🌱वि४🌿व्हॉट्सअप ग्रुप
📄 *आठवडा 7⃣4⃣वा* 📝
🖊🖋✒🖌🖍✏🖋✒✍📖
जातीच्या राजकारणाचे परिणाम
शिरीष उमरे यवतमाळ
ही जात आली कुठुन हे माहीत नाही पण दोन हजार वर्षीपुर्वी व्यक्तीला त्याच्या व्यवसाय व गावावरुन ओळखल्या जायचे. त्याचा काही धुर्त लोकांनी गैरफायदा घेत मानवीय उतरंड तयार केली व मानवी हक्क हीरावुन घ्यायला सुरुवात केली. एकदुसऱ्यात गैरसमज निर्माण करुन राग व द्वेषाची बीजे पेरली. सत्तेसाठी कुठल्याही थरावर जाणारी ही लोके म्हणजे आजकालच्या भ्रष्टाचारी गुन्हेगार राजकारण्यांची पुर्वजे....जातीच्या अयोग्य व्यक्तीला मत देणे म्हणजे स्वत:ला समाजात असुरक्षित वाटणे होय !! सरकार कींवा राजकीय पक्ष नागरिकांमधे ही असुरक्षितता वाढवुन स्वत:च्या स्वार्थाच्या भाकऱ्या द्वेषाच्या व रागाच्या आगीत शेकुन घेत आहेत.
एक नागरिक म्हणुन कवडीची कीमंत नाही आहे व्यक्तीला. पैसा व बाहुबल ह्याच्या जोरावर बहुसंख्यंकाना जातपात धर्मामधे गुंतवुन भांडणे लावुन ही गिधाडे मजा घेतात ह्या खेळाची...
एक इतर धर्मिय वा दुसऱ्या जातीचा चांगला उमेदवार निवडुन दिला तर विकास होइल की एक गुन्हेगार, भ्रष्ट स्वजातीचा व्यक्ती विकास घडवेल ??
एकदुसऱ्यावरचा विश्वास का व कोणामुळे उडाला हे जाणुन घेणे गरजेचे आहे. एक देश म्हणुन विकास करायचा असेल ल संविधानानुसार स्वच्छ राज्यकारभार चालावा असे वाटत असेल तर चांगला स्वच्छ प्रतिमेचा सुशिक्षीत चारीत्रवान युवक राजकारणात निवडुन द्या. जात पाहुन चुकीच्या व्यक्तीला मत दिल्यास स्वत:च्या पायावर धोंडा मारुन घ्याल.
शिवाजी महाराजांनी स्वराज्य मिळवुन दिले. त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी लोकशाहीत आपल्या सगळ्यांची आहे. विचार करुन मत द्या.
*=============================*
वाल्मीक फड निफाड,नाशिक.
जातीय राजकारणाचे अनेक तोटे आपण भोगत आलो आहोत.त्यामुळे आपण नेमके जो लायक उमेदवार असेल त्याला टाळून जात पाहून मतदान करत असतो.प्रसंगी त्या उमेदवाराला कोणत्याही प्रकारची राजकारणाबद्दल काहीही माहीत नसते,परंतु एक जातवाला म्हणून आपण त्याला मतदान करत असतो.मला वाटतं आपण हे जर कायम करत राहिलो तर लवकरच आपला देश माघारी जायला वेळ लागणार नाही.जात म्हणून आपण एखाद्या मुर्ख माणूस किंवा एखादा गुंड माणूस निवडून दिला तर त्याचा परिणाम निच्छितच आपल्यावर म्हणजे पर्यायाने आपल्या देशातील व राज्यातील राजकारणावर होऊ शकतो.अनेक प्रकारच्या विकास कामे तसेच योग्य निर्णय न घेतल्यामुळे आपलेच नुकसान जास्त होणार आहे.
म्हणून जवळजवळ सर्वच मतदार बंधु आणी बघीनींना माझे विनम्र आवाहन आहे कि कोणत्याही प्रकारच्या जातीय प्रलोभन कींवा आर्थिक प्रलोभनाला बळी न पडता आपल्या उमेदवाराचे अपराधीक रेकाॕर्ड तपासून त्याचे शिक्षण त्याची समाजाशी असलेली वागणूक आणी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्याचे चरीञ.
काय आहे की एखाद्या पोपटासारखा बोलणारा असला की आपण त्याला भुलतो आणी मतदान करुन मोकळे होतो पण आपलीच अधोगती आपण करुन घेतो.म्हणून आता भुलथापा मारणारा,चरीञहीन असलेला,अशिक्षित असलेला,जाती धर्माच्या नावाने मतदान मागणारा एकही उमेदवार निवडून येता कामा नये.देशाच्या संंविधानाला न माननारा देशाविरुद्ध बोलणारा तसेच सत्तेवर येण्यासाठी देशाला तुच्छ समजून आमूक एका जातीला प्राधान्य देऊन इतर जातिंची धर्माची पायमल्ली करणारा उमेदवार नसावा.
शेवट एकच विणवणी एक योग्य उमेदवार निवडावा नाहीतर सरळ NOTA दाबून आपलं मत व्यक्त करावं.
*=============================*
गणेश नारायणराव फाळके,कामशेत. पुणे.
कसंय मंडळी..राजकारणातच काय..कुठंही जातीभेद नसावा..सर्वसमावेशक राजकारण असावं या हेतूनं राजकारणात विविध जाती जमातीतल्या शिकल्या सवरलेल्या मंडळींना प्रगतीच्या वाटा खुल्या झाल्या..पण याचा फायदा होण्याऐवजी तोटाच जास्त होतोय असं चित्र सध्या तरी दिसतय.
ग्रामीण भागातील राजकीय क्षेत्रात सरपंच,उपसरपंच,सदस्य,
झेडपी सदस्य, सभापती, उपसभापती अशा अनेक जागांवर उमेदवार उभा करताना
जात बघीतली जाते..
बघूद्यात.. पण ही सगळीच मंडळी हुशार,राजकारणात तरबेज असतात असं नसतय..
फक्त जात बघून उमेदवार उभा असतोय.. त्या पदाचं ज्ञान कमी असतय.. मग अशावेळी आजूबाजूला मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारी मंडळी आपापला फायदा करुन घेतात.. विधायक कामं बाजूला राहतात..लबाडी,भ्रष्टाचार आणि जातीचे राजकारण केलं जातं.. सामान्य माणसाला फुकटचा मनस्ताप होतो..
राजकीय क्षेत्रात जातीवाद नसावा असं म्हणनं नाही..कारण सर्व क्षेत्रात संविधानानं प्रत्येकाला अधिकार दिलाय..कुणी कुठल्याही जातीत वा धर्मात जन्माला येवो..त्याला सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्याची मुभा आहे..तशी ती राजकीय क्षेत्रातही आहेच..पण किमान तो माणूस लायक असावा.. त्याला सामाजिक व राजकीय जाण व भान असावं..म्हणजे झालं.
*=============================*
जगताप रामकिशन शारदा,बीड
जातीच्या राजकारणाचे दुष्परिणाम असतात ते फक्त परिणाम नसतात. मग ते विविधांगी असतात. सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक ही. प्रत्येकाने आप आपली जात जपली पाहिजे कारण त्याला सांस्कृतिक, सामाजिक विविधतेची किनार असते पण सध्याच्या परिस्थितीत जात ही दुधारी तलवारी सारखी वापरली जात आहे. माणूस नावाची जात तर कधीच हद्दपार झाली असून विविध प्रकारच्या आणि सोयीस्कर जाती जन्माला आलेल्या आहेत. सर्वधर्मसमभाव समजावून घेतानाही इतर जातींना कस प्राधान्य किंवा स्वजातीला कस दुर्लक्षित केले जाते पटवून सांगताना जी उदाहरण दिली जातात तिथून खर जातीच गलिच्छ राजकारण चालू होते. पुढे चालून गेल्यावर लक्षात येते की जातीच्या नावाने रंग विभागून घेतलेले आहेत आणि जातीच्या नावावरून फळांची पण विभागणी माणसान केली आहे. आपला सुधारणेचा अजेंडा का सपशेल अपयशी ठरला किंवा आपण समाजासाठी का योगदान देऊ शकलो नाही याची प्रांजळ कबुली देण्यापेक्षा आपण काही विशिष्ट जातीत असल्यामुळे डावलले गेलो हा मुद्दा प्रखर आणि ठळकपणे मांडला जातो. विविध मतदार संघातील उमेदवार जाहीर करतानाही जातीय समिकरणे जुळतात का? याचा आढावा घेतला जातो. आणि मतदारही जात नावाच्या अफुच्या नशेत उमेदवार किती पात्रतेचा आहे हे न पाहता त्याला डोळेझाकून मत देतात. कितीही पुरोगामी विचारांचा दाखला दिला तरीही सुरवात करायला नेहमीच इतरांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा तळागाळापर्यंत रूजलेली आहे. निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जात धर्माच्या नावावर मत मागितली जाऊ नये यासाठी प्रयत्नशील असतानादेखील सत्ता काळात किंवा विरोधी पक्षाच्या कार्यपद्धतीत कसा कोणाकोणावर अन्याय झाला किंवा कसा फक्त विशिष्ट वर्गाला फायदा झाला याचे उदाहरण देऊन देऊन जनतेच्या मनावर जात बिंबवली जाते. जाती निर्मूलन साठी प्रयत्न केले जात नाहीत अशातला भाग नाही पण ते कितपत यशस्वी होताहेत हे परिक्षण कोणीही करत नाही. अलिकडील गोष्ट आहे भिमा कोरेगाव चा जो हिंसाचार झाला त्यावेळी सोशलमेडियावर एका लहान मुलाचा हातात दगड घेतलेला व्हिडिओ व्हारल झाला ज्याला अजून लेखणी कशी धरावी याच ज्ञान नसाव पण तो इतर जातींच्या लोकांबद्दल ज्या तिरस्कार भावनेने बोलत होता ती तिरस्काराची भावना नक्कीच विचार करायला लावून शर्मेने मान खाली घालायला लावणारी होती. जात कधीपर्यंत टिकेल माहिती नाही पण जो पर्यंत राजकारण राहील तोपर्यंत जात नावाचा बागुलबुवा समाजामध्ये राहणार कारण जात हे असे बटण आहे की ते दाबले कि लोकांना दोन वेळच्या जेवणाचाही विसर पडतो आणि ते जातीच्या भल्यासाठी समोर येतात, समाजाच्या नाही. महापुरुषांच्या नावाखाली पण जातीचा जोगवा फिरवून मत मागायला ही राजकारणी कमी करत नाहीत. लाजीरवाणी बाब ही आहे की सोशलमेडियावर फिरणारे भडकावू मेसेज वाचून तरुणपिढी आपल मत बनवत आहे आणि राजकीय नेते पण समाजासाठी महापुरुषांच्या असणाऱ्या विचारात सोयीस्कर तफावत असंदर्भीय माहिती देऊन आपली पोळी भाजत आहेत. कितीही विद्रोह झाला तरीही जात नावाची किड पुन्हा रूजवण्याच आणि तिला खतपाणी घालण्याच काम राजकारणी करतच आहेत. मग जिथे विठ्ठलाच्या वारीचा झेंडा घेणारा हातात फक्त दांडा घेऊन फोडत राहतो इतरांचे माथे आणि आख्ख्य कुटुंब जे त्याच्या उपजिविकेवर चालते ते टाहो फोडत असते. घरातील सदस्य आपल लेकरू अस करणारच नाही अस ठामपणे सांगत राहत पण त्यांना काय माहिती की ते लेकरु कोणत्यातरी साहेबांच्या आदेशानुसार काम करणार सांगकाम्या बनल असून घरात वाट पाहणाऱ्या लोकांपेक्षाही त्याला साहेब आपला वाटू लागला आहे कारण तो अमक्या जातीचा आहे.*============================*
मुकुंद शिंदे
जोपर्यंत निळ्या विरुद्ध भगवा न भगव्या विरुद्ध हिरवा याच्या पलीकडे आपण जाणार नाहीत तोपर्यंत तिरंगा आपल्याला कळणार च नाही,आणि यानेच फावताय राजकारण.राजकारण हा शब्द नवा नाही पण आज काल "राज" करायचं कारण च समजून घेतलं नाही आणि यात येत ते जातीचे राजकारण आरक्षण,थोर पुरुषांचे पुतळे,त्यांच्या जयंत्या आणखी खूप कारण हे यांना जातीचे राजकारण करायला पुरेसे पडतात.कोणता मुद्धा तापला असला की तो किती तापवायचा हे राजकारणी ठरवतात आणि आणि आपण फक्त हातात वेगवेगळे झेंडे घेऊन भिडतोय एकमेकाला.एका टोकाला एखाद्या जातीच्या माणसाला काय झालं की दुसऱ्या टोकापर्यंत ती आग पसरत जाते यात होरपळतात ती सामान्य जन आनि यावर पोळी भाजतात ते राजकारणी.जेव्हा मुंबई बॉम्बस्फोट झाले तेव्हा भारतामध्ये एकूण वातावरण खूप बिघडलं होत,पुण्यात त्यावेळी सवाई गंधर्व कार्यक्रम घ्यायचा का नाही त्याचा विचार चालला होता आणि पहिली जुगलबंदी होती झाकीर हुसेन यांची पण,कार्यक्रमात जेव्हा झाकीर हुसेन म्हणाले की मी जो तबला वाजवतो तो माँ सरस्वती की देणं हे तितच जात संपली.आपण जर एकमेकांच्या जातींचा आदर केला तर राजकारणाचा प्रश्न च उरणार नाही.
जातीचा अभिमान असावा पण अहंकार नसावा तरच भारत खऱ्या अर्थाने सर्वधर्मसमभाव होईल नुसता कागदावरचा समभाव मनामना मध्ये रुजला पाहिजे.
*=============================*
आकाश थिटे, उपळाई (खुर्द ).
आपला भारत देश हा लोकशाही असलेला देश आहे. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेले सरकार होय . आपल्या देशात लोकसभा व राज्यसभा यांमार्फत राजकीय पक्ष, राजकीय नेते संघराज्य पद्धतीने शासन चालवले जात आहे.राजकारण हे देशाच्या विकासासाठी, देशातील जनतेसाठी, व्हायला पाहिज, परंतु आजच्या राजकारणाचे स्वरूप खूपच बदलून गेले आहे. आजचे राजकारण हे जातीयता, धर्म, भ्रष्टाचार, अशा मुद्यावर चालते. याचे जे काही परिणाम होतात ते पुढीलप्रमाणे आहेत;
ज्या वेळेस जातीचे राजकारण होते तेव्हा होणारे परिणाम हे देशाच्या विकासासाठी मारक ठरतात. यामुळे देशाची प्रगती खुंटली जाते.देशाची प्रगती खुंटणे म्हणजे देशातील प्रत्येक नागरिकांची प्रगती थांबणे असे आहे. याचा प्रत्येकाने विचार करायला हवा.
जातीच्या राजकारणाने जाती-जातीत तेढ निर्माण होऊन नंतर त्याचे रूपांतर दंगल,हल्ले, यात होऊन मोठी हानी होते. यामध्ये जास्तीत जास्त होणारा त्रास हा सर्व सामान्य जनतेलाच सोसावा लागतो. याविरुद्ध जनतेने आवाज उठवला पाहिजे व लोकशाही च्या माध्यमातून अशा राजकारणारण्यांना धडा शिकवला पाहिजे.
राजकारणात कोणीही कुणाचा कायमचा मित्रही नसतो व शत्रूही नसतो. याचा वापर करूनही जातीचे राजकारण केले जाते. राजकारणी लोक आपल्या विरोधीपक्ष यांवर टीका टिप्पणी करून आपली बाजू योग्य आहे हे जनतेला दाखवून देण्याचा प्रयत्न करतात. अशा गोष्टींचा उपयोग करून त्यांना कसेबसे सत्ता मिळवाची असते. त्यांच्या खोट्या आश्वासनांना जनता फसते.
अशा जातीच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात आपल्या देशाच्या युवाशक्ती चा र्हास होतो. ही शक्ती देशाच्या विकासासाठीच्या कार्यात वापरता येते.
समाजात होणाऱ्या अशा जातीचे राजकारण, तसेच जातीविषयक काही गोष्टी जेव्हा लहान बालकांच्या कानी पडतात तेव्हा त्यांच्या मनात जातीबद्दल विचार येतात आणि जेव्हा हीच बालके मोठी होऊन देशाचे नागरिक होतात तेव्हा यांच्या कडून जातीच्या राजकारणाला हातभार लागला जातो. तर यावरून असे वाटते की आज असे जातीचे राजकारण करणारे राजकारणी लोक आपल्या देशाच्या पुढच्या काही पिढ्यानपिढ्या या जातीयतीच्या संघर्षा खाईत ढकलून देण्याचे काम करत आहेत.
आणि या सर्व गोष्टींत आपल्याला व कोणालाही काहीच साध्य होत नाही परंतु प्रत्येकाचा बहुमोलाचा, परत न येणारा, विकतही न मिळणारा वेळ मात्र नक्की वाया जातो.
समाजातील लोक शिकले, सुशिक्षित झाले तरीही "जात" या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जाते.सर्वांनी याचा विचार करायला हवा.
सर्व जाती नष्ट करून "मानव- माणूस "हीच एक जात मानली पाहिजे.
*=============================*
*Image source INTERNET*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा