शिरीष उमरे, नवी मुंबई
मी सामाजिक क्षेत्रात काम करत असुनही ज्यांच्या विचाराचे व आचाराचे अनुकरण करणे महाकठीण वाटले ते म्हणजे गाडगेबाबा आणि गांधी !!
आईवडीलांच्या व शिक्षकांच्या संस्कारामुळे सर्वधर्म समभाव, जातपात न मानणे, अस्पृश्यता न पाळणे, स्वदेशी ची आवड, निर्भयता, सत्याग्रह, मितव्यय, स्वावलंबन ह्याची बीजे लहाणपणापासुन रुजली होती.पुढे जाऊन हे गांधींचे विचार व आचारसरणी होती हे उमजले.
हा हाडामासाचा माणुस उच्चशिक्षीत होता. प्रयोगशील वृत्तीमुळे भरपुर चुका केल्या. वाईट म्हणता येईल ते सगळे करुनही ह्याला इतके जनसमर्थन कसे ह्याचे सुरुवातीला मला आश्चर्य वाटायचे... नंतर ह्यांचे चरीत्र लेखण वाचत गेलो तेंव्हा कळाले की हे अवघड प्रकरण आहे.
स्वत:च्या चुका मान्य करणे व आयुष्यभर ती चुक न करणे आणि पश्चाताप करुन त्यावर कायम समाधान शोधणे हे हीमालय चढण्यापेक्षा महाकठीण काम आहे. हे लिलया करणारे गांधी मला जास्त झेपले नाहीत.
सोपे सोपे पेलेल एवढे विचार पचवुन अंमलात आणण्याचा प्रयत्न आजही सुरु आहेत.
नेहमी खरे बोलण्याचा प्रण अजुनही यशस्वी झाला नाही. निरुपद्रवी खोटे बोलण्याने काही होत नाही अशी स्वताचीच समजुत घालतो.
खादी कपडे आवडतात पण हीवाळ्यात स्वेटर घालतो. रंगीबेरंगी कपडे वापरतो.
मित्र कंजुस म्हणतात पण रीयुज, रीसायकल करायचे सोडत नाही. भ्रष्टाचार करत नाही. दुसर्याने केलेला आवडत नाही. बरेचवेळा मुर्खात काढतात लोक पण खरच छान गाढ झोप येते.
स्वताचे ताट धुणे, घर झाडणे, टॉयलेट स्वच्छ करणे, कपडे धुणे ह्यात कधीच कमीपणा वाटला नाही.
सगळ्या जातीधर्माचे जिवलग मित्र आहेत. कर्मकांडात कधी पडलो नाही त्यामुळे सगळे नास्तिक समजतात. मित्रांसोबत कधीमधी बसतो पण माझे पैसे कधीच खर्च करत नाही. 😜
गांधीबद्दल इतके चांगले वाईट ऐकले व वाचले आहे की मी गोंधळुन जातो...मग एकच केले की जे चांगले वाटले ते अनुकरण करुन बघितले आणि जे वाईट वाटले ते केले नाही...
आज दीडशे वर्षापुर्वी जन्मलेला व पन्नास वर्षापुर्वी मृत्यु पावलेला व्यक्ती पुर्ण जगात आपल्या विचार व आचाराचे गारुड करुन आहे त्या व्यक्तिमत्वाबद्दल अजुन काय लिहावे ?? 🙏🏼😇
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
पी.प्रशांतकुमार,सावेडी,अहमदनगर..
गांधी हा encyclopedia आहे.. आपली जितकी कुवत तितकी ओंजळ भरून घ्याची..
.. शिवाशीव- भेदाभेद हे मी माझ्या पातळीवर कधीच पाळले नाही.. फक्त जातीतलेच नाही तर आर्थिक सामाजिक पातळीवरही..
... तुम्ही प्रत्येक वेळी खूप मोठा उद्देश ठेवूनच कार्य करावं असं नाही तर तुमच्या छोट्या-मोठ्या वागण्याचा बोलण्याचा आपोआप तुमच्या मुलांवर परिणाम होत असतो..
.... आज आपल्याला गरज आहे ती ..स्वच्छ भारत-सशक्त भारतची...प्रत्येकवेळी कॅमेरासमोर चमकोगिरी करून आपण आपल्यालाही फसवतच असतो..
...मी कचरा करत नाही,तो व्यवस्थित कचराकुंडीत टाकतो.. अगदी ट्रिपला गेलो तरी चॉकलेट वगैरेचे रॅपर रस्त्यावर टाकत नाही..आणि आता घरातलेही सगळे तसंच करतात..
.....मला धर्म-भाषा-जात याच्या शृंखला आवडत नाही.. भारत एकसंघ आहे आणि तसाच राहावं हे मत.. आताही आपल्या कृतीतून जोडो भारत साठी काय करता येईल हे पहातो..
.... तुमच्या साध्या-साध्या कृतीने भले मोठा परिणाम होत नाही पण छोट्या प्रमाणात नक्कीच कुठेना कुठे त्याची दखल घेतलीच जाते..
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
गणेश भंडारी, अहमदनगर
आज गांधी जयंती! आज आपण सर्वत्र गांधीजींचा जयजयकार करतो, त्यांनी केलेल्या कार्याचे गोडवे गातो. त्यांचे कार्य व त्यांनी सांगितले विचार जयजयकार करण्यासारखेच आहे. पण असा जयजयकार करीत असताना आपण या महात्म्याने सांगितलेले विचार, मूल्ये, तत्वे आपल्या स्वतःच्या आचरणात आणतो का, आणत असल्यास कितपत आणतो, त्यात काही अजून सुधारणा करू शकतो का, जर आणत नसू तर ती कशी आचरणात आणता येतील याचाही विचार केला पाहिजे. नाहीतर त्यांचे विचार कागदावरच राहायचे व आपण केवळ विभूतीपूजेतच मग्न राहू! त्यांच्या विचारांवर आचरण करणे हेच त्यांना खरे अभिवादन असेल. याच अनुषंगाने मी सध्या गांधीविचारांचा आचरणाचा बाबतीत नेमका कोठे उभा आहे, याचे अवलोकन करायचे ठरवले. त्या अवलोकणातून जे काही हाती लागले, ते आपणासमोर मांडीत आहे.
सर्वप्रथम आपण गांधीविचार म्हणजे नेमके काय, ते पाहूया. गांधीजींनी त्यांच्या आयुष्यात वेळोवेळी अनेक महान तत्वांचे प्रतिपादन केले. त्यांनी सांगितलेली सर्व प्रमुख तत्वे 'एकादश व्रते' यात समाविष्ट आहेत. या एकादश व्रतांचे विवेचन गांधीजींनी 'मंगल प्रभात' या पुस्तकात खूप छान पद्धतीने केले आहे. जिज्ञासूंनी हे पुस्तक अवश्य वाचावे. एकादश व्रतांत सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, शरीरश्रम, अस्वाद, निर्भयता, स्पर्शभावना, सर्वधर्म समभाव व स्वदेशी यांचा समावेश होतो. याशिवायही त्यांनी व्रतांचे पालन करण्यासाठीचा निग्रह, दृढनिश्चय, स्वावलंबन, सेवावृत्ती, स्वयंपूर्णता, अन्यायाला विरोध इ अनेक तत्वे सांगितली आहेत. खरे तर ही तत्वे भारतीय संस्कृतीत खूप प्राचीन काळापासून अस्तित्वात होती, पण गांधीजींनी त्यांना एक सुसंगत रूप दिले व त्यांचे विविध बारकावे सांगितले. म्हणून या सर्वांना आपण सोयीसाठी गांधीविचार असे म्हणूया.
आता या गांधीविचारांचा मी माझ्या प्रत्यक्ष जीवनात उपयोग करण्याचा कसा प्रयत्न करतो, हे थोडक्यात स्पष्ट करतो. येथे एक गोष्ट मी स्पष्ट करू इच्छितो, की हे लेखन मी माझी बढाई मारण्यासाठी किंवा मोठेपण मिरवण्याची करीत नसून मी नेमका कोठे उभा आहे, मला कोणत्या सुधारणांची आवश्यकता आहे हे माझ्या लक्षात येण्यासाठी करीत आहे. त्यातून इतरांना काही मिळाले, काही फायदा झाला, तर मला आनंदच होईल.
सत्य आणि अहिंसा ही गांधीजींची सर्वात महत्वाची व तितकीच प्रसिद्धी पावलेली तत्वे. अहिंसा म्हणजे केवळ दुसऱ्याची हिंसा करणे नव्हे, तर तिला यापेक्षाही अनेक विविधार्थी पदर आहेत. मी स्वतः शाकाहारी आहे. तसेच इतर प्राण्यांना कोणत्याही कारणाने मारण्याआधी किंवा इजा पोचवण्याआधी अनेकदा विचार करतो. पण ही अहिंसेची ढोबळ व्याख्या झाली. सुक्ष्मार्थाने अहिंसेचे पालन करण्याचा मी प्रयत्न करतो. म्हणजे दुसऱ्यांना केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक पीडा होणार नाही याची काळजी घेतो. अर्थात ते मला अजून पूर्णपणे साधत नाही. माझ्या बोलण्यातून किंवा कृतींतून इतरांना काही त्रास होत असेल तर त्याची जाणीव मात्र होते आणि मनाला वेदनाही होतात. हे मी योग्य मार्गावर असल्याचे लक्षण आहे असे मी मानतो. मी शक्यतो दुसऱ्यांविषयी काही निर्णय घेताना किंवा दुसर्याशी बोलताना-वागताना त्यांच्या जागेवर मला स्वतःला ठेऊन पाहतो. त्यामुळे आपल्या हातून दुसऱ्यांना दुखावण्याची शक्यता कमी होते. सत्य म्हणजे खरे बोलणे व वागणे. आता रोजच्या व्यवहारात पूर्णपणे सत्य वर्तन मला साधत नाही. अनेकदा परिस्थितीवश किंवा प्रसंगवश खोटे बोलण्यात येते. तरीही जेवढे जास्त शक्य होईल, तेवढे सत्य वागण्याचा मी प्रयत्न करतो. विनाकारण आपल्याकडून खोटे बोलले जाणार नाही, याची काळजी घेतो. खोटे बोलण्याचे नैतिक दुष्परिणाम तर आहेतच, पण व्यवहारातही त्याचे अनेक तोटे आहेत. खोटे बोलून कधीकधी आपला तात्कालिक फायदा होत असेलही, पण एक खोटे शंभर खोट्यांना जन्म देते याची मला जाणीव आहे. रोजच्या वागण्यातही काही बारीकसारीक गोष्टींची मी काळजी घेतो. जसे की, समजा आपण एखाद्याला म्हटले, की थांब मी दहा मिनिटांत आलोच, तर ती दहा मिनिटांनी मर्यादा पाळण्याचा प्रयत्न करणे, एखाद्याला काही करण्याविषयीचे दिलेले आश्वासन कसे पूर्ण करता येतील हे पाहणे इ. या गोष्टी दिसताना छोट्या दिसतात, पण त्या आपल्या स्वभावाला एक वळण देतात.
अस्तेय म्हणजे चोरी न करणे. यात प्रत्यक्ष चोरी करण्याचे मी टाळतोच, पण दुसऱ्याच्या हक्काची एखादी गोष्ट बळकावणे, व्यवसायात खोटी वजनेमापे वापरणे, एखाद्यकडून अनावधानाने जास्त पैसे मिळाले, तर ते ठेऊन घेणे हेही टाळतो. तरुण वयाचा परिणाम म्हणून काही भावना या स्वाभाविक असल्या तरी त्यामुळे माझे मन मालिन होणार नाही याची मी काळजी घेतो. अपरिग्रहाच्या बाबतीत खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. मला खूप संपत्ती मिळवायची आहे, श्रीमंत व्हायचे आहे, पैशांच्या जोरावर लोकांवर सत्ता गाजवायची आहे, या भावनांवर मी नियंत्रण मिळवू शकलो नाही. तरीही त्यातल्या त्यात माझ्या गरजा कमीत कमी कशा ठेवता येतील, राहणीमान साधे कसे राखता येईल, किमान साधनांचा उपयोग करणे या गोष्टींचा मी प्रयत्न करतो.
बँकेतल्या नोकरीमुळे शरीरश्रमास वाव मिळत नाही. तसेच मला अल्पदृष्टीचा त्रास असल्याने शरीरश्रम करण्यावर अनेक मर्यादा येतात. तरीही जेव्हा शरीरश्रम करण्याची संधी मिळेल, तेव्हा तिचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतो.
गांधीजींच्या सर्व तत्वांत मला सर्वात जास्त आवडलेले तत्व म्हणजे अस्वाद. अस्वाद म्हणजे कोणत्याही गोष्टीचा-अन्न, कपडे व इतर गोष्टी- केवळ इंद्रियसुखांसाठी रसास्वाद न घेणे, तर त्या केवळ शरीराचे भरणपोषण व संरक्षण करण्याच्या दृष्टीने वापरणे. मी शक्यतो जेवण करताना चव थोडी कमीजास्त झाली तरी तक्रार करण्याचे टाळतो. ताटात जे काही येईल, ते गोड मानून खातो. पण अजूनही काही थोडे पदार्थ मी खाऊ शकत नाही. कपड्यांच्या बाबतीतही तसेच. अस्वाद हे तत्व प्रभावीपणे अमलात आणता आले, की इतर तत्वांचे पालन करणे सोपे होते, असे गांधीजी एके ठिकाणी म्हटले आहेत. निर्भयतेची बाबतीतही मी थोडीफार प्रगती केली आहे. निरर्थक गोष्टींची, उदा. भूत, अंधार, विविध प्राणी यांची भीती मनातून काढून टाकण्यात मी मोठ्या प्रमाणात यशस्वी झालो आहे असे मला वाटते. अन्यायाच्या विरोधात कोणाविरुद्ध निर्भयपणे उभे राहण्यास मात्र मॅन अजूनही कचरते.
स्वावलंबन व स्वयंपूर्णता साध्य करण्यास पुन्हा माझे अपंगत्व आड येते, पण त्यावर मात करून जास्तीत जास्त स्वावलंबी होण्याचा, स्वतःच्या गोष्टी स्वतःच करण्यास शिकण्याचा, दुसऱ्यावरील अवलंबित्व कमी करण्याचा माझा प्रयत्न असतोच. निश्चयाचा बाबतीतही एखादी गोष्ट विचारांती ठरवली, तर ती कशी पूर्ण करता येईल यासाठी माझे प्रयत्न असतात. पण अनेक गोष्टींत मी निश्चय पार पाडू शकलो नाही, जसे की सकाळी लवकर उठणे, चालायला जाणे, व्यायाम इ. कदाचित माझ्यातील आळस यात आडवा येत असावा! गांधीजींचा एक गुण म्हणजे वक्तशीरपणा व वेळेचे नियोजन. उपलब्ध वेळेचा जास्तीत जास्त प्रभावी व उत्पादक वापर कसा करता येईल यासाठी नियोजनाची कला व त्याच्या जोडीला आत्मनियंत्रण पाहिजे. हे साध्य करण्याचाही माझा प्रयत्न आहे.
स्पर्शभावना म्हणजे अस्पृश्यता न मानणे. मी अलीकडे कुणालाही त्याची जात विचारत नाही. जरी एखाद्याची माहीत पडली तरी त्याच्याशी माझ्या व्यवहारात फरक पडत नाही. पूर्णपणे जातमुक्त होण्यासाठी मात्र खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. सर्वधर्म समभावाच्या बाबतीतही तसेच. कोणत्याही धर्माच्या लोकांबद्दल व त्यांच्या धर्माबद्दल माझ्या मनात द्वेष नाही हे मी माझे भाग्य समजतो. स्वदेशीचे पालन आज कसे करता येईल, याबाबत मला विचार करायचा आहे. महात्मा गांधींची वृत्ती अतिशय सेवाभावी होती. त्यांच्या मार्गावर चालताना मी शक्य होईल तेवढी इतरांची विशेषतः दुर्बलांची सेवा करण्याचा प्रयत्न करतो. गांधीजी असे म्हणत असत, की एखादी गोष्ट मी म्हणतो म्हणून स्वीकारू नका, तर ती तुमच्या बुद्धीला पातळी, तरच स्वीकारा. येथे ते चिकित्सक वृत्तीचा पुरस्कार करतात. मी माझ्या विचारसरणीला चिकित्सेची सवय लावण्याचा प्रयत्न करत आहे.
या विवेचनावरून गांधीविचारांचा माझट जीवनात उपयोग करण्याचा मी कसा प्रयत्न करतो, याची कल्पना आली असेल. माझी आपणास विनंती आहे, की हे वाचल्यानंतर मला कृपया कोणी थोर व्यक्ती किंवा साधक समजण्याची चूक करू नका. मी अगदी सामान्यातील सामान्य व्यक्ती असून अनेक चुकांचा व दोषांचा मूर्तिमंत पुतळा आहे. गांधीविचारांचे पालन करण्याच्या बाबतीत मी अगदी प्राथमिक अवस्थेत वा पहिल्या पायरीवर आहे. खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यासाठी आणि गांधीजींचा केवळ जयजयकार न करता त्यांचा एक सच्चा अनुयायी बनण्यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न असतील हे मात्र नक्की!
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
किशोर शेळके.लोणंद.
आजच्या या कलयुगात सरळ मार्गाने वागणारा माणूस सापडणे खूप कठीण आहे. किंबहूना सरळ मार्गाने वागणे म्हणजे खूपच अशक्य अशी गोष्ट आहे. साध्या साध्या गोष्टीतही उंगली तेढी करावी लागते. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की गांधीजींच्या विचाराने पुर्णपणे वागणारा माणूस सापडणे खूप कठीण आहे. तरीही आपण प्रामाणिकपणे एखादी गोष्ट अवलंबायचे ठरवलेच तर आपल्याला कोणीही रोखू शकत नाही.
मी माझ्या आयुष्यात तसाच वागण्याचा प्रयत्न केला. सत्य हे कटू असतं हे खरंच आहे . पण ते अजरामर ही आहे हेही तितकंच खरं आहे. सत्याचा पराजय कधीच नाही होऊ शकत. कोणत्याही व्यक्तीचा खोटेपणाचा आधार घेऊन झालेला विजय जास्त वेळ टिकणारच नाही. एक खोटं लपवण्यासाठी परत हजार वेळा खोटं बोलावं लागतं.
असाच एक प्रसंग सांगतो, म्हणजे त्याचवेळी मला जाणिव झाली की सत्य बोलणं हे किती महत्त्वाचे आहे. साल २००५ मी आठवीत शिकत होतो. ग्रंथालयाकडून पाठ्यपुस्तकांचा संच घ्यायचा होता. मला आधीच ऊशीर झालेला त्यामुळे मी त्यादिवशी घाई करत होतो. ग्रंथालयाच्या फाॅर्मवरती वर्गशिक्षिकेची सही लागणार होती. आणि त्यादिवशी त्या आल्या नव्हत्या. मग मीच माझ्या हातानेच त्या फाॅर्मवर सही केली. विषय इथेच संपत नाही. जेव्हा ग्रंथपालाने मला विचारले की ही सही मॅडमची नाहीच आहे. तू दुसरा फाॅर्म भर , तर मी बोललो की ही सही मॅडमचीच आहे. तेव्हा मला खोटं बोलण्याची शिक्षा म्हणून त्या वर्षी पुस्तकेच दिली नाहीत. आणि तेव्हापासून ठरवलं की इथून पुढे कधीच खोटे बोलणार नाही. आणि मग तसा प्रयत्न ही केलाय.
अहिंसेचा मार्ग ही तितकाच खडतर आहे. पण या मार्गाने जात असलेल्या व्यक्तीला आपले लक्ष्य नक्कीच सापडणार. माझ्या जीवनातील असाच एक प्रसंग आठवतोय मला.
मला सहा चुलते व दहा चुलत भाऊ पण काॅलेजची पायरी चढणारा मी एकटाच. म्हणून मी सगळ्यांचा लाडका. काॅलेज मधे असताना मला एका मुलाने विनाकारण च त्रास दिला . मी त्याकडे कानाडोळा केला. त्याने दुसर्या दिवशी ही तोच त्रास दिला. मीही पुन्हा दुर्लक्ष केले. खरंतर त्याला घरची पार्श्वभूमी माहीत नव्हती. कोणत्याही एका भावाला ही गोष्ट समजली असती तरी त्याचे बारा वाजले असते. पण मी ती गोष्ट कोणाला कळू दिली नाहीच पण मीही काही बोललो नाही. शेवटी त्याच्याच लक्षात आल्यावर त्याने माफी मागितली. आणि तो प्रसंग आठवला तर अजूनही खुप बर वाटतं. तेव्हा मला जाणवलं की त्याच्या तश्या वागण्याने मला जो त्रास झाला नाही तो त्रास माझ्या हिंसक कृत्याने नक्कीच मला झाला असता. तेव्हा अहिंसेचा मार्ग जोपासणे गरजेची बाब आहे.
एकुणच गांधीजींच्या तत्वांचा वापर केला तर जगणं खूप सोयीस्कर होऊन जाईल...
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
अक्षय पतंगे,आ बाळापुर,हिंगोली.
माझ्यामते गांधी हा जगण्याच्या विषय आहे. मी दोन वर्षांपूर्वी M.A. सोडून गांधी विचारांवर अभ्यास करण्यासाठी गांधी रिसर्च फौंडेशन जळगाव ला प्रवेश घेतला. पहिल्या सहा महिन्यानंतर बाकीचे सहा महिने गावात राहून गावचा सामाजिक आर्थिक अभ्यास करावा लागतो, तो मी पूर्ण केला. ग्रामसभा, बचतगट चळवळ यात हिरारीनं सहभाग घेतला (जळगाव तालुक्यात). मला शहरांपेक्षा गावात जायला लोकांमध्ये राहायला रमायला आवडते. त्यानंतर मी टाटा धान अकादमी मदुराई च्या परीक्षेत उत्तीर्ण झालो. माझ्या साध्या राहणीमानाबद्दल माझे दोन-चार मित्र बऱ्याचदा बोलले. मी पाच वर्षांपासून जीन्स घालणे सोडले, कारण हजारो रुपयांच्या पैशांची उधळपट्टी करून दोन अंकी ड्रेस विकत घेणे हे मला अजिबात पटत नाही. मला इथं धान चे संस्थापक श्री. एम. पी. वासीमलाई यांचे उदाहरण देणे महत्वाचं वाटतं, 17 राज्यात धान काम करते. IIM अहमदाबाद मधून उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी लक्षावधी रुपयांची नोकरी सोडून एका सामाजिक संस्थेत(PRADHAN) कार्यकर्ता म्हणून काम केले. ते केवळ 2 ड्रेस वापरतात. कारण मागणी कमी झाली तर गरिबांनाही कमी दरात कपडे मिळतील असं त्यांना वाटतं. गांधीजींनी सांगितलं होतं, समाजातील सर्वांत दुःखी चेहरा तुमच्या कामाचा आदर्श असला पाहिजे, मी ही तोचं चेहरा आदर्श माणून काम करीत राहीन.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
सौदागर काळे,पंढरपूर.
महात्मा गांधीजी अगोदर कृती करायचे ,त्यानंतर विचार जन्मास यायचा.विचार रोज आपल्याला आत्मसात होत राहतात.कधी पुस्तकांतून,कधी माणसांतून,कधी निसर्गातून.पण कृतीचं काय ?असा प्रश्न खूप वेळा पडतो मला.मी माझ्या परीने जिथे जाईल तिथे रस्त्यावर न थुंकणे,कचरा न टाकणे ,उगीच कुणालाही त्रास न देणे,अशा सध्या गोष्टींची काळजी घेतो.8 वर्षांपासून चहा,कॉफी असे पेय पीत नाही.यात गांधीजींचा विचार किती माहीत नाही पण दुसऱ्यांना चहा पिणे शरीरास कसे चांगले नाही ,हे सांगताना माझ्याकडे कृतीचा आधार असतो.याचे समाधान वाटते.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा