दिवाळी - भाग १ (पहिला )

संदिप बोऱ्हाडे (वडगाव मावळ , पुणे)

  दिवाळी सण केवळ आपल्या कुटुंबातच नाही तर सर्व समाजात आनंद वाटण्याचा सण. हा सण आनंदाचा , आपुलकीचा आणि सामाजिक भान जपण्याचा..
   आजही समाजात अशी खूप मुले आहेत ज्यांना स्वतःहाचे कुटुंब नाही. त्याच बरोबर अनेक आजीआजोबा आहेत त्यांना बोलायला माणसे नाहीत. अनेकांना एक वेळेचे जेवण नाही , कित्येकांचे पैश्यांच्या अभावी शिक्षण अपुरे राहिले आहे.. जर त्यांनाही आपण अविभाज्य घटक बनविला तर तश्या दिवाळी सारखी दुसरी दिवाळी नाही. उगीच फटाके ,लायटिंग, वर पैसे खर्च करण्यापेक्षा आपण अश्या लोकांना मदत केली तर , अश्या दिवाळी सारखी दुसरी दिवाळी होऊच शकत नाही. आणि आपला आनंद द्विगुणित होईल आणि आशीर्वाद देखील मिळतील ते वेगळेच.
    4- 5 दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने दिवाळीमध्ये फटाके फक्त 8 ते 10 पर्यंत वाजवावेत असा निर्णय दिला..पण लगेच काही लोकांना हिंदुद्वेष दिसायला लागला..काय बोलावे अश्या लोकांना..फटाके फोडुन होणारे ध्वनी, वायु प्रदुषण हे पर्यावरणाला घातकच आहे.
मग ते कोणत्याही निमित्ताने अथवा कोणत्याही धर्माच्या लोकांनी केलेले असोत.
यामुळे वृद्धांना ,लहान मुलांना,रुग्नांना ,पशु,पक्षांना खुप त्रास होतो. फटाके उडवताना भाजून अनेकजण गंभीर जखमी होतात. त्यात लहान मुलांची संख्या अधिक असते. डोळ्यांना इजा होऊन अंधत्व येऊ शकते. प्रदूषणामुळे सर्वांनाच त्रास होतो.
दिवाळी आनंदाचा सण , परंतु इथेपण शेजारी शेजारी यांच्यात आतीशबाजीसाठी चढाओढ , स्त्रीवर्गात तेलांच्या दिव्याने घर सजावट करण्यात स्पर्धा लागलेली असते. एकंदर पैशाचा धूर करण्याचीच स्पर्धा.
दिवाळी सणानिमित्त आतिषबाजीसाठी होणारी पैशाची नासाडी टाळावी.
    फटाके ही काही कुठल्याच धार्मिक परंपरेमधे नाही
हिंदू धर्मात तर नव्हेच नव्हे.
धर्म हा मनुष्य जैवविविधता पर्यावरण संरक्षण पूरक असेल तरच टिकतो. सर्वच पक्षी सृष्टि पशूंना फटाके त्रासदायक असून कित्येक पक्षी जनावरे यांचा मृत्यु निव्वळ फटाके यामुळेच होतो
निव्वळ परंपरा म्हणुन फटाके फोड़ने हा अंधळेपणा आहे.
हिंदू धर्मात दिवाळी च्या वेळेस दिवे लावणं महत्वाचं असतं फटाके फोडणे नाही....दिवाळीत उत्सव म्हणून एखादा फटाका, फुलबाजे उडविणे ठीक आहे. मात्र हजारो रुपयांच्या फटाक्यांचा कचरा करून काहीच मिळत नाही.
   गरिबांना  ,महागाईने पिचलेल्यांना होळी काय आणि दिवाळी काय’ कष्टकरी, हातावर पोट भरणारे, उपेक्षित, वंचित, अनाथ, अपंग कित्येक जीव आपल्या सभोवती वावरताना दिसतात. त्यांच्या विकासासाठी, आधारासाठी, दिशाहीनतेतून वाट दाखवण्यासाठी नसावा काय असा एखादा सण?
यंदाची दिवाळी आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीने साजरी करण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्याला आनंद द्या न त्याच्या आनंदात आपण सुद्धा आनंदी व्हा!!
पहिल्यांदा आपल्या ग्रुपवरील सर्व मित्र-मैत्रीणींना, आणि तुमच्या सर्व कुटुंबीयांना माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा....
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
शिरीष उमरे, नवी मुंबई
        फराळाचे ताट ... ती मिठास.. तो आग्रह... सगळ कस लख्ख डोळ्यासमोर उभे राहीले दिवाळी म्हणताच !
माझ्या लहानपणी ३६ वर्षापुर्वी शाळेला भरपुर दिवाळीच्या सुट्टया असायच्या. आमची दिवाळी सुरु व्हायची पाचवीत घेऊन दिलेल्या टीकल्याच्या रोलवाली पिस्तोल ने. पिस्तोलला खोबरेल तेल पाजुन टीकली रोल टाकुन चोर पोलीस खेळ रंगायचा. थकुन घरी आलो की आई ने बनवलेला पोह्याचा चिवड्याचा बकणा भरुन खिश्यात शंकरपाळे भरुन परत पसार... मग रोल मधल्या उरलेल्या चार पाच टिकल्या फोडण्यात जाम मजा यायची.
वडीलांसोबत कीराणा आणायला जायचो. तिथुनच मग  चिरंगीचे फटाके, फुलझड्या, भुईनळ, रेल्वेचा फटाका, मटका अनार, डबलबार रॉकेट, सापाची गोळी काय काय खरेदी असायची... शेवटी कुंभारवाडीत जाऊन दीवा पणती घेऊन आनंदात तरंगत घरी यायचो!
       ज्या दिवशी पहाटे गुलाबी थंडीत उठवुन बंबातल्या गरम पाण्याने तेल उटणे लावुन घास घास घासुन आंघोळ व्हायची तेंव्हा लक्षात यायचे की दिवाळी आली.
तोपर्यंत आकाश कंदील छतावर लावलेला असायचा. मग आई द्यायची फराळाचे ताट ! अनरसा, लाडु शेव चकल्या करंजी... पोटभर न्याहारी करुन मित्रांसोबत भटकायचे व खेळायचे...  दुपारच्या जेवणानंतर फटाके फोडणे सुरु... लवंगी फटाक्याची लड काळजीपुर्वक खुल्ली करुन एकेक फटाका वेगळा करायचा आणि बनवलेल्या मातीच्या कील्ल्यावरील तोफेतुन फोडायचे. संध्याकाळी कलर वाले फटाके उडवायचे. काय भन्नाट दिवस होते ते ! रेल्वे चा फटाका वा भुचक्र आणि रॉकेट वैगेरे म्हणजे जय्यत तयारी व मोठ्यांच्या निगराणीतली ती मोहीम फत्ते करणे हा म्हणजे कौटुंबिक सोहळा असायचा. उदबत्तीचा व सुतळी बाँब चा टाइम बाँब बनवुन फोडणे व त्यानंतर मनसोक्त मार खाणे ह्याची पण आपली एक वेगळी मजा होती.

पुढचे पाचसहा दिवस कापरासारखे भुर्र उडुन जायचे. रोज तिन घरी फराळाचे निमंत्रण असायचे. प्रत्येक घरची तव वेगळी... अजगर होइपर्यंत खायचे.. लोळायचे.. खेळायचे...  मग हा दिनक्रम तुळशीपुजनापर्यंतचा असायचा. अगदी शेवटचा फटाका फोडेपर्यंत... झाडलेल्या कचर्यातुन फुसके फटाके गोळा करुन त्यातली बारुद काढुन कागदावर जाळेपर्यंत...
मग जड अंत: करणाने शाळेचे दप्तर भरणे व जाताजाता भग्न झालेला कील्ला पाहतांना घराच्या दरवाज्यातुन पाय निघायचा नाही...
त्यावेळी जसे डोळे भरुन यायचे तसे आताही आले आहेत...
ती निरागसता... ते कुतुहल... ते स्वप्नील क्षण... ते बालपण...  खुप मीस करतो...
आता ती मजा च नाही उरली दिवाळीची...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अमोल धावडे.
दिवाळी म्हटली की सर्व आनंदीआनंद सर्व रोषणाई व  खुप सारी धम्माल. दिवाळी आली सर्व घर आवराआवर नंतर घराला रोषणाई असे सर्व प्रकार दिवाळी आली की सुरू होतात दिवाळीमध्ये लोक अडमाप पैसे उडवतात.

दिवाळी ही गरीब लोकांचे दिवाळे काढून जाते मला आठवत आहे की मी लहान असताना आमच्याकडे दिवाळी साजरी केली जायची परंतु एकदम साधी फटाके वाजवाचे नाही कारण खरेदी करण्यासाठी आमच्याकडे पैसे नसायचे त्यामुळे शेजारी जे फटाके उडवतील त्यात आनंद मानयचो.

आजही विचार केला तरी कित्येक लोकांच्या घरी दीपावली साजरी केली जात नाही समाजामध्ये खुप गरीब लोक रहात आहे ते दिवाळी साजरी करू शकत नाही त्याना दिवाळी मध्ये बनवले जाणारे फराळ खायला भेटत नाही. जर समाजामध्ये आजही असे गरीब लोक असतील तर आपण आपली दिवाळी कशी आनंदात साजरी करू शकतो.

तर प्रत्येक दिवाळीमध्ये आम्ही एक उपक्रम करतो तो म्हणजे जे लोक दिवळी साजरी करू शकत नाही अश्या लोकांसोबत आम्ही दिवाळी साजरी करतो त्यांच्या मुलाना कपडे घेतो व त्यांना फराळ वाटप करतो. यातून मिळणार आनंद व त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तो गगनात न मावणारा असतो. खुप छान उपक्रम आहे आपण ही असे उपक्रम राबवून गरिबांच्या चेहऱ्यावर आनंद देऊ शकता व गरिबांची दिवाळी साजरी करू शकता.

चला तर ही दिवाळी गरिबांसोबत............
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
निखिल खोडे, ठाणे.

              भारतामध्ये दिवाळी सण जवळपास सगळीकडेच साजरा केला जातो. अत्यंत आनंद देणारा पण खुप खर्चात पाडणारा हा सण पाच दिवस चालतो. दिवाळी म्हटल की सगळीकडे विद्युत रोषणाई, चमकणारे आकाशकंदिल, दिव्यांचा झगमगाट, सुरेख रांगोळी, वेगवेगळ्या प्रकारचे रुचकर खाद्य पदार्थ.. प्रत्येकजण त्याच्या परीने दिवाळी सण उत्साहात साजरा करत असतो.
 
                शाळा किंव्हा कॉलेज मध्ये सहामाही परीक्षे नंतर दिवाळीच्या सुट्टया लागायच्या. सहामाही परीक्षा कधी पासुन सुरु होते आहे यापेक्षा दिवाळीच्या सुट्टया कधी लागणार याची घाई जास्त असायची. सुट्ट्यांमध्ये घराची साफसफाई करणे, घरी आईला कामात मदत करणे, दिवाळी साठी बनविलेला फराळ खाणे, मित्रांसोबत खेळणे आणि वेळ मिळाला तर पुस्तक वाचणे असा वेळ निघुन जायचा. साधारणपणे ज्युनिअर कॉलेज कॉलेज पर्यंतची दिवाळी अश्याप्रकारे साजरी केली. त्यानंतर मात्र कामासाठी बाहेर पडल्यावर परिस्थिती थोडी बदलली. रेल्वेचे तिकिट न मिळणे, खाजगी बसेस चे जास्त दर, जॉब वरती सुट्टया नाही यामुळे मागच्या २ वर्षापासून दिवाळीला घरी जाणे सुध्दा शक्य झाले नाही.

                 दिवाळी साजरी करण्यामागे कोणतेही कारण असो, बाजारात दिवाळी दरम्यान मोठे उत्साहाचे वातावरण असते. दिवाळीला लोक नविन कपडे, मिठाई , दागदागिने खरेदी करतात. सर्वसामान्य माणूसही या सणाच्या वेळी मनमोकळे पणाने खरेदी करतो. खरेदी करता वेळेस देशी बनावटीच्या वस्तु, छोटे व्यासायिक ज्यांचे घरदार सणांवर चालते अशा लोकांकडुन खरेदी करण्यास प्राधान्य द्यायला पाहीजे.

               आजच्या धकाधकीच्या जीवनात वाढत चाललेल्या प्रदुषणामुळे जीव धोक्यात येतोय. त्यामुळे सण उत्सवा मध्ये प्रदूषण कमी करण्याचा व दीव्याची आरास पणती लावण्याचा प्रयत्न करुया. दिवाळी आनंद आणि अारोग्यमयरित्या पणे साजरी करूया.. शुभेच्छा सगळ्यांना !!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

मुकुंद बसोळे, लातूर.

वेळ सकाळी सहाची.....थोडीफार बोचरी थंडी वाजत होती.... त्या 'बोचऱ्या' थंडीला सगळ्यांनी केंव्हाच झुगारून लावलं होत..... वातावरणात उत्साह होता...आणि असणारच कारण ती 'दिवाळी' ची पहाट होती.....वातावरणात उत्साहाच्या बरोबरच नवीन चैतन्य, अंधार चिरणारा प्रकाश....आणि फटाक्यांचे 'धडाम- धूम' आवाज सुद्धा होते...सूर्यनारायण नुकतेच उगवून ते फटाक्यांचे 'कर्णभेदी' आवाज ऐकत होते....दररोज 'सोनेरी' दिसणारा त्यांचा प्रकाश आज मात्र 'फटाक्यांच्या' धुरामुळे 'धुराडी' रंगाचा दिसत होता....चिमण्यांचा 'चिवचिवाट' त्या 'फटाक्यांच्या' 'धडाम -धूम' आवाजात केंव्हाच विरून गेला होता.....आणि इकडे 'छोटा'निशांत  आपला अभंग्य 'स्नान' नुकतंच आटपून कपडे परिधान करत होता....त्याच कपडे लेऊन झालं होतं....आणि असाच आपल्या खिडकीबाहेर बघत थांबला होता....बाहेर रस्त्यावर त्याचा 'वर्गमित्र' आदित्य त्याच्या 'पप्पासोबत'  'अनार'पेटवत होता....ते 'अनार' पेटलं होत आणि  त्याचे 'स्पार्क' हवेत उंच उडाले होते...आणि त्याचा 'धूर' सुद्धा हवेत उडत होता....निशांत खरं तर खूप खोडकर....पण आज तो थोडा शांतच होता....आज वेगळ्याच आठवणीत त्याच्या मनाचा तो 'पक्षी' घिरट्या घालत होता....आणि रस्त्यावरच त्याच्या वर्गमित्राचं त्याच्या वडिलांसोबत 'मस्ती' करतानाचं ते दृश्य बघून तर आता 'फक्त' त्याच्या डोळ्यातून 'अश्रू' टपकायचेच तेवढे  बाकी राहिले होते....मोठ्या मुश्किलीने त्याने ते रोखले होते.....
                  तेवढ्यात 'निशांत' ची 'आई' त्याच्या रूममध्ये आली....."काय रे ओवाळून घ्यायचं नाही का तुला!".....या त्याच्या आईच्या आवाजाने त्याची तंद्री भंग पावली....तो आईकडे वळाला.... आणि त्याने थरथरत्या आवाजात आईला विचारले  "आई, पप्पा ह्यावेळेस तरी दिवाळी ला घरी येणार आहेत ना"!.........आणि त्याची आई फक्त आपल्या लाडक्या 'निशांत'ला खुश करण्यासाठी म्हणून गेली होती..."हो रे बाळा ह्यावेळेस तुझ्या पप्पानी दिवाळीला घरी येण्याचं 'प्रॉमिस' केलं आहे"!..... पण खरं तर तिला सुद्धा ह्या प्रश्नाचं उत्तरं माहीत नव्हतं.....लग्न होऊन  12 वर्ष झाली होती...त्यात फक्त दोन वेळेस 'निशांत' चा 'पप्पा' घरी आला होता.....शेवटच्या वेळेस जेंव्हा 'निशांत' चा  पप्पा 'दिवाळी' ला घरी आला होता त्याला आता 5 वर्ष झाली होती...ही प्रत्येक वेळी वाट बघायची आणि 'निशांत' ला काहीतरी सांगून वेळ निभावून नेयाययची...तिला आता त्याची सवय झाली होती......पण 'निशांत' चा  पप्पा तरी काय करणार...दरवेळेस तिकडे सीमेवर काहीतरी आणीबाणी यायची आणि त्याला सुट्टी कॅन्सल करून 'ड्युटी' वरचं थांबावं लागायचं.....शेवटी 'फॅमिली' पेक्षा 'देश' महत्वाचा होता ना......कारण तो फौजी होता आणि 'फौजी के लिये सबसे पहले देश,फिर उसका रेजिमेंट, फिर उसके साथी और सबसे लास्ट मे  फॅमिली'......हे तो विसरला नव्हता....ज्यांच्या विश्वासावर सारा देश 'दिवाळी' साजरी करत होता असा तो 'फौजी'.....
                कर्नल 'विजय महाडिक'......निशांत चा 'पप्पा'......कालच उद्या 'दिवाळीसाठी' घराकडे जाणार ह्या खुशीत झोपी गेले होते...आणि आज 'नरकचतुर्दशीच्या' सकाळी-सकाळीच कॅम्प वर बातमी येऊन धडकली होती की काही 'शत्रू' घुसकोरी करून बाजूच्या जंगलात लपून बसले आहेत....आणि लगेच यांनी आपली सुट्टी 'रद्द' केली होती....ते त्यांची 'टीम' घेऊन 'सर्च ऑपरेशन' साठी निघाले होते.....हळू - हळू ते   जंगलात शिरत होते....सूर्याच्या प्रकाशाला सुद्धा खाली जमिनीवर पडायला कसरत करावी लागत होती इतकं ते दाट 'जंगल' होत....तरीही तशेच ते पुढे पुढे सरकत होते...आता कॅम्प सोडून त्यांना एक तास झाला होतं... दाट जंगलात ते शिरले होते आणि सूर्याच्या प्रकाशाने सुद्धा आता त्यांची साथ सोडली होती.....आणि आणि अचानक एक गोळी सु-सु करत कर्नल च्या टीम मधील एका साथीदाराच्या छाताडावर आदळली....आणि रक्ताची एक 'चिळकांडी' उडून एका झुडपावर स्थिरावली....कर्नल ने आपल्या त्या पडणाऱ्या 'साथीदाराला' पकडले आणि झाडाचा 'आश्रय'घेऊन ते थांबले...त्यांच्या इतर साथीदार सुद्धा तसेच झाडाच्या आडोश्याला थांबले.... आता 'दिवाळी' सुरू झाली होती....तिकडून गोळ्यांचा वर्षाव होत होता....कर्नल आणि त्यांचे साथीदार सुद्धा त्यांना चोख प्रतिउत्तर देत होते....पण ते सुद्धा माघार घेयायला तयार नव्हते....शेवटी 'कर्नल' ने निर्धार केला...आता खूप झालं....आता दिवाळीचा 'बॉम्ब' फोडणार...त्याच्या एका साथीदाराला हे कळालं आणि त्याच्या तोंडावर विजयी हास्य उमटलं....आणि कर्नल ने 'हॅन्डग्रेनेड' चा लॉक तोंडाने काढून तो 'हॅन्डग्रेनेड' गोळ्या ज्या दिशेने येत होत्या त्या दिशेने भिरकावला.....आणि स्फोट झाला....आकाशात आगीबरोबर तीन देह उडताना त्याच्या सहकाऱ्यांना दिसलं आणि बाकीच काम त्यांनी पूर्ण केलं...गोळ्यांचा वर्षाव त्या तीन देहांच्या दिशेने केला...आणि काम संपवलं....आणि 'ऑपरेशन' संपवलं.....ते तीन 'मृतदेह' घेऊन त्यांची टीम कॅम्प मध्ये आले होते आणि कर्नल चे वरिष्ठ अधिकारी त्यांचं अभिनंदन करत होते....पण त्यांना त्यांचा एक साथीदार गमवावा लागला होता....ते सुद्धा आज 'दिवाळीच्या' दिवशीच.... म्हणून ते खूप दुःखी होते....'ऑपरेशन' यशस्वी झाल्याचा 'आनंद' या दुःखात कधीच विरून गेला होता.....
                    आणि आज दिवाळी झाल्या चार दिवसानंतर 'कर्नल' घरी आले होते....'निशांत' भलताच उत्साहात होता....तसं तर त्यांना त्याला खूप 'मनवावं' लागलं होतं....पण लवकरच तो 'पप्पासोबत मिसळून गेला....आणि आज टी. व्हि  वर गाणं लागलं होतं......  'जावो जो लौटके तुम तो घर हो खुषी से भरा.... साथी मुबारक हो तूम्हे  जष्ण ये जित का.....बस इतना याद रहे एक साथी और भी था....'

              आणि हे गाणं ऐकताच कर्नल च्या डोळ्यातून कधी 'अश्रू' आले आणि कधी त्यांनी जमिनीचा वेध घेतला हे त्यांचं त्यांनाच नाही कळालं..... आपल्या साथीदारांच्या आठवणीने......

 कुठल्याही स्तरावरचा त्याग करणाऱ्या 'भारतीय सेनेला' समर्पित........
 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


दत्तात्रय डोईफोडे,वाशिम.

चाल रे मण्या चाल रे गण्या बाजाराला,
खूप सारे फटाके, फराळ घेऊन येऊ घराला,

दिवाळीचा सिझन सुरू झाला की आता,
दुकानदार साहेब जरा स्वस्तात फटाके देता,

खरेदीच्या नादात घरी जायला खूप उशीर झाला,
देवालाच काळजी शेवटचा रिक्षावाला भेटला,

आता काय दिवाळीचा सगळीकडे  आपलाच धडाका,
कोणी समोर नाही येणार तेवढा फटाक्यांचा भडका,

कोणाला इथे आहे काळजी पर्यावरण प्रदूषणाची,
सगळेच करताहेत आपल्यापरीने आपल्याच मनाची,

लख्ख लख प्रकाश किती सगळीकडे दाटला,
कोण लक्ष देतो त्या प्रकशासाठी किती कोळसा अटला,

घरी सगळे जमलेत ताई, बाई, आणि अक्का,
आता सगळे मिळून देऊ एक आनंदाचा धक्का,
या दिवाळीत आमच्या सगळ्यांचा वि4 आहेच असा पक्का,
ही दिवाळी अशी साजरी करू पर्यावरणाला नाही लागणार बुक्का...
आणि पर्यावरणाचा समतोल ही राहील अगदी हक्का पक्का...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
किशोर शेळके,
लोणंद.

      आय. सी. यू. मधील ती भयाण शांतता, त्या मशीन मधून येणारा तो टिंग टिंग आवाज, डाॅक्टर आणि नर्सच्या काहीही आवाज न येऊ देता चाललेल्या हालचाली. बाहेरच्या बाजूला बसलेल्या नातेवाईकांचे हिरमुसलेले चेहरे, आणि समोर मरणासन्न अवस्थेत एकेका बेडवर पडलेले ते रूग्ण. या सर्वांच्या मधे, अगदी मधल्या बेडवर बारा वर्षांचा अथर्व मृत्यूशी झुंज देत होता. आज पाचवा दिवस आहे, तो आजिबातच हालला नव्हता, की डोळेदेखील उघडले नव्हते. त्याच्या डोक्याला चारही बाजूने पांढ-या पट्ट्या गुंडाळलेल्या होत्या. आय. सी. यू. च्या दाराजवळील काचेतून अथर्व चे बाबा अथर्व कडे एक टक बघत होते. दोन्ही गालांवर ओघळलेले अश्रू पुसायचेही भान नव्हते.

      पाच दिवस अंगावर एकच ड्रेस, तोंड धुण्यापलिकडे या पाच दिवसात अंगाला पाणी लागेलच नव्हते. कुणाच्यातरी आग्रहाखातर कसेबसे दोन घास घश्याखाली उतरत होते, तेही बेचवच. त्यांनी स्वतःलाच असे खाऊन टाकलेले की, हे जिवन नकोसं वाटत होतं. त्यांच्या बेचाळीस वर्षांच्या आयुष्यात पहिल्यांदाच ते स्वतःचा राग-राग आणि तिरस्कार करत होते. स्वतःलाच दोष देत होते. असेच विचार करत ते हाॅस्पिटल च्या गॅलरीत येऊन ऊभे राहीले, समोर अंधूक अंधूक धूर होता. हाॅस्पिटल च्या आतमध्ये असलेली शांतता बाहेर फटाक्यांच्या कर्कश्श आवाजात बदलली. आणि अथर्वचे बाबा आठवू लागले.....

      ऑफिसमधून आठ दिवसांची दिवाळीची सुट्टी घेतली होती. आता दिवाळी आहे म्हटल्यावर तेवढी सुट्टी पाहिजेच ना! बायको आणि एकच मुलगा, इतर वेळी या दोघांसाठी वेळ नसतोच मग दिवाळीत जरा जास्त वेळ देऊ, या हेतूने मी चार दिवस अगोदर च सुट्टी काढली. बरीच खरेदी करायची होती आणि एकुलत्या एका मुलाला हा सगळा वेळ द्यायचा होता. एक दिवस जरा आरामच केला, कोणतेच काम हाती घेतले नाही. जरा कंटाळा घालवावा या हेतूने घरातच बसून राहिलो. दुस-या दिवशी सर्वांनीच लवकर आवरलं. मी गाडी बाहेर काढली, तेवढ्यात शेजारचे घुले गुरूजी माझ्याजवळ आले आणि म्हणाले,
" काय अथर्वचे पप्पा, कुठे चाललात"?
मी म्हणालो,
" दिवाळीची खरेदी करायला, आता आठवड्याची सुट्टी काढली आहे. आता बायकोची अन् मुलाची हौस पुरवतो."
घुले गुरूजी म्हणाले,
" दिवाळी आनंदाने साजरा केली जाते, हौसेने नाही. मजा करा पण हवा तेवढाच खर्च करा."

      मी काही बोलणार इतक्यात माझी बायको अन् अथर्व आला. आम्ही गुरूजींचा निरोप घेतला अन् निघून गेलो. दिवसभर भरपूर खरेदी केली. संध्याकाळी घरी आल्यावर, गुरूजी बाहेरच बसलेले, म्हणाले,
 " काय काय खरेदी केली अथर्व."

   अथर्व म्हणाला, " आजोबा आम्ही भरपूर फटाके घेतलेत, अन् खाऊ पण आणलाय."
" आणि चित्रे आणलीस का रे किल्ल्यावर मांडायला ".- गुरूजी
"नाही आजोबा, मला नाही आवडत किल्ला बिल्ला."
असे म्हणून अथर्व आणि अथर्वची आई घरात गेली, मला घुले गुरूजींनी बोलवून घेतले.
" अथर्वचे पप्पा, मुलांनी या वयात ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी शिकल्याच पाहिजेत."
"म्हणजे?" मी.
        गुरूजी बोलले, " आपला इतिहास साधू संतांच्या विचारांचा, शिवाजी महाराजांच्या शौर्याचा, किल्ले अन् पर्वतांच्या. आपण मुलांना या सर्वांचे महत्व सांगितले पाहिजे. फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करायची आपली संस्कृती नाही. फटाक्यांचे दुष्परिणामांचा आणि प्रदुषणाचा तुम्हाला अंदाज असलेच की, बाकी तुम्ही जास्त शिकलाय तुमच्या लक्षात आले असेलच.".

       मी मनातून खुप रागावलो, पण काही बोलू शकत नव्हतो. "बर" म्हटले आणि घरात निघून गेलो. त्यावेळी मला राग आला, पण रागाचा दृष्टिकोन नकारात्मक होता. जर सकारात्मक असता तर आज अथर्व इथं बेडवर नसता. तो घरीच असता, खेळत, मातीच्या किल्ल्यावर. एक शूर मावळा असता रात्रंदिन गड राखत. आणि मलाही अभिमान असता.
     इतक्यात समोर घुले गुरूजी दिसले. थांबलेले अश्रू पुन्हा वाहू लागले. आणि मी मान खाली घालून थोडं साईडला आलो. आणि घुले गुरूजी धीर देण्याच्या सुरात म्हणाले, " अथर्वचे पप्पा, मी गावी गेलेलो, रात्री उशिरा घरी आलो, आणि आत्ता सकाळी लवकर इकडे आलो. अथर्वला नेमकं..."
    मी त्यांचे वाक्य अर्धवट तोडून बोलू लागलो.
       "गुरूजी, तुम्ही मला जे सांगितलं ते मी ऐकायला पाहिजे होते. परवा सकाळी अथर्व लवकर उठून फटाके फोडण्यासाठी खाली रस्त्यावर आला. मी घरातच होतो. काॅलनीतील इतर मुले होती तिथे. फटाके फोडत होता. फटाक्यांच्या धुराने एवढा अंधार होता की, सामोरचं काहीच दिसत नव्हतं. रस्त्यावरून एक कार जोरात येत होती, अथर्व फटाका लावून पलिकडच्या बाजूने पळतच अलिकडे आला. आणि त्या येणा-या कारने...."


      माझा हुंदका अनावर झाला. गुरूजी पुन्हा धीर देत म्हणाले. " होईल सगळं ठीक, थोडा धीर धर".

      थोड्या वेळाने मी हाॅस्पिटलच्या खाली आलो. तर तिथे एक मुलगा फटाका फोडत होता, मी त्याच्याजवळ गेलो, त्याला घेऊन त्याच्या बाबांकडे गेलो. आणि त्याच्या बाबांना घुले गुरूजींनी सांगितलेलं सगळं सांगितलं....... ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


   डॉ. विजयसिंह पाटील,कराड.

         दिवाळी चार दिवसावर आलेली. व्यायामाला बऱ्याच जणांनी दांडी मारलेली. इंजिनिअर , गोडबोले गावी गेलेले . आबा रानात मुक्कामी , लानीच्या कामात व्यस्त, घोलपसाहेब पुण्याला मुलांकडे  दिवाळी साजरी करायला गेलेले.
हॉटेलात घारे, मी आणि मुळे टेलर एव्हढेच हजर होतो.  तेव्हड्यात कावळे सर तोंडातल्या तोंडात बडबडतं आत आले. भयंकर चिडलेले दिसत होते. ( हे एक तर चिडलेले असतात नाहीतर विचारात असतात.!)
भुई उडवून घारेनी काय झाले आता ? असं विचारताच , बंदुकीच्या गोळ्यांप्रमाणे त्यांच्या तोंडातून शब्द पडू लागले. ' हल्लीच्या मुलांना सगळं रेडिमेड पाहिजे, स्वतः काही करायला नको, नुसतं पैसे खर्च करायचा उद्योग , नॉनसेन्स ". अहो पण झालं तरी काय असं विचारताचं " तयार रेडिमेड किल्ला घेण्यासाठी नातवाने काल दिवसभर डोकं खाल्लं, वैतागून संध्याकाळी गेलो बाजारात. आणि घेतला एक तयार किल्ला, दोन हजार रुपयांना लागला चुना " चुना हा शब्द ऐकताच अर्धवट झोपेत असलेल्या घारेंनी रिफ्लेक्स ऍक्शनने पुडी सरांच्या पुढं धरली. तंबाखू हातात घेऊन ती खाण्याच्या बेतात असताना मुळे म्हणाले ' सर तुमचा आक्षेप नक्की कशाला आहे ? मुलं काही कष्ट करत नाहीत याला की पैसे खर्च करायला ?'..
उत्तर देणे अवघड आहे हे लक्षात आल्यावर सर  मुकाट्यानं तंबाखूची गुळणी धरून बसले.
शेजारच्या टेबलावर मेडिकल कॉलेजची(परप्रांतातील, युपी. कडील) हायफाय मुलं बसली होती. त्यांनी हिंदीत विचारले  ' मग तुम्ही किल्ला कसा करायचा ?' .
घारे पेंगत होते, कावळेंनी गुळणी धरली होती. आणि मी नेहमी फक्त ऐकायचं काम  करायचो (अहो मी मंद बुद्धीचा,, ऐकायला बुद्धीची गरज लागत नाही असं मी ऐकून आहे.) .
तेव्हड्यात मुळे म्हणाले ' सांगतो मी  ' ह्यावेळी मुळेंच्या डोळ्यात एक वेगळीच चमक मला जाणवली. पुढं मुळे म्हणाले 'सहामाही परीक्षा संपली, की आपोआप जवळ आलेल्या दिवाळीचं वेगळं वातावरण जाणवायचं . त्या वातावरणाची जादू म्हणा किंवा थोड्याच दिवसात आलेल्या दिवाळीचं आकर्षण जाणवू लागायचं  म्हणा .. सुट्टी लागल्याने दिवसभर आम्ही मोकळेच, मग  आमची किल्ला तयार करायची धामधूम सुरू व्हायची. आजूबाजूला पडलेल्या विटा, दगड गोळा करून ठेवोयचो.
मग आमचा दौरा नदीकडे.दरडीची माती ठिक्यात भरून घरी यायचं. (कधीकधी ठिकी मिळाली नाही तर घमेल्यातून माती आणायला लागायची .)
एव्हडं काम झालं की आमची मित्रांची मिटिंग बसायची. मग किल्ला कसा करायचा ह्याची चर्चा.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सगळेजण जमायचे. पहिलं काम पाया तयार करायचं. भिंतीलगत विटांचे तुकडे अगदी मापात बसवायचे. मग वर दगडं रचायचं भिंतीला लागून.
मग वरून मापात माती टाकून ओभडधोबड किल्ला तय्यार व्हायचा .मातीवर पाणी मारून कच्चं सावरायचं . संध्याकाळी परत मिटिंग बसायची. प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या.
कोणतीतरी कल्पना पसंद पडायची. किल्ल्याच्या एका बाजूला गुहा करायचं ठरलं. झालं... आम्ही एक गोल लोखंडी डब्याच्या शोधात प्रत्येकाचं घर धुंडाळायचो . डबा सापडला की आमचा दौरा कुंभारवाड्याकडे कूच करायचा. निरखून पारखून वाघ घ्यायचा.
तिसऱ्या दिवशी किल्ल्याच्या एका बाजुची माती काढून डबा आतं अश्या प्रकारे पुरायचा की नुसतं त्याचं उघडं तोंड दिसावं . झाली गुहा.. वाघ त्यात बसवला की आम्ही दूर जाऊन गुहा पहायचो. पोजीशन पसंत पडली की हुश्श करत घरी जायचो.

मग किल्ल्याच्या पायऱ्यांचे काम सुरू व्हायचे. काडेपेटीच्या आतील भागात माती भरून त्याचा ठसा उठवला की झाली एक पायरी. त्यावर दुसरी, अश्या चढत्या श्रेणीने, वळणं वळणं घेत पायऱ्या थेट वरपर्यंत शिवाजी महाराजांच्या सिंहासना जवळ जायच्या. पायऱ्या वाळवत ठेवायच्या. पक्या वाळेपर्यंत..
सैनिक/ मावळे कुठं कुठं ठेवायचे याच्यावर चर्चा , क्वचित वादही व्हायचे. (आम्हाला मावळे मिळायचेच पाच सहा , तेही तीन चार इंच उंचीचे ).
जागा फिक्स झाली की तिथंली जागा सपाट करून हातानं थापायची.
आणि मग किल्ल्याच्या माथ्यावर शिवाजी महाराजांचे सिंहासन करायला जुपी करायची. आडव्या दोन विटा ठेवायच्या. त्या मातीने लिंपायच्या. पुढील दोन कोपऱ्यात दोन मातीचं वेढणं करायची. मग सर्व किल्ल्यावरून मातीचं हलकं लिंपण द्यायचं. शेवटी
किल्ल्याच्या समोर आणि आजूबाला माती पसरून हाळीवाच्या बिया टाकायच्या , रोज  पाणी शिंपडायचं, दोन दिवसात रोपे यायची. झालं किल्ल्याच्या सभोवतालचं जंगल.
कुंभारवाड्यात जाऊन शिवाजी महाराजांचा पुतळा आणि मावळे घेऊन किल्ल्यावर ठेवायचे..' असा हा आमचा किल्ला तयार व्हायचा ...
मुलं नवीन इंटरेस्टिंग माहिती मिळाल्याने खुश झाली. कावळे सरांनी अगदी असंच आम्ही किल्ला बनवायचो अशी टिपण्णी केली. पण दोन हजार गेल्याचं दुःख त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही स्पष्ट दिसत होते...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************