संगीत

संगीत

प्रतिक्षा बूध्दे,गडचिरोली.
मन आनंदी असो किंवा उदास...आजूबाजुला गर्दी असो किंवा एकांत...कोणत्याही परिस्थितीत संगीताची साथ उत्तमच. मागे मित्र सोडुन गेला एक कायमचा, तेव्हा कुणाच्याही सहानुभूतिपेक्षा किंवा तेवढ्यापुरतीच्या सोबतीपेक्षा मला आधार वाटायचा आमच्या दोघांच्याही आवडीच्या गाण्यांचा. ती गाणी मी सतत ऐकत होते चार दिवस, आजही कधी त्याची आठवण एकटी म्हणुन येत नाहीच, सोबत आणतेच कुठलीतरी एक धुन. मग मीही ते गाणं ऐकुन ऐकुन त्याला प्रत्यक्षात स्वत: सोबत अनुभवते. कधी केलेल्या गमती आठवुण हसायला येते तर कधी त्या संगीताचे गंभीर सुर नकळत वार करुन जातात मनावर... 
असं हे संगीताचं आणि माझं अभूतपूर्व नातं...आनंदात सुद्धा सर्वात जवळचा वाटनारा, भावनांच्या ओघा नुसार स्वत:ची गती, लय, ताल बदलुन हवं ते हवं तसंच व्यक्त करायला मदत करणारा केवळ संगीतच. एक राधा एक मीरा म्हणत प्रेमाच्या भिन्न व्याख्या असोत किंवा चंद्र आहे साक्षीला म्हणत भावविभोर होणं असो, संगीत असतोच सोबत का़यम. 'तुझसे नाराज नहीं जिंदगी हैराण हुं मैं' हे गाणं विशेष आवडीचं, त्याचं कारणही तेवढंच सुंदर. साधं स्मित करण्यावर सुद्धा किती गोष्टी जोडल्या असतात यांच किती सोप्प आणि तेवढंच सुरेख विश्लेषण आहे ते! भाव कोणताही असो, तो व्यक्त करायला संगीतातील रागांची साथ ही जगावेगळीच!माझी आणि संगीताची ही गट्टी मित्रांसोबतच घरच्यांच्याही ओळखीची आहेच. 
'आज मै उपर, आसमां नीचे' म्हणत मी घरी आले की आई समजुन जायची आजचा पेपर मस्त सोडवलाय पोरीने. आणि निकाल लागल्यावर 'पप्पु पास हो गया' आजही वाजतोच घरात.


प्राची सुलक्षणा अनिल,मुंबई.
'मिले सूर मेरा तुम्हारा..तो सूर बने हमारा..'
हे गाणं प्रत्येकाने लहानपणी दूरदर्शनवर ऐकलंच असेल..भारतातल्या प्रसिद्ध गायकांनी गायलेलं आणि संगीतकारांनी संगीत दिलेलं हे गीत दोन दशकांपूर्वी जन्मलेल्या प्रत्येकाच्या मनात कोरलं गेलंय.. जवळपास त्याच काळात 'एक दिल चाहीए that's मेड इन इंडिया' हे अलिशा चिनाईचं गीत आलं होतं आणि त्याने युवापिढीच्या मनावर राज्य केलं..त्यानंतर बॉलिवूडमध्ये शाहरूख खानच्या गाण्यांनी धुमाकूळ घातला.. मग ते 'चल छईया छईया' असो किंवा 'फिर भी दिल हैं हिंदुस्थानी' किंवा 'दो दिल मिल रहे हैं, मगर चूप के चूप के' किंवा 'आशिक हूं मैं, कातिल भी हूं, सब के दिलों में शामिल भी हूं' हे गाणं.. 
त्याही पूर्वीची राजेश खन्नाची गाणी तर कायच सांगावी.. अहाहा..!!
ती जवळपास सगळीच गाणी मला तोंडपाठ आहेत असं म्हणायला हरकत नाहीये.. मी जेव्हा कधी प्रवास करते, विशेषतः कारमध्ये.. तेव्हा ड्रायव्हरच्या बाजूची माझी सीट ठरलेली कारण मला माझ्या आवडीची जुनी गाणी वाजवायची असतात.. तसंच विमान प्रवास असेल किंवा रेल्वे किंवा बस.. प्रवासात खिडकीजवळ बसून इअर फोन्स टाकून गाणी ऐकत बसायला मिळालं तर जन्नतच मिळल्यासारखं वाटतं..कुठलंही गाणं संगीताशिवाय अपूर्ण आहे, निरर्थक आहे.. 
आपल्या चित्रपटसृष्टीत ए. आर. ,रेहमान, रवी शंकर, लता मंगेशकर, आर. डी. बर्मन, बिस्मिल्लाह खान, हरिप्रसाद चौरसिया, झाकीर हुसैन, भीमसेन जोशी, एस. डी. बर्मन, आशा भोसले, किशोर कुमार, जगजीत सिंग, एम. एस. सुब्बालक्ष्मी.. अशा कित्तीतरी दिग्गजांची नावं घेता येतील ज्यांनी आपल्याला अवीट संगीताचा खजिना दिलाय.. प्रत्येक गाणं ऐकताना प्रत्येक वेळी नवीन काहीतरी गवसतं आणि गाण्याला नवीन अर्थ मिळतो.. म्हणजे मी जेव्हा खूप खुश असते तेव्हा सहजच एखाद्या गाण्याची ओळ गुणगुणत असते.. जेव्हा खूप दुःखी (कधीकधीच) असते तेव्हाही कुठलं ना कुठलं गाणं मनाच्या कोपऱ्यात घोळत असतं.. अगदी कोणी कधी रागावलं तरी माझ्या मनातलं गाणं चालूच असतं.. (त्यामुळं ना, त्या रागावण्याकडे जास्त लक्ष जात नाय आणि लय मनस्ताप होत नाय एवढंच..)
कुठल्याही बिकट मनस्थितीतून बाहेर यायला मला गाण्यांची खूप मदत झालीये आणि म्हणूनच संगीत हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे..
शाहरुखच्या मुव्हीज बघताना लहानपणापासून मला वाटायचं की मलापण कोणीतरी माझ्यासाठी मस्त रोमँटिक गाणं म्हणून गुडघ्यावर बसून मागणी घालावं आणि मी लाजून (चक्क, कारण मला लाजता येत नाय..) त्याला हो म्हणावं.. पण ही माझी fantacy होती.. असलं कोणी काय करत नसतंय आणि आता ते शक्यही नाहीये तो भाग वेगळा.. पण असं, नेहमीच या संगीतामुळं मी स्वप्नांच्या दुनियेत रमत आलीये आणि त्यामुळं मला दुसऱ्यांच्या फालतू उचापतींमध्ये रसच राहिला नाय.. 
गंमत म्हणजे, हे संगीत एवढं प्रभावी असतंय की कधी कधी सहज एखादं sad गाणं ऐकताना आपल्यालाही आपला ब्रेकअप झाल्यासारखं वाटून दुःख होतंय.. माझ्याकडे प्रत्येक मुडसाठी गाणी आहेत.. पण राजेश खन्ना फेम 'मेरे दिल में आज क्या हैं, तू कहे तो मैं बता दू..', 'चलते चलते, मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना..' 'हसते हसते, कट जाये रस्ते, जिंदगी युं ही चलती रहे..' 'ना बोले तुम ना मैं ने कुछ कहा, मगर ना जाने ऐसा क्यूँ लगा..' 'दिलबर मेरे कब तक मुझे ऐसें ही तडपाओगे..' 'क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो..' ही असली काही भन्नाट गाणी मी कधीही केव्हाही आणि कितीही वेळ ऐकू शकते..खरं तर संगीत म्हणजे माणसाच्या आयुष्याचं टॉनिक आहे असं मला वाटतं.. ज्या माणसाला संगीत आवडत नसेल तो जगातला सगळ्यात गरीब मनुष्य असेल असं माझं मत आहे..  आणि आता कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आपल्याला घरात बसावं लागतंय..पण तेव्हाही घरात मस्त गाणी ऐकत पडून राहण्यात मजाच काही वेगळी आहे..

सौदागर काळे,पंढरपूर.
सारं काही गावात..

पहाटेच्या पारी 
कोंबड्याचं आरवणं
गायीचं,वासराचं हंबरणं
देवळातल्या घंटीचा नाद
थापणाऱ्या भाकऱ्यांचा आवाज
खरकट्या भांड्याचा आणि काकणांचा संवाद
सारं काही संगीत,सारं काही गावात.

पहाटेच्या पारी
दुरून ऐकू येणारी ओराळी
अंघोळ करणाऱ्यांचा नामजप
झाडांच्या पानांची सळसळ
पाखरांचा किलबिलाट
बाळाचं हसणं-रडणं
सारं काही संगीत,सारं काही गावात.

पहाटेच्या पारी
हात पसरून दिल्या जाणाऱ्या जांभई
अंथरुण-पांघरूणाची झाडाझडती
कामावर जाणाऱ्या बायांची हाक
दुधांच्या धारांची लयबद्धता
पाखरं राखणाऱ्यांची तालबद्धता
सारं काही संगीत,सारं काही गावात.

#आठवडा123

(संबंधीत फोटो इंटरनेटवरून घेतली आहेत.) 

व्यसन

🌱वि४🌿व्हॉट्सअप ग्रुप

व्यसन



Source:- INTERNET
-नानु तिवाडे, 
 नागपूर

माझी पहीलीच कविता आहे काही मिस्टेक झाली असेल तर सांभाळून घ्याल.... 

कथा दारूड्याच्या संसाराची त्या मायमाऊलीला
 विचारा.
कशी सांभाळत असते ती स्वतःच्या खांद्यावर संसाराची धूरा........ 
मोदी जी...... ती मेट्रो तर आजची उद्या बनेल...
आधी ती दारू बंद करा........ 2

घरामध्ये नसते कधी मीठ तर नसते कधी तिखट.....
फिरून गाव आला की म्हणते कर मला ताट.... 
कधी कधी रात्रभर घरी नाही आला तर पाहत असतो याची आम्ही वाट..... 
आणि चांगल सांगल जरी काही तर मात्र चढते याला आट..#

कसं रे नाही समजत तुला.... 
कोणाच झालं आतापर्यंत दारू पिऊन भला..... 
कसं नाही लागत रे मन तुझा संसाराला.....
तुला तर वाटते दारू प्यायल्यावर खूप चांगला...
पण...आम्ही मात्र झोपताे ना उपाशी उशाच्यापाशाला...#

होतास खरं तेव्हा सात गावाचा धनी......
म्हणेस लग्नाच्या वेळी ठेवीन तुम्हच्या पोरीला आनंदी..
पण आता सवय धरलास दारूची गंदी.... 
आणि हाल हाल करतोस घरामध्ये करून माझी बंदी...#

कशी रे नाही वाटत दारू पितांना थोडीशी तुला लाज...
घरामध्ये लग्नाचा जवान पोरगा आहे आज....
पोरीचा लग्न झाला म्हणून चढला का रे तुला एवढा माज.....
जरी मनावर घेतलनं पोराने तर उतरवेल सगळी तुझी खाज....#

कथा दारूड्याच्या संसाराची त्या मायमाऊलीला
 विचारा..
कशी सांभाळते ती आपल्या लेकराला....   
कधी तरी मोदी जी ह्यांचाही विचार करा........ 
ती मेट्रो तर आजची उद्या बनेल......
आधी ती दारू बंद करा.......आधी ती दारू बंद करा..##



Source:- INTERNET

-अनिल गोडबोले
 सोलापूर

व्यसन हा शब्दच मुळात माणसाला मानसिक आजाराकडे घेऊन जातो हेच आपल्याला माहीत नसावं.. आपल्याला म्हणजे भारतातील व्यक्तींना !
व्यसन वेगवेगळी असतात आणि प्रत्येक देशात व्यसनाची समस्या आहे.. पण भारतात व्यसन करण्याला जे काही महत्त्व दिलं आहे.. त्याला जगात तोड नाही.
गंमत म्ह्णून सुरू झालेली कोणतीही गोष्ट आरोग्य कधी पोखरते, हेच मुळात कळत नाही.. व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केलेल्या विविध रुग्णांना मला बोलताना जाणवलं की त्यांना व्यसनांमुळे आपल्याला त्रास झालेत हेच कळत नाही किंवा मान्य नसत.
दारू पिणे, तंबाखूजन्य पदार्थ, बिडी, सिगारेट, गांजा, अफू, चरस, हेरॉईन, मारीज्युअना,एल एस डि, नारकोटिक असे बरेच प्रकार आहेत..हल्ली तर मोबाईल, चहा ,कॉफी, व्हाईटनर पिणे, अयोडेक्स व पाव खाणे, पेट्रोलचा वास, स्पिरिट, सापाचे विष.. असे अजून किती तरी प्रकार आहेत.
सगळ्यात जास्त प्रमाण हे दारू आणि तंबाखू याचे आहे. आता मोबाईल चे परिणाम पण आपण बघत आहोत.. या मध्ये आता स्त्रिया आणि पुरुष असा काही फरक राहिलेला नाही.. पण तरी देखील पुरुषांकडे प्रमाण जास्त आहे. 
व्यसनाधीन होण्याच्या कारण मध्ये सर्वात मोठे कारण आहे.. अनुकरण..!! सगळे जण करतात मग मी केलं तर काय बिघडत?.. परदेशात सगळेच दारू पितात.. एकदा सिगरेट ओढली की लगेच व्यसन कुठे लागत..
'आयुष्यात येऊन दारू पिली नाही किंवा व्यसन नाही केलं तर मग जीवनाला अर्थ काय?' अस तत्वज्ञान शिकवलं जातं.. आमच्याकडे फिल्मचा हिरो दारू पितो, सिगरेट ओढतो, घरात मोठी माणसं आणि आता तर मुली पण करत आहेत.. मग त्यात काय एवढं?.. असे बरेच वाद चालू आहेत..

मोबाईल चे कुठे व्यसन लागते.. मी फक्त कामपूरत वापरतो.. असे म्हणणाऱ्या व्यक्ती ने तपासावे की दिवसातून किती वेळ मी मोबाईल वर असतो.. मी स्वतःला प्रयत्न करून मोबाईल पासून लांब ठेवलं आहे..
असो... पण ही सगळी तत्त्वज्ञान आयुष्याच्या एका टप्प्यावर फोल पडतात.. कधीतरी रुग्णालयात जाऊन व्यसनी माणसाला बघा म्हणजे कळेल.. काय अवस्था आहे ती.. कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जाऊन एकदा त्या वार्ड मध्ये फिरून यायचं ज्या वॉर्ड मध्ये तोंडाचा कॅन्सर आहे..
विविध रसायनांवर अवलंबून राहणे हे एक मेंदूचा आजार आहे त्यावर उपचार आहेत.. ते करून अजून सुद्धा आपण स्वताला सावरू शकतो.. मला वाटत की 'संजू' फिल्म मध्ये जे दाखवलं आहे ना.. ते खूप घेण्यासारखं आहे..
आपण आपली काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्याला जर खरच कोणत्याही पद्धतीचे व्यसन असेल तर लगेच त्यावर उपचार करून घेणे नेहमी चांगले.. आपण एखाद्या गोष्टीला टाळू शकत नाही असं वाटलं की लगेच समुपदेशक किंवा मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेऊन थांबवूयात..

शेवटी "सर सलामत तो पगडी पचास"..हेच खरं

Source:- INTERNET

-मंदा गव्हाणे, 
 अमरावती.      

 वेड्या माणसा करू नको रे या जन्मी कुठलेच व्यसन. ..... शरीर होईल तुझे भंगार अन् लवकर तुला येईल मरण.                  लिव्हर नष्ट दारूने अन् कॅन्सर देते दारूचे व्यसन.... समाजास तू नकोसा होशील, कुटुंबासहि तुझे दडपण....... व्यसनामुळे उद्ध्वस्त कुटुंब लेकरांचे होते अर्धवट शिक्षण, पैशांचे नुकसान होऊनी, कुटुंबासह येते भिकार पण..... माणुसकी तुझी मरून जाते येतो तुझ्यात राक्षस गण, कुटुंबातील प्रत्येकाचे हिसका वतो तू आनंदी क्षण............... जिने आयुष्यभरासाठी तुला अर्पिले तन, मन, धन, अंतरीचे दुःख लपवून जगते लेकरां सह जीवन..... यमराजाकडे तुजला नेईल तुझे ते प्रिय ड्रग्स चे व्यसन, सिगरेट , बिडी, गांजा, करते कॅन्सर आणि क्षयरोगाची लागण....... फाशी घेण्यास प्रवृत्त करते वरली आणि जुगाराचे व्यसन, आतातरी सुधार तु रे सोडून दे वाईट लक्षण....... एच. आय. व्ही. बाधित करते तुला अनैतिक संबंधाचे व्यसन, एकनिष्ठ रहा पत्नीशी नको करू वाईट वर्तन........ किंमत कर शरीराची, कुटुंबाला दे आनंदी क्षण, आदर करतील तुझा रे वेड्या कुटुंबातील प्रत्येक जण..... प्रत्येकाला जगण्यासाठी मिळते एकदा मानवी जीवन, परमेश्वराचे आभार मानुनी सोडून दे सर्वच व्यसन.

Source:- INTERNET

-रत्नाकर सातपुते, 
 संगमनेर

गावात कोणाचीही वरात असुद्या, तिच्यामध्ये दगडू नाचायला असणारच.वरातीचे म्हणून असे खास आमंत्रण त्याला आजवर कोणीही दिलेले नाही.तरीही कोणाचीही वरात दगडू शिवाय झाली नाही.वरातीला नाचण्यासाठी जर पोरांनी दारुसाठी लईच आग्रह धरला तर नवरदेव स्पष्ट सांगून मोकळा,
" काय येऊ नका तुम्ही.एकटा दगडूच पुरुन उरतो वरातीला."
दगडूला फक्त वरात सुरु व्हायच्या आधी आणि वरात संपल्यावर जेवायला लागतं पोटभर.वाजंत्री थकतात पण दगडू नाही थकत.नाचणार सुध्दा इतकं तालात का खुश होऊन बाईमाणसांची ओवाळणी टाकायला गर्दीच होणार.त्यामुळे वाजंत्रीही खुप वेळ दगडूला राजी असायचे.मला जेव्हा कळायला लागले तेव्हापासून मी दगडूला नाचताना पाहात आलोय.नोकरी निमित्ताने गाव अंतरले आणि दगडूचाही विसर पडला.आज निवृत्त होऊन मी गावी आलोय.मुलाचं लग्न करायचं म्हणून नियोजन चाललंय...वरातीच्या खर्चाचा आकडा पाहून मुलाला म्हटलं,
" एवढा खर्च ?"
" दारु पाजल्याशिवाय कोणी येत नाही नाचायला..."
मला दगडूची तीव्र आठवण आली.त्याला फक्त नाचायचं व्यसन... आजारपणामुळे गेला नसता तर... मनात मुलाची वरात सुरु झाली आहे आणि दगडू नाचतोय... ओवाळणी टाकायला मी ताडकन उठलो तसा मुलगा म्हणला,
" पैशाची नका काळजी करु ओ.पिऊ द्या मरु द्या पिणारांना..."

Source:- INTERNET

-वाल्मीक फड 
 नाशिक 

व्यसन असावे माणुसकीचे 
माणसातील देव पहाण्याचे
लटके नसावे बोलण्याचे
असावे वचन पाळण्याचे.
मातृभूमीवर प्रेम करण्याचे
आणी तिला सावरण्याचे
विरुद्ध तिच्या घोषणा देऊन 
नसावे तिला लज्जीत करण्याचे.
व्यसन असावे निसर्गाचे
त्याला जोपासण्याचे
घाव घालूनी झाड तोडणे 
नसावे हे व्यसन कुकर्माचे.
वाईट व्यसन जसे दारु 
तिच्यामुळे कधी मारते जोरु 
म्हणून असले व्यसन ठेऊ नको
मार तिचा खाऊ नको.
व्यसनातून अलिप्त राहू
सुंदर हा देश पाहू
माझ्या सर्व देशबांधवांना 
हा प्रेमाचा संदेश देऊ.
ईश्वराच्या ह्या धरणीवर
आहेत बहु पशू पक्षी जलचर
रक्षण त्यांचे करण्याचे
व्यसन असावे सात जन्माचे.
जय हिंद.

वाचलेलं पुस्तक

वाचलेलं पुस्तक.

किरण पवार,औरंगाबाद.
          हल्ली नुकतचं मिर्झा ग़ालिब थोडेफार वाचून घेतले होते. त्यानंतर जवळजवळ 9-10 नवीन पुस्तकांची खरेदी करून ठेवली. सोबतच काही इंग्रजी साहित्याची खरेदीही केली. पण सगळ्याच पुस्तकांवरून नजर फिरवता वाटलं की, साने गुरुजींनी लिहलेली क्रांती पहिल्यांदा वाचावी. कधीकधी आतून आलेल्या भावना योग्या परिस्थितीत योग्या वाचायचा सल्ला देऊन जातात, हे खरचं आहे; मला बऱ्याचदा असं जाणवलं आहे. क्रांतीचा पहिला धडा वाचून संपवला वाटलं जणू की, यातून एका ठराविक दिशेला जाणारा संदेश साने गुरुजींना समाजाला द्यावयाचा असेल पण नंतर पुढे वाचत जाताना लक्षात आलं की, कशा प्रकारे साने गुरुजींनी महाराष्ट्रातील सामान्य जनतेपर्यंत गांधीजींच्या चळवळीचा धागा अगदी सोप्या गोष्टींमधून पोहोचवला. आजही काही लेखकांच्या मार्मिक कथांमधून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात जसं की; गिरीजा कीर उत्तम लिहायच्या, सुधा मुर्ती उत्कृष्ट लिहतात किंवा देवाचा शोध कथानकांमधून घेणारे अमीश असतील ज्यांनी मेलुहा, नांगांचे रहस्य पुढे सिरीजच लिहिली. शोध काय असतो आणि कथा किंवा गोष्टी काल्पनिक न ठेवता सत्यात वाटाव्यात असं लिखाणही साने गुरुजींनी केल्याचा प्रत्यय मला आला. क्रांती हे वाचताना खरचं आनंद मिळाला, सोबतच विचारांमधे अधिक प्रगल्भतेची भर पडली हे निर्विवाद.


केशव भिसे.शेगांव,बुलढाणा.
एक होता कार्व्हर हे पुस्तक मला खूप काही देऊन गेलं आधी फक्त या पुस्तकाविषयी ऐकून होतो पण कधी वाचले नाही पण एक सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेत इंटरविव्ह साठी गेलो असता मला त्यांनी हे पुस्तक वाचण्याचा सल्ला दिला तसेच मला हे पुस्तक वाचून झाल्यावर माझी या पुस्तकाविषयी प्रतिकीय सुद्धा मागितली मी ते पुस्तक आणले आणि माझ्या परीने माझी प्रतिक्रिया देण्याचा प्रयन्त केला.आजच्या तरुण पिढीने एक वेळ हे पुस्तक नक्की वाचायला पाहिजे फक्त वाचून चालणार नाही तर या मध्ये ज्या प्रकारे कार्व्हर नि त्याच्या आयुष्यात संघर्ष करून त्याला जे काही मिळवायचे होते ते त्यांनीं मिळवले  यातून एक चांगली गोष्ट शिकायला मिळाली ती म्हणजे आपण आपल्या जिवंत आपल्याजवळ काय नाही त्याच गोष्टीचा विचार करून त्याचा डोंगर करत असतो माझ्या जवळ हे नव्हते म्हणून मी ते करू शकले नाही फक्त परिस्थिती ला दोष देतो पण जेव्हा आपण प्रत्यक्षात जॉर्ज कार्व्हर संघर्ष आणि त्याची जीवन काम करण्याप्रति असणारी आवड त्याला त्या संकटांना सोडवण्याची ताकत देत असते. यात एक चांगले वाक्य आहे ते म्हणजे " तुम्ही कोणाला काही नवीन शिकवू शकत नाही मुळातच त्याच्यात जे काही आहे त्याचाच विकास करू शकता" या मुळे आपण आपल्यायत काय आहे हे पाहून त्याचा विकास करण्याचा पर्यंत आपण केला पाहिजे. त्याच बरोबर आपण नेहमी चिकित्सक वृत्ती ठेवून जे काही शिकायला मिळणार ते शिकत राहणे आणि नेहमी आपल्या दृष्टिकोन हा सकारात्मक ठेऊन प्रयन्त करत राहिले पाहिजे.त्याच बरोबर निसर्गा प्रति पाहण्याच्या सुद्धा आपण कसे असवणे या विषयी सुद्धां छान सांगितले आहे कार्व्हर सांगतो निसर्ग तुम्हाला देत आहे तर आपण याचा उपभोग घेत असताना 'संवर्धन-विकास-उपयोग-पुनर्भरण' ह्या गोष्टीचा विचार करून निसर्गाचा समतोल राखण्याचे पर्यंत करत राहणे.


जी.ए.नळंदवार,हिंगोली.
वपुर्झा -व.पु.काळे
अनेक पुस्तकांनी भुरळ घातली आहे...खासकरून आत्मचरित्र माणसांना प्रेरणा देतात...ऐतिहासिक पुस्तके भूतकाळातील घटना, महापुरुषांचे कार्याची ओळख करून देतात...अशा अनेक पुस्तकामध्ये..कुठे वास्तव्याची धग आढळते...तर कुठे कल्पनेचे अथांग थवे मांडले होते... अशाच एक जादुई लेखकांनी साकारलेलं, लेखणीने सत्यात उतरलेलं, वाचकांच्या उशाला बाळगावे वाटणारे पुस्तक म्हणजे 'वपुर्झा'...कोणतेही पान काढावे आणि वाचता वाचता डोक्यात झिंग चढावी, नशा यावी तसं होत...अनेक वाक्य आपल्या जिवनाशी चपखल लागू होतात...या पुस्तकामध्ये; मागच्या पुढच्या पानांचा एकमेकांशी संबंध नाही,अत्तरासारखं खूप खूप भावलेलं पुस्तक आहे.

रंग

रंग

स्नेहलता सरनाईक,सांगली.
रंगाचा शब्दशः अर्थ तसा पाहिला तर वेगवेगळ्या रंगांच्या छटा असाच कोणीही घेऊ शकतो,मात्र कल्पकता आणि जीवन प्रवाहात वाटचाल करत असताना गडद आणि फिकट अशा रंगाच्या संगतीत आपण आयुष्याची वळणे घेत असतो.छोटी- मोठी दुःखे ही जीवनात काळोख घेऊन येतात म्हणजेचं त्या क्षणी आपण विवंचनेनी ग्रासले जातो. परिस्थिती हाताबाहेर किंवा इतरांशी बोलून हलके होण्यासारखी नसली तर आपोआपच आपण पोखरले जातो.सुखाच्या प्रसंगी आनंदाला पारावर नसतो तदक्षणी आपले चंचल मन इंद्रधनुसारख्या सप्तरंगात न्हाऊन निघते.एक मात्र खरे आहे आपल्या बँकेच्या खाते बुक मधील आलेखासारखे आपलं आयुष्य रोज नवी वळण घेत,त्याकडे पहाण्याचा आपला दृष्टिकोन त्यात नवनवीन रंग भरत रहातो, तो पूर्णतः आपल्यावरती असतो.निसर्गाने बहाल केलेल्या रंगानी आपले आयुष्य बहरायचे की आलेल्या संकटांनी खचून जाऊन स्वतःला काळोखात लोटायचे. भिन्नविभिन्न रंगसंगती आयुष्यात लाखो छटांचे कंगोरे घेऊन येऊ शकतात त्याला फक्त आणि फक्त आपली परवानगी हवी त्यासाठी जुन्या गोष्टीना बाजूला करून आपण वाट मोकळी करून द्यायला हवी.


अनिल गोडबोले ,सोलापूर.
सा रंग आपल्या आयुष्यामध्ये भरपूर वेळ येत असतो आणि आपण तसं भरपूर रंगीला आहे, पण रंग म्हटलं.... की तीन गोष्टी आठवतात :- एक शाळेतला चित्रकलेचा तास, दोन होळी आणि सण समारंभ आला की  रांगोळी ....बाकी भिंतीचे कलर वगैरे किंवा रंग संगती याबद्दल आपला तसा काही फारसा संबंध नाही. मला आठवतं रंगपंचमी हा सण... कारण मी लहानपणी म्हणजे बारावी पूर्ण होईपर्यंत रंग खेळलेला आठवत नाही.

 जेव्हा सोलापूरला आलो तेव्हा मात्र रंगपंचमीला भरपूर रंग खेळत होतो .नंतर कॉलेज संपल्यावर नोकरी लागल्यानंतर आयुष्यातील रंग संपले (नंतर रंग उधळायला लागला असं लोक म्हणतात) असो तो भाग वेगळा .....पण उधळून द्यायचं सण म्हणजे रंगपंचमी आणि तो माझा फार आवडता सण आहे.. रंग नसते तर आपले आयुष्य किती निरस झालं असतं याबद्दल कोणाचे दुमत नाही. मग याच धुंदीत रंग खेळुयात ..उधळण करूयात फक्त दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी घेऊ...एवढच !!

महेश कामडी,नागपूर.
रंग मळा  हिरवळतो
फळा-फुलांनी बहरतो
पिकून होतं पिवळ्या शार
हा रंग कसा दळवळ तो
वर नभ हे निळे
खाली पण्यावरती खेळे 
कापूस पिंजून ढग हे पांढरे
त्यास किती बघ शोभे
उगवत्या सूर्यात जणू 
भगवा रंग बघ कसा दिसे
जिकडे तिकडे चोहीकडे
गोड गुलाबी फुलली फुले
त्यावरती शोभे लुपलुप्ती
रंगीबेरंगी फुलपाखरे
कुठे काळे काळे शेतही 
लाल गुलाबांची शाल ओढते
निसर्गाची किमया पाहा 
अग्नी पाणी हवा एकत्र येते जवा
मग आकाशी सप्तरंगी
इंद्रधनुष्य ही येतो नवा
या सर्व रंगांना मिळून घेतो
खाकी रंग तो पहा


गजानन घुंबरे,परभणी.
 हानपणी चित्रकलेच्या विषयात रंगाची खऱ्या अर्थाने ओळख झाली. जन्मापासुन सभोवताली असणारे रंग चित्रकलेच्या वर्गात आणखीच आवडायला लागले. सातरंगाची समज आली .अंधकाराला संपवणारा प्रकाश ही सप्तरंगाचा असल्याचे शाळेत प्रयोगशाळेतील प्रिझम ग्लासने तर निसर्गाने क्षितिजावर तयार झालेल्या इंधनुष्यातून दाखवले. या सात रंगाची नावे जरी सर्वांना माहीत असली तरि गावात राहणाऱ्या आम्हां सारख्याकडे आणखी ही रंगाच्या नावाचा खजीना असतो त्यात ढवळा, हरणा,राखुंडी, गजगा, गढूळ इत्यादीं अनोख्या नावाचा समावेश असतो.जसजसे वय वाढले रंगाविषयी आणखी माहिती वाढत राहिली काही निसर्गाने शिकवले तर काही समाजाने. शेतशिवाराने ही  शेतात पिक हिरवेगार आले की बहरात असते, पोपटी परिपक्वतेच लक्षण तर पिवळे काढणीस आले समजा अशी लक्षणे सांगितली. एवढच नाही तर पिकाच्या बदलणाऱ्या रंगावरुन उभ्या पिकाला आवश्यक अन्नद्रव्य , पाणी देऊन पिक जोमात आणण्याची किमया रंगानेच शिकवली.निसर्गाने वनराईला हिरवा, पाणी व आकाशाला निळा तर मातीला काळा,लाल रंग गुणधर्मानुसार दिला. मानवाने मात्र हळूहळू हे रंगही वाटून घेतले.समाजाने अमका रंग ह्या धर्माचा ,तमका त्या धर्माचा शिकवण दिली.आता रंगावरुन जात ,धर्म कळायला लागले. भितींना आकर्षक करणारे रंग , एखाद्या धार्मिक स्थळाच्या भिंतीवर पडले तर समाज शांतता कमालाची अशांत झालेली पहायला ही मिळाली.एवढं कमी की काय ?रंगावरून माणसे माणसांचा वर्णभेद करायला ही लागले. गोरा, काळा, सावळा रंग ही भेदाभेदीचा झाला. अमुक रंगाचा अभिमान बाळगू लागला तर तमुक रंगाचा न्युगंड .रंग बदलण्याची चढाओढ लागल्याने अधिक गोरा रंग  दिसावा म्हणुन रंगाच्या डब्या चेहऱ्यावर लावल्या जाऊ लागल्या.शेवटी निसर्गाचा रंग तो मातीच्या रंगाशी एकरूप झाल्याशिवाय जाणार नाही अन् दुःख या गोष्टीच आहे कि रंगभेद करणारा प्रत्येक व्यक्ती, समाज ते कधी समजून घेणारही नाही .
आपण जपला पाहिजे तो फक्त अंतरंग बाकी बाह्यरंग उडणारे आहेत.शेवटी सर्व रंग मिळून  जेव्हा एकत्र येतात तेव्हा पडतो तो स्वच्छ प्रकाश व तो नष्ठ करतो मानव निर्मित भेदाभेदीच्या, समजगैरसमज,अज्ञानाच्या अंधकाराला.एवढ समजल ना मग कोणी हा रंग माझा अन् तो रंग तुझा असं कदाचीत म्हणणार नाही. मुक्तहस्ते उधळलेले रंग वाटूनही घेणार नाही .

(संबंधित छायाचित्रे इंटरनेटवरून घेतलेली आहेत)

पुरुषप्रधानता

पुरुषप्रधानता 


मयुर डुमणे,उस्मानाबाद. 
समाजात वावरताना पुरूषप्रधानता सहज दिसून येते. आज मेसवर गेलो होतो. मेसच्या काकू लंगडत चलत होत्या. मी विचारलं काय झालं काकू? काकू म्हणाल्या नवऱ्याने मारलंय. नुकताच थप्पड चित्रपट पाहिल्यामुळे मला त्या क्षणी चित्रपटात दररोज नवऱ्याचा मार खाणारी ती महिला आठवली. काकुला नवऱ्याने का मारलं याच कारण विचारलं. काकू म्हणाल्या, घराबाहेर बसले होते म्हणून मारलं. काकू मेस चालवतात. त्यांचा नवरा घराबाहेर बोन्बलत फिरतो. घराबाहेर काय करतो हे काकूंनाही माहिती नाही. लहर आली की काकुना मारतो. काकूंनी नवऱ्याच्या या हाणामारीची सवय करून घेतलीय. माझ्यासोबत एक कॉलेजवयीन मुलगीही जेवत होती. तिला हा प्रकार काय सहन झाला नाही. ती म्हणत होती. कमवायच तुम्हीच, घर सांभाळायचं तुम्हीच आणि वरून मार पण खायचा. काकू तुम्ही पोलिसांत जा. मुलीच्या या प्रश्नावर काकूंनी हसून दाद दिली. मुलगी आपलं दुःख समजून घेतेय हे ऐकून काकूंनी तिला जवळ बोलवून घेतलं. काकूंना एक 7 वीत जाणारी मुलगी आहे. काकू सांगत होत्या. मी जर नवऱ्याला सोडलं तर हीच कसं होणार. हिच्याशी कोण लग्न करणार. नवऱ्याला सोडलं तर त्यांच्या मुलीशी कोणी लग्न करणार नाही असा काकूंचा समज होता. मी काकूंना समाज कसा बदलतोय हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण काकूंना समाज आहे तसाच आहे असं वाटत होतं. कुटुंब टिकविण्यासाठी बाईने सहन केल पाहिजे अस काकूंच म्हणणं. 
काकू या समाजातील एक प्रातिनिधिक उदाहरण आहेत. त्यांच्यासारख्या अशा लाखो स्त्रीया नवऱ्याकडून होणारी मारहाण, अत्याचार अजूनही सहन करतात. 
बाईला माणूस म्हणून या समाजात अजूनही किंमत दिली जात नाहीय. 
काकूंना त्यांच्या लहानपणी अनेक बंधनात जगावं लागलं. आता मी माझ्या मुलीला या बंधनात नाही जगू देणार हेच काकूंच वाक्य थोडाफार आशावाद निर्माण करणार आहे. 
लग्न करणे, घर सांभाळणे, नवऱ्याची सेवा करणे, मुलांना जन्म देणे अशा पारंपरिक चौकटीत जगणाऱ्या तिलाही इच्छा, आकांक्षा, स्वप्ने आहेत याचा विचारच पुरुषप्रधान व्यवस्थेत केला जात नाही. या सर्वांशी तडजोड करून ती संसार टिकविण्यासाठी जगते  मात्र तरीही तिला दुय्यमच लेखले जाते. पुरुषांची स्वप्ने, इच्छा, करिअर पूर्ण करण्यासाठी स्त्रिया जन्माला आल्या असा समज असलेल्या समाजात स्त्री ही देखील माणूस आहे तिलाही भावना, इच्छा, करिअर, स्वप्ने आहेत.संसार टिकविण्यासाठी स्त्रीनेच कशी तडजोड केली पाहिजे, तिनेच कायम पडती भूमिका घेतली पाहिजे हे सांगणाऱ्या स्त्रीया देखील या पुरुषप्रधान व्यवस्थेच्या वाहक आहेत. थप्पड चित्रपटात त्याने लगावलेली थप्पड हे फक्त निमित्त आहे. तिला गृहीत धरलं जातं, तीच माणूस म्हणून असलेलं अस्तित्व नाकारलं जातं इथं खरी गोम आहे.सतत गृहीत धरल्या जाणाऱ्या तिचा अखेर स्वाभिमान जागा होतो आणि ती या पुरूषप्रधान व्यवस्थेला एक जोरात थप्पड लगावते.स्त्रीच्या जगण्यापासून ते मरण्यापर्यंत इथली पुरुषप्रधान व्यवस्था स्त्रीवर कायम अन्याय करते आणि सहनशील स्त्री समाजाच्या भीतीपोटी तो अन्याय सहन करत राहते. ही परिस्थिती आता बदलायची वेळ आली आहे. लग्न करणं, नवऱ्याची सेवा करणं, स्वयंपाक करणं, भांडी धुणी धूण, बाळाचा सांभाळ करणं ही पारंपरिक चौकट मोडण्याची वेळ आता आली आहे. ही कामे पुरुषांनीही केली पाहिजेत. ती काळाची गरज आहे. बदलत्या आर्थिक परिस्थितीची गरज आहे. कारण ती शिकतेय, स्वावलंबी होतेय, तिला तिच्या अधिकारांची जाणीव होतेय. कमावती झाल्यामुळे तिच्याकडे निर्णय स्वातंत्र्यही येत आहे. कोणत्या मुलासोबत लग्न करायचं हे आता तिचे आई वडील ठरवत नाहीत. तर आई वडिलांना विश्वासात घेऊन ती स्वतः आपला जोडीदार निवडतेय. मला इथे सांगायला आनंद होतोय की मी जिथे काम करतो तेथील माझे वरिष्ठ स्वतः उत्तम स्वयंपाक करतात. घरकाम कमी दर्जाचं आणि ऑफिसच काम खूप महत्वाच ही मानसिकता बदलण्याची वेळ आली आहे. घरकाम कमी दर्जाचं असणाऱ्या पुरुषांनी एक सर्व घरकाम करून बघितलं पाहिजे. हा बदल आहे. हा बदल हळूहळू होत जाणारा आहे. आपण या बदलाचा भाग बनू या आणि या समाज परिवर्तनाच्या लढ्यात छोटंस योगदान देऊ या.


हर्षदा चौरे,पुणे.
भारत पुरुषप्रधान संस्कृती असलेला देश आहे. का? या मागचं कारण काय? प्रत्येक कामात बाईची मदत घेतल्याशिवाय काम होत नाही. आणि कसली आलीय पुरुषप्रधानता? पण रुबाबाच्या बाबतीत, निर्णय घेण्याच्या बाबतीत पहिली पुरुषप्रधानता येते. प्रत्येक निर्णय हा घरातील 'कर्त्या-धर्त्या' पुरुषानेच घेतला पाहिजे. बाईला त्यातलं काही कळत नाही. हे कोणी सांगितलं? तिला कधी कोणी विचारलं का, की ती कोणते निर्णय घेऊ शकते!!अनेक पुरुषांकडे त्यांचा 'पुरुषी अहंकार' असतो. तो कधी जागा होईल, हे सांगता येत नाही. त्या अहंकार असलेल्या पुरुषाला नेहमी असेच वाटते की, बाईने त्याच्या शब्दाबाहेर जाऊ नये. स्त्री कोण? ती म्हणजे एक प्रकारची मालमत्ता आहे का? तुम्ही बस म्हणाला की बसेल, उठ म्हणाले की उठेल! का तिने पुरुषाच्या दबावात/ बंधनात राहावं? घरातील सगळी कामं बाईनेच करावी. का पुरुषाला हात नाहीत? घरातील प्रत्येक छोटा-मोठा निर्णय पुरुषाने घ्यावा. का तिला काही कळत नाही? कळत सगळं असत. पण भवताली असणाऱ्या लोकांनी तिच्या मनावर 'पुरुषप्रधान' संस्कृति रुजलेली असते. पुरुषाने काही केलं तर घर सोडून जाऊ शकत नाही. आजच्या काळात अशा स्त्रिया आहेत, ज्या स्वतःच्या बळावर घर चालवू शकतात. अगदी घरातील 'कर्त्या-धर्त्या' पुरुषाची मदत न घेता. अनेकदा नवरा-बायकोमध्ये भांडण होते. काहीवेळा त्यात हाणामार होते. तिथे पुरुषाकडून अगदी सहजपणे बाईवर हात उगारला जातो. पण अन्याय का सहन करायचा? अन्याय होतो, त्याक्षणी उभे राहत आपल्या हक्कासाठी लढले पाहिजे.आजही कितीही मोठ्या पदावर काम करणारी स्त्री असली तरी घरात मात्र ती गृहिणी या पदावरच काम करत असते. घरात सगळी कामं स्त्रीने करावी. कारण पुरुषाला घरातील कामं करणं शोभत नाही. ती कामं स्त्रीनेच करायची असतात. पण खरंच पुरुषप्रधानता असेल ना तर समजून घ्याल त्या स्त्रीचं दुःख. ती जरी स्त्री असली तरी तिलाही भावना, मन, इच्छा, स्वप्न आहेत, जी तिला पूर्ण करायची आहेत. स्त्री आणि पुरुष दोघे निसर्गाचा भाग आहेत. आणि निसर्गाने प्रत्येकाला सगळ्या गोष्टी प्रमाणात दिल्या आहेत. त्यामुळे जितका हक्क-अधिकार पुरुषाला आहेत, ते तिलाही आहेत. ते तिच्याकडून हिसकावून घेऊ नका. तिलाही तिच्या जगू द्या तिच्या मनाप्रमाणे...

प्रविण,मुंबई.
एकदा एका मैत्रिणीचा फोन आला. ती उच्चशिक्षित असल्याने तिच कौतुकच वाटायचं आणि विचाराने पक्की फेमिनिस्ट होती. फोनवर गप्पांचा फड रंगला होता. ती म्हणाली "यार या घरच्यांनी डोक्याची दही करून टाकली आहे, सतत लग्न, लग्न आणि लग्न असा एकसुरी पाढा चालू आहे". मी म्हणालो मग करन टाक ना लग्न. त्यावर ती म्हणाली "हा ना यार. लग्न करायचं आहे. पण मुलगा मनासारखा मिळायला हवा" मी तिला विचारलं मनासारखा म्हणजे नेमकं कसं. त्यावर ती एक वाक्य म्हणाली आणि माझे विचारचक्र चालू झाली. ती म्हणाली "मला असा नवरा हवा की जो मला 'स्वातंत्र्य' देईल".
ह्या संभाषणातून दोन प्रश्न उभे राहिले आहेत
1. स्वातंत्र्य द्यायला तो नवरा कोण आहे?
2. जो पारतंत्र्यात असतो त्याला स्वतंत्र हवं असत. मग ही शिक्षित, फेमिनिस्ट मुलगी पण स्वतःला पारतंत्र्यात असल्याचं मानते का?
ह्या दोन्ही प्रश्नच उत्तर एकच की "पुरुषप्रधान मानसिकता" आणि उच्चशिक्षित महिलाही याच्याच मानसिक गुलाम झाल्या आहेत.
आपल्या विचार ग्रुप मध्ये एका अडमीन मैत्रिणीने एक अपील केलं होतं की "पुरुषप्रधानता वर लेख येत नाही येत याचा अर्थ समाज पुरुषप्रधान नाही वाटत". खर तर पुरुषप्रधानता आपल्या नसानसात भरली आहे म्हणूनच "पुरुषप्रधान" या विषयावर लेख कमी येत असतील.आपल्या आजूबाजूला घडणारे महिला अत्याचार हे "पुरुषप्रधान" मानसिकतेतूनच होत असतात आणि याची पाळेमुळे पुरुषसत्ताक व्यवस्थेत रुजली आहेत. स्त्री आणि पुरुष ही दोन अशी चाके असतात की त्यावर समाजाचा गाढा हाकला जातो. ह्यातलं एक चाक जरी कमकुवत निघाला तर समाजाचा समतोल बिघडतो. अनेक शतकांपासून हा समतोल बिघडलेलाच दिसत आहे. त्याच कारण पुरुष वर्गाला मिळत असलेले झुकत माप.ह्याचा अर्थ असा नव्हे की स्त्रीला।झुकत माप द्यावं. याचा एकच अर्थ होतो स्त्री ला देवी बनवून पुजाण्यापेक्षा तिला माणूस म्हणून सन्मान द्या.


प्रतिक्षा बूध्दे,गडचिरोली.
कालच बस ने कॉलेज ला जातानाचा प्रसंग.काका काकु शेजारीच बसलेले. थोडं चिंतींत वाटत होते दोघे. शेवटी मौन तोडत काकुंनीच सुस्कारा टाकला. म्हणाल्या 'जाऊ द्या हो, होईल सर्व ठीक... ' असं म्हणताच आत्तापर्यंत शांत असलेले काका एकदम चिडले. काकुंना नको तसं ओरडायला लागले. बस मधली लोकं त्यावर स्वत:पुरते प्रतिक्रिया देण्यात व्यस्त झाले, 'केलं असेल हिनेच काही...',  '...असं नको वागायला', '...जाऊदे आपल्याला काय करायचंय', ई. वाक्य धडाधड काणावर आपटत होते. काकु बिचार्या हुंदका आवरत कसंबसं सगळं गप्प एेकत राहिल्या. हे सगळं बघुन मलाच कसंतरी वाटायला लागलं. काकुंसाठी वाईट तर वाटलंच पण रागही आला. कारण नेमकं काय होतं माहीत नाही पण सर्वांसमोर अगदी निर्विचाराने आणि आक्रमकतेने काकुंचा अपमान केला जात होता आणि त्या काही न बोलताच गप्प होत्या. काकांनी तर तिच्या दिसण्या पासुन असण्या पर्यंत, अगदी ती च्या चारित्र्या पर्यंत जाऊन तिला सर्वांदेखत वाट्टेल ते बोलत होते आणि त्या मात्र गप्पच. हुंदके आवरत, शरमेने झुकत, झालेल्या अपमानाचे घण सहन करत... 
कारण काहीही असेल, परंतु एवढं टाकुन बेलायचा अधिकार काकांना कुणी दिला असावा?  काकुंना सगंळ गपगुमान सहन करायला लावणारा कोण असावा? काय कारण असावं असं सार्वजनिक ठिकानी स्वत:च्या चारित्र्यावर (त्या वयात सुद्धा!) लांछन लागावल्या जात असताना त्या सहन करत राहिल्या? कसली ही गुलामी?कोणती ती सत्ता जी काकांच्या विवेकावर हावी झाली होती?आजवर ज्या नवर्याची सेवा केली त्यानेच जगासमोर लाथाडलं, नको तसा अपमान केला याचं दुःख तिच्या वाहणार्या नेत्रांनी सांगितलंच.काय किंमत ठेवली असावी काकांना आज तिच्या त्यागाची, कष्टाचीं, प्रेमाची ? एका कुठल्यातरी चुकीपुढे सगळंच निर्अर्थक? तिचं कर्तृत्व, चरित्र, माया, प्रेम सगळं क्षणात शुन्य? काय आपला समाज, कसली आपली गुलाम मानसिकता! माझा स्टॉप आला मी बसमधुन उतरले, पण पुरुषसत्ताक मानसिकतेच्या या समाजाची, सत्तेनं बेभान झालेल्या काकांची, गुलामीत जगणार्या काकुंची व काही न करता सगळं फक्त बघत रहणार्यांची, स्वत:ची, किव येत होती मला...
पण तेव्हाच एक निश्चय केलाय, मी किमान स्वत: तरी पुरुषसत्ताक मानसिकतेची गुलाम होणार नाही... प्रत्येक व्यक्तिने एवढं साधं काम जरी केलं तरी पुढे एकही गुलाम उरणार नाही. गुलामच नसतील तर कोण प्रधान? कसली प्रधानता? पुरुषसत्ता नकोय. सत्ताच नकोच आहे कुणाचीच. समानता हवी आहे आपल्याला,तर सुरवातही स्वत: पासुनच करावी लागेल. नाही का?

(संबंधीत फोटो :इंटरनेट)

महिला दिन:बाजारीकरण

🌱वि४🌿व्हॉट्सअप ग्रुप

   महिला दिन: बाजरीकरण.


Source: INTERNET

-अमोल धावडे,
 अहमदनगर.

महिला दिनाच्या माझ्या सर्व बहिणीना शुभेच्छा.
महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
              ८ मार्च रोजी सर्वांचे महिलांवरील प्रेम दिसून येते    व्हाट्सएप, फेसबुक व ईतर सर्व माध्यमातून महिलांवरील प्रेम या दिवशी दिसून येते पण आजही महिला सुरक्षित आहे का आपण याचा कधी विचार केला आहे का. महिलेचा आदर हा एका दिवसापुरता मर्यादित नसला पाहिजे महिलेचा आदर हा दररोज केला पाहिजे. समाजामध्ये आजही स्त्री ही सुरक्षित जीवन जगू शकत नाही. समाजामध्ये महिला जगत असताना तिला वेगवेगळ्या लोकांना सामोरे जावे लागते हाच का तो महिलांचा आदर. आपण दररोज टीव्ही न्युज वर पाहतो अनेक वेगवेगळ्या घटना स्त्रियांच्या बाबतीत घडत असतात आज ६ वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो तर उद्या ७० वर्षाच्या म्हाताऱ्या आजीवर हीच का आपली संस्कृती आणी हाच का महिलांनाचा आदर. आपली बहीण आई बायको ही एक स्त्री आहे आपण जसा यांचा आदर करतो तसाच इतरांचा आपल्या बहीनिप्रमाणे आदर करा तरच आपल्या समाजामध्ये महिलांवरील होणारे अत्याचार थांबतील. आपण पाहतो की आपली मुलगी ७ च्या आत घरात आली पाहिजे आणि मुलाने १२ वाजेपर्यंत घराबाहेर राहिलेले चालते असे का आपल्या मुलाला ही ७ च्या आत घरात बोलवा इतर मुलींकडे आपल्या बहणीप्रमाणे पाहा आणि बघा आपला समाज किती पुढे जातो ते आणि समाजामध्ये स्रियांवर होणारे अन्याय आत्याचार थांबतील.
                 आपण पाहतो की लग्न झाले की मुलीला आपल्या आई वडिलांना सोडून आपल्या सासरी जावे लागते आणि सासरी गेल्यावर वेगवेगळ्या कारणावरून अगदी सुशिक्षित सुद्धा त्या मुलीला त्रास देतात आणि ती मुलगी असहाय होते ती आपल्या वडिलांकडे पण जाऊ शकत नाही आणि शेवटी ती आत्महत्येचा पर्याय निवडते. तर असे का होते याचा बारकाईने विचार करायला हवा आणि फक्त महिला दिनाच्या दिवशी शुभेच्छा न देता प्रत्यक्षरित्या  महिलेचा आदर करायला हवा. आपण पाहतो की आपल्याला स्त्री म्हणून आई पाहिजे, बायको म्हणून एक स्त्री पाहिजे, बहीण म्हणून एक स्त्री पाहिजे आणि मुलगी म्हणून स्त्री नको वंशाचा दिवा हवा व पोटातच तिला मारून टाकतात तिला या जगात येऊ पण देत नाही.
                   एक स्त्री म्हणून तिला हे जग पाहुद्या आणि तिच आयुष्य जगू द्या. आज महिला उंच शिखरावर जाऊन पोहोचली आहे वेवेगळ्या कार्यक्षेत्रात कार्यरत आहे पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून आज महिला काम करत आहे तरीही महिलांना आजही योग्य प्रकारे वागणूक मिळत नाही.
आणि आपण महिला दिन साजरा करतो.
आपले विचार सर्वप्रथम बदला मग समाज आपोआप बदलेल.
महिलांचा आदर करा.
#HappyWomansday.......




Source: INTERNET

-वैशाली सावित्री गोरख
 ग्राफिक डिझाइनर (पंढरपूर) मुंबई.

 आंतरराष्ट्रीय महिला दिवसाचा उगम हा नियोर्क शहरात 1908 मधे 15 हजार महिलांच्या आंदोलनाने झाला,ह्या आंदोलनात महिलांची मागणी होती कामाचे तास कमी करावेत, योग्य वेतन मिळावी, मतदानाचा अधिकार द्यावा .नंतर एक वर्षाने सोशालिस्ट पार्टी ऑफ अमेरिकाने पहिला महिला दिन साजरा केला. महिला दिनाला आंतराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करावा अशी कल्पना 1910 मध्ये क्लारा जेटकीन ह्यांनी कोपनहेगन मध्ये श्रमिक आंतराष्ट्रीय महिला कॉन्फरन्स मध्ये दिली.ह्या कॉन्फरन्स ला 17 देशाच्या 100 महिला उपस्थित होत्या नि ह्या सर्वांनी क्लारा जेटकीन ह्यांच्या कल्पनेला मान्यता दिली.अशा तरेने महिला दिन हा महिल्यांच्या हक्कासाठी साजरा झाला पण हल्ली त्याच पूर्णपणे बाजारीकरण झालेलं आहे, आज महिला दिन हा फक्त ऑफर्स साठी साजरा होतो, ह्या भांडवलशाही व्यवस्थेत महिला पूर्णपणे वाहून गेलेत, ह्या सगळ्यातून त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव ही होतं नाही नि करून ही दिली जात नाही.



Source: INTERNET

महेश कामडी, नागपूर.

प्रेमाचा सागर ग तू...
हृदयाची हाक ग तू...
माझ्या जीवनाची सावली ग तू ...
माझ्यासाठी माझा देव ग तू...
'एक स्त्री' माझी आई ग तू...

मला मांडीवर आंघोळ घालणारी ग तू...
हट्ट पुरवणारी मैत्रीण ग तू...
जुन्या गोष्टी सांगणारी राणी ग तू...
संस्कार देणारी देवी ग तू...
'एक स्त्री' माझी आजी ग तू...

न सांगता मनातलं ओळखणारी ग तू...
कधी मायेची ऊबदार शाल ग तू ...
सावली जणू आईची ग तू... 
कधी प्रेमाने तर कधी रागीट ग तू... 
'एक स्त्री' माझी बहीण ग तू...

भर उन्हात गार वाऱ्याची झुळूक ग तू...
मी असेल शिव तर माझी शक्ती ग तू...
माझ्या सुख दुःखाची सोबती ग तू...
माझे पूर्ण संसार माझे प्राण ग तू ...
'एक स्त्री' माझी पत्नी ग तू...

आईचे अर्धे रूप ग तू... 
आईपेक्षा जवळची मैत्रीण ग तू ...
प्रेमाची घागर ग तू ...
आई नंतर सगळ्यात जवळची ग तू ...
'एक स्त्री' माझी मावशी ग तू...

गोड मनाची साखर ग तू ...
आईची माया देई ग तू ...
पुरणपोळीचे जेवण भरवणारी ग तू...
 'एक स्त्री' माझी मामी ग तू...

अशी नशिबाने लाभली ग तू ...
कधी कधी छोट्या गोष्टीत रुसणारी ग तू ...
प्रत्येक गोष्टीवर पार्टी मागणारी ग तू...
बेस्ट फ्रेंड चा हक्क गाजवणारी ग तू...
'एक स्त्री' माझी मैत्रीण ग तू...

मायेची ऊब लक्ष्मीचे रूप ग तू...
भावनेचा पाझर ग तू ...
थोडे दिवस राहून आयुष्यभराची आठवण देऊन जाते ग तू...
बाबांची शान आईचे प्राण तू....
'एक स्त्री' माझी मुलगी ग तू...

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************