स्त्री वादी म्हणजे पुरुष विरोधी का??

स्त्री वादी म्हणजे पुरुष विरोधी का??

🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

स्त्री वादी म्हणजे पुरुष विरोधी का??


Source: INTERNET
-जयंत जाधव,
लातूर
 आजचा विषयावर विचारमंथन करण्यापूर्वी आपल्याला स्त्रीवादी म्हणजे काय हे पाहणे आवश्यक ठरते.हा खूप व्यापक असा विषय आहे.स्त्रीवादी किंवा स्त्रीवाद याला इंग्रजीत 'फेमिनिझम' Feminism असे म्हणतात.जागतिक स्तरावर स्त्रीवादाचा आरंभ १९६० व भारतात १९७५ च्या आसपास झालेला आहे.गेल्या ४५ वर्षात अतिशय जलद गतीने पसरलेल्या या विचारप्रवाहाला सर्व दृष्टिकोनातून व्यवस्थित मांडणी करण्यासाठी जागतिक किंवा भारतीय स्तरावर पाहिजे तसे व्यासपीठ लाभले नाही ही स्त्रीवादाची शोकांतिका म्हणावी लागेल.त्यामुळेच स्त्रीवादा विषयी अनेक  असे स्त्रीवाद ही पुरुषविरोधी चळवळ अर्थ निर्माण झाले .
स्त्रीवाद म्हणजे लिंगभेदाला झिडकारुन स्त्री-पुरुष समानतेकडे वाटचाल एक सामाजिक व राजकीय  विचारप्रणाली आहे. सोप्या भाषेत     स्त्रीवाद ही पुरुषविरोधी चळवळ नाही. या विचारप्रवाहाच्या मार्गाने  स्त्रियांचे कित्येक वर्षापासून चालत आलेले  खालचा दुय्यम दर्जा उजेडात आणून हे शोषण संपवणे हा स्त्रीवादाचा मुळ गाभा आहे. ही एक सामाजिक, राजकीय जाणीव आहे.
"सहाची असो वा साठीची,बाईला हक्काने भोगायची
प्रेमाला नकार दिला तर,प्रियशीलासुध्दा जाळायची
जगताना दुसऱ्यालाही,थोडे जगू द्यायला शिका
आलाच आहात मानसाच्या जन्माला
तर थोडे माणसासारखे जगून बघा"
या आश्विनी धोंगडे यांच्या कवितेच्या ओळीमधून स्त्रीवाद समजता येईल.
१.खरंच स्त्रीवाद पाहिजे आहे का- हा मुद्दा मांडण्यामागे हा हेतू आहे की भारतात स्त्रीवाद याविषयी जनमाणसांमध्ये खूपच संकुचित व गोंधळ अशी परिस्थिती आहे.एकुणच स्त्रीवाद किंवा स्त्री-पुरुष समानता कोणालाही नको आहे.
२.स्त्री-पुरुष दोन्हींना वर्चस्व पाहिजे- भारतात पितृसत्ताक पध्दती असल्याने त्या घरातील मुख्य स्त्री तिच्या पेक्षा दुसऱ्या लहान स्त्री वर हुकूम गाजविण्याचा प्रयत्न करते किंवा बाहेरच्या स्त्रीयांवर,पुरुषांवर सत्ता चालविण्याचे प्रयत्न करतात.
३.स्त्री-स्ञी किंवा पुरुष-पुरुष किंवा स्त्री-पुरुष कोणी असो एकमेकांचा सन्मान करायलाच पाहिजे.स्त्रीवाद तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा हे घडेल. एक स्त्री असूनही पोटातील मुलीला मारुन टाकण्यासाठी स्त्री कशी काय तयार होऊ शकते?
४.पुरुषद्वेष भयानक वाढत आहे- आजच्या युगात पुरुषांचा अतिशय द्वेष करणे हा एक भयंकर प्रश्न निर्माण झाला आहे.एका स्त्रीवर अन्याय झाला.त्यातून ती स्वतः सक्षम झाली.तिने ठरविले आता सर्व पुरुषांना अद्दल घडवायची म्हणून ती दुसऱ्या स्त्रीला तसेच करायला  लावते. मला वाटते हा स्त्रीवादाचा चुकीचा  अर्थ किंवा ट्रेंड सध्या अतिशय वेगाने वाढत असून यावर विचार करणे आवश्यक आहे.समाजातील स्त्री-पुरुष रुपी जीवन ओसाड व्हायला वेळ लागणार नाही.त्यासाठी आजच्या स्त्रीला शिक्षण व तिच्या तील जागृतीने मिळालेली ताकद किंवा नव ऊर्जा हेवे-दावे,मत्सर किंवा द्वेष यांच्या ऐवजी त्या ताकदीचा स्वतःच्या स्त्री विकासाला वा व्यक्तीस्वातंत्र्याचा विकास कसा होईल हे पाहिले पाहिजे.
माझ्या मते पुरुषांनी एक गोष्ट खुल्या मनानं स्वीकारली पाहिजे ती म्हणजे निसर्गाने स्त्रीला पुरुषांएवढी विचार करण्याची क्षमता प्रदान केली आहे.दुसरा मुद्दा स्त्रीने देखील निसर्गाने पुरुषांपेक्षा कमी दिलेली शारीरिक  क्षमता मान्य करावी.
सर्वात शेवटी डाॕ.विनय काटे याःचा एक संदेश ते म्हणतात ,'एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला स्वतंत्र करु शकते तिची खरी स्पर्धा ही पुरुषांशी नसून दुसऱ्या स्त्रीया सोबत आहे,म्हणूनच स्त्रीयांनी एकमेकांशी असलेले हेवे-दावे विसरुन एक व्हावे तरच स्त्रीवाद सार्थक होईल.' याबाबतीत पुरुषांची एकच योगदान द्यावे ते म्हणजे त्यांनी सत्य,स्वातंत्र्य व शहाणपण बाजूने खंबीरपणे उभे राहवे.निसर्गाने स्त्री -पुरुष या नात्यात एक छोटा फरक ठेवला तो तसाच राहावा तेव्हाच या नात्यातील गोडवा कायम राहिल.

Source: INTERNET
-पी.प्रशांतकुमार,
 अहमदनगर


  आपल्याला शाळेत विरुद्ध अर्थी शब्द शिकवले होते..
गरम X थंड, उंच X बुटका, जवळ X लांब
आणि त्याच यादीत हेही आलं होतं की रात्रीच्या उलट दिवस तसच *स्त्री*च्या विरुद्ध *पुरुष*
.....पण खरंच सांगा ते एकमेकांच्या विरुद्ध आहेत की पूरक??
...शाळेतले निकाल असो किंवा इलेक्शनचे आपण लगेच टक्केवारीत यश मांडतो इतके टक्के स्रिया इतके पुरुष आणि कुणाचं पारडं जड.. शेवटी कोण जिंकलं..जणू इथे कुणी स्त्रीXपुरुष असली स्पर्धाच ठेवली होती..
.... ही स्त्री विरुद्ध पुरुष असली लढाई होती का?
कळत नकळत आपण असल्या बतम्यांमधून opposite sex वाल्यांकडे आपला शत्रू म्हणून पहायला तर शिकवत नाही ना?
आपण दोघांनाही समान पारड्यात ठेवूच शकत नाही का?..
...मुळात जे खरे स्त्री वादी असतात..स्त्री सबल,सक्षम व्हावी वाटणारे.. ते पुरुषविरोधी कधीही असत नाही ..त्यांना पुरुषांवर अन्याय होऊन स्रियांच्या पारड्यात झुकत माप पडावं अस कधीही वाटत नसत..
...आपण घरी कस वागतो , मुलं-मुलींना कस वाढवतो हे पहाण ही महत्वाच.. आमच्यात बायकांनी हे केलेलं नाही चालत,त्यांना त्यातलं काय कळत?? .. भले आज नसेलही कळत पण थोडी शिकण्याची संधी तर द्या..
...
*स्त्री आणि पुरुष दोघांनाही सर्वत्र समान संधी असाव्यात* हे महत्त्वाचं. दोघांनाही नागरिक म्हणून समान जबाबदाऱ्या आणि कर्तव्य तसेच समान लाभ असावेत..
....they are complimentary to each other..

Source: INTERNET
-करण बायस,
 हिंगोली

   ‘स्त्रीवादी’ या शब्दाबद्दल भरपूर जणांच्या मनात गैरसमज आहे. गैरसमज असणाऱ्यांना अस वाटते की ‘स्त्रीवादी’ म्हणजे पुरुष विरोधी जे की स्त्रियांसाठी चांगले आणि पुरुषांसाठी वाईट अस काही तरी.

आपल्या समाजात एक आणखी गैरसमज आहे,ते म्हणजे समाज स्त्रियांना कमी लेखतो.आपल्याला पण कळते की हे चुकीचं आहे पण आपल्या डोक्यात हे विचार कुठंतरी घर करून असते,आणि माणूस जसा विचार करतो तसेच त्याचे कृत्य असते.
आज आपण बघत आहोत स्त्रिया त्यांच्या हक्कासाठी लढत आहेत,लोकं स्वतःला दुसऱ्यांसमोर मी खूप चांगला आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात मग स्त्रियांना आज पण का लढावं लागत आहे?
आणि आपण इतिहासात पण वाचतो की कित्येक राजे झाले की त्यांनी स्त्रियांचा सन्मान केला.
स्त्रीवादी हे पुरुषांच्या विरोधी नसून ते या समाजातल्या व्यवस्थेच्या विरोधी आहे.
सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई,ताराबाई शिंदे इ. नी पण स्त्रियांच्या स्वातंत्र्याबद्दल लढा दिला. आणि आजही अनेक गावांमध्ये असं दिसून येते की स्त्रियांना फक्त चूल आणि मूल या पर्यंतच समजलं जातं, त्यांना त्यांचे मत मांडण्याचा सुद्धा अधिकार नसतो!

मुलं शाळेत प्रतिज्ञा, संविधान म्हणतात पण त्यांना याचा अर्थ समजावणारे शिक्षक नाहीत.
मुलं आपल्या घरात जे काही चालू आहे तसेच वागतात, त्यांना समानता शिकवणारी मंडळी नाही.
आणि काही स्त्रीवादी महिला/पुरुष समोर आले की त्यांचा विरोध करायचा अशा समाजात आपण राहतो.

Source: INTERNET
-संगीता देशमुख,
 वसमत
 जि. हिंगोली

          भारतीय स्त्रियांचा इतिहास पाहिला तर गार्गी,मैत्रयी सारख्या फार कर्तृत्ववान स्त्रियांचा आपल्याला तेजस्वी इतिहासआहे. तो काळ म्हणजे स्त्रीप्रधान काळ होता. कृषिसंस्कृतीची सुरुवात सुध्दा स्त्रीपासूनच झाली आहे. स्त्री कष्टकरी तसेच लढाऊ होती. पण तिच्या ताकदीचा अंदाज आल्याने  कालांतराने तिचे खच्चीकरण करण्याचा आणि तिला बंधनात अडकविण्याचा प्रयत्न सुरू झाले. मनुस्मृतीच्या माध्यमातून तिच्या बंधनाची संहिताच अस्तित्वात आली. आणि मुळात सर्वार्थाने सबला,सक्षम असलेल्या स्त्रीला अबला ठरवून तिच्या मानेवर संस्कृतीरक्षणाचे जोखड लादले. रुढीपरंपरांची चौकट,चूल आणि मूल यातच तीही धन्यता मानू लागली. मनुस्मृतीपासून कट्टर अशी पुरुषप्रधान संस्कृती अस्तित्वात आली. स्त्रीला "पायातील वहाण पायात बरी" असे अत्यंत दुय्यम स्थान प्राप्त झाले. "पती हा परमेश्वर आहे,त्याची दासी म्हणून रहाण्याने स्वर्ग प्राप्त होतो,त्यातच स्त्रीजीवनाची धन्यता आहे", अशा खुळचट कल्पनानी स्त्रीच्या मनावर अधिराज्य सुरु झाले. यात आजतागायत अडकलेल्या स्त्रीला 'माणूस' म्हणून जगण्याचा हक्कच नाकारला.
          स्त्री आणि पुरुष हे दोघेही या सृष्टीचे समान निर्माते आहेत. दोघेही महत्वाचे घटक आहेत. यातील एकाहीशिवाय ही सृष्टी अपूर्ण आहे. सृष्टीनिर्मितीमध्ये यापैकी कोणीही श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरत नाही. स्त्री ही सृष्टीची कूस आहे तर पुरुष हा सृष्टीचे छत्र आहे. असे असताना संस्कृतीमध्ये एका घटकाला परमेश्वर मानण्याइतके श्रेष्ठत्व दिल्या जाते तर दुसऱ्या घटकाला दासीइतका दर्जा क्षुल्लक दर्जा दिल्या जातो. 'असे का' कुठल्याही विवेकी माणसाला पडावा, असा हा प्रश्न आहे. कुठलातरी एखादा ग्रंथ येतो आणि निसर्गचक्रातील महत्वाच्या घटकालाच आव्हान देतो आणि त्या घटकामध्येच एवढी मोठी दरी निर्माण करतो,हे कितपत योग्य आहे? यातून मग स्त्रियांच्या अस्तित्वासाठी, हक्कांसाठी जन्माला येतो तो स्त्रीवाद!
                स्त्रीवाद म्हणजे लिंगभेद दूर करून स्त्रीपुरुष समानता मानणारा विचार प्रवाह! या संकल्पनेवरूनच लक्षात येईल की,स्त्रीवाद हा स्त्रीला माणूस जगण्याचे हक्क मांडतेआणि त्यासाठी ती भांडते. यात  पुरुषविरोधी विचार येतोच कुठे? स्त्रीवाद म्हणजे पुरुषांचे हक्क,स्वातंत्र्य काढून टाकून ते स्त्रियांना देण्यात यावेत,असे खचितच नाही. स्त्रियांना माणूस म्हणून जगायला लागणाऱ्या बाबी पुरुषांच्या अस्तित्त्वाला धक्का लावूनच मिळवायचे,असेही काही नाही.  पुरुषाला माणूस म्हणून जो दर्जा मिळतो,तो समान दर्जा स्त्रीला मिळावा,ही स्त्रीवादाची माफक अपेक्षा!मुख्य म्हणजे स्त्रीवादासाठी  फक्त स्त्रियांनीच झगडावं,असही नाही. स्त्रियांचे शिक्षण,केशवपन,सतीबंदी,बालविवाह,हुंडाबळी अशा स्त्रियांच्या प्रश्नासाठी आजवर थोर पुरुषांनीच लढा दिलेला आहे. अशा लढणाऱ्यांमध्ये पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे प्रमाण हे अत्यल्प आहे. यात पुरुषांना स्त्रीवादासाठी लढले म्हणून समाजात न्यूनत्व येण्याऐवजी त्यांना थोरपणा प्राप्त होऊन  त्यांची नावे काळाच्या पडद्यावर सोनेरी अक्षरात लिहिली गेली आहेत.
         असे असले तरी आजूबाजूला पाहिल्यावर लक्षात येईल, फक्त मूठभर स्त्रियांना आज स्वतःचे अस्तित्व आहे. ग्रामीण भागातील स्त्रियांना अजूनही माणूस म्हणून वागणूक मिळत नाही.  तिथे तिच्यावर अत्याचार करायला कोणी बाहेरची व्यक्ती लागत नाही,तर घरातीलच पुरुष तिच्यावर अत्याचात करत असतात. तिच्या वेदनेचा हुंकारही बाहेर पडत नाही. आणि इकडे शहरात  कार्पोरेट जगातल्याही स्त्रियांची अशीच मुस्कटदाबी चालू आहे. आज एकविसाव्या शतकातही हुंडाबळी,बलात्काराच्या बळी दिसून येतात. आणि इथे बलात्कार करणारा उजळमाथ्याने फिरतो तर त्यात बळी ठरलेल्या व्यक्ती आत्महत्या करतात. मूल झाले नाही किंवा मुलगा झाला नाही म्हणून स्त्रीलाच दोषी ठरवले जाते. अजूनही ग्रामीण भागात मुलगा-मुलगी यापैकी  शिक्षणाचा विचार करायचा झाला तर मुलाच्याच शिक्षणाला प्राधान्य दिले जाते.  म्हणून आजही इथे स्त्रीवादाची गरज पडते. म्हणजे गुन्हा कोणीही करो शिक्षा मात्र स्त्रीलाच भोगावी लागते.
          आजची स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवत आहे. ती आज अनेक सन्मानाच्या  पदावर आरूढ झाली. पण तिचा तिथपर्यंतचा प्रवास म्हणजे अग्निदिव्य असते.  ज्यांनी समाजविरोधाचे शिवधनुष्य पेलले ती आज स्वतःचे अस्तित्व टिकवून आहे. आणि ज्या खचल्या त्या आज किडामुंगीचे जीवन जगत आहेत. तिच्या यशाचे हे मुकुट काटेरी  असते. यात जर स्त्रीला पुरुषाच्या वरचा नको पण बरोबरीचा दर्जा मिळाला तर तिला माणूस म्हणून जगण्याचा दर्जा मिळेल. हे सर्व मिळवताना पुरुषाच्या अस्तित्वाला धक्का न लागताही हे साध्य होऊ शकते. म्हणूनच स्त्रीवाद म्हणजे पुरुष विरोधी अजिबातच नव्हे,हेच सिध्द होते.
 
Source: INTERNET
-अश्विनी कटकेमोड,  
 नांदेड

  स्त्रीवादी म्हणजे पुरुषविरोधी का?
     तर नक्कीच नाही.
  स्त्रीवादी म्हणजे पुरुषविरोधी नसुन स्त्रीयाचे शोषण संपवून त्याना पुरूषांच्या बरोबरीने समाण अधिकार/हक्क मिळवून देण्याकडची वाटचाल. त्यांना उजेडात आणण्याचा प्रयत्न.
    खर तर 19 व्या शतकातच स्त्रीवादी चळवळीला सुरवात झाली. बाळशास्त्री जांभेकर यांनी बालविवाह, सतीप्रथा स्त्रीयांवर होणारे अत्याचार अन्याय या विरोधात समाज जागृती केली.
    पूर्वीच्या काळी आपल्या भारतीय समाज व्यवस्थेतील स्त्रीयांचे जीवन हलाखीचे होते...'चुल आणि मुल' इतपतच त्यांचे जीवन होते. पुरुषांनी केलेले कुठलेही वर्तण/काम योग्य मानले जायचे आणि तेच काम स्त्रीयांनी केल्यास त्यास अवास्तव ठरविले जायचे.
   गोपाळ हरी देशमुख यांनी सुद्धा आपल्या शतपत्रांमधुन स्त्रीशिक्षणाचा पुरस्कार केला. जर पुरुषांना पुनर्विवाहाची परवानगी असेल तर स्त्रीयांनाही पुनर्विवाहाची असली पाहीजे असे लोकहितवादीचे म्हणणे होते. तेव्हाच्या स्त्रीवादी चळवळीच्या सुरवातीचे पडसाद आज आपल्याला पहायला मिळतात. तेच म्हणजे स्त्रीयांना स्था. स्व. संस्थेमध्ये 50% दिल गेलेल आरक्षण. आज स्त्रीया कुठेही कमी नाहीयेत. प्रत्येक ठिकाणी त्या पुरुषाच्या बरोबरीने काम करतांना पाहायला मिळतात.
  त्यामुळे तिच्या या वाटचालीला आपण पुरुष विरोधी न म्हणता, आपण पुरोगामी विचारसरणीचा स्वीकार करायला लागलोत अस म्हणायला हरकत नाही.

Source: INTERNET
-अनिल गोडबोले,
 सोलापूर

माणूस म्हणून निसर्गाने जो प्राणी विकसित केला त्याला त्याने कुठलीच विलक्षण शक्ती दिली नाही किंवा खूप शारीरिक ताकद दिलीं नाही. पण त्याला दोन गोष्टी दिल्या...1 विचार करण्याची शक्ती
2. विचार मांडण्यासाठी भाषा

आता या गोष्टीचा मानवाने चांगला वापर करून घेतलाच पण त्याचे काही दुरुपयोग सुद्धा झाले ... त्या पैकी एक दुरुपयोग म्हणजे..पुरुष हा स्त्री पेक्षा श्रेष्ठ आहे हा विचार

नर आणि मादी ह्या दोन्ही भूमिका पार पाडण्यासाठी दोघांची शरीर आणि त्या साठी लागणारी वृत्ती या मध्ये झालेला फरक सोडून इतर कुठलाही फरक दोघांमध्ये नाही, अस शास्त्र सांगते.

पण या विचारी (?) माणसाने मात्र स्वतःच्या काहीतरी भ्रामक समजुती पायी पुरुष वरचढ आणि स्त्री कमी, असा काहीतरी गैरसमज करून ठेवला.
आपल्याकडे मातृ सत्ताक पद्धती पण होती आणि पितृसत्ताक पद्धती पण आहे. पण या गोष्टी मुले स्त्रियांना कमी लेखण्याचा डाव जो साधण्यात आला त्या विरुद्ध बंड म्हणून महिलांनी फेमिनिझम चे रूप धारण केले..

पण स्त्री वादी च्या विरोधात पुरुष विरोधी अशी भूमिका देखील योग्य नाही. आता या मानसिकते मध्ये काशी भर पडते बघू..
काही वाक्य अशी कानावर पडतात की, आम्ही आमच्या मुलीला मुलाप्रमाणे वाढवलं.
आम्ही अजिबात मुलगा आणि मुलगी हा भेद करत नाही.. सगळं मुलांसारखं आणून देतो. आमची मुलगी एका पुरुषा प्रमाणे रागीट आहे..
तर नकळतपणे तुलना केली जाते.. आणि जिथे तुलना असते तिथे कमी जास्त पण आलाच.

तर आता तुलना सोडून दोघांमधील योग्य ते वेगळेपण सोडून दोघेही एकच काम एकाच सफाईने करू शकतात हे मानणे होय..

ही शिकवण आपल्या मुलींना देणं गरजेचं आहे आणि त्या पेक्षा जास्त प्रमाणात मुलांना शिकवण गरजेच आहे..

याची शिकवण पदोपदी कृतीतून देणे गरजेचे आहे. स्त्री वादी भूमिका म्हणजे पुरुष विरोधी भूमिका नव्हे तर स्त्री पुरुष समानतेची भूमिका घेणे होय..
आणि याची सुरुवात आपल्या घरापासून करा.

Source: INTERNET
-अक्षय पतंगे,
 हिंगोली

 'स्त्री-पुरुषांनी बिनदिक्कत एकमेकांचं अस्तित्व मान्य करताना त्यावर शंका उपस्थित न करणे म्हणजे स्त्रीवाद होय'.
    
      'हिंदू संस्कृती आणि स्त्री' या  डॉ.आ.ह.साळुंखे यांच्या ग्रंथातून साभार- "सहचार्याने व सहकार्याने एकमेकांचे केवळ गुणच नव्हे तर दोषही सजवून घेणारे स्त्री-पुरूष एकमेकांना अधिक परिपूर्ण करतील. ते एक अशी समाजव्यवस्था निर्माण करतील, की जिच्यामध्ये कोणाचा श्वास गुदमरून मरणार नाही.मानवी जीवनात परस्पर विश्वासाचा सुगंध दरवळत राहील. एका उत्कट आनंदाने हे जीवन बहरून येईल. येथे स्त्री व पुरूष यांपैकी कोणा एकाचा पराजय असणार नाही. दोघांपैकी कोणा एकाचेच राज्य असणार नाही. जय झाला,तरी तो दोघांचा असेल पराजय झाला, तरी तो दोघांचा असेल आणि राज्यही चालेल ते दोघांचेच" !

Source: INTERNET
-समीर सरागे,
 नेर,  यवतमाळ

भारतीय समाज व्यवस्थेत स्त्री-पुरुष महत्वाची भूमिका पार पाडत असतात . आपली भारतीय समाज संरचना पुरुष प्रधान संस्कृतिपर राहिली असल्याने स्त्रिला गृहीत धरल्या गेले नाही. चुल आणि मूल , कुटुंब व्यवस्था संभाळ करणे , मुलांचे संगोपन   इत्यादि तिच्यावर  कौटुंबिक जबाबदारी राहिली आहे.
या चढ़ उतारातून तिने सामर्थ्य दाखवून स्वताला सिद्ध केले आहे ,

आज 21 व्या शतकात महिला  अन्य क्षेत्रात देखील अंनत शिखरे काबिज करत असल्याचे दिसत आहे. शासकिय , प्रशासकिय, आरोग्य, खेळ, विज्ञान , अंतराळ, कला व मनोरंजन इत्यादि क्षेत्र आज स्त्रियांनी काबिज केली आहे.  अर्थात यात या शिखरावर असलेल्या  स्त्रियांच्या वाटयला कधी कौटुंबिक  आणि सामाजिक विरोध, कधी आर्थिक अडचणी आल्या असतील.या प्रतिकूल परिस्थितीत विरोध झुगारुन त्यांनी आपली शिखरे यशस्वी रित्या संपादित करून त्यांनी भावी पीढ़ी समोर एक आदर्श निर्माण केला की, पुरुषी वर्चस्व असलेल्या या जगात ,या व्यवस्थेत स्त्रियां देखील मागे नाही. वास्तविक ज्या समाजात स्त्रियांना सन्मान मिळतो तो समाज विकासाच्या मार्गावर असतो  आणि आज 21 व्या शतकात देखील काही धर्मात ,पंथात ,जातित स्त्रियांवर ,त्यांच्या स्वतंत्र्यवर बंधने आहेत हे विशेष संगण्याची गरज नाही. अलीकडे साउदी अरब मध्ये स्त्रियांना फुटबॉल सामने बघण्याची मुभा देण्यात आली व स्त्रियांना  वाहन चालवन्याचे अधिकार प्राप्त झाले. म्हणजे तेथील  स्त्रियांना आजपर्यंत  वाहन चालविन्यावर आणि फुटबॉल सामने बघण्यावर निर्बंध होते शरीयत कायद्याचा पगड़ा असलेल्या या देशात स्त्रियां  करिता विशेष अधिकार व मुभा नव्हती परंतु विश्वातिल बहुसंख्य देशात स्त्रियानि केलेल्या कामगिरी आणि त्यांचा होत असलेला सन्मान बघता  सऊदी अरब चे राजा शेख अब्दुल रहमान  यांनी या विषयाची दख़ल घेऊन त्यांना देखील जगण्याचा अधिकार आहे  . त्यांच्या वर असलेली सामाजिक व धार्मिक बंधने अधिक न लादता स्त्रियांच्या स्वतंत्रतेला प्रोत्साहन दिले व त्यांना देखील पुरुषा प्रमाने सर्व मोकळीक दिली , जो देश जगात सर्वोत्तम रित्या  आर्थिक सम्पन्न देश आहे तीथे मात्र स्त्रियांची कुचम्बना होत होती परंतु त्यांच्या देखील लक्षात ही बाब आली म्हणजे जो पर्यंत पुरुष  स्वता स्त्रियांचे स्वतंत्र आणि त्यांचे अधिकारा बाबत विचार करणार नाही तो पर्यंत या बाबी होने शक्य नाही. अखेर कुठ पर्यंत स्त्रियांना सामाजिक आणि धार्मिक जोखडात बंदिस्त करुण ठेवायचे? काही स्त्रियांना याचा समोर खुप त्रास भोगावा  लागतो. जसे कुटुंबातील एखादा कर्ता पुरुष जर अचानक अपघाती गेला तर त्या स्त्रिची किती कुचम्बना होते ,कारण कुटुंबातील पुरुषी मानसिकतेने  तिला नेहमी दुय्यम स्थान दिलेले असते  ,तुला काही जमत नाही ,तू काही करु नकोस , हे तुझे काम नाही वैगरे त्यामुळे  तिला पदों पदी सामाजिक व कौटुंबिक  अडचणीना सामोरे जावे लागते.
आजही समाजात काही स्त्रियांना विविध क्षेत्रात    काही  करायचे असल्यास दोन्ही कडील  कुटुंबाची परवानगी घ्यावी लागते, याचा अर्थ असा मुळीच नाही की तीने ही परवानगी घ्यायला नको होती ति घेणे अनिवार्य आहेच परंतु जे चांगले आहे त्यास कौटुंबिक प्रोत्साहन मिळणे अतिशय गरजेचे आहे.  शेवटी ती देखील या समाजाचा एक अविभाज्य घटक आहे. केवळ कुटुंबाचा व घराण्याचा वंश वाढवा ,घराला वंशचा दिवा असावा , लिंग परीक्षण (sex Determine)  या सारखे प्रयोग होत गेले व गर्भातच तिची हत्या करणे सुरु झाले, आणि वारंवार जर मुलगीच जन्माला येत असेल तर कुटुंबा कडून सदर महिलेचा आतोनात छळ होत राहीला परिणामी पुरुष प्रधान संस्कृति उदयास आली आणि याचे रूपांतर मग समाजातील  स्त्रियांना  दुय्यम  स्थान प्राप्त झाले. यातही अतिशय दुर्दैवी बाब म्हणजे एका स्त्रीने दुसरिवर अत्यचार करणे म्हणजेच (कौटुंबिक हिंसा)  कालांतराने  समाजसुधारक यांनी वेळोवेळी स्तियांचे महत्व अधोरेखित केले स्त्रियांना देखील समाजाच्या मुख्य प्रवहात आनावे या करिता ते सदैव प्रयत्नरत राहिले आहे.  शासनाच्या विविध योजना व कायदे जसे लिंग परीक्षण कायदा , कौटुंबिक हिंसा कायदा वैगरे यामुळे यावर आळा बसला,

आजंची स्त्री आता आपली नवी ओळख निर्माण करु लागली आहे. तिने या विश्वावर आपले प्रभुत्व स्थापन करण्यास सुरुवात केली आहे. सर्वच क्षेत्रात तिची आघडी आहे. आणि यात त्यांना पुरुषांचे देखील महत्वाचे योगदान लाभत आहे.

आज खऱ्या अर्थाने स्त्री आणि पुरुष प्रधान संस्कृति उदयास येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************