पुरुषप्रधानता
मयुर डुमणे,उस्मानाबाद.
समाजात वावरताना पुरूषप्रधानता सहज दिसून येते. आज मेसवर गेलो होतो. मेसच्या काकू लंगडत चलत होत्या. मी विचारलं काय झालं काकू? काकू म्हणाल्या नवऱ्याने मारलंय. नुकताच थप्पड चित्रपट पाहिल्यामुळे मला त्या क्षणी चित्रपटात दररोज नवऱ्याचा मार खाणारी ती महिला आठवली. काकुला नवऱ्याने का मारलं याच कारण विचारलं. काकू म्हणाल्या, घराबाहेर बसले होते म्हणून मारलं. काकू मेस चालवतात. त्यांचा नवरा घराबाहेर बोन्बलत फिरतो. घराबाहेर काय करतो हे काकूंनाही माहिती नाही. लहर आली की काकुना मारतो. काकूंनी नवऱ्याच्या या हाणामारीची सवय करून घेतलीय. माझ्यासोबत एक कॉलेजवयीन मुलगीही जेवत होती. तिला हा प्रकार काय सहन झाला नाही. ती म्हणत होती. कमवायच तुम्हीच, घर सांभाळायचं तुम्हीच आणि वरून मार पण खायचा. काकू तुम्ही पोलिसांत जा. मुलीच्या या प्रश्नावर काकूंनी हसून दाद दिली. मुलगी आपलं दुःख समजून घेतेय हे ऐकून काकूंनी तिला जवळ बोलवून घेतलं. काकूंना एक 7 वीत जाणारी मुलगी आहे. काकू सांगत होत्या. मी जर नवऱ्याला सोडलं तर हीच कसं होणार. हिच्याशी कोण लग्न करणार. नवऱ्याला सोडलं तर त्यांच्या मुलीशी कोणी लग्न करणार नाही असा काकूंचा समज होता. मी काकूंना समाज कसा बदलतोय हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण काकूंना समाज आहे तसाच आहे असं वाटत होतं. कुटुंब टिकविण्यासाठी बाईने सहन केल पाहिजे अस काकूंच म्हणणं.
काकू या समाजातील एक प्रातिनिधिक उदाहरण आहेत. त्यांच्यासारख्या अशा लाखो स्त्रीया नवऱ्याकडून होणारी मारहाण, अत्याचार अजूनही सहन करतात. बाईला माणूस म्हणून या समाजात अजूनही किंमत दिली जात नाहीय.
काकूंना त्यांच्या लहानपणी अनेक बंधनात जगावं लागलं. आता मी माझ्या मुलीला या बंधनात नाही जगू देणार हेच काकूंच वाक्य थोडाफार आशावाद निर्माण करणार आहे.
लग्न करणे, घर सांभाळणे, नवऱ्याची सेवा करणे, मुलांना जन्म देणे अशा पारंपरिक चौकटीत जगणाऱ्या तिलाही इच्छा, आकांक्षा, स्वप्ने आहेत याचा विचारच पुरुषप्रधान व्यवस्थेत केला जात नाही. या सर्वांशी तडजोड करून ती संसार टिकविण्यासाठी जगते मात्र तरीही तिला दुय्यमच लेखले जाते. पुरुषांची स्वप्ने, इच्छा, करिअर पूर्ण करण्यासाठी स्त्रिया जन्माला आल्या असा समज असलेल्या समाजात स्त्री ही देखील माणूस आहे तिलाही भावना, इच्छा, करिअर, स्वप्ने आहेत.संसार टिकविण्यासाठी स्त्रीनेच कशी तडजोड केली पाहिजे, तिनेच कायम पडती भूमिका घेतली पाहिजे हे सांगणाऱ्या स्त्रीया देखील या पुरुषप्रधान व्यवस्थेच्या वाहक आहेत. थप्पड चित्रपटात त्याने लगावलेली थप्पड हे फक्त निमित्त आहे. तिला गृहीत धरलं जातं, तीच माणूस म्हणून असलेलं अस्तित्व नाकारलं जातं इथं खरी गोम आहे.सतत गृहीत धरल्या जाणाऱ्या तिचा अखेर स्वाभिमान जागा होतो आणि ती या पुरूषप्रधान व्यवस्थेला एक जोरात थप्पड लगावते.स्त्रीच्या जगण्यापासून ते मरण्यापर्यंत इथली पुरुषप्रधान व्यवस्था स्त्रीवर कायम अन्याय करते आणि सहनशील स्त्री समाजाच्या भीतीपोटी तो अन्याय सहन करत राहते. ही परिस्थिती आता बदलायची वेळ आली आहे. लग्न करणं, नवऱ्याची सेवा करणं, स्वयंपाक करणं, भांडी धुणी धूण, बाळाचा सांभाळ करणं ही पारंपरिक चौकट मोडण्याची वेळ आता आली आहे. ही कामे पुरुषांनीही केली पाहिजेत. ती काळाची गरज आहे. बदलत्या आर्थिक परिस्थितीची गरज आहे. कारण ती शिकतेय, स्वावलंबी होतेय, तिला तिच्या अधिकारांची जाणीव होतेय. कमावती झाल्यामुळे तिच्याकडे निर्णय स्वातंत्र्यही येत आहे. कोणत्या मुलासोबत लग्न करायचं हे आता तिचे आई वडील ठरवत नाहीत. तर आई वडिलांना विश्वासात घेऊन ती स्वतः आपला जोडीदार निवडतेय. मला इथे सांगायला आनंद होतोय की मी जिथे काम करतो तेथील माझे वरिष्ठ स्वतः उत्तम स्वयंपाक करतात. घरकाम कमी दर्जाचं आणि ऑफिसच काम खूप महत्वाच ही मानसिकता बदलण्याची वेळ आली आहे. घरकाम कमी दर्जाचं असणाऱ्या पुरुषांनी एक सर्व घरकाम करून बघितलं पाहिजे. हा बदल आहे. हा बदल हळूहळू होत जाणारा आहे. आपण या बदलाचा भाग बनू या आणि या समाज परिवर्तनाच्या लढ्यात छोटंस योगदान देऊ या.
हर्षदा चौरे,पुणे.
भारत पुरुषप्रधान संस्कृती असलेला देश आहे. का? या मागचं कारण काय? प्रत्येक कामात बाईची मदत घेतल्याशिवाय काम होत नाही. आणि कसली आलीय पुरुषप्रधानता? पण रुबाबाच्या बाबतीत, निर्णय घेण्याच्या बाबतीत पहिली पुरुषप्रधानता येते. प्रत्येक निर्णय हा घरातील 'कर्त्या-धर्त्या' पुरुषानेच घेतला पाहिजे. बाईला त्यातलं काही कळत नाही. हे कोणी सांगितलं? तिला कधी कोणी विचारलं का, की ती कोणते निर्णय घेऊ शकते!!अनेक पुरुषांकडे त्यांचा 'पुरुषी अहंकार' असतो. तो कधी जागा होईल, हे सांगता येत नाही. त्या अहंकार असलेल्या पुरुषाला नेहमी असेच वाटते की, बाईने त्याच्या शब्दाबाहेर जाऊ नये. स्त्री कोण? ती म्हणजे एक प्रकारची मालमत्ता आहे का? तुम्ही बस म्हणाला की बसेल, उठ म्हणाले की उठेल! का तिने पुरुषाच्या दबावात/ बंधनात राहावं? घरातील सगळी कामं बाईनेच करावी. का पुरुषाला हात नाहीत? घरातील प्रत्येक छोटा-मोठा निर्णय पुरुषाने घ्यावा. का तिला काही कळत नाही? कळत सगळं असत. पण भवताली असणाऱ्या लोकांनी तिच्या मनावर 'पुरुषप्रधान' संस्कृति रुजलेली असते. पुरुषाने काही केलं तर घर सोडून जाऊ शकत नाही. आजच्या काळात अशा स्त्रिया आहेत, ज्या स्वतःच्या बळावर घर चालवू शकतात. अगदी घरातील 'कर्त्या-धर्त्या' पुरुषाची मदत न घेता. अनेकदा नवरा-बायकोमध्ये भांडण होते. काहीवेळा त्यात हाणामार होते. तिथे पुरुषाकडून अगदी सहजपणे बाईवर हात उगारला जातो. पण अन्याय का सहन करायचा? अन्याय होतो, त्याक्षणी उभे राहत आपल्या हक्कासाठी लढले पाहिजे.आजही कितीही मोठ्या पदावर काम करणारी स्त्री असली तरी घरात मात्र ती गृहिणी या पदावरच काम करत असते. घरात सगळी कामं स्त्रीने करावी. कारण पुरुषाला घरातील कामं करणं शोभत नाही. ती कामं स्त्रीनेच करायची असतात. पण खरंच पुरुषप्रधानता असेल ना तर समजून घ्याल त्या स्त्रीचं दुःख. ती जरी स्त्री असली तरी तिलाही भावना, मन, इच्छा, स्वप्न आहेत, जी तिला पूर्ण करायची आहेत. स्त्री आणि पुरुष दोघे निसर्गाचा भाग आहेत. आणि निसर्गाने प्रत्येकाला सगळ्या गोष्टी प्रमाणात दिल्या आहेत. त्यामुळे जितका हक्क-अधिकार पुरुषाला आहेत, ते तिलाही आहेत. ते तिच्याकडून हिसकावून घेऊ नका. तिलाही तिच्या जगू द्या तिच्या मनाप्रमाणे...
प्रविण,मुंबई.
एकदा एका मैत्रिणीचा फोन आला. ती उच्चशिक्षित असल्याने तिच कौतुकच वाटायचं आणि विचाराने पक्की फेमिनिस्ट होती. फोनवर गप्पांचा फड रंगला होता. ती म्हणाली "यार या घरच्यांनी डोक्याची दही करून टाकली आहे, सतत लग्न, लग्न आणि लग्न असा एकसुरी पाढा चालू आहे". मी म्हणालो मग करन टाक ना लग्न. त्यावर ती म्हणाली "हा ना यार. लग्न करायचं आहे. पण मुलगा मनासारखा मिळायला हवा" मी तिला विचारलं मनासारखा म्हणजे नेमकं कसं. त्यावर ती एक वाक्य म्हणाली आणि माझे विचारचक्र चालू झाली. ती म्हणाली "मला असा नवरा हवा की जो मला 'स्वातंत्र्य' देईल".
ह्या संभाषणातून दोन प्रश्न उभे राहिले आहेत
1. स्वातंत्र्य द्यायला तो नवरा कोण आहे?
2. जो पारतंत्र्यात असतो त्याला स्वतंत्र हवं असत. मग ही शिक्षित, फेमिनिस्ट मुलगी पण स्वतःला पारतंत्र्यात असल्याचं मानते का?
ह्या दोन्ही प्रश्नच उत्तर एकच की "पुरुषप्रधान मानसिकता" आणि उच्चशिक्षित महिलाही याच्याच मानसिक गुलाम झाल्या आहेत.
आपल्या विचार ग्रुप मध्ये एका अडमीन मैत्रिणीने एक अपील केलं होतं की "पुरुषप्रधानता वर लेख येत नाही येत याचा अर्थ समाज पुरुषप्रधान नाही वाटत". खर तर पुरुषप्रधानता आपल्या नसानसात भरली आहे म्हणूनच "पुरुषप्रधान" या विषयावर लेख कमी येत असतील.आपल्या आजूबाजूला घडणारे महिला अत्याचार हे "पुरुषप्रधान" मानसिकतेतूनच होत असतात आणि याची पाळेमुळे पुरुषसत्ताक व्यवस्थेत रुजली आहेत. स्त्री आणि पुरुष ही दोन अशी चाके असतात की त्यावर समाजाचा गाढा हाकला जातो. ह्यातलं एक चाक जरी कमकुवत निघाला तर समाजाचा समतोल बिघडतो. अनेक शतकांपासून हा समतोल बिघडलेलाच दिसत आहे. त्याच कारण पुरुष वर्गाला मिळत असलेले झुकत माप.ह्याचा अर्थ असा नव्हे की स्त्रीला।झुकत माप द्यावं. याचा एकच अर्थ होतो स्त्री ला देवी बनवून पुजाण्यापेक्षा तिला माणूस म्हणून सन्मान द्या.
प्रतिक्षा बूध्दे,गडचिरोली.
कालच बस ने कॉलेज ला जातानाचा प्रसंग.काका काकु शेजारीच बसलेले. थोडं चिंतींत वाटत होते दोघे. शेवटी मौन तोडत काकुंनीच सुस्कारा टाकला. म्हणाल्या 'जाऊ द्या हो, होईल सर्व ठीक... ' असं म्हणताच आत्तापर्यंत शांत असलेले काका एकदम चिडले. काकुंना नको तसं ओरडायला लागले. बस मधली लोकं त्यावर स्वत:पुरते प्रतिक्रिया देण्यात व्यस्त झाले, 'केलं असेल हिनेच काही...', '...असं नको वागायला', '...जाऊदे आपल्याला काय करायचंय', ई. वाक्य धडाधड काणावर आपटत होते. काकु बिचार्या हुंदका आवरत कसंबसं सगळं गप्प एेकत राहिल्या. हे सगळं बघुन मलाच कसंतरी वाटायला लागलं. काकुंसाठी वाईट तर वाटलंच पण रागही आला. कारण नेमकं काय होतं माहीत नाही पण सर्वांसमोर अगदी निर्विचाराने आणि आक्रमकतेने काकुंचा अपमान केला जात होता आणि त्या काही न बोलताच गप्प होत्या. काकांनी तर तिच्या दिसण्या पासुन असण्या पर्यंत, अगदी ती च्या चारित्र्या पर्यंत जाऊन तिला सर्वांदेखत वाट्टेल ते बोलत होते आणि त्या मात्र गप्पच. हुंदके आवरत, शरमेने झुकत, झालेल्या अपमानाचे घण सहन करत...
कारण काहीही असेल, परंतु एवढं टाकुन बेलायचा अधिकार काकांना कुणी दिला असावा? काकुंना सगंळ गपगुमान सहन करायला लावणारा कोण असावा? काय कारण असावं असं सार्वजनिक ठिकानी स्वत:च्या चारित्र्यावर (त्या वयात सुद्धा!) लांछन लागावल्या जात असताना त्या सहन करत राहिल्या? कसली ही गुलामी?कोणती ती सत्ता जी काकांच्या विवेकावर हावी झाली होती?आजवर ज्या नवर्याची सेवा केली त्यानेच जगासमोर लाथाडलं, नको तसा अपमान केला याचं दुःख तिच्या वाहणार्या नेत्रांनी सांगितलंच.काय किंमत ठेवली असावी काकांना आज तिच्या त्यागाची, कष्टाचीं, प्रेमाची ? एका कुठल्यातरी चुकीपुढे सगळंच निर्अर्थक? तिचं कर्तृत्व, चरित्र, माया, प्रेम सगळं क्षणात शुन्य? काय आपला समाज, कसली आपली गुलाम मानसिकता! माझा स्टॉप आला मी बसमधुन उतरले, पण पुरुषसत्ताक मानसिकतेच्या या समाजाची, सत्तेनं बेभान झालेल्या काकांची, गुलामीत जगणार्या काकुंची व काही न करता सगळं फक्त बघत रहणार्यांची, स्वत:ची, किव येत होती मला...
पण तेव्हाच एक निश्चय केलाय, मी किमान स्वत: तरी पुरुषसत्ताक मानसिकतेची गुलाम होणार नाही... प्रत्येक व्यक्तिने एवढं साधं काम जरी केलं तरी पुढे एकही गुलाम उरणार नाही. गुलामच नसतील तर कोण प्रधान? कसली प्रधानता? पुरुषसत्ता नकोय. सत्ताच नकोच आहे कुणाचीच. समानता हवी आहे आपल्याला,तर सुरवातही स्वत: पासुनच करावी लागेल. नाही का?
(संबंधीत फोटो :इंटरनेट)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा