रंग
स्नेहलता सरनाईक,सांगली.
रंगाचा शब्दशः अर्थ तसा पाहिला तर वेगवेगळ्या रंगांच्या छटा असाच कोणीही घेऊ शकतो,मात्र कल्पकता आणि जीवन प्रवाहात वाटचाल करत असताना गडद आणि फिकट अशा रंगाच्या संगतीत आपण आयुष्याची वळणे घेत असतो.छोटी- मोठी दुःखे ही जीवनात काळोख घेऊन येतात म्हणजेचं त्या क्षणी आपण विवंचनेनी ग्रासले जातो. परिस्थिती हाताबाहेर किंवा इतरांशी बोलून हलके होण्यासारखी नसली तर आपोआपच आपण पोखरले जातो.सुखाच्या प्रसंगी आनंदाला पारावर नसतो तदक्षणी आपले चंचल मन इंद्रधनुसारख्या सप्तरंगात न्हाऊन निघते.एक मात्र खरे आहे आपल्या बँकेच्या खाते बुक मधील आलेखासारखे आपलं आयुष्य रोज नवी वळण घेत,त्याकडे पहाण्याचा आपला दृष्टिकोन त्यात नवनवीन रंग भरत रहातो, तो पूर्णतः आपल्यावरती असतो.निसर्गाने बहाल केलेल्या रंगानी आपले आयुष्य बहरायचे की आलेल्या संकटांनी खचून जाऊन स्वतःला काळोखात लोटायचे. भिन्नविभिन्न रंगसंगती आयुष्यात लाखो छटांचे कंगोरे घेऊन येऊ शकतात त्याला फक्त आणि फक्त आपली परवानगी हवी त्यासाठी जुन्या गोष्टीना बाजूला करून आपण वाट मोकळी करून द्यायला हवी.
अनिल गोडबोले ,सोलापूर.
तसा रंग आपल्या आयुष्यामध्ये भरपूर वेळ येत असतो आणि आपण तसं भरपूर रंगीला आहे, पण रंग म्हटलं.... की तीन गोष्टी आठवतात :- एक शाळेतला चित्रकलेचा तास, दोन होळी आणि सण समारंभ आला की रांगोळी ....बाकी भिंतीचे कलर वगैरे किंवा रंग संगती याबद्दल आपला तसा काही फारसा संबंध नाही. मला आठवतं रंगपंचमी हा सण... कारण मी लहानपणी म्हणजे बारावी पूर्ण होईपर्यंत रंग खेळलेला आठवत नाही.
जेव्हा सोलापूरला आलो तेव्हा मात्र रंगपंचमीला भरपूर रंग खेळत होतो .नंतर कॉलेज संपल्यावर नोकरी लागल्यानंतर आयुष्यातील रंग संपले (नंतर रंग उधळायला लागला असं लोक म्हणतात) असो तो भाग वेगळा .....पण उधळून द्यायचं सण म्हणजे रंगपंचमी आणि तो माझा फार आवडता सण आहे.. रंग नसते तर आपले आयुष्य किती निरस झालं असतं याबद्दल कोणाचे दुमत नाही. मग याच धुंदीत रंग खेळुयात ..उधळण करूयात फक्त दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी घेऊ...एवढच !!
महेश कामडी,नागपूर.
रंग मळा हिरवळतो
फळा-फुलांनी बहरतो
पिकून होतं पिवळ्या शार
हा रंग कसा दळवळ तो
वर नभ हे निळे
खाली पण्यावरती खेळे
कापूस पिंजून ढग हे पांढरे
त्यास किती बघ शोभे
उगवत्या सूर्यात जणू
भगवा रंग बघ कसा दिसे
जिकडे तिकडे चोहीकडे
गोड गुलाबी फुलली फुले
त्यावरती शोभे लुपलुप्ती
रंगीबेरंगी फुलपाखरे
कुठे काळे काळे शेतही
लाल गुलाबांची शाल ओढते
निसर्गाची किमया पाहा
अग्नी पाणी हवा एकत्र येते जवा
मग आकाशी सप्तरंगी
इंद्रधनुष्य ही येतो नवा
या सर्व रंगांना मिळून घेतो
खाकी रंग तो पहा
गजानन घुंबरे,परभणी.
लहानपणी चित्रकलेच्या विषयात रंगाची खऱ्या अर्थाने ओळख झाली. जन्मापासुन सभोवताली असणारे रंग चित्रकलेच्या वर्गात आणखीच आवडायला लागले. सातरंगाची समज आली .अंधकाराला संपवणारा प्रकाश ही सप्तरंगाचा असल्याचे शाळेत प्रयोगशाळेतील प्रिझम ग्लासने तर निसर्गाने क्षितिजावर तयार झालेल्या इंधनुष्यातून दाखवले. या सात रंगाची नावे जरी सर्वांना माहीत असली तरि गावात राहणाऱ्या आम्हां सारख्याकडे आणखी ही रंगाच्या नावाचा खजीना असतो त्यात ढवळा, हरणा,राखुंडी, गजगा, गढूळ इत्यादीं अनोख्या नावाचा समावेश असतो.जसजसे वय वाढले रंगाविषयी आणखी माहिती वाढत राहिली काही निसर्गाने शिकवले तर काही समाजाने. शेतशिवाराने ही शेतात पिक हिरवेगार आले की बहरात असते, पोपटी परिपक्वतेच लक्षण तर पिवळे काढणीस आले समजा अशी लक्षणे सांगितली. एवढच नाही तर पिकाच्या बदलणाऱ्या रंगावरुन उभ्या पिकाला आवश्यक अन्नद्रव्य , पाणी देऊन पिक जोमात आणण्याची किमया रंगानेच शिकवली.निसर्गाने वनराईला हिरवा, पाणी व आकाशाला निळा तर मातीला काळा,लाल रंग गुणधर्मानुसार दिला. मानवाने मात्र हळूहळू हे रंगही वाटून घेतले.समाजाने अमका रंग ह्या धर्माचा ,तमका त्या धर्माचा शिकवण दिली.आता रंगावरुन जात ,धर्म कळायला लागले. भितींना आकर्षक करणारे रंग , एखाद्या धार्मिक स्थळाच्या भिंतीवर पडले तर समाज शांतता कमालाची अशांत झालेली पहायला ही मिळाली.एवढं कमी की काय ?रंगावरून माणसे माणसांचा वर्णभेद करायला ही लागले. गोरा, काळा, सावळा रंग ही भेदाभेदीचा झाला. अमुक रंगाचा अभिमान बाळगू लागला तर तमुक रंगाचा न्युगंड .रंग बदलण्याची चढाओढ लागल्याने अधिक गोरा रंग दिसावा म्हणुन रंगाच्या डब्या चेहऱ्यावर लावल्या जाऊ लागल्या.शेवटी निसर्गाचा रंग तो मातीच्या रंगाशी एकरूप झाल्याशिवाय जाणार नाही अन् दुःख या गोष्टीच आहे कि रंगभेद करणारा प्रत्येक व्यक्ती, समाज ते कधी समजून घेणारही नाही .
आपण जपला पाहिजे तो फक्त अंतरंग बाकी बाह्यरंग उडणारे आहेत.शेवटी सर्व रंग मिळून जेव्हा एकत्र येतात तेव्हा पडतो तो स्वच्छ प्रकाश व तो नष्ठ करतो मानव निर्मित भेदाभेदीच्या, समजगैरसमज,अज्ञानाच्या अंधकाराला.एवढ समजल ना मग कोणी हा रंग माझा अन् तो रंग तुझा असं कदाचीत म्हणणार नाही. मुक्तहस्ते उधळलेले रंग वाटूनही घेणार नाही .
(संबंधित छायाचित्रे इंटरनेटवरून घेतलेली आहेत)
(संबंधित छायाचित्रे इंटरनेटवरून घेतलेली आहेत)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा