माझा खासदार कसा असावा आणि सद्यस्थिती !


ऋषिकेश जोहरे, डोंबिवली.

 सद्य स्थिती चा विचार केलात तर आपल्याला हे लक्षात येईल की २०१४ साल पासान आपण लोकसभेच्या निवडणुका आल्या की देशाचा पंतप्रधान कोण होईल हा विचार करून लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करतो पण मात्र आपला देश काही अमेरिका नाही  आणि भारतात काही अध्यक्षीय लोकशाही नाही की आपण देशाचा पंतप्रधान निवडू . आपण लोकसभेत मतदान करतो ते खासदाकीच्या उमेदवारासाठी या वेळी आपण कुठलाच राजकीय पक्ष किंवा त्याचा पंतप्रधान पदाचा उमेदवार हे विचारत ना घेता , निवडणुकीत उभा असलेला उमेदवार हा आपल्या लोकसभा मतदार संघात किती जोमाने काम करू शकतो . आपल्या मतदार संघाचे किती प्रश्न तो लोकसभेत मांडू शकतो , नाही तर पक्ष आणि राजकीय ताकदीवर कोणीही खासदार होतं आणि लोकसभेच्या खुर्च्या उबावता . उमेदवार किती शिक्षित आहे त्याला भारतीय संविधानाची कितपत माहिती आहे तसेच मतदार संघातील किती प्रश्न त्याला माहीत आहेत, या सर्व बाबी लक्षात घेणं खूप महत्त्वाचा आहे . आपल्या लोकशाही सर्वात मुख्य भूमिका निभावतो तो म्हणजे विरोधी पक्ष , आपला विरोधी पक्ष किती क्षमतेचा आहे हे महत्त्वाचं आहे . लोकशाही बळकट ठेवायची असेल तर त्याचे चारही स्तंभ बळकट असणे महत्त्वाचे आहे . तसेच जागृत आणि सुशिक्षित लोक हे देशाचा भवितव्य आहे यात शंका नाही म्हणून जागृत आणि सुशिक्षित लोकच देशाच्या संसदेत पाठवा जेणे करून . देशहिताचे नवनवीन प्रयोग होतील.
=======================

 वाल्मीक फड, निफाड नाशिक

सामान्य जनता हि आजपर्यंत आस्वासनांवर विश्वास ठेऊन मत करत असायची परंतु आता परीस्थीती वेगळी आहे.जनता आता सुजाण झालेली आहे,जनतेला राजकारणाचे ज्ञान नव्हते म्हणूनच कायम एकच पक्षाची सत्ता जवळजवळ सत्तर वर्षे होती.सत्तर वर्षांनी जनतेला जाग आली आणी आमदार,खासदार यांचे चेहरे बदलायला लागले.
खासदार तर मला वाटतंय की हाक मारल्यावर धाऊन येणारा पाहीजे.खासदार कींवा आमदार काही आपल्याला भाकरी थापून जेऊ घालू शकत नाही पण ज्या मूलभूत सुविधा देण्याचे जे काम आहे ऊदा.रस्ते बांधणी,पिण्याचे व शेतीसाठी पाणी ऊपलब्ध करणे,शिक्षणाची व्यवस्था करणे.ज्या सरकारी योजना आहेत त्या सामान्य जनतेपर्यत पोहचविणे,त्या पुर्ण होण्यासाठी मदत करणारा असावा. आणी केवळ बोलण्यात पोपट असणारा खासदार नसावा.खासदार कमीतकमी महीना दोन महीन्यातून मतदारसंघात फिरुन जनतेच्या समस्या असतिल त्या संसदेत निर्भीडपणे मांडणारा असावा.प्रसंगी जनतेसाठी सरकारशी भांडणारा असावा.
सध्याच्या आमच्या खासदाराने माझ्या गावाकडे जवळजवळ दहा वर्षात डोकून सुद्धा पाहीलेले नाही.आणी दहा वर्षात खासदाराचे एकही विकास काम आम्हाला मिळाले नाही.एवढेच काय पण यांचे मुख सुद्धा आम्हाला बघायला मिळालेले नाही.
=======================

प्रविण, मुंबई

शिकलेला असावा, खर बोलणाराआणि चारचौघात काय बोलावे याची जाणीव असणारा असावा. एवढं असलं तरी खूप झाले. विषयाची सुरवात अशी संकुचित केली कारण च तस आहे. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला या प्रमाणे अनेक नेते "मन की बात " करत असतात. म्हणून पहिल हेच अपेक्षित आहे. असो
पण जेव्हा माझा नेता कसा असावा किंवा खासदार कसा असावा तेव्हा डोक्यात खालील मुद्दे येतात
1. भावनिक आवाहन (जात, धर्म, मंदिर, मस्जिद इ) न करता, विकासाला प्राधान्य देणारा
2. आचार आणि विचार सारखे आणि चांगले असणारा
3. कोणत्याही व्यक्ती (पक्षश्रेष्ठीं, उद्योजक....) पेक्षा जनतेचा प्रश्नाला प्राधान्य देणारा
4. मतदारसंघाला सतत भेटीदेऊन विकासकामे करणारा
आशा बर्याचश्या अपेक्षा आहेत, पण वास्तवात असा नेता सापडणं कठीण. कारण वरील गोष्टी या मत मागण्यासाठी चांगल्या आहेत पण सत्ता टिकवायला नाही. खासदार आदर्श पाहिजे तर कार्यकर्ता आणि मतदार ही तसाच हवा.

सिनेमा हा समाजाचा आरसा असतो असे म्हणतात आणि ते बरोबर पण आहेच.  एक सामान्य माणूस जे विचार करतो त्याचंच भांडवल सिनेमात केलं जातं. माझा खासदार कसा असावा ह्या सारख्या विषयांचं भांडवल करून नायक सारखे चित्रपट हिट झालेच की.
आजचा विषय हा सिनेमाचा नसला तरी त्याच्याशी खूप जवळीक साधणार आहे. नायक, सारखे सिनेमे हिट होतात कारण त्यात सुद्धा जनातेच्या मनातला नेता स्क्रीन वर असतो.
पण असा नायक मिळेल का? जरी मिळाला तर टिकेल का?
ह्या शंका आहेतच....
=======================

शिरीष उमरे, यवतमाळ.

आम्ही पृथ्वीतलावर अवतरण्यापुर्वीच भारत स्वतंत्र झाला होता. देश चीनसोबत युध्द हारुन पाकीस्तानसोबत जिंकला होता. आम्हाला कळायला लागेपर्यंत नेहरु शास्त्री नंदा हे पंतप्रधान होउन गेले होते. यांच्यानंतरच्या पंतप्रधान इंदीरा गांधीनी बांगलादेश निर्मीती करुन दीड वर्षे आणीबाणी ची हुकुमशाही राबवुन टाकली होती.
 आम्ही दुसरीत शिकत असतांना गाय वासरु चे बिल्ले गोळा करत असु तेंव्हा एवढेच कळाले की आता मोरारजी पंतप्रधान आहेत. जन संघाने कात टाकुन जनता पार्टीच्या रुपाने पुढील तीन वर्षे सत्ता गाजवली.
मग आला पंजा !! परत इंदीरा आल्या पण लगेच चार वर्षानी त्यांची हत्या झाली व त्यांची जागा राजीवने घेतली. त्याचवेळेस भाजपा चा उगम झाला.  १९८४!

 तोपर्यंत आम्हाला खासदार म्हणजे दील्लीत राहणारा खास माणुस जो कधीमधी आपल्या जिल्ह्यात येतो असेच वाटायचे. पण कलेक्टर पेक्षा मोठा व पंतप्रधानाचा खास मानुस असा दरारा वाटायचा.

आता देशावरुन डायरेक्ट येऊ या आमची कांस्टीट्युएंसी म्हणजे यवतमाळ !! कुणबी समाजाचा  आणि आदिवासी समाजाचा !! १९५२ मध्यप्रदेश १९५७ बॉम्बे स्टेट १९६२ महाराष्ट्र असा बदल होत गेला पण कांग्रेस आणि कुणबी खासदार हे कायम राहीले १९९६ पर्यंत.

१९९१ ला राजीवची हत्या व आम्ही आमचे पहीले मत टाकले कांग्रेस ला भावनेच्या भरात... नरसिंहराव पंतप्राधान झाले.
१९९६ ला माहीत पडले की खासदार कश्यासाठी निवडायचा असतो. भ्रष्टाचारी व निष्क्रीय लोक नुसती पक्षश्रेष्ठी निष्ठा व जात ह्या निकषावर आपल्यावर उमेदवार म्हणुन लादली जातात. त्याला विरोध म्हणुन भाजपाच्या नविन उमेदवाराला वोट दिले आणि नेमका भाजपाचा (कुणबी) खासदार निवडुन आला पण दोनच वर्षांनी इलेक्शन झाले ... दरवर्षी नविन पंतप्रधान असा घोळ दील्लीला आणि आमच्या मतदारसंघात परत कांग्रेस व कुणबी हे भ्रष्ट निष्क्रीय लोकनेतृत्व पक्षश्रेष्ठी लादत राहीले. विकासाच्या नावाने बोंब !!  आम्ही नवनेतृत्व म्हणुन एकदा जनता दलाच्या उमेदवाराला व एकदा वोट क्रॉस (रद्द) करुन आलो होतो.

शेवटी २००४ ला दील्लीत अटजींचे कमळ उगवले एनडीएच्या मदतीने. त्यावेळेसही आमच्याकडे कांकु च होत्या. (कांग्रेस+कुणबी)!!
तोपर्यंत अडवानी १९९० रथयात्रा १९९१ बाबरी मस्जीद प्रकरण तापवुन उत्तर भारतीयांत भाजपा रुजवत होते. २००२ मधे कारसेवक गोदरा प्रकरणातुन झालेली दंगलीचे पडसाद २००४ मधे भाजपा व एनडीए च्या पराभवात झाली. नेमका त्यावेळी आमचा मतदारसंघ भाजपाच्या बिगर कुणबी  अर्थात बंजारा आदिवासी समाजाच्या खासदार उमेदवाराला निवडुन देत होता...  !! आम्ही अर्थात नोटाचे बटन दाबुन आलो होतो.

मग आली आर्थिक सुधारणा व मुक्त व्यापाराची लाट !! युपीए च्या मदतीने मनमोहन सिंग दोन वेळा पंतप्रधान २००४-१४... नेमका ह्यावेळेस आमचा मतदारसंघ फेररचनेत अडकला व आता तो यवतमाळ वाशिम मतदारसंघ झाला. नवयुवा व महीला उमेदवार त्यामुळे शिवसेनेला वोट देउन मोकळा झालो. निवडुन ही आली. पण जिल्ह्याचा विकास काही झाला नाही. ज्यात पैसै खाता येतो तेच प्रोजेक्ट राबवल्या जातात हे लक्षात आले.

मग २०१२ नंतर लोकपाल आंदोलन व महीला बलात्कार ह्यामुळे देश घुसळुन निघाला. सोशल मिडीयाचा  वापर ही त्यावेळेसची उल्लेखनिय बाब होती. ह्यावेळेस दील्लीत आम आदमी पार्टी चा उगम झाला.
२०१४ ला अनपेक्षीतरित्या मोदीच्या नेतृत्वाखाली एनडीए व भाजपाने अभुतपुर्व यश मिळवले. ह्यात कांग्रेसच्या काळातील भ्रष्टाचाराची प्रकरणे कारणीभुत ठरली. ह्यावेळेस मात्र आम्ही नोटा न दाबता व शिवसेनाकडुन भ्रमनिरास झाल्याने एका नविन सुशिक्षीत स्वच्छ प्रतीमेचा नवयुवकाला मत देऊन आलो, तो निवडुन येणार नाही हे माहीत असतांना सुध्दा...
आता परत ११ तारखेला मताचा हक्क व जबाबदारी निभवायची आहे. परिक्षा असल्या सारखा पुर्ण अभ्यास केला. राजकीय पक्षांचे जाहीरनामे वाचलेत. त्याचा जगावर, देशावर व माझ्या मतदारसंघात काय फरक पडु शकतो ह्याचा अंदाज घेतला. मिडीयावरील खरेखुरे सर्वे व अनॅलिसीस रिपोर्ट वाचलेत. जगाच्या, माझ्या देशाच्या व मतदारसंघाच्या समस्यांचा आढावा घेतला. एका आठवड्यापुर्वी निवडणुकीला उभे असलेल्या २४ उमेदवारांची पुर्ण माहीती घेतली. ह्यातले पाडापाडीचे राजकारण, आर्थिक राजकारण, जातीचे राजकारण, युती, आघाडी, गठबंधन वैगेरे गणीते समजावुन घेतली. सरतेशेवटी आज निर्णय घेतोय की नोटाची बटन दाबुन येणार !!

 शेवटी मनातली इच्छा बोलुन दाखवतोय की लोकांच्या मेन व मुळ समस्या वर उत्कृष्ट समाधान देणाऱ्या दील्ली राज्य सरकारासारखे सरकार व योग्य सुशिक्षीत स्वच्छ प्रतिमेचे खासदार २०१९ ला लाभावे.
तुम्ही काय करणार ? तुमच्या मतदारसंघाबद्दल चार ओळी लिहा की !!
========================



दिपाली वडणेरे, नाशिक.


विषय तसा तर लिहायला खरचं गंभीर  आहे पण सद्यपरिस्थिती पाहता लिहीणेही गरजेचे वाटले...
कसा असावा माझा खासदार....? माझा खासदार सुशिक्षित ,  सामंजस , हूशार , सर्वांना गरजेच्या वेळी  मदत करणारा , प्रामाणिक,  मदतीसाठी नेहमीच तत्पर  असणारा, मदत करताना  लहान - मोठे ,  गरीब - श्रीमंत  असा भेद करणारा , कामाची लाज  बाळगणारा  तर नकोच पण महत्वाचे म्हणजे आपले काम हे साहेब करतील अशी मदतीची  अपेक्षा मनात घेऊन आलेले गोर-गरीब यांच्या समस्या नेमकी काय आहेत ?  हे जाणून घेताना ,  समोरच्या  व्यक्तीशी  नम्रतेने वागणारा, त्याच्या समस्यांवर  काहीतरी उपाय करून नक्कीच विकास करण्यास स्वतः  प्रयत्न करणारा असावा.... फक्त  आश्वासनच न देता प्रत्यक्ष  कृती करणारा असावा आणि मुख्य  म्हणजे  मत मागत असताना आपण काय आश्वासने  दिलेली आहेत याची जाणीव ठेऊन , हा माणूस ना नक्कीच  विकास घडवेल अशी अपेक्षा  मनात बाळगून आपल्या वर विश्वास  ठेऊन मतदारांनी आपल्याला  निवडून दिलेय तर मग आपणही  त्या  विश्वासाला  योग्य  प्रकारे उतरू याची जाणिव ठेऊनच काम करणारा असावा ...थोडक्यात जाणिव ही शेवटपर्यंत  असणे गरजेचे आहे  जाणीव असली की माणूस जबाबदारीने, आणि लक्षपूर्वक  काम करतोच....

सद्यस्थितीत सांगायचीच झाली तर आपणा सर्वांनाही माहीतीच आहे की काय आहे ती आणि तीच्या विषयी जास्त  बोलणेही  योग्य  ठरणार नाही हो पण एक मात्र नक्की सांगेन आचारसंहिता चालू आहे आणि त्यातच सर्वजण    सोशल मीडियाला  जास्त  प्राधान्य देऊन प्रचार  करताय...यामध्ये आपल्यासारखी तरूण मंडळीच जास्त आहेत हे कुठेतरी आपणच विचार करायला हवा की खरच नेमकी काय करतोय ? हे करण योग्य  आहे  की अयोग्य?  आणि यातुन आपल्याला  काय निष्पन्न  होणार आहे....? हे खूप महत्वाचे  आहे. ...

शेवटी प्रत्येकाचे विचार वेगवेगळे  आहेत पण मतदानाचा  अधिकार मात्र  सर्वांना  समान आहे तो आपला अधिकार आहे आपले अमूल्य  मत वाया जाऊ देऊ नका... आणि कोणी विकत घेण्याचा  प्रयत्न  करत असेल तर थांबवण्याचा प्रयत्न  करा आणि वेळीच सावध व्हा..... शेवटी आपल्याच भविष्याचा प्रश्न  आहे नंतर पश्चात्ताप  करण्यापेक्षा  आत्ताच आपले हीत कशात आहे हे ओळखा.... तात्पुरत्या भूलथापांना  बळी पडण्यापेक्षा भविष्याचा विचार करूनच योग्य  व्यक्तिला  मतदान करा..
=======================
टीप-(वरील सर्व प्रतिमा इंटरनेट वरून घेतल्या आहेत)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************