मासिक पाळी
रत्नाकर सातपुते,संगमनेर.
या विषयावर शाॅर्ट फिल्म केली तेव्हा सगळीकडून भुवया उंचावल्या गेल्या होत्या. अतिशय संवेदनशील विषय,त्यात मी डाॅक्टर वगैरे नाही म्हटल्यावर माझी अनेकांना काळजी वाटली.पण माझ्याकडे याबाबत ठोस आणि ठाम अनुभव,अभ्यास, निरिक्षण असल्यामुळे मला व्यक्त होता आले.शहरात सुशिक्षितांमध्ये ज्ञान साधनांमुळे प्रश्न निकाली निघतात तसे खेड्यात नाही, संवादाचा अभाव,संकोच, अज्ञान यामुळे कालापव्यय होतो आणि गैरसमज वाढत जातात... कारणं शोधण्याची गरज मनात येत नाही. खेड्यात, अडाणींमध्ये समुपदेशन वगैरे काही प्रकार असतो हे माहीत नसते.मुळ समस्या बाजूला राहून गैरसमज वाढतात, संशय वाढतो, घरामध्ये मिळत नाही म्हणून बाहेर सुख शोधण्याचा प्रयत्न केला जातो...निष्पाप माणसे यामध्ये फसतात आणि नकळत एखादे हसते खेळते कुटुंब उध्वस्त होते.या विषयाला अनेक नकारात्मक कंगोरे असतात,पैकी मी त्यातला एकच मांडला आहे.उद्देश,पती पत्नी ने आपसात हेही बोलले पाहिजे, एकमेकांना समजून घेतले पाहिजे...सोबत लिंक देत आहे.(क्लिक करा)
गजानन घुंबरे,परभणी.
निसर्गाने स्त्रीला आई होण्यासाठी मोठी देणगी दिली खरी पण स्त्रीला पूर्णत्व देणाऱ्या मासिक पाळीला समाजाने बहिष्कृत दर्जा दिला. ग्रामीण भागात तर मासीक पाळीतील चार दिवस म्हणजे कहरच असतात.घरच्या स्त्रीला दैनंदिन कामाला हात लावू दिला जात नाही. घरातील स्त्रीला मासीक पाळी आलीय हे काही वेळातच घरच्यांना न सांगता कळते कि, 'ती' ला आज करायच नाही. त्यात लग्न झालेल्या महिलेला करायचं नाही म्हणजे, चार दिवसाचे बहिष्कृत जीवनच म्हणावं लागेल. स्वतःच्या बेडरुम मधील पलंगा पासुन ते घरातील स्वयंपाक घरापर्यंत अलिखीत आचारसंहिता घातल्या जाते. चूकून घरच्या सदस्याला स्पर्श झाला तर विटाळ झाला म्हणून त्याने एकतर आंघोळ करायची नाहीतर गोमुत्राचा पर्याय शिल्लक असतोच. तीला करायचं नाही असा शब्द प्रचलीत असला तरी असह्य पोटदुखीच्या वेदना ओठावर न आणता 'ती ' च्या राशीला मात्र घरातील सर्व काम दिले जातात.आराम हराम काय असतो ? ते त्या चार दिवस जगणाऱ्या बिचाऱ्या स्त्रीलाच विचारा. स्पर्श झाला की विटाळ अन् धुतले कि शुद्ध म्हणुन धूनी भांडी सर्व तीच्या कडून गुलामा सारखी केल्या व करवून घेतल्या जातात. त्यात चार दिवस 'ती'ला मात्र अंगाला पाणी लावू दिल्या जात नाही. शरीरातून निघणाऱ्या अशुद्ध रक्ताला तुमच्या मार्केटमध्ये भेटणारे ' स्टे फ्री ' सॅनेटरी नॅपकिन तरी कुठे मिळतात.मिळतात जुन्या कपड्याच्या चिंध्या.नवरोबाला कधी सॅनेटरी पॅड सांगितले तर त्यांना दुकानदाराला मागण्याची लाज वाटते. चुकून घेतले तर दुकानदार पॅड ला असे कागद गुंडाळून हातात देतात जसं कि,पॅड दिसल्यावर इज्जत उघड्यावर पडणार आहे. या चार दिवसाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन कोणी बदलला असेल हे माहीत नाही. अज्ञातुन निर्माण झाला हे नक्की.मला हे कधीच कळालं नाही , ग्रामीण भागात मुलीला पहील्यांदा मासीक पाळी येते तेंव्हा तीची खणा नारळाने ओटी भरल्या जाते, आनंद साजरा होतो, मग पुढच्या महीन्यापासुन त्याच मुलीला घरात या चार दिवसात याला हात लावू नको ! विटाळ होईल असं का होतं .लेक असल्यापासुन ते बिंबवल्या जात सुन झाल्यावर तर अधिकच जाचक होत. मग हिच लेक ,सुन व पुढे सासु असते हिनेच सगळे भोगलेले असताना बदल का होत नाही? त्या मासीक पाळीच ठरलेलं आहे, एक ते चार , पाच ते चौदा अन् पंधरा ते अठ्ठावीस दिवस असणारं ते वयाच्या ठरावीक वयोमर्यादेपर्यंत न थांबणार चक्र आहे .मग या अज्ञानी वागणुकीतून समाज व स्त्री कधी बाहेर निघेल?कदाचीत शिकलेली ग्रामीण 'स्त्री' याचं उत्तर असेल.
नंदा गव्हाणे,अमरावती.
मुलींना किंवा स्त्रियांना महिन्यातून एकदा नियमित मासिक पाळी येणे म्हणजे कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा घाण नसून ती एक नैसर्गिक घटना आहे. त्यात सुतक, अशुद्धता, विटाळ किंवा अ पवित्रता असे काही नाही. साधारणतः मुलींना अकरा वर्षांनंतर पंधरा सोळा वर्षाच्या दरम्यान पाळी येणे स्वाभाविक आहे, व ती वयाच्या पंचेचाळीस ते पन्नास वर्षात जाणे स्वाभाविक आहे. पाळी नियमित येऊन ठराविक दिवस स्त्राव गेला पाहिजे. प्रत्येकीची पाळी ही २८-३० दिवसांनी असेलच असे नाही. कधीकधी व्यक्तिपरत्वे ती २१ दिवस ते ३५ दिवस असू शकते. पाळी येणे हा आजार नव्हे यावेळी रोजचे काम नियमित करता येतात. निरोगी व सुदृढ मुलींना पाळीच्या वेळी काहीच त्रास होत नाही. अशक्तपणा, मानसिक ताण तणाव, वातावरणातील बदल यामुळे पाळी अनियमित होणे किंवा पाळी मध्ये त्रास होणे शक्य असते. काही मुलींना किंवा स्त्रियांना पाळी तीन दिवस नियमित असते, याव्यतिरिक्त काहींना सहा दिवस पर्यंत पाणी असते. या दिवसांमध्ये वैयक्तिक स्वच्छतेविषयी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. रोजच्या रोज अंघोळीच्या वेळी जननेंद्रिय स्वच्छ करावे, या दिवसात आंघोळ करणे टाळू नये.विकत मिळणारे सॅनिटरी डायपर्स बरेच महाग असल्याने मध्यमवर्गीयांना परवडत नाहीत म्हणून माऊ पांढऱ्या पातळ स्वच्छ कापडाचे दोन-तीन पदरी पुरेसे मोठे रुमाल शिवून वापरावेत. त्यामुळे ते लवकर फाटत नाहीत व पांढरे असल्यास त्यावरील डाग निघाले की नाही हे लवकर लक्षात येते. वापरलेले कापड हे गरम पाण्याने धुऊ नयेत कारण उष्णतेने रक्तातील प्रोटिन्स गोठून कपड्यांना चिकटून राहतात आणि हिरवट असे डाग कपड्यांवर पडतात व कपडे रखरखीत झाल्याने मांडी ना घासून पुरळ येते व जखमा होणे अशा घटना घडतात.धुतलेले कापड सूर्यप्रकाशात वाळवून चांगल्या ठिकाणी ठेवावे. प्रत्येक वेळी लघवीस गेल्यानंतर बाहेरील जननेंद्रियाची स्वच्छता भरपूर पाण्याने करावी. बाजारातील सॅनिटरी पॅड्स वापरणाऱ्या मुलींनी वापरलेले पॅड संडास मध्ये वाहत्या नळाखाली स्वच्छ करून , पिळून कागदामध्ये गुंडाळून केराच्या टोपलीत टाकावे. दिवसातून तीन ते चार वेळा पॅड बदलावेत. या काळात समतोल आहार, नियमित झोप व थोडी विश्रांती घ्यावी, अतिशय कष्टाचे काम टाळावेत. मासिक पाळी न येणे, खूप रक्तस्त्राव जाणे, अनियमित पाळी येणे, अजिबात पाळी न येणे, ओटीपोटात दुखणे असे असल्यास तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, मुलींना पहिल्यांदा पाळी येते तेव्हा तिला समजून घेणे व समजावून सांगणे हे आईचे किंवा पालकांचे आद्यकर्तव्य आहे.
तो असाच एखादा दिवस असायचा . जवळजवळ सगळ्या गोष्टी उशिराने होत असायच्या आजी स्वयंपाक करताना दिसायची तर आई कुठेतरी कोपऱ्यात आपली अंथरूण पांघरूण गुंडाळून बसलेली असायची. येणाऱ्या जाणाऱ्या कडून त्यावर पाय पडू नये म्हणून ती सारखी सारखी तो अंथरूण गोळा करायची. वागण्यातला विचित्रपणा पाहून चिड यायची. आजीला विचारलं तर सांगायची 'आईला कावळ्याने शिवल' प्रश्न पडायचा म्हणजे काय?
मग ते चार दिवस आईचा उदास त्रासलेला चेहरा पाहून मन भरून यायच.मनाची चिडचिड व्हायची, अस कित्येक वेळा झाले. कधी कधी आजी नसायची तर मग सगळी परेशानीच परेशानी.
अशा पध्दतीने वर्षे सरत गेले पण एक दिवस लोकमत पेपर मध्ये 'ते चार दिवस' अशा आशयाचे लिखाण मैत्र नावाच्या पुरवणीत ते करणार अशी जाहिरात ते जवळपास आठवडाभरापासून देत होते आजीपासून ते लहान मुलांच्या विचारांशी सांगड घालून ती पुरवणी ते का देताहेत आणि सर्वांनी ती का वाचावी याची अनेक प्रश्नातुन उत्तरे त्यांनी दिली होती.
शेवटी ती पुरवणी मी पण वाचली आणि असंख्य प्रश्नांची उत्तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून मिळाली. जी कधीच कोणत्याही एका व्यक्तीकडून मिळणे कठीण होते.
मासिक पाळी म्हणजे काय, शहरी ग्रामीण भागात तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती मिळता जुळता आहे. त्या चार दिवसांत होणारी कुचंबणा विविध वयोगटातील मुलांचे प्रश्न त्यांना द्यायची उत्तरे, आरोग्य आणि स्वच्छतेची घ्यायची काळजी , समाजातील अनेक अंधश्रद्धा त्यांची वैज्ञानिक उत्तरे आणि आपण एक पुरुष म्हणून कोणत्या प्रकारे सहकार्य करावे याबद्दल अतिशय सविस्तर माहिती मिळाली.
पण आजही मासिक पाळी बद्दल बोलायचे झाले तर अनेक जण नाक मुरडतात, वडिलधाऱ्यांच्या आवाजाचा सुर एखाद्या पट्टिच्या गायकासारखा खालीवर होत राहतो. अलिकडे असच वाचण्यात आल की ओडिशा राज्यात मुलींची पहिल्या पाळीचे स्वागत एका उत्सवासारखे केले जाते आणि दुसरी विशेष बाब मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाणही त्या राज्यात कमी आहे.शिक्षण व्यवस्थेत याची मूळ दडलेली आहे कारण चौकसपणाने कोणी प्रश्न केला तर हा कोण परग्रहावरील प्राणी अशा नजरेने त्या विद्यार्थ्यांना पाहिले जाते.सर्वच ठिकाणी अशी गोष्ट आहे असे नाही पण मानसिकता हीच असते. तसेच देश पातळीवर कधी कधी मासिक पाळीच्या दिवसात महिला कर्मचाऱ्यांना रजा देण्यात यावी अशी मागणीही जोर पकडते पण आपणच आपल्या घरात मासिक पाळीत असणाऱ्या महिलेला कामाला लावतो तर मग घरातच नाही तर समाजात बदल कसा होणार.
मासिक पाळी या विषयावर आजही उघडपणे बोलले जात नाही. पाळी म्हणजे पवित्र किंवा अपवित्र असं काही नसतं. मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.आतापर्यंत आपण बघितलं, वाचलं, ऐकलं असेलही की स्त्रियांसोबत काय घडतं .त्यांना आपल्याच घरात त्या चार ते पाच दिवसांत करिता स्वतंत्र असून कैदी सारखं राहावं लागतं. देवघर, स्वयंपाक घर घरची कुठलीही कार्यक्रम या पासून दूर ठेवले जाते. बर्याच ठिकाणी पाळी सुरू असलेल्या महिलेकडून जेवण दिलेले चालत नाही. पाणी दिलेले चालत नाही. मात्र त्याच दिवसांमध्ये तिच्याकडून भांडी धुऊन घेणे, तिने सारवलेले घर-अंगण शेतातील कामे या गोष्टी चालतात.असो काही गोष्टी जुन्या लोकांनी संस्कृती, रीत म्हणून चालत आलेल्या आणि आपण आजही त्याच पकडून चालत आहे .पण का असू शकत नाही का आधी सर्व एकत्र असत मोठी कुटुंब असायचे त्यामुळे घरातील कामे करायला सोपे जात म्हणून पाळी आलेल्या स्त्रीला आराम व्हावा म्हणून तिला कामे करू देत नसत कारण या दिवसांमध्ये त्रास खूप होतो. पण आता मात्र लहान कुटुंब झालीत. आता तर सर्व चालतं मी बऱ्याच ठिकाणी बघितलं देवपूजा सोडला तर सर्व कामे या दिवसांमध्ये केली जातात खरे तर मासिक पाळी हे देवाने स्त्रीला आई होण्यासाठी दिलेले एक वरदान आहे. मग अशा वेळी त्याच स्त्रीला का अमंगल समजले जाते?शास्त्रीयदृष्ट्या या दिवसांमध्ये स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आंघोळ न करता बाजूला बसणे अत्यंत चुकीचं आहे.आजही बऱ्याच ठिकाणी बायकांना पाळीच्या दिवसात चिंद्या फडकी वापरावी लागतात ते धुवायला पाणी नसते. वायला (वेगळी)जागा नसते आणि पॅड घ्यायला पैसे नसतात.
आजही काही पालक पाळीच्या दिवसात मुलींना शाळेत पाठवत नाही.प्र त्येक महिन्यात चार दिवस किती नुकसान होतं ह्या गोष्टी आता सर्वांना समजून घ्यायला पाहिजे. या काळात महिलांना समजून घेईल तोच खरा माणूस मुलींना साधारणता वयाच्या अकरा ते पंधरा या वर्षापासून पाळी सुरू होते. कोणाला लवकर तर कोणाला थोड्या उशिरा पण सतरा अठरा वर्ष पर्यंत पाळी आलीच नाही तर डॉक्टरकडे दाखवायला पाहिजे. सुरुवातीस काही महिने पाळी अनियमित होऊ शकते पण एक ते दीड वर्षानंतरही अनियमित असल्यास डॉक्टर कडे दाखवणे गरजेचे. पालकांनी आपल्या घरातील मुलींना या गोष्टीची माहिती आधी देणे गरजेचे आहे असे मला वाटतं कारण ही स्थिती अशी असते कोणाला कसे सांगावे काय सांगावे कारण पहिल्यांदा असल्यामुळे नेमके काय होतं हे कळत नाही बऱ्याच मुलींना चक्कर येणे, डोके दुखणे या समस्या होतात त्याकडे पालकांनीही विशेष लक्ष दिले पाहिजे. खाण्या पिण्या मूळे हा प्रकार घडतो पोटात दुखणे पाळीमध्ये चेहऱ्यावर मुरूम येणे साधारण असतं.या काळात विटामिन सी लोहयुक्त अन्नपदार्थ खाणे चांगले योगासन व्यायाम नेहमीच करावा यामुळे पाळीमध्ये त्रास कमी होतो.पाळी येणे म्हणजे निरोगी असल्याचे लक्षण असते. वयाच्या 45 ते 55 वर्षाच्या काळात पाळी आपोआप बंद होते.मासिक पाळी ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे .ज्यामुळे आज आपण अस्तित्वात आहे.तिच्या मधूनच तर जन्मलो मग त्यात अशुद्ध अपवित्र ते काय? चला तिला समजून घेऊया.
वैभव गाटे,पुणे.
मासिक पाळी हा विषय इतका महत्वाचा आहे की यावर चर्चा होणं खूपच आवश्यक आहे. परंतु विषय नाजूक असल्याने त्यावर बोलणं बऱ्याचदा टाळलं जातं. पण म्हणतात ना, चर्चा नाही तर गैरसमज कसे दूर होणार. हल्ली मासिक पाळी या विषयावर काही काही टीव्ही चॅनल्स वर चर्चा सत्र होताना पाहिले आहेत. पण समस्या ही आहे की ही चर्चा सत्र एखाद्या कुटुंबात सर्व जण एकत्र बसून ऐकत असतील का की घरातील मोठी माणसं, आई वडील तो चर्चा सुरु असलेला चॅनल बदलत असतील. टीव्हीवर काही रोमँटिक सीन सुरू असला तरी आपण चॅनल पटकन बदलतो, तर मासिक पाळीवर चर्चा कधी ऐकणार? मुलं लहान असतं तेव्हा जसे त्याच्यावर योग्य-अयोग्य, चांगलं- वाईट असे संस्कार केले जातात, असेच संस्कार मुलं वयात असल्यावर, त्याला थोडीफार समज आल्यावर त्याच्यावर व्हायला नकोत? समज-गैरसमज याची जाण मुलं वयात आलं की त्यांना करून द्यायला नको? मुलं वयात आलं, जरा समजूतदार झाल की त्यांच्याशी या विषयावर चर्चा व्हायला हवी. त्यांना अशा चर्चा ऐकवायला हव्यात.
मासिक पाळी म्हणलं की स्त्री देव घरात प्रवेश का करू शकत नाही याचं नेमका कारण त्यांना कळायला हवं. त्यांना त्यासंबंधित प्रश्न उपस्थित झाले पाहिजेत. सत्य असत्य समजून घेतल्यावरच ते त्यांच्या तरुणपणात एकमेकांचा आदर करू शकतील.स्त्रीला येणारी मासिक पाळी हा काही आजार नाही, त्यात काही गैर नाही, ती एक शारीरिक प्रक्रिया आहे. मग त्याचं एवढं दडपण कशासाठी?
समाजात वावरताना या विषयाबद्दल सहजता येणं आवश्यक आहे.
याच विषयांसारखे अनेक विषय असे होते जे आपल्यासाठी आता अगदी सहज झाले आहेत. बोलताना अवघड वाटणाऱ्या गोष्टी सोप्या झाल्या आहेत. फक्त गरज आहे ती एखादी गोष्ट समजून घेण्याची. त्यावर मुक्त संवादाची आणि आपली मानसिकता बदलण्याची. मनातली ती भीती सोडली पाहिजे.
अनेकदा आपण पाहतो की एखाद्या महिलेला मासिक पाळी असेल तर दुसरी महिला तिला हे करू नको, असा करू नको. असं सांगत असते. वर्षानुवर्षे हेच होत आहे. आपली भारतीय संस्कृती आपल्याला मोठ्यांचा आदर करायला शिकवते. म्हणून अनेकदा काही गोष्टी, घटना चुकीच्या असूनही आपण ती मोठ्यांचा मान ठेवायचा म्हणून ऐकतो आणि करतो. पण त्यावर आपलं मत देत नाही. हाच तो क्षण असतो जिथं विचाराच्या देवाण-घेवणीला खीळ बसतो.
खरंतर महिलांनी मासिक पाळी या विषयाकडे आपला पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. विवेकी विचार करून एकमेकींना सहकार्य करायला हवं. आईनं मुलीला, सासूनं सुनेला मासिक पाळी बद्दल जागृत करावं. त्यातूनच भविष्यात मासिक पाळी या विषयावर पुढील पिढी विवेकी विचार करेल. मासिक पाळी म्हणजे काही वाईट नाही हा विचार पिढ्यान पिढ्या रुजेल.मासिक पाळी मुळे स्त्रियांवर येणारी परंपरागत बंधन दूर होतील. खरंतर, नवी पिढी या अशा विषयांवर बोलण्यास घाबरत नाही. मासिक पाळी दरम्यान महिलांवर येणाऱ्या बंधनांवर देखील त्यांचा विश्वास नाही.विचारात बदल होत आहेत. फक्त त्याला योग्य वळण देण्याची आवश्यकता आहे, योग्य मार्गदर्शन देण्याची आवश्यकता आहे.
स्नेहलता सरनाईक,सांगली.
निसर्गचक्रानी ऋतूंची निर्मिती केली आणि स्त्री आणि पुरुष देहाची निर्मितीदेखील केली. ती निर्मिती करत असताना त्याची प्रत्येकाची रचना, ठेवण वेगवेगळी असल्याचे आपण पाहतो.मासिक पाळी हा या ठेवणीतलाच भाग जो स्त्रीच्या वाट्याला आला आहे ,आणि हे तिचं परमभाग्यच म्हणता येईल.याकडे पहाण्याचा दृष्टिकोन पूर्वीचा आणि सध्याचा यात हळूहळू बदल होत गेला आणि यापुढे ही बदल होईल नक्की. काही समाज हा अजूनही भ्रामक कल्पना जोपासतो आहे. त्यांच्यात बदल होण्यासाठी वेळ जाईल पण आपल्यासारख्या लोकांच्या विचारांच्या माध्यमातून त्यांच्यातील बुरसटलेल्या विचारांची जळमटे काढणे आपल्या करता आणि सर्व पुढारलेल्या समाजाकरता सहज सोपे होईल.त्यासाठी आपले प्रयत्न सतत असेच चालू ठेवावे लागतील. मासिक पाळी ही गोष्ट तशी कुतूहल किंवा बाऊ करण्यासारखी कदापी नाही. ते एक ऋतुचक्र आहे ज्याच्या मदतीने स्त्री आणि पुरुषांच्या संयोगातून नवनिर्मितीचे आणि हे पिढ्या न पिढ्यांचे चक्र चालू ठेवण्याचे कार्य पूर्वापार चालत आले आहे. सध्याची पिढी जागरूक आहे. पाळी आली की त्याचा बाऊ न करता अगदी नेहमीच्या दिवसांप्रमाणेच आपले व्यवहार चालू ठेवावे आणि सहज जगावे.या दिवसात काही शारिरीक बदल होत असल्यामुळे वेदना,त्रास होत असतात तर त्यावर घरगुती उपाय करावेत आणि स्वतः त्याकडे सहज पाहीले तर आपल्या अवतीभोवती असलेले लोक ही मासिक पाळीला सहज घेतील. तसेही या बाबी कोणापासूनही लपून नाहीत प्रत्येकाला याची माहिती ही असतेच सो यावर उघड बोलायला या काळात तरी काही हरकत नसावी आणि असू ही नये.जग बदलत आहे ते फक्त वाक्यांनी आणि वेगवेगळ्या लेखनीमधून नको तर प्रत्यक्ष कृतीतून त्याची वाटचाल व्हावी हीच अपेक्षा...
संदिप बोऱ्हाडे,वडगाव मावळ,पुणे
माणसाची निर्मिती कुणी केली तर देवाने, पुरुषांची निर्मिती देवाने केली, स्त्रीयांची निर्मिती पण देवानेच केली. मग स्रियांना येणारी मासिक पाळी कुणी तयार केली तर देवानेच.. जर देवाला पाळी चालत नाही तर त्याने ती का बरं निर्माण केली असावी..??तसही काय आहे कितीतरी देवांचा जन्म हा मातेच्या उदरातून न होता, काहींचा जन्म शिंकण्यातुन, काहींचा घामातून काहींचा, तर मळातुन जन्म झालेला आहे ? आणि त्याही पुढे काहींचा कामुक दृष्टीक्षेपातुन तर काहींचा फळे खाल्यामुळे झालेला आहे. त्यामुळेच नक्कीच त्यांना विटाळ हा होणारच ? मासिक पाळी ही निसर्ग नियमित आहे व त्यामुळेच नविन जीवाची निर्मिती होते हे या अतिशहाण्यांना कोण सांगणार. यांना माझा एकच प्रश्न या पृथ्वीवर अशी एकच नारी दाखवा जीला मासीक पाळी न येता ती माता बनली आहे..?? स्त्रीची मासिक पाळी ही एक नैसर्गिक सहज क्रिया आहे. नको असलेला पदार्थ शरीराबाहेर टाकणे ह्या क्रियेला विटाळ अगर अपवित्र का मानायचे. स्त्री-पुरुषांची शरीरे ही वेगवेगळे त्याज्य पदार्थ नेहमीच बाहेर टाकत असतात. विनोबांनी मानवी शरीराला मलमूत्राची
गटारगंगा म्हटले आहे. जसे मल, मूत्र, घाम तसेच स्त्रीचा मासिक स्त्राव. मल, मूत्र उत्सर्जनाने स्त्री-पुरुषांना विटाळ होत नाही, तर मग मासिक पाळीने विटाळ कसा होतो? पुरुषांच्या वीर्यपतनाच्या वेळी पुरुषास विटाळसा पुरुष का म्हणू नये?तसही या देशात गाय नावाचे जनावर माता होऊ शकते आणि स्त्री वेश्या .. बाई च्या स्पर्शाने विटाळणारा देव गाई च्या मुञाने कसा काय शुद्ध होतो ? ? गाय पण एक मादी ( स्त्री) च आहे ना..
स्त्री ला जर मासिक पाळी नाही आली तर गर्भ धारणा होत नाही. अरे नालायकांनो ज्या नैसर्गिक कारणामुळे तुमा आम्हा सर्वांचा जन्म होतो. ती मासिक पाळी कशी काय अपवित्र होते. धर्माच्या नावाखाली असली थेरं बंद करा.जर स्त्री ही तिच्या रक्ता मुळे अपवित्र होत असेल तर तिच्या रक्तातुन निर्माण झालेल हे सार जगच अपवित्र आहे असे मानायला हवे..!!
(यातील संबंधीत फोटो इंटरनेटवरून घेतला आहे)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा