दिवाळी - भाग २ (दुसरा)



श्यामकांत डगवार,यवतमाळ.
          लहानपणी दिवाळीची खुप खुप मजा असायची. दिवाळीची चाहूल ही दसऱ्यापासुनच लागायची कारण दिवाळीला जसे फटाके फोडण्याचा आनंद घेता येत होता तसाच आनंद दसऱ्याला रावण दहणाच्या वेळी होणाऱ्या फटाक्याच्यां आतीषबाजीचा आनंद त्यावेळेस मिळत असल्याने ही चाहूल दसऱ्यापासूनच लागायची आमच्या लहानपणी सिंधी कॅम्प परिसर म्हणजे किरकोळ फटाक्याचं बाजाराचं ठिकाण. आम्ही रोज या परिसरात जाऊन फटाके फोडणाऱ्या व्यक्तिच्यां अवती भवती असायचो. आणी त्यांनी फोडलेल्या फटाक्यांचा आवाजाचा मनमुराद आनंद लुटायचो. कारण आर्थिक परिस्थिती जेमतेम असायची इच्छा असुन देखील बघण्याचा आनंद घेण्यापलिकडे मात्र काहीच करू शकत नव्हतो. जशी फटाक्याच्यां आवाजाची मजा तशीच आकाशदिव्यांच्या प्रकाशाची मजा यायची सायंकाळी सहा वाजले की अनेकांकडे रंगिबेरंगी आकाशदिवे  लागायचे. अनेकजण घरीच आकाशदिवे बनवायचे तो आकाशदिव्यांचा मंद प्रकाश मनाला प्रफुल्लित करून जायचा. सोबतच गड किल्ले बनवण्याची जणू स्पर्धाच लागायाची घरोघरी मुले माती आणि विटा किवां छोटे दगड यांच्या माध्यमातुन किल्ले सजवायचे . खुप आनंद मिळायच हे करतानां . दिवाळी म्हटली पक्वानांची रेलचेल. घरो घरी फराळाची मिष्ठाणं असायची. पण   शेजारी जेव्हा फराळाला बाेलवण्याकरिता एकमेकांशी स्पर्धा करीत तेव्हा फराळाला बाेलावण्याचा व शेजारी फराळाला जाण्याचा तो आनंद अवर्णीयच. नरकचतुर्दशीची पहाटे गुलाबी थंडीत उठायचं आणि आईच्या हातची उटंण लाऊन आंघोळ करायची हा अनुभव खुपच आनंद देणारा असायचा.
अशी दिवाळी आता चाळीस वर्षानंतर अनुभवाल्या मिळत नाही यांची खूप  खंत वाटंते .कारण पुर्वी सारखे एकमेकात मिसळून दिवाळी साजरी करण्याचे दिवस केव्हाच लोप पावले.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

महेश देशपांडे,ढोकी, जिल्हा धाराशिव.

दिवाळी सण हा भारतीयांची संपूर्ण जगाला दिलेली एक अनोखी देणगी आहे,
चीन, रशिया, अमेरिका या देशांमध्ये सुद्धा दिवाळी सारख्या सणाचे आयोजन केले जाते.
पण त्याला कुठलीही पार्श्वभूमी आहे असं मला ज्ञात नाही. लोक फक्त एकत्र येण्यासाठी साजरे करतात...

भारतामध्ये दिवाळीला इतर कोणत्याही सनांपेक्षा अनन्यसाधारण महत्व आहे.
अगदी साधा विचार केला तर, कोणत्या दिवसात आपण हा सण साजरा करतो, तर हिवाळ्यात... याच दिवसात का ? तर आपल्याला निसर्गाच्या नियमाप्रमाणे जो बदल होतो, आज तो बदल कसा स्वीकारावा यासाठी...
सामाजिक पार्श्वभूमी पाहिली तर खूप मोठा बदल घडतो... याच कारण आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये कनेक्टिव्हिटी वाढली आहे आणि त्यामुळे ज्यांच्याकडे ही साधन नाहीत अगदी त्यांच्यापर्यंत पोहोचता येतं आणि त्यामुळे आपल्याला समाजात आर्थिक दृष्टीने अगदी गरीब असणाऱ्या लोकांना काय हवं काय नको हे समजत... आणि त्यामुळे आज अनेक संस्था यासाठी खुप मोलाचं योगदान देतात... त्यांना खरंच सलाम..

दिवाळी सणाला साहित्याची खूप मोठी पार्श्वभूमी आहे...
मला वाटत आता ही संख्या कमी झाली असेल पण इतर कुठल्याही     कर्यक्रमाला नाही इतकी, दिवाळी मासिक छापली जात होती... खूप, म्हणजे खूप..
आता हळूहळू याचा वाचक वर्गही वाढतो आहे...मी स्वतः अनेक दिवाळी अंक वाचतो माझ्याकडे तसा संग्रह आहे... खूप खूप समृद्ध झाल्यासारखं वाटत..

अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे,
*दिवाळी पहाट*. मी संगीत ही साधना मानतो, ईश्वराच्या जवळ जाण्याची..!
आणि दिवाळी पहाट च्या निमित्ताने किंवा दिवाळीतील इतर दिवशी सुद्धा अगदी भरगच्च कर्यक्रम असतात.. मन प्रसन्न होत, हा माझा अनुभव आहे.. तो तुम्ही सुद्धा अनुभवावा..

लहानपणीच्या खूप आठवणी आहेत त्या फक्त आठवल्या जरी तरी अगदी लहान मुलासारखं आनंदून जायला होत..😊

दिवाळीच्या धार्मिक पार्श्वभूमीवर खूप काही बोलल जात की, अमुक दिवशी अस झालं म्हणून अस करायचं  वैगेरे..
या सर्वांपेक्षा आपल्या मनाला पटतील अशा गोष्टी करणं मला जास्तीच योग्य वाटत...

बहुतेक सर्व गोष्टींना स्पर्श केला आहे असं वाटत...😊

या सर्वच्या सर्व गोष्टींमागे जी प्रेरणा आहे ती मला वाटत की माणसाचं आयुष्य सर्वार्थानं समृद्ध व्हावं अशीच आहे..!
मग तो समाजातला कोणताही व्यक्ती असो...!

आणि आपणही तसच वागण्याचा प्रयत्न करावा असा मला वाटत..

इतर गोष्टींचा आंनद घेत असताना, सर्व घटकांना जास्तीत जास्त सामावून घेता येईल हा विचार हवा अस माळ वाटत....
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

रामेश्वर जाधव, नांदेड.

         दिवाळीचा सण म्हटला की, लहानपणीच्या आठवणी डोळ्यासमोर येतात व दिपावली सणावरती लिहायचे म्हटले तर त्याच लिहावाव्या वाटतात.

        दिवाळी जस जशी एक एक दिवस जवळ येते तशीच मामाच्या गावी जायची ओढ वाटते आणि दिवाळी दोन दिवस राहीली म्हटल की आई जवळ विचार पुस चालु की मामा कधी येणार ...

         मामा न्यायला आले की घाई होयायची की कधी तरी घरी जातो घरी गेल्या नंतर मावशीच्या मुलांबरोबर मस्त फटाखे फोडायचे ते पण वेगवेगळ्या प्रयोगांनी ...

         दिवाळीची आंघोळ म्हटली की थंडगार सुगंधी ऊटणे अंगाला लावताच झोंबणारे मग आम्हा भावंडा मध्ये तुझी बारी माझी बारी  अस म्हणत त्यामध्ये मामा पण सहभागी असायचे मग काय कुणालाही ऊटणे लावणे चालु झाले की बाकीचे मस्त दुरून मज्जा घ्यायचे शेवटी आपणाला पण अंघोळीला समोर जायचे याची पण मनाला वचक लागायची हा उपक्रम दिवाळीच्या शेवटच्या दिवशी पर्यंत चालायचा...

            या दिवाळीच्या सणा निमित्याने सर्वजन एकत्र आलेले रहायचे व एकमेकांविषयी वर्षभर झालेल्या गोष्टींची ऊजळणी होयायची...

          आता पण दिवाळी आली की,  लहान पनीच्या  दिवाळी एवढी मज्जा नाही वाटत कारण अस असाव की आता आपली जागा आपल्या भाचे व पुतन्यांनी घेतली व आपण मामा च्या जागी आलेले आहोत म्हणुन की काय ही मज्जा जिम्मेदारी दर्शवते...

                   धन्यवाद.
  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

R. सागर,सांगली.
.
"दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा" असा उल्लेख असणारा दिवाळीचा सण. याचा खरा अनुभव घेतला तो लहानपणीच. त्यावेळी खरंच भारी वाटायचं. दिवाळीच्या साधारण 8-10 दिवस आधीपासूनच किल्ला बनवायच्या तयारीला लागायचं. किल्ल्याला मनासारखा आकार येईपर्यंत 4-5 दिवस कसे निघून जायचे तेही समजायचं नाही. आकार तयार झाल्यावर पुढचे 4 दिवस सजावटीसाठी जायचे. मातीत खेळताना मस्तच वाटायचं. अक्षरशः जेवायचंही भान राहायचं नाही. दिवाळीदिवशी पहाटे लवकर उठण्यात एक वेगळीच उत्सुकता असायची. कारण जो लवकर आवरून तयार होईल त्याला फटाके फोडायला जास्त वेळ मिळायचा. त्यामुळं ऐन थंडीतसुद्धा पहाटे उठायची चढाओढ असायची.
.
नंतर शाळेत असतानाच घरच्या परिस्थितीमुळं शेतीकडं लक्ष द्यायला लागलं. आमची कृष्णाकाठची शेती म्हणजे ऊसाचं पीक हमखास असतंच. आणि ऊसाचा हंगाम ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरू होतो. त्यामुळं ऊसतोड मजुरांचा संपर्क दिवाळीच्या दिवसांमध्ये हमखास येतोच. एकीकडे आपण दिवाळी साजरी करत असतो अन त्याच वेळी दुसरीकडे पोटासाठी धडपडणारे ऊसतोड मजूर आपला अर्धा-अधिक संसार सोबत घेऊन गावाबाहेरच्या एखाद्या रिकाम्या माळरानावर आपला हंगामी संसार उभारत असतात. जशी आपली दिवाळी असते तशीच त्यांचीही दिवाळी असते. पण दिवाळीपेक्षा त्यांना चिंता असते ती त्यांच्या कुटुंबाच्या भवितव्याची. त्यामुळेच त्यांना चिंता सतावत असते कधी अवकाळी पडणाऱ्या पावसाची तर कधी ऊसदरासाठी पेटणाऱ्या आंदोलनाची. कारण या सगळ्याचा जसा शेतकऱ्याला फटका बसतो तसाच तो त्यांनाही बसत असतो. आणि इतकं असूनही ते त्यांच्यापरीनं सण साजरा करतात.
.
'वर आभाळ खाली धरती' अशा स्थितीत आणि कामाच्या व्यापातसुद्धा ज्या पद्धतीनं, ज्या उत्साहानं ते दिवाळीसारख्या सणाचं स्वागत करतात, त्यासाठीचा फराळ वेळात वेळ काढून बनवतात. समोर असणाऱ्या परिस्थितीवर मात करून आपली पारंपरिकता आणि संस्कृती जपताना त्यांना बघितलं की नक्कीच समाधान वाटतं.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

मयूर पाटील,मोर्शी जिल्हा अमरावती.

दीपावली मनाई सुहानी
दीपावली मनाये सुहानी

ज्या दीपावली ला साई बाबांनी ज्या हाताने बिना तेलाचे दिवे लावले होते तसेच आपण आज खरच या विषयावर चर्चा करत आहात याचा मला अभीमान वाटतो. दिवाळी हा सण आहे उत्सवाचा ! माझे खूप खूप अनुभव आहेत दिवाळी बाबतीतचे... काही छान आणि वाईट !! 

मी लेखक नाही... या ग्रुप चा वाचक आहे. खूप काही या ग्रुप मधून शिकलो पण लिहायचा प्रयत्न कधी केला नाही. मला माहित आहे की मी नवोदित लेखक आहे म्हणून मला सर्व माफ करतील. आज जे काही मी शिकलो या ग्रुप मधून त्या नुसार मी प्रयत्न करेल लिहायचा या नंतर नेहमी ! 🙏🏼
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

 शीतल शिंदे, दहिवडी जि सातारा.

🤹‍♀🤹‍♂ दिवाळी आली रे दिवाळी आली ! हे हे ,
दिवाळी जवळ आली की आईच्या  मागे सारखी कटकट आई मला कपडे घे .मला असला फ्रॉक घे हे ते घे .सारखी आईच्याआगे कटकट आणी सतत प्रश्न विच्यारायचे काय काय बनवायचे,  आणायचे आपल्याला .
पण कसे भागवायचे हे त्यांच्या मानत त्यावेळी प्रश्न असतील .हे आता कळतेय .

खरेच दिवाळी सण म्हणजे सुखाचे दिवाळ काढणारा सण असतो .खरेतर हा सण सर्वांसाठीच आनंद आणी उस्ताह आणणारा असा सण .मात्र लहान मुलांसाठी त्यांच्या आयुष्य भरासाठिच्या आठवणी असतात .त्यांना काहीही माहीत नसते खर्च किती होतो खूप सुट्टी आणी आनंद असतो एवढे मात्र माहीत .

पण कमीतकमी या निमित्ताने तरी सर्व स्तरातील लोकांना गोड धोड  खायला आणी नवीन कपडे घेण्याची संधी - सवड मिळते मग भले कर्ज का काढायचे होईना .वर्षातून किमान चार दिवस तरी आनंदाणे दिवस घालवतात .

श्रीमंतांची काय रोजचीच दिवाळी असते .
दिवाळीला बरोबर शेती मालाचा दर कमी होतो . लाखो शेतकरी आपला माल कसाबसा मिळेल त्या भावाने विकून दिवाळीची  खरेदी करतात .
खरेतर सरकारने प्रत्येक गरजू लोकांना दिवाळी सणासाठी बोनस दिला पाहिजे .आणी त्यासाठीच लागणाऱ्या खाद्य वस्तूंची किंम्मत थोड्या दिवसांसाठी तरी  कमी करणे गरजेचे आहे .किंवा या सणासाठी दारिद्र्य रेषेतील लोकांना रेशन वरती जास्त साहित्य पुरवले जावे.

पण माझी  खरी दिवाळी असेल ती म्हणजे ज्या दिवशी या देशातील आतंकवाद्यांविरोधात सरकार कठोर पाउले उचलेल आणी  आतंकवाद 🤕 नाहीसा  करेल सरकार .......  !

तेव्हा माझी खरी दिवाळी असेल जेव्हा माझे सीमेवरचे जवान बंधु रात्रं दिवस पहारा देतात ते जवान बंधु  शांतीमय वातावरणात दिवाळी साजरी करतील !

माझी खरी दिवाळी असेल,  जेव्हा माझ्या सर्व पोलीस बंधु ,  सुरक्षा विभागातील सर्व कर्मचारी बंधु सुखाने त्यांच्या कुटुंबात दिवाळी साजरी करतील !
कारण ते पहारा देतात तेव्हा आपण सुखाने आनंदाने हा दिवाळी सण साजरा करतोय .

माझी खरी दिवाळी ती असेल जेव्हा  न्यायदाते डोळे उघडे ठेवून आणी कोणत्याही अमिषाला बळी न पडता निष्पक्षपणे न्यायदानाचे काम करतील आणी गुन्हेगारांना सजा देवून निरपराधी लोकांना दिलासा देतील ! ती माझी खरी दिवाळी आसेल !

येयील का एक दिवस अशी दिवाळी माझ्यासाथी ?

सांगा ना ? येयील का ? 😞

कधी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


*"माझ्या कोकणातील गावाकडची दिवाळी"....*

अक्षय गांवकर,
गाव. पारपोली,
ता. सावंतवाडी,
जि. सिधुदुर्ग.


भारतात साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणांमध्ये सर्वात प्रसिद्ध आणि महत्वाचा उत्सव म्हणजे दिवाळी

भारतात सर्व धर्मीय लोक यास मोठ्या आनंदात साजरा करतात. असे म्हटले जाते कि “दिवाळी” रोषणाई, उल्हास, उत्सवाचा, प्रेमानी भरलेला, मैत्रीचा आणि मानवतेने भरलेला उत्सव आहे.

आपल्या देशात दिवाळी हिंदू महिना आश्विन च्या शेवटी म्हणजे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये मोठ्या उल्हासात साजरी होते. आजकाल दिवाळी मोठ्या रंगीत माध्यमांनी साजरी होते. पण माझ्या कोकणात अजुनही साधी अन् सरळ पद्धतीने पण मनापासुन दिवाळी साजरी केली जाते. मला आठवते ती लहानपणाची गावची दिवाळी जी आजही कमी अधीक तशीच साजरी होते.

दिवाळी म्हणजे शाळेला सुट्टी चांगली आठ दहा दिवस सुट्टी मिळायची. लहानपणी ही मोठी चंगळच असे. परिक्षा व्हायची , रीजल्ट लागायचा अन् मग सुट्टी पडायची. मग आमच नियोजन चालु व्हायच. दिवाळीत मोठ आकर्षण जर कशाच असेल तर ते आकाशकंदिल बनवायच. चुलत भाऊ तसेच वाडीतील दोस्त मंडळी जमुन एखादा मोठा कंदिल बनवायचा अन् तो बरोबर रस्त्यावर दोन्ही बाजुंनी बांधुन टांगायचा. त्याच बरोबर बांबूच्या बारीक काठ्यांची चांदणी बनवायची, त्याला सभोवती रंगीबेरंगी कागद (फोली) लावुन त्यात बल्प सोडायचा अन् घरासमोर लावायचा. संध्याकाळी घरा बाहेर आईची रांगोळी काढुन झाली की पणत्या लावायला मी अग्रेसर असायचो.

घरी म्हणाल तर दिवाळी जवळ आली की आईची फोहे कुटुन(बनवुन) आणण्यासाठी धावपळ असायची. कोकणात दिवाळीपुर्वी बर्‍यापैकी भातकापणी संपलेली असते. या नव्या भाताचे पोहे बनऊन आणुन त्याचा उपार देवाला दाखवायची प्रथा आहे. म्हणुन मग आई भात भिजत घालायची त्यानंतर ते सुकवुन एका पिशवीत भरुन बाबांच्यास्वादिन करायची. जवळपास कुठे गिरण नसल्याने सरळ तालुकाच गाठावा लागायचा. सावंतवाडीत साटेलकरांच्या गिरणीवर ही गर्दी असायची. बाबा सकाळी ५.३० वाजता पारपोली गावातुन जाणारी पहीली गाडी पकडुन सावंतवाडीत पोहचायचे आणि फोहे कुटुन आणायचे. इथुनच खरी दिवाळी चालु व्हायची...

त्यानंतर खरी मजा जर कशात असेल तर नरकासुर बनवण्यात. आजही सावंतवाडीत मोठ्या प्रमाणात नरकासुर स्पर्धा होतात. जरी व्यवसायीक नसली तरी तशी स्पर्धा आमच्यातही असायची प्रत्येक वाडी वाडी वर नरकासुर बनवले जायचे. त्यासाठी जुन शर्ट पॅन्ट तसच मातीच मडक अशी जमवाजमव सुरू व्हायची. बाकी त्या कपड्यांत गवत भरून मडक रंगऊन नरकासुर रात्री आठ वाजता तयार असायचा. आज काल रंगीत मुखवटे भेटतात. पण तो जो रंगऊन नरकासुर बनवायचो त्याची सर म्हणा किंवा ती मजा आज नाही. मग रात्री जेऊन खाऊन झाल्यावर नरकासुराला रात्रभर गावात फिरवायचो. कोणाचा नरकासुर चांगला झालाय यात चढाओढ असायची. तसेच कोणीही कोणाचा नरकासुर पळऊन न्हायचे म्हणुन रात्रभर जागरण असायच ते वेगळच. मग सकाळी सहा वाजता गावाबाहेर पुलावर नेऊन नरकासुर जाळायचो.

नरकासुर जाळुन आल्यावर मस्त गरम पाण्याने आंगोळ व्हायची आणि मग तुळशीसमोर कारीट फोडण्याने आमची दिवाळी सुरु व्हायची. कारीट फोडुन गोविंदा गोविंदा अशी आरोळी द्यायची अन् त्या फोडलेल्या कारेटातली एक बी तोंडात टाकायची. तोंड कडु जार होऊन जायच पण त्याला पर्याय नसायचा. त्यानंतर सकाळी घरच्या नविन भाताचे फोहे ते पण गोडे आणि तिखट असे बनवले जायचे त्या सोबत उकडलेली रताळी हा मेनु ठरलेला अगदि आजही.

लक्ष्मिपुजना दिवशी भाताच्या राशींची पूजा झाली की मी माझ्या ताई सोबत आमच्या गुरांच्या गोठ्यात शेणाचा छोटा गोठा बनवून त्याला फुलांनी सजवायचो. जोताच्या रेड्यांन सोबत इतरही छोट्या मोठ्या गुरांच्या शिंगाना पीठाने किवा कधीकधी रंगाने रंगवायचो आईने बनवलेली पोळी त्यांना खावु घालुन घरी परतायचो .दुपारी काळ्या वाटण्याचे सांभार आणि पोळ्यांचे जेवण व्हायचे.

भाऊबीज दिवशी अगदी साध्यासुध्या प्रकारात भाऊबीज व्हायची, फार मोठ्या भेटवस्तू नसायच्या. घरात उपयोगाला येतील अशी स्टीलची भांडी डब्बा अशीच काही तरी भेटवस्तु अन् ओवाळणी असायची. तीही आई बाबांनी दिलेल्या पैशातुन.

अशी ही दिवाळी तुळशीच्या लग्नापर्यत असायची. ती लगबग वेगळीच तुळशीच्या लग्ना अगोदर अंगण बनवणे हे मोठ काम असायच. अंगण म्हणजे कोकणातील घरांची खरी शोभा. पावसाळ्यात अंगण खराब होत ते खणुन पुन्हा नविन बनवायच. शेणाने सारवुन तयार करायच. त्यानंतर मग तुळस रंगविण्याचे आवडीचे काम होत असे. तुळशी मध्ये टाकायला लागणारे चिंचा, आवळे आम्ही खुप लांब जंगलातुन जावुन आणायचो. तुलसी विवाहादिवशी संध्याकाळी तुळस सजवून तुळशीचे लग्न लावायचे नंतर लग्न लावुन झाल्यावर चिरमुले वाटले जायचे पहीले चिरमुले तुळशी समोर ठेवल्यावर टोपातील चिरमुले मुठभर पकडुन वर उडवले जायचे आणि आम्ही ते तोंड उघड ठेवुन खाण्याचा प्रयन्त करायचो. सर्व पोर चिरमुले आपापल्या पिशवीत जमवायचे त्यानंतर त्या चिरमुल्यांचे कोणी भेळ बनवायचा तर कोणी चहा सोबत खायचा. अशा पद्धतीने धमाल मस्तीत दिवाळी सणाची सांगता व्हायची.

सुट्टी संपायची शाळा सुरू व्हायची. त्यानंतर मग वेध लागायचे गावच्या जत्रेचे. कोकणात वार्षिक होणारे जत्राेत्सव म्हणजे मोठी पर्वणी. दशावतार नाटक अन् बाकी सगळी धमाल. या विषयावर पुन्हा कधीतरी.
तर सगळ्यांना माझ्याकडुन दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा . .

*शुभ दीपावली...*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************