एकांत....

एकांत….

एकांत या विषयांवरील लिखाण pdf च्या माध्यमातूनही वाचण्यासाठी क्लिक करा. (pdf आकार: 309 kb)



वैशाली सावित्री गोरख,पंढरपूर(मुंबई)
आजकाल एकांत असा भेटत नाही ,आपण इलेक्ट्रॉनिक मीडिया मध्ये एवढं अडकलो आहे की कधीतरी एकांतात बसावं , मनन चिंतन करावं असं आपल्याला कधीच वाटतं नाही, नि तसा एकांत भेटला तर आपण त्याला मी खूप एकटा पडलोय अस मनतो ,पण एकटं पडलं तरी तो वेळ विचार करायला, स्वतःच ओब्सेर्वेशन करायला आपण देत नाही .मला ही खूप वाटतं मला एकांत भेटावा , मी माझ्या रुममेन्ट ला खूपदा बोलले की मला एकांत भेटत नाही नि एका संडे ला मला ऑफिस मधे जाव लागलं नि पूर्ण ऑफिस मध्ये मी एकटीच तेव्हा ही मी मला एकांत भेटतोय म्हणून खुश व्हायला पाहिजे होत पण तो एकांत मला जीवघेणा वाटायला लागला होता, ह्यावर आपण अस म्हणू शकतो की एकांत हा आपल्या मूड वरती ही अवलंबून असतो, सगळ्या लोकांपासून उगाचच अलिप्त राहणे , म्हणजे एकांत नव्हे तर कधीतरी आपल्या रोजच्या दिनक्रमामधून स्वतःसाठी स्वताहून दिलेला थोडा वेळ म्हणजे एकांत, नि मी वरती कधीतरी हा शब्द वापरला ह्याचा अर्थ खरंच कधीतरी न घेता माझं तरी अस वैयक्तिक म्हणणं आहे की दिवसातून रात्री थोडा वेळ स्वतःसाठी ठेवून दिवस भर आपण जे काही केलं त्याच मननं ,चिंतन करणं गरजेचं आहे कारण हल्ली आपण कधीच स्वतःच्या वर्तवणुकीच अनुकरण करत नाही .आठवड्यातून एक दोन तास काढून एकटेच (बिना मोबाइल) बाहेर पडणे गरजेचं आहे .
स्नेहलता सरनाईक,सांगली.
लोकांच्या गोमगल्यातून क्षणभर स्वताला वेगळे करून स्वत्व जपणं म्हणजे एकांत.प्रिय अप्रिय  भूतकाळ नव्यानं डोळ्यासमोरून या एकांतातच जातो,त्याक्षणी आपण स्वतःच्या अस्तित्वापासूनच्या छटांना उजाळा देतो.निसर्गाच्या सोबतीने आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा या एकांतात खऱ्या अर्थाने केला जातो.एकांतात स्वमग्न होऊन कवी मनाची लोक आपल्या  शब्दांची गुंफण करून नवीन रचनांची सुंदर भेट स्वतःसाठी आणि रसिकांसाठी रचतात.
रोजच्या तारेवरच्या कसरतीती सगळ्यांना हा एकांत हवाहवासा वाटतो.मनमुराद हास्य ,कोणाच्या भीतीशिवायच रडणं, बालपण अनुभवणं यासारख्या भावनांना मोकळं करण्यासाठी एकांताची  एक अनमोल भेट निसर्गाने मानवाला दिली आहे.
दिव्या अंबुरे पाटील,बीड.
कधी भेटतो एकांत,
कोणी आयुष्यात येऊन गेल्याने,
आलेल्याने जाताना ,
आपल्याच अस्तित्वाकडे बोट दाखवल्याने.....

मग निघतो आपण,
 स्वतःचा शोध घेत,
अन् गुंततो त्या आपण असलेल्या काळोखात ,
नवीन उमेदीची किरणे शोधत,
तोच तो एकांत.....

स्वतःला पारखायला हवा असतो तो एकांत,
आयुष्यावर चालून आलेल्या डावपेचांना डावलून लावायला ,
अन् खचलेल्या माझ्यातुन मला ,
लढवय्या व्हावया मज हवा तो एकांत.....

माणूस एकांतात जेवढं स्वतःला ओळखू शकतो , तेवढं कोणत्याच परीक्षेने आत्मपरीक्षण करू शकत नाही.
प्रतिक्षा बूध्दे,गडचिरोली.
आपल्या स्व शी सांगड घालायलचा सर्वोत्तम पर्याय! 
पण कधी कधी हाच एकांत आपल्याला आपल्याच विचारविश्वात मग्न करुन सोडतो. त्यावेळी मग, येणार्या विचारांची दिशा प्रभावित , प्रगल्भ होते. शांत आणि एकांतवासी अशी व्यक्ति सहसा फारच सॉर्टेड असतात असं मला वाटायचं, त्याचे कारणही हेच असावं. म्हणजे जगाच्या नजरेत त्यांचं चित्र खरंतर परिस्थिति नुसार कायम बदलत असतं पण जगाच्या तर्कांचा परिणाम 'एकांताची साथ' धरलेल्या विवेकी व्यक्तिला तिळमात्रही जाणवत नसतो.
कित्ती भारीए ना हे! एकांतात एक फार महत्त्वपूर्ण काम करता येतो ते म्हणजे आत्मचिंतन. जेव्हा आपण आत्म-शोध (self inspection) करायला लागतो तेव्हा स्वत: बद्दल नवनविन आयाम व आपल्याच वेगवेगळ्या प्रवृत्तीं शी आपली नव्याने ओळख होते. हे एकदा जमलं की मग एकांतात शांत झालेल्या आपल्या मनाला आपल्या चांगल्या-वाईट गोष्टी सहज स्विकारता येतात. मान्य होतात. पुढे स्व परिवर्तिन सुद्धा! 'स्व च्या स्विकाराची' खरी सुरवात मी सुद्धा एकांतातच केली होती. या एकांताने मला स्वत:चा, स्वत:च्या आयुष्याचा खरा अर्थ समजुन घेता आला.मी काहींना बघितलंय, एकांताचा उपयोग ध्यान वगैरे करायला सुद्धा करतात. पण मला काय वाटतं, जगापासुन अलिप्त होणं, परत त्याच जगात त्याच मनाला घेऊन परत येणं (ते ही काहीसं मनाविद्धच) आणि ते सुद्धा काही न करताच(!?) हे काही कळतं नाही. हां तेवढ्यापुरती बरं वाटतं हे मान्य आहे पण अश्याने एकतर काही प्रश्न ही सुटत नाही आणि एकांताचा अमुल्य वेळही नष्ट होतो.त्यापेक्षा आपण एकांतात आणखी एक गंमत करु शकतो,शांतीत क्रांती म्हणजे काय तर आपल्या आजुबाजुला चालेल्या घटनांची मीमांसा! यातुन सकारात्मक मार्ग काढने सोप्पं जातं. एकातांतील आत्मचिंतनातुन 'स्व' ची उकल केलेल्या माणसांना तसंही मग ते काही अवघड वाटत नाही. आपल्या क्षमता, कमजेरी काय? व त्याही पुढे आपली मुल्ये काय? यांची प्रश्ने ज्यांनी एकांतात प्रामाणिकपणे सोडवली आहेत त्यांना जगातील प्रश्न सोडवनं कठिन वाटत नाहीत.

हे माझं व्यक्तिगत अनुभव. एखाद्या गोष्टीचा, व्यक्तिचा एवढंच नव्हे अगदी स्वत:चा जेव्हा त्रास व्हायला लागतो तेव्हा मला माझ्या जीवाभावाचा, फक्त माझ्याच हक्काचा असलेला व कधी कधी क्रुरपणे खेचत मला चुकीच्या वाटेवरुन परत सरळ वाटेवर आणणारा माझा मित्र म्हणजे माझा एकांत! 

वाल्मीक फड ,नाशिक 
एकांतात बसून माणसाला जीवनात बर्याच काही गोष्टी साध्य करता येतात.एकांत माणसासाठी फार महत्त्वाचा.असाध्यासी साध्य करणारे साधन म्हणजे एकांत,विचारी मनाला विसावा म्हणजे एकांत, आंतरमनात डोकावून बघण्याचा माणस म्हणजे एकांत, जीवनाला कोणत्या वळणावर घेऊन जायचे यासाठी एकांत गरजेचा आणी सर्वात महत्त्वाचे म्हणजे लिहीण्यासाठी जो विचार करावा लागतो त्यासाठी एकांत खूप गरजेचा. तसं पाहीलं तर प्रेमी प्रेमीकेसाठी, नवविवाहीत जोडप्याला एकांत हा फार गरजेचा असतोच.अनेक लेखक,कवी हे एकांतात राहूनच आपल्या मनातील विचार सामान्य माणसांपर्यंत पोहचवू शकतात.एकांत असा काही विषय आहे की, एकांतात जाऊन सतत नामस्मरण केल्यामुळे जगद्गुरु श्रीसंत तुकाराम महाराजांनी देवाची प्राप्ती करुन घेतली म्हणूनच माणसाच्या जीवनात एकांत असणे खूप गरजेचे नव्हे नव्हे तो अंगात बिंबवणे अधिक महत्वाचे.
राम आक्रम,सातारा.
एकांत हा जेवढा चांगला तेवढा वाईट. याला मी स्पष्टीकरण देऊ शकतो, स्वतःच्या अनुभवावरून.मला काही वेळ एकांतात घालवू वाटतो. त्या एकांतात चांगले आणि वाईट दोन्ही क्षण असतात. लहानपणीच माझ्या आई-वडिलांचे छत्र हरपले. वसतिगृहात असताना मित्रांचे पालक भेटायला यायचे, त्यांना पाहून खूप दुःख व्हायचे आणि मी एकांतात बसुन रडायचो. हा माझा लहानपणीचा एकांत.जसा जसा मोठा होत गेलो तसा एकांत कमी होत गेला, तरीसुद्धा पाचगणी महाबळेश्वरच्या शाळेत असताना पहाडावर जाऊन एकांताचा आनंद लुटायचो, कधी आनंदात तर कधी भविष्याच्या चिंतेत, कधी अंतर्मनाच्या भावनांच्या लयेत. 
माझ्या एकांताचे सध्याचे महत्वाचे कारण आहे, भावना आणि विचार व्यक्त करायला योग्य व्यक्ती नसणे, अर्थातच एकांतात बसुन मी स्वतःच्या दुःखात रडतो, स्वतः चे दुःख समजून घेतो आणि स्वतःला सकारात्मक ऊर्जा व विचार देऊन नवीन सुरुवतीला आलिंगन देतो.
प्रत्येकासाठी एकांत हा वेगळा असू शकतो, काहींना हवासा काहींना नकोसा. माझ्यासाठी तो हवासा आहे. एकांतात मला विचार करायला वेळ मिळतो. एकांत म्हणजे स्वतः साठी राखून ठेवलेला वेळ.
जगताप रामकिशन शारदा,बीड.
एकांत कुठे भेटतो हल्ली. कोणी सोबत नसल तरी असतो न मोबाईल. मग काय कर ली दुनिया मुठ्ठी में. एकांत मिळणे ही आजकालची खूप अवघड गोष्ट बनली आहे. माणूस एकांतात बसला की तो शांत डोक्याने सभोवतालच्या गोष्टीवरून स्वतः च्या आत विसावतो. बऱ्याच वेळा असा अनेकांचा अनुभव असेल की प्रवासाच्या वेळी आपण अनेक गोष्टींचा मागोवा घेतला असेल किंवा अनेक भविष्यातील  योजनांचा आराखडा हवेत आखत असतो. आवडत्या क्षणांचा पाठपुरावा करुन इमले उभारून मस्त झुलत असतो नको वाटल तर हळूच मान डोलावून तो इमला काढून टाकतो. कसलाही खर्च नाही दुख नाही. एक तर आपण आपल्या कल्पनेतल जग जगत असतो अगदी बंड करून क्रांतीची मशाल घेऊन धावत असतो. आणि खर आयुष्य त्या क्षणांमध्येच आहे.एकांतात माणूस आंंतर्मुख होतो अचानक हसतो तर कधी कधी हलकेच पाणावलेल्या डोळ्याच्या कडा अलगद पुसतो विचारलच कोणी तर हसून काही नाही असच आल म्हणतो. जेव्हा माणूस एकांतात असतो न तेव्हा त्याच शरीर मन आत्मा ऱ्हदय मेंदू असे जे वेगवेगळे अवयव भाग असतात ते सर्वच एकाच दिशेने विचार करत असतात म्हणून तर एकांत हवा असतो.पण हवाहवासा वाटणारा एकांत कधीकधी काळ बनून आल्यासारखा येतो एकांतात ही अनेक ज्वलंत प्रश्नांची उत्तरे हवी असतात त्यावेळी मात्र कसलही हास्य किंवा डोळ्यातून पाणी येत नाही पण तप्त मेंदूच्या भट्टीत उफाळून येणारे ज्वालामुखी सारखे एक ना अनेक विचार कान आणि नाकातून बाहेर पडतात यावेळी मात्र कोणी का विचारले तर तो तांडव करायला मागे पुढे पाहत नाही.म्हणून एकांत आत्मपरिक्षणाचा एक उत्तम उपाय आहे पण जर कोणी अतिरेकी एकांतात असेल तर समजून घ्या प्रलय येणार आहे आणि कसा.कुठून केव्हा काही कल्पना नाही.
मंदा गव्हाणे,अमरावती.
आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती एकांत शोधत असतो, इतर लोकांच्या गर्दीपासून दूर कुठेतरी फक्त मी किंवा आपणच असलेल्या, जागेला एकांत असे म्हणतात. एकांत सुद्धा दोन प्रकारचा आहे, एक म्हणजे केवळ मी आणि मीच, दुसरा म्हणजे फक्त मी आणि माझी मैत्रीण, किंवा माझी बायको, किंवा माझा मित्र. एकांत म्हणजे एखाद्या नदीकाठी दूरवर कुठेतरी, तळ्याकाठी, मंदिरात, शहरापासून दूर फार्म हाऊस, बागेत, किंवा आपल्या घरातील स्वतःची खोली जिथे आपण एकटेच असतो. एकांतामध्ये दोन व्यक्ती कुठलीतरी महत्वाची चर्चा अगदी शांतपणे छान पार पडतात, कुठल्याही समस्येचे समाधान शोधून काढतात, विचारांची देवाण-घेवाण शांत मनाने करतात.एकांतामध्ये केवळ मी आणि मीच असल्यास एकचित्त होऊन परमेश्वराशी बोलून स्वतःच्या मनाला समाधान मिळवता येते, स्वतःला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर स्वतःला शोधता येते, एखादा छंद असल्यास तो जोपासता येतो.                उदा. पेंटिंग करणे , लिखाण काम, अभ्यास, कमी आवाजात संगीत ऐकणे, एखादी कला जोपासणे.एकांत काही विशेष लोकांना अत्यंत गरजेचा असतो, उच्च शिक्षणाच्या परीक्षेची तयारी, वही खाते सांभाळणारे लोक, मन दुखावले लोक, आर्थिक परिस्थिती चांगली नसणारे, काही चिडचिड्या स्वभावाचे लोक, काही व्यसनांनी ग्रासलेले लोक इ.काही लोकांना एकांतात गुन्हेगारीचे वृत्त करायला आवडते, कधी स्वतःच्या जीवाशी खेळ करून आत्महत्येचा प्रयत्न करणे, कधी इतरांच्या जीवा विषयी वाईट कट रचणे. शहरापासून दूर एकांतामध्ये शुद्ध वातावरण असते, तो एकांत आरोग्यासाठी सुद्धा खूप रामबाण ठरतो.        
                               
रामेश्वर शिंदे,औरंगाबाद.
इथे जमलेल्या तमाम लोकांनो...... असा सूर एका सभेतल्या गर्दीतून निघाला आणि तसाच तो तिथून चालता झाला कायमचा, त्या गर्दीपासून दूर...या माणसांच्या कोलाहलात त्याचा श्वास गुदमरत होता. दमा असलेल्या लोकांसारखा त्याला हवा होता इनहेलररुपी एकांत कायमचा..त्या एकांताच्या शोधात त्याने गूगलला सर्च केलं ''वेअर इस एकांत" या प्रश्नावर उत्तरादाखल गूगल बंद झालं. कारण तिथे व्यस्त वर्दळीतल्या लोकांसाठी माहितीचा अफाट साठा होता पण एकांत कुठे आहे ते त्या यंत्राला माहिती नव्हतं, त्याच निराशेतुन त्याने अनावश्यक अस गूगल फेकलं कचऱ्याच्या पेटीत, आता हा एकांत कुठे मिळेल याच्या शोधात तो भरउन्हात पडला घराबाहेर तेव्हा त्याला रस्त्याच्या कडेला निपचित पडलेला देह दिसला तेव्हा त्याने त्या देहाजवळ जाऊन बघितले तेव्हा तो देह अर्धवट शुद्धीत कुणाला तरी शिव्या देत होता. रस्त्यावरून जाणाऱ्या एका पादचाऱ्याला त्याने विचारले हा देह इथे असा बेवारस का पडला ? तेव्हा त्याला उत्तर मिळालं, एकांतासाठी त्याने दारू पिली आणि तो या गर्दीतही एकांतात पडला. मग मात्र ह्या दारूमुळे आपल्याला एकांत मिळतो यावर तो ठाम झाला आणि दारूच्या दुकानात गेला.. तिथे गर्दी असूनही स्वतःत रममाण असणाऱ्या लोकांना पाहून त्याची खात्री पटली की, गर्दीतही एकांत मिळू शकतो तेही या रंगीबेरंगी पाण्यामुळे,त्याने थोडी घेतली आणि एकांत मिळायच्या ऐवजी विचारांची गर्दी तिथे सुरू झाली शुद्धीत आल्यानंतर दारू ही एकांत नव्हे तर विचारांच्या गर्दीत आणून सोडते, म्हणून तो परत एकांताच्या शोधात पुढे चालता झाला त्याला मांडी घालून डोळे बंद करून बसलेले लोक दिसले तेव्हा त्याने त्यांच्याजवळ जाऊन या अवस्थेत बसण्याच कारण विचारलं तेव्हा त्यांनी संगीतल की, "आम्ही मनाच्या शांतीसाठी हे करत आहोत" मग त्यानेही त्यांच्यासारखी कृती केली त्यातून तो स्वतःला डोळे बंद करून अनुभवत होता.. त्याचा श्वास, हृदयाची धडधड सगळं त्याला जाणवत होतं.काहीतरी नवीन मिळवल्याचा त्याला आनंद झाला  आणि बराच वेळ तो तसाच बसून राहिला, आजूबाजूच्या झाडांच्या पाना-फुलांचा सळसळणारा आवाज पक्ष्यांचा किलबिलाट, गर्दीतल्या लोकांचा आवाज हे सगळं असूनही तो शांत होता एकांतात. पण हे असं आपण किती वेळ बसणार आणि काम सोडून असं बसून राहील तर आपल्या जीवनचक्राच काय ? तेव्हा त्याने डोळे उघडले आणि समोर त्याला पक्षी उडताना दिसले तेव्हा त्याने विचार केला की, पक्ष्यांना प्राण्यांना एकांत हवा असेल की नाही, ते एकांतात बसतात की नाही तेव्हा या प्रश्नाचे उत्तरही आकाशात असणाऱ्या रंग बदलणाऱ्या ढगाने दिलं निसर्गचक्राप्रमाणे आपणही निसर्गाशी समरस होऊन जगावं...उन्हाळा, हिवाळा, पावसाळा याप्रमाणे आपणही आपला स्वभाव, दिनचर्या बदलावी...आपण आपलं होऊन जगावं एकांतात गर्दी असली तरीही.


(यातील संबंधित छायाचित्रे गुगलवरून घेतलेली आहेत)
*एकांत विषयांवरचे प्रत्येकाचे विचार कसे वाटले? तुमचे मत जाणून घेण्यास सर्वाना आवडेल.खाली कमेंट करायला विसरू नका.

1 टिप्पणी:

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************