लोक काय म्हणतील ? म्हणू देत ...

🌱वि४🌿व्हॉट्सअप ग्रुप

〰〰〰〰〰〰〰〰〰〰

लोक काय म्हणतील ? म्हणू देत ...

 

अमोल धावडे,अहमदनगर

लोक काय म्हणतील या विचारानेच आपण आपला अर्धा वेळ वाया घालतो. माणूस जन्माला आल्यापासून त्याच्या जीवनात लोकांचा प्रेवेश होतो. मुलगी जन्माला आली लोक काय म्हणतील या सर्व गोष्टी करता करता आपण आपले जीवन जगण्याचे राहूनच जातो.
व्यक्तीच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतात पण लोक काय म्हणतील या भीतीने त्या समस्याच तशाच सोडून देतात. उदाहरण घ्यायच म्हटलं की एखाद्या मुलीच 20 व्या वर्षी लग्न होत आणि तिचा पती 22 व्या वर्षी मरण होतो तर लोक काय बोलतील या भीतीने ती दुसरं लग्न करत नाही आणि आपल आयुष्य हे एकटाच काढते.
मी लहान असल्यापासून माझी आई मला लोकांचं उदाहरण द्यायची लोक अस बोलतील लोक तस बोलतील नीट वाग लोक नाव ठेवतील अस वागू नको परंतु मला अजूनही समजलं नाही लोकांना पडलं तरी काय दुसऱ्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करून परंतु आपलं आयुष्य सुधारण्यासाठी पण लोक काय बोलतील या भीतीने आपण सुधारत असतो.
मी आज माझे पदवीधर शिक्षण पूर्ण केले आहे एका सामजिक संस्थेत कामही करत आहे मला आईचा फोन आला की ती सांगत असते की अरे ती शेजारीन विचारत होती की तुमचा मुलगा काय करतो. दिसत नाही गावाकडे चांगली नोकरी करतो ना बापरे मी आई ला नेहमी सांगत असतो अग आई त्यांच्या या बोलण्याने मला अजून नवीन काही करण्याची उर्मी येते त्यामुळे ते बोलतात बोलू देत तू नको विचार करत जाऊ.
आपण आपल्या जीवनात लोकांना घाबरण्यात वेळ खर्च करत असतो कोण काय बोलेल याकडे दुर्लक्ष करून आपण भिनदास्त पणे वावरायला शिकलं पाहिजे गंमत पहा ना आपल्याला प्रियशीला किंवा प्रियकर भेटायला जायचं म्हटलं तरी कोण पाहिलं का पाहिलं तर बोलेल का या सर्व गोष्टींचा विचार करत आपला निम्मं मूड इथेच खराब करून टाकतो.
आपण आपलं जीवन जगत असताना स्वतःच्या मनाचा विचार करायला हवा आपल्या मनाप्रमाणे जस एखाद्या पक्षाला आपण पिंजऱ्यात बंद करतो व जेव्हा त्याला पिंजऱ्यातुन सोडून देतो व तो पक्षी भिनदास्त होऊन आकाश भरारी घेतो त्याचप्रमाणे आपण कसलाही विचार न करता जगायला शिकलं पाहिजे. शेवटी ते लोक बोलतच रहाणार😀
==============================

श्रीनाथ कासे,सोलापूर


कुछ तो लोग कहेंगे,
लोगों का काम है कहना !
छोडो बेकार की बातो में बीत ना जाये रैना ....

हे हिंदी चित्रपटातील गाणे ऐकले की लोक काय म्हणतील ? या विषयाचा ताण कमी होतो. माणूस हा समाजशील प्राणी आहे, तो समाजामध्ये किंवा समूह करून राहतो. अश्यामुळे बरेच निर्णय, तो लोकांचा समूह कसा विचार करेल ? या भीतीने घेत नाही. घेतला तरी तो निर्णय सर्वमान्य किंवा समाजमान्य असला पाहिजे असा अट्टहास असतो त्यामुळेच भारतात शास्त्रज्ञाची कमतरता जाणवते.
लोकमान्य किंवा सर्वसामान्य विचार करणारे व्यक्ती जास्त असल्यामुळे सृजनशील नवनिर्माण विचार व्यक्त होताना दिसत नाहीत याचे सर्वात मोठे उदाहरण ग्रामीण भागाकडे दिसून येते. तेथील स्त्रिया आणि मुली कपडे कुठले आणि कसे घ्यायचे ? लग्न कुठे करायचं ? पासून सर्व निर्णय परजीवी सारखे घेत असतात. लोक काय म्हणतील या विचाराने त्या समाजासमोर व्यक्त होत नाहीत. या लोक काय म्हणतील ? किंवा चार लोक काय म्हणतील ? या विचाराने भारताचा विकास अडवला असेल का ?असेही कधीकधी विचार मनात डोकावून जातात.
आपण कुठली नोकरी करायला पाहिजे. हेअर स्टाईल, कपडे पासून सर्व गोष्टी दुसऱ्यांना काय वाटेल ? कसे वाटेल ? या गोष्टीवरच ठरत असतात. एकंदरीत आपण समोरच्या माणसाचा आणि त्या चार माणसाचा जास्तच विचार करत असतो.
" कोण कुणाचं नसतं " असेच सर्वजण म्हणत असतात मुळात आपण कोणाचे नसतो. हे त्यांना माहित नसते. लोक काय म्हणतील या विचाराने अनेक प्रेम हृदय तुटतात. अनेक लग्न याच विचाराने तुटतात. याउलट लोक काय म्हणतील म्हणून भ्रष्टाचार करणे सोडत नाहीत. वाईट विचार, चोरी, नालायकपणा सोडत नाहीत. श्यामची आई या पुस्तकात साने गुरुजी ची आई, साने गुरुजीना म्हणतात की, "शाम चांगल्या गोष्टी किंवा कष्ट करीत असताना लाजू नको. चोरी किंवा वाईट कृत्ये करत असताना माणसाला लाज वाटायला पाहिजे".
मुळात माणूस गुलाम असतो. आणि त्याचे शारीरिक आणि मानसिक अशी दोन प्रकार आढळतात. शारीरिक गुलामगिरी मध्ये दुसऱ्यांच्या म्हणण्यानुसार काम करणे आणि त्या कामाचा मोबदला अत्यंत तुटपुंजी मिळणे असे बरेच प्रकार आढळतात. यामध्ये भारतात 50 टक्के लोक आढळतात. ही गुलामगिरी कळून येते पण याविरुद्ध बंड करू शकत नाही.
दुसरी आहे मानसिक गुलामगिरी यामध्ये त्या माणसाला माहीत होत नाही तो गुलाम आहे एखाद्या विचारांचा, व्यसन, श्रद्धेचा, अंधश्रद्धेचा, एखाद्या पक्षाचा, रूढी, परंपरेचा, धर्माचा किंवा एखाद्या जातीचा, लोक काय म्हणतील ? याचा देखील मानसिक गुलामगिरी यामध्ये उल्लेख केला तरी काय हरकत नसावी. माझे तर सांगणे आहे की शक्य होईल तेवढ्या मानसिक गुलामगिरीतून मुक्त व्हा आणि स्वतंत्र माणूस म्हणून तुमचा अस्तित्व दाखवून द्या.
धन्य
================================

जयश्री खोडे, मुंबई


लोक काय म्हणतील ? म्हणू देत  या विषयावर जेवढे लिहावे, तेवढे कमीच ! कारण हा विषयच  एवढा विस्तृत आहे.

लोक काय म्हणतील?  हा समाजाचा विकासाचा सर्वात मोठा  अडथळा आहे. याची सुरुवात  आपल्या घरातूनच  होते. आपल्या  घरातीलच  लोक  आपल्याला बोलतात की असे  कपडे घालायचे नाही, केस मोकळे  सोडून नकोस, बाहेर  जास्त जाऊ नको, मुलाशी  बोलू नको, मुलीने सर्वांसमोर  जास्त बोलू नये, लोक काय म्हणतील ?  अश्या बऱ्याच गोष्टी ग्रामीण भागामध्ये आढळून  येते.  एवढंच काय तर तिने जास्त हसू  सुद्धा  नये.  घरातूनच आपल्या विकासाला  काही मर्यादा निर्माण  होतात.  मग आपण  स्वतः  ही  विचार करत असतो की  लोक काय म्हणतील?

लोक  काय म्हणतील  याचा  सर्वात  जास्त  त्रास  मुलींना  सहन  करावा लागतो.  जसे मुलींना  येणारी  मासिक पाळी ही  नैसर्गिक आहे  पण  याचा  चुकीचा  अर्थ  समाजाने  घेतला  आहे. देवाची  पूजा  करू नये,  कोणाला  हात  लावू  नये आणि  तिने देवाला  हात लावला किंवा  मंदिरात  गेली  तर अपशकुन  झाला  आहे  असे समजल्या  जाते.  या गोष्टीचा  खूप मोठा  बाऊ  केला जातो.  २१व्या शतकात ही  या गोष्टींचे  प्रमाण  कमी झाले नाही ह्यामुळे मुलींना दर महीन्याला मानसिक ताणतणावाला सामोरे जावे लागते...
         खरं  तर  एक स्त्री च दुसऱ्या स्त्रीची शत्रू  आहे. जसे आई व सासू ह्यांना कायम लोक काय म्हणतील हा प्रश्न पडला असतो यामधून  घरात मोठ्या  प्रमाणात  वादावादी  होत जाते. 

              देश स्वतंत्र  होऊन कित्येक  वर्ष  झाली पण अजूनही  पारतंत्र्यात  असल्यासारखं  वाटत. अंधश्रद्धा, चालत  आलेल्या बुरसट कालबाह्य रुढी परंपरा यामध्ये  आपण  अश्याप्रकारे अडकलो  आहोत की बाहेर निघायचं  म्हटलं की बंड  पुकारल्यासारखं वाटत !

 लहानपणापासून  मनामध्ये  तयार  झालेला  हा सर्वात मोठा  न्यूनगंड ! यामधून  बाहेर पडणे  म्हणजे  खूपच कठीण ! शाळेत ,  कॉलेज  मध्ये जायला सुरुवात केली की पुन्हा तिथे स्पर्धा  सुरु होते. मग एखाद्या कार्यक्रमात सहभाग घ्यायचा आधी  आपण  विचार करतो, आपण चुकलो तर कोणी हसणार तर नाही ना, यामुळे आपण मागेच राहतो, आपल्या मधला आत्मविश्वास ढासळत जातो आणि मग वाढत च नाही.

 पण या सर्वांना मधून  जो बाहेर पडतो,  तो कधी मागे वळून बघतच  नाही. लोक  काय म्हणतील  या कडे  लक्ष  देण्यापेक्षा  आपल्या मध्ये काय कौशल्य  आहे  हे जाणून  घेऊन त्याकडे  लक्ष  दिले  तर आपला शारीरिक ,  मानसिक ,  बौद्धिक  विकास  चांगल्याप्रकारे  होईल. आपण  चांगली  काम  केली तरी त्यामध्ये लोक चुका  शोधत  असतात  म्हणून  स्वतःला जे वाटते ते जर प्रत्येक  व्यक्तीने केले  तर नक्कीच आपल्या समाजाचा  भरपुर विकास  होईल....
==============================

सचिन फड, नाशिक


नोकरी करून कितीशी प्रगती होते व स्वातंत्र्य, श्रीमंती मिळते, सद्या मुलाना काहीही शिकवा, ते कितीही हुशार असुद्या नोकरीची वन-वन करावीच लागतेय, भविष्यात तर परिस्थिती अजून भयंकर होणार, त्या पेक्षा छोटासा का असेना स्वतःचा व्यवसाय कधी ही बराच, लोक काय म्हणतील? म्हणु देत....
मुलांचे ही भवितव्य सुरक्षित राहील व माझेही स्वातंत्र्य मी पहिले पाऊल उचलतोय, लोक काय म्हणतील? म्हणु देत....
कदाचित माझ्या पूर्वजांनी ते उचलले असते तर आज स्थिती वेगळी राहिली असती, मी किमान सुरू करून चालत तरी ठेवेल नंतर मुलं करतीलच की त्यांना हवे तसे बदल व प्रगती त्यांच्या पध्दतीने लोक काय म्हणतील? म्हणु देत....
म्हणूनच बस्स ठरवलं आणि महिना 18 हजार पगाराची ऑफिसर पदाची नोकरी दिली सोडून, लोक काहीबाही बोलू लागले, लोक काय म्हणतील? म्हणु देत....
दुकानात हेल्पर हमाली चे काम केले, लोक नावे ठेऊ लागले, लोक काय म्हणतील? म्हणु देत....
डिलिव्हरी बॉय चे काम केले, लोक हसू लागले, लोक काय म्हणतील? म्हणु देत.... दुकान घरोघरी फिरून वस्तू विकल्या, लोक चेष्टा करू लागले, लोक काय म्हणतील? म्हणु देत....
दिड वर्ष झाले अजून ही काय व्यवसाय करू कळेना, चाचपडतोय, पण ठीक आहे ना योग्य वेळ आल्या वर काही तरी मार्ग सापडेलच की, लोक काय म्हणतील? म्हणु देत.... की मला माहित आहे मी का असं करतोय तर मी त्यांची फिकीर का करावी
==============================

निखिल खोडे, ठाणे


   सबसे बडा रोग, क्या कहेंगे लोग!!
 या म्हणी प्रमाणे प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीत व कार्यात अडथळा येतो तो म्हणजे लोक काय म्हणतील? आपण करत असलेले काम चांगले की वाईट यापेक्षा त्यावर लोकांच्या काय प्रतिक्रिया येतील हे आपल्याला जास्त महत्वाच्या वाटत असतात. कोणतीही एखादी गोष्ट करायची इच्छा असली की लगेच मनात येते की यावर लोक काय म्हणतील....
              
      स्वतःच्या बाबतीत सांगायचे झाल्यास, घरच्या आर्थिक परिस्थिती मुळे  लहानपणी डोक्यावर परडी घेऊन नरडे (fried finger) विकणे असो किंवा हातपंप वरुन पाणी भरायचे असो ... लोक काय म्हणतील याचा तितका माझ्यावर परिणाम झाला नाही परंतु जसजसे वय वाढत गेले तसे कळायला लागले की आपण काहीही केले  तरी त्यावर लोक काहीतरी बोलतीलच हे नक्की ! आणि याची जाणीव स्वतःच्या घरातुनच होते उदा. एखादया दिवशी कामाच्या थकव्यामुळे  सकाळी जास्त वेळ झोपलो तर लगेच आई म्हणायची की लवकर उठायच नाहीतर लोक काय म्हणतील. बाकीचे मुल बघ.

            प्रत्येक वेळेस मी गृहीत धरायला लागलो होतो की लोक काहीतरी वाईट म्हणतीलच,  आपण काहीही चांगले काम केले तरी.... अलीकडे सवय कमी झाली आहे.  काम करत असताना या भिती मुळे मनामध्ये खुप न्यूनगंड निर्माण व्हायचा..

        घरची परिस्थिती बिकट असलीे आणि अंगावर जबाबदारी असली तर त्यावेळेस मात्र लोकं काय म्हणतील याचा विचार न करता आपण आपले काम करतो..
तेव्हा वाटते की लोक काय म्हणतील? म्हणु देत! आपल्याला काही फरक नाही पडत..!

 "कुछ तो लोग कहेंगे, लोगोका काम है कहना"
==============================


शिरीष उमरे, नवी मुंबई


सगळ्यात जास्त मते मिळालेला व त्यावर आतार्यंत सगळ्यात जास्त लेख आलेला विषय ... मी काय वेगळे लीहावे ह्या विचारात आत्ता जे काही सुचले ते शब्दात रंगवण्याचा प्रयत्न करतो...

लहाणपणापासुन च मी बंडखोर वृतीचा... कुतुहलापायी जे काही उपद्याप करायचो त्यामुळे सगळे धाकात राहायचे की हा आता काय नविन प्रकरण करतो... मला धाकात ठेवण्याचा असफल प्रयत्न वडीलांनी व गुरुजींनी केले. त्यातुन कोडगेपणा हा दुर्गुण  जो चिपकला तो आजगायत कायम आहे... ह्या च स्वभावामुळे  लोक मला काय म्हणतील हा विचार च मनाला शिवला नाही उलटपक्षी हा कार्टुन काय म्हणेल हा धाक लोकांना निर्माण करण्यात बराच यशस्वी झालो.

हे काय ? कसे ? केंव्हा ? कुठे ? का बरे ? अश्या प्रत्येक गोष्टीवर प्रश्नाच्या सरबत्तीमुळे कंटाळुन मला लवकर शाळेत पाठवल्या गेले. पण पालकांचा डाव शिक्षकांच्या लगेच लक्षात आला. कशीबशी माझ्या प्रश्नातुन सुटका करुन घेण्यासाठी शिक्षक च जास्त अभ्यास करायला लागले.
बुरसट कालबाह्य शिक्षणपध्दतीचे बुरखे मी तेंव्हाच टराटरा फाडले. सुदैवाने आखरे वैद्य रानडे सारखे गुरु लाभल्याने आणि वाचन व प्रवासाच्या आवडीने मी थोडा स्थीर झालो.

भिंगाने सुर्याच्या कीरणाचा वापर करुन कागद पेटवण्याच्या नादात फक्त न्युजपेपर च नाही तर बाबांचे ऑफीस कागद व एक नोट जाळण्याला ते विध्वंसक वृत्ती म्हनायचे तर माझ्या मते ती प्रयोगशीलता होती. नंतर ही मैदानी खेळांमध्ये खोटारडेपणा केला म्हणुन दुसर्या टीमसोबत शाब्दीक वादावादी ते बचावासाठी मी केलेला शारिरीक प्रतिकार ह्यामुळे मी हींसक ठरलो पण माझ्या दृष्टीने तो सत्याचा आग्रह होता.
नंतरही कॉलेज मध्ये भ्रष्टाचाराविरोधात मी मारलेल्या बोंबांमुळे काही लोकांना धाक पडला होता की त्यांना लोक काय म्हणतील ...
हा सरळमार्गी प्राणी नाही आहे ह्याची खात्री झाल्याने लोकांनी मला काही म्हणायचे सोडले.

ह्या वरील निरर्थक बडबडी मागे काही आयुष्याचे अमुल्य विचार लपले आहेत...

# ह्या जगात चांगले शिकण्यासारखे इतके काही आहे की लोक काय म्हणतील याचा विचार करायला सुध्दा वेळ नाही आपल्याजवळ...
# तुम्हाला स्वत: बद्दल इतकी खात्री हवी की तुम्ही जे करणार ते चांगल्यासाठी च करणार. ह्यात यशस्वी झालो तर छान च कीवा काहीतरी नविन शिकलो याचा आनंद घ्या. लोकांच्या कोल्हेकुईकडे लक्ष च जाणार नाही.
# वाचन वाढवा खास करुन आत्मचरित्र वाचा जेणे करुन लक्षात येइल की जेवढे यशस्वी लोक आहेत त्यांनी टीकेला स्वत:च्या विकासाची संधी व आव्हान म्हणुन स्विकारले होते...

लोक काय म्हणतील त्याला एका कानाने ऐकुन दुसर्या कानाने सोडुन द्या ...
==============================

  

हरिदास यादव,मु.पो. मारापूर, ता.मंगळवेढा जि.सोलापूर

 मी आत्ताच गृपमद्धे सहभागी झाल्याने माझा पूर्ण परिचय दिला आहे.
   असो, लोक काय म्हणतील म्हणु देत,हा खुपच छान विषय इथे निवडलेला आहे.
 लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देवून आपल्या ध्येयापासून विचलित होणारी व्यक्ती यशास्वी होत नाही, याची अनेक उदाहरणे आपल्या आसपास नेहमी पहायला मिळतात.

महात्मा फुले व सावित्रीबाई फुले या दांपत्याने लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देवून आपले कार्य थांबवले असते तर आज शिक्षणाचा प्रसार एवढया प्रमाणात झालाच नसता.

अशी अनेक उदाहरणे देता येतील, पण म्हणतात ना "हाती चले बजार, कुत्ते भुंके हजार", त्याप्रमाणे आपण नेहमी आपल्याला मनापासून आवडनारे चांगले कार्य सतत चालू ठेवले पाहिजे, मग लोक काय म्हणतील? म्हणु देत.
==============================

 किरण पवार, औरंगाबाद


       
 लोक काय म्हणतील? या एका प्रश्नामुळे कितीतरी आयुष्ये उद्ध्वस्त झालेली आपण प्रत्यक्षात पाहतो. मात्र त्याच गांभीर्य कुणाच्याच लक्षात न आल्याचा आव बनवत आपण समाजात वावरतो. मुलं ज्या वयात वेल मॅच्युअर नसतात तिथून आपल्या समाजाचा त्यांच्यावर बोलण्याचा पराक्रम सुरू होतो. हा असाच आहे, तू तसंच का केलं, हे विषय घे, हे तुला जमणार नाही. एक दिवस कंटाळतो अगदी आपण या सगळ्या प्रश्नांना. अरे बाबा तुझं आयुष्ययं तुझ्या जीवणात डोकं घाल ना. आमचं आम्ही बघू काय करायचयं ते. तुम्हाला प्रचीती आजवर आली असेल नसेल मला माहित नाही पण मला आलेला एक अनुभव सांगतो.
                 एका मित्राला बैंगलोरमधे एका ठिकाणी एक मैत्रीण भेटली. ती आली होती तिथे मैत्रीणीसोबत पण परत जाताना ती एकटी असणारं होती. आणि हा मित्रही त्याच दिवशी निघणार होता. तो मित्र लातूरचा. पण मुलीला मुंबईला जायचं होतं. तेव्हा तो तिला सहज सोबत घेऊन लातूरला त्याच्या घरी घेऊन गेला. आणि पुढे जो राडा झाला तो सांगण अवघडचं. त्याला सर्वजण घरातले बोलू लागले, कोणती मुलगी? तुझ्यासोबतच कशी, काय व का आली? तू हे चुकीच केलसं वगैरे.... वगैरे. घरचे हे सर्व बोलतं होते; कारण त्यांना भिती होती, शेजारीपाजारी त्यांचे नातलग व इतर काय म्हणतील? मुलगा त्याच्या जागी योग्य होता. ठाम राहीला. नंतर मुलीला मुंबई रवाना करून तो रिकामा झाला. पण यात बारकाईने विचार केला तर प्रश्न असाही उद्भवतो की, लोकांच्या अशा तऱ्हेवाईकपणामुळे आज मुली खरचं आपल्याला सुरक्षीत ठेवता येत आहेत का?
                लोक काय म्हणतील? दोन वर्षे वाया गेली. पुढचं कायं? धडाधड प्रश्नमंजुषा सुरू झाली. पण मुद्याच कुणी बोललच नाही की, तुझं काय? तुला का असा निर्णय घ्यावासा वाटला. किंवा तू पुढचं शिक्षण कितपत योग्यरित्या पूर्ण करू शकशील? नामोहराम झालयं हे असं सगळं विधायक स्वरूपातलं बोलणं. का? कारण आम्ही राहतो तो समाज भले आम्हला जगण्यासाठी एक रूपया देत नसेल तरी आम्ही त्याला काय वाटतं याची पर्वा करायची? अरे का? जगा ना बिनधास्त. अडवलयं कुणी? लोक आज एक बोलतात, ऊद्या दुसरं. त्यांना फक्त विषय हवा असतो. त्यांची लगावट तुमच्याशी नसतेच मुळी कधी. त्यामुळे लक्षात राहू द्या. लोक काही म्हणतील, म्हणू देत.......
==============================

अर्जुन (नाना) रामहरी गोडगे, सिरसाव ता.परंडा जि. उस्मानाबाद


जगणं सोडलंय माझ्यासारख्या अनेकांनी
का तर लोकांना काय मनतील....

मन मानेल ते न करता
खूळचट विचार घेऊन जगतो
आवडीचे काम न करता
समाजामन मी जपतो

काळोखात जीवन जगताना
स्वतःचे अस्तित्व विसरतो
भीती मज विद्रोही मनांना
गंड समाजात मी वावरतो

अब्रू ला घाबरतो मी
लोक समजतात गब्रू घाबरला
समाजचा विचार करतो मी
विळख्यात अडकवतो स्वतःला

मी अजूनही जिवंत आहे
तरी समाजमन बुरसटलेले आहे
जिवंतपणा अजूनही शिल्लक आहे
मन मात्र कोमेजलेले आहे

विद्रोह करावा वाटतो समाजाच्या विरोधात
पण मनही मानत नाही
शेवटी समाजाच्या कलाने चालता चालता
जळून खाक झालो बदनाशिबी मी

जीवन किती सरल किती उरलं
हा व्यर्थ हिशोब कशाला
जीवन तुज आहे तुझ्यासाठी
चिंता विवंचना कशाला

व्यर्थ ताण नको मनाला
समजामुळे तू विसरतो हास्यला
हे कशालाही हसतील
फक्त काबूत ठेवा रागाला

जीवन जगताना एक लक्षात ठेव
हत्ती चालते है कुत्ते भूकते है
व्यर्थ ताण नको मनाला
समाज आहे सर्वांची देखभाल करायला..


आयुष्यात पहिल्यादा कविता केलीय अडमीन साहेब चुकलं असेल क्षमा असावी....
==============================

शिरीष मेढी

लोक काय म्हणतील, म्हणू देत ; पण पाँल बँरन नावाचे विचारवंत काय म्हणतात ते बघा.                                       पाँल बँरन लिखीत प्रदिर्घ अवलोकन या पुस्तकातून  ###########                             वास्तव व सारासारविवेक यांमधिल संघर्ष कुठल्याही प्रकारे काल्पनिक वा बौध्दिक संकल्पना नाही. माणसाचे माणसाद्वारे शोषण केल्या जाणाऱ्या कुठल्याही वर्गभेदावर आधारित समाजातील शोषक वर्गाचे हीत अस्तित्वातील सामाजिक संबंधांचे अस्तित्व टीकवून ठेवण्यात असते आणि म्हणूनच शोषकांच्या वर्गाद्वारे फक्त असे बदल मान्य केले जातात की ज्यांच्यामुळे शोषण करण्याच्या अधिकारावर बाधा येत नाही. समाजाच्या विकासक्रमात असा काळ अटळपणे येतो की जेव्हा समाजातील व्यक्तींच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या अस्तित्वांतील व पुढील संभाव्य शक्यतांचा बळी समाजातील प्रभूत्व असणाऱ्या वर्गाच्या हीताचे संरक्षण करण्यासाठी व अस्तित्वांतील समाज व्यवस्था टीकवुन ठेवण्यासाठी दिला जातो व हा काळ असा असतो की जेव्हा शोषक समाजाच्या हीतासाठी संपूर्ण समाजाच्या हीताचा बळी बळी दिला जातो. वास्तव आणि सारासारविवेक (तर्कनिष्ठता) यांमधील संघर्षाच्या ऐतिहासिक प्रसंगी अस्तित्वातील समाजव्यवस्थेची तर्कहीनता सारासारविवेकद्वारा उघडी पाडली जाते व मार्क्सच्या म्हणण्यानुसार या संघर्षाचे रूपांतर जे काही अस्तित्वात आहे, त्या सर्वांवर निर्दयपणे टीका करण्यामध्ये होते व निर्दयपणाचा अर्थ असा होतो की स्वतःवरिल टीकेच्या निष्कर्षांपासुन वा सत्ताधाऱ्यांवरिल टीका करण्यापासुन अलिप्त होणे अशक्य केले जाणे व *त्याचप्रमाणे हा संघर्ष संपूर्ण समाजाच्या व्यवहारिक गरजांची बौद्धिक अभिव्यक्ती आहे आणि विशेषतः बहुसंख्य असणाऱ्या शोषितांच्या शोषणाविरूध्द हा संघर्ष एक अटळ आवश्यकता असते.
==============================

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************