माझी शाळा आणि बालपणीच्या सुखद आठवणी (भाग:-2)

🌱 वि४🌿 व्हॉट्सअप ग्रुप
📄 आठवडा 21वा 📝
24 मार्च ते 30 मार्च 2018

माझी शाळा आणि बालपणीच्या सुखद आठवणी (भाग:-2)

(नरेश बदनाळे,लातूर.सागर राडे,सांगली.अनिल गोडबोले,सोलापूर,वैशाली साविञीगोरख,पंढरपूर.जयंत जाधव,लातूर.
सोमनाथ आदमिले,पंढरपूर.प्रविण भिकले,मुंबई .ज्ञानेश्वर टिंगरे,उस्मानाबाद.
सिद्धेश्वर गाडे, सोलापूर.सौदागर काळे, पंढरपूर यांच्या शाळेच्या आठवणी कशा वाटल्या,नक्की कळवा खालील कमेंट बॉक्स मध्ये.)
(यातील सर्व प्रातिनिधिक छायाचित्रे इंटरनेटवरून घेतली आहेत)

अनिल गोडबोले,सोलापूर
हा विषय लिहिण्यासाठी वेगळे शब्द जुळवायची गरजच नाही. माझी प्राथमिक शाळा माझ्या गावातली एक प्राथमिक शाळा..माझा गाव हा वेंगुर्ला तालुक्यातील एक गाव.. नाव..  'पाल' ...
आम्ही म्हणजे आई वडील आणि मी पहिल्यांदा मुंबईला होतो. काही कारणांनी वडिलांनी कोकणात गावी जाऊन राहण्याचा निर्णय घेतला.. आणि आम्ही सगळे कोकणातल्या गावात आलो. गाव अतिशय दुर्गम (अजूनही दुर्गमच आहे) त्यामुळे त्यावेळी गावाच्या बहिउन सगळ्या गोष्टी आणाव्या लागत. पण सुदैवाने गावात शाळा होती. मी 5 वर्षाचा असल्यामुळे मला पहिली मध्ये बसवून घेतलं होतं.


मला शाळेत जायलाच आवडायचं कारण घरी कोणी खेळायला नसायचं त्यामुले शाळेत जास्त मन रमायचे. बर शाळेत जायचं म्हणजे आतासारखा खर्च नव्हता. कापडी पिशवी , एक पाटी पेन्सिल आणि (मिळालंच) तर एक पुस्तक..,शर्ट आणि हाफ पॅन्ट, एवढं मटेरील खूप झालं.
चप्पल वापरायची हॊस पाचवीत पूर्ण झाली. तस मला चप्पल असायची पण ती घातली पाहिजे आणि गेलं पाहिजे असा काही नियम नव्हता.

मुळात हुशार(आताच्या वागण्यावर जाऊ नका.. तेव्हा मला हुशार समजत) असल्यामुळे जरा गुरुजी आणि बाई शक्यतो मारत नसत. मी मॉनिटर पण असे कधी कधी.. पण गोंधळ घळणार्याला जर मॉनिटर केला तर जास्त दिवस टिकत नाही. त्यामुळे मारामारी न करता घरी गेला की चुकल्या चुकल्या सारख वाटायचं.

शाळेला शेणाने सारवण्याची खोल्या होत्या त्यामुळे आम्ही दर शनिवारी शेण आणायला जात असू. कोकणात जर जमिनी शेणाने नाही सारवल्या तर खराब होतात.. त्यामुळे मुलांनी शेण आणून द्यायचं आणि मुलींनी सारवायच असा नियम होता. प्रत्येक वर्गातल्या मुली आणि मुलांनी हे करायचंच..

पण ते शेण आणायला जाताना कोणाच्या काकड्या (कोकणी भाषेत 'तवशी' म्हणतात) पेरू, चिंचा, आवळे असे बरेच उद्योग असायचे.
मग त्यातून तक्रारी जात होत्या. मार खायची पण एक सिस्टम होती.. म्हणजे पहिल्यांदा तक्रार व्हायची म्हणून समोर जे शिक्षक असतील ते मारायचे.. मग प्रकरण वर्ग शिक्षकाकडे 'वर्ग' केलं जायचं.. ते हात धुवून घ्यायचे... त्या नंतर मुख्याध्यापक ... तो पर्यंत घरी तक्रार पोहोचवायची सोय केलेली असायची..
घरी पहिल्यांदा आई आणि मग बाबा.. हा क्रम चुकत नसे.. पण एवढे जण मिळून मारलेला विद्यार्थी.. दुसऱ्या दिवशी ऐटीत शाळेत(कशाची अजूनही कळलं नाही) पण बिल माझ्यावर फाटत होत एवढं नक्की..

बाकी पेन तोडणे, शाई उडवणे, पॅडने मारणे, कपडे घाण करणे ही दिनचर्या होती. अभ्यास करत नसलो कधी कधी घरी 'एक्स्ट्रा धुण्याचा' कार्यक्रम बाबा करायचे.

भाषण मात्र कधी।सोडलं नाही.. शाळेत किंवा हायस्कूल मध्ये प्रत्येक भाषण स्पर्धेला आवर्जून असायचो(म्हणूनच बहुतेक मास्तर झालो) महात्मा गांधी, लोकमान्य टिळक आणि बरेच महापुरुष.. गुरुजींनी लिहून दिले की स्टेज वर बोलायचो.

शाळेतल्या मंत्री मंडळात असताना "स्वच्छता मंत्री" होतो तेव्ह एकाला 'गुटखा' खाताना पकडला व त्याला शाळेत ओढून नेताना.. त्याचा हात मोडला माझ्याकडून.. तर मी सात दिवस मार आणि शिव्या खाल्या होत्या..

तर माझ्या डोक्यावर दगड बसल्यामुळे माझ्या डोक्यातून रक्त येत असून देखील मीच शिव्या खाल्या अस काही आठवत आहे(लहान पणा पासून अन्याय होत आहे😉)

स्कॉलरशिप परीक्षा दिल्या पास झालो नाही हा भाग वेगळा.
भीती मात्र खूप वाटायची.. अंधाराची.. कोकणातल्या गोष्टी, मी पाचवी ला असताना लाईट अली घरात. सातवीला असताना पहिल्यांदा एस टी अली गावात. (विमान बघायला पळतात ना.. तस पहिली एस टी बघायला पळत गेलो होतो)

भीती एकटेपणाची वाटायची(अजूनही वाटते) त्यामुळे रविवार नको असायचा..

एकदा खरुताईला मारून एकाने त्याची शेपटी मला आणुन दिली. ती माझ्याकडून हरवली म्हणून खूप भांडण झाले. तेव्हा सगळ्यांनी बोलणं सोडल्यामुळे खूप वाईट वाटलं होतं. कधी कधी पालकांना शाळेत बोलावाव लागायचं.. मग जॅम वाट लागायची..

पण सगळे मित्र आणि मैत्रिणी अजूनही भेटलो की खूप जवळचे वाटतो. मी चंचल होतो त्यामुळे एका जागी न बसल्यामुळे बराच भाग हा खोड्या काढण्यात गेला.

तर असो.. आठवणींच्या मुंग्या एकदा वरुळातून निघाल्या की किती निघतील सांगता येत नाही.. पण मला बेस्ट वाटतात ते दिवस

शाळेची घंटा, शाळेतील वाढदिवस, शाळेतले सत्कार, खेळ, मारामाऱ्या, मधल्या जवण्याच्या वेळात पटकन घरी जाऊन जेवण करून येणं.. अशा बऱ्याच गोष्टी आहेत.
आता शाळा बदलली आहे.. पण मुळंतली शाळा अजून आठवते,शाळेसमोरील 'दशावतारी नाटक' आणि शारदोत्सव मधील 'विविध गुणदर्शन' त्यामधील नाच.. आता माझ्या समोर घडतात अस वाटत आहेत..
थांबतो...
न विसरणारे दिवस, परिस्थितीच्या पलीकडे जाऊन आनंद मिळवणारे दिवस खूप आठवतात एवढं नक्की!!!!
सौदागर काळे,पंढरपूर
या विषयावर खुपजण लिहीत आहेत.आपली सुद्धा एखादी आठवण सांगून मन हलकं करावं असं वाटलं. पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली या गावात पहिली ते पाचवी पर्यंत मराठी शाळेत शिकलो. नंतर सहावी ते दहावी याच तालुक्यातील टाकळी(ल) या शाळेत शिक्षण घेतलं. विशेषतः मराठी शाळेच्या संबंधित माझे बालपण , लंगोटी मित्र यांच्या आठवणी खूप जोडल्या आहेत.खरंतर यावर वेगळं लिखाण होऊ शकतं. पण मी इथं माझ्या पहिलीच्या शाळा प्रवेशाची आठवण सांगेन.


लहानपणी मला शाळा नकोशी वाटायची. इतके की मास्तर लोक जे शाळेत येत नाहीत त्यांना पकडून आणण्यास पाठवत.त्यात मी पण असायचो.तेव्हा ओढत ओढत मला  शाळेत आणून बसवलं की त्यांना खूप मजा वाटायची. मी मात्र रडक्या चेहऱ्याने मधल्या सुट्टीची घरी पळून जाण्यासाठी पुन्हा वाट बघायचो.पकडून आणून बसवणं या कामातसुध्दा ती मुलं काही दिवसांनी कंटाळली. मी स्वतःहून तर शाळेत जात नव्हतोच .मग ते वर्ष असंच वाया गेलं. माझ्याबरोबरची पोरं पुढच्या वर्गात गेली.मी मात्र गावातून उनाडक्या करत हिंडायचो. कधी आमच्या शेताखाली असलेल्या मोठ्या ओढ्यातून फिरत बसायचो.सोबतीला माझ्यासारखे असायचे.हे सारं मनसोक्त होतं. हल्ली हेच चार भिंतीत मुलं शिकतात आणि मास्तर सुद्धा प्रथेप्रमाणे शिकवतात.

जी गोष्ट आपल्याकडे नसते त्याचे खूप कुतुहुल असतं.तसं माझं टीव्हीच्याबाबत खूप म्हणजे खूप होतं. तेव्हा टीव्ही म्हणजे श्रीमंतीचे लक्षण होते. गल्लीतील एका भावकीतील घरी टीव्ही होता.तिथं ते "आता घरी जा" असं दरडावून म्हणेपर्यंत त्यांच्या घरी शाळेला न जाता टीव्ही बघण्यासाठी पडीक असायचो.आमच्या गल्लीतील बहुतांश मुलं शाळेत जात. मी मात्र शाळेला जात नाही,हे साऱ्यांना कळलं होतं.मी जिथं जिथं जात तिथं तिथं शाळेत जात नाही म्हणून काहीजण मारत, खवळत. ज्यांच्या घरी टीव्ही बघण्यासाठी जात त्यांनी तर नंतर अटच घातली ,"तू शाळेला गेला तरच आमच्या घरी रोज संध्याकाळी ,रविवारी टीव्ही बघायला यायचं, नाहीतर इकडे फिरकायचं सुद्धा नाही"
माझ्या घरात यापूर्वी कोणीच शिकलेलं नव्हतं. सारे सरकारच्या,व्यवस्थेच्या दृष्टीने अडाणी.त्यामुळे साऱ्यांना काळजी मी तर शिकायला पाहिजे.मी तर शाळेत जात नव्हतो.  2000 साली माझ्याबरोबरची पोरं तिसरीच्या वर्गात जाणार होती. एके दिवशी वडिलांनी शाळेला जात नाही म्हणून वैतागून इतकं मारलं की,तोंडातून रक्त येईपर्यंत.मग काय....दुसऱ्या दिवशी मुकाट्याने वायरच्या पिशवीत(बाजाराच्या) पाटी-पेन्सिल टाकून पहिलीच्या वर्गात जाऊन बसलो. _पुढे कधीच शाळा न बुडवण्यासाठी...._ 🚶‍🚶‍🚶‍🚶‍

आठवणी तशाच ताज्या वाटतात आजपण.. फक्त आपण जुने होत चाललो आहे....

नरेश बदनाळे,लातूर
आयुष्याच्या प्रवासात आवडीचा वाटतो  तो टप्पा म्हणजे शाळेतील दिवस व बालपणीच्या कडु गोड आठवणी आणि त्याबद्दल लिहायच म्हटलं तर वेळ आणि शब्द अपुरे पडतील पण,खरच खुप हवे  हवेसे वाटतात ते दिवस ते प्रसंग.प्राथमिक शिक्षणाची सुरुवात झाली शिक्षणाचे माहेर घर असलेल्या  पुणे येथील  काळेवाडी परिसरातील जोतिबा मंदिरातील जोतिबा शाळा येथे आम्हाला राजे बाई नावच्या बाई होत्या त्यावेळेस बाई हा शब्द इतका प्रचलित नव्हता आम्ही बाईच म्हणायचो शाळेसमोरच घर होतं त्यामुळे शाळेला दांडी मारण्याचा तर प्रश्नच नव्हता शाळा आणि घर हा रोजचा उपक्रम होता. . बाई भरपूर अभ्यास द्यायच्या व तो पुर्ण करुन घ्यायच्या पण त्यांची शिक्षा करण्याची पद्धत खुप वेगळी आणि मजेशीर होती.जर कोणी अभ्यास करताना इकडे तिकडे पाहिलं तर त्याच्या मानेवर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे दप्तर ठेवुन लिहायला लावायच्या पण त्या तितक्याच प्रेमळ होत्या. तिथुन पुढे आम्ही शिक्षणाचे दुसरे माहेर घर म्हणुन आोळखल्या जाणाऱ्या लातूर जिल्ह्यातील अहमदपुर या तालुक्यात अहमदपुरला आलो तिथे पुढचे शिक्षण घेतले व तिथुन पुढे नवोदयला नंबर लागल्या मुळे जवाहर नवोदय विद्यालय लातूरला गेलो व तिथे जिवनाचा खरा अर्थ शिकलो त्या आठवणीं पद्य स्वरुपात वर्णन असे कि,


नवोदय चे जीवन फारच मजेशीर,
एक गोष्ट सांगतो गमतीशीर
नियम इथे पाचला उठा,
शिट्टीच्या दिशेने पळत सुटा
बाथरुम आणि बेसिनवर  
सगळीकडेच असतो नंबर
कसेतरी आटपुन घ्यावे
रस्त्याने चालत नाष्ट्याला गिळावे
पटकन assembly ground गाठावे
Mr. मांडवकर मध्येच भेटावे,
शुज नाही, चप्पल का घातली
सर, उंदराने ती खाऊन टाकली,
असेम्बलीत म्हणे डोळे मिटा
चिडवण्याला मिळतात मोकळ्या वाटा
दिसेल त्याची उडवुन टिंगल
असेम्बलीत करतात दंगलच दंगल
येवुन सारे क्लास मध्ये बसले
1st period लाच शिष्टाचारी रुसले
म्हणे रिपोर्ट बोलो भाई
3 sick  2 leave  1 Od
क्लास मध्ये बसला एकटाच भाई
बाकीचे कुठं माहितच नाहि
क्लासची ती गंमत न्यारी
धमाल करतात साऱ्याच पोरी
पोरांची टाँटिंग लइच भारी
काय रे ती, अशीच करते
उगीच एवढ डेंजर बघते  
थोडासा करुन इथं अभ्यास
साऱ्यांना लागतो जेवनाचा ध्यास
जेवनाची गंमत तर काय सांगावी
पहिल्या नंबरसाठी धावपळ उडावी
पोळी असते तर भाजी नसते
भात असतो तर वरण नसते
जेव्हा वरण भाताची पडते गाठ
खाल्लेले जिरुन पोट पुन्हा सपाट
हाउसमधील गप्पा काय सांगाव्यात
प्रत्येकाने कान देउन ऐकाव्यात  
हा असा तो तसा,ही अशी ती तशी
ती बाई मेली, तशाच तशी
कोणी मॅडमची नक्कल करतो
तोंड दाबुन हसत सुटतो
कसा तरी दिवस जातो
झोपताना मात्र अभ्यासाचा ध्यास लागतो
येथे असतात नियम काटेकोर
रागावणारे वाटतात हरामखोर
असे सारे असले तरी
कोण कुठले सारेजण
एकमेकांचे बनतात जिवलग
सगळ्यांचा जरी वॅाच असतो
शिस्तिला आम्ही आग लावतो
आनंदी असावे जीवन म्हणावे
पण प्रत्येकाचे भविष्य उजळावे
हेच आमचे भाग्य म्हणावे

अशा आठवणींनी जीवनाची जडण घडण झालीव जीवन बदलले आता फक्त गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी.

सागर राडे,सांगली
बालपण म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातला एक हळवा कोपरा. त्यातून शालेय जीवन म्हणजे तर विचारायलाच नको. अशा विषयावर लिहायची संधी दिलीत त्याबद्दल प्रथमतः सर्व ऍडमिन टीमचे आभार..
.
सांगली जिल्ह्यात कृष्णाकाठावर वसलेलं माझं गाव. गाव तसं मोठं. माझं अगदी बालवाडीपासून दहावीपर्यंतचं संपूर्ण शालेय शिक्षण गावातच झालं. त्यामुळं आठवणी तशा बऱ्याच आहेत. घरापासून अगदी जवळच आमची बालवाडी. अजूनही आठवतंय मी आणि माझी चुलत बहीण एकत्रच जायचो. आमच्यासाठी बालवाडीला असताना वर्गाच्या शेवटच्या कोपऱ्यात असलेली खेळणी ठेवायची लाकडी पेटी म्हणजे आमची वर्गात बसायची अगदी हक्काची जागा. मग तिथे कुणीही बसलेलं असू दे. आम्ही गेलं की ती जागा आमच्या बाई आम्हाला रिकामी करून द्यायच्या. पेटीतून खेळणी काढताना सुद्धा पहिला अधिकार आमचाच. आम्हाला जे पाहिजे ते आम्ही घेणार मग बाकीच्यांना. त्यावेळी बाईंनी शिकवलेली गीतं *एवढा मोठा भोपळा* असेल किंवा *नाच रे मोरा* असेल, आजही त्याच सुरात आठवतात. *एवढा मोठा भोपळा* शिकवताना साधारण भोपळ्याच्या आकारापासून हातवारे करत-करत तो भोपळा इतका मोठा होत असे की म्हातारी खरंच भोपळ्यात बसून लेकीकडे गेली असेल यावर विश्वास बसायचा..
.
पुढे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला वडिलांसोबत जाऊन शिक्षकांना नारळ अन् पान-सुपारी देऊन घेतलेला प्रवेश आणि तिथून पुढे चौथीपर्यंत आमच्या वर्गशिक्षिका असणाऱ्या गडदे बाईंनी केलेले संस्कार अजूनही आठवतात. बाईंचा मुलगा आणि मी आम्ही एकाच वर्गात. पण कधी तो त्यांचा मुलगा आहे म्हणून त्याला वेगळी वागणूक आणि आम्हाला वेगळी वागणूक असं वर्गात कधीच होत नसायचं. बाईंनी अगदी त्याच्याइतकाच जीव आम्हालाही लावला. बऱ्याच जणांना अप्रिय असणारा गणित विषय मला तिथे असतानाच अतिप्रिय वाटू लागला. इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकाने इतिहासाचीही गोडी लावली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेलं चित्र पाहून आणि ती घटना वाचून आम्हीही त्यावेळी फारसं काही कळत नसताना ब्लेडने स्वतःच्या अंगठ्याचे रक्त त्या चित्राला लावल्याची घटना आजही आठवल्याशिवाय राहत नाही. कशासाठी करतोय, काय करतोय काहीच माहीत नसतानाचं ते वागणं आणि त्यातला तो निरागसपणा अजूनही आठवतोय.

शाळेच्या पहिल्याच दिवशी पडणारा पाऊस हे तर त्यावेळेसचं हमखास चित्र असायचं. त्यावेळी छत्री, रेनकोट ह्या सगळ्या दुर्मिळ गोष्टी. एका हातात वायरीची पिशवी, त्या पिशवीतच पाटी-पेन्सिल, वह्या, पुस्तकं जे काही असेल ते भरलेलं असायचं. ती पिशवी एका हाताने पकडायची आणि दुसऱ्या हातानं पावसापासून बचाव करण्यासाठी खताचं एखादं रिकामं पोतं त्याची खोळ करून डोक्यावरून पाठीवर सोडायचं जे जवळ-जवळ गुडघ्यापर्यंत यायचं. खूप मस्त वाटायचा तो आपला त्यावेळचा राजेशाही थाट. दिवाळीच्या सुट्टीचा तर निराळाच थाट. परीक्षा संपायच्या आधीपासूनच कृष्णेकाठची लाल माती आणून त्यापासून किल्ला बनवायची तयारी चालू असायची. अर्थात लहान असताना आम्ही फक्त माती आणणे, आणि मागेल ते साहित्य देणे हेच काम करायचो आणि मोठी भावंडं, त्यांचे मित्र किल्ला बनवायचे. पण तरीही त्या मातीत खेळायला मिळाल्याचा आनंद निराळाच.
.
आता ते दिवस पुन्हा नाहीत भेटत. बदलत्या काळानुसार मित्र बदलले. शिक्षक बदलले. कधीतरी चुलत भावंडांच्यासाठी जातो शाळेत. मित्रांबरोबर एखाद्या कार्यक्रमाचं नियोजन करताना शाळेमध्ये जायला लागतं. तिथे गेल्यावर जाणवतं की गुरुजी जाऊन सर आले, बाईंच्या ठिकाणी मॅडम आल्या. आता इंग्रजी माध्यमाच्या शाळा आल्या. तिथे तर सर, मॅडम सगळं जाऊन टीचर आले. पण आमच्यावेळी असणारा बाई किंवा गुरुजी(गुर्जी) ह्या शब्दांमधला आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या नात्यांमधला आपलेपणा आता नाही भेटत.

वैशाली साविञीगोरख,पंढरपूर
नमस्कार 😊
पहिल्यादाच हसून घेते कारण माझ्या आठवणी सूखद आहेत की नाहीत हे मलाच कळल नाही आजपर्यत .आपली प्राथमिक शाळा म्हणजे आपल्या आयुष्याचा पाया असतो व हा आगोदरच डगमगलेला असेल तर संपूर्ण आयूष्यच डगमगतं ...तसच माझं झालं आहे संपूर्ण आयुष्याचं माहीत नाही पण जिथ पर्यत पोहचलेय तेथेपर्यत येण्यासाठी संघर्षच करावा लागलाय आणि मी आज टिमचंही आभार मानते की ह्या विषयामुळे परत लहानपणीच्या आठवणीत घेवून गेलात .शाळा जि.प.प्रा.शाळा चळे,पंढरपूर🏡

शाळेचा पहीला दिवस मोठ्या भावाच्या मागेमागे चाललेली पाठीवर वायरची पिशवी टाकलेली एवढच आठवतायं .नकाते नावाचे गुरुजी होते ते एवढे उंच होते की मान वर करुण करुण त्याच्याकडे बघाव लागायचं तेथेच मला माझी जिवलग मैञीण चिमी भेटली .रोज प्रार्थना व्हायची शाळे समोरच्या  मारुतीच्या मंदिरात पण मला तेव्हाही आणी आतापर्यतही कधी पसायदान मनायला आले नाही कधी मनावरच घेतलं नाही .नंतर आमची शाळा बदलून वरच्या चौकात आली तेथ आम्हाला नकाते गुरुजी जाउन त्याची बायको नकाते मॅडम शिकवापला आल्या .शिकवायला हा शब्द नूसता नावाला आहे आमच्या बाई आम्हाला घरुन विक्स आनायला लावायच्या दुपार पर्यत बाईही आणी आम्हीही एकडंतिकडं करायचो दुपारच जेवन झालं का बाई डोक्याला विक्स लावून घ्यायच्या मुलींकडून आणी खुशाल झोपायच्या आणी गंमत म्हणजे जी मुलगी विक्स रोज लावून देणार तिला 15 आॅगस्ट /26 जाने .डान्स करायला पुढच्या रांगेत उभं करायचं .4 थी पर्यत तर असचं चाललं धड माराठी पण वाचता येत नव्हतं आम्हाला . नुसतं शाळेत जायचं दंगा मस्ती करायची माघारी यायचं बसं..
पाचवीत हायस्कूल मधे गेले येथं डिव्हीजन असायच्या त्यामुळे माझी आणी चिमीची गट्टी तुटली मी" ए" मधे गेली चिमी "बी" मध्ये  अख्खा दिवस दोघींनी रडण्यात घालवला कारण जिवलग आम्ही घरा शेजारी राहणार्र पण काहीच पहिल्यासारख राहिलं नाही डिव्हीजन बदलली ती बदलली आमची घरं पण लांब लांब झाली आम्ही गावात रहायला आलो .येथे शिक्षक चांगली होती दंगा मस्ती चालूच होती रडतं खडतं शाळा चालु होती .नव्यानव्या मैञीणी . पण सातवी पासून खरी परीक्षा चालू झाली प्रत्येक शनिवारी आणी रविवारी आई शेतात कामाला घेवून चालली त्यामुळे शाळेला सूट्टी असूच नये असं व्हायचं आणी घरी काम असतं म्हनून शाळेची जास्त ओढ लागली आठवीपर्यत मस्तमजेत आईवडीलांच्या लाडात शाळा चालू होती .स्नेहसंमेलनाला तर वडील आवर्जून सांगायचे आत्ता ह्याा वेळेस ना लावणी घे तू आणी मी घेतलीही .भरभरुन प्रतिसाद द्यायचे घरचे ह्या गोष्टींनाही पण आठवीच्या उन्हाळसुट्टीत आई गेली व बालपण संपल आणी जगण्याची खरी लढाई चालू झाली .नातेवाईक मनायचे शाळा सोड लग्न करुयात तूझं पण मी आणी भाउ ठाम शाळा नाही सोडायची परत रानात रहायला गेलो परत रानातून 10/15 km शाळा स्वयंपाक ,बाकीची काम करुन बस पकडायची आणी मग शाळेत जाईचं 5 वाजता परत बसची कुठं वाट बघायची मनून चालतं घर घाटायचं कारणं आत्ता जबाबदार्रपण आल्या होत्या डोक्यावर त्यातचं  वाचनाची सवय लागली व पहिलं पुस्तक "महाश्वेता" हातात पडलं आत्ता शाळेपासून दूर जाईचं नाही ठरवूनच ठाकलं नववीच्या परीक्षा मस्त गेल्या दहावीचे उन्हाळ्याचे क्लास चालू झाले खूप जोशात आभ्यास चालू केला आणी मधूनच बहिणीनं शाळेतूनच काढलंनी तिच्यागावी नेलं 🙆‍
मलातर शिकायचं होतं ,तिनं टाकलं शिवण क्लासला मग जे बहिणीच गाव होत तिथल्या 10 वीच्या मुलीच्या भेटी घ्यायला चालू केल्या शाळा सूरी होउन दोन आडीच महिने झालंत उगाचं अभ्यासाची चौकशी करत रहायची मग एक दिवशी बहिनीला विनंती केली व तिच्या गावात "विध्या विकास प्रशाला लक्ष्मी टाकळी "येथं शाळेला गेली .गेल्यागेल्या परीक्षा चालू झाली तशीच मौठ्या हिमतीन दिली वर्ष एकदम मजेत घालवलं ,स्टेज माञ सोडलं नाही पाहूण्याचं गाव होत तरीही स्नेहसंमेलनाला स्टेजवर जाउन गवळणं मनली.चांगले मिञमैञीण ह्याच शाळेतून भेटले .
असा माझा सुखद प्रवास..............
थोडी वाहवत गेलेय समजून घ्या
जयंत जाधव,लातूर
      " आजही खूणावतोय मला शाळेचा तो फळा,गुरुजींच्या  हातातील तो खडू.
आजही आठवतोय मला शाळेच्या  माझ्या दंगामस्तीचा लळा,चला भूतकाळात  बालपणात दडू."
      माझ्या आयुष्यात मला शाळा कधीच जवळ मिळाली नाही.पहिली पासून ४ किमी जावे लागायचं.तो लालपरीचा प्रवास व बाबांनी खाऊसाठी दिलेले रुपयाचे नाणे व सोबत लहान बहिण-भाऊ यांना शाळेत नेण्यासाठीची जबाबदारी आजही मला आठवते.माझे पहिले गुरु म्हणजे श्री.हर्डीकर नाना. वडिलांच्या साखर कारखान्यात लेखाधिकारी होते.त्या काळी आमच्याकडे टि.व्ही.नव्हता.मी त्यांच्याकडे बघायला जात असे.टि.व्ही वरील बातम्या,अभिनेते नावे मुखपाठ होत असे. ते पाहून त्यांनी मला शाळेत दाखल करण्यापूर्वीच बाराखडी,उजळणी इत्यादी घरीच शिकवले.आजही तो भयानक दिवस मला आठवला की अंगावर शहारे येतात.मी शाळेत शिक्षकांना पाटीवर अभ्यास दाखवून वर्गाच्या मागील दरवाजा जवळ उभा होता व तेवढयात कारखान्यातील बॉयलरमध्ये प्रचंड स्फोट झाला.चारही बाजूला पळापळ,आरडाओरडा सुरु होता.तशा अवस्थेत माझी आई माझ्या लहान बहिण व भावाला घेऊन मला शोधत होती. शाळेच्या चपराशी काकांनी घंटा वाजविली होती.सुदैवाने मी आईला सापडलो.जिकडे तिखडे मृतदेहांचा खच पडला होता .तसे आमची शाळा कारखान्याचे मागे होती.पूर्ण ३-४दिवस आम्ही कारखान्याच्या जवळच्या शांता अक्काच्या शेतात काढली.बाबा आदल्या दिवशीच दुसऱ्या साखर कारखान्यात जॉईन झाले होते.

   २ ते ५ वीचे माझे शिक्षण नागपूर जिल्ह्यात मौदा जवळील जि.प.शाळा  तारसा येथे झाले. त्यावेळी आमच्या शाळेत दोन नवीन शिक्षिका रुजु झाल्या होत्या. गंमत म्हणजे त्यातील एक शिक्षिका दिसायला ऐवढी सुंदर होती की मी त्याचवेळी त्यांच्या प्रेमात पडलो होतो.शेवटी दिल तो बच्चा था ना.येथे मी अगदी प्रामाणिकपणे कबुली देत आहे.
      नंतर ६-७वी चक्क गुजराथी भाषेत शिकावे लागले.सुरत जिल्ह्यातील महुवा येथील शाळा.येथे मला चित्रकलेची निर्माण झालेली आवड व दुसऱ्या भाषा शिकण्याची आवड ही याच शाळेची अमुल्य भेट मला मिळालेली. त्यावेळी मुळचा नाशिकचा पण पूर्ण गुजराथी वातावरणात वाढलेला संतोष सारखा मित्र लाभला.
      पुढे माझ्या शिक्षणाचा खरा विकास झाला तो औरंगाबाद जिल्ह्यातील न्यु हायस्कुल किनगाव येथील शाळेत.शाळेत जाण्यासाठी स्कुल बसला २००/- द्यावे लागत होते.घरी शिकणारे आम्ही तिघे.म्हणजे ६००/- खर्च होत.त्या वेळी बाबांनी रेंजर सायकल आणली होती.मी एक दिवस शाळेत सायकलीवर जाऊन बघितले.८+८=१६ कि.मी. जाणे व परत येणे याला ४५+४५=९० मिनीट लागत.मी माझ्या बहिणीला डबल सीट बसून नेत असे.अशा प्रकारे मी एका वर्षात सायकलसाठी खर्ची झालेले पैसे वसूल केले पूर्ण ३ वर्षे .पुढे हाच आत्मविश्वास वर्धा येथे कॉलेजमध्ये कामी आला.तिथे वडिलांची बदली झाली होती.साखर कारखाना ते कॉलेज हे अंतर १४+१४ एकुण २८ कि.मी.जात असे. महात्मा गांधी यांच्या विषयी त्यांच्या जीवन प्रवासाचा अभ्यास करण्याची संधी वर्धा जिल्ह्यात सेवाग्राम येथे मिळाली.मी २००१ ते २००४ या काळात तब्बल ५० किमी जाणे येणे करत ३२ वेळा दर रविवारी जामणी ते सेवाग्राम येथील आश्रम पाहिला.खूप काही शिकायला मिळाले गांधीजी विषयी.मला माझे मित्र खूप वेड्यात काढत .न्यु हायस्कुल किनगाव या शाळेत एखाद्या विद्यार्थ्यांवर जे सर्वसमावेशक संस्कार घडायला पाहिजे ते सर्व मला या शाळेने दिले.नेतृत्व व भाषण कौशल्ये विकसित झाले व सर्वात महत्त्वाचे मला समाजसेवेची आवड शाळेन निर्माण केली व याच क्षेत्रात आज मी यशस्वी झालो  आहे.
सोमनाथ आदमिले,पंढरपूर
प्रथम मी अडमिंन ग्रुपचे आभार मानतो त्यांनी हा विषय देऊन  बालपणीच्या भूतकाळात डोकावून पाहण्यास भाग पाडले .


माझी शाळा पंढरपूर तालुक्यातील रोपळे गावातील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल रोपळे बु.हि आहे आणि मला माझ्या शाळेचा अभिमान वाटतो कि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या आणि शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवलेल्या देशातील एवढ्या मोठ्या संस्थेच्या वटवृक्षाच्या शाळेत माझे बालपण गेले.
आम्ही गावातच राहायला असल्याकारणाने शाळा घरापासून जवळच होती पण शाळेत दाखल झालो त्यावेळेस शाळेला खूप दांड्या मारायचो ,आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने आई वडिलांचे त्यांच्या कामातून  आमच्या भावंडकडे लक्ष नसायचे त्याचा गैरफायदा घेऊन आम्ही शाळा बुडवायचो पण हे जास्त दिवस चालले नाही
आमच्या शाळेत भागवत गुरुजी होते त्यांचं सर्व मुलांकडे जातीने लक्ष असायचे त्यांना  मी सारखी शाळा बुडवतो हे कळल्यावर खूप मारले आणि कायमची अद्दल घडली .तेंव्हापासून PG होईपर्यंत शाळा ,कॉलेज कधी बुडवली नाही .
मला शाळेत  पहिल्यापासून पहिल्या बेंचवर बसायला आवडायचे परंतु प्रश्नोत्तरे, गृहपाठवेळी मात्र खूप भीती वाटायची.
आमच्या शाळेचं वैशिष्ठ सांगायचे म्हणजे आदरणीय श्री माणिक जगन्नाथ चौधरी हे सर आज पर्यंत चौधरी सरांचे खूप उपकार आहेत .

चौधरी सर हे मूळचे माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या सांगलीतील अंजनगावचे आहेत.ते जेंव्हा शिक्षक म्हणून रोपळे गावात रुजू झाले आणि नंतर बढती मिळून मुख्याध्यापक याच गावात झाले म्हणजे सलग 25 वर्षे या गावात शिक्षक म्हणून कार्य केले .या काळात त्यांनी 3पिढ्या घडवल्या.
त्यांची ओळख हाडाचा शिक्षक म्हणून आहे.
शालेय शिक्षण घेत असताना आर्थिक परिस्थिती कारणाने माझ्या दोन भवांनी आणि बहिणीने शाळा सोडली पण मला शाळेबद्दल खूप आवड आणि चौधरी सरामुले शिक्षण घेता आले .मी तर घरापासून शाळा जवळ असून देखील सराबरो बार शाळेतच राहत असे.आमच्या शाळेत श्री लिगाडे म्हणून लिपिक होते ,माणूस खूप हजरजबाबी,अवांतर वाचन खूप करायचे आणि ते प्रत्येक शुक्रवारी शाळेत राहायचे तेंव्हा ते मला यशवंतराव चव्हाणापासून,प्र. के.अत्रे,पु. ल.देशपांडे,दुर्गा भागवत कुसुमाग्रज आणि असे अनेक साहित्यक,राजकारण आणि प्रशासन यांबद्दल बोलायचे .आणि बोलता बोलता एक गोष्ट कायम सांगायचे उचशिक्षण घेऊन क्लास वन चा ऑफिसर हो तरच काही तरी आहे नाही तर आमच्यासारखे लिपिक म्हणून राहावे लागेल.त्या वेळी मला या सर्व गोष्टी एवढ्या समजत नव्हत्या परंतु आज त्या आठवल्या तर त्याचे मोल अधिक जाणवते.
शाळेला सुट्टी लागली की मी लोकांच्या शेतात बोरे वेचायला जायचो आणि आलेल्या पैशातुन शाळेची फि भरायला मदत होयची नाहीतर शाळा सोडून काम करायला जावे लागेल या भीतीने कष्ट करत करतच शिकलो.
अशातऱ्हेने या सर्व बालपणीच्या आठवणी आज पुन्हा या वि४ ग्रुप च्या या विषयाने जाग्या झाल्या.
       🙏धन्यवाद🙏

प्रविण  भिकले ,मुंबई
लहानापासून ते मोठ्यांपर्यंत कुतूहलाचा आणि जवळचा विषय म्हणजे शाळा. या शाळेने बऱ्याच लोकांना घडवलं. तशीच माझी ही एक शाळा. साने गुरुजी विद्यालय, दादर. गिरणगावातील मध्यमवर्गीयांची पण उच्च शैक्षणिक दर्जा असलेली माझी शाळा. शाळे शेजारी शिवाजी पार्कच मैदान आणि समोर चौपाठी यातच माझ शालेय विश्व होत. दादर हा परिसर च मुंबईच्या सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडीचा केंद्राबिंदु. शाळेने नेहमीच सांस्कृतिक वारसा जपला. मला अजुनही आठवतंय कि शाळेत दर शनिवारी साने गुरुजी कथामाला होत असे, त्याचे चांगलेच संस्कार आम्हा मुलांवर होत असत. शाळेतील शिक्षकांसोबत आमच एक वेगळाच भावनिक नात झाल होत. आज जेव्हा हे आठवत तेव्हा उगाच मोठ झाल्यासारखं वाटत.
शाळेत मला जर सर्वात जास्त भिती कोणाची वाटत असेल तर ते म्हणजे पाटील सर. उशीर झाला कि सर्वाना लाईन मध्ये उभाकारून पट्ट्या खायला लागायच्या. माझ्या वर्गात एक क्लायंट तर फिक्स होता प्रथमेश. त्याला आम्ही नाट्या म्हणायचो.

तसेच शाळेतली खरी मज्जा म्हणजे प्रत्येकाला एकमेकांची नाव माहित नसतील पण वडिलांची नावे सर्वाना माहित होती. त्यात एखाद्या वडिलांचे नाव खूप पुराणिक असले कि रोज त्याचा जयघोष चालायचा. नवनाथ नावाच्या मित्राने प्रत्येक वडिलांच्या नावाची महाभारत आणि रामायण अशी विभागणी करून पूर्ण वही भरून कादंबरीच लिहिली होती. ते माझे पहिले अवांतर वाचन होते. वडिलांचा उद्धार करणारी वही राठोड सरांच्या हातात पडली आणि  मित्राच्या गालावर ज्ञानपीठ पुरस्कार. कदाचित नावनाथला लेखक व्यायच असेल पण त्याचा सेन्सोर ९ तच झाला.
माझ्या वर्गात मुलांचा आणि मुलींचा असे दोन मोनिटर असायचे. मुलांचा मोनिटर खूपच साधाभोळा (नावच त्याच लाड उर्फ लाडोबा) पण मुलींची मोनिटर तर आम्हा मुलांवर नेहमी खार खाऊन असायची. तिच्यामुळे खूप मार पण खाल्ला. मीनल नाव होत तीच. अजूनही नाही कळत नेमक तीच आणि मुलाचं काय वाकड होत. आमचा झगडे नावचा मित्र नेहमीच तिच्या हिट लिस्ट वर असायचा. सध्या पोलीस खात्यात आहे. (बाळाचे पाय पाळण्यात दिसतात हिचे आमच्या वर्गात दिसले)
ह्या शाळेने एक मोठा संस्कार आमाच्या वर केला तो म्हणजे दिनदुबळ्याची सेवा करण्याचा. आम्ही ४ दिवस कुष्टबंधूच्या आश्रमात श्रमदान केले होते आणि त्या आठवणी आयुष्यभर एक शिकवण म्हणून सोबत राहतील.
असे बरेचसे किस्से आहेत आणि एका ब्लोग मध्ये लिहिणे अवघड. आज शाळासंपून १२ वर्ष झाली. एक तप ओलांडल. पण मला आज वेगळ्याच कारणासाठी पुन्हा शाळेची गरज वाटू लागली आहे.
समाजात वाढत असलेल्या बेशिस्तीला शिस्त लावण्यासाठी पाटील सर चे छडीची गरज आहे.
पोकळ देशाभाक्तांत देशभक्ती जागवण्यासाठी जगताप सर सारख्या देशभक्त शिक्षकांची गरज आहे.
समाजाच बिघडत चाललेलं गणित सुधारण्याठी फडतरे सरांसारख्या गणिततज्ञाची गरज आहे.
भाषण ऐकून दंगे करणार्याना आज नांगरे सरांनी कथामालेतून रुजवलेल्या संस्कारांची गरज आहे.
सेन्सोर चा बाजार मांडणार्यानना आजही राठोड सरांच्या सेन्सो-चपराकाची गरज आहे
आज प्रत्येक क्षणागनिक शाळेची गरज वाटू लागली आहे. लहानपनी शाळेने केलेले संस्कार आज आपण  विसरून गेलोय कि काय अस वाटू लागत. पण आजूबाजूला पाहिलं कि वाटत आज खरच प्रत्येकाला पुन्हा एकदा शाळेचे संस्कार उजळणी करायची गरज आहे.
धन्यवाद,
कु. प्रविण मारुती भिकले भिकले
इ. १० वी / अ, ह.क्र. १४
साने गुरुजी विद्यालय, दादर

(राहावल नाही म्हणून लेखक म्हणून असा उल्लेख केला)

ज्ञानेश्वर तात्या टिंगरे,उस्मानाबाद.
सगळ्यांचे लेख वाचल्यावर मीपण माझ्या बालपणात हरवून गेलो पण प्रश्न पडला की माझ्या बाबतीत जे घडलं ते बऱ्याच लेखात काहींच्या वाट्याला ते आलं होतं, तरी पण काही ठराविक आठवणी मी इथं सांगण्याचा प्रयत्न करत आहे.
माझे प्राथमिक शिक्षण सारोळा बु .ता जि उस्मानाबाद येथे झाले.

सर्वसामान्य मुलांसारखाच मी सुद्धा एक विद्यार्थी होतो, अभ्यासात प्रगती जेमतेम होती. वर्ग बदलत होते पण बालपण सोडायला मन धजत नव्हते.
वर्गात जास्त खोड्या केल्या नाहीत पण खोडकरी मुलांच्या संगतीने बराच वर्ष गुरू प्रसाद मिळत राहिला.. (आमच्या भाषेत धपाटे ).
पण काही करता खोड्या करणारांची संगत सुटत नव्हती अन प्रसाद मिळणं काही थांबत नाही म्हंटल्यावर गावचे आदर्श म्हणून नावाजलेले गुरुजी भोसले सरांनी माझ्या घरी सूचना दिली अन पुन्हा आईचा भरपूर प्रसाद मिळाला तो शेवटचाच.. पुन्हा कधी तसा प्रसंग उद्भवला नाही.
लहानपणी केलेल्या खोड्या माफ असतात असं म्हणतात पण ते आता समजून काय उपयोग,  ते लहानपण आता हवं हवं असं वाटतंय, लहानपण देगा देवा अशी देवाला विनवणी कराविशी वाटते पण ते आता शक्य नाही कारण सायकलीवर गाव तसेच शिवार पालथा घालणे, किंवा सायकलचे टायर ( चकारी ) फिरवत फिरवत गावच्या बारा भानगडी कळत नसताना बघणे, विटी दांडू खेळणे, गावच्या सप्ताहात पंगतीला खायला मिळते म्हणून पारायनाला बसने आशा गोष्टी आता करता येत नाहीत.
त्या केलेल्या खोड्या आता मनाला सुखद धक्का देतात,
त्यावेळी ज्या पद्धतीने हट्ट पुरवला जात होता तो आता पुरवणारे कोणीही नाही म्हणून तो काळ सुखाचा होता असं वाटतं..
धन्यवाद.
काही अडचणीमुळे दोन आठवडे लेखन करता आलं नाही तरीही एडमीननी समजून घेतले त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.

सिद्धेश्वर गाडे ,सांगोला (सोलापूर)
माझे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा खिलारवाङी येथेच झाले .लहानपणी च्या काही गोष्टी डोळ्यासमोर आल्या एका आम्ही सकाळी सकाळी शाळेत कचरा गोळा करून तो एका ठिकाणी जाळूण टाकायचो त्या दिवशी माझ्या कडून निळ्या (गावतला मित्र ) च्या गालावर जुळल्याली कोरी बॅग ची ठिपका पडला(आज ही तो डाग आहे ) त्या मुळे त्या वेळी मला गुरूजी नी जोरात मारले आमंची आजी येऊन गुरूजी ना भाडत होती .
आमच्या आवडीचे गुरूजी म्हणून मुलाणी गुरूजी होते .ते बाराखडी मुळाक्षरे,  पाढे पाठांतर करून घ्यायचे .आणि कधी कधी घरी जाऊन येचे आसे करता करता आम्ही इयत्ता चौथीच्या वर्गात आलो होतो मार्क कमी आहे की जास्त हे काही माहिती नसले तरी आम्ही गावातील निळ्या,सोम्या , खंड्या,फनटर, नवल्या , एकावेळेस पुढील वर्गात जायचो .आशा वेगवेगळ्या आठवणी जाग्या झाल्या. रम्य ते बालपण रम्य ते दिवस. या विषयावर व्यक्त होता आले लहानपणीच्या आठवणीत जाता आले . हा विषय घेतला त्या बद्दल  टीमचे अभिनंदन
धन्यवाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************