्त काहीही नाही.
जंगलातल्या अन्नसाखळीमध्ये कोणी सगळयात मोठा असतो तर कोणी सगळ्यात खालच्या थरावर असतो. काही पशु हिसकावून खाण्यात तर कोणी सगळे गमावून बसलेला आहे. जंगलात कोणी शाकाहारी तर कोणी मांसाहारी, कोणी शिकार आहे तर कोणी शिकारी , आम्ही जे जंगल सोडून आलो तिथे आजही जीवन मरणाचा खेळ चालू आहे. कोणी मारत असत तर कोणी मरत असत. कोणी चिरत असत तर कोणी चारत असत. जंगलाचा फक्त एकच नियम आहे जगायचे असेल तर मरा नाहीतर मारा, लढा नाहीतर पळा. जो जिंकेल तोच फक्त जगेल. कमजोर प्राण्याला जंगलात कोणतीही संवेदना अजिबात नाही. Servival of fitest हाच जंगलाचा मुलमंत्र आहे.

   आम्ही कायमस्वरूपी जंगल सोडले आहे. आता आम्ही सभ्य माणसात राहतो. आम्ही माणूस बनलो आहोत...परंतु हा आमचा कदाचित भ्रम आहे, हे खोटे आहे हे पाखंड आहे. ती फक्त माणसांची झुंड आहे. आणि आमच्यासारख्या माणसांनी  याला समाज म्हणून समजूत घातली आहे. या समाजात देखील तेच नियम आहेत जे जंगलात चालतात परंतू माणसांच्या या सामाजिक जंगलामध्ये खूप भयानक अवस्था आहे..

   जंगलामध्ये खुप अराजकता असते परंतू कोणताही पशु पक्षी जनावरे आत्महत्या करत नाही. कोणीही भुकेने मरत नाही , कोणी पोटासाठी देह विकत नाही. जनावरांमध्ये कदाचित संवेदना नसतीलही परंतु कोणतेही जनावर आपल्या प्रजातीची हत्या करत नाही.  सर्व सोबत असतात इथे कोणताही भेदभाव नाही. जे मिळेल ते सर्वांना दिले जाते.

  माणसांच्या समाजात मात्र न्याय हा प्रत्येकाला वेगवेगळा आहे.  गैर बरोबरी जंगलात नाही तर माणसांमध्ये चालते. जंगलात एकाला जगण्यासाठी दुसऱ्याच्या मरावे लागते. तिथे वाघाच्या मुलालाही जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. माणसांमध्ये मात्र दुसऱ्यांना लुटावे लागते, हिसकावून घ्यावे लागते, शोषण केले जाते आणि त्याचाच व्यापार केला जातो. जंगलात नर आणि मादी समान असतात ते आपले कर्तव्य कामे नीट बजावत असतात. जंगलात नर मादीचे शोषण बलात्कार करत नाही मादी मात्र जंगल सृजन करते जंगलाला घडविते म्हणूनच
जंगल नारीप्रधान आहे. परंतू मानवी समाजामध्ये नारी
सर्वकाही कायम करत असते तरीही ती अपवित्र, त्यांना अग्निपरीक्षा दयावी लागते. भरलेल्या बाजारात तिला नागडे केले जाते. तिच्या देहाचा व्यापार केला जातो. तिला विकली जाते. तरीही तिची औकात शून्यच..

  जंगलात बलात्कार होत नाहीत.
मानवी समाजात मात्र बलात्कार पुरुषप्रधान परंपरेचा अविभाज्य घटक मानला जातो. जंगलात कोणताही धर्म नाही फक्त तिथे एकच नियम जीवन जगण्यासाठी संघर्ष..या नियमात कोणालाही सुटका नाही मग तो वाघ असो नाहीतर बकरी.. हरीण असो वा हत्ती.. सगळेच नियमाला बांधील.
मानवांमध्ये पण हे नियम आहेत परंतू  सगळ्यांसाठी नाहीत. काहींना संघर्ष नाही तर षडयंत्र करावे लागते. तर काही लोकांना कठोर संघर्ष.. संघर्षवाली लोक अनेक पिढ्या संघर्षच करत राहतात तर षडयंत्रवाले अनेक पिढ्या संघर्षच करत राहतात.

   षडयंत्र करून ही लोक संसाधने हडप करतात. सत्ता आणि धर्माच्या माध्यमातून समाजाचे नियम तयार करतात हे नियम फक्त त्यांच्याच फायद्यासाठी असतात. या धार्मिक नियमांना संघर्ष करणाऱ्या लोकांना अविभाज्य घटक बनवीला जातो.  हाच माझा समाज ज्यामध्ये बोटांवर मोजण्याइतके लोकांचे राज चालत आहे. माणसांकडून माणसांचे शोषण, अत्याचार, भ्रष्टाचार , गुलामी चाललेली आहे.

  आजादीच्या नावावर अनेक बंधने आहेत, इंसानियतच्या नावावर जातींच्या बेड्या, धर्माच्या नावावर पाखंड, सभ्यतेच्या नावावर चित्कार, शांतीच्या नावावर अत्याचार, भय, भूक, आणि भ्रष्टाचार. आणि धर्माच्या नावावर व्यापार..

यापेक्षा जंगल बरे! तिथे संघर्ष तर आहेच पण शोषण नाही. डर आहे पण भय नाही. भूक आहे पण भुकेने कोणी मरत नाही. धर्माच्या नावावर कोणी कुणाशी लढत नाही. माणसांच्या या समाजात संवेदना मेली आहे.

म्हणूनच जंगले कित्येक पटींनी चांगली सभ्य समाजापेक्षा असभ्य जनावरे खूप चांगली.. माणूस म्हणून मी लाचार आहे..अजूनही आम्ही माणूस बनलेलो नाही.

प्रदिप इरकर.वसई,पालघर.
राहायलाच मी वसईत,त्यात कामानिमित्त रोजचे मुंबईला जाणे होते आणि मुंबई लोकलचा प्रवास
या लोकल मधील गर्दीला जर मेंढरांची उपमा दिली तर मेंढरे देखील लाजून असे म्हणतील की आम्ही खरेच असे आहोत काय?😳😱
अहो अशा किती घटना रोज लोकल मध्ये किंवा प्लॅटफॉर्म वर घडतात ज्या मेंढरामध्ये कधीच घडत नसतील.कधी एका मेंढराला अक्षरशः तुडवत दुसरी मेंढरे गेलेले ऐकवलाय का तुम्ही?
डाउन लोकलमध्ये सीट मिळवण्यासाठी समोर येईल त्याला नको तिथे धक्के मारून गेलेले ऐकलंय का?
आपला रस्ता ओलांडून झाला पाहिजे म्हणून झुंड करून रास्ता ओलांडण्यासाठी गाड्या जागेवर थांबवल्या जातात काय कधी मेंढरांकडून?
ज्याप्रकारे माणसाच्या खुशीसाठी मेंढरू स्वतःचा जीव देतो त्याप्रमाणे माणूस दुसऱ्याच्या खुशीसाठी काहीतरी करतो का?

अहो छे छे... नाही आपल्यात व  मेंढरात साम्यता त्यापेक्षा कधी कधी आपल्यापेक्षा मेंढरेच परवडतील.

नामदेव डफळे ,सोलापूर.
नमस्कार मी या ग्रुपमध्ये नवीन आहे आणि पहिल्याच वेळी लिहीत आहे. लिहिण्यासाठी दिलेले विषय खरंच छान आहेत आणि ज्यावेळी त्याबद्दल आपण स्वतः लिहायचा प्रयत्न करतो त्यावेळी लक्षात येतं की ते बराच विचार करायला लावणारे आहेत.
  सर्वप्रथम विषय निवडणाऱ्या ऍडमिनना एका गोष्टी साठी दाद द्यावी वाटते ते म्हणजे त्यांनी विषय देताना 'मेंढरं आणि माणसं'असा न देता  'मेंढरं आणि आम्ही:साम्यता' असा थोडा विस्तृतपणे दिला , जे की अत्यंत गरजेचं आहे.कारण आपण बऱ्याचदा मेंढरांची प्रवृत्ती हा शब्दसमूह दुसऱ्यांचे दोष दाखवायला किंवा टीका करण्यासाठी वापरत असतो त्यावेळी स्वतःला त्यापासून आवर्जून वेगळं ठेऊन बोलत असतो.पण काही अपवाद वगळता , खरंच आपण त्या मेंढरांपेक्षा  वेगळे असतो का ??याबद्दल विचार करायला लावणारा हा अत्यावश्यक असा विषय आहे.
   आता आपण वरील विषयानुरूप मेंढरं (म्हणजेच त्यांची एक विशिष्ट वृत्ती/गुणधर्म या अर्थाने )आणि मेंढरांशी साम्य दर्शवणारं आपलं वागणं याबद्दल बोलूया.
 सुरुवातीला ,काय असते ही मेंढरांची वृत्ती ? इंग्रजीत त्याबद्दल काहीसं असं वाचायला मिळतं की 'Get one to go and they will all go'.  एकंदरीत सांगायचं झालं तर ' मेंढरं कळपाने राहतात आणि चालताना एक जात असेल तर बाकीचे सगळे त्याच्यामागे जातात '.हे झालं मेंढरांचं पण आपलं वागणं तर याच्यापेक्षा कुठं वेगळं आहे ?? यातलं साम्य म्हणजे आपल्या लोकांची सार्वजनिक जीवनातली कळपाने राहायची , एकामागे एक कुठल्याही गोष्टीचं अंधानुकरण करायची वृत्ती. या आपल्या वृत्तीच सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे आपली सोशल मिडियावरची वागणूक( हे फक्त एक उदाहरण देत आहे , बाकी आपल्या एकूण वागण्यालाच हा गुणधर्म लागू असल्याने देता येतील तेवढी उदाहरणे शक्य आहेत).माहितीस्फोटाच्या युगात ( माहिती - खरी , खोटी आणि जाणीवपूर्वक पसरवलेली खोटी  माहिती )सोशल मिडियाचा वापर करत असताना आपण बऱ्याच येणाऱ्या पोस्ट कोणतीही शहानिशा न करता , त्याबद्दल स्वतः काहीही स्थिरपणे विचार न करता , आणि त्याचा पूढे नक्की किती गंभीर परिणाम होणार आहे हे न पाहता व्हाट्सअप्प , फेसबुक आणि इतर माध्यमातून पुढे पाठवत असतो जे की खूपच घातक ठरत आहे. मी हेच उदाहरण निवडलं कारण त्याला तसा पुरावाही आहे तो म्हणजे - 'केवळ सोशल मिडियावरच्या अफवांमुळे आपल्या देशात मागच्या वर्षी जवळपास ३१ लोक अतिशय वाईट पद्धतीने mob lynching मध्ये जीवानिशी मारले गेले आहेत. हे खूपच भीतीदायक आणि आपल्यातल्याचसाठी धोकादायक असल्याने यावर लगाम म्हणून फक्त भारतासाठी व्हाट्सअपला msgs पुढे पाठवण्यासाठी ५ इतकी मर्यादा लागू करावी लागली आहे.'हे एकच उदाहरणसुद्धा आपण आणि मेंढरं काही वेगळं नाही आहोत हे उघडपणे दर्शवतं .
का वागतो आपण अस ? किंवा का वागतात मेंढरं अशी ? मेंढरं अशी वागतात कारण रस्त्याने एकटं चालताना दुसऱ्या जनावरांमूळे त्यांना जीवाची भीती वाटते म्हणून ते सतत एकमेकांच्या सोबत राहतात .तशाच प्रकारे आपणही सोशल मिडियावरती प्रस्थापित परिस्थितीशी विरुद्ध एखादी वास्तविक पोस्ट केली , सद्सद्विवेकाला अनुसरून वेगळं मत धारण केलं तर आपल्याला सोशलमीडियावरच्या ट्रोल्सरूपी जनावरांकडून ट्रोल होण्याची किंवा समूहातून एकटे पडण्याची भीती वाटते म्हणून आपणही  जास्त विचार न करता येणाऱ्या पोस्ट ( ज्या की बऱ्याचदा कुठल्यातरी विषारी प्रोपौगंडाचा भाग असतात )आपल्या हातून घडणाऱ्या जणू मानवी कल्याणासाठी म्हणून किंवा आपणही सगळ्यांच्या सोबत आहोत हे दाखवण्यासाठी पुढे पाठवत असतो.
आतापर्यंत आपण साम्य पाहिलं पण आपण एक मोठा फरक विसरतो त्यामुळे आपल्याला साम्य असलेली उदाहरणे जास्त दिसतात आणि तो फरक म्हणजे मेंढराना हाकायला मेंढपाळ असतो ज्याच्यावर विश्वास ठेवून ती मेंढरं वावरत असतात परंतु आपल्याला हाकणारा कुणी मेंढपाळ असण्याची गरजच नाही कारण आपल्याला दिशा दाखवायला ,स्वतंत्रपणे विचार करायला लावायला आपलं डोकं( बुद्धी )आपल्या धडावर अजून तरी टिकून आहे.  त्यामुळे आपण त्या बुद्धीचा जास्तीत जास्त वापर करून मेंढरांसारख अंधानुकरण न करता वास्तविकता काय आहे हे समजून घेऊन सोशलमिडियावरती आणि प्रत्यक्षात वागण्याची, बोलण्याची आज सर्वात जास्त गरज आहे. आज सगळीकडे माहितीचा विस्फोट होतोय ज्यात माणूस स्वतःला हरवून जात चालला आहे , त्यात स्वतःला हरवू द्यायचं नसेल तर स्वतःच्या चौकस बुद्धीचा वापर करण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. या विषयावर अजून खूप उदाहरणं देता येतील आणि लिहिता येईल असा हा विषय आहे.
  शेवटी सारखं सारखं एक जुनं गाणं आठवतंय म्हणून लिहावंसं वाटतं की आपण जर असचं मेंढरांप्रमाणे वागत राहिलो तर दादा कोंडकेंच्या  गाण्याचे बोल खरे ठरू लागतील. एकटा जीव सदाशिव मधल्या या गाण्यात दादा कोंडके म्हणतात -
जरा जपून चाल ग पोरी ,
गेली सांगून ज्ञानेश्वरी ,
अन मांसापरास मेंढरं बरी

डॉ. विजयसिंह पाटील. कराड.
आम्ही फिरून झाल्यावर हॉटेलकडे वळलो. आज फिरायला घारे गैरहजर होते. आदल्याच दिवशी कावळे सर आणि घारेंची कश्यावर तरी शाब्दिक धुसपुस झाली होती. आम्ही आत शिरताच समोरच घारे शेजारच्या एका आम्हाला अनोळखी असलेल्या व्यक्तीबरोबर मोठया तावातावाने चर्चा करत होते. आत शिरताना पुढं कावळे,(हे कायम पुढेच असतात ) मी , घोलप साहेब आणि इतर मागे होतो आबा काठी टेकत सगळ्यात मागे होते.  "काय तुम्ही पण त्याच्या मागे मेंढरागतं ' आणि याक्षणी त्यांचं लक्ष समोरून येणाऱ्या कावळे आणि आमच्या कडे गेले. कावळे तात्काळ शीघ्र संतापाने गरजले , " मेंढरं कुणाला म्हणता ?ऑ आम्ही मेंढरे आहोत ? जरा तोंड सांभाळून बोलावं , नॉनसेन्स ". छद्मी पणाने घारे उत्तरले ' छे छे, आपण कावळे आहात, मेंढरे नाही ' असं म्हणून बरोबर च्या व्यक्तीला ' तू जा घरी , मी आलोच मागून ' असं सांगितले.
तेव्हड्यात आबा आले . अबानी फक्त मेंढरे हा शब्द ऐकून
' काय घारे, ह्यो मेंढरांचा उद्योग कदी सुरू केला ? '
असं म्हणतात हॉटेल मध्ये थोडा हशा पिकला.
घारे पण हसले, कावळेनी नाईलाजाने हसल्यासारखे केलं.
घारे म्हणाले ' हा आता गेलेला किश्या माझा पुतण्या, गावी शेती करतो. ह्यानं '
हिथं कावळे सर त्यांना थांबवून ' करुद्या की त्याला मेंढीपालन , मेंढीपालन हा एक चांगला व्यवसाय आहे . ' आणि आबांनी जोरात काठी आदळली, दचकून कावळे सरांचं भाषण बंद झालं. पुढं घारे ' पुतण्याने आणि त्याच्या बायकोने मुलाला इंग्रजी शाळेत घालायचा विचार केलाय, तेच सांगण्यासाठी तो आलाय , मला काही ते पटलं नाही, सगळे जण करतायत म्हणून आपण पण तसं करायचं का ?मेंढरासारखे वागायचेच काय ? असं त्याला समजावून सांगत होतो .
गोडबोले आणि शेडगे एकदम म्हणाले ' घालू दे की त्याला इंग्रजी शाळेत ,  अडचण काय आहे ?'..

आबा  ' घारेंचं बराबर हाय , कायवो घारे तुमच्या पुतण्या आनी सून किती शिकलेत ? त्याना इंग्रजी येतं का ?नातवाला घरात कोन शिकवनार ? उगाच पैशाची नासाडी '.

घोलपसाहेब म्हणाले '  अगदी बरोबर बोलला आबा . कसं आहे की, हल्ली एकानं काही केलं तर बाकी सगळे मेंढरागतं त्याच्या प्रमाणे करायचं याची फॅशनच आलीय. घारेंचा पुतण्या खेड्यात राहतोय. दोघे नवरा बायको मराठीतून शिकलेले. पहिली दुसरी पर्यंत ठीक आहे. पुढं काय ? प्रत्येक विध्यार्थ्यांकडं शाळेने शिक्षकाने जातीने लक्ष द्यावे अशी अपेक्षा ठेवणंच गैर आहे. घरात अभ्यास घ्यावा लागतोच, तो कोण घेणार ? शिवाय घरातील सर्व मराठीत बोलणार, चुकून एखादा इंग्लिश शब्द कानावर पडायची मुश्किल, शिकवायचं तर दूरच. आणि त्याही पेक्षा आपण आपल्या मातृभाषेत विचार करतो, मराठीत विचार करतो, बंगाली माणूस बंगाली भाषेत, तर इंग्रज इंग्लिश मध्ये. आपला पोरगा मराठीत विचार करणार, त्याचं इंग्लिश मध्ये मनातल्या मनात भाषांतर करणार आणि मग इंग्लिश बोलणार, हे किती अवघड आहे हे लक्षातच येत नाही लोकांच्या . बरं एव्हडं व्याप करून , तिप्पट चौपट खर्च करून त्याचं अपेक्षित फळ मिळते का ? माझं स्पष्ट मत नाही असे आहे.
त्याला चांगल्या मराठी शाळेत घाला , सगळे विषय त्याला समजून घेऊ द्या, घरी आपल्यालाही लक्ष देता येईल, बरोबर आहे का मंडळी ?  '
पुढं ' हल्ली जो तो कश्याच्या पण मागं लागतोय, उदा. आणि ती फाटकी जीन प्यांट. चांगली पॅन्ट घ्यायची  आणि मग फाडायची. एक एक छेद असलेली जीन्स घालतोय , तर दुसरा दोन छेद असलेली तर तिसरा तीन छेद असलेली पॅन्ट घालतोय,  ह्याला फॅशन म्हणायचं ?. एकानं घातली की लागली सगळी लेंढारं त्याच्या मागे. जस्ट हॉरीबल,, आय जस्ट कान्ट इमाजीन , काय चाललंय हे...
आबा म्हणाले ' अक्षी बराबर बोलला बगा सायेब, अवो चार दिसाच्या मागं, म्या शेतात होतु. एक छलपाट पोरगं आलं, त्याचा अवतार बगून मला कसं तरीच झालं. पिवळा शर्ट आनी गुढघ्यावर फाटलेली पॅन्ट. डोक्याला बुचडयासारखे केस, डोळ्यावर धा रंगाचा चष्मा.
रानात म्या एकलाच हुतो, पांडा ( आबांचा मोठा मुलगा ) कसल्यातरी कार्यक्रमाला गेलता. कुठल्या तरी कंपनीचा माणूस व्हता त्यो. लै काय बाय सांगत व्हता. मी गप कान पाडून त्येच्या अवतारकडं बगत बसलू. त्याच बोलुन झालं. म्या ईचारलं ' सायेब ,  कंपनी काय हजरी , पगार बिगार देती का न्हाय ?. मोठया ऐटीत त्यानं सांगितलं मग भरपूर पगार देते आमची कंपनी. मंग म्या ईचारलं ' मंग अशी कापडं का घातलीस ? ह्यो बायमाणसाच्या चोळीसारका अंगाला घट्ट शर्ट , ही फाटकी प्यांट, पायात शिल्पर , अरं कसला अवतार केलास म्हणायचा ?'
पोरगं जे xxx ला पाय लावून पळालं म्हणता ' असं म्हणून आबा आणि आमच्या सकट सगळं हॉटेल हसायला लागले. त्यात दोन तीन कॉलेजच्या फाटक्या जीन्स घातलेल्या कॉलेज वीरांनी  हळूच तिथून पोबारा केला.
त्यो इंदुरीकर महाराज म्हनतो ते काय खोटं न्हाय. मध्येच इंदोरीकर महाराज कुठून उगवले हे काही आम्हाला कळेना. आबाच पुढं म्हणाले 'इंदोरीकर म्हनतात ' ती केसांची कसली स्टाईल म्हणायची , अवो दोनी कानाच्या बाजूनं रान नांगरलेल्या सारकं डोकं भादरलेलं , एका बाजूला लसणाचा वापा आनी दुसऱ्या बाजूला कांद्याचा वापा , आनी वरती भोंगळा ' इथं हसून हसून सगळ्यांच्या पोटात दुखायला लागले. अजून दोन तीन मुलं हॉटेलातून गायब झाली.
कावळे सरांनी बऱ्याच वेळानं तोंड उघडलं ' अबसोलुटली करेक्ट , पटलं बुवा आपल्याला, आणि  हो , अमुक दुकानात सेलचा फंडा, म्हणे दोन ड्रेस घ्या आणि त्यावर तीन फुकट घ्या , किती गर्दी तिथं, युसलेस ..' पण तुम्ही तिथं काय करत होता असं विचारताचं ' अहो बायको घेऊन गेली. बायकोला नाही म्हणायची टाप आहे का कुणाची ?  
अहो साड्यांचा ढीग पडलेला होता, एक बाई साडी हिकडून ओढतीय, तर दुसरी दुसऱ्या बाजूने, भांडणं व्हायची वेळ आली होती, बायकोनं चांगल्या दहा साड्या घेतल्या. पाच हजाराना लागला चुना '
घोर चिंतेत पडलेले घारे  चुना हा शब्द ऐकताच भानावर आले आणि चटदीशी त्यांनी तंबाखूचुन्याची डबी कावळे सरांच्या समोर धरली. तंबाखू दर्शनाने त्यांचं दुःख कमी झाल्याचे आम्हाला जाणवलं .

शेवटी घोलप साहेब ' थोडक्यात प्रत्येकजण दिखाऊ पणाच्या मागं लागलाय मग ते शिक्षण असुदे नाहीतरी गाडीघोडा असुदे, माझा मुलगा यावं शाळेत आहे, मी सिंगापूरला जाऊन यायचं म्हणतोय, शेजाऱ्यांनं गाडी घेतली की झाली यांची तयारी गाडी घ्यायची, मी इतकं भारी इंटेरिअर केलं आणि मी त्यांव केलं.राजकारण हा विषय वेगळा तिथं पण  सगळा मेंढरांचा बाजार . मेंढरं परवडली , ती निदान मालकाच्या सूचनेनुसार तरी चालतात. पण माणूस विचारच करायचा बंद झालाय. ना कुणाची भीती ना कुणाचा धाक. हे विश्व ज्याच्या जोरावर चाललंय, त्या देवाला पाया पडलं की झालं . आपण मंदिरात देवाच्या पायाशी कायतरी मनापासून वाहायचं याचा सोयीस्कर अर्थ काढून देवाला दहा रुपये दान करायचे आणि शंभर मागायचे असं झालंय हल्ली. विकारांच्या अहारी गेलाय माणूस ..
दिवसेंदिवस परिस्थिती अवघड होत चाललीय..


शिरीष उमरे,नवी मुंबई.
विषयाचे शीर्षक वाचताच आठवले मेंढरांचे लांबच लांब कळप खासकरुन रस्ता ओलांडतांना डोके खाली करुन एकामागोमाग एक चिपकुन लगबगीने चालणारी मेंढरे....

एक कॉर्टुन फील्म आठवली ज्यात सगळी मेंढरे  पटांगणात जमलेली असतात व माइकवर त्यांचा नेता (मेंढीची लोकर ओढलेला लांडगा) त्यांना सांगत असतो की ह्या हीवाळ्यात सगळ्याना थंडीपासुन बचावासाठी ब्लँकेट दिल्या जातील. सगळी मेंढरे खुष होतात. नंतर त्यांच्याच अंगावरची लोकर काढुन त्यांना पातळशी ब्लँकेट दीली जातात.

आपणही काय करत असतो वेगळे ?!! इलेक्शनच्या वेळी नेते लोक मोठीमोठी आश्वासने देतात व आपण खुष होतो. मग टॅक्स च्या पैश्यातुन काही तुकडे आपल्यासमोर फेकतात व स्वत: केक खातात.

मेंढरांच्या कळपासोबत काही रानटी कुत्रे असतात. मेंढरांना वाटते की लांडग्यांपासुन बचाव करण्यासाठी आहेत ही कुत्री पण खरेतर कळपापासुन कोणी पळुन जाऊ नये म्हणुन ठेवली असतात धनगराने...

आपलही सेम आहे की हो... पोलीस आपल्या रक्षणासाठी आहेत असे वाटते पण ते गुलाम असतात सरकारचे. कोणी अन्यायाविरोधात आंदोलने केली तर त्यांच्यावर लाठीमार करणे, गोळीबार करणे असल्या कामासाठी त्यांची नेमणुक होते की काय असे वाटते.

मेंढरांना स्वत:चे मत नसते. मेंढपाळ लाठीने जी दिशा देईल तिकडे चालणे, जिथे चरायला सांगितले तिथे चरणे व जिथे राहायला सांगितले तिथे राहणे आणि मालकाला दुध, लोकर व कधीकधी स्वत:चे मास देणे ह्यालाच ती जीवन समजतात. फारसे डोके लावत नाही...

माफ करा पण काही साम्य वाटते का त्यांच्यात व आपल्यात ?

जे शिकवले ते शिकायचे... जेवढे सांगितले तेवढे काम करायचे.. सकाळी कामावर जायचे... संध्याकाळी परत यायचे... कुत्र्याच्या व लांडग्याच्या भितीने एकत्र राहायचे... टॅक्स इमानदारीने भरायचा. कधीकधी देशासाठी जीव द्यायचा... वेगळे स्वप्न बघण्याचा गुन्हा केला तर कत्तलखाना आहेच. पळुन जाण्याचा कींवा कळपाचा नियम मोडला तर मार आहेच...

ही लोकशाही आहे की मेंढरांची लांडगेशाही ?? जागृत व्हा मित्रांनो ...मेंढरे नाही .. चांगला माणुस बना ... योग्य नेता निवडा.

किशोर शेळके. लोणंद,सातारा.
मला माणसात अन् मेंढरात साम्य दिसत नाही. माझ्या मते, मेंढरं जरा बरी, पण माणूस नितीमत्तेला सोडूनच वागतो....

      परवा काही कामानिमित्त पुण्याला गेलो होतो. पुण्याच्या बाहेरच टोलनाक्यावर गर्दी असल्याने आमची गाडी रांगेतच उभी होती. समोर चार गाड्या असल्या कारणाने मी माझी गाडी बंद केली, आणि थोडं बाहेर डोकावून पाहिलं, पलिकडच्या रांगेत एक कार उभी होती. रांगेतच समोर दुसरी कार उभी होती. पुढिल कार थोडी पूढे गेली आता दोन्ही कारच्या मध्ये थोडी जागा होती. पाठीमागच्या बाजूने बीएमडब्ल्यू ची महागडी कार आली आणि दोन्ही कारच्या मधे घुसवली. पण घुसवत असताना मागच्या कारला थोडी धडक बसली. धडकेचे नुकसान वेगळेच, पण अर्धा पाऊण तास त्यांचे भांडण बघून सगळं ट्रॅफिक जॅम झालं. आता या सुशिक्षित वर्गाची ही बोंब असेल, तर यांच्यापेक्षा मेंढरं बरीच ना!. निदान मेंढरांचा कळप व्यवस्थित, लयात, एका रेषेत चालतो. माणसांसाठी नियम असतात, तरी त्यांच्याकडून पाळले जात नाहीत. आणि मेंढरांसाठी नसतात, पण वागतात मात्र नियमबद्ध.

        हे एक उदाहरण झाले, पण हे मानवी वागणं खरंच मेंढरांपेक्षा खालच्या दर्जाचे आहे. आपण स्वतःला सुशिक्षित म्हणवून घेतो आणि क्षुल्लक कारणातही आपण आपला अडाणीपणा दाखवतो. आणि हा सुशिक्षितमधला अडाणीपणा फक्त रस्त्यापुरता मर्यादित नाही. प्रत्येक क्षेत्रामधे हीच परिस्थिती आहे. मेंढरांचं दिवसभराचा दिनक्रम ठरलेला असतो. हा दिनक्रम मेंढरांचा मालक ठरवतो. पण माणसाचा दिनक्रम, आठवड्याचे सहा दिवस जरी बांधील असला तरी सातव्या दिवशी स्वतःच राजा. मेंढरांच्या मनात असो वा नसो, मालक ठरवेल तिथे दिवसभर चरावे लागते, पण माणसाच्या थोडं तरी काही मनाविरुद्ध घडलं की त्यांची चिडचिड सुरू झाली म्हणून समजा.

      याचे विश्लेषण करताना 'एकटा जीव सदाशिव' या चित्रपटातील दादा कोंडकेचे हे गाणे आठवतंय.

 माणसा परास मेंढरं बरी
त्याला खायाला दिलं तर खातंय
न्हाय दिलं तर उपाशी राहतंय
दिलं हाकलून माघारी येतंय
काय बोलत न्हाय, काय मागत न्हाय, जीव लावतंय माणसावरी.

         आणि माणसांत वरिल एक तरी गुण दिसतो का? माणूस उपाशी राहू शकतो का? का स्वतःचा स्वार्थ साधण्याखेरीज जीव लावतो कुणावर?

         याचं सुंदर उदाहरण म्हणजे 1987 ला प्रदर्शित झालेला निळू फुले आणि सरला येवलेकर यांचा मराठी सिनेमा 'माणसा परीस मेंढरं बरी'. सावकारकीचा माज असलेल्या लांडग्यानं समाजरूपी मेंढरांना कसं चिरडलं हे प्रत्यक्ष अनुभवलेलं, हा सिनेमा खय्राखुय्रा जिवनात घडत असलेल्या अन्यायाला उजाळा देतो. आणि शेवटी हे म्हणावंच लागतं की, 'माणसा परी मेंढरं बरी'....


शीतल शिंदे.दहिवडी ,सातारा .
माणसा पेक्षा  मेंढरे केव्ह्याही बरीच म्हणावे लागतील .
माणसांपेक्षा मेंढरांत चांगले दोनच गुण आहेत ते म्हणजे एकिने राहणे आणी  दुसरा म्हणजे कोणाला ईजा न पोहोचवणे .
  उलट लोक स्वतःचे  पोट भरण्यासाठी दुसऱ्याच्या पोटावर पाय देतात .एकमेकांची माथी भडकवतात .
   स्वतःच्या बुद्धीचा वापर न करता दुसऱ्यांचे क्रुत्य करायचे , त्यांचे तरी काय चूकतेय म्हणा आपली रुढी परम्परा .वेगळे काही केले की धर्म बुडेल .धर्म काय घरात खायला आणून दे तोय काय ?  बाप दादांनी केले तेच मुलांनी , नातवंडानी करायचे .
  
कोणी काय सांगितले की छो  कुत्र्या 🐰उभे कान .निवडणुकित  चार पैसे कोणी फेकले की त्याच्या मागे पळायचे .मग त्या पार्टीने पाच वर्षे किती का अन्याय करेना .आपल्याला काय पैसे मिळाले की बास .मत विकले सम्पला विषय म्होरक्या म्हणेल✌ ती पूर्व दिशा .ही आपली मेण्ढक 🐑🐑  व्रुत्ती .स्वतःचे अस्तित्व विकून टाकून आपणच आपल्या पुढच्या पिढीला भ्रष्ट आणी लाचार बनवून समाजामध्ये प्रामाणिकपणे भ्रष्टाचार करणारे नेते तयार करायला हातभार लावायचा .

मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत पण तेच .त्यांचे मत , आवड - निवड जाणून न घेता शेजाऱ्यांनी मुलाला जे शिक्षण दिले तेच आपण पण दयायचे .आणी मग जबरदस्तीने ईछ्या नसताना  लादलेल्या गोष्टीं मुले ताण - तणाव निर्माण होवून मानसिक द्रुष्ट्या खचीकरण होते याकडे पालकांनी लक्ष्य देणे गरजेचे आहे.

अलीकडे मुलांची  हेअर स्टायल पहिली तर मेंढीच्या पाठीवर काढली जाणारी लोकरीची डिज़ाइन आठवते.जसे गझणी मधे डोक्याला ओरबडलेले हेअर कट आहे तसे मेंढी च्या पाठीवर डिज़ाइन , गोंडे राखलेले असतात. मेंढीचा आदर्श्य घेण्यापेक्षा एखादया  महापुरुषांचा आदर्श घेवून त्यांच्या विचारांचा आदर्श घेतलेला केव्हाही चांगलेच.

सर्व बाबतीत आपल्याला हेच पहायला मिळते .एखादया बाबांनी , गुरुंनी काही सांगितले की त्यांच्या मागे पळायचे .त्यांनी दिलेले मल मूत्राचे पाणी प्रसाद म्हणून प्यायचे .लगेच अंध विश्वास ठेवायचा .हात पाय न हलवता बघू बरे घरात पैसे येतात काय 🤔? पण विचार कोण करतो .विरोध केला तर कोप होईल आणी धर्म बुडेल .धर्माच्या नावाखाली हातात कटोरि का घ्यायचे  होईना .सर्वानुमते काय व्हायचे ते होईल .अधोगतीची
पाऊले चालीती ....   . ...वाट .

      आपला एकच देश असा आहे की तेथे देवाला दुधाने आंघोळ घातली जाते आणी माणसांना मूत्र प्यायला लावला जातो .
  मेंढरे असे तर काही करत नाहीत ! !


अनिल गोडबोले,सोलापूर.
आता गम्मत अशी आहे की साम्यता लिहायला बसल की विरोधी गोष्टी आठवायला लागतात. पण साम्यता आहे ही शरमेची बाब आहे की अभिमानाची हेच आम्हाला कळत नाही.

मेंढरे एका लाईन ने चालतात. एका मागोमाग जातात. एकत्र खड्यात पडतात. त्या प्रमाणे प्रगत असलेले आपण सुद्धा कोणाच्या तरी सांगण्यावरून "असेल बरोबर तो म्हणतोय तर.. आपल्याला काय करायचं!" या विचारांनी अंधानुकरण करून मेंढरे आहोत हे सिद्ध करतो.

मेंढरे झाडपाला खातात आणि मालकाला आपली लोकर देऊन टाकतात. त्या बदल्यात त्या फार काही मिळवत नाहीत पण मालक मात्र त्यावर भरपूर कमाई करतो... त्या प्रमाणे आपल्या कडे काहीजण सेवा करतात आणि त्यांचे मालक त्यांना आयुष्यभर वापरून घेतात.. पूर्ण सुविधा आणि सन्मान न देता

मेंढरे कळपात राहतात आणि तिथे सुरक्षित समजतात आता मानासाविषयी फार काही बोलायची गरज आहे असे मला।वाटत नाही.

मेंढरे शेतात लेंडुक टाकण्यासाठज चरवली जातात.. म्हणजे यांची किंमत तेवढीच वर या कामाचा काही जणांना फार आनंद वाटतो.

मेंढरे जास्त किमतीला विकली जातात आणि एका काळापातून दुसऱ्या काळापात जातात... माणसात देखील शिकून कम्पनीत नोकरी करणार्यांना वेगळी वागणूक नसते..

असो... काहीजण धडपडतात, बाजूला पडतात पण सतत वाघाची नजर यांच्या सारख्या वेगळ्या झालेल्या पिल्लावर असते.. काळ झडप घालून गडप करून टाकतो.. (स्वतंत्र निर्णय घेणाऱ्यांची अवस्था)

तर.... मेंढरे बनायचं की माणूस हे आपणच ठरवू.. नाहीतर दादा कोंडके म्हणूनच गेलेत.
"सांगून गेली ज्ञानेश्वरी.. माणसा परास मेंढरं बरी!"


हरीभाऊ यादव,मंगळवेढा,सोलापूर.
मेंढरे आणि आम्ही,साम्यता हा विषय जेव्हां वाचला, तेव्हां मला माझ्या लहानपणीची दिवाळी आठवली, आडीच एक हजार लोकसंख्या असलेल, माण नदीच्या काठावरील मारापूर हे खेड, सगळे सण उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे व्हायचे. दिवाळीच्या पाडव्यादिवशी मेंढरांचा एक मजेदार कार्यक्रम असायचा, गावातील दोन चार जणांचे मेंढरांचे कळप एकत्र करुन वाजत गाजत गावात आणले जायचे, गावचे ग्रामदैवत खंडोबाच्या मंदीराच्या कडेनी त्यामधील ज्या मेंढीला आगोदर प्रशिक्षण दिलेले असायचे, ती मेंढी सगळ्या मेंढ्यांच्या पुढे असायची व तिच्या पुढे  भाकरीचा एक तुकडा हातात घेवून मेढपाळ मंदीराला प्रदक्षिणा घालत पळायला सुरुवात करायचा.
पुढची मेंढी भाकरीसाठी पळायची,  तिच्या मागे दुसरी मेंढी पळायची, व एक एक करत सगळ्या मेंढ्या पळायच्या व ज्यावेळी शेवटच्या मेंढीजवळ मेढपाळ पोहोचायचा, त्यावेळी तो हळूच बाजूला निघायचा, परंतू मेंढ्या मात्र एका मागून एक पळत राहायच्या, गोल रिंगन तयार झाल्यामुळे तो खेळ बघायला खुप मजा वाटायची, पण त्याबरोबर एक विचार मनात यायचा की मेंढ्या एवढ्या अनुकरणप्रीय कशा असू शकतात. परंतू पुढे महाविद्यालयामद्धे शिक्षण शिक्षण घेत असताना, कांही व्यावसायिक मंडळी तरुण विद्यार्थ्यांना  व्यसनाच्या विळख्यात अडकवून बाजूला निघायचे, व एकामागून एक तरुण कोणताही विचार न करता, व्यसनात आडकत जायचे, हे पाहताना माझ्या डोळ्यासमोर मंदीराच्या कडेनी पळनारी मेढ्यांची रांग दिसू लागली,व माणसात आणि मेंढरात फार मोठ साम्य असल्याची प्रचीती आली.

(यातील सर्व छायाचित्रे इंटरनेटवरून घेतलेली आहेत.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************