वसुंधरा सुंदर राहिली नाही

गजानन घुंबरे,परभणी

कधीकाळी नैसर्गीक साधनसंपत्तीने  संपन्न ,तिला पुरक जैवविविधता यांना आश्रय असणारी व आतापर्यंत तरी एकमेव असणारी सजीवसृष्टी म्हणजे ' पृथ्वी ' अर्थात वसुंधरा.या पृथ्वीवर आतापर्यंत बरेच युग झाले, उलथापालथ झाली. पण यादरम्यान तीची जी हानी झाली नाही , ती मात्र ( मानवी उत्क्रांतीचा सिंद्धात थोडा वेळ सोडला तर कुठून तरी एलीयन रुपी आलेल्या ) मानव नावाच्या स्वार्थी प्राण्याने हळू हळू भक्कास केली. एलियन यासाठी म्हणतो कि, मानव सोडून इतर सर्व जीव निसर्गाचे मित्र आहेत. त्यामुळे पृथ्वीवरिल नैसर्गीक समतोल राखल्या जायचा व जातो.या भुतलावर फक्त मानवालाच  फक्त  घ्यायचे कळते.ओरबाडणे, हिसकावणे, निचरा करणे एवढचं त्याला जमतं. मग मानव समुहातील त्याच्या सारख्या हाडामासाच्या व्यक्तीसोबत त्याचा हा व्यवहार तुम्हाला पहायला मिळेलं.

   आता हेच पहा पृथ्वीला सुंदर ठेवण्यात खरा वाटा असणारे, तीला सजीव ठेवणारे पाणी ज्याच्यावर सर्वांचा हक्क आहे. मानवाने केलेल्या बेसुमार , अमाप वापराने निसर्गहानी करण्यास कारणीभूत ठरलायं. जमीनीवर उपलब्ध साठे कमी पडले म्हणून पाचशे फुट खोलीवरून उपसा केला.मानवाच्या या कृत्यांने जमीनीच्या वरच्या भूस्थरात पाणी न राहील्याने झाडे नष्ठ झाली व होत आहेत. यामुळे हिरवळ कमी झालीयं, वाळवंट वाढलेत. जमिनिच्या आत ५० फुटांपर्यंत पाणी निचरा होण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लोटतो. त्याखाली दोनशे फुटांपर्यंत जाण्यासाठी ५०ते १०० वर्ष जातात. कधी कधी आपण एखाद्या नवीन घेतलेल्या ५०० फुट बोअरवेलला लागलेले पाणी तीनशे वर्ष जुने असु शकते. पण त्याचे ते आपल्याला काय? तहान भागली ना बस्स ! आपल्या या वागण्याने निसर्ग समतोल मात्र बिघडला. जमीन कोरडी पाडली, झाडे वाळली, पाऊस कमी झाला आणि पाणीचं कमी झाल्याने जैवविविधतेचा पृथ्वीचा दागिना लुप्त होण्याच्या मार्गावर आलायं.

  आपल्याला फक्त घेता येत देणं जमतंच नाही.आपल्या अन् दुसऱ्याच्या हिश्याचेही घ्यायचे. घेतानाही बेमाप घ्यायचं मग त्याची किंमतही कळत नाही. मानवाने तयार केलेल्या पाणी मोजण्याच्या पर्जन्यमापकात जेंव्हा १०० मिमी पाऊस पडतो ना त्यावेळी १० लाख लिटर पाणी १०० गुंठ्यात पडलेलं असत. असे एक दोन पाऊस पडल्यावर ते पाणी वाहत  त्यातील फक्त १०% पाणी जमिनीत मुरल्या जातं.३०% वाफ होते तर उर्वरीत नदी व शेवटी समुद्रास मिळतं.

यातील मुरलेलं पाणी उपसा करताना आपण हे भान विसरतो  कि किमान आपल्या गरजे इतके तरि पाणी भूगर्भाला आपण परत दिलयं का? आपण किंमत असणाऱ्या वस्तुंच मोजमाप करतो . त्याचप्रमाणे सृष्टीला सजीव ठेवणाऱ्या पाण्याचे मोजमाप करण्यास शिकलो तर निसर्गाची अनमोल देण असणाऱ्या पाण्याची किंमत कळेल .

 आपल्या गरज इतके निसर्गा कडून हवं असेल तर परत देण्यास शिकावं लागेल ,उपशा इतके पाणी जमिनीत मुरवावे लागेल , एक झाड तोडण्यापूर्वी दोन आधी जोपासावी लागतील .तरचं समतोल साधला जाईल अन्यथा या वसुंधरेला कुरुप करत दुसऱ्या सजीव सृष्टीचा शोध घेत स्वार्थी ( सुरुवातीस एलियन यासाठी म्हणालो) मानव एके दिवशी निघून जाईल आणखी एखाद्या वसुंधरेला बेचिराख करण्यासाठी .

बलात्कार आणि त्यावरील घाणेरडे राजकारण..



करिश्मा डोंगरे,पंढरपूर

           जाती कशाला उकरून काढता.गुन्हा हा गुन्हाच असतो.आणि गुन्हेगार कोणत्याही जातीचा असला तरी तो गुन्हेगारच असतो.असले भंपक युक्तीवाद करणार्या,वरून सात्वीकतेचे भजन आणि आतुन जातीच्या वर्चस्वाचा तमाशा करतात.उच्चवर्णिय पुरूषी मानसिकतेमुळे दलित स्रीचा शरीराचे लचके तोडण्याची वृत्ती कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.जातीच्या विखारातून कोवळया कळ्यांना चुरगळनारा कुसंस्कृतीच्या कणाकणात भरला आहे.पीडितेचा जबाब नेहमी दाबला जातो.परंपरेने चालत आलेले आरोपींना जातिनिहाय संरक्षण.अत्याचार झालाच नाही,असे सांगण्यासाठी प्रशासनाचा वापर केला जातो.धडक पोलिस पुरावेच नष्ट करतात,हे कसले मोठे राजकारण म्हणावे लागेल.माध्यमानांही त्यांच्यापर्यंत पोहचू देत नाहीत,याला काय म्हनायचं?यामुळेच त्यांची नियत सिद्ध होतेय.

         आईसोबत गवत काढण्यासाठी गेलेल्या मुलीची कसली कपडे असतील ओ?आणि त्यांना धड जेवनाचा रोज प्रश्न पडत असेल,तिच्याजवळ कसला आलाय मोबाईल?उगीच मनाच बडबडून मुलींना दोषी नका ठरवू.ती साधी सरळ मुलगी तिने कोणाच काय वाईट केले.एवढी कसली जातीयता आणि राजकारण?

             कधीही असले करण्याअगोदर किंवा वाईट नजरेने बघान्याचं धाडस नाही झाले पाहीजे,असे प्रशासन हवं आहे की,डायरेक्ट निकालचं लागला पाहीजे.खाकी वर्दितल्यांनी पकडायचं नाही किवा तारखेवर तारीख मिळन्याची वाट न बघता,त्यांच वरचं तिकीट काढले पाहीजे.आपल्या घरातील स्रीयांना हेच शिकवा की, एखाद्याच तोंड कसे फोडायचे आणि हात पाय कसे मोडायचे.गरिबाची मुलगी असो किवा मुख्यमंत्र्याची मुलगी ही मुलगीच असते.स्वत:च्या घरातली मुलगी रडताना कसे लगेच वाईट वाटते,तसेच दुसर्यांच्या मुली काय रस्तावर पडलेत काय?रडत बसायला.जात बघून मानसाचं जनावरं बनू नका.माणुसकी हाच आपला धर्म आहे.आमच्या हातात कोणी मेणबत्या दिल्या तेव्हाच तलवार दिली असती तर,आज तोंड वर करून कोणी बघितले पण नसते.


वृषाली वाघ,मुंबई 

आपल्या भारतात बलात्कार हे काय नवीन कृत्य नाहीये.... अनेक वर्ष हे असले क्रूर कृत्य होत आहेत....रोज बातम्यात एक न एक तरी असली बातमी असते परंतु आपणच त्याला दुर्लक्ष करतो.... जो पर्यन्त पीडित व्यक्ति (मुलगी किंवा मुलगा) सोबत  काही राक्षसा ने केल्या प्रमाणे कृत्य होत नाही किंवा राजकिय नेत्यांना, पक्षांना त्याचा काही लाभ नाही भेटत तो पर्यन्त ना न्यूज मीडिया ना सोशल मीडिया मध्ये त्याचा विषय येत.... 

आपल्या सारख्या सर्व सामान्य लोकांचा कानावर आपल्या ओळखी मधील अशी एखादी बातमी सहजासहजी ऐकला नाही भेटत कारण मिडल क्लास वर्ग  कधी ही कोर्ट किवा पोलिस ठाण्यात जाऊ इच्छित नाही.... ह्याला देखील कारण आहे आपल्या देशात ला राजकारण आहे... कारण कधी एखादी घटना गंभीरतेने लक्ष ओढून घेत असल तर... राजकीय लोक पीड़ित व्यक्ति चा घरी जाऊन फोटो काढून मोकळे होतात...... त्या घटनेचा 4 - 5 वर्षात निर्णय (कोर्टात) लाऊन विसरून जातात...... परत अशी गंभीर घटना होऊ पर्यन्त ....

एखाद्या घटनेचा बोध घेऊन सरकारने, राजकिय पक्षाने, मीडियाने पुढाकार घेऊन लक्ष देऊन जर काम केल आणि  एखादा गंभीर कायदा (न्यायालयात) बनवला तर अशे कृत्य करणार्‍याना, करायचा आधी हजारो वेळा विचार करावा लागेल.....

आणि आपन आपल्या जाग्या वर राहून आपल्या पुढचा पीढ़ी ला,  समोरचा व्यक्ति ची मदत आणि इज्जत करायची शिकवण दिली तरी देशात असल्या घटना कमी होतील.... 


अनघा नंदाने

दिवस पहिला: अरे बातम्या पाहिल्या का? खूप वाईट झालं बिचाऱ्या त्या मुलीसोबत. 

दिवस दुसरा: काय चाललय काय आपल्या देशांत? तिची बाँडी परस्परच जाळली पोलिसांनी. हे पोलिस गुंड झालेत. आता कुठे गेली मिडिया, कुठे गेले विरोधी पक्ष? 

दिवस तिसरा: काय नौटंकी चाललीये देशांत.... ती ABP वाली आणि तो पप्पू.... नुसता पब्लिसिटी साठी चाललाय हा खेळ...

दिवस चौथा: काय राव चार दिवस झाले तेच तेच, मस्त पिक्चर लाव एखादा... बोअर झालंय, तेच तेच 


असंच होतं ना? 

तिसऱ्या दिवशी राख थंड झाली कि आपणही थंड होतो. आपापल्या कामाला लागतो. 


पण तुम्हाला एक लक्षात येतय का? या संपूर्ण चार दिवसांच्या संभाषणांत बहुतेक लोकांनी, पोलीस, मिडिया, काँग्रेस, यांच्यावरच चर्चा जास्त केली. जणूकाही सत्ता "काँग्रेसची" आहे. यांत खूप कमी लोकांनी "मुख्यमंत्री योगी" कुठे आहेत हा प्रश्न विचारला आणि मोदींना तर लोक विसरलेच. लोकांच्या लक्षातच आलं नाही, येत नाही, किंवा आणून दिल्या जात नाही कि आता गेली 6 वर्षे सत्तापक्ष बदलला आहे. वर्तमान पंतप्रधानांनी संपूर्ण घटनेवर एक वाक्य उच्चारलेलं नसताना, आपण पूर्व प्रधानमंत्री कसे मुके होते याच्या अजूनही चवीने चर्चा करतो आहे. 


आपण सरकार चं उत्तरदायित्वच विसरलो आहोत. ज्याप्रमाणे वर्तमान सरकार अजूनही "विरोधी पक्षाच्या" भूमिकेतून बाहेर आलं नाही, तसंच आपणही आपल्या डोळ्यातला "सत्ताधारी" पक्ष बदललेला नाही. 


प्रजासत्तेतला "राजाच" स्वतःची भूमिका, हक्क, जबाबदाऱ्या विसरला असतांना, त्याने निवडून दिलेल्या "नौकरांकडंनं" काय अपेक्षा ठेवणार? 130 कोटी राजांच्या राज्यांत, 1 एका राजकुमारीवर "बलात्कार" होतो, तेव्हा राजे आपापसांत लढत बसतात, शाब्दिक चकमकी रंगतात, कुणी निवडून दिलेला नोकर चांगला आहे हे सिद्ध करायला! मग नोकर मनमानी करणार नाही, घाणेरडं राजकारण करणार नाही तर काय करतील? 

राजांना कळायला हवं, कुणाचेही असले तरी ते नोकर आहेत, आणि ते नीट काम करत नसतील तर त्यांना जाब विचारणं, प्रत्येक राजाचं काम आहे आणि हक्क आहे. 


राजकारण घाणेरडं झालं आहे. वादचं नाही. झालंच आहे. पण पुढे काय? उपाय का? हे शोधायला हवं. आपल्याला माहिती असतं, सरकारचं चुकलं आहे पण आपण नेहमी मुख्यतः दोन भूमिका घेतो, एक, जाऊदे, आपल्याला काय करायचं आहे? आणि दुसरी, सगळे तसेच असतात... 

या दोन मतांमुळे आपण "नागरिक" होऊन सरकारला कधी प्रश्नच विचारत नाही. प्रजासत्तेत राहून राजसत्तेचं गुणगान गांत राहतो आणि कुणी "हिरो" आपल्याला वाचवायला येण्याची वाप बघत बसतो. चांगल्या राजंच्या राज्यात, प्रजा आपले हक्क आणि कर्तव्य कधीच विसरायची नाही आणि विसरली तर चांगले राजे प्रजेला त्याची जाणीव करून द्यायचे. "खबरदार जर टाच मारूनी याल पुढे, चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या" किंवा "राजा, माझा 1 रुपया अजूनही परत का नाही मिळाला?" असे प्रश्न शिवाजी महाराजांना सुद्धा रयतेनं विचारलेच. मग आता आपलीच सत्ता असताना आपण आपल्या सेवकांना प्रश्न विचारायला का घाबरतो? का गरज नसताना त्यांचं गुणगान करतो? या प्रश्नांची उत्तरं स्वतः शोधली पाहिजेत. 


आपल्या पुर्वजांनी चांगले मावळे बनून दाखवलं, आपण चांगले "नागरिक" बनू शकू का हे आपण आपलं बघायला हवं.



प्रतिक्षा बुध्दे,गडचिरोली 

कुण्यातरी गावात कुण्यातरी मुलीवर अत्याचार झाला, 

लगेच लावली गेली जाती-धर्माची, राजकिय पक्षांची फिल्टरं त्याला!

'ती' असते कधी दोन दिवसांची तर कधी ऐंशी वर्षांची,

जी नाहक शिकार होते समाजातील राक्षसी सत्तेची 


पुर्वी बलात्कार झाले की छत्रपति छाटुन टाकायचे हात पाय त्या नराधमांचे भर चौकात... 

मग नराधमांचंच राज्य आलं ज्यात पिडितेच्या लुटलेल्या आब्रूचेच धिंडवडे काढतंय समाज.


कधी तिच्या कपड्यांची तर कधी उच्चशिक्षणाची चुक पटवुन देण्याची थेरं आरोपींच पक्ष करतंय

आम्हीच इथले तथाकथित राजे म्हणत आरोपींनाच संरक्षण देतंय


बाहेरचे लोक काय म्हणतील म्हणुन आधी

घरचेच तोंड दाबुन मुक्का मार द्यायचे

आज त्याहीपेक्षा वाईट झालीय परिस्थिती, कोर्टाची पायरी चढण्यासाठी ही वेळ आलीय लढण्याची.


तिथं न्यायासाठी ऊभं रहायला सुद्धा पूर्व पडताडणी केली जातेय, 

पिडिता अन् आरोपी दोघांच्याही जाती-धर्माची टेहाळणी होतेय.


विरोधी पक्ष लागतो लगेच कामाला, ओतुन टाकतो सगळी जिव्हाळी

आणि मग भडकली आग सामान्य माणसांत की भाजुन घेतो आपली राजकिय पोळी


कुणाचा राजिनामा मागितल्या जातं तर कुणावर फेकली जाते शाई

मात्र आरोंपीना लवकरच शिक्षा नक्की होईल अशी हमी कुणीच देत नाही


वर्षानुवर्षे ताटकळत बसावं लागतं मग झालेला अन्याय सिद्ध करायला

तेव्हा येतं लक्षात की वास्तवात कोणताच पक्ष नाही आहे आपल्या मदतीला


पिडीतेच्या घरच्यांनाही बेआब्रू व्हावचं लागतं, पोरगी गेली ती गेली पण पैसे कमावुन गेली असंही ऐकावं लागतं. 

कधी संपेल कुणास ठाऊक आपल्या समाजाचे अधःपतन बघवत नाही मला आता हे बलात्कार आणि त्यावरील घाणेरडे राजकारण…


चैतन्यकुमार देवकर,माळशिरस

खरंतर बलात्काराची घटना घडली.. असं ऐकलं तरी आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला प्रचंड राग येतो. अशा नराधमांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी आपली तीव्र इच्छा असते. कधीकधी तर आपल्याला वाटतं की प्रियांका रेडी प्रकरणात जसं एन्काऊंटर करून आरोपींना ठार मारण्यात आलं ते योग्य होतं बऱ्याच वेळा अनेक अमानवीय शिक्षांकडेही आपण एक पर्याय म्हणून पाहतो.हेच बरोबर आहे असं मानायला लागतो तर दुसरीकडे बऱ्याच वेळा आरोपीं हेच गुन्हेगार आहेत असं सिद्ध होईपर्यंत तरी थांबायला हवं असा सूर निघतो. या दोन्ही चा  सुवर्णमध्य म्हणजे  फास्टट्रॅक अर्थात जलदगती न्यायालयांची व्यवस्था असणे ठरु शकते.आणि विशेषता बलात्कारासारख्या गंभीर होण्यासाठी तर असायलाच हवी. आता अगोदर मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला या घटनांचा प्रचंड राग येतो यातून आपल्यामध्ये संवेदनशीलता असल्याचं दिसून येत. ते आपसूकच असतं. परंतु ती संवेदनशीलता ,ती तीव्र इच्छा  गुन्हेगारांप्रती राज्यकर्ते, अधिकारी यांच्यात कशी नसू शकेल?? केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तर ' इथिक्स' चा स्वतंत्र पेपर असतो. तरीदेखील हाथरस मध्ये घडलेल्या घटनेमध्ये जबाबदारीची पदे भूषवणारे अधिकारी असं बेजबाबदार आणि असंवेदनशील कसं काय वागू शकतात?? भलेही राज्यकर्त्यांनी त्यांना वेगळे निर्देश दिले असतील परंतु एक अधिकारी म्हणून त्यांनी त्यांचं कर्तव्य करणं भाग होतं. आणि राज्यकर्ते त्यांनी तर... लोकांचं प्रतिनिधित्व करायचं असतं.. परंतु ते तर अगदीच बेजबाबदार वागले उलटपक्षी गुन्हेगारांना पाठीशी घालू लागले ...  आपला  विषय आहे , बलात्कार आणि त्यावरील घाणेरडे राजकारण. मला वाटतं की, कोणतीही गोष्ट राजकारणापासून अलिप्त राहणं तसं अवघडच .. पण त्याच्या माध्यमातून संवेदनशीलतेचं दर्शन घडणं , आणि न्यायासाठी , सत्यासाठी पराकाष्ठा करणारे नेते , राजकारणी असणं , तयार होणं...हे फार आशादायी चित्र असतं…


क्षितीज गिरी,सातारा

     काही जण म्हणतात बलात्कार हा बलात्कार असतो त्यामध्ये तुम्ही जातीचा धर्माचा विषय का  आणता आरोपी कोणीही असू दे त्याला शिक्षा झाली पाहिजे.पण  निर्भया प्रकरणामध्ये झालेला बलात्कार आणि  खैरलांजी , हातसर  मध्ये झालेला बलात्कार यामध्ये तसा खूप फरक आहे.तुम्ही म्हणाल तसे कसे. बलात्कार तर शेवटी बलात्कार असतो.पण माझ्या मते कोणताही बलात्कार करणाऱ्या आरोपीचा उद्धेश हा खूप महत्त्वाचा असतो.निर्भयाच्या प्रकरणात तो फक्त सेक्स हाच होता.पण सगळी कडे तो सारखाच असेल असे नाही.आणि तसा तो नसतो पण ...

             हातसर च्या घटनेकडे पाहू. ठाकूर आणि वाल्मिकी समुदायाच्या वादातून हा बलात्कार झाला आहे.तो पण खुले आम धमकी देऊन.संदीप ठाकूर यातला मुख्य आरोपी.6 महिने आदोगर ठाकुरानी  धमकी दिली होती.तेव्हा पासून मनीषा वाल्मिकी कोठे घरा बाहेर पडली नव्हती.पण त्या  दिवशी म्हणजे 14 सप्टेंबरला ती तिची आई गवत आणण्यासाठी रानात गेले.गवत कापणे चालू होतो.मनीषा बाजूला बसली होती तिची आई गवात कापता कापता थोडी  लांब निघून गेली.अश्या वेळी  सरेआम तिची आई तिच्या बरोबर असताना. मुली ला उचलून संदीप आणि त्याच्या मित्रांनी  तिच्यावर बलात्कार केला.आई ला ऐकू कमी येत होते .त्यामुळे मनीषचा आवाज ती ऐकू शकली नाही. बलात्कार करून झाल्यावर ती कुठे बोलू नये म्हणून तिची जीभ कापली. मानेची हाडे मोडली.शेवटी 29 सप्टेंबरला सकाळी 5 वाजता तडफडून तिला मरण आले.14 ते 29 तारखे पर्यंत तिच्यावर दवाखान्यात उपचार पण नीट झाले नाहीत.याच्या आगोदर पण तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न झाला होता.

त्याच्यानंतर  आसपासच्या 12  गावातल्यांनी  त्यामध्ये ठाकूर आणि ब्राम्हण यांनी गुपचूप पंचायत लाऊन आरोपीचा साथ देणे आणि गावामधे कुणाला घुसून न देणे असा निर्णय घेतला.डॉक्टरांनी पोलिसांनी  मुख्यमंत्र्यांनी आरोपीच्या बाजून  साथ दिली.कारण आरोपी ठाकूर होता.योगी आदित्यनाथ बोलले आरोपीची आणि मनिष्याच्या घरातल्यांची  नार्को  टेस्ट करा.कारण सगळे अधिकारी यांचेच.डॉक्टररांचा रिपोर्ट पण चुकीचा दिला गेला.आपल्या मुलीला शेवटी जाळण्याचा अधिकार पण दिला जात नाही.लावारिस लाश जाळावी तसे जाळले जाते तिला.आणि नंतर बोलले जाते बलात्कार झालाय नाही.आमच्यावर खोटं आरोप केला जातोय.

आज पूर्ण कुटुंब दहशतीखाली राहत , वावरत आहे.त्यांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

मनीषा वाल्मिकी सारख्या भरपूर घटना  भारतामध्ये घडतात.त्यातल्या काहीच घटना प्रकशाझोतात आणल्या जातात.पण दुर्दुव त्यांना पण लोकशाही मार्गाने संघर्ष करून नीट न्याय भेटीत नाही.म्हणून बाबासाहेब नेहमी सामाजिक न्यायासाठी संघर्ष करायला सांगत.

 माझ्या मते या घटनांकडे पाहताना फक्त बलात्कार म्हणून पाहणे चुकीचे आहे.जसे निर्भया कडे पाहतो तसे.हा तर जातीय द्वेष भावनेतून केलेला बलात्कार आहे.जसा खैरलांजी मध्ये घडला.न्याय मागता मागता भोतमांगे परिवार संपला पण न्याय???

या आरोपींना फाशी मिळाली पाहिजे पण ते वाटते इवढे सोपे नाही.सगळी न्याय  व्यावस्था आरोपीच्या  बाजूने खंभिरपणे उभी आहे. पण शेवटी दिली तरी फाशी देऊन फक्त न्याय भेटेल पण सामाजिक न्याय ? 

आज एक संदीप गेला तरी उद्या हजारो लाखो संदीप तयार होतील.कदाचित झालेही असतील.

जोपर्यंत लोकांची या जतिव्यवस्थेकडे  बघण्याची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत हे असले जातीय द्वेषातून बलात्कार होतच राहतील.उत्तर प्रदेश सारख्या राज्यात अजुन पण अस्पृश्यता पाळली जाते.

यावर उपाय म्हणजे  समानतेच्या विचार करणाऱ्या प्रत्येकाने आता एकत्र येऊन या ना त्या मार्गाने या व्यवस्थे विरुद्ध लढले पाहिजे.कारण उद्या यामध्ये कदाचित तुमची पण मुलगी असू शकते.

मराठा आरक्षण नेमकं कुठं अडत आहे?




मयुर डुमणे,उस्मानाबाद.
____________________


राठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला दिसून येतोय. अशावेळी मराठा आरक्षणाचा विषय समजून घेणं खूप महत्वाच ठरतं. मराठा समाजाला आरक्षण मागण्याची वेळ का आली हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे.


पंतप्रधान नरसिंहराव यांनी मंडल आयोगाच्या शिफारसी 1991 मध्ये लागू केल्या आणि त्यानुसार OBC घटकांना 27% आरक्षण लागू झालं. म्हणजे 1991 पासून 50% आरक्षण शिक्षणात आणि नोकरीत लागू झालं. परिणामी SC, ST, NT, OBC वर्गातील घटकांनी आरक्षणाचा लाभ घेत शैक्षणिक प्रगती साधली. मागास घटकांतील अनेकजण चांगल्या हुद्यावर आले. मात्र याची दुसरी बाजूही आपल्याला बघावी लागेल. दुसरीकडे खुल्या गटाला 50% जागा राखीव राहिल्या. या खुल्या गटातील स्पर्धेत उच्च वर्णीयांचा वाटा अधिक राहिला. त्याचबरोबर OBC व अन्य वर्गातील घटकही खुल्या वर्गातील जागा गुणवत्तेच्या जोरावर मिळवू लागला. अशा या स्पर्धेत मराठा समाजाला जाग आली आणि शिक्षणातील व सरकारी नोकरीतील आपला टक्का घसरत चाललाय याची जाणीव झाली. हे एक कारण झालं. दुसरं कारण आहे शेतीची दुर्दशा. राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मराठा समाजातील शेतकऱ्यांचा वाटा अधिक आहे. सातत्याने पडणाऱ्या दुष्काळामुळे, हवामान बदलामुळे शेतीची अवस्था खूप वाईट झाली. अल्पभूधारक मराठा शेतकरी कर्जबाजारी झाला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल झाल्याने मुलांच्या उच्च शिक्षणासाठी अडचणी येऊ लागल्या. मुलीचे लग्न मराठा जातीच्या स्टेटसला शोभेल असं करता येईना.  खाऊजा धोरण स्वीकारल्यानंतर बदलत्या अर्थव्यवस्थेच्या स्पर्धेत टिकून राहणं शेतकऱ्यांना अशक्य झालं. शेती व्यवसायाकडे नकारात्मकपणे पाहिले जाऊ लागलं. शेतीपेक्षा नोकरी केलेली कधीही चांगली हा समज दृढ होत गेला.  तिसरं कारण आहे वाढती बेरोजगारी. एक काळ होतो ज्यावेळेस इंजिनिअरिंग केल्यावर चांगली नोकरी मिळायची पण तो काळ हळूहळू लुप्त झाला. खाजगी क्षेत्रातील नोकऱ्या घटल्या. BA,Bsc, इंजिनिअरिंग च्या डिगऱ्या नोकरी मिळवून देण्यास असमर्थ ठरल्या. राज्यातील बहुतांश बेरोजगार वर्ग स्पर्धा परीक्षेची तयारी करू लागला. अधिकारी होणं हेच अनेकांच ध्येय झालं.  स्पर्धा अधिक तीव्र झाली. पण सुरवातीला मोठ्या प्रमाणात निघणाऱ्या जागा हळूहळू कमी होऊ लागल्या. जागा कमी होत गेल्यामुळे मराठा तरुणांना सहजासहजी अधिकारी होणं अशक्य झालं. मागास वर्गामध्येही नोकरी मिळवण्यासाठी स्पर्धा कठीण झाली. आरक्षण नसल्यामुळेच आपल्याला नोकरी मिळत नाही, फीमध्ये सवलत मिळत नाही ही भावना मराठा तरुणाईमध्ये प्रबळ झाली. मागास जातींना आरक्षण मिळत असल्यामुळे आपल्याला संधी मिळत नाही ही मांडणी दिशाभूल करणारी असली तरी बेरोजगारीच्या असंतोषात अनेकांना पटणारी आहे. यातूनच मग मराठा आरक्षणाच्या मागणीचा उदय झाला. प्रश्न आहे वाढत्या बेरोजगारीचा, शेतीच्या दुर्दशेचा, शिक्षणाच्या बाजारीकरणाचा, मंदावलेल्या अर्थव्यवस्थेचा पण आला आरक्षणावर. 


मराठा आरक्षणाची मागणी करण्यात आली खरी पण मराठ्यांना आरक्षण कोणत्या निकषावर द्यायचं हा प्रश्न निर्माण झाला कारण मराठा समाजातील एक वर्ग आर्थिकदृष्ट्या मागास असला तरी सामाजिक दृष्ट्या मागास नाही. आरक्षण मिळवायचे असेल तर मराठा समाज मागास आहे हे सिद्ध करावं लागेल. यासाठी मागासवर्गीय आयोग नेमण्यात आले. आयोगाने मराठा समाजाला मागास ठरवून देखील अडचणी काही कमी होणार नव्हत्या. कारण मराठा आरक्षणामुळे सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली 50% ची मर्यादा क्रॉस होणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत तमिळनाडू राज्याला ही मर्यादा क्रॉस करता आली पण मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. पण समजा सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती उठवली आणि पुढे चालून घटनात्मक पिठानेही मराठा आरक्षणाला मान्यता दिली तरी प्रश्न कमी होणारे नाहीत.  हरियाणातील जाट, गुजरातमधील पाटीदार समाजही आरक्षणाची मागणी करू लागेल. 


मराठा समाजातील वर्ग

राज्यात मराठा समाज बहुसंख्य असल्यामुळे शिक्षण, सहकार, राजकारण अशा क्षेत्रात मराठा जातीच वर्चस्व राहिलं आहे. मराठा समाजातील एक वर्ग फोरव्हीलरमधून दिमाखात फिरणारा, राजकीय वर्चस्व असणारा, बागायती जमिनी असलेला असा आहे मात्र त्यांची संख्या एकूण मराठा लोकसंख्येच्या तुलनेत कमी आहे. मध्यमवर्गीय देखील आहेत. मात्र या व्यतिरिक्त जो शेतकरी, कष्टकरी मराठा समाज आहे. त्याची आर्थिक परिस्थिती दयनीय आहे. त्याची संख्या जास्त आहे. यामध्येही प्रादेशिक वर्गवारी करता येते. पश्चिम महाराष्ट्रातील मराठा शेतकऱ्यापेक्षा मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्याची परिस्थिती अधिक हलाखीची आहे. 


आरक्षणाचा फेरआढावा का घेण्यात आला नाही? 

आरक्षणाची व्यवस्था ही काय परिपूर्ण व्यवस्था नाही. त्यातदेखील दोष आहेत मात्र हे दोष दूर करण्याची इच्छाशक्ती राज्यकर्त्या वर्गाने वेळीच दाखवली नाही. OBC घटकाला जशी क्रिमिलेयरची म्हणजे उत्पन्नाची मर्यादा घालून दिलीय तशी मर्यादा काही कालावधीनंतर SC,ST. गटालाही लागू करणं गरजेचं आहे. SC वर्गातील एखादा तरुण जिल्हाधिकारी जरी झाला तरी त्याच्या पोराला आरक्षणाचा लाभ मिळतोय. त्यामुळे SC गटातील इतर जो आर्थिकदृष्ट्या मागास घटक आहे त्याला संधी मिळत नाही. आरक्षणाचा लाभ घेऊन ज्यांची परिस्थिती सुधारलीय अशांनी स्वतःहून आरक्षण नाकारायला हवे होते पण तसं होताना दिसत नाही. यामुळे ज्या वर्गाला आरक्षण मिळतेय त्या वर्गातील जो पुढारलेला आहे त्यालाच पुनःपुन्हा आरक्षणाचा फायदा मिळतोय. त्यावर मर्यादा घालायला हव्यात. OBC वर्गातीलही ज्या जाती पुढारलेल्या आहेत, आरक्षणाचा लाभ घेऊन सक्षम झाल्या आहेत त्यांना आरक्षण नाकारायला हवं. आरक्षणाचा हेतू सामाजिक न्यायाचा आहे व्यक्ती उद्धाराचा नाही हे ही समजून घ्यायला हवं. आरक्षणाचा फेरआढावा घेण्यात न आल्यामुळे ही सदोष व्यवस्था अशीच पुढे चालत आली आहे. 


आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची मागणी

एवढी सगळी गुंतागुंत पाहिल्यावर मग शेवटी आर्थिक निकषावर आरक्षण द्या अशी मागणी पुढे येते. आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम कधीच नव्हता. सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या जे घटक मागासलेले आहेत त्यांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळावं यासाठी आरक्षण आहे.  सामाजिक न्याय प्रस्थापित करणं हा आरक्षणाचा मुख्य हेतू आहे. घटना दुरुस्ती करून दिलंच आर्थिक निकषावर आरक्षण तर त्याचा फायदा किती लोकांना होणार आहे? कारण आरक्षण हे खाजगी क्षेत्रात लागू नाही. ते फक्त सरकारी नोकऱ्यात आणि सरकारी संस्थांमध्ये लागू आहे. या जागा वरचेवर कमी होताना दिसत आहेत. मूळ समस्या बेरोजगाराची, कौशल्याच्या अभावाची, घसरत्या gdp ची, शेतीच्या दुर्देशची आहे मात्र उपाय शोधला जातोय आरक्षणात. म्हणजे आरक्षण ही तर मराठा, पाटीदार, जाट समाजाची दिशाभूल ठरतेय. पण हे वास्तव आपल्याला स्वीकारायचं नाही. मराठा आरक्षणाचा चकवा या लेखात पत्रकार, अभ्यासक रमेश जाधव म्हणतात, "आरक्षण ही समान संधीचा अवकाश उपलब्ध करून देणारी कुबडी आहे, हत्यार नव्हे याचा विसर पडलेला आपला समाज आहे. अमेरिकेत जशी affirmative action झाली तशी स्थिती आपल्याकडे आहे का? गोऱ्यांनी वर्चस्ववादी भूमिका घेऊन आपल्याला संधी नाकारल्यामुळे आपण मागे पडलो. आता त्या संधी हस्तगत करून त्यांच्या तोडीस तोड किंवा त्यांच्याहून अधिक चांगला परफॉर्मन्स देऊ ही वृत्ती आरक्षणाचा लाभ मिळणाऱ्या जातींमध्ये दिसते का? याउलट त्यांना आरक्षण मिळतंय तर आम्हालाही द्या ही याचकाची वृत्तीच आपल्याकडे प्रबळ होताना दिसतेय. ज्ञानाची आस आणि संपत्ती निर्मितीचा ध्यास याला कवडीचीही किंमत न देणाऱ्या समाजाचे हेच भाग्यध्येय असणार. आजच्या पर्यावरणात अशी आस आणि ध्यास असलेला समाज निर्माण करणं हा आज एखाद्या राजकीय पक्षाचा अजेंडा असणं शक्य आहे का? हे आपलं कलेक्टिव्ह फेल्युर आहे" पत्रकार रमेश जाधव यांचे  हे अभ्यासू मत मला महत्वाचे वाटते. राज ठाकरे यांनी घेतलेल्या मुलाखतीत शरद पवारांनीही आर्थिक निकषाचा सूर आवळला. पण त्याच मुलाखतीत  70 हजार लोकांना रोजगार मिळवून देणारा हनुमंत गायकवाड हाच तुमचा आदर्श असला पाहिजे, असे बोलून त्यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत. 



पारावरच्या गप्पा

      

ओंकार क्षिरसागर,अहमदनगर

दाखव रे ती गायछाप नाहीतर सोड डबल घे..

आय आर थांब बाबा काय रे काय झालं रंगा??? 

बाबा नको नको मीच माझी इकत घेऊन खातो.

का रे बाबा म्या काय इष कालवल हाय व्हय र सुकळीच्या...

अरे बाबा नको म्हटलं ना.

अरे पण का सांगशील तर???

अरे बाबा तू तालुक्याला जाऊन आलास न व्ह.

हा मग त्याच काय???

अरे मग तो कोरोना का फोरोना आलाय ना बाबा तिथं त्याच्याने लोक हात लावल्या लावल्या मरतात म्हणे.

संप्या नसलं खायची तर खाऊ नकोस पण उगाच माझ्या मनात भीती नको घालून देऊस लगा तू


शहरी बाबू आला शहरी बाबू

संकेत कधी आलास बाळा

नाना आठवडा झाला आलोय आणि आल्या आल्या स्वतःला घरात कोंडून घेतलं मी.

ते म्हणून का रे बाबा??

अहो नाना मी सांगतो हा शहरी बाबू तिकडून आलाय आपल्याला ते व्हायरस होऊ नये म्हणून हो ना रे संक्या??

हो रे आणि त्याला कोरोना असे म्हणतात.

अरे मला एक सांग की ते गावात येताना लांबून दत्त मंदिर दिसायचं ते एवढं खराब का झालं की किती पडझड झाली आहे त्याची असे का??

आणि आणि प्रवरेला पाणी केव्हा येणार आहे रे शहरात बघ ते अडवलेल्या पाण्यात पोहायची मजा काही येत नाही बघ लगा आणि आणि पद्मावतीला केव्हा जायचंच आपण मेंढरं घेऊन? आणि आणि तो नदी पलीकडचा काळभैरव चला राव चला अरे आणि तिथे अजून पण रविवारी पिठलं भाकरी मिळते का रे?? अरे बघ ना आठ वर्षे झालीत पण जिभेवरची ती चव अजून विसरलो नाहीये हा मी..

अरे आय भुसपांग्या जरा गप की श्वास घे थोडा.

दत्त मंदिराचे झालं असे की साल बदलले आणि त्याचे हक्क मोठया वाड्याकडे गेले आणि तुला म्हणून सांगू काय काका काकू आणि आज्जी वर्षभरात कायमचे दत्ताकडे गेले रे.

काही काय बोलतोय हे शक्यच नाही काका सैन्यात होते त्यांचे ते सकाळचे व्यायाम अजून पण डोळ्यासमोर आहेत रे.

गप लगा तुला माहीत तरी आहे का काही इथलं?

तू शेवट केव्हा आला होतास तुला आठवत का?

येतोस आणि पुन्हा सांजच्याला निघतोस लगा 

आम्हाला तू आलास याची खबर मिळे पर्यत तू पुन्हा जायला निघालेला असतोस बघ.

अरे हो रे कामाची गडबड खूपच वाढली आहे रे आजकल काय करू समजतच नाहीये जबाबदारी वाढली आणि सर्वच.

ते सोड मला एक सांग आता मग मंदिर कोण बघत???

अरे त्यांची  मुले शहरात असतात चांगलं कमवतात म्हणून त्यांना इकडे यायला नको वाटतं. आता अवकाळी झाला तेव्हा आपली ती *आमटी चिंच*  जिच्यावर आपण सुरपा-रंब्या खेळायचो ते पडली की रे खाली सरळ मंदिरावर.

वाईट झालं रे आपल्या गावातलं एकूणच सर्व..

अरे तू गेलास गाव सोडून तुझ्या सोबतच ज्यांनी ज्यांनी गाव सोडलं त्यांनी पुन्हा कुठे गावाकडे ढुंकून पण बघितलं नाही.

आणि बाकी जे आम्ही इथे थांबलो ते उसाला,घासाला आणि दुधाच्या किटलीत पाणी देऊन देऊन आयुष्य काढतोय..


हे सर्व बोलत असताना संकेतच्या डोळ्यासमोरून संपूर्ण लहानपणीचे आयुष्यच गेले जसे

टचकन डोळ्यात पाणी आलं आणि इथून पुढे वेळ मिळेल तसे गावाकडे यायच त्याने ठरवलं आणि जमेल तशी आर्थिक मदत करून यांना एक सरळ आयुष्याच्या घडीत घेऊन यायचे याचा मनोमन संकल्प त्याने केला.



पावसाळ्यातील सौंदर्य


    


चैतन्यकुमार देवकर,माळशिरस

हिल्या पावसाच्या एका एका थेंबा बरोबर उन्हाळ्यातील प्रखर उन्हाचे चटके सहन करून भेगाळलेल्या जमिनीची तहान भागत असते. मातीचा दरवळणारा सुगंध याची साक्ष देतो जणू तिच्या  तृप्ततेची ती ढेकरच असते. चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यामधून पावसाची रिपरिप पडल्याबरोबर आभाळात न मावेल असा आनंद ओसंडून वाहत असतो. हळूहळू जमीन हिरवीगार व्हायला लागते. जमिनीची तहान भागल्यानंतर डबकी, नद्या,ओढे यांच्यामध्ये पाणी साठू लागतं. डबक्यामधल्या पाण्यामध्ये होड्या करून लहान मुलांचे खेळ रंगू लागतात. झाडांच्या पानापानांवर रात्रभर पडलेल्या पावसाचे थेंब दबा धरून बसलेले असतात. अवखळ पोरांचे मग त्या झाडाखाली एखाद्याला न्यायचं आणि झाडाला जोरात हिसका देऊन त्याला  'शॉवर बाथ' द्यायचे खेळ रंगतात.

एखाद्यावेळी अतिवृष्टी होते. गावातील सारे ओढे,नाले तुडुंब भरून लागतात. अनेक घरं अगदी चाळणी प्रमाणे गळू लागतात. ओढे-नाले यांनी रौद्ररूप धारण केल्यामुळे म्हणून गावाचा संपर्क तुटतो. गावकऱ्यांना चर्चेला पुन्हा एक नवीन विषय मिळतो. पुढचे काही दिवस तर या पुराच्या पाण्याची चर्चाच रंगणार असते. गावातली जेष्ठ,वृद्ध मंडळी त्यांच्या काळातील किस्से सांगून आताच्या पाण्याची तुलना करताना दिसतात. निसर्ग यातूनही एक मोठा संदेश देऊन जातो... एक धडा देऊन जातो... ओढा- नाल्यांवर झालेली अतिक्रमणं आपल्या सोबत घेऊन जातो.. आणि माणसांनी केलेल्या चुका सुधारण्याची आणखी एक संधी देऊन जातो..

सौदागर काळे,पंढरपूर.

पाऊस झोपडीमध्ये पडत असतो.झोपडी जुनी झाल्याने गळत असते.जिथून पाणी टिपकत असते,त्याखाली भांडी ठेवली जातात. रिकाम्या भांड्यात पडणाऱ्या थेंबांचा आवाज ते काठोकाठ भरत आलेल्या पातेल्यात पडणाऱ्या थेंबांचा आवाज वातावरणात  एक नाद,संगीत तयार करत राहते.हे सौंदर्य झोपडीमालक-मालकीण रात्रभर ऐकत असतात.

रात्रभर सुसाट्याचा पाऊस पडलेला असतो.भल्या पहाटेपासून पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत असतो.ज्या भाबळीला  सुगरणी चिमण्यांचे घरटं होतं ते आता तुटून खाली पडलं होतं.लहान मूलांनी सकाळ सकाळ ते कुतूहल म्हणून खेळण्यासाठी घेतलं आहे.चिमण्यां नविन सौंदर्य तयार करण्यासाठी पुन्हा कामाला लागल्या आहेत.

अनिल गोडबोले,सोलापूर

पावसाळा हा ऋतू अतिशय रोमँटिक आहे. त्यामुळे पावसाळ्यात निसर्ग सौंदर्याला बहार येतो. सगळी कडे हिरवळ आणि चैतन्य देणारे वातावरण असल्यामुळे, आनंददायी वातावरण असते.

मला आठवत की हायस्कूल ला जात असताना साधारण पणे 7 ते 8 किलोमीटर पायी चालत जावं लागायचं. कोकणात अजूनही दळणवळणाची साधन फारशी वाढलेली नाहीत. खेडेगावात चालत फिरावं लागत.. त्याचा फायदा असा की सर्व आजूबाजूच्या गोष्टी निरखत, बघत निवांत चालत जायचो.

कोकणात पावसाळ्याचे रौद्र रूप असतेच पण त्या सोबत.. सतत पडणाऱ्या पावसात चालण्याचा आनंद वेगळाच..!

तेव्हा शाळेत जायची घाई नासायची आणि घरी यायची पण.. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवेगार गवत आणि झुडुपात येणारी विविध फुल व याच्यावर पडणारे पावसाचे थेंब अजूनही आठवले की मन डायरेक्ट हायस्कूल मध्ये जाते.

छोट्या छोट्या भिंगरी (हेलिकॉप्टर प्रमाणे उडणारे कीटक) पकडायचो. फुलपाखरं तर भरपूर दिसायची.. आता कॉलेजमध्ये प्राणिशास्त्र शिकताना फोटो बघितला की ते नवीन अस कधी वाटत नाही. सर्व प्रकारची फुलपाखरं अजूनही माझ्या गावात आहे. आता तर त्यावर काहीजण अभ्यास करत आहेत.

शाळेत जाताना छत्री नावालाच असायची.. म्हणजे पावसात भिजायचं, हे नक्की असायचं.. फक्त एकच गोष्ट महत्त्वाची असायची ती म्हणजे पावसाळी सँडल..! पाण्यात पायाखाली काय येईल हे सांगता येत नसे..

मध्येच एखादा ससा टुणकन उडी मारून निघून जाई.. शेतात चालू असलेली काम व त्यात काम करणाऱ्या बायकांची लोक गीते चालू असायची.. डोक्यावर इरले घेऊन भात शेती मध्ये काम चाललेलं असायचं..

एकदा तर सापावर पाय पडता पडता राहिला. नंतर कळलं की, तो साप म्हणजे नाग होता. गावाच्या बाजूने तेरेखोल ची खाडी गेलेली आहे.. पावसाळ्यात ही गोड्या पाण्याची असते इतर वेळी समुद्राचे पाणी यात येते.. त्या नदीचा आवाज.. पक्षी यांचे आवाज कानात अजूनही बसलेले आहेत..

असो, आता अजून काय वर्णन करावे, बा. भ. बोरकर सांगतात त्या प्रमाणे, "माझ्या गोव्याच्या भूमीत, गड्या नारळ मधाचे.. कड्या कपारी मधोनी, घट फुटती दुधाचे."

मला माहित आहे, वरील कविता आपण चाल लावूनच वाचली असणार, तर माझ्या मनात पावसाळा अत्यंत निसर्गाने भरलेला आहे.

न्याय


Preamble of the Constitution - Latest law News | Indian ...



अनघा नंदाने

किती सोपं आहे, ज्याला जे हवं ते मिळणं.
प्रत्येकाला मनाप्रमाणे जगण्याचं स्वातंत्र्य.
प्रत्येकानं प्रत्येकाशी बंधुत्वानं राहणं.
प्रत्येकाला त्याच्या मनाप्रमाणे आयुष्य घडवण्याची समान संधी मिळणं.
प्रत्येकाला व्यक्त होण्याचं आणि "योग्य शब्दांत" टीका करण्यांचं स्वातंत्र्य असणं.
हे सगळं किती सोप्पं आहे.

पण "बुद्धी" मिळालेल्या माणसासाठी सहज गोष्टीच खूप कठीण होऊन बसल्या आहेत. निसर्गाने उपलब्ध करून दिलेली साधनसंपत्ती जेव्हा माणूस माणसाला नाकारतो, तेव्हा "अन्यायाला" सुरूवात होते. एका मर्यादेपर्यंत हा अन्याय सहन केल्या जातो. पण त्यानंतर "न्याय" म्हणजे बहुतेक वेळा हक्कांसाठी लढा लढला जातो.

आजच्या काळांत "न्याय" हा शब्द असा एकटा वापरून चालत नाही.
त्यापुढे "प्रश्नचिन्ह" (न्याय?) येतंच.
आपली न्यायव्यवस्था इतकी वाईट झाली आहे का?
का आपली न्यायव्यवस्था इतकी वाईट झाली आहे?
या दोन प्रश्नांमध्ये फक्त "का" ची जागा बदलली तर प्रश्नाचा अर्थ बदलतो. पहिला प्रश्न थेट "व्यवस्थेवर" प्रश्नचिन्ह उभे करतो. तर दुसरा प्रश्न हाताची तीन बोटे आपल्याकडे म्हणजे लोकांकडे आहे याची जाणीव करून देतो.

पहिल्या प्रश्नावर बोलायचं झालं तर संसद, कार्यपालिका आणि न्यायपालिका या लोकशाहीच्या तीन स्तंभांचा समतोल राखणं अजूनही आपल्याला जमलेलं नाही आहे. जेव्हा बहुपक्षीय सरकार होतं, तेव्हा संसदेच्या पडत्या बाजूला बघता न्यायपालिकेने अनेक ठाम आणि लोकहिताचे निर्णय दिले. PIL "भारतीय लोकशाहीचा अविष्कार" तितक्यातच सुरू झाला. पण केंद्रात बहुसंख्यकांचं एकपक्षीय सरकार आल्यानंतरची आपल्या न्यायव्यवस्थेची कामगिरी म्हणावी तितकी "ठाम" वाटली नाही. त्यातच 12 जानेवारी 2018 रोजी सुप्रीम कोर्टाच्या चार मोठ्या न्यायाधीशांनी घेतलेली पत्रकार परिषद थेट सुप्रीम कोर्टाच्याच काम करण्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित करते. पण त्याहूनही मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा त्याच पत्रकार परिषदेत निर्भिडपणे बोलणारे आणि त्यानंतर मुख्य न्यायाधीश राहिलेले रंजन गोगोई राज्यसभेवर जातात. यावरूनच आता आपली न्यायव्यवस्था किती "निष्पक्ष" राहिली आहे हे जाणवतं.

जगातली सगळ्यांत मोठी लोकशाही "भारत" असं स्वतःच स्वतःला ओरडून सांगताना "लोकशाही मूल्य" आपण किती जपतो हे सुद्धा आपण स्वतःला विचारायला हवं. आता तुम्ही म्हणाल, "न्याय" या विषयावरून "लोकशाही" वर कुठून आली ही?
कारण "न्याय" हा विषय एकपात्री नाही. स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, या मुल्यांशिवाय फक्त न्यायाला काही अर्थच उरत नाही. बरेचदा तसा न्याय, न्याय नाही तर अन्यायच ठरतो.

उदा. खाप पंचायतीमध्य नवरा-बायकोला जबरदस्तीने एकमेकांचे "मानलेले" बहीण-भाऊ बनवणं आणि न्याय दिला असं समजणं हा त्या समाजानं "मानलेला" न्याय असू शकतो. पण तो खरा न्याय असू शकतो का? माझ्या मते नक्कीच नाही. कारण यांत त्या दोघांच्याही स्वातंत्र्याची गळचेपी झालेली दिसते.

न्याय हा समाजाच्या भावनांवर आधारित कसा असू शकेल? कारण भावना बदलतात, पण मूल्य नाही. म्हणून निरपेक्ष न्यायासाठी, लोकशाही मूल्य जपावे लागतील.
========================================================================
Constitution of India - List of All Articles (1-395), PDF Download


अनिल गोडबोले,सोलापूर


लोकशाही व्यवस्था बळकट आहे असे आपण तेव्हाच म्हणू शकतो जेव्हा अन्यायकारक गोष्टी विरोधात आवाज उठवण्याची व त्याला योग्य तो न्याय मिळवण्याची व्यवस्था असेल.

न्यायदान हे पूर्वी राजा लोक करायचे नंतर त्यांनी पंतप्रधान नेमले काहींनी न्यायाधीश नेमले.. पण न्याय व्यवस्था ही स्वायत्त आणि पारदर्शी, नियमावर आधारित व्यवस्था ब्रिटिशांनी भारतात आणली.

कायदे, नियम, व्यवस्था या साठी निर्माण केले गेले की सर्वांना निर्भयपणे राहता येईल. कोणी छोटा किंवा मोठा नसेल.. म्हणून ,'कायद्यासमोर समान' हा शब्दप्रयोग होऊ लागला.

गरीबतील गरिबाला सुद्धा न्याय मिळवण्याची, सरकारला जाब विचारायची आणि हक्क मजबूत करायची यंत्रणा ज्या तत्वावर उभी आहे, ते तत्व म्हणजे न्याय..

पण आज जरा चित्र वेगळं दिसत आहे. न्याय पालिका हा नवा व्यवसाय उदयाला आला आहे. वकिली ही डॉक्टरकी प्रमाणे पिढीजात चालत आहे.

धूर्त, नालायक आणि प्रचंड महत्त्वाकांक्षी (विकृत महत्त्वाकांक्षी) लोकांनी यावर देखील कब्जा मिळवला आहे.. हे फार चुकीचे आहे.

भारतीय दंड संहिता आणि गुन्हेगारी दंड संहिता व त्यातील नियम, हे संविधानातील तत्वावर उभे आहेत.

या मध्ये काही चांगल्या बाबी देखील आहेत. सरकारने जे काही चुकीचे निर्णय घेतले त्याला सुप्रीम कोर्टाने दणका दिलेला आहे. राष्ट्रीय स्तरावर "राष्ट्रीय कायदेशीर मदत व मध्यस्थी कक्ष" चालवला जातो. (National legal aid authority) या मार्फत गरीब, वंचित लोकांना मोफत कायदेशीर मदत दिली जाते.

जॉनी एल एल बी 2 मध्ये जज शेवटी जे काही बोलतात ते अगदी वास्तव आहे न्याय पालिकेचे..!
आता याला सुज्ञ आणि निडर पणे लढणाऱ्या लोकांची मानसिकता लागते. या बाबतीत कस लढायचं हा चेंडू तुमच्या आमच्या "कोर्टात" आहे.

========================================================================

चैतन्यकुमार देवकर

अगदी लहानपणापासून आपल्या कानावर हा शब्द पडत असतो न्याय... एक महत्त्वाचं मानवी मूल्य. पण खरोखरच हा अडीच अक्षरी शब्द सोपा जरी असला तरी त्या शब्दासाठी करावा लागणारा संघर्ष फार मोठा असतो. जो सर्वात जास्त ताकद वान तो कमजोर व्यक्तींवर अधिकार गाजवत त्यांचे शोषण करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांच्यावर अन्याय करतो. न्याय म्हणजे काय तर सर्वांसाठी एकच मापदंड असणे किंवा फारतर असा मापदंड जेणेकरून सर्वांना सोयीचा सामावून घेणारा असेल. न्याय संस्था किंवा न्यायालय आपल्याकडे अन्यायाच्या विरुद्ध दाद मागण्यासाठी म्हणून स्थापलेल्या आहेत परंतु एखाद्या गोष्टीच्या न्याय मिळायला अनेक वर्षे घालवावे लागतात आणि त्यामुळे इंग्रजीमध्ये कथन आहे. त्याप्रमाणे न्यायासाठी विलंब म्हणजे न्याय नाकारणे असं बहुतांशी पाहायला मिळते.

स्वातंत्र्य

Less Force, More Freedom: Living Life in the Flow
जगताप रामकिशन शारदा 
बीड 

स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय?  आपण स्वातंत्र्य म्हणजे मुक्तता असा अर्थ घेणार की स्वातंत्र्य म्हणजे कसलेही बंधन नाही असा अर्थ घेणार.  जसे आपण मराठी स्वातंत्र्य म्हणजेच मुक्तता असे बोलतो त्याचप्रमाणे  इंग्रजीमध्ये याला  फ्रीडम इंडिपेंडेंस किंवा लिबर्टी असे  देखील बोलले जाते.  अगदी सुरुवातीपासूनच सामान्य माणूस हा स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता राहिलेला आहे. तरीही आपण पाहिलेला आहे की जागतिक    पातळीपासून की अगदी कुटुंब व्यवस्थेपर्यंत प्रत्येकाचा स्वातंत्र्याचा अर्थ हा वेगळा राहिलेला आहे आणि ते स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रत्येकाने कसोशीने प्रयत्न केलेले आहेत करत आहेत आणि चालू राहतील.   कोणाला आपल्या व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य हवे आहे,  कोणाला आपल्या निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य हवे आहे  कोणाला आपले विचार मांडण्याचे स्वातंत्र्य हवे आहे कोणाला परंपरागत रूढी परंपरा च्या  साखळदंडातुन स्वातंत्र्य हवे आहे.म्हणूनच भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना  बहाल करण्यात आलेल्या स्वातंत्र्यांचा  उल्लेख आपणास संविधानाच्या उद्देश पत्रिकेमध्ये दिसून येतो.तो  असा  विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य  बहाल करत असल्याचे  नमूद केलेले आहे. यामध्ये कोणताही भारतीय नागरिक जर सनदशीर मार्गाने या स्वातंत्र्यांचा उपयोग करत असेल तर सरकार यामध्ये आडकाठी आणू शकत नाही. पण बऱ्याच वेळा  नागरिकांना स्वातंत्र्य आणि स्वैराचार यांच्यातला फरक ठळकपणे करता येत नाही आणि मोठ्याप्रमाणावर  आपण किती  स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते आहोत  हे दाखवण्याच्या प्रयत्नात त्याचा स्वैराचार केला जातो तो संविधानााला अभिप्रेत नाहीये.
वर सांगितल्याप्रमाणे भारतीय संविधानाने भारतीयांना कोणती स्वातंत्र्य बहाल केलेली आहेत त्यामध्ये घटनाकार यांचा उद्देश काय होता ? हेही समजून घेणे गरजेचे आहे. पारतंत्र्यात जीवन जगत असताना कोण कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते?  पारतंत्र्य मध्ये होणारी मानवी प्रतिष्ठेची गळचेपी विनाकारण सोसावा लागणारा त्रास दडपशाही आणि जुलमी राजवट  यांचे समाजावर होणारे विपरीत परिणाम हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील पुढाऱ्यांनी जाणवलेले होते . म्हणून कोणत्याही प्रकारे भारतीय नागरिक कसल्याही प्रकारच्या स्वातंत्र्यापासून वंचित राहू नयेत म्हणून त्यांनी विविध प्रकारच्या स्वातंत्र्यांचा समावेश भारतीय संविधानात करून मूल्य अधोरेखित केलेली आहेत. आपण इंग्रजांच्या शासन काळामध्ये इंग्रजांकडून कोणत्या प्रकारच्या स्वातंत्र्याची मागणी करत होतो तेच स्वातंत्र्य आता आपण राज्यकर्ते म्हणून सामान्य जनतेला बहाल करणे हे आपले कर्तव्य असल्याचे संविधान सभेने आणि संविधानकारांनी जाणले होते.    स्वातंत्र्य मध्ये कशाप्रकारे सुधारणांना वाव असतो स्वातंत्र्य मध्ये कशाप्रकारे एक सामान्य नागरिकही आपला आवाज बुलंद करू शकतो स्वातंत्र्य मध्ये कशाप्रकारे एक चित्रकार एक वृत्तसंपादक एक गायक किंवा एक कलाकार आपल्या विविध कलागुणांच्या  साह्याने स्वतःला समाजाला देशाला व्यक्त करू शकतो आणि व्यंग अथवा कडक शब्दांत या गोष्टी  मांडू शकतो. कारण स्वातंत्र्यांशिवाय लोकशाही  म्हणजे लोकशाहीची थट्टाच असा ग्रह होतो.   म्हणूनच तर आपण पाहतो की देशभरामध्ये  विविध विचारधारेचे लोक प्रत्येक गोष्टीवर आपले विचार व्यक्त करत असतात. जमलं तर त्या सुधारणांनावर कौतुकाचा वर्षाव करत असतात त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी अनेक उपायही सुचवत असतात किंवा ज्या व्यक्तींना  गोष्टी आवडत नाहीत ते या गोष्टी कशाप्रकारे चुकीच्या येथे विविध माध्यमातून विविध कलेच्या मार्फत लोकांसमोर मांडत असतात.सहाजिकच काहीवेळा सरकारने घेतलेले कठोर निर्णय हे जर जनतेला पचणारे नसतील तर त्या जनतेच्या असहाय्यतेचा फायदा उठवून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न अनेक गट करत असतात परंतु शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे खरोखरच मानवी स्वातंत्र्याची गळचेपी होते का त्याचं तटस्थ परीक्षण करण्यासाठी भारतीय संविधानाने स्वतंत्र न्यायव्यवस्थेची निर्मिती केलेली आहेत. न्याय व्यवस्था ही फक्त सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी नाही तर नागरिक वापरत असलेल्या स्वातंत्र्यावर काही प्रमाणात आवश्यक  मर्यादा आणि त्याच्या सीमा टाकण्याचं काम करते.  अशा व्यवस्थेची भारतामध्ये गरज आहे कारण की स्वातंत्र्याचा प्रत्येकाला हवा तसा अर्थ ते घेऊ शकतात आणि स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार फोफावू शकतो. स्वातंत्र्य कोणाला नकोय ते प्रत्येकाला हवं पण त्यात प्रत्येकाची स्वातंत्र्याची व्याख्या वेगवेगळ्या आहेत .काही जणांच्या दृष्टिकोनातून ती समाजासाठी उपयुक्त आहे तर काहीजणांच्या दृष्टिकोनातून समाजामध्ये फूट पाडणारे देखील असू शकते.  पण विषय जेव्हा न्यायव्यवस्था आणि मानवामध्ये असणारी त्याची सद्विवेक बुद्धी यावर येईल तेव्हा मात्र प्रत्येकाच्या स्वातंत्र्याचा हा आदर नक्कीच केला जाईल. पण त्याला  अट एवढीच आहे की आपल्यामध्ये इतरांच्याही स्वातंत्र्याचा सन्मान करण्याची  क्षमता असली पाहिजे. स्वातंत्र्य हे जरी आपण आपल्या अधिकाराचा भाग मानत असू तरी जोपर्यंत आपण तो आपले कर्तव्याचाही भाग आहे असे समजत नाही तोपर्यंत ते स्वातंत्र्य समाजामध्ये मिसळून एक  प्रगल्भ आणि आदर्श समाज निर्माण होऊ शकत नाही. मग समाजामध्ये आपण सगळे आलो.आपल्या कुटुंबाला कुटुंबातील सदस्य आले ज्यावेळी समाज  वैचारिक दृष्टीने प्रगल्भ होतो त्याला कारणीभूत ही त्या समाजात असणारी कुटुंब असतात. आपण जोपर्यंत आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या स्वातंत्र्याचा आदर करत नाहीत तोपर्यंत स्वातंत्र्य हे केवळ पुस्तकात वाचण्यासाठी आपल्याला अधिक चांगले वाटते प्रत्यक्ष जीवनामध्ये मात्र त्याचा आपण तिरस्कार करू लागतो.
---------------------------------------------------------------------------------


Freedom Life Church - Home | Facebook
-
मयुर डुमणे, उस्मानाबाद

मानवाच्या विकासासाठी आवश्यक असणारं अत्यन्त महत्वाचं मूल्य म्हणजे स्वातंत्र्य. ब्रिटिशांच्या तावडीतून भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी मुक्त झाला तो आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्य या शब्दाचा संबंधच सर्वप्रथम या स्वातंत्र्य दिनामुळे येतो. हे झालं राजकीय स्वातंत्र्य. स्वातंत्र्य हा शब्द वाचायला किती सोप्पा वाटतो ना. पण या मूल्यांत फार मोठा व्यापक अर्थ दडलाय जो तुमच्या माझ्या जीवनाशी थेट संबंधित आहे. आज मी या 'स्वातंत्र्य'  विषयावर लिहू शकतो कारण ते लिहिण्याच स्वातंत्र्य मला सहज उपलब्ध आहे. माझ्याकडे मोबाईल आहे, विचार करण्यासाठी लागणारा वेळ आहे, दोन टायमाचं जेवण मला मिळू शकतं ही सगळी पार्श्वभूमी असल्याशिवाय मी लिहू शकत नाही. दोन वेळेच जेवण मिळणं ज्यांना मुश्किल आहे त्यांना आहे का हे अशाप्रकारचं लिहिण्याचं बोलण्याचं स्वातंत्र्य? येथे स्वातंत्र्याचा संबंध समतेशी येतो. महात्मा फुलेंच्या काळात मुलींना, दलितांना शिक्षणाचं स्वातंत्र्य नव्हतं. कारण त्या काळी असलेली टोकाची सामाजिक विषमता. असा हा स्वातंत्र्य आणि समतेचा जवळचा संबंध आहे.  स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही लोकशाही मूल्यच परस्पर पूरक आहेत. तुम्ही शिक्षण घेताय, शाळेत जाताय लिहिताय, बोलताय हे सारं काही करू शकता. यातून तुमचं व्यक्तिमत्व आकारास येतं. व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासासाठी स्वातंत्र्य महत्वाची भूमिका बजावतं.  

अभिव्यक्ती स्वातंत्र्य, स्वातंत्र्याची गळचेपी आणि समाज

म्हणजे व्यक्त होण्याच स्वातंत्र्य. प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. पण काही वेळा या स्वातंत्र्याची गळचेपी होते. तुमचं व्यक्त होणं बहुसंख्य समाजाच्या विचारधारेविरुद्ध असेल, राज्यसंस्थेला अडचणीत आणणारे असेल तर तुम्हाला सामाजिक राजकीय दबावाचा सामना करावा लागतो. व्यक्त झाल्यास येणारे धमक्यांचे कॉल ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहेच. डॉ. दाभोलकर अंधश्रद्धा निर्मुलनाचे काम करत होते. काहींना वाटलं हे आपल्या धर्माविरुद्ध काम करताहेत. त्यांनी दाभोलकरांचा खून केला. गोंविद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या होणं ही स्वातंत्र्याची गळचेपीच आहे. तुकाराम महाराजांची गाथा पाण्यात बुडवणं, आगरकरांची जिवंतपणी अंत्ययात्रा काढणं, गांधीजींची हत्या ही सगळी स्वातंत्र्याच्या गळचेपीची उदाहरण आहेत. तुम्ही आमच्या विचारधारेविरुद्ध जाल तर आम्ही तुमचा खून करू असा हा मागास विचार. हा असहिष्णु विचार सध्या समाजात रुजतोय. आज अनेक परखड विचार मांडणाऱ्या साहित्यिकांना अंगरक्षक घेऊन फिरावं लागतंय. सरकार विरोधात बोलणाऱ्या व्यक्तींना देशद्रोही ठरवणं हा त्यातलाच प्रकार. नास्तिकतेचा विचार तुम्ही बहुसंख्य आस्तिक समाजात खुलेपणाने मांडू शकत नाही. मांडल्यास धमक्या ट्रोलिंग ठरलेलं. र.धो कर्वे या माणसानं स्वातंत्र्यपूर्व काळात लैंगिकतेविषयी परखड विचार मांडले. समाजस्वास्थ्य मासिकाद्वारे जनजागृती केली. त्या माणसावर अश्लील मजकूर छापला म्हणून कोर्टाच्या वाऱ्या कराव्या लागल्या होत्या. आजही तुम्ही लैंगिक विषयावर समाजात उघडपणे बोलनं हे समाजाला न पचणारी गोष्ट आहे. लोकं काय म्हणतील या प्रश्नाने तर कित्येकांचे स्वातंत्र्य हिरावून घेतलंय. परवाचीच गोष्ट आहे कॉमेडियन अग्रीमा जोशुआ हिने शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला म्हणून शिवभक्तांनी रान उठवले. एकाने जाऊन व्हिडिओ जिथे शूट करण्यात आला होता तो स्टुडिओ फोडला. काहींनी तिला बलात्काराच्या धमक्या दिल्या. ट्रोलिंग झालं अखेर तिला या प्रकरणी माफी मागावी लागली. व्हिडिओत स्पष्ट दिसतंय तिने शिवाजी महाराजांचा कसलाही अपमान केलेला नाही तरीही तिला या टोकदार अस्मितांना सामोरं जावं लागलं. ही झुंडशाही आहे. ही झुंडशाही देखील स्वातंत्र्याची गळचेपी करते. 


स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे

इतक्या महत्वाच्या मुल्यासोबत जबाबदारी ही असणारच. स्वातंत्र्याचा उपभोग घेत असताना इतरांच्या स्वातंत्र्याला बाधा पोहचणार नाही, कायदा आणि सुव्यवस्थेची अडचण होणार नाही याची काळजी घ्यायलाच हवी. 

एका कार्यक्रमात राममनोहर लोहिया यांच्याबद्दलचा किस्सा उल्हास दादांनी सांगितला. लोहिया एका बाईला म्हणाले, मी तुला पंडित जवाहरलाल नेहरू यांची ओळख करून देतो. तू फक्त त्यांची कॉलर पकडून एवढंच म्हणायच की 'आझादी के बाद क्या किया मेरे लिए' ठरल्याप्रमाणे ती बाई नेहरूंना भेटली. भेटल्यावर तिने नेहरूंची कॉलर पकडली आणि  म्हणाली , आझादी के बाद क्या किया मेरे लिए 

नेहरूंच उत्तर होतं, आप मेरी कॉलर पकड सकती है इतना तो जरूर किया है मैने. 

लोकांनी लोकांसाठी चालवलेली ही शासनपद्धती आहे. यांत राज्यकर्त्यांना प्रश्न करण्याचा, सरकारवर टीका करण्याचा अधिकार तुम्हाला आहे.अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा या लोकशाहीचा आत्मा आहे.
----------------------------------------------------------------------


80 Inspirational Quotes on Freedom | Sayings & Images

अनिल गोडबोले

लहानपणी स्वातंत्र्य हा शब्द फार भारी वाटायचा. लोकमान्य टिळक   पुण्यतिथी ला "स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" अस ठणकावून समोरच्या पोरांना सांगितल्यावर फार मजा यायची.
       जस जस आयुष्य जगायला लागलो. पुस्तक वाचली. इतिहास शिकत गेलो, समजत गेलो तस कळलं की स्वातंत्र्य फार गरजेचे असते, त्या साठी आपल्याकडे भरपूर लोक हुतात्मे झाले आहेत. 
       भारतीय संविधानानुसार आहार, विहार, विचार, भाषा, धर्म, प्रार्थना व मालमत्ता(सरकारच्या नियमात) या सर्व गोष्टी स्वातंत्र्याच्या अधिपत्याखाली येतात.
       'जेव्हा तुम्ही काठीच एक टोक उचलता तेव्हा दुसरे टोक आपोआप उचलले जाते." या न्यायाने स्वातंत्र्य बरोबर जबाबदारी येते त्याचा मात्र त्रास होतो.
      पर्यटक म्हणून कुठेही फिरण्याचे स्वातंत्र्य आपल्याला आहे, पण स्वतःची काळजी, इतरांची काळजी, परिसर स्वछता, याची जबाबदारी आपल्याला नको असते..  त्यामुळे स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी नियम करावे लागतात, ते नाही पाळले की दंड, कडक अंमलबजावणी करावी लागते.. त्यामुळे कायद्याचे पालन करताना आपल्याला त्रास होतो किंवा समोरची व्यक्ती त्रास देऊ शकते.
      दुसऱ्याच्या जोखडाखाली, अधिपत्याखाली राहताना मानवी सन्मानाची हानी होते, गुलामगिरी या पेक्षा वेगळी नसते त्यामुळे भारतीय संविधान आपले(नागरिकांचे)स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी योजना, नियम करत आहे.
       स्वतंत्र विचार सरणी, स्वतंत्र वर्तन हे लोकशाही मूल्य आहे.. आपण ते झुंडशाही, फॅसिझम, मुजरे-हुजरेगिरी, स्वार्थी विचार यातून, रसातळाला जात आहोत.. हे थांबवण्यासाठी हे मूल्य गर्जवचे आहे.
----------------------------------------------------------




अमोल चाटे , पुणे

              स्वातंत्र्य म्हणजे परकीय नियंत्रणापासून मुक्त आपल्याला हवे तसे विचार करण्याचा, बोलण्याचा, आणि वागण्याचा हक्क. स्वातंत्र्य हा प्रत्येक माणसाचा नैसर्गिक अधिकार आहे. आचार, विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे माणसाचा व समाजाचा सर्वांगीण विकास होतो, प्रगल्भता वाढते,लोकशाही सदृढ होते व जिथे स्वातंत्र्याचा अभाव असतो तिथे गुलामगिरी, हुकूमशाही फोफावते व समाज अधोगती कडे अग्रेसर होतो.
    पण स्वातंत्र्य हे अनिर्बंध नसतात त्यांच्यावर नैतिक आणि कायदेशीर बंधने असतात, आपण आपले स्वातंत्र्य उपभोगत असताना दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणू शकत नाही किंवा कमी करू शकत नाही. आपल्याला स्वातंत्र्य आहे म्हणून आपण वाट्टेल ते करू शकत नाही.त्यामुळे प्रत्येकाच्या स्वातंत्र्याचे रक्षण व्हावे म्हणून व्यक्तीगत स्वातंत्र्य वर काही बंधने आहेत. 
       स्वातंत्र्य सोबत जबाबदारी सुद्धा येते ती म्हणजे स्वतः स्वातंत्र्य उपभोगत असताना दुसऱ्याच्या स्वातंत्र्याला बाधा येऊ न देणे.
-------------------------------------------------------------------


I would give my life for freedom! — LivingNow Magazine Australia
 करण बायस

आपण स्वातंत्र्याबद्दल वाचतो , स्वातंत्र्याचे स्वप्न बघतो , आपण आपल्या स्वातंत्र्यासाठी लढू पण शकतो, पण खरंच स्वातंत्र्य काय आहे हे समजून घेतले का ?
नुकतीच भगवद्गीता वाचून पूर्ण केली आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला.उदारमतवादी आणि पूर्वग्रह न ठेवता, भगवद्गीता ही भगवान कृष्णाने मानवजातीला दिलेली देणगी आहे, जी आपल्याला मानवी जीवनातील अशांततेने तर्कसंगत पद्धतीने व्यवहार करण्यास मदत करते.
त्यामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला अत्यंत गोपनीय आध्यात्मिक ज्ञानानंतर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की आता त्याने सर्व काही ऐकले आहे, जे उचित वाटले ते करण्यास तो मोकळे आहे. थोडक्यात, हे समजलं की गीता व्यक्तीचे स्वातंत्र्य ओळखते आणि साधकाच्या हाती अंतिम निवड सोडते .
विचार केला तर स्वातंत्र्य हा विषय खूप खोल आणि ही फार आकर्षक संकल्पना आहे. माणसाला वैचारिक, धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक इत्यादी अनेक प्रकारचे स्वातंत्र्य असू शकते, हवे असते. कुठेही राहण्याचे, हवा तो व्यवसाय करण्याचे, हवा तो जीवनसाथी निवडण्याचे, हवे ते वाचण्याचे, लिहिण्याचे, प्रकटीकरणाचे असेही स्वातंत्र्य हवे असते.आणि स्वातंत्र्य साठी तो त्याला हवे तो पर्याय निवडू शकत असेल तर तो स्वतःला स्वातंत्र्य समजतो आणि जर त्या व्यक्तीचे निर्णय दुसर कोणी घेत असेल तर तो स्वतःला स्वातंत्र्य समजणार नाही.
स्वातंत्र्याच्या वेगवेगळ्या व्याख्या असू शकतात कोणासाठी ते तुरुंगवास किंवा गुलाम अशी अवस्था नसणे म्हणजे स्वातंत्र्य असू शकते किंवा कार्य करण्याची, बोलण्याची किंवा विचार करण्याच्या अधिकारात बाधा किंवा संयम न ठेवता एखाद्याला हवे आहे. कोणत्याही नियंत्रणाशिवाय एखाद्याला पाहिजे म्हणून कार्य करणे, बोलणे आणि विचार करणे ,मोकळे असणे हे स्वातंत्र्य आहे. आणि कदाचित हे सुद्धा कोणासाठी स्वातंत्र्य असणे म्हणजे वर सांगितलं तस असणे आवश्यक नाही .
भारत १९४७ मध्ये स्वतंत्र्य झाला विचार अभिव्यक्ती अशा अनेक विषयांमध्ये स्वातंत्र्य प्राप्त झाले .म्हणजेच भारत हा पारतंत्र्यात होता आणि जेंव्हा भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची भावना निर्माण झाली तेंव्हा भारत देश स्वातंत्र्य झाला, तर स्वातंत्र्य हा फक्त एक शब्द नसून तर ती एक भावना आहे.पारतंत्र्य यासारखे कल्पनांचा जवळपास संपूर्ण जगातून पराभव झाला पण याचा अर्थ असा नाही की स्वातंत्र्य ही कल्पना सर्वत्र रूढ झाली.
माझा भारत देश आपला भारत देश अश्या अर्थपूर्ण स्वातंत्र्य देशात आजसुध्दा नागरिक आपल्या पेक्षा मोठ्या माणसाला मालक म्हणून गुलामगिरीत राहतात . देश स्वातंत्र्य होऊनसुद्धा या काही नागरिकांमध्ये स्वातंत्र्याची भावना नाही.स्वातंत्र्य ही कुणाकडून घेण्याची गोष्ट नाही.
देश परकीय ताब्यातून स्वातंत्र्य होऊन ७३ वर्षे होत आहेत तरीही भारतीय नागरिक जात , धर्म , द्वेष , चिंता ,निराशावादी विचार यांसारख्या अनेक विचारांच्या गुलामगिरीत आहेत.

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************